नारद भक्तिसूत्रे
सा न कामयमाना निरोधरूपत्वात ॥ ७ ॥
अर्थ : ती (भक्ती) कामनायुक्त नाही; कारण ती निरोधस्वरूपा आहे.
विवरण - ती भक्ती प्रेमस्वरूप, अमृतस्वरूप, सिद्धिस्वरूप आहे, असे या पूर्वीच्या सहा सूत्रातून स्पष्ट केल्यानंतर पुन्हा ती कामनायुक्त नाही हे सांगण्याचे प्रयोजन काय ?
त्याचे उत्तर हे की, मागील पाचव्या सूत्रात 'यत्प्राप्य न किञ्चिद्वाञ्छति, न शोचति, न द्वेष्टि, न रमते, नोत्साही भवति असे भक्तीचे निषेधक रूप सांगितले आहे, त्याचेच स्पष्ट स्वरूप दाखविण्याकरिता 'सा न कामयमाना' हे सूत्र आले आहे. भक्ती ही कामनायुक्त नसावी हे आवर्जून सांगण्याचे कारण हे की, बहुधा ईश्वरभक्ती करणार्यांच्या ठिकाणी ऐहिक-पारत्रिक कोणती ना कोणती कामना दिसून येते. श्रीभगवानकृष्ण अर्जुनास सांगतात -
कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ॥ - गीता ४. १२.
'कर्मफलाची इच्छा करणारे लोक कर्मफल या लोकी लौकर प्राप्त व्हावे म्हणून इहलोकी देवदेवतांची पूजा करीत असतात.'
येर बहुत जोडती किरीटी । जयांची भजनें भोगासाठी ।
जे आशा तिमिरें दृष्टी । मंद जाले ॥ -ज्ञा. ७. १३८
अशा फलासक्तिपूर्वक भक्ती करण्याने हृदयात कामाचा प्रवेश होतो व त्याच्या संबंधाने ज्ञानाचा दिवा मालवला जातो.
आणि फळाचिया हावा । हृदयी कामा जाला रिगावा ।
की तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥ ज्ञा ७ - १३९.
कामाचे ज्ञानाशी किती वैर आहे याचा विचार गीतेच्या तिसर्या अध्यायाच्या शेवटी आलाच आहे. काम हा जीवाला खर्या प्रेमापावेतो जाऊ देत नाही. 'कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख । बहू वाटे दुःख फुटो पाहे हृदय ॥' असे श्रीतुकाराममहाराज म्हणतात. <
br>
काम हा एक राजस मनोविकार आहे. तो इंद्रियद्वारा अनुकूल विषय प्राप्तीत तृप्ती मानतो. तो देवापावेतो जीवास पोहोचू देत नाही. गीता, भागवतादी, ग्रंथामध्ये अनेक स्थळी या कामाच्या परिणामाच्या बाधकतेचा विचार केला आहे. (पुढे ४३-४४ या सूत्राच्या विवरणप्रसंगी या विषयाचा सविस्तर विचार आहे.)
महर्षी अङ्गिर याच्या दैवी मीमांसादर्शनातही एक सूत्र भक्तिविषयक आहे. 'अकाम्या सा' भक्तीत कामना अन्य असेल तर भक्तीचा विषय जो भगवान तो साधन ठरतो म्हणजे गौण ठरतो. ते परमप्रेम ठरू शकत नाही. कामनेत स्वसुखाभिलाषा असते व प्रेम ज्यावर केले जाते, त्याच्या सुखाची अपेक्षा ठेवीत असते. पुढे चोविसाव्या सूत्राच्या विवरणप्रसंगी या विषयाचा विचार येणार आहे. आरंभीच्या सूत्रातून ज्या भक्तिलक्षणाचा विचार केला आहे त्यात 'न किञ्चित वांञ्छति' (सूत्र ५) असे स्पष्टच म्हटले आहे. वांछा म्हणजेच काम.
'न कामयमाना' याचा अर्थ भगवद्व्यतिरिक्त अन्य कामना भक्तीत खपत नाही असा आहे.
श्रीहरीचे ठिकाणी ज्याची बुद्धी जडलेली आहे अशा पुरुषाचा काम हा काम म्हणविला जात नाही, त्यासच प्रेमही म्हटले आहे. 'प्रेमैव गोपरामाणां काम इत्योगमत्प्रथाम् ॥' असे भक्तिशास्त्रात सांगितले आहे. म्हणजे 'गोपिकाच्या विशुद्ध प्रेमालाही कोठे कोठे काम अशी संज्ञा दिली जाते.'
