श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय पंचावन्नावा


धृतराष्टाचा राग आणि गांधारीचा शाप


श्रीगणेशाय नम: ॥
वैशांपयन म्हणे राया ऐक ॥ मागें पर्व संपलें विशोक ॥
पुढें स्त्रीपर्व सुरेख ॥ आतां परिसा यावरी ॥ १ ॥
संजय म्हणे कुरुवर्या ॥ करीं सर्वांची उत्तरक्रिया ॥
अंधास मूर्च्छा येऊनियां ॥ उर्वीवरी पडिला हो ॥ २ ॥
मग बोले विदुर सुमती ॥ ऊठ सर्वांची हेचि गती ॥
व्यर्थ कां करिसी आतां खंती ॥ पडली भ्रांति तुजलागीं ॥ ३ ॥
सायंकाळी पक्षी देख ॥ एका वृक्षी बैसले अनेक ॥
सवेंच उगवतां अर्क ॥ गेले सर्व उडोनियां ॥ ४ ॥
तरी त्या पक्ष्यांलागीं देख ॥ कां वृक्षानेंच करावा शोक ॥
तूं हृदयीं धरूनियां विवेक ॥ नाठवीं पुत्रवेदना ॥ ५ ॥
गंगेतवाहत आलीं नेटें ॥ संगमीं मिळाली दोन्ही काष्ठे ॥
बहुत दिवस होती एकवटें ॥ ऋणानुबंधेंकरूनियां ॥ ६ ॥
त्यांत एक नेले धरून ॥ एक धारेत गेलें वाहून ॥
तैसे दारा बंधू आप्त स्वजन ॥ ऋणानुबंधें घडामोड ॥ ७ ॥
कुलालें पात्रे केलीं एकसरीं ॥ तीं लोकीं नेलीं घरोघरीं ॥
तीं वर्तती कोणे व्यापारीं ॥ कासया कुलालें विचारावे ॥ ८ ॥
छायेस बैसले बहुत नर ॥ सवेंच उठून गेले सत्वर ॥
तरी शोक करावया तरुवर ॥ सिद्ध कदा नव्हेचि ॥ ९ ॥
मातेनें तान्ह्या दिधलें विष ॥ पित्यानें विकिलें पुत्रास ॥
रायानें नगर केलें ओस ॥ तरी कोणास सांगावें ॥ १० ॥
तैसें ईश्वराधीन सर्व सूत्र ॥ नाचवी पुतळे चित्रविचित्र ॥
पहा अभिमन्युसारिखा वीर ॥ रणांगणीं पडियेला ॥ ११ ॥
ज्याचा मातुल श्रीधर ॥ क्षणें सृष्टि क्षणें संहार ॥
जिवे मारूनि वांचविणार ॥ तोही जवळी होता कीं ॥ १२ ॥
अर्जुनासारिखा पिता असोन ॥ जेणें समरी जिंकिला पाकशासन ॥
परी उठवावया अभिमन्य ॥ न जाहली शक्ति कोणासी ॥ १३ ॥
ऐसें विदुरें बोधून ॥ सकल सामग्री सिद्ध करून ॥
शतकौरवकामिनी शोकीं निमग्न ॥ शिबिकारूढ चालिल्या ॥ १४ ॥
गांधारी कुंती आदिकरूनी ॥ दुर्योधनाची पट्टराणी ॥
निघाल्या वहनापुढें दंडपाणी ॥ सहस्रावधि धांवती ॥ १५ ॥
संजय धृतराष्ट विदुर ॥ रथीं बैसोन जाती सत्वर ॥
कर्णस्त्रिया सुकुमार ॥ लावण्यहरिणी निघाल्या ॥ १६ ॥
द्रोणस्त्री कृपी पाहीं ॥ तेही गेली लवलाहीं ॥
एकचि हांक गाजली ते समयीं ॥ अंत नाहीं महाशब्दा ॥ १७ ॥
एकवस्त्रा अनाथा ॥ भूषणें तोडिती जातांजातां ॥
पिता पुत्र बंधु सुता ॥ नाम घेऊन आरडती ॥ १८ ॥
लजा सोडून सकळ ॥ धरणीवरी फोडिती कपाळ ॥
