PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ४ - सूक्त ४१ ते ५०

ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४१ (इंद्रावरुणौ सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - इंद्रावरुणौ : छंद - त्रिष्टुप्


इन्द्रा॒ को वां॑ वरुणा सु॒म्नमा॑प॒ स्तोमो॑ ह॒विष्माँ॑ अ॒मृतो॒ न होता॑ ।
यो वां॑ हृ॒दि क्रतु॑माँ अ॒स्मदु॒क्तः प॒स्पर्श॑दिन्द्रावरुणा॒ नम॑स्वान् ॥ १ ॥

इंद्रा कः वां वरुणा सुम्नं आप स्तोमः हविष्मान् अमृतः न होता ।
यः वां हृदि क्रतुऽमान् अस्मत् उक्तः पस्पर्शत् इंद्रावरुणा नमस्वान् ॥ १ ॥

हे इंद्रवरुणांनो, अमरत्वमंडित आचार्यांप्रमाणें आम्ही हवि अर्पण करून गायिलेल्या कोणत्या स्तवनानें तुमच्या आनंदमय प्रसादाचा लाभ मिळविला आहे ? आम्ही लीन होऊन म्हटलेल्या व आमचा कार्यभाग सफल करणार्‍या कोणत्या स्तवनानें, हे इंद्रवरुणांनो, तुमचें अंतःकरण वेधून टाकले आहे ? ॥ १ ॥


इन्द्रा॑ ह॒ यो वरु॑णा च॒क्र आ॒पी दे॒वौ मर्तः॑ स॒ख्याय॒ प्रय॑स्वान् ।
स ह॑न्ति वृ॒त्रा स॑मि॒थेषु॒ शत्रू॒नवो॑भिर्वा म॒हद्भिः॒ स प्र शृ॑ण्वे ॥ २ ॥

इंद्रा ह यः वरुणा चक्रे आपी इति देवौ मर्तः सख्याय प्रयस्वान् ।
सः हंति वृत्रा संऽइथेषु शत्रून् अवःऽभिः वा महत्ऽभिः स प्र शृण्वे ॥ २ ॥

जो सुखाभिलाषी मर्त्यजन तुम्हां इंद्रावरुणांचा जिव्हाळ्याचा स्नेह संपादन करण्यासाठी तुम्हा देवांना आप्त करतो तो अंधकाराचें आवरण घालणार्‍या शत्रूचा संग्रामामध्यें फडशा उडवितो आणि तोच तुमच्या कृपाप्रसादांच्या योगानें प्रख्यात होतो. ॥ २ ॥


इन्द्रा॑ ह॒ रत्नं॒॒ वरु॑णा॒ धेष्ठे॒त्था नृभ्यः॑ शशमा॒नेभ्य॒स्ता ।
यदी॒ सखा॑या स॒ख्याय॒ सोमैः॑ सु॒तेभिः॑ सुप्र॒यसा॑ मा॒दयै॑ते ॥ ३ ॥

इंद्रा ह रत्नंा वरुणा धेष्ठा इत्था नृऽभ्यः शशमानेभ्यः ता ।
यदी सखाया सख्याय सोमैः सुतेभिः सुऽप्रयसा मादयैते इति ॥ ३ ॥

आनंदपूर्ण अंतःकरणानें गाळून तयार केलेल्या सोमरसांनी, खरे प्राणमित्र इंद्रवरुण हर्षनिर्भर होऊन भक्तांवर आत्मनिर्विशेष प्रेम करतील तर ते मनःपूर्वक स्तवन करणार्‍या भाविकांना अपरंपार रत्‍नसंपत्ति खचित देतील. ॥ ३ ॥


इन्द्रा॑ यु॒वं व॑रुणा दि॒द्युम॑स्मि॒न्नोजि॑ष्ठमुग्रा॒ नि व॑धिष्टं॒ वज्र॑म् ।
यो नो॑ दु॒रेवो॑ वृ॒कति॑र्द॒भीति॒स्तस्मि॑न्मिमाथाम॒भिभू॒त्योजः॑ ॥ ४ ॥

इंद्रा युवं वरुणा दिद्युं अस्मिन् ओजिष्ठं उग्रा नि वधिष्टं वज्रं ।
यः नः दुःऽएवः वृकतिः दभीतिः तस्मिन् मिमाथां अभिऽभूति ओजः ॥ ४ ॥

इंद्रवरुणांनो, हे प्रतापि देवांनो, ह्या दुरात्म्यावर तुम्ही आपल्या जाज्वल्य आणि अत्यंत तेजस्वी वज्राचा प्रहार करा. हा जो दुराचारी व पराधनापहार करणारा मारेकरी, त्याच्यावरच तुम्ही शत्रूंची गाळण उडविणार्‍या आपल्या तेजाचा प्रयोग करा. ॥ ४ ॥


इन्द्रा॑ यु॒वं व॑रुणा भू॒तम॒स्या धि॒यः प्रे॒तारा॑ वृष॒भेव॑ धे॒नोः ।
सा नो॑ दुहीय॒द्यव॑सेव ग॒त्वी स॒हस्र॑धारा॒ पय॑सा म॒ही गौः ॥ ५ ॥

इंद्रा युवं वरुणा भूतं अस्या धियः प्रेतारा वृषभाऽइव धेनोः ।
सा नः दुहीयत् यवसाऽइव गत्वी सहस्रऽधारा पयसा मही गौः ॥ ५ ॥

इंद्रवरुणहो, धेनूवर मोहित झालेल्या दोन वृषभांप्रमाणे तुम्ही ह्या माझ्या ध्यानस्तुतीवर प्रेम करणारे व्हा; म्हणजे ती धेनु जशी कुरणांत चरून दुधानें टंच भरून पुष्ट दिसते व हजारो दुग्धधारा सोडते त्याप्रमाणें तुमची स्तुतिही अमृतरसानें परिपूर्ण भरून जाऊन हजारो पीयुष धारा सोडील. ॥ ५ ॥


तो॒के हि॒ते तन॑य उ॒र्वरा॑सु॒ सूरो॒ दृशी॑के॒ वृष॑णश्च॒ पौंस्ये॑ ।
इन्द्रा॑ नो॒ अत्र॒ वरु॑णा स्याता॒मवो॑भिर्द॒स्मा परि॑तक्म्यायाम् ॥ ६ ॥

तोके हिते तनय उर्वरासु सूरः दृशीके वृषणः च पौंस्ये ।
इंद्रा नः अत्र वरुणा स्यातां अवःऽभिः दस्मा परिऽतक्म्यायां ॥ ६ ॥

ह्या अर्भकाच्या, ह्या बालकाच्या कल्याणासाठी, ह्या सुपीक भूमीसाठी, सूर्याचे मनोहर दर्शन आम्हांस नित्य घडावे ह्यासाठी, आणि वीर्यवान योद्ध्याचें पौरुष आमच्यामध्यें कायम रहावें ह्यासाठी, ते अद्‍भुत पराक्रमी इंद्रवरुण, आमचे मन काळजींत चूर करणार्‍या ह्या अशा तमोमय रात्रीं, येथे आपल्या कृपाकटाक्षांनी आमचे सहकारी होवोत. ॥ ६ ॥


यु॒वामिद्ध्यव॑से पू॒र्व्याय॒ परि॒ प्रभू॑ती ग॒विषः॑ स्वापी ।
वृ॒णी॒महे॑ स॒ख्याय॑ प्रि॒याय॒ शूरा॒ मंहि॑ष्ठा पि॒तरे॑व श॒म्भू ॥ ७ ॥

युवां इत् हि अवसे पूर्व्याय परि प्रभूती इति गोऽइषः सुऽआपी ।
वृणीमहे सख्याय प्रियाय शूरा मंहिष्ठा पितराऽइव शम्भू इति शं‍भू ॥ ७ ॥

प्रकाशप्राप्तीची मनीषा धरणारे आम्ही भक्तजन त्या तुमच्या सनातन कृपाप्रसाकरितां व सर्वांना प्रिय वाटणारे जे तुमचें वात्सल्य त्याच्याकरितां तुम्हालाच पदर पसरून विनवीत आहोंत. तुम्ही थोर प्रभू भक्तांचे खरे आप्त आहांत, तुम्हीच शूर, अत्यंत उदार आणि आईबापाप्रमाणे सज्जनांचे हितकर्ते आहांत. ॥ ७ ॥


ता वां॒ धियोऽ॑वसे वाज॒यन्ती॑रा॒जिं न ज॑ग्मुर्युव॒यूः सु॑दानू ।
श्रि॒ये न गाव॒ उप॒ सोम॑मस्थु॒रिन्द्रं॒ गिरो॒ वरु॑णं मे मनी॒षाः ॥ ८ ॥

ता वां धियोऽवसे वाजऽयंतीः आजिं न जग्मुः युवऽयूः इति सुऽदानू ।
श्रिये न गाव उप सोमं अस्थुः इंद्रं गिरः वरुणं मे मनीषाः ॥ ८ ॥

दातृश्रेष्ठहो, तुमच्या ठिकाणी जडलेल्या आमच्या ध्यानबुद्धि सत्त्वसामर्थ्य प्राप्तीची ईर्ष्या धरून, एखादा पण जिंकण्यास जावें त्याप्रमाणे, हे दानशूर देवांनो, कृपाप्रसाद मिळविण्याकरितां तुमच्याकडेच गेल्या आहेत. आपल्या दुधाचा देवकार्याकडे उपयोग व्हावा म्हणून धेनूंनी सोमरस तयार करण्याच्या ठिकाणी जाऊन उभे रहावे त्याप्रमाणे माझ्या स्तवनवाणी, माझ्या मननबुद्धि, दिव्य वैभवप्राप्तीसाठी इंद्रासन्निध, व वरुणासन्निध उभ्या राहिल्या आहेत. ॥ ८ ॥


