नारद भक्तिसूत्रे

यल्लब्ध्वा पुमान्सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति ॥४॥


अर्थ : ज्या (परमप्रेमरूपा अमृतरूपा) भक्तीची प्राप्ती (लाभ) झाला असता तो पुरुष सिद्ध होतो, अमर होतो, तृप्त होतो.


विवरण : दुसर्‍या सूत्रात अस्मिन्पदवाच्य परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी परमप्रेम असणे असे ज्या भक्तीचे लक्षण सांगितले आहे व जी भक्ती अमृतरूपा आहे असे मागील तिसर्‍या सूत्रात सांगितले गेले, तिचे आणखीही अधिक फल या सूत्रात सांगितले आहे.

त्या परमप्रेमरूपा भक्तीचा लाभ झाला असता तो पुरुष सिद्ध होतो. येथे 'पुमान' (पुरुष) असा शब्द वापरला आहे. तो मनुष्य देहधारी जीव या अर्थानेच वापरला आहे, स्त्री-पुरुष या लिङ्गभेदाने वापरला नाही. कारण प्रेमलक्षणा भक्तीत पुरुष, स्त्री, बालवृद्ध सर्वांचाच अधिकार आहे, म्हणून 'पुमान' हा सूत्रातील शब्दाचा मनुष्य देहवान असाच अर्थ करावा हे योग्य आहे. तसेच पुढे सूत्रातच 'यथाव्रजगोपिकानाम' म्हणून गोपीचे-स्त्रियांचे-उदाहरण दिले आहे. इतर काही यज्ञयागादी तसेच संन्यासादी साधनात स्त्रियांना, शूद्रादिकांना शास्त्रात अधिकार सांगितला नाही, पण भक्तिसाधनात, सर्वांनाच समान अधिकार आहे. तसेच येथे मनुष्य, शरीरी, पुरुष या शब्दाचा उपयोग न करता 'पुमान' शब्द वापरला आहे. 'पुम' म्हणजे पुरुषार्थ, जो पुरुषार्थ सिद्ध करतो तो पुमान होय. धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे सामान्यतः चार पुरुषार्थ सांगितले जातात, तसेच 'भक्ती' हाही पाचवा पुरुषार्थ सर्व संतांनी, शुक-सनक-व्यास-नारदादी मुनींनी व भक्तिशास्त्रकारांनी मानला आहे. म्हणून परमप्रेमरूपा पंचम-पुरुषार्थरूपा भक्तीचा ज्या पुरुषाला लाभ झाला आहे, त्याचे हे वर्णन आहे. तसेच येथे 'लब्ध्वा' असे पद आहे. "लब्ध्वा" म्हणजे ज्या प्रेमाचा लाभ झाला असता असा अर्थ होतो. जगात ऐहिक - पारत्रिक असे अनेक लाभाचे प्रकार सांगितले जातात. पण ते खरे लाभ नव्हेत. कारण मूळविषयच जर मृगजळाप्रमाणे आभासिक आहेत तर त्यांचा लाभही आभासिक असाच राहणार, तो खरा नाही. विषय हे क्षयातिशयदोषाने युक्त असतात व केवळ अज्ञानी पुरुषांनाच तो लाभ वाटतो. 'भ्रातासी काम । विषयावरी ॥' (ज्ञा. ९. ६०) म्हणून तो खरा लाभ नव्हे. उलट भक्तिप्रेम हे पुरुषार्थस्वरूप आहे. पुढे सूत्र साठमध्ये भक्ती ही शांतिरूप व परमानंदस्वरूप आहे असे म्हटले आहे. ऐहिक-पारत्रिक विषयाच्या लाभाने या सूत्रात व पुढील सूत्रात सांगितलेली सिद्ध होणे, अमृत होणे, तृप्त होणे ही फळे प्राप्त होणे शक्य नाही. म्हणून भक्तिप्रेमाचा लाभ श्रेष्ठ असल्यामुळे त्याचे फळ सांगतात. ज्याला हा लाभ होतो तो पुरुष 'सिद्ध' होतो. जगात असिद्ध व सिद्ध असे दोन प्रकारचे मानव असतात. विशिष्ट साध्याची ज्यांना प्राप्ती झाली नाही, त्यांना असिद्ध म्हटले असता चालेल व ज्यांना ते साध्य प्राप्त झाले आहे त्यांना सिद्ध म्हणतात, किंवा सिद्धी प्राप्त झाली म्हणजेही सिद्ध म्हटले जाते. भगवद्‌गीतेमध्ये तर सिद्धी शब्द अनेक अर्थाने आला आहे.

योगशास्त्रात आणिमा, महिमा इत्यादी मुख्य अष्टसिद्धी व आणखी अनुर्मिमत्व, दूर-श्रवणादी दहा गौण सिद्धी तसेच त्रिकालज्ञत्वादी पाच क्षुद्रसिद्धीही सांगितल्या आहेत. भागवतात याचा सविस्तर विचार सांगितला आहे व कोणकोणत्या साधनाने कोणकोणत्या सिद्धी प्राप्त होतात, त्याचाही विचार केला आहे. भागवत स्कंध ११, अ. १५, श्लोक ५-८ पातञ्‍जलयोगदर्शनातही सिद्धीचा विचार केलेला आहे. पण या सर्व सिद्धीना परमार्थमार्गात अंतराय (विघ्न) म्हटले जाते. भगवान श्रीकृष्णच उद्धवास सांगतात,
अंतरायान्वदन्त्येता युञ्‍जतो योगमुत्तमम् ।
मया संपद्यमानस्य कालक्षपण हेतवः ॥ - भागवत स्कंध. ११ - १५ - ३३
'माझी प्राप्ती करून घेण्यासाठी निष्काम असा उत्तम योगाचा अभ्यास करणार्‍या भक्ताला या सिद्धी म्हणजे मोक्षमार्गातील अडथळेच आहेत, असे ज्ञानी लोक म्हणतात, या सिद्धी म्हणजे काळाचा व्यर्थ अपव्यय आहे.'