केश तोडून विकळ ॥ एक पडती भूमीवरी ॥ १९ ॥
हस्तनापुर भणभणित ॥ मंदिरे भरलीं ओस दिसत ॥
पौरलोक त्यांसमवेत ॥ रणांगणीं पातले ॥ २० ॥
कृतवर्मा शारद्वत ॥ तेही पातले शोक करित ॥
स्त्रियांचें दुःख पाहोन समस्त ॥ म्हणती येथून जातां बरें ॥ २१ ॥
कृतवर्मा गेला स्वराष्ट्रा ॥ कृपाचार्य जात गजपुरा ॥
द्रौणी गेला वनांतरा ॥ कृष्णशापेंकरोनिया ॥ २२ ॥
तो बंधूसह युधिष्ठिर ॥ युयुत्सु सात्यकी यादवेंद्र ॥
द्रौपदी स्त्रियांसह समग्र ॥ येतीं जाहलीं भेटावया ॥ २३ ॥
गंगातीरीं कौरवयुवती ॥ भ्रतारदुःखें प्रलय करिती ॥
तें दुःख कवीनें ग्रंथीं ॥ काय म्हणोनि लिहावें ॥ २४ ॥
स्त्रिया म्हणती धर्माचें मन ॥ नवनीताहूनि मृदु पूर्ण ॥
ये वेळीं वज्राहून ॥ केलें कठिण हृदय कैसें ॥ २५ ॥
तुझें अजातशत्रु नाम जाण ॥ कां दया दिधली दवडून ॥
सर्व गोत्रज मारून ॥ राज्य करीं धर्मराया ॥ २६ ॥
धर्म अंधास करी नमस्कार ॥ प्रीतीं हृदयीं धरी धृतराष्ट्र ॥
म्हणे धर्मा तुझें हृदय पवित्र ॥ सकलांमाजी मी जाणें ॥ २७ ॥
मजकारणें धर्मा निश्चितीं ॥ त्वां शोकसागरीं केली वस्ती ॥
बा रे तूं सहसा न करीं खंती ॥ मम प्रीति तुजवरी आहे ॥ २८ ॥
मग धृतराष्ट्र म्हणे तेव्हां ॥ मजला वृकोदर भेटवावा ॥
क्षेम द्यावयासी भीम बरवा ॥ सरसावला पुढेंचि ॥ २९ ॥
तंव तो भक्तपालक भगवंत ॥ भीमास दावी भ्रूसंकेत ॥
म्हणे होईल आतां अनर्थ ॥ त्यास सर्वथा भेटू नको ॥ ३० ॥
जो भक्तकामकल्पद्रुम ॥ जाणोनि भविष्य तो आत्माराम ॥
केला होता लोहाचा सबळ भीम ॥ वस्त्राभरणीं संयुक्त ॥ ३१ ॥
तो भीम पुढें उभा केला ॥ त्यास धृतराष्ट्रे दृढ धरिला ॥
रगडितांच चूर्ण जाहला ॥ यवपिष्टवत्‌ ते समयीं ॥ ३२ ॥
नवसहस्रनागांचें बळ ॥ तो भीमाहून असे सबळ ॥
एक नेत्रांविण विकळ ॥ नाहीं तरी काळ प्रत्यक्ष ॥ ३३ ॥
भीमे मारिले सकल सुत ॥ तो डाव राखी मनांत ॥
असो लोहभीम तेथ ॥ चूर्ण करोनि टाकिला ॥ ३४ ॥
अंधाचें भावीत मन ॥ कीं मीं मारिला भीमसेन ॥
बळें रगडिला तेणेकरून ॥ वाहे अशुद्ध मुखावाटे ॥ ३५ ॥
भूमीवरी पडे मूर्च्छा येऊन ॥ आश्चर्य करिती पंडुनंदन ॥
म्हणती लीलाविग्रही श्रीकृष्ण ॥ भक्तजनपालक जो ॥ ३६ ॥
मग म्हणे युधिष्ठिर ॥ पूर्ण ब्रह्मानंद यादवेंद्र ॥
आजि नवा जन्मला वृकोदर ॥ मोठे चरित्र दाखविलें ॥ ३७ ॥
असो यावरी अंबिकासुत ॥ अट्टहासें तेव्हां रडत ॥
म्हणे जळो हा क्रोधें केला घात ॥ भीमसेन मारिला ॥ ३८ ॥
हाहाकार करी वृद्ध ॥ मग बोलिला सच्चिदानंद ॥
