श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय एकोणपन्नासावा


कर्णाचा वध


श्रीगणेशाय नम: ॥
जो पांडवांचा कैवारी ॥ नंदाचेघरींचा खिल्लारी ॥
पांचाळीचा साह्यकारी ॥ द्वारपाळ बळीचा ॥ १ ॥
जो क्षीराब्धीचा जामात ॥ जो होय कमलोद्भवाचा तात ॥
सनकादिक योगी जे समस्त ॥ आराध्यदैवत तयांचें जो ॥ २ ॥
जो आनकदुंदुभीचा कुमार ॥ जो त्रिनेत्राचा प्राणमित्र ॥
जो निगमाचें आद्यसूत्र ॥ पाठिराखा शतमखाचा ॥ ३ ॥
जो पुराणपुरुष प्रल्हादवरद ॥ उद्धवाक्रूरहृदयाब्जमिलिंद ॥
तों अर्जुनरथीं मुकुंद ॥ बैसोन काय बोलतसे ॥ ४ ॥
अर्जुना होई सावधान ॥ तुवां मारिला कर्णनंदन ॥
त्या दुःखेंकरून ॥ तप्त जाहला वीर तों ॥ ५ ॥
तों काळाचे मनीं बैसे वचक ॥ ऐशी अर्जुने फोडिली हांक ॥
तैशीच कर्णें देख ॥ गर्जना केली समरांगणीं ॥ ६ ॥
दोघांचे रथ श्वेतवर्ण ॥ श्वेततुरंग गति समान ॥
दोघांचें सौंदर्य देखोन ॥ मीनकेतन तटस्थ ॥ ७ ॥
समवय समविद्या समठाण ॥ समसमान ओढिती समसंधान ॥
दोघेही पृथेचे नंदन ॥ तेजें दिशा उजळती ॥ ८ ॥
कर्णाचे ध्वजीं रेखिला कुंजर ॥ पार्थध्वजीं वायुकुमार ॥
दोन्हीं दळी वाद्यगजर ॥ तुंबळ जाहला तेधवां ॥ ९ ॥
सर्व वीरांची आरोळी ॥ दोन्हीं दळी एकचि गाजली ॥
शल्य कृष्ण सारथी बळी ॥ दोहींकडे दोघांचे ॥ १० ॥
एक मेरु एक मंदार ॥ एक भार्गव एक रघुवीर ॥
एक रमावर एक उमावर ॥ तैसे दोघे दिसती ॥ ११ ॥
एक सागर एक आकाश ॥ एक वासुकी एक शेष ॥
एक धैर्य एक यश ॥ तैसे दोघे दिसती ॥ १२ ॥
एक सूर्य एक प्रलयाग्न ॥ एक वसिष्ठ एक गाधिनंदन ॥
तैसे कर्ण आणि अर्जुन ॥ समरांगणीं शोभलें ॥ १३ ॥
एक स्मार्त एक वैष्णव ॥ एक सद्भाव एक गौरव ॥
विजयश्री वरावया अभिनव ॥ रणनोवरे केवळ ते ॥ १४ ॥
दोन्हीं दळें चिंतेनें व्याकुळ ॥ कोणास विजयश्री घालील माळ ॥
सर्व देशींचे भूपाळ ॥ पक्षीं बोलती आपुलालिया ॥ १५ ॥
कोणी वर्णिती वीर कर्ण ॥ कोणी म्हणती धन्य अर्जुन ॥
सूर्य आणि संक्रंदन ॥ चिंतिती कल्याण निजपुत्रां ॥ १६ ॥
पार्थाचें कल्याण चिंतिती ॥ सुरवर सर्व निश्चितीं ॥
कर्णास व्हावी जयप्रासी ॥ दैत्य इच्छिती मनांत ॥ १७ ॥
ब्रह्मायासी पुसती देव आणि मुनी ॥ सांग जय प्राप्त कोणालागूनी ॥
ते ऐकावया विधीची वाणी ॥ शक्र सादर जाहला ॥ १८ ॥
मग बोले विष्णुनाभ ॥ जिकडे असेल रुक्मिणीवल्लभ ॥
जय आणि लाभ ॥ तिकडे सर्व विलोका ॥ १९ ॥
ऐसें ऐकतां पाकशासन ॥ आनंदभरित त्रिभुवन ॥
जयवाद्यें वाजवून ॥ वर्षे सुमनें पार्थावरी ॥ २० ॥
अमर दाटले विमानीं ॥ नरनरेश्वरीं भरिली मेदिनी ॥
निजभारेंशीं दुरोनी ॥ कित्येक कौतुक विलोकिती ॥ २१ ॥
असो कौरव पांडव रणीं ॥ झुंजता पडल्या शीर्षांच्या श्रेणीं ॥
कंपायमान होय धरणी ॥ उरगेंद्र मस्तक सरसावी ॥ २२ ॥
दिग्गज चळचळा कांपत ॥ आदिवराह सरसावी दांत ॥
कूर्म पृष्ठ सरसावित ॥ चिंताग्रस्त भुवनत्रय ॥ २३ ॥
आकाशमंडप आसडत ॥ भडभडां नक्षत्रे रिचवत ॥
महाधाकें बलवंत ॥ हिमज्वरें कांपती ॥ २४ ॥
तया कल्होळांत उभयकृष्ण ॥ वाजविती देवदत्त पांचजन्य॥
तेव्हां सृष्टि गेली म्हणोन ॥ एकचि हांक जाहली ॥ २५ ॥
त्यामाजी अंजनीनंदन ॥ बुभुःकारे गाजवी त्रिभुवन ॥
वेष्टित भूतें आवेशेकरून ॥ हांका फोडिती ते वेळीं ॥ २६ ॥