या श्लोकावरील आपल्या टीकेत श्रीएकनाथ महाराज म्हणतात :
अहैतुक करिता माझे भजन । तेणे शीघ्र माझी प्राप्ती जाण ।
तेथे सिद्धीवरी घालिता मन । आली नागवण मत्प्राप्तीसी ॥
ज्यासी विषयभोग लागे गोड । तोचि सिद्धीची वाहे चाड ।
ज्यासी माझे प्राप्तीचे कोड । तो वांछीना बंड ऋद्धिसिद्धीचे ॥
माझे स्वरूप अद्वैतता । तेथे सिद्धींच्या नानावस्था ।
ते मायेची व्यामोहकता । जाण तत्त्वता उद्धवा ॥
माझे प्राप्ती आड सिद्धीचे विघ्न । हेचि तुज कळावया जाण ॥
म्या सर्व सिद्धीचे निरुपण । समूळ संपूर्ण सांगितले ॥
माझ्या ठायी धरिता ध्यान । एकाग्रता होता मन ।
तेथ भोगलिप्सा सिद्धी जाण । करिती नागवण साधका ॥ - नाथ भागवत, १५ - १८५ - ९१

या सिद्धी परमार्थमार्गात विघ्नस्वरूप असतात. खरा भक्त या सिद्धींच्या मागे लागत नाही. सिद्धीच्या मागे कोण लागतो त्याबद्दल श्रीकृष्ण भगवान उद्धवाला सांगतात :
जे नेणती माझे निजसुख । ऐसे जे का केवळ मूर्ख ।
त्यासीच सिद्धीचे कौतुक । अलोकिक भोगलिप्सा ॥ - नाथ भागवत, १५ . २३५

एखादा भक्त अनन्यभक्ती करू लागला म्हणजे तेथेही सिद्धी प्रकट होत असतात. पण भक्त त्यांच्याकडे तुच्छतेनेच पाहत असतो. ज्या साधावया महासिद्धी । योगी शिणताती नाना विधी । त्या प्रगटल्या त्रिशुद्धी । भक्त सद्‌बुद्धी नातळती ॥ त्या आणिमादि सिद्धीच्या माथा । मद्‍भक्ती हाणोनि लाथा ॥ लागले माझ्या भक्तिपंथा । जाण तत्त्वता उद्धवा ॥ - नाथ भागवत, १४. १२६ . २७

श्रीतुकाराममहाराज देवाजवळ बोलतात :
ऋद्धिसिद्धी तुम्हा मुख्य भांडवल । आम्हासी ते फोल भक्तीपुढे ॥ १ ॥
या सर्व सिद्धी भौतिक असून क्षयातिशयदोषाने युक्त आहेत, म्हणूनही भक्त त्यांना सिद्धी समजत नाही.

अध्यात्मशास्त्रात मोक्ष, कैवल्य, निर्वाण यांच्या प्राप्तीस सिद्धी म्हणतात. ती ज्यांना प्राप्त होते, त्यास सिद्ध म्हणतात. श्रीमद्‍भगवतगीतेमध्ये 'नैष्कर्म्यसिद्धिं परम संन्यासेन अधिगच्छति ॥' (गीता १८-४९). 'ज्याचे अंतःकरण कोठेच आसक्त नाही, किंबहुना ज्याचे ताब्यात ते आहे, ज्याची इच्छा निःशेष नाहीशी झाली आहे अशा पुरुषांस संन्यासाच्या योगाने उत्कृष्ट अशी नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होते. तिच्या बद्दल 'संसिद्धी,' "परासिद्धी" असे शब्द गीतेने योजले आहेत. श्रीज्ञानेश्वर महाराज वरील अठराव्या अध्यायातील एकोणिसाव्या श्लोकावरील आपल्या टीकेत म्हणतात : 'देवळाच्या कामाला जशी कळस ही शेवटची मर्यादा आहे, अथवा गंगेला जसा समुद्रप्रवेश ही शेवटची हद्द आहे, जसा सोन्याचा सोळावा हा शेवटचा कस आहे, त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाचे अज्ञान नाहीसे करते ते ज्ञानही गिळून असणे अशी जी अवस्था, त्या नैष्कर्म्यसिद्धीच्या पलीकडे या जगात काही मिळविण्याचे राहात नाही, म्हणून सर्व सिद्धीत ही नैष्कर्म्यसिद्धी श्रेष्ठ म्हटली जाते. (ज्ञानेश्वरी, अ. १८ - ९८१ - ८३.)

श्रीनारद महर्षी येथे 'यल्लब्ध्वा पुमान्सिद्धोभवति' असे म्हणतात. जर सिद्ध शब्दाने योगातील सिद्धी प्राप्त किंवा मोक्षनिर्वाणसिद्धी प्राप्त असा अर्थ घेतला तर 'यल्लब्ध्वा' यातील यत् शब्द नपुंसकलिंगी आहे. येथे भक्तीने तो सिद्ध होतो असा अर्थ केला तर भक्ती हे पद स्त्रीलिंगी आहे व म्हणून 'याल्लब्ध्वा' असा प्रयोग करावयास पाहिजे होता. पण 'यल्लब्ध्वा' असा प्रयोग केला आहे म्हणून येथे 'यत्' म्हणजे 'जे' व 'जे' म्हणजे "प्रेम," असा अर्थ केला पाहिजे कारण वरील दुसर्‍या सूत्रात 'प्रेम' व तिसर्‍या सूत्रात त्याचा 'अमृतस्वरूप' असा उल्लेख आहे.

