|
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १०१ ते ११० ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १०१ ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : इंद्र - छन्द : जगती त्रिष्टुभ्
प्र म॒न्दिने॑ पितु॒मद॑र्चता॒ वचो॒ यः कृ॒ष्णग॑र्भा नि॒रह॑न्नृ॒जिश्व॑ना ॥
प्र मंदिने पितुऽमत् अर्चता वचः यः कृष्णऽगर्भा निःऽअहन् ऋजिश्वना ॥
ज्याने ऋजिश्वा ह्याचे हातून, ज्यांची संतति कृष्णवर्ण, अशा लोकांचा वध करविला, त्या आनंददायक इंद्रास, हवीसह एक स्तोत्र अर्पण करा. त्यानें आमचें संरक्षण व्हावें ह्यासाठी, त्याच्या मित्रत्वाची इच्छा धरून, आम्ही त्या दक्षिण हस्तांत वज्र धारण करणाऱ्या पराक्रमी देवास मरुतासहवर्तमान निमंत्रण करतो. ॥ १ ॥
यो व्यंसं जाहृषा॒णेन॑ म॒न्युना॒ यः शंब॑रं॒ यो अह॒न्पिप्रु॑मव्र॒तम् ॥
यः विऽअंसं जाहृषाणेन मन्युना यः शंबरं यः अहन् पिप्रुं अव्रतम् ॥
ज्याने क्रोधाच्या भरांत व्यंसाचा वध केला, ज्यानें शम्नराला मारले व ज्याने पिप्रूचेंही हनन केले, ज्याचा नाश करणें शक्य नव्हतें अशा शुष्णाचाही ज्यानें नायनाट केला त्या इंद्राच्या मित्रत्वाची इच्छा धरून आम्ही त्यास मरुतांसहवर्तमान निमंत्रण करतो. ॥ २ ॥
यस्य॒ द्यावा॑पृथि॒वी पौंस्यं॑ म॒हद्यस्य॑ व्र॒ते वरु॑णो॒ यस्य॒ सूर्यः॑ ॥
यस्य द्यावापृथिवी इति पौंस्यं महत् यस्य व्रते वरुणः यस्य सूर्यः ॥
द्युलोक आणि पृथिवीलोक हा ज्याचा मोठा पराक्रम आहे, ज्याच्या आज्ञेंत वरुण राहत असतो, सूर्यही ज्याच्या आज्ञेंत आहे, ज्याच्या आज्ञेस सर्व नद्याही अनुसरतात, त्या इंद्रास, मित्रत्वाची इच्छा धरून, आम्ही मरुतांसहवर्तमान निमंत्रण करतो. ॥ ३ ॥
यो अश्वा॑नां॒ यो गवां॒ गोप॑तिर्व॒शी य आ॑रि॒तः कर्म॑णिकर्मणि स्थि॒रः ॥
यः अश्वानां यः गवां गोपऽतिः वशी यः आरितः कर्मणिऽकर्मणि स्थिरः ॥
जो अश्वांचा प्रभु आहे, जो धेनूंचाही प्रभु आहे, जो सर्वांना वश ठेवतो, जो सर्वत्र सन्मान पावलेला असून प्रत्येक कृत्यांत ज्याचें अस्तित्व निश्चयानें दृगोचर होतें, व हवि अर्पण न करणारा (अभक्त) कितीही प्रबल असला तरी त्याचा जो वध करतो त्या इंद्रास, त्याच्या मित्रत्वाची इच्छा धरून, आम्ही मरुतांसहवर्तमान निमंत्रण करतो. ॥ ४ ॥
यो विश्व॑स्य॒ जग॑तः प्राण॒तस्पति॒र्यो ब्र॒ह्मणे॑ प्रथ॒मो गा अविं॑दत् ॥
यः विश्वस्य जगतः प्राणतः पतिः यः ब्रह्मणे प्रथमः गा अविंदत् ॥
सर्व प्राणिमात्रांचा जो प्रभु आहे, ज्यानें भक्तिशील उपासकाप्रित्यर्थ प्रथमतः धेनूची प्राप्ति करविली व ज्यानें दुष्ट लोकांना दूर खाली फेंकून दिलें त्या इंद्रास, त्याच्या मित्रत्वाची इच्छा धरून आम्ही मरुतांसहवर्तमान निमंत्रण करतो. ॥ ५ ॥
यः शूरे॑भि॒र्हव्यो॒ यश्च॑ भी॒रुभि॒र्यो धाव॑द्भिर्हू॒यते॒ यश्च॑ जि॒ग्युभिः॑ ॥
यः शूरेभिः हव्यः यः च भीरुभिः यः धावत्ऽभिः हूयते यः च जिग्युऽभिः ॥
शूरांनी जो हांक मारण्यास योग्य आहे व भीरु जनांनींही जो हांक मारण्यास योग्य आहे, युद्धांतून पळ काढणारे ज्याचा धांवा करतात व युद्धांत विजयी झालेले पुरुषही ज्याचा धांवा करतात, सर्व जगानेंही ज्या इंद्राच्या संगतीची इच्छा धरलेली आहे त्या इंद्रास, त्याचे मित्रत्व प्राप्त होण्याकरतां, आम्ही मरुतांसहवर्तमान निमंत्रण करतो. ॥ ६ ॥
रु॒द्राणा॑मेति प्र॒दिशा॑ विचक्ष॒णो रु॒द्रेभि॒र्योषा॑ तनुते पृ॒थु ज्रयः॑ ॥
रुद्राणां एति प्रदिशा विऽचक्षणः रुद्रेभिः योषा तनुते पृथु ज्रयः ॥
हा प्रज्ञावान इंद्र रुद्रांच्याच दिशेकडून येतो व ह्या रुद्रांचेसहवर्तमान ती युवतीही आपलें विशाल तेज पसरते. भक्तांची स्तोत्रें ह्या कीर्तिमान इंद्राचेंच अर्चन करीत असतात. आम्हींही त्याचेंच मित्रत्व प्राप्त होण्याकरितां त्यास मरुतांसहवर्तमान निमंत्रण करतो. ॥ ७ ॥
यद्वा॑ मरुत्वः पर॒मे स॒धस्थे॒ यद्वा॑व॒मे वृ॒जने॑ मा॒दया॑से ॥
यत् वा मरुत्वः परमे सधःऽस्थे यत् वा अवमे वृजन मादयासे ॥
मरुतांसहवर्तमान असणाऱ्या हे इंद्रा, सर्व देव एकत्र जमण्याच्या एखाद्या मोठ्या ठिकाणीं तूं आनंद करीत असलास अथवा एकाद्या क्षुद्र स्थलांतच तूं आनंदानें बसला असलास तरी तेथून ह्या आमच्या यज्ञाकडे आगमन कर. सत्यांत संतोष मानणाऱ्या हे देवा, तुझ्या प्रेमामुळे आम्ही हा हवि तयार केला आहे. ॥ ८ ॥
त्वा॒येन्द्र॒ सोमं॑ सुषुमा सुदक्ष त्वा॒या ह॒विश्च॑कृमा ब्रह्मवाहः ॥
त्वायेन्द्र सोमं सुषुमा सुदक्ष त्वाया हविश्चकृमा ब्रह्मवाहः ॥
हे वीर्यशाली इंद्रा, तुझ्याविषयी प्रेम बाळगून आम्ही सोमरस तयार केला, व हे स्तुतींचा स्वीकार करणाऱ्या देवा, तुझ्या प्रेमाने प्रेरित होऊनच आम्ही हविही सिद्ध केला. ह्यासाठी हे अश्वांवर आरूढ होणाऱ्या इंद्रा, तूं आपल्या गणांसह कुशासनावर विराजमान होऊन मरुतांचे बरोबर ह्या यज्ञांत आनंद कर. ॥ ९ ॥
मा॒दय॑स्व॒ हरि॑भि॒र्ये त॑ इंद्र॒ वि ष्य॑स्व॒ शिप्रे॒ वि सृ॑जस्व॒ धेने॑ ॥
मादयस्व हरिभिर्ये त इंद्र वि ष्यस्व शिप्रे वि सृजस्व धेने ॥
तुझे जे पीतवर्ण अश्व आहेत त्यांचेसह ह्या यज्ञांत आनंद कर. तूं आपले ओंठ उघड व आपल्या सुंदर मुखाचे दोन्ही भाग तूं हालवूं लाग. हे उत्तम मुकुटानें शोभणाऱ्या इंद्रा, तुला तुझे अश्व घेऊन येवोत. आमच्या हवींविषयी आवड बाळगून तूं त्यांचे सेवन कर. ॥ १० ॥
म॒रुत्स्तो॑त्रस्य वृ॒जन॑स्य गो॒पा व॒यमिंद्रे॑ण सनुयाम॒ वाज॑म् ॥
मरुत्स्तोत्रस्य वृजनस्य गोपा वयं इंद्रेण सनुयाम वाजम् ॥
ज्या ठिकाणीं मरुतांची स्तुति चाललेली असते त्याचें संरक्षण करणारा हा इंद्रच होय. इंद्राच्याच कृपेमुळें आम्हांस सामर्थ्याचा लाभ करून घेतां येईल. ह्या आमच्या विनंतीस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी आणि द्युलोक हेही अनुमोदन देवोत. ॥ ११ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १०२ ( इंद्र सूक्त ) ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : इंद्र - छन्द : जगती त्रिष्टुभ्
