नारद भक्तिसूत्रे
सात्वस्मिन्परमप्रेमरूपा ॥ २ ॥
सा - ती (भक्ती), अस्मिन् - या, प्रत्यक्ष नित्यअपरोक्ष परमात्म स्वरूपाचे ठिकाणी, परमप्रेमरूपा - म्हणजे परमप्रेम असणे हेच तिचे स्वरूप (अशी आहे).
विवरण : यद्यपि पुराणादिकांतून आगम ग्रंथातून भक्तीचे अनेक प्रकार सांगितले गेले तरी ते शरीर किंवा मानस क्रियात्मक होत, त्यात क्रियेला प्राधान्य प्राप्त होतें. संसारामध्ये क्रियाप्रधानता असते. एखादा पाहुणा घरी आला असता मनातून त्याच्यावर प्रेम नसले तरी योग्य प्रकारे आदर दाखविला, त्याला सर्व साधने पुरविली की तो संतुष्ट होतो. पण परमात्मा केवळ बाह्य उपचार किंवा क्रियेने संतुष्ट होत नाही. तो अवाप्तकाम आहे, तो पूर्ण आनंदमय आहे. श्रीकृष्णभगवान अर्जुनास सांगतात,
अर्जुना माझा ठायी । आपणपेनवीण सौरसु नाही ॥
मी उपचारी कवणाही । नाकळे गा ॥ ज्ञा. ९-३६७ ॥
येर पत्र पुष्पफळ । हे भजावया मिस केवळ ।
वांचूनि आमुचालाग निष्कळ । भक्तितत्त्व ॥ ज्ञा. ९-३९५ ॥
उपचार किंवा क्रिया भक्तीत नको किंवा नसते असे नाही, पण त्याच्या मुळाशी जे प्रेम, जो भाव असतो त्याला महत्त्व आहे. तसेच ते प्रेमही सामान्य असून भागत नाही तर परमप्रेम पाहिजे. म्हणून नारद 'सात्वस्मिन्परमप्रेमरूपा' असे लक्षण सांगतात. शास्त्रात एखाद्या महत्त्वाच्या साधनाची दोन प्रकारची लक्षणे सांगितली जातात. १ बहिरंग व २ अंतरंग. इतरत्र पुराणादिकांत जी क्रियात्मक लक्षणे सांगितली आहेत ती लक्षणे नाहीत असे नाही, पण ती बहिरंग होतील. अंतरंग लक्षणामुळे बहिरंगाला महत्त्व येते. जर मुळात प्रेम असेल तरच श्रवण अर्चन वंदन इत्यादी क्रियांना भक्तीमध्ये बहिरंग स्वरूपाने का होईना स्थान मिळेल. नसता सर्व व्यर्थ. श्रीभगवान कृष्ण म्हणतात, एक भाव नाही माझा । तरी पाल्हाळ ते ॥ ज्ञा. ९-४३२.
