श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय बासष्टावा


चंद्रहास राजाची कथा


श्रीगणेशाय नम: ॥
सव्यसाचीप्रति कथा गहन ॥ सांगे सरसिजोद्भवनंदन ॥
पूर्वी एक नृप पावन ॥ केरलाधिपति नाम तयाचें ॥ १ ॥
त्याला पुत्र जाहला सुलक्षण ॥ चंद्रहास्यनामाभिधान ॥
पृथ्वीवरी ऐसें आन ॥ स्वरूप नाहीं तत्त्वतां ॥ २ ॥
त्या नृपावर आलें परचक्र ॥ युद्ध जाहले सप्त रात्र ॥
केरलाधिपति पावला परत्र ॥ शत्रूंनी नगर घेतलें ॥ ३ ॥
राजजाया करी अग्निप्रवेश ॥ मग उपमातेने घेऊन चंदहास्य ॥
चोरून नेत कुंतलपुरास ॥ निशिदिवस जतन करी ॥ ४ ॥
तीन वर्षें होतां संपूर्ण ॥ धात्रीही गेली मरोन ॥
मग निराधार राजनंदन ॥ आश्रय कोठें नसेचि ॥ ५ ॥
तो शालिग्राम नृसिंहमूर्ती ॥ सांपडली त्या बाळकाप्रती ॥
वदनसंपुटी अहोरात्रीं ॥ प्रीतीनें जतन करी तया ॥ ६ ॥
पूजा करून त्रिकाळ ॥ मुखीं रक्षीत सदा निर्मळ ॥
परदेशीं हिंडे बाळ ॥ म्हणोनि लोक दया करिती ॥ ७ ॥
एक पाचारून अन्न घालिती ॥ एक पांघरावया वस्त्र देती ॥
चिमणे बाळ घेऊनि सांगातीं ॥ बिदोबिदीं खेळत ॥ ८ ॥
बाळ देखोनि सुलक्षणा ॥ तन्मय होती जननयन ॥
कडेवरी घेती उचलोन ॥ घेती चुंबन प्रीतीनें ॥ ९ ॥
तेथील कुंतलेश्वर नृपती ॥ दुष्टबुद्धि नामा पापमती ॥
प्रधान तयाचा निश्चितीं ॥ अति दुरात्मा निर्दय ॥ १० ॥
कामी कुबुद्धि तो क्रूर ॥ पाचारूनि ऋषीश्वर ॥
अन्नसंतर्पण करितसे थोर ॥ तो बाळक समोर देखिला ॥ ११ ॥
प्रधानें बाळ बोलावून ॥ म्हणे तूं येथें करीं भोजन ॥
द्विजपंक्तीं तो सुलक्षण ॥ भोजनासी बैसला ॥ १२ ॥
शालिग्रामासी तुलसी वाहून ॥ सवेच नैवेद्य करी अर्पण ॥
तीर्थ घेऊन करी प्राशन ॥ ऋषी तटस्थ पाहती ॥ १३ ॥
भोजन करून बाळ उठिला ॥ प्रधानाचे पुढें बैसला ॥
ऋषींस ऐसा भाव गमला ॥ कीं पुत्र याचाच निर्धारे ॥ १४ ॥
ब्राह्मण मंत्राक्षता टाकित ॥ हा पुत्र विजयी हो तुझा श्रीमंत ॥
पृथ्वी जिंकोन समस्त ॥ राज्य करो रामाऐसें ॥ १५ ॥
ऐकतां क्षोभला प्रधान ॥ म्हणे पढतमूढ तुम्ही ब्राह्मण ॥
पुत्र कोणाचा नेणोन ॥ आशीर्वाद दिधला त्या ॥ १६ ॥
स्वस्थळा गेले ब्राह्मण ॥ असत्य नव्हे विप्रवचन ॥
चिंता मानसीं दारुण ॥ दुष्टबुद्धीसी लागली ॥ १७ ॥
म्हणे ब्रह्मवचन निश्चितीं ॥ असत्य नव्हे कल्पांतीं ॥
मग अंत्यज जीवघाती ॥ त्यांसी एकांतीं सांगत ॥ १८ ॥
म्हणे हें पोर चाळवूनी ॥ नेऊनि वधा तत्काल वनीं ॥
सहावी अंगुली चरणीं ॥ ते छेदूनि खूण आणावी ॥ १९ ॥
मग ते बाळ घेऊनि वना गेले ॥ शस्त्र मारायासी काढिलें ॥
देखोन बाळ घाबरले ॥ म्हणे कां मज मारितां ॥ २० ॥
तंव ते बोलती वचन ॥ तुज मारवितो प्रधान ॥
चहूंकडे पाहे राजनंदन ॥ दिशा शून्य दिसती ॥ २१ ॥
मग मुखींची काढिली शिळा ॥ करतळीं घेतली ते वेळां ॥
म्हणे करावी करुणा दीनदयाळा ॥ हरे गोविंदा माधवा ॥ २२ ॥
म्हणे मी बाळ अनाथ दीन ॥ आजवरी केलें माझें पालन ॥
जनकजननी तुजविण ॥ मजला कोण ये वेळीं ॥ २३ ॥
धांवें प्रर्‍हादरक्षका जगजेठी ॥ मज ठाव देईं तुझ्या पोटीं ॥
मी तव कंठीं घालीन मिठी ॥ कृपादृष्टीं पाहें कां ॥ २४ ॥
ऐसें बोलोन सप्रेम ॥ मुखीं घातला शालिग्राम ॥
तंव चांडाल निर्दय परम ॥ शस्त्र उचलिती वधावया ॥ २५ ॥
न्यहाळून जंव ते पाहती ॥ तो सिंहवदन रमापती ॥
शंखचक्रादि आयुधें हातीं ॥ उभा पाठीशीं रक्षित ॥ २६ ॥
सुदर्शन धगधगित ॥ हातीं धरिलें क्रोधयुक्त ॥
ब्रह्मांड जाईल समस्त ॥ हेलावत तेज ऐसें ॥ २७ ॥
त्या तेजामाजी निश्चितीं ॥ चंद्र सूर्य बुचकळ्या देती ॥
विद्युल्लता करपोनि जाती ॥ दंतपंक्ती तैशा हो ॥ २८ ॥
