॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(उत्तरार्ध)

पंचिका १० वी
जीवन्मुक्तिलक्षण

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
जीवद्वैतसंहार


नित्यमुक्त जीवन्मुक्त । तिसरा तो विदेहमुक्त ।
स्वस्वरूप बद्ध ना मुक्त । मायायोगें बोलावें ॥१॥
स्वस्वरूप हे बद्धही नसते, अथवा मुक्तही नसते. फक्त मायेच्या बाबतीत तसे बोलले जाते. मुक्तांचे तीन प्रकार होत. नित्यमुक्त, जीवन्मुक्त, तिसरा विदेहमुक्त. (१)

स्व‍इच्छेनें देह धरिले । ज्ञानसंपन्नचि प्रगटले ।
शिवादि नित्यमुक्त बोलिले । व्यापारा अलिप्त ॥२॥
शंकरादी देवांनी स्वइच्छेने देह धारण केले असून ते ज्ञानसंपन्न अवस्थेतच प्रकट झाले. ते नित्यमुक्त असून जगाच्या व्यापारापासूनअलिप्त असतात. (२)

गुरुमुखें ज्ञानसंपन्न । तयाचीं दोन लक्षणें ।
एक ते जीवन्मुक्त जाण । एक विदेहमुक्त ॥३॥
गुरुमुखातून ज्यांना ज्ञानप्राप्ती होते त्यांचे दोन प्रकार आहेत. जीवन्मुक्त, विदेहमुक्त. (३)

वासनाक्षय दोहींपरी । सरूप अरूप निर्धारी ।
सरूपें जीवन्मुक्ति वरी । विदेहमुक्ति अरूप ॥४॥
दोन्ही मुक्तांमध्ये वासनाक्षय सारखाच झालेला असतो. पण त्यांच्यामध्ये सरूप व अरूप असे उपासनेचे दोन प्रकार आहेत. सरूप उपासनेने जीवन्मुक्ती मिळते, अरूप उपासनेने विदेह मुक्ती मिळते. (४)

सरूप तेंचि सविकल्प । तेंचि जीवन्मुक्ताचें रूप ।
विदेहमुक्त निर्विकल्प । अरूप जे कां ॥५॥
सरूप म्हणजेच सविकल्प उपासना होय. तेच जीवन्मुक्ताचे स्वरूप होय. निर्विकल्प मात्र विदेह मुक्ताचे स्वरूप असते. ते अरूप असते. (५)

प्रस्तुत जीवन्मुक्ताची लक्षणें । पंचसमासीं बोलणॆं ।
जीवद्वैताच्या हननें । पराकाष्ठा ज्ञानाची ॥६॥
पुढील पाच समासांमध्ये जीवन्मुक्ताची लक्षणे सांगितली जातील. जीवाने निर्माण केलेल्या द्वैताच्या नाशाने ज्ञानाची पराकाष्ठा होते. (६)

येथें असे उपोद्‌घात । ईशसृष्ट जीवद्वैत ।
विवेचन करितां उभयांत । हेयोपादेय कळे ॥७॥
येथे प्रस्तावनेदाखल ईशसृष्ट व जीवसृष्ट याप्रकारच्या सृष्टीचे विवेचन केले जाईल. त्यामुळे या दोहोंतील त्याज्य, ग्राह्य हे कळेल. (७)

ईशसृष्ट असे जितुकें । मिथ्या जाणावें विवेकें ।
नाहीं नव्हे ते असिकें । देहउपाधि तोवरी ॥८॥
जेवढे म्हणून ईशसृष्ट असेल ते विवेकाच्या साहाय्याने मिथ्या जाणावे. नाहीतर देहउपाधी असेतो ते मिथ्या नाही, हे कळणारच नाही. (८)

ईशसृष्ट द्वैताचा । ती प्रकारें नाश याचा ।
परोक्षज्ञानें सत्यत्वाचा । क्षय होतसे ॥९॥
ईशसृष्ट द्वैताचा तीन प्रकारे नाश करता येतो. परोक्षज्ञानाने त्यातील सत्यत्वाचा नाश होतो. (९)

अपरोक्ष जेव्हां कळलें । तेव्हां कार्यक्षेम नासलें ।
उपाधिक्षयें सर्वही गेलें । त्रिविध नाश यापरी ॥१०॥
अपरोक्षज्ञानाने कार्याकार्य कळते आणि त्याचा नाश होतो व उपाधीच्या नाशाबरोबर मात्र सर्वांचाच नाश होतो. अशा प्रकारे तीन प्रकारचे नाश होत. (१०)

ईशसृष्ट मिथ्या पाहणें । जीवद्वैताचेनि हननें ।
कार्यक्षेम नासे तेणें । जीवन्मुक्ति लाभे ॥११॥
जीवद्वैताचा (जीवसृष्टाचा) संहार करून, ईशसृष्ट सर्व मिथ्या पाहून कार्याकार्यता नष्ट होते आणि जीवन्मुक्तीचा लाभ होतो. (११)

म्हणसी ईशसृष्ट मृषा पाहतां । आली गुरुशास्त्रां मिथ्यता ।
गुरुशास्त्रावीण तत्वतां । ज्ञानलाभ कैंचा ॥१२॥
तू जर म्हणशील की, ईशसृष्ट जर खोटे ठरवले तर गुरुशास्त्रही खोटे मानावे लागेलगुरुशास्त्रावाचून ज्ञानलाभ शक्य आहे काय ? (१२)

साधक अबाधक ईशद्वैत । सर्व नामरूप मिथ्याभूत ।
दग्धपटापरी दिसत । बाधा होत बाधका ॥१३॥
ईशद्वैत साधक आणि अबाधक असे दोन प्रकारचे आहे. साधक ईशद्वैत हे अबाधक असून साधनास उपयोगी असते. त्यामध्ये सर्व नामरूप मिथ्या असून दग्ध पटाप्रमाणे दिसते. पण बाधक ईशसृष्टामुळे साधनेस बाधा येते. (१३)

गुरुशास्त्र हे साधक । येणेंचि निरसें हें माइक ।
ब्रह्म अविनाश कळे एक । उपाय ज्ञानाचा ॥१४॥
गुरू, शास्त्र हे साधक ईशसृष्ट असून त्यायोगाने या मायिकाचे निरसन होते. अविनाशी ब्रह्म एक आहे, हे त्यामुळे कळते. ज्ञानाचा उपायही त्यायोगे कळतो. (१४)

मीपणेंविण गुरुदेव । एकचि असे स्वयमेव ।
तरी मग द्वैतासी ठाव । उरे कोठोनी ॥१५॥
गुरुदेव तर मीपणापासून मुक्त आहेत. ते एकमेव आहेत. त्यामुळे द्वैताला वाव कोठून उरेल ? (१५)

जीवद्वैतहनन कैसें । तेंहि दो प्रकारेंचि असे ।
शास्त्रीयद्वैतें अविद्या नासे । तेंहि साधन उपयोगी ॥१६॥
जीवद्वैताचे निरसन कसे करावे ? तेही दोन प्रकारचे आहे. शास्त्रीय जीवद्वैत आणि अशास्त्रीय जीवद्वैत. शास्त्रीय द्वैताने अविद्येचा नाश होतो. तेही साधनेस उपयोगी आहे. (१६)

अहं ब्रह्म अनुसंधान । शास्त्रीय द्वैताचे लक्षण ।
अविद्येचे होतां हनन । तेंहि विरे ब्रह्मरूपीं ॥१७॥
अहंब्रह्माचे अनुसंधान हे शास्त्रीय द्वैताचे लक्षण होय. अविद्येचा घात झाल्यानंतर तीही ब्रह्मरूपात विरून जाते. (१७)

अशास्त्रीय जीवद्वैत । ज्ञानें होय तयाचा घात ।
तरीच जीवन्मुक्ति वरित । असे साधकासी ॥१८॥
दुसरा प्रकार म्हणजे अशास्त्रीय जीवद्वैताचा होय. ज्ञानाने त्याचा घात होतो. त्यानंतर साधकाला जीवन्मुक्ती प्राप्त होते. (१८)

अशास्त्रिय जें बोलिलें । त्याचेहि दो प्रकारें मासलें ।
कामादि तीव्रसे भासले । मनोराज्य तें मंद ॥१९॥
अशास्त्रीय जे आहे त्याचेही दोन प्रकार आहेत. तीव्र आणि मंद. कामादी तीव्र भासतात आणि मनोराज्यादी मंद भासतात. ( १९)

कामक्रोधादि असुर । हेचि मोक्षासी विघ्नकर ।
विवेक वैराग्य महावीर । क्षणमात्रें जिंकिती ॥२०॥
कामक्रोधादी आसुर गुण हे मोक्षमार्गाला विघ्नकर होत. विवेक, वैराग्य हे शूर योद्धे त्यांना क्षणात जिंकतात. (२०)

बोधापूर्वीच हे निमाले । तरीच ज्ञान उपतिष्ठलें ।
दोषदृष्टीं त्यागितां पावलें । अति समाधान ॥२१॥
ज्ञान होण्यापूर्वीच त्या कामादिकांचा निरास झाला तरच ज्ञानाची प्राप्ती होते. दोषदृष्टीने त्यांचा त्याग करताच अतिशय समाधान होते (२१)

बोधा उर्ध्व तरी निःशेष । निरसावे हे विशेष ।
बहुधा श्रुतीचे घोष । जीवन्मुक्तिसुखार्थ ॥२२॥
ज्ञानानंतर तरी निदान त्यांचा संपूर्ण निरास व्हावा. सर्वच श्रुती जीवन्मुक्तिसुखासाठीच उद्घोष करत आहेत. (२२)

जरी कामादि सांडिसी । जीवन्मुक्ति-सुख पावसी ।
कामादि अंगिकारिसी । दृष्ट दुःख नासेना ॥२३॥
जर तू कामादिकांचा त्याग केलास तर तुला जीवन्मुक्तीचे सुख प्राप्त होईल. जर तू कामादिकांचा अंगीकार केलास तर समोर पाहिलेले द:खही नष्ट होणार नाही. (२३)

श्रोता म्हणे जालिया ज्ञान । मोक्ष तो नव्हे अप्रमाण ।
जन्ममरणाचें खंडण । ज्ञानें जालें ॥२४॥
श्रोता यावर म्हणतो की, ज्ञान झाल्यावर मोक्ष मिळतोच. ज्ञानानेच जन्ममरणाचेही खंडन झाले आहे. (२४)

नव्हे जरी जीवन्मुक्ति । दृष्ट दुःखे न नासतीं ।
अंतकाळीं होय मुक्ति । इतुकेंचि पुरे ॥२५॥
जर जीवन्मुक्ती प्राप्त झाली नाही, तर समोर पाहिलेली दुःखे फारतर नष्ट होणार नाहीत. तेव्हा निदान अंतकाळी तरी मुक्ती मिळाली तरी तेवढेही पुरेसे होईल. एवढे आश्वासन पुरे आहे. (२५)

वक्ता म्हणे ऐका वचन । अत्यंत दोष कामालागून ।
राहतां घडे यथेष्टाचरण । हेंचि निषिद्ध ॥२६॥
यावर वक्ता म्हणतो की, "एक विचार ऐकून घ्या. कामाच्या ठिकाणी अत्यंत दोष आहेत. काम राहिला तर यथेष्टाचरण घडते, हेच सर्वात निषिद्ध आहे. (२६)

