श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
चतुर्दशोऽध्यायः


सगरोत्पत्तिः -

जनमेजय उवाच
कथं स सगरो जातो गरेणैव सहाच्युतः ।
किमर्थं च शकादीनां क्ष्हत्रियाणां महौजसाम् ॥ १ ॥
धर्मं कुलोचितं क्रुद्धो राजा निरसदच्युतः ।
एतन्मे सर्वमाचक्ष्व विस्तरेण तपोधन ॥ २ ॥
वैशम्पायन उवाच
बाहोर्व्यसनिनस्तात हृतं राज्यमभूत् किल ।
हैहयैस्तालजङ्घैश्च शकैः सार्धं विशाम्पते ॥ ३ ॥
यवनाः पारदाश्चैव काम्बोजाः पह्लवाः खसाः ।
एते ह्यपि गणाः पञ्च हैहयार्थे पराक्रमम् ॥ ४ ॥
हृतराज्यस्तदा राजा स वै बाहुर्वनं ययौ ।
पत्न्या चानुगतो दुःखी वने प्राणानवासृजत् ॥ ५ ॥
पत्नी तु यादवी तस्य सगर्भा पृष्ठतोऽन्वगात् ।
सपत्न्या च गरस्तस्यै दत्तः पूर्वमभूत् किल ॥ ६ ॥
सा तु भर्तुश्चितां कृत्वा वने तामध्यरोहत ।
और्वस्तां भार्गवस्तात कारुण्यात् समवारयत् ॥ ७ ॥
तस्याश्रमे च तं गर्भं गरेणैव सहाच्युतम् ।
व्यजायत महाबाहुं सगरं नाम पार्थिवम् ॥ ८ ॥
और्वस्तु जातकर्मादि तस्य कृत्वा महात्मनः ।
अध्याप्य वेदशास्त्राणि ततोऽस्त्रं प्रत्यपादयत् ॥ ९ ॥
आग्नेयं तु महाघोरममरैरपि दुःसहम् ।
स तेनास्त्रबलेनाजौ बलेन च समन्वितः ॥ १० ॥
हैहयान्निजघानाशु क्रुद्धो रुद्रः पशूनिव ।
आजहार च लोकेषु कीर्तिं कीर्तिमतां वरः ॥ ११ ॥
ततः शकान् सयवनान् काम्बोजान् पारदांस्तदा ।
पह्लवांश्चैव निःशेषान् कर्तुं व्यवसितस्तदा ॥ १२ ॥
ते वध्यमाना वीरेण सगरेण महात्मना ।
वसिष्ठं शरणं गत्वा प्रणिपेतुर्मनीषिणम् ॥ १३ ॥
वसिष्ठस्त्वथ तान् दृष्ट्वा समयेन महाद्युतिः ।
सगरं वारयामास तेषां दत्त्वाभयं तदा ॥ १४ ॥
सगरः स्वां प्रतिज्ञां च गुरोर्वाक्यं निशम्य च ।
धर्मं जघान तेषां वै वेषान्यत्वं चकार ह ॥ १५ ॥
अर्द्धं शकानां शिरसो मुण्डं कृत्वा व्यसर्जयत् ।
यवनानां शिरः सर्वं काम्बोजानां तथैव च ॥ १६ ॥
पारदा मुक्तकेशाश्च पह्लवाः श्मश्रुधारिणः ।
निःस्वाध्यायवषट्काराः कृतास्तेन महात्मना ॥ १७ ॥
शका यवनकाम्बोजाः पारदाश्च विशाम्पते ।
कोलिसर्पाः समहिषा दार्द्याश्चोलाः सकेरलाः ॥ १८ ॥
सर्वे ते क्षत्रियास्तात धर्मस्तेषां निराकृतः ।
वसिष्ठवचनाद् राजन् सगरेण महात्मना ॥ १९ ॥
खसांस्तु पारांश्चोलांश्च मद्रान् किष्किन्धकांस्तथा ।
कौन्तलांश्च तथा वङ्गान् साल्वान् कौङ्कणकांस्तथा ॥ २० ॥
स धर्मविजयी राजा विजित्येमां वसुन्धराम् ।
अश्वं वै प्रेरयामास वाजिमेधाय दीक्षितः ॥ २१ ॥
तस्य चारयतः सोऽश्वः समुद्रे पूर्वदक्षिणे ।
वेलासमीपेऽपहृतो भूमिं चैव प्रवेशितः ॥ २२ ॥
स तं देशं तदा पुत्रैः खानयामास पार्थिवः ।
आसेदुस्ते ततस्तत्र खन्यमाने महार्णवे ॥ २३ ॥
तमादिपुरुषं देवं हरिं कृष्णं प्रजापतिम् ।
विष्णुं कपिलरूपेण स्वपन्तं पुरुषोत्तमम् ॥ २४ ॥
तस्य चक्षुःसमुत्थेन तेजसा प्रतिबुध्यतः ।
दग्धास्ते वै महाराज चत्वारस्त्ववशेषिताः ॥ २५ ॥
बर्हकेतुः सुकेतुश्च तथा धर्मरथो नृपः ।
शूरः पञ्चजनश्चैव तस्य वंशकरो नृपः ॥ २६ ॥
प्रादाच्च तस्मै भगवान् हरिर्नारायणो वरान् ।
अक्षयं वंशमिक्ष्वाकोः कीर्तिं चाप्यनिवर्तनीम् ॥ २७ ॥
पुत्रं समुद्रं च विभुः स्वर्गवासं तथाक्षयम् ।
पुत्राणां चाक्षयाँलोकाँस्तस्य ये चक्षुषा हताः ॥ २८ ॥
समुद्रश्चार्घ्यमादाय ववन्दे तं महीपतिम् ।
सागरत्वं च लेभे स कर्मणा तेन तस्य वै ॥ २९ ॥
तं चाश्वमेधिकं सोऽश्वं समुद्रादुपलब्धवान् ।
आजहाराश्वमेधानां शतं स सुमहायशाः ।
पुत्राणां च सहस्राणि षष्ठिस्तस्येति नः श्रुतम् ॥ ३० ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
सगरोत्पत्तिर्नाम चतुर्दशोऽध्यायः


