PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त १ ते १०

ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - मधुच्छंदस् वैश्वामित्र : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


स्वादि॑ष्ठया॒ मदि॑ष्ठया॒ पव॑स्व सोम॒ धार॑या ।
इन्द्रा॑य॒ पात॑वे सु॒तः ॥ १ ॥

स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्व सोम धारया इन्द्राय पातवे सुतः ॥ १ ॥

अत्यंत रुचकर, अत्यंत मधुर अशा धारेनें, हे सोमरसा, तूं स्वच्छ प्रवाहानें वहात रहा. इंद्रानें प्राशन करावा म्हणून तुझा रस पिळला आहे. १.


र॒क्षो॒हा वि॒श्वच॑र्षणिर॒भि योनि॒मयो॑हतम् ।
द्रुणा॑ स॒धस्थ॒मास॑दत् ॥ २ ॥

रक्षः हा विश्व चर्षणिः अभि योनिं अयः हतं द्रुणा सध स्थं आ असदत् ॥ २ ॥

राक्षसांचा नाश करणारा, सर्वदर्शी सोम, (सुवर्णाच्या अथवा) लोहाच्या बत्त्यानें किंवा काष्टानें जेथें कुटतात अशा आपल्या गृहांत (अथवा खलांत) अधिष्ठित झाला आहे. २.


व॒रि॒वो॒धात॑मो भव॒ मंहि॑ष्ठो वृत्र॒हन्त॑मः ।
पर्षि॒ राधो॑ म॒घोना॑म् ॥ ३ ॥

वरिवः धातमः भव मंहिष्ठः वृत्रहन् तमः पर्षि राधः मघोनाम् ॥ ३ ॥

तूं इच्छिताची प्राप्ति उत्कृष्टरीतीनें करून देणारा, अत्यंत दानशील आणि अज्ञानाचा समूळ नाश करणारा हो; दानशूर यजमानांची देणगी तूंच इकडे आणतोस. ३.


अ॒भ्यर्ष म॒हानां॑ दे॒वानां॑ वी॒तिमन्ध॑सा ।
अ॒भि वाजं॑ उ॒त श्रवः॑ ॥ ४ ॥

अभि अर्ष महानां देवानां वीतिं अन्धसा अभि वाजं उत श्रवः ॥ ४ ॥

श्रेष्ठ असे जे दिव्यविबुध त्यांच्या यज्ञाकडे आपल्या पेयाच्या योगानें वहात रहा. आणि सत्यबल आणि सत्कीर्ति यांना आमच्याकडे वहात आण. ४.


त्वां अच्छा॑ चरामसि॒ तदिदर्थं॑ दि॒वे-दि॑वे ।
इन्दो॒ त्वे न॑ आ॒शसः॑ ॥ ५ ॥

त्वां अच्च चरामसि तत् इत् अर्थं दिवे दिवे इन्दो इति त्वे इति नः आशसः ॥ ५ ॥

आम्हीं तुझ्याच सेवेंत व्यापृत आहोंत. प्रतिदिवशीं तें आमचें कर्तव्यच आहे. हे आल्हादप्रद रसा, आमच्या आकांक्षा तुझ्या ठायीं एकवटल्या आहेत. ५.


पु॒नाति॑ ते परि॒स्रुतं॒ सोमं॒ सूर्य॑स्य दुहि॒ता ।
वारे॑ण॒ शश्व॑ता॒ तना॑ ॥ ६ ॥

पुनाति ते परि स्रुतं सोमं सूर्यस्य दुहिता वारेण शश्वता तना ॥ ६ ॥

पात्रांत पाझरलेल्या सोमरसाला सूर्याची कन्या (श्रद्धादेवी) ही अभंग आणि विस्तृत अशा पवित्रांतून गाळून स्वच्छ करते. ६.


तं ईं॒ अण्वीः॑ सम॒र्य आ गृ॒भ्णन्ति॒ योष॑णो॒ दश॑ ।
स्वसा॑रः॒ पार्ये॑ दि॒वि ॥ ७ ॥

तं ईं अण्वीः स मर्ये आ गृभ्णन्ति योषणः दश स्वसारः पार्ये दिवि ॥ ७ ॥

अंगुलीरूप दहा तरुणी परस्परांच्या भगिनी त्या सोमाला अभिषव पात्रांत यज्ञाच्या शेवटच्या दिवसापर्यंत जपून ठेवतात. ७.


तं ईं॑ हिन्वन्त्य॒ग्रुवो॒ धम॑न्ति बाकु॒रं दृति॑म् ।
त्रि॒धातु॑ वार॒णं मधु॑ ॥ ८ ॥

तं ईं हिन्वन्ति अग्रुवः धमन्ति बाकुरं दृतिं त्रि धातु वारणं मधु ॥ ८ ॥

त्या ललना त्याला पात्रांत खळखळ ओततात, नंतर रस भरण्यासाठीं एक फुगीर भोत फुंकून फुगवितात, आणि सोमाचें तीन प्रकारचें दुःखहारक मधुरपेय बनवितात. ८.


अ॒भी१ममघ्न्या॑ उ॒त श्री॒णन्ति॑ धे॒नवः॒ शिशु॑म् ।
सोमं॒ इन्द्रा॑य॒ पात॑वे ॥ ९ ॥

अभि इमं अघ्न्याः उत श्रीणन्ति धेनवः शिशुं सोमं इन्द्राय पातवे ॥ ९ ॥

मग इंद्रानें रस प्राशन करावा म्हणून निर्दोष अशा धेनू सोमरूप वत्साला दुग्धाशीं मिश्रित करतात. ९.


अ॒स्येदिन्द्रो॒ मदे॒ष्व् आ विश्वा॑ वृ॒त्राणि॑ जिघ्नते ।
शूरो॑ म॒घा च॑ मंहते ॥ १० ॥

अस्य इत् इन्द्रः मदेषु आ विश्वा वृत्राणि जिघ्नते शूरः मघा च मंहते ॥ १० ॥

म्हणजे त्याच्या प्राशनानें होणार्‍या हर्षावेगांत इंद्र हा सर्व तमोरूप शत्रूंचा समूळ नाश करतो; आणि भक्तांना तो शूर देव वरदानें अर्पण करतो. १०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त २ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - मेध्यातिथि काण्व : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


पव॑स्व देव॒वीरति॑ प॒वित्रं॑ सोम॒ रंह्या॑ ।
इन्द्रं॑ इन्दो॒ वृषा वि॑श ॥ १ ॥

पवस्व देव वीः अति पवित्रं सोम रंह्या इन्द्रं इन्दो इति वृषा आ विश ॥ १ ॥

सोमा, तूं देवसेवोत्सुक आहेस म्हणून या स्वच्छ पवित्रांतून वेगानें वहा. हे आल्हादप्रद रसा, वीर्यशाली असा तूं इंद्राच्या ठिकाणीं प्रवेश कर. १.


आ व॑च्यस्व॒ महि॒ प्सरो॒ वृषे॑न्दो द्यु॒म्नव॑त्तमः ।
आ योनिं॑ धर्ण॒सिः स॑दः ॥ २ ॥

आ वच्यस्व महि प्सरः वृषा इन्दो इति द्युम्नवत् तमः आ योनिं धर्णसिः सदः ॥ २ ॥

वीर्यशाली रसा, तुझा उत्तमोत्तम प्रसाद आम्हांस दे. हे आल्हादप्रदा, तूं अत्यंत तेजस्वी आणि लोकधारक असा स्वस्थानीं अधिष्ठित हो. २.


