॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(उत्तरार्ध)

पंचिका ९ वी
अद्वैतसिद्धिविवेचन

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
निर्भयत्वसाम्राज्य


मोहार्णव हा सागर । साधन सेतु केला थोर ।
शमदमादि वानर । गेला रघुवीर पैलतीरा ॥१॥
मोहार्णव (मोहरूपी सागर) हा मोठा सागर असून त्यावर साधनांचा मोठा सेतू बांधला. शमदमादी वानरांबरोबर रघुवीर पैलतीरावर पोचला. (१)

कामक्रोधादि असुर । निर्दाळुनिया समग्र ।
शांतिसीता हे सुंदर । आत्मारामा प्राप्त जाली ॥२॥
त्यांनी काम, क्रोध इत्यादी सगळ्या राक्षसांचे निर्दालन केले, तेव्हा शांतिरूप सीता आत्मारूप रामाला प्राप्त झाली. (२)

स्वानुभवविमानीं बैसले । भावार्थभरतासि भेटले ।
नि:संदेह राज्य केलें । अयोद्धेचें ॥३॥
मग ती दोघे स्वानुभवरूपी विमानात बसली. नंतर भावार्थरूपी भरताला भेटली व नंतर त्यांनी संदेहरहित होऊन अयोध्येचे राज्य केले. (३)

तैसें साधनचतुष्टय । चतुरंगसेना समुदाय ।
अज्ञानशत्रूचा पराजय । करुनि विजय पावला ॥४॥
साधनचतुष्टय हीच चतुरंगसेना होय. तिच्या साहाय्याने अज्ञानरूपी शत्रूचा पराभव करून आत्माराम विजयी झाला. (४)

स्वात्मबोध लाभ जाला । साम्राज्यपदासी पावला ।
सुमुहूर्ती अभिषेक केला । संतमुनिजनीं ॥५॥
त्यामुळे त्याला स्वात्मज्ञानरूपी लाभ झाला, त्याला साम्राज्यपदाची प्राप्ती झाली. मग चांगला मुहूर्त पाहून संत, मुनिजनांनी त्याला स्वानंदसाम्राज्यपदावर अभिषेक केला. (५)

विवेकादि महाशूर । विजय पावोनि समग्र ।
आवेश टाकोनियां थोर । ब्रह्मानंदी शोभलें ॥६॥
विवेक इत्यादी महाशूर असे सर्व योद्धे विजयी झाले. तेही अहंकाररहित होऊन ब्रह्मानंदपदावर शोभू लागले. (६)

मग स्वानुभवाचें भांडार । उचित दिधलें अपार ।
जैसा जयाचा अधिकार । आतृप्ति निजधन ॥७॥
मग त्यांनी स्वानुभवाचे अपार भांडार योग्यता पाहून वाटून टाकले. जसा ज्याचा अधिकार होता तसे त्याला तृप्त होईपर्यंत त्यांनी निजधन वाटले. (७)

शिष्यवर्ग याचक आले । तया साधनधन वाटिले ।
कोणी ज्ञानें तृप्त जाले । कोणी उपासना ॥८॥
त्यांचे शिष्यवर्ग आले, याचक आले त्यांना त्यांनी साधनरूप द्रव्य वाटले. कोणाला ज्ञान देऊन तृप्त केले, कोणाला उपासना सांगून तृप्त केले. (८)

कोणा विहित अनुष्ठान । जैसा अधिकार जया पूर्ण ।
तें तें तयासी देऊन । तृप्त केले ॥९॥
कोणाला शास्त्रविहित अनुष्ठान सांगितले. अशा रीतीने ज्याचा जसा अधिकार होता त्याप्रमाणे त्याला ते ते देऊन त्यांनी तृप्त केले. (९)

द्वितीयापासून भय होतें । तरी द्वैताचि जाली प्रेतें ।
हे जनक पावलासी अभयातें । श्रुतिसिद्ध निर्भयता ॥१०॥
द्वितीयापासून भय निर्माण होते, असे म्हणतात. पण येथे द्वैताची प्रेते झाली आहेत. जनक राजाला अशी निर्भयता प्राप्त झाली होती. त्याची निर्भयता श्रुतिसिद्ध (वेदांनी सांगितल्याप्रमाणे) होती. (१०)

एकपणीं समरसला । द्वैतेंवीण एकला ।
अहंकारू तरी घातला । निज बंदिखानीं ॥११॥
द्वैतरहित अशा ऐक्यामध्ये तो समरस झाला. अहंकारही त्याने स्वत:च्या बंदिखान्यात घातला होता. (११)

आतां भय तरी कोणाचें । कोणासी होईल साचें ।
अद्वैतीं पाहतां द्वैताचें । नामचि नाहीं ॥१२॥
आता भय कोणाचे राहिले ? आणि कोणाला होईल ? अद्वैताच्या अनुभवात द्वैताचे नावही शिल्लक राहात नाही. (१२)

ऐसें ऐकोनी श्रोता । वक्त्यासी म्हणे तत्त्वतां ।
नसे द्वैताची वार्ता । हें बोलणें अप्रमाण ॥१३॥
हे ऐकल्यानंतर श्रोता वक्त्याला म्हणतो, "द्वैताची गोष्टही ऐकू येत नाही हे बोलणे विश्वसनीय वाटत नाही. (१३)

