नारद भक्तिसूत्रे

स तरति स तरति स लोकान्स्तारयति ॥ ५० ॥


अर्थ : (मागील सूत्रात ज्याचे वर्णन केले आहे) तो या (मायानदीतून तरतो, तो (च) तरतो, (किंबहुना) तो (शरणागतांना) (या मायानदीतून) तारून नेतो.


विवरण : शेहेचाळिसाव्या सूत्रात आरंभी 'कस्तरति माया' मायेतून कोण तरून जातो असा प्रश्न उपस्थित करून एकोणपन्नासाव्या सूत्रापावेतो माया तरून जाणार्‍या भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. 'जो संगत्याग करतो, महानुभवांची सेवा करतो, निर्मम होतो, एकांतवासाचा आश्रय करतो, लोकबंधाचे उन्मूलन करतो, निस्त्रैगुण्य होतो, योगक्षेमाचाही त्याग करतो, तसेच कर्मफलांचा त्याग करतो, कर्माचाही त्याग करतो, निर्द्वंद्व होतो, जास्त काय वेदांचाही त्याग करतो, तो या दैवी दुरत्यया गुणमयी मायेतून तरून जातो हे निश्चयपूर्वक द्विरुक्तीने या सूत्रात सांगतात. मायातारण म्हणजेच मोक्ष, उद्धार, कैवल्य इत्यादी होय हे मागील सूत्रात सांगितलेच आहे.

'स तरति' तो तरतो म्हणजे इतर लोक तरून जात नाहीत असा अर्थ होतो. सर्व जीवमात्राची प्रवृत्ती या मायानदीतून पलीकडे जाण्याची म्हणजेच दुःख-निवृत्तीची असते व त्याकरिता ते प्रयत्नही करीत असतातच, पण ते प्रयत्न कसे निष्फल होतात व का होतात हे श्रीज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे. त्या ओव्याचा भावार्थ खाली देत आहो.

श्रीकृष्णभगवान सांगतात, अर्जुना ! कोणी आपल्याच बुद्धिरूपी बाहुने ही नदी तरून जाण्याकरिता या नदीत शिरले. ते कोठे गेले त्याचा पत्ताच नाही; दुसरे कितीएक या मायानदीत ज्ञानाभिमानाच्या डोहात गर्वरूपी जलचराकडून गिळले गेले. कित्येकांनी तीन वेदरूपी सांगडीचा (मायानदीतून तरण्याकरिता) आश्रय केला, पण त्याबरोबर अभिमानाचे मोठे धोंडे घेतले ते मदरूपी माशाच्या तोंडात सबंधच गेले. कितीएकांनी तारुण्यरूपी कासपेटा कमरेला बांधला व मग मदनाच्या कासेला लागले ते विषयरूपी मगरानी चघळून टाकले. आता वार्धक्याच्या लाटेमध्ये असणार्‍या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चोहोबाजूनी व्यापिले जातात, आणि शोकरूपी काठावर आपटून, क्रोधरूपी भोवर्‍यात गुरफटून ज्या ठिकाणी वर येतात त्या ठिकाणी अनंत आपत्तिरूपी गिधाडाकडून टोचले जातात, नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले व मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यानी कामाचा आश्रय केला, ते व्यर्थ गेले. कित्येकानी यजनक्रियारूप पेटी या मायानदीतून तरून जाण्याकरिता आपल्या पोटाशी बांधली ते स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. कित्येकानी मोक्षरूपी मायानदीच्या पलीकडच्या किनार्‍याला लागावे या आशेने विहितकर्मरूपी बाहूवर विश्वास ठेवला, परंतु ते विधिनिषेधाच्या भोवर्‍यात सापडले. ज्या मायानदीत वैराग्याची नाव प्रवेश करू शकत नाही, विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही, याउपर अष्टांग योगाने काही तरणोपाय होतो पण तोही क्वचित होतो. याप्रमाणे आपल्या अंगच्या सामर्थ्याने ही मायानदी उतरून जाऊ असे म्हणणे कशासारखे आहे, हे विचारल्यास दृष्टांताने सांगतात. जर पथ्य न करणाराला रोग घालविता येईल किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल, अथवा लोभी पुरुषाला ऐश्वर्य प्राप्त झाले असता तो त्याचा त्याग करील, चोराना जर न्यायाधीश (चौकशी करणारे) भितील, अथवा माशाला जर गळ गिळता येईल, अथवा एखाद्या भित्र्या माणसाला पिशाचावर हल्ला करता येईल, हरिणाच्या पाडसाला जर जाळे कुरतडून तोडता आले, मुंगीला जर मेरुपर्वत ओलांडता आला तरच मायानदीचा पलीकडचा काठ जीव पाहू शकतील. म्हणून हे अर्जुना ! ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही (म्हणजे तोच तिच्या आधीन होतो) त्याप्रमाणे जीवाना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. या विवेचनावरून माया तरणे किती कठीण आहे, हे लक्षात येईल, म्हणून तो तरतो या वाक्याला महत्त्व आहे.

भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात ।
मामेव ये प्रयद्यन्ते मायामेतांतरंति ते ॥ १४ ॥ गी. ७
'जे मलाच शरण येतात ते माया तरून जातात.'
येथे एकचि लीला तरले । जे सर्व भावे मज भजले ।
तया ऐलीच थडी सरले । माया जळ ॥ ज्ञा. ७-९७ ॥
तसेच उद्धवास उपदेश करतेवेळीही श्रीकृष्ण भगवान म्हणतात,
विरळा कोणीएक सभाग्य येथे । हे सकळ उपाय सांडूनि परते ।
जो अनन्य प्रीती भजे माते । कर्मनदी त्याते कोरडी ॥१०७७॥
माझे भक्तीचे तारु नातुडे । जव सप्रेमाचे शीड ना चढे ।
तव तरणोपाय बापुडे । वृथा का वेडे शिणताती ॥ ७८ ॥
धरूनि अनन्य भक्तीचा मार्गु । करूनि सर्व धर्म कर्मत्यागु ॥
हा तरणोपाय चांगू । येरू तो व्यंगु अधःपाती ॥ ७९ ॥ एकनाथी भागवत अ. ११

श्रीमद्‌भागवत एकादशस्कंधात जनकाने मायातरणोपाय कोणत्या साधनाने होईल असा प्रश्न (अध्याय ३) केला होता त्याचा उत्तरात नवयोगेश्वरांनी स्पष्ट सांगितले आहे.
इति भागवतान् धर्मान् शिक्षन्भक्त्या तदुत्थया ॥
नारायणपरो माया मञ्‍जस्तरति दुस्तराम ॥ २३ ॥

'याप्रमाणे भागवत धर्माचा अभ्यास करून प्राप्त झालेल्या भगवद्‌भक्तीने नारायणपर झालेला पुरुष दुस्तर मायेतून लीलेने तरून जातो.' या श्लोकावरील प्रसादगर्भ टीकेत श्रीएकनाथ महाराज सांगतात,
ऐशी हे भागवत धर्म स्थिती । शरण जाऊनि सद्‌गुरु प्रति ।
अभ्यासावी भगवद्‌भक्ती । तै मायेची शक्ति बाधू न शके ॥ ६१५ ॥
माया वेदशास्त्रा अनावर । ब्रह्मादिका अतिदुस्तर ।
ते सुखे तरती भगवत्पर । हरिनाम मात्र स्मरणार्थे ॥६१६॥
हरिनामाच्या गजरापुढे । माया पळे लवडसवडे ।
यालागी तरणो पावो घडे । सुख सुरवाडे हरिभक्ता ॥ ६१७ ॥
भक्तीपाशी नित्य तृप्ति । भक्तीपाशी नित्य मुक्ति ।
भक्तीपाशी भगवत्प्राप्ति । मायानिवृत्ती हरिभजने ॥ ६१८ ॥
हरिनाम भजन कल्लोळे । माया जीव घेऊनी पळे ।
भक्त तरती भाळे भोळे । हरिभजन बळे महामाया ॥६२१॥ ए. भा. ३

प्राप्त कालात भगवद्‌भक्ती हाच महत्त्वाचा मायेतून तरून जाण्याचा मार्ग आहे असे सर्वच संतांनी स्वानुभवाने सिद्ध केले आहे. श्री भागवत बाराव्या स्कंधात स्पष्ट म्हटले आहे.

