श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय अडतिसावा


दुर्योधनाला थोरांचा सल्ला


श्रीगणेशाय नम: ॥
वैशंपायन म्हणे पुण्यरूपा ॥ ऐक जनमेजया महानृपा ॥
चार याम क्रमिली क्षपा ॥ सनत्सुजातसमागमें ॥ १ ॥
मेघापरीस उदार ॥ ज्ञान वर्षला तों विधिपुत्र ॥
उदयाचलीं येतां मित्र ॥ तम निःशेष हारपलें ॥ २ ॥
परम देदीप्यमान तरणि ॥ भीष्म शारद्वत द्रोण द्रोणि ॥
सुयोधन दुःशासन कर्ण शकुनि ॥ सभास्थानीं बैसले ॥ ३ ॥
अर्कज सौबल बाल्हीक ॥ प्रज्ञाचक्षु कुरुनायक ॥
सभा घनवटली सम्यक ॥ शक्रस्थानासारिखी ॥ ४ ॥
तों संजय परम प्रवीण ॥ सभेस बैसला येऊन ॥
मग सांगता जाहला वर्तमान ॥ पंडुकुमारांचें सर्वही ॥ ५ ॥
धर्में वृद्धकनिष्ठांलागून ॥ सांगितलें आशीर्वाद क्षेम नमन ॥
दुर्योधन म्हणे तरी संजया संपूर्ण ॥ सांग अर्जुन बोलिला तें ॥ ६ ॥
संजय म्हणे जें ते बोलिले ॥ तेंचि कथितों नाहीं आगळें ॥
तुम्ही जरी न कोपाल वहिलें ॥ तरी वर्तलें तें सांगेन मी ॥ ७ ॥
प्रज्ञाचक्षु म्हणे कां कोपावें ॥ बोलिले तेंच त्वां सांगावें ॥
संजय म्हणे ऐकावें ॥ सर्व सादर होऊनी ॥ ८ ॥
क्रोधें बोलिला अर्जुन ॥ दुरात्मा जो सूतपुत्र कर्ण ॥
त्याचा समरीं घेईन प्राण ॥ तरीच गांडीवचापधारी मी ॥ ९ ॥
धर्मराज उघडील दिव्य दृष्टी ॥ तेव्हां भस्म करील सर्व कौरवसृष्टी ॥
हा वृकोदर वीर जेठी ॥ यापुढें पृष्ठी कृतांत दावी ॥ १० ॥
माद्रीसुत इच्छित मनीं ॥ केव्हां माजेल रण मेदिनी ॥
द्वारावतीची भवानी ॥ श्रीरंगरूपिणी चतुर्भुज ॥ ११ ॥
तीस आम्ही नवशिलें उदंड ॥ कीं तुजपुढें करूं होमकुंड ॥
कौरवबस्त प्रचंड ॥ दळासहित बळी देऊं ॥ १२ ॥
आम्ही अरण्यात श्रमलों बहुत ॥ कौरव समरीं लोळवू समस्त ॥
धर्माचा क्रोध सांचला बहुत ॥ कौरवसंहार करील तों ॥ १३ ॥
कुठारधार छेदी सर्व वनें ॥ कीं तृण जाळिले त्रिचरणें ॥
भीमसूर्य शत्रुउडुगणें पैं ॥ तेजहीन पैं होती ॥ १४ ॥
शनुजलदजाल सघन ॥ भीम सुटतां प्रभंजन ॥
क्षणें जाती वितळोन ॥ शीघ्रकाळें यावरी ॥ १५ ॥
कौरवमूषकांचा मार्ग लक्षी ॥ सहदेवभुजंग धुसधुशी ॥
नकुलव्याघ्र आपटी शेपटी ॥ शत्रुजंबुक कोठें वसती ॥ १६ ॥
हा महावीर धृष्टद्युम्न ॥ नरवीरांमाजी पंचानन ॥
हा सात्यकी प्रलयाग्न ॥ शत्रुवन जाळूं इच्छी ॥ १७ ॥
हे प्रतिविंध्यादि पांच कुमार ॥ उदित युद्धासी अहोरात्र ॥
हा कृष्णसदृश सौभद्र ॥ कृतांतासी गणीना ॥ १८ ॥
मेरु मंदार सबळ सदट ॥ तैसे द्रौपद आणि विराट ॥
देशोदेशींचे राजे अचाट ॥ त्यांचा पराक्रम न वर्णवे ॥ १९ ॥
दुर्योधन दुःशासन ॥ यांचा काळ भीमसेन ॥
हें हरि हर कमलासन ॥ नव्हे अप्रमाण त्यांचेनी ॥ २० ॥
भीष्माचा काळ शिखंडी जाण ॥ द्रोणास वधील धृष्टद्युम्न ॥
सार्वभौम धर्म आपण ॥ शल्यास मारूं इच्छित ॥ २१ ॥
सहदेव शकुनीचा काळ ॥ उलूकास मारील नकुळ ॥
कौलिकपुत्राचें शिरकमळ ॥ मीच छेदीन स्वहस्तें ॥ २२ ॥
उरले जे कां धार्तराष्ट ॥ सर्वांचा काळ हा वृकोदर ॥
धृतराष्ट्राचे पालन समग्र ॥ आम्हीच करूं शेवटीं ॥ २३ ॥
वीज तळपे जैशी अंबरीं ॥ तैसा श्रीरंग रथ फेरी ॥
तेव्हां वीर पळतील दशदिशांतरीं ॥ शस्त्रें अस्त्रें टाकोनियां ॥ २४ ॥
कौरव तस्कर संपूर्ण ॥ यांचे तोडीन हस्त चरण ॥
जयद्रथाचें शिर छेदीन ॥ द्रौपदीस घेऊन पळत होता ॥ २५ ॥