शून्याला गणितात मूल्य प्राप्त होते, पण त्याचे मागे जर एखादा अंक असेल तर, नसता ते व्यर्थ होते. तसे भक्तीच्या क्रियेत प्रेम मागच्या अंकासारखे आहे. प्रेम ही एक महत्त्वाची वृत्ती आहे तिला कोणी तरी विषय लागतो. म्हणजे कोणास तरी विषय करूनच प्रेम होऊ शकते. या सूत्रातील 'अस्मिन्' हे पद विषय दर्शविणारे आहे. येथे 'तस्मिन्' असे न म्हणता 'अस्मिन्' म्हटले आहे जो आपणाहून दूर परोक्ष असतो त्याला 'तो', 'त्याच्या ठिकाणी' असे म्हटले जाते, पण जो आपल्या नित्य सन्मुख, इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष, अपरोक्ष असतो त्याकरिता 'अस्मिन्' म्हणजे 'याच्या ठिकाणी' असा शब्दप्रयोग केला जातो. कोणी म्हणेल, 'अस्मिन्' = हा - असा सामान्य प्रयोग झाला. केवळ 'हा,' 'तो' म्हणण्याने एखाद्या वस्तूचा विशेष बोध होत नाही. तेथे नामरूपगुणादिकांनी युक्त विशेष स्वरूप सांगावे लागते. याचे उत्तर हे की बहुतेक भक्ती करणारे भज्य जो भगवान त्याला स्वहून भिन्न, परोक्ष, अशा रूपाने जाणूनच त्याची भक्ती करतात. पण तसा जर परोक्ष मानला तर तो परमप्रेमाचा विषयच होणार नाही. तसेच जो नित्य अपरोक्ष आहे त्याला परोक्ष भिन्न मानणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. वास्तविक देहादिक स्वहून भिन्न, परोक्ष, आहेत, पण जीव त्यांना स्वहून अभिन्न मानून तादात्म्याने व्यवहार करतो व या भ्रांतिजन्य तादात्म्यामुळेच ते प्रेमाचे विषय बनतात व ही भ्रांती त्या नित्य अपरोक्ष परमात्म्यास आवृत करते. म्हणून खरे प्रेम हे ज्यावर होते तो प्रत्यक्ष, अपरोक्ष, वाटला पाहिजे. सर्व भक्त भगवंताला अपरोक्ष, प्रत्यक्षच, मानतात. गोपिकांना देखील त्याचे अपरोक्ष ज्ञान होते हे नारदच पुढे सूत्रातून सांगणार आहेत. तो 'हा' विठ्ठल बरवा । तो 'हा' माधव बरावा ॥' 'तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेभरी' इ. श्रीज्ञानेश्वरमहाराजांची वचने प्रसिद्ध आहेत. परमात्मा हा सर्वांना नित्य अपरोक्ष आहे. इतकेच नव्हे, तो कधीच परोक्ष होत नाही. सांसारिक देहादि कधी परोक्ष तर कधी अपरोक्ष भासतात. तो परमात्मा तिन्ही अवस्थेत तिन्ही देहात असून सर्वांचा साक्षी आहे. श्रीज्ञानेश्वर महाराज 'ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।' गी. १८.६१.) या श्लोकावरील व्याख्यानात सांगतात-
सकळ भूतांच्या अंतरीं । हदयमहाअंबरीं ।
चिद्वृत्तीच्या सहस्रकरी । उदयला असे जो ॥ -ज्ञा. १८.१२९९.
म्हणून नारदांनी त्याला 'अस्मिन्' म्हटले आहे. भगवान भक्तइच्छेने सगुणसाकार जरी झाला, परोक्षाप्रमाणे जरी भासला तरी त्याचे अपरोक्षत्व बाधित होत नाही. कारण त्याही वेळी तो आवरणरहितच, संसारधर्माहून अलिप्तच असतो. म्हणूनच आणि आकारा आलिया जयाचे । निराकारपण न वचे ॥ ज्ञा. ८.१८० असे श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात. जर तो परोक्ष होईल तर परमप्रेमाचा विषय होणारच नाही.
तेथ प्रियाची परमसीमा । तो भेटे माऊली आत्मा ॥
तये खेवी आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥ - ज्ञा. १६.४४३.
असे श्रीज्ञानेश्वरमहाराज त्याचे लक्षणच एकप्रकारे सांगतात. अशा या नित्य अपरोक्ष परमात्म्यावर परमप्रेम असणे हीच भक्ती.
येथे सूत्रात 'तु' असे एक अव्यय वापरले आहे. सूत्राचे लक्षण करताना निरर्थक पद त्यात नसते असे मागे सांगितलेच आहे. 'तु' हे पद प्रेमाचे आलंबन असणाऱ्या अन्य वस्तूची म्हणजे अन्य प्रिय विषयाची व्यावृत्ती करणारे आहे. अपरोक्ष परमात्म्याहून अन्य जे प्रेमाचे विषय होतात त्यांच्या प्रेमाला भक्ती म्हटली जात नाही किंवा म्हणू नये, असा त्यातून अर्थ निष्पन्न होतो.