अधु॑क्षत प्रि॒यं मधु॒ धारा॑ सु॒तस्य॑ वे॒धसः॑ ।
अ॒पो व॑सिष्ट सु॒क्रतुः॑ ॥ ३ ॥

अधुक्षत प्रियं मधु धारा सुतस्य वेधसः अपः वसिष्ट सु क्रतुः ॥ ३ ॥

आनंदोत्पादक सोमरसाच्या धारेनें प्रिय आणि मधुर असें पेय बनविलें; पहा त्या सत्कर्मप्रवर्तक सोमानें (वसतीवरी) उदकांना आच्छादून टाकलें. ३.


म॒हान्तं॑ त्वा म॒हीरन्व् आपो॑ अर्षन्ति॒ सिन्ध॑वः ।
यद्गोभि॑र्वासयि॒ष्यसे॑ ॥ ४ ॥

महान्तं त्वा महीः अनु आपः अर्षन्ति सिन्धवः यत् गोभिः वासयिष्यसे ॥ ४ ॥

जेव्हां दुग्धासह (म्हणजे दुग्धमिश्रित होऊन) तूं एकत्र राहतोस, तेव्हां श्रेष्ठ जो तूं त्या तुझ्याकडे श्रेष्ठ नद्याहि वहात येतात. ४.


स॒मु॒द्रो अ॒प्सु मा॑मृजे विष्ट॒म्भो ध॒रुणो॑ दि॒वः ।
सोमः॑ प॒वित्रे॑ अस्म॒युः ॥ ५ ॥

समुद्रः अप् सु ममृजे विष्टम्भः धरुणः दिवः सोमः पवित्रे अस्म युः ॥ ५ ॥

हर्षाचा समुद्र, भूलोकाचा स्तंभ, द्युलोकाचा धारणकर्ता, आणि आम्हांला प्रिय असा सोमरसहि पवित्रांतून पाझरून उदकांत जाऊन मिसळतो. ५.


अचि॑क्रद॒द्वृषा॒ हरि॑र्म॒हान् मि॒त्रो न द॑र्श॒तः ।
सं सूर्ये॑ण रोचते ॥ ६ ॥

अचिक्रदत् वृषा हरिः महान् मित्रः न दर्शतः सं सूर्येण रोचते ॥ ६ ॥

हरिद्वर्ण, श्रेष्ठ, आणि मित्राप्रमाणें दर्शनीय अशा सोमरूपी वृषभानें गर्जना केली आहे. सूर्याबरोबर तोहि तेजानें तळपत आहे. ६.


गिर॑स्त इन्द॒ ओज॑सा मर्मृ॒ज्यन्ते॑ अप॒स्युवः॑ ।
याभि॒र्मदा॑य॒ शुम्भ॑से ॥ ७ ॥

गिरः ते इन्दो इति ओजसा मर्मृज्यन्ते अपस्युवः याभिः मदाय शुम्भसे ॥ ७ ॥

आल्हादप्रदा, आमच्या सत्कर्मोत्सुक वाणी तुझ्या तेजानें अलंकृत होतात; आणि इंद्राला हर्ष व्हावा म्हणून त्या प्रार्थनांनी तूंहि सुशोभित होतोस. ७.


तं त्वा॒ मदा॑य॒ घृष्व॑य उलोककृ॒त्नुं ई॑महे ।
तव॒ प्रश॑स्तयो म॒हीः ॥ ८ ॥

तं त्वा मदाय घृष्वये ओं इति लोक कृत्नुं ईमहे तव प्र शस्तयः महीः ॥ ८ ॥

तर देवानें हर्षोत्फुल्ल व्हावें, त्यानें शत्रूंचा दर्प चिरडून टाकावा म्हणून तुज पाप विमोचकाची विनवणी आम्हीं करीत आहों, खरोखर तुझी प्रशंसा तशीच श्रेष्ठ आहे. ८.


अ॒स्मभ्यं॑ इन्दव् इन्द्र॒युर्मध्वः॑ पवस्व॒ धार॑या ।
प॒र्जन्यो॑ वृष्टि॒माँ इ॑व ॥ ९ ॥

अस्मभ्यं इन्दो इति इन्द्र युः मध्वः पवस्व धारया पर्जन्यः वृष्टिमान् इव ॥ ९ ॥

आल्हादप्रद रसा, इंद्राच्या भेटीसाठीं उत्सुक झालेला असा तूं उदकवृष्टी करणार्‍या पर्जन्याप्रमाणें आमच्यासाठीं मधुर धारेनें वहात रहा. ९.


गो॒षा इ॑न्दो नृ॒षा अ॑स्य् अश्व॒सा वा॑ज॒सा उ॒त ।
आ॒त्मा य॒ज्ञस्य॑ पू॒र्व्यः ॥ १० ॥

गो साः इन्दो इति नृ साः असि अश्व साः वाज साः उत आत्मा यजस्य पूर्व्यः ॥ १० ॥

आल्हादप्रद रसा, तूं धेनू प्राप्त करून देणारा, शूर सैनिक मिळवून देणारा, अश्व मिळवून देणारा आणि सत्वसामर्थ्य उपलब्ध करून देणारा आहेस. तसाच यज्ञाचा पुरातन आत्माहि तूंच आहेस. १०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ३ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - शुनःशेप आजीगर्ति : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


ए॒ष दे॒वो अम॑र्त्यः पर्ण॒वीरि॑व दीयति ।
अ॒भि द्रोणा॑न्य् आ॒सद॑म् ॥ १ ॥

एषः देवः अमर्त्यः पर्णवीः इव दीयति अभि द्रोणानि आसदम् ॥ १ ॥

पहा, हा मृत्युरहित दिव्यसोम द्रोणकलशांत अधिष्ठित होण्यासाठीं त्या कलशाकडे पक्ष्याप्रमाणें उड्डाण करून जात आहे .१.


ए॒ष दे॒वो वि॒पा कृ॒तो॑ऽति॒ ह्वरां॑सि धावति ।
पव॑मानो॒ अदा॑भ्यः ॥ २ ॥

एषः देवः विपा कृतः अति ह्वरांसि धावति पवमानः अदाभ्यः ॥ २ ॥

हा दिव्यरस, मुखानें स्तुतिघोष करीत असतां पिळून सिद्ध केलेला हा अजिंक्य रस, आपल्या पवित्र प्रवाहानें वहात वहात कपटी शत्रूवर धांवून जातो. २.


ए॒ष दे॒वो वि॑प॒न्युभिः॒ पव॑मान ऋता॒युभिः॑ ।
हरि॒र्वाजा॑य मृज्यते ॥ ३ ॥

एषः देवः विपन्यु भिः पवमानः ऋतयु भिः हरिः वाजाय मृज्यते ॥ ३ ॥

हा दिव्यरस, सद्धर्मप्रेमी स्तोतृजनांनीं सत्वसामर्थ्य प्राप्तिसाठीं अलंकृत केला आहे; ३.


ए॒ष विश्वा॑नि॒ वार्या॒ शूरो॒ यन्न् इ॑व॒ सत्व॑भिः ।
पव॑मानः सिषासति ॥ ४ ॥

एषः विश्वानि वार्या शूरः यन् इव सत्व भिः पवमानः सिसासति ॥ ४ ॥

हा पवित्रप्रवाही रस, सत्वबलांनीं युक्त होऊन गमन करणार्‍या वीराप्रमाणें यच्चावत् अभिलक्षणीय वस्तु जिंकून आणतो. ४.