इ॒मां ते॒ धियं॒ प्र भ॑रे म॒हो म॒हीम॒स्य स्तो॒त्रे धि॒षणा॒ यत्त॑ आन॒जे ॥
इमां ते धियं प्र भरे महः महीं अस्य स्तोत्रे धिषणा यत् ते आनजे ॥
हे इंद्रा ज्या अर्थीं तुझे मन ह्या स्तोत्रांत आसक्त झालेलें दिसतें त्या अर्थी हे उत्कृष्ट स्तोत्र तूं जो श्रेष्ठ देव त्या तुला मी अर्पण करतो. आनंदोत्सव प्रसंगी अथवा लाभसमयीं जो विजयीच असतो त्या इंद्रास पाहून त्याच्या सामर्थ्यामुळें देवांना हर्ष झाला. ॥ १ ॥
अ॒स्य श्रवो॑ न॒द्यः स॒प्त बि॑भ्रति॒ द्यावा॒क्षामा॑ पृथि॒वी द॑र्श॒तं वपुः॑ ॥
अस्य श्रवः नद्यः सप्त बिभ्रति द्यावाक्षामा पृथिवी दर्शतं वपुः ॥
ह्याची कीर्ति सप्त नद्या भरून नेतात व ह्याच्या सुंदर देहास स्वर्ग व भूमि हे दोन विशाल लोक धारण करतात. खरोखर, हे इंद्रा, तुझेवर आमची श्रद्धा बसावी म्हणूनच हे सूर्य आणि चंद्र, आम्हांस प्रकाश देण्याकरितां, एकमेकांची गांठ न पडूं देतां, संचार करीत असतात. ॥ २ ॥
तं स्मा॒ रथं॑ मघव॒न्प्राव॑ सा॒तये॒ जैत्रं॒ यं ते॑ अनु॒मदा॑म संग॒मे ॥
तं स्म रथं मघऽवन् प्र अव सातये जैत्रं यं ते अनुऽमदाम संऽगमे ॥
हे उदार इंद्रा, जो तुझा विजयी रथ प्राप्त झाला असतां आम्हांस आनंद होतो त्या रथाचें त्याच्या योगानें आम्हांस संपत्तीचा लाभ घडावा म्हणून तूं रक्षण कर. हे अनेक भक्तांनी स्तुति केलेल्या उदार इंद्रा, मनःपूर्वक तुजवर प्रेम करणाऱ्या आम्हांस युद्धांत सुरक्षितपणा अर्पण कर. ॥ ३ ॥
व॒यं ज॑येम॒ त्वया॑ यु॒जा वृत॑म॒स्माक॒मंश॒मुद॑वा॒ भरे॑भरे ॥
वयं जयेम त्वया युजा वृतं अस्माकं अंशं उत् अव भरेऽभरे ॥
तूं आम्हांस साहाय्यकर्ता असल्यावर आम्हांस अडविणाऱ्या शत्रूंस आम्ही खात्रीनें जिंकू. सोमरसाचा हवि तुला जेव्हां जेव्हां अर्पण होईल तेव्हां तेव्हां आमच्या पक्षाच्या रक्षणार्थ तूं उभा रहा. हे इंद्रा, आमचेसाठी सुलभ असें बचावाचें साधन निर्माण कर आणि हे उदार देवा शत्रूंच्या सामर्थ्यांचा पुरा मोड करून टाक. ॥ ४ ॥
नाना॒ हि त्वा॒ हव॑माना॒ जना॑ इ॒मे धना॑नां धर्त॒रव॑सा विप॒न्यवः॑ ॥
नाना हि त्वा हवमानाः जनाः इमे धनानां धर्तः अवसा विपन्यवः ॥
संपत्तीस धारण करणाऱ्या हे इंद्रा, तुझ्या कृपाकटाक्षाची हांव धरून तुझें स्तवन व पूजन करणारे हे जन नानाविध आहेत. परंतु तूं केवल आम्हांसच लाभ प्राप्त करून देण्याच्या इच्छेनें रथांत आरूढ हो. हे इंद्रा, तुझी मनःप्रवृत्ति खरोखर अतिशय विजयशाली असते. ॥ ५ ॥
गो॒जिता॑ बा॒हू अमि॑तक्रतुः सि॒मः कर्म॑न्कर्मञ्छ॒तमू॑तिः खजङ्क॒रः ॥
गोऽजिता बाहू इति अमितऽक्रतुः सिमः कर्मन्ऽकर्मन् शतम्ऽऊतिः खजंऽकरः ॥
त्याचे बाहू गोधन जिंकून आणतात. त्याच्या बुद्धिसामर्थ्यास सीमा नाही. तो श्रेष्ठ आहे. प्रत्येक कृत्यांत तो शेंकडो रीतीनें साहाय्य करण्यास समर्थ आहे. तो युद्ध करण्यांत निपुण आहे. ह्या इंद्राची कोणाला कल्पना करता यावयाची नाही. ह्याच्या अद्वितीय सामर्थ्यामुळें तो प्रमाणच होऊन बसला आहे. त्यांत त्याची सेवा करणारे लोक त्यास अनेक तऱ्हेनें हांक मारतात. ॥ ६ ॥
उत्ते॑ श॒तान्म॑घव॒न्नुच्च॒ भूय॑स॒ उत्स॒हस्रा॑द्रिरिचे कृ॒ष्टिषु॒ श्रवः॑ ॥
उत् ते शतान् मघऽवन् उत् च भूयसः उत् सहस्रात् रिरिचे कृष्टिषु श्रवः ॥
मानवांमध्यें तुझे पसरलेले यश शेंकडो लोकांपेक्षां - शेंकड्याहूनही जास्ती लोकांपेक्षां - सहस्रावधि लोकांपेक्षां - जास्त आहे. ज्याच्या सामर्थ्याचें मापन कधींही करतां यावयाचे नाही अशा तुला आमच्या उत्कृष्ट स्तुतींनी प्रोत्साहन दिले आणि म्हणूनच शत्रूंच्या पुरांचा विध्वंस करणाऱ्या हे देवा तूं राक्षसांचा नाश करण्यास समर्थ होतोस. ॥ ७ ॥
त्रि॒वि॒ष्टि॒धातु॑ प्रति॒मान॒मोज॑सस्ति॒स्रो भूमी॑र्नृपते॒ त्रीणि॑ रोच॒ना ॥
त्रिविष्टिऽधातु प्रतिऽमानं ओजसाः तिस्रः भूमीः नृऽपते त्रीणि रोचना ॥
आम्हां मानवांचे प्रभो, तीन भूलोक अथवा तीन देदीप्यमान प्रदेश (स्वर्गलोक) असे तुझा सामर्थ्याचे त्रिगुणित प्रमाण आहे. ह्या अखिल भुवनांपेक्षाही तूं जास्त मोठा झाला आहेस. हे इंद्रा, फार प्राचीन काळापासून तुला जन्मतः कोणीच शत्रु नाहीं. ॥ ८ ॥
त्वां दे॒वेषु॑ प्रथ॒मं ह॑वामहे॒ त्वं ब॑भूथ॒ पृत॑नासु सास॒हिः ॥
त्वां देवेषु प्रथमं हवामहे त्वं बभूथ पृतनासु सासहिः ॥
देवामध्यें आम्ही प्रथम तुला हांक मारतो. युद्धांत तूंच विजय मिळविणारा निघालास. असा हा इंद्र ह्या स्तवन कर्त्यास बाणेदार व स्फुर्तिसंपन्न करो व आम्हांस संपत्तीचा लाभ व्हावा म्हणूनच तो आमचा रथ सर्वांच्यापुढें नेवो. ॥ ९ ॥
त्वं जि॑गेथ॒ न धना॑ रुरोधि॒थार्भे॑ष्वा॒जा म॑घवन्म॒हत्सु॑ च ॥
त्वं जिगेथ न धना रुरोधिथ अर्भेषु आजा मघऽवन् महत्ऽसु च ॥
हे उदार देवा, लहान युद्धांत व मोठमोठ्या संग्रामांत तूं जय मिळवितोस, पण कधीही संपत्ति बळकावून बसत नाहीस. तूं उग्रच आहेस, तथापि आमच्या संरक्षणार्थ तूं सज्ज व्हावेंस म्हणून तुला आम्ही जास्त स्फुरण चढवितो. ह्यास्तव हे इंद्रा, आम्ही जेव्हां जेव्हां तुझे पूजन करूं त्या त्या वेळी आमचा उत्कर्ष करीत जा. ॥ १० ॥
वि॒श्वाहेन्द्रो॑ अधिव॒क्ता नो॑ अ॒स्त्वप॑रिह्वृताः सनुयाम॒ वाज॑म् ॥
विश्वाहा इन्द्रः अधिऽवक्ता नः अस्तु अपरिऽह्वृताः सनुयाम वाजम् ॥
इंद्र आम्हांस नेहमीं मंगल आशिर्वचनें देणारा असो. ह्या योगानें आमच्या मार्गांत कोणतेंही विघ्न न येतां खरोखर आम्हांस सामर्थ्याची प्राप्ति होईल. ह्या आमच्या विनंतीस मित्र, वरुण, व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी आणि द्युलोक हेही अनुमोदन देवोत. ॥ ११ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १०३ ( इंद्र सूक्त ) ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : इंद्र - छन्द : जगती त्रिष्टुभ्
तत्त॑ इंद्रि॒यं प॑र॒मं प॑रा॒चैरधा॑रयन्त क॒वयः॑ पु॒रेदम् ॥
