श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय चवदावा
अग्नीने खांडववन जाळले
॥ श्रीगनेशाय नमः ॥
इंद्रप्रस्थीं पंडुसुत । धर्मराजा राज्य करित ।
चौघे बंधु बलवंत । सदा सादर सर्वार्थीं ॥ १ ॥
तों दूत आले धांवत । धर्मास जाणविती मात ।
कीं यादवभारासमवेत । रामश्रीकृष्ण पातले ॥ २ ॥
छप्पन्नकोटी यादववीर । चतुरंगदलभार ।
आले इंद्रप्रस्थाबाहेर । वाद्यें अपार गर्जती ॥ ३ ॥
श्रृंगारुनियां इंद्रप्रस्थ । पांडव सामोरे धांवत ।
रुक्मिणीनाथ रेवतीकांत । रथाखाली उतरती ॥ ४ ॥
राम आणि हृषीकेशी । आलिंगन देती धर्मासी ।
भीमार्जुनां माद्रीसुतांसी । परमानंदे भेटले ॥ ५ ॥
उद्धव सात्यकी अक्रूर । यांसी भेटती पंडुकुमार ।
कृष्णबंधु कृष्णपुत्र । मदनसांबादि भेटले ॥ ६ ॥
समस्तांसी सभेस आणून । बैसविलें आदरेंकरुन ।
मुख्यासनीं बैसवून रामकृष्ण । केलें पूजन यथोचित ॥ ७ ॥
आदरें बोले हृषीकेशी । सुभद्रा निरवावी तुम्हांसी ।
म्हणोनि आलो भेटीसी । बोळवण करुं सोयरिके ॥ ८ ॥
अपार धन अलंकार । धर्मासी ओपी रेवतीवर ।
विंशति श्यामकर्ण सुंदर । पांचांप्रती समर्पिले ॥ ९ ॥
रथ गज दास दासी । नाना यानें सुवस्त्रराशी ।
जे न गणवे शेषासी । इतके आंदण दिधलें ॥ १० ॥
वेंचितां न सरे आसमास । अक्षय्य दिधले द्रव्यकोश ।
खिल्लारें अर्पिलीं विशेष । नंदिनींचीं पडिपाडें ॥ ११ ॥
आंदण दिधलें बहुत । तें अंगीकारुन पंडुसुत ।
पांचही जण स्तवित । श्रीरंगासी तेधवां ॥ १२ ॥
महाराज तूं जगज्जीवन । भक्तकैवारी जगन्मोहन ।
आम्ही पांडाव तुझे दीन । थोर करिसी आम्हांतें ॥ १३ ॥
मग रामकृष्ण दलासहित । राहविले दिवस सप्त ।
भोजनादि उपभोग बहुत । देऊनियां गौरविले ॥ १४ ॥
देऊनियां वस्त्रालंकार । यादव बोळाविले समग्र ।
सर्व गेले परी श्रीधर । इंद्रप्रस्थींच राहविला ॥ १५ ॥
पार्थ प्राणसखा जिवलग । त्याचा न साहवे वियोग ।
अर्जुनापाशीं श्रीरंग । म्हणोनि राहिला सर्वदा ॥ १६ ॥
सुभद्रा जाहली गरोदर । लोटतां एक संवत्सर ।
उपजला अभिमन्युकुमार । प्रतिअर्जुन पराक्रमें ॥ १७ ॥
कुमार सुंदर देखोनि पाहीं । धर्में वांटिल्या सहस्त्र गाई ।
भांडारें फोडोनि सर्वही । याचक तृप्त केले पैं ॥ १८ ॥
यावरी द्रुपदराजकुमारी । गर्भशुक्तिकेमाझारी ।
पंच मुक्ताफलें निर्धारीं । पंचवीर्यें जाहलीं ॥ १९ ॥
धर्मात्मज प्रतिविंध्य । भीमवीर्यें श्रुतसोम शुद्ध ।
पार्थात्मज श्रुतकर्मा प्रसिद्ध । शतानीक नकुलाचा ॥ २० ॥
सहदेवाचा श्रुतसेन । पांचां वर्षांत पांच जण ।
भिन्न भिन्न उपजोन । सुख दिधलें समस्तां ॥ २१ ॥
जातकर्मादि षोडश प्रकार । धौम्य पुरोहित करी समग्र ।
साही जण जाहले थोर । केले संस्कार अनुक्रमें ॥ २२ ॥
करविलें वेदाध्ययन । सकल शास्त्रीं जाहले निपुण ।
अर्जुनापासून साही जण । धनुर्वेद शिकले पैं ॥ २३ ॥