भयभीत जाहले चांडाळ ॥ म्हणती कोणीं वधावे हें बाळ ॥
मग सहावी अंगुली तत्काळ ॥ छेदोनि गेले घेऊनियां ॥ २९ ॥
वधिला म्हणोनि दाविली खूण ॥ तोषलें दुष्टबुद्धीचे मन ॥
इकडे बाळ करी रोदन ॥ घोरकांतारीं हिंडत ॥ ३० ॥
रोदनामाजी हरीचा छंद ॥ गात दिव्य नामप्रबंध ॥
तो मृगया करीत राय कुलिंद ॥ त्याच स्थळी पातला ॥ ३१ ॥
बाळ देखोनि सुकुमार ॥ रथ सोडूनि धांवे नृपवर ॥
उचलोन घेतला सुंदर ॥ उदक नेत्रींचें पुशिलें ॥ ३२ ॥
तो नाममाला सुंदर ॥ बाळ उच्चारी वारंवार ॥
देववाणी वदे साचार ॥ राया तुज पुत्र दिधला हा ॥ ३३ ॥
कुलिंदाचा हर्ष न माये गगनीं ॥ नगरास आला परतोनी ॥
भांडारे फोडिलीं तये क्षणीं ॥ याचकांहातीं लुटवित ॥ ३४ ॥
लागला वाद्यांचा एकचि कल्लोळ ॥ चंदनावतीचे लोक सकळ ॥
मंडपघसणी होतसे प्रबळ ॥ पहावया बालकासी ॥ ३५ ॥
कुलिंदाची मेघावती पट्टराणी ॥ कुरवंडी करी पुत्र देखोनी ॥
ओसंगा आडवा घेऊनी ॥ स्तनपान करवीतसे ॥ ३६ ॥
चुकलें बाळक भेटे पुढती ॥ तैशी गगनीं न माय प्रीती ॥
पान्हा फुटला तियेप्रती ॥ न सांवरेच सर्वथा ॥ ३७ ॥
धावले विप्र बहुत ॥ लक्षण पाहून सांगत ॥
नाम चंदहास्य यथार्थ ॥ नसे विपरीत कांहीं हो ॥ ३८ ॥
नगरजन आणिती अहेर ॥ त्यांचे द्विगुण देत नृपवर ॥
लोटले सप्त संवत्सर ॥ मौंजीबंधन जाहलें ॥ ३९ ॥
वेदशास्त्रीं निपुण ॥ जाहला चौसष्टकलाप्रवीण ॥
पुत्रविद्या देखोन ॥ कुलिंदराव तोषला ॥ ४० ॥
राजकारभार समस्त ॥ चंद्रहास्यासी राव देत ॥
यथाकालीं मेघ वर्षत ॥ धरणी पिके असंभाव्य ॥ ४१ ॥
धेनू दुभती अपार ॥ आधि व्याधि नसे अणुमात्र ॥
चंद्रहास्य लोकां समग्र ॥ पाचारूनि सांगत ॥ ४२ ॥
तुलसीवृंदावनें हरिपूजन ॥ पुराणश्रवण हरिकीर्तन ॥
दिनत्रय हरिदिनीव्रत पूर्ण ॥ अन्नोदकदान याचका ॥ ४३ ॥
इतुकें जो न करी सत्य ॥ त्यास दंडीन मी यथार्थ ॥
लोक तैसेंच मग आचरती समस्त ॥ दानधर्म यथाविधि ॥ ४४ ॥
षोडश वर्षें जाहल्या पूर्ण ॥ मेळवून अपार सैन्य ॥
पित्यास म्हणे पृथ्वी जिंकीन ॥ आज्ञा द्यावी महाराजा ॥ ४५ ॥
कुलिंद म्हणे कुंतलेश्वर ॥ त्यास देतों आम्ही करभार ॥
दुष्टबुद्धि प्रधान दुराचार ॥ न शके देखों आम्हांतें ॥ ४६ ॥
चंद्रहास्य बोले उत्तर ॥ पृथ्वी जिंकोन समग्र ॥
मग त्याचा घेईन समाचार ॥ शिक्षा लावीन क्षणमात्रें ॥ ४७ ॥
असो चंद्रहास्यें बहुत ॥ पृथ्वी जिंकिली अकरा दिवसांत ॥
भूमंडळीचे नृपनाथ ॥ जिंकोन आणिले नगरातें ॥ ४८ ॥
कुलिंद सामोरा येत ॥ पुत्र देखोनि आनंदत ॥
चंद्रहास्य साष्टांगें नमित ॥ क्षेम देत पितयासी ॥ ४९ ॥
सर्व राजे पित्यास भेटवून ॥ करवी त्यांहातीं नमन ॥
असो यज्ञ जाहला संपूर्ण ॥ राजे बोळविले स्वस्थाना ॥ ५० ॥
कुलिंद म्हणे ऐक कुमारा ॥ करभार पाठवावा कुंतलेश्वरा ॥
येरू म्हणे आज्ञा दीजे सत्वरा ॥ धरून आणीन क्षणमात्रें ॥ ५१ ॥
कुलिंद म्हणे पूर्वापार ॥ त्यास देतों करभार ॥
स्वामिद्रोह न करावा साचार ॥ चंद्रहास्य अवश्य म्हणे ॥ ५२ ॥
समागमें लोक देऊन सत्वरा ॥ द्रव्य पाठविलें कुंतलपुरा ॥
दुष्टबुद्धीनें भांडारां ॥ द्रव्य सांठविलें समग्र ॥ ५३ ॥
कुलिंदाचे लोकांस यथाविधी ॥ पाहुणेर करी दुष्टबुद्धी ॥
म्हणे जाहली पाकसिद्धी ॥ भोजनासी उठावे ॥ ५४ ॥
तंव ते लोक सत्य विश्वासी ॥ म्हणती आज एकादशी ॥
चंदहास्य कोपेल आम्हांसी ॥ शासन करील तत्काळ ॥ ५५ ॥
चंद्रहास्य आणि हृषीकेश ॥ दोन्हींकडे होईल नाश ॥
क्रोध दाटला दुष्टबुद्धीस ॥ माझे वचनास मान न देती ॥ ५६ ॥
तुमचा कुलिंद आणि चंद्रहास्य ॥ क्षण न लागतां वधीन दोघांस ॥
