PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त ९१ ते १०४

ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९१ ( इंद्रवायुसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्रवायु : छंद - त्रिष्टुभ्


कु॒विद॒ङ्गष नम॑सा॒ ये वृ॒धासः॑ पु॒रा दे॒वा अ॑नव॒द्यास॒ आस॑न् ।
ते वा॒यवे॒ मन॑वे बाधि॒तायावा॑सयन्नु॒षसं॒ सूर्ये॑ण ॥ १ ॥

कुवित् अङ्ग नमसा ये वृधासः पुरा देवाः अनवद्यासः आसन्
ते वायवे मनवे बाधिताय अवासयन् उषसं सूर्येण ॥ १ ॥

जे देव निष्कलंक म्हणून प्रसिद्ध आहेत, ते पूर्वी भक्तांच्या केवळ प्रणिपातानेंच प्रसन्नचित्त होत नव्हते काय ? आणि म्हणूनच अंधकारापासून पीडा होत होती. अशा वेळेस त्यांनीच मनुष्यासाठी-मनुराजासाठी सूर्याच्या सन्निध उषादेवीला स्थापन केले. ॥ १ ॥


उ॒शन्ता॑ दू॒ता न दभा॑य गो॒पा मा॒सश्च॑ पा॒थः श॒रद॑श्च पू॒र्वीः ।
इन्द्र॑वायू सुष्टु॒तिर्वा॑मिया॒ना मा॑र्डी॒कमी॑ट्टे सुवि॒तं च॒ नव्य॑म् ॥ २ ॥

उशन्ता दूता न दभाय गोपा मासः च पाथः शरदः च पूर्वीः
इन्द्रवायूइति सुऽस्तुतिः वां इयाना मार्डीकं ईटे सुवितं च नव्यम् ॥ २ ॥

तुम्ही इतके उत्सुक आहां की, जणों काय दूतच, आणि रक्षणकर्ते अशा दृष्टीने इतके दक्ष आहां की, तुम्हाला कोणीहि फसवूं शकत नाही; तर तुम्ही महिनोगणती, वर्षानुवर्ष आमचे परिपालन करा. हे इंद्रवायूनो, आमची भक्तियुक्त स्तुति तुमच्यापाशी याचना अशी करते की आम्हांवर तुमची दया असावी आणि प्रशंसनीय असे मंगल प्राप्त व्हावे. ॥ २ ॥


पीवो॑अन्ना.ण् रयि॒वृधः॑ सुमे॒धाः श्वे॒तः सि॑षक्ति नि॒युता॑मभि॒श्रीः ।
ते वा॒यवे॒ सम॑नसो॒ वि त॑स्थु॒र्विश्वेन्नरः॑ स्वप॒त्यानि॑ चक्रुः ॥ ३ ॥

पीवःऽअन्नान् रयिऽवृधः सुऽमेधाः श्वेतः सिषक्ति निऽयुतां अभिऽश्रीः
ते वायवे सऽमनसः वि तस्थुः विश्वा इत् नरः सुऽअपत्यानि चक्रुः ॥ ३ ॥

परम बुद्धिमान्, शुभ्रतेजस्क, आणि "नियुत्" अश्वांना शोभणारा असा जो त्यांचा अधिपति "वायु" तो भक्तांजवळ सदैव राहतो; पण ते भक्त त्यापूर्वी त्याची कृपा होतांच धनधान्याने समृद्ध, आणि वैभवाने वृद्धिंगत झालेले असतात; ते एक विचारानेंच वायूच्या आज्ञेची वाट पहात परोपरीने उभे राहिले असतात, आणि अशा रीतीने त्या सर्व भक्तजनांनी सत्कर्माचरण केलेले असते. ॥ ३ ॥


याव॒त्तर॑स्त॒न्वो॒३ याव॒दोजो॒ याव॒न्नर॒श्चक्ष॑सा॒ दीध्या॑नाः ।
शुचिं॒ सोमं॑ शुचिपा पातम॒स्मे इन्द्र॑वायू॒ सद॑तं ब॒र्हिरेदम् ॥ ४ ॥

यावत् तरः तन्वः यावत् ओजः यावत् नरः चक्षसा दीध्यानाः
शुच् इं सोमं शुचिऽपा पातं अस्मे इति इन्द्रवायूइति सदतं बर्हिः आ इदम् ॥ ४ ॥

आमच्या शरीरांत जोपर्यंत तरतरी आहे, जोपर्यंत जोम आहे, आणि जोपर्यंत आमचे कुशल ऋत्विज् प्रत्यक्ष आणि ध्यानानेंहि पाहूं शकत आहेत, तोपर्यंत पवित्रतेचे प्रतीकच अशा इंद्रवायूहो, तुम्ही ह्या शुद्ध सोमरसाचे प्राशन करा, आणि येथे ह्या कुशासनावर विराजमान व्हा. ॥ ४ ॥


नि॒यु॒वा॒ना नि॒युत॑ स्पा॒र्हवी॑रा॒ इन्द्र॑वायू स॒रथं॑ यातम॒र्वाक् ।
इ॒दं हि वां॒ प्रभृ॑तं॒ मध्वो॒ अग्र॒मध॑ प्रीणा॒ना वि मु॑मुक्तम॒स्मे ॥ ५ ॥

निऽयुवाना निऽयुतः स्पार्हऽवीराः इन्द्रवायूइति सऽरथं यातं अर्वाक्
इदं हि वां प्रऽभृतं मध्वः अग्रं अध प्रीणाना वि मुमुक्तं अस्मे इति ॥ ५ ॥

’नियुत्’ जोडून भक्तांचे अभीष्ट पूर्ण करणारे, स्पृहणीय अशा वीरवृतीच्या इंद्रवायूंनो, तुम्ही रथारूढ होऊन इकडे आगमन करा. हे मधुर पेय प्रथमतः तुमच्यापुढेंच आणले आहे; तर आम्हांवर प्रसन्न होऊन आम्हांला पापमुक्त करा. ॥ ५ ॥


या वां॑ श॒तं नि॒युतो॒ याः स॒हस्र॒मिन्द्र॑वायू वि॒श्ववा॑राः॒ सच॑न्ते ।
आभि॑र्यातं सुवि॒दत्रा॑भिर॒र्वाक्पा॒तं न॑रा॒ प्रति॑भृतस्य॒ मध्वः॑ ॥ ६ ॥

या वां शतं निऽयुतः याः सहस्रं इन्द्रवायूइति विश्वऽवाराः सचन्ते
आभिः यातं सुऽविदत्राभिः अर्वाक् पातं नरा प्रतिऽभृतस्य मध्वः ॥ ६ ॥

तुमच्यापाशी जे शेकडो ’नियुत्’ अश्व आहेत - किंबहुना ज्या सहस्रवधि, सकलजन मनोहर नियुत् अश्वांच्या जोड्या तुमच्या हांकेसरशी धांवत येतात, त्याच भक्तवरद नियुतांसह, हे इंद्रवायुहो, इकडे आगमन करा, आणि हे वीरांनो, तुम्हांपुढे जो मधुर रस ठेवला आहे तो प्राशन करा. ॥ ६ ॥


अर्व॑न्तो॒ न श्रव॑सो॒ भिक्ष॑माणा इन्द्रवा॒यू सु॑ष्टु॒तिभि॒र्वसि॑ष्ठाः ।
वा॒ज॒यन्तः॒ स्वव॑से हुवेम यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

अर्वन्तः न श्रवसः भिक्षमाणाः इन्द्रवायू इति सुस्तुतिऽभिः वसिष्ठाः
वाजऽयन्तः सु अवसे हुवेम यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

आम्ही अश्ववीर नाही, तरी हे इंद्रवायुहो, आम्ही वसिष्ठाचे लोक भक्तियुक्त स्तुतींनी तुम्हांपाशी सत्कीर्तिची भिक्षा मागत आहोत. सात्त्विक प्रयत्‍नांची पराकाष्ठा करून आम्ही तुमची कृपा व्हावी म्हणून आहुति अर्पण करतो; तर दिव्यजनांनो, तुम्हीपण हाच आशीर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९२ ( इंद्रवायुसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मित्रावरुणौ : छंद - त्रिष्टुभ्


आ वा॑यो भूष शुचिपा॒ उप॑ नः स॒हस्रं॑ ते नि॒युतो॑ विश्ववार ।
उपो॑ ते॒ अन्धो॒ मद्य॑मयामि॒ यस्य॑ देव दधि॒षे पू॑र्व॒पेय॑म् ॥ १ ॥

आ वायो इति भूष शुचिऽपाः उप नः सहस्रं ते निऽयुतः विश्वऽवार
उपो इति ते अन्धः मद्यं अयामि यस्य देव दधिषे पूर्वऽपेयम् ॥ १ ॥

हे पावित्र्य प्रतिपालका वायु, तू येथेच वास्तव्य कर. हे सर्व जनांना अत्यंत प्रिय वायुदेवा, तुझ्याजवळ सहस्रावधि नियुत् आहेत. हे मधुर रस-पेय तुजला अर्पण केले आहे. कारण हे देवा, सर्वांच्या आधी हे पेय तूंच ग्रहण करतोस. ॥ १ ॥


प्र सोता॑ जी॒रो अ॑ध्व॒रेष्व॑स्था॒त्सोम॒मिन्द्रा॑य वा॒यवे॒ पिब॑ध्यै ।
प्र यद्वां॒ मध्वो॑ अग्रि॒यं भर॑न्त्यध्व॒र्यवो॑ देव॒यन्तः॒ शची॑भिः ॥ २ ॥

प्र सोता जीरः अध्वरेषु अस्थात् सोमं इन्द्राय वायवे पिबध्यै
प्र यत् वां मध्वः अग्रियं भरन्ति अध्वर्यवः देवऽयन्तः शचीभिः ॥ २ ॥

सोमरस त्वरित पिळणारा हा ऋत्विज् आजच्या अध्वर यागामध्ये इंद्राने आणि वायूने सोम प्राशन करावा म्हणून पहा सोम पिळण्याकरितां उद्युक्त झाला आहे. आणि ह्यासाठीच, देवोपासक जे अध्वर्यू, ते मधुर रसाची पेय आपल्या भक्तिबलाने प्रथमतः तुमच्याच पुढे ठेवतात. ॥ २ ॥


प्र याभि॒र्यासि॑ दा॒श्वांस॒मच्छा॑ नि॒युद्भि॑ेर्वायवि॒ष्टये॑ दुरो॒णे ।
नि नो॑ र॒यिं सु॒भोज॑सं युवस्व॒ नि वी॒रं गव्य॒मश्व्यं॑ च॒ राधः॑ ॥ ३ ॥

प्र याभिः यासि दाश्वांसं अच्च नियुत्ऽभिः वायो इति इष्टये दुरोणे
नि नः रयिं सुऽभोजसं युवस्व नि वीरं गव्यं अश्व्यं च राधः ॥ ३ ॥

ज्या ’नियुत्’ अश्वांच्या योगाने, हे वायु तूं भक्ताकडे त्याच्या गृही यागसंपादनार्थ जात असतोस, त्याच नियुतांच्या योगाने आम्हांला सुखानुभवाचा लाभ देणारे वैभव अर्पण कर; आणि शूर पुरुष, ज्ञनगोधन, आणि अश्वधन ह्यांनी युक्त अशा तुझ्या कृपाप्रसादाचीहि प्राप्ति करून दे. ॥ ३ ॥


ये वा॒यव॑ इन्द्र॒माद॑नास॒ आदे॑वासो नि॒तोश॑नासो अ॒र्यः ।
घ्नन्तो॑ वृ॒त्राणि॑ सू॒रिभिः॑ ष्याम सास॒ह्वांसो॑ यु॒धा नृभि॑र॒मित्रा॑न् ॥ ४ ॥

ये वायवे इन्द्रऽमादनासः आदेवासः निऽतोशनासः अर्यः
घ्नन्तः वृत्राणि सूरिऽभिः स्याम ससह्वांसः युधा नृऽभिः अमित्रान् ॥ ४ ॥

आम्ही भक्त ’वायू’च्या संतोषार्थ इंद्राला सोमरसाने प्रसना करणारे, देवापुढे नम्र होणारे, आणि आर्यजनांना सहाय्य करणारे आहोत. आम्ही आमच्या धुरीणांच्या सहाय्याने घातकी नीचांना ठार मारून, आमच्या शूर सैनिकांच्या योगाने शत्रूंना पादाक्रांत करू असे होवो. ॥ ४ ॥


आ नो॑ नि॒युद्भिः॑द श॒तिनी॑भिरध्व॒रं स॑ह॒स्रिणी॑भि॒रुप॑ याहि य॒ज्ञम् ।
वायो॑ अ॒स्मिन्सव॑ने मादयस्व यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

आ नः नियुत्ऽभिः शतिनीभिः अध्वरं सहस्रिणीभिः उप याहि यज्ञं
वायो इति अस्मिन् सवने मादयस्व यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ५ ॥

तूं आपल्या शेकडो नियुतांसह आमच्या अध्वर यागासाठी ये. आपल्या सहस्रावधि नियुतांसह आमच्या यज्ञार्थ आगमन कर, हे वायू, ह्या सोमसवनामध्ये हर्षनिर्भर हो, आणि दिव्य जनांनो, तुम्ही अशाच आशीर्वचनांनी आमचे सद्वैव रक्षण करा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९३ ( इंद्राग्नीसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्राग्नी : छंद - त्रिष्टुभ्


शुचिं॒ नु स्तोमं॒ नव॑जातम॒द्येन्द्रा॑ग्नी वृत्रहणा जु॒षेथा॑म् ।
उ॒भा हि वां॑ सु॒हवा॒ जोह॑वीमि॒ ता वाजं॑ स॒द्य उ॑श॒ते धेष्ठा॑ ॥ १ ॥

शुचिं नु स्तोमं नवऽजातं अद्य इन्द्राग्नी इति वृत्रऽहना जुषेथां
उभा हि वां सुऽहवा जोहवीमि ता वाजं सद्यः उशते धेष्ठा ॥ १ ॥

पवित्र, आणि नवीन स्फुरलेल्या ह्या स्तोत्रकलापाचा, हे शत्रूनाशन इंद्राग्नीहो, तुम्ही आज प्रसन्नतेने स्वीकार करा. तुम्ही उभयतां भक्तांचा धांवा तत्काल ऐकतां, म्हणूनच तुम्हाला मी नम्रतेने पाचारण करीत आहे. तर उत्क्सुक अशा मज भक्ताला आत्तांच्या आतां सत्त्वसामर्थ्याची अपरिमित देणगी अर्पण करा. ॥ १ ॥


ता सा॑न॒सी श॑वसाना॒ हि भू॒तं सा॑कं॒वृधा॒ शव॑सा शूशु॒वांसा॑ ।
क्षय॑न्तौ रा॒यो यव॑सस्य॒ भूरेः॑ पृ॒ङ्क्तं वाज॑स्य॒ स्थवि॑रस्य॒ घृष्वेः॑ ॥ २ ॥

ता सानसी इति शवसाना हि भूतं साकम्ऽवृधा शवसा शूशुऽवांसा
क्षयन्तौ रायः यवसस्य भूरेः पृङ्क्तं वाजस्य स्थविरस्य घृष्वेः ॥ २ ॥

भक्तांचे प्राप्तव्यच तुम्ही आहांत, तर त्याच्यासाठी तुमच्या उत्कट बलाने प्रकट व्हा. तुम्ही उभयतां बलोद्रेकाने उत्फुल्ल होऊन एकदम वृद्धिंगत होतां. ऐश्वर्य आणि धान्यसमृद्धि ह्यांचे भांडारच तुमच्यापाशी आहे. तर शत्रुनाशक, देदीप्यमान, आणि चिरस्थायी अशा सत्त्वसामर्थ्याशी आमचा योग घडवा. ॥ २ ॥