ज्ञानापूर्वीं कामे सळिलें । तेणें अत्यंत दुःख झाले ।
पुढें यथेष्टाचरणीं वर्तले । लोकनिंदा होईल ॥२७॥
ज्ञानापूर्वी कामाने अत्यंत छळल्यामुळे अतिशय दुःख होते. त्यामुळे यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती होते. त्यामुळे लोकनिंदा होते. (२७)

इहलोकीं मुक्तिसुखाचें फळचि गेलें हातींचें ।
कोण जाणें मोक्षा अंतींचें । देहपातानंतरें ॥२८॥
तात्पर्य, इहलोकीचे मुक्तिसुख हातचे गमवावे लागेल. देह पडल्यानंतर अंतीच्या मोक्षाबद्दल कोण जाणे! (२८)

जो या कामाकरितां । जीवन्मुक्ति होय त्यागितां ।
पुढें स्वर्गादि अपेक्षितां । विदेहमुक्ति त्यागील ॥२९॥
जो या कामाकरिता जीवन्मुक्तीचा त्याग करतो, पुढे स्वर्गादी सुखाच्या अभिलाषेकरता विदेहमुक्तीचाही तो त्याग करील" (२९)

श्रोता म्हणे स्वर्गसुखासी । नाश आहे निश्चयेंसी ।
त्याची अपेक्षा कायसी । स्वसुखापुढें ॥३०॥
यावर श्रोता म्हणतो की, स्वर्गसुखाला निश्चितपणे नाश आहे. स्वसुखापुढे स्वर्गसुखाची अपेक्षा कशासाठी करायची ? (३०)

वक्ता म्हणे भले भले । स्वर्गसुख म्हणसी नाथिलें ।
कामादि दुष्ट दोषें भरलें । त्याची अपेक्षा करिसी ॥३१॥
तेव्हा वक्ता म्हणतो की, "वा! वा! स्वर्गसुख लटके आहे असे म्हणतोस आणि ते नको म्हणतोस ! आणि जे कामादी अनेक दुष्ट दोषांनी भरले आहेत त्यांची अपेक्षा करतोस ! " (३१)

तत्त्ववेत्ता हो‍ऊनी । प्रवर्तसी यथेष्टाचरणीं ।
तरी श्वानसूकरादि योनी । त्याहून विशेष कोणतें ॥३२॥
"तत्त्ववेत्ता असूनही यथेष्टाचरणाकडे प्रवृत्त होतोस ! तरी श्वान सूकर इत्यादी योनीमध्ये आणखी काय वेगळे असते ? " (३२)

अहो आश्चर्य ज्ञानाचें । दुःख मोठें लोकनिंदेचें ।
हेंचि वैभव तत्वज्ञानाचें । तुजचि साजे ॥३३॥
"काय आश्चर्य आहे पहा! ज्ञान प्राप्त होऊनही लोकनिंदेचे भय बाळगतोस! हेच का तझ्या तत्त्वज्ञानाचे वैभव ? ते तुझे तुलाच शोभून दिसो! " (३३)

आणीक एक उपपत्ति । यथेष्टाचरणनिवृत्ति ।
वार्षिकीं  प्रवाहीं नदी वाहती । महापूर येतां ॥३४॥
यथेष्टाचरणापासून निवृत्त होण्यासाठी आणखी एक उपपत्ती आहे. पावसाळ्यात महापूर येऊन जी नदी आपल्या पात्रातून प्रवाहाने वाहू लागते, (३४)

उष्णकाळीं पात्र फोडिलें । ऐसें नाही ऐकिलें ।
अज्ञानीं कामादि त्यागिलें । ज्ञान जालिया राहतीना ॥३५॥
तिने उन्हाळ्यात आपले पात्र फोडले व ती दुथडी ओलांडून वाहू लागली, असे कधी ऐकले नाही. अज्ञानात ज्या कामादिकांचा त्याग केला, ते ज्ञान झाल्यावर कसे राहतील ? (३५)

तथापि वैरी कामादिक । अज्ञान कार्य हे सकळिक ।
राहतां ज्ञानाचा परिपाक । जालाचि नाहीं ॥३६॥
तरीसुद्धा कामादिक हे जे वैरी आहेत ते अज्ञानातून निर्माण झाले आहेत. ज्ञानानंतर ते शिल्लक राहतात याचा अर्थ ज्ञानाचा पूर्ण परिपाक अद्याप झालाच नाही असा होतो. (३६)

शांतिरसाचें होतां पान । तृष्णेचें होय निसंतान ।
नित्यानंदे तृप्त पूर्ण । इच्छी कोण कामादि ॥३७॥
शांतिरसाचे पान केल्यामुळे तृष्णा समूळ नष्ट होते. नित्यानंदाने तृप्त व पूर्ण असल्यानंतर कामादिकांची कोण इच्छा करील ? (३७)

दोषदृष्टी याचा त्याग । करुनी होईजे निसंग ।
देह जैसा प्रारब्धयोग । वर्तो सुखें ॥३८॥
तेव्हा दोषदृष्टीने त्यांचा त्याग करून निःसंग व्हावे मग जसा प्रारब्धाचा योग असेल तसा देह खुशाल राहेना का ? (३८)

श्वानसूकरासी तुल्यता । नांगिकारीं तूं तत्ववेत्ता ।
जगीं पूज्य होई समस्तां । देवासारिखा ॥३९॥
तेव्हा हे तत्त्ववेत्त्या, तू श्वानसूकरांप्रमाणे होऊ नकोस. जगात सर्वांना देवांसारखा पूज्य हो. (३९)

तुजला सुख जीवन्मुक्तीचें । शास्त्ररीती वर्ततां साचें ।
प्रमाण घेवून वर्तणुकीचें । जनां मार्ग लागे ॥४०॥
शास्त्रात सांगितलेल्या रीतीने तू वर्तन करू लागलास तर तुलाही जीवन्मुक्तीचे सुख लाभेल आणि तुझ्या वर्तनाचा आदर्श मानून लोकांनाही मार्गदर्शन होईल. (४०)

आपण तरून जगातें तारी । तोचि ईश्वर गा निर्धारी ।
म्हणुनि त्याग केलाचि करी । कामादिकांचा ॥४१॥
आपण तरून जो विश्वाला तारतो तोच खरा ईश्वर होय. म्हणून लोकांच्यापुढे आदर्श ठेवण्यासाठी कामादिकांचा त्याग झालेला असला तरी पुन्हा त्याग कर. (४१)

अशास्त्रीय तीव्र जें जीवद्वैत । याचें हनन तो जीवन्मुक्त ।
परी मंद जें जीवद्वैत । तेंहि जिंकावें ॥४२॥
अशास्त्रीय तीव्र जीवद्वैताचा नाश करणारा तो जीवन्मुक्त होतो. पण त्याचबरोबर मंद जीवद्वैतही त्याने जिंकावे. (४२)

म्हणसी कामादि गेलिया । मनोजय तो कासया ।
अनर्थहेतु नव्हे तया । काय काज ॥४३॥
यावर असे म्हणशील की, कामादी नष्ट झाल्यावर मनोजय कशासाठी करायचा ? जर ते मन अनर्थाला कारणीभूत नसेल तर त्याची फिकीर कशाला ? (४३)

हें अनर्था नव्हें कारण । प्रत्यक्ष परी परंपरेनें ।
कामादिकांचे बीज पूर्ण । तें हेंचि मन ॥४४॥
यावर उत्तर असे की, मन हे प्रत्यक्ष अनर्थाला कारणीभूत नसेल, पण परंपरेने ते अनर्थकारक ठरते. सर्व कामादिकांचे बीज हे मनच आहे. (४४)

विषय ध्यातां उपजे संग । संगे काम क्रोध मग ।
मोह होतां स्मृतिभंग । बुद्धिनाशें प्रणश्यति ॥४५॥
विषयांचे चिंतन केले की आसक्ती निर्माण होते. आसक्तीने काम, क्रोध निर्माण होतात. क्रोधामुळे मोह निर्माण होतो आणि मोहामुळे स्मरण नाहीसे होते आणि एकदा का स्मरण नाहीसे झाले की बुद्धी नाश पावते आणि बुद्धिनाशामुळे विनाश होतो. (४५)

ऐसे परंपरा अनर्थकर । यास्तव मनोजय हाचि सुखकर ।
श्रोता आक्षेपी सत्वर । म्हणे विरोध दिसे ॥४६॥
अशा त-हेने मन हे परंपरेने अनर्थकारक आहे. म्हणून मनोजय हा सुखकारक ठरतो. यावर श्रोता लगेच आक्षेप घेतो. तो म्हणतो की या तुमच्या प्रतिपादनात विरोध दिसतो. (४६)

मनासवें कासया जावें । स्वस्वरूपातेंचि अनुभवावें ।
यासि मृगजलवत्‌ पाहावें  मागें ऐसें बोलिला ॥४७॥
स्वस्वरूपाचा अनुभव घेत असताना मनाबरोबर जायचेच कशाला ? मनाला मृगजळाप्रमाणे पहावे असे तुम्हीच म्हणालात. (४७)

आतां मनोजय करावा म्हणतां । हाचि विरोध तत्त्वतां ।
वक्ता म्हणे पाहा पुरता । हाचि मनोजय ॥४८॥
आणि आता मनोजय करावा असे तुम्ही म्हणत आहात! हाच विरोध होय, यावर वक्ता म्हणतो की, नीट पहा. अरे स्वरूपचिंतन हाच मनोजय होय. (४८)

विषयचिंतन मात्र सांडावें । चिदचित्तादात्म्य न व्हावें ।
मग दिसेना कां स्वभावें । मृगजलापरी ॥४९॥
विषयांचे चिंतन तेवढे सोडून द्यावे. चित् आणि अचित् यांचे तादात्म्य होऊ देऊ नये. मग खुशाल ते मृगजलाप्रमाणे दिसेना का ? (४९)

हा सरूप वासनाक्षय । हाचि बापा मनोजय ।
सविकल्प समाधि होय । हाचि स्मृतिरूप ॥५०॥
हा सरूप वासनाक्षय होय. हाच मनोजय होय. यालाच स्मृतिरूप सविकल्प समाधी म्हणावे. (५०)

हें जीवन्मुक्तीचें लक्षण । विस्तारें पुढें निरूपण ।
अशास्त्रीय जीवद्वैतहनन । येथें जालें ॥५१॥
हे जीवन्मुक्तीचे लक्षण होय. याचाच विस्तार पुढे करू. येथे अशास्त्रीय जीवद्वैताचे निरसन कसे करावे हे येथे सांगून झाले. (५१)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
जीवद्वैतसंहारे । प्रथमसमासः ॥१॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
जीवन्मुक्तिलक्षण


जीवन्मुक्तीचें श्रवण । सर्वांसी असे प्रयोजन ।
याचा अव्हेर करी कोण । विना पशू ॥१॥
जीवन्मुक्तीचे श्रवण सर्वांनीच करावे. ते सर्वांनाच उपयोगी आहे. पशूखेरीज दुसरा कोण मानवप्राणी त्याचा अव्हेर करील ? (१)

जीवन्मुक्ताची स्थिति । अति आनंद ज्ञात्या प्रति ।
साधका मननसंपत्ति । सदृढ होय ॥२॥
जीवन्मुक्तीच्या स्थितीच्या श्रवणाने ज्ञात्याला अतिशय आनंद होतोच, पण साधकाचीसुद्धा मननसंपत्ती दृढ होते. (२)