हे रणपंडित महारथी । पुढें समयीं वर्णिजेती ।
त्यांमाजी अभिमन्यूची ख्याती । परमपुरुषार्थी आगळा ॥ २४ ॥
तो कृष्णभगिनीनंदन । त्याकडे पाहोनि अर्जुन ।
सर्वदाही आनंदघन । विद्या संपूर्ण बिंबली ॥ २५ ॥
तो महाराज रणपंडित । द्रोणपर्वीं वर्णिजेल पुरुषार्थ ।
त्याचे पोटीं परीक्षिति सुत । तुझा पिता जनमेजया ॥ २६ ॥
ऐशियापरी पुरंदरप्रस्थीं । धर्म राज्य करी विदेहस्थितीं ।
पूर्वीं हरिश्चंद्र कीं भूमिजापती । कीं चक्रवर्ती शिबिराज ॥ २७ ॥
रुक्मांगद धर्मांगद नळ । तैसाच धर्मराज दयाळ ।
आपली काया आपणा प्रिय केवळ । तैसाचि स्नेहाळ सर्वांभूतीं ॥ २८ ॥
आज्ञा न भंगिती भूपाळ । करभार देती पुष्कळ ।
दुष्ट दंडावया मूर्तिमंत काळ । सेवक संतभक्तांचा ॥ २९ ॥
प्राणप्रिय श्रीकृष्ण । एकजीव एकप्राण ।
मृगया भोजन पान शयन । एके ठायीं सर्वदा ॥ ३० ॥
श्रीरंगासी म्हणे पार्थ वीर । ग्रीष्मऋतु जाळी फार ।
यमुनातीरीं करुं विहार । अवश्य श्रीधर म्हणतसे ॥ ३१ ॥
सवें सुभद्रा आणि द्रौपदी । त्यांसवें बहु स्त्रियांची मांदी ।
षड्रसान्नसमृद्धी । आणि शिबिरें समागमें ॥ ३२ ॥
कृतांतभगिनीचे तीरीं । वनें शोभिवंत नानापरी ।
कनकस्तंभ शिबिरें निर्धारीं । उभविलीं सुंदर ॥ ३३ ॥
सुभद्रा आणि द्रुपदनंदिनी । क्रीडती तेथें नौकायानीं ।
कर्णधारस्त्रियांनीं । आवलिजे तदाज्ञें ॥ ३४ ॥
एक करिती गायन । एक स्त्रिया करिती नर्तन ।
येरीकडे कृष्णार्जुन । यमुनातीरीं क्रीडती ॥ ३५ ॥
कृष्णचरणस्पर्शेंकरुन । जलचरें जाती उद्धरुन ।
यमुना जाहली नीलवर्ण । नीलगात्र क्रीडतां ॥ ३६ ॥
नीलवर्ण जगदीश्वर । अर्जुनाची तनु गौर ।
वाटे विष्णु आणि उमावर । भानुजातीरीं क्रीडती ॥ ३७ ॥
असो जलक्रीडा करुन । बाहेर आले उभयकृष्ण ।
तों तप्तहाटकसमवर्ण । पुरुष एक पातला ॥ ३८ ॥
श्मश्रुकेश पिंगटवर्ण । वेष्टिलें असे कृष्णवसन ।
खदिरांगार तैसे नयन । यज्ञोपवीत तेजस्वी ॥ ३९ ॥
ऐसा येऊनि ब्राह्मण । उभयकृष्णां प्रार्थी कर जोडून ।
म्हणे मी क्षुधित पूर्ण । खांडववन भोजना दीजे ॥ ४० ॥
मी प्रत्यक्ष हुताशन । रोगें जाहलों अतिक्षीण ।
देतां खांडववनभोजन । रोगमोचन होईल ॥ ४१ ॥
स्वशक्तीनें मी जातों तेथ । परी मघवा मेघ वर्षत ।
माझें कांहीं न चाले सत्य । बलक्षीण होय मी ॥ ४२ ॥
तुम्ही सोडून अस्त्रजाल । निवारा मेघधारा सकल ।
त्यावरी तक्षक विशाल । शतपुत्रांशीं राहतसे ॥ ४३ ॥
तक्षक शक्राचा मित्र । म्ह्णोनि राहतो निरंतर ।
ऐसें बोलतां वैश्वानर । कृष्णार्जुन आवेशती ॥ ४४ ॥
जनमेजय म्हणे वैशंपायना । कां रोग लागला द्विमूर्धाना ।
येरु म्हणे राया सज्ञाना । परिसें गोष्टी नावेक ॥ ४५ ॥
श्वेतकेत राजा पवित्र । तेणें मांडिलें दीर्घ सत्र ।
द्वादश वर्षें विचित्र । द्रव्य अपार वेंचिलें ॥ ४६ ॥