त्यांहीं शब्दशस्त्रें सोडिली अपार ॥ लोहशस्त्रें आम्ही देऊं प्रत्युत्तर ॥
कृष्णद्वेषी चांडाळ समग्र ॥ संहारीन नेम हा ॥ २६ ॥
माझिया चापास आहे गवसणी ॥ परी प्रतिचाप क्षणक्षणां झणाणी ॥
तूणीर भरलासे बाणीं ॥ करकरती बाहेर यावया ॥ २७ ॥
काळ फोडीन रणांगणीं ॥ यवपिष्टवत करीन धरणी ॥
आकाशमंडप उघडोनी ॥ पाडीन स्वर्ग खालता ॥ २८ ॥
माझिया रथाचा ध्वज अद्‌भुत ॥ वायु नसतां फडकत ॥
भूतांसह हनुमंत ॥ वाट पाहत रणाची ॥ २९ ॥
सर्पाचिया परी झडकरी ॥ असिलता निघती मेणाबाहेरी ॥
शक्तिजाळ माझें थरथरी ॥ अस्त्रे विचार करिताती ॥ ३० ॥
परम प्रतापी पंडुकुमार ॥ परी धृतराष्ट्र आणि गंगापुत्र ॥
शारद्वत आचार्य गुरूवर ॥ यांचे चरण न विसरती ॥ ३१ ॥
मग बोले गंगानंदन ॥ विधीनें केलें प्रजाचें समाधान ॥
भूभार उतरावया संपूर्ण ॥ नरनारायण अवतरले ॥ ३२ ॥
ते हेच कृष्णार्जुन ॥ भूभार उतरतील संपूर्ण ॥
दुर्योधना होई सावधान ॥ वंशवन जाळू नको ॥ ३३ ॥
कपिध्वज रणांगणीं ॥ देखिला नाहीं तुम्ही नयनीं ॥
तोंवरी धर्मासी आणोनी ॥ राज्यविभाग देइजे ॥ ३४ ॥
आतां नायकसी आमुचें वचन ॥ समरीं जेव्हां सोडशील प्राण ॥
तेव्हां होईल आठवण ॥ आमुचिया वचनाची ॥ ३५ ॥
कर्ण शकुनि दुःशासन ॥ यांचें नायकें कदा वचन ॥
मम वाक्य सुधारस सेवून ॥ अमर होऊन नांदे कां ॥ ३६ ॥
सक्रोध बोले वीर कर्ण ॥ अरे हा भयभीत वृद्ध पूर्ण ॥
क्षत्रियधर्म सोडून ॥ दीनवदन गोष्टी सांगे ॥ ३७ ॥
सेनेसमवेत पांडव ॥ मी रणीं संहारीन सर्व ॥
एकछत्री राणीव ॥ दुर्योधनाचें करीन मी ॥ ३८ ॥
भीष्म म्हणे रे कर्णा ॥ कां करिसी व्यर्थ वल्गना ॥
गोग्रहणीं घेऊन कृष्णवदना ॥ कां रे सर्व पळाला ॥ ३९ ॥
गंधर्वी कौरव धरून नेले ॥ तेव्हां तुझें बळ कोठें गेलें ॥
अधम हो तुम्हां सोडविलें ॥ भीमार्जुनीं धांवोनी ॥ ४० ॥
यावरी महाराज गुरुद्रोण ॥ धृतराष्ट्रास बोले वचन ॥
जें बोलिला देवव्रत गर्जोन ॥ सत्य सत्य जाण हें ॥ ४१ ॥
जो माजली नाहीं रणकुंभिनी ॥ तों मैत्री करा जाऊनी ॥
तों अंध पैं म्हणे ते क्षणीं ॥ मज भय वाटे भीमाचें ॥ ४२ ॥
भीमाचिया बळापुढें ॥ न तुळती उभय दळे पडिपाडें ॥
त्याचा गदाघाय ज्यावरी पडे ॥ तेथें उरी उरेना ॥ ४३ ॥
मी तयाचें समाधान ॥ पहिलेंच करितों जाऊन ॥
तरीच हा अनर्थ चुकता दारुण ॥ आतां ते कदा नाटोपती ॥ ४४ ॥
उपजत मूर्ख माझे नंदन ॥ नायकती श्रेष्ठांचे वचन ॥
भीम ऐरावत दारुण ॥ वंशवन उपडील ॥ ४५ ॥
तेणें जरासंध मारिला ॥ किर्मीर हिडिंब बक वधिला ॥
सबळ कीचकांचा मेळा ॥ मृत्युनगरा धाडिला ॥ ४६ ॥
तों या सकळांस मारील देख ॥ माझेनें नायकवेल स्नुषांचा शोक ॥
मी त्यांचे द्वारीं लोळेन बहुतेक ॥ पुत्रशोकेकरूनियां ॥ ४७ ॥
धन्य पांडव बलवंत ॥ माझी मर्यादा पाळिती बहुत ॥
येर्‍हवीं हे दुर्जन समस्त ॥ नेतील क्षणांत बांधोनि ॥ ४८ ॥
संजय म्हणे द्रौपदी सभेसी ॥ आणिली तेव्हां उगाच होतासी ॥
आतां काय या गोष्टी करिसी ॥ भय मानसीं धरोनियां ॥ ४९ ॥
तुझे पुत्र बांधून ॥ गंधर्वी नेले धरून ॥
तेव्हां धांवले भीमार्जुन ॥ पराक्रमें त्यांहीं सोडविले ॥ ५० ॥
परम पराक्रमी वृकोदर ॥ करील तव पुत्रांचा संहार ॥
तुझी बालबुद्धि साचार ॥ मोहेंकरोनि तत्त्वतां ॥ ५१ ॥
दुर्योधन बोले वचन ॥ हा अनिवार कृतांतासी द्रोण ॥
रणपंडित परम निपुण ॥ कृपाचार्य पराक्रमी ॥ ५२ ॥