उपो॑ ह॒ यद्वि॒दथं॑ वा॒जिनो॒ गुर्धी॒भिर्विप्राः॒ प्रम॑तिमि॒च्छमा॑नाः ।
अर्व॑न्तो॒ न काष्ठां॒ नक्ष॑माणा इन्द्रा॒ग्नी जोहु॑वतो॒ नर॒स्ते ॥ ३ ॥

उपो इति ह यत् विदथं वाजिनः गुः धीभिः विप्राः प्रऽमतिं इच्चमानाः
अर्वन्तः न काष्ठां नक्षमाणाः इन्द्राग्नी इति जोहुवतः नरः ते ॥ ३ ॥

सत्त्वसामर्थ्यभूषित वीरांनी जेव्हां धर्मसभेमध्ये प्रवेश केला, काव्यप्रवीण भक्त जेव्हां स्वबुद्धीने त्यांच्या मार्गदर्शकत्वाची इच्छा करूं लागले, तेव्हां इंद्राग्निहो, तुमचे करुणास्तोत्र म्हणणारे भक्तजन असे दिसले की जणो काय युद्धाला निघालेले अश्ववीरच. ॥ ३ ॥


गी॒र्भिर्विप्रः॒ प्रम॑तिमि॒च्छमा॑न॒ ईट्टे॑ र॒यिं य॒शसं॑ पूर्व॒भाज॑म् ।
इन्द्रा॑ग्नी वृत्रहणा सुवज्रा॒ प्र नो॒ नव्ये॑भिस्तिरतं दे॒ष्णैः ॥ ४ ॥

गीःऽभिः विप्रः प्रऽमतिं इच्चमानः ईटे रयिं यशसं पूर्वऽभाजं
इन्द्राग्नी इति वृत्रऽहना सुऽवज्रा प्र नः नव्येभिः तिरतं देष्णैः ॥ ४ ॥

आपल्या स्तुतिस्तोत्रांनी तुमच्या मार्गदर्शकत्वाची इच्छा धरणारा आमचा स्तोतृजन तुम्हांपाशी पहिल्या प्रथम यश आणि ऐश्वर्य यांचीच याचना करतो. त्यानंतर हे वज्रहस्त इंद्राग्नीहो, हे वृत्रनाशनांनो, मग आम्हांला ज्या काय अपूर्व देणग्या द्यावयाच्या त्या देऊन आमचा उत्कर्ष करा. ॥ ४ ॥


सं यन्म॒ही मि॑थ॒ती स्पर्ध॑माने तनू॒रुचा॒ शूर॑साता॒ यतै॑ते ।
अदे॑वयुं वि॒दथे॑ देव॒युभिः॑ स॒त्रा ह॑तं सोम॒सुता॒ जने॑न ॥ ५ ॥

सं यत् मही इति मिथती इति स्पर्धमानेइति तनूऽरुचा शूरऽसाता यतैते
अदेवऽयुं विदथे देवयुऽभिः सत्रा हतं सोमऽसुता जनेन ॥ ५ ॥

जेव्हां दोन प्रचंड सैन्ये परस्परांवर चाल करून जातात, अंगचे तेज आणि शूरत्वाची करामत निदर्शनास आणणार्‍या युद्धांत परस्परांवर प्रहार करतात, तेव्हां इंद्राग्नीहो, तुम्ही सोम अर्पण करणार्‍या भक्तांच्या हातूनच देव निंदकांना ठार करा. ॥ ५ ॥


इ॒मामु॒ षु सोम॑सुति॒मुप॑ न॒ एन्द्रा॑ग्नी सौमन॒साय॑ यातम् ।
नू चि॒द्धि प॑रिम॒म्नाथे॑ अ॒स्माना वां॒ शश्व॑द्भिोर्ववृतीय॒ वाजैः॑ ॥ ६ ॥

इमां ओं इति सु सोमऽसुतिं उप नः आ इन्द्राग्नी इति सौमनसाय यातं
नु चित् हि परिमम्नाथेइतिपरिऽमम्नाथे अस्मान् आ वां शश्वत्ऽभिः ववृतीय वाजैः ॥ ६ ॥

हा पहा तुमच्यासाठी सोमरस पिळला आहे, तर हे इंद्राग्नीहो, तुम्ही भक्तवात्सल्याने प्रेरित होऊन आमच्याकडे या. तुम्ही केव्हांही आमच्याकडे दुर्लक्ष करीत नाही; म्हणूनच आम्ही आपल्या निश्चित अशा सात्त्विक बलाने तुम्हांला आमच्याकडे वळवून आणतो. ॥ ६ ॥


सो अ॑ग्न ए॒ना नम॑सा॒ समि॒द्धोऽच्छा॑ मि॒त्रं वरु॑ण॒मिन्द्रं॑ वोचेः ।
यत्सी॒माग॑श्चकृ॒मा तत्सु मृ॑ळ॒ तद॑र्य॒मादि॑तिः शिश्रथन्तु ॥ ७ ॥

सः अग्ने एना नमसा सम्ऽइद्धः अच्च मित्रं वरुणं इन्द्रं वोचेः
यत् सीं आगः चकृम तत् सु मृळ तत् अर्यमा अदितिः शिश्रथन्तु ॥ ७ ॥

हे अग्निदेवा, हा असा प्रणिपात करून तुजला आम्ही प्रज्वलित केले आहे. तर आम्हांसाठी तूं मित्र, वरुण आणि इंद्र यांना आमच्या अपराधाच्या क्षमेसंबंधी काहातरी सांग. आम्ही जो काही अपराध केला असेल वा जे पातक केले असेल त्याबद्दल आम्हांवर दया कर, आणि ते पातक अर्यमा, अदिति आणि आदित्य दूर करोत. ॥ ७ ॥


ए॒ता अ॑ग्न आशुषा॒णास॑ इ॒ष्टीर्यु॒वोः सचा॒भ्य॑श्याम॒ वाजा॑न् ।
मेन्द्रो॑ नो॒ विष्णु॑र्म॒रुतः॒ परि॑ ख्यन्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ८ ॥

एताः अग्ने आशुषाणासः इष्टीः युवोः सचा अभि अश्याम वाजान् मा
इन्द्रः नः विष्णुः मरुतः परि ख्यन् यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ८ ॥

हे इंद्राग्निहो, तुमचे यागसंपादन करण्याला आम्ही सत्वर उद्युक्त झालो आहोत. कारण तुमच्या कृपेने आम्हांला सात्विक सामर्थ्यें प्राप्त करून घावयाची आहेत. तर इंद्र, विष्णु आणि मरुत् हे आमचा अव्हेर न करोत; आणि दिव्यजनांनो, तुम्ही असाच आशीर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९४ ( इंद्राग्नीसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्राग्नी : छंद - गायत्री, अनुष्टुभ्


इ॒यं वा॑म॒स्य मन्म॑न॒ इन्द्रा॑ग्नी पू॒र्व्यस्तु॑तिः ।
अ॒भ्राद्वृ॒ष्टिरि॑वाजनि ॥ १ ॥

इयं वामस्य मन्मनः इन्द्राग्नी इति पूर्व्यऽस्तुतिः अभ्रात् वृष्टिःऽइव अजनि ॥ १ ॥

इंद्राग्निहो, ही पहा माझ्या केवळ अंतःकरणाच्या वृत्तीने स्फुरलेली तुमची स्तुति; आणि तीही अगदी पहिल्या प्रथम; ती अशा वेगाने आणि ओघाने स्फुरते कीं जणो काय मेघापासून निघणारी पर्जन्यवृष्टिच. ॥ १ ॥


शृ॒णु॒तं ज॑रि॒तुर्हव॒मिन्द्रा॑ग्नी॒ वन॑तं॒ गिरः॑ ।
ई॒शा॒ना पि॑प्यतं॒ धियः॑ ॥ २ ॥

शृणुतं जरितुः हवं इन्द्राग्नी इति वनतं गिरः ईशाना पिप्यतं धियः ॥ २ ॥

तुमच्या उपासकाची भाक तुम्ही ऐका, इंद्राग्निहो, त्याने म्हटलेली स्तुति गोड मानून घ्या; हे जगन्नायकांनो, त्याच्या प्रतिभेचा विकास करा. ॥ २ ॥


मा पा॑प॒त्वाय॑ नो न॒रेन्द्रा॑ग्नी॒ माभिश॑स्तये ।
मा नो॑ रीरधतं नि॒दे ॥ ३ ॥

मा पापऽत्वाय नः नरा इन्द्राग्नी इति मा अभिऽशस्तये मा नः रीरधतं निदे ॥ ३ ॥

शौर्यसंपन्न इंद्राग्निहो, पापकर्माकडे आमची प्रवृत्ति होऊं देऊ नका. आमच्याविषयी कुत्सित बोलणार्‍याच्या, किंवा निंदकांच्या ताब्यंत आम्हाला सापडू देऊ नका. ॥ ३ ॥


इन्द्रे॑ अ॒ग्ना नमो॑ बृ॒हत्सु॑वृ॒क्तिमेर॑यामहे ।
धि॒या धेना॑ अव॒स्यवः॑ ॥ ४ ॥

इन्द्रे अग्ना नमः बृहत् सुऽवृक्तिं आ ईरयामहे धिया धेनाः अवस्यवः ॥ ४ ॥

इंद्राग्निहो, हा माझा तुम्हांला अत्यंत नम्रपणे प्रणिपात आहे; ही भक्तियुक्त स्तुति आम्ही तुमच्या सेवेस अर्पण करीत आहों. आम्ही तुमच्या कृपेचे याचक आहोत, म्हणून आमच्या स्तवनवाणी अगदी मनापासून तुमच्याकडे येतील असे करतो. ॥ ४ ॥


ता हि शश्व॑न्त॒ ईळ॑त इ॒त्था विप्रा॑स ऊ॒तये॑ ।
स॒बाधो॒ वाज॑सातये ॥ ५ ॥

ता हि शश्वन्तः ईळते इत्था विप्रासः ऊतये सऽबाधः वाजऽसातये ॥ ५ ॥

ह्याप्रमाणे संरक्षणासाठी पुष्कळ कविजन तुमचे स्तवन करतात, आणि ते संकटांत गुरफटले तरी सत्त्वसामर्थ्य प्राप्तीसाठी तुमचे गुणगायन करीत असतात. ॥ ५ ॥


ता वां॑ गी॒र्भिर्वि॑प॒न्यवः॒ प्रय॑स्वन्तो हवामहे ।
मे॒धसा॑ता सनि॒ष्यवः॑ ॥ ६ ॥

ता वां गीःऽभिः विपन्यवः प्रयस्वन्तः हवामहे मेधऽसाता सनिष्यवः ॥ ६ ॥

तसेच पद्य प्रबंध रचणारे आम्हीं स्तुतृजनहि भक्तिपूर्वक तुमचा धांवा करीत असतो. कारण, बुद्धिकौशल्याच्या कार्यांत आम्ही यशस्वी व्हावे अशी आमची इच्छा असते. ॥ ६ ॥


इन्द्रा॑ग्नी॒ अव॒सा ग॑तम॒स्मभ्यं॑ चर्षणीसहा ।
मा नो॑ दुः॒शंस॑ ईशत ॥ ७ ॥

इन्द्राग्नी इति अवसा आ गतं अस्मभ्यं चर्षणिऽसहा मा नः दुःऽशंसः ईशत ॥ ७ ॥

तर हे इंद्राग्निहो, तुम्ही आपल्या कृपाप्रसादांसह आमचेकडे या. सकल प्राण्यांचे दमन करणार्‍या इंद्राग्निहो, दुसर्‍यांना नेहमी अपशब्द बोलणार्‍या दुष्टांची सत्ता आम्हांवर चालू देऊं नका. ॥ ७ ॥


मा कस्य॑ नो॒ अर॑रुषो धू॒र्तिः प्रण॒ङ्मगर्त्य॑स्य ।
इन्द्रा॑ग्नी॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ८ ॥

मा कस्य नः अररुषः धूर्तिः प्रणक् मर्त्यस्य इन्द्राग्नी इति शर्म यच्चतम् ॥ ८ ॥

कोणाहि अधमाचे कपटजाल आम्हांला गळफटून टाकील असे करूं नका. म्हणून हे इंद्राग्निहो, तुमचा सुरक्षित आसरा आम्हांस अर्पण करा. ॥ ८ ॥


गोम॒द्धिर॑ण्यव॒द्वसु॒ यद्वा॒मश्वा॑व॒दीम॑हे ।
इन्द्रा॑ग्नी॒ तद्व॑नेमहि ॥ ९ ॥

गोऽऽमत् हिरण्यऽवत् वसु यत् वां अश्वऽवत् ईमहे इन्द्राग्निइति तत् वनेमहि ॥ ९ ॥

गोधनयुक्त, सुवर्णप्रचुर, आणि अश्वप्रचुर असे जे जे वैभव ते इंद्राग्निहो, आम्हीं तुम्हांपाशी पदर पसरून मागत आहोत, तर त्याची प्राप्ति आम्हांला होईल असे करा. ॥ ९ ॥


यत्सोम॒ आ सु॒ते नर॑ इन्द्रा॒ग्नी अजो॑हवुः ।
सप्ती॑वन्ता सप॒र्यवः॑ ॥ १० ॥

यत् सोमे आ सुते नरः इन्द्राग्नी इति अजोहवुः सप्तिऽवन्ता सपर्यवः ॥ १० ॥

सोमरस पिळून सिद्ध होतांच, शूर भक्तजनांनी हे इंद्राग्निहो, तुम्हांला पाचारण केले आहे. ते अश्वांचे पथक बाळगणारे, आणि फार तरतरीत असूनही ईशसेवेंत अत्यंत तत्पर आहेत. ॥ १० ॥


उ॒क्थेभि॑र्वृत्र॒हन्त॑मा॒ या म॑न्दा॒ना चि॒दा गि॒रा ।
आ॒ङ्गू॒॑षैरा॒विवा॑सतः ॥ ११ ॥

उक्थेभिः वृत्रऽहन्तमा या मन्दाना चित् आ गिरा आङ्गूषैः आविवासतः ॥ ११ ॥

तमोमय अंतःकरणाचे जे शत्रु त्यांचा तुम्हीं समूळ नाश करतां, आणि उक्थगायनांनी हर्षभरित होतां, म्हणून उपासकजन तुम्हाला स्तुतींनी आणि भजन घोषांनी आळवीत असतात. ॥ ११ ॥


ताविद्दुः॒शंसं॒ मर्त्यं॒ दुर्वि॑द्वांसं रक्ष॒स्विन॑म् ।
आ॒भो॒गं हन्म॑ना हतमुद॒धिं हन्म॑ना हतम् ॥ १२ ॥

तौ इत् दुःऽशंसं मर्त्यं दुःऽविद्वांसं रक्षस्विनं आभोगं हन्मना हतं उदऽधिं हमना हतम् ॥ १२ ॥

तर तोंडावाटे अपशब्द काढणार्‍या दुष्टाला, तसेंच विद्वत्तेचा दुरुपयोग करणार्‍या नीचाला, तसेंच राक्षस वृत्तीच्या अधमाला आणि धिप्पाड दुरात्म्याला तुम्ही आपल्या आयुधाने ठार करा. ज्ञानोदकें तुंबवून धरणार्‍यालाहि आयुधाने हाणून ठार मारून टाका. ॥ १२ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९५ ( सरस्वती, सरस्वत् )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - सरस्वती, सरस्वत् : छंद - त्रिष्टुभ्