मुमुक्षूसी वाटे मनीं । हीं चिन्हें कधीं मजलागुनी ।
प्राप्तिसाठीं साधनीं । नित्य नूतन श्रद्धा ॥३॥
मुमुक्षूला वाटते, ही चिन्हे आपल्याला कधी प्राप्त होतील ? त्यामुळे ती प्राप्त करण्यासाठी साधनांच्या ठिकाणी तो नित्य नवी श्रद्धा बाळगत जातो. (३)

बद्ध जरी हे ऐकतां । क्षणभरी पस्तावती चित्ता ।
तयासीही अनुताप होतां । मुमुक्षा उपजे ॥४॥
बद्धांनी जर ती ऐकली तर त्यांना क्षणभर पश्चात्ताप वाटू लागतो आणि त्यांनासुद्धा पश्चात्तापामुळे मुमुक्षा उत्पन्न होते. (४)

हटयोगी जरी जाले । जीवन्मुक्तीसी अंतरले ।
तयासी ऐसें जरी कळलें । म्हणती कष्टलों व्यर्थ ॥५॥
जर हठयोग्यांनी जीवन्मुक्तीची स्थिती ऐकली तर स्वत: जीवन्मुक्तीच्या अनुभवाला अंतरल्यामुळे त्यांना दु:ख होते आणि ते म्हणू लागतात, "इतके दिवस आपण उगाचच कष्ट उपसत होतो. " (५)

असो हा सर्वांचा विषय । मुमुक्षुसाधकां हाचि उपाय ।
जीवन्मुक्ता संचारु होय । तोचि अवधारा ॥६॥
असो, हा सर्वांचाच विषय आहे. मुमुक्ष, साधक यांना हाच एक मार्ग आहे. जीवन्मुक्तांचा याच अवस्थेत संचार असतो. म्हणून त्याचे स्वरूप ऐका. (६)

साधकसिद्धां नाहीं भेद । करणें हा साधका छंद ।
निःसंशय सिद्ध निर्द्वंद्व । सहजस्थिति ॥७॥
साधक आणि सिद्ध यात भेद नाही. साधक कार्य करत असतो, त्याचा तोच एक छंद असतो आणि सिद्ध हा नि:संशयपणे निर्द्वद्व सहजस्थितीत असतो. (७)

गेली अवघी तळमळ । आनंदें डुले सर्वकाळ ।
तिहीं अवस्थेसी कल्लोळ । समाधिसुखाचे ॥८॥
त्याची सर्व तळमळ नष्ट होऊन तो सर्वकाळ आनंदाने डुलत असतो. तिन्ही अवस्थांमध्ये त्याच्यावर समाधिसुखाचे कल्लोळ दाटत असतात. (८)

आत्मा ब्रह्म परिपूर्ण । कैचें समाधि उत्थान ।
त्याहून आपण असावें भिन्न । तरी अवस्थांतर होतें ॥९॥
आत्मा परिपूर्ण ब्रह्म असून त्याच्या ठिकाणी समाधी कसली आणि उत्थान कसले ? आपण त्याहून भित्र असतो तर असे अवस्थाभेद झाले असते. (९)

आतां करणें ना धरणें । पाहणें ना ऐकणें ।
चालणें ना बोलणें । तेंहि नाहीं ॥१०॥
आता काही करणे नाही, की धरणे नाही; पाहणे नाही की ऐकणे नाही; चालणे नाही किंवा बोलणे नाही, काहीच क्रिया नाही. (१०)

निद्रा ना आहार । स्वप्न ना जागर ।
बैसणें ना व्यापार । तेंहि नाहीं ॥११॥
निद्रा नाही, आहार नाही; स्वप्न नाही की जागृती नाही; बसून राहाणेही नाही अथवा व्यापार करणेही नाही; काहीच नाही. (११)

इंद्रिय विषय देवता । भिन्नपणें कैची आतां ।
अंतःकरण प्राणां समस्ता । एकरस जालें ॥१२॥
इंद्रिये, विषय, देवता आता भिन्न कशी असतील ? अंत:करण, सगळे प्राण हे सगळे एकत्र येऊन एकरस झालेले असतात. (१२)

तोंवरी अलंकारा मासले । जों मुसेंत नाहीं साठवले ।
अग्निसंगे जरी आटिले । तरी मग सुवर्ण ॥१३॥
अलंकार मुशीत आटवले नाहीत तोपर्यंत वेगवेगळे वाटतात. पण अग्नीच्या संपर्काने ते आटवले की सगळेच सोने होऊन जाते. (१३)

जेव्हां होती अलंकार । सुवर्णचि आंतबाहेर ।
हा वाचारंभण प्रकार । नामरूपाचा ॥१४॥
जेव्हा ते अलंकारस्वरूपात येतात तेव्हाही त्यांच्यात अंतर्बाह्य सोनेच असते. सोन्याला अलंकार असे म्हणणे म्हणजे नामरूपांचा शब्दांनी बोलण्याचा प्रकार होय. (वाचारंभण) . (१४)

माझे अस्तित्वें भरले । माझे स्फुरणें दिसूं लागले ।
पृथक्सत्व कैचें आलें । यासि मजवांचुनी ॥१५॥
हे सर्व माझ्या अस्तित्वाने व्यापले आहे. माझ्या स्फुरणामुळे ते सर्व मला दिसताहेत. माझ्यावाचून त्यांना वेगळे अस्तित्व कसे येईल ? (१५)

आतां मीच सदोदित । देहगेहा मी नातळत ।
शुद्धबुद्ध मी अनंत । अवस्था मज केवी ॥१६॥
मीच नेहमी असणारा असून देह, घर इत्यादींनी मी बंदिस्त होणारा नाही. मी त्यांच्या पलीकडचा आहे. मी शुद्ध, बुद्ध आणि अनंत असून मला अवस्था कशा असतील ? (१६)

देहासि घडे व्यापार । म्हणसि कैसा निर्विकार ।
येविशींचे उत्तर । सावध ऐका ॥१७॥
आता देहाचे व्यापार होताना दिसत असूनही आपण निर्विकार आहोत असे कसे म्हणतोस, असे म्हणशील तर त्याचे उत्तर ऐक. (१७)

तरंग जळेंविण न राहे । तरंगीं पाहतां पाणीच आहे ।
परी तरंग अवस्था साहे । जळासि केवी ॥१८॥
लाटा पाण्यावाचून राहात नाहीत. पण लाटात पाहता पाणीच असते. पण अवस्था तरंगांचीच असते. जळाची नसते. (१८)

मज वांचून प्राणादिकासी । असणेंचि नाहीं निश्चयेसी ।
माझें सदत्व या सर्वांसी । सारिखें असे ॥१९॥
माझ्यावाचून प्राणादिकांना अस्तित्व खात्रीपूर्वक नसते. त्या सर्वांना माझेच अस्तित्व (सदत्व) व्यापून असते. (१९)

परी त्या त्या नामरूपात्मकाचे । धर्म मजलागी न वचे ।
सुखदुःख उद्‌भवलयाचे । ज्याचे त्या विकार ॥२०॥
पण नामरूपात्मक विकारांचे गुणधर्म मला लागत नाहीत. सुख, दु:ख, उद्भव, लय हे विकार ज्याचे त्याला बाधतात. मला नाही. (२०)

मी विकारापूर्वी आहे । विकार होतां जाणताहें ।
लया जातां असतची आहें । असण्यानसण्याविण ॥२१॥
मी विकारापूर्वी होतो, विकार होत असताना त्यांना जाणत होतो, विकार लयाला जाताच मी असण्यानसण्याच्या अवस्थांवाचून अस्तित्वात असतोच. (२१)

म्हणुन मी सर्वातीत । व्यापून धर्म धर्मीसहित ।
या सर्वांसी येतां अंत । मी जैसा तैसा ॥२२॥
म्हणून मी धर्म आणि धर्मी या सर्वांना व्यापून त्या सर्वांच्या अतीत आहे. त्या सर्वांचा अंत झाला तरी जसाच्या तसा राहतो. (२२)

अवस्था धर्म बुद्धि धर्मी । जागृति स्वप्नातें नेमी ।
अथवा लीनत्वें अज्ञान तमीं । सुषुप्तीं बुद्धीसी ॥२३॥
अवस्था ही धर्म असून बुद्धी ही धर्मी असते. जागृती, स्वप्र या अवस्था तीच नेमते आणि सुषुप्ती अवस्थेत ती अज्ञानरूपी अंधकारात लीन होऊन जाते. तेव्हा या तिन्ही अवस्था बुद्धीच्याच होत. (२३)

जागृतींच्या व्यापारी । इंद्रियें धावती विषयावरी ।
धर्मिधर्मत्वें निर्धारी । भिन्न भिन्न असती ॥२४॥
जागृतीच्या व्यापारात इंद्रिये विषयावर धाव घेतात. त्यावेळी धर्म व धर्मी वेगवेगळे असतात. (२४)

श्रोत्र-शब्द-वाचे-तें । अधिष्ठिलें मिया त्यातें ।
परी ऐकणें बोलणें मातें । स्पर्शलें नाहीं ॥२५॥
मी श्रोत्र, शब्द, वाचा यांना अधिष्टून असतो. पण ऐकणे, बोलणे यांचा मला स्पर्श होत नाही. मी त्यांच्या पलीकडचा आहे. (२५)

त्वचा स्पर्श पाणी । वेगळें कैचे मजवाचुनी ।
परी स्पर्शत्वग्रहणदानीं । नातळेंचि मी ॥२६॥
त्वचा, स्पर्श, हात हे माझ्यावाचून वेगळेपणाने कसे असतील ? पण स्पर्शत्व, ग्रहण, दान यांच्या मी पलीकडेच असतो. (२६)

चक्षु पाद आणि रूपातें । व्यापिलें मिया अनंते ।
परी पाहणें चालणें मातें । किमपि नाहीं ॥२७॥
चक्षू, पाय आणि रूप यांना अनंत अशा मीच व्यापून टाकले आहे. पण पाहणे, चालणे या क्रिया माझ्या नाहीत. (२७)

रसना उपस्थ मात्रा रस । मजमाजीं असे वास ।
परी अन्नपानरतिसुखास । मज संबंध असेना ॥२८॥
जीभ, शिश्न, मात्रा, रस हे सर्व माझ्यामध्येच राहतात. पण अन्नग्रहण, पिणे, रतिसुख यांचा माझ्याशी काही संबंध नाही. (२८)

घ्राण गुद गंध विषय । माझा सर्वत्रीं अन्वय ।
सुगंध विसर्ग जो होय । मज काय तेणें ॥२९॥
तसेच घ्राण, गुद, गंध या सर्वांच्या ठिकाणी माझाच संबंध असूनही जो विसर्ग अथवा सुगंध निर्माण होतो, त्याचे मला काय ? (२९)

जन्ममृत्यु धर्म शरीराचे । तैसेचि बाल्यादि अवस्थेचे ।
मज भय काय असे त्याचें । मज म्या ओळखितां ॥३०॥
जन्म, मृत्यू हे शरीराचे धर्म होत. त्याचप्रमाणे बाल्यादी अवस्थांच्या बाबतीत म्हणता येईल. पण एकदा मला माझी ओळख पटली की मला त्यांची कसली भीती ? (३०)

