श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय त्रेसष्टावा


धर्मराजाचा गर्व नाहीसा झाला


श्रीगणेशाय नम: ॥
दिग्विजय करून ॥ परतोन आला फाल्गुन ॥
सकल राजे दोन्ही श्यामकर्ण ॥ धर्मराया भेटविले ॥ १ ॥
भूमि शुद्ध खणून ॥ साधिलें यज्ञमंडपप्रमाण ॥
साडेतीन हातांची यष्टि जाण ॥ चारशे मोजिल्या चतुरस्त्र ॥ २ ॥
जेथें व्यास विधि सांगणार ॥ तेथें कांहींच न पडे अंतर ॥
विटबंदी वेदिका सुंदर ॥ प्रमाण यथोक्त योग्य केली ॥ ३ ॥
मंडपाचीं अष्ट द्वारे ॥ अष्ट ध्वज अष्ट कुंडे परिकरें ॥
दशविध दर्भ सर्व यज्ञपात्रे ॥ यथाशास्त्र निर्मिलीं ॥ ४ ॥
सोमवल्ली उलूखल मुसळ ॥ एवं सर्व सामग्री निर्मळ ॥
जगद्‌गुरू व्यास दयाळ ॥ आचार्य मुख्य जाहला ॥ ५ ॥
पितामह बकदाल्भ्य केला ॥ वीससहस्त्र ब्राह्मणांचा मेळा ॥
एक संवत्सर जाहला ॥ जपास धर्मराजें घातले ॥ ६ ॥
भीम आणि पार्थ ॥ हे यज्ञरक्षक जाहले तेथ ॥
कार्य वांटिलिया समस्त ॥ जेथींचे तेथें ठायीं ठायीं ॥ ७ ॥
मृगश्रृंगें कंडूनिरसन ॥ धर्माचे हातीं सदा जाण ॥
मृगाजिन प्रावरर्ण ॥ नाहीं भाषण इतरांशीं ॥ ८ ॥
बोलिला सत्यवतीसुत ॥ उदक आणावया दंपत्य ॥
चौसष्ट सिद्ध करावीं येथ ॥ अति उत्तम निवडूनि ॥ ९ ॥
शिरीं सुवर्णकलश घेती ॥ निघालीं वसिष्ठ अरुंधती ॥
पल्लवीं गांठी देऊनि प्रीतीं ॥ अत्रि अनसूया चालिलीं हो ॥ १० ॥
रुक्मिणी आणि श्रीकृष्ण ॥ मिरवत चालिलीं शोभायमान ॥
रति आणि प्रद्युम्न ॥ अनिरुद्ध उखा उभयतां ॥ ११ ॥
वृषकेत आणि प्रभावती ॥ युवनाश्व आणि वेदावती ॥
बभ्रुवाहन स्त्री रूपवती ॥ जाती कलश घेऊनि ॥ १२ ॥
पदरीं दिधल्या दंपत्यग्रंथी ॥ पुढें चतुर्विध वाद्यें वाजती ॥
वसुदेव देवकी सती ॥ तींही निघती मिरवत ॥ १३ ॥
सत्यभामेचे सदनीं ॥ प्रवेशोन सांगे नारदमुनी ॥
सर्वरायांदेखतां रुक्मिणी ॥ विशेष मान घेतसे ॥ १४ ॥
पदरीं देऊन ग्रंथी ॥ मुख्य दोघें मिरवती ॥
सेवक उपचार समर्पिती ॥ शिरीं छत्र विराजतसे ॥ १५ ॥
तुज टाकून जगन्मोहन ॥ गेला तीस संगे घेऊन ॥
सत्यभामा बोले हांसोन ॥ घरांत श्रीकृष्ण आहे कीं ॥ १६ ॥
घरांत गेला नारदमुनी ॥ तो मंचकीं पहुडला मोक्षदानी ॥
म्हणे सभे होता चक्रपाणी ॥ उदकास रुक्मिणीसहित गेला ॥ १७ ॥
रुक्मिणीसी सोडून ॥ पहुडसी येथें येऊन ॥
सत्यभामा म्हणे ग्रंथी बांधोन ॥ उदका जाऊं आम्ही आतां ॥ १८ ॥
मग जांबवतीच्या घरांत ॥ नारदमुनि प्रवेशत ॥
तीसही तैसेंच सांगत ॥ न मानी श्रीकृष्ण तूतें पैं ॥ १९ ॥