कामक्रोधादि गेले । विवेकादिकीं निवटिले ।
परी दिसती वेगळाले । ज्ञात्याचे ठाई ॥१४॥
कामक्रोधादी गेले. विवेकादींनी त्यांचा नायनाट केला, हे खरे असले तरी ज्ञात्याच्या ठिकाणी ते वेगळेपणाने दिसतातच की ? (१४)

तरी हे निमाले कैसें । द्वैतही कैसें न दिसें ।
ज्ञाता निर्भय जालासे । कोणे परी ॥१५॥
मग त्यांचा नायनाट झाला असे कसे म्हणावे ? द्वैतही दिसत नाही म्हणता ते कसे ? मग ज्ञाता निर्भय झाला असे आपण म्हणता ते कोणत्या प्रकाराने ? " (१५)

वक्ता म्हणे ऐका सादर । ज्ञातयासी ज्ञानोत्तर ।
द्वैत दिसे परी साचार । सत्यत्वें नाहीं ॥१६॥
यावर वक्ता म्हणतो, "आता लक्ष देऊन ऐका. ज्ञात्याच्या ठिकाणी ज्ञानानंतरही द्वैत दिसते. पण ते सत्यत्वाने दिसत नाही. (१६)

मृगजळ उभयांसी दिसतें । सारिखें परी जाणत्या कळतें ।
नेणतें बापुडें कष्टी होतें । सत्यत्वबुद्धीं मृग ॥१७॥
जाणता आणि नेणता या दोघांनाही मृगजळ सारखेच दिसते. पण ते खोटे आहे, हे जाणत्याला कळते. पण नेणते हरिण मात्र ते सत्य आहे असे मानून कष्टी होते. (१७)

नसतां अज्ञानें सत्य केलें । ज्ञानें जाणतां लया गेलें ।
मिथ्यात्वें जरी दिसलें । तरी काय भीति ॥१८॥
मृगजळ नसताना देखील अज्ञानाने ते सत्य मानले. पण ज्ञानाने त्याचे खरे स्वरूप जाणल्यामुळे ते लयास गेले. तेव्हा मिथ्यात्वाने ते दिसले तरी भीती कशाची ? (१८)

तैसेचि कामक्रोधादिक । प्रेतरूप जाले सकळिक ।
तरी आतां याचा धाक । कासयाचा ॥१९॥
त्याप्रमाणे कामक्रोध इत्यादी सगळे प्रेतरूप झाले असताना आता कशाचा धाक मनात धरायचा ? (१९)

जोंवरी अविद्या पाठीसी । तोंवरी सामर्थ्य होतें यासी ।
तेव्हांचि जर्जर केलें तयासी । विवेकादिकीं ॥२०॥
जोपर्यंत त्यांच्या पाठीशी अज्ञान होते. तोपर्यंत त्यांना सामर्थ्य होते. पण विवेक इत्यादीनी त्यांना लगेच जर्जर केले. (२०)

ज्ञानें घालूनियां घाला । अज्ञानशत्रु जिवें मारिला ।
अहंकारप्रधान धरिला । सहज निर्बळ कामादि ॥२१॥
ज्ञानाने जोरदार हल्ला करून अज्ञानरूप शत्रूला जिवानिशी मारले. अहंकाररूप प्रधानाला पकडून बंदिस्त केले. त्यामुळे काम इत्यादी सहजच निर्बळ झाले. (२१)

मग विवेक वैराग्य उठावले । कामक्रोधादि वधिले ।
शिरें धडें छिन्न पडिले । रणभूमीसी ॥२२॥
मग विवेक, वैराग्य यांनी बळ धरले आणि त्यांनी काम, क्रोध यांचा वध केला. त्यांची शिरे आणि धडे रणभूमीवर पडली. (२२)

ही साम्राज्यसंपदा । भाट गाताती सदा ।
जयजयकारें आनंदा । प्रेतें पाहूनी करिती ॥२३॥
हे साम्राज्यवैभव भाट सतत गात आले आहेत. त्या कामक्रोधांची प्रेते पाहून ते आनंदाने जयजयकार करतात. (२३)

प्रेतादि जेव्हां दिसती । म्हणसी निर्भयता नसे चित्तीं ।
तरि हे जिवंत जैं होतीं । समोर न राहती कोणीही ॥२४॥
तू म्हणशील की, प्रेतादी जेव्हा प्रत्यक्ष दिसतात तेव्हा सत् आणि चित् ही लक्षणे घेऊन व्यर्थ असूनसुद्धा उगाचच मीपणा घेऊन स्फुरण पावत असतात. मनात निर्भयता नसते. अरे, मग ते जिवंत असताना त्यावेळी त्यांच्या समोर उभे रहायलाही कोणी तयार नव्हते ना! (२४)

आतां तरी प्रेतें जालीं । कैसीं लढतील मेलीं ।
म्हणून निर्भयता पावलीं । ब्रह्मानंदीं ॥२५॥
आता ते तर प्रेते झाले आहेत. ते मेल्यानंतर कसे लढतील या विचाराने तरी निर्भयता झाली असे म्हणता येईल की नाही ? ही निर्भयता ब्रह्मानंदामध्ये असते. (२५)

जैसी जिवंत उंदिरें । न होती मांजरासमोरे ।
मेल्या मारिती मांजरें । काशावरूनी ॥२६॥
मांजरे जिवंत असताना उंदीर मांजरांसमोर यायला घाबरत होते. आता मांजरांना मारून टाकल्यानंतर ते मांजरे कसे मारू शकतील ? (२६)

