श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय एकेचाळिसावा


कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली


श्रीगणेशाय नम: ॥
जय जय सुभद्रकारके भवानी ॥ मूळपीठद्वारकाविलासिनी ॥
आदिमायेची तूं कुलस्वामिणी ॥ प्रणवरूपिणी श्रीरंगे ॥ १ ॥
व्यास वाल्मीक नारद ॥ शुक प्रल्हाद रुक्मांगद ॥
अंबरीष ऋषि सनकादि ऋषिवृंद ॥ वर्णिती कीर्ति अंबे तुझी ॥ २ ॥
धर्म भीम सुभद्राकांत ॥ नकुल सहदेव पंडुसुत ॥
द्रुपद विराट सात्यकी समस्त ॥ दिवटे तुझे नाचती ॥ ३ ॥
सप्त अक्षौहिणी दळ पूर्ण ॥ या भूतावळी संगे घेऊन ॥
कुरुक्षेत्रा जाऊन ॥ गोंधळ मांडिला स्वानंदें ॥ ४ ॥
रणमंडळ हें होमकुंड ॥ द्वेषाग्नि प्रज्वळला प्रचंड ॥
कौरव बस्त उदंड ॥ आहुती आत पडतील पैं ॥ ५ ॥
भीष्म द्रोण कर्ण वीर ॥ दुःशासन शकुनि कपटसागर ॥
इतरही दैत्यांश नृपवर ॥ आहुती घेशील ययांच्या ॥ ६ ॥
दुर्योधन याची निश्चितीं ॥ शेवटीं घेशील पूर्णाहुती ॥
राज्यीं स्थापून धर्मनृपती ॥ मग तूं जाशील द्वारके ॥ ७ ॥
अंबे तुझे दिवटे अपार ॥ त्यांमाजी दासानुदास श्रीधर ॥
तेणें पांडवप्रतापदीपिका थोर ॥ पाजळिली यथामती ॥ ८ ॥
आबाल भोळे अज्ञान जन ॥ प्रपंचरजनींत पडले जाण ॥
त्यांस हे ग्रंथदीपिका पाजळून ॥ सारांशमार्ग दाखविला ॥ ९ ॥
ब्रह्मानंदा यादवेंद्रा ॥ पंढरीशा करुणासमुद्रा ॥
श्रीधरवरदा आनंदभद्रा ॥ पुढें चरित्र बोलवीं ॥ १० ॥
हातीं लेखणी घेऊन लवलाहें ॥ तव वदन मी सदा पाहें ॥
पुढें आतां लिहूं काय ॥ लवलाहें सांग तें ॥ ११ ॥
पंढरीशें हें ऐकून ॥ सुहास्यमुखें बोले वचन ॥
म्हणे मी सांगतो लेखन ॥ करीं तूं तेंच सत्वर ॥ १२ ॥
ऐसें वदोन चक्रपाणी ॥ हातीं दिधली लेखणी ॥
श्रीधरसखया येथूनी ॥ भीष्मपर्व लिहीं कां ॥ १३ ॥
उद्योगपर्व मागें संपतां ॥ वैशंपायनें कथिली कथा ॥
सप्रेमें जनमेजय श्रोता ॥ अत्यादरें पुसतसे ॥ १४ ॥
कौरव आणि पांडवदळें ॥ कुरुक्षेत्रीं मिळाली सकळें ॥
जैसें सागरीं लवण फुटले ॥ प्रलयीं लोटलें भूमीवरी ॥ १५ ॥
कौरवांशीं करून शिष्टाई ॥ आला क्षीराब्धीचा जांवई ॥
दुर्योधन कुबुद्धि पाहीं ॥ सहसाही नायके तों ॥ १६ ॥
सेनापती गंगानंदन ॥ दुर्योधनें केला संपूर्ण ॥
इकडे धर्में जो धृष्टद्युम्न ॥ रणपट्ट त्यासी बांधिला ॥ १७ ॥
येथूनि भीष्मपर्व रसाळ ॥ बोले वैशंपायन निर्मळ ॥
मनीं चिंतूनि व्यासपदकमळ ॥ कथा पुढें चालविली ॥ १८ ॥
तेच कथेचा अन्वय ॥ धृतराष्ट्रास सांगे संजय ॥
दोहीं दळी गजर पाहें ॥ विशेष जाहला वाद्यांचा ॥ १९ ॥
धर्म कृष्णार्जुन भीम देख ॥ इहीं त्राहाटिले बळें शंख ॥
कौरवदळीही अनेक ॥ वाजविले जलज तेधवां ॥ २० ॥
दोहीं दळीचा वाद्यगजर ॥ त्यांत कंबू वाजले अपार ॥
तेथें ब्रह्मांडगोळ समग्र ॥ डळमळत अतिभयें ॥ २१ ॥
दोन्ही दळे परम सदट ॥ मिळाली जेव्हां सेना अचाट ॥
वाटे उर्वी शतकूट ॥ होऊनि जाईल क्षणार्धें ॥ २२ ॥
ऐकतां तों गजर विशेष ॥ ग्रीवा सहस्र डोलवी नागेश ॥
श्रमित जाहले मानस ॥ म्हणे अनर्थ काय हा ॥ २३ ॥
भगणें रिचवती भूमंडळी ॥ बैसली मेघांची दातखिळी ॥
कृतांतासही ते वेळीं ॥ भय अत्यंत वाटलें ॥ २४ ॥
उचंबळले समुद्रजळ ॥ डळमळलें धरणीमंडळ ॥
हेलावले सप्त पाताळ ॥ वराह कूर्म दचकले ॥ २५ ॥
दिग्गज चळचळा कांपती ॥ मेरु मंदार आंदोळती ॥