म्हणे हृदयीं न धरावा खेद ॥ केला वध लोहभीमाचा ॥ ३९ ॥
तुझा क्रोध जाणोन ॥ म्यां लोहाचा केला भीमसेन ॥
तो तूं रगडून केला चूर्ण ॥ ऐकोन अंध संतोषला ॥ ४० ॥
श्रीरंगाकडे पाहोन ॥ गदगदां हांसती पंडुनंदन ॥
भ्रूसंकेत केवळ दाखवून ॥ एकमेकांसी खुणाविती ॥ ४१ ॥
रक्तें भरलें अंधाचें वदन ॥ धर्में धुतले उदक आणून ॥
अंध म्हणे भीमसेन ॥ आतां मज भेटवा ॥ ४२ ॥
म्हणे विश्वव्यापका चक्रपाणी ॥ माझा क्रोध केवळ प्रलयाग्नी ॥
त्यासी तुवां लोहभीम अणोनी ॥ आहुती दिधली उत्तम हे ॥ ४३ ॥
श्रीकृष्ण म्हणे अंधाप्रती ॥ पूर्वी म्यां सांगितली नीती ॥
ते तुवां धरिली नाहीं चित्तीं ॥ अहंममतें भुलोनियां ॥ ४४ ॥
स्वदोष जाहले संपूर्ण ॥ राया पाहें विचारुन ॥
कोणते अन्याय तुम्हांपासोन ॥ घडले नाहींत सांग पां ॥ ४५ ॥
आपुले गुणदोष लपवी सदा ॥ करी दुसर्‍याची दीर्घनिंदा ॥
अहा रे धृतराष्ट्र वृद्धा ॥ किती क्रोधा वश्य होसी ॥ ४६ ॥
तुमचे अन्याय अद्‌भुत ॥ बहुत मीं घातले पोटांत ॥
द्रौपदी आणिली ओढीत ॥ तेव्हां संतोष वाटला तूतें ॥ ४७ ॥
पारधी वृक्षाआड स्वस्थ ॥ करावया बैसला मृगघात ॥
तीं सर्पें येऊन अकस्मात ॥ पाय फोडिला कडकडोनी ॥ ४८ ॥
लहरी आसमास येती ॥ म्हणे कोणी वांचवा मजप्रती ॥
परी फांसे जवळी असती ॥ पापमति जाणवीतसे ॥ ४९ ॥
हिंसक गाई वधित ॥ तों त्याचीच अंगुली तुटली अकस्मात ॥
त्या घायें परम आरंबळत ॥ परी गोघात आठवीना ॥ ५० ॥
तस्करीं भरिलें घरीं धन ॥ तेथें दरवडा पडला येऊन ॥
लोक नागविले म्हणून ॥ नाठवी कर्म आपुलें ॥ ५१ ॥
तैसें तुझ्या पुत्राचें कर्म दारुण ॥ आठवीना कां तुझें मन ॥
लोहभीम मारिला रगडून ॥ मत्सरेंकरून तुवां कीं ॥ ५२ ॥
वृंदावन जों जों पक्क होत ॥ तो तो कडुपणा चढे बहुत ॥
कोरफड जो जो गाजत ॥ दुर्गंधि बहुत उठे तया ॥ ५३ ॥
मैंदाची पोरें मेलीं समस्त ॥ म्हणून चडफडोनि तो रडत ॥
परी आपण हिंसा केली बहुत ॥ तें मनांत आठवीना ॥ ५४ ॥
तैसें जळो तुझें वृद्धपण ॥ अजून हृदयीं नांदे अज्ञान ॥
अंधे ऐकतां ऐसें वचन ॥ उगाच मग राहिला ॥ ५५ ॥
मग म्हणे श्रीहरी ॥ आतां मज चौघांची भेट करीं ॥
मग स्पर्शमात्र ते अवसरीं ॥ करिता जाहला स्वहस्तें ॥ ५६ ॥
चौघांनीं वंदिले चरण ॥ परी न देती आलिंगन ॥
विश्वास गेला उडोन ॥ मग तें बोलणें फोलचि ॥ ५७ ॥
असो गांधारीचें समाधान ॥ करिती पांचही पंडुनंदन ॥
पूर्वीच व्यासदेवें येऊन ॥ बोधिलें होतें तियेतें ॥ ५८ ॥