पाशुपतास्रें वांचला । तो जलफेसें मृत्यु पावला ।
प्रमाण मानिजे या बोला । बाळपणींच ॥२७॥
पाशुपतास्त्रासमोर जो जिवंत राहिला, तो पाण्याच्या फेसाने मरण पावला. ही (वृत्रासुराची गोष्ट) लहानपणातच खरी वाटत होती. मोठेपणी ती खरी मानली जात नाही. (२७)

असे निर्भयत्व परिपूर्ण । चक्रवर्ती साम्राज्य पाऊन ।
निर्वैर भोगी स्वानंदघन । अविट आणि अचळ ॥२८॥
अशा प्रकारे परिपूर्ण निर्भयत्व प्राप्त करून निर्वैर, अवीट आणि अचल असे चक्रवर्ती साम्राज्य आत्माराम भोगत राहतो. (२८)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
निर्भयत्वसाम्राज्यद्वारे । प्रथमसमास: ॥१॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
ग्रंथीभेद


परावर आत्मा परिपूर्ण । तेथें बुद्धीचें पडिलें ठाण ।
तें समई ग्रंथीचे भेदन । आणि निवर्तन संशया ॥१॥
आत्मा सर्वश्रेष्ठ आहे, सर्वव्यापी आहे. परिपूर्ण आहे. त्यात बुद्धीचा मुक्काम पडल्यानंतर जो ग्रंथी निर्माण होतो त्या ग्रंथीचे भेदन झाले पाहिजे आणि आपल्या संशयाची निवृत्ती झाली पाहिजे. (१)

अशेष कर्माची क्षीणता । हा श्रुति-उद्‌घोष तत्त्वतां ।
आणि अनुभूतीही पाहतां । ऐसीच असे ॥२॥
त्याद्वारे संपूर्ण कर्माची निवृत्ती झाली पाहिजे. असा श्रुतीचा उद्घोष (गर्जना) आहे आणि अनुभूती पाहिली तरी अशीच आहे. (२)

चित्‌ म्हणिजे चैतन्य । अचित्‌ हें जड संपूर्ण ।
अहि नसता रज्जुत्व जाण । सर्पाकार जालें ॥३॥
चित् म्हणजे चैतन्य, अचित् म्हणजे संपूर्णपणे जड, आत्म्याखेरीज बाकीचे हे सर्व जगत् जड असून सर्प नसताना दोरीलाच सर्पाकार प्राप्त होतो त्याप्रमाणे ते निर्माण झाले आहे. (३)

तेवि अहंकारासमवेत । देहादि जे असत्‌ ।
उगेंच मीपणें स्फुरत । सच्चिद्‌ घेउनी ॥४॥
अहंकारासह देह इत्यादी असत् (सत्ता म्हणजे अस्तित्व नसलेले) असून सत् आणि चित् ही लक्षणे घेऊन व्यर्थ असूनसुद्धा उगाचच मीपणा घेऊन स्फुरण पावत असतात. (४)

असज्जड दु:खात्मक । आत्मत्वीं आरोपीं अविवेक ।
अस्तिभातिप्रियात्मक । देहादिकां आलें ॥५॥
सदसद्विवेक नसल्यामुळे अविचाराने आत्म्यावर असत्, जड आणि दु:खरूप असा आरोप केला जातो आणि त्याउलट देह इत्यादींना आत्म्याची लक्षणे चिकटवली जातात. म्हणजे त्यांना अस्ति (सत्ता) , भाति (चिद्‌रूपता) आणि प्रियत्व (आनंदात्मकता) ही लक्षणे दिली जातात. (५)

अन्योन्याध्यास ऐसा । अज्ञानकार्याचा ठसा ।
उमटला तो अपैसा । ज्ञानें नष्ट जाला ॥६॥
याला अन्योन्याध्यास असे म्हणतात. हा अन्योन्याध्यास म्हणजे अज्ञानकार्याचा ठसाच होय. तो ज्ञानाने आपोआपच नष्ट होतो. (६)

रज्जु यथार्थ कळतां । मिथ्या सर्पाची वार्ता ।
तैसें सत्यत्व यथार्थ जाणतां । अहंममता विराली ॥७॥
दोरीचे यथार्थ रूप कळताच सर्पाची गोष्ट आपोआप खोटी ठरते. त्याप्रमाणे खरे सत्य कळल्याबरोबर मीपणा आणि माझेपणा या दोन्हींचा निरास होतो. (७)

सच्चिदानंद आत्मा आपण । असज्जड दु:ख संपूर्ण ।
यासी निवडिलें भिन्न भिन्न । विवेकदृष्टीं ॥८॥
आपले सत्, चित् आणि आनंद स्वरूप आणि बाकीचे सर्व असत्, जड आणि दु:खात्मक विश्व असे दोन भित्र प्रकार विवेकदृष्टीने वेगवेगळे लक्षात येतात. (८)

पुन्हा तयासी एकत्र । हो‍ऊंचि नेदी अणुमात्र ।
होत असतां व्यापार । तक्र लोणी न मिळें जैसे ॥९॥
आपले नित्याचे व्यवहार चालू असताना देखील या दोहोंना, ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून काढलेले लोणी आणि ताक पुन्हा एकत्र मिसळू शकत नाहीत त्याप्रमाणे ती विवेकदृष्टी सरमिसळ होऊ देत नाही. (एकदा ज्ञानदृष्टी प्राप्त झाली की सच्चिदानंद आणि असज्जडदु:ख यांचा अन्योन्याध्यास होत नाही. ) (९)