अगाध जीवनीं नौका डळमळी ॥ तैशी कुंभिनी डोलों लागली ॥
तों हनुमंत कवं घातली ॥ ध्वजावरी कर्णाचे ॥ २७ ॥
कुंजररेखित कर्णध्वज ॥ तों विदारित वायुतनुज ॥
कौतुक पहावया धर्मराज ॥ पाठीशीं उभा पार्थाच्या ॥ २८ ॥
शल्याकडे शेषशयन ॥ क्रोधें पाहे विलोकून ॥
तुरंगांवरीतुरंग जाण ॥ रथींचे धांवले सक्रोधें ॥ २९ ॥
विजय म्हणे चक्रपाणी ॥ जरी मज कर्णें मारिलें रणीं ॥
तरी तूं काय रे करिशील ये क्षणीं ॥ सांग मजला गोविंदा ॥ ३० ॥
यावरी यादवकुलदिवाकर ॥ बोलत काय श्रीकरधर ॥
अघटित घडेल साचार॥ परी पराजय नव्हे तूतें ॥ ३१ ॥
सूर्य मार्ग चुकेल करितां भ्रमण ॥ नेत्रीं अंधत्व पावेल अग्न ॥
मशकाची थडक लागून ॥ जरी मेरु उपडेल ॥ ३२ ॥
पाषाणप्रहारें करून ॥ जरी वायु पडेल मोडून चरण ॥
पिपीलिका शोधी सिंधुजीवन ॥ विजेस धांवोन शलभ धरी ॥ ३३ ॥
धडधडीत प्रलयज्वाळ ॥ कर्पूरतुषारें होय शीतळ ॥
हेंही घडेल एक वेळ ॥ परी पराजय नव्हे तूतें ॥ ३४ ॥
पार्थ म्हणे ब्रह्मांडनायका ॥ सूत्रधारका विश्वव्यापका ॥
तुझी करणी भक्तपालका ॥ ब्रह्मादिकां नेणवेचि ॥ ३५ ॥
कर्णाच्या नितंबिनी सकल ॥ विगतधवा आजि होतील ॥
वैकुंठींचा वेल्हाळ ॥ करी भविष्य आधींच हें ॥ ३६ ॥
तों दुर्योधन गुरुसुत ॥ कृतवर्मा आणि शारद्वतं ॥
बाणांची वृष्टि करित ॥ पार्थावरी लोटले ॥ ३७ ॥
गजभार रथभार ॥ पायदळ आणि अश्वभार ॥
लक्षोनियां सुभद्रावर ॥ हाणिती शस्त्रें एकदांचि ॥ ३८ ॥
तितुक्यांचीं शस्त्रें छेदून ॥ टाकिता झाला अर्जुन ॥
आपुले अंगीं एक बाण ॥ लागों नेदी कुशल तों ॥ ३९ ॥
स्वभारेंशी धांवले जे वीर॥ तितुके पार्थें केले जर्जर॥
शिरें उडविलीं अपार॥ कंदुकाऐशीं तेधवां ॥ ४० ॥
पक्षी उडती वृक्षावरूनी ॥ तैशी शिरें उसळती गगनीं ॥
तों महाप्रलय देखोनी ॥ द्रौणी म्हणे सुयोधना॥ ४१ ॥
अजून तरी होई सावधान ॥ ऐक माझें हितवचन ॥
मित्र करूनि पंडुनंदन ॥ समसमान नांदा तुम्ही ॥ ४२ ॥
माझिया बोलांत निश्चित ॥ आहेत पांच ही पंडुसुत ॥
तूं ऐकतां आपलें हित ॥ कल्याण यांत सर्वांचें ॥ ४३ ॥
दुःखार्णव भरला देखा ॥ मम वचन दृढनौका॥
बैसोन पावसी परतटाका ॥ विरोधवार्ता सांडीं कां ॥ ४४ ॥
कर्णास वारीं तूं सत्वर॥ मी आवरितों सुभद्रावर ॥
अभिमान हा महाक्रूर ॥ सांडीं संग तयाचा ॥ ४५ ॥
धृतराष्ट्राचें वंशवन ॥ विरोधें गेलें शुष्क होऊन ॥
तेथें पांच पांडव पंचाग्न ॥ जाळीत पूर्ण चालिले ॥ ४६ ॥
गुरुसुत मी गुरुसमान ॥ सुधारस मानीं मम वचन ॥
दूर करील सर्वांचें मरण ॥ सांडीं अभिमान सुयोधना ॥ ४७ ॥
मग दुर्योधन बोले वचन ॥ आतां सोडूनियां अभिमान ॥
पांडवांस न जाऊं शरण ॥ मैत्री करा म्हणोनियां ॥ ४८ ॥
वेंचूं समरांगणीं प्राण ॥ कीर्तींनें भरूं त्रिभुवन ॥
अर्जुनास मारील कर्ण ॥ पाहें कौतुक आतां हें ॥ ४९ ॥
इभमस्तकींचें मुक्त ॥ घेऊं गेला मृगनाथ ॥
तों होऊन भयभीत ॥ परतेल काय घडेल हें ॥ ५० ॥
माझ्या दुःशासनाचें रक्तपान ॥ केलें भीमें समरीं जाण ॥
त्याचा मी घेईन प्राण ॥ किंवा देईन आपुला ॥ ५१ ॥
माझ्या मस्तकींचा मुकुट ॥ लत्ताप्रहारें करीन पिष्ट ॥
समरीं भीम बोलिला स्पष्ट॥ तें तुवां श्रवण केलें कीं ॥ ५२ ॥
आतां करूं पुरुषार्थ ॥ प्राण द्यावा हाचि इत्यर्थ ॥