कीं पांडवांवरी याउपरी ॥ क्रोध तूं सहसा न करीं ॥
मग धर्मराजें ते अवसरीं ॥ समाधान केलें तियेचें ॥ ५९ ॥
तो भीम बोले गर्जोन ॥ परम शठ दुर्योधन ॥
त्यास मी पूर्वीच टाकितों मारून ॥ परि धर्मवचनें उगाच होतों ॥ ६० ॥
जे वेळीं मांडी उघडून ॥ दाविली द्रौपदीलागून ॥
तेव्हांच गदाघायेंकरून ॥ करितों चूर्ण अंक त्याचा ॥ ६१ ॥
असो गांधारीचे चरण ॥ धर्मरायें दृढ धरोन ॥
म्हणे माते मज भस्म करीं शापून ॥ मी अन्यायी सर्वस्वें ॥ ६२ ॥
मीं पृथ्वी पाडिली ओस ॥ कुलक्षय केला निःशेष ॥
धर्म बोलतां गांधारीचे मानस ॥ स्नेहभरें उचंबळले ॥ ६३ ॥
वस्त्रपट डोळयांवरी ॥ गांधारीच्या असे दिवसरात्रीं ॥
भ्रतार चक्षुहीन अवधारीं ॥ म्हणोनि पट बांधिला ॥ ६४ ॥
वस्त्राआड उभी राहून ॥ सौबली पाहे न्याहाळून ॥
तो धर्मराज देखिला दीन ॥ अत्यंत कृश जाहला असे ॥ ६५ ॥
मग बोले गांधारी ॥ धर्मा तूं पुत्र माझा निर्धारीं ॥
तूं सर्वथा चिंता न करीं ॥ सुखरूप नांदे सर्वदा ॥ ६६ ॥
कुंतीस साष्टांग नमस्कार ॥ करिते जाहले पांचही कुमार ॥
पृथेस दाटला गहिवर ॥ गेले ते सर्व आठवूनी ॥ ६७ ॥
वनींहून आलिया रामलक्ष्मण ॥ कौसल्या देत प्रेमें आलिंगन ॥
तैशी कुंती पांचालागून ॥ ब्रह्मानंदें आलिंगी ॥ ६८ ॥
म्हणे बाळ हो वनांतरीं ॥ बहु श्रमलेति आजवरी ॥
पुत्र म्हणती माते निर्धारीं ॥ तुझे पाय देखिले ॥ ६९ ॥
तेणें श्रम गेला समस्त ॥ तुज खेद न व्हावा यथार्थ ॥
द्रौपदी गांधारीस वंदित ॥ मग नमीत कुंतीतें ॥ ७० ॥
पृथ्वीवरी पडली पांचाळी ॥ पुत्रदुःखें आरंबळली ॥
सुभद्रा शोकसमुद्रीं बुडाली ॥ आठवून अभिमन्या ॥ ७१ ॥
मग कुंती समाधान करीत ॥ दोघी स्नुषा हृदयीं धरीत ॥
म्हणे अष्टादशाक्षौहिणी सेना अद्‌भुत ॥ जाहला निःपात सर्वांचा ॥ ७२ ॥
विदुरें जें जें भविष्य केलें ॥ तें तें सर्व डोळां देखिलें ॥
असो कौरवस्त्रिया त्या वेळे ॥ रणभूमीसी धांवल्या ॥ ७३ ॥
पुत्र भ्राते आणि पती ॥ त्यांचीं प्रेतें हृदयीं धरिती ॥
दीर्घस्वरें सकल रडती ॥ ऐकतां धरित्री कांपतसे ॥ ७४ ॥
दुर्योधनादि शंभर बंधू जाण ॥ द्रोण कर्णादि वीर संपूर्ण ॥
वस्त्राभरणेंकरून ॥ मंडित रणीं पडियेले ॥ ७५ ॥
मुकुट कुंडलें आणि शिरें ॥ अपार भूषणें लेवविलीं करें ॥
भूतें भक्षिती सत्वरें ॥ प्रेतमांसें काढूनियां ॥ ७६ ॥
मृगमदचंदनें शोभती ॥ ज्यांचीं शरीरे विराजती ॥
एकाचे डोळे पक्षी फोडिती ॥ चरण तोडिती एकाचे ॥ ७७ ॥
त्यांत भीष्म द्रोण कर्ण ॥ यांचीं कलेवरे देदीप्यमान ॥
