श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
नवमोऽध्यायः


वैवस्वतोत्पत्तिः -

वैशम्पायन उवाच
विवस्वान् कश्यपाज्जज्ञे दाक्षायण्यामरिन्दम ।
तस्य भार्याभवत् संज्ञा त्वाष्ट्री देवी विवस्वतः ॥ १ ॥
सुरेणुरिति विख्याता त्रिषु लोकेषु भामिनी ।
सा वै भार्या भगवतो मार्तण्डस्य महात्मनः ॥ २ ॥
भर्तृरूपेण नातुष्यद् रूपयौवनशालिनी ।
संज्ञा नाम सुतपसा दीप्तेनेह समन्विता ॥ ३ ॥
आदित्यस्य हि तद्रूपं मण्डलस्य सुतेजसा ।
गात्रेषु परिदग्धं वै नातिकान्तमिवाभवत् ॥ ४ ॥
न खल्वयं मृतोऽण्डस्थ इति स्नेहादभाषत ।
अज्ञानात् कश्यपस्तस्मान्मार्तण्ड इति चोच्यते ॥ ५ ॥
तेजस्त्वभ्यधिकं तात नित्यमेव विवस्वतः ।
येनातितापयामास त्रीँल्लोकान्कश्यपात्मजः ॥ ६ ॥
त्रीण्यपत्यानि कौरव्य संज्ञायां तपतां वरः ।
आदित्यो जनयामास कन्यां द्वौ च प्रजापती ॥ ७ ॥
मनुर्वैवस्वतः पूर्वं श्राद्धदेवः प्रजापतिः ।
यमश्च यमुना चैव यमजौ सम्बभूवतुः ॥ ८ ॥
सा विवर्णं तु तद्रूपं दृष्ट्वा संज्ञा विवस्वतः ।
असहन्ती च स्वां छायां सवर्णां निर्ममे ततः ॥ ९ ॥
मायामयी तु सा संज्ञा तस्याश्छाया समुत्थिता ।
प्राञ्जलिः प्रणता भूत्वा छाया संज्ञां नरेश्वर ॥ १० ॥
उवाच किं मया कार्यं कथयस्व शुचिस्मिते ।
स्थितास्मि तव निर्देशे शाधि मां वरवर्णिनि ॥ ११ ॥
संज्ञोवाच
अहं यास्यामि भद्रं ते स्वमेव भवनं पितुः ।
त्वयेह भवने मह्यं वस्तव्यं निर्विकारया ॥ १२ ॥
इमौ च बालकौ मह्यं कन्या चेयं सुमध्यमा ।
सम्भाव्यास्ते न चाख्येयमिदं भगवते क्वचित् ॥ १३ ॥
छायोवाच
आ कचग्रहणाद् देवि आ शापान्नैव कर्हिचित् ।
आख्यास्यामि मतं तुभ्यं गच देवि यथासुखम् ॥ १४ ॥
वैशम्पायन उवाच
समादिश्य सवर्णां तां तथेत्युक्ता च सा तया ।
त्वष्टुः समीपमगमद् व्रीडितेव तपस्विनी ॥ १५ ॥
पितुः समीपगा सा तु पित्रा निर्भर्त्सिता तदा ।
भर्तुः समीपं गच्छेति नियुक्ता च पुनः पुनः ॥ १६ ॥
अगच्छद् वडवा भूत्वाऽऽच्छाद्य रूपमनिन्दिता ।
कुरूनथोत्तरान् गत्वा तृणान्येव चचार ह ॥ १७ ॥
द्वितीयायां तु संज्ञायां संज्ञेयमिति चिन्तयन् ।
आदित्यो जनयामास पुत्रमात्मसमं तदा ॥ १८ ॥
पूर्वजस्य मनोस्तात सदृशोऽयमिति प्रभुः ।
सवर्णत्वान्मनोर्भूयः सावर्ण इति चोक्तवान् ॥ १९ ॥
मनुरेवाभवन्नाम्ना सावर्ण इति चोच्यते ।
द्वितीयो यः सुतस्तस्याः स विज्ञेयः शनैश्चरः ॥ २० ॥
संज्ञा तु पार्थिवी तात स्वस्य पुत्रस्य वै तदा ।
चकाराभ्यधिकं स्नेहं न तथा पूर्वजेषु वै ॥ २१ ॥
मनुस्तस्याक्षमत्तत्तु यमस्तस्या न चक्षमे ।
तां स रोषाच्च बाल्याच्च भाविनोऽर्थस्य वै बलात् ।
यदा संतर्ज्जयामास संज्ञां वैवस्वतो यमः ॥ २२ ॥
तं शशाप ततः क्रोधात्सावर्णं जननी नृप ।
चरणः पततामेष तवेति भृशदुःखिता ॥ २३ ॥