प्र क्षोद॑सा॒ धाय॑सा सस्र ए॒षा सर॑स्वती ध॒रुण॒माय॑सी॒ पूः ।
प्र॒बाब॑धाना र॒थ्ये॑व याति॒ विश्वा॑ अ॒पो म॑हि॒ना सिन्धु॑र॒न्याः ॥ १ ॥

प्र क्षोदसा धायसा सस्रे एषा सरस्वती धरुणं आयसी पूः
प्रऽबाबधाना रथ्याइव याति विश्वाः अपः महिना सिन्धुः अन्याः ॥ १ ॥

आपल्या सर्वपोषक प्रवाहाने ही सरस्वती नदी पहा कशी वाहात आहे. तिचा सर्वांना असा आधार आहे की जणों लोखंडाचीच तटबंदी. बाकीच्या नद्यांमध्ये हीच श्रेष्ठपणांत वरचढ आहे. ती एखाद्या राजरस्त्याप्रमाणे नीट सरळ वाहते. सिंधु म्हणतात ती हीच होय. ॥ १ ॥


एका॑चेत॒त्सर॑स्वती न॒दीनां॒ शुचि॑र्य॒ती गि॒रिभ्य॒ आ स॑मु॒द्रात् ।
रा॒यश्चेत॑न्ती॒ भुव॑नस्य॒ भूरे॑र्घृ॒तं पयो॑ दुदुहे॒ नाहु॑षाय ॥ २ ॥

एका अचेतत् सरस्वती नदीनां शुचिः यती गिरिऽभ्यः आ समुद्रात्
रायः चेतन्ती भुवनस्य भूरेः घृतं पयः दुदुहे नाहुषाय ॥ २ ॥

पर्वत राजीपासून निघून थेट समुद्रापर्यंत जाऊन भिडणार्‍या नद्यांमध्ये पवित्रतेजस्क, आणि सोज्वळ अशी एक सरस्वतीच ढळढळीत दिसते. ह्या अवाढव्य जगाचे वैभव हीच स्पष्टपणे दिग्दर्शनास आणते, आणि भक्तजनांसाठी घृत आणि उदक ह्यांचे दोहन करून समृद्ध करते. ॥ २ ॥


स वा॑वृधे॒ नर्यो॒ योष॑णासु॒ वृषा॒ शिशु॑र्वृष॒भो य॒ज्ञिया॑सु ।
स वा॒जिनं॑ म॒घव॑द्भ्योव दधाति॒ वि सा॒तये॑ त॒न्वं॑ मामृजीत ॥ ३ ॥

सः ववृधे नर्यः योषणासु वृषा शिशुः वृषभः यज्ञियासु
सः वाजिनं मघवत्ऽभ्यः दधाति वि सातये तन्वं ममृजीत ॥ ३ ॥

सरस्वान् हा सरस्वतीचेच रूप. तो मानवहितकारी नद (नदीरूप) स्त्रियांमध्येच वाढला. तो वर्षणशील नद लहान असला, तरी पूज्य नद्यांमध्ये अग्रेसर आहे. दानशील यजमानांना तो सत्त्वबलाढ्य असा पुत्र देतो; आणि यशःप्राप्तीसाठी त्यांची शरीरें सुदृढ बनवून सज्ज करतो. ॥ ३ ॥


उ॒त स्या नः॒ सर॑स्वती जुषा॒णोप॑ श्रवत्सु॒भगा॑ य॒ज्णे अ॒स्मिन् ।
मि॒तज्ञु॑भिर्नम॒स्यै॑रिया॒ना रा॒या यु॒जा चि॒दुत्त॑रा॒ सखि॑भ्यः ॥ ४ ॥

उत स्या नः सरस्वती जुषाणा उप श्रवत् सुऽभगा यज्ञे अस्मिन्
मितज्ञुऽभिः नमस्यैः इयाना राया युजा चित् उत्ऽतरा सखिऽभ्यः ॥ ४ ॥

भक्तावर प्रसन्न असलेली सद्‌भाग्यदात्री सरस्वती ह्या यज्ञामध्ये आमची विज्ञप्ति श्रवण करो. आम्ही भक्तजन तिजपुढे गुडघे टेंकून प्रणिपात करून तिच्यापुढे पदर पसरतो. म्हणजे तिच्याशीं संलग्न असलेल्या दिव्य ऐश्वर्यासह येऊन ती प्रिय भक्तांना उत्कर्षप्रदच होईल. ॥ ४ ॥


इ॒मा जुह्वा॑ना यु॒ष्मदा नमो॑भिः॒ प्रति॒ स्तोमं॑ सरस्वति जुषस्व ।
तव॒ शर्म॑न्प्रि॒यत॑मे॒ दधा॑ना॒ उप॑ स्थेयाम शर॒णं न वृ॒क्षम् ॥ ५ ॥

इमा जुह्वानाः युष्मत् आ नमःऽभिः प्रति स्तोमं सरस्वति जुषस्व
तव शर्मन् प्रियऽतमे दधानाः उप स्थेयाम शरणं न वृक्षम् ॥ ५ ॥

हे हविर्भाग आम्ही नमस्कारपूर्वक तुजप्रित्यर्थ अग्नीमध्ये अर्पण करीत आहोत. तर हे सरस्वति, आमचे स्तवन तूं मान्य करून घे. तुझ्या अत्यंत प्रेमळ आश्रयाखाली आम्ही आशा धरून एखाद्या महावृक्षाच्या अचल आश्रयास जावे त्याप्रमाणे ठाम निश्चिंत राहूं. ॥ ५ ॥


अ॒यमु॑ ते सरस्वति॒ वसि॑ष्ठो॒ द्वारा॑वृ॒तस्य॑ सुभगे॒ व्या॑वः ।
वर्ध॑ शुभ्रे स्तुव॒ते रा॑सि॒ वाजा॑न्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ६ ॥

अयं ओं इति ते सरस्वति वसिष्ठः द्वारौ ऋतस्य सुऽभगे वि आवर् इत्य् आवः
वर्ध शुभ्रे स्तुवते रासि वाजान् यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ६ ॥

हे सरस्वति, हा मी वसिष्ठ, सद्धर्माचे द्योतक असा जो तुझा यज्ञ त्याची द्वारे उघडीत आहे; म्हणून हे शुभ्रतेजस्क देवि, तूं स्तोतृजनाला सत्त्वसामर्थ्याची देणगी दे, आणि दिव्यजनहो, तुम्हींही तोच आशीर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९६ ( सरस्वती, सरस्वत् )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - सरस्वती, सरस्वत् : छंद - बृहती, सतोबृहती, प्रस्तारपंक्ति, गायत्री


बृ॒हदु॑ गायिषे॒ वचो॑ऽसु॒र्या॑ न॒दीना॑म् ।
सर॑स्वती॒मिन्म॑हया सुवृ॒क्तिभि॒ स्तोमै॑र्वसिष्ठ॒ रोद॑सी ॥ १ ॥

बृहत् ओं इति गायिषे वचः असुर्या नदीनां
सरस्वतीं इत् महय सुऽवृक्तिऽभिः स्तोमैः वसिष्ठ रोदसी इति ॥ १ ॥

सरस्वती ही नद्यांमध्ये दैवी सामर्थ्याने मंडित आहे, तर तिच्या प्रित्यर्थ मी ’बृहत्’ स्तोत्राने गायन करतो. हे स्तोत्या, तूं भक्तियुक्त स्तुतींनी सरस्वतीची महती वर्णन कर. वसिष्ठा, तूंहि रोदसीप्रित्यर्थ स्तोत्रप्रबंधाचा घोष कर. ॥ १ ॥


उ॒भे यत्ते॑ महि॒ना शु॑भ्रे॒ अन्ध॑सी अधिक्षि॒यन्ति॑ पू॒रवः॑ ।
सा नो॑ बोध्यवि॒त्री म॒रुत्स॑खा॒ चोद॒ राधो॑ म॒घोना॑म् ॥ २ ॥

उभे इति यत् ते महिना शुभ्रे अन्धसी इति अधिऽक्षियन्ति पूरवः
सा नः बोधि अवित्री मरुत्ऽसखा चोद राधः मघोनाम् ॥ २ ॥

हे शुभ्रतेजस्वति, हे पौरजन (हे ’पुरु’ चे वंशज) तुझ्या महिम्याच्या प्रभावाने इहपरत्र अशा दोन्हीं लोकांत वास्तव्य करतात; तूं आमची रक्षणकर्त्री आहेस. मरुत्‌सखा (इंद्र) तूंच आहेस तर आम्हांला प्रबुद्ध कर, आणि दानशालि यजमानांकडे तुझा कृपाप्रसाद येऊं दे. ॥ २ ॥


भ॒द्रमिद्भ॒वद्रा कृ॑णव॒त्सर॑स्व॒त्यक॑वारी चेतति वा॒जिनी॑वती ।
गृ॒णा॒ना ज॑मदग्नि॒वत्स्तु॑वा॒ना च॑ वसिष्ठ॒वत् ॥ ३ ॥

भद्रं इत् भद्रा कृणवत् सरस्वती अकवऽअरी चेतति वाजिनीऽवती
गृणाना जमदग्निऽवत् स्तुवाना च वसिष्ठऽवत् ॥ ३ ॥

कल्याणस्वरूपा सरस्वती भक्तांचे कल्याणच करील. ती सत्त्वशक्तीने संपन्न आहे, तशीच अगदी पूर्णपणे ऐश्वर्यसंपन्नही आहे, ह्याची जाणीव ती करून देते. जमदग्नीप्रमाणे आमच्याकडून तिचे संकीर्तन होते आणि ’वसिष्ठा’प्रमाणे स्तवनही होते. ॥ ३ ॥


ज॒नी॒यन्तो॒ न्वग्र॑वः पुत्री॒यन्तः॑ सु॒दान॑वः । सर॑स्वन्तं हवामहे ॥ ४ ॥

जनीयन्तः नु अग्रवः पुत्रिऽयन्तः सुऽदानवः सरस्वन्तं हवामहे ॥ ४ ॥

स्त्रीला भेटण्याची इच्छा धरणार्‍याप्रमाणे किंवा पुत्रप्राप्तीसाठी आतुर असलेल्या मनुष्याप्रमाणे जरी कोणी वागत असले, तरी सर्वांनी दानधर्म आणि भक्ति केलीच पाहिजे. म्हणूनच आम्ही दानशील होऊन सरस्वानाचा धांवा करतो. ॥ ४ ॥


ये ते॑ सरस्व ऊ॒र्मयो॒ मधु॑मन्तो घृत॒श्चुतः॑ । तेभि॑र्नोऽवि॒ता भ॑व ॥ ५ ॥

ये ते सरस्वः ऊर्मयः मधुऽमन्तः घृतऽश्चुतः तेभिः नः अविता भव ॥ ५ ॥

हे सरस्वान् नदा, तुझ्या ज्या लहरी घृतस्रावी आणि मधुरस्रावी आहेत, त्यांच्या योगाने तू आमचा प्रतिपालक हो. ॥ ५ ॥


पी॒पि॒वांसं॒ सर॑स्वत॒ स्तनं॒ यो वि॒श्वद॑र्शतः । भ॒क्षी॒महि॑ प्र॒जामिष॑म् ॥ ६ ॥

पीपिऽवांसं सरस्वतः स्तनं यः विश्वऽदर्शतः भक्षीमहि प्रऽजां इषम् ॥ ६ ॥

त्या सरस्वतीरूप नदीचा सर्वांना प्रेक्षणीय असा जो ओघरूप पुष्ट स्तन आहे, त्यांतील रसाची आम्हांस प्राप्ति होते, आणि संतति आणि उत्साह ह्यांचाही लाभ घडतो. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९७ ( इंद्र, बृहस्पति, ब्रह्मणस्पति सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र, बृहस्पति, इंद्राबृहस्पति : छंद - त्रिष्टुभ्


य॒ज्ञे दि॒वो नृ॒षद॑ने पृथि॒व्या नरो॒ यत्र॑ देव॒यवो॒ मद॑न्ति ।
इन्द्रा॑य॒ यत्र॒ सव॑नानि सु॒न्वे गम॒न्मदा॑य प्रथ॒मं वय॑श्च ॥ १ ॥

यज्ञे दिवः नृऽसदने पृथिव्याः नरः यत्र देवऽयवः मदन्ति
इन्द्राय यत्र सवनानि सुन्वे गमत् मदाय प्रथमं वयः च ॥ १ ॥

द्युलोक आणि भूलोक ह्यांच्या दृष्टीखाली चाललेल्या यज्ञांत ऋत्विक् मंदिरांमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी भक्तजन भक्तीने हृष्ट होतात- आणि ज्या ठिकाणी इंद्राप्रित्यर्थ मी सोमरस पिळतो, त्या ठिकाणी इंद्राचे तारुण्याढ्य रूप प्रादुर्भूत होवो. ॥ १ ॥


आ दैव्या॑ वृणीम॒हेऽवां॑सि॒ बृह॒स्पति॑र्नो मह॒ आ स॑खायः ।
यथा॒ भवे॑म मी॒ळ्हुषे॒ अना॑गा॒ यो नो॑ दा॒ता प॑रा॒वतः॑ पि॒तेव॑ ॥ २ ॥

आ दैव्या वृणीमहे अवांसि बृहस्पतिः नः महे आ सखायः
यथा भवेम मीळ्हुषे अनागाः यः नः दाता परावतः पिताइव ॥ २ ॥

आम्ही दैवी संरक्षणाची याचना करतो, म्हणूनच हे मित्रांनो, आम्ही बृहस्पतीचेंच यशोवर्णन करीत असतो अशा करतां की, त्या मनोरथवर्षक बृहस्पतीच्या दृष्टीने आम्ही निरपराध ठरावे. तो आम्हांला पित्याप्रमाणे आहे, आणि आम्हांला उत्तम लोक देणाराहि तोच आहे. ॥ २ ॥


तमु॒ ज्येष्ठं॒ नम॑सा ह॒विर्भिः॑ सु॒शेवं॒ ब्रह्म॑ण॒स्पतिं॑ गृणीषे ।
इन्द्रं॒ श्लोको॒ महि॒ दैव्यः॑ सिषक्तु॒ यो ब्रह्म॑णो दे॒वकृ॑तस्य॒ राजा॑ ॥ ३ ॥

तं ओं इति ज्येष्ठं नमसा हविःऽभिः सुऽशेवं ब्रह्मणः पतिं गृणीषे
इन्द्रं श्लोकः महि दैव्यः सिसक्तु यः ब्रह्मणः देवऽकृतस्य राजा ॥ ३ ॥

प्रणिपातांपूर्वक हविर्भाग अर्पण करून आणि स्तुतींनी आम्ही त्या सर्वश्रेष्ठ ब्रह्मणस्पतीचेंच गुणसंकीर्तन करतो. ह्या विषयी आम्हांला जो एक दिव्यस्तवनांचा कलाप माहित आहे तो इंद्रालाच पावन होवो. कारण ब्रह्मणस्पति (अथवा इंद्र) हाच देवाने स्फूर्ति दिलेल्या प्रार्थनासूक्तांचा अधिपति आहे. ॥ ३ ॥