सुधापानी परम चित्तीं ॥ भय पावले तेधवां ॥ २६ ॥
आखंडल मनीं दचकला ॥ अपर्णा पडली शिवाचे गळां ॥
भयभीत जाहली कमळा ॥ विष्णु तियेसी सांवरी ॥ २७ ॥
सृष्टि बुडाली देख ॥ तिहीं लोकीं वाजली हांक ॥
पार्थाचे रथीं आदिपुरुष निःशंक ॥ पाहे विस्मित उगाचि ॥ २८ ॥
सृष्टि बुडेल हें जाणोन ॥ मुखींचा काढिला पांचजन्य ॥
तों अवघेच नाद राहोन ॥ तटस्थ जाहलीं दोन्ही दळे ॥ २९ ॥
वृद्ध बाळ घरीं ठेवून ॥ मिळाले मुख्यीचे वीर तरुण ॥
तों गजपुरी सत्यवतीनंदन ॥ धृतराष्ट्रासी भेटला ॥ ३० ॥
म्हणे दोन्ही दळे आटतील ॥ पांडव पांच उरतील ॥
तूं जरी पुत्रांचे युद्ध पाहशील ॥ तरी मी चक्षु देईन तूतें ॥ ३१ ॥
विचारें बोले अंबिकानंदन ॥ कुलक्षय न पाहवे माझेन ॥
मज एथेंच कळेल वर्तमान ॥ ऐसें करीं गुरुवर्या ॥ ३२ ॥
मग संजयाच्या मस्तकीं हस्त ॥ ठेविता जाहला शुकतात ॥
म्हणे ज्ञानदृष्टीनें विलोकून समस्त ॥ करीं श्रुत रायातें ॥ ३३ ॥
जें जें वर्तेल रणाचे समयीं ॥ तें तें सर्वही पाहून येई ॥
तुज श्रम न होती कांहीं ॥ मनोजवें येतां जातां ॥ ३४ ॥
तुज शस्त्रें न लागती रणीं ॥ सुखें तूं येई जाई क्षणोक्षणीं ॥
ऐसें श्रीव्यास बोलोनी ॥ अंतर्धान पावले ॥ ३५ ॥
संजय म्हणे ते वेळीं ॥ राया दोन्ही दळे सिद्ध जाहलीं ॥
तुझे पुत्र मिळाले सकळी ॥ नामें ऐक अनुक्रमें ॥ ३६ ॥
दुर्योधन दुःशासन युयुत्सु जाण ॥ सह जलसंध सहविंद सुलक्षण ॥
अनुविंद भीष्मवर्मा सुबाहु प्रदर्शन ॥ द्युमत्सेन बारावा ॥ ३७ ॥
दुर्मुख दुष्कर्ण विशंति विकर्ण ॥ जलशंख उपचित्र चित्राक्ष लोचन ॥
चारुचित्र दुर्मद शरासन ॥ दुःप्रगाह चोविसावा ॥ ३८ ॥
विवत्स विकट शुभदर्शन ॥ उपनंद नंद चित्रभान ॥
चित्रकर्ण सुवर्मा दुर्विष मोचन ॥ सुनाभ जाण छत्तिसावा ॥ ३९ ॥
आयुर्बाहु महाबाहु चित्रांगद दीर्घचरण ॥ भीष्मवेग भीम बल सुभग जाण ॥
उग्रायुध भीमकर्णा बलवर्धन ॥ कर्णेयु अठ्ठेचाळिसावा ॥ ४० ॥
दृढायु बहुकर्मा बृहत्क्षेत्र पूर्ण ॥ सोमकीर्ति द्वंद्वसंध जनसंध जाण ॥
सत्यसंघ उग्रश्रवा सेनानी असेन ॥ दुःपूर अपराजित साठ जाहले ॥ ४१ ॥
कुंडशायी विशालाक्ष अक्षय दुराधर्ष ॥ दृढहस्त सुकेश वात सुवेष ॥
बद्धसिंह आदित्य केतु विशेष ॥ उग्रज बाहात्तर जाहले ॥ ४२ ॥
कवचीनाग दंतखड्‍गी अंडह थोर ॥ उग्र भीमरथ बाहु अलोलुप कुंडधर ॥
अभय शौचकर्मा दृढरहंवर ॥ युद्धदृढ चौर्‍यायशीं हे ॥ ४३ ॥
इंद्रायुध अनालस्य कुंडभेदी दीर्घलोचन ॥ प्रथन प्रमाथी दीर्घलोभ वीर्यवान ॥
व्यूढध्वज कनकध्वज कुंडशीर्ण पूर्ण ॥ कर्णिक शाण्णव जाहले ॥ ४४ ॥
बलाकी सुभग सगुण ॥ सुहस्त विरोधी पूर्ण ॥
एकशतावरी आगळा जाण ॥ एकोत्तरशत पुत्र हे ॥ ४५ ॥
संजय म्हणे इतर वीर देख ॥ त्यांचींही नामें ऐक ॥
कृपाचार्य द्रोणाचार्य वीरनायक ॥ अश्वत्थामा द्विज तिन्ही ॥ ४६ ॥
भीष्म कर्ण शकुनि भगदत्त ॥ शल्य उलूक बाल्हीक सोमदत्त ॥
भूरिश्रवा अलंबुष जयद्रथ ॥ बृहद्‍बल आश्रश्रृंगी ॥ ४७ ॥
सैंधव विंद अनुविंद ॥ अंगराज म्लेंच्छपति बहुविध ॥
पर्वतिकराजे विविध ॥ नामें त्यांचीं असंख्य ॥ ४८ ॥
त्रिगर्त सुशर्मा हलायुध ॥ दंडधर मागधराजे दळसन्निध ॥
जयत्सेन कांबोज पौरव प्रसिद्ध ॥ महावीर कौरवदळीं ॥ ४९ ॥
आतां पंडुपुत्रांचे दळी ॥ वीर ऐक राया महाबळी ॥