यमस्तु तत्पितुः सर्वं प्राञ्जलिः पर्यवेदयत् ।
भृशं शापभयोद्विग्नः संज्ञावाक्यप्रतोदितः ॥ २४ ॥
शापोऽयं विनिवर्तेत प्रोवाच पितरं तदा ।
मात्रा स्नेहेन सर्वेषु वर्तितव्यं सुतेषु वै ॥ २५ ॥
सेयमस्मानपाहाय यवीयांसं बुभूषति ।
तस्यां मयोद्यतः पादौ न तु देहे निपातितः ॥ २६ ॥
बाल्याद्वा यदि वा मोहात्तद्भवान् क्षन्तुमर्हति ।
यस्मात्ते पूजनीयाहं लङ्घितास्मि त्वया सुत ॥ २७ ॥
तस्मात् तवैष चरणः पतिष्यति न संशयः ।
अपत्यं दुरपत्यं स्यान्नाम्बा कुजननी भवेत् ॥ २८ ॥
शप्तोऽहमस्मि लोकेश जनन्या तपतां वर ।
तव प्रसादाच्चरणो न पतेन्मम गोपते ॥ २९ ॥
विवस्वानुवाच
असंशयं पुत्र महद्भविष्यत्यत्र कारणम् ।
येन त्वामाविशत् क्रोधो धर्मज्ञं सत्यवादिनम् ॥ ३० ॥
न शक्यमन्यथा कर्तुं मया मातुर्वचस्तव ।
कृमयो मांसमादाय यास्यन्ति धरणीतलम् ॥ ३१ ॥
तव पादान्महाप्राज्ञ ततस्त्वं प्राप्स्यसे सुखम् ।
कृतमेवं वचस्तथ्यं मातुस्तव भविष्यति ॥ ३२ ॥
शापस्य परिहारेण त्वं च त्रातो भविष्यसि ।
आदित्योऽथाब्रवीत् संज्ञां किमर्थं तनयेषु वै ॥ ३३ ॥
तुल्येष्वभ्यधिकः स्नेहः क्रियतेऽति पुनः पुनः ।
सा तत् परिहरन्ती तु नाचचक्षे विवस्वते ॥ ३४ ॥
आत्मानं सुसमाधाय योगात्तथ्यमपश्यत ।
तां शप्तुकामो भगवान्नाशाय कुरुनन्दन ॥ ३५ ॥
मूर्धजेषु च जग्राह समयेऽतिगतेऽपि च ।
सा तत्सर्वं यथावृत्तमाचचक्षे विवस्वते ॥ ३६ ॥
विवस्वानथ तच्छ्रुत्वा क्रुद्धस्त्वष्टारमभ्यगात् ।
त्वष्टा तु तं यथान्यायमर्चयित्वा विभावसुम् ।
निर्दग्धुकामं रोषेण सान्त्वयामास वै तदा ॥ ३७ ॥
त्वष्टोवाच
तवातितेजसाविष्टमिदं रूपं न शोभते ।
असहन्ती च तत् संज्ञा वने चरति शाड्वले ॥ ३८ ॥
द्रष्टा हि तां भवानद्य स्वां भार्यां शुभचारिणीम् ।
नित्यं तपस्यभिरतां वडवारूपधारिणीम् ॥ ३९ ॥
पर्णाहारां कृशां दीनां जटिलां ब्रह्मचारिणीम् ।
हस्तिहस्तपरिक्लिष्टां व्याकुलां पद्मिनीमिव ।
श्लाघ्यां योगबलोपेतां योगमास्थाय गोपते ॥ ४० ॥
अनुकूलं तु देवेश यदि स्यान्मम तन्मतम् ।
रूपं निर्वर्तयाम्यद्य तव कान्तमरिन्दम ॥ ४१ ॥
रूपं विवस्वतश्चासीत् तिर्यगूर्ध्वसमं तु वै ।
तेनासौ सम्भृतो देवरूपेण तु विभावसुः ॥ ४२ ॥
तस्मात् त्वष्टुः स वै वाक्यं बहु मेने प्रजापतिः ।
समनुज्ञातवांश्चैव त्वष्टारं रूपसिद्धये ॥ ४३ ॥
ततोऽभ्युपगमात् त्वष्टा मार्तण्डस्य विवस्वतः ।
भ्रमिमारोप्य तत् तेजः शातयामास भारत ॥ ४४ ॥
ततो निर्भासितं रूपं तेजसा संहृतेन वै ।
कान्तात्कान्ततरं द्रष्टुमधिकं शुशुभे तदा ॥ ४५ ॥
मुखे निवर्तितं रूपं तस्य देवस्य गोपतेः ।
ततः प्रभृति देवस्य मुखमासीत्तु लोहितम् ।
मुखरागं तु यत्पूर्वं मार्तण्डस्य मुखच्युतम् ॥ ४६ ॥
आदित्या द्वादशैवेह सम्भूता मुखसंभवाः ।
धातार्यमा च मित्रश्च वरुणोंऽशो भगस्तथा ॥ ४७ ॥
