श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय चोपन्नावा
व्यासांचा धृतराष्टाला उपदेश
श्रीगणेशाय नम: ॥
वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ कथा ऐकें नृपवर्या ॥
दुर्योधन निमालिया ॥ धृतराष्ट्र सौबली अतिदुःखित ॥ १ ॥
अंध पडला भूमीवरी ॥ मस्तक आपटी ते अवसरीं ॥
माझे पक्ष छेदिले निर्धारीं ॥ वृद्धपणीं समूळ ॥ २ ॥
माझे डोळे आजि फोडिले ॥ माझे धैर्यदुर्ग आजि पाडिले ॥
माझे हातपाय तोडिले ॥ मत्सरशस्त्रेंकरूनियां ॥ ३ ॥
माझी अंधळ्याची काठी ॥ नेऊन ठेविली स्वर्गकपाटीं ॥
माझी दरिद्र्याची गोठी ॥ सोडून गेली पूर्वकर्म ॥ ४ ॥
माझे पुत्रपौत्र महाबळी ॥ कैसे मारिले रणमंडळीं ॥
इतराह घेऊन धुळी ॥ मुखीं मस्तकीं घालित ॥ ५ ॥
मज कृष्णें पूर्वी सांगितलें ॥ व्यासनारदें साक्षेपें कथिलें ॥
विदुरें गेहीं बहुत शिकविलें ॥ परी म्यां ऐकिलें नाहीं तें ॥ ६ ॥
भीष्म द्रोण शारद्वत ॥ संजय क्षणोक्षणीं सांगत ॥
मैत्रेयऋषीनें बहुत ॥ सागतां म्यां नाइकिलें ॥ ७ ॥
मग बोले गांधारी ॥ संजया गोष्टी अवधारीं ॥
युद्धाआधी एक रात्रीं ॥ दुःखस्वप्न म्यां देखिलें ॥ ८ ॥
मी बैसलें असतां मंदिरीं ॥ कृष्णवसनवेष्टित विधवा नारी ॥
मृत्तिका घेऊन झडकरी ॥ ओटी भरीत माझी पैं ॥ ९ ॥
धृताचे घट श्वानें फोडिती ॥ उताणीं पडून चाटिती ॥
पिंजर्यातील रावे मारिती ॥ बिडालकें येवोनियां ॥ १० ॥
आणि दुर्योधनाची कामिनी ॥ तिचे कंठींचा मंगळमणी ॥
कृष्णवर्ण पुरुष येउनी ॥ नेला तोडूनि स्वप्नांत ॥ ११ ॥
शतही माझिया सुना ॥ देखिल्या स्वप्नीं मी कुंकुमहीना ॥
बंधूंसमवेत दुर्योधना ॥ मांडीवरी देखिलें म्यां ॥ १२ ॥
पूर्वी म्यां पूजिला ईश्वर ॥ व्रत नेम चालविला फार ॥
परी व्रत पूर्ण न करितां साचार ॥ मध्येंच सोडूनि दिधलें ॥ १३ ॥
त्याच दोषेंकरून ॥ गेले शतही पुत्र आटोन ॥
किंवा द्वेषिले संतसज्जन ॥ न केलें अर्चन तयांचें ॥ १४ ॥
किंवा पंक्तिभेद घडला ॥ कीं कीर्तनरंग उच्छेदिला ॥
किंवा गुरुद्रोह घडला ॥ मजपासून पूर्वी हो ॥ १५ ॥
कीं परद्रव्य अभिलाषिलें ॥ कीं दाता दान देतां विघ्न केलें ॥
कीं हरिहरांसी निदिले ॥ अपमानिलें कुलदैवत ॥ १६ ॥
कोणाचे मुखींचा ग्रास जाण ॥ म्यां पूर्वी घेतला हिरोन ॥