मुख्य वीरनायक वनमाळी ॥ काळ चळचळा कांपे जया ॥ ५० ॥
धर्म भीम अर्जुन ॥ नकुळ सहदेवं माद्रीनंदन ॥
आतां प्रतिपांडव पांच जाण ॥ त्यांचीं नांवें ऐक पां ॥ ५१ ॥
प्रतिविंध्य श्रुतसोम श्रुतकर्मा ॥ श्रुतसेन शतानीक ज्यांची युद्धसीमा ॥
हे दौपदीपुत्र अगाध महिमा ॥ पांडवांचे प्रतिपांडव ॥ ५२ ॥
जैसा नवग्रहांत सूर्यनारायण ॥ तैसा सुभद्रात्मज प्रत्यर्जुन ॥
द्रुपद शिखंडी धृष्टद्युम्न ॥ बहुत नंदन द्रुपदाचे ॥ ५३ ॥
युद्धसमयीं नामें जाण ॥ त्यांचीं सांगेल वैशंपायन ॥
विराटसुत उत्तर सात्यकी यादव जाण ॥ शिशुपालपुत्र धुष्टकेतु ॥ ५४ ॥
कुंतिभोज काशिराज चेकितान ॥ घटोत्‍कच अंजनपर्वा त्याचा नंदन ॥
उलूपीपुत्र इलावान ॥ अर्जुनवीर्ये जन्मला ॥ ५५ ॥
नीलराज क्षत्रिय देवाधिराज वीर ॥ शंख उत्तमौजा युयुधान संजित दशपुत्र ॥
युधामन्यु विक्रांत महावीर ॥ धुष्टद्युम्नकुमार क्षात्रधर्मी ॥ ५६ ॥
वार्ध्यक्षमी चित्रायुध सुकुमार ॥ सत्यधृति व्याघ्रदत्त चंद्रसेन वीर ॥
सेनाबिंदु परंजय सत्यजित थोर ॥ पांड्यराज महाबळी ॥ ५७ ॥
श्रोणिमान्वसुधान पूजित ॥ हे पांडवदळीं वीर विख्यात ॥
राया वीरगणना समस्त ॥ यथानुक्रमे सांगितली ॥ ५८ ॥
कौरवदळीं वीर अद्‌भुत ॥ सेनामुखीं मुख्य देवव्रत ॥
शुभ्र घोडे शुभ्र रथ ॥ पंच ध्वज शुभ ज्याचे ॥ ५९ ॥
शुभ्र वस्त्रें शुभ्र मुक्तामाळा ॥ शुभ्र परिमळ सर्वागळा ॥
एकत्र करूनि द्वादशादित्यकळा ॥ वाटे घडिला कमलासनें ॥ ६० ॥
महावीर रणपंडित ॥ जेणें रणीं तोषविला रेणुकासुत ॥
उर्वीचे राजे विपरीत ॥ ज्याच्या भयानें वर्तती ॥ ६१ ॥
कल्पांतीं जैसा कृतांत ॥ विश्व ग्रासू पाहे क्षुधाक्रांत ॥
तैसा पाहतां देवव्रत ॥ भयभीत पांडवदळें ॥ ६२ ॥
दोन सेना दोनभागीं अद्‌भुत ॥ मध्ये भीष्में केला उभा रथ ॥
हस्तसंकेत दाखवूनि त्वरित ॥ राहवीत वाद्यध्वनी ॥ ६३ ॥
पांडव कौरव तटस्थ होऊन ॥ ऐकती भीष्माचे बोल गहन ॥
म्हणे वीर हो ऐका सावधान ॥ दोहीं दळींचे समस्तही ॥ ६४ ॥
युद्धसमयींच करावें वैर ॥ शिबिर गेलिया निर्वैर ॥
सेनेंत हिंडावे निःशस्त्र ॥ भय मनीं न धरूनियां ॥ ६५ ॥
कित्येक राजे सेनेसहित ॥ भोंवते युद्धकौतुक विलोकित ॥
त्यांवरी जाऊनि शस्त्रघात ॥ सर्वथाही न करावा ॥ ६६ ॥
पळे तयासी न मारावे ॥ शस्त्र टाकील त्यास रक्षावें ॥
शरणागतास पाळावे ॥ बहुतीं नजावें एकावरी ॥ ६७ ॥
घेऊनि उपचार तांबूल उदक ॥ मध्ये वागती जे कां सेवक ॥
त्यांस न मारावें देख ॥ ऐका समस्त धर्म हा ॥ ६८ ॥
वार्तिक चार येत जात ॥ सूत्रधार लोहचर्मकारक ॥
भूमिसमानकर्ते खनक ॥ त्यांस कदा न मारावे ॥ ६९ ॥
महाराज गंगानंदन ॥ आणीक बोले हस्त उभारून ॥
पांडवदळींचे नृप संपूर्ण ॥ सावधान ऐका पां ॥ ७० ॥
मज भीष्माचा नेम निश्चितीं ॥ नित्य मारीन दहासहस्र रथी ॥
निर्वीर करीन सकल क्षिती ॥ निज सामर्थ्येंकरूनियां ॥ ७१ ॥
द्रोणाचार्य कृपाचार्य ॥ कर्ण अश्वत्यामा बळें आर्य ॥
जे रणपंडित प्रतापसूर्य ॥ आटिती तुम्हांस दळासहित ॥ ७२ ॥
तरी आम्हांकडे जे येणार ॥ ते आतांच या नृप हो सत्वर ॥
ऐकोन पांडवदळींचे वीर ॥ उगेच उत्तर न देती ॥ ७३ ॥
मग आपल्या दळाकडे पाहून ॥ बोले शंतनुरायनंदन ॥
म्हणे जिकडे असती कृष्णार्जुन ॥ जय तिकडे निश्चयें ॥ ७४ ॥
विजय चाप विजय तूणीर ॥ विजय ध्वज विजय वायुकुमार ॥