इन्द्रो विवस्वान् पूषा च पर्जन्यो दशमस्तथा ।
ततस्त्वष्टा ततो विष्णुरजघन्यो जघन्यजः ॥ ४८ ॥
हर्षं लेभे ततो देवो दृष्ट्वाऽऽदित्यान् स्वदेहजान् ।
गन्धैः पुष्पैरलङ्कारैर्भास्वता मुकुटेन च ॥ ४९ ॥
एवं सम्पूजयामास त्वष्टा वाक्यमुवाच ह ।
गच देव निजां भार्यां कुरूंश्चरति सोत्तरान् ॥ ५० ॥
वडवारूपमास्थाय वने चरति शाद्वले ।
स तथा रूपमास्थाय स्वभार्यारूपलीलया ॥ ५१ ॥
ददर्श योगमास्थाय स्वां भार्यां वडवां ततः ।
अधृष्यां सर्वभूतानां तेजसा नियमेन च ॥ ५२ ॥
वडवावपुषा राजंश्चरन्तीमकुतोभयाम् ।
सोऽश्वरूपेण भगवांस्तां मुखे समभावयत् ॥ ५३ ॥
मैथुनाय विचेष्टन्ती परपुंसोपशङ्कया ।
सा तन्निरवमच्छुक्रं नासिकायां विवस्वतः ॥ ५४ ॥
देवौ तस्यामजायेतामश्विनौ भिषजां वरौ ।
नासत्यश्चैव दस्रश्च स्मृतौ द्वावश्विनाविति ॥ ५५ ॥
मार्तण्डस्यात्मजावेतावष्टमस्य प्रजापतेः ।
संज्ञायां जनयामास वडवायां स भारत ।
तां तु रूपेण कान्तेन दर्शयामास भास्करः ॥ ५६ ॥
सा च दृष्ट्वैव भर्तारं तुतोष जनमेजय ।
यमस्तु कर्मणा तेन भृशं पीडितमानसः ॥ ५७ ॥
धर्मेण रञ्जयामास धर्मराज इव प्रजाः ।
स लेभे कर्मणा तेन परमेण महाद्युतिः ॥ ५८ ॥
पितॄणामाधिपत्यं च लोकपालत्वमेव च ।
मनुः प्रजापतिस्त्वासीत् सावर्णः स तपोधनः ॥ ५९ ॥
भाव्यः सोऽनागते काले मनुः सावर्णिकेऽन्तरे ।
मेरुपृष्ठे तपो घोरमद्यापि चरति प्रभुः ॥ ६० ॥
भ्राता शनैश्चरश्चास्य ग्रहत्वमुपलब्धवान् ।
नासत्यौ यौ समाख्यातौ स्वर्वैद्यौ तौ बभूवतुः ॥ ६१ ॥
सेवतोऽपि तथा राजन्नश्वानां शांतिदोऽभवत् ।
त्वष्टा तु तेजसा तेन विष्णोश्चक्रमकल्पयत् ॥ ६२ ॥
तदप्रतिहतं युद्धे दानवान्तचिकीर्षया ।
यवीयसी तयोर्या तु यमी कन्या यशस्विनी ॥ ६३ ॥
अभवत् सा सरिच्छ्रेष्ठा यमुना लोकभाविनी ।
मनुरित्युच्यते लोके सावर्ण इति चोच्यते ॥ ६४ ॥
द्वितीयो यः सुतस्तस्य मनोर्भ्राता शनैश्चरः ।
ग्रहत्वं स च लेभे वै सर्वलोकाभिपूजितम् ॥ ६५ ॥
य इदं जन्म देवानां शृणुयाद्वापि धारयेत् ।
आपद्भ्यः स विमुच्येत प्राप्नुयाच्च महद्यशः ॥ ६६ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे वैवस्वतोत्पत्तौ नवमोऽध्यायः


द्वादश आदित्यांची उत्पत्ति -

वैशंपायन सांगतात - दक्षकन्या अदिति हिचे ठिकाणीं कश्यपापासून विवस्वान् हा उत्पन्न झाला. त्वष्ट्याची कन्या जी मोठी रागीट असून सर्व त्रैलोक्यांत सुरेणु या नांवानें प्रख्यात होती, ती या विवस्वानाची भार्या झाली. या कुळांत हिचें नांव संज्ञा असें ठेविलें होतें. ही संज्ञा जातीचीच मोठी रूपवान् व तपस्वी असून हल्लीं उमेदीचे भरांत असल्यामुळे तिला तो तापदायक पति रुचेना. कारण त्याच्या अत्यंत तेजामुळें त्या कोमल व सुंदर स्त्रीचे अवयव ठिकठिकाणीं