प्रेम हे कधी साधन होत नाही व साधन हे अमृतस्वरूप नसते. प्रेम हे साध्यच आहे. शिवाय खरा प्रेमीभक्त मोक्षासकट सर्व सिद्धीच्या संबंधात निरपेक्ष असतो. श्रीकृष्ण भगवान उद्धवास सांगतात.
माझे अतिशये शुद्ध भक्त । ते मुक्तीसी दूर दवडित ।
माझेनि भावार्थे नित्य तृप्त । ते पूज्य होत मजलागी ॥
जो सकळ सिद्धीचा ईश्‍वरू । तो मी लागे त्यांची पूजा करू ।
तेथिला जो सिद्धींचा संभारू । घेऊनि निजवेव्हारू पळताती ॥
सकळ सिद्धींच्या स्वामित्वेसी । मी भगवंत तिष्ठे भक्तापाशी ।
-नाथ भागवत, अ. १५ - २१८ - १९
म्हणून भक्तिप्रेमप्राप्ती हीच फार मोठी सिद्धी आहे.

भागवत एकादश स्कंधाच्या एकोणिसाव्या अध्यायात उद्धवाने श्रीकृष्णास जे अनेक प्रश्न विचारले आहेत, त्यात लाभ कशास म्हणावे हा एक प्रश्न आहे त्याचे उत्तर श्रीकृष्णांनी 'लाभो मद्‍भक्तिरुत्तमः' "माझी भक्ती हाच उत्तमोत्तम लाभ आहे" असेच दिले आहे. यावरील टीकेत श्रीएकनाथमहाराज सांगतात :
तुवां पुसिला लाभ तो कोण । ऐक त्याचेंही लक्षण ।
माझी उत्तमभक्ति जाण । 'लाभ' संपूर्ण त्या नांव ।
माझी करिता उत्तम भक्ती । चारी मुक्ती पाया लागती ।
सुरवर लोटांगणी येती । लाभ श्रीपति मी लाभे ॥ -नाथभागवत १९-५०२ -३.

भगवान प्रसन्न असल्यावर त्यापेक्षा मोठया सिद्धी कोणत्या आहेत ? नारद पांचरात्रामध्ये म्हटले आहे :
हरिभक्ति महादेव्यः सर्वामुक्त्यादि सिद्धयः ।
भुक्तयश्‍वाद्‍भुतास्तस्याश्‍चेटिकावदनुव्रताः ॥ - नारदपांचरात्र.
'मुक्ती आदि सिद्धी आणि अनेक प्रकारच्या भुक्ती (भोग) दासीप्रमाणे हरिभक्तरूप महादेवीच्या सेवेत तत्पर असतात.'

हरिप्रेमाने युक्त होऊन सिद्धीची अपेक्षा केली तर प्रेमातील अनन्यता कशी राहणार ? तेथे प्रेम हे साधन होईल. अनन्य प्रेम हेच एकमेव प्रेमीचे साध्य असते, म्हणून ते प्राप्त होणे हीच सिद्धी आहे, व ही सिद्धी प्राप्त होणाराच 'सिद्ध' म्हटला जातो. अनेक भक्ताच्या चरित्रातून काही सिद्धीचे चमत्कार झालेले दिसून येतात. त्यामुळे या भक्तांनी सिद्धिसंपादन केल्या असाव्यात असे वाटणे स्वाभाविक आहे. पण हे चमत्कार भक्ताकरिता भगवान करीत असतो. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालविली हे प्रसिद्ध आहे, पण श्रीतुकाराम महाराज सांगतात ती देवाने ओढली, म्हणजे चालविली. 'ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ॥'

सिद्ध हा शब्द पूर्णत्वाचा वाचकही आहे. ज्याला काही साध्य प्राप्त करून घ्यावयाचे राहिले नाही असा कृतकृत्यताप्राप्त पुरुष सिद्ध म्हणविला जातो व ही सिद्धी केवळ भक्तिप्रेमानेच त्यास प्राप्त झालेली असते, यावरून प्रेमही पूर्णच आहे हे सिद्ध होते.

सूत्रातील यापुढील पद 'अमृतो भवति अमर होतो' हे आहे. तिसरे सूत्र 'अमृतरूपाचे' हे आहे. प्रेमभक्ती ही स्वरूपाने अमृतरूपच आहे, मग ती प्राप्त होणारा पुरुष अमृतरूप अमर का होणार नाही ? प्रेमी भक्त तन्मय होतो. 'यतस्तन्मयाः' असे पुढे सतराव्या सूत्रात म्हटले आहे. म्हणून अमृतस्वरूपा भक्तीशी तन्मय होणारा भक्तही अमृतच होतो.

शांडिल्य भक्तिसूत्रातही 'तत्संस्थस्य अमृतत्वोपदेशात' असे तिसरेच सूत्र आहे. त्याचाही हाच अभिप्राय आहे 'तत्संस्थस्य' म्हणजे द्वितीय सूत्रात ' सापरानुरक्तिरीश्‍वरे' - ईश्‍वराचे ठिकाणी परम प्रेम हे भक्तीचे लक्षण सांगून, त्या ईश्‍वराच्या ठिकाणी संस्था म्हणजे निष्ठा, म्हणजे त्यागपूर्वक अनुरक्ती ज्याची आहे त्या प्रेमी भक्तास अमृतत्व हे फल सांगितले आहे. जेव्हा भक्त आपल्या हृदयनाथाशी एकरूप होतो तेव्हाच तो अमृतरूप होऊन जातो. 'अमर तू खरा । नोहे कैसा मी दातारा ॥' असा प्रश्‍न तुकाराममहाराज देवाला करतात.

