श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय एकविसावा


कौरवांच्या राजसभेत द्रौपदीचा अपमान


श्रीगणेशाय नम: ॥
अजातशत्रु धर्मराज ॥ धर्मपरायण धर्मात्मज ॥
स्वधर्माचरण देवद्विज ॥ भजन न सोडी सर्वथा ॥ १ ॥
कौरव जे परम दुर्जन ॥ कपटद्यूत तयांशीं खेळोन ॥
राज्य सेना देश धन ॥ द्रौपदीसहित हारविलें ॥ २ ॥
पांच पांडव पंचानन ॥ कपटकूपीं पडिले येऊन ॥
कीं ते पंच मराळ नेऊन ॥ पंक गर्तेते रोंविले ॥ ३ ॥
विदुरास म्हणे दुर्योधन ॥ पाडव जिंकोनी केले दीन ॥
जैसे दग्धवनीं हरिण ॥ तेजहीन क्षुधित पैं ॥ ४ ॥
द्रौपदी जाहली आमुची दासी ॥ ऊठ बोलावून आणीं सभेसी ॥
तिचें पतिव्रतापण जनासी ॥ दाखवूं आजि तत्त्वतां ॥ ५ ॥
विदुर म्हणे पापखाणी ॥ तुज निकट आली प्राणहानी ॥
काय अपवित्र बोलसी वाणी ॥ महादुर्जना कपटिया ॥ ६ ॥
दुर्योधन म्हणे देखा ॥ हा पांडवांचा पाठिराखा ॥
कृत्रिम सांगत विवेका ॥ हितशत्रु घातक पैं ॥ ७ ॥
प्रातिकामी सूतपुत्र जाण ॥ त्यास सांगे दुर्योधन ॥
आणीं पांचालीस बोलावून ॥ भीड सोडून सभेसी ॥ ८ ॥
हेर प्रवेशला मंदिरीं ॥ म्हणे अहो द्रुपदराजकुमारी ॥
दुर्योधनें तेथवरी ॥ बोलाविलें जाण पां ॥ ९ ॥
धर्में हारविलें समस्त ॥ कोणाचा शब्द न चाले तेथ ॥
द्रौपदी म्हणे मनांत ॥ मांडला अनर्थ निर्धारे ॥ १० ॥
वाटे काळिजीं घातली सुरी ॥ कीं सौदामिनी पडली शिरीं ॥
कीं सुकुमार कमलिनीवरी ॥ वज्रघाय पडियेला ॥ ११ ॥
मग द्रौपदी म्हणे तयासी ॥ जाऊनि सांगें भीष्मद्रोणांसी ॥
तुम्ही श्रेष्ठ असतां सभेसी ॥ विपरीत करणी काय हे ॥ १२ ॥
धर्में हारविलें आपणास ॥ तरी तो तुमचा जाहला निःशेष ॥
धर्मास आणि आम्हांस ॥ मग संबंध कायसा ॥ १३ ॥
मी पंचपुरूषांची ललना पाहीं ॥ मज सर्वथा जिंकिलें नाहीं ॥
नारदे नेमिले दिन सर्वही ॥ सीमा केली अलोट ॥ १४ ॥
पांचां ठायीं वांटिलें वर्ष ॥ दोन मास द्वादश दिवस ॥
यांत मी स्त्री भीमाची निःशेष ॥ तरी धर्म केविं हारवी ॥ १५ ॥
सभेसी येऊन सूतनंदन ॥ सांगे सुयोधनासी वर्तमान ॥
ऋतुस्नात द्रौपदीनिधान ॥ कैशी आणूं सभेंत ॥ १६ ॥
त्यास निर्भर्त्सी दुर्योधन ॥ मग उठविला दुःशासन ॥
म्हणे धांव आणीं ओढून ॥ केश धरूनि येथवरी ॥ १७ ॥
आमुची ते जाहली दासी ॥ मग तिची भीड कायसी ॥
दुःशासन धांवला वेगेंशीं ॥ द्रौपदीपाशीं पातला ॥ १८ ॥
हरिणीवरी क्रोधयुक्त ॥ महाव्याघ्र जेविं झेंपावत ॥
कीं तस्कर जैसा संचरत ॥ राज्यभांडारीं एकलाची ॥ १९ ॥
कीं मेदिनीगर्भरत्‍न ॥ धरूं धांवला द्विपंचवदन ॥
तैसा याज्ञसेनीजवळ येऊन ॥ काय बोले दुरात्मा ॥ २० ॥
ऊठ आतां वेगें येथून ॥ राजा पाचारी दुर्योधन ॥
तुझे पंच भ्रतार दास करून ॥ आम्हीं जिंकून ठेविले ॥ २१ ॥
तूं आमची दासी निर्धारे ॥ ऊठ सभे चाल सत्वरें ॥
तुझें भाग्य उदेलें चतुरे ॥ दुर्योधना वरी आतां ॥ २२ ॥
आयुष्यांतीं यमदूत ॥ तैसा द्रौपदीस तो भासत ॥
कंठ होऊन सद्‌गदित ॥ काय मात बोलिली ॥ २३ ॥
म्हणे देवरा तूं अवधारीं ॥ सभेसी कैशी नेतां नारी ॥
ज्येष्ठ सहोदराची अंतुरी ॥ गांधारीसम तुम्हांते ॥ २४ ॥
देवरा ऐकें ये समयीं ॥ माझा कैवारी तूंचि होई ॥
निर्दोष यश पदरीं घेई ॥ कळेल शिष्टाई करीं तैसी ॥ २५ ॥
देवरा तूं होईं माउली ॥ लज्जा रक्षीं आजि आपुली ॥