भाजून तिच्या रूपाचा बिघाड होत चालला, यामुळें ती त्याच्यावर संतुष्ट नव्हती. या विवस्वानालाच मार्तंड असेंही नांव होतें. हें पडण्याचें कारण असें झालें कीं, याचे खेपेस याची आई अदिति ही गरोदर असतां बुध भिक्षेसाठी तिचे दारांत आला. परंतु, गर्भभारानें तिचें पाऊल मंदावल्यामुळें तिला झप्दिशीं जाऊन भिक्षा घालतां आली नाहीं. त्यायोगानें बुधानें रागावून तिला शाप दिला कीं, 'हा तुझा "अण्ड" म्हणजे गर्भ मृत होईल.' त्यावरून अदितीला आपला अण्ड मृत आहे असें भासून त्या गर्भाला पुढें मृतांड म्हणजे मार्तंड असें नांव पडलें. शाप असून हा गर्भ जिवंत कसा उपजला म्हणशील तर अदितीचा भर्ता जो कश्यप त्यानें स्वस्त्रीला बुधानें दिलेला शाप ऐकतांच तिची दया येऊन आपल्या तपोबलानें तो शाप दूर केला, व हा अण्डांत मृत नाहीं असें प्रेमानें तिला म्हणाला; तेव्हांपासून त्या गर्भाचे मार्तंड हेंच नांव पडलें. असो; आपल्यापेक्षां अत्यंत तेजस्वी अशा त्या विवस्वानाची संगती त्या कोमल स्त्रीला अतीच असह्य होऊं लागली. कारण हा विवस्वान् म्हणजे तिन्ही लोकांना नित्य तापवून सोडणारा जो सूर्य तोच होय. तथापि अशाच्याही संगतींत त्या संज्ञेला तीन अपत्यें झाली. त्यांपैकीं पहिले गर्भापासून वैवस्वत मनु हा जन्मला. यालाच प्रजापति, श्राद्धदेव असेंही म्हणतात, व दुसरे खेपेला जुळेंच झालें; त्यांत एक मुलगा व एक मुलगी अशीं अपत्ये होतीं. मुलाचें नांव यम व मुलीचें नांव यमुना. येथपर्यंत संज्ञेनें भर्त्याबरोबर कसेबसे दिवस काढले; परंतु जवळ जातांच भाजून काढणारें त्याचें तें द्वाड रूप तिला आवडेना व सोसेहीना. तेव्हां रूपानें हुबेहुब आपल्यासारखी अशी तिनें सवर्णा नांवाची आपली प्रतिच्छाया उत्पन्न केली. कारण ही संज्ञा जादूत मोठी प्रवीण होती. निर्माण करतांच ती तिची छाया हात जोडून संज्ञेपुढें उभी राहून म्हणाली, 'शुचिस्मिते, मीं काय करावें हे मला सांग. हे सुंदरि, मी तुझ्या सर्वथा आज्ञेंत आहें; करितां मी तुझी काय कामगिरी करूं तें मला सांग.'

संज्ञा म्हणते - हे सवर्णे, देव तुझें कल्याण करो. मी आतां माझ्या बापाचे घरीं जातें व तूं ह्या माझे घरांत मनांत कांहीं एक किंतु न आणितां माझे जागीं रहा. हे दोन माझे मुलगे आहेत व सुरेखशी दिसते आहे ही माझी मुलगी आहे. या तिन्ही मुलांना तूं माझेचप्रमाणें जीव लावून वागीव; व मीं योजिलेली युक्ति ही भगवान् मार्तंडाला कांहीं झालें तरी सांगू नको.

छाया उत्तर करिते -- हे देवि, तूं खुशाल आपल्या बापाच्या घरीं जा. तुझ्या नवर्‍याला आपोआप संशय येऊन त्याच्या निरासार्थ माझ्या वेणीला आंसडा देऊन तो विचारीपर्यंत अथवा मला शापाची भीति घालीपर्यंत मी मुळीच रहस्यभेद करणार नाहीं, ही खात्री ठेव.