क्षुधा तृषा प्राणधर्म । तेणें देहाची पुष्टि परम ।
मी परिपूर्ण आत्माराम । स्थूळ रोड नव्हे ॥३१॥
क्षुधा, तृषा हे प्राणधर्म असून त्यांमुळे देहाचे पोषण होते. मी मात्र परिपूर्ण असा आत्माराम आहे. स्थूल, रोड ही विशेषणे मला लागू नाहीत. (३१)

मनोधर्म मोह शोक । अविवेकेंचि वाहतसे धाक ।
मी केवळ निष्कलंक । चंचलत्व नाहीं ॥३२॥
मोह, शोक हे मनोधर्म असून केवळ अविवेकाने मी त्यांचा धाक बाळगत होतो. मी केवळ निष्कलंक असून चंचलत्वादी गुणधर्म माझ्या ठिकाणी नाहीत. (३२)

वर्ण आश्रम मज कैचा । अवघा जोजार स्थूलाचा ।
तेणेंविण कर्मधर्माचा । कर्ता मी नव्हे ॥३३॥
वर्ण, आश्रम हे मला कुठले ? हा सगळा स्थूलाचा पसारा आहे. मी त्यापासून अलिप्त असून कर्मधर्म इत्यादीचा मी कर्ता नाही. (३३)

अंतःकरण हें प्रमाण । इंद्रियद्वारा विषयग्रहण ।
यास्तव प्रमाता अभिधान । आभासा आलें ॥३४॥
अंत:करण हे प्रमाण (साधन) असून इंद्रियांच्या द्वारा जीव विषयांचे ग्रहण करतो. त्यामुळे चिदाभास जो जीव त्याला प्रमाता असे म्हणण्यात येते. (३४)

तया कर्ता भोक्ता आरोप । यथार्थ नव्हे जीवासि रूप ।
तरी माझा ठाई आपेआप । न बोलतां अकर्तृत्व ॥३५॥
त्याच्यावरच कर्ता, भोक्ता इत्यादी आरोप केले जातात. जीवाचे हे खरे स्वरूप नाही. माझ्या ठिकाणी मात्र न बोलता सहजच अकर्तृत्व आले आहे. (३५)

मी करी ना करवी । भोगी ना भोगवी ।
हले ना हलवी । चंचळपणें ॥३६॥
मी करत नाही किंवा करवीतही नाही, मी भोगत नाही किंवा भोगवीतही नाही, मी चंचलपणे हलत नाही किंवा हलवीत नाही, (३६)

जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । अथवा समाधि ज्यातें म्हणती ॥
मजसी संबंध अर्थाअर्थी । कल्पांती नाहीं ॥३७॥
जागृती, स्वप्र, सुषुप्ती अथवा जिला समाधी म्हणतात, त्यांचा आणि माझा कल्पान्तापर्यंत देखील अर्थाअर्थी संबंध येणार नाही. (३७)

व्यापार व्हावा कीं राहावा । देह दुःखी कीं सुखी व्हावा ।
जन्मतां मरतां असावा । संबंध मज केवी ॥३८॥
व्यापार होवोत अथवा राहोत, देह दुःखी असो की सुखी, जन्मो की मरो, माझा त्यांच्याशी काय संबंध ? (३८)

एक पिंडीचा मासला । स्वानुभवें जाणीतला ।
हा ब्रह्मगोळ अवघा व्यापला । म्याचि व्यापकत्वें ॥३९॥
एका पिंडाचा हा स्वानुभव जाणून घेतला, पण हा सर्व ब्रह्मगोल माझ्या व्यापकत्वामुळे मी व्यापून टाकला आहे ! (३९)

एक देही असुनी । लिप्त नव्हे देहाचरणीं ।
तैसा सर्व ब्रह्मांडभुवनीं । व्यापून अलिप्त ॥४०॥
एका देहात असूनसुद्धा देहाच्या आचरणापासून मी अलिप्त आहे, तसा सर्व ब्रह्मांडभुवन व्यापूनही मी अलिप्त आहे. (४०)

मी सुखदुःखा नातळें । पापपुण्यासी निराळे ।
चंचळ जळीं प्रतिबिंब चळे । मुख्य बिंब ते चळेना ॥४१॥
मी सुखदु:खांच्या पलीकडे आहे, पापपुण्यांपासून निराळा आहे. चंचल पाण्यात प्रतिबिंब हलते, मुख्य बिंब मात्र अचल असते. (४१)

कोठे चंचळ कोठें निश्चळ । परि मी एकलाचि असे सकळ ।
व्यापोनि अलिप्त केवळ । आकाश जैसें ॥४२॥
बिंब क्वचित चंचल असते, क्वचित निश्चल असते, पण मी मात्र एकटाच असून सर्व व्यापून आकाशाप्रमाणे अलिप्त असतो. (४२)

हेचि पुढें निरूपण । श्रोते ऐकोत सावधान ।
एक पिंडींचे विवेचन । स्वानुभवें केलें ॥४३॥
हेच निरूपण श्रोत्यांनी पुढील समासात सावधानपणे ऐकावे. हे एका पिंडाचे विवेचन स्वानुभवाने केलेले आहे. (४३)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
जीवन्मुक्तिलक्षणप्रकारे । द्वितीयसमासः ॥२॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
ब्रह्माण्डतादात्म्यप्रकार


पुढती जीवन्मुक्त लक्षण । सविकल्पात्मक जाण ।
सकळ ब्रह्मांडीं आपण । ब्रह्मगोळ आपणांत ॥१॥
यापुढे जीवन्मुक्ताचे लक्षण सांगावयाचे आहे. ते सविकल्पात्मक आहे. सर्व ब्रह्मांडात आपणच व्यापलेले असून सर्व ब्रह्मगोल आपल्यातच सामावलेला आहे, असा हा अनुभव आहे. (१)

मीतूंपण आटिलें निजरूपीं । माझें तुझें साठविलें मापीं ।
क्रीडे कैसा स्वस्वरूपीं । आपपर नेणतां ॥२॥
त्याने मी-तूपण ही भावना आत्मरूपात आटवून टाकलेली असते आणि माझे-तुझेपणाची भावना मापात बंदिस्त करून टाकलेली असते आणि त्यामुळे आपले परक्याचे असा भेद न ठेवता तो स्वस्वरूपात क्रीडा करतअसतो. (२)

जें जें तत्व दिसतें । नामरूप निस्तत्व वाटतें ।
अस्तिभाति संचलें तें । दुजे आढळेचि ना ॥३॥
जे जे तत्त्व नामरूपात्मक आढळते ते त्याला निस्तत्त्व म्हणजे असार वाटू लागते. ते तत्त्व अस्ति भातिमध्ये सामावलेले आहे असे त्याला जाणवते. अस्तिभातिशिवाय त्याला दुसरे काही आढळतच नाही. (३)

पृथ्वीवरी चालतां चरणीं । आपुली आपणा होय घसणी ।
पाय ठेवितां उचलोनी । तळीं ब्रह्म ॥४॥
पृथ्वीवर पायांनी चालत जात असताना आपणच आपल्याला घासत चाललो आहोत असे त्यालावाटते. एक पाऊल उचलून पुढे टाकावे तो आपल्या पायाखाली ब्रह्म सापडले आहे असे त्याला जाणवते. (४)

पृथ्वीचें कठिणत्व विरालें । चरण गमनासी विसरले ।
त्रैलोक्य पलाटण जरी केलें । तरी ठाईचा ठाई ॥५॥
त्याच्यासाठी पृथ्वीचे कठीणपण विरून जाते. पाय चालायचे विसरतात. त्याने त्रैलोक्याचे पर्यटन जरी केले तरी आपण जेथे होतो तेथेच आहोत असे त्याला वाटते. (५)

आपीं देह बुचकाळिला । आपण ओतप्रोत संचला ।
हे पाणी हा देह विसरला । तरी स्नान कैचें ॥६॥
पाण्यात देह बुचकळला तरी आपणच सर्वत्र ओतप्रोत भरून राहिलो असून आपल्यापेक्षा निराळे असे हे पाणी आहे, हे त्याचा देह विसरूनच जातो. मग त्याला स्नान कुठले ? (६)

अग्नि धडधडी रक्तवर्ण । आपण वर्णरहित अवर्ण ।
आंत बाहेरि व्यापून । अग्नित्व नाम सांडिले ॥७॥
अग्नी प्रखर असून रक्तवर्ण असतो. पण आत्मरूप मात्र वर्णरहित बिनरंगाचे असते. ते आतबाहेर सर्वत्र व्यापून असल्यामुळे अग्रीचे वेगळे नाव त्याने टाकूनच दिलेले असते. (७)

तेज आप तिजें अन्न । तीनच भूतें संपूर्ण ।
हें छांदोग्यश्रुतीचें वचन । यापासून चराचर ॥८॥
तेज, पाणी आणि अत्र (पृथ्वी) ही तीनच भूते सर्वत्र व्यापलेली आहेत असे छान्दोग्य उपनिषद (श्रुती) सांगते आणि या तीन भूतांपासून सर्व चराचरविश्व निर्माण झाले असे ती श्रुती सांगते. (८)

जितके भौतिक समस्त । तेथें तिन्हीं भूतें मिश्रित ।
तेज रक्त आप श्वेत । पृथ्वी कृष्ण ॥९॥
जेवढे म्हणून भौतिक (भूतांपासून उत्पन्न झालेले आहे ते) म्हणून जे जे काही आहे ते सर्व या तिन्ही भूतांनी मिश्रित आहे. तेज लाल असते, आप (पाणी) पांढरे शुभ्र असते आणि पृथ्वी कृष्ण (काळी) असते. हे तिन्ही वर्णच त्या भौतिक पदार्थात आढळतात. (९)

जड चंचल सकळिक । शीत उष्णप्रकाशक ।
तेथें तिहींचे रूपक । तिहीं वर्णी ॥१०॥
सगळे जड, चंचल, शीत, उष्ण, प्रकाशक असे जेवढे म्हणून पदार्थ आढळतात त्यांच्या ठिकाणी याच तीन भूतांचे रूप आढळते. यांच्याच तीन वर्णांनी ते पदार्थ व्यापलेले असतात. (१०)

चंद्रसूर्य तारांगण । औषधी धातू संपूर्ण ।
स्थावर जंगमें भिन्न भिन्न । नामरूप जितुकें ॥११॥
चंद्र, सूर्य, तारांगण, सर्व औषधी धातू, भिन्न भिन्न स्थावर पदार्थ, जंगम जीव असे जेवढे म्हणून नामरूपात्मक आहे, (११)

कृष्ण तितुकें अन्नाचें । श्वेतरूप तें आपाचें ।
रक्त जाणिजे तेजाचें । कार्यजात ॥१२॥
त्यांतील जेवढे म्हणून कृष्ण वर्णाचे आहे ते सर्व अन्नाचे (म्हणजे पृथ्वीचे) ; शुभ्रवर्णाचे ते आपाचे (जलाचे) आणि रक्त म्हणजे लाल ते तेजाचे कार्य आहे, असे जाणावे. (१२)

तिहींचे रूप निवडिलें । नामरूपा निस्तत्व आलें ।
वाचारंभण श्रुति बोले । तिन्हींच सत्य ॥१३॥
या तीन तत्त्वांचे रूप कळल्याबरोबर सर्व नामरूप व्यर्थ होते. श्रुती सांगते की ती सर्व नामरूपे म्हणजे वाणीचे विकार होत. तेव्हा वरील तीन भूतेच तेवढी सत्य होत. (१३)