कीं मायबापें अन्नाविण ॥ पीडून मारिलीं पूर्वजन्मी ॥ १७ ॥
कीं गुरुनिंदा गुरुहत्या ॥ पूर्वी पडल्या माझे माथां ॥
कीं पात्रीं बैसला विप्र तत्त्वतां ॥ उठवून घातला बाहेरी ॥ १८ ॥
कीं यतीश्वराची निंदा ॥ केली पूर्वी अमर्यादा ॥
कुरंगिणी पाडसां करूनि भेदा ॥ पूर्वी म्यां बिघडिलीं ॥ १९ ॥
कीं गाईवत्सांसी तुटी ॥ केली म्यां परमेष्ठी ॥
अहा रे कासया रचिली सृष्टी ॥ माझे अदृष्टीं लिहिलं हें ॥ २० ॥
कीं वेदशास्त्रपुराणें ॥ हरिहरचरित्रें पावनें ॥
उच्छेदिलीं म्यां संपूर्ण ॥ म्हणोनि ऐसें जाहलें ॥ २१ ॥
किंवा स्त्री आणि पुरुष ॥ माता आणि पुत्रांस ॥
कीं गुरु आणि शिष्यांस ॥ विकल्प घालून बिघडिलें ॥ २२ ॥
पोटांतून उमाळे उठती ॥ भडभडां नेत्रीं अश्रू वाहती ॥
असो यावरी संजय महामती ॥ धृतराष्ट्रासी बोलत ॥ २३ ॥
म्हणे कुरुनायका तूं विचक्षण ॥ बहुत तुज जाहलें श्रवण ॥
श्रीव्यासप्रसादेंकरून ॥ बहुत शास्त्रें ऐकिलीं ॥ २४ ॥
बहुत पुराणें इतिहास ॥ ऐकिली भगवद्गीता निर्दोष ॥
बहुत ऋषिमुखें सुरस ॥ दिव्य निरूपणें ऐकिलीं ॥ २५ ॥
सनत्सुजात महाराज आला ॥ दिव्यज्ञानामृत वर्षला ॥
आतां तूं ये वेळां ॥ शोक दूर करीं कां ॥ २६ ॥
लटकी हे संसारमाया ॥ मरीचिजलवत् जाहलिया ॥
सप्त पुरुषांच्या गोष्टी हृदया- ॥ माजी आठवीं तूं सर्वही ॥ २७ ॥
प्राणी जितुके आले आकारा ॥ चंद्रसूर्यादि पसारा ॥
तितुके लया जातील राजेंद्रा ॥ पंचभूतांचे सर्वही ॥ २८ ॥
राजा पूर्वज तुझे सकळी ॥ त्यांहीं नागपुरीची संपदा भोगिली ॥
ती कोठे उरली वंशावळी ॥ तुजपर्यंत सांग पां ॥ २९ ॥
येथींचें सुख क्षणिक जाण ॥ जैसें विषाचें शीतलपण ॥
कीं सावचोराचें गोड वचन ॥ असत्य पूर्ण सर्वही ॥ ३० ॥
अरण्यांत मिथ्याघन ॥ कीं अभ्राची साउली सघन ॥
कीं शत्रूचा आदर पूर्ण ॥ क्षणांत प्राण घेईल ॥ ३१ ॥
संसारदुःख दारुण ॥ क्लेशतरूचें उद्यान ॥
जेविं मृगांबुलहर सधन ॥ दिसती परि क्षणिक त्या ॥ ३२ ॥
विद्युल्लतेची प्रभा क्षणिक साचार ॥ सवेंच गाढ पडे अंधार ॥
परी त्या प्रकाशें व्यवहार ॥ वर्तणूक घडेना ॥ ३३ ॥
रजूवरी अहि दिसत ॥ शुक्तिकेवरी भासे रजत ॥
स्थाणूचे ठायीं चोर भासत ॥ मिथ्या पाहतां साचार ॥ ३४ ॥