हाच जाणिजे ग्रंथिभेद । निवडिले चित्‌ आणि अचित्‌ ।
जन्ममृत्यूचा खेद । तुटला एकसरां ॥१०॥
हाच ग्रंथिभेद होय. एकदा की चित् आणि अचित् हे वेगळे आहेत असे कळले की जन्म आणि मृत्यू यांचे दुःख एकदम नाहीसे होते. (१०)

श्रोता म्हणे ज्ञान रज्जूचें । होतां सर्पदृष्टि न वचे ।
ज्ञान होतां आत्मयाचें । देहादिक दिसती ॥११॥
यावर श्रोता विचारतो की, एकदा दोरीचे ज्ञान झाले की पुन्हा सर्प दृष्टीस पडत नाही हे बरोबर आहे, पण आत्म्याचे ज्ञान झाल्यानंतरही देह इत्यादी पदार्थ दिसतात त्याचे काय ? (११)

वक्ता म्हणे उपाधिक भ्रम । स्फटिक आणि जपाकुसुम ।
एक स्थळीं असतां परम । रक्त स्फटिक दिसे ॥१२॥
यावर वक्ता म्हणतो की हा उपाधिक भ्रम आहे. स्फटिक जास्वंदीच्या फुलावर ठेवला की तो लाल दिसतो. (१२)

वेगळेपणें जाणितला । श्वेत स्पटिक जरी कळला ।
यावत्सांनिध्य कुसुमाला । तों काळ तांबडा दिसे ॥१३॥
जोपर्यंत तेथे आहे तोपर्यंत तो तसा दिसणारच. तो स्फटिक असून तो पांढरा आहे असे ज्ञान झाले तरी फुलाचे सांनिध्य असेपर्यंत तो लालच दिसणार. (१३)

तैसा आत्मा जरी कळला । सच्चिदानंद प्रतीति आला ।
तरी देहादि दिसती त्याला । उपाधिक भ्रमें ॥१४॥
त्याप्रमाणे आपण आत्मा असून सच्चिदानंद स्वरूप आहोत, असा त्याला प्रत्यय आला तरी औपाधिक भ्रमामुळे त्याला देहादी पदार्थ दिसणारच. (१४)

जों काल प्रारब्ध देहाचें । तों काल दिसणें साचें ।
दिसतां पुन्हा ग्रंथीचें । ऐक्य नव्हे ॥१५॥
जोपर्यंत देहाचे प्रारब्ध असेल तोपर्यंत असे पदार्थ दिसतात हे खरे असले तरी एकदा ग्रंथिभेद झाला तो झालाच. त्यांच्यात पुन्हा ऐक्य केव्हाही होणार नाही. (१५)

म्हणसी व्यापार करितां । दिसताहे अहंममता ।
तरी चिद्‌रूप आणि अहंता । न मिळे कदा ॥१६॥
व्यापार करीत असताना अहंममता दिसते असे म्हणशील तर चिद्‌रूप आणि अहंता कधी एकत्र येत नाहीत, (हे ध्यानात घे.) (१६)

हर्ष विषाद सांडुनी । प्रारब्ध भोगी ज्ञानी ।
श्रीकृष्ण बोलिला वचनीं । गीतेमाजीं अर्जुना ॥१७॥
श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला सांगितले आहे की, हर्षविशाद यांचा त्याग करून ज्ञानी मनुष्य प्रारब्ध भोगत असतो. (१७)

प्राप्ताचा द्वेष न करी । गेलियाची इच्छा न धरी ।
भोगी उदासीनापरी । हाचि ग्रंथिभेद ॥१८॥
जो प्रसंग आला आहे, त्याचा द्वेष करू नकोस, गेलेल्याची इच्छा धरू नकोस. आल्या गोष्टी उदासीनासारखा राहून भोग. हाच ग्रंथिभेद होय. (१८)

म्हणसी जड हो‍ऊनी पडिला । त्या उदासीन कृष्ण बोलिला ।
तरी त्यासारिखा या शब्दाला । व्यर्थता आली ॥१९॥
माणूस जड होऊन पडला, तर त्याला कृष्णाने जड असे म्हटलेले आहे. असे म्हणशील तर त्यासारखा' या शब्दाला अर्थहीनता येईल. (१९)

उदासीनापरी म्हणतां । जड नव्हे की ज्ञाता ।
प्रारब्ध  भोग भोगितां । अलिप्तता असे ॥२०॥
उदासीनासारखा असे म्हटल्याने ज्ञानी माणसाला जड व्हावे लागत नाही. प्रारब्ध भोग भोगताना तो अलिप्ततेने भोगतो एवढाच त्याचा अर्थ आहे. (२०)

श्रोता म्हणे भरतादिक । जडत्व पावले अनेक ।
जडत्व तेचि आवश्यक । ज्ञानी म्हणावे ॥२१॥
यावर श्रोता म्हणतो की, भरत इत्यादी अनेक लोक ज्ञानप्राप्तीनंतर जडत्व पावले होते. ज्ञानी माणसाला जडत्व आवश्यकच आहे, असे समजायचे काय ? (२१)

वक्ता म्हणे राज्य करितां । जनका नाम विदेहता ।
येविशीं श्रुतीहि संमता । नायकसी ते ॥२२॥
यावर वक्ता म्हणतो की, जनक राजा राज्य करत असतानादेखील विदेही अवस्थेत होता. याला वेदाचाही आधार आहे, हे तू ऐकत नाहीस काय ? (२२)