द्वादश वर्षें करितां यज्ञ । श्रम पावले ब्राह्मण ।
धूम्रें आरक्त नयन । अश्रु स्त्रवती सर्वदा ॥ ४७ ॥
विप्र श्रमले फार । रायें राहविला अध्वर ।
लोटतां द्वादश संवत्सर । पुढती याग आरंभिला ॥ ४८ ॥
बोलावी पहिल्या ऋत्विजांप्रती । ते श्रमले न येती पुढती ।
मग प्रसन्न करुनि उमापती । ऋत्विज मागे राव तो ॥ ४९ ॥
आपला अंश दुर्वासमुनी । शिव पाठवी त्यालागूनी ।
तेणें अनेक ऋषी मेळवूनी । याग नेला सिद्धीतें ॥ ५० ॥
हस्तिशुंडेप्रमाण । वसुधारा चालली संपूर्ण ।
द्वादश वर्षें खंडन । अहोरात्रे नसेची ॥ ५१ ॥
द्वादश वर्षेंपर्यंत । होमद्रव्य भक्षिलें अद्भुत ।
पूर्णाहुति होतां श्वेतकेत । परम सुख पावला ॥ ५२ ॥
दक्षिणा देऊनि बहुवस । तोषविला ऋषि दुर्वास ।
परि उदररोगे यज्ञपुरुष । क्षीण अत्यंत जाहला ॥ ५३ ॥
कुष्ठें व्यापिलें शरीर । कासावीस वैश्वानर ।
द्वयवदनी अरुचि फार । अवदान न घे कोठेंही ॥ ५४ ॥
स्वाहास्वधेचा पती । कोणे यज्ञीं न घेचि आहुती ।
पंडुवर्ण जाहली कांती । क्षीणशक्ति सर्वदा ॥ ५५ ॥
खांडववन भक्षितां तात्काल । रोग जाईल समूल ।
परि तेथें मेघ वर्षत जल । शक्राज्ञेंकरुनियां ॥ ५६ ॥
तक्षक पुत्राशीं उद्धट । शिरीं घेऊनि सहस्त्र जलपट ।
शिंपी तेणें हव्यवाट । अपमानें माघारतसे ॥ ५७ ॥
म्हणे ब्रह्मदेवासी गेलों शरण । तो म्हणे अवतार कृष्णार्जुन ।
ते तुज देतील खांडवदान । मेघ पुरुषार्थें वारुनि ॥ ५८ ॥
म्हणोनि यमुनातीरीं येऊन । चित्रभानु प्रार्थी कृष्णार्जुन ।
म्हणे जगन्निवास मनमोहन । रोगहरण माझें करीं ॥ ५९ ॥
ब्रह्मानंदा वनमाली । मी तव मुख ज्वालामाली ।
माझा रोग हरीं ये वेळीं । दीनदयाळा गोविंदा ॥ ६० ॥
मग बोले वीर पार्थ । तुज खांडववन देईन यथार्थ ।
चालों नेदीं इंद्राचें सामर्थ्य । परि एक न्यून येथें असे ॥ ६१ ॥
अस्त्रें मजपाशीं विशेष । परि नाहीं रथ आनि धनुष्य ।
ऐसें ऐकतां यज्ञपुरुष । प्रसन्न जाहला अर्जुनासी ॥ ६२ ॥
यमुनाजलीं बुडी देऊन । पाताळीं गेला हुताशन ।
वरुणाप्रति प्रार्थून । दिव्यवस्तु घेतल्या ॥ ६३ ॥
दैत्य वधावयालागून । पूर्वीं विधीनें ठेविल्या निर्मून ।
त्या घेऊनि हुताशन । पार्थाजवळी पातला ॥ ६४ ॥
गांडीवचाप देत हस्तीं । ज्याची कल्पांतसूर्यासमान दीप्ती ।
अक्षय्य भाता बाण न सरती । कल्पवरी वेचितां ॥ ६५ ॥
समरी जें जें अस्त्र कल्पावें । तें तें तत्कालचि प्रसवे ।
बाणसमूह न मोजवे । सहस्त्रवक्त्र गणितांही ॥ ६६ ॥
जैसे शास्त्रज्ञ संवादती । शब्दमाला न खंडे कल्पांतीं ।
कीं ग्रथीं कवीचे शब्द किती । नाहीं गणती तयांसी ॥ ६७ ॥
सवेंचि ओपिला विजयरथ । ध्वजीं बैसला अंजनीसुत ।
जो भाललोचन उमाकांत । अर्जुनें पूर्वींच प्रार्थिला ॥ ६८ ॥
उच्चैःश्रव्यासमान । चार्ही अश्व क्षीरवर्ण ।