संहाररुद्राची अपरप्रतिमा ॥ तों हा नरलोकीं अश्वत्थामा ॥
या कर्णाचा युद्धमहिमा ॥ एका वक्त्रें न वर्णवे ॥ ५३ ॥
निष्पांडव धरित्री ॥ करीन सत्वर यावरी ॥
हे राजे मजकारणें समरीं ॥ प्राण देतील भरंवसा ॥ ५४ ॥
पांडव निर्बल पक्षहीन ॥ त्यांस साह्य जरी आले स्वर्गाहून ॥
शक्र शिव रमारमण ॥ कमलासन जरी आला ॥ ५५ ॥
त्यांसही संहारूं समरीं ॥ हा निश्चय आमुचे अंतरीं ॥
रेवतीरमण गुरु शिरीं ॥ बळ माझें जाण पां ॥ ५६ ॥
धर्म भ्याड अति दीन ॥ पांच गांव मागतो कर जोडून ॥
परी एक पाऊल धरणी जाण ॥ त्यास नेदीं निर्धारे ॥ ५७ ॥
मी गदा पडताळीन जेव्हां ॥ समरीं मजशीं न तगे मघवा ॥
या सर्व राजांचा वर्णावा ॥ पराक्रम किती हो ॥ ५८ ॥
करूनि एकत्र द्वादश मित्र ॥ हा घडिला कीं स्वर्धुनीपुत्र ॥
या द्रोणाशीं माजवी समर ॥ ऐसा वीर नसेचि ॥ ५९ ॥
आम्ही दळाशीं अवघेजण ॥ एकीकडे बळें संपूर्ण ॥
एकला हा वीर कर्ण ॥ पराक्रमें आगळा ॥ ६० ॥
वीरचक्रचूडामणि ॥ उदार धीर समरांगणीं ॥
तरी कवचकुंडलें मागोनि ॥ गेला घेऊन सुत्रामा ॥ ६१ ॥
ही वासवी शक्ति सोडील कर्ण ॥ तेव्हां कदा न वाचे अर्जुन ॥
भीष्मप्रतिज्ञा अति दारुण ॥ वीर मारीन दशसहस्त्र ॥ ६२ ॥
संजय म्हणे पंडुकुमार ॥ निर्भय निःशंक प्रलयरुद्र ॥
समरीं टाकतील समोर ॥ पंचादित्य प्रतापी ॥ ६३ ॥
सभोंवता एक योजन ॥ दिसे अर्जुनाचा उंच स्यंदन ॥
कपिवरध्वज भेदीत गगन ॥ दश योजन भोंवता दिसे ॥ ६४ ॥
तिहीं वाटून घेतले वीर ॥ शिखंडीचा भाग गंगापुत्र ॥
धृष्टद्युम्न महावीर ॥ द्रोण गुरूस वधील ॥ ६५ ॥
शल्यास वधील धर्म ॥ दुर्योधनदुःशासनांस भीम ॥
समरीं मारील हा नेम ॥ शतही बंधूंसमवेत ॥ ६६ ॥
कर्णासी सुभद्रावर ॥ मारील समरीं निर्धार ॥
सहदेवहातें शकुनि वीर ॥ मृत्युसदना जाईल ॥ ६७ ॥
शकुनीचा पुत्र उलूक जाण ॥ नकुल त्याचा घेईल प्राण ॥
बृहद्‌बल आणि लक्ष्मण ॥ यांस आवतिलें अभिमन्यें ॥ ६८ ॥
यादववीर युयुधान ॥ तेणें नेमिला चेकितान ॥
तुमचें अकरा अक्षौहिणी सैन्य ॥ दृष्टीं नाहीं तयांचे ॥ ६९ ॥
एकल्या अर्जुने गोग्रहणी ॥ केला पुरुषार्थ आठवा मनीं ॥
शतही कीचक मारूनी ॥ निशीत टाकिले वृकोदरें ॥ ७० ॥
दुर्योधन बोले पराक्रम ॥ उद्यां पांडवांचा करीन होम ॥
धृतराष्ट बोले अतिसंभ्रम ॥ कां वल्गना व्यर्थ करिसी ॥ ७१ ॥
अरे प्राणातसमयीं जाण ॥ माझें तुम्हांस आठवेल वचन ॥
परमपराक्रमी भीमार्जुन ॥ संहारितील सर्वांसी ॥ ७२ ॥
संजय म्हणे एकांतीं जाण ॥ दिव्यस्यंदनीं श्रीकृष्णार्जुन ॥
एक शय्येवर दोघेजण ॥ पहुडले नयनीं देखिले म्यां ॥ ७३ ॥
नकुल सहदेव सौभद्र ॥ जेथें जाऊं न शकती द्रौपदीपुत्र ॥
तें परमसुवास एकांत मंदिर ॥ तेथें पार्थश्रीधर पहुडले ॥ ७४ ॥
ध्वजवज्ररेखांकित बरवे ॥ देखिले म्यां श्रीरंगाचे तळवे ॥
ते सुभद्रावरें प्रेमभावे ॥ तळहातितां देखिले म्यां ॥ ७५ ॥
सनकादिक कमलासन ॥ करिता योगयागसाधन ॥
त्यांचेही दृष्टीस जाण ॥ अगोचर पदतळवे ते ॥ ७६ ॥
ते पाय आपुले अंकीं धरून ॥ क्षणोक्षणीं तळहाती अर्जुन ॥
सवेंच हातीं धरून श्रीकृष्ण ॥ पहुडवीत पार्थातें ॥ ७७ ॥
भोजन शयन पान ॥ गमनागमन संभाषण ॥
एके ठायीं दोघेजण ॥ क्षणभरी दूर न होती ॥ ७८ ॥
ते निजले असतां दोघेजण ॥ तेथें मी निजभाग्येंकरून ॥
उभा ठाकलों जाऊन ॥ तों उभयतांचे चरण देखिले ॥ ७९ ॥
