|
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ११ ते २०
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ११ ( इंद्र सूक्त )
ऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - इंद्र : छंद - अनुष्टुप् इन्द्रं॒ विश्वा॑ अवीवृधन्त्समु॒द्रव्य॑चसं॒ गिरः॑ । र॒थीत॑मं र॒थीनां॒ वाजा॑नां॒ सत्प॑तिं॒ पति॑म् ॥ १ ॥
इंद्रं विश्वाः अवीवृधन् समुद्रऽव्यचसं गिरः । रथीऽतमं रथीनां वाजानां सत्ऽपतिं पतिम् ॥ १ ॥
समुद्रासही व्याप्त करून टाकणार्या इंद्राचे यश विश्वांतील अखिल स्तुतिवचनांनी वृद्धिंगत केले आहे. इंद्र हा सर्वांचा राजा आहे; सर्व सामर्थ्यांचा हा अधिपति आहे; सर्व महारथी वीरांतही हा अत्यंत श्रेष्ठ आहे. ॥ १ ॥ स॒ख्ये त॑ इन्द्र वा॒जिनो॒ मा भे॑म शवसस्पते । त्वाम॒भि प्र णो॑नुमो॒ जेता॑र॒मप॑राजितम् ॥ २ ॥
सख्ये ते इंद्र वाजिनः मा भेम शवसः पते । त्वां अभि प्र नोनुमः जेतारं अपराजितम् ॥ २ ॥
हे सामर्थ्याधिपति इंद्रा, तूं आमचा रक्षणकर्ता असतांना आम्हांस आपल्या सामर्थ्याबद्दल भरंवसा वाटून भितीचे नांवही उरणार नाही. तूंच शत्रूंचा जेता. तुझा पराजय करण्यास कोण समर्थ आहे ? तुला आमचे पुनः पुनः नमस्कार असोत. ॥ २ ॥ पू॒र्वीरिन्द्र॑स्य रा॒तयो॒ न वि द॑स्यन्त्यू॒तयः॑ । यदी॒ वाज॑स्य॒ गोम॑तः स्तो॒तृभ्यो॒ मंह॑ते म॒घम् ॥ ३ ॥
पूर्वीः इंद्रस्य रातयः न वि दस्यंति ऊतयः । यदी वाजस्य गोऽमत स्तोतृऽभ्यः मंहते मघम् ॥ ३ ॥
इंद्राजवळ गोधनादि संपत्ति अपार असल्यामुळे, आपल्या भक्तांना, पराक्रमी इंद्राचे औदार्य जरी एकसारखे वैभव अर्पण करीत असतें, तथापि त्याच्या भरपूर दातृत्वाला अथव संरक्षणशक्तीला कधीही खंड पडत नाही. ॥ ३ ॥ पु॒रां भि॒न्दुर्युवा॑ क॒विरमि॑तौजा अजायत । इन्द्रो॒ विश्व॑स्य॒ कर्म॑णो ध॒र्ता व॒ज्री पु॑रुष्टु॒तः ॥ ४॥
पुरां भिंदुः युवा कविः अमितऽओजाः अजायत । इंद्रः विश्वस्य कर्मणः धर्ता वज्री पुरुऽस्तुतः ॥ ४ ॥
शत्रूंच्या पुरांचा उच्छेदक इंद्र हाच होय. त्याचे तारुण्य सदोदित टिकणारे अहे. हा बुद्धिवंतांमध्यें श्रेष्ठ आहे. हा एकदम पराक्रमी असाच अवतीर्ण झाला. सर्व कर्मांस याचा आधार अहे. वज्र हे याचे आयुध आहे. इंद्राची स्तुति अनेकांनी केली आहे. ॥ ४ ॥ त्वं व॒लस्य॒ गोम॒तोऽ॑पावरद्रिवो॒ बिल॑म् । त्वां दे॒वा अबि॑भ्युषस्तु॒ज्यमा॑नास आविषुः ॥ ५
त्वं वलस्य गोऽमतः अप अवः अद्रिवः बिलं । त्वां देवा अबिभ्युषः तुज्यमानासः आविषुः ॥ ५ ॥
हे वज्रधर इंद्रा, गाईंचा समुदाय बलाने हस्तगत केला होता, म्हणून तूं त्याचा कोट फोडून टाकलास. ज्यावेळी देवांना अतिशय पीडा झाली त्यावेळी ते न डगमगतां तुझ्या आश्रयास आले. ॥ ५ ॥ तवा॒हं शू॑र रा॒तिभिः॒ प्रत्या॑यं॒ सिन्धु॑मा॒वद॑न् । उपा॑तिष्ठन्त गिर्वणो वि॒दुष्टे॒ तस्य॑ का॒रवः॑ ॥ ६
तव अहं शूर रातिऽभिः प्रति आयं सिंधुं आऽवदन् । उप अतिष्ठंत गिर्वणः विदुः ते तस्य कारवः ॥ ६ ॥
हे शूर इंद्रा, ह्या तुझ्या उदारपणाच्या कृत्यांस भुलून तुझी स्तुती गात गात मी तुझ्याकडे आलो. कारण तूं कृपेचा सिंधु आहेस. स्तोत्रकर्तेही जवळच उभे होते. त्यांनीही तो तुझा पराक्रम अवलोकन केला. ॥ ६ ॥ मा॒याभि॑रिन्द्र मा॒यिनं॒ त्वं शुष्ण॒मवा॑तिरः । वि॒दुष्टे॒ तस्य॒ मेधि॑रा॒स्तेषां॒ श्रवां॒स्युत्ति॑र ॥ ७ ॥
मायाभिः इंद्र मायिनं त्वं शुष्णं अव अतिरः । विदुः ते तस्य मेधिराः तेषां श्रवांसि उत् तिर ॥ ७ ॥
शुष्ण इतका हिकमती, परंतु आपल्या युद्धचमत्करानें तूं त्याचा पराभव केलास. बुद्धिमान् पुरुषांनी तेंही अवलोकन केले, म्हणून त्यांच्याही श्रवणार्ह स्तुतींचा तूं आदर कर. ॥ ७ ॥ इन्द्र॒मीशा॑न॒मोज॑सा॒भि स्तोमा॑ अनूषत । स॒हस्रं॒ यस्य॑ रा॒तय॑ उ॒त वा॒ सन्ति॒ भूय॑सीः ॥ ८ ॥
इंद्रं ईशानं ओजसा अभि स्तोमाः अनूषत । सहस्रं यस्य रातयः उत वा संति भूयसीः ॥ ८ ॥
आपल्या समर्थ्यानें जगतावर सत्ता चालविणार्या ह्या इंद्राची अनेक स्तुतींच्या योगाने आराधना झाली. इंद्राची उपकारकृत्यें हजारों आहेत, किंबहुना त्यांपेक्षांही त्यांची संख्या अधिक आहे. ॥ ८ ॥ ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १२ ( अग्नि सूक्त )
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - अग्नि : छंद - गायत्री अ॒ग्निं दू॒तं वृ॑णीमहे॒ होता॑रं वि॒श्ववे॑दसम् । अ॒स्य य॒ज्ञस्य॑ सु॒क्रतु॑म् ॥ १ ॥
अग्निं दूतं वृणीमहे होतारं विश्वऽवेदसं । अस्य यज्ञस्य सुक्रतुम् ॥ १ ॥
अग्नि हा देवांचा दूत आहे. अग्नीच्या हातून सर्व देवतांस त्यांचे हवि पोहोंचतात. अग्नि सर्वज्ञ आहे. अग्नि हेंच आमच्या ह्या यज्ञांतील खरे ज्ञानसामर्थ्य आहे. यास्तव आम्ही त्याच्या आगमनाची इच्छा करतो. ॥ १ ॥ अ॒ग्निम॑ग्निं॒ हवी॑मभिः॒ सदा॑ हवन्त वि॒श्पति॑म् । ह॒व्य॒वाहं॑ पुरुप्रि॒यम् ॥ २ ॥
अग्निंऽअग्निं हवीमऽभिः सदा हवंत विश्पतिं । हव्यऽवाहं पुरुऽप्रियम् ॥ २ ॥