ए॒ष दे॒वो र॑थर्यति॒ पव॑मानो दशस्यति ।
आ॒विष् कृ॑णोति वग्व॒नुम् ॥ ५ ॥

एषः देवः रथर्यति पवमानः दशस्यति आविः कृणोति वग्वनुम् ॥ ५ ॥

हा दिव्यसोम महारथ्याप्रमाणें वेगानें पुढें जातो. हा पवित्रप्रवाही रस इच्छित देतो आणि "वर माग" अशी स्पष्टपणें गर्जना करतो. ५.


ए॒ष विप्रै॑र॒भिष्टु॑तोऽ॒पो दे॒वो वि गा॑हते ।
दध॒द्रत्ना॑नि दा॒शुषे॑ ॥ ६ ॥

एषः विप्रैः अभि स्तुतः अपः देवः वि गाहते दधत् रत्नानि दाशुषे ॥ ६ ॥

स्तवनज्ञ भक्तांनीं स्तविलेला हा सोमदेव, भक्तांना रत्‍नसंपत्ति देऊन उदकांत निमज्जन करतो. ६.


ए॒ष दिवं॒ वि धा॑वति ति॒रो रजां॑सि॒ धार॑या ।
पव॑मानः॒ कनि॑क्रदत् ॥ ७ ॥

एषः दिवं वि धावति तिरः रजांसि धारया पवमानः कनिक्रदत् ॥ ७ ॥

आपल्या धारेनें पवित्रपणें वाहणारा हा रस गर्जना करीत रजोलोकाच्याहि पार निघून द्युलोकापर्यंत धांवत जातो. ७.


ए॒ष दिवं॒ व्य् आस॑रत् ति॒रो रजां॒स्य् अस्पृ॑तः ।
पव॑मानः स्वध्व॒रः ॥ ८ ॥

एषः दिवं वि आ असरत् तिरः रजांसि अस्पृतः पवमानः सु अध्वरः ॥ ८ ॥

हा अप्रतिहत, पवित्रप्रवाही आणि अध्वरयागांना साङ्ग करणारा सोमरस रजोलोकांतून पार निघून द्युलोकापर्यंत पसरतो. ८.


ए॒ष प्र॒त्नेन॒ जन्म॑ना दे॒वो दे॒वेभ्यः॑ सु॒तः ।
हरिः॑ प॒वित्रे॑ अर्षति ॥ ९ ॥

एषः प्रत्नेन जन्मना देवः देवेभ्यः सुतः हरिः पवित्रे अषर्ति ॥ ९ ॥

हा दिव्यरस, दिव्यविभूतिसाठीं पिळलेला हरिद्वर्ण रस, आपल्या पुरातन, जन्मानें निर्दोष, अशा पवित्रांतून वहात आहे. ९.


ए॒ष उ॒ स्य पु॑रुव्र॒तो ज॑ज्ञा॒नो ज॒नय॒न्न् इषः॑ ।
धार॑या पवते सु॒तः ॥ १० ॥

एषः ओं इति स्यः पुरु व्रतः जजानः जनयन् इषः धारया पवते सुतः ॥ १० ॥

असा तो अनेक धर्माचरणांचा प्रणेता (सोम), स्वतः प्रकट होऊन भक्तांमध्यें उत्साह उत्पन्न करून पिळला गेला म्हणजे आपल्या धारेनें पवित्र प्रवाहानें वाहत रहातो. १०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ४ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - हिरण्यस्तूप अंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


सना॑ च सोम॒ जेषि॑ च॒ पव॑मान॒ महि॒ श्रवः॑ ।
अथा॑ नो॒ वस्य॑सस्कृधि ॥ १ ॥

सना च सोम जेषि च पवमान महि श्रवः अथ नः वस्यसः कृधि ॥ १ ॥

सोमा, तूं आम्हांस वरदान दे. हे पावना, तूं आमच्यासाठी महत्कीर्ति जिंकून आण; आणि आम्हांला श्रेयप्राप्तिविषयीं उत्सुक कर. १.


सना॒ ज्योतिः॒ सना॒ स्व१ र्विश्वा॑ च सोम॒ सौभ॑गा ।
अथा॑ नो॒ वस्य॑सस्कृधि ॥ २ ॥

सना ज्योतिः सना स्वः विश्वा च सोम सौभगा अथ नः वस्यसः कृधि ॥ २ ॥

आम्हांला प्रकाश दे; दिव्यतेज दे; हे सोमा, यच्चावत् मंगलें आमच्या आधीन कर; आणि आम्हांला श्रेयःप्राप्तिविषयीं उत्सुक कर. २.


सना॒ दक्षं॑ उ॒त क्रतुं॒ अप॑ सोम॒ मृधो॑ जहि ।
अथा॑ नो॒ वस्य॑सस्कृधि ॥ ३ ॥

सना दक्षं उत क्रतुं अप सोम मृधः जहि अथ नः वस्यसः कृधि ॥ ३ ॥

चातुर्यबल दे; कर्तृत्व दे; हे सोमा, आम्हांवर हल्ला करणार्‍यांना हांकून देऊन ठार कर; आणि आम्हांला श्रेयःप्राप्तिविषयीं उत्सुक कर. ३.


पवी॑तारः पुनी॒तन॒ सोमं॒ इन्द्रा॑य॒ पात॑वे ।
अथा॑ नो॒ वस्य॑सस्कृधि ॥ ४ ॥

पवीतारः पुनीतन सोमं इन्द्राय पातवे अथ नः वस्यसः कृधि ॥ ४ ॥

सोमरस गाळून स्वच्छ करणारांनो, तो रस इंद्राला प्राशन करावयाचा आहे म्हणून तो गाळून स्वच्छ करा. आणि हे सोमा, तूं आम्हांला श्रेयः प्राप्तिविषयीं उत्सुक कर. ४.


त्वं सूर्ये॑ न॒ आ भ॑ज॒ तव॒ क्रत्वा॒ तवो॒तिभिः॑ ।
अथा॑ नो॒ वस्य॑सस्कृधि ॥ ५ ॥

त्वं सूर्ये नः आ भज तव क्रत्वा तव ऊति भिः अथ नः वस्यसः कृधि ॥ ५ ॥

सूर्य प्रकाशित झाला असतां त्या प्रकाशांत तुझ्या कर्तृत्वानें, आणि तुझ्या सहायशक्तींनीं, आमचा भाग राहील असें कर, आणि आम्हांला श्रेयसोत्सुक कर. ५.


तव॒ क्रत्वा॒ तवो॒तिभि॒र्ज्योक् प॑श्येम॒ सूर्य॑म् ।
अथा॑ नो॒ वस्य॑सस्कृधि ॥ ६ ॥

तव क्रत्वा तव ऊति भिः ज्योक् पश्येम सूर्यं अथ नः वस्यसः कृधि ॥ ६ ॥

तुझ्या कर्तृत्वानें आणि तुझ्या सहायांनीं सूर्यप्रकाश निरंतर पाहूं असे घडीव, आणि आम्हांस श्रेयसोत्सुक कर. ६.


अ॒भ्यर्ष स्वायुध॒ सोम॑ द्वि॒बर्ह॑सं र॒यिम् ।
अथा॑ नो॒ वस्य॑सस्कृधि ॥ ७ ॥

अभि अर्ष सु आयुध सोम द्वि बर्हसं रयिं अथ नः वस्यसः कृधि ॥ ७ ॥

हे उत्तम आयुधधारी सोमा, उभयलोकांतील ऐश्वर्य आमच्याकडे वहात आण, आणि आम्हांस श्रेयसोत्सुक कर. ७.