माझा द्रुपदराज ये वेळीं ॥ तूंचि होई दयाळा ॥ २६ ॥
किंवा शस्त्र घेऊन तत्त्वतां ॥ वधीं मज येथेंचि आतां ॥
लोक धन्य म्हणती ऐकतां ॥ वर्णितील कीर्ति तुझी ॥ २७ ॥
निर्दय बोले पापराशी ॥ ऊठ वाचाळे चाल सभेसी ॥
तुज धरून नेईन केशीं ॥ जाहलीस दासी आमुची तूं ॥ २८ ॥
हिंसकास कैंची दया ॥ मार्गघ्नास कैंची माया ॥
उपरति पैशून्यवादिया ॥ कदाकाळीं घडेना ॥ २९ ॥
धनलुब्धास नावडे धर्म ॥ जारासी कायसें सत्कर्म ॥
साधुनिंदका नावडे प्रेम ॥ भजनमार्ग कदाही ॥ ३० ॥
शांत नव्हे कदा विखार ॥ दुर्जन न बोलती कधीं मधुर ॥
ध्यान करूं बैसले खर ॥ कालत्रयीं घडेना ॥ ३१ ॥
असो ओढवला काल कठिण ॥ पांचाळी उठली तेथोन ॥
गृहांत चालली देखोन ॥ दुःशासन धावला ॥ ३२ ॥
अर्धयोजन आसमास ॥ जिचे तनूचा जाय सुवास ॥
चहूंकडे फांके जिचा प्रकाश ॥ तिचे केश धरियेले ॥ ३३ ॥
हांक फोडी श्रीकृष्णभगिनी ॥ आंसडूनी पाडिली मेदिनीं ॥
ब्रह्मांड डळमळलें ते क्षणीं ॥ उसळे पाणी सागरींचें ॥ ३४ ॥
रोहिणीवर वासरमणी ॥ खचों भाविती तेव्हां धरणीं ॥
वैकुंठ कैलास ते क्षणीं ॥ डळमळले अति दुःखें ॥ ३५ ॥
केशीं आकर्षोनि वेल्हाळ ॥ सभे चालिला चांडाळ ॥
जैसा हरिणीस धरून शार्दूल ॥ घेऊनि जाय त्वरेनें ॥ ३६ ॥
रोदन करी अधोवदनी ॥ नयनोदकें भिजे कुंभिनी ॥
म्हणे वीरगुंठी करेंकरूनी ॥ हळूच तरी धरीं पैं ॥ ३७ ॥
भूषणें जाहलीं विगलित ॥ ठायीं ठायीं गळोनि पडत ॥
मुक्तें वाटेस विखुरत ॥ तेजें कविगुरूंसारखीं ॥ ३८ ॥
म्हणे राजसा सखया देवरा ॥ हळूचि चालें न करीं त्वरा ॥
केश ओढिसी एकसरा ॥ सुढाळ मुष्टी धरीं पैं ॥ ३९ ॥
उभा राहें एक क्षण ॥ कासावीस जाहले माझे प्राण ॥
रसना अधर गेले वाळोन ॥ जीवनावीण एधवां ॥ ४० ॥
द्रोणगुरूची तुम्हांस आण ॥ धांवडूं नका मजलागून ॥
तुटोनि पडों पाहती चरण ॥ परि कुलक्षण नायके तो ॥ ४१ ॥
सभेस आणितां सुंदरी ॥ उजेड पडला सकलांवरी ॥
विद्युल्लता जैसी अंधारीं ॥ नभोमंडळीं प्रकाशे ॥ ४२ ॥
देखतां द्रौपदीनिधान ॥ संतभक्तीं झांकिले नयन ॥
परम संतोषले दुर्जन ॥ स्वरूप देखोन तियेचें ॥ ४३ ॥
जिचिया स्वरूपावरून ॥ कुर्वंडी करिजे रतिरमण ॥
जे अपर्णेची अपरप्रतिमा जाण ॥ गुणनिधान द्रौपदी ॥ ४४ ॥
पाकशासन कमलजन्मा ॥ त्यांचेनि न करवे जिची प्रतिमा ॥
रंभा उर्वशी तिलोत्तमा ॥ चरणांगुष्ठीं न तुळती ॥ ४५ ॥
कृष्णाचऐशी कृष्णभगिनी ॥ कीं ओतिली इंद्रनील गाळूनी ॥
खंजन मृग मीन लोचनांवरूनी ॥ ओंवाळून टाकावे ॥ ४६ ॥
दंत जेविं हिरेखाणी ॥ बोलतां उजेड पडे मेदिनीं ॥
जिचा मुखप्रकाश देखोनी ॥ रोहिणीवर लज्जित ॥ ४७ ॥
कर्ण म्हणे द्रौपदीस ॥ तूं दुर्योधनाचे अंकीं बैस ॥
भोगीं आतां राज्यविलास ॥ सोडीं आशा पांडवांची ॥ ४८ ॥
ऐसें ऐकतां ते पद्याक्षी ॥ भीमार्जुनां कोठे लक्षी ॥
परि पक्षहीन अंध पक्षी ॥ तैसे दीन दिसती ते ॥ ४९ ॥
भीमास नावरे क्रोध तदा ॥ सांवरूनि करें आकर्षी गदा ॥
म्हणे कौरवांच्या शिरश्छेदा ॥ करीन आतां क्षणार्धे ॥ ५० ॥
पांचालीनें पाहतो विलोकून ॥ माझें हृदय जाहलें शतचूर्ण ॥
दावानल जाळी तृणकानन ॥ तेविं दुर्जन मारीन हे ॥ ५१ ॥
धर्म म्हणे ऐक भीमा ॥ तिहीं पण करूनि जिकिलें आम्हां ॥
क्रोध आवरीं करीं क्षमा ॥ वेगें पाहें विचारून ॥ ५२ ॥
