श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
पञ्चदशोऽध्यायः


आदित्यस्य वंशानुकीर्तनम् -

जनमेजय उवाच
सगरस्यात्मजा वीराः कथं जाता महात्मनः ।
विक्रान्ताः षष्टिसाहस्रा विधिना केन वा द्विज ॥ १ ॥
वैशम्पायन उवाच
द्वे भार्ये सगरस्यास्तां तपसा दग्धकिल्बिषे ।
ज्येष्ठा विदर्भदुहिता केशिनी नाम विश्रुता ॥ २ ॥
कनीयसी तु या तस्य पत्नी परमधर्मिणी ।
अरिष्टनेमिदुहिता रूपेणाप्रतिमा भुवि ॥ ३ ॥
और्वस्ताभ्यां वरं प्रादात् तं निबोध जनाधिप ।
षष्ठिं पुत्रसहस्राणि गृह्णात्वेका तपस्विनी ॥ ४ ॥
एकं वंशधरं त्वेका यथेष्टं वरयत्विति ।
तत्रैका जगृहे पुत्राँल्लुब्धा शूरान् बहूंस्तथा ॥ ५ ॥
एकं वंशधरं त्वेका तथेत्याह च तां मुनिः ।
केशिन्यसूत सगरादसमञ्जसमात्मजम् ॥ ६ ॥
राजा पञ्चजनो नाम बभूव सुमहाबलः ।
इतरा सुषुवे तुम्बीं बीजपूर्णामिति श्रुतिः ॥ ७ ॥
तत्र षष्ठिसहस्राणि गर्भास्ते तिलसम्मिताः ।
सम्बभूवुर्यथाकालं ववृधुश्च यथाक्रमम् ॥ ८ ॥
घृतपूर्णेषु कुम्भेषु तान् गर्भान् निदधे पिता ।
धात्रीश्चैकैकशः प्रादात् तावतीरेव पोषणे ॥ ९ ॥
ततो दशसु मासेषु समुत्तस्थुर्यथासुखम् ।
कुमारास्ते यथाकालं सगरप्रीतिवर्धनाः ॥ १० ॥
षष्टिः पुत्रसहस्राणि तस्यैवमभवन् नृप ।
गर्भादलाबुमध्याद् वै जातानि पृथिवीपते ॥ ११ ॥
तेषां नारायणं तेजः प्रविष्टानां महात्मनाम् ।
एकः पञ्चजनो नाम पुत्रो राजा बभूव ह ॥ १२ ॥
सुतः पञ्चजनस्यासीदंशुमान् नाम वीर्यवान् ।
दिलीपस्तनयस्तस्य खट्वाङ्ग इति विश्रुतः ॥ १३ ॥
येन स्वर्गादिहागत्य मुहूर्तं प्राप्य जीवितम् ।
त्रयोऽनुसन्धिता लोका बुद्ध्या सत्येन चानघ ॥ १४ ॥
दिलीपस्य तु दायादो महाराजो भगीरथः ।
यः स गङ्गां सरिच्छ्रेष्ठामवातारयत प्रभुः ॥ १५ ॥
कीर्तिमान् स महाभागः शक्रतुल्यपराक्रमः ।
समुद्रमानयच्चैनां दुहितृत्वेन कल्पयत् ।
तस्माद् भागीरथी गङ्गा कथ्यते वंशचिन्तकैः ॥ १६ ॥
भगीरथसुतो राजा श्रुत इत्यभिविश्रुतः ।
नाभागस्तु श्रुतस्यासीत् पुत्रः परमधार्मिकः ॥ १७ ॥
अम्बरीषस्तु नाभागिः सिन्धुद्वीपपिताभवत् ।
अयुताजित् तु दायादः सिन्धुद्वीपस्य वीर्यवान् ॥ १८ ॥
अयुताजित्सुतस्त्वासीदृतुपर्णो महायशाः ।