ते म्हणे गृहांत चक्रपाणी ॥ कां कलि लावितां नारदमुनी ॥
आत प्रवेशतां म्हणे चक्रपाणी ॥ आलासी येथें केधवां ॥ २० ॥
अष्टनायिका आदिकरूनी ॥ सोळासहस्र कृष्णकामिनी ॥
सर्वांघरीं आहे मोक्षदानी ॥ शून्य सदन नसे कोठे ॥ २१ ॥
सर्वही घरें फिरोन ॥ धर्ममंडपास आला परतोन ॥
तो सर्व साहित्य श्रीकृष्ण ॥ करीत तेथें बैसला ॥ २२ ॥
इकडे उदकासी गेलीं दंपत्यें ॥ सत्यवतीसुत गेला सांगातें ॥
मंत्रूनियां उदक दे तेथें ॥ भरूनि कलश पूजियेला ॥ २३ ॥
सुभद्रा आणि अर्जुन ॥ जो आलीं धरूनि जीवन ॥
अरुंधतीने कलश भरून ॥ रुक्मिणीच्या मस्तकीं ठेविला ॥ २४ ॥
म्हणे तुज पुष्पभार न सोसे ॥ कैसा कलश नेशील राजसे ॥
तो हास्यवदनें बोलतसे ॥ सुभद्रादेवी तेधवां ॥ २५ ॥
जेणें गोवर्धन सप्त दिन ॥ नखाग्रीं घेतला उचलून ॥
अनंत ब्रह्मांडें संपूर्ण ॥ उदरामाजी वाहतसे ॥ २६ ॥
त्यास हे हृदयावरी धरित ॥ कलशाची गोष्टी कायसी तेथ ॥
भीमकी म्हणे ऐसेंच निश्चित ॥ तुम्हीही नित्य करीत जा ॥ २७ ॥
असो उदक भरून सकळीं ॥ यज्ञमंडपासी मिरवत आलीं ॥
त्या उदकें तत्काळीं ॥ श्यामकर्ण न्हाणिला ॥ २८ ॥
मंत्रून घोडा तेजागळा ॥ स्तंभासी दृढ बांधिला ॥
सकल ऋषिचक्र ते वेळां ॥ वेदघोषें गर्जतसे ॥ २९ ॥
रत्‍नवस्त्रालंकारीं ॥ ऋषी पूजिले ते अवसरीं ॥
घोड्यास म्हणती पशुत्व करीं ॥ तंव तो मान हालवित ॥ ३० ॥
अश्वज्ञानी निपुण तेथ ॥ नकुल सांगे करूनि अर्थ ॥
म्हणे श्यामकर्णाचें ऐसें आहे चित्त ॥ इतर गतीस न जाय म्हणे ॥ ३१ ॥
येथें आहे श्रीकृष्ण ॥ मी तरी पूर्णपदासी पावेन ॥
इतर लोक नेघे म्हणोन ॥ हालवी मान अर्थ हा ॥ ३२ ॥
यावरी वेदमंत्रेंकरून ॥ ठायीं ठायीं बांधला श्यामकर्ण ॥
धौम्यें पिळिला कान ॥ तो दुग्धधारा निघाल्या ॥ ३३ ॥
रक्त नाहीं अणुमात्र ॥ मग भीमें घेतलें दिव्य शस्त्र ॥
छेदिलें अश्वाचे शिर ॥ वाद्यगजर उठविला ॥ ३४ ॥
श्यामकर्णाचें शिर उडालें ॥ तें सूर्यबिंबांत प्रवेशले ॥
सकल ऋषी स्तविते जाहले ॥ ऐसें देखिलें नाहीं कोठे ॥ ३५ ॥
श्यामकर्णाची अंतर्ज्योति निघाली ॥ ते श्रीकृष्णमुखीं प्रवेशली ॥
वरकड शरीर पाहती सकळी ॥ राशि पडली कर्पूराची ॥ ३६ ॥
अस्ति मांस रुधिर ॥ न देखती कोणी अणुमात्र ॥
मग सत्यवतीहृदयाब्जभ्रमर ॥ टाकी अवदानें तयांचीं ॥ ३७ ॥
इंद्रादि देव समस्त ॥ त्या अवदानें जाहले तृप्त ॥
ऋषी म्हणती याग अद्‌भुत ॥ यावरी आतां न होय ऐसा ॥ ३८ ॥