नित्य अपरोक्ष अहंप्रत्ययवाच्य आत्म्याचे प्रेम असणे म्हणजे भक्ती, असे भक्तीचे लक्षण केले तर, कोणी म्हणेल, असे प्रेम तर आपल्या अपरोक्ष आत्म्यावर सर्वांचे असतेच. श्रीविद्यारण्यस्वामी पंचदशीत म्हणतात,
इथं आत्मा परानंद परप्रेमास्पंदं यतः
मानभूव हि भूयासमिति प्रेमात्मनीक्ष्यते ॥
तत्प्रेमात्मार्थमन्यत्र नैषमन्यार्थमात्मनि, ।
अतस्तत्परमं ते न परमानंदतात्मनः ॥ पंचदशी १
ही आत्मरूप संवित परानंदरूप आहे. कारण तीच परमप्रेमास्पद आहे. म्हणून मी नसावे असे कोणास वाटत नाही तर मी अखंड असावे असेच वाटते; हेच आत्मप्रेम होय. जीव आत्म्यावर प्रेम करतो ते अन्याकरिता नसते पण अन्यावर जे प्रेम करतो ते आत्म्याकरिताच असते म्हणून आत्माच परमश्रेष्ठ आनंदस्वरूप आहे.
तसेच बृहदारण्य उपनिषदामध्ये याज्ञवल्यमुनींनी या विषयाचा विस्तृत विचार व ऊहापोह अनेक उपत्तींनी केला आहे. ते म्हणतात, ( न वा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति । आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति ।) मनुष्य सर्वांवर जे प्रेम करतो ते सर्वांकरिता नाही. इतर सर्व प्रेमाचे शेष (अंग) आहेत. आत्म्याच्या अपेक्षेनेच सर्व प्रिय वाटते. म्हणजेच आत्मा हाच प्रेमाचा शेषी (अंगी) - प्रमुख विषय आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराजही सांगतात,
आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जे प्रियोत्तमा ।
तें दुजे नव्हे की आत्मा । ऐसेंचि जाणावे ॥ ज्ञा. १८.१३४१
इत्यादी प्रमाणांवरून अपरोक्ष आत्मा प्रेमास्पद आहे हे सिद्ध झाले. म्हणजे सर्वांच्या परमप्रेमाचा विषय तो आहे, असे जरी आहे तरी हे शास्त्रात मानले जाते. अपरोक्ष आत्म्यावर प्रेम असते हे मानले तरी ते ज्ञान सर्वांचे भ्रमस्वरूप आहे, कारण आत्म्याचा आत्मत्वाने तर नाहीच मग परमात्मस्वरूपाने बोध सर्वांना कसा राहणार ? अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी देहेंद्रियादिकांचा व त्याच्या धर्माचा आरोप केला जातो ' देहखडा नाम आत्मा ॥ आत्मा तव म्हणिजे । देहासीचि ॥ ' (ज्ञा.) असाच बोध असतो हे सर्वांच्या अनुभवावरून सिद्ध होते. त्यामुळे ते आत्मप्रेमही देहादि अनात्म तत्त्वावरच केले जाते. देहादिक व त्याचे धर्म तसेच इंद्रियादि पंचविषय हे सर्व व्यभिचारी, दोषवान असतात. म्हणून त्याच्यावर केलेले प्रेम तेही व्यभिचारी, सदोष बाधकच असते. त्यास प्रेमही म्हणता येत नाही. खरे प्रेम हे एक-आलंबनात्मक असते. त्यास अनेक विषय खपत नाहीत. खरा प्रेमी नित्य अपरोक्ष, अव्यभिचारी, सर्व अवस्थांचा साक्षी एक परमात्मा श्रीहरीच आहे, अन्य सर्व तुच्छ आहे, कारण अन्य सर्व क्षयातिशय दोषस्वरूप असत् जड, दुःख-स्वभाववान् आहे. ते अहंप्रत्ययाचा विषय होत नाही, ते नित्यपरोक्षच असते. तेथे भ्रांतीने अपरोक्षत्व प्रतीत होते. खऱ्या भक्ताची भूमिका 'तेथे बोला कैची उरी । माझे मीपण झाला हरी ॥' (तु.) ही असते. नित्यप्रत्यक्ष अस्मत्प्रत्ययविषय परमात्माच आहे, हे जाणून त्याच्यावर प्रेम करणे ही भक्ती होय.