त्यांसी भूतें प्रेते द्विजगण ॥ स्पर्श करूं न शकती ॥ ७८ ॥
असो स्त्रियांचा कल्लोळ ॥ रणभूमीसी माजला तुंबळ ॥
एकीं ओळखून शिरकमळ ॥ धडास नेऊन मेळविती ॥ ७९ ॥
एकांचीं प्रेते न सांपडतीं ॥ सैरावैरा रणीं हिंडती ॥
बहुतांचीं शरीरे फुगलीं देखती ॥ ओळखू न येती कदाही ॥ ८० ॥
दुर्योधनाचे प्रेत धरून ॥ गांधारी करीतसे रुदन ॥
असो आकांत वर्तला दारुण ॥ तो कवणासी न वर्णवे ॥ ८१ ॥
गांधारी म्हणे दुर्योधनालागून ॥ युद्धाचे आधीं तूं येऊन ॥
मज करोनियां नमन ॥ निघालास ते वेळे ॥ ८२ ॥
मी बोलिलें तुज वचन ॥ जेथें धर्म तेथें जय जाण ॥
अती जाहले तेंच प्रमाण ॥ गेले मरोन पुत्र सर्व ॥ ८३ ॥
गांधारीच्या बहुत सुना ॥ कित्येक रडती हंसगमना ॥
गजगमना मृगनयना ॥ चंद्रवदना असती पैं ॥ ८४ ॥
एक मीनाक्षी मृगशावाक्षी ॥ एक कामाक्षी एक पद्याक्षी ॥
एक हरिमध्या नेत्रकटाक्षी ॥ वेधून पाडिती पतींतें ॥ ८५ ॥
आपुल्या पतींचीं प्रेते धरूनी ॥ शोक करिती नितंबिनी ॥
सुभद्रा उत्तरा शोधूनी ॥ अभिमन्यूसी आलिंगिती ॥ ८६ ॥
अभिमन्यूचें स्वरूप जाण ॥ प्रत्यक्ष केवळ श्रीकृष्ण ॥
असो देशोदेशीच्या स्त्रिया येऊन ॥ आपुले पती शोधिती ॥ ८७ ॥
अभिमन्यूलागीं गांधारी ॥ बहुत शोक करी ते अवसरीं ॥
हे बाळा नरवीरकेसरी ॥ कोमलांगा कमलनेत्रा ॥ ८८ ॥
हे महाराज गुरु द्रोण ॥ हे धीर उदार वीर कर्ण ॥
कर्णस्त्रिया सर्व मिळोन ॥ रणांगणीं आरडती ॥ ८९ ॥
हा शकुनि वीर पडिला येथ ॥ हा दुःशीलापति जयद्रथ ॥
बहुतीं रक्षिला परी मृत्य ॥ न सोडीच तयातें ॥ ९० ॥
हा पडिला माद्रीचा बंधु शल्य ॥ हा भगदत्त पडिला विशाळ ॥
हा भीष्म सूर्य केवळ ॥ शरपंजरी पहुडला ॥ ९१ ॥
नारायण हरि गोविंद ॥ ऐसा नामांचा दिव्य प्रबंध ॥
सहस्रनामावळी प्रसिद्ध ॥ भीष्मदेव स्मरण करी ॥ ९२ ॥
कोणाशीही न बोले वचन ॥ निजरूपीं सावधान ॥
सकलस्त्रिया करूनि नमन ॥ प्रदक्षिणा करून जाती ॥ ९३ ॥
देहावरी नाहीं भीष्म ॥ स्वरूपीं पावला विश्राम ॥
नारी नर आप्त परम ॥ कोणासही नेणे तो ॥ ९४ ॥
तो पिंडब्रह्मांडावेगळा ॥ जैसें कमलपत्र नातळे जळा ॥
तैसा तो ज्ञानी जाहला ॥ त्याची लीला कोण जाणे ॥ ९५ ॥
असो गांधारी म्हणे ते वेळां ॥ श्रीकृष्णा पाहें रे डोळां ॥
स्नुषा तळमळती सकळा ॥ जीवनाविण मीनापरी ॥ ९६ ॥
सात्यकीनें मारिला ॥ हा भूरिश्रवा येथें पडिला ॥
हा सोमदत्त रणीं मृत्य पावला ॥ बाल्हीक वृद्ध तैसाची ॥ ९७ ॥