कीं नवनीताचे घडिले पूर्ण । कीं कर्पूरचूर्णें लुटियेले ॥ ६९ ॥
जाह्नवीतोय आटून घडिले । कीं चंद्रकिरणांचे ओतिले ।
कीं क्षीरसागरें पाठविले । हृदयशाळेमधूनियां ॥ ७० ॥
चंद्रसूर्यांऐशीं चक्रें । रथाचीं जडित विचित्रें ।
वारु हिंसती अतिगजरें । मेघगर्जनेसारिखे ॥ ७१ ॥
साक्षात तो त्रिनेत्र । ध्वजीं बैसलासे वानर ।
ज्याचा ऐकतां भुभुःकार । प्रलय वाटे शत्रूंसी ॥ ७२ ॥
चक्र आणि एक गदा । अग्नि देत तेव्हां मुकुंदा ।
अर्जुनाचे भाग्यासी मर्यादा । ब्रह्मादिकां नव्हेचि ॥ ७३ ॥
पार्थें नमिलें हुताशना । विजयरथा केली प्रदक्षिणा ।
सारथि करुनि नारायणा । बैसे अर्जुन मुख्यासनीं ॥ ७४ ॥
उतावीळ जावया कृष्णार्जुन । त्याच रथीं बैसला अग्न ।
चत्वारिश्रृंग त्रिचरण । सप्तपाणि प्रत्यक्ष ॥ ७५ ॥
खांडववनाजवळी येऊन त्वरां । म्हणती स्वामी वैश्वानरा ।
आता रोगहरण करा । स्वेच्छें वन भक्षूनियां ॥ ७६ ॥
ऐशी आज्ञा होतां ते क्षणीं । ज्वाळा धडकल्या चहूंकडूनी ।
महाधूम्र भरला गगनीं । पक्षी पोळती असंख्यात ॥ ७७ ॥
जैसा कनकाद्रीचा गोळ । तैसे गगनीं चालिले ज्वाळ ।
अग्नि म्हणे वन समूळ । भक्षितां तृप्त होईन मी ॥ ७८ ॥
अर्जुन म्हणे आळस सोडून । स्वेच्छें करीं वनभक्षण ।
पार्थें बाणीं भरोनि गगन । मंडप दृढ पैं केला ॥ ७९ ॥
कृष्णचक्र भोंवतें फिरत । इकडे अग्नि चेतला अद्भुत ।
वनचरें पक्षी आहाळत । तेही भक्षीत कृशानु ॥ ८० ॥
व्याघ्र वृक जंबुक शशक । रीस वानर सूकर भयानक ।
कस्तूरीमृग तरस चितळ देख । भाजोनि मरती एकसरें ॥ ८१ ॥
करी करिणी सिंह शार्दूल । गंडभैरव पक्षिपाळे सकळ ।
भोंवता बाणांचा आवर्त सबळ । ठाव न दिसे पळावया ॥ ८२ ॥
अठराभार वनस्पती । असंख्य वृक्ष विराजती ।
नामें सांगतां यथामती । ग्रंथ फार वाढेल ॥ ८३ ॥
विहंगम नवलक्षजाती । चतुष्पद तीस लक्ष गणती ।
अकरा लक्ष कीटक निश्चितीं । ज्वालावर्तीं पडियेले ॥ ८४ ॥
खांडववन जळतां ते वेळे । सप्तही सागर तापले ।
स्वर्गासी ज्वाळ संघट्टले । आहाळों लागले लोक तेव्हां ॥ ८५ ॥
अतित्वरें धांवे निर्जरेंद्र । प्रलयमेघ प्रेरी सत्वर ।
अर्जुनें सोडोनि पवनास्त्र । बलाहक विदारिला ॥ ८६ ॥
विपरीतकालीं जाय भाग्य । तैसे वितळोन गेले मेघ ।
इंद्र वज्र टाकूनि सवेग । धांवतां मार्ग फुटेना ॥ ८७ ॥
शिलाधारीं मेघ वर्षती । विद्युल्लता असंख्य पडती ।
मग म्हणे जगत्पती । गोकुळीं ऐसेंचि जाहलें ॥ ८८ ॥
मग म्यां उचलोनि गोवर्धन । रक्षिले गोकुळींचे जन ।
पार्थ म्हणे आतां कोण । तुजवीण असे रक्षिता ॥ ८९ ॥
अमरनाथाचे साह्यार्थ । धांवती राक्षसांचे सार्थ ।
परि समोर येतां पार्थ । संहारित एक बाणें ॥ ९० ॥
दैत्य राक्षस गंधर्व यक्ष । धांवती वेगें लक्षांचे लक्ष ।
रणपंडित अर्जुन दक्ष । संहारित सर्वही ॥ ९१ ॥