स आ नो॒ योनिं॑ सदतु॒ प्रेष्ठो॒ बृह॒स्पति॑र्वि॒श्ववा॑रो॒ यो अस्ति॑ ।
कामो॑ रा॒यः सु॒वीर्य॑स्य॒ तं दा॒त्पर्ष॑न्नो॒ अति॑ स॒श्चतो॒ अरि॑ष्टान् ॥ ४ ॥

सः आ नः योनिं सदतु प्रेष्ठः बृहस्पतिः विश्वऽवारः यः अस्ति
कामः रायः सुऽवीर्यस्य तं दात् पर्षत् नः अति सश्चतः अर् इष्टान् ॥ ४ ॥

अत्यंत भक्तप्रिय, असा जो ब्रह्मणस्पति तो सर्वांनाच अतिशय अभिलषणीय आहे. तो ह्या आसनावर आरोहण करो. उत्कृष्ट शौर्याने जे उपलब्ध होते, अशा वैभवाची आम्हांला जी आकांक्षा आहे, ती इच्छा तो पूर्ण करो; आणि आमच्यामागे हात धुवून लागलेल्या संकटांतून तो आम्हांला पार नेवो. ॥ ४ ॥


तमा नो॑ अ॒र्कम॒मृता॑य॒ जुष्ट॑मि॒मे धा॑सुर॒मृता॑सः पुरा॒जाः ।
शुचि॑क्रन्दं यज॒तं प॒स्त्या॑नां॒ बृह॒स्पति॑मन॒र्वाणं॑ हुवेम ॥ ५ ॥

तं आ नः अर्कं अमृताय जुष्टं इमे धासुः अमृतासः पुराजाः
शुचिऽक्रन्दं यजतं पस्त्यानां बृहस्पतिं अनर्वाणं हुवेम ॥ ५ ॥

जे प्रशस्त ’अर्कस्तोत्र’ आम्हाला अमरत्व देण्यास समर्थ असेल, तेंच स्तोत्र पुरातन कालापासून प्रकट झालेल्या अमर विभूति आम्हांला शिकवोत. आणि ज्याचा शब्द मंगल आहे, ज्याला शत्रूचा प्रहारच होणे शक्य नाही, आणि जो लोकांमध्ये यजनीय आहे, अशा बृहस्पतीचा त्याकरितां आम्ही धांवा करूं. ॥ ५ ॥


तं श॒ग्मासो॑ अरु॒षासो॒ अश्वा॒ बृह॒स्पतिं॑ सह॒वाहो॑ वहन्ति ।
सह॑श्चि॒द्यस्य॒ नील॑वत्स॒धस्थं॒ नभो॒ न रू॒पम॑रु॒षं वसा॑नाः ॥ ६ ॥

तं शग्मासः अरुषासः अश्वाः बृहस्पतिं सहऽवाहः वहन्ति
सहः चित् यस्य नीलऽवत् सधऽस्थं नभः न रूपं अरुषं वसानाः ॥ ६ ॥

कल्याणप्रद, आरक्तवर्ण, असे अश्व जोडी जोडीनेंच बृहस्पतीला इकडे घेऊन येतात. त्या अश्वांचे ठिकाण कोणते म्हणाल तर शत्रुदमन सामर्थ्य जेथें प्रकट होते तो लोक. जणों काय पक्षांचे निवासस्थानच; असे ते अश्व, आकाश जसें निरनिराळे वर्ण धारण करते, त्याप्रमाणें आरक्त वर्णाचे तेज धारण करतात. ॥ ६ ॥


स हि शुचिः॑ श॒तप॑त्रः॒ स शु॒न्ध्युर्हिर॑ण्यवाशीरिषि॒रः स्व॒र्षाः ।
बृह॒स्पतिः॒ स स्वा॑वे॒श ऋ॒ष्वः पु॒रू सखि॑भ्य आसु॒तिं करि॑ष्ठः ॥ ७ ॥

सः हि शुचिः शतऽपत्रः सः शुन्ध्युः हिरण्यऽवाशीः इषिरः स्वःऽसाः
बृहस्पतिः सः सुऽआवेशः ऋष्वः पुरु सखिऽभ्यः आसुति करिष्ठः ॥ ७ ॥

ब्रह्मणस्पति हाच पवित्र, तोच शतपत्रधारी, तोच शुद्ध स्वरूप आहे, त्याचे आयुध सुवर्णाप्रमाणे तेजस्वी आहे. तोच सत्कर्माचा प्रोत्साहक आणि दिव्य प्रकाशाचा दाता आहे. त्याच्याकडून भक्ताला स्फूर्ति सहज मिळते. तो अतिशय उदात्त आहे, सहस्रावधि भक्तांचे सोमस्तवन तो अगदी सफल करतो. ॥ ७ ॥


दे॒वी दे॒वस्य॒ रोद॑सी॒ जनि॑त्री॒ बृह॒स्पतिं॑ वावृधतुर्महि॒त्वा ।
द॒क्षाय्या॑य दक्षता सखायः॒ कर॒द्ब्र ह्म॑णे सु॒तरा॑ सुगा॒धा ॥ ८ ॥

देवी देवस्य रोदसी इति जनित्री इति बृहस्पतिं वावृधतुर् महित्वा
दक्षाय्याय दक्षता सखायह्क् करद् ब्रह्मणे सुतरासुगाधा ॥ ८ ॥

दिव्य रोदसींनी त्या बृहस्पति देवाला प्रकट केले; आणि त्याच्याच महिम्याने त्याला वृद्धिंगत केले. तर ऋत्विजांनो, चातुर्यबलाची जोपासना करणार्‍या त्या देवाला सत्कृत्यांनी आपलासा करा. म्हणजे प्रार्थनासूक्तें भक्तीने म्हणणारांची दुस्तर संकटें तो सुगम करील. ॥ ८ ॥


इ॒यं वां॑ ब्रह्मणस्पते सुवृ॒क्तिर्ब्रह्मेन्द्रा॑य व॒ज्रिणे॑ अकारि ।
अ॒वि॒ष्टं धियो॑ जिगृ॒तं पुरं॑धीर्जज॒स्तम॒र्यो व॒नुषा॒मरा॑तीः ॥ ९ ॥

इयं वां ब्रह्मणः पते सुऽवृक्तिः ब्रह्म इन्द्राय वज्रिणे अकारि
अविष्टं धियः जिगृतं पुरम्ऽधीः जजस्तं अर्यः वनुषां अरातीः ॥ ९ ॥

हे ब्रह्मणस्पति, ही भक्तियुक्त स्तुति, हे प्रार्थनासूक्त, तुजप्रित्यर्थ आणि वज्रधर इंद्राप्रित्यर्थ केले आहे. तर तुम्ही आमच्या ध्यानशक्तीचा विकास करा, आणि आमची तारतम्य बुद्धि जागृत करा, आणि आम्हा आर्य लोकांवर हल्ला करणार्‍या शत्रूंचा निःपात करा. ॥ ९ ॥


बृह॑स्पते यु॒वमिन्द्र॑श्च॒ वस्वो॑ दि॒व्यस्ये॑शाथे उ॒त पार्थि॑वस्य ।
ध॒त्तं र॒यिं स्तु॑व॒ते की॒रये॑ चिद्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ १० ॥

बृहस्पते युवं इन्द्रः च वस्वः दिव्यस्य ईशाथेइति उत पार्थिवस्य
धत्तं रयिं स्तुवते कीरये चित् यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ १० ॥

हे ब्रह्मणस्पते, तूं आणि इंद्र असे दोघेहि सर्व ऐहिक आणि दैवी अशा उत्कृष्ट संपत्तीचे प्रभु आहात, तर तें वैभव प्रयत्‍नशील भक्ताला अर्पण करून अशाच आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९८ ( इंद्राबृहस्पतीसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र, इंद्राबृहस्पती : छंद - त्रिष्टुभ्


अध्व॑र्यवोऽरु॒णं दु॒ग्धमं॒शुं जु॒होत॑न वृष॒भाय॑ क्षिती॒नाम् ।
गौ॒राद्वेदी॑या.ण् अव॒पान॒मिन्द्रो॑ वि॒श्वाहेद्या॑ति सु॒तसो॑ममि॒च्छन् ॥ १ ॥

अध्वर्यवः अरुणं दुग्धं अंशुं जुहोतन वृषभाय क्षितीनां
गौरात् वेदीयान् अवऽपानं इन्द्रः विश्वाहा इत् याति सुतऽसोमं इच्चन् ॥ १ ॥

सोमवल्लीतून काढलेला अरुणवर्ण रस, हे अध्वर्यूंनो, तुम्ही इंद्राला - सकल मानव जातीच्या मार्गदर्शक अग्रेसराला आहुतीनें अर्पण करा. गौर मृग, हा फारच चाणाक्ष, पण त्याला देखील पाणी पिण्याची जागा सांपडणार नाही; परंतु त्याच्याहिपेक्षा सोमरसपानांची स्थले इंद्रालाच उत्तम रीतीने कळतात, म्हणूनच आपल्या ह्या सोमरसाची इच्छा धरून तो प्रत्येक दिवशी येथे आगमन करतो. ॥ १ ॥


यद्द॑धि॒षे प्र॒दिवि॒ चार्वन्नं॑ दि॒वेदि॑वे पी॒तिमिद॑स्य वक्षि ।
उ॒त हृ॒दोत मन॑सा जुषा॒ण उ॒शन्नि॑न्द्र॒ प्रस्थि॑तान्पाहि॒ सोमा॑न् ॥ २ ॥

यत् दधिषे प्रऽदिवि चारु अन्नं दिवेऽऽदिवे पीतिं इत् अस्य वक्षि
उत हृदा उत मनसा जुषाणः उशन् इन्द्र प्रऽस्थितान् पाहि सोमान् ॥ २ ॥

आजपर्यंत तुजला अर्पण झालेली सुंदर हविरत्‍ने तूं स्वीकारली आहेस; तरीसुद्धां प्रतिदिनी तूं ह्या सोमरसाच्या प्राशनाची प्र्वृत्ति ठेवतोसच. आणि तीहि अंतःकरणाने आणि मनाने अगदी प्रसन्न होऊन ठेवतोस. तर इंद्रा, आम्ही तुझ्यापुढे आणलेले सोमरस तूं मोठ्या आतुरतेने प्राशन करच. ॥ २ ॥


ज॒ज्ञा॒नः सोमं॒ सह॑से पपाथ॒ प्र ते॑ मा॒ता म॑हि॒मान॑मुवाच ।
एन्द्र॑ पप्राथो॒र्व१न्तरि॑क्षं यु॒धा दे॒वेभ्यो॒ वरि॑वश्चकर्थ ॥ ३ ॥

जज्ञानः सोमं सहसे पपाथ प्र ते माता महिमानं उवाच
आ इन्द्र पप्राथ उरु अन्तरिक्षं युधा देवेभ्यः वरिवः चकर्थ ॥ ३ ॥

इंद्र प्रकट होतांच त्याने शत्रूच्या निर्दलनासाठी प्रथम सोमरस प्राशन केला, तेव्हां अदिति मातेने त्याचा महिमा आणि त्याचे गौरव असे वर्णन केले; की, "हे इंद्रा, हे विस्तृत आकाश तूं पसरून दिलेंस, आणि शत्रूंशी युद्ध करून दिव्य जनांना सर्व प्रकारची मोकळीक करून दिलीस." ॥ ३ ॥


यद्यो॒धया॑ मह॒तो मन्य॑माना॒न्साक्षा॑म॒ तान्बा॒हुभिः॒ शाश॑दानान् ।
यद्वा॒ नृभि॒र्वृत॑ इन्द्राभि॒युध्या॒स्तं त्वया॒जिं सौ॑श्रव॒सं ज॑येम ॥ ४ ॥

यत् योधयाः महतः मन्यमानान् साक्षाम तान् बाहुऽभिः शाशदानान्
यत् वा नृऽभिः वृतः इन्द्र अभिऽयुध्याः तं त्वया आजिं सौश्रवसं जयेम ॥ ४ ॥

आपल्याच मोठेपणाच्या घमेंडीत राहून निव्वळ मल्लयुद्धाने देखील दुसर्‍यावर चढाई करणारे जे दुरात्मे, त्यांच्याशी जरी आमचे युद्ध तूं जुंपून दिलेस, तरी आम्ही त्या दुष्टांना धुळीस मिळवून देऊं. आम्ही सर्व शूर सैनिक तुझ्याभोंवती गोळा होऊन तुझ्या अधिपत्याखाली युद्ध करूं, आणि तुझ्या कृपेने युद्ध आणि सत्कीर्ति अशा दोहोंनाही जिंकून आणूं. ॥ ४ ॥


प्रेन्द्र॑स्य वोचं प्रथ॒मा कृ॒तानि॒ प्र नूत॑ना म॒घवा॒ या च॒कार॑ ।
य॒देददे॑वी॒रस॑हिष्ट मा॒या अथा॑भव॒त्केव॑लः॒ सोमो॑ अस्य ॥ ५ ॥

प्र इन्द्रस्य वोचं प्रथमा कृतानि प्र नूतना मघऽवा या चकार
यदा इत् अदेवीः असहिष्ट मायाः अथ अभवत् केवलः सोमः अस्य ॥ ५ ॥

म्हणूनच इंद्राने जे पूर्वीच्या काळी पराक्रम केले, आणि नुकती अलीकडेहि ह्या भगवंताने जी अगदी नूतन कृत्यें केली, त्यांचेच वर्णन मी यथाशक्ति केले आहे. राक्षसांच्या सर्व प्रकारच्या कपटी युक्त्या - इंद्राने हाणून पाडून राक्षसांचा नाश केला; त्यामुळेच सोमरस प्राशन करण्याचा मुख्य मान एकट्या इंद्राला मिळाला. ॥ ५ ॥


तवे॒दं विश्व॑म॒भितः॑ पश॒व्यं१ यत्पश्य॑सि॒ चक्ष॑सा॒ सूर्य॑स्य ।
गवा॑मसि॒ गोप॑ति॒रेक॑ इन्द्र भक्षी॒महि॑ ते॒ प्रय॑तस्य॒ वस्वः॑ ॥ ६ ॥

तव इदं विश्वं अभितः पशव्यं यत् पश्यसि चक्षसा सूर्यस्य
गवां असि गोऽऽपतिः एकः इन्द्र भक्षीमहि ते प्रऽयतस्य वस्वः ॥ ६ ॥

हे जे आमच्या भोंवती विश्व दिसते आहे ते तुझेच आहे. ते विश्व तूं आपला नेत्र जो सूर्य त्याच्या योगाने अवलोकन करतोस. इंद्रा, प्रकाशरूप, ज्ञानरूप धेनूंचा तूंच एकटा प्रतिपालक आहेस; म्हणूनच पवित्र जो तूं, त्या तुझ्या कृपेने प्राप्त होणार्‍या उत्कृष्ट संपत्तीचा आम्ही उपभोग घेऊं असे कर. ॥ ६ ॥


बृह॑स्पते यु॒वमिन्द्र॑श्च॒ वस्वो॑ दि॒व्यस्ये॑शाथे उ॒त पार्थि॑वस्य ।
ध॒त्तं र॒यिं स्तु॑व॒ते की॒रये॑ चिद्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

बृहस्पते युवं इन्द्रः च वस्वः दिव्यस्य ईशाथेइति उत पार्थिवस्य
धत्तं रयिं स्तुवते कीरये चित् यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

हे बृहस्पते, इंद्रा, दिव्य अथवा दैवी संपत्ति आणि ह्या भूलोकांतील ऐहिक संपत्ति अशा दोन्ही संपत्तींचे अधिपति तुम्हींच आहांत. तर त्या संपत्तीची देणगी तुमचे यशोवर्णन करणारा जो सत्कर्मशील भक्त असेल त्याला द्या. आणि दिव्य जनांनो, तुम्हींही असेच आशीर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९९ ( इंदाविष्णु )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - विष्णु, इंद्राविष्णु : छंद - त्रिष्टुभ्