यानीं अथवा उपवनीं । स्रियासंघ अथवा जनीं ।
विनोदें क्रीडे अनुदिनी । परी क्रीडतों हें स्मरेना ॥२३॥
वाहनात, उपवनात, स्त्रियांसह अथवा इतर जनांसह रोज क्रीडा करत असतानाही आपण क्रीडा करतो आहोत हे त्यास स्मरण नव्हते. (२३)

ज्ञानी जाला काष्ठवत्‌ । तैसेचि रोगीही निचेष्ठित ।
ज्ञाता आणि रोगयुक्त । एक कैसे ॥२४॥
ज्ञानी लाकडासारखा निश्चेष्ट होऊन पडला, तसेच ज्ञानी आणि रोगी सारखेच म्हणता येतील काय ? (२४)

रोगी आणि जीवन्मुक्त । एक अज्ञानी मानित ।
हेंचि बोलणें अयुक्त । प्रमाणसिद्ध नव्हे ॥२५॥
रोगी माणसही निश्चेष्ट होऊन पडला. एवढ्यावरून रोगी आणि जीवन्मुक्त एकच आहेत असे फक्त अज्ञानी लोकच मानू शकतात. पण हे बोलणे अयोग्य आणि प्रमाणांना सोडून होत नाही काय ? (२५)

भरतादि जे जाले । दुष्ट संगासि भ्याले ।
जनसमुदाय वर्जिले । सुखें राहिले निवांत ॥२६॥
भरतादिक हे दुष्ट सहवासाला भ्याले आणि त्यांनी जनसमुदायाचा त्याग करून ते सुखाने निवांत राहिले. (२६)

तेहि काष्ठवत्‌ न होती । खाती चालती नेत्रीं पाहती ।
मौन म्हणतां रहुगणाप्रति । उपदेश केला ॥२७॥
तेही काष्ठवत् पडले नव्हते. ते खात होते, चालत होते, डोळ्यांनी पाहत होते, मौन धारण केलेले असले, तरी भरताने राजा रहुगणाला उपदेश केलाच होता ना! (२७)

म्हणोनि ज्ञाता जीवनमुक्त । प्रारब्ध भोगून अलिप्त ।
तेथे जडत्वाचा संकेत । लाऊं नये ॥२८॥
म्हणून ज्ञाता हा खरा जीवन्मुक्त असतो. तो प्रारब्ध भोगत असूनही अलिप्त असतो. पण त्यामुळे त्याच्या बाबतीत जडत्वाचा संकेत लावू नये. (२८)

ब्रह्मानंदस्वानुभवें । नित्य तृप्त स्वभावें ।
प्रारब्ध देहादि अघवे । उपाधि तोंवरी ॥२९॥
ब्रह्मानंदाच्या स्वानुभवाने तो स्वभावत:च नित्यतृप्त असतो. देहादी प्रारब्ध फक्त उपाधी असेपर्यंतच असते. (२९)

देह जातां आत्मा न जाय । देह खातां आत्मा न खाय ।
देह भोगितां नाना विषय । आत्मा भोगातीत ॥३०॥
देह जात असला तरी आत्मा त्याबरोबर जात नाही, देह खात असला तरी आत्मा खात नाही. देहाने विविध विषय भोगले तरी आत्मा मात्र भोगातीत असतो. (३०)

देह जन्मला कीं  मेला । आत्मा परिपूर्ण संचला ।
क्रीडला अथवा पडिला । देहचि प्रारब्धें ॥३१॥
देहाला जन्म प्राप्त होवो अथवा मृत्यू, प्रारब्धामुळे देह क्रीडा करत राहिला अथवा पडून राहिला, आत्मा मात्र सर्वत्र परिपूर्णपणे भरून राहिला आहे. (३१)

ते देह जरी आपण । तरिच हटनिग्रह करणें ।
देहबुद्धीचें निसंतान । ज्ञानेंचि केलें ॥३२॥
जर तो देह आपण असतो तर त्याच्याबाबतीत बळजबरी किंवा नियंत्रण करता आले असते. पण ज्ञानानेच देहबुद्धी समूळ नष्ट केली आहे. (३२)

आतां देह आणि देहसंबंध । वर्तो पडो नसे खेद ।
आपुला आपण स्वानंदकंद । बोध सदृढ जाला ॥३३॥
आता देह अथवा देहसंबंध असो अथवा पडो त्याच्याबद्दल खेद मानण्याचे कारण नाही. कारण आपण स्वानंदकंद आहोत हा बोध पक्का झाला आहे. (३३)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
ग्रंथिभेदप्रकारे । द्वितीयसमास: ॥२॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
संशयच्छेदनप्रकार


सांगितला ग्रंथिभेद । संशयाचा कैसा छेद ।
तोचि कीजेतो विशद । येणें समासीं ॥१॥
ग्रंथिभेद म्हणजे काय ते सांगितले, आता संशयाचे निरसन कसे करायचे तो प्रकार या समासात सांगावयाचा आहे. (१)

संशयात्मा नाश पावे । म्हणुन संशय खंडावे ।
मळमळ करीत जेवावें । हें बरवें नव्हे ॥२॥
संशयात्मा (सतत संशयात राहणारा माणूस) नाश पावतो. म्हणून संशयाचे प्रथम खंडन करावे लागते. मळमळत असताना जेवण करणे बरे नव्हे. (२)

लौकिक रीतीचे दंडक । वर्तताती अनेक ।
इतुके पाहतां एक । निश्चय नव्हे ॥३॥
लौकिक व्यवहारात अनेक दंडक घालून दिलेले असतात. ते सर्व पाहिले असता एकच एक निश्चय निष्पन्न होत नाही. (३)