असो इकडे कर्ण आणि पार्थ ॥ रणरंगीं भिडती ॥ ५३ ॥
पूर्वी इंद्र आणि वृत्रासुर ॥ कीं श्रावणारिसुत मयजावर ॥
शक्रारि आणि ऊर्मिलाप्रियकर ॥ तैसे दोघे दिसती ॥ ५४ ॥
व्योमकेश आणि त्रिपुरासुर ॥ कीं तारकासुर आणि कुमार ॥
तैसे कर्ण आणि कृष्णप्रियकर ॥ निःशंक वीर दोघेही ॥ ५५ ॥
मग कर्ण पार्थास लक्षून ॥ सोडिता जाहला दहा बाण ॥
ते अर्जुने छेदून ॥ सोडिले द्विगुण तयावरी ॥ ५६ ॥
कर्णे सोडिले बाण शत ॥ सहस्रबाणीं ताडिला पार्थ ॥
लक्षबाणीं सूर्यसुत ॥ ताडिता जाहला तयातें ॥ ५७ ॥
यावरी तों वीर जगजेठी ॥ सोडिता जाहला बाणकोटी ॥
अक्षय्य तूणीर पृष्ठी ॥ अर्जुनाचा भरला असे ॥ ५८ ॥
अमोघ धनंजयाचे बाण ॥ सुटते जाहले चापापासून ॥
जैसे चतुराचे मुखांतून ॥ अपार शब्द निघती पैं ॥ ५९ ॥
कीं पदक्रमवर्णक्रमेंकरून ॥ वैदिक करिती वेदाध्ययन ॥
तैसे चपलत्वें अर्जुन ॥ शर सोडी असंख्य ॥ ६० ॥
कीं मेघापासून अवधारा ॥ अपार पडती तोयगारा ॥
कीं ओंकारापासून अपारा॥ ध्वनी जैशा निघती ॥ ६१ ॥
कीं मूलमायेपासूनि एकसरें ॥ असंख्य जीवसृष्टि उभारे ॥
कीं चपल लेखकापासून त्वरें ॥ असंख्य अक्षरें उमटती ॥ ६२ ॥
कर्णाचें जें बाणजाळ ॥ एकसरें छेदी कुंतीबाळ ॥
जैसें उगवतां सूर्यमंडळ ॥ भगणें सर्व झांकती ॥ ६३ ॥
कीं एक उठतो विनायक ॥ अपार संहारी दंदशूक ॥
कीं सुटतां चंडवात देख ॥ जलदजाळ वितळे पैं ॥ ६४ ॥
कीं विष्णुनामेंकरून ॥ असंख्य दुरितें जाती जळोन ॥
कीं चेततां द्विमूर्धान ॥ होती विपिनें दग्ध पैं ॥ ६५ ॥
शत्रुबाणजाल समस्त ॥ छेदून पाडी एके क्षणांत ॥
जैसे एका सिंहनादें गज बहुत ॥ पडती गतप्राण होऊनी ॥ ६६ ॥
हृदयीं प्रकटातांचि बोध ॥ सहपरिवारें पळती काम क्रोध ॥
कीं प्रत्यया येतां ब्रह्मानंद ॥ क्षुद्रानंद विरूनि जाती ॥ ६७ ॥
अर्कज सोडी एक शर ॥ त्यापासून निघती अपार॥
जैसा एकुलता एक पुत्र॥ संतति वाढे बहु त्याची ॥ ६८ ॥
तैलबिंदु जळी पडतां ॥ तों पसरे चहूंकडे अवचितां ॥
कीं सत्पात्रीं दान देतो ॥ कीर्ति प्रकटे सर्वत्र ॥ ६९ ॥
कीं कुलवंतासी उपकार करितां ॥ यश प्रकटे न सांगता ॥
तैसा कर्ण एक बाण सोडितां ॥ पसरती बाण चहूंकडे ॥ ७० ॥
बाणांसी झगडतां बाण ॥ तेव्हां वर्षत प्रलयाग्न ॥
बाणखंड पडतां उसळोन ॥ कित्येक वनें दग्ध होती ॥ ७१ ॥
शस्त्रांसी झगडतां शस्त्रें ॥ भयें रिचवती नक्षत्रे ॥
सप्तसमुंद्राचीं नीरे ॥ तप्त जाहलीं तेधवां ॥ ७२ ॥
कलाहीन शशितरणी ॥ विमानें पळविती सुधापानी ॥
वायु फिरों न लाहे धरणीं ॥ दिवसचि रजनी वाटत ॥ ७३ ॥
जळती सकल पांडवभार ॥ ऐसें कर्णे सोडिलें अग्न्यस्त्र ॥
वीरांचे रथ शस्त्रे समग्र ॥ जळो लागलीं तेधवां ॥ ७४ ॥
हरिनामें निरसती दोष समग्र ॥ तेविं पार्थें सोडिलें जलदास्त्र ॥
अग्नि विझाला समग्र ॥ जैशी मत्सरें प्रीति मरे ॥ ७५ ॥
जलद माजले अद्‌भुत ॥ कौरवांची सेना वाहत ॥
जैसा विवेक होतां प्राप्त ॥ काम क्रोध निरसती ॥ ७६ ॥
मग तों लोकप्राणेशास्त्र ॥ सोडिता जाहला सूर्यपुत्र ॥
पार्थसेना समग्र ॥ वायुचक्रीं पडियेली ॥ ७७ ॥
पार्थें सोडून पर्वत ॥ प्रभंजन कोंडिला समस्त ॥
जैसे मद अहंकार महंत ॥ सत्यज्ञानें विभांडी ॥ ७८ ॥
मग वज्रास्त्र जपोन ॥ सोडिता जाहला सूर्यनंदन ॥