राया पाहतां ब्रह्मादिकां ॥ सर्वदा काल नाहीं सारिखा ॥
मागें भरिल्या ज्या घटिका ॥ त्या पुढें सर्वथा न येती ॥ ३५ ॥
भरला दिसे गंगापूर ॥ परी पाहतां तें ओहोटलें नीर ॥
मागून येतें तेंही जाणार ॥ क्षणभंगुर सर्वही ॥ ३६ ॥
तैसें बरें हें दिसतसे शरीर ॥ परी आयुष्य सरले नेणे नर ॥
जैसा रांजणींचा मकर ॥ म्हणे नीर बहु आहे ॥ ३७ ॥
पर्जन्यकाळींची ओल देखोन ॥ दानवे म्हणती ध्रुवासमान ॥
तैसे नर गेले भुलोन ॥ विषयभान देखोनियां ॥ ३८ ॥
कीं हिंसकस्कंधीं बस्त ॥ सुख मानी म्हणे मी भाग्यवंत ॥
परी पुढें मरण आलें जवळी बहुत ॥ नेणवेचि तयातें ॥ ३९ ॥
द्विजस्कंधीं वहन देऊन ॥ नहुषें भाविलें कल्याण ॥
परी पुढें अनर्थ दारुण ॥ तें त्यास कदा नेणवेचि ॥ ४० ॥
मेदिनीगर्भरत्न ॥ नेतां सुखावला विंशतिनयन ॥
परी पुढें कुलक्षय पूर्ण ॥ तें त्यास कदा नेणवे ॥ ४१ ॥
तैसे जीव भुलले समग्र ॥ पुढील दुःख नेणती पामर ॥
चौर्यायशीं लक्ष योनी थोर ॥ किती म्हणोनि भोगाव्या ॥ ४२ ॥
कुर्हाडीचे घाय गणित ॥ तरूचा गर्भ जाय तुटत ॥
तेविं कुठारपाणि काल येथ ॥ छेदितो कांड आयुष्यवृक्षाचें ॥ ४३ ॥
अहो बरवा देखिला बाळ ॥ मग तरुण होय तो वेल्हाळ ॥
सवेंच जरेनें घातली माळ ॥ पडिला व्याकुल होउनी ॥ ४४ ॥
मग सवेंच गेला मरोन ॥ भोगिले कुंभीपाक दारुण ॥
सवेंच गर्भांत राहिला येऊन ॥ पावला जनन मागुती ॥ ४५ ॥
ऐशा जन्ममरणांच्या पंक्ती ॥ प्राणी असंख्यात भोगिती ॥
परी त्रास नुपजे चित्तीं ॥ पडली भ्रांति मूर्खत्वें ॥ ४६ ॥
म्हणोन प्रज्ञाचक्षु अवधारीं ॥ पहुडें सद्विवेकमंदिरीं ॥
शोकमोहांतें दूर करीं ॥ निजसुखीं बुडी दे कां ॥ ४७ ॥
शस्त्रें कासया जवळी रक्षावीं ॥ कीं निर्वाणीं कामा यावीं ॥
तैशी शास्त्रे श्रवण करावीं ॥ अंतीं विवेक उपजावया ॥ ४८ ॥
जवळी कासया रक्षावें ओडण ॥ कीं घाय पडतां पुढें रक्षण ॥
तैसा शोक मोह दवडून ॥ पुढें विवेक प्रकट करीं ॥ ४९ ॥
तुझें कुळ संहारिलें ॥ पांडवांचें तरी कोठे उरलें ॥
द्रौणीनें सर्व आटिले ॥ रात्रीमध्ये जाऊनियां ॥ ५० ॥
आतां पांडव तुझे कुमार ॥ त्यांवरी स्नेह करीं अपार ॥
तुज तिलांजलि साचार ॥ तेच देतील पुढेंही ॥ ५१ ॥
आतां प्रज्ञाचक्षु यावरी ॥ उत्तरक्रिया पुत्रांची करीं ॥