अ॒भ्य१र्षान॑पच्युतो र॒यिं स॒मत्सु॑ सास॒हिः ।
अथा॑ नो॒ वस्य॑सस्कृधि ॥ ८ ॥

अभि अर्ष अनपच्युतः रयिं समत् सु ससहिः अथ नः वस्यसः कृधि ॥ ८ ॥

तूं अपराजित आणि समरांत शत्रूंना चिरडून टाकणारा आहेस, तर आमच्याकडे अढळ ऐश्वर्य वहात आण आणि आम्हांला श्रेयसोत्सुक कर. ८.


त्वां य॒ज्ञैर॑वीवृध॒न् पव॑मान॒ विध॑र्मणि ।
अथा॑ नो॒ वस्य॑सस्कृधि ॥ ९ ॥

त्वां यजैः अवीवृधन् पवमान वि धर्मणि अथ नः वस्यसः कृधि ॥ ९ ॥

नानाप्रकारचे धर्माचार आहेत तरी भक्तांनीं यज्ञद्वाराच तुझें माहात्म्य वाढविलें आहे तर आम्हांस श्रेयसोत्सुक कर. ९.


र॒यिं न॑श्चि॒त्रं अ॒श्विनं॒ इन्दो॑ वि॒श्वायुं॒ आ भ॑र ।
अथा॑ नो॒ वस्य॑सस्कृधि ॥ १० ॥

रयिं नः चित्रं अश्विनं इन्दो इति विश्व आयुं आ भर अथ नः वस्यसः कृधि ॥ १० ॥

हे आल्हादप्रदा, आम्हांला अद्‌भुत, अश्वसमृद्ध, आणि सर्वांना जीवन देणारें सर्वात्मभावाचें ऐश्वर्य दे. अर्थात् आम्हांला श्रेयसोत्सुक कर. १०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ५ (आप्रिसूक्त)

ऋषी - असित काश्यप : देवता - आप्रीसूक्त : छंद - गायत्री, अनुष्टुभ्


समि॑द्धो वि॒श्वत॒स्पतिः॒ पव॑मानो॒ वि रा॑जति ।
प्री॒णन् वृषा॒ कनि॑क्रदत् ॥ १ ॥

सं इद्धः विश्वतः पतिः पवमानः वि राजति प्रीणन् वृषा कनिक्रदत् ॥ १ ॥

हा देदीप्यमान, सर्वाधिपति, भक्तपावन, वीर्यशाली सोम प्रसन्नान्तःकरणानें मोठ्यानें गर्जना करीतच येथें विराजमान झाला आहे. १.


तनू॒नपा॒त् पव॑मानः॒ शृङ्गे॒ शिशा॑नो अर्षति ।
अ॒न्तरि॑क्षेण॒ रार॑जत् ॥ २ ॥

तनूनपात् पवमानः शृङ्गेइति शिशानः अर्षति अन्तरिक्षेण रारजत् ॥ २ ॥

भक्तरक्षक, पतितपावन, सोम अन्तरिक्षांत सुप्रकाशित होऊन आपलीं पल्लवरूप शिंगें पाजळीत यज्ञमंडपाकडे येतो. २.


ई॒ळेन्यः॒ पव॑मानो र॒यिर्वि रा॑जति द्यु॒मान् ।
मधो॒र्धारा॑भि॒रोज॑सा ॥ ३ ॥

ईळेन्यः पवमानः रयिः वि राजति द्यु मान् मधोः धाराभिः ओजसा ॥ ३ ॥

तो स्तवनीय, पावन, अभीष्टदाता, महाद्युति सोम आपल्या ओजस्वितेनें मधुररसाच्या धारांनीं सुप्रकाशित होतो. ३.


ब॒र्हिः प्रा॒चीनं॒ ओज॑सा॒ पव॑मान स्तृ॒णन् हरिः॑ ।
दे॒वेषु॑ दे॒व ई॑यते ॥ ४ ॥

बर्हिः प्राचीनं ओजसा पवमानः स्तृणन् हरिः देवेषु देवः ईयते ॥ ४ ॥

दर्भाचीं अग्रें पूर्वेकडे करून कुशासन पसरावयास लावून तो हरिद्वर्ण आणि आपल्या ओजस्वितेनें पावन करणारा दिव्यसोम, दिव्यविभूतिमध्यें गमन करतो. ४.


उदातै॑र्जिहते बृ॒हद्द्वारो॑ दे॒वीर्हि॑र॒ण्ययीः॑ ।
पव॑मानेन॒ सुष्टु॑ताः ॥ ५ ॥

उत् आतैः जिहते बृहत् द्वारः देवीः हिरण्ययीः पवमानेन सु स्तुताः ॥ ५ ॥

सोन्याच्या पात्रांनीं मढविलेलीं यज्ञमण्डपाचीं देदीप्यमान महाद्वारें पतितपावन, सोमानें स्तुति करतांच सर्व बाजूंनीं एकदम उघडतात. ५.


सु॒शि॒ल्पे बृ॑ह॒ती म॒ही पव॑मानो वृषण्यति ।
नक्तो॒षासा॒ न द॑र्श॒ते ॥ ६ ॥

सुशिल्पे इतिसु शिल्पे बृहती इति मही इति पवमानः वृषण्यति नक्तोषसा न दर्शते इति ॥ ६ ॥

लावण्यवती, श्रेष्ठ, आणि परमथोर अशा ज्या रात्र आणि उषादेवी त्यांना पाहून सोस्वरूप युवतींनाच पाहिल्याप्रमाणें पतित पावन सोम आतुर होतो. ६.


उ॒भा दे॒वा नृ॒चक्ष॑सा॒ होता॑रा॒ दैव्या॑ हुवे ।
पव॑मान॒ इन्द्रो॒ वृषा॑ ॥ ७ ॥

उभा देवा नृ चक्षसा होतारा दैव्या हुवे पवमानः इन्द्रः वृषा ॥ ७ ॥

सर्व मानवांना पाहणारे दिव्यलोकींचे यज्ञपुरोहित जे उभयतां देव त्यांना मी पाचारण करतों. पावन सोम आणि इंद्र हे ते देव होत. ७.


भार॑ती॒ पव॑मानस्य॒ सर॑स्व॒तीळा॑ म॒ही ।
इ॒मं नो॑ य॒ज्ञं आ ग॑मन् ति॒स्रो दे॒वीः सु॒पेश॑सः ॥ ८ ॥

भारती पवमानस्य सरस्वती इळा मही इमं नः यजं आ गमन् तिस्रः देवीः सु पेशसः ॥ ८ ॥

भारतीं, सरस्वती आणि इळा ह्या तीन श्रेष्ठ आणि दर्शनीय देवी आमच्या पवमानसोमाच्या यज्ञप्रसंगीं प्राप्त झाल्या. ८.


त्वष्टा॑रं अग्र॒जां गो॒पां पु॑रो॒यावा॑नं॒ आ हु॑वे ।
इन्दु॒रिन्द्रो॒ वृषा॒ हरिः॒ पव॑मानः प्र॒जाप॑तिः ॥ ९ ॥

त्वष्टारं अग्र जां गोपां पुरः यावानं आ हुवे इन्दुः इन्द्रः वृषा हरिः पवमानः प्रजापतिः ॥ ९ ॥

सर्वांच्या अगोदर प्रकट झालेला, सर्वांचें संरक्षण करणार, सर्वांचा अग्रेसर, जो त्वष्टा त्याला मी पाचारण करतों, तोच इन्दु, तोच वीर इंद्र, तोच हरि, तोच पावन सोम, आणि तोच प्रजापति होय. ९.