अनिवार बाणांची वृष्टी । चक्र फिरवी कृष्ण जगजेठी ।
देवेंद्र जाहला हिंपुटी । परि किरीटी नावरे ॥ ९२ ॥
सहस्त्रधार हरीचें चक्र । दैत्यचक्रें संहारी अपार ।
कोट्यानुकोटी शिरोभार । पृथ्वीवरी पडियेले ॥ ९३ ॥
तेहतीस कोटी मिळोनि देव । करिती शरधारावर्षाव ।
धांवले दिक्पाल सर्व । आठही शस्त्रें घेऊनि ॥ ९४ ॥
एकादश रुद्र द्वादश मित्र । अश्विनौदेव अष्टवसु पवित्र ।
सहस्त्रपुत्रांशीं धांवे त्रिनेत्र । परि पार्थश्रीधर नाटोपती ॥ ९५ ॥
तों गर्जत आकाशवाणी । म्हणे सावध होईं वज्रपाणी ।
मनीं पाहें विचारुनी । कृष्नार्जुन कोण हे ॥ ९६ ॥
तूं जय न पावसी यथार्थ । मग माघारा आला अमरनाथ ।
अग्नीस म्हणती कृष्णपार्थ । सावचित्त भोजन करीं ॥ ९७ ॥
नाना श्वापदें भक्षून । बहुत वल्लीरस प्राशून ।
दिव्यशरीर जाहला अग्न । रोगनिरसन जाहलें ॥ ९८ ॥
भरुचा भ्राता मयासुर । जो रावणाचा होय श्वशुर ।
तो पळत होता बाहेर । तव कृष्णें चक्र सरसाविलें ॥ ९९ ॥
पावकभयें आक्रंदून । नरनारायणां आला शरण ।
पार्थ म्हणे तुजलागून । न मारीं मी सर्वथा ॥ १०० ॥
अर्जुनें अभय देतां । चक्र आवरी कमलोद्भवपिता ।
मयासुर चतुर जाणता । विश्वकर्मा दैत्यांस ॥ १०१ ॥
ज्याची चातुर्यकला अपूर्व । सभापर्वीं सांगिजेल सर्व ।
हें जाणोनि पार्थरमाधव । रक्षिते जाहले साक्षेपें ॥ १०२ ॥
सुरेंद्रमित्र तक्षक । वनीं नसतां लागला पावक ।
एक पुत्र आणि भार्या देख । अनलचक्रीं कोंडलीं ॥ १०३ ॥
पावकचक्रामधून । बाहेर जाऊं नेदी अर्जुन ।
पशु पक्षी निघतां छेदून । बाणें घाली माघारां ॥ १०४ ॥
कृष्णचक्र अद्भुत । भोंवतीं घिरटी घालित ।
अग्नि चहूंकडे जाळित । तृणमात्र राहों नेदी ॥ १०५ ॥
एक वृक्ष अथवा वल्ली । राहों नेदी ज्वालामाली ।
तक्षकभार्या ते वेळीं । पुत्र घेऊनि करी शोक ॥ १०६ ॥
नव्याण्णव पुत्र घेऊन । तक्षक गेला येथून ।
मग म्हणे पुत्रा तुजलागून । मुखाकडून गिळीन मी ॥ १०७ ॥
मग तिणें पसरुनि वदन । पुत्र गिळला मुखाकडून ।
शेवटीं पुच्छ ग्रासून । गगनमार्गें उडाली ॥ १०८ ॥
निघाली वनाबाहेर । तों पार्थें सोडिला सतेज शर ।
छेदिलें सर्पिणीचें शिर । पुच्छ तुटलें पुत्राचें ॥ १०९ ॥
माता निमाली ते वेळां । तक्षकपुत्र पळोनि गेला ।
कुरुक्षेत्रास पावला । तेथें भेटला तक्षक ॥ ११० ॥
सागें पितयासी वृत्तांत । माता निमाली तेथें वनांत ।
माझें पुच्छ तुटलें समस्त । प्राण घेऊनि येथें आलों ॥ १११ ॥
भार्येलागीं करी शोक । रडत बैसे तक्षक ।
म्हणे पार्थाच्या वंशीं देख । मी भक्षीन एकांते ॥ ११२ ॥
असो इकडे हुताशन । जाळीत समस्तही वन ।
अपार श्वापदें भक्षून । वल्लीरस प्राशित ॥ ११३ ॥
मग स्तवन करी कृशान । पुर्वीं नृपानीं केलें बहु हवन ।
परि मी तृप्त हुताशन । आजि जाहलों अर्जुना ॥ ११४ ॥
वसतों शिवाचिये तृतीयनयनीं । वस्ती माझी सहस्त्रवदनीं ।