छप्पन्न देशींचे नृपती ॥ धांवोनि आल्या त्यांच्या युवती ॥
दीर्घस्वरें हांका देती ॥ नाहीं मिति शोकातें ॥ ९८ ॥
द्रुपद विराट द्रोणें मारिले ॥ ते हे येथें दोघे पडिले ॥
असो शाण्णव कुळींचे पहुडले ॥ राजे सर्व समरांगणीं ॥ ९९ ॥
ऐकें कृष्णा श्यामसुंदरा ॥ तूं उपलव्यासी गेलास माघारा ॥
दळासह माझ्या कुमारां ॥ पाणी तेव्हांच सोडिलें ॥ १०० ॥
अरे कृष्णा तूं चालक थोर ॥ तुवाच हा केला संहार ॥
तरी मी गांधारी पतिव्रता साचार ॥ शाप माझा घेई तूं ॥ १०१ ॥
तुझा कुलक्षय जाण ॥ शेवटीं होईल संपूर्ण ॥
हरि म्हणे कर्ता कारण ॥ मजविण कोण असे पैं ॥ १०२ ॥
पिंडब्रह्मांडघडामोडी ॥ एका रक्षी एका रगडी ॥
भूभार उतरावया तांतडी ॥ म्यांच सर्व मारिले ॥ १०३ ॥
युगायुगीं धरोनि अवतार ॥ मीच करितो दुष्टसंहार ॥
पुढेही सर्व करणार ॥ मीच असें आदिअंतीं ॥ १०४ ॥
यादवसंहार शेवटीं ॥ मज करणें उठाउठी ॥
तुवां शाप दिधला हे गोष्टी ॥ मजही अगत्य आहे पैं ॥ १०५ ॥
असो रणरंगीं जे पडले ॥ त्यांचे वैशंपायनें गणित केलें ॥
सासष्टकोटि वीर पडिले ॥ लहानथोर मिळोनियां ॥ १०६ ॥
मग यथानुक्रमेंकरून ॥ करिती तेव्हां सर्वांचें दहन ॥
करोनियां धर्मदान ॥ त्रयोदशदिनपर्यंत ॥ १०७ ॥
धूम्र आणि अग्निज्वाळ ॥ येणें ब्रह्मांड भरलें तुंबळ ॥
त्यामाजी जे अनाथ केवळ ॥ ज्यांसी दहनासी कोणी नाहीं ॥ १०८ ॥
मग त्यांच्या राशी करून ॥ लाविला असंभाव्य अग्न ॥
विदुर युयुत्सु जाण ॥ हेंच कृत्य करिते जाहले ॥ १०९ ॥
सर्वांचें उत्तरक्रियासंपादन ॥ करिते जाहले त्रयोदश दिन ॥
शतही कौरवांचें दहन ॥ यथान्यायें तैसेंचि ॥ ११० ॥
धर्म म्हणे ते वेळीं ॥ हा कर्ण पडला महाबळी ॥
यास कोणीं द्यावी तिलांजली ॥ कोणे कुळी जन्मला हा ॥ १११ ॥
तो कुंतीनें फोडिली हांक ॥ अट्टाहासें करी शोक ॥
म्हणे माझा पुत्र कर्ण वरिष्ठ ॥ सूर्यवीर्ये जन्मला ॥ ११२ ॥
तुम्हां पांचांहून ज्येष्ठ ॥ जो धीर वीर उदार वरिष्ठ ॥
रणपंडित अति सुभट ॥ सूर्यभक्त निःसीम जो ॥ ११३ ॥
त्याचिया औदार्यापुढें ॥ सुरतरु कायसें बापुडें ॥
त्याचें सौंदर्य देखोनि रडे ॥ एकीकडे शफरीध्वज ॥ ११४ ॥
तो जाहला कुमारपणीं ॥ सोडिला मी स्वर्धुनीजीवनीं ॥
अधिरथ किरातें नेऊनी ॥ राधेजवळी दिधला ॥ ११५ ॥
राधा ते अधिरथनितंबिनी ॥ तिनें कर्ण लाविला निजस्तनीं ॥
राधेय कर्णास जनीं ॥ नाम तेंचि प्रकटले ॥ ११६ ॥
मी आणि कृष्णे जाऊन ॥ बहुतांपरी बोधिला कर्ण ॥
परी कौरवांस भाकवचन ॥ तेणें पूर्वीच दिधलें ॥ ११७ ॥