श्रीकृष्णतळव्यांवरी चिन्हे अद्‌भुत ॥ तैशीच पार्थाचे पायीं झळकत ॥
मी देखोन जाहलों तटस्थ ॥ धन्य भाग्य पार्थाचें ॥ ८० ॥
अर्जुनास निद्रा नाहीं निःशेष ॥ म्हणोनि नाम गुडाकेश ॥
मज देखतां तों नरवीरेश ॥ उठोनियां बैसला ॥ ८१ ॥
श्रीरंगाचे चुरितां चरण ॥ सावध जाहला जगज्जीवन ॥
मज आसनावरी बैसवूना ॥ गौरव बहुत पैं केला ॥ ८२ ॥
मी बोलिलों तेथें वचन ॥ कीं जातों कुंजरपुरालागून ॥
मग मजप्रति रुक्मिणीरमण ॥ बोलिला तेंच ऐक पां ॥ ८३ ॥
सांग भीष्यद्रोणदुर्योधनां ॥ सकळ भूभुजां थोरलहाना ॥
भगदत्तशल्यकर्णा ॥ संजया सांग सर्वांसी ॥ ८४ ॥
जप तप याग दानें ॥ अष्टभोग ललनांसी देणें ॥
पुत्रकन्यांचीं समाधानें ॥ संभाषणें मित्रांशीं ॥ ८५ ॥
करा दिव्यान्नभोजना ॥ ठेवू नका कांहीं वासना ॥
तुम्हां आलें मरण चुकेना ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥ ८६ ॥
द्रौपदीच्या दुःखेंकरून ॥ मी आरंबळें रात्रंदिन ॥
अर्जुनाची पाठी राखोन ॥ संहार करीन सर्वांचा ॥ ८७ ॥
त्रिदशांसह शचीरमणं ॥ तुम्हां रक्षे आलिया जाण ॥
क्षणांत हें ब्रह्मांड जाळीन ॥ सुदर्शन सोडूनियां ॥ ८८ ॥
पार्थाचे हस्तेकरुन ॥ एकादश अक्षौहिणी दळ संहारीन ॥
ना तरी हें सुदर्शन ॥ मीं सोडीन शेवटीं ॥ ८९ ॥
या पांचांतून एक वीर ॥ करील तुमचा संहार ॥
अवघे जाहलिया एकत्र ॥ तरी मग उरी कायशी ॥ ९० ॥
ऐसें एकांतीं कृष्णार्जुन ॥ बोलिले तेव्हां मजलागून ॥
दोघांचें बोलणें एकचि जाण ॥ नसे अन्य दुसरें पैं ॥ ९१ ॥
ऐसें ऐकतां अंबिकानंद ॥ भयभीत होऊन बोले वचन ॥
दुर्योधना वर्तमान ॥ पुढें बरें दिसेना ॥ ९२ ॥
हें दळ मेळविलें त्वां निर्धारीं ॥ याचा भरंवसा कदा न धरीं ॥
पार्थासी साह्य समरी ॥ हरि हर इंद्रादि जाणिजे ॥ ९३ ॥
मग बोलती सुयोधन कर्ण ॥ तुम्ही सुखें करा मंदिरीं शयन ॥
क्षणांत पांडव संहारून ॥ दळासह टाकू आम्ही ॥ ९४ ॥
गंगात्मज म्हणे कर्णा ॥ कां करिशी व्यर्थ वल्गना ॥
गोग्रहणीं कृष्णवदना ॥ करून पळालेति सर्वही ॥ ९५ ॥
श्रीरंग सोडिल सुदर्शन ॥ मग कैचें उरेल तुमचें सैन्य ॥
नका कुल टाकू संहारून ॥ ऐका वचन शिकविलें ॥ ९६ ॥
क्रोधें बोले कर्ण वीर ॥ जो आहे गंगाकुमार ॥
तों मी कदा न धरीं शस्त्र ॥ नेम माझा हा जाणिजे ॥ ९७ ॥
शस्त्रें टाकून रागें कर्ण ॥ गेला जेव्हां सभेस उठून ॥
तेव्हां भीष्मास म्हणे सुयोधन ॥ तुम्ही पाठिराखे पांडवांचे ॥ ९८ ॥
तुमचे बळें आम्ही पाहीं ॥ समरीं सहसा भीत नाहीं ॥
आम्ही चौघे मिळून सर्वही ॥ पांडवसेना संहारूं ॥ ९९ ॥
दुःशासन शकुनि कर्ण ॥ चौथा मी पराक्रमी सुयोधन ॥
टाकू सर्व संहारून ॥ भरंवसा पूर्ण असो द्यावा ॥ १०० ॥
विदुर बोले तेव्हां नीति ॥ जे कां स्वजातीशीं विरोध करिती ॥
वृद्धास क्षणोक्षणीं अपमानिती ॥ ते अनर्थी पडतील ॥ १०१ ॥
धृतराष्ट्र म्हणे सुयोधना ॥ बा रे ऐकें वृद्धाचें वचना ॥
द्रौपदीस्वयंवरीं भीमार्जुनां ॥ साह्य कवण होता पैं ॥ १०२ ॥
गोग्रहणीं साह्य नव्हता कृष्ण ॥ आतां मिळालें अपार सैन्य ॥
तों दुर्योधन सभा सोडून ॥ रागें गेला स्वसदना ॥ १०३ ॥
अंधास एकांतीं येऊन ॥ भेटला सत्यवतीनंदन ॥
म्हणे हें एकीकडे त्रिभुवन ॥ एक जनार्दन एकीकडे ॥ १०४ ॥
श्रीकृष्णमहिमा अपार ॥ नेणाच तुम्ही पामर ॥
मनें वृष्टि मनें संहार ॥ करी साचार श्रीकृष्ण ॥ १०५ ॥