तुज क्रोध नावरेच कदा ॥ तरी माझिये मस्तकीं प्रेरीं गदा ॥
परी स्वधर्मसत्यमर्यादा ॥ सर्वथाही न सांडीं तूं ॥ ५३ ॥
चळतील मेरुमांदार ॥ पश्चिमेस उगवेल जरी मित्र ॥
हेंही अघटित घडेल परि सजन नर ॥ असत्य मार्गें न जाती ॥ ५४ ॥
उष्णता धरील रोहिणीपती ॥ शिळेवरी कमळें उगवती ॥
हेंहि अघटित घडेल परि न वर्तती ॥ भगवद्भक्त असत्यें पैं ॥ ५५ ॥
मग भीम म्हणे एकांतीं ॥ वडिलीं तुज सांगितली नीती ॥
नारदव्यासांचिया उक्ती ॥ द्यूतीं रत होऊं नको ॥ ५६ ॥
वर्जितां खेळोनि कपटद्यूता ॥ व्यसनी पाडिलें समस्तां ॥
तोडीन आतां तुझे हस्ता ॥ गदाघायें तत्काल ॥ ५७ ॥
अवश्य म्हणे महाराज धर्म ॥ गदा उचली क्रोधें भीम ॥
तो सद्विवेकी पार्थ परम ॥ हस्त धरीत भीमाचा ॥ ५८ ॥
म्हणे या ब्रह्मांडमंडपांत ॥ धर्माऐसा सत्य शांत ॥
नाहीं नाहीं यथार्थ ॥ साक्ष देत सरस्वती ॥ ५९ ॥
जो निश्चलगंगेचा लोट ॥ जो विवेकरत्‍नांचा मुकुट ॥
कीं भक्तिवैरागरींची सुभट ॥ दिव्य हिरा जन्मला ॥ ६० ॥
सद्‌बुद्धिसरोवरींचा राजहंस ॥ भक्त्युद्यानींचा तापस ॥
जो अजातशत्रु निर्दोष ॥ पंडूसमान आम्हांतें ॥ ६१ ॥
तेणें शब्द गोंविला नेमा ॥ तो निश्चय तुम्हां आम्हां ॥
धर्मास मारून भीमा ॥ अपकीर्तिच वरावी ॥ ६२ ॥
संसार मृगजलन्याय ॥ याचा भरंवसा असे काय ॥
ये अवनीसं बहुत राय ॥ भोगोनि गेले पुढें जाती ॥ ६३ ॥
भीमाचा क्रोधाग्नि अत्यंत ॥ चालिला विवेकवन जाळित ॥
तों सुशब्द वर्षला मेघपार्थ ॥ तेणें शांत जाहला तो ॥ ६४ ॥
धर्माचे चरण वंदूनी ॥ भीम बैसला स्वस्थानीं ॥
तों दुःशासन केश कवळूनी ॥ झोका देत द्रौपदीतें ॥ ६५ ॥
इंदुवदना पद्यलोचनी ॥ जे पद्मजजनकाची भगिनी ॥
सुकुमार एकवसनी ॥ जाचिली दुर्जनीं तेधवां ॥ ६६ ॥
पूर्वी जाहला राजसूय यज्ञ ॥ शेवटीं जाहलें अवभृथस्नान ॥
तेव्हां केशमोकळे करून ॥ वीरगुंठी बांधिली ॥ ६७ ॥
ते हस्तीं दृढ धरून दुःशासन ॥ झोके देतसे हिंसक दुर्जन ॥
तेव्हां द्रौपदी गुणनिधान ॥ भीष्मद्रोणांकडे पाहे ॥ ६८ ॥
तुम्ही वडील न्यायसागर ॥ अन्याय होतो परम दुस्तर ॥
इहीं मज जिंकिले काय साचार ॥ वदा उत्तर येधवां ॥ ६९ ॥
भीष्म वदे ते क्षणीं ॥ ऐकें वो सद्‌गुणरत्‍नखाणी ॥
धर्म बोले स्वमुखेंकरूनी ॥ आम्हांस पणीं जिकिलें ॥ ७० ॥
तेथें आमुचें न्यायवचन ॥ कोण मानील सांग प्रमाण ॥
मग बोले गुरु द्रोण ॥ भीड धरून कौरवांची ॥ ७१ ॥
समुद्राहूनि अगणित ॥ धर्माचें मातें न गणवे तत्त्व ॥
निर्मल अंतर शांत दांत ॥ वचन विपरीत न बोले ॥ ७२ ॥
कोणी भीड टाकून ॥ न बोलेचि यथार्थ वचन ॥
हें देखोनि विकर्णं ॥ बोलता जाहला उठोनियां ॥ ७३ ॥
द्रौपदी जिंकिली म्हणतील कोणी ॥ गलितकुष्ठें झडेल वाणी ॥
त्यांस निकट आली प्राणहानी ॥ येच क्षणीं जाणिजे ॥ ७४ ॥
त्रिवार हांक फोडोनी ॥ म्हणे नाहीं जिंकिली याज्ञसेनी ॥
हे अन्यायी अवघे या स्थानीं ॥ साधु कोणी नसे येथें ॥ ७५ ॥
अंतर्बाह्य धृतराष्ट्र अंध ॥ पुत्रलोभें जाहला मंद ॥
अरे हे भीष्म द्रोण वृद्ध ॥ सत्य येथें न बोलती ॥ ७६ ॥
कुलक्षयास कारण ॥ तो हा शकुनि आणि कर्ण ॥
अधिकाधिक दुर्योधन ॥ इहीं बोधून खवळिला ॥ ७७ ॥
राजा केवळ राक्षस जाण ॥ व्याघ्ररूपी अवघे प्रधान ॥
केवळ ते सेवक श्वान ॥ मग अन्योन्य वर्ततसे ॥ ७८ ॥