तत् त इंद्रियं परमं पराचैः अधारयंत कवयः पुरा इदम् ॥
येथें दृगोचर होणार्या त्या तुझ्या श्रेष्ठ सामर्थ्याचा विद्वान लोकांनी प्राचीनकाली अति उच्च गौरव केला होता. तुझ्या शक्तीचा एक अंश पृथिवीवर दृष्टीस पडतो व एक अंश स्वर्गलोकीं अनुभवास येतो. आणि ज्यप्रमाणें युद्धकालीं लढाईचे एक निशाण दुसर्याजवळ जाऊन मिळते त्याप्रमाणें तुज्या शक्तीचे ते दोन्ही भाग तुझे ठायी एकत्र होतात. ॥ १ ॥
स धा॑रयत्पृथि॒वीं प॒प्रथ॑च्च॒ वज्रे॑ण ह॒त्वा निर॒पः स॑सर्ज ॥
सः धारयत् पृथिवीं पप्रथत् च वज्रेण हत्वा निः अपः ससर्ज ॥
त्यानें पृथिवीला धारण करून तिचा विस्तार केला, आणि आपल्या वज्रानें वृत्रास मारून त्यानें उदकांचा मार्ग मोकळा केला. त्या उदार देवानें अहीचा वध केला, त्यानें रोहिणाचा उच्छेद केला व त्यानें आपल्या सामर्थ्यानें कंसास मारलें. ॥ २ ॥
स जा॒तूभ॑र्मा श्र॒द्दधा॑न॒ ओजः॒ पुरो॑ विभि॒न्दन्न॑चर॒द्वि दासीः॑ ॥
सः जातूऽभर्मा श्रत्ऽदधानः ओजः पुरः विऽभिंदन् अचरत् वि दासीः ॥
आपलें वज्र व आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्याने दहा शत्रूंच्या पुरांचा विध्वंस करीत त्यांच्या सैन्यास पायाखाली तुडविलें. हे वज्रधर इंद्रा, तूं सर्व जाणत असल्यामुळें शत्रूंवर आपलें आयुध सोड व तुझ्यावर विश्वास टाकणार्या भक्तांचे बल व वैभव वृद्धिंगत कर. ॥ ३ ॥
तदू॒चुषे॒ मानु॑षे॒मा यु॒गानि॑ की॒र्तेन्यं॑ म॒घवा॒ नाम॒ बिभ्र॑त् ॥
तत् ऊचुषे मानुषा इमा युगानि कीर्तेन्यं मघऽवा नाम बिभ्रत् ॥
वज्रधारी व उदार इंद्रानें दस्यूंचा वध करण्याकरितां त्यांचेवर चाल करून जात आतां आपली कीर्ति वाढवून जे नांव मिळविलें तेंच प्रशंसनीय नांव त्या औदार्यशील देवानें मानवी कालांतसुद्धां आपल्या भक्ताच्या हितासाठीं राखले आहे. ॥ ४ ॥
तद॑स्ये॒दं प॑श्यता॒ भूरि॑ पु॒ष्टं श्रदिंद्र॑स्य धत्तन वी॒र्याय ॥
तत् अस्य इदं पश्यत भूरि पुष्टं श्रत् इंद्रस्य धत्तन वीर्याय ॥
त्याचें तें विपुल व अतिशय वृद्धि पावलेले सामर्थ्य अवलोकन करा व त्या इंद्राच्या शक्तीवर विश्वास ठेवा. त्यानेंच धेनूंची प्राप्ति करून घेतली, अश्व मिळविले, औषधि संपादन केल्या, उदकें जिंकून आणली व अरण्यांचा ताबा घेतला. ॥ ५ ॥
भूरि॑कर्मणे वृष॒भाय॒ वृष्णे॑ स॒त्यशु॑ष्माय सुनवाम॒ सोम॑म् ॥
भूरिऽकर्मणे वृषभाय वृष्णे सत्यऽशुष्माय सुनवाम सोमम् ॥
वाटेंत अडविणार्या तस्कराप्रमाणें जो शूर अभक्तांचा प्रथम आदरसत्कार करून मागाहून त्याच्या संपत्तीचा भंग करीत इकडे आगमन करतो त्या अनेक पराक्रम करणार्या, सामर्थ्यवान, बलशाली व सत्यशक्तियुक्त इंद्राकरितां आपण सोमरस तयार केला पाहिजे. ॥ ६ ॥
तदिं॑द्र॒ प्रेव॑ वी॒र्यं चकर्थ॒ यत्स॒सन्तं॒ वज्रे॒णाबो॑ध॒योऽ॑हिम् ॥
तत् इंद्र प्रऽइव वीर्यं चकर्थ यत् ससंतं वज्रेण अबोधयः अहिम् ॥
हे इंद्रा निद्रिस्त असलेल्या अहीस तूं वज्रानें जागें केलेंस हे तूं खरोखर जणूं काही अत्यन्त मोठेंच शूरत्वाचें कृत्य केलेंस. तूं आनंदित झाल्याबरोबर अखिल देवपत्नी, सर्व पक्षी, व सकल देव ह्यांनाही आनंद झाला ॥ ७ ॥
शुष्ण॒म् पिप्रुं॒ कुय॑वं वृ॒त्रमिं॑द्र य॒दाव॑धी॒र्वि पुरः॒ शम्ब॑रस्य ॥
शुष्णं पिप्रुं कुयवं वृत्रं इंद्र यदा अवधीः वि पुरः शंबरस्य ॥
हे इंद्रा, ज्या वेळी तूं शुष्ण, विप्रु, कुयव आणि वृत्र ह्यांचा वध केलास त्यावेळीं तूं शम्बराच्या पुराचाही विध्वंस केलास. ह्या आमच्या विनंतीस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी आणि द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १०४ ( इंद्र सूक्त ) ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : इंद्र - छन्द : जगती त्रिष्टुभ्
योनि॑ष्ट इंद्र नि॒षदे॑ अकारि॒ तमा नि षी॑द स्वा॒नो नार्वा॑ ॥
योनिः ते इंद्र निऽसदे अकारि तं आ नि सीद स्वानः न अर्वा ॥
हे इंद्रा, तूं विराजमान व्हावेंस म्हणून हें आसन सिद्ध केलें आहे. अश्व जसा आनंदानें खिंकाळू लागतो त्याप्रमाणें आनंदानें ह्याचा स्वीकार कर. पक्ष्यांप्रमाणें वेगवान असे आपले घोडे आतां सोड. तुला रात्र असो कीं दिवस असो, संतोषानें सोमपानार्थ वाहून घेऊन जाणार्या तुझ्या अश्वांस तूं आतां मोकळे कर. ॥ १ ॥
ओ त्ये नर॒ इंद्र॑मू॒तये॑ गु॒र्नू चि॒त्तान्त्स॒द्यो अध्व॑नो जगम्यात् ॥
ओ इति त्ये नरः इंद्रं ऊतये गुः नु चित् तान् सद्यः अध्वनः जगम्यात् ॥
ते पुरुष आपलें संरक्षण व्हावें ह्या हेतूनें इंद्राकडे गेले. तोही त्यांच्याच मार्गाकडे जाणार नाहीं काय ? सर्व देव मिळून दुष्ट शत्रूचा राग शमवोत, आणि आमच्या वर्णाच्या लोकांस ते कल्याणाच्या मार्गाकडे घेऊन जावोत. ॥ २ ॥
अव॒ त्मना॑ भरते॒ केत॑वेदा॒ अव॒ त्मना॑ भरते॒ फेन॑मु॒दन् ॥
अव त्मना भरते केतऽवेदाः अव त्मना भरते फेनं उदन् ॥
दुसर्याच्या मनांतले जाणणार्या त्या कपट्यानें पाण्यांत फेंस भरून ठेवला; त्या कुयवाच्या बायकामात्र दुधानें स्नान करतात. शिफेच्या भोवर्यांत त्या बुडून तरी जावोत. ॥ ३ ॥
यु॒योप॒ नाभि॒रुप॑रस्या॒योः प्र पूर्वा॑भिस्तिरते॒ राष्टि॒ शूरः॑ ॥
युयोप नाभिः उपरस्य आयोः प्र पूर्वाभिः तिरते राष्टि शूरः ॥
आयु वर आकाशांत होता. त्याच्या नाभिस्थलानें सर्व दिसेनासें केले होतें. परंतु आपल्या पुरातन सामर्थ्यानें इंद्र त्यांतून सहज तरून गेला व त्याचेवर त्या शूरानें आपला अधिकार प्रस्थापित केला. त्या वीराच्या पत्नी ज्या अजंसी व कुलिशी त्यांनी उदकामध्यें गति उत्पन्न करून त्या आयूस पाण्याने भरून टाकले. ॥ ४ ॥
प्रति॒ यत्स्या नीथाद॑र्शि॒ दस्यो॒रोको॒ नाच्छा॒ सद॑नं जान॒ती गा॑त् ॥
प्रति यत् स्या नीथा अदर्शि दस्योः ओकः न अच्छा सदनं जानती गात् ॥
ज्या अर्थी त्या दुष्ट राक्षसाचा मार्ग दृष्टीस पडूं लागला आहे व आपल्या घराची माहिती असणारी स्त्री ज्याप्रमाणें तिकडे जाते त्याप्रमाणें तो थेट तिकडे निघाला आहे, त्या अर्थी हे उदार देवा, आम्हांस अपाय होऊं देऊं नकोस व ज्याप्रमाणें एखादा विषयासक्त पुरुष आपली संपत्ति उडवून टाकतो त्याप्रमाणें आम्हांस टाकून देऊं नकोस. ॥ ५ ॥