प॒रो मात्र॑या त॒न्वा॑ वृधान॒ न ते॑ महि॒त्वमन्व॑श्नुवन्ति ।
उ॒भे ते॑ विद्म॒ रज॑सी पृथि॒व्या विष्णो॑ देव॒ त्वं प॑र॒मस्य॑ वित्से ॥ १ ॥

परः मात्रया तन्वा वृधान न ते महिऽत्वं अनु अश्नुवन्ति
उभे इति ते विद्म रजसी इति पृथिव्याः विष्णो इति देव त्वं परमस्य वित्से ॥ १ ॥

तूं शरीराने वाढता वाढता इतका मोठा होतोस की विश्वाच्या सीमेच्याहि पलिकडे जातोस. तुझ्या मोठेपणाला त्रैलोक्याच्या मर्यादाहि पुर्‍या पडत नाहीत. त्यांपैकी पृथ्वीवरून पाहिले, तर पृथिवी आणि अंतरीक्ष हे दोन लोक आम्हांला कांहीसे माहित होतात. पण हे विष्णु, अतिश्रेष्ठ जो द्युलोक तो तूंच मात्र जाणतोस. ॥ १ ॥


न ते॑ विष्णो॒ जाय॑मानो॒ न जा॒तो देव॑ महि॒म्नः पर॒मन्त॑माप ।
उद॑स्तभ्ना॒ नाक॑मृ॒ष्वं बृ॒हन्तं॑ दा॒धर्थ॒ प्राचीं॑ क॒कुभं॑ पृथि॒व्याः ॥ २ ॥

न ते विष्णो इति जायमानः न जातः देव महिम्नः परं अन्तं आप
उत् अस्तभ्नाः नाकं ऋष्वं बृहन्तं दाधर्थ प्राचीं ककुभं पृथिव्याः ॥ २ ॥

हे विष्णु,, पूर्वी होऊन गेलेला, पुढे होणारा, किंवा आतां असलेला ह्यापैकी ज्याने तुझ्या महिम्याची शेवटची सीमा गाठली आहे असा कोणीही नाही. अत्युच्च आणि विशाल असा जो नक्षत्र लोक तो तूंच स्थिर केलास आणि पृथिवीची पूर्वदिशा तूंच निश्चित केलीस. ॥ २ ॥


इरा॑वती धेनु॒मती॒ हि भू॒तं सू॑यव॒सिनी॒ मनु॑षे दश॒स्या ।
व्य॑स्तभ्ना॒ रोद॑सी विष्णवे॒ते दा॒धर्थ॑ पृथि॒वीम॒भितो॑ म॒यूखैः॑ ॥ ३ ॥

इरावती इतीरावती धेनुमती इतिधेनुऽमती हि भूतं सुयवसिनी इतिसुऽयवसिनी मनुषे दशस्या
वि अस्तभ्नाः रोदसी इति विष्णो इति एते इति दाधर्थ पृथिवीं अभितः मयूखैः ॥ ३ ॥

द्यावा पृथिवी हो, तुम्ही संपत्तीने समृद्ध व्हा, धेनूंनी संपन्न व्हा, तसेंच तृणधान्यानेंहि युक्त व्हा. पण संपत्तीचा वाटा मनुष्यास देण्याच्या इच्छेने समृद्ध व्हा. हे विष्णु, तूं रोदसींना स्थिर केलेंस, आणि आपले किरण् सभोंवती पसरून तूं पृथ्वीला सांवरून धरलेंस. ॥ ३ ॥


उ॒रुं य॒ज्ञाय॑ चक्रथुरु लो॒कं ज॒नय॑न्ता॒ सूर्य॑मु॒षास॑म॒ग्निम् ।
दास॑स्य चिद्वृषशि॒प्रस्य॑ मा॒या ज॒घ्नथु॑र्नरा पृत॒नाज्ये॑षु ॥ ४ ॥

उरुं यज्ञाय चक्रथुः ओं इति लोकं जनयन्ता सूर्यं उषसं अग्निं
दासस्य चित् वृषऽशिप्रस्य मायाः जघ्नथुः नरा पृतनाज्येषु ॥ ४ ॥

हे इंद्राविष्णुहो, तुम्ही सर्व प्रदेश यज्ञमार्गाचा विस्तार होण्यासाठी खुला करून दिलात. उषा, सूर्य, आणि अग्नि ह्यांना उत्पन्न केलेत, आणि बैलाच्या डोक्याच्या आकाराची शिरस्त्राणें वापरणारा जो धर्महीन दुष्ट, त्याच्या सर्व कौटिल्याचा, हे वीरांनो, तुम्ही घोर युद्धांत पार धुव्वा उडवून दिलात. ॥ ४ ॥


इन्द्रा॑विष्णू दृंहि॒ताः शम्ब॑रस्य॒ नव॒ पुरो॑ नव॒तिं च॑ श्नथिष्टम् ।
श॒तं व॒र्चिनः॑ स॒हस्रं॑ च सा॒कं ह॒थो अ॑प्र॒त्यसु॑रस्य वी॒रान् ॥ ५ ॥

इन्द्राविष्णूइति दृंहिताः शम्बरस्य नव पुरः नवतिं च श्नथ् इष्टं
शतं वर्चिनः सहस्रं च साकं हथः अप्रति असुरस्य वीरान् ॥ ५ ॥

हे इंद्राविष्णुहो, शंबर नांवाच्या दुरात्म्याची नव्व्याण्णव नगरे मोठी खंबीर होती, पण तुम्ही ती खिळखिळी करून उध्वस्त केलीत. आणि आसूर नांवाच्या जातीच्या वर्चिनामक राजाचे एक लाख सैनिक अपतिम पराक्रमी होते तरी त्यांचाहि त्या ’वर्चि’ सह तुम्ही फडशा उडवून दिलात. ॥ ५ ॥


इ॒यं म॑नी॒षा बृ॑ह॒ती बृ॒हन्तो॑रुक्र॒मा त॒वसा॑ व॒र्धय॑न्ती ।
र॒रे वां॒ स्तोमं॑ वि॒दथे॑षु विष्णो॒ पिन्व॑त॒मिषो॑ वृ॒जने॑ष्विन्द्र ॥ ६ ॥

इयं मनीषा बृहती बृहन्ता उरुऽक्रमा तवसा वर्धयन्ती
ररे वां स्तोमं विदथेषु विष्णो इति पिन्वतं इषः वृजनेषु इन्द्र ॥ ६ ॥

श्रेष्ठ आणि सर्वव्यापि इंद्राविष्णुहो, ही जी आमची उत्तमोत्तम स्तुति, ती तुमच्याच प्रभावाने विकसित होते. म्हणून येथे यज्ञ सभेमध्ये हा स्तुतीचा कलाप तुम्हांला अर्पण केला आहे. तर हे विष्णु, हे इंद्रा, समरांगणावर आमच्या उत्साहाला, तुम्ही पूर्णपणे भरती आणा. ॥ ६ ॥


वष॑ट् ते विष्णवा॒स आ कृ॑णोमि॒ तन्मे॑ जुषस्व शिपिविष्ट ह॒व्यम् ।
वर्ध॑न्तु त्वा सुष्टु॒तयो॒ गिरो॑ मे यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

वषट् ते विष्णो इति आसः आ कृणोमि तत् मे जुषस्व शिपिऽविष्ट हव्यं
वर्धन्तु त्वा सुऽस्तुतयः गिरः मे यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

हे विष्णु, मी स्वमुखाने ’वषट्’ निविद् म्हणून तुजला आदराने पाचारण करीत आहे. तर हे दीप्तिकिरण-वेष्टिता, माझा हविर्भाग तूं संतोषाने मान्य करून घे. माझी सामान्य वाणी, परंतु प्रेमळ स्तुति, तुझा महिमा वृद्धिंगत करोत, आणि दिव्यविबुधांनो, तुम्हींही असेच आशीर्वाच देऊन सदैव आमचा प्रतिपाल करा. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १०० ( विष्णु )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - विष्णु : छंद - त्रिष्टुभ्


नू मर्तो॑ दयते सनि॒ष्यन्यो विष्ण॑व उरुगा॒याय॒ दाश॑त् ।
प्र यः स॒त्राचा॒ मन॑सा॒ यजा॑त ए॒ताव॑न्तं॒ नर्य॑मा॒विवा॑सात् ॥ १ ॥

नु मर्तः दयते सनिष्यन् यः विष्णवे उरुऽगायाय दाशत्
प्र यः सत्राचा मनसा यजाते एतावन्तं नर्यं आविवासात् ॥ १ ॥

यश मिळविण्याची इच्छा असलेला मनुष्य जगदाक्रमण करणार्‍या भगवान् विष्णुला आपली भक्ति अर्पण करील, तर त्याला सर्व कांही प्राप्त होईल. जो अनन्य भावाने याची सेवा करील, त्याला अशा मानवहितकारी देवाचे साहाय्य मिळेल. ॥ १ ॥


त्वं वि॑ष्णो सुम॒तिं वि॒श्वज॑न्या॒मप्र॑युतामेवयावो म॒तिं दाः॑ ।
पर्चो॒ यथा॑ नः सुवि॒तस्य॒ भूरे॒रश्वा॑वतः पुरुश्च॒न्द्रस्य॑ रा॒यः ॥ २ ॥

त्वं विष्णो इति सुऽमतिं विश्वऽजन्यां अप्रऽयुतां एवऽयावः मतिं दाः
पर्चः यथा नः सुवितस्य भूरेः अश्वऽवतः पुरुऽचन्द्रस्य रायः ॥ २ ॥

हे विष्णु, तूं आम्हाला सर्व लोकांचे कल्याण करण्याची सुबुद्धी दे. हे अभीष्टप्रापका देवा, आम्हाला निष्पाप बुद्धि दे, म्हणजे अति आल्हादप्रद, अश्वसंपन्न वैभव आणि निरतिशय असे आनंदाचे स्थान ह्या दोहोंचाही आम्हाला अनुभव घडेल. ॥ २ ॥


त्रिर्दे॒वः पृ॑थि॒वीमे॒ष ए॒तां वि च॑क्रमे श॒तर्च॑सं महि॒त्वा ।
प्र विष्णु॑रस्तु त॒वस॒स्तवी॑यान्त्वे॒षं ह्य॑स्य॒ स्थवि॑रस्य॒ नाम॑ ॥ ३ ॥

त्रिः देवः पृथिवीं एषः एतां वि चक्रमे शतऽअर्चसं महिऽत्वा
प्र विष्णुः अस्तु तवसः तवीयान् त्वेषं हि अस्य स्थविरस्य नाम ॥ ३ ॥

ह्या देवाने शेकडो ज्वालामुखींनी परिवेष्टित अशा ह्या पृथ्विवीचे आपल्या महिम्याने तीनदां आक्रमण केले. म्हणूनच ज्या ज्या विभूति प्रभावशाली आहेत, त्यांच्यामध्ये विष्णु हा अत्यंत प्रभावशाली ठरला; त्या मुळेंच ह्या पुराण पुरुषाचे नांव तसेच प्रखर आहे. ॥ ३ ॥


वि च॑क्रमे पृथि॒वीमे॒ष ए॒तां क्षेत्रा॑य॒ विष्णु॒र्मनु॑षे दश॒स्यन् ।
ध्रु॒वासो॑ अस्य की॒रयो॒ जना॑स उरुक्षि॒तिं सु॒जनि॑मा चकार ॥ ४ ॥

वि चक्रमे पृथिवीं एषः एतां क्षेत्राय विष्णुः मनुषे दशस्यन्
ध्रुवासः अस्य कीरयः जनासः उरुऽक्षितिं सुऽजनिमा चकार ॥ ४ ॥

मनुष्यांना राहण्यासाठी आणि कृषीकर्मासाठी पृथ्वी योग्य व्हावी म्हणून विष्णुने ह्या पृथ्वीचे तीन वेळां आक्रमण केले. त्या योगाने ह्याचे उद्यमशील भक्तजन निश्चिंत झाले. पवित्रप्रभव विष्णुनें त्यांची निवासस्थाने फारच प्रशस्त केली. ॥ ४ ॥


प्र तत्ते॑ अ॒द्य शि॑पिविष्ट॒ नामा॒र्यः शं॑सामि व॒युना॑नि वि॒द्वान् ।
तं त्वा॑ गृणामि त॒वस॒मत॑व्या॒न्क्षय॑न्तम॒स्य रज॑सः परा॒के ॥ ५ ॥

प्र तत् ते अद्य शिपिऽविष्ट नाम अर्यः शंसामि वयुनानि विद्वान्
तं त्वा गृणामि तवसं अतव्यान् क्षयन्तं अस्य रजसः पराके ॥ ५ ॥

हे शिपिविष्टा, हे दीप्तकिरण वेष्टिता, तूं आर्य जनांचा अभिमानी म्हणून त्याच तुझ्या नांवाची मी आज महती वर्णन करतो. सर्व धर्मांचे, सर्व शास्त्रांचे तुला ज्ञान आहे. मी दुर्बल असलो, तरी तुजसारख्या बलवंताचे संकीर्तन करतो. ज्या तुझा निवास हा अंतरालाच्या पलिकडे देखील आहे, त्या तुझ्या नांवाचे संकीर्तन करतो. ॥ ५ ॥


किमित्ते॑ विष्णो परि॒चक्ष्यं॑ भू॒त्प्र यद्व॑व॒क्षे शि॑पिवि॒ष्टो अ॑स्मि ।
मा वर्पो॑ अ॒स्मदप॑ गूह ए॒तद्यद॒न्यरू॑पः समि॒थे ब॒भूथ॑ ॥ ६ ॥

किं इत् ते विष्णो इति परिऽचक्ष्यं भूत् प्र यत् ववक्षे शिपिऽविष्टः अस्मि
मा वर्पः अस्मत् अप गूहः एतत् यत् अन्यऽरूपः समिथे बभूथ ॥ ६ ॥

मी शिपिविष्ट आहे, मी शिपिविष्ट आहे असे हे विष्णु, तूं वरचेवर म्हणतोस, तर त्यांत विलक्षण असे काय आहे ? म्हणून कृपा कर आणि तुझे ते अलौकिक रूप तूं आम्हांपासून गुप्त ठेवूं नको; कारण युद्धामध्ये तूं नानाप्रकारची दुसरी रूपें घेतोसच. ॥ ६ ॥


वष॑ट् ते विष्णवा॒स आ कृ॑णोमि॒ तन्मे॑ जुषस्व शिपिविष्ट ह॒व्यम् ।
वर्ध॑न्तु त्वा सुष्टु॒तयो॒ गिरो॑ मे यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

वषट् ते विष्णो इति आसः आ कृणोमि तत् मे जुषस्व शिपिऽविष्ट हव्यं
वर्धन्तु त्वा सुऽस्तुतयः गिरः मे यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

हे विष्णु, मी स्वमुखाने 'वषट्’ असे म्हणून तुला आदराने पाचारण करीत आहे. तर हे शिपिविष्टा, (हे दीप्तकिरणवेष्टिता) माझ्या हविर्भागाचा तूं संतोषानें स्वीकार कर. माझे सामान्य शब्द परंतु प्रेमळ स्तुति तुझा महिमा वृद्धिंगत करोत, आणि दिव्यगणांनो, तुम्हीही अशाच आशीर्वादांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १०१ ( पर्जन्यसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि किंवा कुमार आग्नेय : देवता - पर्जन्य : छंद - त्रिष्टुभ्