असो अज्ञानाची कृति । काज नसे निश्चिती ।
संशय जे ज्ञात्याप्रती । संक्षेपगती बोलूं ते ॥४॥
असो, हे संशय अज्ञानी माणसाने घेतले असतील तर त्यांच्याशी आपल्याला इथे काही कर्तव्य नाही. पण ज्ञात्याला जे संशय येतात त्यांच्यासाठी संक्षेपाने येथे निरूपण करू. (४)

नाना शास्त्रांचा गलबला । तेथें मोक्षही बोलिला ।
तया साधनकचाटिला । साधकीं न पडावें ॥५॥
अनेक शास्त्रे आहेत. ती सर्वच शास्त्रे मोक्षाबद्दल स्वत:ची मते मांडतात. या कष्टमय साधनांच्या वाटेला साधकांनी जाऊ नये. (५)

जेथें अज्ञान-निवृत्ति । स्वात्मलाभाची तृप्ति ।
हाचि मोक्ष आदिअंतीं । दुसरा नाहीं ॥६॥
अज्ञानाची निवृत्ती होऊन स्वात्मलाभाचे समाधान मिळणे हाच एकमेव मोक्ष आहे. यापेक्षा दुसरा कुठलाही मोक्ष नाही. (६)

मागां ज्ञाते जाले उदंड । कोणी उन्मत्त कोणी जड ।
एक करिती बडबड । एक चाहाड सर्वदा ॥७॥
मागे जे अनेक ज्ञाते होऊन गेले त्यांमध्ये कोणी उन्मत्त होते, कोणी जड होते, कोणी बडबड करणारे, तर कोणी सर्वकाळ चुगल्या सांगणारे होते. (७)

एक कर्मचि आचरती । एक कर्मातें त्यागिती ।
एक राज्यादि करिती । एक फिरती नागवे ॥८॥
कोणी कर्माचे आचरण करत होते, तर कोणी कर्माचा त्याग करणारे होते, कोणी राज्यकर्ते होते तर कोणी तसेच उघडे फिरत होते. (८)

तरी आपण कैसें वर्तावें । भिन्न भिन्न दिसती अघवे ।
ऐशा संशया करूं धावे । क्षणा क्षणा एक ॥९॥
हे सर्व पाहून आपण कसे वागावे असा संभ्रम निर्माण होतो. ते सगळे भिन्न भित्रच दिसताहेत. तेव्हा आपण कसे वागावे असा संशय दरक्षणी मनात येतो. (९)

वर्तणूक ही प्रारब्धाची । स्थिति नव्हे कीं ज्ञानाची ।
सर्वाचें प्रारब्ध एकचि । बोलोंचि नये ॥१०॥
यावर उत्तर असे की, ही सर्व प्रारब्धाची वर्तणूक आहे. ही ज्ञानाची स्थिती मानू नये. सर्वांचे प्रारब्ध एकसारखेच असले पाहिजे असे कधीच म्हणू नये. (१०)

जैसी कर्मगती गहन । तैसे देहा घडो वर्तन ।
ब्रह्मबुद्धि करी जतन । करणें न करणें सांडीं ॥११॥
कर्मगती ज्या प्रमाणात गहन असेल त्याप्रमाणे देहाचे वर्तन घडत असते. ते तसे खुशाल घडो. आपण मात्र करणे न करणे याचा विचार सोडून देऊन ब्रह्मबुद्धीचे तेवढे जतन करावे. (११)

तथापि कांहीं अवलंबिसी । प्रारब्ध भोगितां कष्टी होसी ।
तेणें जीवनमुक्तिसुखासी । अंचविसी निर्धारी ॥१२॥
तथापि, कर्तव्याकर्तव्याचा विचार मनात बाळगशील तर प्रारब्ध भोगत असताना तू दुःखी होशील आणि परिणामी जीवन्मुक्तिसुखाला अंचवशील (पारखा) होशील. (१२)

सकळ धर्मामध्ये धर्म । स्वरूपीं राहणें हा स्वधर्म ।
या विरहित सर्व कर्म । तें निरर्थक ॥१३॥
सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म म्हणजे स्वरूपामध्ये वास्तव्य करणे हा होय. याखेरीज जे काही कर्म करशील ते सर्व निरर्थक होय. (१३)

सामर्थ्यवंत तेचि ज्ञाते । आमुचें ज्ञानचि नुसतें ।
म्हणोनियां सामर्थ्यातें । इच्छी जो ज्ञाता ॥१४॥
ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, त्यांनाच खरे ज्ञानी म्हणावे, आपल्याकडे फक्त ज्ञानच आहे, अशी उणीव वाटून जो ज्ञाता सामर्थ्याची इच्छा करतो, (१४)

तरी हें सामर्थ्य तपाचें । बोलूं नये ज्ञानाचे ।
सामर्थ्य तरी देहाचें । येणें आत्म्यासी काय ॥१५॥
त्याने हे लक्षात ठेवावे की, असे सामर्थ्य तपश्चर्येचे सामर्थ्य असते, ते ज्ञानाचे सामर्थ्य मुळीच मानू नये. सामर्थ्य हे देहाचेच असते. आत्म्याला त्याचा काय उपयोग ? (१५)