स त्वं न॑ इंद्र॒ सूर्ये॒ सो अ॒प्स्वनागा॒स्त्व आ भ॑ज जीवशं॒से ॥
सः त्वं नः इंद्र सूर्ये सः अप्ऽसु अनागाःऽत्वे आ भज जीवऽशंसे ॥
हे इंद्रा, सूर्य, उदकें, निष्पापपणा व सर्व जीवांत प्रशंसनीय स्थिति ह्यांचा आम्हास लाभ व्हावा म्हणून तूं आमच्या जवळ अस. आम्ही अगदी आंत गांठ मारून ठेवलेल्या संपत्तीचा नाश तूं होऊं देऊं नकोस. प्रत्यक्ष शरीरबलच असा जो तूं श्रेष्ठ देव त्याचेवर आमचा विश्वास आहे. ॥ ६ ॥
अधा॑ मन्ये॒ श्रत्ते॑ अस्मा अधायि॒ वृषा॑ चोदस्व मह॒ते धना॑य ॥
अध मन्ये श्रत् ते अस्मै अधायि वृषा चोदस्व महते धनाय ॥
हे इंद्रा माझी अशी मनःपूर्वक समजूत आहे कीं आम्हीं तुजवर विश्वास ठेवला आहे. तूं सामर्थ्यवान आहेस म्हणूनच तूं अतिशय संपत्तीकडे आमची प्रेरणा कर. अनेक भक्तांनी ज्यास पाचारण केलें आहे असे हे इंद्रदेवा, आम्हांस क्षुधा लागेल तेव्हां अन्न पाणी पुरवितांना आमचें घर बांधण्याचें तसेंच अपुरें ठेवून मात्र ते आम्हांस देऊं नकोस. ॥ ७ ॥
मा नो॑ वधीरिंद्र॒ मा परा॑ दा॒ मा नः॑ प्रि॒या भोज॑नानि॒ प्र मो॑षीः ॥
मा नः वधीः इंद्र मा परा दाः मा नः प्रिया भोजनानि प्र मोषीः ॥
हे इंद्रा आमचा वध करूं नको, आम्हांस टाकूं नकोस; हे सामर्थ्यवान व उदार इंद्रा, गर्भांत असलेल्या आमच्या संततीचा नाश करूं नकोस - अनेक शिशूंनासुद्धां जी एकदम जन्म देतात अशी अंडी तूं फोडूं नकोस. ॥ ८ ॥
अ॒र्वाङ्ए्हि॒ सोम॑कामं त्वाहुर॒यं सु॒तस्तस्य॑ पिबा॒ मदा॑य ॥
अर्वाङ् आ इहि सोमऽकामं त्वा आहुः अयं सुतः तस्य पिब मदाय ॥
इकडे ये. सोमाची तुला अत्यंत आवड आहे असे म्हणतात. म्हणून हा सोमरस येथें ओतला आहे तो पी व आनंदित हो. तूं अनेक स्थलें व्यापून टाकली आहेस. तूं हा सोमरस पोटांत घालून सामर्थ्यवान हो. जेव्हां आम्ही तुला हांक मारूं तेव्हां आमच्या पित्याप्रमाणें आमची हांक ऐक. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १०५ ( विश्वेदेव सूक्त ) ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : विश्वेदेव - छन्द : जगती त्रिष्टुभ्
च॒न्द्रमा॑ अ॒प्स्व१॑न्तरा सु॑प॒र्णो धा॑वते दि॒वि ।
चंद्रमा अप्ऽसु अंतः आ सुऽपर्णः धावते दिवि ॥
चंद्रमा जलांतून धांवत जात आहे व हा सुंदर पंखांचा पक्षी आकाशांत धांवत आहे. ज्यांचे पदर सोन्याचे आहेत अशा ह्या विजांना सुद्धां तुमचें स्थान कोणते तें नेमके माहीत नाहीं. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ १ ॥
अर्थ॒मिद्वा उ॑ अ॒र्थिन॒ आ जा॒या यु॑वते॒ पति॑म् ।
अर्थं इत् वै ऊं इति अर्थिनः आ जाया युवते पतिम् ॥
आपल्या इष्टार्थाची इच्छा करणार्या मनुष्यास इच्छित वस्तु प्राप्त होते, आणि भार्येस पतीची भेट होते. ती दोघें वीर्यसंपन्न अशा उदकास प्रेरणा करतात व तें परस्परांस देऊन त्यापैंकी प्रत्येकजण स्वतःस आनंद प्राप्त करून घेतो. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ २ ॥
मो षु दे॑वा अ॒दः स्व१॑रव॑ पादि दि॒वस्परि॑ ।
मो इति सु देवाः अदः स्वः अव पादि दिवः परि ॥
हे देवहो, हे तेज स्वर्गापासून कधींही च्युत न होवो. आम्हांस हितकारी असा जो सोम तो जेथें नाही अशा ठिकाणी आम्ही कधींही नसावे. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ ३ ॥
य॒ज्ञं पृ॑च्छाम्यव॒मं स तद्दू॒तो वि वो॑चति ।
यज्ञं पृच्छामि अवमं सः तत् दूतः वि वोचति ॥
मी सर्वांत शेवटच्या यज्ञांस एक प्रश्न विचारतो. तो सर्वांचा दूत असल्यामुळें त्याचें उत्तर देईल. तें पूर्वींचे सत्य कोठें नाहीसें झाले ? कोणत्या नवीन मनुष्याचे जवळ ते गेले आहे ? हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ ४ ॥
अ॒मी ये दे॑वा॒ स्थन॑ त्रि॒ष्वा रो॑च॒ने दि॒वः ।
अमी इति ये देवाः स्थन त्रिषु आ रोचने दिवः ॥
द्युलोकाच्या तिन्ही देदीप्यमान प्रदेशांत जे निवास करतात अशा हे देवांनो, तुमचें सत्य कोणतें, व तुमचें असत्य कोणतें ? तुम्हांस मी पूर्वीं अर्पण केलेली आहुति कोठे गेली ? हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ ५ ॥
कद्व॑ ऋ॒तस्य॑ धर्ण॒सि कद्वरु॑णस्य॒ चक्ष॑णम् ।
कत् व ऋतस्य धर्णसि कत् वरुणस्य चक्षणम् ॥
तुमचें सत्याचे परिपालन कोणते ? वरुणाची अमृत दृष्टि कोणती ? श्रेष्ठ अर्यमाच्या मार्गानें, आम्ही आमचें वाईट चिंतणार्या लोकांना दाद न देतां, कसें पुढें जाऊं ? हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ ६ ॥
अ॒हं सो अ॑स्मि॒ यः पु॒रा सु॒ते वदा॑मि॒ कानि॑ चित् ।
अहं सः अस्मि यः पुरा सुते वदामि कानि चित् ॥
जो मी पूर्वी सोमरस सिद्ध करून अनेक स्तोत्रें म्हणत होतो तोच मी होय, परंतु एखाद्या तृषित मृगाला ज्याप्रमाणें लांडगा खाऊन टाकतो त्याप्रमाणें आतां मला चिंता खाऊन टाकीत आहेत. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ ७ ॥
सं मा॑ तपन्त्य॒भितः॑ स॒पत्नी॑रिव॒ पर्श॑वः ।
सं मा तपंति अभितः सपत्नीःऽइव पर्शवः ॥
ज्याप्रमाणे सवती सवती जमल्या म्हणजे त्या दोन्हीकडून नवर्यास छळूं लागतात त्याप्रमाणे माझ्या कृश झालेल्या बरगड्या मला दोन्हींकडून टोंचीत आहेत. हे अत्यंत सामर्थ्यवान देवा, मी तुझी स्तुति गाणारा असून ज्याप्रमाणें उंदीर कोष्ठ्याच्या भागांतील दोरे खाऊन टाकतात त्याप्रमाणे मला चिंता खाऊन टाकीत आहेत. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ ८ ॥
अ॒मी ये स॒प्त र॒श्मय॒स्तत्रा॑ मे॒ नाभि॒रात॑ता ।
अमी इति ये सप्त रश्मयः तत्र मे नाभिः आऽतता ॥
हे जे सूर्याचे सात रंगाचें किरण पसरलेले आहेत त्यांच्याच खाली माझी नाभी उघडी पडली आहे. आप्त्य त्रिताला हें माहीत आहे व कोणी तरी त्यास मायाळु आप्त भेटावा म्हणून तो प्रार्थना करीत आहे. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ ९ ॥