तंव ते सांगती पराक्रम त्यास ॥ अत्यद्भुत तयाचा ॥ ५७ ॥
सकल जिंकिले नृपनायक ॥ तूं काय त्यापुढें मशक ॥
येथील राज्य सकळिक ॥ घेईल क्षण न लागतां ॥ ५८ ॥
परम कोपला दुष्टबुद्धी ॥ लोक आकळोन घातले बंदीं ॥
कुंतलेश्वराजवळी तो कुबुद्धी ॥ वर्तमान सांगत ॥ ५९ ॥
कुलिंद मातला बहुत ॥ द्रव्य पाठविलें किंचित ॥
त्याचा समाचार घेऊन त्वरित ॥ येतों सत्वर पुढती ॥ ६० ॥
राव म्हणे चंपकमालती ॥ उपवरे कन्या जाहली जाणती ॥
वर सुलक्षण पुरुषार्थी ॥ पाहोनियां आणावा ॥ ६१ ॥
अवश्य म्हणे ते अवसरीं ॥ तो विषया प्रधानकुमारी ॥
पितयास म्हणे निर्धारीं ॥ वर मजही आणावा ॥ ६२ ॥
प्रधानें गणिले दिवस ॥ षोडश वर्षें जाहलीं कन्येस ॥
म्हणे द्यावी जरी शिवास ॥ तरी तो मसणी लोळत ॥ ६३ ॥
विष्णु परद्वारी नाटक ॥ कुलाल तो चतुर्मुख ॥
इंद्रांगी भगें देख ॥ दूषणे समस्त नवग्रहां ॥ ६४ ॥
मग कन्येचे करी समाधान ॥ उत्तम वर आणून करीन लग्न ॥
असो दळभार घेऊन ॥ चंदनावतीस पातला ॥ ६५ ॥
कुलिंद सामोरा येऊन भेटला ॥ दुष्टबुद्धि मंदिरा आणिला ॥
तो म्हणे तुमचा पुत्र पुरुषार्थी भला ॥ भेटवीं वहिला मजलागीं ॥ ६६ ॥
चंद्रहास्य आला तत्काळ ॥ उठून भेटला दुष्ट खल ॥
न्यहाळून पाहे सकल ॥ तो चिन्ह देखिलें अंगुलीचें ॥ ६७ ॥
म्हणे तोच हा बाळ यथार्थ ॥ अंत्यजीं यास सोडिला जीवंत ॥
मग नम्र वचन बोलत ॥ कुलिंदाप्रति तेधवां ॥ ६८ ॥
म्हणे ऐसा पुत्र तुम्हीं लपविला ॥ आमुचे रायासी नाहीं भेटविला ॥
मग चंद्रहास्यस ते वेळां ॥ एकांतासी नेत दुष्टबुद्धि ॥ ६९ ॥
म्हणे मी पत्र देतों लिहूनी ॥ कुंतलपुरा जावें घेऊनी ॥
मदनास भेटावे जाऊनी ॥ तो मी मागून येतो सत्वर ॥ ७० ॥
आमुचा ध्यास तुमचे पायीं ॥ रात्रंदिवस लागला पाहीं ॥
चंद्रहास्य म्हणे लवलाहीं ॥ जातों आतांचि सत्वर ॥ ७१ ॥
दुष्टबुद्धि लिही पत्र ॥ परमचांडाळ अपवित्र ॥
दुष्टाचें मानस कुश्चित फार ॥ इंद्रादिकां न कळेचि ॥ ७२ ॥
सहस्त्रायु चिरंजीव मदना ॥ माझी तुजला हेचि आता ॥
चंद्रहास्यास तव दर्शना ॥ पाठविलें यथार्थ ॥ ७३ ॥
विष दीजे यासी ॥ विचार न पुसे कोणासी ॥
भोजनीं उदकीं निश्चयेंशीं ॥ सर्वथा विसर न पडावा ॥ ७४ ॥
अभ्यंग शयनीं तत्त्वतां ॥ कीं सुगंध अंगीं चर्चितां ॥
उत्साह करावा पुरता ॥ पुत्र आमुचा जरी होसी ॥ ७५ ॥
विचार कोणास न पुसावा ॥ सुदिन कुदिन न पहावा ॥
आमुचा मार्ग न लक्षावा ॥ बरा करावा उत्साह ॥ ७६ ॥
पत्र गुंडाळोनि करीं देत ॥ म्हणे एकलेच तुम्हीं जावें तेथ ॥
मग चंद्रहास्य त्वरित ॥ पितयास आज्ञा पुसतसे ॥ ७७ ॥
म्हणे कुंतलपुरास जाऊन ॥ सत्वर येतों परतोन ॥
तत्काल वारूवरी बैसोन ॥ एकलाच निघाला ॥ ७८ ॥
शतयोजनें पंथ क्रमोनी ॥ कुंतलपुरासमीप येऊनी ॥
राहूनियां उपवनीं ॥ स्नान करोनि पूजा करीतसे ॥ ७९ ॥
केले शालिग्रामाचें अर्चन ॥ सहस्रनाम केलें पठन ॥
जवळी होतें तें निर्दोषान्न ॥ केलें भोजन चंद्रहास्ये ॥ ८० ॥
विडा घेऊन ते अवसरीं ॥ निद्रा केली क्षणभरी ॥
तो वनक्रीडेस सुंदरी ॥ विषया आली त्या स्थाना ॥ ८१ ॥
सवें सखिया पांचशत ॥ नाना चातुर्यकला दावित ॥
विषया दुरोनि देखत ॥ पुरुष निद्रित जाहला तो ॥ ८२ ॥
म्हणे वारू वृक्षास बांधोन ॥ कोणीं येथें केलें शयन ॥
सकल सख्यास चुकवून ॥ एकलीच आली तेथें ॥ ८३ ॥
शंकतशंकत जात ॥ वृक्षाआड लपतलपत ॥
मनामाजी चिंतित ॥ क्षण एक निद्रित असो कां ॥ ८४ ॥
जवळी येऊन जंव पाहत ॥ अंगींच्या कला दिव्य फांकत ॥
जैसा केवळ रतिकांत ॥ शोभायमान दिसतसे ॥ ८५ ॥
तो जवळी गांठ देखत ॥ ती सोडोनि जंव पहात ॥
तो शालिग्राम दीप्तिमंत ॥ म्हणे विष्णुभक्त असे हा ॥ ८६ ॥