पांडवांचें निमित्त करून ॥ भूभार उतरील संपूर्ण ॥
भव पंकजोद्भव कर जोडून ॥ ज्याचें स्तवन करिताती ॥ १०६ ॥
गांधारीने दुर्योधन ॥ एकांतीं आणिला बोलावून ॥
म्हणे ऐक वडिलांचें वचन ॥ भेटे जाऊन धर्मराजा ॥ १०७ ॥
उतरावया भूभार ॥ अवतरलासे श्रीकरधर ॥
न ऐकशी शिकविलें साचार ॥ तरी मरण जवळी आलें ॥ १०८ ॥
भीम घालील गदा उचलोन ॥ मग माझें आठविशील वचन ॥
हें कालत्रयीं न चुके जाण ॥ सत्य वचन सांगतें ॥ १०९ ॥
इकडे जगद्‌वंद्य जगज्जीवन ॥ त्याप्रति धर्म बोले वचन ॥
तुजवांचूनि रक्षिता जाण ॥ दुजा कोण असे आम्हां ॥ ११० ॥
बाळाचे पालन करी बरवें ॥ हें मातेस काय सांगावे ॥
शांति क्षमा दया धरा म्हणावें ॥ न लागेच सज्जनां ॥ १११ ॥
श्रीरंगा श्यामसुंदरा ॥ आपण जावें हस्तनापुरा ॥
कौरवांचे शोधावे अंतरा ॥ साम भेद करोनि ॥ ११२ ॥
त्रयोदश वर्षें वनीं क्रमिलीं ॥ कुंती माता मज अंतरली ॥
तिची भेट होय वनमाळी ॥ त्वरितचि करीं ऐसें तूं ॥ ११३ ॥
परम उन्मत्त दुर्योधन ॥ राज्यमदें मद्यपान ॥
स्त्रीविषय धन यौवन ॥ तेणेंकरून भुललासे ॥ ११४ ॥
यावरी बोले राजीवनयन ॥ मी तेथवर एकदां जाईन ॥
शिष्टाई करून बोधीन ॥ दूरात्मा दुर्योधनातें ॥ ११५ ॥
युधिष्ठिर म्हणे जगन्नाथा ॥ तों तुझें न ऐके बोधितां ॥
मज ऐसे वाटतें चित्ता ॥ त्वां एथूनि नच जावें ॥ ११६ ॥
मग बोले रुक्मिणीजीवन ॥ मी एकदा तेथवरी जाईन ॥
संदेह सर्व फेडीन ॥ जेणेंकरून बोल न लागे ॥ ११७ ॥
तेथें वर्ततां विपरीत ॥ सुदर्शन सोडीन अकस्मात ॥
करीन दुष्टांचा निःपात ॥ एका क्षणांत धर्मराया ॥ ११८ ॥
धर्म म्हणे श्रीहरि ॥ सर्वभावें करावी मैत्री ॥
भीम म्हणे मुरारि ॥ पंच ग्राम माग त्यांतें ॥ ११९ ॥
पार्थ म्हणे समान ॥ जरी अर्धराज्य देतींल वांटून ॥
आणि दुर्योधनें एथें येऊन ॥ धर्मरायास नमावें ॥ १२० ॥
तंव बोले नकुल ॥ जरी दुर्योधन शरण येईल ॥
अर्धराज्य देईल ॥ तरीच मैत्री करावी ॥ १२१ ॥
ऐसें ऐकोन द्रुपदनंदिनी ॥ म्हणे श्रीरंगा मी तुझी भगिनी ॥
अद्यापि घातली नाहीं वेणी ॥ त्रयोदश वर्षें जाहलीं कीं ॥ १२२ ॥
हातीं धरोनियां केश ॥ म्हणे हे जगन्निवास हृषीकेश ॥
दुःशासनें धरून निःशेष ॥ नेलें ओढीत सभेमाजी ॥ १२३ ॥
ऐसें बोलतां द्रुपदबाळा ॥ नयनीं अश्रु कंठ दाटला ॥
म्हणे विश्वव्यापका ते वेळां ॥ वस्त्रें पुरविलीं त्वां असंख्य ॥ १२४ ॥
मज सभेत करितां नग्न ॥ हे पांचही पाहती अधोवदनं ॥
आतां होऊनियां दीन ॥ पंच ग्राम मागती ॥ १२५ ॥
अंगीं बलप्रताप असतां पूर्ण ॥ मग कां मागावें याचकपण ॥
प्रतापें समर माजवून ॥ राज्यासन मग घ्यावें ॥ १२६ ॥
हें जरी न होय तुमचेन ॥ तरी जा मागुती सेवा अरण्य ॥
पंच पुत्र आणि अभिमन्य ॥ दुर्जन संहारीन यांहातीं ॥ १२७ ॥
ऐसें पांचाळी बोलतां ते क्षणीं ॥ आसुवें भिजतसे कुंभिनी ॥
श्रीरंग म्हणे वो मायबहिणी ॥ खेद मनीं करूं नको ॥ १२८ ॥
यावरी सत्वरचि जाणा ॥ एकेक कौरव येती रणा ॥
स्नानास जातील कौरवललना ॥ तें तूं डोळा विलोकिशी ॥ १२९ ॥
ऐसें बोलोन जगज्जीवन ॥ करोनियां जप हवन ॥
आपले स्यंदनावरी आरूढोन ॥ निघता जाहला गरुडध्वज ॥ १३० ॥
वारू योजिले अतिसुरेख ॥ शैब्य सुग्रीव बलाहक ॥
मेघपुष्प चवथा देख ॥ पुढे दारुक धुरेसी ॥ १३१ ॥
शंख चक्र गदा पद्य ॥ घेऊनि बैसला मेघश्याम ॥