अंध म्हणे ते अवसरीं ॥ मी जाईन वनवासा ॥ ५२ ॥
संजय म्हणे राया देख ॥ आपुली क्रिया तारक मारक ॥
तैशी दुर्योधनाची दुष्कर्में देख ॥ त्याचीं त्यासी फळा आलीं ॥ ५३ ॥
आपुले गृहास आपण ॥ लाविला जैसा महाअग्न ॥
कीं रुईचा चीक घालून नयन ॥ वळेंचकरून दवडिले ॥ ५४ ॥
आपुलें अस्त्र आपण ॥ पोटीं ठेविलें खोंवून ॥
विखारबिळीं जाऊन ॥ बळेच हात घातला ॥ ५५ ॥
तैसें दुर्योधनें पांडव छळून ॥ कैंचे कपटद्यूत मांडून ॥
वडिलीं वारितां न जाणून ॥ कुलक्षय आपुला केला ॥ ५६ ॥
विदुर म्हणे जें होणार ॥ तें कालत्रयी न चुके साचार ॥
जरी गृहांत लपाला निरंतर ॥ तरी मृत्यु सोडीना ॥ ५७ ॥
राया हाच दृढ विचार ॥ आदि अंतीं अवघा ईश्वर ॥
मध्ये जीव हे समग्र ॥ मिथ्या सर्वं आहे हें ॥ ५८ ॥
जैसा बीजापोटीं तरुवर ॥ तरूचे अग्नी बीज साचार ॥
मध्ये दिसे काष्ठ थोर ॥ तेविं प्रपंच सबळ हा ॥ ५९ ॥
जप तप तीर्थ होम दान ॥ सर्वांहून श्रेष्ठ आत्मज्ञान ॥
राया हें हृदयीं धरून ॥ शोक दूर करीं कां ॥ ६० ॥
पूर्वजन्मींचा परिवार ॥ कोठे तुझा सांग समग्र ॥
जें पूर्वींचें कुटुंब साचार ॥ सुखी कीं दुःखी कोठें आहे ॥ ६१ ॥
यौवन धन आयुष्य देख ॥ विद्युत्प्राय अवघें क्षणिक ॥
या मायाचक्रींचे कौतुक ॥ इंद्रजालवत् असे हें ॥ ६२ ॥
शरीर हाचि स्यंदन ॥ मनाचे तुरंग जुंपिले जाण ॥
त्या रथींचीं चक्रे चरण ॥ पूर्वकर्म सारथी पुढें ॥ ६३ ॥
तो सारथी ओढील जिकडे ॥ शरीररथ धांवे तिकडे ॥
एवं प्राक्तनाधीन घडे ॥ वर्तणूक सर्वही ॥ ६४ ॥
कर्मानुसार बुद्धी ॥ प्राणियांस उपजे त्रिशुद्धी ॥
पदरीं दोष तैशा आधि व्याधी ॥ कवळिती बहु सक्रोध ॥ ६५ ॥
पाप पुण्य होय समान ॥ तेव्हां कर्मभूमीस होय जनन ॥
जरी विशेष दोष दारुण ॥ तरी पतन नरकीं होय ॥ ६६ ॥
बहुत जाहला पुण्योत्कर्ष ॥ तरी सहजचि होय स्वर्गवास ॥
पापपुण्यसमानता निःशेष ॥ नरयोनींत जनन होय ॥ ६७ ॥
तरी एकास सुबुद्धि जाण प्राप्त ॥ कित्येक पापेंकरून लिप्त ॥
ऐसें व्हावया विपरीत ॥ कारण काय ऐक पां ॥ ६८ ॥
एकाचें पुण्य सबळ ॥ एक पापाचा पुतळा केवळ ॥
तो नर होय पुण्यशीळ ॥ बुद्धि अढळ सकीर्ति ॥ ६९ ॥
एकाचें पाप अचाट ॥ पुण्य पदरीं नाहीं नीट ॥
तरी पापबुद्धी होय प्रकट ॥ दरिद्र कष्ट भोगी तो ॥ ७० ॥