कोणी म्हणेल, अमृत होणे याचा अर्थ काय ? देहाच्या द्वारा का आत्मस्वरूपाने ? देहाच्या द्वारा कोणीही अमृत बनू शकणार नाही ? कारण देहाला उत्पत्ती आहे, त्याला आयुष्य देणार्‍या कर्माचा भोगाने क्षय झाला की देह मरणार. देहाने कोणी अमर झाला नाही. "जातस्यहि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्यच ।" (गीता, २. २७) 'जो जन्माला आला त्याला निश्‍चयाने मृत्यू आहे व जो मृत झाला त्याला निश्‍चयाने जन्म आहे.' हे भगवद्‍वाक्य स्पष्ट देहाचा मृत्यू सांगते. आत्म्याला अमरत्व प्राप्त होते म्हणावे तर आत्मा अमर आधीच आहे. तो शाश्‍वत, नित्य, अविकारी म्हणजे षट्‍भावविकाररहित आहे. हा उपनिषदे, गीता यांचा सिद्धान्त आहे.

या प्रश्‍नाचे थोडक्यात उत्तर असे की, आत्मा अमर आहे, देह विनाशी आहे हे जरी खरे असले तरी अनादिकालापासून जीव अज्ञानवश होऊन देहालाच मी म्हणतो व देहाचे जन्म-मृत्यूच काय, सर्व अवस्था, सर्व विकार, इंद्रिये, विषय, देहेंद्रियादिकाच्या द्वारे होणारी कर्मे, त्याची सुखदुःखादी फळे इत्यादी सत्यच मानतो. याचा परिणाम आत्मस्वरूपाचा त्यास विसर पडतो. त्याला संसारच प्रिय वाटतो व त्या सांसारिक भोगप्राप्तीकरताच इष्टानिष्ट कर्मे तो करीत असतो. त्याचा परिणाम जन्म व मरण अखंड भोगावे लागते. तत्त्वतः जीव जन्मणारा, मरणारा नाही. कारण तो चेतन आत्मा आहे. अनादिकालापासून जीवाला या देहसंबंधामुळे पुनः पुन्हा जन्म व मरण भोगावे लागते. एखाद्या जीवास महत्सुकृताने मनुष्यदेह लाभला, पूर्वपुण्याईने सद्‌बुद्धी प्राप्त झाली, भाग्यविशेषाने सद्‍भक्तांची संगती घडून सच्छास्त्र - श्रवण झाले म्हणजे त्यायोगाने त्याला या संसाराच्या यथार्थ रूपाची जाणीव होते, विषयभोगातील दोष कळू लागतात, विषयाचे सुखही परिणामी दुःखच आहे व जन्ममरण फार त्रासदायक-दुःखस्वरूपच आहे, असे वाटू लागते. हळूहळू सत्संगतीने भगवद्‌भाव जागृत होऊ लागतो, सर्व अनर्थांचे कारण हा देह व तन्मूलक संसार आहे व विनाभगवत्कृपेच्या यातून तरणोपाय नाही असे वाटू लागते.

'तेषामहंसमुद्धर्ता मृत्युसंसारसागरात ॥ (गीता, १२ . ७)' "माझ्या अनन्य भक्ताचा संसारसागरातून उद्धार करणारा मीच आहे," हे भगवंताचे प्रतिज्ञावाक्य आहे हे जाणून त्याच्या अंतःकरणात भक्ती निर्माण होते. अनित्य दुःखरूप संसार आहे म्हणून यातून मुक्त होण्याकरिता भगवद्‌भक्ती हेच योग्य श्रेष्ठ साधन आहे. (अनित्यमसुखंलोकमिमंप्राप्यभजस्वमाम् ।- गीता, ९ . ३३) हे कळून तो भगवद्‍भक्तीकडे प्रवृत्त होतो. जशी जशी भगवद्‍भक्तीची गोडी लागू लागते तसतसा तो भगवदेशरण होऊ लागतो. पश्चात्तापदग्ध अंतःकरणाने भगवंताची प्रार्थना करू लागतो. भक्तवर्य प्रल्हादाचे उद्‌गार पाहा :
यस्मात्प्रियाप्रिय वियोग संयोग जन्म शोकाग्निना सकलयोनिषु दह्यमानः ।
दुःखौषधं तदपि दुःखमतद्धियाऽहं भूमन्भ्रमामि वदमेतवभक्तियोगम ॥ -भागवत, ७ - ९ - १७
प्रल्हाद म्हणतो, 'हे अनंता ! मी ज्या ज्या योनीत फिरलो त्यात प्रियाचा वियोग व अप्रियाच्या संयोगापासून होणार्‍या शोकाग्नीमध्ये जळत होतो. त्या दुःखाकरिता जे औषध म्हणजे साधन करावे तेही दुःखासच कारण होते. मला कळत नाही की मी केव्हापासून तुमच्याहून अतिरिक्त वस्तूंना आत्मा समजून इकडेतिकडे भटकत आहे. तुम्ही कृपा करून तुमच्या भक्तियोगाचे स्वरूप सांगा.'

भगवत्कृपेने भक्तियोगाचा लाभ ज्याला झाला आहे असा भक्त देहाकडे ढुंकूनही पाहत नाही. 'तुका म्हणे तुम्ही आइकाहो मात । आम्ही हो अतित देहाहुनी ॥ श्रीमद्‌भागवताच्या एकादश स्कंधाच्या दुसर्‍या अध्यायात जनक-नव-योगेश्वर संवादात म्हटले आहे -
देहेंद्रिय प्राणमनोधियां यो जन्माप्ययक्षुद्भयतर्षकृच्छ्रैः ।
संसारधर्मैरविमुह्यमानः स्मृत्याहरेर्भागवतप्रधानः ॥ २-४९ ॥
'देह, इंद्रिये, प्राणमन याचे विशिष्ट धर्म जे जन्ममृत्यू, क्षुधातृष्णा, भय, भोगेच्छा व कर्म, ते संसारात प्रतिक्षणी उत्पन्न होत असताही त्या हरिभक्ताच्या हरिस्मरणामुळे ते धर्म बाधक होत नाहीत, त्यास भागवतप्रधान म्हणावे.'