कल्पांतीं बैसें सर्व भक्षूनी । परि तृप्त मी आजि जाहलों ॥ ११५ ॥
माझा आशीर्वाद यावरी । शत्रु निवटीं तूं अवनीवरी ।
राज्य करीं एकछत्री । आशीर्वादें माझिया ॥ ११६ ॥
तक्षकपुत्र आणि मयासुर । दोघे वांचले साचार ।
ऋष्यात्मज चौघे निर्धार । सारंग पक्षी वांचले ॥ ११७ ॥
तरी मंदपाल नामें ऋषी । तपस्तेजें गेला स्वर्गासी ।
पावता जाहला पितृलोकासी । मान त्यासी कोणी नेदी ॥ ११८ ॥
न देती दिव्य भोग किंचित । मग त्यास देवेंद्र म्हणत ।
तुझे पोटीं नाहीं सुत । कष्ट प्राप्त त्याकरितां ॥ ११९ ॥
पुत्रहीन जो प्राणी । त्यास येथें मान नेदी कोणी ।
तरी तूं भलतिये योनी । पुत्र जन्मवी मंदपाला ॥ १२० ॥
मग तो मंदपाल मुनी । म्हणे फार संतति कोणे योनीं ।
उतरला तो खांडववनीं । पक्षी नयनीं विलोकिले ॥ १२१ ॥
मग जातीची सारंगपक्षिणी । जरिता नामें केली पत्नी ।
आत्मवीर्य तेथें निक्षेपूनी । चार पुत्र उपजविले ॥ १२२ ॥
शुक्र मित्र स्तंभ द्रोण । चहूं पुत्रांचें नामकरण ।
पुत्रांसमवेत नीडांत जाण । जरिता ठेविली मंदपालें ॥ १२३ ॥
लपितानामें पक्षीण । मंदपालाची स्त्री दुसरी पूर्ण ।
तियेचे भेटी जातां जाण । पुढील भविष्य समजलें ॥ १२४ ॥
कीं पावक जाळील या वना । म्हणोनि प्रार्थिलें हुताशना ।
माझे चौघे पुत्र पांचवी अंगना । रक्षीं त्यांस वैश्वानरा ॥ १२५ ॥
अवश्य म्हणतसे अनल । भाषदान देत तत्काळ ।
ऋषि गेला मंदपाल । तों मागें सकल वन जळे पैं ॥ १२६ ॥
पक्षहीन कोमल हीं बाळें । जरिता म्हणे ये वेळे ।
कनिष्ठ भार्येच्या आसक्तीमुळें । मंदपाल गेला कीं ॥ १२७ ॥
मग म्हणे नारायणा । रक्षक होई आमुच्या प्राणां ।
करुणासिंधो जगज्जीवना । सर्वांतर्व्यापक तूं ॥ १२८ ॥
बालकें म्हणती माते । उड्डाण करीं आकाशपंथें ।
वांचवीं आपुल्या प्राणातें । मोह आमुचा सोडोनियां ॥ १२९ ॥
आम्ही बाळें पक्षिहीन । तूं वांचवीं आपुला प्राण ।
मंदपालापाशीं जाऊन । आणीक पुत्र उपजवीं ॥ १३० ॥
पक्षिणी करी रोदन । तुम्हांस हुताशनीं ओपून ।
म्यां काय करावें वांचोन । देईन प्राण तुम्हांसवें ॥ १३१ ॥
आतां आला देहांत । बाल हो आठवा रुक्मिणीकांत ।
हे दीनदयाळ वैकुंठनाथ । शरणागतवत्सल तूं ॥ १३२ ॥
तूं राहतोसी क्षीरसागरीं । कीं अससी बलीचे द्वारीं ।
तेथून तूं आपला हात पसरीं । रक्षीं आम्हांसी दयाळा ॥ १३३ ॥
हे वैकुंठपुरविलासा । गोकुलपालका जगन्निवासा ।
अग्नि गिळोनि जगदीशा । गाई गोपाळ रक्षिले ॥ १३४ ॥
पांडव रक्षिले लाक्षासदनीं । आम्हीं दीनें तुझीं चक्रपाणी ।
धांव धांव ये क्षणीं । ब्रह्मानंदा करुणाब्धे ॥ १३५ ॥
यावरी जरिता बाळांसी म्हणत । मूषकबीळ आहे भूमींत ।
तुम्हीं तेथें रहा गुप्त । मृत्तिका द्वारीं लावीन मी ॥ १३६ ॥
बाल म्हणे तेथें राहणें निंद्य । भक्षिल एकादें श्वापद ।