वैशंपायन सांगतात -- छायेचें हें आश्वासन घेऊन व तिला जपून वागण्याविषयीं पुनः पुनरपि बजावलें असतां तुझ्या शब्दाबाहेर मी तिळभर जाणार नाहीं असें तिनें दिलेलें वचन घेऊन ती बिचारी संज्ञा लाजत लाजतच बापाकडे गेली. परंतु न बोलावितां नवर्‍याच्या घरून उठून ती आपले घरीं आली, हे पाहातांच बापानें तिची निर्भर्त्सना करून तूं आलीस तशी आपल्या नवर्‍याच्या घरीं चालती हो, म्हणून पुनःपुनः तिला निक्षून सांगितलें. बापाकडे डाळ शिजेना तेव्हां आपलें खरें रूप लपवून व घोडीचें कृत्रिम रूप घेऊन ती सुंदरी उत्तर कुरुदेशांत जाऊन तेथें गवत चरत राहिली.

इकडे तिनें आपले ठिकाणीं उभी करून ठेविलेली जी तिची छाया ती आपली पहिली स्त्री संज्ञाच आहे असें समजून तिच्याशीं आदित्य हा पूर्ववत् संबंध ठेवीत असतां त्याचेपासून तिला आदित्यासमान एक पुत्र झाला. हे जनमेजया, हा पुत्र याचा सापत्न वडील बंधु जो वैवस्वत मनु त्याच्याशीं दिसण्यांत हुबेहूब सारखा असल्यामुळें त्याला सावर्ण अशी संज्ञा पडली, व हाच पुढें सावर्णमनु या नांवानें मनु होईल. यानंतर त्या छायेला आदित्यापासून दुसरा एक पुत्र झाला. त्याचें नांव शनैश्चर. या छायारूप संज्ञेला जेव्हां स्वतःचे दोन पुत्र झाले तेव्हांपासून पहिल्या मुलांपेक्षां या मुलावर ती अधिक प्रेम करूं लागली. ही गोष्ट पहिल्यांतील वडील जो वैवस्वतमनु त्यानें सहन केली; परंतु त्याचा धाकटा भाऊ जो यम, तो सहन करीना. कांहीं आंगचे पोरपणानें, संतापानें मोठा अनर्थ ओढवावयाचा होता त्या योगानें यमाला तशी बुद्धि होऊन त्यानें या भेदभावाबद्दल संज्ञेची सडकून खरडपटटी काढली, व तिला तंबीही दिली. पण हे संज्ञेला कसें खपावें व काय म्हणून खपावें? तें बोलणें तिचे जिवाला फारच झोंबले व संतापून जाऊन तिनें यमाला तत्काल शाप दिला कीं, 'तूं जी ही मजवर मला लाथ मारण्यासाठीं तंगडी उचलली आहेस ही गळून पडेल,' असा तिनें जेव्हां ताडकन् शाप दिला, तेव्हां संज्ञेचा हा शाप ऐकून यमाचेंही मन फार उदास झालें, व तिचे ते शब्द त्याला सारखे टोंचीत राहिले. अशा स्थितींत तो बापाकडे जाऊन हात जोडून दीनवाणीनें झालेली सर्व हकीकत बापाला सांगून म्हणाला, 'आपण तरी कृपा करून हा आईनें दिलेला शाप दूर करा. मी आईला बोलूं नये; पण एका अर्थीं मी बोललो यांत माझा तरी अपराध काय? आपणच न्याय सांगा कीं, आई म्हटली म्हणजे तिनें सर्व मुलांशी सारखे प्रेमानें वागावे कीं नाहीं? परंतु ही आमची आई आमचेकडे पाहातही नाहीं, पण आमचा जो धाकटा भाऊ आहे त्याच सगळे थाटमाट करीत असते. ही गोष्ट आम्हांला कशी रुचावी. तेव्हां रागाचे तडाक्यांत मीं पाय उचलला खरा, नाहीं म्हणत नाहीं; परंतु, उचलला मात्र, तिच्या देहावर मारिला नाहीं; बाकी हेंही करणें योग्य नव्हे खरें, परंतु पोरपणानें किंवा मूर्खपणानें मजकडून ही गोष्ट झाली, इकडे लक्ष देऊन वास्तविक तिनें मला क्षमा केली पाहिजे होती. परंतु तें कांहीं न करितां ती मला म्हणाली, 'पोरा, मी तुझी आई अर्थात् मी तुला देवाप्रमाणें वंद्य असें असतां तूं आपली मर्यादा उल्लंघून ज्या अर्थीं हा मजवर पाय उचलिलास त्या अर्थी हा गळून पडेल. यांत अंतर व्हायचें