सर्व लोकांत जर कोणा देवतेस पुनः पुनः बोलवणे जरूर वाटत असेल तर तें अग्नीसच होय. करण हा अखिल मानवांचा राजा आहे. हा सर्व देवतांस हवि पोहोंचवितो. हा सर्वांना प्रिय आहे. ॥ २ ॥ अग्ने॑ दे॒वाँ इ॒हा व॑ह जज्ञा॒नो वृ॒क्तब॑र्हिषे । असि॒ होता॑ न॒ ईड्यः॑ ॥ ३ ॥
अग्ने देवान् इह आ वह जज्ञानः वृक्तऽबर्हिषे । असि होता नः ईड्यः ॥ ३ ॥
हे अग्निदेवा, सोमरसांतील दर्भाची अग्रे वगैरे काढून सर्व सिद्धता करून ठेविली आहे हें तुला विदितच आहे. ह्यासाठी सर्व देवांस इकडे घेऊन ये. त्यांस हवि पोहोंचविणारा तूं आम्हांस अत्यंत पूज्य वाटतोस. ॥ ३ ॥ ताँ उ॑श॒तो वि बो॑धय॒ यद॑ग्ने॒ यासि॑ दू॒त्यम् । दे॒वैरा स॑त्सि ब॒र्हिषि॑ ॥ ४ ॥
तान् उशतः वि बोधय यत् अग्ने यासि दूत्यं । देवैः आ सत्सि बर्हिषि ॥ ४ ॥
हे अग्निदेवा, ज्यावेळीं दूत होऊन तूं देवांकडे जाशील त्यावेळी आमच्या हविंविषयी त्यांचे मनांत इच्छा उत्पन्न करून त्यांस जागृत कर. ह्या दर्भासनावर देवांसहवर्तमान तूं विराजमान हो. ॥ ४ ॥ घृता॑हवन दीदिवः॒ प्रति॑ ष्म॒ रिष॑तो दह । अग्ने॒ त्वं र॑क्ष॒स्विनः॑ ॥ ५ ॥
घृतऽआहवन दीदिऽवः प्रति स्म रिषतः दह । अग्ने त्वं रक्षस्विनः ॥ ५ ॥
घृतांच्या हवींनी उज्ज्वलता धारण करणार्या हे अग्निदेवा, आमच्या शत्रूंचा नाश कर. त्यांनीं राक्षसांशी सख्य जोडलें आहे. ॥ ५ ॥ अ॒ग्निना॒ग्निः समि॑ध्यते क॒विर्गृ॒हप॑ति॒र्युवा॑ । ह॒व्य॒वाड् जु॒ह्वास्यः ॥ ६ ॥
अग्निना अग्निः सं इध्यते कविः गृहऽपतिः युवा । हव्यवाट् जुहुऽआस्यः ॥ ६ ॥
अग्नि एकदा प्रदीप्त झाला कीं तो स्वसामर्थ्यानेंच वृद्धिंगत होत जातो. अग्निदेवाची बुद्धिमत्ता अपूर्व आहे. गृहांचा खरा अधिपति हाच आहे. ह्याचे तारुण्य अबाधित आहे. ह्याच्याच द्वारें सर्व देवतांस हवि पोहोंचतो. याचें मुख ज्वालामय आहे. ॥ ६ ॥ क॒विम॒ग्निमुप॑ स्तुहि स॒त्यध॑र्माणमध्व॒रे । दे॑वम॑मीव॒चात॑नम् ॥ ७ ॥
कविं अग्निं उप स्तुहि सत्यऽधर्माणं अध्वरे । देवं अमीवऽचातनं ॥ ७ ॥
यज्ञामध्यें अग्नीची स्तुति करीत जा. अग्नि हा फार ज्ञाता आहे. सत्य हें त्याचें ब्रीद आहे. सर्व रोगांचे उच्चाटन ह्या अग्निदेवाकडून होते. ॥ ७ ॥ यस्त्वाम॑ग्ने ह॒विष्प॑तिर्दू॒तं दे॑व सप॒र्यति॑ । तस्य॑ स्म प्रावि॒ता भ॑व ॥ ८ ॥
यः त्वां अग्ने हविःऽपतिः दूतं देव सपर्यति । तस्य स्म प्रऽअविता भव ॥ ८ ॥
हे अग्निदेवा, जो यागकर्ता, तूं देवतांचा दूत म्हणून तुझे पूजन करतो, त्याच्या रक्षणाची चिंता वहा. ॥ ८ ॥ यो अ॒ग्निं दे॒ववी॑तये ह॒विष्माँ॑ आ॒विवा॑सति । तस्मै॑ पावक मृळय ॥ ९ ॥
यः अग्निं देवऽवीतये हविष्मान् आऽविवासति । तस्मै पावक मृळय ॥ ९ ॥
हे सर्वांस पावन करणार्या अग्निदेवा, जो यागकर्ता देवांचा संतोष होण्याकरितां म्हणून तुझी सेवा करतो त्यास तूं सुखांत ठेव. ॥ ९ ॥ स नः॑ पावक दीदि॒वोऽ॑ग्ने दे॒वाँ इ॒हा व॑ह । उप॑ य॒ज्ञं ह॒विश्च॑ नः ॥ १० ॥
सः नः पावक दीदिऽवः अग्ने देवान् इह आ वह । उप यज्ञं हविः च नः ॥ १० ॥
हे सर्वांस पावन करणार्या दीप्तिमान अग्निदेवा, आमचा यज्ञ व हवि ह्यांच्या सन्निध देवांस घेऊन ये. ॥१० ॥ स नः॒ स्तवा॑न॒ आ भ॑र गाय॒त्रेण॒ नवी॑यसा । र॑यिं वी॒रव॑ती॒मिष॑म् ॥ ११ ॥
सः न स्तवानः आ भर गायत्रेण नवीयसा । रयिं वीरऽवतीं इषम् ॥ ११ ॥
अग्निदेवा, तूं असा सर्वविख्यात असल्याकारणानें आम्ही नवीन स्तोत्र गाऊन तुझी स्तुति केली आहे. ह्यास्तव आम्हांस संपत्ति दे. तुझ्या प्रसादाने आम्हांस वीर्यशाली संततिही प्राप्त होऊं दे. ॥ ११ ॥ अग्ने॑ शु॒क्रेण॑ शो॒चिषा॒ विश्वा॑भिर्दे॒वहू॑तिभिः । इ॒मं स्तोमं॑ जुषस्व नः ॥ १२ ॥
अग्ने शुक्रेण शोचिषा विश्वाभिः देवहूतिऽभिः । इमं स्तोमं जुषस्व नः ॥ १२ ॥
हे अग्निदेवा, तुझें तेज अत्यंत उज्ज्वल आहे. तूं आमच्या स्तोत्रांचा व जे हवि आम्ही सर्व देवतांस अर्पण करीत आहों त्या हवींचा स्वीकार कर. ॥ १२ ॥ ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १३ ( आप्री सूक्त )
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - आप्री देवतासमूह : छंद - गायत्री सुस॑मिद्धो न॒ आ व॑ह दे॒वाँ अ॑ग्ने ह॒विष्म॑ते । होतः॑ पावक॒ यक्षि॑ च ॥ १ ॥
सुऽसमिद्धः नः आ वह देवा अग्ने हविष्मते । होतरिति पावक यक्षि च ॥ १ ॥
हे अग्निदेवा, आमच्या यज्ञांत मी हवि सिद्ध करून ठेविला आहे. त्याचा स्वीकार करण्याकरितां तूं प्रदीप्त होऊन सर्व देवांस घेऊन ये. हे पुण्यप्रद देवा, हे हविर्दात्या, आमचा यज्ञ पूर्णतेस ने. ॥ १ ॥ मधु॑मन्तं तनूनपाद्य॒ज्ञं दे॒वेषु॑ नः कवे । अ॒द्या कृ॑णुहि वी॒तये॑ ॥ २ ॥
मधुऽमंतं तनूनपात् यज्ञं देवेषु नः कवे । अद्य कृणुहि वीतये ॥ २ ॥
हे प्रज्ञानशील अग्निदेवा, तूं स्वयंजात आहेस. आमचे हवि देवांस प्राप्त व्हावे म्हणून हा यज्ञ आज देवतासमुदायामध्यें नेऊन त्यांस तो अर्पण कर. ह्यांत मधुर सोमरस सिद्ध करून ठेविला आहे. ॥ २ ॥ नरा॒शंस॑मि॒ह प्रि॒यम॒स्मिन्य॒ज्ञ उप॑ ह्वये । मधु॑जिह्वं हवि॒ष्कृत॑म् ॥ ३ ॥