पुढती पाहे झडकरी ॥ तो पत्र देखे तो अवसरीं ॥
पितृमुद्रा ओळखून अंतरीं ॥ परम संतोष वाटला ॥ ८७ ॥
उकलून पत्र वाचित ॥ विष दीजे यास त्वरित ॥
वरकड लेखनपदांचा अर्थ ॥ उत्तमचि निघाला ॥ ८८ ॥
म्हणे हें कां विपरीत ॥ तांतडी जाहली यथार्थ ॥
अक्षर चुकलें सत्य ॥ तरी येथें कैसें करावें ॥ ८९ ॥
तेव्हां नखें नेत्रींचें काजळ ॥ काढून तेथें लिहिलें तत्काळ ॥
विषया देई यास प्रांजळ ॥ ऐसें लिहून पत्र बांधिलें ॥ ९० ॥
मग म्हणे जय जय भवानी ॥ तुष्टलीस मजलागोनी ॥
हा वर देई ये क्षणीं ॥ आणीक कांहीं न मागें तूतें ॥ ९१ ॥
स्वरूप सुंदर देखोनी ॥ म्हणे मी जाईन ओंवाळूनी ॥
वारा घालूं काय ये क्षणीं ॥ घर्म पातला शरीरास ॥ ९२ ॥
जरी जागा जाहला प्राणनाथ ॥ तरी तेही गोष्ट अनुचित ॥
मायाजाळ परमाद्भुत ॥ गुंडाळत अंतःकरण ॥ ९३ ॥
सवेंच सख्यांमाजी मिळाली ॥ आपुले गृहासी पातली ॥
मनांत चिंता लागली ॥ ती न सांगे कोणातें ॥ ९४ ॥
चंद्रहास्य जागा होऊन ॥ सत्वर वारूवरी बैसोन ॥
प्रधानगृहास येऊन ॥ वृत्तांत आंत पाठविला ॥ ९५ ॥
ऐकतो मदन आला धांवत ॥ क्षेमालिंगन प्रीतीनें देत ॥
मंदिरांत नेऊन त्वरित ॥ पूजा केली प्रीतीनें ॥ ९६ ॥
चंद्रहास्य पत्र देत ॥ मदन उकलून पहात ॥
विषया दीजे त्वरित ॥ पदें समस्त उत्तमचि ॥ ९७ ॥
घरांत घेऊन गेला लिखित ॥ मातेपुढें धडधडां वाचित ॥
म्हणे त्वरा करा बहुत ॥ पत्र वडिलीं लिहिलें असे ॥ ९८ ॥
तो स्त्रिया येऊनि समस्त ॥ गवाक्षद्वारें विलोकित ॥
स्वरूपास उणा रतिकांत ॥ हर्षभरित सर्व जाहल्या ॥ ९९ ॥
मदन मातेस म्हणत ॥ आज्ञा करावी जी त्वरित ॥
तंव ती म्हणे उत्तम बहुत ॥ करा तयारी या समयीं ॥ १०० ॥
बाहेर आला मदन ॥ आणविले ज्योतिषी बोलावून ॥
म्हणे सांगा कधीं सुलग्न ॥ येर विचारून बोलती ॥ १०१ ॥
उत्तम लग्न आजि असे ॥ पुढें सातां मासांवांचोनि नसे ॥
बाप चरित्र केलें हृषीकेशें ॥ त्वरा म्हणोनि उठिले ॥ १०२ ॥
नवरा गुप्तरूपें नेऊनी ॥ बैसविला शेजारले सदनीं ॥
मदनस्त्रिया जाऊनी ॥ जाहल्या बहिणी चंद्रहास्या ॥ १०३ ॥
वर्‍हाडी मिळाले बहुत ॥ हळद वधूवरांस लावित ॥
विप्र स्वस्तिवाचन संपादित ॥ गजरें वाजती वाजंत्रें ॥ १०४ ॥
वर सुंदर देखोन ॥ बोलती नगरींचे जन ॥
म्हणती विषयेचें भाग्य धन्य ॥ ऐसें निधान जोडलें ॥ १०५ ॥
लग्नघटिका जवळी आली ॥ विषया श्रृंगारून आणिली ॥
मधुपर्कादि पूजा केली ॥ आरंभिलीं मंगलाष्टकें ॥ १०६ ॥
अंतःपट गेला फिटोन ॥ लोक म्हणती सावधान ॥
दोघां जाहले पाणिग्रहण ॥ लाजाहोमादि सर्वही ॥ १०७ ॥
इकडे दुष्टबुद्धीनें केला अनर्थ ॥ कुलिंदास आकळून बंदींत घालित ॥
नगर विध्वंसोनि समस्त ॥ कलह करून निघाला ॥ १०८ ॥
तो वाटेस सर्प बोलिला एक ॥ मी तुझ्या द्रव्याचा रक्षक ॥
मदनें वेचिलें सकळिक ॥ विषयेच्या विवाहातें ॥ १०९ ॥
घाबरला प्रधान ॥ तो पुढें येतां देखिले ब्राह्मण ॥
म्हणे कोठूनि आलां रे अवघे जण ॥ दटावून उभे केले ॥ ११० ॥
तो ते आशीर्वाद देत ॥ धन्य तुझा मदन सुत ॥
द्रव्य वेंचिलें अपरिमित ॥ लग्न जाहले विषयेचें ॥ १११ ॥
सेवकांस म्हणे धरा ब्राह्मण ॥ जिव्हा यांच्या टाका उपटून ॥
द्रव्य घेतलें हिरोन ॥ मग दिधले सोडून ॥ ११२ ॥
मंदिरास आला त्वरित ॥ मदन पित्यास नमस्कारित ॥
तो म्हणे मीं काय लिहिलें लिखित ॥ कैसा अनर्थ केला तुवां ॥ ११३ ॥
येरू म्हणे पत्र पाहून ॥ तत्काळचि लाविलें लग्न ॥
पहा वधूवरें कैशीं सुलक्षण ॥ द्रव्य संपूर्ण वेचिलें ॥ ११४ ॥
पत्र आणविलें सत्वर ॥ अक्षरें वाचली सादर ॥
तो विषया दीजे हें उत्तर ॥ मग उगाचि राहिला ॥ ११५ ॥