नाहीं.' तर बाबा, तुम्हींच सांगा कीं, एकवेळ पोर वाईट होऊं शकेल. कारण किती झालें तरी पोरच तें; परंतु माता कधीं कुमाता होईल काय? हे तपस्विश्रेष्ठा, परंतु माझ्या जन्मदात्रीनेंच मला शाप दिला आहे, ही गोष्ट आपण ध्यानांत घ्या, व आपल्या कृपाबलानें तरी हा माझा पाय गळून न पडेल असें करा.' विवस्वान् ( सूर्य) म्हणतो - बेटा, तुझ्यासारख्या सत्यवादी व धर्मवेत्त्या मुलाला ज्या अर्थीं इतका क्रोध आला त्या अर्थीं या कामांत कांहीं तरी मोठेच गूढ असलें पाहिजे. एरवीं आई मुलाला असा शाप देईल असें होणें नाहीं. आतां तूं शाप दूर व्हावा म्हणून म्हणतोस परंतु तुझ्या आईचे शब्द मला फिरवितां येत नाहींत. तथापि मी तिचे शब्दाला कायम राखून इतकीच तडजोड करितों कीं, तिने तुझा पाय गळून पडेल म्हणून म्हटलें आहे तो गळून म्हणजे हाडासकट सबंध तुटून भुईवर न पडतां त्याचें मांस किडे पडून सडून भुईवर पडेल. म्हणजे या युक्तीनें तुझे आईचाही शब्द खरा झालासा होऊन तुझाही कायमचा घात न होतां तूं सुखी होशील. म्हणजे तिचा शापही पुरा झाला व तूंही बचावलास. याप्रमाणें यमाची समजूत काढून आदित्य संज्ञेकडे गेला व तिला म्हणाला, "अग, सर्व मुलें तुझीच; खरे पाहातां तुझें सार्‍यांवरच सारखे प्रेम असावें, परंत पाहावें तों तुझे प्रेमांत वारंवार विषमपणा आढळून येतो, असें कां असावें तें मला फोडून सांग." सूर्याने असें तिला खोदून विचारले. परंतु खरी गोष्ट सांगणें तिला इष्ट नसल्यामुळें ती टाळा- टाळ करूं लागली व खरें कांहीं सांगेना. अशी स्थिति झाली त्यावेळीं सूर्याने समाधि लावली व योगबलानें खरा प्रकार काय आहे, तो ध्यानांत आणिला; आणि झालेली लबाडी ध्यानांत येतांच तिला शाप देऊन नाहींशी करण्याच्या बेतांत येऊन त्यानें त्वेषाने तिचा बुचडा धरला. नवरा इतक्या बाणीवर आलेला पाहून व तो माझे केश धरी तों मी बोलणार नाही. असें आपण जें संज्ञेला वचन दिलें होतें त्याची मर्यादा झाली असें पाहून छायेनें अधिक टाळाटाळ न करितां सूर्याला अक्षरशः जशी हकीकत होती तशी सांगितली. तिचे मुखांतून ती हकीकत कानीं येतांच विवस्वान् क्रोधाचे आवेशांत तडक त्वष्ट्याकडे चालता झाला. पण त्याला पाहातांच त्वष्ट्याने तत्काल त्याच्या योग्यतेनुरूप त्याचें पूजन करून, व हा आतां संतापाने आपणास जाळून टाकणार असा रंग दिसतांच मोठया युक्तीनें त्याची समजूत काढून त्याला शांत केलें. त्वष्टा म्हणाला, "हे विवस्वाना, तुला तसें वाटतें खरें, परंतु माझी मुलगी तुला सोडून गेली यांत तिचा तिळभरही दोष नाहीं. काय करील बिचारी! तुझें हें रूप म्हणजे नुसता आगीचा लोळ. हा एक तर तिचे डोळ्याला गोड दिसत नाहीं; दुसरें, तिच्या शरीराला तो सहन होत नाहीं. तेव्हां निरुपायास्तव तुला सोडून ती निघाली. पण निघाली म्हणून तिनें काडीभरही गैरवर्तन केलें नाहीं. आजच तुला तुझी ती स्त्री घोडीचें रूप घेऊन उत्तर कुरुप्रदेशांतील हिरव्यागार कुरणांत फिरतांना दृष्टीस पडेल. तेथें तिची स्थिति पाहिली असतां तिचें आचरण फारच पवित्र असून ती सदैव तपश्चर्येत निमग्न आहे, असें तुला दिसेल. बापडी केवळ पिकलीं पाने खाऊन असल्यामुळें अत्यंत दीन व रोड होऊन गेली