सवे सात्यकी वीरोत्तम ॥ निघाले वेगेकरोनी ॥ १३२ ॥
पांडव आणि भूभुज सकळी ॥ बोळवीत चालिले वनमाळी ॥
मग श्रीरंगें राहवून ते वेळीं ॥ निघे वेगेंचि गजपुरा ॥ १३३ ॥
वाटेस जातां जगदीश्वर ॥ भेटती बहुत ऋषीश्वर ॥
म्हणती आम्ही येतो समग्र ॥ कौरवसभेस श्रीरंगा ॥ १३४ ॥
तूं येथें बोलसी कवणे रीतीं ॥ तें आमुचे श्रवण ऐकू इच्छिती ॥
अवश्य म्हणे रुक्मिणीपति ॥ यावें सत्वर मागूनियां ॥ १३५ ॥
मेघीं विद्युल्‍लता देदीप्यमान ॥ तैसें हातीं झळके सुदर्शन ॥
कोटिमदनतात जगन्मोहन ॥ शोभायमान दिसतसे ॥ १३६ ॥
क्षीराब्धीचें ठेवणें देख ॥ तैसा लखलखीत हातीं शंख ॥
गदा ते वाटे बहुतेक ॥ आदित्यतेजे घडियेली ॥ १३७ ॥
वाटे चंडकिरण आटून ॥ घडिलें हातींचें दिव्य पद्म ॥
सच्चिदानंद मेघश्याम ॥ निगमागम वर्णिती जया ॥ १३८ ॥
प्रलयाग्नीचा कल्लोळ भडकत ॥ तैसें उत्तरीयवस्त्र झळकत ॥
दशांप्रति मुक्ता तळपत ॥ कृत्तिकापुंज ज्यापरी ॥ १३९ ॥
तों परम तेजाळ क्षीरोदक ॥ कीं शुभयशा चढले बिक ॥
कीं शुद्ध श्वेत मृडानीनायक ॥ कर्पूरेकरून उटियेला ॥ १४० ॥
कीं दिव्य रजत गाळोनि ओतिलें ॥ कीं पेरोजें कैलास डवरिलें ॥
कीं जाह्नवीतोये ओपिलें ॥ दिनकरनाथें स्वहस्तें ॥ १४१ ॥
तों सच्चिदानंदतनु सगुण ॥ अतसीकुसुमाभास पूर्ण ॥
त्याचिया रंगेंकरून ॥ नीलोत्पलें लेपिलीं ॥ १४२ ॥
नभास चढला तोचि रंग ॥ त्याच प्रभेनें रंगले मेघ ॥
इंद्रनीळ मणि सुरंग ॥ त्याच प्रकाशें जाहले ॥ १४३ ॥
तेथींचें सौंदर्य अद्‌भुत ॥ गरुडपाचूस तेज दिसत ॥
मर्गजासी बिक चढत ॥ तनु सावळी देखोनि ॥ १४४ ॥
तों वैकुंठींचा सुकुमार ॥ भक्तहृन्मदिरांगणमंदार ॥
कुरवंडी करावी साचार ॥ कोटि मकरध्वज करूनियां ॥ १४५ ॥
ब्रह्मांड फोडोन बाहेरी ॥ अंगींचा सुवास धांवत वरी ॥
लावण्यामृतसागर कैटभारी ॥ लीलावतारी वेधक जो ॥ १४६ ॥
पूर्ण ब्रह्मानंद यादवेंद्र ॥ लीलाविग्रही श्रीकरधर ॥
हृदयीं रेखिला निरंतर ॥ निजभक्तीं प्रेमबळें ॥ १४७ ॥
असो निघाला जेव्हां यादवेंद्र ॥ धर्में अनिवार महावीर ॥
सवें दीधले सहस्त्र शूर ॥ जे कालातें न लेखिती ॥ १४८ ॥
आणीकही सेवकांचीं चक्रे ॥ सेवा करणार चतुर निर्धारे ॥
सवें दीधले सूपशास्त्रें ॥ जाणते आणि हडपिये ॥ १४९ ॥
धृतराष्ट्रास जाहलें श्रुत ॥ कीं गजपुरा येतो मन्मथतात ॥
तो सभेंत समस्तां आज्ञापित ॥ जा हो समस्त सामोरे ॥ १५० ॥
सन्मान करून बहुत ॥ सभेत आणा तों भगवंत ॥
त्यासी पूजितां सुख अद्‌भुत ॥ अकल्याण न पूजितां ॥ १५१ ॥
दुर्योधन सभा श्रृंगारी ॥ स्वहस्तें हरीची पूजा करी ॥
असो श्रृंगारली नगरी ॥ मखरें द्वारीं गुडिया बहू ॥ १५२ ॥
शक्रसभेहूनि आगळी ॥ सभा तेव्हां श्रृंगारली ॥
ज्या मार्गें येत वनमाळी ॥ शिबिरे दीधलीं तये ठायीं ॥ १५३ ॥
जे जे स्थळी राहात वनमाळी ॥ सेवक राबती उपचारीं सकळीं ॥
चंदनकस्तुरींचे सडे ते वेळीं ॥ शिंपिता सुगंध फांकतसे ॥ १५४ ॥
दुःशासनाचिये सदनीं ॥ वस्तीस स्थळ नेमिलें चक्रपाणी ॥
दुर्योधनाची दांभिक करणी ॥ कापट्य अंतरीं कल्पोनियां ॥ १५५ ॥
पद्मदलाकार वदन ॥ वाचा शीतळ जेविं चंदन ॥
परी हृदयीं कापट्य दारुण ॥ दुर्योधन दुरात्मा तों ॥ १५६ ॥
अंतरीं शठत्व अपार ॥ शब्द सुरस बाहेर आदर ॥
परी चित्तांत परम कातर ॥ कापट्यसागर दुरात्मा ॥ १५७ ॥