पुढे प्रेमाचे विशेषण 'परम' असे केले आहे. त्याचे कारण
देखे मनुष्यात सकळ । हे स्वभावता भजनशीळ ।
झाले असे केवळ । माझा ठायी ॥ -ज्ञा. ४-६७
असे श्रीकृष्ण भगवान म्हणतात. भक्ती करणे हा जीवाचा स्वभाव आहे. कारण जीव स्वतः अपूर्ण आहे. ज्या अंशातील अपूर्णता ज्याच्याकडून नष्ट होईल त्याची भक्ती जीव करीत असतो. त्यात कामना, गुण, विकार, अज्ञान, मोह, भेदबुद्धी इ. सर्वांचे मिश्रण असते. जरी ईश्वरभाव सामान्यत्वाने भासत असला व मनोकामना पूर्तीकरिता अल्पभावनेने, श्रद्धेने, पूजा-अर्चा इत्यादी काही क्रिया होत असल्या, तरी त्या खऱ्या भक्तीच्या लक्षणात समाविष्ट होत नाहीत. शास्त्रामध्ये भक्तीचे विविध प्रकार वर्णिले आहेत. अर्थार्थी, आर्त, यांनाही भक्त म्हटले आहे. भागवतामध्ये सात्विकी, राजसी, तामसी असेही भक्तीचे प्रकार सांगितले आहेत. कोठे कोठे उत्तम, मध्यम, अधम असे भेद कल्पिलेआहेत. ' भक्तिरसामृतसिंधू' नावाच्या भक्तिशास्त्रावरील महत्त्वाच्या ग्रंथात रूपगोस्वामी यांनी साधनभक्ती, भावभक्ती प्रेमभक्ती असे तीन प्रकार सांगितले आहेत. तसेच वैधी, रागानुगा असे दोन प्रकारही स्पष्ट केले आहेत. नारदांनीही पुढे गौणी भक्ती सांगून तिचे तीन प्रकार सांगितले आहेत. पण खरी भक्ती म्हणजे ' परमप्रेमरूपा' हीच होय. श्रीशांडिल्य महर्षींनीही आपल्या भक्तिसूत्रात "सा परानुरक्तिरीश्वरे" - शां. भ. सू. २ असे परा अनुरक्ति (प्रीती) हेच लक्षण केले आहे. नारदपांचरात्रातही असेच भक्तीचे लक्षण सांगितले आहे.
अनन्य ममता विष्णौ ममता प्रेमसंगता ।
भक्तिरित्युच्यते भीष्म प्रल्हादोद्धवनारदैः ॥ नारदपांचरात्र
'भगवान महाविष्णूच्या ठिकाणी प्रेमयुक्त अनन्यममत्व म्हणजेच भक्ती असे भीष्म, प्रल्हाद, उद्धव, नारद म्हणतात.'
भक्तश्रेष्ठ श्रीनामदेव महाराज अशा प्रेमालाच भक्ती म्हणतात.