म्हणे लेखणी गेली चांचरी ॥ कीं डोळा पडली अंधारी ॥
मदनास म्हणे ते अवसरीं ॥ उत्तम कृत्य केलें तुवां ॥ ११६ ॥
म्हणे कुंतलेश्वरासी येई नमून ॥ सांग सकल वर्तमान ॥
तत्काळ निघाला मदन ॥ रायाप्रति सांगत ॥ ११७ ॥
प्रधान आले ग्रामाहून ॥ निद्रा केली आहे श्रमोन ॥
आणि साड्यांचें आहे कारण ॥ जाहले लग्न विषयेचें ॥ ११८ ॥
तो लोक जवळील सांगती ॥ जो कां चंद्रहास्य भूपती ॥
पृथ्वीवरी ज्याची ख्याती ॥ विषयेस वर तो केला ॥ ११९ ॥
राजा जाहला कोपायमान ॥ माझें कन्येचे सोडून लग्न ॥
आपुले कन्येलागून ॥ वर सुंदर मेळविला ॥ १२० ॥
एक म्हणती तोच वर आणून ॥ चंपकमालती द्यावी पूर्ण ॥
मग राये अपार जन ॥ मदनासंगतीं दिधले ॥ १२१ ॥
वर आणा गजीं बैसवूनी ॥ देऊं तया चंपकमालती ॥
सुलग्न आहे येच क्षणीं ॥ उशीर आतां न लावावा ॥ १२२ ॥
तो इकडे दुष्टबुद्धि काय करित ॥ अंत्यज बोलावूनि सांगत ॥
म्हणे चडिकेचे देवळांत ॥ अंधारीं गुप्त बैसावें ॥ १२३ ॥
जो येईल पूजा घेऊन ॥ तेथेंच घ्यावा त्याचा प्राण ॥
मग म्हणे चंद्रहास्यालागून ॥ करा पूजन चंडिकेचें ॥ १२४ ॥
पूजा घेऊन ते वेळां ॥ एकलेच जावें देउळा ॥
नवस पाहिजे पुरविला ॥ मग साडे होतील ॥ १२५ ॥
अवश्य म्हणोनि त्वरित ॥ एकलाच चंद्रहास्य अंधारांत ॥
नगराबाहेर जात ॥ चंडिकेलागी पूजावया ॥ १२६ ॥
तो नगराबाहेर भयभीत ॥ मदन आला भारेंसहित ॥
चंद्रहास्यस देखोन म्हणत ॥ एकलेच कोठे जाता ॥ १२७ ॥
आम्हांवरी कोपला नृपनाथ ॥ तुम्हांस बोलाविलें तेथ ॥
येरू म्हणे अंबा पूजोनि त्वरित ॥ मग मी सत्य येईन ॥ १२८ ॥
मदन म्हणे मी जाऊन ॥ येतों सत्वर पूजा करून ॥
चंद्रहास्यास गजी बैसवून ॥ गेलें मिरवत राजसदना ॥ १२९ ॥
राये तत्काळ लाविलें लग्न ॥ वरदक्षिणा राज्य दिधलें दान ॥
चंद्रहास्यावरी छत्र धरून ॥ कुंतलेश्वर गेला तपातें ॥ १३० ॥
चंपकमालती संगे घेऊनी ॥ वरात निघाली तेच क्षणीं ॥
प्रधानगृहालागोनी ॥ येता जाहाला चंद्रहास्य ॥ १३१ ॥
होत वाद्यांचा गजर ॥ प्रधानास सांगती सत्वर हेर ॥
आले चंद्रहास्य नृपवर ॥ चंपकमालती घेऊनियां ॥ १३२ ॥
प्रधान म्हणे तयांलागूनी ॥ काय रे बोलतां ऐशी वाणी ॥
यांच्या जिव्हा छेदा कोणी ॥ तंव वधूवरें नयनीं देखिली ॥ १३३ ॥
तो चंद्रहास्य म्हणे प्रधानासी ॥ मज पाठवून राजसदनासी ॥
मदन गेला अंबिकेसी ॥ पूजावयाकारणें ॥ १३४ ॥
दुष्टबुद्धि वेगें धांवत ॥ नगराबाहेर आला त्वरित ॥
तया देखोन भूतें भयभीत ॥ विटाळ त्याचा न व्हावा ॥ १३५ ॥
देवळांत आला प्रधान ॥ तो छिन्नभिन्न जाहला मदन ॥
तेणें मस्तक आपटून ॥ दिधला प्राण तेथेंचि ॥ १३६ ॥
इकडे चंद्रहास्य साडे करून ॥ दोघी स्त्रिया सांगातें घेऊन ॥
राजगृहाप्रति येऊन ॥ सिंहासनीं बैसला ॥ १३७ ॥
प्रातःकाल जाहला त्वरित ॥ तंव गुरव आले धांवत ॥
म्हणती पुत्रासमवेत ॥ प्रधान रंगशिळेवरी पडलासे ॥ १३८ ॥
वर्तमान ऐकोनि विरस ॥ घाबरा जाहला चंद्रहास्य ॥
टाकीत आला श्वासोच्छ्वास ॥ चंडिकेच्या देवालयीं ॥ १३९ ॥
प्रेते देखोनि बोलत ॥ कोणीं केले हो जीवघात ॥
नगरलोक म्हणत ॥ नेणों निश्चित राजेंद्रा ॥ १४० ॥
मग करूनि हवन ॥ करी अंबिकेचें स्तवन ॥
शिवललना जाहली प्रसन्न ॥ माग वरदान म्हणे तेव्हां ॥ १४१ ॥
येरू म्हणे या दोघाते ॥ उठवीं आतां जगन्माते ॥
तंव ते निद्रितापरी अवचिते ॥ मदन प्रधान उठती ॥ १४२ ॥
वाद्यांचा गजर होत ॥ चंद्रहास्ये आणिले मिरवित ॥
तो चंदनावतीचे दूत ॥ वर्तमान सांगती ॥ १४३ ॥
दुष्टबुद्धीनें कुलिंद आकळिला ॥ सकल संपदा हरूनि गेला ॥