विजय रथावरी विजय वीर ॥ विजय देणार श्रीकृष्ण तेथें ॥ ७५ ॥
भीमाची ऐकतां हांक ॥ चळचळा कांपती तिन्ही लोक ॥
गदाघायें सेना सकळिक ॥ निवटील हा निश्चयें ॥ ७६ ॥
धर्म तपस्वी सत्यपरायण ॥ नयन उघडील क्रोधेंकरून ॥
सर्व पृतना जाईल पूर्ण ॥ उमारमण दुसरा तों ॥ ७७ ॥
तैसेच हे सहदेव नकुल ॥ उतावीळ पाहती युद्धकाल ॥
सौभद्र सात्यकी प्रत्यक्ष काल ॥ दळ सकळ उरों न देती ॥ ७८ ॥
द्रुपद पांचाळ महारथी ॥ असो जय पांडवचि पावती ॥
कोण जाणार ते नृपती ॥ त्वरितगति जा आतां ॥ ७९ ॥
तों युयुत्सु धृतराष्ट्रनंदन ॥ वेश्योदरीं पावला जनन ॥
जो कां आगळा शतांहून ॥ तों उठोन चालिला ॥ ८० ॥
निजसेनेसहित जात ॥ देखोन सुयोधन संतप्त ॥
मग बोले गंगासुत ॥ तूं कां व्यर्थ राहविसी त्या ॥ ८१ ॥
आपणाकडे आला युयुत्सव ॥ हें जाणोन संतोषले पांच पांडव ॥
गजाखालीं उतरून धर्मराव ॥ भेटोनि तया गौरविलें ॥ ८२ ॥
धर्म बोले प्रियवचन ॥ संकटीं बंधु आलासी धांवोन ॥
तूं मज आवडशी प्राणांहून ॥ ऐकोन युयुत्सु तोषला ॥ ८३ ॥
असो यावरी भीष्म महाबली ॥ जेणें दहा दिवस सेना रक्षिली ॥
दुर्योधन आज्ञापी सकलीं ॥ नृपवरीं रक्षावें भीष्मातें ॥ ८४ ॥
शिखंडीस रक्षा अवघेजण ॥ अथवा सत्वर टाका मारून ॥
देवव्रत त्यावरी न घाली बाण ॥ स्त्री म्हणून पूर्वीं तों ॥ ८५ ॥
दोन्ही दळींचे दिसती हस्ती ॥ जैशा चालिल्या पर्वतपंक्ती ॥
कनकपाखरा झळकती ॥ हिरे दंतीं जडियेले ॥ ८६ ॥
कर्णांमधूनि रुळती चामरे ॥ घंटा वाजती अतिगजरें ॥
रणसागरींचीं तारें ॥ रथ तैसे दोन्ही दळी ॥ ८७ ॥
ध्वज तळपती साचार ॥ वरी चिन्हे तेच कर्णधार ॥
रत्‍नकनकमंडित रहंवर ॥ रणपंडित वरी बैसले ॥ ८८ ॥
पवनवेगें गरुडासमान ॥ दोन्ही दळीं तुरंग संपूर्ण ॥
कित्येक धांवती श्यामकर्ण ॥ मनोजवेंकरूनियां ॥ ८९ ॥
फुटलें जैसें समुद्रजळ ॥ तैसें न गणवेचि पायदळ ॥
तों उठिले वाद्यांचे कल्लोळ ॥ भूमंडळ डळमळिलें ॥ ९० ॥
शशिवदना भेरी धडकत ॥ दुंदुभी वाजती असंख्यात ॥
श्रृंगें करणे फुंकीत ॥ नाहीं अंत वाद्यांसी ॥ ९१ ॥
वरी उगवला सूर्यनारायण ॥ रणीं दुसरा सूर्य गंगानंदन ॥
कर्ण विलोकी दुरून ॥ नेमवचन दृढ धरिलें ॥ ९२ ॥
भीष्माचा जो होय अंत ॥ तोंवरी कदा न ये युद्धांत ॥
असो देवर्षी समस्त ॥ कल्याण चिंतिती पांडवां ॥ ९३ ॥
महारथी वीससहस्र ॥ भीष्माचे पाठीशीं उभे सादर ॥
वज्रव्यूह दृढ साचार॥ धृष्टद्युम्नें रचियेला॥ ९४ ॥
मध्यभागीं युधिष्ठिर॥ जैसा भगणीं वेष्टित रोहिणीवर ॥
की निजकिरणीं वेष्टित भास्कर॥ कीं देवीं शक्र त्यापरी ॥ ९५ ॥
दिव्यरत्‍नांभोंवतीं सकळी ॥ मिळे जैशी परीक्षकमंडळी ॥
कीं सिद्धाभोंवती पाळी ॥ साधकांची विराजे ॥ ९६ ॥
दोन्ही दळीची अपार धुळी ॥ गेली ऊर्ध्व गगनमंडळी ॥
निर्बुजले पक्षी सकळी ॥ वायु फिरू न लाहे ॥ ९७ ॥
कौरवांस अपशकुन जाणा ॥ जाणवताती क्षणक्षणां ॥
विजय कल्याण पंडुनंदनां ॥ शकुनचिन्हें दिसती पैं ॥ ९८ ॥
केवळ देवांऐशी जाणा ॥ दिसों लागली पांडवपृतना ॥
दैत्यराक्षसवत कौरवसेना ॥ अमंगळ दारुण दिसतसे ॥ ९९ ॥
केशव म्हणे किरीटी ऐक ॥ शुचिष्मंत होऊन सेनेसन्मुख ॥
दुर्गास्तवन करीं सम्यक ॥ जय प्राप्त तेणें तुम्हां ॥ १०० ॥
मग हस्तपाद प्रक्षालून ॥ श्वेतवाहनें कर जोडून ॥
करूं आरंभिलें स्तवन ॥ जेणें प्रसन्न अंबा होय ॥ १०१ ॥