सगरोत्पत्तिवर्णन -

जनमेजय विचारतो - "हे तपोधना, उदरांत विष गेलें असतां तो सगर त्या विषासह सजीव कसा जन्मला ? शकादिक हे क्षत्रिय असतांना व सगर हाही धर्मनिष्ठ असतांना त्यानें क्रोधावेशाने त्या क्षत्रियांचा धर्म म्हणजे एक प्रकारे स्वधर्मच उच्छिन्न केला हें कसें ? तें सर्व सविस्तर मला सांगा."

वैशंपायन सांगतात - "सगराचा बाप बाहू राजा हा फार व्यसनी निघाल्यामुळे, हे राजा, शकांच्या साहाय्याने हैहय व तालजंघ यांनी त्याचें राज्य हरण केलें. या कामांत यवन, पारद, कांबोज, पल्हव व खस, याही पांच गणांनीं हैहयाच्या साह्यार्थ शिपाईगिरी केली होती. राज्य हिरावल्यामुळे बाहूराजा रानांत चालता झाला. पाठोपाठ त्याची यादवी नांवाची गरोदर स्त्रीही चालत आली. हिला तिचे सवतीने ती बाहेर पडण्याच्या अगोदरच विष घातले होतें. ती पाठोपाठ आलेली पाहून राजाला अधिकच दुःख झाले; व त्या दुःखात त्यानें प्राण सोडिले. तेव्हां देवी त्या वनांत भर्त्याची चिता रचून आपण चितेवर चढली. इतक्यांत भृगुकुलोत्पन्न और्वऋषि यांना दया येऊन त्यांनी तिला फिरविले व आपल्या आश्रमांत नेले. तेथे ती प्रसूत होऊन त्यांचे कृपेने तो गर्भ विषासहच सजीव उत्पन्न झाला. हाच तो महाबाहू सगर राजा. जन्म होतांच और्वाने त्याचें जातकर्मादि करून त्याला वेद शास्त्र पढविलें; आणि नंतर देवांना देखील असह्य असें महाघोर आग्नेयास्त्र दिलें. अगोदरच सगर जातीने बलाढय होता व तशांत असल्या अस्त्राचे त्याला पाठबळ मिळाले. तेव्हां त्यानें संहारकर्ता रुद्र ज्याप्रमाणें जीवांना पटापट मारितो, त्याप्रमाणें रागाचे तडाक्यांत सर्व हैहयांस तत्काल मारून टाकिलें. त्यानें त्याची लोकांमध्यें फारच कीर्ति झाली. हैहयांना चीत केल्यावर यवन, कांबोज, पारद व पल्हव यांसह शकांचे निर्मूलन करण्याचे उद्योगास तो लागला. त्या महात्म्या वीराने त्यांचेवर जेव्हां गहजब उडविला तेव्हां ते विवेकी वसिष्ठ मुनींना शरण येऊन त्यांचे पाया पडले. त्या वेळीं शरणागताचे रक्षण केलेंच पाहिजे, ही धर्ममर्यादा ध्यानी आणून महातेजस्वी वसिष्ठांनी त्यांना अभय दिले, व सगराचे निवारण केलें. गुरूची आज्ञा व स्वतःची प्रतिज्ञा या दोन्ही सांभाळण्याची जेव्हां सगरावर पाळी आली, तेव्हां त्यानें शकादिकांचा नाश न करितां त्याऐवजी त्यांचे धर्माचा नाश केला, व त्यांचेकडून वेषांतर करविले तें असें. शकांचे अर्धे शीर मुंडून त्यांना सोडून दिलें व यवन आणि कांबोज यांचें सर्वच शीर मुंडून टाकिलें. पारदांकडून मोकळ्या जटा ठेवविल्या व पल्हवांकडून दाढ्या राखविल्या; व या सर्वांकडूनच वेदाध्ययन व वष‍ट्कार हे हक्क काढून घेतले. त्याचप्रमाणें कोली, सर्प, महिष, दीर्घ, चोल, केरल व शकादि पूर्वोक्त चार हे सर्व क्षत्रिय असतां वसिष्ठाचे सांगण्यावरून महात्म्या सगराने त्यांचे धर्माचा उच्छेद केला. पुढें त्या धर्मविजयी राजाने खस, तुषार, चोल, मद्र, किष्किंधक, कौंतल, वंग, साल्व व कौंकणक, या सर्वांस जिंकून अश्वमेधाची दीक्षा घेऊन अश्‍व मोकळा सोडिला. तो त्याचा मेधीय अश्व फिरत फिरत पूर्व-दक्षिण समुद्राच्या काठाला पोचला असतां कोणी पळविला, तो भूमीच्या तळाशी नेला. तेव्हां त्या सगराने आपले पुत्रांकडून ती जागा खणविली; व त्यांनीं जेव्हां समुद्रप्राय विशाल असा अति खोल खड्डा खणिला तेव्हां ते शेवटीं अशा स्थळी पोंचले कीं, तेथें सर्व सृष्टीचा पालक जो आदिपुरुष देवाधिदेव सर्वात्मा, ज्याला कृष्णही म्हणतात असा तो पुरुषोत्तम, कपिलाचे रूपाने निजलेला होता. यांचे खणण्याचे खडबडीमुळें तो जेव्हां जागृतीवर येऊन डोळे उघडू लागला, तेव्हां त्याचे नेत्रांतून जें तेज उठले, त्या तेजाने चार वजा करून बाकीचे ते सर्वही (साठ सहस्त्र) सगरपुत्र जळून खाक झाले. चार उरले त्यांची नांवे - बर्हकेतु, सुकेतु, धर्मरथ व शूरपंचजन. या चौघांनी पुढें सगराचा वंश चालवला. सगर राजाला परमात्मा कपिलरूपी नारायणानें अनेक वर दिले, ते असे - इक्ष्वाकूचा वंश अक्षय्य राहील, त्याच्या कीर्तीची पीछेहाट कधींही होणार नाहीं; प्रत्यक्ष समुद्र पुत्ररूपानें त्याच्या उदरी जन्मेल; सगराला अक्षय्य स्वर्गवास मिळेल; त्याचप्रमाणे सगराचे जे पुत्र नेत्राच्या तेजामुळें भस्म झाले होते, त्यांनाही अखंड उत्तम लोकप्राप्ति होईल. इतके वर दिल्यावर समुद्राने मूर्तिमान होऊन त्या सगर राजाची अर्घ्यपूर्वक पूजा केली, व त्याबद्दल सगराने त्याला आपलासा म्हणवून सागर असें नांव दिलें. नंतर समुद्राकडून त्याला त्याचा नाहीसा झालेला मेधीय अश्व परत मिळाला. नंतर त्या महायशस्वी सगराने शंभर अश्वमेध केले. त्याच्या पुत्रांची संख्या साठ हजार होती, असें आमचे ऐकण्यांत आहे."


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
सगरोत्पत्तिर्नाम नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
अध्याय चवदावा समाप्त

GO TOP