ति॒स्रो वाचः॒ प्र व॑द॒ ज्योति॑रग्रा॒ या ए॒तद्दु॒ह्रे म॑धुदो॒घमूधः॑ ।
स व॒त्सं कृ॒ण्वन्गर्भ॒मोष॑धीनां स॒द्यो जा॒तो वृ॑ष॒भो रो॑रवीति ॥ १ ॥

तिस्रः वाचः प्र वद ज्योतिःऽअग्राः याः एतत् दुह्रे मधुऽदोघं ऊधः
सः वत्सं कृण्वन् गर्भं ओषधीनां सद्यः जातः वृषभः रोरवीति ॥ १ ॥

प्रणवज्योतिनें आरंभ होणार्‍या तीन्हीं वेद वाणीचा तूं आतां उच्चार कर. त्यांच्या योगानें मधुररस वर्षाव करणार्‍या ह्या मेघरूप स्तनांचे दोहन होतें. पहा तत्काळ प्रकट होऊन भूमिमध्यें अंकुर आणि ओषधिमध्यें बीज उत्पन्न करणारा तो मेघरूप वृषभ डुरकण्या फोडूं लागला आहे ॥ १ ॥


यो वर्ध॑न॒ ओष॑धीनां॒ यो अ॒पां यो विश्व॑स्य॒ जग॑तो दे॒व ईशे॑ ।
स त्रि॒धातु॑ शर॒णं शर्म॑ यंसत्त्रि॒वर्तु॒ ज्योतिः॑ स्वभि॒ष्ट्य१स्मे ॥ २ ॥

यः वर्धनः ओषधीनां यः अपां यः विश्वस्य जगतः देवः ईशे
सः त्रिऽधातु शरणं शर्म यंसत् त्रिऽवर्तु ज्योतिः सुऽअभिष्टि अस्मे इति ॥ २ ॥

जो पर्जन्य, औषधी वनस्पतींना वाढीस लावतो, नद्यांना पूर आणतो; आणि त्या योगानें जो सकल जगतावर सत्ता चालवितो, तो हा पर्जन्य आम्हांला तीन प्रकारच्या धातूंनीं, तीन प्रकारांनीं संपन्न असा शरीररूपी आश्रय आणि सुखशान्ति देवो; आणि त्रिकालगामी असें जें आमचें तेजोरूप अभीष्ट तेंहि आम्हांला अर्पण करो ॥ २ ॥


स्त॒रीरु॑ त्व॒द्भषव॑ति॒ सूत॑ उ त्वद्यथाव॒शं त॒न्वं॑ चक्र ए॒षः ।
पि॒तुः पयः॒ प्रति॑ गृभ्णाति मा॒ता तेन॑ पि॒ता व॑र्धते॒ तेन॑ पु॒त्रः ॥ ३ ॥

स्तरीः ओं इति त्वत् भवति सूतः ओं इति त्वत् यथावशं तन्वं चक्रे एषः
पितुः पयः प्रति गृभ्णाति माता तेन पिता वर्धते तेन पुत्रः ॥ ३ ॥

कांहीं मेघ वांझ गाईप्रमाणें उदकरहित तर कांहीं वृष्टिजल प्रसवणारें असतात; अशा रीतीनें पर्जन्य आपल्या इच्छेप्रमाणें शरीर धारण करतो; तेव्हां ही आमची पृथिवी माता पित्यापासून वृष्टिरूप बीज धारण करते; त्याबरोबर पित्याला हर्ष होतो आणि पुत्र वाढीस लागतो. ॥ ३ ॥


यस्मि॒न्विश्वा॑नि॒ भुव॑नानि त॒स्थुस्ति॒स्रो द्याव॑स्त्रे॒धा स॒स्रुरापः॑ ।
त्रयः॒ कोशा॑स उप॒सेच॑नासो॒ मध्व॑ श्चोतन्त्य॒भितो॑ विर॒प्शम् ॥ ४ ॥

यस्मिन् विश्वानि भुवनानि तस्थुः तिस्रः द्यावः त्रेधा ससुः आपः
त्रयः कोशासः उपऽसेचनासः मध्वः श्चोतन्ति अभितः विऽरप्शम् ॥ ४ ॥

ज्याच्या आधारावर तिन्हीं भुवनें राहिलीं आहेत, ज्याच्या आश्रयानें तीन्हीं द्युलोक आहेत, आणि ज्याच्या बलावर तीन्हीं दिशांकडील उदकप्रवाह वाहूं लागतात; त्याच्याच मधुर रसाचे तिन्हीं संचय उदकाचा भरपूर वर्षाव सर्वत्र करितात. ॥ ४ ॥


इ॒दं वचः॑ प॒र्जन्या॑य स्व॒राजे॑ हृ॒दो अ॒स्त्वन्त॑रं॒ तज्जु॑जोषत् ।
म॒यो॒भुवो॑ वृ॒ष्टयः॑ सन्त्व॒स्मे सु॑पिप्प॒ला ओष॑धीर्दे॒वगो॑पाः ॥ ५ ॥

इदं वचः पर्जन्याय स्वऽराजे हृदः अस्तु अन्तरं तत् जुजोषत्
मयःऽभुवः वृष्टयः सन्तु अस्मे इति सुऽपिप्पलाः ओषधीः देवऽगोपाः ॥ ५ ॥

स्वातंत्र्यसुख उपभोगणार्‍या पर्जन्य राजाला हें माझें स्तुतिस्तोत्र अर्पण असो. तें स्तवन त्याच्या हृदयाचा अन्तर्भागदेखील प्रसन्नतेनें भरून टाको. पर्जन्यवृष्टि आम्हांला आनंदमय होवो, वनस्पतींचे संरक्षण देव करो आणि त्या फलपुष्पसंपन्न होवोत. ॥ ५ ॥


स रे॑तो॒धा वृ॑ष॒भः शश्व॑तीनां॒ तस्मि॑न्ना॒त्मा जग॑तस्त॒स्थुष॑श्च ।
तन्म॑ ऋ॒तं पा॑तु श॒तशा॑रदाय यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ६ ॥

सः रेतःऽधाः वृषभः शश्वतीनां तस्मिन् आत्मा जगतः तुस्थुषः च
तत् मा ऋतं पातु शतऽशारदाय यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ६ ॥

सर्व औषधीमध्यें जलवर्षक पर्जन्य हा फलबीज ठेवणारा आहे, म्हणूनच सकल स्थावर जंगमाचा प्राण त्याच्यामध्यें राहतो; यास्तव माझ्याहि सद्धर्माचें रक्षण शतावधि वर्षेंपर्यंत देखील हा पर्जन्यच करो, आणि देवांनो, तुम्हीं पण आपल्या मंगल आशीर्वचनांनीं आमचें रक्षण करा. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १०२ ( पर्जन्यसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि किंवा कुमार आग्नेय : देवता - पर्जन्य : छंद - पादनिचृद्, गायत्री


प॒र्जन्या॑य॒ प्र गा॑यत दि॒वस्पु॒त्राय॑ मी॒ळ्हुषे॑ । स नो॒ यव॑समिच्छतु ॥ १ ॥

पर्जन्याय प्र गायत दिवः पुत्राय मीळ्हुषे सः नः यवसं इच्चतु ॥ १ ॥

आकाशपुत्र जलवर्षक जो पर्जन्य, त्याच्या प्रीत्यर्थ स्तुतिगायन करा, आम्हांला धनधान्य देण्याची त्यालाच इच्छा होवो ॥ १ ॥


यो गर्भ॒मोष॑धीनां॒ गवां॑ कृ॒णोत्यर्व॑ताम् । प॒र्जन्यः॑ पुरु॒षीणा॑म् ॥ २ ॥

यः गर्भं ओषधीनां गवां कृणोति अर्वतां पर्जन्यः पुरुषीणाम् ॥ २ ॥

कारण वनस्पतींमध्यें, धेनूंमध्यें अश्वांमध्ये आणि स्त्रिया यांच्या ठिकाणी गर्भधारणा करविणार्‍या पर्जन्य देवते - ॥ २ ॥


तस्मा॒ इदा॒स्ये॑ ह॒विर्जु॒होता॒ मधु॑मत्तमम् । इळां॑ नः सं॒यतं॑ करत् ॥ ३ ॥

तस्मै इत् आस्ये हविः जुहोत मधुमत्ऽतमं इळां नः सम्ऽयतं करत् ॥ ३ ॥

हविर्दत्त पर्जन्याकडे तुम्ही विपुल अन्नाची याचना करा. ॥ ३ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १०३ ( मंडूकसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - मंडूक, पर्जन्य : छंद - त्रिष्टुभ्, अनुष्टुभ्


सं॒व॒त्स॒रं श॑शया॒ना ब्रा॑ह्म॒णा व्र॑तचा॒रिणः॑ ।
वाचं॑ प॒र्जन्य॑जिन्वितां॒ प्र म॒ण्डूका॑ अवादिषुः ॥ १ ॥

संवत्सरं शशयानाः ब्राह्मणाः व्रतऽचारिणः
वाचं पर्जन्यऽजिन्वितां प्र मण्डूकाः अवादिषुः ॥ १ ॥

बेडूक व्रतस्थ विप्राप्रमाणे वर्षभर मौन पाळतात. पण जसा वर्षाकाल आरंभ होतो तसा अति हर्षित होऊन पर्जन्यसूचक डराँव डराँव ओरडा सुरू करतात. ॥ १ ॥


दि॒व्या आपो॑ अ॒भि यदे॑न॒माय॒न्दृतिं॒ न शुष्कं॑ सर॒सी शया॑नम् ।
गवा॒मह॒ न मा॒युर्व॒त्सिनी॑नां म॒ण्डूका॑नां व॒ग्नुरत्रा॒ समे॑ति ॥ २ ॥

दिव्याः आपः अभि यत् एनं आयन् दृतिं न शुष्कं सरसी इति शयानं
गवां अह न मायुः वत्सिनीनां मण्डूकानां वग्नुः अत्र सं एति ॥ २ ॥

ग्रीष्मकाली सुष्क पखालीप्रमाणे अचेतनसे पडून राहिलेले मंडूक स्वर्गीय पर्जन्यधारांचा वर्षाव होताच, सवत्स धेनू जसा शब्द करते, तसाच अति हर्षित झाल्यामुळे घोष करू लागले. ॥ २ ॥


यदी॑मेना.ण् उश॒तो अ॒भ्यव॑र्षीत्तृ॒ष्याव॑तः प्रा॒वृष्याग॑तायाम् ।
अ॒ख्ख॒ली॒कृत्या॑ पि॒तरं॒ न पु॒त्रो अ॒न्यो अ॒न्यमुप॒ वद॑न्तमेति ॥ ३ ॥

यत् ईं एनान् उशतः अभि अवर्षीत् तृष्यावतः प्रावृषि आगतायां
अख्खलीकृत्य पितरं न पुत्रः अन्यः अन्यं उप वदन्तं एति ॥ ३ ॥

तृषार्त असलेल्या मंडूकांवर पर्जन्यवृष्टी होताच जसे बालक बोबडे बोल करते तसे आपापसाम्त शब्द करूं लागले आहेत. ॥ ३ ॥


अ॒न्यो अ॒न्यमनु॑ गृभ्णात्येनोर॒पां प्र॑स॒र्गे यदम॑न्दिषाताम् ।
म॒ण्डूको॒ यद॒भिवृ॑ष्टः॒ कनि॑ष्क॒न्पृश्निः॑ सम्पृ॒ङ्क्ते हरि॑तेन॒ वाच॑म् ॥ ४ ॥

अन्यः अन्यं अनु गृभ्णाति एनोः अपां प्रऽसर्गे यत् अमन्दिषातां
मण्डूकः यत् अभिऽवृष्टः कनिस्कन् पृश्निः सम्ऽपृङ्क्ते हरितेन वाचम् ॥ ४ ॥

पर्जन्यवृष्टीने आनंदित झालेल्या, निथळत्या शरीराचा चित्रविचित्र वर्णाचा मंडूक आपल्या जवळच असलेल्या इतर हरितवर्णीय मंडूकांच्या आवाजात आपला आवाज मिसळतो आणि त्यास पकडतो. ॥ ४ ॥


यदे॑षाम॒न्यो अ॒न्यस्य॒ वाचं॑ शा॒क्तस्ये॑व॒ वद॑ति॒ शिक्ष॑माणः ।
सर्वं॒ तदे॑षां स॒मृधे॑व॒ पर्व॒ यत्सु॒वाचो॒ वद॑थ॒नाध्य॒प्सु ॥ ५ ॥

यत् एषां अन्यः अन्यस्य वाचं शाक्तस्यऽइव वदति शिक्षमाणः
सर्वं तत् एषां समृधाइव पर्व यत् सुऽवाचः वदथन अधि अप्ऽसु ॥ ५ ॥

गुरूसमवेत संथा करणार्‍या शिष्याप्रमाणे सामुदायिक शब्द करणार्‍या मंडूकांनो, शब्द करतेवेळी तुमच्या शरीराचे सारे भाग जणू एकजीव होतात. ग्रीष्मकाली मृत्तिकामय बनलेले तुम्ही वर्षाकाली पुन्हा सजीव होता. ॥ ५ ॥


गोमा॑यु॒रेको॑ अ॒जमा॑यु॒रेकः॒ पृश्नि॒रेको॒ हरि॑त॒ एक॑ एषाम् ।
स॒मा॒नं नाम॒ बिभ्र॑तो॒ विरू॑पाः पुरु॒त्रा वाचं॑ पिपिशु॒र्वद॑न्तः ॥ ६ ॥

गोऽऽमायुः एकः अजऽमायुः एकः पृश्निः एकः हरितः एकः एषां
समानं नाम बिभ्रतः विऽरूपाः पुरुऽत्र वाचं पिपिशुः वदन्तः ॥ ६ ॥

वर्षाकाली गर्जना करणारे नानाविध मंडूक विभिन्नस्थली उत्पन्न होतात. धेनूसदृश हंबरणारा मंडूक वित्रविचित्रवर्णीय असून, अजापुत्रासदृश शब्द करणारा मंडूक हरितवर्णीय असतो. ॥ ६ ॥


ब्रा॒ह्म॒णासो॑ अतिरा॒त्रे न सोमे॒ सरो॒ न पू॒र्णम॒भितो॒ वद॑न्तः ।
सं॒व॒त्स॒रस्य॒ तदहः॒ परि॑ ष्ठ॒ यन्म॑ण्डूकाः प्रावृ॒षीणं॑ ब॒भूव॑ ॥ ७ ॥

ब्राह्मणासः अतिऽरात्रे न सोमे सरः न पूर्णं अभितः वदन्तः
संवत्सरस्य तत् अहरिति परि स्थ यत् मण्डूकाः प्रावृषीणं बभूव ॥ ७ ॥

वर्षाकालच्या प्रारंभी सृष्टीमध्ये सर्वत्र मंडूक उत्पन्न होतात. ’अतिरात्र’ यज्ञातील सोमयाजी विप्रांप्रमाणे सरोवराच्या काठी मंडूक शब्द करीत आहेत. ॥ ७ ॥


ब्रा॒ह्म॒णासः॑ सो॒मिनो॒ वाच॑मक्रत॒ ब्रह्म॑ कृ॒ण्वन्तः॑ परिवत्स॒रीण॑म् ।
अ॒ध्व॒र्यवो॑ घ॒र्मिणः॑ सिष्विदा॒ना आ॒विर्भ॑वन्ति॒ गुह्या॒ न के चि॑त् ॥ ८ ॥