जय जय दुर्गे आदिजननी ॥ भवच्छेदके वरदायिनी ॥
भवप्रिये भवभयमोचनी ॥ समरांगणीं पाठी राखें ॥ १०२ ॥
इंद्र उपेंद्र कमलासन ॥ शिव करिती तुझें अर्चन ॥
ऋषिगण गंधर्व मानव जाण ॥ तुज स्तवूनि यशस्वी ॥ १०३ ॥
अनंत तरुणादित्य पंक्ती ॥ तव प्रभेमाजी गुप्त होती ॥
प्रणवस्वरूपिणी मूळस्फूर्ती ॥ त्रिपुरसुंदरी जगन्माते ॥ १०४ ॥
ऐसें ऐकतां स्तवन ॥ देवी अंतरिक्ष बोले वचन ॥
तुज साह्य मी आणि श्रीकृष्ण ॥ रक्षूं सदा समरांगणीं ॥ १०५ ॥
मग रथारूढ जाहला सुभद्रावर ॥ सारथी पुढें त्रिभुवनसुंदर ॥
अंजनीहृदयारविंदभ्रमर ॥ देत भुभुःकार सत्राणें ॥ १०६ ॥
फुटली भूतांची आरोळी ॥ जलज वाजविती बीभत्सु वनमाळी ॥
शुष्क तुंबिनीचे फळ जळी ॥ तेवीं डळमळे कुंभिनी हे ॥ १०७ ॥
श्रीवल्लभास म्हणे पार्थ ॥ उभयसेनांमध्यें लोटीं रथ ॥
मग त्रुटि न वाजतां त्वरित ॥ मध्यभागीं उभा केला ॥ १०८ ॥
संजय म्हणे कुरुभूषणा ॥ हषीकेशें लोटितां स्यंदना ॥
तटस्थ पाहे उभयसेना ॥ मध्ये रथोत्तम स्थापिला ॥ १०९ ॥
मग चहूंकडे पार्थ ॥ कौरवसेना विलोकित ॥
तों अवघेचदेखिले आप्त ॥ भीष्मद्रोणादिसर्वही ॥ ११० ॥
ऐसें देखोन सुभद्रावरा ॥ म्हणे हे श्रीकृष्ण हे श्रीकरधर ॥
अवघे प्राणसखे हे सहोदर॥ यांस कैसें वधू आतां ॥ १११ ॥
अरे हा भीष्म महाराज पाहें ॥ आमुचा पितामह प्रत्यक्ष होत आहे ॥
बालपणापासूनि पाळिले स्नेहे ॥ त्यास कैसें वधू आतां ॥ ११२ ॥
हा द्रोणाचार्य गुरुमाउली ॥ त्याच्या स्नेहसागरी म्यां बुडी दिधली ॥
आपुल्या पुत्राहून आगळी ॥ मजवरी प्रीति तयाची ॥ ११३ ॥
पृथ्वीपरी क्षमा आगळी ॥ या द्रोणाचे ठायीं न्यहाळीं ॥
गुणगंभीरा दयेची खोली ॥ सागराहून अधिक पैं ॥ ११४ ॥
हें राज्य जावो जळोन ॥ जाऊं दे आतांच माझा प्राण ॥
परी गुरुद्रोणावरी बाण ॥ टाकूं कैसे कमलावरा ॥ ११५ ॥
हा कृपाचार्य दयासागर ॥ हा अश्वत्यामा गुरुपुत्र ॥
हे सुयोधनादि माझे सहोदर ॥ कैसा गोत्रवध करूं आतां ॥ ११६ ॥
थरथरां कांपे अर्जुन ॥ नेत्रीं वाहे अश्रुजीवन ॥
मुखकमल गेलें सुकोन ॥ जिव्हा अधर वाळले ॥ ११७ ॥
हातींचें चाप गळाले ॥ सर्वांगीं रोमांच उभारले ॥
उडी घातली रथाखालें ॥ मोहें व्यापिलें पार्थासी ॥ ११८ ॥
कंठ दाटला सद्‌गदित ॥ स्फुंदस्फुंदोन रडे पार्थ ॥
म्हणे हा मांडला अनर्थ ॥ स्वजन कैसे वधू आतां ॥ ११९ ॥
नलगे राज्य संपदा धन ॥ घेवोत सुखें माझा प्राण ॥
परी मी यांवरी बाण ॥ सहसाही सोडींना ॥ १२० ॥
यांस समरांगणीं मारूनी ॥ रक्ते भिजवावी हे मेदिनी ॥
मग ते भोगावी चक्रपाणी ॥ महापापें भरली जे ॥ १२१ ॥
कुलक्षय मित्रद्रोह करून ॥ गुरुहत्या मारूनि ब्राह्मण ॥
जळो जळो हें क्षत्रियपण ॥ काय भोगूं राज्य तें ॥ १२२ ॥
मग राज्यांतीं नरक थोर ॥ आपण भोगावें अपार ॥
सुखें सेवावें गिरिकंदर ॥ जळो क्षत्रियधर्म हा ॥ १२३ ॥
हे रविकरवरांबरधरा ॥ मधुमुरनरकसंहारा ॥
द्वारकानगरविहारा ॥ युद्ध मी सहसा न करींच ॥ १२४ ॥
यावरी इंदिराहृदयाब्जभ्रमर ॥ मेघगंभीरगिरा बोले उत्तर ॥
म्हणे प्राणसखया हा विचार ॥ व्यर्थ काय आरंभिला ॥ १२५ ॥
दोन्ही दळे सिद्ध जाहलीं ॥ रणतुरांची घाई लागली ॥
तुझी गति मोहें व्यापिली ॥ कैशी पडली भुली तूतें ॥ १२६ ॥
तूं मारिशी तरीच हे मरती ॥ नाहीं तरी काय चिरंजीव होती ॥