व्यासदेवें आवाहनून ॥ साक्षात आणिला पाकशासन ॥
तैसेच सर्व दिक्पाल बोलावून ॥ भाग तयांस दिधले पैं ॥ ३९ ॥
तृप्त जाहले देव समस्त ॥ संतोषला वैकुंठनाथ ॥
वाद्यगजरें महोत्साह करित ॥ अवभृथस्नाना चालिले ॥ ४० ॥
सोमपान करून निर्दोष ॥ सर्वांनीं घेतला मग पुरोडाश ॥
सकल पृथ्वीचे नरेश ॥ धर्मद्रौपदींसी पूजिती ॥ ४१ ॥
धर्मराजें सकल अवनी ॥ समर्पिली वेदव्यासालागूनी ॥
तेणें तत्काल विकूनी ॥ द्रव्य ब्राह्मणां वांटिले ॥ ४२ ॥
यागांतीं सर्व ब्राह्मणां ॥ धर्मराज देत दक्षिणा ॥
एक हस्ती एक तुरंग जाणा ॥ पांच मण सुवर्ण तें ॥ ४३ ॥
एक एक पायली रत्‍नें ॥ दिधलीं धर्में ब्राह्मणांकारणे ॥
यावरी जें जें इच्छिलें मनें ॥ तें तें सर्व पुरवित ॥ ४४ ॥
मग पृथ्वीचे जे भूभुज ॥ त्यांसी पूजी अनुक्रमें धर्मराज ॥
कोटि द्रव्य सहस्त्र रथ ॥ तेजःपुंज देत अश्व दहाशतें ॥ ४५ ॥
छप्पन्नकोटी यादव ॥ त्यांचे द्विगुण पूजिले सर्व ॥
इच्छिलें तें तें धर्मराव ॥ वस्तु देऊन तोषवित ॥ ४६ ॥
यावरी मग द्वारकानाथ ॥ षोडशसहस्त्र स्त्रियांसहित ॥
वरी अधिक अष्टोत्तरशत ॥ पूजिता जाहला आदरें ॥ ४७ ॥
यज्ञफळ संपूर्ण ॥ श्रीकृष्णकरीं केलें अर्पण ॥
षड्रस अन्नें निर्मून ॥ चतुर्विध रसागळीं ॥ ४८ ॥
ऋष्यादि चार्‍ही वर्ण ॥ तृप्त केले देऊन भोजन ॥
जेथें पूर्णकर्ता भगवान ॥ तें अन्न काय वर्णावे ॥ ४९ ॥
सुवर्णपीठें बैसावया ॥ पात्रांप्रति रत्‍नदीपसमया ॥
योगिनी जेथें वाढावया ॥ चौसष्टसंख्या विराजती ॥ ५० ॥
रत्‍नजडित झार्‍या सुंदर ॥ माजी भरिलें सुवासिक नीर ॥
दिव्यगंध सुमनें समग्र ॥ चर्चिलें भाळा शोभती ॥ ५१ ॥
त्या अन्नास देखोन ॥ वसंत करी प्रदक्षिण ॥
देव लाळ घोंटिती पूर्ण ॥ भोजनालागीं टोंकती ॥ ५२ ॥
जैशी विद्युल्लता तळपत ॥ तैशी द्रौपदी तेथें वाढित ॥
हातीं चुडे झळकत ॥ उजेड पडत जेवित्यांवरी ॥ ५३ ॥
अरण्यवासी ऋषी समस्त ॥ चतुर्विध अन्नें असंख्यात ॥
ते देखोन नांवें पुसत ॥ एकमेकांस परस्परें ॥ ५४ ॥
फेणिया देखोन वर्तुळा ॥ म्हणती चंद्रबिंब चिरूनि केल्या ॥
वडे पाहून म्हणती ते वेळां ॥ चक्रे सूर्यरथाचीं हीं ॥ ५५ ॥
म्हणती अमृत आळवून ॥ मांडे केले निर्माण ॥
सुवर्णचि शिजवून ॥ केलें वरान्न वाटतसे ॥ ५६ ॥
सोमकांताचा पर्वत ॥ शिजवून केला भात ॥
म्हणती सुवास जेविता घृत ॥ घुसळून अमृत काढिलें ॥ ५७ ॥
एवं सर्व जाहले तृप्त ॥ त्रयोदशगुणी विडे घेत ॥
दक्षिणा देऊन समस्त ॥ ऋषिराज बोळविले ॥ ५८ ॥