इ॒मा इन्द्रं॒ वरु॑णं मे मनी॒षा अग्म॒न्नुप॒ द्रवि॑णमि॒च्छमा॑नाः ।
उपे॑मस्थुर्जो॒ष्टार॑ इव॒ वस्वो॑ र॒घ्वीरि॑व॒ श्रव॑सो॒ भिक्ष॑माणाः ॥ ९ ॥

इमाः इंद्रं वरुणं मे मनीषाः अग्मन् उप द्रविणं इच्छमानाः ।
उप ईं अस्थुः जोष्टारःऽइव वस्वः रघ्वीःऽइव श्रवसः भिक्षमाणाः ॥ ९ ॥

ह्या माझ्या मननबुद्धि सामर्थ्यसंपत्ति लाभाची आशा करीत आहेत. आणि म्हणून त्या भगवान वरुणासन्निध गेल्या आहेत. धनाची अपेक्षा करणार्‍या सेवकाप्रमाणें, किंवा लगबगीनें धांवत जाणार्‍या भिकार्‍याप्रमाणें सत्कार्यकीर्तीची याचना करण्याकरितां त्या त्याच्याकडे गेल्या आहेत. ॥ ९ ॥


अश्व्य॑स्य॒ त्मना॒ रथ्य॑स्य पु॒ष्टेर्नित्य॑स्य रा॒यः पत॑यः स्याम ।
ता च॑क्रा॒णा ऊ॒तिभि॒र्नव्य॑सीभिरस्म॒त्रा रायो॑ नि॒युतः॑ सचन्ताम् ॥ १० ॥

अश्व्यस्य त्मना रथ्यस्य पुष्टेः नित्यस्य रायः पतयः स्याम ।
ता चक्राणा ऊतिऽभिः नव्यसीभिः अस्मऽत्रा रायः निऽयुतः सचंतां ॥ १० ॥

बुद्धिरूप अश्वांचे, मनोरूप रथांचे, उत्कर्षाचे आणि अविनाशी ऐश्वर्याचे आम्ही स्वतः मालक होऊं असे घडो. नेहमी आपल्या अश्रुतपूर्व रक्षणसामग्रींनी कार्य तडीस लावणारे ते उभयरूप देव आपल्या अपरिमित ऐश्वर्याशी आमचा सतत योग घडेल असे करोत. ॥ १० ॥


आ नो॑ बृहन्ता बृह॒तीभि॑रू॒ती इन्द्र॑ या॒तं व॑रुण॒ वाज॑सातौ ।
यद्दि॒द्यवः॒ पृत॑नासु प्र॒क्रीळा॒न्तस्य॑ वां स्याम सनि॒तार॑ आ॒जेः ॥ ११ ॥

आ नः बृहंता बृहऽतीभिः ऊती इंद्र यातं वरुण वाजऽसातौ ।
यत् दिद्यवः पृतनासु प्रऽक्रीळान् तस्य वां स्याम सनितारः आजेः ॥ ११ ॥

श्रेष्ठचारित्र्य इंद्रावरुणांनो, सात्विक संग्रामांत आम्ही गुंतलो असतांना श्रेष्ठ अशाच आपल्या रक्षणसाधनांनिशीं आमच्याकडे या. जेथे शत्रु सैन्यांत तुमची झगझगीत आयुधें सहज मौजेनें खेळतात अशा संग्रामांत निकराची बाजी आम्ही तुमच्या सहायानें मारूं असें करा. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४२ (इंद्रावरुणौ सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - इंद्रावरुणौ : छंद - त्रिष्टुप्


मम॑ द्वि॒ता रा॒ष्ट्रं क्ष॒त्रिय॑स्य वि॒श्वायो॒र्विश्वे॑ अ॒मृता॒ यथा॑ नः ।
क्रतुं॑ सचन्ते॒ वरु॑णस्य दे॒वा राजा॑मि कृ॒ष्टेरु॑प॒मस्य॑ व॒व्रेः ॥ १ ॥

मम द्विता राष्ट्रं क्षत्रियस्य विश्वऽआयोः विश्वे अमृताः यथा नः ।
क्रतुं सचंते वरुणस्य देवा राजामि कृष्टेः उपऽमस्य वव्रेः ॥ १ ॥

मी जो विश्वात्मा, त्या माझेच जसे हे सर्व देवगण अंकित आहेत तसेंच ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही प्रकारचे हें राष्ट्र माझें सार्वभौम प्रभूचेंच आहे. मज वरुणाच्या अगाध कर्तृत्वाला अनुसरूनच देव वागत असतात. सर्व चराचराचा आणि सर्वोत्कृष्ट आच्छादन जो स्वर्गलोक त्याचाही राजा मीच आहे. ॥ १ ॥


अ॒हं राजा॒ वरु॑णो॒ मह्यं॒ तान्य॑सु॒र्याणि प्रथ॒मा धा॑रयन्त ।
क्रतुं॑ सचन्ते॒ वरु॑णस्य दे॒वा राजा॑मि कृ॒ष्टेरु॑प॒मस्य॑ व॒व्रेः ॥ २ ॥

अहं राजा वरुणः मह्यं तानि असुर्याणि प्रथमा धारयंत ।
क्रतुं सचंते वरुणस्य देवाः राजामि कृष्टेः उपऽमस्य वव्रेः ॥ २ ॥

राजा वरुण मीच होय. देवांना लाभलेली ती अगदी प्रथमची दैवी सामर्थ्यें माझ्याचसाठी टिकलेली आहेत. मज वरुणाच्या अगाध कर्तृत्वाला अनुसरूनच देव वागत असतात. सर्व चराचराचा आणि सर्वोत्कृष्ट आच्छादन जो स्वर्गलोक त्याचाही राजा मीच आहे. ॥ २ ॥


अ॒हमिन्द्रो॒ वरु॑ण॒स्ते म॑हि॒त्वोर्वी ग॑भी॒रे रज॑सी सु॒मेके॑ ।
त्वष्टे॑व॒ विश्वा॒ भुव॑नानि वि॒द्वान्समै॑रयं॒ रोद॑सी धा॒रयं॑ च ॥ ३ ॥

अहं इंद्रः वरुणः ते इति महिऽत्वा उर्वी इति गभीरे इति रजसी इति सुमेके इति ।
त्वष्टाऽइव विश्वा भुवनानि विद्वान् सं ऐरयं रोदसी इति धारयं च ॥ ३ ॥

इंद्र मी आणि वरुणही मीच. आपल्या महिम्याच्या जोरावर जे अतिविस्तीर्ण सखोल आणि रम्याकृति बनलेले आहेत ते दोन रजोलोकही पण मीच आहे. मी सर्वज्ञ देवानें "त्वष्टा" म्हणून यच्चावत् भुवनांना एकदम चालना देऊन सांवरून धरलें आहे. ॥ ३ ॥


अ॒हम॒पो अ॑पिन्वमु॒क्षमा॑णा धा॒रयं॒ दिवं॒ सद॑न ऋ॒तस्य॑ ।
ऋ॒तेन॑ पु॒त्रो अदि॑तेर्‌ऋ॒तावो॒त त्रि॒धातु॑ प्रथय॒द्वि भूम॑ ॥ ४ ॥

अहं अपः अपिन्वं उक्षमाणा धारयं दिवं सदने ऋतस्य ।
ऋतेन पुत्रः अदितेः ऋतऽवा उत त्रिऽधातु प्रथयत् वि भूम ॥ ४ ॥

फोंफावत जाणारी दिव्य उदकें मीच तुडुंब भरून टाकली आणि सनातन सत्याच्या अधिष्ठानांत देवलोकही मीच धारण केला आहे. ह्याप्रमाणें अनाद्यनंत शक्तिच्या मी सद्धर्मप्रिय पुत्रानें सनातन सत्याच्या योगानें हें त्रिविध जग पसरून दिले आहे. ॥ ४ ॥


मां नरः॒ स्वश्वा॑ वा॒जय॑न्तो॒ मां वृ॒ताः स॒मर॑णे हवन्ते ।
कृ॒णोम्या॒जिं म॒घवा॒हमिन्द्र॒ इय॑र्मि रे॒णुम॒भिभू॑त्योजाः ॥ ५ ॥

मां नरः सुऽअश्वाः वाजयंतः मां वृताः संऽअरणे हवंते ।
कृणोमि आजिं मघऽवा अहं इंद्र इयर्मि रेणुं अभिभूतिऽओजाः ॥ ५ ॥

लुमाईत घोड्यावर स्वार झालेले युद्धोत्सुक वीर आणि शत्रूंनी वेढून टाकलेली सेना रणमैदानावर माझाच धांवा करतात. मी दिव्यैश्वर्यसंपन्न इंद्र आणीबाणीच्या वेळेस बाजू राखतो आणि असह्य तेजानें व युद्धाच्या धुमश्चक्रीनें धुरळा उडवून देतो. ॥ ५ ॥


अ॒हं ता विश्वा॑ चकरं॒ नकि॑र्मा॒ दैव्यं॒ सहो॑ वरते॒ अप्र॑तीतम् ।
यन्मा॒ सोमा॑सो म॒मद॒न्यदु॒क्थोभे भ॑येते॒ रज॑सी अपा॒रे ॥ ६ ॥