कालत्रयीं क्षय न पावती ॥ सांग मज तूं आतां हें ॥ १२७ ॥
तुझें करून निमित्तमात्र ॥ मी उतरितों हा भूभार ॥
कर्ता हर्ता पाळिता सर्वत्र ॥ मीच व्यापक सर्व असें ॥ १२८ ॥
या ब्रह्मांडाची रहाटी ॥ मजपासूनियां जाहली किरीटी ॥
स्वया पावोन शेवटीं ॥ मजमाजी सर्व मिळे ॥ १२९ ॥
जैशा अलंकारांच्या आकृती ॥ मुसेमाजी सर्व विरती ॥
तैसे हे जीव सामावती ॥ मजमाजी सुभद्रावरा ॥ १३० ॥
मणी ओविले जैसे सूत्री ॥ तैसा मी व्यापक सर्वांतरी ॥
आदि अंतीं मध्यें निर्धारीं ॥ मजवांचून नसे दुजें ॥ १३१ ॥
जैशी काष्ठाची बुद्धिबळें मांडिजेत ॥ तेथें चलनवलन नाहीं किंचित ॥
हारी जिती समस्त ॥ खेळणाराजवळीच असे ॥ १३२ ॥
बुद्धिबळानें अभिमान तेथ ॥ कां हो धरावा उगाचि एथ ॥
आम्ही युद्धकरते जयवंत ॥ कायशी मात विचारीं हे ॥ १३३ ॥
तैशी ही कौरवपांडवदळें ॥ मीच हें बुद्धिबळ ठेविलें ॥
स्वच्छंदें मी खेळ खेळें ॥ तुवां की मांडिलें नसतेचि ॥ १३४ ॥
तूं मजशीं आहेस अभिन्न ॥ अवघें कर्तृत्व माझेंच जाण ॥
व्यर्थ धरून देहाभिमान ॥ आपणा दूषण लाविसी ॥ १३५ ॥
ऊठ घेई धनुष्यबाण ॥ पाहसी काय माजवीं रण ॥
तूं माझें स्वरूप ओळखून ॥ होई निमग्न मजमाजी ॥ १३६ ॥
आरशांत पाहिलें वदन ॥ तरी काय जाहले दुजेपण ॥
तैसें माझें प्रतिबिंब पूर्ण ॥ निमित्त पुढें तुज केलें ॥ १३७ ॥
तूं निर्दोष सच्चिदानंदघन ॥ माझें स्वरूप तूंच पूर्ण ॥
पार्था हें माझें सत्यज्ञान ॥ तुझी आण वाहतसें ॥ १३८ ॥
श्रीधर विनवी सकळ पंडितां ॥ एथून अद्‌भुत भगवद्गीता ॥
अवघी वर्णावी तत्त्वतां ॥ तरी ग्रंथविस्तार होईल पैं ॥ १३९ ॥
आदिपर्वापासून ॥ हा एकेचाळिसावा अध्याय जाण ॥
अपार ग्रंथ वैशंपायन ॥ व्यासप्रसादें बोलिला ॥ १४० ॥
साह्य होऊन पंढरीनाथ ॥ त्यांतील सारांशकथा वदवित ॥
एरवीं समुद्राऐसा ग्रंथ ॥ महाभारत व्यासोक्त हा ॥ १४१ ॥
साठलक्ष मूळभारत ॥ सवालक्ष निवडी सत्यवतीसुत ॥
त्यांची टीका पदपदार्थ ॥ मानवां केविं करवेल पां ॥ १४२ ॥
सवालक्ष श्लोक पावन ॥ त्यांची टीका संपूर्ण ॥
शतवर्षे करितां जाण ॥ तरी कदा न सरेचि ॥ १४३ ॥
त्यांत मनुष्याचें आयुष्य क्षणिक जाण ॥ केव्हां सरेल न कळे खूण ॥
त्यांत संसारव्यथा परम दारुण ॥ आधि व्याधि पीडिती ॥ १४४ ॥
शतवर्षे वांचल्या जरी ॥ पन्नास वर्षें गेलीं रात्री ॥
कांहीं बालत्व तारुण्यभरीं ॥ तों वृद्धत्व निर्धारीं लागलें ॥ १४५ ॥
त्यांतही पूर्वपुण्यानुसारे ॥ आठवतील भगवंताचीं चरित्रे ॥
गंगा न प्राशवे समग्र करें ॥ म्हणून तृषा कां मोडावी ॥ १४६ ॥
एक दोन अंजुळी जीवन ॥ घेऊन करावें तृषाहरण ॥
पर्वताइतकें दिधलें धन ॥ तरी शक्ति पाहून स्वीकारावे ॥ १४७ ॥
देखिला दिव्यान्नाचा पर्वत ॥ परी केविं मावेल पोटांत ॥
तरी कां बैसावें क्षुधाक्रांत ॥ घ्यावें किंचित उदराइतकें ॥ १४८ ॥
वाचेचें सार्थक करावें यथार्थ ॥ म्हणोनि आरंभिलें व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ अतुट कथा निवडिली ॥ १४९ ॥
असो भीष्मपर्व आरंभितां ॥ एथें लागली भगवद्‌गीता ॥
सातशत श्लोक पाहतां ॥ गणना ऐका समस्तही ॥ १५० ॥
धृतराष्टोक्त एक श्लोक ॥ दुर्योधनाचे नऊ देख ॥
संजयाचे बत्तीस सम्यक ॥ अर्जुनाचे चौर्‍यायशीं ॥ १५१ ॥
पाचशे चौर्‍याहत्तर सुरस ॥ स्वयें बोलिला जगन्निवास ॥