दुर्योधनास सुख वाटत ॥ परि समीप आला अनर्थ ॥
द्रौपदी केली उभी येथ ॥ भुलले मूर्ख सर्वही ॥ ७९ ॥
गांजित द्रौपदी वेल्हाळा ॥ परि हे प्रलयाग्नीची ज्वाळा ॥
तुम्हां पतंगां सकळां ॥ भस्म करील क्षणार्धें ॥ ८० ॥
ऐकोनि विकर्णाची वाणी ॥ सुर वर्षती दिव्य सुमनीं ॥
माथे आणि तर्जनी ॥ डोलविती आनंदें ॥ ८१ ॥
ऐसें देखोनि ते क्षणीं ॥ कर्ण कोपला शतगुणीं ॥
धर्में बोली करून पणीं ॥ याज्ञसेनी हारविली ॥ ८२ ॥
तें असत्य अवघें करूनी ॥ भलतेंचि जल्पसी सभास्थानीं ॥
तुज वधितों येच क्षणीं ॥ परि दुखवेल मनीं गांधारी ॥ ८३ ॥
शतमूर्ख तूं त्रिशुद्धि ॥ वडिलांस शिकविसी बुद्धि ॥
येथें काय जाहला अविधि ॥ दासी सभेसी आणिल्या ॥ ८४ ॥
एक स्त्री भ्रतार पांच जण ॥ कोणे शास्त्रीं केलें लेखन ॥
हे दोषखाणी जारीण ॥ करा नग्न येथें आतां ॥ ८५ ॥
वस्त्रें भूषणें संपूर्ण ॥ आधीं घ्या पांडवांचीं हिरोन ॥
ऐसें ऐकतां पांचही जण ॥ वल्कलें वेष्टून बैसले ॥ ८६ ॥
जानु उघडी करून ॥ द्रौपदीस दावी दुर्योधन ॥
म्हणे बैस अर्धांगी येऊन ॥ पट्टराणी होई माझी ॥ ८७ ॥
भीमे गदा उचलोनि लवलाहें ॥ म्हणे अंधपुत्रा इकडे पाहें ॥
तुझा अंक गदाघाये ॥ चूर्ण करीन जाण पां ॥ ८८ ॥
हें जरी न करवेल माझेनी ॥ तरी विवून वंध्या कुंती जननी ॥
लज्जा आली सोमवंशालागूनी ॥ कृष्णदास्य व्यर्थ गेलें ॥ ८९ ॥
ऐसें ऐकतां वचन ॥ प्रकट बोले दुर्योधन ॥
म्हणे गे द्रौपदी येऊन ॥ बैस निःशंक मांडीवरी ॥ ९० ॥
ऐसें बोलतां दुर्योधन ॥ द्रौपदी बोले तीक्ष्ण वचन ॥
बळेंचि चेतविला प्रलयाग्न ॥ कौरवकुल जाळावया ॥ ९१ ॥
बळें खवळिला भुजंग ॥ कीं शुंडे पिळिला मत्तमातंग ॥
निद्रित व्याघ्र सवेग. ॥ नासिकेवरी ताडिला ॥ ९२ ॥
तैशी ते पांडवललना ॥ म्हणे चांडाळा दुर्योधना ॥
गलितकुष्ठ भरोनि रसनी ॥ झडों दे तुझी पापिया ॥ ९३ ॥
महाप्रलयसौदामिनी ॥ हिंसका पडो तुजवरी घेऊनी ॥
तुझे दृष्टीचे कोळसे होऊनी ॥ भस्म होऊं दे दुर्जना ॥ ९४ ॥
भीमे गदा नेमिली नोवरी ॥ रणचत्वरीं घेई मांडीवरी ॥
पंचप्राण घालोनि बाहेरी ॥ प्रलयाग्नि लावीं पैं ॥ ९५ ॥
तुझ्या स्त्रिया हृदय पिटूनी ॥ वाद्यें वाजविती भयंकर वदनीं ॥
रक्तमृत्तिका मिळोनी ॥ हळदी सहजचि लागेल ॥ ९६ ॥
मग ते गदा हृदयीं धरून ॥ समरमंचकीं करीं शयन ॥
बंधूंसमवेत यमसदन ॥ पावोनि करीं साडे तेथें ॥ ९७ ॥
शब्दशस्त्रांचे घाय तीक्ष्ण ॥ लागतां खवळला दुर्योधन ॥
म्हणे इचे तुकडे करून ॥ सर्षपप्राय टाका रे ॥ ९८ ॥
जिव्हा नासिक आणि कर्ण ॥ हस्त शस्त्रें टाका छेदून ॥
दुःशासना फेडीं वसन ॥ दावीं नग्न सभेंत ॥ ९९ ॥
वामहस्तें केश कवळून ॥ सव्यहस्तें फेडीं वसन ॥
नगरलोक सभाजन ॥ झांकती नयन अति दुःखें ॥ १०० ॥
कृष्णास करावया श्रुत ॥ वेगें पिटिला मनोदूत ॥
म्हणे मांडिला थोर आकांत ॥ धांवें त्वरित कैवारिया ॥ १०१ ॥
सुभद्रकारिके भवानि ॥ मूलपीठद्वारकाविलासिनि ॥
आदिमायेची कुलस्वामिनी ॥ धांव जननि लौकरी ॥ १०२ ॥
मनमोहने गोकुलवासिनि ॥ हृदयवृंदावनविहारिणि ॥
सावळे गोवर्द्धनोद्धारिणि ॥ वेगेंकरून धावे कीं ॥ १०३ ॥
म्हणे दुर्योधन दुःशासन ॥ हेचि शुंभ निशुंभ दैत्य जाण ॥
ययां मर्दूनियां जाण ॥ रक्षी लज्जावसन माझें ॥ १०४ ॥
खगवरकेतना इंदीवरनेत्रा ॥ इंदिरावरा जलदगात्रा ॥