नराशंसं इह प्रियं अस्मिन् यज्ञे उप ह्वये । मधुऽजिह्वं हविःऽकृतम् ॥ ३ ॥
ह्या यज्ञांत आम्ही अग्नीस पाचारण करतो. तो आम्हांस प्रिय आहे. मनुष्यांनी स्तुति करण्यास तो योग्य आहे. त्याच्या जिव्हेंत माधुर्य आहे, व हवींची पूर्णता त्याच्यामुळें होते. ॥ ३ ॥ अग्ने॑ सु॒खत॑मे॒ रथे॑ दे॒वाँ ई॑ळि॒त आ व॑ह । असि॒ होता॒ मनु॑र्हितः ॥ ४ ॥
अग्ने सुखऽतमे रथे देवान् ईळितः आ वह । असि होता मनुःऽहितः ॥ ४ ॥
हे अग्निदेवा, तुझें स्तवन सर्वांनी केलें आहे. तूं हवि पोहोंचविणारा आहेस. तूं सर्व मनुष्य जातींचा हितकर्ता आहेस. अत्यंत सुखदायक अशा रथांत बसवून सर्व देवतांस तूं घेऊन ये. ॥ ४ ॥ स्तृ॒णी॒त ब॒र्हिरा॑नु॒षग्घृ॒तपृ॑ष्ठं मनीषिणः । यत्रा॒मृत॑स्य॒ चक्ष॑णम् ॥ ५ ॥
स्तृणीत बर्हिः आनुषक् घृतऽपृष्ठं मनीषिणः । यत्र अमृतस्य चक्षणम् ॥ ५ ॥
हे सुज्ञ ऋत्विज हो, ज्यांच्या पृष्ठभागांवर चकाकी मारीत आहे, अशी दर्भासनें जवळ जवळ मांडा. त्यांवरच आपणांस अविनाशी रूपाचें दर्शन होणार आहे. ॥ ५ ॥ वि श्र॑यन्तामृता॒वृधो॒ द्वारो॑ दे॒वीर॑स॒श्चतः॑ । अ॒द्या नू॒नं च॒ यष्ट॑वे ॥ ६ ॥
वि श्रयंतां ऋताऽवृधः द्वारः देवीः असश्चतः । अद्य नूनं च यष्टवे ॥ ६ ॥
यज्ञसिद्ध्यर्थ आज यज्ञमंडपाची पवित्र द्वारें लवकर खुली करा. येथें यागविधींचे उत्तम परिपालन होते, व हीं इतकी विशाल आहेत कीं, आंत प्रवेश करणार्या पुरुषांना यांची मुळीच अडचण होत नाहीं. ॥ ६ ॥ नक्तो॒षासा॑ सु॒पेश॑सा॒स्मिन्य॒ज्ञ उप॑ ह्वये । इ॒दं नो॑ ब॒र्हिरा॒सदे॑ ॥ ७ ॥
नक्तोषासा सुऽपेशसा अस्मिन् यज्ञे उप ह्वये । इदं नः बर्हिः आऽसदे ॥ ७ ॥
नक्त आणि उषस् या दोन सुस्वरूप देवतांस ह्या यज्ञांत मी निमंत्रण करतो. त्यांना बसण्याकरितां हे दर्भ येथे पसरले आहेत. ॥ ७ ॥ ता सु॑जि॒ह्वा उप॑ ह्वये॒ होता॑रा॒ दैव्या॑ क॒वी । य॒ज्ञं नो॑ यक्षतामि॒मम् ॥ ८ ॥
ता सुऽजिह्वौ उप ह्वये होतारा दैव्या कवी इति । यज्ञं नः यक्षतां इमम् ॥ ८ ॥
त्या दोघां दिव्य, प्रज्ञायुक्त, व मधुरभाषी होत्यांनाही मी बोलावतो. ते आमचा यज्ञ सिद्धीप्रत नेवोत. ॥ ८ ॥ इळा॒ सर॑स्वती म॒ही ति॒स्रो दे॒वीर्म॑यो॒भुवः॑ । ब॒र्हिः सी॑दन्त्व॒स्रिधः॑ ॥ ९ ॥
इळा सरस्वती मही तिस्रः देवीः मयःऽभुवः । बर्हिः सीदंतु अस्रिधः ॥ ९ ॥
इळा, सरस्वती आणि मही अशा तीन सौख्यदायिनी अमर देवता या दर्भावर विराजमान होवोत. ॥ ९ ॥ इ॒ह त्वष्टा॑रमग्रि॒यं वि॒श्वरू॑प॒मुप॑ ह्वये । अ॒स्माक॑मस्तु॒ केव॑लः ॥ १० ॥
इह त्वष्टारं अग्रियं विश्वऽरूपं उप ह्वये । अस्माकं अस्तु केवलः ॥ १० ॥
सर्वदर्शी व सर्वश्रेष्ठ अशा त्वष्ट्रदेवाला आम्हा यज्ञार्थ आमंत्रण करतो. त्याचे केवळ आमच्यावरच प्रेम असो. ॥ १० ॥ अव॑ सृजा वनस्पते॒ देव॑ दे॒वेभ्यो॑ ह॒विः । प्र दा॒तुर॑स्तु॒ चेत॑नम् ॥ ११ ॥
अव सृज वनस्पते देव देवेभ्यः हविः । प्र दातुः अस्तु चेतनम् ॥ ११ ॥
हे वनस्पतिदेवा, देवांस हवींचे दान कर व यज्ञकर्त्यास ज्ञानप्राप्ति होवो. ॥ ११ ॥ स्वाहा॑ य॒ज्ञं कृ॑णोत॒नेन्द्रा॑य॒ यज्व॑नो गृ॒हे । तत्र॑ दे॒वाँ उप॑ ह्वये ॥ १२ ॥
स्वाहा यज्ञं कृणोतन इन्द्राय यज्वनः गृहे । तत्र देवान् उप ह्वये ॥ १२ ॥
यागकर्त्याच्या गृहांत इंद्राला यज्ञ अर्पण करा. सर्व देवांना मी त्या यज्ञांत आमंत्रण करतो. ॥ १२ ॥ ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १४ ( विश्वेदेव सूक्त )
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - विश्वेदेव : छंद - गायत्री ऐभि॑रग्ने॒ दुवो॒ गिरो॒ विश्वे॑भिः॒ सोम॑पीतये । दे॒वेभि॑र्याहि॒ यक्षि॑ च ॥ १ ॥
आ एभिः अग्ने दुवः गिरः विश्वेभिः सोमऽपीतये । देवेभिः याहि यक्षि च ॥ १ ॥
हे अग्निदेवा, ह्या सर्व देवांसहवर्तमान सोमपानाची इच्छा धरून आमची स्तवनें व आमची उपासना यांचा स्वीकार करण्याकरितां इकडे ये, आणि आमचा याग सफल कर. ॥ १ ॥ आ त्वा॒ कण्वा॑ अहूषत गृ॒णन्ति॑ विप्र ते॒ धियः॑ । दे॒वेभि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ २ ॥
आ त्वा कण्वाः अहूषत गृणन्ति विप्र ते धियः । देवेभिः अग्ने आ गहि ॥ २ ॥
कण्वांनी तुला आमंत्रण केलें आहे. हे प्रज्ञाशाली अग्ने, ही स्तोत्रेंही तुझी स्तुति गात आहेत. सर्व देवतांना घेऊन तूं ये. ॥ २ ॥ इ॒न्द्र॒वा॒यू बृह॒स्पति॑म् मि॒त्राग्निं पू॒षणं॒ भग॑म् । आ॒दि॒त्यान्मारु॑तं ग॒णम् ॥ ३ ॥
इन्द्रवायू इति बृहस्पतिंम् मित्रा अग्निं पूषणं भगं । आदित्यान् मारुतं गणम् ॥ ३ ॥
इंद्र, वायु, बृहस्पति, मित्र, अग्नि, पूषा, भग, आदित्य आणि मरुद्गण; ॥ ३ ॥ प्र वो॑ भ्रियन्त॒ इन्द॑वो मत्स॒रा मा॑दयि॒ष्णवः॑ । द्र॒प्सा मध्व॑श्चमू॒षदः॑ ॥ ४ ॥
प्र वः भ्रियन्ते इन्दवः मत्सराः मादयिष्णवः । द्रप्साः मध्वः चमूसदः ॥ ४ ॥
अशा तुम्हां सर्व देवतांकरितां हे सोमरस येथें भरून ठेविले आहेत. ह्यांचे प्राशन फार सुखदायक आहे. ह्यांमुळे चित्तास फार उल्हास वाटतो. हे मधुर आहेत आणि पात्रांत हे कांठोकाठ भरून ठेविल्यामुळें बाहेर सांडतील की काय असे वाटत आहे. ॥ ४ ॥ ईळ॑ते॒ त्वाम॑व॒स्यवः॒ कण्वा॑सो वृ॒क्तब॑र्हिषः । ह॒विष्म॑न्तो अर॒ंकृतः॑ ॥ ५ ॥