पार्थें माहेश्वर टाकून ॥ संहारिलें तेधवां ॥ ७९ ॥
पार्थ कर्णाचा रहंवर ॥ निजबाणीं भेदिला समग्र ॥
जैसे शोभती तृणांकुर ॥ तेविं रथ दिसतसे ॥ ८० ॥
निजरथीं शोभे सूर्यकुमार ॥ जैसा निरभ्रनभी सहस्रकर ॥
कर्णें तेव्हां कार्तवीर्यास्त्र ॥ अनिवार सोडिलें ॥ ८१ ॥
सहस्रकरांचे तीव्र वीर ॥ कोट्यवधि उठिले अपार ॥
मग पार्थें भार्गवास्त्र ॥ असंभाव्य सोडिलें ॥ ८२ ॥
कर्णे सोडिलें माहिषास्त्र ॥ पार्थें शक्ति सोडिल्या समग्र ॥
कर्णे जपतां सर्पास्त्र ॥ गारुडास्त्र फाल्गुन जपे ॥ ८३ ॥
कर्णे सोडिला अपांपती ॥ किरीटीनें पाठविला अगस्ती ॥
कर्णे प्रेरिला काळराती ॥ सोडी गभस्ति पार्थें तेव्हां ॥ ८४ ॥
यावरी कर्णें कृष्णार्जुन ॥ शरधारी खिळिले संपूर्ण ॥
मग पार्थाप्रति भीमसेन ॥ बोलता जाहला तेधवां ॥ ८५ ॥
कर्णे संहारिली पृतना ॥ कौतुक कायपाहसी अर्जुना ॥
मग बाणजाळी शल्यकर्णां ॥ पार्थें खिळिले तेधवां ॥ ८६ ॥
शल्य आणि सौती ॥ मयूराऐसेचि दिसती ॥
पांडवांचे बहुत हस्ती ॥ कर्णे मारिले तेधवां ॥ ८७ ॥
रथी आटिले बहुत ॥ स्वारांस तेथे नाहीं गणित ॥
धर्मराज कौतुक पाहत ॥ कर्णाजुनांचे तेधवां ॥ ८८ ॥
गांडीवाचा गुण जाण ॥ कर्णे छेदिला टाकूनि बाण ॥
सवेंच अर्जुनें आपण ॥ लाविला नूतन तत्काळ ॥ ८९ ॥
थोर युद्धांचा कडकडाट ॥ वार्‍यास मध्ये न फुटे वाट ॥
तेथें द्विजांचा संघट्ट ॥ होईल कैसा त्या ठायां ॥ ९० ॥
कृष्णावरी साठ बाण ॥ सोडिता जाहला वीर कर्ण ॥
शल्यावरी नऊ मार्गण ॥ पार्थ तेव्हां घातले ॥ ९१ ॥
दोन्ही दळीचे वीर ॥ पाहती उगेच भयातुर ॥
जैसे चित्रीं लिहिले चित्रभार ॥ तैसे दिसती तेधवां ॥ ९२ ॥
हस्तलाघव करी कर्ण ॥ त्याहून विशेष करी अर्जुन ॥
तों कर्णाचें भातां येऊन ॥ तक्षकपुत्र बैसला ॥ ९३ ॥
त्याची माता खांडववनीं ॥ पळता मारिली पार्थ बाणीं ॥
तेथील वैर स्मरोनी ॥ शर होऊनि गुप्त वसे ॥ ९४ ॥
कर्णाजुन श्रमले फार ॥ अंगीं चालिले घर्मपुर ॥
विंझणे घेवोनि सेवक नर ॥ वारा घालिती दोघांवरी ॥ ९५ ॥
चंदनकर्पूरमिश्रित गीर ॥ सेवक शिंपिती वारंवार ॥
दोघेंही कौतेय सुंदर ॥ तनु सुकुमार दोघांची ॥ ९६ ॥
त्यावरी तों तक्षकबाण ॥ कर्णे काढिला जेविं सहस्रकिरण ॥
अर्जुनाचा कंठ लक्षून ॥ अकस्मात सोडिला ॥ ९७ ॥
तों बाण अनिवार ॥ अर्जुनाचा प्राण घेणार ॥
शक्रादिदेव समग्र ॥ हाहाकार करिती तेव्हां ॥ ९८ ॥
नित्य पूजिला तों बाण ॥ चर्चिला चंदनेंकरून ॥
त्याच बाणीं तक्षकनंदन ॥ गुप्तरूपें संचरला ॥ ९९ ॥
कळवळला शचीरमण ॥ त्यास शांतवी चतुरानन ॥
तूं धीर धरीं एक क्षण ॥ व्याकुल मन होऊं नेदी ॥ १०० ॥
अर्जुनास रक्षक पाहीं ॥ आहे क्षीराब्धीचा जावई ॥
कौतुक करील ये समयीं ॥ सावधान पहा तें ॥ १०१ ॥
प्रलयचपलेस मागे टाकून ॥ निघता जाहला निर्वाणबाण ॥
द्वादश सूर्याचें तेज पूर्ण ॥ तया शरी एकवटले ॥ १०२ ॥
कीं सुटला कालदंड ॥ विदारील वाटे ब्रह्मांड ॥
मेरुमंदार शतखंड ॥ घायें करील वाटतसे ॥ १०३ ॥
सहस्रविजा कडकडती ॥ तैसा बाण जाय सत्वरगती ॥
दोन्हीं दळें मोह पावती ॥ वीर गळती दश दिशां ॥ १०४ ॥
धर्म भीम नकुळ सहदेव ॥ भयभीत वीर सर्व ॥
म्हणती हे विश्वव्यापक कमलाधव ॥ रक्षीं रक्षीं निजदासा ॥ १०५ ॥
परम आनंदला दुर्योधन ॥ आतां सर्वथा न उरे अर्जुन ॥