वन॒स्पतिं॑ पवमान॒ मध्वा॒ सं अ॑ङ्ग्धि॒ धार॑या ।
स॒हस्र॑वल्शं॒ हरि॑तं॒ भ्राज॑मानं हिर॒ण्यय॑म् ॥ १० ॥

वनस्पतिं पवमान मध्वा सं अङ्ग्धि धारया सहस्र वल्शं हरितं भ्राजमानं हिरण्ययम् ॥ १० ॥

पावना सोमा, सहस्रावधि शाखांचा, हरिद्वर्ण, परंतु सोन्याप्रमाणें चकचकीत असा जो यूप त्याला आपल्या धारेनें आर्द्र कर. १०.


विश्वे॑ देवाः॒ स्वाहा॑कृतिं॒ पव॑मान॒स्या ग॑त ।
वा॒युर्बृह॒स्पतिः॒ सूर्यो॑ऽ॒ग्निरिन्द्रः॑ स॒जोष॑सः ॥ ११ ॥

विश्वे देवाः स्वाहा कृतिं पवमानस्य आ गत वायुः बृहस्पतिः सूर्यः अग्निः इन्द्रः सजोषसः ॥ ११ ॥

सकल दिव्यविबुधानों, आम्हीं पावन अशा सोमरसाची आहुति देत आहों, तर ह्या प्रसंगीं तुम्हीं सर्वजण आगमन करा. वायु, बृहस्पति, सूर्य, अग्नि आणि इंद्र, हे सर्व तुम्ही अगदीं एकसारखेच भक्तवत्सल आहांत. ११.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


म॒न्द्रया॑ सोम॒ धार॑या॒ वृषा॑ पवस्व देव॒युः ।
अव्यो॒ वारे॑ष्व् अस्म॒युः ॥ १ ॥

मन्द्रया सोम धारया वृषा पवस्व देव युः अव्यः वारेषु अस्म युः ॥ १ ॥

हे सोमा, तुजला ऊर्णावस्त्राच्या गाळणीवर ठेवला आहे; तूं वीर्यशाली, देवोत्सुक, आणि आम्हांविषयीं प्रेम बाळगणारा आहेस, तर आपल्या धारेनें स्वच्छ प्रवाहानें वहा. १.


अ॒भि त्यं मद्यं॒ मदं॒ इन्द॒व् इन्द्र॒ इति॑ क्षर ।
अ॒भि वा॒जिनो॒ अर्व॑तः ॥ २ ॥

अभि त्यं मद्यं मदं इन्दो इति इन्द्रः इति क्षर अभि वाजिनः अर्वतः ॥ २ ॥

तूंच इंद्र म्हणून आपला अपूर्व, हर्षवर्धन, आणि अत्युल्लासकर रस वहावयास लाव. आमच्या सत्वधीर वीरांसाठीं, अश्वारूढ सैनिकांसाठीं, रसधारा वहावयास लाव. २.


अ॒भि त्यं पू॒र्व्यं मदं॑ सुवा॒नो अ॑र्ष प॒वित्र॒ आ ।
अ॒भि वाजं॑ उ॒त श्रवः॑ ॥ ३ ॥

अभि त्यं पूर्व्यं मदं सुवानः अर्ष पवित्रे आ अभि वाजं उत श्रवः ॥ ३ ॥

तुजला पिळून पवित्रावर ठेवला असतांना पूर्वींचाच उत्तेजक हर्ष उत्थापित कर. सत्वधैर्याला अनुलक्षून, आणि सत्कीर्तीला अनुलक्षून वहात रहा. ३.


अनु॑ द्र॒प्सास॒ इन्द॑व॒ आपो॒ न प्र॒वता॑सरन् ।
पु॒ना॒ना इन्द्रं॑ आशत ॥ ४ ॥

अनु द्रप्सासः इन्दवः आपः न प्रवता असरन् पुनानाः इन्द्रं आशत ॥ ४ ॥

सरसर ठिबकणारे सोमबिन्दु सखल जाग्याकडे धांवणार्‍या उदकाप्रमाणें झराझर वहात राहिले, आणि भक्तांना पावन करून इंद्रापर्यंत जाऊन पोहोंचले. ४.


यं अत्यं॑ इव वा॒जिनं॑ मृ॒जन्ति॒ योष॑णो॒ दश॑ ।
वने॒ क्रीळ॑न्तं॒ अत्य॑विम् ॥ ५ ॥

यं अत्यं इव वाजिनं मृजन्ति योषणः दश वने क्रीळन्तं अति अविम् ॥ ५ ॥

सत्वाढ्य आणि अश्वारूढ वीराला युवतीजन स्नान घालून स्वच्छ करतात, त्याप्रमाणें वनांमध्यें क्रीडा करणार्‍या सोमाला दहा युवती लोंकरीच्या पवित्रांतून गाळून स्वच्छ करतात. ५.


तं गोभि॒र्वृष॑णं॒ रसं॒ मदा॑य दे॒ववी॑तये ।
सु॒तं भरा॑य॒ सं सृ॑ज ॥ ६ ॥

तं गोभिः वृषणं रसं मदाय देव वीतये सुतं भराय सं सृज ॥ ६ ॥

हर्षोत्कर्ष व्हावा, देवांनीं स्वीकार करावा, आणि संग्रामाकरितां सैनिक सिद्ध व्हावे म्हणून त्या वीर्यशाली रसाला गोदुग्धाशीं मिश्रित कर. ६.


दे॒वो दे॒वाय॒ धार॒येन्द्रा॑य पवते सु॒तः ।
पयो॒ यद॑स्य पी॒पय॑त् ॥ ७ ॥

देवः देवाय धारया इन्द्राय पवते सुतः पयः यत् अस्य पीपयत् ॥ ७ ॥

इंद्रदेवासाठीं पिळलेला हा दिव्य सोम आपल्या पवित्र धारेनें वहात आहे. पहा, त्याच्या दुग्धानें इंद्राला हर्षोत्फुल्ल केलें आहे. ७.


आ॒त्मा य॒ज्ञस्य॒ रंह्या॑ सुष्वा॒णः प॑वते सु॒तः ।
प्र॒त्नं नि पा॑ति॒ काव्य॑म् ॥ ८ ॥

आत्मा यजस्य रंह्या सुस्वाणः पवते सुतः प्रत्नं नि पाति काव्यम् ॥ ८ ॥

यज्ञाचा आत्मा असा हा सोम उत्तम पिळला असतां जोरानें रसप्रवाह सोडतो, आणि प्राचीन कवनांचें रक्षण करतो. ८.


ए॒वा पु॑ना॒न इ॑न्द्र॒युर्मदं॑ मदिष्ठ वी॒तये॑ ।
गुहा॑ चिद्दधिषे॒ गिरः॑ ॥ ९ ॥

एव पुनानः इन्द्र युः मदं मदिष्ठ वीतये गुहा चित् दधिषे गिरः ॥ ९ ॥

याप्रमाणें हे अत्युत्तेजक रसा, गाळून स्वच्छ झालेला आणि आपला स्वीकार व्हावा म्हणून इंद्राला भेटण्यास उत्सुक झालेला असा तूं काव्यस्फूर्तीचे शब्द भक्ताच्या हृदयांत गुप्त ठेवतोस. ९.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


असृ॑ग्रं॒ इन्द॑वः प॒था धर्म॑न्न् ऋ॒तस्य॑ सु॒श्रियः॑ ।
वि॒दा॒ना अ॑स्य॒ योज॑नम् ॥ १ ॥

असृग्रं इन्दवः पथा धर्मन् ऋतस्य सु श्रियह् विदानाः अस्य योजनम् ॥ १ ॥

हे आल्हादप्रद आणि सुशोभित सोमबिन्दु इंद्राचें धोरण जाणून धर्मकार्यात सनातन धर्माच्या मार्गानेंच पुढें सरसावतात. १.