ईळते त्वां अवस्यवः कण्वासः वृक्तऽबर्हिषः । हविष्मन्तः अरऽंकृतः ॥ ५ ॥
सोमवल्लीचीं मुळें काढून टाकून व सुंदर हवि तयार करून तुझें पूजन करण्यास हे कण्व बसले आहेत. तूं त्यांचे रक्षण करावें अशी त्यांची इच्छा आहे. ॥ ५ ॥ घृ॒तपृ॑ष्ठा मनो॒युजो॒ ये त्वा॒ वह॑न्ति॒ वह्न॑यः । आ दे॒वान्सोम॑पीतये ॥ ६ ॥
घृतऽपृष्ठा मनःऽयुजः ये त्वा वहन्ति वह्नयः । आ देवान् सोमऽपीतये ॥ ६ ॥
जे अश्व तुला आणि सर्व देवांस सोमपानाकरितां घेऊन येतात, ज्यांच्या पाठी तकतकीत दिसत आहेत, व जे स्वप्रेरणेनेंच तुझ्या रथास नियुक्त होतात, ॥ ६ ॥ तान्यज॑त्राँ ऋता॒वृधोऽ॑ग्ने॒ पत्नी॑वतस्कृधि । मध्वः॑ सुजिह्व पायय ॥ ७ ॥
तान् यजत्राँ ऋतऽवृधः ऽग्ने पत्नीऽवतः कृधि । मध्वः सुऽजिह्व पायय ॥ ७ ॥
त्या पुण्यकारक अश्वांस त्यांच्या सहचरींची भेट करीव. ह्या अश्वांच्यामुळें सर्व विधि यथायोग्य चालतात. तर त्यांस हे मधुर भषण करणार्या देवा, मधुर सोमरसांचेंही प्राशन करीव. ॥ ७ ॥ ये यज॑त्रा॒ य ईड्या॒स्ते ते॑ पिबन्तु जि॒ह्वया॑ । मधो॑रग्ने॒ वष॑ट्कृति ॥ ८ ॥
ये यजत्राः ये ईड्याः ते ते पिबन्तु जिह्वया । मधोः अग्ने वषट्ऽकृति ॥ ८ ॥
हे अग्निदेवा, ज्या ज्या देवांस यज्ञ समर्पण करणें योग्य आहे व जे जे देव स्तवनार्ह आहेत त्या सर्वांच्या जिह्वेस या यज्ञांत मधुर सोमरसांचा आस्वाद मिळो. ॥ ८ ॥ आकीं॒ सूर्य॑स्य रोच॒नाद्विश्वा॑न्दे॒वाँ उ॑ष॒र्बुधः॑ । विप्रो॒ होते॒ह व॑क्षति ॥ ९ ॥
आकीं सूर्यस्य रोचनाद् विश्वान् देवाँ उषःऽबुधः । विप्रः होता इव वक्षति ॥ ९ ॥
हा विद्वान् यागकर्ता, उषःकालाबरोबर जागृत झालेल्या देवतांना सुप्रकाशित अशा सूर्यलोकांतून घेऊन येत आहे. ॥ ९ ॥ विश्वे॑भिः सो॒म्यं मध्वग्न॒ इन्द्रे॑ण वा॒युना॑ । पिबा॑ मि॒त्रस्य॒ धाम॑भिः ॥ १० ॥
विश्वेभिः सोम्यं मधु अग्ने इन्द्रेण वायुना । पिब मित्रस्य धामभिः ॥ १० ॥
हे अग्ने मित्राने ह्या भूतलावर आपली सर्व किरणें फेंकल्याबरोबर इंद्र आणि वायु ह्यांसहवर्तमान येऊन ह्या मधुर सोमरसाचें प्राशन कर. ॥ १० ॥ त्वं होता॒ मनु॑र्हि॒तोऽ॑ग्ने य॒ज्ञेषु॑ सीदसि । सेमं नो॑ अध्व॒रं य॑ज ॥ ११ ॥
त्वं होता मनुःऽहितः अग्ने यज्ञेषु सीदसि । सः इमं नः अध्वरं यज ॥ ११ ॥
अग्ने, तूं हव्यवाहक आहेस, तूं मनुष्यजातीचा हितकर्ता आहेस. प्रत्येक यज्ञांत तूंच विराजमान होतोस. तूं आमचा यज्ञ सांगतेस (पूर्णतेस) ने. ॥ ११ ॥ यु॒क्ष्वा ह्यरु॑षी॒ रथे॑ ह॒रितो॑ देव रो॒हितः॑ । ताभि॑र्दे॒वाँ इ॒हा व॑ह ॥ १२ ॥
युक्ष्व हि अरुषीः रथे हरितः देव रोहितः । ताभिः देवान् इह आ वह ॥ १२ ॥
हे देवा, आपल्या रक्तवर्ण व चपल अशा घोड्यांना रथास जोड, आणि त्यांचेकडून देवांस येथें घेऊन ये. ॥ १२ ॥ ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १५ ( ऋतु सूक्त )
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - १- इंद्र; २- इंद्र; ३- त्वष्ट्ट; ४- अग्नि; ५- इंद्र; ६- मित्रावरुण; ७-१० द्रविणोदस् अग्निः; ११- अश्विनीकुमार; १२- अग्नि; : छंद - गायत्र इंद्र॒ सोमं॒ पिब॑ ऋ॒तुना त्वा॑ विश॒न्त्विन्द॑वः । म॒त्स॒रास॒स्तदो॑कसः ॥ १ ॥
इंद्र सोमं पिब ऋतुना त्वा विशन्तु इंदवः । मत्सरासः तत्ऽओकसः ॥ १ ॥
हे इंद्रा ऋतूसहवर्तमान सोमपान कर. हे सोमरसाचे बिंदु तुझ्या उदरांत प्रवेश करोत. यांचे प्राशन केलें असतां तुला हर्ष वाटेल. तुझें उदर हेंच स्थान त्यांना योग्य आहे. ॥ १ ॥ मरु॑तः॒ पिब॑त ऋ॒तुना॑ पो॒त्राद्य॒ज्ञं पु॑नीतन । यू॒यं हि ष्ठा सु॑दानवः ॥ २ ॥
मरुतः पिबत ऋतुना पोत्राद् यज्ञं पुनीतन । यूयं हि स्था सुऽदानवः ॥ २ ॥
हे मरुत् हो, ऋतूसहवर्तमान पात्रांतून सोमपन करा. आमच्या यज्ञास तुमचे हातून पवित्रता येवो. दानशूरतेबद्दल तुमचीच फार प्रसिद्धी आहे. ॥ २ ॥ अ॒भि य॒ज्ञं गृ॑णीहि नो॒ ग्नावो॒ नेष्टः॒ पिब॑ ऋ॒तुना॑ । त्वं हि र॑त्न॒धा असि॑ ॥ ३ ॥
अभि यज्ञं गृणीहि नः ग्नावः नेष्टरिति पिब ऋतुना । त्वं हि रत्नऽधाः असि ॥ ३ ॥
हे सपत्नीक नेष्टृदेवा, आमच्या यज्ञाची प्रशंसा कर आणि ऋतूसहवर्तमान सोमपान कर. उत्कृष्ट रत्नांचा निधि तुझेच जवळ आहे. ॥ ३ ॥ अग्ने॑ दे॒वाँ इ॒हा व॑ह सा॒दया॒ योनि॑षु त्रि॒षु । परि॑ भूष॒ पिब॑ ऋ॒तुना॑ ॥ ४ ॥
अग्ने देवान् इह आ वह सादया योनिषु त्रिषु । परि भूष पिब ऋतुना ॥ ४ ॥
हे अग्निदेवा, देवांस इकडे घेऊन ये, आणि तिन्ही ठिकाणच्या आसनांवर ह्यास विराजित कर. ह्यांस विविध अलंकार दे, व ऋतूसहवर्तमान तूं सोमपन कर. ॥ ४ ॥ ब्राह्म॑णादिंद्र॒ राध॑सः॒ पिबा॒ सोम॑मृ॒तूँरनु॑ । तवेद्धि स॒ख्यमस्तृ॑तम् ॥ ५ ॥
ब्राह्मणात् इंद्र राधसः पिबा सोमं ऋतून् अनु । तव इत् हि सख्यं अस्तृतम् ॥ ५ ॥