सर्व मिथ्या कळावें । तिहीमाजीं समरसावें ।
पुढें तिहीं भूतांचे जाणावें । रूप कैसें ॥१४॥
अशा त-हेने सर्व मिथ्या आहे, असे कळावे आणि या तीन भूतांमध्येच सगळ्यांचा समावेश होतो, हे कळावे आणि त्यानंतर या तीन भूतांचे रूप कसे आहे ते जाणून घ्यावे. (१४)

एकमेकां संहारिती । पाहतां नासे हे प्रतीति ।
सत्यत्वें प्रतिपादी श्रुति । तरी लय बोलतीना ॥१५॥
ही तीन भूते एकमेकांचा संहार करतात, शेवटी ती नष्ट होतात अशी प्रतीती येते. श्रुतीने हे सर्व सत्यत्वानेच सांगितले आहे. अन्यथा तिने त्यांचा लय सांगितला नसता. (१५)

आणि तैसाचि अनुभव । सद्‌रूपेंवीण कैचा ठाव ।
विवेकें कळतां रूपनांव । निस्तत्वरूप ॥१६॥
आणि अनुभवही तसाच आहे. विवेकाने सर्व नामरूप हे मिथ्या आहे, असे कळल्यानंतर एका सद्‌रूपावाचून त्यांना अस्तित्व कसे असेल ? (१६)

तिहीं भूतांसी मिथ्यात्व आलें । भौतिकें तैसींच होती फोलें ।
सत्य सत्यत्वें उरलें । निस्तत्वेंविण ॥१७॥
अशा प्रकारे तिन्ही भूते मिथ्या ठरली. त्या भूतांपासून निर्माण झालेले सर्व भौतिक पदार्थही त्याचप्रकारे व्यर्थ ठरतात आणि शेवटी सत्य हे सत्यच ठरते. सर्व मिथ्या पदार्थांचा त्यावेळी अभाव होतो. (१७)

आतां चंचळ आणि अवकाश । हेचि माया शून्य फोस ।
निश्चळीं आकाश वायूस । रिगचि कैसा ॥१८॥
आता चंचल आणि अवकाशयुक्त जे असेल तीच माया होय. ती खरी शून्य आणि फोस आहे. तिला ब्रह्माच्या ठिकाणी प्रवेश नाही, आकाश हे सावकाश (अवकाशयुक्त) असते, आणि वायू चंचल असतो. मायेचे दोन्ही गुणधर्म या दोहोंच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनाही ब्रह्मामध्ये प्रवेश नाही. (१८)

समुद्रामाजी लवण । राहे जरी घर बांधून ।
तरीच वायू आणि गगन । स्वस्वरूपीं राहे ॥१९॥
मिठाचा समुद्रामध्ये घर बांधून राहण्याचा प्रयत्न जर यशस्वी झाला तरच वायू आणि आकाश स्वस्वरूपात (ब्रह्मात) राहतील. (१९)

जोंवरी पाणियासी वेगळें । तोंवरी लवण राहिलें ।
जोंवरी स्वरूप नाहीं कळलें । तोवरी गगन वायू ॥२०॥
मीठ जोपर्यंत पाण्यापासून वेगळे असते तोपर्यंतच त्याला स्वतंत्र अस्तित्व असते. त्याप्रमाणे स्वरूप जोपर्यंत कळले नाही, तोपर्यंतच आकाश आणि वायू अस्तित्वात असतात. (२०)

परब्रह्मीं होतां अभिन्न । अवकाश आणि चंचलपण ।
निस्तत्वें उरे सद्‌रूपाविण । जळेंवीण तरंग जैसा ॥२१॥
आकाश आणि वायू परब्रह्मात अभिन्नपणे विलीन होताच अवकाश आणि चंचलत्व हे गुणधर्म पाण्यावाचून जशा लाटा त्याप्रमाणे सद्‌रूपाअभावी अस्तित्वशून्य होतात. (२१)

असो ऐसा जीवन्मुक्त । परब्रह्मीं असे क्रीडत ।
उर्णनाभि तंतु सृजित । आणि विहरत एकला ॥२२॥
असो तर कोळी नावाचा किडा (ऊर्णनाभी) तंतू निर्माण करतो आणि एकटाच विहार करतो, त्याप्रमाणे जीवन्मुक्त परब्रह्मामध्ये विहार करत असतो. (२२)

होतां वृत्तीचें स्फुरण । सर्व जगा करी निर्माण ।
शेवटीं वृत्तींत साठऊन । तेहि ग्रासून आपण उरे ॥२३॥
वृत्तीचे स्फुरण होताच तो सर्व जगाची निर्मिती करतो. शेवटी त्या सर्व जगाची वृत्तीत साठवण करून, अखेर तेही ग्रासून (गिळंकृत करून) पुन्हा आपण एकटाच उरतो. (२३)

ऐसें चराचर आपणांत । आपणचि ब्रह्मांडीं वर्तत ।
नामरूपाचा करुनि घात । एकरस स्वानंदीं ॥२४॥
अशा प्रकारे सर्व चराचर आपणात सामावून आपणच सर्व ब्रह्मांडात व्यापून, नामरूपांचा घात करून स्वानंदात एकरस होऊन तो राहतो. (२४)

ब्रह्मांड वृत्तींत साठवलें । कीं सप्तावर्णवापरी वेष्टिलें ।
जैसे समुद्रीं राहिले । नाना जलचर ॥२५॥
सर्व ब्रह्मांड त्याच्या वृत्तीत साठवलेले असते किंवा समुद्रात अनेक जलचर जसे राहतात त्याप्रमाणे त्याच्या वृत्तीने पृथ्वीच्या सात आवरणाप्रमाणे सबंध ब्रह्मांड वेढून घेतलेले असते आणि ते त्या जलचरांप्रमाणे त्याच्या वृत्तीत राहत असते. (२५)

ऐसें अनंत ब्रह्मांड । रेणू ऐसे उदंड ।
वृत्तींत करिती बुडबुड । निस्तत्वपणें ॥२६॥
अशा प्रकारे अनेक ब्रह्मांडे असंख्य धूलिकणांप्रमाणे त्याच्या वृत्तीत व्यर्थपणे बुडबुड करत असतात. (२६)

गवसणी अनंत ब्रह्मांडाची । मर्यादा नव्हे कीं वृत्तीची ।
मग केवळ निरावलंबाची । केवि बोलावी ॥२७॥
अनंत ब्रह्मांडांना गवसणी घालण्यापुरतीच त्याच्या वृत्तीची मर्यादा नसते. मग निरावलंब ब्रह्माची ती मर्यादा कशी सांगता येईल ? (२७)

अंत नव्हे म्हणोनि अनंत । ऐसा श्रुतीचा संकेत ।
ब्रह्मांडें जैसीं सागरांत । बुदबुद फेण ॥२८॥
त्याला अंत नाही म्हणून ते अनंत आहे. असा श्रुतीचा संकेत आहे. समुद्रात ज्याप्रमाणे बडबडे किंवा फेस असतो त्याप्रमाणे ब्रह्मांडे त्यात राहतात. (२८)

आपणावीण कांही नाहीं । आपणचि असे सर्वदाही ।
आतां नाहीं आहे कांहीं । बोलावे लागे ॥२९॥
आपल्यावाचून काहीही नाही आपणच एकटे सर्वकाळ असतो अशी जीवन्मुक्ताची अवस्था असते. त्याच्या बाबतीत काही आहे अथवा नाही असे बोलावेच लागत नाही. (२९)

आपुलिये निजस्वरूपीं । वृत्ति एकदेशी आरोपी ।
तया वृत्तिचिये मापीं । साठवलीं ब्रह्मांडे ॥३०॥
त्याने आपल्या निजस्वरूपाच्या एका भागात वृत्तीची स्थापना केलेली असते आणि त्या वृत्तीच्या मापट्यामध्ये ब्रह्मांडे साठवलेली असतात. (३०)

एका ब्रह्मांडाच्या पोटीं । अनंत पिंडांची दाटी ।
त्यांतील एक पिंडाची रहाटी । मी मी हे कोणेपरी ॥३१॥
त्यांपैकी एकेका ब्रह्मांडाच्या पोटात अनंत पिंडांची दाटी असते. त्यातील एका पिंडाने मी मी करत व्यवहार करणे हे किती क्षुद्र असेल! (३१)

मी मी होतां लहाणाळला । वाढत वाढत शेवटा गेला ।
अवधि सरतां मावळला । दीपु जैसा ॥३२॥
तो पिंड'मी मी म्हणत होता त्यावेळी तो खूप क्षुद्र झाला. पण तोच पिंड वाढत वाढत शेवटपर्यंत जाऊन पोहोचला आणि आपली मर्यादा किंवा मुदत संपताच दिवा विझावा त्याप्रमाणे अस्तंगत झाला. (३२)

आधीं एकपणें सांडिलें । मग बहुपणीं पैसावलें ।
एक बहु एकीं आटलें । एकपणेंविण ॥३३॥
आधी एकपणा धारण करून सर्व ब्रह्मांड त्याने बाजूस सारले. नंतर बहुपणा स्वीकारून तो विस्तारत गेला. एक होता तो बह झाला, पुन्हा शेवटी एकपणावाचून एकातच ते एक आणि बहू (पुष्कळ, व्यापक) सर्व आटून गेले. (३३)

आकाश राहिलें घटीं । घट आकाशाचे पोटीं ।
पिंड ब्रह्मांडीं ब्रह्माची दाटी । ब्रह्मी राहाटी सर्वाची ॥३४॥
आकाश घटात राहिले. घट आकाशाच्या पोटात राहिल. पिंड ब्रह्मांडात ब्रह्म व्यापून राहिले आणि त्या ब्रह्मात सर्व ब्रह्मांडे वावरू लागली. (३४)

घट जैसा आकाशीं फिरे । तैसा जीवन्मुक्त वावरे ।
आकाशापरी निश्चय बारे । ज्ञानीं अखंड ॥३५॥
घट ज्याप्रमाणे आकाशात वावरतो. त्याप्रमाणे जीवन्मुक्त वावरतो. ज्ञानी पुरुष आकाशाप्रमाणे अखंड असतो. (३५)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
ब्रह्मांडतादात्म्यप्रकारे । तृतीयसमासः ॥३॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
सविकल्पसमाधी


परब्रह्मीं नित्य विचरती । परी तयासी न जाणती ।
शयनप्राय ते सुषुप्ति । कलिप्राय तो बद्ध ॥१॥
परब्रह्मामध्ये नित्य संचार करूनही त्याला जे जाणत नाहीत ते बिछान्यावर झोपलेल्या माणसाप्रमाणे सुषुप्तिअवस्थेतच असतात. असा माणूस कलियुगाप्रमाणेच बद्ध होय. (१)

तें परब्रह्म जाणावें । ऐसें इच्छीं मनोभावें ।
शयनींच जागृतीं यावें । तोचि द्वापार मुमुक्षु ॥२॥
ते परब्रह्म जाणून घ्यावे, अशी मनोभावे इच्छा करतो, तो मुमुक्षू होय. बिछान्यावर असून जागा झालेल्या माणसाप्रमाणे तो असून द्वापार युगाप्रमाणे त्याची स्थिती असते. (२)