अ॒मी ये पञ्चो॒क्षणो॒ मध्ये॑ त॒स्थुर्म॒हो दि॒वः ।
अमी इति ये पंच उक्षणः मध्ये तस्थुः महः दिवः ॥
जे हे पांच प्रबल देव विस्तीर्ण द्युलोकाच्या मध्यभागी विराजमान झाले आहेत ते माझी स्तुति श्रवण करून देवांच्या समुदायातं परत गेले. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ १० ॥
सु॒प॒र्णा ए॒त आ॑सते॒ मध्य॑ आ॒रोध॑ने दि॒वः ।
सुऽपर्णाः एते आसते मध्य आऽरोधने दिवः ॥
द्युलोकांच्या सीमांत प्रदेशावर हे सुंदर पंखांचे पक्षी विराजमान झालेले आहेत व ते ह्या विस्तीर्ण उदकामधूनही तरून जाणार्या लांडग्यास हांकून लावीत आहेत. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ ११ ॥
नव्यं॒ तदु॒क्थ्यं हि॒तं देवा॑सः सुप्रवाच॒नम् ।
नव्यं तत् उक्थ्यं हितं देवासः सुऽप्रवाचनम् ॥
हे देवहो, प्रशंसनीय व भक्तांचे कल्याण करणारें असें तें उत्तम स्तोत्र अगदी नवे आहे. ह्या पहा महानद्या आपल्या प्रवाहाबरोबर देवांच्या नीतिनियमनांचा प्रसार करीत आहेत व सूर्यानें चोहोंकडे सत्य पसरलें आहे. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ १२ ॥
अग्ने॒ तव॒ त्यदु॒क्थ्यं दे॒वेष्व॒स्त्याप्य॑म् ।
अग्ने तव त्यत् उक्थ्यं देवेषु अस्ति आप्यम् ॥
हे अग्निदेवा, तुझें देवांच्याबरोबर तें सर्वप्रसिद्ध नातें आहे, व त्याची सर्वत्र प्रशंसाही होत आहे. ह्यास्तव तूं जसा मनूच्या यज्ञांत विराजमान झाला होतास तसा येथें आमच्या करितां विराजमान हो, व अत्यंत प्रज्ञाशील असल्यामुळें तूं देवांना आमचा यज्ञ पोंचीव. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ १३ ॥
स॒त्तो होता॑ मनु॒ष्वदा दे॒वाँ अच्छा॑ वि॒दुष्ट॑रः ।
सत्तः होता मनुष्वत् आ देवान् अच्छ विदुःऽतरः ॥
सर्व देवांत अत्यंत प्रज्ञाशील व बुद्धिमान असा हा अग्निदेव, मनूच्या यज्ञाप्रमाणें आमच्या यज्ञांत स्थित होऊन, आमचे हवि देवांकडे पोंचवितो. कारण हवि पोंचविण्याचें काम त्याचेंस आहे. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ १४ ॥
ब्रह्मा॑ कृणोति॒ वरु॑णो गातु॒विदं॒ तमी॑महे ।
ब्रह्मा कृणोति वरुणः गातुऽविदं तं ईमहे ॥
वरुण हाच स्तोत्र रचण्याची स्फूर्ति देतो, व म्हणून चांगला मार्ग कोणता ह्याचे ज्ञान असणार्या त्या देवाची आम्ही प्रार्थना करतो. भक्तांचे हृदय व अंतःअकरण प्रकट व्हावयास तोच लावतो. खरोखर आज नीतीचा पुन्हां नवीन उदय होवो. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ १५ ॥
अ॒सौ यः पन्था॑ आदि॒त्यो दि॒वि प्र॒वाच्यं॑ कृ॒तः ।
असौ यः पंथा आदित्यः दिवि प्रऽवाच्यं कृतः ॥
आदित्याचा जो हा आकाशांतील मार्ग सर्वांचे स्तुतीस पात्र होईल अशा रीतीनें तयार करण्यांत आलेला आहे त्याचें अतिक्रमण, हे देवहो, तुम्हांसही करतां आलें नाही व हे मर्त्यहो, तुमच्याही तो दृष्टीस पडत नाही. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ १६ ॥
त्रि॒तः कूपेऽ॑वहितो दे॒वान्ह॑वत ऊ॒तये॑ ।
त्रितः कूपे अवऽहितः देवान् हवते ऊतये ॥
त्रित विहीरींत पडला म्हणून आपल्या रक्षणाकरितां तो देवांना हांक मारीत आहे. बृहस्पतीने त्याचा संकटापासून बचाव करून त्याची ती हांक ऐकली. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ १७ ॥
अ॒रु॒णो मा॑ स॒कृद्वृकः॑ प॒था यन्तं॑ द॒दर्श॒ हि ।
अरुणः मा सकृत् वृकः पथा यंतं ददर्श हि ॥
मी मार्गानें जात असतां मला एकदां एका लाल रंगाच्या लांडग्यानें पाहिलें. मग काम करून करून पाठींत कळ आलेल्या सुताराप्रमाणें तो हळू हळू उठला व माझेकडे चालूं लागला. हे द्युलोक व भूलोक हो, माझी प्रार्थना लक्षांत घ्या. ॥ १८ ॥
ए॒नाङ्गू॒वषेण॑ व॒यमिंद्र॑वन्तोऽ॒भि ष्या॑म वृ॒जने॒ सर्व॑वीराः ।
एना आगूषेण वयं इंद्रऽवंतः अभि स्याम वृजने सर्वऽवीराः ॥
ह्या स्तोत्राच्या योगानें इंद्राची कृपा संपादन करून आम्ही आपल्या पदरच्या सर्व योद्ध्यांसह, आपल्या संकटांतून सुरक्षितपणें पार पडूं. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी आणि द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ १९ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १०६ ( इंद्र सूक्त ) ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : इंद्र - छन्द : जगती त्रिष्टुभ्
इंद्रं॑ मि॒त्रं वरु॑णम॒ग्निमू॒तये॒ मारु॑तं॒ शर्धो॒ अदि॑तिं हवामहे ॥
इंद्रं मित्रं वरुणं अग्निं ऊतये मारुतं शर्धः अदितिं हवामहे ॥
आम्ही आपल्या संरक्षणाकरितां इंद्र, मित्र, वरुण अग्नि, मरुद्गण व अदिति ह्यांना आमंत्रण करतो. प्रत्यक्ष वैभवच अशा ह्या उदार देवांनो, ज्याप्रमाणे एखाद्या गाडीस अडचणीच्या जागेंतून काढावें त्याप्रमाणें आम्हांस सर्व संकटांतून बाहेर काढा. ॥ १ ॥
त आ॑दित्या॒ आ ग॑ता स॒र्वता॑तये भू॒त दे॑वा वृत्र॒तूर्ये॑षु श॒म्भुवः॑ ॥
ते आदित्याः आ गत सर्वऽतातये भूत देवाः वृत्रऽतूर्येषु शम्ऽभुवः ॥
हे देवहो, तुम्हां सर्वांस उद्देशून जो आम्ही यज्ञ करीत आहों तत्प्रित्यर्थ इकडे या. हे देवहो, दुष्टांचे हनन करून आमचें कल्याण करणारे व्हा. प्रत्यक्ष वैभवच अशा उदार देवांनो, ज्याप्रमाणे एखाद्या गाडीस अडचणीच्या जागेंतून काढावें त्याप्रमाणें आम्हांस सर्व संकटांतून बाहेर काढा. ॥ २ ॥
अव॑न्तु नः पि॒तरः॑ सुप्रवाच॒ना उ॒त दे॒वी दे॒वपु॑त्रे ऋता॒वृधा॑ ॥
अवंतु नः पितरः सुऽप्रवाचनाः उत देवी इति देवऽपुत्रे ऋतऽवृधा ॥
स्तुति करण्यास सर्वथैव योग्य असे पितर आमचे संरक्षण करोत आणि नीतिनियमनांस उत्तेजन देणार्या व देवांना जन्म देणार्या दोघी देवीही आमचे संरक्षण करोत. प्रत्यक्ष वैभवच अशा उदार देवांनो, ज्याप्रमाणे एखाद्या गाडीस अडचणीच्या जागेंतून काढावें त्याप्रमाणें आम्हांस सर्व संकटांतून बाहेर काढा. ॥ ३ ॥