एव सप्तशतश्लोक गीता निःशेष ॥ महापुरुष उपासिती ॥ १५२ ॥
गीता हे भवानी सतेजा ॥ अष्टादशाध्यायः तिच्या भुजा ॥
बोधत्रिशूल घेऊन ओजा ॥ कुतर्कदैत्य मर्दित ॥ १५३ ॥
पार्थाचे हृदयीं मोह फार ॥ हाच माजला होता महिषासुर ॥
बोधशस्त्रें छेदूनि शिर ॥ पायांखालीं रगडिला ॥ १५४ ॥
अर्जुन मोहें व्यापिला कैसा ॥ आपुलें स्वरूप नेणे सहसा ॥
त्यास गीता हाच आरसा ॥ रमावरें दाखविला ॥ १५५ ॥
अर्जुनाचे हृदयीं अंधार ॥ पडला असतां निबिड फार ॥
तेथें सातशतें श्लोक दिवाकर ॥ उदय पावले एकदांचि ॥ १५६ ॥
गीता हे कामधेनु जाणा ॥ अर्जुनासी घाली प्रेमपान्हा ॥
तेंच दुभतें संतसज्जनां ॥ परिपूर्ण होय अद्यापी ॥ १५७ ॥
कीं गीता हें पदक अवधारा ॥ त्यावरी जोडिले हिरे अठरा ॥
पार्थ प्राणसखा जाणोन खरा ॥ कंठीं घातलें तयाच्या ॥ १५८ ॥
कीं पार्थहृदयसमुद्रओघा ॥ मिळाल्या अष्टादश गंगा ॥
कीं गीता सुरतरूची अंगलगा ॥ अष्टादश शाखांची ॥ १५९ ॥
कीं अष्टादश पुराणांचें हें सार ॥ कीं अठरा कोहळीं द्रव्य अपार ॥
गीतामंजूषेंत भरून श्रीधर ॥ समर्पित अर्जुनासी ॥ १६० ॥
सहा अध्याय कर्मकांड जाण ॥ सहा अध्याय पूर्ण औपासन ॥
सहा अध्याय पूर्ण दिव्यज्ञान ॥ त्रिकांड संपूर्ण वेद हा ॥ १६१ ॥
कीं अष्टादश दिव्य खण ॥ गीता हेंच वृंदावन ॥
स्वानुभवतुळशी शोभायमान ॥ घवघवीत साजिरी ॥ १६२ ॥
तेथें पारायण प्रदक्षिणा अनुदिन ॥ करिती सदा संतजन ॥
असो गीता सुरस गहन ॥ पार्थाप्रती निरोपिली ॥ १६३ ॥
ब्रह्मानंदें श्रीधर ॥ विनवी पंडितां जोडूनि कर ॥
गीतेवरी टीका साचार॥ जरी आतां येथें करावी ॥ १६४ ॥
तरी ज्ञानेश्वराहून निश्चितीं ॥ माझी नव्हे कीं आगळी मती ॥
तेचि पाहावी सर्वसंतीं ॥ दिनरातीं अत्यादरें ॥ १६५ ॥
गीता हें पदक निर्धारें ॥ वरी ज्ञानेश्वरें जोडिले हिरे॥
इतर जडतील तीं खापरे ॥ मागें अथवा पुढेंही ॥ १६६ ॥
ज्ञानेश्वरी निंदिती साचार ॥ ते नर नव्हेत प्रत्यक्ष असुर॥
कीं मनुष्यरूपें खर ॥ व्यर्थ जन्मास आले ते ॥ १६७ ॥
ज्ञानेश्वर तोच कृष्णनाथ ॥ केला गीतेचा तेणें अर्थ ॥
जे निदितील यथार्थ ॥ ते मंदमती जाणावे ॥ १६८ ॥
असो ज्ञानेश्वर आणि सर्व संत ॥ त्यांस ब्रह्मानंदें श्रीधर विनवित ॥
पुढें कथेस द्यावें चित्त ॥ भीष्मपर्व रसागळें ॥ १६९ ॥
अर्जुनास ज्ञान अद्‌भुत ॥ उपदेशून क्षीराब्धिजामात ॥
निजरथीं बैसवी स्वस्थ ॥ पुढें कथार्थ परिसिजे ॥ १७० ॥
धर्म रथाखालीं उतरून ॥ शस्त्र कवच सर्व ठेवून ॥
दोन्ही हस्त जोडून ॥ कौरवसेनेंत चालिला ॥ १७१ ॥
कौरव धर्मास निंदित॥ क्षत्रियधर्म टाकून समस्त ॥
जीवभयें शरण येत ॥ भीष्मालागीं वाटतें ॥ १७२ ॥
चौघेही बंधू वेगें ॥ धांवती धर्माचे पाठिलागे ॥
कौरव आनंदले सर्वांगें ॥ म्हणती बरवें आतां जाहलें ॥ १७३ ॥
दोन्ही दळींचे राजे समस्त॥ म्हणती हें काय जाहले विपरीत ॥
पांडव झाले शरणागत ॥ परम नीच कर्म हें ॥ १७४ ॥
कौरव वस्त्रें उडवून वहिले ॥ म्हणती पांडव आम्हांस शरण आले ॥
वाद्यघोष उगेचि राहिले ॥ शब्द न बोले कोणी तेथें ॥ १७५ ॥
कां पांडव गेले कर जोडून ॥ हें एक जाणे श्रीकृष्ण ॥
वरकड दोन्ही दळींचे जन ॥ संशयचक्रीं पडियेले ॥ १७६ ॥
असो भीष्माजवळी येऊन ॥ पांडव अनुक्रमें करिती वंदन ॥
पुढें बद्धांजलि उभारून ॥ धर्मराज विनवीतसे ॥ १७७ ॥