सर्वांहुनि निराळा रजतमा वेगळा । भोगी प्रेमकळा तेचि भक्ति ॥
'प्री' धातूपासून प्रेम शब्द बनतो. या 'प्री' धातूचे गणभेदाने तीन प्रकारचे पाठ सिद्ध होतात. 'प्रीङ् प्रीतौ' (दिवादि), 'प्रीञ् तर्पणे कान्तौच' (क्र्यादि), 'प्रीञ् तर्पणे' (चूरादि) याचौ पाणिनीय व्याकरणानुसार लट् लकाराची प्रथम- पुरुष एकवचनाची सर्व मिळून सात प्रकारची रूपे होतात. प्रीयते, प्रीणाति, प्रीणीते प्रीणयति, प्राययति, प्रयति व प्रयते. 'प्रियस्थभावः प्रेम अथवा प्रेमा । परमः प्रेमारूपं यस्याः सा परमप्रेमरूपा' प्रियत्वाचा जो भाव (अस्तित्व) ते प्रेम परम प्रेम आहे स्वरूप जिचे ती परमप्रेमरूपा भक्ती होय.
प्रेम्णस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैः ॥ भ.र.सि.
' प्रेमाच्या प्रथमावस्थेसच ज्ञाते लोक भाव असे म्हणतात.' कित्येक ठिकाणी भाव, प्रेम, भक्ती हे शब्द एकाच अर्थाने घेतलेले सापडतात, पण भक्तिशास्त्रकारांनी याच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत. भाव ही प्रेमाची प्रथम अवस्था व प्रेम ही भावाची परिणत स्थिती आहे अशी ' भक्तिरसामृतसिंधू' मध्ये भाव व प्रेम यांची व्याख्या केली आहे.
शूद्धसत्त्वविशेषात्मा प्रेमसूर्याशुसाम्यभाक् ।
रुचिभिश्चित्त मासृण्य कृदसौभाव उच्यते ॥ भ. र. सि.
रजतममिश्रणरहित शुद्धसत्वगुणात्मक अंतःकरणात प्रेमरूपी सूर्याच्या किरणाप्रमाणे असणारी व भगवद्रुचीमुळे चित्ताची होणारी जी द्रवावस्था तिला भाव म्हणतात.
ही झाली भावाची व्याख्या यानंतर ते प्रेमाची व्याख्या करतात.
सम्यङ्सृणितः स्वान्तो ममत्वातिशयाङ्कितः ।
भावः स एव सान्द्रात्मा बुधैः प्रेमा निगद्यते ॥ ४-१
'योग्य रूपाने जे हृदय स्निग्धत्वाला प्राप्त झाले आहे, व भगवंताविषयी अतिशय ममत्व ज्यात निर्माण झाले आहे, असा जो अंतःकरणातील पूर्णभाव त्यासच प्रेम म्हटले जाते.'
म्हणून भावभक्ति व प्रेमभक्ती असे दोन प्रकार भक्तीचे पडतात. महाराष्ट्रातील संताच्या ग्रंथांतून मात्र भाव व प्रेम हे पर्यायच मानलेले दिसतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति ।
बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ ज्ञानेश्वर हरिपाठ ४
श्री एकनाथ महाराज म्हणतात-
शुद्ध भावेवीण जे भक्ती । तेचि दांभिक जाण निश्चती ।
ते अपक्वचि राहे प्राप्ती । जेवी कांकड जाती मुगांची ॥ ना. भा. २४-४१८
भक्ति नामाचा इत्यर्थ । माझे स्वरूपीं निज भावार्थ ।
येणेचि लाभे परमार्थ । सुफळ शास्त्रार्थ या नांव ॥ ना. भा. २५-४४९
असे श्रीकृष्ण उद्धवास स्पष्ट सांगतात.
या सूत्रात 'परमप्रेमरूपा' असे पद आहे. प्रेमास परम हे विशेषण दिले आहे. विशेषण हे व्यावर्तक असते. परम प्रेम म्हणण्याने अन्य सामान्य प्रेमाची व्यावृत्ति होते. यावरून प्रेमातही काही प्रकार आहेत की काय असे वाटते.