माझा यज्ञ सिद्धीस गेला ॥ धर्मास हा गर्व जाहला ॥
तो एक मुंगूस ते वेळां ॥ बिळांतूनि आला तेथें ॥ ५९ ॥
तो नकुळ बोले वचन ॥ माझें अर्धांग जाहलें सुवर्ण ॥
तुझ्या यागांत येऊन ॥ परी कांहींच होईना ॥ ६० ॥
तुझा यज्ञ कांहीं ॥ धर्मा शुद्ध जाहला नाहीं ॥
धर्म म्हणे जेथें व्यास श्रीकृष्ण पाहीं ॥ तेथें व्यंग नव्हे कदा ॥ ६१ ॥
नकुळ म्हणे मुद्रलब्राह्मण ॥ स्त्री पुत्र आणि सून ॥
बहुत दुर्भिक्ष पडोन ॥ लोक संपूर्ण आटले ॥ ६२ ॥
चौघीं षण्मास करूनि यत्‍न ॥ तीन चौंगे मेळविलें धान्य ॥
त्यांत पंचमहायज्ञ ॥ अनुक्रमें करीत ॥ ६३ ॥
ब्रह्मयज्ञ पितृयज्ञ ॥ मनुष्ययज्ञ देवयज्ञ ॥
पांचवा तो भूतयज्ञ ॥ पंचमहायज्ञ हेचि पैं ॥ ६४ ॥
अग्नीचा विभाग देऊन ॥ सहा मासां करूं बैसले भोजन ॥
त्यांच्या डोळा उतरला प्राण ॥ अस्तिपंजर दिसती ते ॥ ६५ ॥
पाठ पोट एक होऊन ॥ चौघे दिसती अत्यंत दीन ॥
अस्थींचा पिंजरा संपूर्ण ॥ त्वचेंतून वरी दिसे ॥ ६६ ॥
परमहंसवेष धरून ॥ तेथें एक आला ब्राह्मण ॥
मुद्रलें परम आनंदोन ॥ पूजा केली प्रेमयुक्त ॥ ६७ ॥
ब्राह्मण भोजना बैसविला ॥ मुद्गलें आपला भाग दिधला ॥
विप्र क्षुधानळें व्यापिला ॥ इच्छिता जाहला आणीक अन्न ॥ ६८ ॥
मग तिघांहीं विभाग देऊन ॥ तृप्त केला प्रीतीनें ब्राह्मण ॥
तेणें स्वरूप प्रकटिले पूर्ण ॥ यमधर्म साक्षात तो ॥ ६९ ॥
प्रसन्न जाहला मुद्‌गलासी ॥ इच्छिलें फळ सर्व पावशी ॥
हरिहरब्रह्मादिकांसी ॥ तोषविशी दर्शनें तूं ॥ ७० ॥
तुज सर्व याग घडले ॥ अवघ्या तपांचें फळ हाता आलें ॥
तो पुष्पवर्षाव जाहले ॥ मुद्रलावरी तेधवां ॥ ७१ ॥
प्रिय बोलोन जें दान ॥ तेंचि उत्तम मानी श्रीभगवान ॥
अहंकर्तेपण नुरवून ॥ सदा निमग्न हरिरूपीं ॥ ७२ ॥
रंतिदेवनामें ब्राह्मण ॥ तेणें तृषार्तासी पाजिलें जीवन ॥
प्रेमें भक्तिपूर्वक जाण ॥ तेणेंकरून उद्धरला ॥ ७३ ॥
मग तो मुद्‌गल स्त्रीपुत्रस्नुषांसहित ॥ हरिरूप होऊनि वैकुठीं जात ॥
त्याचा याग ऐसा अद्भुत ॥ मी जाण तेथें लोळलो धर्मा ॥ ७४ ॥
अर्धांग जाहलें सुवर्ण ॥ मग या यागीं लोळलों पूर्ण ॥
परी अणुमात्र न पालटे वर्ण ॥ ऐसें वदोन नकुळ गेला ॥ ७५ ॥
मग धर्में गर्व टाकून ॥ धरीत जगद्वंद्याचे चरण ॥
म्हणे मीं तुझी लीला देखिली गहन ॥ ते वेदशास्त्रां न कळेचि ॥ ७६ ॥
ऋषी राजे गेले समस्त ॥ एक मास राहिला द्वारकानाथ ॥
तों सौदागर ब्राह्मण तेथ ॥ आले भांडत धर्मापाशीं ॥ ७७ ॥
जैमिनि म्हणे जनमेजयास ॥ ऐक कथा ते आहे सुरस ॥