नरा॒शंसं॑ वा॒जिनं॑ वा॒जय॑न्नि॒ह क्ष॒यद्वी॑रं पू॒षणं॑ सु॒म्नैरी॑महे ॥
नराशंसं वाजिनं वाजयन् इह क्षयत्ऽवीरं पूषणं सुम्नैः ईमहे ॥
सामर्थ्यवान नराशंसाचे येथें स्तवन करीत, ज्याचेजवळ वीरांचा निवास असतो अशा पूषादेवास, उत्तम उत्तम हवींनी आम्ही आळवीत आहों. प्रत्यक्ष वैभवच अशा उदार देवांनो, ज्याप्रमाणे एखाद्या गाडीस अडचणीच्या जागेंतून काढावें त्याप्रमाणें आम्हांस सर्व संकटांतून बाहेर काढा. ॥ ४ ॥
बृह॑स्पते॒ सद॒मिन्नः॑ सु॒गं कृ॑धि॒ शं योर्यत्ते॒ मनु॑र्हितं॒ तदी॑महे ॥
बृहस्पते सदं इत् नः सुऽगं कृधि शं योः यत् ते मनुःऽहितं तत् ईमहे ॥
हे बृहस्पतिदेवा, आम्हांकरितां सदोदित सर्व मार्ग सुलभ कर. मानवांस हितकारक असें जें कांही सौख्य तुला शरण येणार्याकरितांच तूं राखून ठेवलेलें असशील त्याची आम्हीं तुझेपाशीं याचना करतो. प्रत्यक्ष वैभवच अशा उदार देवांनो, ज्याप्रमाणे एखाद्या गाडीस अडचणीच्या जागेंतून काढावें त्याप्रमाणें आम्हांस सर्व संकटांतून बाहेर काढा. ॥ ५ ॥
इंद्रं॒ कुत्सो॑ वृत्र॒हणं॒ शची॒पतिं॑ का॒टे निबा॑ळ्ह॒ ऋषि॑रह्वदू॒तये॑ ॥
इंद्रं कुत्सः वृत्रऽहनं शची३ऽपतिं काटे निऽबाळ्ह ऋषिः अह्वत् ऊतये ॥
कूपांत पडलेल्या कुत्स ऋषीनें, आपल्या रक्षणासाठी, वृत्राचा वध करणार्या सामर्थ्यवान इंद्राचा धावा केला. प्रत्यक्ष वैभवच अशा उदार देवांनो, ज्याप्रमाणे एखाद्या गाडीस अडचणीच्या जागेंतून काढावें त्याप्रमाणें आम्हांस सर्व संकटांतून बाहेर काढा. ॥ ६ ॥
दे॒वैर्नो॑ दे॒व्यदि॑ति॒र्नि पा॑तु दे॒वस्त्रा॒ता त्रा॑यता॒मप्र॑युच्छन् ॥
देवैः नः देवि अदितिः नि पातु देवः त्राता त्रायतां अप्रऽयुच्छन् ॥
सर्व देवांसह अदितिदेवी आमचें संरक्षण करो आणि आमचा पालनकर्ता देवही, आम्हांकडे यत्किंचित् दुर्लक्ष न करतां, आमचे संरक्षण करो. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी आणि द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १०७ ( अग्नि सूक्त ) ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : अग्नि - छन्द : जगती त्रिष्टुभ्
य॒ज्ञो दे॒वानां॒ प्रत्ये॑ति सु॒म्नमादि॑त्यासो॒ भव॑ता मृळ॒यन्तः॑ ॥
यज्ञः देवानां प्रति एति सुम्नं आदित्यासः भवत मृळयंतः ॥
यज्ञ हा देवांची उत्तम कृपा संपादन करून घेण्यास साधनीभूत होत असतो. हे आदित्यहो, तुम्ही आम्हांस सौख्य अर्पण करणारे व्हा. ही तुमची अनुग्रहबुद्धि संकटांतून उत्तम संरक्षण करीत असते ती आमचेकडेच वळो. ॥ १ ॥
उप॑ नो दे॒वा अव॒सा ग॑म॒न्त्वङ्गि॑॑रसां॒ साम॑भि स्तू॒यमा॑नाः ॥
उप नः देवाः अवसा आ गमंतु अङ्गिरसां सामऽभि स्तूयमानाः ॥
अंगिरसांच्या स्तोत्रांनी ज्याचें स्तवन झालेले आहे असे देव आम्हांवर कृपा करण्याकरितां आमचेकडे येवोत. इंद्र आपल्या सर्व सामर्थ्यांसह, मरुत्देव व इतर सर्व मरुतांसह, व अदिति सर्व आदित्यांसह येथें येवो व आम्हांस सौख्य अर्पण करो. ॥ २ ॥
तन्न॒ इंद्र॒स्तद्वरु॑ण॒स्तद॒ग्निस्तद॑र्य॒मा तत्स॑वि॒ता चनो॑ धात् ॥
तत् नः इंद्रः तत् वरुणः तत् अग्निः तत् अर्यमा तत् सविता चनः धात् ॥
ही आमची स्तुति इंद्र गोड करून घेवो. ही वरुण गोड करून घेवो. ही अर्यमा गोड करून घेवो, व ही सविताही गोड करून घेवो. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी आणि द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ३ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १०८ ( इंद्राग्नी सूक्त ) ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : इंद्राग्नौ - छन्द : जगती त्रिष्टुभ्
य इं॑द्राग्नी चि॒त्रत॑मो॒ रथो॑ वाम॒भि विश्वा॑नि॒ भुव॑नानि॒ चष्टे॑ ॥
यः इंद्राग्नी इति चित्रऽतमः रथः वां अभि विश्वानि भुवनानि चष्टे ॥
हे इंद्र आणी अग्निदेवहो, जो तुमचा अत्यंत आश्चर्यकारक रथ मार्गक्रमण करीत असतां अखिल विश्वांचे अवलोकन करीत असतो त्या रथांत दोघेही एकत्र बसून येथें या व हा सोमरस काढून ठेवला आहे त्याचे प्राशन करा. ॥ १ ॥
याव॑दि॒दण् भुव॑नं॒ विश्व॒मस्त्यु॑रु॒व्यचा॑ वरि॒मता॑ गभी॒रम् ॥
यावत् इदं भुवनं विश्वं अस्ति उरुऽव्यचा वरिमता गभीरम् ॥
हे इंद्र आणि अग्निदेवहो, हे सर्व जगत् आपल्या विस्तीर्ण आकारामुळें जसें खोलपर्यंत पसरलेले आहे तसा हा सोम तुमच्या प्राशनास भरपूर पुरून तुमच्या मनास सर्वतोपरी आनंदकारक होवो. ॥ २ ॥
च॒क्राथे॒ हि स॒ध्र्य१॑ङ्ना॑म॑ भ॒द्रं स॑ध्रीची॒ना वृ॑त्रहणा उ॒त स्थः॑ ॥
चक्राथे इति हि सध्र्यक् नाम भद्रं सध्रीचीना वृत्रऽहनौ उत स्थः ॥
तुम्ही खरोखर उत्कृष्ट रीतीनें उत्तम नांव मिळविले आहे व वृत्राचे हनन करणारे तुम्ही खरोखर उत्कृष्ट कृति करणारे आहां. तेव्हां ह्या यज्ञांत उत्कृष्ट रीतीनें विराजमान होऊन, हे सामर्थ्यवान इंद्र आणि अग्निदेवहो, तुम्ही ह्या सामर्थ्यप्रद सोमराचें प्राशन करा. ॥ ३ ॥
समि॑द्धेष्व॒ग्निष्वा॑नजा॒ना य॒तस्रु॑चा ब॒र्हिरु॑ तिस्तिरा॒णा ॥
संऽइद्धेषु अग्निषु आनजाना यतऽस्रुचा बर्हिः ऊं इति उ तिस्तिराणा ॥
हे इंद्र आणि अग्निदेवहो, अग्नि प्रदीप्त केल्यावर ज्या तुम्हांस भूषणें चढविलीं आहेत, ज्यांचेकरितां यज्ञचमस वर उचलण्यांत येत आहेत, व जे तुम्ही दर्भासनावर विराजमान झालेले आहां, ते हा तीव्र सोमरस सिद्ध केल्यावरोबर आम्हांवर कृपा करण्याची इच्छा धरून इकडे या. ॥ ४ ॥
यानी॑न्द्राग्नी च॒क्रथु॑र्वी॒र्याणि॒ यानि॑ रू॒पाण्यु॒त वृष्ण्या॑नि ॥
यानि इन्द्राग्नी इति चक्रथुः वीर्याणि यानि रूपाणि उत वृष्ण्यानि ॥
हे इंद्र व अग्निदेवहो, जी वीरकर्में आजपर्यंत तुम्ही केलीं, जी नानाप्रकारचीं रूपें तुम्ही दाखविलीं, व जे अनेक पराक्रम तुम्ही गाजविलें त्याचें व जी तुमची मित्रत्वाची कृत्यें पुरातन कालापासून प्रख्यात आहेत त्या सर्वांचे स्मरण ठेवून ह्या आम्ही सिद्ध केलेल्या सोमरसाचें प्राशन करा. ॥ ५ ॥
यदब्र॑वं प्रथ॒मं वां॑ वृणा॒नोऽ॒यं सोमो॒ असु॑रैर्नो वि॒हव्यः॑ ॥