प्र धारा॒ मध्वो॑ अग्रि॒यो म॒हीर॒पो वि गा॑हते ।
ह॒विर्ह॒विष्षु॒ वन्द्यः॑ ॥ २ ॥

प्र धारा मध्वः अग्रियः महीः अपः वि गाहते हविः हविष्षु वन्द्यः ॥ २ ॥

मधुररसाची धारा श्रेष्ठ होय; विस्तृत नदीप्रवाहांत ती बुडी मारते. सर्व हविर्भागांमध्यें महनीय हबि हाच होय. २.


प्र यु॒जो वा॒चो अ॑ग्रि॒यो वृषाव॑ चक्रद॒द्वने॑ ।
सद्मा॒भि स॒त्यो अ॑ध्व॒रः ॥ ३ ॥

प्र युजः वाचः अग्रियः वृषा अव चक्रदत् वने सद्म अभि सत्यः अध्वरः ॥ ३ ॥

श्रेष्ठ आणि कामनावर्षक सोमानें ज्याला अभिमुख होऊन वनामध्यें यथायोग्य शब्द मोठ्यानें उच्चारले तोच अध्वरयाग सत्य होय. ३.


परि॒ यत् काव्या॑ क॒विर्नृ॒म्णा वसा॑नो॒ अर्ष॑ति ।
स्वर्वा॒जी सि॑षासति ॥ ४ ॥

परि यत् काव्या कविः नृम्णा वसानः अर्षति स्वः वाजी सिसासति ॥ ४ ॥

पौरोषवस्त्रानें मण्डित आणि प्रतिभाशाली सोम काव्यस्फूर्ति देतो, तेव्हांच सत्वपराक्रमी भक्त स्वर्गीय प्रकाश जिंकतो. ४.


पव॑मानो अ॒भि स्पृधो॒ विशो॒ राजे॑व सीदति ।
यदीं॑ ऋ॒ण्वन्ति॑ वे॒धसः॑ ॥ ५ ॥

पवमानः अभि स्पृधः विशः राजा इव सीदति यत् ईं ऋण्वन्ति वेधसः ॥ ५ ॥

भक्त पावन सोम, प्रतिस्पर्ध्याच्या छातीवर आपल्या सैनिकांत राजाप्रमाणें विराजमान होतो; आणि अशा वेळेस स्फूर्तीनें कवन रचणारे भक्त त्याच्या सेवेस सादर असतात. ५.


अव्यो॒ वारे॒ परि॑ प्रि॒यो हरि॒र्वने॑षु सीदति ।
रे॒भो व॑नुष्यते म॒ती ॥ ६ ॥

अव्यः वारे परि प्रियः हरिः वनेषु सीदति रेभः वनुष्यते मती ॥ ६ ॥

देवाला प्रिय असा हरिद्वर्ण सोम लोंकरीच्या पवित्रावर अधिष्ठित झाला आहे. परंतु त्यापूर्वीं त्याचा वास वनांत असतो, आणि तेथें स्तोता हा त्याला मननानें आपलासा करतो. ६.


स वा॒युं इन्द्रं॑ अ॒श्विना॑ सा॒कं मदे॑न गच्छति ।
रणा॒ यो अ॑स्य॒ धर्म॑भिः ॥ ७ ॥

सः वायुं इन्द्रं अश्विना साकं मदेन गच्चति रण यः अस्य धर्म भिः ॥ ७ ॥

आनंदित हो असें आपल्या मनानें भक्ताला जो म्हणतो, तो सोम स्वतःहि वायु, इंद्र आणि अश्वीदेव ह्यांच्याकडे हर्षभरानें गमन करतो. ७.


आ मि॒त्रावरु॑णा॒ भगं॒ मध्वः॑ पवन्त ऊ॒र्मयः॑ ।
वि॒दा॒ना अ॑स्य॒ शक्म॑भिः ॥ ८ ॥

आ मित्रावरुणा भगं मध्वः पवन्ते ऊर्मयः विदानाः अस्य शक्म भिः ॥ ८ ॥

त्या मधुररसाच्या लाटा, मित्र वरुण, आणि भग यांना आपल्या शक्तींनीं ओळखून काढून त्यांच्याकडे वहात जातात. ८.


अ॒स्मभ्यं॑ रोदसी र॒यिं मध्वो॒ वाज॑स्य सा॒तये॑ ।
श्रवो॒ वसू॑नि॒ सं जि॑तम् ॥ ९ ॥

अस्मभ्यं रोदसी इति रयिं मध्वः वाजस्य सातये श्रवः वसूनि सं जितम् ॥ ९ ॥

हे द्यावापृथिवीनों, आम्हांला सत्वबलाचा लाभ व्हावा म्हणून तुम्हीं मधुररसाचें ऐश्वर्य, सत्कीर्ति, आणि वैभव हीं जिंकून आणा. ९.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


ए॒ते सोमा॑ अ॒भि प्रि॒यं इन्द्र॑स्य॒ कामं॑ अक्षरन् ।
वर्ध॑न्तो अस्य वी॒र्यम् ॥ १ ॥

एते सोमाः अभि प्रियं इन्द्रस्य कामं अक्षरन् वर्धन्तः अस्य वीर्यम् ॥ १ ॥

ह्या सोमबिंदूनीं इंद्राच्या पौरुषाचा व्याप वृद्धिंगत करून त्याच्या इच्छेनुरूप रसप्रवाह वहात सोडला आहे. १.


पु॒ना॒नास॑श्चमू॒षदो॒ गच्छ॑न्तो वा॒युं अ॒श्विना॑ ।
ते नो॑ धान्तु सु॒वीर्य॑म् ॥ २ ॥

पुनानासः चमू सदः गच्चन्तः वायुं अश्विना ते नः धान्तु सु वीर्यम् ॥ २ ॥

चमूपात्रांत अधिष्टित होणारे भक्तपावन सोमबिन्दु, वायु आणि अश्वीदेव यांच्यापर्यंत जाऊन पोहोंचणारे सोमरस, आम्हांमध्यें उत्कृष्ट वीर्य प्रकट करोत. २.


इन्द्र॑स्य सोम॒ राध॑से पुना॒नो हार्दि॑ चोदय ।
ऋ॒तस्य॒ योनिं॑ आ॒सद॑म् ॥ ३ ॥

इन्द्रस्य सोम राधसे पुनानः हार्दि चोदय ऋतस्य योनिं आसदम् ॥ ३ ॥

हे सोमा, देवप्रसादाचा लाभ व्हावा ह्यासाठीं आमच्या हृदयांत पवित्र भावना उत्पन्न करून, सद्धर्माचें आद्यस्थान जी वेदी तेथें आरोहण करण्यासाठीं तूं इंद्राला आग्रह कर . ३.