आहे; व तुजविरहित अन्य पुरुष तिला पाहाणें नसल्यामुळें माथ्यावर जटा वाढवून पूर्ण ब्रह्मचर्यानें ती रहात आहे. ऐनयौवनांत पतिविरह सोसावा लागल्यानें बिचारी हत्तीच्या सोंडेच्या तडाक्यांत सांपडलेल्या सुकुमार पद्मिनीप्रमाणें हैराण होऊन गेली आहे; तथापि इतकी दशा झाली असतांही तिनें तिळभर अमार्गीं पाऊल ठेविलें नाहीं, यास्तव ती सर्वांच्या स्तुतीस पात्र आहे. तिनें आपलें वर्तन इतकें शुद्ध कसें राखलें म्हणशील तर, हे किरणनाथा, तिनें योगाचा आश्रय केला असून तिचें योगसामर्थ्यही फार वाढलें आहे. असो; एतावता माझी मुलगी तुझ्या संगतीं राहाण्यास धर्मतः नाकबूल नाहीं, परंतु तुझ्या या विक्राळ रूपापुढें तिचा उपाय चालत नाहीं. या कामीं मला एक उपाय सुचला आहे. त्याविषयीं तुझी जर कबुली असेल तर तो मी अमलांत आणतों. तो उपाय असा कीं, तुझें हें ओबडधोबड .व वांकडें मुंडकें आणि तेजाचा केवळ लोळ असलें भ्यासूर रूप मी बदलून माझ्या मनांत आहे त्याप्रमाणें याला अति मोहक आकार देतों." त्वष्ट्याची ही गोष्ट सूर्याला रुचली, व सूचनेबद्दल त्याचे आभार मानून त्याला वाटेल तसें आपलें रूप फिरवावें अशी त्यानें त्वष्ट्याला अनुज्ञा दिली. सूर्याचा हा कबूलजबाब पदरांत येतांच त्वष्ट्याने सूर्याला चाकावर घालून त्याचे रूपांत जो ओबडधोबडपणा होता व तेजांत जो भ्यासूरपणा होता तो साफ कांतून काढिला. याप्रमाणें त्या कुशल त्वष्टयानें तें रूप कांतून काढिलें असतां चरकीं धरलेल्या भांडयाप्रमाणें तें फारच साफसूफ व सुबक दिसूं लागलें व त्या दिवसापासून सूर्याच्या मुखमंडलावर कायमची लाली चढूं लागली. त्वष्ट्यानें चरकावर घातल्यावेळीं त्या रूपावरील तेजाचा जो तास किंवा चुरा खालीं पडला त्यापासून तेजस्वी असे बारा आदित्य निर्माण झाले, त्याची नांवें - धाता, अर्यमा, मित्र, वरुण, अंश, भग, इंद्र, विवस्वान्, पूषा व पर्जन्य हा दहावा, त्याच्यापुढें त्वष्टा, व उत्पत्तिक्रमानें शेवटला परंतु महत्वानें सर्वांत वरिष्ठ असा बारावा विष्णु. आपल्या देहापासून असले द्वादश आदित्य निर्माण झाले हें पाहून सूर्यदेवाला फारच आनंद झाला. असो; एवढें झाल्यावर त्वष्टयानें सूर्याची गंध, पुष्प, अलंकारांनीं पुनरपि पूजा करून त्याला एक दैदीप्यमान मुकुट दिला, व प्रार्थना करून म्हणाला, "हे देवा, आपली भार्या वडवेचें म्हणजे घोडीचें रूप घेऊन उत्तर कुरुप्रदेशांतील हिरव्यागार कुरणांत फिरते आहे, तिजकडे आपण निःशंकपणे जा." त्वष्टयाचें हें वाक्य ऐकून सूर्यालाही मौज वाटली व आपल्या भार्येला गोड वाटण्याकरितां आपणही गमतीनें अश्वाचें रूप घेऊन अंतर्यामीं योगबलानें आपली स्त्री काय करीत आहे व कोठें आहे हें त्यानें न्याहाळलें. त्यावेळीं ती घोडीचें रूप घेऊन निर्भय संचार करीत आहे, व तिच्या व्रतस्थपणामुळें व तेजाच्या उग्रतेमुळें कोणीही प्राणी तिचे जवळ जाऊं शकत नाहीं, असें त्याचे दृष्टीस पडलें. मग तिचे वर्तनाने अंतर्यामी खुष होऊन मोठया प्रेमानें तो तिजजवळ जाऊन भिडला व कामविव्हल होऊन तिला भोग देण्याच्या रंगांत आला, परंतु हा आपला पति हें तिच्या ध्यानांत आलें नसल्यानें त्याला परपुरुष समजून ती त्याची