यत् अब्रवं प्रथमं वां वृणानः अयं सोमः असुरैः नः विऽहव्यः ॥
ज्या अर्थीं प्रथम तुमच्या दर्शनाची आवड मनात धरून मी म्हणालों, - "हा सोम आमच्याच यज्ञांतील उपासकांनी तुला अर्पण केला पाहिजे" - त्या अर्थीं त्या माझ्या खर्या भक्तीकडे पाहून तुम्ही या व ह्या आम्हीं सिद्ध केलेल्या सोमरसाचें प्राशन करा. ॥ ६ ॥
यदिं॑द्राग्नी॒ मद॑थः॒ स्वे दु॑रो॒णे यद्ब्र॒ह्मणि॒ राज॑नि वा यजत्रा ॥
यत् इंद्राग्नी इति मदथः स्वे दुरोणे यत् ब्रह्मणि राजनि वा यजत्रा ॥
हे यज्ञार्ह इंद्र आणि अग्निदेवहो, जरी तुम्ही आपल्या मंदिरात, एखाद्या विद्वान भक्ताच्या घरी, अथवा एखाद्या राजाच्या यज्ञांत आनंद करीत बसलां असाल तरी तेथूनही, हे सामर्थ्यवान देवांनो, इकडे या व आम्ही तयार केलेल्या सोमरसाचें प्राशन करा. ॥ ७ ॥
यदिं॑द्राग्नी॒ यदु॑षु तु॒र्वशे॑षु॒ यद्द्रु॒ह्युष्वनु॑षु पू॒रुषु॒ स्थः ॥
यत् इंद्राग्नी इति यदुषु तुर्वशेषु यत् द्रुह्युषु अनुषु पूरुषु स्थः ॥
हे इंद्र आणि अग्निदेवहो, जरी तुम्ही यदु, तुर्वश, दह्यु, अनु अथवा पूरू ह्यांचे सदनांत असलां तरी तेथूनही, हे सामर्थ्यवान देवांनो, इकडे या व आम्ही तयार केलेल्या सोमरसाचें प्राशन करा. ॥ ८ ॥
यदिं॑द्राग्नी अव॒मस्यां॑ पृथि॒व्यां म॑ध्य॒मस्यां॑ पर॒मस्या॑मु॒त स्थः ॥
यत् इंद्राग्नी इति अवमस्यां पृथिव्यां मध्यमस्यां परमस्यां उत स्थः ॥
हे इंद्र व अग्निदेवहो, जरी तुम्ही पृथिवीच्या अगदी खालच्या प्रदेशांत असलां अथवा मधल्या किंवा वरच्या प्रदेशांत असलां तरी तेथूनही, हे सामर्थ्यवान देवांनो, इकडे या व आम्ही तयार केलेल्या सोमरसाचें प्राशन करा. ॥ ९ ॥
यदिं॑द्राग्नी पर॒मस्यां॑ पृथि॒व्यां म॑ध्य॒मस्या॑मव॒मस्या॑मु॒त स्थः ॥
यत् इंद्राग्नी इति परमस्यां पृथिव्यां मध्यमस्यां अवमस्यां उत स्थः ॥
हे इंद्र आणि अग्निदेवहो, जरी तुम्ही पृथिवीच्या अगदीं वरच्या प्रदेशात असलां अथवा मधल्या किंवा खालच्या प्रदेशांत असलां तरी तेथूनही, हे सामर्थ्यवान देवांनो, इकडे या व आम्ही तयार केलेल्या सोमरसाचें प्राशन करा. ॥ १० ॥
यदिं॑द्राग्नी दि॒वि ष्ठो यत्पृ॑थि॒व्यां यत्पर्व॑ते॒ष्वोष॑धीष्व॒प्सु ॥
यत् इंद्राग्नी इति दिवि श्थः यत् पृथिव्यां यत् पर्वतेषु ओषधीषु अप्ऽसुः ॥
हे इंद्र आणि अग्निदेवहो, जरी तुम्ही स्वर्गांत, पृथिवीवर, वनस्पतींमध्यें अथवा उदकात असलां तरी तेथूनही, हे सामर्थ्यवान देवांनो, इकडे या व आम्ही तयार केलेल्या सोमरसाचें प्राशन करा. ॥ ११ ॥
यदिं॑द्राग्नी॒ उदि॑ता॒ सूर्य॑स्य॒ मध्ये॑ दि॒वः स्व॒धया॑ मा॒दये॑थे ॥
यत् इंद्राग्नी इति उत्ऽइता सूर्यस्य मध्ये दिवः स्वधया मादयेथे इति ॥
हे इंद्र व अग्निदेवहो, तुम्ही सूर्योदयाचे वेळीं जरी स्वर्गलोकाच्या मध्यभागीं बसून आनंदानें हवीचें सेवन करीत असला तरी तेथूनही, हे सामर्थ्यवान देवांनो, इकडे या व आम्ही तयार केलेल्या सोमरसाचें प्राशन करा. ॥ १२ ॥
ए॒वेन्द्रा॑ग्नी पपि॒वांसा॑ सु॒तस्य॒ विश्वा॒स्मभ्यं॒ सं ज॑यतं॒ धना॑नि ॥
एव इन्द्राग्नी इति पपिऽवांसा सुतस्य विश्वा अस्मभ्यं सं जयतं धनानि ॥
हे इंद्र व अग्निदेवहो, ह्याप्रमाणें सोमरसाचें प्राशन करून आमचेकरितां सर्व वैभवें जिंकून घेऊन या. आमच्या विनंतीस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ १३ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त १०९ ( इंद्राग्नी सूक्त ) ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : इंद्राग्नौ - छन्द : जगती त्रिष्टुभ्
वि ह्यख्यं॒ मन॑सा॒ वस्य॑ इ॒च्छन्निंद्रा॑ग्नी ज्ञा॒स उ॒त वा॑ सजा॒तान् ॥
वि हि अख्यं मनसा वस्यः इच्छन् इंद्राग्नी इति ज्ञासः उत वा सऽजातान् ॥
मनामध्यें वैभवाची इच्छा ठेवून मी मला कोणी ज्ञातिबांधव अथवा आप्त मदत करतील काय म्हणून त्यांना शोधावयास लागलो. हे इंद्र आणि अग्निदेवहो, तुमच्या मनाची प्रवृत्तिही माझेविषयीं अन्यप्रकारची नाही, व म्हणूनच हें जोरदार स्तोत्र मी तुमचे सन्मानार्थ रचलें आहे. ॥ १ ॥
अश्र॑वं॒ हि भू॑रि॒दाव॑त्तरा वां॒ विजा॑मातुरु॒त वा॑ घा स्या॒लात् ॥
अश्रवं हि भूरिदावत्ऽतरा वां विऽजामातुः उत वा घ स्यालात् ॥
खरोखर मेहुण्यापेक्षां अथवा एखाद्या गुणहीन जांवयापेक्षांही आपण जास्ती सढळपणानें द्रव्य देणारे आहांत असें मी ऐकलें आहे. ह्यासाठी हे इंद्र व अग्निदेवहो, तुम्हांस सोमरस अर्पण करून मी हे नूतन स्तोत्र रचीत आहे. ॥ २ ॥
मा छे॑द्म र॒श्मीँरिति॒ नाध॑मानाः पितॄ॒णां श॒क्तीर॑नु॒यच्छ॑मानाः ॥
मा छेद्म रश्मीन् इति नाधमानाः पितॄणां शक्तीः अनुऽयच्छमानाः ॥
आमचा वंशविच्छेद न होवो अशी प्रार्थना करणारे व आपल्या वाडवडिलांचे सामर्थ्य आपल्या संततीच्या अंगी उतरावें अशी इच्छा बाळगणारे जे सामर्थ्यवान पुरुष सौख्याचा उपभोग घेत असतात ते केवळ इंद्र आणि अग्नि ह्यांच्याच कृपेमुळेंच होय. कारण ते पहा, सोमरस काढण्यासाकरितां त्यांनी आणलेले यज्ञपाषाण जवळच ठेवलेले दिसत आहेत. ॥ ३ ॥
यु॒वाभ्यां॑ दे॒वी धि॒षणा॒ मदा॒येन्द्रा॑ग्नी॒ सोम॑म् उश॒ती सु॑नोति ॥
युवाभ्यां देवी धिषणा मदाय इन्द्राग्नी इति सोमं उशती सुनोति ॥
हे इंद्र आणि अग्निदेवांनो, हें दिव्य सोमरसपात्र तुमच्या संतोषाकरितां मोठ्या हौसेनें सोमरस काढून घेत आहे. तर हे अश्विनी देवहो, आपले मंगल हस्त सरसावून धांवत या व हा सोमरस उदकांत घालून त्यावर मधुर रसाचें सिंचन करा. ॥ ४ ॥
यु॒वामिं॑द्राग्नी॒ वसु॑नो विभा॒गे त॒वस्त॑मा शुश्रव वृत्र॒हत्ये॑ ॥
युवां इंद्राग्नी इति वसुनः विऽभागे तवःऽतमा शुश्रव वृत्रऽहत्ये ॥
हे इंद्र आणि अग्नि देवतांनो, मी असे ऐकलें आहे कीं दुष्टाचें हनन करण्याचे कामीं आणि वैभव अर्पण करण्याचे प्रसंगी आपण सर्वांहून जास्त अधिकार चालवितां. तेव्हां हे अनेक स्थलीं संचार करणार्या देवांनो, ह्या यज्ञांत कुशासनावर अधिष्ठित होऊन ह्या सोमरसानें संतुष्ट व्हा. ॥ ५ ॥