लीलाविग्रही जगन्निवास ॥ दावी धर्मास चमत्कार ॥ ७८ ॥
कुंजरपुरीं नवल वर्तलें ॥ एकें सौदागरें आपलें ॥
स्वस्थळ ब्राह्मणाला दिधलें ॥ गृह बांधावया म्हणोनि ॥ ७९ ॥
गृहास पूर्वीचा होता पाया ॥ ब्राह्मण मुहूर्त पाहोनियां ॥
गेला जंव खणावया ॥ तो द्रव्यघट लागला ॥ ८० ॥
विप्रें द्रव्याचा घट उचलिला ॥ सौदागरापांशीं आणिला ॥
म्हणे हा द्रव्यघट वहिला ॥ घेई आपुला महाराजा ॥ ८१ ॥
सौदागर म्हणे स्वामी ॥ द्रव्य उदंड आहे माझिया धामीं ॥
हें घेऊनि जावें तुम्हीं ॥ अर्पिलें आम्हीं सर्वही ॥ ८२ ॥
जेव्हां तुम्हांस स्थळ दिधलें ॥ तेथें जितके द्रव्य लाधलें ॥
तितुकें तुम्हांसी अर्पिलें ॥ न्यावे वहिलें घरासी तें ॥ ८३ ॥
आणीक द्रव्य लागो अपार ॥ तेंही तुमचेंचि असो साचार ॥
मग बोलिला जें विप्र ॥ तेंचि सादर परिसिजे ॥ ८४ ॥
म्हणे हें नलगे आम्हांसी धन ॥ संकल्पितां तें स्थळ दिधलें दान ॥
नाहीं द्रव्याचें आम्हां कारण ॥ प्रलय संपूर्ण द्रव्यसंगें ॥ ८५ ॥
द्रव्यामुळें अनर्थ ॥ द्रव्यामुळे नासतो स्वार्थ ॥
द्रव्यामुळे परमार्थ ॥ सर्व जातो हातींचा ॥ ८६ ॥
सौदागर म्हणे मी नेघें ॥ आपुल्या घरासी न्या वेगें ॥
ब्राह्मण म्हणे मजही नलगे ॥ दोघे चालिले व्यवहारासी ॥ ८७ ॥
आले धर्मराजापाशी ॥ तों कृष्णजी होते त्या समयासी ॥
दोघे म्हणती रायासी ॥ यथार्थ निवडीं व्यवहार ॥ ८८ ॥
सांगितला सकळ वृत्तांत ॥ धर्मराज संतोषत ॥
धन्य माझें भाग्य निश्चित ॥ लोक नगरांत धर्मिष्ठ हे ॥ ८९ ॥
धर्म म्हणे कृष्णराया ॥ पहा नगरींची पवित्र चर्या ॥
दोघे नातळती द्रव्यसंचया ॥ कैसें स्वामिया करावें ॥ ९० ॥
कैसा निवडेल हा व्यवहार ॥ मनांत म्हणे रुक्मिणीवर ॥
मी निजधामा गेलिया सर्व ॥ कलि दुर्धर पेटेल ॥ ९१ ॥
लोक अधर्मी होती रत ॥ करिती एकमेकांचे घात ॥
द्रव्यालागीं महा अनर्थ ॥ घडतील पर्वत पापाचे ॥ ९२ ॥
ते प्रचीत दाखवावया किंचित ॥ धर्मास म्हणे कृष्णनाथ ॥
व्यवहार हा निवडे सत्य ॥ चला निश्चित शेषापाशी ॥ ९३ ॥
द्रव्य सौदागर ब्राह्मण ॥ धर्मराज जगज्जीवन ॥
पाताळीं शेषद्वारीं येऊन ॥ अवलोकित चहूंकडे ॥ ९४ ॥
तो तेथें महावृक्ष दोनी ॥ मध्ये एक पुरुष बांधिला आकळूनी ॥
स्थळोस्थळीं बंद देऊनी ॥ दृढ बांधूनि रक्षिला ॥ ९५ ॥
काजळपर्वताऐसा थोर ॥ भाळीं चर्चिला सिंदूर ॥
महाविक्राळ भयंकर ॥ धर्माप्रति बोलतसे ॥ ९६ ॥
महाभाग्या धर्मशीळा ॥ माझ्या सर्वांगासी लागल्या कळा ॥