हे इंद्रा, ऋतूंनी सोमपान केल्यानंतर ह्या सुंदर पात्रांतून सोमरसाचें प्राशन कर. तुझेंच सख्य चिरकाल टिकणारे आहे. ॥ ५ ॥ यु॒वं दक्षं॑ धृतव्रत॒ मित्रा॑वरुण दू॒ळभं॑ । ऋ॒तुना॑ य॒ज्ञमा॑शाथे ॥ ६ ॥
युवं दक्षं धृतऽव्रता मित्रावरुणा दूऽदभं । ऋतुना यज्ञं आशाथे इति ॥ ६ ॥
हे विधिपरिपालक मित्रवरुण हो, तुम्ही दोघे ऋतूसहवर्तमान ह्या यज्ञाचा अंगीकार करीत आहां. येथें सर्वसिद्धता उत्तम करून ठेविली आहे, व ह्यास विघ्न करणास कोणीही समर्थ नाही. ॥ ६ ॥ द्र॒वि॒णो॒दा द्रवि॑णसो॒ ग्राव॑हस्तासो अध्व॒रे । य॒ज्ञेषु॑ दे॒वमी॑ळते ॥ ७ ॥
द्रविणःऽदाः द्रविणसः ग्रावऽहस्तासः अध्वरे । यज्ञेषु देवं ईळते ॥ ७ ॥
हा पहा द्रविणोदा. ह्याचेसाठी ह्या यज्ञांत सोमरस काढण्याकरितां, वैभवांची इच्छा बाळगणारे हे ऋत्विज, हातांत ग्रावा घेऊन बसले आहेत. ह्या देवाचें पूजन प्रत्येक यज्ञांत करीत असतात. ॥ ७ ॥ द्र॒वि॒णो॒दा द॑दातु नो॒ वसू॑नि॒ यानि॑ श्रृण्वि॒रे । दे॒वेषु॒ ता व॑नामहे ॥ ८ ॥
द्रविणःऽदाः ददातु नः वसूनि यानि शृण्विरे । देवेषु ता वनामहे ॥ ८ ॥
ज्या वैभवांची महती फार दूरवर ऐकूं येते ती हा द्रविणोदा आम्हांस देवो. सर्व देव समुदायांजवळ आम्ही त्यांच्या प्राप्तीबद्दल प्रार्थना करीत असतो. ॥ ८ ॥ द्र॒वि॒णो॒दाः पि॑पीषति जु॒होत॒ प्र च॑ तिष्ठत । ने॒ष्ट्रादृ॒तुभि॑रिष्यत ॥ ९ ॥
द्रविणःऽदाः पिपीषति जुहोत प्र च तिष्ठत । नेष्ट्रात् ऋतुऽभिः इष्यत ॥ ९ ॥
नेष्टा व ऋतु ह्यांच्यापासून पुढें चला, उठा, सोमरसाचा आणखी एक हवी तयार करा. कारण द्रविणोदाला सोमरसाची इच्छा (ददिः) झाली आहे. ॥ ९ ॥ यत्त्वा॑ तु॒रीय॑मृ॒तुभि॒र्द्रवि॑णोदो॒ यजा॑महे । अध॑ स्मा नः द॒दिर्भ॑व ॥ १० ॥
यत् त्वा तुरीयं ऋतुऽभिः द्रविणःऽदः यजामहे । अध स्मा नः ददिः भव ॥ १० ॥
हे द्रविणोदा, तूं अनुक्रमाने चौथा देव आहेस, आणि आम्ही ऋतूंसहवर्तमान तुला हवि अर्पण करीत आहों. तेव्हां आम्हांवर मनःपूर्वक प्रसाद कर. ॥ १० ॥ अश्वि॑ना॒ पिब॑तं॒ मधु॒ दीद्य॑ग्नी शुचिव्रता । ऋ॒तुना॑ यज्ञवाहसा ॥ ११ ॥
अश्विना पिबतं मधु दीद्यग्नी दीदिऽअग्नी शुचिव्रता । ऋतुना यज्ञऽवाहसा ॥ ११ ॥
हे देदीप्यमान व पुण्यव्रत अश्विन हो, यज्ञ सिद्धि नेणार्या हा ऋतुसहवर्तमान तुम्ही मधुर सोमरसाचें सेवन करा. ॥ ११ ॥ गार्ह॑पत्येन सन्त्य ऋ॒तुना॑ यज्ञ॒नीर॑सि । दे॒वान्दे॑वय॒ते य॑ज ॥ १२ ॥
गार्हऽपत्येन संत्य ऋतुना यज्ञऽनीः असि । देवान् देवऽयते यज ॥ १२ ॥
हे उदार देवा, खरा गृहस्वामी तूंच असल्याकारणाने ऋतूप्रमाणे तुझ्याकडेही यज्ञाचे अध्वर्युत्व आलेले आहे. माझ्या विनंतीस मान देऊन हा यज्ञ सर्व देवांना पोहोंचीव. ॥ १२ ॥ मण्डल १ - सूक्त १६ ( इंद्रसूक्त )
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - इंद्र : छंद - गायत्री आ त्वा॑ वहन्तु॒ हर॑यो॒ वृष॑णं॒ सोम॑पीतये । इंद्र॑ त्वा॒ सूर॑चक्षसः ॥ १ ॥
आ त्वा वहन्तु हरयः वृषणं सोमऽपीतये । इंद्र त्वा सूरऽचक्षसः ॥ १ ॥
हे इंद्रदेवा, तूं वृष्टि करणारा आहेस व तुझेकरितां सोमरस करून ठेवला आहे. ह्यासाठी तुझे हरिद्वर्ण अश्व सूर्याचे दर्शन करीत करीत तुला घेऊन येवोत. ॥ १ ॥ इ॒मा धा॒ना घृ॑त॒स्नुवो॒ हरी॑ इ॒होप॑ वक्षतः । इंद्रं॑ सु॒खत॑मे॒ रथे॑ ॥ २ ॥
इमाः धानाः घृतऽस्नुवः हरी इति इह उप वक्षतः । इंद्रं सुखऽतमे रथे ॥ २ ॥
ह्या लाह्यांत इतके तूप घातलें आहे कीं, त्या जशा कांही निथळत आहेत. त्यांचे सेवन करण्याकरितां सर्व सुखसामग्रींनी सज्ज अशा रथांतून इंद्राचे हरिद्वर्ण अश्व त्यास घेऊन येत आहेत. ॥ २ ॥ इंद्रं॑ प्रा॒तर्ह॑वामह॒ इंद्रं॑ प्रय॒त्यध्व॒रे । इंद्रं॒ सोम॑स्य पी॒तये॑ ॥ ३ ॥
इंद्रं प्रातः हवामह इंद्रं प्रऽयति अध्वरे । इंद्रं सोमस्य पीतये ॥ ३ ॥
ह्या प्रातःकालाचे समयीं आम्ही इंद्रास बोलावतो. यज्ञास आरंभ झाला आहे म्हणून आम्ही इंद्रास पाचारण करतो. सोमरसाचे सेवन करण्याकरितां आम्ही इंद्रास हांक मारतो. ॥ ३ ॥ उप॑ नः सु॒तमा ग॑हि॒ हरि॑भिरिंद्र के॒शिभिः॑ । सु॒ते हि त्वा॒ हवा॑महे ॥ ४ ॥
उप नः सुतं आ गहि हरिऽभिः इंद्र केशिऽभिः । सुते हि त्वा हवामहे ॥ ४ ॥
इंद्रा, हे अश्व जोडून तूं आमच्या सोमरसाचा स्वीकार करण्याकरितां इकडे ये. सोमरस पिळून ठेवूनच आम्ही तुला बोलावीत आहोत. ॥ ४ ॥ सेमं न॒ स्तोम॒मा ग॒ह्युपे॒दं सव॑नं सु॒तम् । गौ॒रो न तृ॑षि॒तः पि॑ब ॥ ५ ॥
सः इमं नः स्तोमं आ गहि उप इदं सवनं सुतं । गौरः न तृषितः पिब ॥ ५ ॥
आमची प्रार्थना श्रवण करण्याकरितां इकडे आगमन कर. आम्ही काढलेल्या सोमरसाचा स्वीकार करण्याकरितां इकडे ये. एखाद्या तृषाक्रांत हरणाप्रमाणें उत्सुकतेने हा सोमरस पी. ॥ ५ ॥ इ॒मे सोमा॑स॒ इन्द॑वः सु॒तासः॒ अधि॑ ब॒र्हिषि॑ । ताँ इ॑न्द्र॒ सह॑से पिब ॥ ६ ॥
इमे सोमासः इंदवः सुतासः अधि बर्हिषि । ता इन्द्र सहसे पिब ॥ ६ ॥
हे सोमरसाचे बिंदु दर्भावर पात्रें ठेऊन त्यांत ठेवले आहेत. हे इंद्रा, श्रमपरिहारार्थ ह्यांचे प्राशन कर. ॥ ६ ॥ अ॒यं ते॒ स्तोमो॑ अग्रि॒यो हृ॑दि॒स्पृग॑स्तु॒ शंत॑मः । अथा॒ सोमं॑ सु॒तं पि॑ब ॥ ७ ॥