मग दुष्टबुद्धि घरीं बैसविला ॥ मदना दिधला प्रधानपट्ट ॥ १४४ ॥
मग मातापिता सत्वरा ॥ चंद्रहास्यें आणिलीं कुंतलपुरा ॥
वर्षें तीनशत अवधारा ॥ राज्य केलें सुखरूप ॥ १४५ ॥
औदार्य धैर्य परोपकार ॥ धर्मरायासम गंभीर ॥
पराक्रमी पुण्यशील निर्धार ॥ सप्रेमभक्त विश्वासी ॥ १४६ ॥
तितुक्या लक्षणीं मंडित ॥ चंद्रहास्य राजा राज्य करित ॥
विषयेस मकरध्वजनामा सुत ॥ महापराक्रमी जाहला ॥ १४७ ॥
पद्माक्ष नामें सुंदर ॥ चंपकमालतीस जाहला कुमार ॥
पित्यासमान बलाढ्य अपार ॥ रणपंडित भक्त दोघे ॥ १४८ ॥
नगराबाहेर येऊन ॥ मृगया खेळता दोघे जण ॥
तुम्हां देखतां श्यामकर्ण ॥ घेऊनि गेले न कळे तुम्हां ॥ १४९ ॥
विद्युल्लता लवोनि जाये ॥ तैसे घोडे नेले लवलाहें ॥
युद्ध करितां तुम्हां पाहें ॥ सर्वथा ते नाटोपती ॥ १५० ॥
चंद्रहास्याची कथा सांगोन ॥ नारद पावला अंतर्धान ॥
मग बोले वीर अर्जुन ॥ कथा ऐकिली मनोहर ॥ १५१ ॥
इकडे श्यामकर्ण पाहोन ॥ चंदहास्य बोले सुहास्यवदन ॥
म्हणे पुत्र हो ऐका वचन ॥ उत्तम एक जाहले ॥ १५२ ॥
श्रीरंग आणि अर्जुन ॥ साक्षात हे नरनारायण ॥
त्यांस आतां सामोरे जाऊन ॥ सन्मानेंकरोनि आणावें ॥ १५३ ॥
श्यामकर्ण देऊन त्यांसी ॥ साह्य होऊं धर्मकृत्यासी ॥
ऐसें बोलोनि वेगेंशीं ॥ चंदहास्य निघाला ॥ १५४ ॥
अपार घेऊन दळभारा ॥ चरणचालीं जात नृपवर ॥
तो दूर देखोनि यादवेंद्र ॥ ब्रह्मानंदें उचंबळला ॥ १५५ ॥
येतां देखोनि चंद्रहास्य ॥ रथाखालीं उतरे जगन्निवास ॥
पूर्णब्रह्म आदिपुरुष ॥ भक्तमानससंतोषक जो ॥ १५६ ॥
चंद्रहास्यें सप्रेम होऊन ॥ श्रीकृष्णास घातलें लोटांगण ॥
तो भगवंतें उचलोन ॥ हृदयीं धरिला प्रीतीनें ॥ १५७ ॥
सर्व राजे आश्चर्य करिती ॥ धन्य या चंद्रहास्याची भक्ती ॥
जेणें अकरा दिवसांत जिंकिली क्षिती ॥ ऐसा पुरुषार्थी नसे दुजा ॥ १५८ ॥
हरीनें चंदहास्य हृदयीं धरिला ॥ सोडावा हें न वाटे घननीळा ॥
जैसा कृपणास ठेवा सांपडला ॥ तो न विसंबें जीवेंभावेंशीं ॥ १५९ ॥
चंद्रहास्य धरी हरिचरण ॥ आनंदें करी अपार स्तवन ॥
म्हणे धन्य धन्य आजि नयन ॥ पूर्णब्रह्म विलोकिलें ॥ १६० ॥
पार्थाप्रति मधुसूदन ॥ भेटवी चंद्रहास्यालागून ॥
मग बोले अर्जुन ॥ दोन्ही घोडे येणें धरियेले ॥ १६१ ॥
युद्धास आला उचलून ॥ कैसें यास द्यावें आलिंगन ॥
क्षत्रियधर्म न सांडावा पूर्ण ॥ त्वांच पूर्वी निरूपिलें ॥ १६२ ॥
हरि म्हणे पार्थास ॥ हा नव्हे केवळ मनुष्य ॥
देवांहून विशेष ॥ स्वरूप याचें जाण तूं ॥ १६३ ॥
ऐसें मदनजनकें बोलोन ॥ करविलें दोघां आलिंगन ॥
मग सर्वही राजे येऊन ॥ अनुक्रमें भेटले ॥ १६४ ॥
कटकासमवेत अर्जुन ॥ तेणें राहविला सप्तदिन ॥
अपार संपत्ति आणून ॥ कृष्णापुढे समर्पिल्या ॥ १६५ ॥
चंद्रहास्यास म्हणे नारायण ॥ चला संगे घेऊनि श्यामकर्ण ॥
धर्मरायास भेटून ॥ यज्ञ समाप्त करूं त्याचा ॥ १६६ ॥
पद्माक्ष मकरध्वज बोलावून ॥ चंद्रहास्य बोले सुहास्यवदन ॥
द्या रे श्यामकर्ण आणून ॥ मग ते वचन बोलती ॥ १६७ ॥
आला असे भारती वीर ॥ पूर्वी कौरव मारिले समग्र ॥
तें हस्तलाघव पाहूं क्षणभर ॥ मग देऊं वारू हे ॥ १६८ ॥
चंदहास्य बोले वचन ॥ हरिवचना दीजे मान ॥
मग अणूनि श्यामकर्ण ॥ हरीपुढें समर्पिले ॥ १६९ ॥
अपार चमूसह जाण ॥ साह्य दिधले दोघे नंदन ॥
चंद्रहास्यासी राहवून ॥ कृष्णार्जुन निघाले ॥ १७० ॥
ब्रह्मानंदें म्हणे श्रीधर ॥ सोडून चंद्रहास्याचें नगर ॥
दोन्ही वारू सत्वर ॥ चालिले पुढें ऐका तें ॥ १७१ ॥
पुढें लागलें मेदिनीवसन ॥ श्यामकर्ण धांवती वरून ॥
सेना न चाले तेधून ॥ तीरीं सर्व खोळंबले ॥ १७२ ॥