संसारसिंधुमतिदुस्तरमुत्तितीर्षोर्नान्यः प्लवो भगवतः पुरुषोत्तमस्य ॥
लीलाकथारसनिषेवणमंतरेण पुंसो भवेद्विविधदुःखदवार्दितस्य ॥ ४० ॥ (स्कं. १२ अ. ४)

'अनेक दुःखांनी पीडिलेल्या पुरुषास अतिदुस्तर अशा संसारसागरातून तरून जाण्याची इच्छा करणार्‍यास भगवंताच्या लीलाकथारससेवन या नौकेविना अन्य तरणोपाय नाही.' मूळ सूत्रात 'तो तरतो' असे विधान आहे. तो तरतो म्हणजे कोठे जातो याचे व्याख्यान ज्ञानेश्वरमहाराजांनी स्पष्ट केले आहे.

जया सद्‌गुरु तारु पुढे । जे अनुभवाचिये कासे गाढे ।
जया आत्मनिवेदन तराडे । आकळले ॥९८॥
जे अहंभावाचे वोझे सांडूनि । विकल्पाचिया झुळका चुकाउनि ।
अनुरागाचा निरु ताउनि । पाणिढाळु ॥९९॥
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।
मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेपावले जे ॥ १०० ॥
ते उपरतीच्या वावी सेलत । सोऽहं भावाचे नि थावे पेलत ।
मग निघाले अनकळित । निवृत्तितटी ॥ १०१ ॥
येणे उपाये मज भजले । ते हे माझी माया तरले ।
परि ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाही ॥ १०२ ॥ ज्ञानेश्वरी - ७

श्रीतुकाराममहाराजही सांगतात 'तरले तरती हा भरवसा । नामधारकाचा ठसा ॥' प्रेमी भक्त म्हणजे केवळ अविच्छिन्न अनुरागाचा लाभ ज्याला झाला आहे असा. मागील चार सूत्रातून जी अनेक साधने सांगितली आहेत ती या भगवद्‌भक्तीचे अंगभूत म्हणून गौण आहेत. भगवद्‍भक्तीत कोणता प्रतिबंध येऊ नये म्हणून संगत्याग, निर्ममता, महानुभावसेवा, एकांतसेवन, लोकबन्धउन्मूलन, निस्त्रैगुण्यता, योगक्षेमत्याग, कर्मफलत्याग, कर्मत्याग, वेदत्याग, निर्द्वंद्वता ही साधने सांगितली आहेत. मायेच्या वर्धिष्णू, क्षयिष्णू व समपरिमाणी अशा तीन स्थिती सांगितल्या आहेत. माया व तिचे विकार यांची अज्ञानी बद्ध जीवांच्या ठिकाणी अनादी संस्काराने वाढच होत असलेली दिसून येते. संसार वृद्धिंगत व्हावा, मान, कीर्ती, भोग वरचेवर मिळतच राहावेत याकरिता विहित निषिद्ध कर्मे करणार्‍यांच्या ठिकाणी माया ही वरचेवर वर्धिष्णू म्हणजे वृद्धी पावणारी अशी असते. ते माया वाढविण्याचा प्रयत्न करणारे असतात, मायेतून तरून जाण्याची कल्पनाही त्यांना नसते. ती वर्धिष्णू अवस्था होय. कित्येक काही दुःखाचे आघात आले, मान, कीर्तीत उणेपणा आला, देहादिकांचे अनित्यत्व जाणले म्हणजे काही काळ माया निवर्तक काही साधनाचा अवलंब करीत असलेले दिसतात. पण अनादि विषयवासनाजन्य संस्कारामुळे पुन्हा पुन्हा संसारात पडत असतात. ही समपरिमाणी स्थिती असते. म्हणजे कधी मायाकार्याचे अनित्यत्वही पटते व अनुकूल भोग प्राप्त झाले तर त्या भोगात रुचीही निर्माण होते. तिसरी क्षयिष्णू अवस्था ही आहे की, सत्संगतीने विवेकाने मायाकार्य सर्व संसार अनित्य दुःखरूप आहे, पारत्रिक भोगही विषयजन्य कार्य असल्याने क्षयातिशयादी सर्व दोषांनी युक्त आहेत, असा दृढ निश्चय झाल्याने या सर्वांचे कारण ही माया आहे. तिची निवृत्ती म्हणजेच त्या मायानदीतून तरून गेलेच पाहिजे असे त्या भक्तास जे वाटते ती ही क्षयिष्णू स्थिती आहे. या मायेची अशी क्षयिष्णू स्थिती निर्माण होण्याकरिता वरील चार सूत्रात जी अनेक साधने सांगितली आहेत, त्याचा उपयोग होतो, अशा रीतीने माया व मायाकार्य सर्व संसाराविषयी अनास्था निर्माण झाली व केवळ परमात्मा हाच सुखरूप आहे, त्याच्या प्रेमाच्या आड ही माया आहे, ती त्याचीच शक्ती आहे, त्याच्या कृपेनेच तिच्यातून तरून जाणे शक्य आहे म्हणून त्याची भक्ती, त्याची अनन्य प्रीती संपादन करणे यापेक्षा अन्य मार्ग नाही, असे जाणून जो केवळ भगवत्प्रीतीचाच अखंड अनुभव घेत असतो तोच मायेतून पूर्ण तरून जातो.