अयं ते स्तोमः अग्रियः हृदिऽस्पृक् अस्तु शंऽतमः । अथा सोमं सुतं पिब ॥ ७ ॥
ह्या आमच्या स्तुतिनें तुला समधान वाटो. ही फार सुंदर आहे. ही तुझ्या अंतःकरणांत जाऊन भिडो. आम्ही तयार करून टेविलेला सोमरसही तूं पी. ॥ ७ ॥ विश्व॒मित्सव॑नं सु॒तमिंद्रो॒ मदा॑य गच्छति । वृ॒त्र॒हा सोम॑पीतये ॥ ८ ॥
विश्वं इत् सवनं सुतं इंद्रः मदाय गच्छति । वृत्रऽहा सोमऽपीतये ॥ ८ ॥
हा शत्रूंचा संहार करणारा इंद्र ज्या ज्या यज्ञांत म्हणून सोमरस काढला असेल त्या त्या सर्व ठिकाणीं त्याचें प्राशन करण्याकरितां जातो. ह्यांत त्यास फार आनंद वाटतो. ॥ ८ ॥ सेमं नः॒ काम॒मा पृ॑ण॒ गोभि॒रश्वैः॑ शतक्रतो । स्तवा॑म त्वा स्वा॒ध्यः ॥ ९ ॥
सः इमं नः कामं आ पृण गोभिः अश्वैः शतक्रतो इति शतऽक्रतो । स्तवाम त्वा सुऽआध्यः ॥ ९ ॥
हे सामर्थवान् इंद्रा, आम्हांस धेनु, अश्व इत्यादि वैभव प्राप्त व्हावें हीच आमची इच्छा आहे. तेवढी तूं परिपूर्ण कर. आम्हांला एकाग्रबुद्धीनें तुझें स्तवन करतां येवो. ॥ ९ ॥ ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १७ ( इंद्र वरुण सूक्त )
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - इंद्रवरुण : छंद - गायत्री; पादनिवृत् इंद्रा॒वरु॑णयोर॒हं स॒म्राजो॒रव॒ आ वृ॑णे । ता नः॑ मृळात ई॒दृशे॑ ॥ १ ॥
इंद्रावरुणयोः अहं संऽराजोः अवः आ वृणे । ता नः मृळातः ईदृशे ॥ १ ॥
जगतांवर साम्राज्य चालविणार्या इंद्रवरुणांची मी करुणा भाकतो. त्यांस असे शरण गेलें म्हणजे ते आपणांस सुख प्राप्त करून देतात. ॥ १ ॥ गन्ता॑रा॒ हि स्थोऽ॑वसे॒ हवं॒ विप्र॑स्य॒ माव॑तः । ध॒र्तारा॑ चर्षणी॒नाम् ॥ २ ॥
गंतारा हि स्थः अवसे हवं विप्रस्य माऽवतः । धर्तारा चर्षणीनाम् ॥ २ ॥
इंद्र-वरुण हो, माझ्यासारख्या भाविकांनी हांक मारली म्हणजे त्यांचे रक्षण करण्याकरितां तुम्ही नेहमीच उडी घेतां. अखिल प्राणिमात्रांचे पोषणकर्ते तुम्हीच आहां. ॥ २ ॥ अ॒नु॒का॒मं त॑र्पयेथा॒मिंद्रा॑वरुण रा॒य आ । ता वा॒ं नेदि॑ष्ठमीमहे ॥ ३ ॥
अऽनुकामं तर्पयेथां इंद्रावरुणा रायः आ । ता वां नेदिष्ठं ईमहे ॥ ३ ॥
इंद्र-वरुण हो, आमची तृप्ति होईपर्यंत आम्हांस संपत्ति द्या. तुम्ही दोघांही उदार देवांनी आमच्या अगदी सन्निध असावें अशी आमची इच्छा आहे. ॥ ३ ॥ यु॒वाकु॒ हि शची॑नां यु॒वाकु॑ सुमती॒नां । भू॒याम॑ वाज॒दाव्ना॑म् ॥ ४ ॥
युवाकु हि शचीनां युवाकु सुऽमतीनां । भूयाम वाजऽदाव्नाम् ॥ ४ ॥
सामर्थ्याचा लाभ करविणार्या आपल्या कृपेचे आम्ही खरोखर विभागी होणार आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेसही आम्ही पात्र होणार. ॥ ४ ॥ इंद्र॑ः सहस्र॒दाव्नां॒ वरु॑णः॒ शंस्या॑नां । क्रतु॑र्भवत्यु॒क्थ्यः ॥ ५ ॥
इंद्रः सहस्रऽदाव्नां वरुणः शंस्यानां । क्रतुः भवति उक्थ्यः ॥ ५ ॥
सहस्रावधि दानकर्मे करणार्यांत इंद्रच श्रेष्ठ आहे, व जे अत्यंत स्तुत्य आहेत त्यांत वरुणाचाच मान पहिला आहे. ह्या दोघांचेही सामर्थ्य प्रशंसनीय आहे. ॥ ५ ॥ तयो॒रिदव॑सा व॒यं स॒नेम॒ नि च॑ धीमहि । स्यादु॒त प्र॒रेच॑नम् ॥ ६ ॥
तयोः इत् अवसा वयं सनेम नि च धीमहि । स्यात् उत प्रऽरेचनम् ॥ ६ ॥
आम्ही त्याच्या कृपेमुळे संपत्ति प्राप्त करून घेऊं, आणि ती मनमुराद संग्रहासही टाकूं, तथापि त्याचे जवळील संपत्ति पुनः जशीची तशी भरपूरच रहाणार. ॥ ६ ॥ इंद्रा॑वरुण वाम॒हं हु॒वे चि॒त्राय॒ राध॑से । अ॒स्मान्त्सु जि॒ग्युष॑स्कृतम् ॥ ७ ॥
इंद्रावरुणा वां अहं हुवे चित्राय राधसे । अस्मान् सु जिग्युषः कृतम् ॥ ७ ॥
इंद्र-वरुण हो, अपूर्व सौख्यासाठी आणि अनेकविध संपत्तिच्या प्राप्तिसाठी आम्ही तुमचा धांवा करतो. आम्हांस सर्वत्र विजयशाली करा. ॥ ७ ॥ इंद्रा॑वरुण॒ नू नु वां॒ सिषा॑सन्तीषु धी॒ष्वा । अ॒स्मभ्यं॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ८ ॥
इंद्रावरुणा नू नु वां सिषासंतीषु धीषु आ । अस्मभ्यं शर्म यच्छतम् ॥ ८ ॥
हे इंद्र-वरुण हो, आमचे मन आतुरतेने सर्वस्वी तुमचे चिंतन करीत असल्यामुळे आम्हांस कल्याणाची जोड करून द्या. ॥ ८ ॥ प्र वा॑मश्नोतु सुष्टु॒तिरिंद्रा॑वरुण॒ यां हु॒वे । यामृ॒धाथे॑ स॒धस्तु॑तिम् ॥ ९ ॥
प्र वां अश्नोतु सुऽस्तुतिः इंद्रावरुणा यां हुवे । यां ऋधाथे इति सधऽस्तुतिम् ॥ ९ ॥
हे इंद्र-वरुण हो, तुम्हां दोघांस मिळून मी ही एकच सुंदर स्तुति अर्पण करीत आहे. तुम्हीही तिला उत्तेजन देत आहां, तेव्हां ती तुम्हास सर्वथैव मान्य होवो. ॥ ९ ॥ ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १८ ( ब्रह्मणस्पति सूक्त )
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - १-३ ब्रह्मणस्पति; ४ - ब्रह्मणस्पति, इंद्र व सोम; ५- ब्रह्मणस्पति व दक्षिणा; ६ - ८ सदसस्पति : छंद - गायत्र सो॒मानं॒ स्वर॑णं कृणु॒हि ब्र॑ह्मणस्पते । क॒क्षीव॑न्तं॒ य औ॑शि॒जः ॥ १ ॥
सोमानं स्वरणं कृणुहि ब्रह्मणऽ पते । कक्षीवंतं यः औशिजः ॥ १ ॥