श्रवणमननें ब्रह्म जाणें । निदिध्यासें अपरोक्ष होणें ।
साधनीं संपन्न साधकपणें । उठिला तो त्रेतायुग ॥३॥
श्रवणमननाच्या योगाने ब्रह्म जाणावे, निदिध्यासाने त्याचे अपरोक्ष (प्रत्यक्ष) ज्ञान व्हावे असे ज्याला वाटते आणि साधनांनी जो संपत्र असतो तो अंथरुणावरून उठून कामाला लागलेल्या माणसाप्रमाणे असून तो साधक होय. त्याची स्थिती त्रेतायुगाप्रमाणे असते. (३)

साधनें संपून साध्य झाला । परब्रह्मीं संचरे एकला ।
तोचि जीवन्मुक्त बोलिला । कृतयुग तें ॥४॥
यापुढे साधने संपली आणि तो स्वत:च साध्यरूप बनला आणि परब्रह्मामध्ये एकटाच संचार करू लागला की तो खरा जीवन्मुक्त होतो. त्यावेळी त्याची स्थिती कृतयुगासारखी असते. (४)

सर्व जन जेथें जागती । तेथें जयासी आली सुषुप्ति ।
जन जेथें शयन करिती । तेथें जागृति अखंड ॥५॥
सर्व लोक जेथे जागृत असतात (लौकिक व्यवहारात रस घेत असतात) तेथे हा जीवन्मुक्त सुप्त दशेत असतो आणि लोक जेथे शयन करतात (पारमार्थिक विषयाकडे पाठ फिरवतात) तेथे हा अखंड जागृती (सावध, दक्ष) भोगत असतो. (५)

सर्वासि जें अगोचर । तेथेंचि जयाचें बिढार ।
सर्वांचा जेथे विहार । वमकापरी तें त्यागिलें ॥६॥
सर्वाना जे स्थान अदृश्य असते, तेथे त्याची वसती असते. आणि सर्वसामान्य लोक जेथे विहार करतात, ते स्थान त्याने ओकलेल्या पदार्थाप्रमाणे टाळलेले असते. (६)

सर्वाहूनी विलक्षण । विवेकें निघाला आपण ।
जनसमुदाय गेला टाकुन । ऐसेंहि न घडे ॥७॥
तो विवेकी असल्यामुळे सर्वांपेक्षा वेगळा असला, तरी तो लोकांचा समुदाय सोडून निघून जातो, असेही होत नाही. (७)

मथून नवनीत काढिलें । परी तक्रींच जैसे ठेविलें ।
पुन्हा जरी एक केलें । तरी नव्हे कल्पांती ॥८॥
दही घुसळून (मंथन करून) लोणी काढले, पण ते ताकातून वेगळे न काढता ताकातच ठेवले, तरी ते कल्पांतीही ताकात पुन्हा मिसळून जात नाही. (८)

तैसा जनसमुदाईं ज्ञाता । अलिप्त राहे जनीं वर्ततां ।
वर्तणूक तयाची तत्वतां । यथामति बोलूं ॥९॥
त्याप्रमाणे जनसमुदायामध्ये ज्ञाता वावरत असला, तरी त्या ताकातच राहिलेल्या लोण्याप्रमाणे अलिप्त असतो. त्याची वर्तणूक आतायथामती सांगतो. (९)

नामरूपातें सांडिलें । अस्तिभाति कोंदाटलें ।
म्हणे मीचि मातें देखिलें । नवल माझें ॥१०॥
नामरूपांचा त्याग केल्यानंतर सर्व विश्व त्याला अस्तिभाति प्रियात्मकाने कोंदाटलेले आढळते. आणि मग"अहो, काय आश्चर्य! मीच मला पाहिले! "असे तो म्हणू लागतो. (१०)

अहो मज माझा नमस्कारु । माझा मीच जाणे बडिवारु ।
वाहा वाहाजी सद्‌गुरू । मी मज चोजविला ॥११॥
"माझाच मला नमस्कार असो. माझा मोठेपणा मीच जाणतो. वा! सद्गुरुराया, तुम्ही माझीच मला ओळख करून दिलीत. " (११)

नेणों माझें अज्ञान । कोठें गेलें संपूर्ण ।
ज्ञानें ब्रह्मांडादि जाळून । राखोंडी केली ॥१२॥
"माझे सगळे अज्ञान कोठे गेले कळत नाही. ज्ञानाने सर्व ब्रह्मांडादी सृष्टी जाळून राख केली. " (१२)

मी येवढा घनदाट । कीं अणूसी नव्हे वाट ।
ओतप्रोत आणि अविट । काहींचा  बाही ॥१३॥
मी एवढा घनदाट असून आता अणूलाही तेथे शिरकाव नाही. असा मी ओतप्रोत अविकारी (अविट) , अविश्वसनीय वाटेने इतका वाढलो आहे. (काहीचा बाही) . (१३)

परि मी देसेना कोणासी । ब्रह्मादि कष्टतां सायासी ।
माझा मी अखंडैकरसीं । परिपूर्ण अनंत ॥१४॥
पण तरीसुद्धा मी कोणालाच दिसत नाही. ब्रह्मादी देव विनाकारण धडपडतात. पण मी मात्र अखंडैकरस अशा ब्रह्माने परिपूर्ण असून अनंत आहे. (१४)

माझा मज अंत कळेना । मज कोण आणितो अनुमाना ।
असो तैसा अंतःकरणा । न चोजवें मी ॥१५॥
माझा अंत (विस्तार, मर्यादा) मलाच माहीत नाही. माझे अनुमान तरी कोण करू शकणार ? माझ्या अंत:करणालासुद्धा माझे ज्ञान होत नाही. (१५)

तेथें जिव्हा हे चामडी । केउती पा बडबडी ।
परेनें मारिली दडी । जाणीव सांडुनी ॥१६॥
अशा परिस्थितीत जीभ ही केवळ चामडी ठरते. ती काय बडबड करील ? पराही जाणीव सोडून तेथे दडी मारते. (१६)

जें कां ज्ञानासी चोरिलें । तरी तेथें ज्ञानें काय केलें ।
अज्ञान जाळून मावळलें । उरलें चिन्मात्र तें मीं ॥१७॥
"जे ब्रह्म ज्ञानापासून लपून राहिले आहे, तेथे ज्ञान बापडे काय करणार ? त्याने अज्ञान जाळून टाकले व स्वत: मावळले. उरला तो केवळ चैतन्यरूप असा मी. " (१७)

मजला तूर्य ऐसे म्हणती । जाणतसें तिही अवस्थेप्रति ।
हे उपाधियोगें आरोपिती । मी स्वयंज्योती एकला ॥१८॥
"मला तूर्य (चौथा) असे म्हणतात, कारण मी तिन्ही अवस्थांना जाणतो. हा आरोप केवळ उपाधीच्यासंदर्भात माझ्यावर करतात. पण मी स्वयंप्रकाशी आणि एकटा आहे. " (१८)

मी तरी अखंड एकला । व्याप्येवीण केवि व्यापिला ।
नुसधेपणें थोटावला । अनुभव अनुभवी ॥१९॥
"मी अखंड असा एकटा आहे. व्याप्य पदार्थावाचून मी व्यापक आहे. मी एकटाच असल्याने अनुभवी आणि अनुभव असा भेद माझ्या ठिकाणी थोटा पडतो. ' (१९)

वेदें सर्व प्रकाशिलें । मज पाहून मौन धरिलें ।
मौनही सांडून राहिले । मीच हो‍ऊनी ॥२०॥
"वेदांनी सर्व प्रकाशित केले असले तरी मला पाहताच त्यांनी मौन धरले. पुढे तर ते मौनही टाकून ते मीच होऊन राहिले. '' (२०)

अहो हें ब्रह्मांड काय जालें । कीं मजमाजीं सांठवलें ।
मूळमायेचें घेतलें । आपोशन मीचि ॥२१॥
"अहो, हे ब्रह्मांड कोठे गेले ? की माझ्यामध्येच ते सामावले ? मी मूळमायेचेही आपोशन घेतले आहे. (म्हणजे मूळ मायेला संपवून टाकले आहे. ) " (२१)

येवढा परिपूर्ण मी असतां । नाथिली कल्पिली अहंममता ।
अहा कष्टलों निर्हेतुता । म्हणुन रडूंचि लागे ॥२२॥
"असा मी परिपूर्ण असता विनाकारणच मी खोटी अहंममता धारण केली आणि विनाकारणच की हो कष्टात पडलो"असे म्हणून तो रडू लागला. (२२)

लोक पुसती काय जालें । म्हणे माझे आईबाप मेले ।
पुत्रकांतेसी वधिलें । माझे म्यांचि ॥२३॥
यावर लोक त्याला विचारू लागतात, "काय हो! काय झाले ? "त्यावेळी तो म्हणतो"माझे आईबाप गेले! मीच माझ्या पत्नी आणि पुर्वाचा वध केला! " (२३)

लोक समजाविती कोडें । मन जालें स्वरूपा येव्हडें ।
माझा मी मजचि आवडे । हासूं लागे या हेतू ॥२४॥
यावर लोक ते कोडे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी त्याचे मन स्वरूपाकार होते. मग त्याचा तोच त्याला आवडू लागतो. त्यामुळे तो हसायला लागतो. (२४)

हासतां आनंदें दाटला । स्वेदरोमांचें थरारिला ।
आवेशें वेगिं उडाला । जाउनी पडला अन्य स्थानीं ॥२५॥
हसता हसता त्याचा आनंद दाटून येतो. त्याचे अंग स्वेद, रोमांच यांनी थरारून जाते आणि मग त्या भरात तो आवेशाने उडी मारतो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडतो. (२५)

अहो हें कैसें जालें । आश्चर्यें मन भुलून गेलें ।
देह नाचूंचि लागले । कळसूत्रापरी ॥२६॥
अहो हे कसे झाले! 'अशा आश्चर्याने त्याचे मन भुरळ पडल्याप्रमाणे होते आणि कळसूत्री बाहुलीप्रमाणे त्याचा देह नाचू लागतो. (२६)

माझिया सुखाची सरोभरी । लोक होतील वाटेकरी ।
म्हणोनि पळाला निर्धारी । मर्यादेविण ॥२७॥
"माझ्या या सुखात लोक बरोबरीने वाटेकरी होतील" असे म्हणून तो बेसुमारपणे धावत सुटतो. (२७)

माझे मीचि जाणें सुख । कोण जाणती बापुडे मूर्ख ।
म्हणोनि बैसला अधोमुख । पृथ्वीसारिखा ॥२८॥
कधी"माझे सुख मलाच ठाऊक. मूर्खाना त्याची काय कल्पना ? " असे म्हणून पृथ्वीकडे तोंड करून अधोमुख होऊन बसून राहतो. (२८)

जयाचा चोहटा तोचि एकांत । हटयोगी व्यर्थचि कष्टत ।
जनीं विजनीं सदोदित । ब्रह्म एकदेशी नव्हे ॥२९॥
चव्हाटा हाच त्याचा एकांत असतो. हठयोगी मात्र विनाकारण कष्ट घेत असतात. जनात-विजनात सर्वत्र सारखे असणारे ब्रह्म काही एकदेशी नाही. (२९)