माझें राज्य आणि प्राण ॥ ओवाळीन कर्णावरूनी ॥ १०६ ॥
वृक्षाग्रींचें फळ पाहोन ॥ पक्षी ये जैसा झेपावोन ॥
तैसा पार्थाचा कंठ लक्षून ॥ प्रलयबाण पातला ॥ १०७ ॥
पांडवकैवारी जगन्नाथ ॥ बळें दडपिला विजयरथ ॥
गुडघे टेंकून तेथ ॥ तुरंग बैसवीत रथाचे ॥ १०८ ॥
चक्रांसहित विजय रथ ॥ खालीं लवला हें अद्‌भुत ॥
तों मुकुट छेदून अकस्मात ॥ बाणें नेला तेधवां ॥ १०९ ॥
तिलप्राय तुकडे करून ॥ मुकुट पडला चूर्ण होऊन ॥
तों मुकुट चतुराननें निर्मून ॥ शक्रास पूर्वी दिला होता ॥ ११० ॥
तों किरीट परम प्रीतीनें ॥ पार्थास दिधला सहस्रनयनें ॥
असो अर्जुन जावा प्राणें ॥ परी मुकुटावरीच तें गेलें ॥ १११ ॥
सूत्रधारी यादवेंद्र ॥ भक्तरक्षक दयासमुद्र ॥
विमानांतूनि पुरंदर ॥ आनंदाश्रु ढाळितसे ॥ ११२ ॥
लक्षोनि पार्थ श्रीधर ॥ सुमनें वर्षे वारंवार ॥
पांडव करिती जयजयकार ॥ स्तविती तेव्हां श्रीरंगा ॥ ११३ ॥
अस्तमाना जाय चंडकिरण ॥ तैसा किरीट नेला उडवून ॥
मग पार्थ मूर्धज सांवरून ॥ वस्त्र बांधले तेधवां ॥ ११४ ॥
यावरी तों तक्षकसुत ॥ कर्णापाशी येऊनि बोलत ॥
म्हणे संधान चुकलें यथार्थ ॥ पुन्हा सोडीं मजलागीं ॥ ११५ ॥
कर्ण पुसे तूं कोण ॥ तों सांगे पूर्ववर्तमान ॥
मी मातेचा सूड घेईन ॥ करी संधान मागुती ॥ ११६ ॥
कर्ण म्हणे मी काय बलहत ॥ तुझ्या आश्रयें युद्ध करूं येथ ॥
मज वीर हांसतील समस्त ॥ जाई तूं त्वरित निजस्थाना ॥ ११७ ॥
मग सर्पास्त्राचें रूप धरून ॥ चालिला पार्थास लक्षून ॥
कृष्ण म्हणे पार्थालागून ॥ तक्षकपुत्र शत्रु तुझा ॥ ११८ ॥
मग बाण सोडून कृष्णमित्रें ॥ खंडविखंड केलीं गात्रें ॥
यावरी त्या कुंतीपुत्रे ॥ द्वादश शर सोडिले ॥ ११९ ॥
ते कर्णाचें फोडूनि अंग ॥ पलीकडे गेले सवेग ॥
सवेंच कर्णाचा मुकुट सुरंग ॥ चूर्ण केला शरघायें ॥ १२० ॥
कवच अंगीचें छेदून ॥ हृदयीं भेदिले नव बाण ॥
मूर्च्छना येऊन कर्ण ॥ ध्वजस्तंभीं टेकला ॥ १२१ ॥
मूर्च्छना जाय निरसोन ॥ तोंवरी अर्जुन न मारी बाण ॥
मग सावध होऊन कर्ण ॥ सरसावूनि बैसला ॥ १२२ ॥
अस्ता जातां वासरमणी ॥ तैसा कर्ण आरक्त दिसे ते क्षणीं ॥
मग सवेच शतबाणीं ॥ श्रीरंगास खिळियेलें ॥ १२३ ॥
सवेंच टाकोनि शत शर ॥ कर्णें पार्थ केला जर्जर ॥
मग पार्थास म्हणे श्रीकरधर ॥ काढीं बाण शिवदत्त जो ॥ १२४ ॥
पृथ्वी आप तेज वायु अंबर ॥ यांचीं सत्त्वे काढून समग्र ॥
एकादश रुद्र द्वादश मित्र ॥ यांचीं तेजें घेउनी ॥ १२५ ॥
तों बाण रची हिमनगजामत ॥ पूर्वी त्रिपुरवधानिमित्त ॥
मग प्रसन्न होऊनियां देत ॥ पार्थालागीं प्रीति ॥ १२६ ॥
तों कर्णाचे कर्म गहन ॥ न सुटे कदा भोगिल्याविण ॥
गुरुशाप विप्रशाप दारुण ॥ सरसावले अंतकाळीं ॥ १२७ ॥
समीरगतीं चालतां रथ ॥ पृथ्वीनें चक्रें गिळिलीं अकस्मात ॥
मंत्र आठवेना समयोचित ॥ अस्त्रही कदा स्मरेना ॥ १२८ ॥
अस्त्रें शक्ति अद्‌भुत बाण ॥ असता कदा नव्हे स्मरण ॥
हस्तलाघव गेलें गळोन ॥ तेजोहीन मुख जाहलें ॥ १२९ ॥
दशदिशा वाटती शून्य ॥ वाटे जवळ आलें मरण ॥
परी तों भास्करी धैर्य धरून ॥ पुढती रण माजवित ॥ १३० ॥
मग चाप ओडूनि आकर्ण ॥ कर्णें सोडून सात बाण ॥
सच्चिदानंदतनूसी भेदून ॥ बाण गेले पलीकडे ॥ १३१ ॥