अहं ता विश्वा चकरं नकिः मा दैव्यं सहः वरते अप्रतिऽइतं ।
यन् मा सोमासः ममदन् यत् उक्था उभे इति भयेते इति रजसी इति अपारे इति ॥ ६ ॥

सर्व वस्तु मीच निर्माण केल्या आहेत. माझ्या अप्रतिहत तेजोबळाला विरोध करणारा औषधालासुद्धां मिळणार नाही. आणि सोमरस आणि सामगायनें ह्यांच्यायोगानें एकदा का मी हर्षनिर्भर झालों कीं त्याबरोबर हे दोन्ही रजोलोक एवढे अमर्याद, पण थरथर कांपू लागतात. ॥ ६ ॥


वि॒दुष्ते॒ विश्वा॒ भुव॑नानि॒ तस्य॒ ता प्र ब्र॑वीषि॒ वरु॑णाय वेधः ।
त्वं वृ॒त्राणि॑ शृण्विषे जघ॒न्वान्त्वं वृ॒ताँ अ॑रिणा इन्द्र॒ सिन्धू॑न् ॥ ७ ॥

विदुः ते विश्वा भुवनानि तस्य ता प्र ब्रवीषि वरुणाय वेधः ।
त्वं वृत्राणि शृण्विषे जघन्वान् त्वं वृतान् अरिणाः इंद्र सिंधून् ॥ ७ ॥

परमेश्वरा, तें तुझे अतुल कृत्य सर्व चराचराला माहीत आहे. आणि हे प्रतिभासंपन्न कविश्रेष्ठ, तूंही भगवान वरुणाप्रित्यर्थच ती आपली प्रसिद्ध कवनें गात असतोस. हे इंद्रा अंधकाररूपी शत्रूचा तूं संहार केलास अशीच तुझी कीर्ति आहे. कुचंबलेल्या महानद्यांना तूंच मुक्त केलेंस. ॥ ७ ॥


अ॒स्माक॒मत्र॑ पि॒तर॒स्त आ॑सन्स॒प्त ऋष॑यो दौर्ग॒हे ब॒ध्यमा॑ने ।
त आय॑जन्त त्र॒सद॑स्युमस्या॒ इन्द्रं॒ न वृ॑त्र॒तुर॑मर्धदे॒वम् ॥ ८ ॥

अस्माकं अत्र पितरः त आसन् सप्त ऋषयः दौह्७गहे बध्यमाने ।
त आ अयजंत त्रसदस्युं अस्याः इंद्रं न वृत्र७तुरं अर्ध७देवं ॥ ८ ॥

दुर्गहाचा पुत्र पुरुकुत्स प्रतिबंधात पडला त्या वेळेस आमचे वाडवडील सात ऋषि होते. त्यांनी यज्ञ करून त्या प्रभावानें पुरुकुत्साच्या पत्‍नीला, इंद्राप्रमाणे पराक्रमी व अंधकाररूपी शत्रूचा नाश करून टाकणारा आणि अर्धामुर्धा देवच बनलेला असा त्रसदस्यु पुत्र म्हणून दिला. ॥ ८ ॥


पु॒रु॒कुत्सा॑नी॒ हि वा॒मदा॑शद्ध॒व्येभि॑रिन्द्रावरुणा॒ नमो॑भिः ।
अथा॒ राजा॑नं त्र॒सद॑स्युमस्या वृत्र॒हणं॑ ददथुरर्धदे॒वम् ॥ ९ ॥

पुरु७कुत्सानी हि वां अदाशत् धव्येभिः इंद्रावरुणा नमःऽभिः ।
अथा राजानं त्रसदस्युं अस्याः वृत्रऽहणं ददथुः अर्धऽदेवं ॥ ९ ॥

इंद्रवरुणांनो, पुरुकुत्साच्या पत्‍नीनें हवि अर्पण करून आणि साष्टांग प्रणिपात करून तुमची सेवा केली. तेव्हां तुम्ही तिला शत्रुविनाशक आणि देवकोटीस पोहोंचलेला असा त्रसदस्यु राजा पुत्र म्हणून दिलांत. ॥ ९ ॥


रा॒या व॒यं स॑स॒वांसो॑ मदेम ह॒व्येन॑ दे॒वा यव॑सेन॒ गावः॑ ।
तां धे॒नुमि॑न्द्रावरुणा यु॒वं नो॑ वि॒श्वाहा॑ धत्त॒मन॑पस्फुरन्तीम् ॥ १० ॥

राया वयं ससऽवांसः मदेम हव्येन देवा यवसेन गावः ।
तां धेनुं इंद्रावरुणा युवं नः विश्वाहा धत्तं अनपऽस्फुरंतीं ॥ १० ॥

आमचे मनोरथ पूर्ण होऊन आम्ही दिव्य ऐश्वर्यानें, व देवमंडळ हविर्भाग मिळाल्यानें, आणि धेनु हरित तृणानें आनंदित होवोत. म्हणून हे इंद्रवरुणांनो, जी कधींही अभीष्ट मनोरथरूप दुग्ध देण्यांत कुचराई करीत नाही अशी ती तुमची कामधेनू तुम्ही आम्हांस अर्पण करा. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४३ (अश्विनीकुमार सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुप्


क उ॑ श्रवत्कत॒मो य॒ज्ञिया॑नां व॒न्दारु॑ दे॒वः क॑त॒मो जु॑षाते ।
कस्ये॒मां दे॒वीम॒मृते॑षु॒ प्रेष्ठां॑ हृ॒दि श्रे॑षाम सुष्टु॒तिं सु॑ह॒व्याम् ॥ १ ॥

क ऊं इति श्रवत् कतमः यज्ञियानां वंदारु देवः कतमः जुषाते ।
कस्य इमां देवीं अमृतेषु प्रेष्ठां हृदि श्रेषाम सुऽस्तुतिं सुऽहव्यां ॥ १ ॥

आमची प्रार्थना कोण ऐकेल ? पूजनीय दिव्य विभूतींपैकीं आमच्या वंदनानें कोण सुप्रसन्न होईल ? दिव्य, सर्वप्रिय व हविर्युक्त अशी ही मनोहर स्तुति अमरविभूतींमध्ये आतां कोणाच्या हृदयसंपुटांत आम्ही निविष्ट करावी ? ॥ १ ॥


को मृ॑ळाति कत॒म आग॑मिष्ठो दे॒वाना॑मु कत॒मः शम्भ॑विष्ठः ।
रथं॒ कमा॑हुर्द्र॒वद॑श्वमा॒शुं यं सूर्य॑स्य दुहि॒तावृ॑णीत ॥ २ ॥

कः मृळाति कतम आऽगमिष्ठः देवानां ऊं इति कतमः शंऽभविष्ठः ।
रथं कं आहुः द्रवत्ऽअश्वं आशुं यं सूर्यस्य दुहिता अवृणीत ॥ २ ॥

आमच्यावर कोण दया करील ? आम्हांकडे झटकन धांवून येणारा असा देवांमध्ये कोण आहे ? आणि आमचे आत्यंतिक कल्याण करणारा तरी कोण आहे ? रविकन्यकेनें ज्याला पसंत केले, ज्याचे घोडे फार चपळ असून जो अतिशय त्वरेनें जातो असे म्हणतात तो रथ कोणता ? ॥ २ ॥


म॒क्षू हि ष्मा॒ गच्छ॑थ॒ ईव॑तो॒ द्यूनिन्द्रो॒ न श॒क्तिं परि॑तक्म्यायाम् ।
दि॒व आजा॑ता दि॒व्या सु॑प॒र्णा कया॒ शची॑नां भवथः॒ शचि॑ष्ठा ॥ ३ ॥

मक्षू हि स्म गच्छथः ईवतः द्यून् इंद्रः नः शक्तिं परिऽतक्म्यायां ।
दिव आऽजाता दिव्या सुऽपर्णा कया शचीनां भवथः शचिष्ठा ॥ ३ ॥

आज इतके दिवस गेले परंतु तितक्याही वेळी तुम्ही इंद्राप्रमाणे अगदी तातडीनें संकटसमयी आमच्या मनगटांत जोर आणण्याकरितां धांवून येत आहांतच. तुम्ही दिव्य लोकांकडून अवतीर्ण होतां आणि तुमचे पंखही दिव्य आहेत तर अलौकिन शक्तींपैकी कोणत्या शक्तिमुळें तुम्ही अत्यंत बलाढ्य झाला आहांत तें आम्हांस सांगाल काय ? ॥ ३ ॥


का वा॑म् भू॒दुप॑मातिः॒ कया॑ न॒ आश्वि॑ना गमथो हू॒यमा॑ना ।
को वां॑ म॒हश्चि॒त्त्यज॑सो अ॒भीक॑ उरु॒ष्यतं॑ माध्वी दस्रा न ऊ॒ती ॥ ४ ॥

का वां भूत् उपऽमातिः कया नः अश्विना गमथः हूयमाना ।
कः वां महः चित् त्यजसः अभीके उरुष्यतं माध्वी इति दस्रा न ऊती ॥ ४ ॥

तुमच्याकडून कोणती देणगी मिळेल ! हे अश्विदेवांनो, धांवा केला असतां तुम्ही कोणती संपत्ति घेऊन आमच्याकडे याल ? तुमच्या क्रोधोद्रेकाच्या ज्वालेजवळ कोण जाऊं शकेल ? तर हे मधुरप्रिय, अद्‍भुत चारित्र्य देवांनो, पातकापासून तुम्ही आमची सुटका कराच. ॥ ४ ॥