विश्वव्यापका त्रिनेत्रमित्रा ॥ सुत्रामा महिमा नेणे तुझा ॥ १०५ ॥
यादवकुलमुकुटावतंसा ॥ कंसांतका क्षीराब्धिविलासा ॥
सच्चिदानंदा मनोहरवेषा ॥ शरणागता रक्षी तूं ॥ १०६ ॥
सनकादिकवंद्या जगदुद्धारा ॥ पद्मजातजनका त्रिभुवनसुंदरा ॥
पांडवपालका रणरंगधीरा ॥ । अति उदारा श्रीरंगा ॥ १०७ ॥
मायाचक्रचालका निरंजना ॥ महारजतपूर्णवसना ॥
मधुमुरकैटभदैत्यभंजना ॥ जगज्जीवना धांवे कां ॥ १०८ ॥
अवतारचक्रचरित्रपालका ॥ धांव अनंतब्रह्मांडनायका ॥
ब्रह्मानंदमुखमृगांका ॥ दावीं एकदा ये वेळे ॥ १०९ ॥
मुचुकुंदोद्धारका गिरिधरा ॥ पंचशरजनका परात्परा ॥
निगमागमवंद्या अनंतनेत्रा ॥ संकट माझें न देखसी ॥ ११० ॥
अंध जातां घोरकांतारीं ॥ समागमी टाकोनि गेले दूरी ॥
मग तो तळमळी नानापरी ॥ मज मुरारि तेविं जाहलें ॥ १११ ॥
व्याघ्रें पाडस धरिलें वनीं ॥ तें दिनरजनीं चिंती जननी ॥
वैकुंठपुरविहारिणि ॥ ध्यायीं मनीं तेविं तूतें ॥ ११२ ॥
प्रसूतसमयीं मध्याह्नीं ॥ तृषित धेनु दग्धवनीं ॥
तो सहस्त्र व्याघ्रीं येऊनि ॥ गर्जना करूनि ओढिली ॥ ११३ ॥
भक्तवत्सला स्नेहाळा हरि ॥ तेविं मज गांजिलें दुराचारीं ॥
कोठे गुंतलासी कैवारी ॥ कमलायतना हृदयस्था ॥ ११४ ॥
ये समयीं न येसी करुणार्णवा ॥ उणें येईल कीं बिरुदा नांवा ॥
भक्तवत्सला रमाधवा ॥ बाहतां कंठ शोषला ॥ ११५ ॥
गांजिती कौरव दुर्जन ॥ विसांव्या कां सांडिला अभिमान ॥
पांचाळी श्रीरंगा तुझी बहीण ॥ घोष गाजे त्रिभुवनीं ॥ ११६ ॥
कौरवकुबुद्धिसमुद्रांत ॥ बुडालें हरि देईं हात ॥
दीनवदन जाहले पंडुसुत ॥ बांधले दृढ कपटपाशें ॥ ११७ ॥
कौरवपीडा वणवा दारुण ॥ जळतो केशवा वर्षें घन ॥
भीष्मद्रोणाचें न चले वचन ॥ म्लानवदन बैसले ॥ ११८ ॥
कौरवसभाभूतमेळीं ॥ पडली तुझी दासी पांचाळी ॥
पंचाक्षरी तूं वनमाळी ॥ धांव ये वेळीं त्वरेनें ॥ ११९ ॥
हरि तूं कंठीरव दयाब्धी ॥ तुझी कन्या मी येथें द्रौपदी ॥
कौरवगजीं वेढिली त्रिशुद्धी ॥ धांव आधीं हांक देत ॥ १२० ॥
चिंतारोग जडला दारुण ॥ धावे कृपारसपात्र घेऊन ॥
तुजपाशीं धाडीन प्राण ॥ कुणप येथें टाकूनि हें ॥ १२१ ॥
लपावया तुझे हृदयीं ॥ हरि मजला ठाव देई ॥
लाज गेलिया लवलाहीं ॥ मग काय उरेल ॥ १२२ ॥
करुणाकरा गोपाला ॥ विलंब कां फार लाविला ॥
जाहलिया भगिनीची अवकळा ॥ मग काय डोळां पाहसी ॥ १२३ ॥
कामधेनु श्रीरंग माउली ॥ कोणते वनीं आजि गुंतली ॥
द्रौपदीवत्स विसंबली ॥ कौरववृकसभेंत ॥ १२४ ॥
अहा श्रीकृष्णा यादवेंद्रा ॥ तुज काय लागली योगनिद्रा ॥
द्रौपदीकन्या एकसरां ॥ हांक फोडितां सोकली ॥ १२५ ॥
आपण वाढविलें म्हणून ॥ जड काष्ठ तारी जीवन ॥
पाळिले जातां बुडोन ॥ ब्रिदें गळोनि गेली पैं ॥ १२६ ॥
यदुकुलकमलविकासमित्रा ॥ पांडवमानसचकोरचंद्रा ॥
जगद्वंद्या कृपासमुद्रा ॥ करीं त्वरा ये वेळे ॥ १२७ ॥
द्रौपदीचे करुणाशब्द ॥ हेचि उडाले प्रेममिलिंद ॥
श्रीकृष्णकमलीं सद्‌गद ॥ गुंजारव जाणविती ॥ १२८ ॥
कौरवसभा कंटकस्थल ॥ जाणोनि द्रौपदीचे शब्द मराल ॥
कृष्णमानससरोवर विशाल ॥ जाऊन तेथें बैसले ॥ १२९ ॥
स्वानंदरूप पर्यंक ॥ तेथें पहुडला वैकुंठनायक ॥
चरण तळहातीं तेथें देख ॥ ज्ञानकला रुक्यिणी ॥ १३० ॥
अनुभवबोधें सुस्वर ॥ गाती नारद आणि तुंबर ॥