या श्लोकावरील श्रीएकनाथ महाराजांची भावगर्भ टीका पाहा.
देह इंद्रिये मनबुद्धिप्राण । हेचि बंधाचे पंचायतन ।
क्षुधातृषाभयक्लेशपूर्ण । जन्ममरण इत्यादि ॥
या पांचा स्थानी अपार श्रम । या नाव म्हणिजे संसारधर्म ।
निज भक्ता प्रसन्न आत्माराम । त्यांसी भवभ्रम स्वप्नीही नाही ॥
देह बुद्धी माजी जाणा । नानापरी उठती तृष्णा ।
ते बुद्धी निश्‍चये हरीच्या स्मरणा । करिता परिपूर्णा विनटली स्वये ॥
जन्म आणि मरण । हे देहाचे माथा जाण । भक्त देही विदेही पूर्ण ।
ध्याता हरिचरण । हरिरूप झाले ॥
यालागी देहाची अहंता । कदानुपजे भगवद्‌भक्ता ।
ते भक्तपूर्णतेची कथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥
भक्त देहासि येता मरण । हेतुरहित हरीचे स्मरण ।
या लागी देह निमाल्या आपण । न मरता पूर्ण पूर्णत्वे उरे ॥
हरिभक्ता देहाचा अभावो । मा काळ कवणा घालील घावो ।
आता आम्ही ते आम्हीच आहो । ते आम्हीपणही वावो आमुचेनि आम्हा ॥ नाथभागवत. २ - ६६४ - ९०
याचे तात्पर्य हे की भक्त देहाला अमर करण्याची अपेक्षा करीत नाही. मी भगवंताचाच जर अंश आहे, चेतन आहे तर भगवंताप्रमाणेच मलाही जन्ममरण नाही, हीच त्याची भावना असते.
याच आशयाने 'मरण माझे मरुनी गेले । मज केले अमर ॥' हे तुकाराम महाराजांचे उद्‌गार सार्थ आहेत.

भगवान श्रीकृष्ण अर्जुनास प्रतिज्ञापूर्वक सांगतात : "न मे भक्तः प्रणश्यति" माझ्या भक्ताचा नाश नाही. (गीता ९. ३१.)
या श्लोकावरील आपल्या व्याख्यानात श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात :
तो आता अवसरे मजसारिखा होईल । ऐसाही भाव तुज जाईल ।
हां गा अमृताआंत राहील । तया मरण कैचे ॥ - ज्ञा. ९ - ४२५.

प्रेमी भक्ताच्या मृत्यूचाच मृत्यू होतो. त्याचे जीवन, त्याचा व्यवहार सर्व भगवन्मय होऊन जातो. भगवंतावर जसा काळाचा प्रभाव पडत नाही तसाच भक्तावरही पडत नाही.
तेवी मी तया । जैसे असती तैसिया ।
कळिकाळ नोकोनिया । घेतला पटा ॥ - ज्ञा . १२ . ८४
असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनास सांगतात.

"जगा काळ खाय । आम्ही माथा दिले पाय" - तुकाराम महाराज,

हे संतांचे उद्‌गार हेच दर्शवीत नाहीत काय ? देहतादात्म्यवानांनाच मृत्यूचे भय असते. भक्ताचे ते पूर्णपणे सुटलेले असल्यामुळे तो काळाला भीत नाही. श्रीज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी, श्रीतुकाराममहाराजांचे सदेह वैकुंठगमन, एकनाथांच्या देहाचे जलमय होणे इत्यादी गोष्टी अमृतत्वाच्या द्योतकच नाहीत काय ?

काही उपलब्ध नारदभक्तिसूत्राच्या प्रतीत 'अमृती भवति' म्हणजे अमर होतो असा अर्थ केला आहे, 'अमृती भवति' याचा अर्थ भक्त स्वतः 'अमृत' बनतो, म्हणजे अमृताचे दोन विशेष मानले जातात. एक, मृत्यूची बाधा दूर करणे व दुसरा, मधुरत्व. मधुरत्व म्हणजेच रसरूपता, रसशब्द वेदात आनंद या अर्थी वापरला आहे. भक्त स्वभावाने किती मधुर असतो त्याचे वर्णन एके ठिकाणी खालीलप्रमाणे केले आहे.
प्रियप्रायावृत्तिर्विनयमधुरी वाचि नियम ।
प्रकृत्याकल्याणी मतिरनवगीत परिचय ॥
पुरोवापश्‍चाद्वा सविधमविपर्यासितरसं ।
रहस्य साधूनां निरुपधि विशुद्धं विजयते ।
'प्रायः सर्वांच्या बरोबर सर्वांना प्रिय होईल असे आचरण, नम्रतेने युक्त, मधुर संयमित वाणी, स्वभावतः सर्वांचे मंगल इच्छिणारी बुद्धी, आपला गुणगौरव झाकण्याची प्रवृत्ती, कोणी सन्मुख असो अथवा विमुख सर्वांसी समान भाव हा साधूचा उपाधिरहित शुद्ध स्वभावच होऊन गेलेला असतो.'

कोणा एका व्यक्तीवर प्रेम करणे हा संसारी माणसाचा स्वभाव असतो. पण अग्नी प्रज्वलित आहे, वाटेल त्याने शीतनिवारण करून घ्यावे. चंद्रोदय झाला आहे, राजा-रंकानी त्या शीतल मधुर प्रकाशाचा आनंद लुटावा, कमल प्रफुल्लित झाले आहे, कोणीही त्याचा सौरभ सेवन करावा, तसे प्रेमी भक्ताच्या जीवनात विनयाचे माधुर्य असते. सर्वांचे कल्याण इच्छिणे हा त्याचा स्वभाव होऊन राहतो. कोणी त्यांना केव्हाही भेटा, त्यांची स्तुती करा किंवा निंदा, त्यांना पीडा द्या किंवा सुख द्या, कसेही झाले तरी त्यांच्या हृदयातील रस एकरूपच असतो व तो सर्वांसी मधुरभावानेच प्रकट होतो. साखर स्वच्छ पाण्यात टाकली किंवा गलिच्छ पाण्यात टाकली तरीही त्या पाण्यास गोडच बनवील, तसे भक्ताच्याजवळ कटुत्वाला स्थानच नाही.