उ॒रु वां॒ रथः॒ परि॑ नक्षति॒ द्यामा यत्स॑मु॒द्राद॒भि वर्त॑ते वाम् ।
मध्वा॑ माध्वी॒ मधु॑ वां प्रुषाय॒न्यत्सीं॑ वां॒ पृक्षो॑ भु॒रज॑न्त प॒क्वाः ॥ ५ ॥

उरु वां रथः परि नक्षति द्यां आ यत् समुद्रात् अभि वर्तते वां ।
मध्वा माध्वी इति मधु वां प्रुषायन् यत् सीं वां पृक्षः भुरजंत पक्वाः ॥ ५ ॥

तुमचा रथ समुद्रांतून तुमच्या सन्मुख येतो त्यावेळी तो मोठमोठे वळसे घेत घेत द्युलोकाच्या जवळ जाऊन भिडतो. आणि तुम्हां महानुभव विभूतींकडे भक्तांची पक्व हविरन्ने जाऊन पोहोंचतात. तेव्हां हे मधुरप्रिय देवांनो, तुमच्या मधुररसानें ते भक्त माधुर्याचें सिंचन जिकडे तिकडे करून टाकतात. ॥ ५ ॥


सिन्धु॑र्ह वां र॒सया॑ सिञ्च॒दश्वा॑न्घृ॒णा वयो॑ऽरु॒षासः॒ परि॑ ग्मन् ।
तदू॒षु वा॑मजि॒रं चे॑ति॒ यानं॒ येन॒ पती॒ भव॑थः सू॒र्यायाः॑ ॥ ६ ॥

सिंधुः ह वां रसया सिंचत् अश्वान् घृणा वयः अरुषासः परि ग्मन् ।
तत् ऊ इति सु वां अजिरं चेति यानं येन पती इति भवथः सूर्यायाः ॥ ६ ॥

आकाश सिंधूनें आपल्या तरंगलहरींनी तुमच्या अश्वांना आच्छादिले आहे. आणि प्रखर तेजानें तळपणारे ते आरक्तवर्ण पक्षी मंडळाकार घिरट्या घालूं लागले आहेत; ह्यामुळे जेव्हां तुम्ही रविकन्येचे पति होण्यास निघालां तेव्हां तुमची जलद जाणारी स्वारी सर्वांना स्पष्टपणे पहावयास सांपडली. ॥ ६ ॥


इ॒हेह॒ यद्वां॑ सम॒ना प॑पृ॒क्षे सेयम॒स्मे सु॑म॒तिर्वा॑जरत्नाभ ।
उ॒रु॒ष्यतं॑ जरि॒तारं॑ यु॒वं ह॑ श्रि॒तः कामो॑ नासत्या युव॒द्रिक् ॥ ७ ॥

इहऽइह यत् वां समना पपृक्षे सेयं अस्मे इति सुऽमतिः वाजऽरत्नार ।
उरुष्यतं जरितारं युवं ह श्रितः कामः नासत्या युवद्रिक् ॥ ७ ॥

सत्त्वरूप रत्‍नसंपत्तीच्या प्रभूंनो, येथें - ह्याच ठिकाणी जिच्या योगानें आम्ही तुम्हांला एकमतानें एकत्र पाचरण केलें तीच ही आमची मननीय स्तुति, तर तुम्ही ह्या तुमच्या भक्तजनाला दुःखमुक्त करा; सत्यस्वरूप देवांनो पहा आमचें सारे लक्ष्य तुमच्याकडे लागून राहिले आहे. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४४ (अश्विनीकुमार सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुप्


तं वां॒ रथं॑ व॒यम॒द्या हु॑वेम पृथु॒ज्रय॑मश्विना॒ संग॑तिं॒ गोः ।
यः सू॒र्यां वह॑ति वन्धुरा॒युर्गिर्वा॑हसं पुरु॒तमं॑ वसू॒युम् ॥ १ ॥

तं वां रथं वयं अद्या हुवेम पृथुऽज्रयं अश्विना संऽगतिं गोः ।
यः सूर्यां वहति वंधुरऽयुः गिर्वाहसं पुरुऽतमं वसुऽयुं ॥ १ ॥

अश्विदेवहो, भरधांव जाणारा तुमचा जो रथ त्याचीसुद्धां आतां प्रशंसा करतो. तोही प्रकाशमय धेनु प्राप्त करून देतो. त्यांत सुरेख बैठकी केल्या असून त्याच्यावर देवांचें स्तवन सुचतें. तो प्रशस्त आणि अभीष्टदायक आहे. सूर्याच्या कन्येने त्याच रथावर आरोहण केले. ॥ १ ॥


यु॒वं श्रिय॑मश्विना दे॒वता॒ तां दिवो॑ नपाता वनथः॒ शची॑भिः ।
यु॒वोर्वपु॑र॒भि पृक्षः॑ सचन्ते॒ वह॑न्ति॒ यत्क॑कु॒हासो॒ रथे॑ वाम् ॥ २ ॥

युवं श्रियं अश्विना देवता तां दिवः नपाता वनथः शचीभिः ।
युवोः वपुः अभि पृक्षः सचंते वहंति यत् ककुहासः रथे वां ॥ २ ॥

हे अश्विदेवांनो, हे आकाशपुत्रांनो, आपल्या देवत्वानें, आपल्या दैविक सामर्थ्यानें तें दिव्य वैभव तुम्ही आपलेसें केलेले आहे. आणि तुमचे उन्नत अश्व तुम्हांला रथांत बसवून घेऊन जातात तेव्हांही सर्व सामर्थ्यें तुमच्याच शरीराचा आश्रय करीत असतात. ॥ २ ॥


को वा॑म॒द्या क॑रते रा॒तह॑व्य ऊ॒तये॑ वा सुत॒पेया॑य वा॒र्कैः ।
ऋ॒तस्य॑ वा व॒नुषे॑ पू॒र्व्याय॒ नमो॑ येमा॒नो अ॑श्वि॒ना व॑वर्तत् ॥ ३ ॥

कः वां अद्या करते रातऽहव्यः ऊतये वा सुतऽपेयाय वा अर्कैः ।
ऋतस्य वा वनुषे पूर्व्याय नमः येमानः अश्विना आ ववर्तत् ॥ ३ ॥

कोणता भक्त आज तुम्हाला हवि अर्पण करून आपल्या संरक्षणाकरितां किंवा तुम्ही सोमरसाचा आस्वाद घ्यावा ह्याकरितां अर्कस्तोत्रांनी तुमची स्तुति करीत असतो ? अथवा तुम्हाला वंदन करून सद्धर्माचरणाचा जो हा पुरातन कालापासून चालत आलेला संप्रदाय त्याच्याकडे, हे अश्विदेवहो, तुमचें मन वळवितो. ? ॥ ३ ॥


हि॒र॒ण्यये॑न पुरुभू॒ रथे॑ने॒मं य॒ज्ञं ना॑स॒त्योप॑ यातम् ।
पिबा॑थ॒ इन्मधु॑नः सो॒म्यस्य॒ दध॑थो॒ रत्नं॑र विध॒ते जना॑य ॥ ४ ॥

हिरण्ययेन पुरुभू इति पुरुऽभूरथेनेमं यज्ञं नासत्या उप यातं ।
पिबाथ इन् मधुनः सोम्यस्य दधथः रत्नं् विधते जनाय ॥ ४ ॥

सर्वस्थलवर्ती देवांनो, हे सत्यस्वरूपांनो, सुवर्णाच्या अविनाशी रथांत बसून ह्या आमच्या यज्ञाकडे या; मधुर सोमरसाचा स्वीकार करा, आणि उपासनातत्पर भक्ताला रत्‍नसंपत्ति द्या. ॥ ४ ॥


आ नो॑ यातं दि॒वो अच्छा॑ पृथि॒व्या हि॑र॒ण्यये॑न सु॒वृता॒ रथे॑न ।
मा वा॑म॒न्ये निय॑मन्देव॒यन्तः॒ सं यद्द॒दे नाभिः॑ पू॒र्व्या वा॑म् ॥ ५ ॥

आ नः यातं दिवः अच्छ पृथिव्याः हिरण्ययेन सुऽवृता रथेन ।
मा वां अन्ये नि यमन् देवऽयंतः सं यत् ददे नाभिः पूर्व्या वां ॥ ५ ॥

देवलोकापासून किंवा ह्या पृथिवीपासून तुम्ही सुयंत्र चालणार्‍या सुवर्णमय अविनाशी रथांतून आमच्या सन्निध या. दुसरे भक्तजन तुम्हाला ज्यास्त वेळे ठेऊन न घेण्याची व्यवस्था करा; कारण तुमचा आमचा जो जुना आप्तसंबंध आहे त्यानें तुम्ही बांधले गेलां आहांत. ॥ ५ ॥


नू नो॑ र॒यिं पु॑रु॒वीरं॑ बृ॒हन्तं॒ दस्रा॒ मिमा॑थामु॒भये॑ष्व॒स्मे ।
नरो॒ यद्वा॑मश्विना॒ स्तोम॒माव॑न्स॒धस्तु॑तिमाजमी॒ळ्हासो॑ अग्मन् ॥ ६ ॥