केवळ तोच तरून जातो असे नसून 'स लोकान्स्तारयति ।' तो आपल्याला शरण आलेल्या अन्य लोकानाही तारून नेतो असे नारद म्हणतात. भगवान श्रीकृष्ण उद्धवास उपदेश करतेसमयीही हीच भाषा वापरत आहेत.

यापरी भक्तियुक्त । होऊनिया माझे भक्त ।
निजानंदेगात नाचत । तेणे केले पुनीत लोकत्रय ॥ ३३२ ॥
कीर्तनाचेनि महाधोके । नाशिली जगाची सर्व दुःखे ।
अवघे विश्वचि हरिखे । भरिले महासुखे ॥ उचंबळत ॥ ३३४ ॥
दर्शने स्पर्शने वचने । एक तारिले कीर्तने । एक तारिले नामस्मरणे ।
या परी जग उद्धरणे उद्धवा ॥ ३३५ ॥ ए. भा. १४

भक्त स्वतः भक्ती करतात व लोकाना भगवद्‌भक्तीचे, भगवन्नामाचे महात्म्य अट्टाहासाने पटवून अनेकांना या भक्तिमार्गाकडे प्रवृत्त करतात. श्री देवर्षी नारदाचे सर्व जीवन अनंत जीवांना मायानदीतून तारून नेण्यातच गेले नाही काय ? 'यारे यारे लहान थोर । याती भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कवणाची ॥' हे तुकाराममहाराजांचे उद्‌गारही लोकतरणच दर्शवितात. ते लोकांना का तारून नेतात ? याचे उत्तर भक्ताच्या अंतःकरणातील करुणावृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. 'बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया ॥' हे उद्‍गार याचीच साक्ष देतात. त्याच्या अवतारकार्याचे प्रयोजनच हे सांगितले जाते. 'अवतार तुम्हा धराया कारण । उद्धराया जन जडजीव ॥' चंदन हा जसा समीपवर्ती वृक्षांना आपला सुगंध प्रदान करतो त्यामुळे त्या सर्व वृक्षांचेही महत्त्व वाढते, त्याचा उद्धार होतो त्याप्रमाणेच भक्तिमान पुरुष हा अनेक लोकांचा उद्धार करतो. गंगा आपल्या सामर्थ्याने ओहोळास पावन करते, परिस आपल्या सामर्थ्याने लोहास सुवर्ण बनवितो, कस्तुरी आपल्या गुणाने मातीस मुल्यवान बनविते त्याप्रमाणे हा भक्तिमान पुरुष आपल्या सामर्थ्याने अनेकाना या मायानदीतून तारून नेतो.


GO TOP