सप्त बाण भेदून गेले ॥ परी कृष्णाचे आसन न ढळे ॥
पंचशरांचेनि मेळें ॥ न ढळे जैसा मारुति ॥ १३२ ॥
हाणता कुठार तीक्ष्ण ॥ वृक्ष न न्याय सोडून स्थान ॥
कीं वर्षतां अपार घन ॥ अचल स्थान सोडीना ॥ १३३ ॥
कीं निंदक निदितां अपार ॥ न चळे साधूचें अंतर ॥
प्रल्हादास लाविले विखार ॥ परी तेणें धीर न सोडिला ॥ १३४ ॥
जो षड्‌विकाररहिततनु ॥ जो नरवीरपंचाननु ॥
तों आदिपुरुष पुरातनु ॥ सप्तशरीं भेदिला ॥ १३५ ॥
पार्थाचे हृदयीं जाण ॥ कर्णे भेदिले द्वादश बाण ॥
सवेंचि प्रत्यंचा छेदून ॥ गांडीवाची टाकिली ॥ १३६ ॥
पार्थ आणीक लावी नूतन ॥ सवेंच तोडून टाकी कर्ण ॥
असो एकामागे एक गुण ॥ शंभर तोडून टाकिले ॥ १३७ ॥
अर्जुने निर्वाणशरीं ॥ कर्ण खिळिला ते अवसरीं ॥
तेव्हां कर्णाचा रथ धरित्री ॥ गिळिती जाहली विप्रशापें ॥ १३८ ॥
ते वेळीं सूर्यनंदन ॥ रथाखालीं उतरोन ॥
रथचक्र काढी उपटोन ॥ परी कदा नुपटेचि ॥ १३९ ॥
धन्य कर्णाचें अद्‌भुत बळ ॥ डळमळलें उर्वीमंडळ ॥
परी समीप आला काळ ॥ चक्र सहसा उपटेना ॥ १४० ॥
तों अर्जुनाचे येती बाण ॥ मग बोलता जाहला उदार कर्ण ॥
भो भो पार्थ पंडुनंदन ॥ क्षणैक स्थिर राहें तूं ॥ १४१ ॥
तूं वीर परम ख्यातिवंत ॥ अवकाश देई एक मुहूर्त ॥
मज चक्र उपडं दे येथ ॥ संकटीं बहुत पडलों असें ॥ १४२ ॥
पार्थ मुकुट नेला छेदून ॥ कर्णाची वीरगुंठी सुटोन ॥
सुवास केश पसरले जाण ॥ ते शोभायमान दिसती ॥ १४३ ॥
असो तों कर्ण उदार ॥ पार्थास विनवी वारंवार ॥
मी व्यसनी पडलों साचार ॥ भीत नाहीं मरणा ॥ १४४ ॥
धर्माधर्मविचार बहुत ॥ तूं सर्व जाणसी रणपंडित ॥
त्याप्रति द्वारकानाथ ॥ प्रत्युत्तर देतसे ॥ १४५ ॥
म्हणे कर्णा धर्म न्याय नीती ॥ आतां काय रे तूज स्मरिली चित्तीं ॥
सभेस नेली द्रौपदी सती ॥ कपटद्यूत खेळोनियां ॥ १४६ ॥
तेव्हां धर्म न्याय नीती ॥ तुज नाठवली कदा चित्तीं ॥
अजातशत्रु धर्म नृपती ॥ कपटेंकरून नाडिला ॥ १४७ ॥
विष घालोन मारिला वृकोदर ॥ वर्मी दंशविले विखार ॥
लाक्षासदनीं लाविला वैश्वानर ॥ तेव्हां धर्म न विचारिला ॥ १४८ ॥
वना धाडिले पंडुकुमार ॥ रात्रीस मिळूनि तुम्ही समग्र ॥
घाला घालावया दुराचार ॥ येत होतां कपटी हो ॥ १४९ ॥
मिळून तुम्ही अवघे जणीं ॥ बाळ अभिमन्यू मारिला रणीं ॥
तुज धर्म नाठवला ते क्षणीं ॥ मदेंकरूनि भुललासी ॥ १५० ॥
द्रौपदी नव्हे देवकी जाण ॥ सभेत गांजिली नेऊन ॥
वस्त्रें घेतलीं फेडून ॥ तेव्हां धर्म न विचारिला ॥ १५१ ॥
आतां शत्रु निवटूनि सर्वत्र ॥ धर्मावरी मी धरीन छत्र ॥
ऐसें बोलतां शतपत्रनेत्र ॥ सूर्यपुत्र न बोलेचि ॥ १५२ ॥
पार्थावरी सोडी शर ॥ सवेंचि उपटी रथचक्र ॥
पार्थास म्हणे नीलगात्र ॥ सोडीं अस्त्र काय पाहसी ॥ १५३ ॥
कर्ण तिकडून शर सोडी ॥ सर्वेच रथचक्रें बळें उपटी ॥
शतबाण सोडून प्रौढी ॥ अर्जुन मूर्च्छित पाडिला ॥ १५४ ॥
इतक्यांत उपटी रथचक्र ॥ परी तें न ढळेचि अणुमात्र ॥
ब्रह्मशाप परम दुस्तर ॥ कदा टाळिला नवजाय ॥ १५५ ॥
श्रीकृष्ण म्हणे पार्था पाहीं ॥ हा वधीं जो रथावरी चढला नाहीं ॥
तों बाण सोडून लवलाहीं ॥ ध्वज छेदिला कर्णाचा ॥ १५६ ॥
हाहाकार करिती कौरवजन ॥ आतां न वांचे कदा कर्ण ॥
जय पारखा जाहला येथून ॥ कर्म गहन पूर्वींचें ॥ १५७ ॥