भगवान 'अमृतस्वरूप' आहे व भक्त आणि भगवान यांच्यात भेद नाही. पुढे सूत्र एकेचाळीसमध्ये श्रीनारदमहर्षीच म्हणतात. 'तस्मिन्स्तज्जने भेदाभावात' 'भगवान व त्याच्या भक्तामध्ये भेदाचा अभाव आहे.' म्हणूनही "अमृतीभवति" असे म्हटले आहे.

या पुढील पद 'तृप्तो भवति' - "तो प्रेमी भक्त तृप्त होतो" असे आहे. तृप्ती, संतोष, समाधान, तृष्णाराहित्यादि शब्द समानार्थक आहेत. जीवाच्या सर्व क्रिया पर्यायाने तृप्तीकरिताच असतात. क्षुधेने व्याकुळ झालेला प्राणी अन्नाने तृप्त होतो व मी तृप्त झालो असे म्हणतो, ती तृप्ती खरी नव्हे, कारण पुन्हा थोडयाच वेळात क्षुधेने पीडित होतो. मनुष्य अनुकूल विषयसेवनाकरिता प्रवृत्त होतो व इंद्रियाविना विषय सेवन होऊ शकत नाही, म्हणून इंद्रियाधीन होतो. 'इंद्रिय' शब्दाचा अर्थच हा आहे- 'इंद्रस्य आत्मन विषयोपलब्धिकारणतया लिङ्गानि इंद्रियाणि' म्हणजे जीवात्म्यास विषयाच्या उपलब्धीस कारणीभूत असतात, म्हणून इंद्रिये म्हटली जातात. पण ती बहिर्मुख आहेत त्यांना त्यांचे त्यांचे विषयच प्रिय असतात.
या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।
ऐसा स्वभावोचि पाही । इंद्रियांचा ॥
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।
का स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ।
देखे अनित्य ते यापरी । म्हणऊनि तू अव्हेरी ॥ ज्ञा. २ . १२० - २१

विषय हे मृगजळवत, भासमान मिथ्या आहेत, पण अंतःकरणही इंद्रियद्वारे विषयाकडेच सतत धावत असते व अंतःकरण म्हणजेच प्रमाता जीव. कारण अंतःकरणोपाधीमुळेच चैतन्यास जीवदशा प्राप्त होते.
वाया मन हे नाव । येर्‍हवी कल्पनाचि सावे ।
जयाचेनि सगे जीव । दशा वस्तु ॥ ज्ञा. १३ - ११०
असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

म्हणजे जीव हा विषयाच्या सतत मागे लागतो. अनादी जन्म-जन्मांतरीय संस्कारांमुळे विषयाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी व अनुकूल बुद्धी, तसेच देहेंद्रियादि संघाताचे तादात्म्य असल्यामुळे स्वतःच्या सुखरूपतेस विसरून जीव तृप्ती, संतोष, समाधानाकरिता विषयाच्या मागे लागतो. त्या विषयप्राप्तीकरिता अहर्निश प्रयत्न करतो व प्राप्त विषयाचा भोग घेतो. पण विषय हे जीवाची सुखवासना तृप्त करू शकत नाहीत. कारण ते अनित्य म्हणून स्वरूपाने दुःखरूपच आहेत.
तेवीं विषयाचें जें सुख । तें केवळ परम दुःख ।
परी काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ - ज्ञा. ९ - ४९९ असे श्रीज्ञानेश्वर महाराज स्पष्ट म्हणतात.

विषय जड आहेत. सुख हा जडाचा धर्म होऊ शकत नाही. केवळ भ्रमामुळे म्हणजे परमात्मा हाच सुखरूप आहे हे न कळल्यामुळे त्याच्या आनंदाचा प्रत्यय न आल्यामुळे सुखरूप भासतात. देहाहंकारामुळे आनंदाचे आवरण होते, परमात्मस्वरूपाचे अज्ञान वाढते. श्रीएकनाथ महाराजांनी एका दृष्टांताच्याद्वारे ही गोष्ट सांगितली आहे.
जेवी कूर्मीचिया पिलिया । चक्षुरमृते तृप्ती तया ।
तेचि मातेसी चुकलिया । मग भुकेलिया कर्दमू सेवी ॥
तेवी खुटलिया आनंदाभिव्यक्ति । जीवासी वाढे विषयासक्ती ।
कामिनी कामापंगिस्त होती । चिंता चित्ती विषयांची ॥
विसरला आपुलें पूर्णपण । धनालागी अति हीनदीन ।
मी देहवंत परिच्छिन्न । ऐसा देहाभिमान दृढ होय ॥ - नाथभागवत १३ . ४३४ - ३६
कासवीच्या पिलाची तृप्ती केवळ मातेच्या दृष्टिक्षेपानेच होते. पण ते जर मातेस चुकून दूर गेले तर मात्र त्याला भूक लागली तर मातेची तृप्त करणारी दृष्टी प्राप्त होत नाही. मग क्षुधापीडानिवारणार्थ चिखल खावा लागतो, पण त्याने पूर्ण तृप्ती होणे शक्य आहे काय ? तद्वत् जीवालाही परमात्मा माऊलीच्या प्रेमानेच खरी तृप्ती प्राप्त होणे शक्य आहे. पण देहेंद्रिय तादात्म्यामुळे त्या शुद्ध प्रेमाला मुकल्यामुळे विषयाचा चिखल खावा लागतो. पण त्या विषयसेवनामुळे कोणाची तृप्ती झाली आहे काय ?