ऐसें जो विदुर बोधित ॥ तो कृष्णद्वैपायन आले तेथ ॥
म्हणे राया मनांत ॥ खेद कांहीं न करावा ॥ ७१ ॥
वृथा द्रव्य दारा सदन ॥ वृथा पुत्र स्नुषा आप्तजन ॥
अवघीं मोहाचीं चोरटीं जाण ॥ जाती ठकवून सर्वस्वें ॥ ७२ ॥
येथें मानावया हरिख ॥ तिळमात्र नाहीं सुख ॥
खदिरांगारीं शयन देख ॥ सुखें निद्रा केवि लागे ॥ ७३ ॥
गर्भवासाचें दुःख ॥ कुंभीपाकाहूनि अधिक ॥
मलमूत्रद्वारीं देख ॥ नवमास उकडतसे ॥ ७४ ॥
उपजतां बहुत कष्ट देख ॥ बाहेर आलिया नाहीं सुख ॥
वाचा नाहीं रडे मूर्ख ॥ माता तर्क करी बहु ॥ ७५ ॥
क्षुधेने रडे साचार ॥ म्हणे याचें दुखतें उदर ॥
मग औषध घालिती तिक्त फार ॥ भाजे अंतर नेणती ॥ ७६ ॥
जरी पोट दुखोन रडत ॥ म्हणे बाळ आहे क्षुधाक्रांत ॥
मग बळेच क्षीर पाजित ॥ एवं अनर्थ बालपणी ॥ ७७ ॥
तरुणपणी अत्युन्मत्त ॥ चवडां चाले वरी पाहत ॥
काममदें मुसमुशित ॥ आपपर नेणें कांहीं ॥ ७८ ॥
मायबापांसी निर्भर्त्सित ॥ गुरूसी सदा चाळवित ॥
केलें स्त्रीआधीन जीवित ॥ हा अनर्थ तरुणपणी ॥ ७९ ॥
यावरी वृद्धपणीं तत्त्वतां ॥ दंत पडून गेले दिगंता ॥
कर्ण बुजले बोलता ॥ बोबडी वळे वाचेची ॥ ८० ॥
डोळां न दिसे कांहीं ॥ चरण न चालती सर्वथाही ॥
नेत्रनासिकीं मुखीं पाहीं ॥ प्रवाह चाले जळाचा ॥ ८१ ॥
खोकतां खोकतां जाण ॥ कासावीस होती प्राण ॥
दारा पुत्र स्वजन ॥ सोय न धरी कोणीही ॥ ८२ ॥
परम दुःखकारक वृद्धपण ॥ सवेंच पापी पावला मरण ॥
एवं सर्व दुःख पूर्ण ॥ किती म्हणोन सांगावें ॥ ८३ ॥
तरी धृतराष्ट्रा तूं वृद्ध ॥ होई हरिभजनीं सावध ॥
जें दिसे तें नाशिवंत प्रसिद्ध ॥ सृष्टिक्रम ऐसाच हा ॥ ८४ ॥
जैशा राहाटघटमाळा पाहतां ॥ रिक्ता भरती पुनरेव रिक्ता ॥
ऐसें धृतराष्ट्रें ऐकतां ॥ मूर्च्छना आली पुत्रदुःखें ॥ ८५ ॥
अंतर्बाह्य केवळ अंधु ॥ हृदयीं न ठरे ज्ञानबोधु ॥
जैसा पालथे घटीं जलबिंदु ॥ सर्वथाही प्रवेशेना ॥ ८६ ॥
भस्मामाजी अवदान ॥ व्यर्थ काय समर्पून ॥
रोगिष्ठासी मिष्टान ॥ व्यर्थ घालून काय तें ॥ ८७ ॥
जाह्नवीचें जीवन ॥ भग्नभाजनीं काय घालोन ॥
उत्तम शर्करा नेऊन ॥ दानव्यांसी समर्पिली ॥ ८८ ॥
तैसा धृतराष्ट्र आंधळा ॥ व्यासदेवें पूर्ण बोधिला ॥
परी अंतरीं नाहीं द्रवला ॥ कैसा भुलला मायामोहें ॥ ८९ ॥