लोकरीती सामर्थ्य आलें । जगीं मोठे मान्य जाले ।
परी आपुलें घर बुडविलें । देहबुद्धिनें ॥१६॥
लोकदृष्टीने सामर्थ्यही प्राप्त होईल, त्यामुळे जगात मान्यताही खूप मिळेल. परंतु त्याचा पारमार्थिक लाभ काय ? उलट देहबुद्धीमुळे आपले घर सर्व बुडेल. अशी परिस्थिती होते. (देहबुद्धी धारण केल्याने हाती आलेले मोक्षसुख दूर जाईल. ) (१६)

म्हणोनि देहबुद्धि सांडावी । माइकाची उठाठेवी ।
आत्मलाभेंचि तृप्ति व्हावी । सामर्थ्य कैचें ॥१७॥
म्हणून देहबुद्धीचा त्याग करावा. सामर्थ्याची अपेक्षा करणे म्हणजे सर्व मायिकाचा व्यवहार. त्याचाही त्याग करावा. आत्मलाभानेच खरे समाधान मिळते. सामर्थ्याने ते कसे मिळेल ? (१७)

काम्य कर्म त्यागावें । विहित कर्म आचरावें ।
कोठें नि:शेष त्यागावें । बोलिलें ऐसें ॥१८॥
काम्य कर्माचा त्याग करावा. काहींच्या मते विहित कर्माचे आचरण करावे. काहींनी कर्माचा संपूर्णपणे त्याग करावा असे सांगितले आहे. (१८)

आतां हे कर्म करूं कीं न करूं । ऐसा संशयाचा भरू ।
याचें कैसें उत्तरू । दिधलें पाहिजे ॥१९॥
तेव्हा कर्म करावे की न करावे ? असा संशय निर्माण होतो. त्याचे उत्तर दिले पाहिजे. (१९)

करूं न करूं मनचि करितें । वृथा आरोपिसी आत्मयातें ।
देहयोगें होतें जातें । तुजला काय तेणें ॥२०॥
करावे की न करावे असा विचार मनच करत असते. आत्म्यावर त्या विचाराचा आरोप व्यर्थ करत आहेस. देहाच्या प्रारब्धाप्रमाणे कमें होत जातात. त्याचा तुझ्यावर (तुझ्या आत्म्यावर) काही परिणाम होतो काय ? (२०)

कर्म देहानें केलें । तुज काय प्राप्त जालें ।
अथवा नि:शेष सांडिलें । तुझी हानी कोणती ॥२१॥
कर्म देहाने केले. त्यातून तुला काय मिळाले ? अथवा कमें करण्याचे पूर्णपणे सोडून दिले, त्यामुळे तुझे काय नुकसान झाले ? (२१)

अथवा करीं प्रवर्ततां । देहादिपंचकसत्ता ।
आत्मयासी श्रर्म केउता । विचारीं मनीं ॥२२॥
किंवा कर्मामध्ये प्रवृत्त झाला, तरी ते देहादि पंचकाच्या सत्तेनेच होय. (अंत:करण पंचक, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिये, पंच कर्मेन्द्रिय) यांमध्ये आत्म्याला किती प्रमाणात श्रम पडले याचा विचार तूच कर. (२२)

करूं न करूं जे धरिलें । इतुकेंचि पाहिजे सांडिले ।
बुद्धीनें सांडिलें अथवा केलें । तरी प्रायश्चित्त आणि बद्धता ॥२३॥
तेव्हा तू 'कर्म करू की नको' हे जे मनात धरलेस ते मात्र सोडून दे. बुद्धिपूर्वर जर ते स्वीकारले असशील अथवा त्यांचा त्याग केला असशील तर प्रायश्चित्त आणि बद्धता ही मागे लागलीच म्हणून समज. (२३)

देह विस्मरण जरी जालें । तरी अनायासें राहिलें ।
अथवा जें जें कर्म निपजलें । हें म्यां केलें नसावें ॥२४॥
देहाचे विस्मरणच जर झाले तर आपोआपच ती कमें थांबतील. अथवा जे कर्म हातून घडेल ते 'मी केले' असे मनात येऊ देऊ नकोस. (२४)

आतां हे घडो कीं न घडो । आत्मा तेथें न सांपडो ।
अहंकर्तव्यता झडो । सद्‌गुरूप्रसादें ॥२५॥
कर्म होवो अथवा न होवो, आत्मा मात्र तेथे सापडता कामा नये आणि सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने 'अहं कर्तव्यता' (हे मी केले, हे मला करायचे आहे'अशी भावना) मात्र गळून पडावी. (२५)

ऐसे उदंड संशय । श्रवणमननें करावें क्षय।
तरिच पाविजे निश्चय । समाधानाचा ॥२६॥
अशा त-हेच्या अनेक संशयांचा श्रवणमनाने क्षय झाला तरच समाधानाचा निश्चय होईल. (२६)

सर्व ग्रंथींचें निरूपण । करिती संशयाचे खंडण ।
किंचित संशयाचें लक्षण । कळावया बोलिलें ॥२७॥
सर्वच ग्रंथांतील निरूपण आपल्या मनातील संशयांचे खंडन करण्यासाठीच असते. पण संशय कशाप्रकारचे असतात, हे थोडेसे कळावे म्हणून हे थोडेफार स्पष्ट केले आहे. (२७)

आणीक अवधारा पुढती । थोर संशय दोन असती ।
तयासी जे ओळखिती । तेचि ज्ञाते ॥२८॥
आणखी थोडे लक्ष देऊन ऐका. याखेरीज दोन मोठे संशय असतात. त्यांना जे ओळखतात तेच ज्ञाते होत. (२८)