प्र च॑र्ष॒णिभ्यः॑ पृतना॒हवे॑षु॒ प्र पृ॑थि॒व्या रि॑रिचाथे दि॒वश्च॑ ॥
प्र चर्षणिऽभ्यः पृतनाऽहवेषु प्र पृथिव्याः रिरिचाथे इति दिवः च ॥
हे इंद्र आणि अग्नि देवहो, एकमेकांत युद्धार्थ आव्हान करणार्या पुरुषापेक्षां, पृथिवीपेक्षां, द्युलोकापेक्षां, महानद्यांपेक्षां, पर्वतांपेक्षां, आणि ह्यावांचून जे कोणते दुसरे लोक उरले असतील त्यांच्यापेक्षांही तूं श्रेष्ठपणांत अधिक आहेस. ॥ ६ ॥
आ भ॑रतं॒ शिक्ष॑तं वज्रबाहू अ॒स्माँ इं॑द्राग्नी अवतं॒ शची॑भिः ॥
आ भरतं शिक्षतं वज्रबाहू इति वज्रऽबाहू अस्मान् इंद्राग्नी इति अवतं शचीभिः ॥
ज्याचे बाहु वज्राप्रमाणें बळकट आहेत अशा हे इंद्र आणि अग्नि देवांनो, आमची भरभराट करा, आम्हांस शिकवा व आपल्या सामर्थ्याचे योगानें आमचे संरक्षण करा. हेच खरोखर ते सूर्याचे रश्मि कीं ज्यांच्या स्वरूपांत आमचे वाडवडील जाऊन मिळाले. ॥ ७ ॥
पुरं॑दरा॒ शिक्ष॑तं वज्रहस्ता॒स्माँ इं॑द्राग्नी अवतं॒ भरे॑षु ॥
पुरंऽदरा शिक्षतं वज्रऽहस्ता अस्मान् इंद्राग्नी इति अवतं भरेषु ॥
शत्रूंची नगरें उध्वंस करणार्या हे वज्रधारी इंद्र आणि अग्निदेवांनो, आम्हांस सन्मार्गास लावा व अमचे हवि स्वीकारून आमचें संरक्षण करा. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ११० ( इंद्राग्नी सूक्त ) ऋषि : अंगिरसः कुत्स - देवता : ऋभवः - छन्द : जगती त्रिष्टुभ्
त॒तं मे॒ अप॒स्तदु॑ तायते॒ पुनः॒ स्वादि॑ष्ठा धी॒तिरु॒चथा॑य शस्यते ॥
ततं मे अपः तत् ऊं इति तायते पुनरिति स्वादिष्ठा धीतिः उचथाय शस्यते ॥
माझे योजलेले कृत्य समाप्त झाले आणि तथापि तें मी पुन्हां करीत आहें, करण ही पहा एक अत्यंत मधुर स्तुति ऋभूंच्या गौरवार्थ मी गात आहे. हा येथें सर्व देवांस उद्देशून सोमरसाचा समुद्र भरून ठेवलेला आहे. हे ऋभूंनो, तो सोम ’स्वाहा’ असा उच्चार करून तुम्हांस अर्पण केल्याबरोबर तुम्ही त्याचा स्वीकार करा व तृप्त व्हा. ॥ १ ॥
आ॒भो॒गयं॒ प्र यदि॒च्छन्त॒ ऐत॒नापा॑काः॒ प्राञ्चो॒ मम॒ के चि॑दा॒पयः॑ ॥
आऽभोगयं प्र यत् इच्छंतः ऐतन अपाकाः प्राञ्चः मम के चित् आपयः ॥
ज्यावेळीं अज्ञानापासून सर्वथैव निर्मुक्त व माझे जणूं कोणी आप्तच असे तुम्ही पुराण पुरुष हवींच्या उपभोगाची आवड धरून त्यांच्या प्राप्तीच्या उद्योगास लागलां त्या वेळीं, हे सुधव्याच्या पुत्रांनो, आपल्या पराक्रमाच्या कृत्यांच्या श्रेष्ठपणामुळेंच तुम्हांस त्या उदार सविता देवाच्या सदनांत जातां आलें. ॥ २ ॥
तत्स॑वि॒ता वो॑ऽमृत॒त्वमासु॑व॒दगो॑ह्यं॒ यच्छ्र॒वय॑न्त॒ ऐत॑न ॥
तत् सविता वः अमृतऽत्वं आ असुवत् अगोह्यं यत् श्रवयंत ऐतन ॥
ज्यास कधींही गुप्त ठेवणे शक्य नाहीं अशा त्या सवित्याचें यश वर्णन करण्याचें ज्या वेळीं तुम्ही श्रम घेतले त्या वेळी मात्र सवित्यानें तुम्हांस अमरत्व अर्पण केलें. त्या उदार त्वष्टा देवाचा जो पिण्याचा एकच रस होता त्याचे तुम्ही चार चमस केले. ॥ ३ ॥
वि॒ष्ट्वी शमी॑ तरणि॒त्वेन॑ वा॒घतो॒ मर्ता॑सः॒ सन्तो॑ अमृत॒त्वमा॑नशुः ॥
विष्ट्वी शमी तरणिऽत्वेन वाघतः मर्तासः संतः अमृतऽत्वं आनशुः ॥
सत्कर्माचें मोठ्या उत्साहानें आचरण करीत देवांची उपासना करणारे ऋभु मानव असून सुद्धां अमरत्वास जाऊन पोंचले. हे सुधव्याचे पुत्र ऋभु सूर्याचेंही दर्शन प्राप्त होण्याच्या योग्यतेस चढून, एका वर्षाच्या आंत, दुसर्यांनी त्यांची स्तोत्रें गावी अशा पदवीस चढले. ॥ ४ ॥
क्षेत्र॑मिव॒ वि म॑मु॒स्तेज॑नेनँ॒ एकं॒ पात्र॑मृ॒भवो॒ जेह॑मानम् ॥
क्षेत्रंऽइव वि ममुः तेजनेन एकं पात्रं ऋभवः जेहमानम् ॥
अमर अशा देवांच्या समुदायामधें सुद्धां आपली कीर्ति वाढावी व अशा रीतीनें अत्यंत उत्कृष्ट यश आपणांस प्राप्त व्हावें अशी इच्छा धारण करणार्या ऋभूंना अखेर मानवांकडून स्तुति प्राप्त होऊन त्यांनी, ज्याप्रमाणें शेताची मोजणी करावी त्याप्रमाणें, आपल्या तेजस्वी हत्यारानें उघड्या तोंडाच्या त्या एकाच यज्ञपात्राची मोजणी केली. ॥ ५ ॥
आ म॑नी॒षाम॒न्तरि॑क्षस्य॒ नृभ्यः॑ स्रु॒चेव॑ घृ॒तं जु॑हवाम वि॒द्मना॑ ॥
आ मनीषां अंतरिक्षस्य नृऽभ्यः स्रुचाऽइव घृतं जुहवाम विद्मना ॥
ह्या ऋभूंची श्रेष्ठ पदवी लक्ष्यांत घेऊन अंतरिक्षांत वास करणार्या ह्या वीरांना आपण, पळीनें घृत अर्पण केल्याप्रमाणे, एक स्तोत्र अर्पण करूं या. ह्याच परम पित्याशीं ते आपल्या उत्साहपूर्वक कृतींनी ऐक्य पावले व सामर्थ्याचा लाभ करून घेऊन दिव्य रजोलोकांवर आरूढ झाले. ॥ ६ ॥
ऋ॒भुर्न॒ इंद्रः॒ शव॑सा॒ नवी॑यानृ॒भुर्वाजे॑भि॒र्वसु॑भि॒र्वसु॑र्द॒दिः ॥
ऋभुः नः इंद्रः शवसा नवीयान् ऋभुः वाजेभिः वसुऽभिः वसुः ददिः ॥
ऋभु हाच आमचा आपल्या सामर्थ्यामुळें नवीन आवेश चढलेला इंद्र होय. ऋभु हाच आपल्या शक्तीमुळें व संपत्तीमुळें आमचें निधान व आमचा उदार दाता होय. हे देवहो, आपल्या कृपेनें आम्ही, ज्या दिवसावर आमचें निरंतर प्रेम राहील अशा एखाद्या दिवशीं, भक्तिहीन लोकांच्या सैन्यांवर विजय मिळवूं. ॥ ७ ॥
निश्चर्म॑ण ऋभवो॒ गाम॑पिंशत॒ सं व॒त्सेना॑सृजता मा॒तरं॒ पुनः॑ ॥
निः चर्मण ऋभवः गां अपिंशत सं वत्सेन असृजत मातरं पुनरिति ॥
हे ऋभूहो, तुम्हींच नुसत्या चर्मापासून एक खरोखरी जिवंत गाय बनविली व मातेची व तिच्या वत्साची गांठ घालून दिली. हे सुधन्व्याच्या पुत्रांनो, तुम्ही अद्भुत कृति करून आपल्या वयस्क मातापितरांस पुन्हां तरुण केलें. ॥ ८ ॥
वाजे॑भिर्नो॒ वाज॑सातावविड्ढ्यृभु॒माँ इं॑द्र चि॒त्रमा द॑र्षि॒ राधः॑ ॥
वाजेभिः नः वाजऽसातौ अविड्ढि ऋभुऽमान् इंद्र चित्रं आ दर्षि राधः ॥
हे इंद्रा, पराक्रमामुळें जेथें लाभ होण्याचा संभव असेल अशा युद्धांत आपल्या सामर्थ्यानें आमचें रक्षण कर आणी ऋभूंसहवर्तमान येऊन आम्हांस आश्चर्यकारक असें सौख्य अर्पण कर. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र, वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ९ ॥
ॐ तत् सत् |