मग बोले रमानाथ ॥ मी आणि प्रद्युम्न पार्थ ॥
हंसकेत मयुरकेत ॥ पांचांचे रथ चालती येथें ॥ १७३ ॥
उदकावरून सत्वर ॥ गेले पांचांचे रहंवर ॥
तो बेटावरी वटवृक्ष थोर ॥ देखते जाहले तेधवां ॥ १७४ ॥
तों एका वटपत्रावरी जाण ॥ बैसला एक तपोधन ॥
तो बकदाल्भ्य महाराज पूर्ण ॥ तप करीत देखिला ॥ १७५ ॥
एका पत्राची वरी साउली ॥ एका पत्राचें आसन तळीं ॥
सर्वही देखोनि तये वेळीं ॥ नमिती भावें तपोधना ॥ १७६ ॥
बकदाल्भ्य म्हणे पार्था ॥ परब्रह्म घरीं असतां ॥
कां रे याग मांडिला वृथा ॥ आटाआटी व्यर्थचि ॥ १७७ ॥
आवडीनें घेतां ज्याचें नाम ॥ सकल पापें होती भस्म ॥
तो हा श्रीकृष्ण परब्रह्म ॥ घरीं असतो नेणा तुम्ही ॥ १७८ ॥
पार्थ म्हणे ते समयीं ॥ स्वामी आश्रम केला नाहीं ॥
तो म्हणे नलगे कांहीं ॥ दारा पुत्र आणि गृह ॥ १७९ ॥
क्षणिक आयुष्य क्षणिक संसार ॥ मरीचिजलवद्भासमात्र ॥
तेथें गुंतोनि राहती जे नर ॥ ते पडती दुःखार्णवीं ॥ १८० ॥
पार्थ म्हणे तयास ॥ तुम्हांस जाहले किती दिवस ॥
बकदाल्भ्य म्हणे पार्था परिस ॥ संख्या मज न सांपडे ॥ १८१ ॥
मार्कंडेय लोमश भले ॥ किती वेळां मेले उपजले ॥
द्विदश ब्रह्मदेव जाहले ॥ मज देखतां जाण पार्था ॥ १८२ ॥
अवघी जलमय सष्टि होत ॥ तेव्हां वटपत्रीं एक बाळक निजत ॥
रोदन करी सवेंच हांसत ॥ देखिलें बहुत वेळां म्यां ॥ १८३ ॥
तो बाळ म्हणसी कोण ॥ तरी पार्था हाचि श्रीकृष्ण जाण ॥
तो त्वां केला आपणाधीन ॥ पंडुनंदन धन्य तुम्ही ॥ १८४ ॥
माझें आयुष्य क्षणिक साचार ॥ म्हणोन न करीं मठ कां घर ॥
जलबुद्‌बुदन्यायें शरीर ॥ पडेल केव्हां न कळेचि ॥ १८५ ॥
कमलिनीपत्रावरील जळ ॥ केव्हां जाईल न कळे चपळ ॥
तैसा जगदाभास केवळ ॥ मिथ्यामय लटकाचि ॥ १८६ ॥
जें जें दिसे तें तें नाशिवंत ॥ श्रीकृष्णस्वरूप एक शाश्वत ॥
ऐसें बोलोनि सद्‌गदित ॥ बकदाल्भ्य जाहला ॥ १८७ ॥
म्हणे कृष्णा क्षेम दे मजलागोन ॥ हरीनें हृदयीं धरिला तपोधन ॥
जैसें क्षीराब्धीने दिधलें आलिंगन ॥ आपुलिया लहरींप्रति ॥ १८८ ॥
हरि म्हणे तपोधना ॥ चला जाऊं धर्मदर्शना ॥
येरू म्हणे मनमोहना ॥ अवश्य येईन तव वचनें ॥ १८९ ॥
बकदाल्भ्य म्हणे पार्था जाण ॥ मज ब्रह्मा आला व्हावया प्रसन्न ॥
मनीं गर्व अत्यंत धरून ॥ म्हणे मज माग कांहीं ॥ १९० ॥
तंव दोघेही उडालों ॥ आणिके ब्रह्मांडांत पडलों ॥
मायामोहें भुललों ॥ लोक पुसती आम्हांतें ॥ १९१ ॥
म्हणती तुम्ही कोण तत्त्वतां ॥ ब्रह्मा म्हणे मी विश्वकर्ता ॥
तंव ते म्हणती मरशी आतां ॥ जीव मी हें म्हणवीं तूं ॥ १९२ ॥
येथें अष्टमुखी ब्रह्मदेव जाण ॥ तुज येथें लेखिती कोण ॥
तंव आम्ही अवघेच उडोन ॥ गेलों तिसरे ब्रह्मांडीं ॥ १९३ ॥
तेथें षोडशमुखी ब्रह्मा पाहीं ॥ तेधून उडालों सर्वही ॥
तो बत्तीस मुखांचा विधि तोही ॥ आणिक ब्रह्मांडीं देखिला ॥ १९४ ॥
एवं सहस्रमुखांचा ब्रह्मा ॥ तेथवरी पाहिली सीमा ॥
मग चिंतून ब्रह्मानंदा सौख्यधामा ॥ निजस्थाना पातलों ॥ १९५ ॥
ते या कृष्णाची माया गहन ॥ सुभद्रापते सत्य जाण ॥
सर्वांचे गर्व गेले हरोन ॥ कृष्णचरण वंदिती ॥ १९६ ॥
असो बकदाल्भ्य ते वेळां ॥ शिबिकेमाजी बैसविला ॥
दळभार माघारां परतला ॥ श्यामकर्णासमवेत ॥ १९७ ॥
जयद्रथाचे राज्यावरून ॥ वेगें चालिला वीर अर्जुन ॥
तेथें दुर्योधनाची भगिनी जाण ॥ दौःशील नामें पुत्र तियेचा ॥ १९८ ॥
तो जाहला भयभीत ते वेळां ॥ पार्थभयें मूर्च्छित पडला ॥
शरण आली दुःशीला ॥ कृष्णार्जुनांस ते वेळे ॥ १९९ ॥
म्हणे तूं बंधू माझा वेल्हाळ ॥ एकुलते एक माझें बाळ ॥
जयद्रथाचे अन्याय सकळ ॥ आठवून भय पावला ॥ २०० ॥