दिव्याक्षहृदयज्ञो वै राजा नलसखो बली ॥ १९ ॥
ऋतुपर्णसुतस्त्वासीदार्तुपर्णिर्महीपतिः ।
सुदासस्तस्य तनयो राजा त्विन्द्रसखोऽभवत् ॥ २० ॥
सुदासस्य सुतस्त्वासीत् सौदासो नाम पार्थिवः ।
ख्यातः कल्माषपादो वै नाम्ना मित्रसहस्तथा ॥ २१ ॥
कल्माषपादस्य सुतः सर्वकर्मेति विश्रुतः ।
अनरण्यस्तु पुत्रोऽभूद् विश्रुतः सर्वकर्मणः ॥ २२ ॥
अनरण्यसुतो निघ्नो निघ्नपुत्रौ बभूवतुः ।
अनिमित्रो रघुश्चैव पार्थिवर्षभ सत्तमौ ॥ २३ ॥
अनमित्रस्य धर्मात्मा विद्वान्दुलिदुहोऽभवत् ।
दिलीपस्तनयस्तस्य रामप्रप्रपितामहः ॥ २४ ॥
दीर्घबाहुर्दिलीपस्य रघुर्नाम्नाभवत्सुतः ।
अयोध्यायां महाराजो रघुश्चासीन्महाबलः ॥ २५ ॥
अजस्तु रघुतो जज्ञे अजाद् दशरथोऽभवत् ।
रामो दशरताज्जज्ञे धर्मात्मा सुमहायशाः ॥ २६ ॥
रामस्य तनयो जज्ञे कुश इत्यभिविश्रुतः ।
अतिथिस्तु कुशाज्जज्ञे निषधस्तस्य चात्मजः ॥ २७ ॥
निषधस्य नलः पुत्रो नभः पुत्रो नलस्य तु ।
नभस्य पुण्डरीकस्तु क्षेमधन्वा ततः स्मृतः ॥ २८ ॥
क्षेमधन्वसुतस्त्वासीद् देवानीकः प्रतापवान् ।
आसीदहीनगुर्नाम देवानीकसुतः प्रभुः ॥ २९ ॥
अहीनगोस्तु दायादः सुधन्वा नाम पार्थिवः ।
सुधन्वनः सुतश्चैव ततो जज्ञेऽनलो नृपः ॥ ३० ॥
उक्थो नाम स धर्मात्मानलपुत्रो बभूव ह ।
वज्रनाभः सुतस्तस्य उक्थस्य च महात्मनः ॥ ३१ ॥
शङ्खस्तस्य सुतो विद्वान् व्युषिताश्व इति श्रुतः ।
पुष्पस्तस्य सुतो विद्वानर्थसिद्धिस्तु तत्सुतः ॥ ३२ ॥
सुदर्शनः सुतस्तस्य अग्निवर्णः सुदर्शनात् ।
अग्निवर्णस्य शीघ्रस्तु शीघ्रस्य तु मरुः सुतः ॥ ३३ ॥
मरुस्तु योगमास्थाय कलापद्वीपमास्थितः ।
तस्यासीद् विश्रुतवतः पुत्रो राज बृहद्बलः ॥ ३४ ॥
नलौ द्वावेव विख्यातौ पुराणे भरतर्षभ ।
वीरसेनात्मजश्चैव यश्चेक्ष्वाकुकुलोद्वहः ॥ ३५ ॥
इक्ष्वाकुवंशप्रभवाः प्राधाण्येनेह कीर्तिताः ।
एते विवस्वतो वंशे राजानो भूरितेजसः ॥ ३६ ॥
पठन्सम्यगिमां सृष्टिमादित्यस्य विवस्वतः ।
श्राद्धदेवस्य देवस्य प्रजानां पुष्टिदस्य च ॥ ३७ ॥
प्रजावानेति सायुज्यमादित्यस्य विवस्वतः ।
विपाप्मा विरजाश्चैव आयुष्मांश्च भवत्युत ॥ ३८ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
आदित्यस्य वंशानुकीर्तनम् नाम पञ्चदशोऽध्यायः