अग्नींत देह ठेवितां शुद्ध । स्वर्गधाम पाविजे ॥ १३७ ॥
तों निकट आली ज्वाळ । बाळें अत्यंत कोमळ ।
अग्नीचें स्तवन निर्मळ । करितीं जाहलीं तेधवां ॥ १३८ ॥
जय जय महाराज हुताशन । तीन स्वरुपें तूं एक अग्न ।
आदि मध्य अंत पूर्ण । तुजवांचोनि नव्हेचि ॥ १३९ ॥
सकलांचे जठरी राहूनी । तूंचि जीवविशी सर्व प्राणी ।
सकल दैवतें तृप्त तुझेनी । द्विवदना सप्तहस्ता ॥ १४० ॥
हरावया तम संपूर्ण । तूंचि जाहलासी सूर्यनारायण ।
मेघ जाहले तुजपासून । विश्व संपूर्ण रक्षावया ॥ १४१ ॥
सोळा जण तुझे पूजक जाण । अष्टाविंशति पात्रेंकरुन ।
तुझें करिती अर्चन । द्विजासी अग्नि पूज्य तूं ॥ १४२ ॥
तुवां रक्षिला हनुमंत । प्रर्हाद रक्षिला ज्वालेंत ।
गोकुल रक्षिलें दावाग्नींत । जोहरीं पांडव रक्षिले ॥ १४३ ॥
ऐकतां पक्षियांचें स्तवन । प्रसन्न जाहला हुताशन ।
म्हणे म्यां रक्षिले तुमचे प्राण । चिंता सोडून द्या आतां ॥ १४४ ॥
तुमचा मंदपाल पिता । मज प्रार्थून गेला होता ।
इच्छित कांहीं मागा आतां । तें तत्वतां देईन मी ॥ १४५ ॥
पक्षी म्हणती येऊनि मार्जार । आम्हां मारावया जपती फार ।
त्यांपासून रक्षणार । तुजवांचून कोण असे ॥ १४६ ॥
ऐसें ऐकतां ज्वालामाली । ज्वाला लाविल्या मार्जारबिळीं ।
बिडालकें जाळून तत्कालीं । ऋषिबालां सांतवित ॥ १४७ ॥
जरिता करी रोदन । म्हणे स्वामी यज्ञनारायण ।
दीनदयाळ हुताशन । पुत्रदान तुवां दिलें ॥ १४८ ॥
इकडे लपितेस म्हणे मंदपाल । खांडववन जळालें सकल ।
तिजसहित ऋषि तत्काल । जरितेजवळी पातला ॥ १४९ ॥
पाठमोरी बैसली जरिता । बाळें न बोलती बोलवितां ।
स्फुंदस्फुंदोनि रडे वनिता । पहावया आतां आलासी ॥ १५० ॥
संकटी सांडोनि आम्हांसी । नूतन स्त्रियेसी भुललासी ।
मंदपाल म्हणे अग्नीसी । प्रार्थूनियां गेलों होतों ॥ १५१ ॥
मग शांतवूनि स्त्रीबालकां । मंदपाल नेत वना आणिका ।
ऐसे पक्षी वांचले तेथें देखा । कुरुनायका जनमेजया ॥ १५२ ॥
असो दिव्य विमानीं बैसोन । पातला तेथें पाकशासन ।
आलिंगूनि कृष्णार्जुन । करी स्तवन दोघांचें ॥ १५३ ॥
अचाट केला पुरुषार्थ । अग्नि जाहला रोग रहित ।
यज्ञमुखें समस्त । देव आम्ही सुखी असों ॥ १५४ ॥
मज सेवा सांगावी कांहीं । मग पार्थ बोले ते समयीं ।
म्हणे दिव्य शस्त्रभार देईं । कारण पाहीं पुढें असे ॥ १५५ ॥
मग बोले तो सुरेश । प्रसन्न होईल व्योमकेश ।
तेव्हां दिव्यशस्त्रें बहुवस । ओपिल तुज निर्धारे ॥ १५६ ॥
ऐसें बोलोनि संक्रंदन । कृष्णास त्रिवार करी प्रदक्षिण ।
विमानी बैसला आज्ञा घेऊन । अमरावतिये पातला ॥ १५७ ॥
संपूर्ण पंचदश दिन । अग्नीनें भक्षिलें खांडववन ।
परम तृप्त होऊन । आज्ञा घेऊन तो गेला ॥ १५८ ॥
गांडीवचाप अक्षय्य तूणीर । विजयरथ ध्वज सुंदर ।
घेऊनियां गदा चक्र । श्रीकरधर संतोषला ॥ १५९ ॥