तों पार्थें शिवदत्तबाण ॥ प्रलयविजेऐसा देदीप्यमान ॥
कीं तों माध्यान्हींचा चंडकिरण ॥ तैसा मार्गण दिसतसे ॥ १५८ ॥
कीं तों शिवहस्तींचा त्रिशूळ ॥ किंवा वज्र सुटलें प्रबळ ॥
कीं सुदर्शन तेजाळ ॥ कृष्णहस्तींचें चालिलें ॥ १५९ ॥
पार्थ करी तेव्हां शपथ ॥ जरी सत्यविद्या हे शिवदत्त ॥
आणि विबुधेश्वराचें सामर्थ्य ॥ अपरिमित असेल ॥ १६० ॥
द्रोणगुरूचें पदकमल ॥ माझें मन तेथें भ्रमर असेल निश्चल ॥
कायावाचामनें निर्मल ॥ कृष्णोपासक मी जरी असें ॥ १६१ ॥
तरी याच बाणें तत्काळ ॥ तुटो कर्णाचे शिरकमळ ॥
तों बाण जातसे तेजाळ ॥ मूर्च्छित जाहलीं दोन्हीं दळे ॥ १६२ ॥
पर्वतावरी पडे चपला ॥ तैसा शर कर्णकंठीं बैसला ॥
कीं सूर्य अस्तमाना गेला ॥ तैसें शिर उडविलें ॥ १६३ ॥
शिर ऊर्ध्व गेलें देखा ॥ मुखांतून निघाली तेजकलिका ॥
ते मिळाली जाऊन अर्का ॥ लवणजलन्यायेंशीं ॥ १६४ ॥
जयवाद्यांचे गजर ॥ पांडवदळीं जाहले अपार ॥
वरी आनंदला पुरंदर ॥ दुंदुभिवाद्यें वाजवी ॥ १६५ ॥
दिव्यसुमनांचा वर्षाव तेव्हां ॥ वारंवार करी मधवा ॥
कौरवदळी तेधवां ॥ शिर पडलें कर्णाचें ॥ १६६ ॥
कर्ण पडतां रणमंडळी ॥ दुःखाश्रू ढाळी चंडांशुमाळी ॥
निजकरें स्पर्शोनि अस्ताचळीं ॥ सागरस्नान करीतसे ॥ १६७ ॥
उरले जे पांडवांचे वीर पूर्ण ॥ एकमेकां देती आलिंगन ॥
उत्तम दानीं संपूर्ण ॥ भूसुर जाण तोषविले ॥ १६८ ॥
रिता रथ घेऊन ते वेळीं ॥ शल्य प्रवेशला कौरवदळी ॥
धरणीवरी आंग घाली ॥ दुर्योधन अतिशोके ॥ १६९ ॥
तेव्हां नेत्रोदकेंकरूनी ॥ खालीं भिजतसे अवनी ॥
अहा बालमित्रा मज टाकूनी ॥ कर्णवीरा गेलासी ॥ १७० ॥
अहा कर्णा परमोदारा ॥ अहा कर्णा अतिसुंदरा ॥
अहा कर्णा समरधीरा ॥ सद्‌गुण मी किती आठवूं॥ १७१ ॥
हे कर्णवीरा चंडकिरणा ॥ पावलास आजि अस्तमाना॥
उदय नव्हेचि पुन्हा ॥ पडली सेना अंधारीं ॥ १७२ ॥
तुझिया स्वरूपावरून ॥ शंबरार्रि टाकावा ओवाळून ॥
कवच कुंडलें मागों आला जाण ॥ ब्राह्मणवेषें शक्र तों ॥ १७३ ॥
तूं सकल उदारांचा राणा साच ॥ तत्काळ दिधलीं कुंडलें कवच ॥
कार्पण्यता न धरसीच ॥ कायावाचामानसें ॥ १७४ ॥
औदार्य सात्विकता परोपकार ॥ धर्मरायास गंभीर ॥
पराक्रमी पुण्यपवित्र ॥ तुजऐसा नसेचि ॥ १७५ ॥
तीं रणमंडळ सांडूनी ॥ पळे तेव्हां कौरववाहिनी ॥
इकडे भीमे आनंदेकरूनी ॥ हांक फोडिली आवेशें ॥ १७६ ॥
प्रतिशब्द उठिला निराळीं ॥ कौरवसेना कांपे चळीं ॥
स्वदेशास तये काळीं ॥ कित्येक जाती जीवभयें ॥ १७७ ॥
वीर बोलती भयेंकरून ॥ पैल पाहा आला अर्जुन ॥
एक म्हणती दुःशासनाचे रक्तपान ॥ कर्ता भीम आलाहो ॥ १७८ ॥
अहो ते भयसमुद्रांत ॥ कौरवसेना अवघी पडत ॥
कर्णाचे स्तवन अद्‌भुत ॥ शल्य करी तेधवां ॥ १७९ ॥
म्हणे कर्णाऐसा वीर पाहीं ॥ नोहेच कदा भवनत्रयीं ॥
होणर न टळे सहसा ही ॥ रणीं मारिला फाल्गुनें ॥ १८० ॥
इकडे धर्मराज कृष्णार्जुनां ॥ प्रीतीनें देत आलिंगना ॥
म्हणे हे कृष्णा जनार्दना ॥ किती उपकार आठवूं ॥ १८१ ॥
आमची शोभा संपत्ति बळ ॥ तूंच अवघा तमालनीळ ॥
तूंच ब्रह्मानंद निर्मळ ॥ सगुणपणा आलासी ॥ १८२ ॥
चिंतामणीचे धवलागारीं ॥ जो पहुडला सुखसेजेवरी ॥
तों ओसणता बोलिला जरी ॥ तरी तें सर्व प्राप्त होय ॥ १८३ ॥