मग पार्थ उठोनि त्वरित ॥ हृदयीं धरिला तो भगिनीसुत ॥
सहस्र हस्ती द्रव्य अपरिमित ॥ भगिनीप्रती दिधलें ॥ २०१ ॥
याग पहावया ते वेळीं ॥ प्रीतीनें दोघें घेतलीं ॥
गांधारी धृतराष्ट्र वृद्ध जाहलीं ॥ भेटती तयांतें ॥ २०२ ॥
असिपत्रव्रतेंकरून ॥ धर्मराजा बहुत क्षीण ॥
यालागीं सर्व देश जिंकून ॥ उभयकृष्ण परतले ॥ २०३ ॥
बहुत देशींच्या संपत्ती ॥ घेऊनियां सुभद्रापती ॥
नाना देशींचे मनुष्य चालती ॥ भार माथां घेऊनियां ॥ २०४ ॥
मग गजपुरासमीप आले भार ॥ सवें पृथ्वीचे सकल नृपवर ॥
रथारूढ होऊनि श्रीधर ॥ गेला आधीं धर्मापाशीं ॥ २०५ ॥
तो भागीरथीतीरीं मंडपांत ॥ धर्मराज बैसला व्रतस्थ ॥
तो रथारूढ रुक्मिणीकांत ॥ एकाएकीं देखिला ॥ २०६ ॥
हरि म्हणे हस्त उभारून ॥ विजय आला विजयी होऊन ॥
पृथ्वीचे भूभुज घेऊन ॥ धर्मा तुज भेटों आला ॥ २०७ ॥
आनंदोनि धर्म धांवत ॥ हृदयीं धरिला द्वारकानाथ ॥
सहस्रभुजा फुटत ॥ आलिंगन द्यावया तेधवां ॥ २०८ ॥
भीम नकुल सहदेव ॥ इहीं वंदिला रमाधव ॥
जाहलें वर्तमान सर्व ॥ धर्माप्रति हरि सांगे ॥ २०९ ॥
गेलिया दिवसापासोन ॥ जें जें जाहलें वर्तमान ॥
सकळ रायांचीं नामें घेऊन ॥ चरित्रे सर्व कथियेलीं ॥ २१० ॥
आश्चर्य करी युधिष्ठिर ॥ तूं पाठिराखा असतां श्रीधर ॥
कोणी एक संकटविचार ॥ उणें पडों न देशी ॥ २११ ॥
या शरीराच्या पादुका करून ॥ तुझे पायीं लेविल्या पूर्ण ॥
तरी आम्ही न होऊं उत्तीर्ण ॥ अनंत जन्में गोपाळा ॥ २१२ ॥
द्रौपदी सुभद्रा कुंती ॥ सर्वांस भेटला वैकुंठपती ॥
रुक्मिण्यादि सर्व युवती ॥ षोडशसहस्र भेटल्या ॥ २१३ ॥
सत्यभामा म्हणे मुरारी ॥ कुब्जेऐशा बहुत नारी ॥
कित्येक भोगिल्या रे सुंदरी ॥ ऐकतो कंसारि हांसत ॥ २१४ ॥
तुम्हांस कोणी एकदा प्रार्थितां ॥ मग तिजसारिखे तुम्ही होतां ॥
लहान थोर कृष्णनाथा ॥ समान तुम्हांस सर्वही ॥ २१५ ॥
तो जयवाद्यें वाजवित ॥ नगरासमीप आला पार्थ ॥
कृष्ण भीम नकुलादि समस्त ॥ सामोरे जात गजरेंशी ॥ २१६ ॥
नानापरींचे उत्साह करित ॥ दोन्ही घोडे घेऊनि पार्थ ॥
धर्मरायास भेटत ॥ नाहीं अंत आनंदा ॥ २१७ ॥
गजारूढ होऊनि कुमारी ॥ मुक्ताफळे वर्षती पार्थावरी ॥
रत्‍नदीप घेऊनि नारी ॥ ओवाळिती अर्जुना ॥ २१८ ॥
नाना सुगंध घेऊनी ॥ उधळिती गोपुरावरूनी ॥
जाळियांतून सर्व कामिनी ॥ विलोकिती सोहळा तो ॥ २१९ ॥
यशोदा देवकी कुंती गांधारी ॥ द्रौपदी सुभद्रा चित्रांगी सुंदरी ॥
उलूपी प्रमिलादि नारी ॥ पाहोन मुक्तें वर्षती ॥ २२० ॥
समागमें जे जे राजे आले ॥ ते ते पार्थे धर्मास भेटविले ॥
बकदाल्भ्यासी वंदिलें ॥ धर्मरायें तेधवां ॥ २२१ ॥
बभ्रुवाहन वृषकेत ॥ मेघवर्ण घटोत्कचसुत ॥
तिघे येऊन अंतःपुरांत ॥ सर्व मातांस वंदिती ॥ २२२ ॥
सर्वही राजे प्रीतीं ॥ धृतराष्ट्रास वंदिती ॥
विदुराप्रति आलिंगिती ॥ मग नमिती वृद्ध स्त्रिया ॥ २२३ ॥
आतां यावरी याग ॥ होईल सर्वप्रकारे सांग ॥
तें प्राकृत भाषेत पांडुरंग ॥ बोलवील ब्रह्मानंदें ॥ २२४ ॥
हें अश्वमेधपर्व ॥ अष्टादशांमाजी अति अपूर्व ॥
श्रवण करोत पंडित सर्व ॥ अत्यादरेंकरोनियां ॥ २२५ ॥
श्रीधरवरदा पांडुरंगा ॥ क्षीराब्धिजाहृदयारविंदभृंगा ॥
नीलजीमूतवर्णा कोमलांगा ॥ वंद्य त्रिभुवना तूं एक ॥ २२६ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेधपर्व जैमिनिकृत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ बासष्टाव्यांत कथियेला ॥ २२७ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि द्विषष्टितमोऽध्यायः ॥ ६२ ॥
अध्याय बासष्टावा समाप्त


GO TOP