हे ब्रह्मणस्पते, उशिजाचा पुत्र कुक्षीवान् ह्याने तुला सोम अर्पण केला आहे. तुझ्या भक्तांना त्याच्याप्रमाणे तेजस्विता अर्पण कर. ॥ १ ॥ यो रे॒वान्यो अ॑मीव॒हा व॑सु॒वित्पु॑ष्टि॒वर्ध॑नः । सः नः॑ सिषक्तु॒ यस्तु॒रः ॥ २ ॥
यः रेवान् यः अमीवऽहा वसुऽवित् पुष्टिऽवर्धनः । सः नः सिसक्तु यः तुरः ॥ २ ॥
जो वैभवशाली आहे, जो व्याधीचे हरण करतो, ज्याचे जवळ द्रव्यकोश भरले आहेत, जगताचे पालनपोषण ज्याचेकडून होते, व जो भक्तांकरितां त्वरेने येतो, असा ब्रह्मणस्पति आमचेवर अनुग्रह करो. ॥ २ ॥ मा नः॒ शंसो॒ अर॑रुषो धू॒र्तिः प्रण॒ङ् मर्त्य॑स्य । रक्षा॑ णो ब्रह्मणस्पते ॥ ३ ॥
मा नः शंसः अररुषः धूर्तिः प्रणक् मर्त्यस्य । रक्ष नः ब्रह्मणः पते ॥ ३ ॥
हे ब्रह्मणस्पते, आमचा द्वेष करणार्या माणसांची कटु भाषणे वा दुष्कृत्ये आम्हास बाधक होणार नाहीत असे तू कर. तू आमचे सर्वथैव संरक्षण कर. ॥ ३ ॥ स घा॑ वी॒रो न रि॑ष्यति॒ यमिंद्रो॒ ब्रह्म॑ण॒स्पतिः॑ । सोमो॑ हि॒नोति॒ मर्त्य॑म् ॥ ४ ॥
सः घ वीरः न रिष्यति यं इंद्रः ब्रह्मणः पतिः । सोमः हिनोति मर्त्यम् ॥ ४ ॥
ब्रह्मणस्पति, इंद्र व सोम यांची ज्याच्यावर कृपा झालेली आहे, असा मनुष्य कधीही नाश पावत नाही. ॥ ४ ॥ त्वं तं ब्र॑ह्मणस्पते॒ सोम॒ इंद्र॑श्च॒ मर्त्य॑म् । दक्षि॑णा पा॒त्वंह॑सः ॥ ५ ॥
त्वं तं ब्रह्मणः पते सोमः इंद्रः च मर्त्यं । दक्षिणा पातु अंहसः ॥ ५ ॥
हे ब्रह्मणस्पते, तूं सोम, इंद्र आणि दक्षिणा यांच्या समवेत सर्व मनुष्यमात्रांचे पातकांपासून रक्षण कर. ॥ ५ ॥ सद॑स॒स्पति॒मद्भु॑तं प्रि॒यमिंद्र॑स्य॒ काम्य॑म् । स॒निं मे॒धाम॑यासिषम् ॥ ६ ॥
सदसः पतिं अद्भुतं प्रियं इंद्रस्य काम्यं । सनिं मेधां अयासिषम् ॥ ६ ॥
अद्भुत पराक्रम करणार्या प्रज्ञारूप सदसस्पतीजवळ मी गेलो आहे. हा उदार असून भक्ति करण्यास योग्य आहे, व इंद्राशी ह्याचें फारच मित्रत्व आहे. ॥ ६ ॥ यस्मा॑दृ॒ते न सिध्य॑ति य॒ज्ञो वि॑प॒श्चित॑श्च॒न । स धी॒नां योग॑मिन्वति ॥ ७ ॥
यस्मात् ऋते न सिध्यति यज्ञः विपःऽचितः चन । सः धीनां योगं इन्वति ॥ ७ ॥
ज्याच्या सहाय्यावांचून ज्ञानी मनुष्याचाही यज्ञ सिद्धीस जाणें अशक्य आहे, तो आम्हांस बुद्धिमत्तेची प्राप्ति करून देतो. ॥ ७ ॥ आदृ॑ध्नोति ह॒विष्कृ॑तिं॒ प्राञ्चं॑ कृणोत्यध्व॒रम् । होत्रा॑ दे॒वेषु॑ गच्छति ॥ ८ ॥
आत् ऋध्नोति हविःऽकृतिं प्राञ्चं कृणोति अध्वरं । होत्रा देवेषु गच्छति ॥ ८ ॥
हवींच्या अर्पण कर्मास तो सफलता आणतो, आणि यज्ञांत जर कांही न्यून राहिलें असेल तर तो सांभळून घेतो, व म्हणूनच आमचा हविर्भाग देवांस जाऊन पोहोंचतो. ॥ ८ ॥ नरा॒शंसं॑ सु॒धृष्ट॑म॒मप॑श्यं स॒प्रथ॑स्तमम् । दि॒वो न सद्म॑मखसम् ॥ ९ ॥
नराशंसं सुऽधृष्टमं अपश्यं सप्रथःऽतमं । दिवः न सद्मऽमखसम् ॥ ९ ॥
नराशंसाचे आज मला दर्शन घडले. हा फार पराक्रमी आहे, व त्याची कीर्ति अत्यंत विशाल आहे. त्याची कांति तर प्रत्यक्ष द्युलोकाप्रमाणें तळपत आहे. ॥ ९ ॥ ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १९ ( अग्निमरुत् सूक्त )
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - अग्नि, मरुत् : छंद - गायत्री प्रति॒ त्यं चारु॑मध्व॒रं गो॑पी॒थाय॒ प्र हू॑यसे । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ १ ॥
प्रति त्यं चारुं अध्वरं गोऽपीथाय प्र हूयसे । मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ १ ॥
हे अग्निदेवा, ह्या मनोहर यज्ञांत तुला सोमपानार्थ निमंत्रण आहे, ह्याकरितां मरुद्गणांसहित येथें ये. ॥ १ ॥ न॒हि दे॒वो न मर्त्यो॑ म॒हस्तव॒ क्रतुं॑ प॒रः । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ २ ॥
नहि देवः न मर्त्यः महः तव क्रतुं परः । मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ २ ॥
तूं इतका पराक्रमी आहेस कीं, देव आणि मनुष्य ह्यांपैकी कोणाचीच गति तुझ्या बरोबरीची नाही. हे अग्ने, मरुतांसह तूं इकडे ये. ॥ २ ॥ ये म॒हो रज॑सो वि॒दुर्विश्वे॑ दे॒वासो॑ अ॒द्रुहः॑ । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ३ ॥
ये महः रजसः विदुः विश्वे देवासः अद्रुहः । मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ३ ॥
जे द्वेषविकारांपासून मुक्त आहेत व ज्यांस अगाध अशा रजोलोकाचें ज्ञान आहे अशा त्या मरुद्देवांसह, हे अग्निदेवा, तूं इकडे ये. ॥ ३ ॥ य उ॒ग्रा अ॒र्कमा॑नृ॒चुरना॑धृष्टास॒ ओज॑सा । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ४ ॥
ये उग्रा अर्कं आनृचुः अनाधृष्टासः ओजसा । मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ४ ॥
जे उग्रकृति मरुत् आपल्या तेजाने कोणाच्याही पराक्रमास न जुमानणारे असून अर्काची अर्चना करतात, त्यांसह हे अग्ने, येथें ये. ॥ ४ ॥ ये शु॒भ्रा घो॒रव॑र्पसः सुक्ष॒त्रासो॑ रि॒शाद॑सः । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ५ ॥