साधुवेष धरोनि शुद्ध ॥ यात्रेस आले जैसे मैंद ॥
कीं वाटपाडे रजनींत प्रसिद्ध ॥ सिद्ध होऊन बैसले ॥ १५८ ॥
जैसा नटाचा वेष जाण ॥ कीं विषाचें शीतळपण ॥
कीं सावचोराचें गोड वचन ॥ परप्राणहरणार्थ ॥ १५९ ॥
तैसा तों पापी सुयोधन ॥ वरी वरी बोले गोड वचन ॥
शकुनि दुःशासन कर्ण ॥ तिघांस एकांतीं बोलाविलें ॥ १६० ॥
म्हणे शिष्टाई करूं येतां कृष्ण ॥ त्यास करावें एथें बंधन ॥
इतकेनें पांडव बलक्षीण ॥ सहजचि मग जाहले ॥ १६१ ॥
त्रिकालज्ञानी जो विदुर ॥ त्यास कळला सर्व समाचार ॥
तें जाणोन गंगाकुमार ॥ म्हणे संहार होईल आतां ॥ १६२ ॥
तों येरीकडे नगरप्रदेशीं ॥ राहिला तेव्हां हृषीकेशी ॥
प्रातःकाळी उठोन गजपुरासी ॥ येता जाहला जगद्‌गुरू ॥ १६३ ॥
धृतराष्ट्र म्हणे सामोरे ॥ श्रीरंगासी जावें त्वरें ॥
सदनास आणावें आदरें ॥ वाद्यगजरें करोनियां ॥ १६४ ॥
शकुनि सुयोधन दुःशासन कर्ण ॥ हे चौघे भिन्न करून ॥
अवघे निघाले जगज्जीवन ॥ आणावया सामोरे ॥ १६५ ॥
भीष्म द्रोण शारद्वत ॥ दळभाराशीं निघाला कृपीसुत ॥
आबालवृद्ध समस्त ॥ पौरजन धांवती पहावया ॥ १६६ ॥
आपुलिया गोष्ठीं गोपुरीं ॥ चढोन पाहती नरनारी ॥
मंडपघसणी जाहली भारी ॥ कृष्ण सुकुमार पाहावया ॥ १६७ ॥
महाराज भवगजविदारकपंचानन ॥ त्यास भेटले भीष्म द्रोण ॥
मग अनुक्रमेंकरून ॥ लहान थोर आलिंगिती ॥ १६८ ॥
ग्रहचक्री जैसा मित्र ॥ तैसा शोभे स्मरारिमित्र ॥
भक्तद्वेषी जे अमित्र ॥ त्यांस शासनकर्ता जो ॥ १६९ ॥
लीलाविग्रही भगवंत ॥ मिरवत आला गजपुरांत ॥
धृतराष्ट्रगृहीं प्रवेशत ॥ अंबिकासुत आनंदला ॥ १७० ॥
प्रज्ञाचक्षु उभा ठाकून ॥ श्रीरंगास दीधलें आलिंगन ॥
मग कनकासनी बैसवून ॥ विश्वपूज्य पूजिला ॥ १७१ ॥
सभेत बैसला जगन्नाथ ॥ चौघे कपटी विलोकिती गुप्त ॥
सूर्य पहावया दिवाभीत ॥ भयभीत जैसे कां ॥ १७२ ॥
पूजिलें देखोन जगज्जीवना ॥ परम खेद वाटे दुर्जनां ॥
मग तों सर्वज्ञ घेऊनि आज्ञा ॥ विदुरगृहाप्रति गेला ॥ १७३ ॥
विदुरें घालोनि लोटांगण ॥ नयनोदकें क्षालिले चरण ॥
श्रीरंगाचे मुखावरून ॥ निंबलोण उतरिलें ॥ १७४ ॥
वस्तू ओवाळोनि अपार ॥ याचकांस देता जाहला विदुर ॥
आसनीं बैसवून उपचार ॥ पूजेचे सर्व समर्पिले ॥ १७५ ॥
म्हणे धन्य माझे नयन ॥ देखती श्रीरंगाचे चरण ॥
धन्य पर्व सुदिन ॥ आजि मज जाहलें ॥ १७६ ॥
अष्टमी नवमी चतुर्दशी ॥ दिनत्रय पुण्यराशी ॥
पिंडपितृयज्ञ महामखासी ॥ निश्चयेंशीं केलें म्यां ॥ १७७ ॥
घरास आला श्रीकरधर ॥ तरी इतुकें पुण्य जोडले समग्र ॥
असो विदुराशीं एकांतविचार ॥ बहुत केला श्रीरंगे ॥ १७८ ॥
यावरी तों इंदिरावर ॥ प्रवेशे कुंतीचें मंदिर ॥
पितृभगिनीसी सर्वेश्वर ॥ वंदन करीत आदरें ॥ १७९ ॥
कुंती गळां मिठी घालून ॥ शोक करी पांडवांलागून ॥
मग श्रीरंगें तीस बैसवून ॥ वर्तमान सांगीतलें ॥ १८० ॥
कुंती म्हणे जगजेठी ॥ उपजत माझीं बाळकें कष्टी ॥
अहा सृष्टिकर्त्या परमेष्ठी ॥ माझें प्राक्तन ऐसें कां ॥ १८१ ॥
मज टाकून काननास ॥ गेले पांचही राजहंस ॥
परम सुकुमार डोळस ॥ द्रुपदात्मजा गेली सवें ॥ १८२ ॥
तेरा वर्षें जाहलीं पूर्ण ॥ मी प्राणसखीस कैं देखेन ॥
सभेस गांजिली नेऊन ॥ तुवां मान रक्षिला तिचा ॥ १८३ ॥
कृष्णा पांडवांस सांग त्वरित ॥ जरी तुम्ही असाल माझे सुत ॥
तरी युद्ध करूनि अद्‌भुत ॥ राज्य घ्यावें सर्वही ॥ १८४ ॥