खोलींत ब्रह्म योगियाचें । डोळांचि असे मुद्राधराचें ।
हें उघडें कैवल्य जयाचें । तोचि जाणें स्वप्रभ ॥३०॥
"योग्याचे ब्रह्म खोलीतच तेवढे आढळते; मुद्राधारकाचे ब्रह्म फक्त डोळ्यात साठवलेले असते, पण ज्याचे कैवल्य उघडे आहे, त्या जीवन्मुक्तालाच फक्त स्वप्रभ (स्वयंप्रकाशी) ब्रह्म खऱ्या अर्थाने जाणवते. " (३०)

उपासक वैष्णव म्हणती । देव असे वैकुंठाप्रती ।
शैवही गलबला करिती । शिव कैलासीं आहे ॥३१॥
"वैष्णव उपासक म्हणतात की, देव वैकंठात आहे, त्याचवेळी शैवही ओरडून सांगतात की शंकर कैलासात आहे. " (३१)

येवढा मोठा देवराय । वैकुंठीं कैलासीं कैसा सामाय ।
अहा हे भुलले काय । उपाय तो कळेना ॥३२॥
"पण एवढा मोठा देव वैकुंठात किंवा कैलासात कसा सामावला जाईल ? अहो, या लोकांना वेड लागले काय ? याला काय उपाय करावा ते समजत नाही. " (३२)

असो परोपदेशीं काज । काय असे बापा मज ।
माझें मजला गुह्य गुज । प्राप्त सद्‌गुरुप्रसादें ॥३३॥
"जाऊ द्या, परोपदेश करून मला काय साध्य होणार आहे ? मला मात्र सद्गुरुकृपेने गुह्य गोष्ट प्राप्त झाली आहे! " (३३)

अगस्तीनें तप केलें । सागरातें उदरीं भरिलें ।
मी तो दृष्टीनें ग्रासिलें । मायेसहित ब्रह्मांड ॥३४॥
अगस्ती ऋषींनी तप केले आणि त्या तप:सामर्थ्याने संपूर्ण सागर आपल्या पोटात सामावून घेतला. पण मी तर केवळ दृष्टीने सर्व मायेसहित ब्रह्मांडाला गिळून टाकले. " (३४)

मस्तकींचे केस उडती । ते स्वर्गसुखा वाकुल्या दाविती ।
अधोमुखें हात शेषाप्रती । म्हणती हा भारवाही ॥३५॥
जीवन्मुक्ताच्या मस्तकावरचे केस उडत असतात. ते जणू स्वर्गसुखाला वाकुल्या दाखवत असतात. त्याचे हात खाली वळलेले असतात. ते जणू शेषाला 'तू केवळ भारवाही आहेस' म्हणून हिणवत असतात. (३५)

नेत्रकटाक्षें पाहिलें । तेणें सदाशिवा सुचविलें ।
कीं तुमचें ऐश्वर्य प्राप्त जालें । मजलागी हें ॥३६॥
त्याने आपल्या नेत्रकटाक्षाने पाहून शंकराला सुचवले की, "पहा, मला तुमचे ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. " (३६)

विष्णूतें म्हणे अवतार घ्यावे । सज्जनासी प्रतिपाळावें ।
आमुचें वंदन तुम्हां बरवें । हस्तसंकेतें करी ॥३७॥
तो विष्णूला हाताने खुणावून म्हणतो की, "तुम्ही अवतार घ्यावे, सज्जनांचे परिपालन करावे. तुम्हाला माझे वंदन असो. " (३७)

अहो अहोजी ब्रह्मदेवा । आतां लोभ असो द्यावा ।
तुम्हां उत्पत्तीचा गोवा । बहुकाळ पडिला ॥३८॥
"अहो ब्रह्मदेवा, तुम्हाला उत्पत्तीचे श्रम फार काळ पडले. पण आमच्यावर लोभ असू द्या. " (३८)

पुन्हा वृत्ति चित्सागरीं । बुडून गेली निर्धारी ।
देह शुष्क तृणाचे परी । वर्तत असे ॥३९॥
अशा त-हेने विचार करत असतानाच त्याची वृत्ती पुन्हा चैतन्यात बुडून जाते आणि त्याचा देह मात्र वाळलेल्या गवताप्रमाणे झालेला असतो. (३९)

प्रारब्धें जे जे भोग येती । ते ते भोग यथारीती ।
संकल्पविकल्पाची रती । उरली नाहीं ॥४०॥
प्रारब्धाने जे जे भोग प्राप्त होतील ते ते तो भोग तो रीतीप्रमाणे भोगत असतो. संकल्पविकल्पांची आवड त्याला राहिलेलीच नसते. (४०)

बद्धता पुढें जातसे । मागें मोक्ष वाटा पुसे ।
एकेविण राहणें नसे । एकवरी जाउळिया ॥४१॥
बद्धता पुढे निघून जात असते आणि त्याच्यामागे मोक्ष वाटा पुसत येत असतो. जुळ्या मुलांमध्ये एकावाचून दुसऱ्याला करमत नाही तसे मोक्षाला त्याच्यावाचून राहवत नाही. (४१)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
सविकल्पसमाधिप्रकारे । चतुर्थ समासः ॥४॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
अंतकालप्रकार


ब्रह्मीं ब्रह्म परिपूर्ण । निर्भय ज्ञाता अभिन्न ।
देहायेवढेंपण । राहिलें नाहीं ॥१॥
ब्रह्म ब्रह्मामध्येच परिपूर्ण आहे. ज्ञाता निर्भय असून ब्रह्माबरोबर अभिन्न असतो. तो आता ब्रह्मरूप बनल्याने त्याची व्याप्ती देहापुरती मर्यादित राहिलेली नाही. (१)

देह हा आकल्प राहिला । अथवा आजचि मरण पावला ।
संबंध नाहीं गा तयाला । अर्थाअर्थी ॥२॥
त्याचा देह कल्पान्तापर्यंत राहिला किंवा आजच मरण पावला तरी त्याचा त्या देहाशी अर्थाअर्थी काही संबंध नसतो. (२)

चक्राचें भ्रमण पुरें । तरी आपेआप थावरें ।
तैसा श्वास जेधवा सरे । देह पडे अचेतन ॥३॥
चाकाची भ्रमणगती थांबताच ते आपोआप थांबते. त्याप्रमाणे श्वास संपताच देह अचेतन होऊन पडतो. (३)

क्रिमि विष्ठा अथवा भस्म । याचे तीनचि परिणाम ।
पुढें अनायासें अनुक्रम । पृथ्वीमाजीं ॥४॥
कृमी, विष्ठा अथवा भस्म असे त्याचे तीनच परिणाम होतात. पुढे शेवटी पृथ्वीत सहजपणे मिळून जाणे हे ओघानेच घडते. (४)

सर्वांची गती ऐसी । इतर लोकांची कल्पना कैसी ।
कीं मरावें काशीसी । प्रयागादितीर्थी ॥५॥
शुक्लपक्ष उत्तरायण । गृहीं दीप दिवामरण ।
अंतीं असावें स्मरण । उत्तर गतीसी ॥६॥
सर्वांची हीच गती असताना सर्वसामान्य लोक वेगवेगळ्या कल्पना करत असतात. उदाहरणार्थ, काशीमध्ये अथवा प्रयागादी तीर्थक्षेत्रांतच मरावे, उत्तरायणातील शुक्ल पक्ष असावा, गृहात दीप असताना किंवादिवसा मरण यावे, मरणोत्तर गतीसाठी अंतकाळी परमेश्वराचेस्मरण असावे इत्यादी. (५-६)

सुस्थळीं बोलतां चालतां । समुदाय असावा भोवतां ।
ऐसा जरी मृत्यु येतां । जना आश्चर्य वाटे ॥७॥
सुस्थळी मरण यावे, बोलता चालता ते यावे, त्यावेळी सभोवती लोकांचा समुदाय असावा इत्यादी;अशा प्रकारचा मृत्यू आला की लोकांना त्याचे आश्चर्य वाटते. (७)

ज्ञान अज्ञान कळेना । उगेचि करीति कल्पना ।
म्हणती कोठें हो वासना । गुंतली नाहीं ॥८॥
लोकांना ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय हे काही कळत नाही. मात्र ते उगीचच कल्पना करत बसतात, मृत जीवाची वासना कोठेही गुंतली नाही अशी भाषा ते करतात. (८)

न करितां तत्त्व विवेचन ।. नव्हे तो ब्रह्म सनातन ।
जरी आलें बरें मरण । तरी अधोगती ॥९॥
तत्वविवेचन केल्याखेरीज कोणीही प्राणी सनातन ब्रह्म होऊ शकत नाही आणि त्याखेरीज तसेच त्याला मरण आले तर अधोगती आहेच. (९)

ज्ञानेंवीण जें जें स्मरलें । तें तें पुढें प्राप्त जालें ।
म्हणती देवासी आठविलें । परि तें कैचें ॥१०॥
एका ज्ञानाखेरीज इतर ज्या ज्या गोष्टीचे त्याला स्मरण होते ते ते त्याला पुढे प्राप्त होतेच. देवाचे स्मरण झाले म्हणतात. पण ते कसचे स्मरण ? (१०)

जैसा असे पूर्वाध्यास । तेचि कल्पि मानस ।
दुःखें केलें कासावीस । भ्रमचि व्यापि ॥११॥
जसा त्याचा पूर्वाध्यास असतो त्याप्रमाणेच तो मनात कल्पना करतो. अंतकाळी त्याला दुःखाने कासावीस केले असता बुद्धीला भ्रमच व्यापतो. हाही एक प्रकारचा भ्रमच होय. (११)

तथापि पुण्यसंस्कारें । अंती देवातें स्मरे ।
तरी देवलोकीं वास बारे । कर्मानुसार होय ॥१२॥
तथापि काही पुण्यसंस्कारांमुळे अंतकाळी त्याला देवाचे स्मरण झाले तर त्याच्या कर्मानुसार त्याला देवलोकात वास्तव्य करावयास मिळते. (१२)

पुण्य असे तंवचिवरि । सरतां जन्मती भूमीवरी ।
ज्ञानावांचून निर्धारि । मोक्ष कैंचा ॥१३॥
पण हे वास्तव्य जोपर्यंत पदरी पुण्य असेल तोपर्यंतच करता येते. ते पुण्य संपताच त्यांना परत भूमीवर (पृथ्वीवर) जन्म मिळतो. ज्ञानावाचून मोक्ष कसा मिळेल ? (१३)

योगी अथवा उपासक । ब्रम्हरंध्रा पाडून भोंक ।
पावती सत्यादि ब्रह्मलोक । तेहि फल निकृष्ट ॥१४॥
योगी अथवा उपासक ब्रह्मरंध्राला भोक पाडून सत्यलोक, ब्रह्मलोक असे लोक प्राप्त करतात. पण तेही निकृष्टच होय. (१४)

कामना जरी दिव्य भोगाची । अधिकाधिक साची ।
सामुग्री सरतां गाठींची । पुन्हा जन्मे ॥१५॥
मनात जर स्वर्गीय सुखाची अधिकाधिक इच्छा असेल तर गाठची सामग्री संपताच त्यालाही पुन्हा जन्म घ्यावा लागतो. (१५)

वैराग्यें कामना जरी सांडिली । दिव्य भोगेच्छा अव्हेरिली ।
अपरोक्ष ज्ञानाची किल्ली । ब्रह्मयापासून प्राप्त ॥१६॥
त्याच्या अंगी वैराग्य असेल आणि त्याने कामनेचा त्याग केला असेल आणि त्यातही स्वर्गीय सुखाच्या भोगाची इच्छा नाकारली असेल तरीसुद्धा अपरोक्ष ज्ञानाची किल्ली ब्रह्मदेवाच्याच हातात असते. ती ब्रह्मदेवापासूनच प्राप्त होते. (१६)