मृ॒जन्ति॑ त्वा॒ दश॒ क्षिपो॑ हि॒न्वन्ति॑ स॒प्त धी॒तयः॑ ।
अनु॒ विप्रा॑ अमादिषुः ॥ ४ ॥

मृजन्ति त्वा दश क्षिपः हिन्वन्ति सप्त धीतयः अनु विप्राः अमादि षुः ॥ ४ ॥

दहा अङ्गुली तुजला पिळून स्वच्छ करीत आहेत; सातांची ध्यानप्रवीणता तुजला पात्रांत ठेऊन हेलकावे देत आहे, आणि ह्या सर्वांला अनुसरून स्तोतृजन तुझ्या सहवासानें हर्षनिर्भर झाले आहेत. ४.


दे॒वेभ्य॑स्त्वा॒ मदा॑य॒ कं सृ॑जा॒नं अति॑ मे॒ष्यः ।
सं गोभि॑र्वासयामसि ॥ ५ ॥

देवेभ्यः त्वा मदाय कं सृजानं अति मेष्यः सं गोभिः वासयामसि ॥ ५ ॥

दिव्यविबुधांसाठीं, त्यांच्या हर्षोत्कर्षासाठीं, उदक मिसळून आणि लोंकरीच्या वस्त्रांतून गाळून तुजला आम्हीं गोदुग्धानें आच्छादित करतों. ५.


पु॒ना॒नः क॒लशे॒ष्व् आ वस्त्रा॑ण्य् अरु॒षो हरिः॑ ।
परि॒ गव्या॑न्य् अव्यत ॥ ६ ॥

पुनानः कलशेषु आ वस्त्राणि अरुषः हरिः परि गव्यानि अव्यत ॥ ६ ॥

तुज भक्तपावनाला कलशांत ठेवला असतांना तुझा हरिद्वर्ण फारच चकचकीत दिसतो; आणि अशा स्थितींत तूं गोदुग्धाचे वस्त्र परिधान करतोस. ६.


म॒घोन॒ आ प॑वस्व नो ज॒हि विश्वा॒ अप॒ द्विषः॑ ।
इन्दो॒ सखा॑यं॒ आ वि॑श ॥ ७ ॥

मघोनः आ पवस्व नः जहि विश्वाः अप द्विषः इन्दो इति सखायं आ विश ॥ ७ ॥

आमच्या यजमानांसाठीं तुझा पवित्र प्रवाह वाहूं दे. सर्व द्वेष्ट्यांना दूर हांकून देऊन ठार कर; आणि हे आल्हादप्रदा सोमा, आपला प्राणमित्र जो इंद्र त्याच्या मुखांत प्रवेश कर. ७.


वृ॒ष्टिं दि॒वः परि॑ स्रव द्यु॒म्नं पृ॑थि॒व्या अधि॑ ।
सहो॑ नः सोम पृ॒त्सु धाः॑ ॥ ८ ॥

वृष्टिं दिवः परि स्रव द्युम्नं पृथिव्याः अधि सहः नः सोम पृत् सु धाः ॥ ८ ॥

आकाशांतून पर्जन्याची वृष्टि कर; पृथिवीवर तेजाची वृष्टी कर; हे सोमा, युद्धप्रसंगीं आमच्यामध्यें शत्रुदमनसामर्थ्य प्रकट कर. ८.


नृ॒चक्ष॑सं त्वा व॒यं इन्द्र॑पीतं स्व॒र्विद॑म् ।
भ॒क्षी॒महि॑ प्र॒जां इष॑म् ॥ ९ ॥

नृ चक्षसं त्वा वयं इन्द्र पीतं स्वः विदं भक्षीमहि प्र जां इषम् ॥ ९ ॥

सकल मानवांना पाहणारा, इंद्रानें प्राशन केलेला, स्वर्गीय प्रकाश देणारा, असा जो तूं त्याला आम्हीं गृहण करून पुत्रपौत्र आणि उत्साह ह्यांचा लाभ मिळवूं असें कर. ९.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


परि॑ प्रि॒या दि॒वः क॒विर्वयां॑सि न॒प्त्योर्हि॒तः ।
सु॒वा॒नो या॑ति क॒विक्र॑तुः ॥ १ ॥

परि प्रिया दिवः कविः वयांसि नप्त्योः हितः सुवानः याति कवि क्रतुः ॥ १ ॥

दिव्य स्फूर्तिदाता सोम, अभिवषण फलकांमध्यें ठेवून पिळला म्हणजे तो प्रतिभादायक सोम, त्याला प्रिय अशा यौवनसंपन्न मित्रांकडे जातो. १.


प्र-प्र॒ क्षया॑य॒ पन्य॑से॒ जना॑य॒ जुष्टो॑ अ॒द्रुहे॑ ।
वी॒त्यर्ष॒ चनि॑ष्ठया ॥ २ ॥

प्र प्र क्षयाय पन्यसे जनाय जुष्टः अद्रुहे वीती अर्ष चनिष्ठया ॥ २ ॥

तूं तेथें वास करावा म्हणून, आणि द्रोह न करणारा मित्र लाभावा म्हणून, पूर्वीं आम्हीं तुझी वाखाणणी केली आणि आतांहि करतों; तर देवांनी तुजला प्राशन करावें यासाठीं तूं अत्यंत मधुर धारेनें वहा. २.


स सू॒नुर्मा॒तरा॒ शुचि॑र्जा॒तो जा॒ते अ॑रोचयत् ।
म॒हान् म॒ही ऋ॑ता॒वृधा॑ ॥ ३ ॥

सः सूनुः मातरा शुचिः जातः जाते इति अरोचयत् महान् मही ऋत वृधा ॥ ३ ॥

त्या महा पवित्र पुत्रानें उत्पन्न होतांच, जगताच्या श्रेष्ठ जननी आणि सद्धर्माची उन्नति करणार्‍या माता ज्या द्यावापृथिवी, त्यांना प्रकाशित केलें. ३.


स स॒प्त धी॒तिभि॑र्हि॒तो न॒द्यो अजिन्वद॒द्रुहः॑ ।
या एकं॒ अक्षि॑ वावृ॒धुः ॥ ४ ॥

सः सप्त धीति भिः हितः नद्यः अजिन्वत् अद्रुहः याः एकं अक्षि ववृधुः ॥ ४ ॥

सात प्रकारच्या ध्यानपद्धतींनीं आपोदेवींना प्रोत्साहन दिलें, तेव्हां त्या नद्यांनाहि त्यांचा एकच अक्षय्य नेत्र जो सोम त्याला आनंदानें वृद्धिंगत केलें. ४.


ता अ॒भि सन्तं॒ अस्तृ॑तं म॒हे युवा॑नं॒ आ द॑धुः ।
इन्दुं॑ इन्द्र॒ तव॑ व्र॒ते ॥ ५ ॥

ताः अभि सन्तं अस्तृतं महे युवानं आ दधुः इन्दुं इन्द्र तव व्रते ॥ ५ ॥

सत्प्रवृत्त, अप्रतिहत, आणि यौवनसंपन्न अशा सोमाला, हे इंद्रा, तुझ्याप्रीत्यर्थ करावयाच्या महत्कार्यांतच त्यांनीं व्यापृत केलें. ५.


अ॒भि वह्नि॒रम॑र्त्यः स॒प्त प॑श्यति॒ वाव॑हिः ।
क्रिवि॑र्दे॒वीर॑तर्पयत् ॥ ६ ॥

अभि वह्निः अमर्त्यः सप्त पश्यति वावहिः क्रिविः देवीः अतर्पयत् ॥ ६ ॥

यज्ञधुरीण आणि अमर असा कार्यवाह जो सोम त्यानें सप्तसिन्धूंना पाहिलें, तेव्हां रस भरलेल्या तडागानें त्याही देवींना त्यानें तृप्त केलें. ६.