मैथुनेच्छा सिद्धीस जाऊं देईना व तडातड दुगाण्या झाडूं लागली. परंतु अशा वेळीं सूर्याला कामावेग अनावर झाल्याने त्यानें तिच्या मुखांतच आपलें वीर्य सोडिलें, पण त्या पवित्र स्त्रीनें तें तेथेंही ठरूं न देतां फुर्दिशी तें परत उडविलें. तें नेमकेंच त्या अश्वरूपधारी सूर्याच्या नाकपुड्यांत घुसले; पण कोठेंही गेलें तरी देवाचें अमोघ वीर्य तें! तें फुकट जावयाचें नाहीं, यामुळे तेथेंच त्या वीर्यापासून वैद्यांमध्यें श्रेष्ठ असे दोन अश्विनौदेव निर्माण झाले; यांतील एकाचें नांव नासत्य व एकाचे दस्त्र. शिवाय अश्विनी म्हणजे घोडींपासून झाल्यामुळे या दोघांना अश्विनीकुमार असेंही म्हटले आहे. सारांश, आठवा प्रजापति जो मार्तंडसूर्य त्याचेपासून अश्विनीचें रूप धारण केलेली जी त्याची संज्ञा नामक भार्या तिचे ठिकाणीं हे अश्विनीकुमार निर्माण झाले. नंतर उभयतांनींही आपलीं पूर्वरूपें ग्रहण केलीं. त्यावेळीं संज्ञेला सूर्याचे रूप अतिशय मनोहर आहेसें दृष्टीस पडून फार आनंद झाला. असो; आतां आपण यमाकडे वळूं. मागें सांगितलेंच आहे कीं, यमानें छायेची अवज्ञा केल्यामुळें तिनें त्याला शाप दिला. तो शाप बसल्यापासून यम अंतर्यामी फार कष्टी झाला व त्याचा पूर्वींचा सर्व द्वाडपणा जाऊन त्याची वृत्ति फार निवळली; मग त्यानें आपल्या प्रजांचें पालन फार धर्मनीतिपूर्वक - केवळ धर्मराजाप्रमाणें - केलें. या त्याच्या सत्कर्मानें तो फारच तेजास चढला, व त्याच गुणामळें त्याला पितरांचें आधिपत्य व लोकपालकत्व असे दोन अधिकार मिळाले. इकडे त्याचा वडील भाऊ जो सावर्णमनु तो तपाच्या नादी लागला व अजूनही मेरू पर्वतावर तो प्रभावशाली प्रजापति मोठें घोर तप करीत बसला आहे. या तपाच्या सामर्थ्यानें येत्या मन्वंतरांत त्याला सावर्णिक मनूचा अधिकार प्राप्त होणार आहे. असो; त्याचा भाऊ जो शनैश्चर त्याला तर नभोमंडलांत ग्रहरूपानें कायमची जागा मिळाली आहे. वर जे नासत्य म्हणजे जुळे अश्विनीकुमार सांगितले ते स्वर्गांतील वैद्य झाले आहेत. याप्रमाणें, हे राजा, सेवत (?) हाही अश्वांना शांति देणारा झाला. त्वष्टयानें सूर्याला चरकीं लावलें असतां जें त्याचें फाजील तेज कांतून पडलें होतें, त्या तेजापासून विष्णूच्या हातांत राहाणारे व युद्धामध्यें कधींही पराभव न पावणारें जें सुदर्शन चक्र तें निर्माण केलें. हें सुदर्शन चक्र करण्याचा मुळ हेतु दानवांचा साफ फडशा उडविणें हाच होता. यम व वैवस्वत मनु यांची जी धाकटी यमी नांवाची बहिण ती सर्व लोकांना पावन करणारी अशी यमुना नांवानें श्रेष्ठ नदी होऊन भूलोकांत वहाते आहे. छायेचे जे दोन मुलगे त्यांतील पहिल्याला मनु असेंही म्हणतात, व सावर्ण असेंही म्हणतात. या मनुचा भाऊ म्हणजे छायेचा दुसरा पुत्र जो शनैश्चर हा सर्व लोकमान्य ग्रह होऊन आकाशांत जाऊन बसला, हें पूर्वींच सांगितलें आहे. जो कोणी देवांचे हें जन्मवृत्त श्रवण करील किंवा त्याचें मनन करील, तो विपत्तीपासून मुक्त होऊन मोठया कीर्तीला चढेल.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
वैवस्वतोत्पत्तौ नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
अध्याय नववा समाप्त

GO TOP