परमात्म्याने नृसिंहावतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. तो आवेशावतार असल्याने व भक्त प्रल्हादाचा हिरण्यकश्यपूने फार अनन्वित छळ केलेला असल्याने नृसिंहास फार क्रोध आलेला दिसत होता. तो शांत करण्यास देव, ऋषिमुनी कोणीही पुढे जाण्यास समर्थ होईना. सर्वांनी मिळून प्रल्हादास नृसिंहापुढे केले, तेव्हा प्रल्हादाने आपल्या भावपूर्ण शब्दात नृसिंहाचे पुष्कळच वर्णन केले, त्या वर्णनाने नृसिंह संतुष्ट होऊन भक्त प्रल्हादास म्हणाले,
प्रल्हाद भद्रभदं ते प्रीतीऽहं तेऽसुरोत्तम ॥
वरं वृणीष्वभिमतं कामपूरोऽस्म्यहं नृणाम् ॥ -भागवत ७ - १०
'हे भक्तश्रेष्ठ प्रल्हादा, तुझे कल्याण असो, मी तुझ्यावर संतुष्ट आहे, तसेच सर्व मानवाच्या कामनेची पूर्णता करणारा मी आहे, तू मला वाटेल तो वर माग, मी तुझी इच्छा पूर्ण करीन.'
एवं प्रलोम्यमानोऽपि। वरैर्लोक प्रलोभनैः ।
एकांतित्वाद्भगवति नैच्छत्तानसुरोत्तमः ॥ ७ - १०
'सर्वांना लोभ निर्माण व्हावा अशा वराने प्रल्हादालाही लोभ निर्माण व्हावा अशी भाषा जरी नृसिंहाने वापरली तरी प्रल्हाद हा एकान्त भक्त असल्याने त्याने त्या वराची इच्छा केली नाही.'
प्रल्हाद नृसिंहास उत्तर देतो -
अहंत्वकामस्त्वद्भक्त स्त्वंतु स्वाम्यनपाश्रय ।
नान्यर्थेहावयोरर्थो राजसेवकयोरिव ॥ ७ - १०
'प्रभो ! मी तुमचा निष्काम भक्त आहे व तुम्ही माझे अनन्याश्रय स्वामी आहा. राजा व त्याच्या सेवकाप्रमाणे आमच्या ठिकाणी काही स्वार्थाचा संबंध नाही. तुमची भक्ती करून जो काही लौकिक पदार्थाची कामना ठेवतो तो तुमचा भक्त नसून व्यापारी आहे.'
यःस आशीष आशास्ते न स भृत्यः सवै वणिक ॥ -भागवत ७ - १०
नृसिंहाने काही माग असा जास्तच आग्रह केल्यानंतर भक्तवर्य प्रल्हाद म्हणतो -
यदिरासीश मे कामान्वंरांस्त्वं वरदर्षभ ।
कामानां हृद्यसंरोहं भवतस्तु वृणे वरम् ॥ भा. ७ - १०
'हे वरदान देणार्यात श्रेष्ठ देवा ! जर तुम्ही मला काही वरदान देण्याची इच्छाच करीत आहा, तर मी तुम्हाला हाच वर मागतो की, माझ्या अंतःकरणात कोणतीही इच्छा कोणतीही कामना निर्माणच होऊ देऊ नका.'
म्हणून सूत्रात भक्ती ही 'कामयमाना' नाही असे म्हटले आहे. आरंभी भक्ती ही 'अमृतरूपा' आहे असे म्हटले आहे. म्हणजे ती निर्विकार आहे, काम हा एक विकार आहे. तो अमृतरूप कसा होईल ? विकार अनित्यच असतात.
भक्ती ही 'कामयमाना' नाही याचे कारणही श्रीनारद महर्षी सूत्रातच स्पष्ट करीत आहेत 'निरोधरूपत्वात ।' निरोध हेच तिचे स्वरूप आहे. कामादिकात निरोध म्हणजे संयम किंवा त्याग नसतो. ते स्वैर भटकत असतात. कामादिकाचे विषय व इंद्रिये, संस्कार, भोग हे संयमित नसतात. ते प्रतिक्षणी बदलत असतात. यास व्यभिचार दोष म्हणतात. भक्तीत हा व्यभिचार खपत नाही.