क्षणभरी सोडवीं दयाळा ॥ प्राण जाहला कासाविस ॥ ९७ ॥
माझें सर्वांग तिडकतें ॥ महाराजा सोडवीं आजि मातें ॥
धर्म कळवळला चित्तें ॥ म्हणे तूतें सोडवीन ॥ ९८ ॥
कळला शेषासी समाचार ॥ भेटी आले धर्म यादवेश्वर ॥
मग येऊन समोर ॥ लोटांगण घातलें ॥ ९९ ॥
सिंहासनीं बैसवूनी ॥ अनुक्रमें पूजा करूनी ॥
धर्म विचारी मनीं ॥ आधीं तो प्राणी सोडवू ॥ १०० ॥
मग निवडेल यांचा व्यवहार ॥ शेषासी म्हणे युधिष्ठिर ॥
वृक्षास बांधला तो सत्वर ॥ प्राणी सोडवून देइजे ॥ १०१ ॥
आमुची गोष्टी येवढी चालवा ॥ आधीं तो प्राणी सोडवा ॥
शेष म्हणे कमलाधवा ॥ सोडूं येधवां काय जी ॥ १०२ ॥
कृष्ण म्हणे धर्मासी पुसोनी ॥ मग द्यावा सोडूनी ॥
धर्म म्हणे तये क्षणीं ॥ सोडा प्राणी एकदा ॥ १०३ ॥
शेष म्हणे मी सोडीन ॥ मागुती तूं करसी बंधन ॥
मग बोले पंडुनंदन ॥ ऐसे न घडे सर्वथा ॥ १०४ ॥
मग दूतांसी आला देऊनी ॥ सोडविला बंधनांतूनी ॥
तो उसळला तत्क्षणीं ॥ गेला पळोनि मृत्युलोका ॥ १०५ ॥
यावरी शेष म्हणे ॥ कां येथें जाहले आपुलें येणें ॥
धर्म म्हणे व्यवहार निवडणें ॥ या दोघांचा येधवां ॥ १०६ ॥
शेष म्हणे कासयाचा व्यवहार ॥ तो क्रोधें बोले द्विजवर ॥
म्हणे या सौदागरें थोर ॥ कहर मजवरी मांडिला ॥ १०७ ॥
जेव्हां मज स्थळ दिधलें दान ॥ तेव्हांच द्रव्य संकल्पिलें संपूर्ण ॥
आतां बळेच घेतो हिरोन ॥ मी प्राण देईन महाराजा ॥ १०८ ॥
सौदागर म्हणे ते वेळीं ॥ माझीं अवघीं गिळिलीं कोहळीं ॥
माझें द्रव्य अपार आहे ते स्थळी ॥ किंचित आम्हांजवळी आणिलें ॥ १०९ ॥
या ब्राह्मणास देईन मार ॥ द्रव्य आणवीन समग्र ॥
विप्र म्हणे मी निर्धार ॥ हत्या करीन आपुली ॥ ११० ॥
मी आतांच येथें क्रिया करीन ॥ द्रव्यासमवेत केलें गृहदान ॥
आश्चर्य करी पंडुनंदन ॥ म्हणे नवल पूर्ण वर्तलें ॥ १११ ॥
धर्म म्हणे वैकुठपती ॥ कां भ्रंशली यांची मती ॥
हरि म्हणे त्या कलीप्रती ॥ सोडवितांच गति हे जाहली ॥ ११२ ॥
कलि सुटतां मोकळा ॥ बुद्धीसी पालट जाहला सकळां ॥
कलियुगाचा आरंभ जाहला ॥ धर्म चालला बुडत पैं ॥ ११३ ॥
परदारा आणि परधन ॥ यालागीं होतील अनर्थ पूर्ण ॥
एकमेकांचे घेतील प्राण ॥ असत्य पूर्ण वर्तेल ॥ ११४ ॥
द्रव्यामुळे पिता पुत्र ॥ कलह करितील दुर्धर ॥
मातेसी घालितील बाहेर ॥ पाप अपार वर्तेल ॥ ११५ ॥
द्रव्यालागीं वेदविक्रय होती ॥ कन्यागोविक्रयें द्रव्य अर्जिती ॥
वृक्ष निष्फळ धेनु न दुभती ॥ घन क्षितीं वर्षेना ॥ ११६ ॥