अवा॒ कल्पे॑षु नः पुम॒स्तमां॑सि सोम॒ योध्या॑ ।
तानि॑ पुनान जङ्घनः ॥ ७ ॥

अव कल्पेषु नः पुमः तमांसि सोम योध्या तानि पुनान जङ्घनः ॥ ७ ॥

धर्मकार्यांत आम्हांला सहाय कर. हे सोमा, अज्ञानरूप अंधकाराशीं आम्हांस झगडलेंच पाहिजे, तर हे पवित्र सोमा, त्यांचा पुरा निःपात कर. ७.


नू नव्य॑से॒ नवी॑यसे सू॒क्ताय॑ साधया प॒थः ।
प्र॒त्न॒वद्रो॑चया॒ रुचः॑ ॥ ८ ॥

नु नव्यसे नवीयसे सु उक्ताय साधय पथः प्रत्न वत् रोचय रुचः ॥ ८ ॥

खरोखर नूतन आणि अपूर्व अशीं कवनें करण्याचा मार्ग सुगम कर आणि पुरातनकाळाप्रमाणेंच आपलें तेज प्रकट कर. ८.


पव॑मान॒ महि॒ श्रवो॒ गां अश्वं॑ रासि वी॒रव॑त् ।
सना॑ मे॒धां सना॒ स्वः ॥ ९ ॥

पवमान महि श्रवः गां अश्वं रासि वीर वत् सना मेधां सना स्वः ॥ ९ ॥

भक्तपावन सोमा, धेनू अश्व आणि वीर्यशाली लोकांनीं मंडीत अशी उच्च कीर्ति तूं आम्हांस दे; तीव्रबुद्धी अर्पण कर आणि स्वर्गीय प्रकाशहि अर्पण कर. ९.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १० (पवमान सोमसूक्त)

ऋषी - असित काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


प्र स्वा॒नासो॒ रथा॑ इ॒वार्व॑न्तो॒ न श्र॑व॒स्यवः॑ ।
सोमा॑सो रा॒ये अ॑क्रमुः ॥ १ ॥

प्र स्वानासः रथाः इव अर्वन्तः न श्रवस्यवः सोमासः राये अक्रमुः ॥ १ ॥

रथाप्रमाणें ध्वनि करणारे आणि अश्ववीरांप्रमाणें सत्कीर्तिविषयीं लालस असे सोमबिन्दु दिव्यैश्वर्याकडे चालले आहेत. १.


हि॒न्वा॒नासो॒ रथा॑ इव दधन्वि॒रे गभ॑स्त्योः ।
भरा॑सः का॒रिणां॑ इव ॥ २ ॥

हिन्वानासः रथाः इव दधन्विरे गभस्त्योः भरासः कारिणां इव ॥ २ ॥

रथाप्रमाणें झपाट्यानें पुढें सरसावलेले सोमपल्लव हे कर्मकारी लोकांच्या हातांतील कार्यभाराप्रमाणें, ऋत्विजांनीं आपल्या दोन्हीं हातांत धरलेले आहेत. २.


राजा॑नो॒ न प्रश॑स्तिभिः॒ सोमा॑सो॒ गोभि॑रञ्जते ।
य॒ज्ञो न स॒प्त धा॒तृभिः॑ ॥ ३ ॥

राजानः न प्रशस्ति भिः सोमासः गोभिः अजते यजः न सप्त धातृ भिः ॥ ३ ॥

राजे जसे बन्दिजनांच्या स्तुतींनीं, यज्ञ जसा सप्तहोत्यांच्या कर्मांनीं, तसेच हे सोमरस गोदुग्धांनीं अलंकृत झाले आहेत. ३.


परि॑ सुवा॒नास॒ इन्द॑वो॒ मदा॑य ब॒र्हणा॑ गि॒रा ।
सु॒ता अ॑र्षन्ति॒ धार॑या ॥ ४ ॥

परि सुवानासः इन्दवः मदाय बर्हणा गिरा सुताः अर्षन्ति धारया ॥ ४ ॥

आल्हादप्रद सोमबिन्दु आवेशपूर्ण स्तोत्रवाणीच्या निनादांत हर्षोत्कर्षासाठीं पिळले जातात; आणि ते याप्रमाणें पिळले गेले म्हणजे धाराप्रवाहानें चोहोंकडे पसरतात. ४.


आ॒पा॒नासो॑ वि॒वस्व॑तो॒ जन॑न्त उ॒षसो॒ भग॑म् ।
सूरा॒ अण्वं॒ वि त॑न्वते ॥ ५ ॥

आपानासः विवस्वतः जनन्तः उषसः भगं सूराः अण्वं वि तन्वते ॥ ५ ॥

विवस्वताचें तृप्तिकर पेय असे जे सोमरस ते प्रभातकाल प्रकट करतात, भाग्याधिपतीचें दर्शन करवितात, आणि सूर्याप्रमाणें आपलें सूक्ष्म किरणजाल चोहोंकडे विखरून देतात. ५.


अप॒ द्वारा॑ मती॒नां प्र॒त्ना ऋ॑ण्वन्ति का॒रवः॑ ।
वृष्णो॒ हर॑स आ॒यवः॑ ॥ ६ ॥

अप द्वारा मतीनां प्रत्नाः ऋण्वन्ति कारवः वृष्णः हरसे आयवः ॥ ६ ॥

पुरातन पद्धतीला अनुसरणारे कवि आपल्या प्रतिभेचीं द्वारें उघडतात, अशा वेळीं ऋत्विक्‌जन वीर्यशाली सोम वनांतून घेऊन येण्याकरितां सज्ज होतात. ६.


स॒मी॒ची॒नास॑ आसते॒ होता॑रः स॒प्तजा॑मयः ।
प॒दं एक॑स्य॒ पिप्र॑तः ॥ ७ ॥

समीचीनासः आसते होतारः सप्त जामयः पदं एकस्य पिप्रतः ॥ ७ ॥

एकमेकांचे बन्धूच असे जे सप्त होते ते एकविचारानें प्रेरित होऊन, आणि एकच परमेश्वराचें स्थान भक्तीनें भरून सोडून तेथें अधिष्ठित होतात. ७.


नाभा॒ नाभिं॑ न॒ आ द॑दे॒ चक्षु॑श्चि॒त् सूर्ये॒ सचा॑ ।
क॒वेरप॑त्यं॒ आ दु॑हे ॥ ८ ॥

नाभा नाभिं नः आ ददे चक्षुः चित् सूर्ये सचा कवेः अपत्यं आ दुहे ॥ ८ ॥

अशा वेळीं आमचा नाभि आम्हीं दिव्यनाभिमध्यें ठेवतों, आमचा नेत्र सूर्यामध्यें स्थापन करतों; आणि कवीचें अपत्य जी प्रतिभा तिचें दोहन करितों. ८.


अ॒भि प्रि॒या दि॒वस्प॒दं अ॑ध्व॒र्युभि॒र्गुहा॑ हि॒तम् ।
सूरः॑ पश्यति॒ चक्ष॑सा ॥ ९ ॥

अभि प्रिया दिवः पदं अध्वर्यु भिः गुहा हितं सूरः पश्यति चक्षसा ॥ ९ ॥

प्रिय वस्तु आणि द्युलोकाचें स्थान हें अध्वर्यूनीं आपल्या हृदय कपाटांत गुप्त ठेविलेंलें असतें, त्याला सूर्य आपल्या नेत्रांनी निरखून पाहतो. ९.


ॐ तत् सत्


GO TOP