सवें मयासुरास घेऊन । निघाले वेगें कृष्णार्जुन ।
यमुनातीरीं येऊन । पूर्वस्थलीं राहिले ॥ १६० ॥
मागुती जलक्रीडा करुन बहुत । द्रौपदीसुभद्रेसहित ।
इंद्रप्रस्था सत्वर येत । वंदीत धर्मकुंतींतें ॥ १६१ ॥
सांगितला सर्वं वृत्तांत । धर्म भीम संतोषत ।
मयासुरासी आदर बहुत । पांडव करुनि राहविती ॥ १६२ ॥
धर्म म्हणे यादवेंद्रा । भक्तमानसचकोरचंद्रा ।
दीनदयाळा करुणासमुद्रा । सकलकर्ता करविता तूं ॥ १६३ ॥
तुजकरितां अर्जुनास जय । तुझे कृपें प्रतापशौर्य ।
धैर्य धारणा कीर्ति पाहें । तुजकरितां श्रीरंगा ॥ १६४ ॥
एके गृहीं कृष्णार्जुन । एके शय्ये सदा शयन ।
एके ठायीं भोजन । सदा गमन एके रथीं ॥ १६५ ॥
दोघांचा एक विचार । मेहुणेपणें विनोद साचार ।
कृष्ण वियोग अणुमात्र । अर्जुनासी सोसेना ॥ १६६ ॥
अर्जुनाचा वियोग । नेणेचि कदा श्रीरंग ।
नरनारायण अभंग । अवतरले पृथ्वीवरी ॥ १६७ ॥
आनीक बहुत राजकन्या । पांडवीं केल्या भोगांगना ।
प्रभावती नामें ललना । नकुलें जाऊनि वरियेली ॥ १६८ ॥
परी सर्वांत श्रेष्ठ द्रुपदनंदिनी । कीं सुभद्रा कृष्णभगिनी ।
सुभद्रेहूनि याज्ञसेनी । आवडे मनीं श्रीरंगा ॥ १६९ ॥
येथोनि आदिपर्व समाप्त । पुढें सभापर्वरस अद्भुत ।
चौदा अध्यायपर्यंत । आदिपर्व जाहलें ॥ १७० ॥
शास्त्रांमाजी वेदांत । कीं देवांमाजी वैकुंठनाथ ।
आनंदवन क्षेत्रांत । पर्वांत आदिपर्व तैसें हें ॥ १७१ ॥
शस्त्रांमाजी सुदर्शन । नवग्रहांत सूर्यनारायण ।
कीं विष्णुक्षेत्रांत जाण । पंढरी पावन जैशी कीं ॥ १७२ ॥
तैसें पर्वांत आदिपर्व । नवरसयुक्त अति अपूर्व ।
जो महाराज व्यासदेव । तेणें पूर्वीं कथियेलें ॥ १७३ ॥
व्यासभारताचे अध्याय विशेष । दोनशत आगळे तीस ।
अवघे मिळोनि श्लोक सुरस । किती मर्यादा ऐका ते ॥ १७४ ॥
अठरासहस्त्र नवशत । चौर्यायशीं श्लोक विशेष परिमित ।
इतुकी गणना नेमस्त । वैशंपायनें केली असे ॥ १७५ ॥
इतुक्यांचा मथितार्थ सुरस । श्रीधरें अध्याय केले चतुर्दश ।
पंढरीनगरीं विशेष । आदिपर्वं संपविलें ॥ १७६ ॥
पुढें सभापर्वरस गहन । जें भक्तिप्रेमवृक्षोद्यान ।
तेथींचे छायेस पंडित जन । सर्वदाही बैसोत कीं ॥ १७७ ॥
ब्रह्मानंदस्वामी पिता । सावित्री नामें माझी माता ।
श्रीधरें वंदोनि उभयतां । आदिपर्व संपविलें ॥ १७८ ॥
पुंडलीकवरदा पांडुरंगा । रुक्मिणीहृदयारविंदभृंगा ।
श्रीधरवरदा अभंगा । ब्रह्मानंदा अक्षय्य तूं ॥ १७९ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । चतुर्दशाध्यायीं कथियेला ॥ १८० ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्वटीका श्रीधरकृत ।
जलक्रीडा खांडववनदहन समस्त । आदिपर्वीं संपविलें ॥ १८१ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
अध्याय चौदावा समाप्त
GO TOP
|