माता आणि पुत्रांमध्ये ॥ इष्टत्व तुटे द्रव्यसंबंधें ॥
माता पुत्रांसी विष देती क्रोधें ॥ द्रव्यनिमित्तें जाण पां ॥ ११७ ॥
पिता घेईल पुत्राचा प्राण ॥ पुत्र करील पित्याचें हनन ॥
स्त्रिया मारितील भ्रतारालागून ॥ द्रव्य चोरून नेतील ॥ ११८ ॥
गुरूशिष्यांमध्ये विकल्प पडती ॥ बंधू बंधूंचा प्राण घेती ॥
कोणी धर्मवाटा पाडिती ॥ द्रव्य नेती हिरोनियां ॥ ११९ ॥
संन्यासी दिगंबर तापसी ॥ तेही संग्रहितील द्रव्यासी ॥
साधु धांवतील राजद्वारासी ॥ धनाढ्य लोकांसी भजतील ॥ १२० ॥
वेश्येसी नेसवितील पट्टकूल ॥ मातेसी चिंध्या लावितील ॥
धर्मपत्‍नी विसरतील ॥ रत होतील परदारी ॥ १२१ ॥
उत्तम सुमनहार गुंफून ॥ घालिती वेश्येच्या गळां नेऊन ॥
कंटकपुष्ये सुवासहीन ॥ देवावरी टाकिती ॥ १२२ ॥
हस्तनापुरींचे तुझे बंधू ॥ ते आतांच जपती तुज वधू ॥
भीमासी उपजेल क्रोधू ॥ राज्यसंबंध तुज नाहीं ॥ १२३ ॥
अर्जुनादि बंधू सर्व ॥ आम्हीच मारिले म्हणतील कौरव ॥
धर्मासी नेदूं राणीव ॥ आमचा गौरव आम्हांसी ॥ १२४ ॥
लोक भाविती हस्तनापुरींचे ॥ पांडव हे कोण कोणाचे ॥
कोठील कोणाच्या वीर्याचे ॥ राज्य कैंचें तयांसी ॥ १२५ ॥
आतां कैसा जाशील हस्तनापुरा ॥ धर्म म्हणे यादवेश्वरा ॥
त्या कलीसी आधीं धरा ॥ बांधा बरा आकळून ॥ १२६ ॥
धर्म पुन: पुन: विनवीतसे ॥ जंववरी माझें राज्य असे ॥
तोंवरी बांधविजे यासी हृषीकेशें ॥ आज्ञा शेषाते करूनि ॥ १२७ ॥
हरि म्हणे दूत पाठवून ॥ कलीस आणवीं बांधोन ॥
शेषाज्ञें सेवकजन ॥ धरून आणिती क्षणार्धे ॥ १२८ ॥
पहिल्याहूनि आकळूनि बांधिती ॥ ब्राह्मण म्हणे सौदागराप्रती ॥
मज द्रव्य नलगे निश्चितीं ॥ बोले प्रीतीं द्विज तेधवां ॥ १२९ ॥
सौदागर म्हणे द्विजवरा ॥ हें द्रव्य न्यावे आपुले घरा ॥
तुमच्या आशीर्वादें अवधारा ॥ द्रव्य भांडारीं बहु असे ॥ १३० ॥
धर्म म्हणे कृष्णनाथा ॥ कलि ऐसेंच करील पुढें आतां ॥
कलियुगामाजी राहतो ॥ बरें सर्वथा नव्हेचि ॥ १३१ ॥
शेषें याचकांसी द्रव्य वांटिलें ॥ विप्र सौदागर संतोषले ॥
श्रीकृष्ण आज्ञा घेऊनि आले ॥ अवघ्यांसमवेत गजपुरासी ॥ १३२ ॥
मग पुसोन पांडवांसी ॥ कुंतीद्रौपदीसुभद्रेसी ॥
म्हणे आम्ही जातों द्वारकेसी ॥ बहुत दिवस जाहले ॥ १३३ ॥
सद्‌गद जाहले पंडुनंदन ॥ जा न म्हणवे मुखांतून ॥
म्हणती लौकर यावें परतोन ॥ शरणागता पहावया ॥ १३४ ॥
मग छप्पन्नकोटी यादवांसहित ॥ द्वारकेसी आले वैकुंठनाथ ॥
सोळासहस्त्र एकशत ॥ अष्टनायिका सांगातें ॥ १३५ ॥