न्न् नः रयिं पुरुऽवीरं बृहंतं दस्रा मिमाथां उभयेषु अस्मे इति ।
नरः यत् वां अश्विना स्तोमं आवन् सधऽस्तुतिं आजऽमीळ्हासः अग्मन् ॥ ६ ॥

अद्‍भुतचरित्र देवांनो, वीरसंतानप्रचुर असें जें महत् ऐश्वर्य आहे त्याचा लाभ आम्हां उभयतांस घडूं द्या. हे अश्वीहो, आम्ही पराक्रमी भक्तांनी तुमचें यशोगान केलें आहे; आम्ही आजमीळ्हाच्या वंशजांनी एकत्र जमून तुमचें स्तवन केलें आहे. ॥ ६ ॥


इ॒हेह॒ यद्वां॑ सम॒ना प॑पृ॒क्षे सेयम॒स्मे सु॑म॒तिर्वा॑जरत्नात ।
उ॒रु॒ष्यतं॑ जरि॒तारं॑ यु॒वं ह॑ श्रि॒तः कामो॑ नासत्या युव॒द्रिक् ॥ ७ ॥

इहऽह यत् वां समना पपृक्षे सेयं अस्मे इति सुऽमतिः वाजऽरत्नात ।
उरुष्यतं जरितारं युवं ह श्रितः कामः नासत्या युवद्रिक् ॥ ७ ॥

सत्त्वरूप रत्‍नसंपत्तीच्या प्रभूंनो, येथें - ह्याच ठिकाणी जिच्या योगानें आम्ही तुम्हांला एकमतानें एकत्र पाचरण केलें तीच ही आमची मननीय स्तुति, तर तुम्ही ह्या तुमच्या भक्तजनाला दुःखमुक्त करा; सत्यस्वरूप देवांनो पहा आमचें सारे लक्ष्य तुमच्याकडे लागून राहिले आहे. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४५ (अश्विनीकुमार सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुप्


ए॒ष स्य भा॒नुरुदि॑यर्ति यु॒ज्यते॒ रथः॒ परि॑ज्मा दि॒वो अ॒स्य सान॑वि ।
पृ॒क्षासो॑ अस्मिन्मिथु॒ना अधि॒ त्रयो॒ दृति॑स्तु॒रीयो॒ मधु॑नो॒ वि र॑प्शते ॥ १ ॥

एषः स्यः भानुः उत् इयर्ति युज्यते रथः परिऽज्मा दिवः अस्य सानवि ।
पृक्षासः अस्मिन् मिथुनाः अधि त्रयः दृतिः तुरीयः मधुनः वि रप्शते ॥ १ ॥

हा पहा तो प्रकाश क्षितिजाच्या वर येत आहे. अर्थात तो अश्विदेवांचा परिभ्रमण करणारा रथ ह्या आकाशाच्या शिरोभागी जोडला जात आहे. त्या रथांत तें प्रभावमूर्ति त्रिकूट जोडीनें बसलें असून शेजारीं तो चवथा मधुररसाचा कुंभ, त्याची शोभा विकसित होत आहे. ॥ १ ॥


उद्वां॑ पृ॒क्षासो॒ मधु॑मन्त ईरते॒ रथा॒ अश्वा॑स उ॒षसो॒ व्युष्टिषु ।
अ॒पो॒र्णु॒वन्त॒स्तम॒ आ परी॑वृतं॒ स्व१र्ण शु॒क्रं त॒न्वन्त॒ आ रजः॑ ॥ २ ॥

उत् वां पृक्षासः मधुऽमंतः ईरते रथाः अश्वासः उषसः विऽउष्टिषु ।
अपऽऊर्णुवंतः तम आ परिऽवृतं स्वः ण शुक्रं तन्वंतः आ रजः ॥ २ ॥

मधुर रस देणारा तुमचा प्रभाव, तुमचे रथ, आणि अश्व हे सर्व उषःकाली दिशा उजळतांच दृग्गोचर होतात, आणि सर्वत्र भरून राहिलेल्या अंधकाराचें आवरण दूर करून सूर्याप्रमाणें अंतराल शुभ्र तेजानें घनदाट भरून टाकतात. ॥ २ ॥


मध्वः॑ पिबतं मधु॒पेभि॑रा॒सभि॑रु॒त प्रि॒यं मधु॑ने युञ्जाथां॒ रथ॑म् ।
आ व॑र्त॒निं मधु॑ना जिन्वथस्प॒थो दृतिं॑ वहेथे॒ मधु॑मन्तमश्विना ॥ ३ ॥

मध्वः पिबतं मधुऽपेभिः आसऽभिः उत प्रियं मधुने युञ्जाथां रथं ।
आ वर्तनिं मधुना जिन्वथः पथः दृतिं वहेथे इति मधुऽमंतं अश्विना ॥ ३ ॥

आपल्या मधुररस परिचित मुखांनी ह्या मधुरपेयाचा आस्वाद घ्या. मधुर सोमासाठी तुम्ही आपला आवडता रथ जोडून सज्ज करा. भक्तांचा वर्तनक्रम आणि तुमचा गमनमार्ग तुम्ही माधुर्यानें ओथंबून टाकतां आणि अश्विदेवांनो, कृपामधूनें ओतप्रोत भरलेला कोष भक्तांकरितां घेऊन येतां. ॥ ३ ॥


हं॒सासो॒ ये वा॒म् मधु॑मन्तो अ॒स्रिधो॒ हिर॑ण्यपर्णा उ॒हुव॑ उष॒र्बुधः॑ ।
उ॒द॒प्रुतो॑ म॒न्दिनो॑ मन्दिनि॒स्पृशो॒ मध्वो॒ न मक्षः॒ सव॑नानि गच्छथः ॥ ४ ॥

हंसासः ये वां मधुऽमंतः अस्रिधः हिरण्यऽपर्णा उहुवः उषःऽबुधः ।
उदऽप्रुतः मंदिनः मंदिऽनिस्पृशः मध्वः न मक्षः सवनानि गच्छथः ॥ ४ ॥

मधुस्रावी, अपायरहित व सुवर्णपक्ष असे तुमचे हंस आहेत ते मोठे बळकट असून अगदीं प्रातःकाळी जागृत होत असतात. ते आनंदमग्न होऊन पाण्यांत खुशाल पोहतात आणि आनंदरूप सोमरसाचे भुकेले असतात. तुव्हां मधुकक्षिका पुष्पाकडे जाते त्याप्रमाणे तुम्ही सरळ भक्तांच्या मधुररसाच्या सवनांकडे जातां. ॥ ४ ॥


स्व॒ध्व॒रासो॒ मधु॑मन्तो अ॒ग्नय॑ उ॒स्रा ज॑रन्ते॒ प्रति॒ वस्तो॑र॒श्विना॑ ।
यन्नि॒क्तह॑स्तस्त॒रणि॑र्विचक्ष॒णः सोमं॑ सु॒षाव॒ मधु॑मन्त॒मद्रि॑भिः ॥ ५ ॥

सुऽअध्वरासः मधुऽमंतः अग्नयः उस्रा जरंते प्रति वस्तोः अश्विना ।
यत् निक्तऽहस्तः तरणिः विऽचक्षणः सोमं सुसाव मधुऽमंतं अद्रिऽभिः ॥ ५ ॥

आपल्या स्वच्छ हातांनी उत्साही व प्रज्ञावान भक्त पाषाणांपासून मधुयुक्त सोमरस पिळून अर्पण करतो; त्यावेळेस मधाच्या आहुतींनी संतुष्ट झालेले त्रेताग्निही याग उत्तम रीतीनें तडीस नेऊन उषःकाली देदीप्यमान अश्विदेवांची महती दर्शवीत असतात. ॥ ५ ॥


आ॒के॒नि॒पासो॒ अह॑भि॒र्दवि॑ध्वतः॒ स्व१र्ण शु॒क्रं त॒न्वन्त॒ आ रजः॑ ।
सूर॑श्चि॒दश्वा॑न्युयुजा॒न ई॑यते॒ विश्वाँ॒ अनु॑ स्व॒धया॑ चेतथस्प॒थः ॥ ६ ॥

आकेऽनिपासः अहऽभिः दविध्वतः स्वः न शुक्रं तन्वंतः आ रजः ।
सूरः चित् अश्वान् युयुजानः ईयते विश्वान् अनु स्वधया चेतथः पथः ॥ ६ ॥

पृथ्वीजवळ लगट करून दररोज अंधकाराची दाणादाण उडवून देणारे तुमचे रश्मि स्वर्गलोकाप्रमाणेंच अंतिरिक्षसुद्धां शुभ्र तेजानें भरून टाकतात आणि सूर्यही आपले एकंदर अश्व जोडून निघतो तेव्हां तुम्ही आपल्या स्वभावानुसार त्याचा गमनमार्ग स्पष्टपणें नजरेस आणतां. ॥ ६ ॥


प्र वा॑मवोचमश्विना धियं॒धा रथः॒ स्वश्वो॑ अ॒जरो॒ यो अस्ति॑ ।
येन॑ स॒द्यः परि॒ रजां॑सि या॒थो ह॒विष्म॑न्तं त॒रणिं॑ भो॒जमच्छ॑ ॥ ७ ॥

प्र वां अवोचं अश्विना धियंऽधा रथः सुऽअश्वः अजरः यः अस्ति ।
येन सद्यः परि रजांसि याथः हविष्मंतं तरणिं भोजं अच्छ ॥ ७ ॥