श्रीधर विनवी श्रोत्यांलागून ॥ कर्णाचे हें जन्मकथन ॥
आदिपर्वी निरूपिलें संपूर्ण ॥ पुनःपुनः वर्णूं कासया ॥ ११८ ॥
असो कुंती म्हणे ते क्षणीं ॥ अहा कर्णा वीरशिरोमणी ॥
मीं तुज सांडिलें बालपणीं ॥ तरीच रुसोनि गेलासी ॥ ११९ ॥
अहा कर्णा परमसुंदरा ॥ अहा कर्णा धीरोदारा ॥
अहा कर्णा परमशूरा ॥ पूर्वी केला दिग्विजय ॥ १२० ॥
जेणें कवचकुंडलें देऊन ॥ तोषविला पाकशासन ॥
ऐसें कुंती दुःख आठवून ॥ कर्णा कर्णा म्हणोनि बाहे ॥ १२१ ॥
धर्माचे नेत्रीं अवधारा ॥ चालिल्या तेव्हां अश्रुधारा ॥
म्हणे अहा कर्णा महाशूरा ॥ कां रे आम्हांसि टाकिलें ॥ १२२ ॥
कुंतीस म्हणे युधिष्ठिर ॥ कर्ण वडील सहोदर ॥
तुवां हा कैसा विचार ॥ गुप्त करूनि ठेविला ॥ १२३ ॥
मज कळू न दिलें वर्तमान ॥ मी धरितों कर्णाचे दृढ चरण ॥
राज्य छत्र देऊन ॥ सेवा करितो अहोरात्र ॥ १२४ ॥
अहा कर्णा राजीवनेत्रा ॥ अहा कर्णा चारुगात्रा ॥
कोमलांगा परमपवित्रा ॥ सहोदरा माझिया ॥ १२५ ॥
अभिमन्यूचे शोकाहून ॥ कर्णशोकें धर्म क्षीण ॥
भूमीस पडे मूर्च्छा येऊन ॥ कृष्णार्जुन सांवरिती ॥ १२६ ॥
धर्म म्हणे हो कुंती ॥ परम कपटी स्त्रियांची जाती ॥
कदा अंत कळों न देती ॥ असत्य चित्तीं सदा वसे ॥ १२७ ॥
सकल स्त्रिया ज्या सृष्टीं ॥ धर्म शापी उठाउठीं ॥
आजपासूनि गुह्य गोष्टी ॥ न राहोत पोटीं स्त्रियांच्या ॥ १२८ ॥
असो धर्में ते काळीं ॥ कर्णवीराची क्रिया केली ॥
सर्वांस समजलें ते वेळीं ॥ कीं कर्ण पुत्र कुंतीचा ॥ १२९ ॥
एव सर्वांची उत्तरक्रिया करून ॥ गांधारी अंबिकानंदन ॥
विदुरादि सर्व जन ॥ हस्तनापुराप्रति गेले ॥ १३० ॥
स्वस्थळासी गेले पंडुनंदन ॥ स्त्रीपर्व संपलें येथून ॥
पुढें शांतिपर्व परम गहन ॥ वैशंपायन बोलिला ॥ १३१ ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ बोलवील पुढें पंढरीनाथ ॥
तें श्रवण करोत पंडित ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥ १३२ ॥
श्रीधरवरदा रुक्मिणीपती ॥ तूं पांडुरंग पांडवसारथी ॥
ब्रह्मानंद तूंचि आदिअंतीं ॥ अभंग अक्षय सर्वदा ॥ १३३ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ स्त्रीपर्व व्यासभारत ॥
त्यातील सारांश यथार्थ ॥ पंचावन्नाव्यांत कथियेला ॥ १३४ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे स्त्रीपर्वणि पंचपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५५ ॥
अध्याय पंचावन्नावा समाप्त


GO TOP