सगरवंश चालू -

जनमेजय विचारतो - "हे वैशंपायना, सगराला शूर व पराक्रमी असे साठ हजार पुत्र झाले म्हणून आपण सांगितलें तर एकट्याला एवढी अतोनात संतति झाली तरी कशी ?"

वैशंपायन सांगतात - "हे राजा, तपाचरणानें ज्यांचीं पातके दग्ध झाली होतीं अशा दोन स्त्रिया सगराला होत्या. त्यांपैकीं वडील ही विदर्भराजाची कन्या असून केशिनी या नांवानें ती प्रख्यात होती. त्याची जी धाकटी स्त्री ती अरिष्टनेमी राजाची मुलगी असून ती अत्यंत धार्मिक होती, व रूपाने तर तिचे तोडीची दुसरी कोणी स्त्री पृथ्वींत नव्हती. हे जनपाला, और्वऋषीनें या दोन्ही स्त्रियांना वर मागायला सांगितले, ते असे - एकीनें साठ हजार पुत्र घ्यावे व एकीनें वंश धारण करील असा एकच पुत्र घ्यावा. या दोहोंपैकीं आपले इच्छेप्रमाणें दोहों वरातील कोणता तरी एक पत्करावा. असें और्वाने म्हटलें तेव्हां एक जी स्वभावाची लोभी होती ती म्हणाली, "मला आपले शूर असे साठ हजारच पुत्र पाहिजेत;" दुसरी म्हणाली, "ज्याचे योगाने हा वंश अखंड राहणार आहे, असला तो एकच पुत्र मला पुरे." यावर और्वमुनींनी तुमचे म्हणण्याप्रमाणें होईल, म्हणून त्यांना आशीर्वाद दिला. त्या गुणाने केशिनीला सगरापासून एकच पुत्र झाला. त्याचें नांव असमंजस असें ठेविले होतें.

हाच पुढें पंचजन नांवानें मोठा प्रख्यात बलाढय राजा झाला. दुसरी जी उरली, ती वियांनीं ठेंचलेला असा एक लांबचलांब दुधीभोपळा व्याली असें ऐकितों. या दुधीभोपळ्यांत तिळातिळाएवढे असे हे साठ हजार गर्भ होते. त्यांना सगराने वेगळे वेगळे करून तुपाचे मडक्यांत घालून ठेविले, व एकेका मडक्यावर एकेक याप्रकारे त्या गर्भांचे पोषणार्थ साठसहस्र दाया ठेविल्या. मग ते गर्भ वाढीस लागून क्रमाक्रमानें पूर्ण झाले, व दहा महिने भरतांच सर्व अवयव पूर्ण होऊन योग्य वेळीं घटांतून बाहेर आले. हे सर्वही दिसण्यांत मोठे फक्कड छोकरे होते व त्यांना पाहून सगरालाही प्रेमाचे मोठे भरते आलें. हे राजा, याप्रमाणे भोपळ्याचे रूपाने गर्भ प्रकट होऊन त्यांतून हे इतके साठ सहस्त्र पुत्र निपजले; आतां समजलास ?