अश्विदेवांनो, मी ध्यानमग्न होऊन तुमचे गुणानुवाद गायिले आहेत, त्याचप्रमाणें तुमच्या रथाचीही प्रशंसा केली आहे. त्या रथाचे घोडे उमदे असून तें कधीं जीर्ण होत नाहींत आणि त्यांत आरोहण करून तुम्ही हवि अर्पण करणार्‍या उत्साही आणि उदार यजमानासन्निध, सर्व अंतराळाला वळसा घालूननी तात्काळ प्राप्त होतां. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४६ (इंद्र-वायुः सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - वायुः : छंद - त्रिष्टुप्


अग्रं॑ पिबा॒ मधू॑नां सु॒तं वा॑यो॒ दिवि॑ष्टिषु । त्वं हि पू॑र्व॒पा असि॑ ॥ १ ॥

अग्रं पिबा मधूनां सुतं वायो इति दिविष्टिषु । त्वं हि पूर्वऽपाः असि ॥ १ ॥

वायुदेवा, प्रातःकाळच्या इष्टीमध्ये तूंच हा मधुर सोमरस प्रथम ग्रहण कर. कारण सर्वांच्या अगोदर रस प्राशन करण्याचा मान तुझाच आहे. ॥ १ ॥


श॒तेना॑ नो अ॒भिष्टि॑भिर्नि॒युत्वाँ॒ इन्द्र॑सारथिः । वायो॑ सु॒तस्य॑ तृम्पतम् ॥ २ ॥

शतेना नः अभिष्टिऽभिः नियुत्वान् इंद्रऽसारथिः । वायो इति सुतस्य तृंपतं ॥ २ ॥

आपल्या शेंकडो रक्षण सामग्रीनिशी ’नियुत्’ घोड्या जोडून आणि इंद्राबरोबर एकाच रथांत आरूढ होऊन, हे वायु, तूं आगमन कर आणि ह्या सोमरसानें तृप्त हो. ॥ २ ॥


आ वां॑ स॒हस्रं॒ हर॑य॒ इन्द्र॑वायू अ॒भि प्रयः॑ । वह॑न्तु॒ सोम॑पीतये ॥ ३ ॥

आ वां सहस्रं हरयः इंद्रवायू इति अभि प्रयः । वहंतु सोमऽपीतये ॥ ३ ॥

इंद्रवायूहो, तुमचे हजारों अश्व तुम्हांला आमच्या सुखोद्देशानेंच सोमरसाचा आस्वाद घेण्याकरितां घेऊन येवोत. ॥ ३ ॥


रथं॒ हिर॑ण्यवन्धुर॒मिन्द्र॑वायू स्वध्व॒रम् । आ हि स्थाथो॑ दिवि॒स्पृश॑म् ॥ ४ ॥

रथं हिरण्यऽवंधुरं इंद्रवायू इति सुऽअध्वरं । आ हि स्थाथः दिविऽस्पृशं ॥ ४ ॥

तुमच्या रथांत सोन्याच्या बैठकी आहेत. तो रथ आमचे याग उत्तम रीतीनें तडीस नेवो. इंद्रवायूहो, त्या गगनचुंबी भव्य रथांत आरोहण करा. ॥ ४ ॥


रथे॑न पृथु॒पाज॑सा दा॒श्वांस॒मुप॑ गच्छतम् । इन्द्र॑वायू इ॒हा ग॑तम् ॥ ५ ॥

रथेन पृथुऽपाजसा दाश्वांसं उप गच्छतं । इंद्रवायू इति इह आ गतं ॥ ५ ॥

त्या अत्यंत ओजस्वी रथांत विराजमान होऊन हवि अर्पण करणर्‍या ह्या उपासक जनाकडे आगमन करा. ॥ ५ ॥


इन्द्र॑वायू अ॒यं सु॒तस्तं दे॒वेभिः॑ स॒जोष॑सा । पिब॑तं दा॒शुषो॑ गृ॒हे ॥ ६ ॥

इंद्रवायू इति अयं सुतः तं देवेभिः सऽजोषसा । पिबतं दाशुषः गृहे ॥ ६ ॥

इंद्रवायूहो, हा सोमरस तुम्ही सप्रेम अंतःकरणानें देवांसह यजमानगृहीं येऊन प्राशन करा. ॥ ६ ॥


इ॒ह प्र॒याण॑मस्तु वा॒मिन्द्र॑वायू वि॒मोच॑नम् । इ॒ह वां॒ सोम॑पीतये ॥ ७ ॥

इह प्रयाणं अस्तु वां इंद्रवायू इति विऽमोचनं । इह वां सोमऽपीतये ॥ ७ ॥

तुमचें आगमन इकडें होऊं द्या. इंद्रवायूहो, सोमप्राशनार्थ येऊन तुम्ही घोडे सोडाल तेही येथेंच सोडा. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४७ (इंद्र-वायुः सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - वायुः : छंद - त्रिष्टुप्


वायो॑ शु॒क्रो अ॑यामि ते॒ मध्वो॒ अग्रं॒ दिवि॑ष्टिषु ।
आ या॑हि॒ सोम॑पीतये स्पा॒र्हो दे॑व नि॒युत्व॑ता ॥ १ ॥

वायो इति शुक्रः अयामि ते मध्वः अग्रं दिविष्टिषु ।
आ याहि सोमऽपीतये स्पार्हः देव नियुत्वता ॥ १ ॥

वायुदेवा, प्रातःकाळच्या इष्टीमध्ये ह्या मधुर पेयाचें अस्सल तेजस्वी सार तुला अर्पण केलें आहे. तूं स्पृहणीय विभूति आहेस, तेव्हां आपले ’नियुत्’ अश्व जोडून सोमरस प्राशनार्थ येथें आगमन कर. ॥ १ ॥


इन्द्र॑श् च वायवेषां॒ सोमा॑नां पी॒तिम॑र्हथः ।
यु॒वां हि यन्तीन्द॑वो नि॒म्नमापो॒ न स॒ध्र्यक् ॥ २ ॥

इंद्रः च वायो इति एषां सोमानां पीतिं अर्हथः ।
युवां हि यंति इंदवः निम्नं आपः न सध्र्यक् ॥ २ ॥

इंद्रवायूहो, ह्या सोमरसांचा आस्वाद घेण्याचा तुमचा मानच आहे, आणि म्हणून खोल पाण्याकडे जलानें वहात जावें त्याप्रमाणें पहा तुमच्याकडे हे एकदम निघाले आहेत. ॥ २ ॥


वाय॒विन्द्र॑श्च शु॒ष्मिणा॑ स॒रथं॑ शवसस्पती ।
नि॒युत्व॑न्ता न ऊ॒तय॒ आ या॑तं॒ सोम॑पीतये ॥ ३ ॥

वायो इति इंद्रः च शुष्मिणा सऽरथं शवसः पती इति ।
नियुत्वंता नः ऊतय आ यातं सोमऽपीतये ॥ ३ ॥

वायुदेवा, तूं आणि इंद्र हे मोठे उग्रप्रतापी आहांत. उत्कट बलावरही प्रभुत्व चालविणार्‍या देवांनो, ’नियुत्’ नांवाचे अश्व जोडून आमच्या रक्षणाकरितां आणि सोमप्राशना करितां एकाच रथांत बसून आमच्याकडे या. ॥ ३ ॥


या वां॒ सन्ति॑ पुरु॒स्पृहो॑ नि॒युतो॑ दा॒शुषे॑ नरा ।
अ॒स्मे ता य॑ज्ञवाह॒सेन्द्र॑वायू॒ नि य॑च्छतम् ॥ ४ ॥

याः वां संति पुरुऽस्पृहः निऽयुतः दाशुषे नरा ।
अस्मे इति ताः यज्ञऽवाहसा इंद्रवायू नि यच्छतं ॥ ४ ॥

वीरांनो, सर्वांना प्रिय अशा ज्या तुमच्या ’नियुत्’ नांवाच्या घोड्या भक्त कार्यासाठीं तुमच्या जवळ आहेत, त्या, हे यज्ञधुरंधर इंद्रवायूंनो, आमच्याकरितां रथास जोडा. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४८ (इंद्र-वायुः सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - वायुः : छंद - त्रिष्टुप्


वि॒हि होत्रा॒ अवी॑ता॒ विपो॒ न रायो॑ अ॒र्यः ।
वाय॒वा च॒न्द्रेण॒ रथे॑न या॒हि सु॒तस्य॑ पी॒तये॑ ॥ १ ॥

विहि होत्राः अवीताः विपः न रायः अर्यः ।
वायो इति आ चंद्रेण रथेन याहि सुतस्य पीतये ॥ १ ॥

श्रीमंत मनुष्य आपल्या ऐश्वर्याचा उपभोग घेतो त्याप्रमाणे ह्या अनुच्छिष्ट आहुतींचा आणि स्तुतींचा स्वीकार कर. हे वायुदेवा, आपल्या आल्हाददायक रथांत आरोहण करून सोमप्राशनार्थ येथें आगमन कर. ॥ १ ॥


नि॒र्यु॒वा॒णो अश॑स्तीर्नि॒युत्वाँ॒ इन्द्र॑सारथिः ।
वाय॒वा च॒न्द्रेण॒ रथे॑न या॒हि सु॒तस्य॑ पी॒तये॑ ॥ २ ॥

निःऽयुवानः अशस्तीः नियुत्वान् इंद्रऽसारथिः ।
वायो इति आ चंद्रेण रथेन याहि सुतस्य पीतये ॥ २ ॥

शिव्याशाप देणार्‍या दुष्कर्मी लोकांचा पुरता निकाल लावून आणि आपल्या ’नियुत्’ घोड्या रथास जोडून इंद्राच्या समागमें, हे वायु तूं आपल्या आल्हाददायक रथांत आरोहण करून सोमप्राशनार्थ येथें आगमन कर. ॥ २ ॥


अनु॑ कृ॒ष्णे वसु॑धिती ये॒माते॑ वि॒श्वपे॑शसा ।
वाय॒वा च॒न्द्रेण॒ रथे॑न या॒हि सु॒तस्य॑ पी॒तये॑ ॥ ३ ॥

अनु कृष्णे इति वसुधिती इति वसुऽधिती येमाते इति विश्वऽपेशसा ।
वायो इति आ चंद्रेण रथेन याहि सुतस्य पीतये ॥ ३ ॥

श्यामवर्ण तथापि उत्कृष्ट संपत्तिने भरलेल्या व बहुरूपधारीणी द्यावापृथिवींनी अनुसरलेल्या हे वायुदेवा, तूं आपल्या आल्हाददायक रथांत आरोहण करून सोमप्राशनार्थ येथें आगमन कर. ॥ ३ ॥


वह॑न्तु त्वा मनो॒युजो॑ यु॒क्तासो॑ नव॒तिर्नव॑ ।
वाय॒वा च॒न्द्रेण॒ रथे॑न या॒हि सु॒तस्य॑ पी॒तये॑ ॥ ४ ॥

वहंतु त्वा मनःऽयुजः युक्तासः नवतिः नव ।
वायो इति आ चंद्रेण रथेन याहि सुतस्य पीतये ॥ ४ ॥

वायुदेवा, आपले ते शेंकडो पीतवर्ण तुंद घोडे रथाला जोड; अथवा ते हजारों अश्वसुद्धां जोड. आणि इतक्या घोड्यांच्या एकवटलेल्या जोरानें तुझा रथ इकडे येऊं दे. ॥ ४ ॥


वायो॑ श॒तं हरी॑णां यु॒वस्व॒ पोष्या॑णाम् ।
उ॒त वा॑ ते सह॒स्रिणो॒ रथ॒ आ या॑तु॒ पाज॑सा ॥ ५ ॥

वायो इति शतं हरीणां युवस्व पोष्याणाम् ।
उत वा ते सहस्रिणः रथः आ यातु पाजसा ॥ ५ ॥

हे वायो, शंभर पुष्ट अश्व रथास जोडून, तसेच सहस्रावधी अश्वयुक्त रथामध्ये बसून तू द्रुतगतीने आमच्या यज्ञस्थानी ये. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४९ (इंद्र-बृहस्पती सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - बृहस्पतीः : छंद - गायत्री


इ॒दं वा॑मा॒स्ये ह॒विः प्रि॒यमि॑न्द्राबृहस्पती । उ॒क्थं मद॑श्च शस्यते ॥ १ ॥

इदं वां आस्ये हविः प्रियं इंद्राबृहस्पती इति । उक्थं मदः च शस्यते ॥ १ ॥

इंद्रबृहस्पतिहो, तुमचा आवडता हविर्भाग तुमच्या मुखांत पडला आहे. आणि तुमच्याकरितां सोमस्तोत्र आणि सोमरसाची महतीही वर्णन केली आहे. ॥ १ ॥


अ॒यं वां॒ परि॑ षिच्यते॒ सोम॑ इन्द्राबृहस्पती । चारु॒र्मदा॑य पी॒तये॑ ॥ २ ॥

अयं वां परि सिच्यते सोमः इंद्राबृहस्पती इति । चारुः मदाय पीतये ॥ २ ॥

इंद्रबृहस्पतिहो, तुमच्याकरितां हा सोमरस सिद्ध केला आहे. हा मनोभिराम रस तुम्ही हर्षाल्लसित होण्यासाठीं त्याचा आस्वाद घ्यावा म्हणून चषकांत ओतला आहे. ॥ २ ॥


आ न॑ इन्द्राबृहस्पती गृ॒हमिन्द्र॑श्च गच्छतम् । सो॒म॒पा सोम॑पीतये ॥ ३ ॥

आ नः इंद्राबृहस्पती इति गृहं इंद्रः च गच्छतं । सोमऽपा सोमऽपीतये ॥ ३ ॥

इंद्रबृहस्पतिहो, तूं आणि इंद्र असे उभयतां तुम्ही सोमप्रिय देव सोमप्राशनार्थ आगमन करा. ॥ ३ ॥


अ॒स्मे इ॑न्द्राबृहस्पती र॒यिं ध॑त्तं शत॒ग्विन॑म् । अश्वा॑वन्तं सह॒स्रिण॑म् ॥ ४ ॥

अस्मे इति इंद्राबृहस्पती इति रयिं धत्तं शतऽग्विनं । अश्वऽवंतं सहस्रिणं ॥ ४ ॥

इंद्रबृहस्पतिहो, शेंकडो प्रकारचे ऐश्वर्य, व हजारों जातीचे बुद्धिरूप अश्व धन आम्हांला अर्पण करा. ॥ ४ ॥


इन्द्रा॒बृह॒स्पती॑ व॒यं सु॒ते गी॒र्भिर्ह॑वामहे । अ॒स्य सोम॑स्य पी॒तये॑ ॥ ५ ॥

इंद्राबृहस्पती इति वयं सुते गीःऽभिः हवामहे । अस्य सोमस्य पीतये ॥ ५ ॥

इंद्रबृहस्पतिहो, सोमरस पिळून सिद्ध होतांच प्रार्थनास्तुतींनी तुम्हांस सोमपानार्थ आम्ही नम्रपणानें पाचारण करीत आहोंत. ॥ ५ ॥


सोम॑मिन्द्राबृहस्पती॒ पिब॑तं दा॒शुषो॑ गृ॒हे । मा॒दये॑थां॒ तदो॑कसा ॥ ६ ॥

सोमं इंद्राबृहस्पती इति पिबतं दाशुषः गृहे । मादयेथां तत्ऽओकसा ॥ ६ ॥

इंद्रबृहस्पतिहो, हवि अर्पण करणार्‍या भक्तांच्या गृही भक्तिरूप रस प्राशन करून त्यांतच रममाण व्हा ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५० (बृहस्पती सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम : देवता - बृहस्पती : छंद - गायत्री


यस्त॒स्तम्भ॒ सह॑सा॒ वि ज्मो अन्ता॒न्बृह॒स्पति॑स्त्रिषध॒स्थो रवे॑ण ।
तं प्र॒त्ना स॒ ऋष॑यो॒ दीध्या॑नाः पु॒रो विप्रा॑ दधिरे म॒न्द्रजि॑ह्वम् ॥ १ ॥

यः तस्तंभ सहसा वि ज्मः अंतान् बृहस्पतिः त्रिऽसधस्थः रवेण ।
तं प्रत्नािसः ऋषयः दीध्यानाः पुरः विप्राः दधिरे मंद्रऽजिह्वं ॥ १ ॥

ज्या त्रैलोक्यव्यापक बृहस्पतीनें सर्वांचे दमन करणार्‍या प्रभावाच्या जोरावर आपल्या गंभीर शब्दानें पृथ्वीच्या निरनिराळ्या भागांना थोंपवून धरलें, त्याचें एकाग्रध्यान प्राचीन ऋषींनी करून त्या मधुरभाषी देवाला त्या ज्ञानी जनांनी अंतःकरणांत आपल्यापुढें स्थापन केलें. ॥ १ ॥


धु॒नेत॑यः सुप्रके॒तं मद॑न्तो॒ बृह॑स्पते अ॒भि ये न॑स्तत॒स्रे ।
पृष॑न्तं सृ॒प्रमद॑ब्धमू॒र्वं बृह॑स्पते॒ रक्ष॑तादस्य॒ योनि॑म् ॥ २ ॥

धुनऽइतयः सुऽप्रकेतं मदंतः बृहस्पते अभि ये नः ततस्रे ।
पृषंतं सृप्रं अदब्धं ऊर्वं बृहस्पते रक्षतात् अस्य योनिं ॥ २ ॥

सकल स्तुतींच्या नाथा, जे जातां जातां शत्रूंची सहज दाणादण उडवून देतात आणि पूर्णयज्ञ अंतःकरणाचा जो तूं, त्या तुला हर्षभरीत करतात असे तुझे सेवक आमच्या भोंवती पसरलेले आहेतच. आमच्या मनोरथाचा निधि अभीष्टवर्षक, विस्तृत आणि अपायरहित आहे, त्याच्याही भोंवती त्या सेवकांची वसति आहेच, परंतु हे बृहस्पति, त्या निधीचें जें मूलस्थान आहे त्याचेंही तूं कृपाकरून संरक्षण कर. ॥ २ ॥


बृह॑स्पते॒ या प॑र॒मा प॑रा॒वदत॒ आ त॑ ऋत॒स्पृशो॒ नि षे॑दुः ।
तुभ्यं॑ खा॒ता अ॑व॒ता अद्रि॑दुग्धा॒ मध्व॑ श्चोतन्त्य॒भितो॑ विर॒प्शम् ॥ ३ ॥

बृहस्पते या परमा पराऽवत् अतः आ ते ऋतऽस्पृशः नि सेदुः ।
तुभ्यं खाताः अवताः अद्रिऽदुग्धाः मध्वः श्चोतंति अभितः विऽरप्शं ॥ ३ ॥

हे बृहस्पते, अत्युच्च आणि अतिदूर अशा स्थानापासून सुद्धां तुझे सद्धर्मवर्ती सेवक येथें येऊन यज्ञांत स्थानापन्न झाले आहेत. आणि तुझ्या प्रसाद प्राप्तीकरितां खोदलेले जलाशय, व तुझ्या प्रित्यर्थ पाषाणांनी पिळून तयार केलेले हे मधुररस पात्रांत उचंबळून जिकडे तिकडे वहात आहेत. ॥ ३ ॥


बृह॒स्पतिः॑ प्रथ॒मं जाय॑मानो म॒हो ज्योति॑षः पर॒मे व्योमन् ।
स॒प्तास्य॑स्तुविजा॒तो रवे॑ण॒ वि स॒प्तर॑श्मिरधम॒त्तमां॑सि ॥ ४ ॥

बृहस्पतिः प्रथमं जायमानः महः ज्योतिषः परमे विऽओमन् ।
सप्तऽआस्यः तुविऽजातः रवेण वि सप्तऽरश्मिः अधमत् तमांसि ॥ ४ ॥

बृहस्पति प्रथम आविर्भूत झाला तो आकाशस्थ महत् तेजाच्या वर जो अत्युच्च प्रदेश आहे तेथे प्रकट झाला. सप्त वृत्तें हीच त्याची सात मुखें असून तो जातीचाच बलाढ्य आणि सात प्रकारच्या किरणांनी मंडित आहे. त्याने आपल्या नुसत्या फुंकारासरशींच काळोखाचा विध्वंस करून टाकला. ॥ ४ ॥


स सु॒ष्टुभा॒ स ऋक्व॑ता ग॒णेन॑ व॒लं रु॑रोज फलि॒गं रवे॑ण ।
बृह॒स्पति॑रु॒स्रिया॑ हव्य॒सूदः॒ कनि॑क्रद॒द्वाव॑शती॒रुदा॑जत् ॥ ५ ॥

सः सुऽस्तुभा सः ऋक्वता गणेन वलं रुरोज फलिऽगं रवेण ।
बृहस्पतिः उस्रियाः हव्यऽसूदः कनिक्रदत् वावशतीः उत् आजत् ॥ ५ ॥

चित्तवृत्ति तल्लीने करून टाकणारी स्तुति करणार्‍या भक्तिविनम्र सेवकांनिशी बृहस्पतीनें आपल्या सिंहनादानेंच, वलराक्षस आणि जलानें टिंब भरलेला मेघ अशा दोघांनाही एकदम विदीर्ण केलें. हविर्दुग्धाच्या धारा सोडणार्‍या परंतु सुटका व्हावी म्हणून हंबरणार्‍या प्रकाशमय धेनूंना त्यानें गंभीर गर्जना करून बाहेर आणून सोडले. ॥ ५ ॥


ए॒वा पि॒त्रे वि॒श्वदे॑वाय॒ वृष्णे॑ य॒ज्ञैर्वि॑धेम॒ नम॑सा ह॒विर्भिः॑ ।
बृह॑स्पते सुप्र॒जा वी॒रव॑न्तो व॒यं स्या॑म॒ पत॑यो रयी॒णाम् ॥ ६ ॥

एवा पित्रे विश्वऽदेवाय वृष्णे यज्ञैः विधेम नमसा हविःऽभिः ।
बृहस्पते सुऽप्रजा वीरऽवंतः वयं स्याम पतयः रयीणां ॥ ६ ॥

जगत् पिता व सर्व चराचराचा देव वीरश्रेष्ठ बृहस्पति त्याची उपासना, आम्ही त्याच्यापुढें साष्टांग प्रणिपात करून आणि यज्ञद्वारा हविर्भाग देऊन करूं. हे स्तुतिप्रभो बृहस्पते, आम्ही उत्तम प्रजावान आणि वीर्यशाली होऊन दैवी संपत्तीचे नाथ होऊं असे होवो. ॥ ६ ॥


स इद्राजा॒ प्रति॑जन्यानि॒ विश्वा॒ शुष्मे॑ण तस्थाव॒भि वी॒र्येण ।
बृह॒स्पतिं॒ यः सुभृ॑तं बि॒भर्ति॑ वल्गू॒यति॒ वन्द॑ते पूर्व॒भाज॑म् ॥ ७ ॥

सः इत् राजा प्रतिऽजन्यानि विश्वा शुष्मेण तस्थौ अभि वीर्येण ।
बृहस्पतिं यः सुऽभृतं बिभर्ति वल्गूऽयति वंदते पूर्वऽभाजं ॥ ७ ॥

भव्याकृति बृहस्पतिदेवाला जो भक्तिभरानें पूर्णपणे भरून टाकतो, सर्ववस्तूंच्या प्रथम आस्वाद घेणार्‍या त्य भगवंताला जो स्तुतिकुसुमांनी अलंकृत करून त्याच्या चरणीं लीन होतो, तोच भक्त सत्ताधारी राजा होऊन त्यानें आपल्या एकंदर प्रतिस्पर्ध्यांना धाकानें आणि पराक्रमानें पादाक्रांत केलें असें घडून येते. ॥ ७ ॥


स इत्क्षे॑ति॒ सुधि॑त॒ ओक॑सि॒ स्वे तस्मा॒ इळा॑ पिन्वते विश्व॒दानी॑म् ।
तस्मै॒ विशः॑ स्व॒यमे॒वा न॑मन्ते॒ यस्मि॑न्ब्र॒ह्मा राज॑नि॒ पूर्व॒ एति॑ ॥ ८ ॥

सः इत् क्षेति सुऽधित ओकसि स्वे तस्मा इळा पिन्वते विश्वऽदानीं ।
तस्मै विशः स्वयं एवा नमंते यस्मिन् ब्रह्मा राजनि पूर्वः एति ॥ ८ ॥

ज्या राजाच्या येथें ब्रह्मवेत्त्या सत्पुरुषाला मान मिळतो तोच आपल्या स्वतःच्या राज्यगृहांत सुखसमाधानानें नांदतो, त्याच्याकरितां अन्नदात्री धरित्री निरंतर धनधान्यांनी समृद्ध होते आणि त्याच्याच पुढे प्रजाजन आपण होऊन नम्र होतात. ॥ ८ ॥


अप्र॑तीतो जयति॒ सं धना॑नि॒ प्रति॑जन्यान्यु॒त या सज॑न्या ।
अ॒व॒स्यवे॒ यो वरि॑वः कृ॒णोति॑ ब्र॒ह्मणे॒ राजा॒ तम॑वन्ति दे॒वाः ॥ ९ ॥

अप्रतिऽइतः जयति सं धनानि प्रतिऽजन्यानि उत या सऽजन्या ।
अवस्यवे यः वरिवः कृणोति ब्रह्मणे राजा तं अवंति देवाः ॥ ९ ॥

त्याचे सामर्थ्य अप्रतिहत होऊन तो शत्रूंची धनसंपत्ति जिंकून घेऊं शकतो; त्याला आपल्या स्वजनांनाही आपल्याच तंत्राने वागवितां येते, संरक्षणाची अपेक्षा असणार्‍या विद्वान ब्राह्मणाला जो राजा आराम वाटेल असें करतो त्याच्यावर देव कृपाच करतात. ॥ ९ ॥


इन्द्र॑श्च॒ सोमं॑ पिबतं बृहस्पतेऽ॒स्मिन्य॒ज्ञे म॑न्दसा॒ना वृ॑षण्वसू ।
आ वां॑ विश॒न्त्विन्द॑वः स्वा॒भुवो॑ऽ॒स्मे र॒यिं सर्व॑वीरं॒ नि य॑च्छतम् ॥ १० ॥

इंद्रः च सोमं पिबतं बृहस्पते अस्मिन् यज्ञे मंदसाना वृषण्वसू इति वृषण्ऽवसू ।
आ वां विशंतु इंदवः सुऽआभुवः अस्मे इति रयिं सर्वऽवीरं नि यच्छतं ॥ १० ॥

इंद्र आणि बृहस्पति, तुम्ही दोघेही सोमरसाचा आस्वाद घ्या. वीर्यधनाढ्य देवांनो, ह्या यज्ञांत तुम्ही हर्ष निर्भर व्हा. तुमच्या अर्ध्या वचनांत वागणारे हे तेजस्वी सोमबिंदु तुमच्या मुखांत प्रवेश करोत; व तुम्हीही आम्हांला वीर्यसंपन्न पुत्रांनी युक्त असें ऐश्वर्य मिळवून द्या. ॥ १० ॥


बृह॑स्पत इन्द्र॒ वर्ध॑तं नः॒ सचा॒ सा वां॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे ।
अ॒वि॒ष्टं धियो॑ जिगृ॒तं पुरं॑धीर्जज॒स्तम॒र्यो व॒नुषा॒मरा॑तीः ॥ ११ ॥

बृहस्पते इंद्र वर्धतं नः सचा सा वां सुऽमतिः भूतु अस्मे इति ।
अविष्टं धियः जिगृतं पुरंऽधीः जजस्तं अर्यः वनुषां अरातीः ॥ ११ ॥

हे बृहस्पते, हे इंद्रा, आमचा उत्कर्ष करा. तुमच्या कृपेची छाया आमच्यावर सदैव राहूं द्या. आमच्या बुद्धीला सहाय व्हा, काव्यप्रतिभा जागृत करा, आणि शीलवान उपासकांच्या धर्मविहीन शत्रूंचे उच्चाटन करा. ॥ ११ ॥


ॐ तत् सत्


GO TOP