मज दुःख जाहलें दिनरजनीं ॥ मम प्राणसखी तव भगिनी ॥
रजस्वला एकवसनी ॥ सभेत दुर्जनीं गांजिली ॥ १८५ ॥
असो पितृभगिनीलागोनी ॥ संबोखी तेव्हां मोक्षदानी ॥
म्हणे जें जें असे तुझे मनीं ॥ तैसेंच होऊन येईल ॥ १८६ ॥
सभेस बैसला सुयोधन ॥ तेथें सात्यकी सह गेला श्रीकृष्ण ॥
पुढें येऊन अंधनंदन ॥ क्षेमालिंगन दीधलें पैं ॥ १८७ ॥
उत्तमासनीं बैसवून ॥ पूजिला जेव्हां जगज्जीवन ॥
जो त्रिभुवनसुंदर सुहास्यवदन ॥ त्यासी सुयोधन बोलत ॥ १८८ ॥
म्हणे आज जगज्जीवना ॥ माझे गृहास यावें भोजना ॥
परि न मानी यादवराणा ॥ वेदपुराणां वंद्य जो ॥ १८९ ॥
श्रीकृष्ण म्हणे दुर्योधना ॥ आम्ही आलों ज्या कारणा ॥
तें झालियाविण भोजना ॥ न करूं जाण सर्वथा ॥ १९० ॥
पांडव माझे पंचप्राण ॥ त्यांशीं द्वेष करी जो अनुदिन ॥
त्याचे गृहीं सहसा भोजन ॥ कल्पांतींही मज घडेना ॥ १९१ ॥
मद्भक्तांचा द्वेष करी ॥ तोच माझा मुख्य वैरी ॥
त्यास मी नानाप्रकारीं ॥ निर्दाळीन सुयोधना ॥ १९२ ॥
विदुराचे मी आजि निजमंदिरीं ॥ भोजन करीन निर्धारी ॥
ऐसें बोलून कंसारी ॥ उठोन गेला स्वस्थाना ॥ १९३ ॥
भीष्म द्रोण जाऊनि तेथें ॥ प्रार्थितेजाहले श्रीहरीतें ॥
म्हणती विश्वव्यापका भोजनातें ॥ चला आमुचे सदनासी ॥ १९४ ॥
हरि म्हणे मी येईन भोजना ॥ परि समय नोहे आणा मना ॥
मग त्यांणीं घेऊन आज्ञा ॥ स्वसदनासी गमन केलें ॥ १९५ ॥
मग विप्रांसह मनमोहन ॥ विदुरगृहीं करी भोजन ॥
विदुराची भक्ति देखून ॥ जगज्जीवन भाळला ॥ १९६ ॥
असो भोजन जाहलिया एकांतीं ॥ विदुर म्हणे जगत्पति ॥
हा दुर्योधन पापमति ॥ परम चांडाळ दुरात्मा ॥ १९७ ॥
तुम्ही येथें येवोनि कांहीं ॥ हा सर्वथा ऐकणार नाहीं ॥
त्याचे सभेस कदाही ॥ न जावें तुम्ही श्रीरंगा ॥ १९८ ॥
सैन्यबळें माजोनि कुमती ॥ जगत्पते तुझा द्वेष करिती ॥
त्यांचे सवें निश्चिती ॥ न बोलावें तुवां कदाही ॥ १९९ ॥
मग बोले जगज्जीवन ॥ चार गोष्टी पाहों सांगोन ॥
नायकती तरी दुर्जन ॥ फळें पावतील शेवटीं ॥ २०० ॥
असो ते रजनींत रमानाथा ॥ विदुरगृहीं निद्रा करित ॥
उषःकालीं उठोन समस्त ॥ सत्कर्मधर्म आटोपिती ॥ २०१ ॥
विदुरगृहास ते क्षणीं ॥ येत दुर्योधन आणि शकुनि ॥
म्हणती वडील बैसले ते स्थानीं ॥ चक्रपाणी तुम्ही चला ॥ २०२ ॥
अवश्य म्हणे कमलाकांत ॥ निजरथीं बैसोनि त्वरित ॥
सवें घेतला विदुर भक्त ॥ निजरथावरी रमावरें ॥ २०३ ॥
शकुनि सुयोधन निजरथीं ॥ बैसोन चालिले सभेप्रति ॥
सहस्त्र वीर सवें निघती ॥ श्रीरंगाचे तेधवां ॥ २०४ ॥
सौबल आणि तों सात्यकी वीर ॥ कृष्णरथीं बैसले प्रीतिपात्र ॥
सभे येतां जलदगात्र ॥ उभे ठाकती सर्वही ॥ २०५ ॥
श्रेष्ठासनीं बैसवून ॥ धृतराष्ट्रें पूजिला जगन्मोहन ॥
यावरी जें जाहले वर्तमान ॥ तें पुढिले अध्यायीं परिसिजे ॥ २०६ ॥
पांडवप्रताप ग्रंथ सुंदर ॥ सकळ साहित्याचें भांडार ॥
ब्रह्मानंदें सांगे श्रीधर ॥ पंडित चतुर परिसोत कां ॥ २०७ ॥
हा असे वरद ग्रंथ ॥ जें कर्णी सांगे पंढरीनाथ ॥
तेंचि लिहिलेंसे यथार्थ ॥ श्रीधर वदे श्रोतयां ॥ २०८ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ अडतिसाव्यांत कथियेला ॥ २०९ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे उद्योगपर्वणि अष्टत्रिंशत्तमोऽध्याय: ॥ ३८ ॥
अध्याय अडतिसावा समाप्त


GO TOP