या सातव्या सूत्रावर विदर्भातील प्रसिद्ध संत प्रज्ञाचक्षू श्रीगुलाबराव महाराज यांनी आपल्या नारदभक्तिसूत्रावरील 'नारदीय भक्तिसूत्र भाष्यम्' नामक संस्कृत टीकेत खालीलप्रमाणे विचार प्रकट केले आहेत.
शंका - ही भक्ति रागरूपिणी आहे का नाही ? कारण राग व प्रीती हे पर्याय शब्द आढळून येतात, म्हणून भक्ती ही रागरूपिणीच मानावी.
उत्तर - रागरूपिणी मानली तर ती राजसी (रजोगुणी) ठरते. 'रजोरागात्मकं विद्धि' असे गीतावचन आहे, पण भक्ती ही राजस (रजोगुणी) होऊ शकत नाही. 'सा न कामयामानानिरोधरूपत्वात' असे सूत्रात नारदांनी म्हटले आहे.
प्रीती व राग यात सांख्य व वेदान्त मताप्रमाणे भेद आहे. गुणांचा विचार विस्तृत करणार्या सांख्यशास्त्रकारांनी प्रीती हा सत्त्वगुण प्रकार आहे, असे सांगितले आहे. भगवंतानी गीतेच्या चौदाव्या अध्यायात सत्त्वगुण हा सुखरूप आहे असे प्रतिपादन केले आहे. 'सत्त्व सुखे संजयति, इ. वाक्याने व प्रीती ही सुखरूप असल्याने तिला सात्त्विकत्व आहे. प्रीतीविना सुखाचा प्रत्यय येत नाही. वेदान्तशास्त्रातही परमप्रेमास्पंदत्व या हेतूनेच आत्मा परमानंदस्वरूप आहे असे सांगितले आहे म्हणून सत्त्वोपहित जीवलक्ष्य जो परमात्मा त्याच्या परमानंदाची अभिव्यक्ती हीच प्रीती होय. ती रागात्मिका नाही, कारण 'निरोधरूप' असल्याने सांख्यमताप्रमाणे तिला सात्विकत्व आहे व वेदांत मताप्रमाणे ब्रह्मानंदरूपत्व असल्याने प्रीती रागस्वरूप म्हणता येत नाही. कारण राग हा अध्यासाचा पुरस्कार करून 'इदं मे स्यात' 'हे मला मिळावे' असा इच्छास्वरूप आहे. तो राग जो मानवाचे ठिकाणी दिसून येतो तो स्वभोगार्थच असतो. भक्तीमध्ये भोक्तृत्वाभिमानही नष्ट होतो. केवळ परमात्मविषयिणी प्रीतिधाराच अवशिष्ट राहाते. यालाच 'निरोध' म्हणतात. यालाच योगशास्त्रात घेरंडाचार्य यांनी 'समाधी' शब्दाने सूचित केले आहे.
स्वकीये हृदये ध्यायेदिष्टदेवस्वरूपकम् ।
चिंतयेद्भक्तियोगेन परमाल्हादपूर्वकम् ॥
आनंदाश्रु पुलकेन दशाभाव प्रजायते ।
समाधिः संभवेत्तेन संभवेच्च मनोन्मनी ॥
'आपल्या हृदयामध्ये इष्ट देवतेच्या स्वरूपाचे ध्यान करावे. त्यायोगे अष्टसात्त्विकभावाची दशा प्राप्त होते. त्यायोगे समाधी संभवतो. त्या योगाने मनोन्मनी ही महत्त्वपूर्ण अवस्था सिद्ध होते.'
ज्ञानाने तूर्यावस्था प्राप्ती होते व भक्तीने मनोन्मनी सिद्ध होते हा विशेष आहे. 'रामकृष्णनामी उन्मनी साधली ॥ असे श्रीज्ञानेश्वरमहाराज हरिपाठात म्हणतात. योगशास्त्राचे प्रयोजन केवळ चित्तवृत्ती निरोध हे आहे व त्याचे साधन अभ्यास व वैराग्य हे योगशास्त्रात सांगितले आहे. 'अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोध ॥' पण भक्तिशास्त्रात एवढेच निरोधाचे स्वरूप मान्य नाही. म्हणून पुढील आठव्या सूत्रांत नारदमहर्षी आपल्या निरोधाचे स्वरूप स्पष्ट सांगत आहेत.
GO TOP
|