तरी ब्रह्मदेवा होईल अंत । पंचभूतादि कल्पांत ।
तों काल राहे मूर्तिमंत । ब्रह्मदेवासह ॥१७॥
या परिस्थितीत ब्रह्मदेवाचा सुद्धा अंत होत असतो. पंचभूते कल्पान्तापर्यंत राहतात. त्या काळापर्यंत तो ब्रह्मदेवासह मूर्ती धारण करून राहतो. ११७)

सर्व जेव्हां लया जाय । त्याकाळीं मोक्षाची सोय ।
हा क्रममुक्तिप्रकार होय । कर्मयोगियासी ॥१८॥
जेव्हा हे सर्व लयाला जाते तेव्हा कोठे त्याच्या मोक्षाचा मार्ग सोपा होतो. कर्मयोगाचे आचरण करणाऱ्या योग्याला अशाप्रकारे क्रममुक्ती मिळते. (१८)

येचि देहीं येचि डोळां । न भोगिजे मुक्तीचा सोहळा ।
कोण जाणे अंतकाळा । क्रम मुक्तीच्या ॥१९॥
पण याच देहात, याच डोळ्यांनी मुक्तीचा सोहळा त्याला भोगता येत नाही. खरे पाहता क्रममुक्तीचा शेवट कसा होईल, हे कुणाला माहीत आहे ? (१९)

असो ज्ञाता जीवन्मुक्त । करून संकल्पाचा घात ।
देह असतां जिवंत । ब्रह्मानंद पावला ॥२०॥
पण जीवन्मुक्त ज्ञाता संकल्पाचा घात करून देह जिवंत असताही ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो. (२०)

त्यासि नलगे उत्तरायण । काशी अथवा बरें मरण ।
अंतकालीं नको स्मरण । आधींच ब्रह्मरूप अंगें ॥२१॥
त्याला उत्तरायणाची गरज नाही, काशीचे वास्तव्य, तेथील अनुकूल मरण हेही लागत नाही. फार काय अंतकाळी स्मरण असण्याचीही गरज नाही. कारण तो अगोदरच स्वत:च ब्रह्मरूप झालेला असतो. (२१)

ब्रह्म जरी जन्मे मरे । पाप पुण्य कर्मद्वारें ।
तरिच ज्ञाताही भरीं भरें । जन्ममृत्यूच्या ॥२२॥
जर कदाचित ब्रह्म जन्म पावले अथवा मृत्यू पावले किंवा कमें करून त्यास पाप पुण्य प्राप्त होऊ लागले तरच ज्ञाताही जन्ममृत्यूच्या प्रवाहात सापडेल. (२२)

कर्तृतंत्र जो असेल । तरिच भीति त्या होईल ।
हा ब्रह्मचि कोणा स्मरेल । अंतकाळीं ॥२३॥
तो कर्तृतंत्र (साधक) असता तरच त्याला जन्ममृत्यूचे भय वाटले असते. पण हा स्वत:च ब्रह्मरूप असल्याने अंतकाळी कोणाचे स्मरण करील ? (२३)

चिदचिद्‌ग्रंथीचा भेद । तेव्हांचि प्राणाचा उपमर्द ।
तोचि अंतकाल प्रसिद्ध । आत्यंतिक प्रलय जो ॥२४॥
चिदचिद् ग्रंथीचा भेद जेव्हा होतो तेव्हाच त्याच्या प्राणाचा अंत झालेला असतो. तोच त्याचा अंतकाल होय. तोच आत्यंतिक प्रलय होय. (२४)

जयासी फिरून असे जन्मणें । त्यासी अंतकाळ कोण म्हणे ।
जन्ममरणाच्या भ्रमणें । मध्यकाल बोलावा ॥२५॥
ज्याला पुन्हा जन्म घ्यायचा असतो त्याच्या मरणाला अंतकाळ कोण म्हणेल ? जन्ममरणाच्या भ्रमणातील तो मध्यकाल समजावा. (२५)

म्हणून प्रलय आत्यंतिकु । हाचि अंतकाल विवेकु ।
प्राणवियोगाचा धाकु । मीपणेंविण कोणा ॥२६॥
म्हणून आत्यंतिक प्रलय (चिदचिग्रंथिभेद, ब्रह्मात्मैक्य) हाच खरा अंतकाल होय. येथे मीपणाचा अभाव असल्याने ज्ञाता मरणाला कसा भिईल ? (२६)

मरणा ऐलीकडे मेला । संपादिलें उत्तर क्रियेला ।
पुढें देह राहिला कीं गेला । कोण काज ॥२७॥
जो मरणाच्या अलीकडेच मेला, त्याच्या उत्तरक्रिया अगोदरच झालेल्या आहेत, त्याच्या बाबतीत देह गेला काय नि राहिला काय, त्याला त्याचे काय होय ? (२७)

रज्जूवरी सर्प भासला । रज्जू ओळखितांच गेला ।
तैसा प्राणादिकांचा मासला । अज्ञान तोंवरी ॥२८॥
दोरीवर सर्प भासला तो रज्जूची (दोरीची) ओळख पटताच नाहीसा होतो त्याप्रमाणे प्राणादिकांना अनुभव अज्ञान आहे तोपर्यंतच येतो. (२८)

जावें ब्रह्मांड भेदून । तो प्राणा नव्हे उत्क्रमण ।
श्वास सरतां होती लीन । जेथील जेथें ॥२९॥
ब्रह्मांड भेदून गेले तरी प्राण देहाबाहेर जात नाहीत. श्वास संपताच जागच्या जागी लीन होतात. (२९)

आधींच ब्रह्माकार जाला । आठवविसरा विसरला ।
स्मरण उर्ध्वगमन कासयाला । जीवन्मुक्तासी ॥३०॥
आधीच ब्रह्माकार झाल्यावर स्मरण विस्मरण यांचे भान तो विसरून जातो. जीवन्मुक्ताला स्मरण, ऊर्ध्वगमन इत्यादीची जरुरी काय ? (३०)

जैसी दग्धवस्त्राची घडी । पांघरावया कोण काढी ।
फिरून लावितां सनकाडी । रक्षा ती जळेना ॥३१॥
जळालेल्या वस्त्राची घडी कोणी पांघरण्यासाठी काढील काय ? तिला फिरून सनकाडी लावली तरी ती राख जळत नाही. (३१)

तैसा मेला तो पुन्हा मरे । हे प्रमाण नव्हेती उत्तरे ।
यास्तव जीवन्मुक्ता बारे । भीतीचि नाहीं ॥३२॥
त्याप्रमाणे जो अगोदर मेला आहे, तो पुन्हा मरतो, ही उत्तरे प्रमाण नव्हेत. म्हणून जीवन्मुक्ताला भीतीच नाही. (३२)

साधूचा देह पडिला रानीं । कीं मरे किकटीं जाऊनी ।
अथवा पडिला जाउनी । लेंड वोहळीं ॥३३॥
साधूचा देह रानात पडला किंवा स्मशानात जाऊन तो साधू मेला किंवा लेंडी, ओहळी यांमध्ये पडला, (३३)

भोंवती श्वान शुकरें । विष्ठेनें सर्वांग भरे ।
गीध श्वापदें मांजरें । रिसें व्याघ्रें फाडिती ॥३४॥
किंवा त्याच्या मृतदेहाभोवती कुत्री, डुकरं आहेत अथवा त्याचे अंग विष्ठेने भरलेले आहे किंवा गिधाडे, मांजरे, अस्वले, हिंस्र श्वापदे त्याला फाडून खात आहेत, (३४)

ग्रामीं अथवा विदेशीं । अंत्यजगृहीं कीं काशी ।
सर्व समान जयासी । भेदचि नाहीं ॥३५॥
गावात असो अथवा विदेशात असो, अंत्यजाच्या घरात असो अथवा काशीमध्ये असो. त्याच्याबाबतीत सर्व सारखेच आहे. त्याला काही भेदच वाटत नाही. (३५)

पुण्यपापा सांडिलें । उंचनीच हें त्यागिलें ।
नरकासि होणें पडिलें । कैवल्यापरी ॥३६॥
पुण्यपाप, उच्चनीच अशा भेदांचा त्याग केल्यानंतर नरकसुद्धा मोक्षासारखा होणे क्रमप्राप्त आहे. (३६)

सुवर्णावांचून कांही । परिसा स्पर्श अन्य धातूस नाहीं ।
तैसे दृष्टी जे पडता तेंही । कैवल्यचि होय ॥३७॥
परिसाला सोन्याखेरीज दुसऱ्या धातूचा स्पर्शच माहीत नाही (परिसाचा स्पर्श होताच सगळेच धातू सुवर्ण बनतात) त्याप्रमाणे जीवन्मुक्ताच्यादृष्टीला जे जे पडेल ते सर्व मोक्षच होते. (३७)

वैकुंठकैलासादि अघवे । आणि घरें ग्रामें पुरें सर्वे ।
जनीं विजनीं अपूर्वें । आपणावीण नाहीं ॥३८॥
वैकुंठ, कैलास, घर, गाव, जन अथवा विजन काहीही असो त्याला आपल्यावाचून तेथे दुसरे काही नाही. (३८)

ऐसा महाराज राजयोगी । स्पर्श होतांचि भूमीलागी ।
अत्यंत हर्षे रोमांगीं । हेलावती उद्‌भिज ॥३९॥
अशा प्रकारचा राजयोगी साधू असतो. त्याचा जमिनीला स्पर्श होताच ती आनंदाने रोमांचित होते, सर्व वनस्पती हेलाक्तात. (३९)

मग देह जेथें पडिला । ते पवित्रता न कळे शेषाला ।
सर्व तीर्थाचा मेळा पातला । चतुःसागरांतील ॥४०॥
मग त्याचा देह जेथे पडतो, त्या प्रदेशाची पवित्रता शेषालासुद्धा कळत नाही. चारी समुद्रातील तीर्थांचा मेळावा त्याच्यादेहाकडे धाव घेतो. (४०)

सकळ सुरवर हें सुख वांछितां । लेश न मिळे कीं पुरता ।
तें मुमुक्षूचें धन तत्त्वतां । इतरां प्राप्त कैचें ॥४१॥
सर्व देवांनी या सुखाची इच्छा केली तरी त्याचा कणदेखील त्यांना मिळत नाही. कारण ते केवळ मुमुक्षूचे धन होय. ते इतरांना कसे प्राप्त होईल ? (४१)

ऐसें जया सुख व्हावें । तेणे सद्‌गुरुपाद सेवावे ।
जीवन्मुक्तीतें पावावें । अनायासें ॥४२॥
असे सुख ज्याला हवे असेल, त्याने आपल्या सद्गुरूचरणांची सेवा करावी आणि अनायासे जीवन्मुक्तीचा लाभ करून घ्यावा. (४२)

इति श्रीमदागमसारे । उपनिषत्तात्पर्यानुसारे ।
अंतकालप्रकारे । पंचमसमासः ॥५॥
॥ इति जीवन्मुक्तिलक्षणपंचिका संपूर्णा ॥ १०॥  ओवीसंख्या २१२ ॥
हरिः ॐ तत्सत्

GO TOP