परंतु, मागें सांगितल्याप्रमाणे हे कपिल-परमात्म्याच्या नेत्रतेजानें दग्ध झाले. तेव्हां केशिनीचा एकुलता एक जो असमंजस किंवा पंचजन तोच राजा झाला. या पंचजनाला अंशुमान नांवाचा वीर्यवान पुत्र झाला. याला पुढें दिलीप नामक पुत्र झाला; या दिलीपाची खट्वांग या नांवानेंच जास्ती प्रसिद्धी आहे. हा खट्वांग राजा स्वर्गांतून भूलोकीं आला व सूक्ष्मबुद्धि व ब्रह्मैक-भावना यांच्या बलाने चित्तैकाग्रय करून एका मुहूर्तांत स्वर्ग, मृत्यु, पाताल या तिन्ही लोकांचे ध्यानबलाने निरीक्षण करून हे सर्वही मिथ्या आहेत, खरें काय तें सर्व-व्यापि एक ब्रह्म आहे, असा निश्चय करून हा बुद्धिमान राजा एका मुहूर्ताचे अवकाशांत मुक्त झाला. या दिलीपाला भगीरथ नांवाचा पुत्र झाला. हा मोठा कीर्तिमान, भाग्यवान, समर्थ व पराक्रमानें केवळ इंद्रतुल्य होता; याने श्रीगंगेला स्वर्गातून भूलोकीं आणून सागरास मिळविले. या त्याच्या कृतीमुळे गंगा ही त्याची कन्या मानिली जाऊन त्या दिवसापासून तिला भागीरथी असें नांव वंशांचा इतिहास जाणणार्‍या ज्ञात्यांनीं दिले आहे. या भगीरथाला पुढें श्रुत नांवाचा पुत्र झाला. श्रुताला नाभाग नांवाचा मोठा धार्मिक पुत्र झाला, या नाभागाचे पोटीं अंबरीष जन्मला. हा अंबरीष सिंधुद्वीपाचा बाप झाला. सिंधुद्वीपाला पुढें अयुताजित नामक पुत्र झाला; या वीर्यवान अयुताजिताला ऋतुपर्ण नांवाचा मोठा यशस्वी मुलगा झाला. प्रसिद्ध नल राजाचा परममित्र व देवांच्या अक्षविद्येत म्हणजे फासे खेळण्यात निपुण म्हणून जो ऋतुपर्ण तोच हा. या बलाढय ऋतूपर्णाला आर्तपर्णि नांवाचा पुत्र झाला. याचा मुलगा सुदास नामक झाला; हा सुदास इंद्राचा मोठा दोस्त होता. सुदासाला पुढें सौदास नामें पुत्र झाला, या सौदासालाच मित्रसह व कल्माषपाद अशीही नांवे आहेत. या कल्माषपादाचा पुत्र सर्वकर्मा नांवानें विश्रुत आहे. सर्वकर्माला पुढें अनरण्य हा पुत्र झाला. अनरण्याचा पुत्र निघ्न. निघ्नाला अनमित्र व रघु असे दोन राजर्षिश्रेष्ठ पुत्र होते. पैकी अनमित्राला धर्मनिष्ठ व विद्वान असा दुलिदुह नामक पुत्र झाला; या दुलिदुहाचा पुत्र दिलीप, हाच प्रसिद्ध श्रीरामचंद्राचा निपणजा. दिलीपाला रघु नांवाचा दीर्घबाहु पुत्र झाला; हा रघु मोठा बलाढय असून अयोध्येचा राजा झाला; रघूपासून अज झाला, अजापासून दशरथ, दशरथाचे पोटीं महायशस्वी धर्ममूर्ति श्रीरामचंद्र अवतरला; रामाला पुढें कुश पुत्र झाला. कुशापासून अतिथी, अतिथीपासून निषध, निषधाचा नल, नलाचा नभ, नभाचा पुंडरीक, त्याचे पुढें क्षेमधन्वा, क्षेमधन्व्याला प्रतापी देवानीक व देवानीकाला अहीनगु नामक बलाढय पुत्र झाला. या अहीनगूचा पुत्र सुधन्वा, सुधन्व्याचा अनल, अनलाचा धर्मनिष्ठ उक्थ. या उक्थाचा पुत्र वज्रनाभ, वज्रनाभाचा शंख. या शंखालाच ध्युषिताश्व अशी संज्ञा आहे. याचा पुत्र पुष्प, त्याचा अर्थसिद्धि, अर्थसिद्धीचा सुदर्शन, सुदर्शनापासून अग्निवर्ण, अग्निवर्णाला शीघ्र नामक पुत्र झाला. शीघ्राचा पुत्र मरु. हा मरु योगाभ्यासांत निमग्न होऊन कलापसंज्ञक द्वीपांत जाऊन राहिला. या मरूचा पुत्र सुप्रसिद्ध राजा बृहद्वल.

हे राजा, पुराणांत नल या नांवानें दोन राजे प्रसिद्ध आहेत. यांतील एक नल वीरसेनाचा पुत्र, व दुसरा नल तो इक्ष्वाकूचा वंश वाढविणारा. हे राजा, याप्रमाणे इक्ष्वाकु वंशातले राजे प्राधान्यतः तुला सांगितले. विवस्वान जो सूर्य त्याचे वंशांत हे अति तेजस्वी राजे होऊन गेले. प्रजेला पुष्टि देणारा जो भगवान् सूर्य त्याचा पुत्र जो वैवस्वत मनु ज्याला श्राद्धदेव असें म्हणतात, त्याची ही वंशावळ जो कोणी लक्षपूर्वक पठण करील त्याला संतति होऊन अंती विवस्वान जो सूर्य त्याच्या रूपाला तो मिळेल; तसाच इहलोकींही तो निष्पाप सत्त्वसंपन्न व दीर्घायु होईल."


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
आदित्यस्य वंशानुकीर्तनं नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP