श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
दशमोऽध्यायः


वैवस्वतोत्पत्तिः -

वैशम्पायन उवाच
मनोर्वैवस्वतस्यासन् पुत्रा वै नव तत्समाः ।
इक्ष्वाकुश्चैव नाभागो धृष्णुः शर्यातिरेव च ॥ १ ॥
नरिष्यंश्च तथा प्रांशुर्नाभागारिष्टसप्तमाः ।
करूषश्च पृषध्रश्च नवैते भरतर्षभ ॥ २ ॥
अकरोत्पुत्रकामस्तु मनुरिष्टिं प्रजापतिः ।
मित्रावरुणयोस्तात पूर्वमेव विशाम्पते ॥ ३ ॥
अनुत्पन्नेषु नवसु पुत्रेष्वेतेषु भारत ।
तस्यां तु वर्तमानायामिष्ट्यां भरतसत्तम ॥ ४ ॥
मित्रावरुणयोरंशे मुनिराहुतिमाजुहोत् ।
आहुत्यां हूयमानायां देवगन्धर्वमानुषाः ॥ ५ ॥
तुष्टिं तु परमां जग्मुर्मुनयश्च तपोधनाः ।
अहोऽस्य तपसो वीर्यमहोऽस्य श्रुतमद्भुतम् ॥ ६ ॥
तत्र दिव्याम्बरधरा दिव्याभरणभूषिता ।
दिव्यसंहनना चैव इला जज्ञ इति श्रुतिः ॥ ७ ॥
तामिलेत्येव होवाच मनुर्दण्डधरस्तदा ।
अनुगच्छस्व मां भद्रे तमिला प्रत्युवाच ह ।
धर्मयुक्तमिदं वाक्यं पुत्रकामं प्रजापतिम् ॥ ८ ॥
इलोवाच
मित्रावरुणयोरंशे जातास्मि वदतां वर ।
तयोः सकाशं यास्यामि न मां धर्मो हतोऽवधीत् ॥ ९ ॥
सैवमुक्त्वा मनुं देवं मित्रावरुणयोरिला ।
गत्वान्तिकं वरारोहा प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ १० ॥
अंशेऽस्मि युवयोर्जाता देवौ किं करवाणि वाम् ।
मनुना चाहमुक्ता वै अनुगच्छस्व मामिति ॥ ११ ॥
तां तथावादिनीं साध्वीमिलां धर्मपरायणाम् ।
मित्रश्च वरुणश्चोभावूचतुर्यन्निबोध तत् ॥ १२ ॥
अनेन तव धर्मेण प्रश्रयेण दमेन च ।
सत्येन चैव सुश्रोणि प्रीतौ स्वो वरवर्णिनि ॥ १३ ॥
आवयोस्त्वं महाभागे ख्यातिं कन्येति यास्यसि ।
मनोर्वंशधरः पुत्रस्त्वमेव च भविष्यसि । १४ ॥
सुद्युम्न इति विख्यातस्त्रिषु लोकेषु शोभने ।
जगत्प्रियो धर्मशीलो मनोर्वंशविवर्धनः ॥ १५ ॥
निवृत्ता सा तु तच्छ्रुत्वा गच्छन्ती पितुरन्तिकम् ।
बुधेनान्तरमासाद्य मैथुनायोपमन्त्रिता ॥ १६ ॥
सोमपुत्राद् बुधाद् राजंस्तस्यां जज्ञे पुरूरवाः ।
जनयित्वा सुतं सा तमिला सुद्युम्नतां गता ॥ १७ ॥
सुद्युम्नस्य तु दायादास्त्रयः परमधार्मिकाः ।
उत्कलश्च गयश्चैव विनताश्वश्च भारत ॥ १८ ॥
उत्कलस्योत्कला राजन्विनताश्वस्य पश्चिमा ।
दिक्पूर्वा भरतश्रेष्ठ गयस्य तु गया पुरी । १९ ॥
प्रविष्टे तु मनौ तात दिवाकरमरिंदम ।
दशधा तद्दधत्क्षत्रमकरोत् पृथिवीमिमाम् ॥ २० ॥
यूपाङ्किता वसुमती यस्येयं सवनाकरा ।
इक्ष्वाकुर्ज्येष्ठदायादो मध्यदेशमवाप्तवान् ॥ २१ ॥
कन्याभावाच्च सुद्युम्नो नैनं गुणमवाप्तवान् ।
वसिष्ठवचनाच्चासीत् प्रतिष्ठाने महात्मनः ॥ २२ ॥
प्रतिष्ठा धर्मराजस्य सुद्युम्नस्य कुरूद्वह ।
तत्पुरूरवसे प्रादाद् राज्यं प्राप्य महायशाः ॥ २३ ॥
सुद्युम्नः कारयामास प्रतिष्ठाने नॄपक्रियाम् ।
उत्कलस्य त्रयः पुत्रास्त्रिषु लोकेषु विश्रुताः ।
धृष्टकश्चाम्बरीषश्च दण्डश्चेति सुतास्त्रयः ॥ २४ ॥
यश्चकार महात्मा वै दण्डकारण्यमुत्तमम् ।
वनं तल्लोकविख्यातं तापसानामनुत्तमम् ॥ २५ ॥
तत्र प्रविष्टमात्रस्तु नरः पापात् प्रमुच्यते ।
सुद्युम्नश्च दिवं यात ऐलमुत्पाद्य भारत ॥ २६ ॥
मानवेयो महाराज स्त्रीपुंसोर्लक्षणैर्युतः ।
धृतवान्य इलेत्येव सुद्युम्नश्चातिविश्रुतः ॥ २७ ॥
नारिष्यतः शकाः पुत्रा नाभागस्य तु भारत ।
अम्बरीषोऽभवत् पुत्रः पार्थिवर्षभसत्तमः ॥ २८ ॥
धृष्णोस्तु धार्ष्टकं क्षत्रं रणदृष्टं बभूव ह ।
करूषस्य तु कारूषाः क्षत्रिया युद्धदुर्मदाः ॥ २९ ॥
सहस्रं क्षत्रियगणो विक्रान्तः सम्बभूव ह ।
नाभागारिष्टपुत्राश्च क्षत्रिया वैश्यतां गताः ॥ ३० ॥
प्रांशोरेकोऽभवत् पुत्रः शर्यातिरिति विश्रुतः ।
नरिष्यतस्य दायादो राजा दण्डधरो दमः ।
शर्यातेर्मिथुनं चासीदानर्तो नाम विश्रुतः ॥ ३१ ॥
पुत्रः कन्या सुकन्याख्या या पत्नी च्यवनस्य ह ।
आनर्तस्य तु दायादो रेवो नाम महाद्युतिः ॥ ३२ ॥
आनर्तविषयश्चासीत् पुरी चास्य कुशस्थली ।
रेवस्य रैवतः पुत्रः ककुद्मी नाम धार्मिकः ॥ ३३ ॥
ज्येष्ठः पुत्रशतस्यासीद् राज्यं प्राप्य कुशस्थलीम् ।
स कन्यासहितः श्रुत्वा गान्धर्वं ब्रह्मणोऽन्तिके ॥ ३४ ॥
मुहूर्तभूतं देवस्य गतं बहुयुगं प्रभो ।
आजगामयुवैवाथ स्वां पुरीं यादवैर्वृताम् ॥ ३५ ॥
कृतां द्वारवतीं नाम्ना बहुद्वारां मनोरमाम् ।
भोजवृष्ण्यन्धकैर्गुप्तां वासुदेवपुरोगमैः ॥ ३६ ॥
ततः स रैवतो ज्ञात्वा यथातत्त्वमरिंदम ।
कन्यां तां बलदेवाय सुव्रतां नाम रेवतीम् ॥ ३७ ॥
दत्त्वा जगाम शिखरं मेरोस्तपसि संस्थितः ।
रेमे रामोऽपि धर्मात्मा रेवत्या सहितः सुखी ॥ ३८ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
ऐलोत्पत्तिवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥१०॥


वैवस्वत मनूची संतति -

वैशंपायन सांगतात - हे जनमेजया, वैवस्वत मनूला त्याच्याच तोडीचे नऊ पुत्र झाले, त्यांचीं नांवें - इक्ष्वाकु, नाभाग, धृष्णु, शर्याति, नरिष्य, प्रांशु, नाभागारिष्ट, करूष व पृषध्र, असे हे नऊ. हे राजा, हे पुत्र होण्यापूर्वीं मनु प्रजापतीनें मित्रावरुण देवतांना उद्देशून पुत्र व्हावा या इच्छेनें एक इष्टि केली; ती इष्टि चालली असतां व नऊ पुत्र उत्पन्न होण्याच्या अगोदर मित्रावरुणांच्या अंशानें मनूनें आहुती दिली; ती आहुती देतांच देव, गंधर्व, मनुष्य व तपोधन मुनि या सर्वांसच परम संतोष होऊन ते म्हणाले, "शाबास, शाबास, काय तरी या मनूच्या तपाचें सामर्थ्य! केवढा तरी याचा वेदज्ञानासंबंधीं अधिकार." हे राजा, असें सांगतात कीं, देवादिक याप्रमाणें जों आनंदानें उद्गारत आहेत तोंच त्या इष्टींतून दिव्य वस्त्र धारण केलेली, दिव्य अलंकारांनीं श्रृंगारलेली व जिची अंगगठण मोठी दिव्य आहे अशी इला नांवाची एक स्त्री उत्पन्न झाली. तिला पाहातांच, राजा मनु म्हणाला कीं, हे कल्याणि, मजबरोवर चल. तें ऐकून आपणास पुत्र व्हावा अशी ज्याला इच्छा झाली होती त्या मनु प्रजापतीला ती इला पुढीलप्रमाणें धर्मयुक्त वाक्य बोलली. इला म्हणाली, 'हे वदान्यश्रेष्ठा, ज्याअर्थी मी मित्रावरुणांच्या हविर्भागा- पासून उत्पन्न झालें आहें त्याअर्थी मी त्यांचे सन्निध जातें; कारण असें न करीन तर मजकडून अधर्म होऊन माझा नाश होईल. करितां तूं माझे आड येऊं नको.' असें म्हणून ती सुंदरी मित्रावरुणासन्निध जाऊन उभी राहिली व हात जोडून म्हणाली, 'देवहो, मी तुमच्या अंशापासून उत्पन्न झालें आहें, त्याअर्थीं मी आपली काय सेवा करावी तें मला सांगा. हा मनु तर मला म्हणतो आहे कीं, तूं मजबरोबर रहा. तर मी कसें करूं ?' या- प्रमाणें ती धर्मनिष्ठ साध्वी इला विनंति करीत असतां मित्रावरुणांनीं तिला जें उत्तर दिलें तें ऐक. ते म्हणाले, 'हे सुश्रोणि, तुझ्या या धर्मनिष्ठेनें, विनयानें, दमानें व सत्यानें आम्हीं फारच खूष झालों, तर तूं आमची कन्या म्हणून लोकांत प्रसिद्ध होशील व यानंतर तुला याच देहीं पुरुषत्व प्राप्त होऊन, हे त्रैलोक्यसुंदरी, तूं या मनूचा वंश चालविणारा सुद्युम्न नांवानें प्रख्यात पुत्र होशील. तूं सर्व प्रजाजनांला आवडता होशील, धर्मशील होशील व तुजपासून मनुवंशाची वृद्धि होईल.' मित्रावरुणांचें हें वचन ऐकतांच ती आपला पिता मनु याकडे जावयाला निघाली. जात असतां वाटेत ती बुधाचे दृष्टीस पडली, व त्यानें तिला 'भोग दे' म्हणून प्रार्थना केली. तीही तरुण असल्यानें त्याला वश झाली, व त्यांचे संयोगापासून पुरूरवा नांवाचा प्रसिद्ध पुत्र तिला झाला. त्या पुत्राला जन्म दिल्यावर तिचा स्त्रीपणा जाऊन तिला पुरुषत्व प्राप्त झालें, व सुद्युम्न या नांवानें त्या रूपानें ती प्रसिद्ध झाली. त्या पुरुषरूपांत असतां त्याला उत्कल, गय व विनताश्व असे तीन पुत्र झाले. यांपैकीं उत्कलाला उत्कल देशाचें राज्य मिळालें; विनताश्वाला पश्चिम दिशेचें व गयाला पूर्वेकडील देशाचें राज्य मिळालें व त्या देशांतील गया नगरी ही त्याची राजधानी झाली. असो; अरिंदमा, वैवस्वत मनु हा आपल्या मूळरूपांत म्हणजे सूर्यरूपांत लीन झाल्यावर त्याच्या दहा पुत्रांनीं त्याच्या ताब्यांत असलेल्या या पृथ्वीचे दहा वांटे केले. त्यांपैकीं यज्ञस्तंभांनीं व अरण्ये आणि रत्नें वगैरे यांच्या खाणी यांनी चिन्हित असलेला जो मध्यदेश तो नऊ भावांतील ज्येष्ठ जो इक्ष्वाकु त्यानें घेतला. न्याय पाहातां हा वांटा सुद्युम्नाला मिळाला पाहिजे होता; परंतु तो मूळ कन्यारूप असल्यानें त्याला तें राज्य मिळाले नाहीं. वसिष्ठांनी त्या धर्मनिष्ठ सुद्युम्नाची प्रतिष्ठान म्हणजे प्रयागप्रांतीं स्थापना केली. पुढें तें राज्य प्राप्त झाल्यावर सुद्युम्नानें तें आपला पुत्र पुरूरवा याजकडे दिलें. उत्कलाला लोकविख्यात तीन पुत्र होते. त्यांचीं नांवें - धृष्टक, अंबरीषः व दंड. तपस्वी लोकांना अतिशय सोईकर व सर्व लोकप्रसिद्ध जें दंडकारण्य आहे, तें या दंड राजानेंच निर्माण केलें. या