ब्राह्मणासः सोमिनः वाचं अक्रत ब्रह्म कृण्वन्तः परिवत्सरीणं
अध्वर्यवः घर्मिणः सिस्विदानाः आविः भवन्ति गुह्याः न के च् इत् ॥ ८ ॥

धर्मवेष्टेत ’प्रवर्ग्य’ ऋत्विजांप्रमाणे निथळत्या शरीराचे मंडूक पर्जन्यवृष्टीच्या अखेरीस अवतीर्ण होतात. स्तोत्रपाठक सोमप्रेमी विप्रांप्रमाणे मंडूक शब्द करीत आहेत. ॥ ८ ॥


दे॒वहि॑तिं जुगुपुर्द्वाद॒शस्य॑ ऋ॒तुं नरो॒ न प्र मि॑नन्त्ये॒ते ।
सं॒व॒त्स॒रे प्रा॒वृष्याग॑तायां त॒प्ता घ॒र्मा अ॑श्नुवते विस॒र्गम् ॥ ९ ॥

देवऽहितिं जुगुपुः द्वादशस्य ऋतुं नरः न प्र मिनन्ति एते
संवत्सरे प्रावृषि आगतायां तप्ताः घर्माः अश्नुवते विऽसर्गम् ॥ ९ ॥

देवाज्ञा आणि ऋतुमियम यांचे पालन करणारे श्रेष्ठ मंडूक वर्षाकालच्या प्रारंभी आपल्या लपण्याच्या जागेतून बाहेर पडतात. ॥ ९ ॥


गोमा॑युरदाद॒जमा॑युरदा॒त्पृश्नि॑रदा॒द्धरि॑तो नो॒ वसू॑नि ।
गवां॑ म॒ण्डूका॒ दद॑तः श॒तानि॑ सहस्रसा॒वे प्र ति॑रन्त॒ आयुः॑ ॥ १० ॥

गोऽऽमायुः अदात् अजऽमायुः अदात् पृश्निः अदात् हरितः नः वसूनि
गवां मण्डूकाः ददतः शतानि सहस्रऽसावे प्र तिरन्ते आयुः ॥ १० ॥

धेनू अथवा अजापुत्रसदृश गर्जनाकारी अशा, चित्रविचित्र आणि हरितवर्णीय मंडूकांनी वर्षा ऋतूच्या अखेरीस आम्हास संपत्ती, शतावधी धेनू, आणि दीर्घायुष्य प्रदान केले. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त १०४ ( रक्षोघ्नसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अनेक देवता : छंद - जगती, अनुष्टुभ्, त्रिष्टुभ्


इन्द्रा॑सोमा॒ तप॑तं॒ रक्ष॑ उ॒ब्जतं॒ न्य॑र्पयतं वृषणा तमो॒वृधः॑ ।
परा॑ शृणीतम॒चितो॒ न्यो॑षतं ह॒तं नु॒देथां॒ नि शि॑शीतम॒त्रिणः॑ ॥ १ ॥

इन्द्रासोमा तपतं रक्षः उब्जतं नि अर्पयतं वृषणा तमःऽवृधः
परा शृणीतं अचितः नि ओषतं हतं नुदेथां नि शिशीतं अत्रिणः ॥ १ ॥

इन्द्रासोमहो, राक्षसांच्या अंगाचा भडका उडवून द्या. त्यांना खालीं आपटा. वीरोttaमांनो, अज्ञानान्धकाराला अधिकाधिक वाढविणार्‍या दुष्टांना ठार करून अधोगतीत ढकला. त्या मूढमति राक्षसांचा पराभव करा; त्यांना भाजून काढा. त्या नरभक्षकांना पळवून लावा, मारून टाका, त्यांचा अगदीं नायनाट करा. ॥ १ ॥


इन्द्रा॑सोमा॒ सम॒घशं॑सम॒भ्य१घं तपु॑र्ययस्तु च॒रुर॑ग्नि॒वा.ण् इ॑व ।
ब्र॒ह्म॒द्विषे॑ क्र॒व्यादे॑ घो॒रच॑क्षसे॒ द्वेषो॑ धत्तमनवा॒यं कि॑मी॒दिने॑ ॥ २ ॥

इन्द्रासोमा सं अघऽशंसं अभि अघं तपुः ययस्तु चरुः अग्निवान्ऽइव
ब्रह्मऽद्विषे क्रव्यऽअदे घोरऽचक्षसे द्वेषः धत्तं अनवायं किमीदिने ॥ २ ॥

इन्द्रासोमहो, आपल्या पापमार्गाचीच ऐट मिळविणारा पातकी अग्नींत टाकलेल्या चरूप्रमाणें तुमच्या तेजानें होरपळून तडफडून मरो. कारण ज्ञानाचा (वेदाचा) द्वेष करणारा, कच्चेंच मांस खाणारा, क्रूर नजरेनें पाहणारा, आणि "आतां काय" "आतां कशी" अशी आरोळी ठोकीत हिंडणारा किमीदिन पिशाच, ह्या सर्वांचा तुम्हीं निरंतर द्वेषच करितां. ॥ २ ॥


इन्द्रा॑सोमा दु॒ष्कृतो॑ व॒व्रे अ॒न्तर॑नारम्भ॒णे तम॑सि॒ प्र वि॑ध्यतम् ।
यथा॒ नातः॒ पुन॒रेक॑श्च॒नोदय॒त्तद्वा॑मस्तु॒ सह॑से मन्यु॒मच्छवः॑ ॥ ३ ॥

इन्द्रासोमा दुःऽकृतः वव्रे अन्तः अनारम्भणे तमसि प्र विध्यतं
यथा न अतः पुनः एकः चन उत्ऽअयत् तत् वां अस्तु सहसे मन्युऽमत् शवः ॥ ३ ॥

इन्द्रासोमहो, ज्याच्या तळाचा कांही थांगच लागत नाहीं, अशा घोर अन्धकाराच्या खोल गर्तेंत दुराचरण करणार्‍या अधमांना ढकलून तेथे भोसकून ठार करा, तें अशा रीतीनें कीं, एकसुद्धां दुष्ट तेथून पुनः वर येऊं नये. ह्याप्रमाणें त्यांचें पारिपत्य करण्यानें तुमच्या क्रोधयुक्त बलाचा सपाटा जगाच्या अनुभवास येऊं द्या ॥ ३ ॥


इन्द्रा॑सोमा व॒र्तय॑तं दि॒वो व॒धं सं पृ॑थि॒व्या अ॒घशं॑साय॒ तर्ह॑णम् ।
उत्त॑क्षतं स्व॒र्यं१ पर्व॑तेभ्यो॒ येन॒ रक्षो॑ वावृधा॒नं नि॒जूर्व॑थः ॥ ४ ॥

इन्द्रासोमा वर्तयतं दिवः वधं सं पृथिव्याः अघऽशंसाय तहर्णं
उत् तक्षतं स्वर्यं पर्वतेभ्यः येन रक्षः ववृधानं निऽजूर्वथः ॥ ४ ॥

इन्द्रासोमहो, पातकांचीच घमेंड बाळगणार्‍यांचा चक्काचूर उडविण्याकरितांच तुम्हीं आपलीं दिव्य आयुधें ह्या पृथिवीकडे सरसावा; आपलें दिव्य विद्युत्‌रूपी शस्त्र पर्वताकार मेघांतून बाहेर काढून तें परजा; आणि वाढत जाणार्‍या राक्षस सेनेचा समूळ नि:पात करा. ॥ ४ ॥


इन्द्रा॑सोमा व॒र्तय॑तं दि॒वस्पर्य॑ग्नित॒प्तेभि॑र्यु॒वमश्म॑हन्मभिः ।
तपु॑र्वधेभिर॒जरे॑भिर॒त्रिणो॒ नि पर्शा॑ने विध्यतं॒ यन्तु॑ निस्व॒रम् ॥ ५ ॥

इन्द्रासोमा वर्तयतं दिवः परि अग्निऽतप्तेभिः युवं अश्महन्मऽभिः
तपुःऽवधेभिः अजरेभिः अत्रिणः नि पर्शाने विध्यतं यन्तु निऽऽस्वरम् ॥ ५ ॥

इन्द्रासोमहो, अग्नीमध्यें पाजळून लाल झालेलीं लोहास्त्रें तुम्हीं द्युलोकांतून राक्षसांवर फेंका; आणि न झिजणार्‍या परंतु तापलेल्या हत्यारांनीं नरभक्षक राक्षसांच्या बरगडींत असा जोरानें वार करा, कीं ओरडण्याचीसुद्धां फुरसत न सापडतां ते तेथल्या तेथेच गतप्राण होतील. ॥ ५ ॥


इन्द्रा॑सोमा॒ परि॑ वां भूतु वि॒श्वत॑ इ॒यं म॒तिः क॒क्ष्याश्वे॑व वा॒जिना॑ ।
यां वां॒ होत्रां॑ परिहि॒नोमि॑ मे॒धये॒मा ब्रह्मा॑णि नृ॒पती॑व जिन्वतम् ॥ ६ ॥

इन्द्रासोमा परि वां भूतु विश्वतः इयं मतिः कक्ष्या अश्वाइव वाजि ना
यां वां होत्रां परिऽहिनोमि मेधया इमा ब्रह्माणि नृपतीइवेतिनृपतीऽइव जिन्वतम् ॥ ६ ॥

इन्द्रासोमहो, लढाऊ घोड्याभोंवतीं जसा त्याचा तंग लपेटलेला असतो, त्याप्रमाणें आम्हाविषयींची ही तुमची सद्‍बुद्धि आमच्याभोवतीं निरंतर ठेवा; आणि ही जी भाक मीं अंत:करणाच्या तळमळीनें देत आहें, आणि हीं जीं प्रार्थनासूक्तें मीं म्हणत आहें त्यांचें एखाद्या राजानें वाहवा करावी त्याप्रमाणें कौतुक करून त्यांना सफल करा. ॥ ६ ॥


प्रति॑ स्मरेथां तु॒जय॑द्भि॒ररेवै॑र्ह॒तं द्रु॒हो र॒क्षसो॑ भङ्गु॒वराव॑तः ।
इन्द्रा॑सोमा दु॒ष्कृते॒ मा सु॒गं भू॒द्यो नः॑ क॒दा चि॑दभि॒दास॑ति द्रु॒हा ॥ ७ ॥

प्रति स्मरेथां तुजयत्ऽभिः एवैः हतं द्रुहः रक्षसः भङ्गुरऽवतः
इन्द्रासोमा दुःऽकृते मा सुऽगं भूत् यः नः कदा चित् अभिऽदासति द्रुहा ॥ ७ ॥

कार्यासाठीं झपाट्याने जाण्यायेण्याच्या गर्दींतदेखील आमचें स्मरण ठेवा; आणि जिकडे तिकडे नासधूस करणार्‍या दुष्टांचा आणि राक्षसांचा उच्छेद करा. तसेंच जो द्वेषबुद्धीनें दुसर्‍याचा केव्हां ना केव्हां तरी घात करण्याची बुद्धि धरतो, अशा दुरात्म्याला कोठेही सुख लागूं देऊं नका. ॥ ७ ॥


यो मा॒ पाके॑न॒ मन॑सा॒ चर॑न्तमभि॒चष्टे॒ अनृ॑तेभि॒र्वचो॑भिः ।
आप॑ इव का॒शिना॒ संगृ॑भीता॒ अस॑न्न॒स्त्वास॑त इन्द्र व॒क्ता ॥ ८ ॥

यः मा पाकेन मनसा चरन्तं अभिऽचष्टे अनृतेभिः वचःऽभिः
आपःऽइव काशिना सम्ऽगृभीताः असन् अस्तु असतः इन्द्र वक्ता ॥ ८ ॥

हे इन्द्रा, मीं शुद्ध निष्कपट मनानें वागत असतां जो खोटें बोलून मजवर पातकाचा आरोप करतो, तो खोडसाळ दुष्ट, चाळणींत ओतलेल्या पाण्याप्रमाणें होता कीं नव्हता असा होवो. ॥ ८ ॥


ये पा॑कशं॒सं वि॒हर॑न्त॒ एवै॒र्ये वा॑ भ॒द्रं दू॒षय॑न्ति स्व॒धाभिः॑ ।
अह॑ये वा॒ तान्प्र॒ददा॑तु॒ सोम॒ आ वा॑ दधातु॒ निरृ॑तेरु॒पस्थे॑ ॥ ९ ॥

ये पाकऽशंसं विऽहरन्ते एवैः ये वा भद्रं दूषयन्ति स्वधाभ् इः
अहये वा तान् प्रऽददातु सोमः आ वा दधातु निःऽऋतेः उपऽस्थे ॥ ९ ॥

पवित्राचरणाविषयीं ज्याची सर्वत्र प्रशंसा होते, अशा सच्छील लोकांना जे नानाप्रकारच्या युक्त्यांनीं गोत्यांत आणतात, किंवा त्याच्या स्वाभाविकपणें चाललेल्या सदाचरणास दोष लावतात, त्या दुष्टांना सोमराजा भुजंगाच्या दाढेत देवो किंवा घोर नरककुण्डांत फेकून देवो. ॥ ९ ॥


यो नो॒ रसं॒ दिप्स॑ति पि॒त्वो अ॑ग्ने॒ यो अश्वा॑नां॒ यो गवां॒ यस्त॒नूना॑म् ।
रि॒पु स्ते॒न स्ते॑य॒कृद्द॒भ्रमे॑तु॒ नि ष ही॑यतां त॒न्वा॒३ तना॑ च ॥ १० ॥

यः नः रसं दिप्सति पित्वः अग्ने यः अश्वानां यः गवां यः तनूनां
रिपुः स्तेनः स्तेयऽकृत् दभ्रं एतु नि सः हीयतां तन्वा तना च ॥ १० ॥

हे अग्नि, आमचे अश्व किंवा धेनू, किंवा आम्हीं स्वतः व आमचीं मुलें-लेंकरें ह्यांचा जोम, ह्यांचा पोषकरस जो नष्ट करूं पाहतो, तोच आमचा शत्रु आहे. तोच चोर आहे आणि अशी चोरी करीत असतानांच तो स्वत: आणि त्याचे सागे लागे (परिवार) ह्यांच्यासह तो पार गारद होवो. ॥ १० ॥


प॒रः सो अ॑स्तु त॒न्वा॒३ तना॑ च ति॒स्रः पृ॑थि॒वीर॒धो अ॑स्तु॒ विश्वाः॑ ।
प्रति॑ शुष्यतु॒ यशो॑ अस्य देवा॒ यो नो॒ दिवा॒ दिप्स॑ति॒ यश्च॒ नक्त॑म् ॥ ११ ॥

परः सः अस्तु तन्वा तना च तिस्रः पृथिवीः अधः अस्तु विश्वाः
प्रति शुष्यतु यशः अस्य देवाः यः नः दिवा दिप्सति यः च नक्तम् ॥ ११ ॥

त्याची आणि मुलां-लेकरांची ताटातूट होवो, त्यांच्यापासून तो दूर फेंकला जावो; एकंदर तीन्हीं भूलोकांच्याहि अगदीं खालतीं तो दुर्गतीला जावो; जो दिवसा किंवा रात्री आमच्यावर घाला घालूं पाहतो, त्याचीहि अशीच दशा होवो, आणि देवांनो, त्याचें यश शुष्क होऊन नष्ट होवो. ॥ ११ ॥