एक संवत्सर जाहला पूर्ण ॥ संपादून अश्वमेध यज्ञ ॥
द्वारकेसी जातां मधुसूदन ॥ पंडुनंदन बोळवूं आले ॥ १३६ ॥
पांचही सप्रेम पाय धरिती ॥ परतोनि यावें द्वारकापती ॥
तुझे कृपेनें समाप्ती ॥ अश्वमेध पावला ॥ १३७ ॥
बोळवून सखया श्रीधरा ॥ पांडव आले हस्तनापुरा ॥
द्वारकेत परात्पर सोयरा ॥ कुटुंबेंशीं प्रवेशला ॥ १३८ ॥
जैमिनि म्हणे जनमेजया ॥ अश्वमेध संपला येथूनियां ॥
श्रवण करितां जाती विलया ॥ क्षुद्रप्रकीर्णक पातके ॥ १३९ ॥
करितां अश्वमेध श्रवण ॥ सहस्र धेनु दिधल्यासमान ॥
सकलकलिमलनाशन ॥ अश्वमेध श्रवणें पुण्य होय ॥ १४० ॥
आणि सर्वदा शत्रुपराजय ॥ चतुर्वर्णांस विद्या प्राप्त होय ॥
धनधान्य घरीं न समाय ॥ लया जाती आधिव्याधी ॥ १४१ ॥
संपूर्ण भारताचें पुण्य ॥ एक अश्वमेध करितां श्रवण ॥
हें पुस्तक लिहून ॥ द्यावें दान सत्पात्रीं ॥ १४२ ॥
अश्वमेध ऐकोन ॥ द्यावें ब्राह्मणांसी अश्वदान ॥
वक्त्याप्रति पूजून ॥ ब्राह्मणभोजन करावें ॥ १४३ ॥
हें सोळावे पर्व येथ ॥ अश्वमेध जाहला समाप्त ॥
यावरी आश्रमवासिक अद्‌भुत ॥ पर्व शेवटीं कथियेलें ॥ १४४ ॥
पद्यनाभात्मजजातोद्भवोद्भव ॥ तत्सुतसुताचें भय सर्व ॥
न बाधी ऐकता हें पर्व ॥ ऐसें वचन व्यासाचें ॥ १४५ ॥
प्रासादावरी कळस ॥ आतां शेवटींचा अध्याय सुरस ॥
श्रवण करोत सावकाश ॥ जे कां पंडित सप्रेम ॥ १४६ ॥
जैमिनिअश्वमेध पाहोन ॥ कथा त्याच कथिल्या संपूर्ण ॥
वाउग्या दंतकथा ऐकोन ॥ नाहीं लिहिल्या ग्रंथीं या ॥ १४७ ॥
दुंदुभीविभ्रवंशीआख्यान ॥ मूळग्रंथीं नाहींच जाण ॥
इतर कवी बोलिले सत्कारून ॥ कशावरून न कळे तें ॥ १४८ ॥
मूळ संस्कृतआधाराविण ॥ कविता करी जो अज्ञान ॥
तयास होय बंधन ॥ कल्पांतवरी यमलोकीं ॥ १४९ ॥
कथा असती जरी भारती ॥ तरी कां वर्णावया माझी मती ॥
शिणती हें विचारोनि श्रोतीं ॥ दोष न ठेवावा ग्रंथातें ॥ १५० ॥
असो पुढे एक अध्यायाचे पर्व ॥ आश्रमवासिक नाम अपूर्व ॥
ते श्रवण करा प्रीतीने सर्व ॥ कळसाध्याय गोड तो ॥ १५१ ॥
श्रीमद्धीमातीरनिवासा ॥ ब्रह्मानंदा आदिपुरुषा ॥
श्रीधरवरदा पंढरीशा ॥ अज अविनाशा अभंगा ॥ १५२ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेध जैमिनिकृत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ त्रेसष्टाव्यांत कथियेला ॥ १५३ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि त्रिषष्टितमोऽध्यायः ॥ ६३ ॥
अध्याय त्रेसष्टावा समाप्त


GO TOP