दंडकारण्याचें माहात्म्य असें आहे कीं, त्यांत पाऊल टाकतांच मनुष्य पापमुक्त होतो. स्त्री आणि पुरुष या उभयतांचीँही लक्षणें ज्याचे ठिकाणीं आहेत असा जो सुद्युम्न किंवा इल (इला हिला पुरुषत्व आल्यावर इल असेंही म्हणत.) हा आपल्या ऐल नामक पुत्राच्या जन्मानंतर त्याला राज्य देऊन आपण स्वर्गी गेला. नरिष्यन् याच्यापासून शक नांवाचे पुत्र झाले. नाभागापासून नृपश्रेष्ठ जो प्रसिद्ध अंबरीष तो झाला. धृष्णूपासून रणशूर असें धार्ष्टक संज्ञक क्षत्रिय कुल उत्पन्न झालें. करूषापासून मोठा पराक्रमी व रणमस्त असा कारूष नामक हजार क्षत्रियांचा समुदाय उत्पन्न झाला. नाभागारिष्टाला जे पुत्र झाले ते जन्मतः क्षत्रिय असतां कर्मदोषानें वैश्य झाले. प्रांशूला शर्याति नांवाचा सुप्रसिद्ध असा एकच पुत्र झाला, नरिष्यंताला दम नांवाचा एक मोठा शास्ता पुत्र झाला. शर्यातीला मुलगा व एक मुलगी, अशी दोन अपत्यें झालीं. त्यांपैकीं मुलाचें नांव आनर्त व मुलीचें नांव सुकन्या; हीच पुढें च्यवन ऋषीची स्त्री झाली. आनर्ताला रेव नांवाचा मोठा तेजस्वी पुत्र झाला. आनर्ताच्या राज्याला आनर्त देश म्हणत असून कुशस्थली ही त्याची राजधानी होती. रेवाला एकंदर शंभर पुत्र झालें. त्यांपैकीं त्याचा ज्येष्ठ पुत्र ककुद्मी नांवाचा मोठा धार्मिक होता. यालाच रैवत असेंही म्हणत. बापापासून याला कुशस्थलीचें राज्य मिळालें. पुढें त्याला रेवती नांवाची कन्या झाली. ती उपवर झाली असतां तिला बरोबर घेऊन तो ब्रह्मलोकीं गेला. तेव्हां ब्रह्मदेव गात बसले होते. त्यामुळें तो तें गायन ऐकतच ब्रह्मदेवाचा एक मुहूर्तपर्यंत बसला. एक मुहूर्त झाल्यावर काय बोलावयाचें तें बोलून मृत्युलोकीं तरुणच्या तरूण परत आला. परंतु, तो आपल्या राजधानीस परत येऊन पाहातो तों तिचें सर्वच स्वरूप बदलून गेलें होतें. तिला अनेक द्वारें किंवा नगरवेशी बांधल्या असून यामुळेंच तिचे पूर्वींचे कुशस्थली हें नांव बदलून द्वारवती हें नांव पडलें होतें. एकंदरींत ती फार मनोहर झाली होती. वासुदेव म्हणजे कृष्णप्रभृति जे भोज, वृष्णि व अंधककुलोत्पन्न राजे यांचा तिजवर ताबा असून तींत यादवांचा फार भरणा होता. हे राजा, एक मुहूर्तांत एवढा फेरबदल झाला कसा म्हणून म्हणशील तर हा मुहूर्त ब्रह्मदेवाचा. अर्थातच आपलीं माणसांची किती तरी युगें एवढयांत लोटलीं व यामुळें सहजच अशी उलथापालथ झाली. असो; स्व- नगरीस आल्यावर नगरीच्या स्थित्यंतराचे कारण काय तें सर्व खरें खरें समजून घेतल्यावर त्यानें आपली व्रतशील कन्या रेवतीं ही कृष्णाचा बंधु जो बलराम त्याला दिली, व आपण मेरुशिखरावर जाऊन तप करीत बसला. इकडे धर्मात्मा बलरामही त्या तरूण रेवतीशीं रममाण होऊन सुखांत राहिला.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
ऐलोत्पत्तिवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥१०॥
अध्याय दहावा समाप्त

GO TOP