तेथें उद्धव आणि अक्रूर ॥ सुगंध वायु जाणविती ॥ १३१ ॥
सप्रेमलक्ष जोडले करीं ॥ उभा सन्मुख तो सर्पारी ॥
चरण तळहातीं भीमककुमारी ॥ देखे नखमुकुरी ब्रह्मांडें ॥ १३२ ॥
कौरवसभा कालरात्री दारुण ॥ द्रौपदीचे वस्त्रहरण ॥
करावया तस्कर दुःशासन ॥ घाला घालूं पहातसे ॥ १३३ ॥
तो द्रौपदीचे शब्द सुरेख ॥ ते द्वारकेत घालिती हांक ॥
जागा जाहला वैकुठनायक ॥ घाबरेपणें विलोकी ॥ १३४ ॥
ज्ञानें पाहे तों यादवेंद्र ॥ पांडवभांडारींचे कौरवतस्कर ॥
द्रौपदीलज्जाधन अपार ॥ नेऊ पाहती हरूनियां ॥ १३५ ॥
रुक्मिणीचे हातींचा चरण ॥ आसडोनि उठला मनमोहन ॥
धांव घेतली उठोन ॥ न बोलतां कोणाशीं ॥ १३६ ॥
पीतांबराची रुळत कास ॥ ती न सांवरीच हषीकेश ॥
मुकुट राहिला रुळती केश ॥ सुगंधसुमनें सांडती ॥ १३७ ॥
कौस्तुभमाला वैजयंती ॥ नीट न सांवरी श्रीपती ॥
खेद पावला श्रीतनूप्रती ॥ कंठ सद्‌गद जाहला ॥ १३८ ॥
श्रीरंगाच्या वेगापुढें ॥ मन पवन कायसें बापुडें ॥
चिंतिलिया ठाया जावें गरुडें ॥ परी तोही मंद राहिला ॥ १३९ ॥
धांवा केला हें भक्तिलक्षण ॥ परी तो हृदयींचा नांदे नारायण ॥
सर्वव्यापक जगन्मोहन ॥ गमनागमन नसेचि ॥ १४० ॥
नारद पुसे रुक्मिणीलागून ॥ कां घाबरेपणें गेले जगज्जीवन ॥
ते म्हणे द्रौपदी गांजिली म्हणवून ॥ न सांवरत धांवले ॥ १४१ ॥
इकडे द्रौपदीचे वसन ॥ फेडू पहात दुःशासन ॥
तंव तो पाठीसीं येऊन ॥ उभा ठाकला कैवारी ॥ १४२ ॥
जो पीतांबर आपुला ॥ तेणें झांकिली द्रौपदी बाला ॥
प्रकाश असंभाव्य झळकला ॥ कौरवसभा चमकली ॥ १४३ ॥
कृष्णवसन तेजाळ सुवास ॥ तेणें सुगंधे भरिलें आकाश ॥
उभा पाठीशीं आदिपुरुष ॥ सद्भक्तींच देखिला ॥ १४४ ॥
आल्हादली पांचाळी ॥ म्हणे कैवारिया वनमाळी ॥
मज गांजिलें दुर्जनीं सकळीं ॥ हरिमाउलि नसतां तूं ॥ १४५ ॥
हरि म्हणे द्रौपदीसी ॥ जें जें बोलिले पापराशी ॥
तें तें गांजिलें देवकीसी ॥ मी हें मानसीं भावितों ॥ १४६ ॥
आला जाणोनि भगवंत ॥ धर्म बंधूस खुणावित ॥
नयनीं वाहती अश्रुपात ॥ कंठ सद्‌गदित जाहला ॥ १४७ ॥
देखोनि पाठीशीं दयार्णव ॥ विदुरास नावरती अष्टभाव ॥
भीष्मद्रोणादिक भक्त सर्व ॥ ब्रह्मानंदें डोलती ॥ १४८ ॥
क्रोध नावरे दुर्योधना ॥ म्हणे रे मंदा दुःशासना ॥
भीड कायसी धरिशी वसना ॥ फेडीं पाहूं दे सभेत ॥ १४९ ॥
तेणें जों आसुडिलें चीर ॥ तों आंत क्षीरोदक सुंदर ॥
म्हणती अद्‌भुत स्त्रीचरित्र ॥ वस्त्रांत वस्त्र नेसली ॥ १५० ॥
तेंही ओढितां दुर्जन ॥ तो आत देखे सुवर्णवर्ण ॥
द्रौपदी झांकिली संपूर्ण ॥ चरणांगुष्ठही दिसेना ॥ १५१ ॥
सभा जाहली तटस्थ ॥ म्हणती वस्त्रभार असंख्यात ॥
अमोलिक तेजाद्‌भुत ॥ कोण पुरवी न कळे हें ॥ १५२ ॥
हांवे चढोनि दुःशासनें ॥ दोहीं हातीं फेडिलीं वसनें ॥
गणती दशशतवदनें ॥ करितां ठायीं पडेना ॥ १५३ ॥
कनकवर्ण वस्त्र ओढी ॥ तो आत देखे जरीची साडी ॥
त्याआत कुसुंबी चुनडी ॥ तेही ओढी अपवित्र ॥ १५४ ॥
पाटाव ओढी जरतारी ॥ तो कल्हारवर्ण त्याअंतरीं ॥
जरीचे शिखी मराळ पदरीं ॥ तेंही आवरी वेगें तो ॥ १५५ ॥
कुसुमवर्ण पदर ॥ करवीरवर्ण कोविदार ॥
रक्तोत्पलवर्ण सिंदूर ॥ चंपकवर्ण साजिरीं ॥ १५६ ॥
केशरीहरिद्राकुंकुमवर्ण ॥ दूर्वारंग जंबू चंदन ॥
सप्तरंगे रंगीत पूर्ण ॥ केतकीदलवर्ण एक पैं ॥ १५७ ॥
कीररंगी नीलोत्पलवर्ण ॥ सहस्रचौकडी कांठ सुवर्ण ॥
पाचू पेरोज वैडूर्य पूर्ण ॥ वर्णाची निघती असंख्य ॥ १५८ ॥
मिलिंदवर्णं अपार ॥ चंद्रसूर्यकला सुकुमार ॥
निराळवर्ण परिकर ॥ नक्षत्रठसे झळकती ॥ १५९ ॥
गुंजारंग अग्निवर्ण ॥ रंभागर्भ काश्मीरवसन ॥
दुग्धवर्ण कनकसुमनवर्ण ॥ जगज्जीवनें पुरविलीं ॥ १६० ॥
कंबुवर्ण रजतहंस ॥ चामीकरवर्ण पद्मकोश ॥
इंद्रगोपमाणिकरंगविशेष ॥ हृषीकेश पुरवीतसे ॥ १६१ ॥
काशीकांचीअवंतींचीं ॥ अयोध्यामथुरामायापुरींचीं ॥
वसनें आणिलीं द्वारकेचीं ॥ भगिनीलागीं श्रीधरें ॥ १६२ ॥
भरत रमणक सप्तविधि वंश हिरण्य ॥ कीर्तिद्राक्ष हरीत सुवर्ण ॥
या नवखंडींचीं वस्त्रें संपूर्ण ॥ जगज्जीवनें पुरविलीं ॥ १६३ ॥
जंबू शाक प्लक्ष शाल्मली ॥ क्रौंच केतुमाल श्वेतवल्ली ॥
या सप्तद्वीपींचीं वस्त्रें वनमाली ॥ पांचाळीतें पुरवीत ॥ १६४ ॥
अंग वंग दशार्ण कलिंग ॥ कुलिंग काश्मीर भोज सुरंग ॥
सौवीर सौराष्ट्र श्रीरंग ॥ वसनें सवेग आणीत ॥ १६५ ॥
बंगाल मागध मालव नेपाळ ॥ केरल चोल पांचाळ ॥
गौड मल्याळ स्त्रीराष्ट्र सिंहल ॥ द्राविड कर्नाटक आध्रं पैं ॥ १६६ ॥
करहाटक महाराष्ट्र धोरण ॥ घोट नाट पंजाब पुलिंद हूण ॥
भिल्ल गांधार विदेह चैद्य जाण ॥ विदर्भ विव्हल केरल ॥ १६७ ॥
कोशल कुंतल किरात ॥ शूरसेन सेवन समस्त ॥
कोंकण गोकर्ण मस्त्य सत्य ॥ मद्र शाल्व सिंधावती ॥ १६८ ॥
सैंधव पारसीक गुर्जर ॥ यवन बर्बर जालंधर ॥
छप्पन्नदेशींचीं वस्त्रें श्रीधर ॥ देत अपार पांचाळीतें ॥ १६९ ॥
चीन मुलतान लाहोर ॥ काबुल बैंगलूर फिरंगाण थोर ॥
खुरासन आणि कृष्णवस्त्र ॥ वस्त्रें तेथींचीं अपार पैं ॥ १७० ॥
विष्णूकांची शिवकांची कुंभकोण ॥ चिदंबर अरुणाचल मल्लिकार्जुन ॥
शेषाचल किष्किंधापट्टन ॥ प्रतिष्ठान करवीर पैं ॥ १७१ ॥
स्वर्ग मृत्यू नागलोक ॥ वैकुंठ कैलास ब्रह्मपद सुरेख ॥
सुरांसहित शचीनायक ॥ वस्त्रीं प्रत्यक्ष रेखिला ॥ १७२ ॥
दशावतार अष्टदिक्पाल ॥ चवदा मनु लिहिले भूगोल ॥
द्वादश मित्र एकादश रुद्र सकल ॥ वस्त्रांवरी पुतळे हे ॥ १७३ ॥
रामायण भारत भागवत ॥ शिवविष्णुचरित्रे अद्‌भुत ॥
एक सहस्रनामे मंडित ॥ कनकाक्षरी रेखिली ॥ १७४ ॥
ऋषिमंडळी सिद्धचारण ॥ सोळा सिद्ध नवनारायण ॥
चौर्‍यायशीं आसनें योगसाधन ॥ ऐशीं वस्त्रें निघालीं ॥ १७५ ॥
शकप्रस्थ हस्तनापुर ॥ कुरुक्षेत्रीं युद्ध पुढें होणार ॥
रणीं पडले कौरव पामर ॥ प्रेतें समग्र रेखिलीं ॥ १७६ ॥
मांडीवरी गदा घालून ॥ भीमे मारिला दुर्योधन ॥
दुःशासनाचे वक्षःस्थळ फोडून ॥ रक्तपान केलें असे ॥ १७७ ॥
इतुकें दुर्जन पाहती ॥ परी सावध कोणी न होती ॥
द्रौपदीचा कैवारी जगत्पती ॥ अनंतहस्तें नेसवी ॥ १७८ ॥
अनंत कोटी ब्रह्मांडें ॥ भरलीं जवळी अक्षय्य दिंडे ॥
श्रीकृष्णनायकाचीं प्रचंडें ॥ वस्त्रें शेषा न गणवती ॥ १७ ए ॥
द्वारकेचा सभाग्य चाटा ॥ वस्त्रश्रेणी पुरवी अचाटा ॥
न कळे हें कौरवांचे थाटा ॥ कांहीं कुचेष्टा न चालती ॥ १८० ॥
रुई राहाट चिवट माग ॥ कांहीं न घालितां श्रीरंग ॥
अचाट पटसुष्टि सुरंग ॥ पुरवीतसे ते काळीं ॥ १८१ ॥
आपला पीतांबर शेवटीं ॥ द्रौपदीस नेसवीत जगजेठी ॥
रत्‍नदर्शन रोंवूनि ओठीं ॥ सुदर्शन उचलिलें ॥ १८२ ॥