तैसा आमुचे मनोरथीं ॥ हरि तूं जाहलासी सारथी ॥
जें जें आम्ही इच्छितों चित्तीं ॥ तें श्रीपति पुरविसी तूं ॥ १८४ ॥
खाऊनि करकरां दांत ॥ दुर्योधन धांवला सेनेसहित ॥
पांडवसेना संहारित ॥ वीर-अती यश दिशां ॥ १८५ ॥
जैसा चापापासूनि सुटे बाण ॥ तैसा धांवला भीमसेन ॥
प्रचंड गदाघायेकरून ॥ कौरवसेना विभांडिली ॥ १८६ ॥
पंचवीस सहस्र वीर॥ मारीत तेव्हां वृकोदर ॥
धृतराष्ट्राचा ज्येष्ठ कुमार॥ पराभवून पळविला ॥ १८७ ॥
रात्र जाहली परमघोर ॥ शिबिरीं जाऊनि बैसला चिंतातुर॥
कर्णासी आठवूनि वारंवार॥ दुर्योधन अश्रु गाळी ॥ १८८ ॥
जेणें द्रव्याचे पर्वत ॥ ब्राह्मणांस दिधले अमित ॥
रणा आला सूर्यसुत ॥ करूनि समस्त ग्रहदानें ॥ १८९ ॥
तों हरिवरध्वजांचे रथीं ॥ द्विजवरध्वज जाहला सारथी ॥
म्हणोनियां जयप्राप्ती ॥ जाहली निश्चितीं तयातें ॥ १९० ॥
देवऋषी स्वस्थाना ॥ चालिले वर्णीत भीमार्जुनां ॥
कोणी वर्णिती कर्णा ॥ धीर उदार म्हणोनियां ॥ १९१ ॥
धर्मराज रथीं बैसोन ॥ सुगंधस्नेहदीपिका लावून ॥
कर्पूरदीपिका पाजळून ॥ सहस्र सेवक चालती ॥ १९२ ॥
कर्ण पडला रणमंडळीं ॥ धर्म जवळी येऊन न्यहाळी ॥
महावीर पडले स्थळोस्थळीं ॥ दिव्य अलंकारीं मंडित ॥ १९३ ॥
नक्षत्रे क्षितीवरी पडती ॥ तेविं अलंकार शस्त्रें झगमगती ॥
असो पांडव शिबिराप्रती ॥ जाते जाहले तेधवां ॥ १९४ ॥
कृष्णकृपेचें बळ अद्‌भुत ॥ रणीं मारिला सूर्यसुत ॥
सुखें निद्रा पांडव करित ॥ सर्व चिंता सोडूनियां ॥ १९५ ॥
इकडे धृतराष्ट्रालागून॥ संजय सांगे वर्तमान ॥
रणीं पहुडला वीर कर्ण ॥ जो को प्राण कौरवांचा ॥ १९६ ॥
धृतराष्ट्र आणि गांधारी ॥ बुडालीं तेव्हां शोकसागरीं ॥
संजय विदुर नानापरी ॥ शांतविती दोघांतें ॥ १९७ ॥
जनमेजय जो धरणीनाथ ॥ त्यास वैशंपायन सांगत ॥
शौनकादिकाप्रति सूत ॥ कथा सांगत नैमिषारण्यी ॥ १९८ ॥
कर्णपर्व संपलें येथून ॥ पुढें शल्यपर्व करा श्रवण ॥
श्रीधर ब्रह्मानंदेंकरून ॥ विनवीतसे श्रोतयांसी ॥ १९९ ॥
हें कर्णपर्व ऐकतां निर्मळ ॥ हाता ये अश्वमेधफळ ॥
श्रवण करी जो पुण्यशीळ ॥ इच्छिलें फळ पावे तों ॥ २०० ॥
तों होय धनधान्यसंयुक्त ॥ पुत्रपौत्री तोच नांदत ॥
माधव आणि उमाधव समस्त ॥ कृपा करिती त्यावरी ॥ २०१ ॥
ब्राह्मणांस होय विद्या प्राप्त॥ क्षत्रिय ऐकतां विजय सत्य ॥
निरंतर धनधान्ययुक्त ॥ वैश्य शूद्र होती श्रवणें ॥ २०२ ॥
कर्णपर्व क्षीराब्धि देख ॥ पार्थरथ शेषमंचक ॥
जेथें विराजे वैकुंठनायक ॥ सर्व सामर्थ्यसहित पैं ॥ २०३ ॥
जेथें जयश्री हेच कमला ॥ अर्धांगी वसतसे वेल्हाळा ॥
म्हणोनियां होतसे सोहळा ॥ पांडवां घरीं सर्वदा ॥ २०४ ॥
श्रीमद्भीमातटविहारा ॥ ब्रह्मानंदा सौख्यसमुद्रा ॥
पांडुरंगा श्रीधरवरा ॥ दिगंबरा आदिपुरुषा ॥ २०५ ॥
येथूनि शल्यपर्व अवधारा ॥ पंडित श्रोते श्रवण करा ॥
श्रीधरवरदा जगदुद्धारा ॥ मन्मनोरथीं बैसें कां ॥ २०६ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ कर्णपर्वे व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकुणपन्नासाव्यांत कथियेला॥ २०७ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे कर्णपर्वणि एकोनपंचाशत्तमोऽध्याय: ॥ ४९ ॥
अध्याय एकोणपन्नासावा समाप्त


GO TOP