म्हणे धृतराष्ट्रा तूं कवण ॥ कैंचा आलास कोठून ॥
तूं भोगसी जन्ममरण ॥ देहाभिमान वाहोनियां ॥ ९० ॥
तुझिया इंद्रियांसी चाळक ॥ कोण असे बुद्धीचा पाळक ॥
तुज वाटे बहुतेक ॥ मीच चालवितों सर्वही ॥ ९१ ॥
गाडीखालीं धांवे श्वान ॥ म्हणे माझा वेग आहे गहन ॥
माझेनें हें चाले संपूर्ण ॥ वाहे अभिमान व्यर्थचि ॥ ९२ ॥
तैसे प्राणी गेले भुलोन ॥ तरी आतां होई रे सावधान ॥
कोणाचे पुत्र तूं येथें कोण ॥ माझें म्हणून भुललासी ॥ ९३ ॥
मी इंद्रसभेसी असतां जाण ॥ उर्वी करूं लागली रुदन ॥
म्हणे मज भार जाहला दारुण ॥ दुष्ट नष्ट रायांचा ॥ ९४ ॥
जो तो म्हणे माझा पती ॥ आणि पापकर्में आचरती ॥
आतां मी जाच सोसू किती ॥ सांग मातें त्रिदशेश्वरा ॥ ९५ ॥
मग बोलिला पाकशासन ॥ कुरुकुलीं जन्मेल दुर्योधन ॥
त्याचे पापें सर्वही जाण ॥ भार तुझा उतरेल पैं ॥ ९६ ॥
ऐशी त्रिदशेश्वराची वाणी ॥ श्रवण करोनि ते मेदिनी ॥
गांठी देत पल्लवालागूनी ॥ वाट पाहे समयाची ॥ ९७ ॥
तैसेंच झालें राया पाहीं ॥ भूपती आटले सर्वही ॥
पांडवांचा अपराध नाहीं ॥ मूळापासोन तत्त्वतां ॥ ९८ ॥
आतां सोडून सकल क्षोभ ॥ करीं पंडुपुत्रांवरी लोभ ॥
अजातशत्रु धर्म स्वयंभ ॥ तुजकारणें कष्टी असे ॥ ९९ ॥
तुझा शोक देखोन ॥ तो तत्काळ देईल आपुला प्राण ॥
तरी विवेकसलिल घेऊन ॥ शोकाग्नि शांत करीं हा ॥ १०० ॥
धृतराष्ट्र म्हणे तुझी आज्ञा ॥ शिरीं वंदितों मी सर्वज्ञा ॥
तो व्यास पावूनि अंतर्धाना ॥ निजभवना पातला ॥ १०१ ॥
विशोकपर्व रसभरित ॥ एकाच अध्यायीं जाहलें समाप्त ॥
पुढें स्त्रीपर्व कारुण्ययुक्त ॥ सुरस बहुत ऐका तें ॥ १०२ ॥
आतां स्त्रीपर्व सुरस फार ॥ वर्णील वैशंपायन चतुर ॥
तें श्रीधरमुखें रुक्मिणीवर ॥ रस अपार कथील पैं ॥ १०३ ॥
ब्रह्मानंदा आत्मारामा ॥ पांडुरंगा अज अनामा ॥
श्रीधरवरदा पूर्णकामा ॥ मंगलधामा अभंगा ॥ १०४ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ विशोकपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ चौपन्नाव्यांत कथियेला ॥ १०५ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे विशोकपर्वणि चतुःपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५४ ॥
अध्याय चोपन्नावा समाप्त
GO TOP
|