मृगजळामागे धावणार्‍या हरिणांची कधी तरी तृषा नाहीशी होईल काय ? शुक्राचार्याच्या शापाने जराग्रस्त झालेल्या ययाति राजाने पुन्हा पुत्राने दिलेल्या नवतारुण्याने एक हजार वर्षे यथेच्छ विषयोपभोग भोगले. पण तृप्ती झाली नाही. तेव्हा त्याच्या पश्‍चात्तापदग्ध अंतःकरणातून असे उद्‌गार निघाले की,
यत्पृथिव्या व्रीहियवं हिरण्यं पशवः स्त्रियः ।
न द्रुह्यन्तिमनः प्रीतिं पुंसः कामहतस्यते ॥ १३ ॥
न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति ।
हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ॥ १४ ॥ - भागवतस्कंध ९ - १८
या पृथ्वीमध्ये जेवढे म्हणून धान्य, सुवर्ण, स्त्रिया इत्यादी भोग्य पदार्थ आहेत, ते सर्व जरी एखाद्याला प्राप्त झाले तरी कामनाभिभूत पुरुषाच्या मनाला संतुष्ट करू शकत नाहीत. कारण विषयोपभोगाने कामना शांत तर होत नाहीच, पण घृताच्या आहुतीने अग्नी कमी न होता वृद्धिंगतच होत जातो, त्याप्रमाणे तो काम वाढतच जातो.'

विषयात जर तृप्ती नाही तर जीव तिकडे प्रवृत्त का होतो ? तसेच अनुकूल विषयसेवनाने सुख झाल्यासारखे का वाटते ? याचे उत्तर हे की, देहेंद्रिय तादात्म्यवान अज्ञानी पुरुषाची वृत्ती बहिर्मुख होते. निसर्गतःच तिला सुखेच्छा असते. खर्‍या सुखाचे ज्ञान नसल्यामुळे ती विषयाकडे अनुकूल बुद्धीने इंद्रियद्वारा जाते. इष्ट विषय प्राप्त झाला असता क्षणैक बहिर्मुखता दूर होऊन ती वृत्ती अंतर्मुख होते व त्या वृत्तीत आत असणार्‍या आत्मस्वरूपाचा आनंद प्रतिबिंबित होतों. जसे एखादे कुत्रे वाळलेले हाड आपल्या दाताने फोडीत बसते, त्याच हाडाचा तुकडा त्याच्या हिरड्यास घासून त्यातून रक्त येते. ते त्याच्या जीभेवर पडले म्हणजे त्यास वाटते हे त्या हाडातूनच आले. तसाच प्रकार वृत्तीचाही आहे, म्हणजे आनंद हा विषयाचा नसून, इच्छावृत्ती अंतर्मुख झाली त्याचा आहे. तसेच ती अंतर्मुखताही तिचे साधन जो विषयलाभ तो क्षणिक असल्यानें तो विषय नष्ट झाला, किंवा त्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ विषय समोर आला किंवा त्या विषयाचे दोषदर्शन झाले, किंवा काही प्रतिबंध आला तर नष्ट होते, म्हणून भोगलेल्या सुखाचाही नाश झाल्यासारखा वाटतो व पुन्हा सुखाकरिता अन्य विषयाकडे धावत जातो. त्यात एखादा इहलोकातील सुखे तुच्छ समजून पारलौकिक स्वर्गादी सुखाच्या प्राप्तीकरिता यज्ञयागादी करण्याकरिता प्रवृत्त होतो. ती क्लेशकारक कर्मे करतोही व त्याला कदाचित् स्वर्गसुख प्राप्तही झाले तरी तेही शेवटी विषयाचेच असते, जे दोष ऐहिक विषयात असतात तेच त्या पारत्रिक विषयातही आहेत.

श्रुतच दृष्टवद्‍दुष्ट स्पर्धासूयाऽत्ययव्ययै ।
बव्हन्तराय कामत्वात्कृषिवच्चापि निष्फलम् ॥ - भागवत, ११ - २१
"श्रुतीने सांगितलेले स्वर्गफलही इहलोकाप्रमाणे दुःखरूपच आहे. तेथेही स्पर्धा, द्वेष, सुख न्यून होण्याची भीती, नष्ट होण्याची भीती वगैरेने ते दूषित असतेच. त्याचप्रमाणे ते मिळविण्यास अनेक प्रकारची विघ्ने असल्यामुळे शेतकर्‍याची शेती ज्याप्रमाणे निश्‍चित फलदायी नसते, त्याप्रमाणे स्वर्गफलही निश्‍चित मिळेलच असा विश्वास नाही." असे श्रीकृष्णानी उद्धवास उपदेश करताना स्पष्ट सांगितले आहे. या श्लोकावरील श्रीएकनाथ महाराजांची विस्तृत टीका मुळातच पाहावी.

या विषयाचा एवढा विस्तार करण्याचे कारण तृप्ती सर्वांनाच अपेक्षित आहे, व जी सर्वांना अपेक्षित आहे ती अयोग्य आहे असे म्हणता येत नाही. ती मिळालीच पाहिजे, हेही खरे आहे, पण जगाकडे दृष्टी टाकल्यास सामान्य माणसेच काय इंद्रादिकही अतृप्तच दिसून येतात. अमृत प्राशन करणारा, दिव्यभोगसंपन्न, अनेक अप्सरांचा उपभोग घेणारा इंद्रही पुन्हा अहिल्येची अपेक्षा ठेवतो !