याचा विचार श्रीएकनाथ महाराजानी आपल्या एकादशस्कंधावरीरू टीकेत विस्तृत रूपाने केला आहे, तेथे प्रेमाचे लौकिक दृष्ट्या सात्त्विक, राजस, तामस व शुद्ध सात्त्विक असे भेद केले आहेत.
श्रवणीं ध्यानीं हे अवगुण । तैसाचि त्रिविध प्रेमा जाण ।
तो वोळखती विचक्षण । ऐक लक्षण सांगेन ॥१२॥
महावीरांचें शौर्यपण । ऐकोनि युद्ध दारुण ।
अत्यंत हरिखें उल्हासे मन । तो प्रेमा जाण राजस ॥१३॥
दुःखशोकांची अवस्था । कां गेल्यामेल्यांची वार्ता ।
अत्यंत विलापाची कथा । ज्यासी ऐकतां न संठे ॥१४॥
नेत्रीं अश्रूंचिया धारा । स्फुंदनें कांपे थरथरां ।
प्रेमविलाप अवसरां । तो जाण खरा तामसू ॥१५॥
सगुणमूर्तीची संपदा । शंख चक्र पद्म गदा ।
पीतांबरधारी गोविंदा । ऐकोनि आनंदा जो भरे ॥१६॥
नेत्रीं आनंदजीवन । हृदयीं न संठें स्फुंदन ।
कृष्णमय जालें मन । तो प्रेमा जाण सात्त्विक ॥१७॥
यावरी जो प्रेमा चौथा । अतर्क्य तर्केना सर्वथा ।
उद्धवा तूं मजलागीं पढियंता । तोही आतां सांगेन ॥१८॥
तुझ्या भावार्थाची अवस्था मोठी । ते बोलविते गुह्य गोठी ।
तुजवेगळा पाहतां दृष्टी । अधिकारी सृष्टी दिसेना ॥१९॥
श्रीकृष्ण म्हणे सावधान । ऐकोनि निर्गुणश्रवण ।
ज्याचें चिन्मात्रीं बुडे मन । उन्मज्जन होऊं नेणे ॥७२०॥
जेवीं कां सैंधवाचा खडा । पडला सिंधूमाजिवडा ।
तो झाला सिंधूचियेवढा । तेवीं तो धडफुडा ब्रह्म होय ॥२१॥
चित्तचैतन्यां पडतां मिठी । सुटतां लिंगदेहाची गांठी ।
नेत्रीं अश्रूंचा पूर दाटी । रोमांच उठी सर्वांगीं ॥२२॥
जीवभावाची दशा आटे । अनिवार बाष्प कंठीं दाटे ।
कांहीं केल्या शब्द न फुटे । पूरु लोटे स्वेदाचा ॥२३॥
नेत्र झाले उन्मीलित । पुंजाळले जेथींचे तेथ ।
विस्मयाचें भरतें येत । वोसंडत स्वानंदें ॥२४॥
हा जाण पां प्रेमा चौथा । उत्तम भागवत अवस्था ।
तुज म्यां सांगीतली तत्त्वतां । इचा जाणता मी एकू ॥२५॥
निर्गुणीं जो प्रेमा जाण । तें शोधितसत्त्वाचें लक्षण ।
हे मी जाणें उणखूण । कां ब्रह्मसंपन्न जाणती ॥२६॥ नाथ भागवत ११-७१२ ते ७२६
भगवदवतारचरित्र श्रवणातून श्रोत्याच्या अधिकाराप्रमाणे गुणात्मक व निर्गुण प्रेम निर्माण होते, असे वरील प्रमाणावरून दिसते. श्री नारद ऋषी आपल्या परमप्रेमाचे विस्तृत लक्षण पुढे चौपन्नाव्या सूत्रात विशद करणारच आहेत, तेथे त्याचा अधिक विचार करू.
GO TOP
|