म्हणे या वसना लावितां हात ॥ दग्ध करीन कौरव समस्त ॥
विदुर द्रोण गंगासुत ॥ म्हणती अनर्थ मांडला ॥ १८३ ॥
धृतराष्ट्रस जाणविती मात ॥ सर्वांचा येथें मांडला अंत ॥
दुर्योधन भयभीत ॥ दुःशासनास वारीतसे ॥ १८४ ॥
दुर्योधन म्हणे वस्त्रभार ॥ भांडारीं ठेवा हें समग्र ॥
तो एकही तेथें न दिसे साचार ॥ अभाग्यासी तेधवां ॥ १८५ ॥
तो अवचिन्हें जाहलीं बहुत ॥ गगनीं उठले त्रिविध केत ॥
मेघ रक्तधारा वर्षत ॥ भयभीत कौरव पै ॥ १८६ ॥
भक्त साधु नगरजन ॥ द्रौपदीस करिती सप्रेम नमन ॥
कौरवांस वाचे निघून ॥ वर्णिती यश पांडवांचें ॥ १८७ ॥
दुर्योधनास म्हणे भीमसेन ॥ तुझी मांडी मी करीन चूर्ण ॥
नातरी पूर्वज पावती पतनच ॥ जीतचि जाण प्रेत मी ॥ १८८ ॥
गांधारी हृदय पिटित ॥ भीम बोले तें करील यथार्थ ॥
धृतराष्ट्रे पांडव समस्त ॥ द्रौपदीसहित बोळविले ॥ १८९ ॥
आलिंगूनि पांचही जण ॥ म्हणे चांडाळ हा दुर्योधन ॥
येणें तुम्हांस कष्टविलें पूर्ण ॥ तें कांहीं आठवू नका ॥ १९० ॥
मी वृद्ध चक्षुहीन ॥ धर्मा करीं तूं माझें पालन ॥
तथास्तु म्हणे भीमसेन ॥ ऐसेंच होईल शेवटीं ॥ १९१ ॥
द्रौपदीच्या माथां हस्त ॥ ठेवून धृतराष्ट्र बोलत ॥
माये तूं कुलतारक यथार्थ ॥ दुर्जनीं कष्ट दिले तूतें ॥ १९२ ॥
इच्छा असेल जे मनांत ॥ ते तूं माग पुरवीन सत्य ॥
येरी म्हणे पांडव मुक्त ॥ पणी जिंकिले ते करावे ॥ १९३ ॥
शस्त्रें वस्त्रें राज्य रथा ॥ देऊन बोळवावें इंद्रप्रस्था ॥
दास न म्हणावें आतां ॥ इतकेचि ताता देइंजे ॥ १९४ ॥
ते तत्कालचि केले मुक्त ॥ उपहासून कर्ण हांसत ॥
म्हणे धन्य रे तुम्ही पंडुसुत ॥ षंढतीळ संसारीं ॥ १९५ ॥
बंदीं पडिलां समस्त ॥ ते स्त्रीप्रयत्‍ने जाहलां मुक्त ॥
जारकर्म करूनि पाळित ॥ पति जैसी स्वैरिणी ॥ १९६ ॥
अर्जुन म्हणे मशका ॥ भ्रष्टा कौलिकान्नभक्षका ॥
कुलहीना सहस्त्रमूर्खा ॥ ऐक आतां प्रतिज्ञा हे ॥ १९७ ॥
आम्ही नपुंसक कीं रणशूर ॥ पुढें कळेल हें समग्र ॥
तुझें रणीं छेदूनि मिरवीन शिर ॥ तरीच पुत्र पंडूचा ॥ १९८ ॥
असो रथीं बैसोनि पांचही जण ॥ माता कुंती द्रौपदीनिधान ॥
शिबिकारूढ होऊन ॥ नगरांतून चालिलीं ॥ १९९ ॥
पूर्वद्यूत संपलें ॥ आतां अन्य द्यूत आरंभिलें ॥
तें पुढें असे कथिले ॥ श्रवण केलें पाहिजे ॥ २०० ॥
अंतरीं येऊन ते वेळां ॥ श्रीरंग सकळांस भेटला ॥
धांवोनि द्रौपदी वेल्हाळा ॥ मिठी गळां घालित ॥ २०१ ॥
नयनोदकेंकरून ॥ केलें कृष्णचरणक्षालन ॥
म्हणे श्रीरंगा तुजवरून ॥ ओवाळून जाईन मी ॥ २०२ ॥
तुझे काय आठवू उपकार ॥ आज लाज रक्षिली थोर ॥
पांडवकैवारी यादवेंद्र ॥ त्रिभुवनीं थोर ब्रीद गाजे ॥ २०३ ॥
श्रीपति म्हणे गे द्रौपदी माये ॥ पांडव मज प्राणांहून प्रिय ॥
संकट पडतां लवलाहें ॥ ऐसाच येईन क्षणोक्षणीं ॥ २०४ ॥
ऐसें बोलोनि सद्‌गद ॥ द्वारकेस गेला ब्रह्मानंद ॥
तो पांडुरंग पुंडलीकवरद ॥ भीमातीरी नांदतसे ॥ २०५ ॥
ब्रह्मानंद पांडुरंगा ॥ श्रीधरहृदयकल्हारभृंगा ॥
आदिपुरुषा अव्यंगा ॥ दिगंबरा अविनाशा ॥ २०६ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकविसाव्यांत कथियेला ॥ २०७ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे सभापर्वणि एकविंशतितमोऽध्यायः
अध्याय एकविसावा समाप्त



GO TOP