ये शुभ्राः घोरऽवर्पसः सुऽक्षत्रासः रिशादसः । मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ५ ॥
जे अत्यंत शुभ्रवर्ण आहेत, ज्यांची शरीरें फार धिप्पाड आहेत, जे महापराक्रमी म्हणून गाजले आहेत, व जे दुष्टांचे उच्चाटन करण्यांत कुशल आहेत, त्या मरुतांसह हे अग्ने, इकडे ये. ॥ ५ ॥ ये नाक॒स्याधि॑ रोच॒ने दि॒वि दे॒वास॒ आस॑ते । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ६ ॥
ये नाकस्य अधि रोचने दिवि देवासः आसते । मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ६ ॥
जे मरुद्देव स्वर्गाचे वसतिस्थान द्युलोकांत वास करतात त्यांसह हे अग्ने, इकडे ये. ॥ ६ ॥ य ई॒ङ्ख्य॑न्ति॒ पर्व॑तान् ति॒रः स॑मु॒द्रम॑र्ण॒वम् । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ७ ॥
ये ईङ्खयंति पर्वतान् तिरः समुद्रं अर्णवम् । मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ७ ॥
ओतप्रोत उचंबळत असलेल्या मेघरूपी पर्वतांसही स्वपराक्रमाने समुद्रापार फेंकून टाकतात, हे अग्ने त्या मरुतांसह तू इकडे ये. ॥ ७ ॥ आ ये त॒न्वन्ति॑ र॒श्मिभि॑स्ति॒रः स॑मु॒द्रमोज॑सा । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ८ ॥
आ ये तन्वंति रश्मिऽभिः तिरः समुद्रं ओजसा । मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ८ ॥
जे आपल्या सामर्थ्याने आपल्या किरणांनी सर्व समुद्र आक्रमून टाकतात, त्या मरुतांसह हे अग्ने, इकडे ये. ॥ ८ ॥ अ॒भि त्वा॑ पू॒र्वपी॑तये सृ॒जामि॑ सो॒म्यं मधु॑ । म॒रुद्भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ९ ॥
अभि त्वा पूर्वऽपीतये सृजामि सोम्यं मधु । मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ९ ॥
हा मधुर सोमरस सर्वप्रथम तू प्राशन करावा अशी माझी इच्छा आहे. हे अग्ने, तू मरुतांसह इकडे ये. ॥ ९ ॥ ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २० (ऋभु सूक्त)
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - ऋभु : छंद - गायत्री अ॒यं दे॒वाय॒ जन्म॑ने॒ स्तोमो॒ विप्रे॑भिरास॒या । अका॑रि रत्न॒धात॑मः ॥ १ ॥
अयं देवाय जन्मने स्तोमः विप्रेभिः आसया । अकारि रत्नऽधातमः ॥ १ ॥
जन्मास येण्याच्या यातायातीतून ज्या देवांची सुटका झाली नाही त्यांचे प्रित्यर्थ विद्वान उपासकांनी ही स्तुति स्वमुखाने गाइली होती. ह्या स्तुतीच्या योगाने उत्कृष्ट वैभवांची प्राप्ति होण्याजोगी आहे. ॥ १ ॥ य इंद्रा॑य वचो॒युजा॑ तत॒क्षुर्मन॑सा॒ हरी॑ । शमी॑भिर्य॒ज्ञमा॑शत ॥ २ ॥
ये इंद्राय वचःऽयुजा ततक्षुः मनसा हरी इति । शमीभिः यज्ञं आशत ॥ २ ॥
ह्या देवांनी स्वतःच्या कल्पनेने इंद्रासाठी, हुकुम केल्याबरोरबर आपण होऊन नियुक्त होणारे, असे दोन अश्व निर्माण केले. ह्यांनी आपल्या अद्भुत् कृत्यांनी यज्ञांतील सन्मानास स्वतःस पात्र करून घेतले. ॥ २ ॥ तक्ष॒न्नास॑त्याभ्यां॒ परि॑ज्मानं सु॒खं रथं॑ । तक्ष॑न्धे॒नुं स॑ब॒र्दुघा॑म् ॥ ३ ॥
तक्षन् नासत्याभ्यां परिऽज्मानं सुखं रथं । तक्षन् धेनुं सबःऽदुघाम् ॥ ३ ॥
आणि ह्यांनी अश्वीदेवांकरितां सर्वत्र संचार करणारा असा सुखकारक रथ तयार केला व दुग्ध देणारी धेनूही उत्पन्न केली. ॥ ३ ॥ युवा॑ना पि॒तरा॒ पुनः॑ स॒त्यम॑न्त्रा ऋजू॒यवः॑ । ऋ॒भवो॑ वि॒ष्ट्यक्रत ॥ ४ ॥
युवाना पितरा पुनरिति सत्यऽमंत्राः ऋजुऽयवः । ऋभवः विष्टि अक्रत ॥ ४ ॥
ऋभु हे असे आहेत की ज्यांस उद्देशून केलेल्या प्रार्थना निःसंशय सफल होतात. ह्यांची वृत्ति अगदीं सरल आहे. ह्यांनी आपल्या सामर्थ्याने मातापितरांस पुन्हां तरुण केले. ॥ ४ ॥ सं वो॒ मदा॑सो अग्म॒तेन्द्रे॑ण च म॒रुत्व॑ता । आ॒दि॒त्येभि॑श्च॒ राज॑भिः ॥ ५ ॥
सं वः मदासः अग्मत इंद्रेण च मरुत्वता । आदित्येभिः च राजऽभिः ॥ ५ ॥
मरुद्गणांसहवर्तमान इंद्र, आणि वैभवश्रीनें मंडित असे आदित्य, ह्यांच्या समुदायाकडे येण्यासाठीं, हे ऋभु जाऊन पोंचले आहेत. हे मूर्तिमान् आनंदच आहेत. ॥ ५ ॥ उ॒त त्यं च॑म॒सं नवं॒ त्वष्टु॑र्दे॒वस्य॒ निष्कृ॑तम् । अक॑र्त च॒तुरः॒ पुनः॑ ॥ ६ ॥
उत त्यं चमसं नवं त्वष्टुः देवस्य निःऽकृतं । अकर्त चतुरः पुनरिति ॥ ६ ॥
शिवाय त्वष्टादेवानें तयार केलेल्या त्या प्रसिद्ध चमसाचे ह्यांनींच पुन्हां चार चमस केले. ॥ ६ ॥ ते नो॒ रत्ना॑नि धत्तन॒ त्रिरा साप्ता॑नि सुन्व॒ते । एक॑मेकं सुश॒स्तिभिः॑ ॥ ७ ॥
ते नः रत्नानि धत्तन त्रिः आ साप्तानि सुन्वते । एकंऽएकं सुशस्तिऽभिः ॥ ७ ॥
तुम्ही असे पराक्रमी असल्यामुळें आपले उत्तम आशीर्वाद, व एकवीस प्रकारची रत्नें, एकेका भक्तास एक एक अशा रीतीनें, आम्हांस द्या. ॥ ७ ॥ अधा॑रयन्त॒ वह्न॒योऽ॑भजन्त सुकृ॒त्यया॑ । भा॒गं दे॒वेषु॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ८ ॥
अधारयंत वह्नयः अभजन्त सुऽकृत्यया । भागं देवेषु यज्ञियम् ॥ ८ ॥
इतर देवांस जसा यज्ञाचा भाग मिळतो तसा भाग ह्यांनीही आपणांस प्राप्त करून घेतला. हे श्रेष्ठ आहेत. यज्ञ हविंचा ह्यांनी स्वीकार केला. ॥ ८ ॥ ॐ तत् सत् |