म्हणे जनकजनका कुरुनायका ॥ निजकुलवल्लीप्रतिपालका॥
युद्ध करावया आम्हां सेवकां ॥ आज्ञा यावरी होईल कीं ॥ १७८ ॥
मग बोलिला देवव्रत ॥ जरी तुम्ही न येतां पुसावया येथ॥
तरी मी शापितों यथार्थ ॥ कोपोनियां निश्चये ॥ १७९ ॥
आतां प्रसन्न मी तुम्हांसी ॥ जय पावाल निश्चयेंशीं ॥
तुम्ही निर्भय होऊन मानसीं ॥ समरीं मजशीं भिडावें ॥ १८० ॥
धर्म म्हणे मज विचार॥ सर्वज्ञा सांग वारंवार॥
भेटीस येईन साचार॥ क्षणक्षणां महाराजा ॥ १८१ ॥
तुजपासूनियां सत्य ॥ आम्हांस कैसा जय प्राप्त ॥
भीष्म म्हणे तों वृत्तांत ॥ पुढें येईं सांगेन तूतें ॥ १८२ ॥
मग पितामहास नमून ॥ द्रोणाचे पांचही वंदिती चरण ॥
कर जोडूनियां स्तवन ॥ करिती प्रेमें आवडीं ॥ १८३ ॥
पार्थ सद्‌गदित होऊनी ॥ भाळ ठेवी द्रोणाचे चरणीं ॥
म्हणे गुरुवर्या समरांगणीं ॥ तुजशीं कैसा युद्ध करूं ॥ १८४ ॥
या शरीराच्या पादुका करून ॥ तुझे चरणीं मी लेववीन ॥
तरी तुझे उपकारां उत्तीर्ण ॥ नव्हें कदा गुरुवर्या ॥ १८५ ॥
तुझिया उपकारें दाटलों फार॥ कैसे सोडूं तुजवरी शरा ॥
द्रोण म्हणे धर्मयुद्ध साचार॥ करितां दोष कदा नसे ॥ १८६ ॥
तुम्हांस जय होईल प्राप्त॥ कौरव क्षय पावतील समस्त ॥
तुम्ही आरंभीं भेटलेत येऊन येथ ॥ इतुकेन तृप्त मी झालों ॥ १८७ ॥
जिकडे असे वैकुठविलास ॥ तिकडे जय आणि निर्दोष यश ॥
धर्मा जें तुझें इच्छित मानस ॥ तें मी पुरवीन सांग पां ॥ १८८ ॥
धर्म म्हणे आम्हांसी जय ॥ तुजपासून कैसा प्राप्त होय ॥
मग संतोषोन द्रोणाचार्य ॥ वर्म सांगे शेवटींचें ॥ १८९ ॥
मजशी अर्जुनावाचूनी ॥ भिडे ऐसा वीर नाहीं समरांगणीं ॥
शेवटीं महामुनीश्वर येऊनी ॥ माझिये कर्णी सांगेल ॥ १९० ॥
त्याचा बोध कर्णी ऐकोन ॥ शस्त्रें माझी मीच ठेवीन ॥
योगदीक्षा आकळून ॥ मी जाईन निजधामा ॥ १९१ ॥
मग तुम्हांस जय प्राप्त ॥ ऐकोन संतोषले पंडुसुत ॥
मग गुरूसी पुसोन शारद्वत ॥ वंदून प्रेमें स्तवियेला ॥ १९२ ॥
कृपाचार्य सुप्रसन्न ॥ म्हणे तुम्हांस होईल जय कल्याण ॥
मी चिरंजीव मज नाहीं मरण ॥ युद्ध निर्वाण करा तुम्ही ॥ १९३ ॥
मग जो शल्य मातुल जाण ॥ त्यास भेटले पांचही जण ॥
धर्म बोले कर जोडून ॥ नेमवचन सांभाळी ॥ १९४ ॥
कर्णाचे सारथ्य करूनी ॥ तेजोभंग करावा क्षणोक्षणीं ॥
मग शल्य अवश्य म्हणोनी ॥ आशीर्वाद देता जाहला ॥ १९५ ॥
मग स्वदळांत येऊन ॥ रथारूढ जाहले पांचही जण॥
कीं उगवले पंच चंडकिरण ॥ श्रीकृष्णकृपांबरीं ॥ १९६ ॥
भीष्माचें युद्ध संपूर्ण ॥ होय तों कदा न ये कर्ण ॥
हेंही उत्तम जाहलें कारण ॥ जगज्जीवन बोलिला ॥ १९७ ॥
उतरावया भूभारा ॥ अवतरलासे यादवेंद्र ॥
त्याची माया परम दुस्तर॥ करी विचित्र करणी पहा ॥ १९८ ॥
ब्रह्मानंद अज अविनाश ॥ श्रीमद्‌भीमातीरविलास ॥
अर्जुनाचे रथीं हृषीकेश ॥ सारथी जाहला स्वयें पैं ॥ १९९ ॥
भीष्मपर्व अतिसुरस ॥ पुढें माजेल बहु वीररस ॥
श्रीधरवरद जगन्निवास ॥ पांडुरंग बोलवील पैं ॥ २०० ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ भीष्मपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकेचाळिसाव्यांत कथियेला ॥ २०१ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे भीष्मपर्वणि एकचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४१॥
अध्याय एकेचाळिसावा समाप्त


GO TOP