तृप्ती म्हणजे एकप्रकारे कृतकृत्यताच होय. कारण मनुष्य जे काही कर्म करतो ते तृप्तीकरिताच करतो. तृप्त झाल्यावर त्याला कर्माची गरज नसते. (तृप्ती झालिया जैसी । साधने सरती आपैसी ॥ -ज्ञा ३ - १४८) पण प्रत्येक प्राणी सतत कर्मे करीतच आहे, हे स्पष्टच आहे. तसेच कोणीही स्वतःस तृप्त समजत नाही. तृप्ती ही पूर्णतेत असते. वेदांतशास्त्रात तृप्ती ही जीवाची ज्ञानाने प्राप्त होणारी शेवटची भूमिका सांगितली आहे. जीवाच्या अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश व तृप्ती अशा सात अवस्था मानल्या आहेत.
अज्ञानमावृतिस्तद्वद्विक्षेपश्‍च परोक्षधी ।
अपरोक्षमति शोकमोक्षस्तृप्तिर्निरंकुशा ॥ पंचदशी तृप्तिदीप, ३३

या सात अवस्थातील प्रथम तीन अवस्था अज्ञानाच्या आहेत व पुढील चार अवस्था ज्ञानाच्या आहेत. यात शेवटची अवस्था निरंकुशा तृप्ती ही सांगितली आहे. विषयभोगापासून जी तृप्ती झाल्यासारखी वाटते ती सांकुशा म्हणजे अन्य विषयाची कामना झाली असता ती तृप्ती कुंठित होते म्हणजे राहात नाही, पुन्हा अतृप्ती येते, पण अपरोक्ष ज्ञानजन्य तृप्ती अन्यविषयक कामनेच्या अभावामुळे कुंठित होत नाही, ती अखंड, अबाधित राहते. याच तृप्तीचे श्रीभगवद्‍गीतेमध्ये "यस्त्वात्मरतिरेवस्यादात्मतृप्तश्च मानव. ॥" (गीता ३ . १७) तसेच 'नित्यतृप्तो निराश्रय' (गीता ४२०) असे वर्णन केले आहे. या तृप्तीतच 'धन्योऽहं धन्योऽहं' असे उद्‌गार त्या ज्ञानी पुरुषाच्या मुखातून बाहेर पडतात. 'जे ज्ञानगंगे नहाले । पूर्णता जेऊनि धाले' (ज्ञा ९ - १९०) असे त्याचे वर्णन श्रीज्ञानेश्वर महाराज करतात.

प्रेमी भक्ताची तृप्तीदेखील अशी निरंकुशा, प्रतिबंधरहित, अखंडच असते, पण तिचा उगम भगवत्प्रेमातून होतो. तो सर्वांगाने प्रेमात रंगून जातो, प्रेममय बनतो.
श्रीकृष्ण भगवान अर्जुनाजवळ त्या प्रेमाचे वर्णन करतात.
ऐसे प्रेमाचेनि बहुवसपणे । नाहीं राती दिवो जाणणे ।
केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेया जिहीं' ॥ ज्ञा. १० - १२९

एका दृष्टीने पाहिल्यास प्रेमात अतृप्तीही दिसून येते. कारण प्रेम कोठे थांबत नाही. 'तृप्ती भुकेली काय करू माये । जीवनी जीवन कैसे तान्हेजत आहे ॥' - ज्ञा. अभंग-

'पोट सेवीता न धाये । भूक भुकेलीच राहे ॥ विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस । पुढता पुढती आस सेवावी हे ॥ तुकाराम महाराज

पण या अतृप्तीतच भक्त तृप्तता मानतो. तो भगवद्विरहातही जेवढे सुख, जेवढा आनंद प्राप्त करून घेतो, विषयी पुरुषाला विश्वातील सर्व विषयभोग प्राप्त झाले तरी तो आनंद, ती तृप्ती लाभणार नाही. या प्रेमी व्यक्तीचे संयोगातही वियोगोपलालन असते तर, वियोगातही संयोगच असतो. म्हणून त्याची तृप्ती अखंड आहे. जोपावेतो जगातील पदार्थांना ईश्वरलीलेहून भिन्न अशी पृथक सत्ता मानली जाते, तोपावेतोच त्यांना सुखप्रद किंवा दुःखप्रद मानून मनुष्य निरंतर नवीन नवीन सुखप्रद विषयाची इच्छा करीत अतृप्त राहतो. जेव्हा सर्वांचे मूल, सर्वांचे यथार्थ पूर्ण स्वरूप त्या प्रेमी मानवाला प्राप्त होते, तेव्हा या अपूर्ण पदार्थाकडे त्याचे मन जात नाही व तो पूर्णत्वास प्राप्त होऊन तृप्त होतो. श्रीएकनाथ महाराज म्हणतात.
भक्तीपाशी नित्यतृप्ती । भक्तीपाशी नित्यमुक्ति ।
भक्तीपाशी भगवत्प्राप्ति । माया निवृत्ति हरिभजने ॥ ६२० ॥ - नाथभागवत, अ. ३

सूत्रात 'यल्लब्ध्वा पुमान्सिद्धोभवति अमृतोभवति तृप्तोभवति असा 'भवति' शब्द तीन वेळा का आला ? 'यल्लब्ध्वा पुमान्सिद्धो ऽ मृतो तृप्तो भवति' असेही सूत्र होऊ शकले असते, अशी कोणी शंका करील. त्याचे उत्तर असे की, जर वरीलप्रमाणे एकवेळाच शेवटी 'भवति' असे म्हटले असते तर या फलाचा पूर्वापरभाव सिद्ध झाला नसता, तर त्यात समुच्चयार्थ आला असता. तसेच 'सिद्धोभवति' 'अमृतोभवति, 'तृप्तोभवति' अशी तीन सूत्रे वेगळी केली असती तर, त्यात उत्तरोत्तर अमृत व तृप्ती यांना गौणत्व आले असते व मुख्य सूत्र 'सिद्धोभवति' हे झाले असते. वास्तविक सिद्धी, अमृतत्व, तृप्ती यात एकत्व असूनही सूत्रातील क्रमामुळे येथे सिद्धीपेक्षा अमृतत्व, त्यापेक्षा तृप्ती हे येथे मुख्य आहे. यामुळे एका सूत्रात तीनवेळा, 'भवति' शब्द आणावा लागला आहे.

चौथ्या सूत्रात प्रेमभक्तिलाभाचे विधायक लक्षण सांगितल्यावर पुढील पाचव्या सूत्रात निषेधक लक्षण सांगतात.


GO TOP