सु॒वि॒ज्ञा॒नं चि॑कि॒तुषे॒ जना॑य॒ सच्चास॑च्च॒ वच॑सी पस्पृधाते ।
तयो॒र्यत्स॒त्यं य॑त॒रदृजी॑य॒स्तदित्सोमो॑ऽवति॒ हन्त्यास॑त् ॥ १२ ॥

सुऽविज्ञानं चिकितुषे जनाय सत् च असत् च वचसी इति पस्पृधातेइति
तयोः यत् सत्यं यतरत् ऋजीयः तत् इत् सोमः अवति हन्ति असत् ॥ १२ ॥

याचें कारण असें कीं, ज्या मनुष्याला सत्‌बुद्धि आहे त्याला (खरे खोटें आपोआप) चांगलें कळतें, आणि त्याच्या अन्त:करणांत खर्‍या-खोट्याचा झगडा जरी उत्पन्न झाला तरी त्यापैकीं जेवढें सत्य असतें, जेवढें सरळ नीतियुक्त असतें त्याचेंच सोमराजा रक्षण करतो, आणि खोटें असेल त्याचा नाश करतो. ॥ १२ ॥


न वा उ॒ सोमो॑ वृजि॒नं हि॑नोति॒ न क्ष॒त्रियं॑ मिथु॒या धा॒रय॑न्तम् ।
हन्ति॒ रक्षो॒ हन्त्यास॒द्वद॑न्तमु॒भाविन्द्र॑स्य॒ प्रसि॑तौ शयाते ॥ १३ ॥

न वै ओं इति सोमः वृजिनं हिनोति न क्षत्रियं मिथुया धारयन्तं
हन्ति रक्षः हन्ति असत् वदन्तं उभौ इन्द्रस्य प्रऽसितौ शयातेइति ॥ १३ ॥

दुमार्गवर्ती अधमाचें सोम राजा कधीं कल्याण करीत नाहीं, किंवा आपण क्षत्रिय आहों अशी खोटी ऐट मिरविणार्‍यांचीहि तो गय करीत नाहीं; दोघांनाहि राक्षस समजून दोघांनाहि खोटें बोलणारे असें समजून तो ठार करतो; किंवा दोघेही इन्द्राच्या पाशांत अडकून त्यांची गळचेपी होते. ॥ १३ ॥


यदि॑ वा॒हमनृ॑तदेव॒ आस॒ मोघं॑ वा दे॒वा.ण् अ॑प्यू॒हे अ॑ग्ने ।
किम॒स्मभ्यं॑ जातवेदो हृणीषे द्रोघ॒वाच॑स्ते निरृ॒थं स॑चन्ताम् ॥ १४ ॥

यदि वा अहं अनृतऽदेवः आस मोघं वा देवान् अपिऽऊहे अग्ने
किं अस्मभ्यं जातऽवेदः हृणीषे द्रोघऽवाचः ते निर्ऽऋथं सचन्ताम् ॥ १४ ॥

हे ईश्वरा, मी काय खोट्या देवाची सेवा केली (किंवा अन्यायालाच देव असें मानलें ?) किंवा हे अग्नि, देवाच्याविषयीं भलतीच वेडीवांकडी कल्पना केली ? (असें असेल तर गोष्ट निराळी, पण) जर तसें नसेल तर हे सर्वज्ञा अग्ने, तूं आमच्यावर रुष्ट कां होशील ? कधीं होणार नाहींस; आणि जे नेहमीं वेडीवांकडी अमंगल भाषा उच्चारीत असतात, ते मात्र नरकांत पडतील. ॥ १४ ॥


अ॒द्या मु॑रीय॒ यदि॑ यातु॒धानो॒ अस्मि॒ यदि॒ वायु॑स्त॒तप॒ पूरु॑षस्य ।
अधा॒ स वी॒रैर्द॒शभि॒र्वि यू॑या॒ यो मा॒ मोघं॒ यातु॑धा॒नेत्याह॑ ॥ १५ ॥

अद्य मुरीय यदि यातुऽधानः अस्मि यदि वा आयुः ततप पुरुषस्य
अध सः वीरैः दशऽभिः वि यूयाः यः मा मोघं यातुऽधान इति आह ॥ १५ ॥

जर मी खरोखरच यातुधान असेन (=जर मी जादुटोणा करणारा चेटक्या असेन), जर मी कोणा निरपराध मनुष्याच्या आयुष्याची राखरांगोळी केली असेल, तर आतांच्या आतां मी मरून पडो; नाहींतर जो दुष्ट लबाडीनें मी यातुधान आहें असा खोटा आळ मजवर घेत असेल, तो तरी आपल्या पोरालेकरांसह येथेंच गतप्राण होऊन पडो. ॥ १५ ॥


यो माया॑तुं॒ यातु॑धा॒नेत्याह॒ यो वा॑ र॒क्षाः शुचि॑र॒स्मीत्याह॑ ।
इन्द्र॒स्तं ह॑न्तु मह॒ता व॒धेन॒ विश्व॑स्य ज॒न्तोर॑ध॒मस्प॑दीष्ट ॥ १६ ॥

यः मा अयातुं यातुऽधान इति आह यः वा रक्षाः शुचिः अस्मि इति आह
इन्द्रः तं हन्तु महता वधेन विश्वस्य जन्तोः अधमः पदीष्ट ॥ १६ ॥

मीं चेटक्या किंवा जादुटोणा करणारा नसतांनाहि उगीच जो कोणी मला यातुधान म्हणेल, किंवा मी पवित्राचरणी असतांना मला कोणी राक्षस असें म्हणेल, तर इन्द्र त्याला आपल्या अजस्र आयुधानें ठार मारील, आणि तो दुष्ट सर्व प्राण्यांपेक्षां नीच कोटीला (योनीला) जाऊन पडेल. ॥ १६ ॥


प्र या जिगा॑ति ख॒र्गले॑व॒ नक्त॒मप॑ द्रु॒हा त॒न्वं१ गूह॑माना ।
व॒व्राण् अ॑न॒न्ता.ण् अव॒ सा प॑दीष्ट॒ ग्रावा॑णो घ्नन्तु र॒क्षस॑ उप॒ब्दैः ॥ १७ ॥

प्र या जिगाति खर्गलाइव नक्तं अप द्रुहा तन्वं गूहमाना
वव्रान् अनन्ताम्न् अव सा पदीष्ट ग्रावाणः घ्नन्तु रक्षसः उपब्दैः ॥ १७ ॥

जी चेटकी एखाद्या हडळीसारखी कांहीं दुष्ट बेत मनांत धरून रात्रीं आपलें अंग उघडें नागडें करून भटकत असते, ती अथांग खोल अशा गर्तेत पडून ठार होईल, आणि आमचे सोम-पाषाणदेखील आपल्या ध्वनीनें राक्षसांना ठार करतील. ॥ १७ ॥


वि ति॑ष्ठध्वं मरुतो वि॒क्ष्वि१च्छत॑ गृभा॒यत॑ र॒क्षसः॒ सं पि॑नष्टन ।
वयो॒ ये भू॒त्वी प॒तय॑न्ति न॒क्तभि॒र्ये वा॒ रिपो॑ दधि॒रे दे॒वे अ॑ध्व॒रे ॥ १८ ॥

वि तिष्ठध्वं मरुतः विक्षु इच्चत गृभायत रक्षसः सं पिनष्टन
वयः ये भूत्वी पतयन्ति नक्तऽभिः ये वा रिपः दधिरे देवे अध्वरे ॥ १८ ॥

मरुतांनो, तुम्हीं ठिकठिकाणीं उभे रहा, सारखी पाळत ठेवा, आणि दुष्ट राक्षसांना अचानक पकडून त्यांचा चुराडा करा. पहा, ते पक्षांचें रूप घेऊन रात्रींच उडत असतात आणि त्याच वेळेस आमच्या देवसेवेंत आणि अध्वर यागांत ते विघ्न आणतात. ॥ १८ ॥


प्र व॑र्तय दि॒वो अश्मा॑नमिन्द्र॒ सोम॑शितं मघव॒न्सं शि॑शाधि ।
प्राक्ता॒दपा॑क्तादध॒रादुद॑क्ताद॒भि ज॑हि र॒क्षसः॒ पर्व॑तेन ॥ १९ ॥

प्र वर्तय दिवः अश्मानं इन्द्र सोमऽशितं मघऽवन् सं सिशाधि
प्राक्तात् अपाक्तात् अधरात् उदक्तात् अभि जहि रक्षसः पर्वतेन ॥ १९ ॥

हे इन्द्रा, सोमानें घांसून बनविलेलें पोलादाचे वज्र, हे भगवंता, तूं द्युलोकांतून खालीं फेंक; आणि राक्षसांवर पुढून, पाठीमागून, उजवीकडून, डावीकडून, एवंच सर्व बाजूनें हल्ला करून आपल्या पर्वतप्राय वज्राने त्यांना ठार कर. ॥ १९ ॥


ए॒त उ॒ त्ये प॑तयन्ति॒ श्वया॑तव॒ इन्द्रं॑ दिप्सन्ति दि॒प्सवोऽदा॑भ्यम् ।
शिशी॑ते श॒क्रः पिशु॑नेभ्यो व॒धं नू॒नं सृ॑जद॒शनिं॑ यातु॒मद्भ्यः॑ ॥ २० ॥

एते ओं इति त्ये पतयन्ति श्वऽयातवः इन्द्रं दिप्सन्ति दिप्सवः अदाभ्यं
शिशीते शक्रः पिशुनेभ्यः वधं नूनं सृजत् अशनिं यातुमत्ऽभ्यः ॥ २० ॥

कांहीं राक्षस कुत्र्याचें रूप धारण करून त्या महापराक्रमी अजिंक्य इन्द्रावरच तुटून पडूं लागले, तेव्हां सर्वसमर्थ इन्द्रानें आपलें वज्र पाजळले आणि त्या कपटी दुष्ट जादूगार राक्षसांवर तें आयुध फेकून मारलें. ॥ २० ॥


इन्द्रो॑ यातू॒नाम॑भवत्पराश॒रो ह॑वि॒र्मथी॑नाम॒भ्या॒३विवा॑सताम् ।
अ॒भीदु॑ श॒क्रः प॑र॒शुर्यथा॒ वनं॒ पात्रे॑व भि॒न्दन्स॒त ए॑ति र॒क्षसः॑ ॥ २१ ॥

इन्द्रः यातूनां अभवत् पराशरः हविःऽमथीनां अभि आविवासतां
अभि इत् ओं इति शक्रः परशुः यथा वनं पात्राइव भिन्दन् सतः एति रक्षसः ॥ २१ ॥

ह्याप्रमाणे देवाची सेवा करणारांच्या हविर्भागाची नासधूस करणार्‍या दुष्ट राक्षसांचा इन्द्राने उच्छेद केला आणि एखादा परशू (कुर्‍हाड) घेऊन रानझाडांचा सप्पा उडवावा किंवा (मातीची) भांडी ताडताड फोडावीं, त्याप्रमाणें सर्व-समर्थ इन्द्र हा राक्षसांची डोकी फोडून टाकीतच चालला. ॥ २१ ॥


उलू॑कयातुं शुशु॒लूक॑यातुं ज॒हि श्वया॑तुमु॒त कोक॑यातुम् ।
सु॒प॒र्णया॑तुमु॒त गृध्र॑यातुं दृ॒षदे॑व॒ प्र मृ॑ण॒ रक्ष॑ इन्द्र ॥ २२ ॥

उलूकऽयातुं शुशुलूकऽयातुं जहि श्वऽयातुं उत कोकऽयातुं
सुपर्णऽयातुं उत गृध्रऽयातुं दृषदाइव प्र मृण रक्षः इन्द्र ॥ २२ ॥

घुबडाचें किंवा पिंगळ्याचें रूप घेणार्‍या राक्षसाला दगडानें ठेंचल्याप्रमाणें ठेचून मारून टाक; तसेंच कुत्र्याचें, खोंकडाचें किंवा गरुड, गिधाड यांचेहि रूप धरणार्‍या राक्षसाला, हे इन्द्रा, तूं त्यांची मान मुरगाळून मारून टाक. ॥ २२ ॥


मा नो॒ रक्षो॑ अ॒भि न॑ड्यातु॒माव॑ता॒मपो॑च्छतु मिथु॒ना या कि॑मी॒दिना॑ ।
पृ॒थि॒वी नः॒ पार्थि॑वात्पा॒त्वंह॑सो॒ऽन्तरि॑क्षं दि॒व्यात्पा॑त्व॒स्मान् ॥ २३ ॥

मा नः रक्षः अभि नट् यातुऽमावतां अप उच्चतु मिथुना या किमीदिना
पृथिवी नः पार्थिवात् पातु अंहसः अन्तरिक्षं दिव्यात् पातु अस्मान् ॥ २३ ॥

आमच्याजवळसुद्धां येण्याची राक्षसाला छाती होऊ नये. त्याचप्रमाणें चेटके, चेटक्या आणि किमीदिन यांचीं जोडपीं तर आम्हांला पाहूनच धूम ठोकीत पळून जावोत. अशा प्रकारचे पातक जर पृथिवीवर आमच्या हातून घडत असेल, तर त्यापासून पृथिवीच आमचें रक्षण करो. आणि दिव्यजनांविषयीं जर कांहीं पातक घडूं लागेल, तर अन्तरीक्ष आमचा बचाव करो. ॥ २३ ॥


इन्द्र॑ ज॒हि पुमां॑सं यातु॒धान॑मु॒त स्त्रियं॑ मा॒यया॒ शाश॑दानाम् ।
विग्री॑वासो॒ मूर॑देवा ऋदन्तु॒ मा ते दृ॑श॒न्सूर्य॑मु॒च्चर॑न्तम् ॥ २४ ॥

इन्द्र जहि पुमांसं यातुऽधानं उत स्त्रियं मायया शाशदानां
विऽग्रीवासः मूरऽदेवाः ऋदन्तु मा ते दृशन् सूर्यं उत्ऽचरन्तम् ॥ २४ ॥

हे इन्द्रा, जादुगार मग तो पुरुष असो, किंवा स्त्री असो; ते आपल्या जादूच्या कपटानें आम्हांवर चोरटा हल्ला करूं पाहतील, तर त्यांना तात्काळ ठार कर; तसेंच अशा मूढ लोकांचे देवहि बिनडोक्याचेच असतील तर, तेहि भंगून जावोत. असले (धर्मनीतिभ्रष्ट) दुष्ट लोक सूर्य पुन: उगवतांना पाहण्याससुद्धां जगूं देऊं नकोस. ॥ २४ ॥


प्रति॑ चक्ष्व॒ वि च॒क्ष्वेन्द्र॑श्च सोम जागृतम् ।
रक्षो॑भ्यो व॒धम॑स्यतम॒शनिं॑ यातु॒मद्भ्यः॑ ॥ २५ ॥

प्रति चक्ष्व वि चक्ष्व इन्द्रः च सोम जागृतं
रक्षःऽभ्यः वधं अस्यतं अशनिं यातुमत्ऽभ्यः ॥ २५ ॥

आमच्याकडे दृष्टि ठेवा, चोहोंकडेहि दृष्टि ठेवा, इन्द्रासोमहो, कृपा करून जागृत रहा, तुम्हीं आपलें घातक अस्त्र राक्षसांवर आणि तुमचा विद्युत्‌अशनि जादुगारांवर फेंकून त्यांना ठार करा. ॥ २५ ॥


॥ इति सप्तमं मण्डलं समाप्तं ॥
ॐ तत् सत्


GO TOP