ब्रह्मात्मज्ञान पूर्ण जालें । अज्ञान नि:शेष हरपलें ।
देहद्वय दिसूं लागलें । दग्धपटापरी ॥२९॥
ब्रह्मात्मज्ञान पूर्ण झालेले आहे, अज्ञान संपूर्णपणे नाहीसे झालेले आहे आणि स्थूल आणि सूक्ष्म देह हे जळालेल्या पटाप्रमाणे दिसू लागले आहेत. (२९)

जैसें स्थूळाचें दिसणें । तैसेंचि लिंगाचे भासणें ।
सोपाधि भ्रमाच्या गुणें । भ्रमाभावीं राहती ॥३०॥
स्थूल देहाचे दिसणे आणि सूक्ष्म देहाचे भासणे ही दोन्हीही सोपाधिक भ्रमाच्या प्रभावामुळे होतात. ती दोन्ही भ्रम नसतानाही राहतात. (३०)

मनादि अंत:करण । तें न राहेचि स्फुरण ।
ज्ञाता धरी अनुमान । म्हणे मज हे बाधिती ॥३१॥
मन, अंत:करण इत्यादीचे स्फुरण थांबतच नाही. तेव्हा ज्ञाता हे आपल्याला बाधक ठरतील असे अनुमान करत असतो. (३१)

नाना प्रकारें कष्टी होतां । शीणचि होय तत्वतां ।
आपुलें पूर्णत्व न जाणतां । अज्ञानचि आलें ॥३२॥
या शंकेने ते स्फुरण उठू नये म्हणून तो खूप धडपड करतो. खूप प्रकारचे प्रयत्न करतो. पण त्यात तो यशस्वी होत नाहीच, उलट त्याला श्रम मात्र होतात. याचा अर्थ असा की, स्वत:चे पूर्णत्व त्याला कळलेच नाही. हे एक त-हेचे अज्ञानच होय. (३२)

जळें तरंग काय सांडिले । कीं आकाशें मेघ दवडिले ।
तैसें आत्मस्वरूपीं भासलें । अज्ञान तोंवरी बाधक ॥३३॥
पाणी कधी लाटांचा त्याग करते काय ? आकाश मेघांचा त्याग करते काय ? त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देहादिक भासणारच व अज्ञान असेतोपर्यंत ते बाधणारच. (३३)

तेचि आपण असावें । तरी जन्ममृत्यू सोसावे ।
परिपूर्ण असतां स्वभावें । भय काय त्याचें ॥३४॥
आपण जर तेच म्हणजे अज्ञानी असू तर जन्म-मृत्यू सोसावेच लागणार. जर आपण स्वभावतःच परिपूर्ण आत्मस्वरूप असू तर जन्म, मरण यांची भीती कशासाठी ? (३४)

दग्ध पटाचें दिसणें । तैसें स्थूलाचे असणें ।
भर्जित बीजाचे राहणें । लिंगदेह तैसा ॥३५॥
स्थूल शरीर दिसते म्हणजे काय ? दग्ध पट दिसत नाही कातसेच ते असते आणि लिंगदेह म्हणजे भाजलेले बी. (३५)

भर्जितबीजें क्षुधाहरण । परी पेरितां ते निष्कारण ।
लिंगदेहाचें जें चळण । प्रारब्ध भोगार्थ ॥३६॥
भाजलेल्या बियांमुळे एकवेळची भूक भागेल. पण पेरणीसाठी ते निरुपयोगी असते. ते पेरल्यास वाया जाते. त्याप्रमाणे लिंगदेहाच्या ज्या हालचाली होतात ते प्रारब्ध भोगण्यासाठीच होय. (३६)

परी जन्मा नव्हे हेतु । हें निश्चये जाण पा तूं ।
आत्मा परिपूर्ण अनंतु । तरी संशय कासया ॥३७॥
परंतु लिंगदेहाच्या हालचालींचा पुनर्जन्मासाठी काही उपयोग नाही, हे तू निश्चयपूर्वक समजून घे. आत्मा परिपूर्ण, अनंत असताना असा संशय तरी कशासाठी ? (३७)

दुसरा अंतकाळीं । आठवे । तें तें होणें असे बरवें ।
अंतकाळी स्मरण असावे । म्हणोनी तळमळी ॥३८॥
दुसरा संशय अंतकाळी आठवतो. अंतकाळी ज्याचे स्मरण आपण करतो, त्याप्रमाणे आपल्याला व्हावे लागते. अशा समजुतीने आपल्याला अंतकाळी स्मरण असावे म्हणून काहीजण तळमळ करत असतात. (३८)

अंतकाळ तो कोणता । अज्ञान निरसे ज्ञान होतां ।
चिदचिद्‌ग्रंथि तत्वतां । तुटे तोचि मोक्ष ॥३९॥
पण अंतकाळ कशाला म्हणावे ? ज्ञान होताच अज्ञानाचा निरास होतो. चित् आणि अचित् यांचा ग्रंथी तुटला की तोच मोक्ष होय. (३९)

मरणा ऐलीकडे मेला । मृत्यु यावा कोणाला ।
मरणाभावीं स्मरणाला । काय काज ॥४०॥
जो मरणाच्या अलीकडेच मृत्यू पावला त्याला आणखी मृत्यू कोणता येणार ? आणि जर मरणच नसेल तर स्मरणाची तरी आवश्यकता काय ? (४०)

त्याचा प्रकार पुढें असे । येथें बोलिलें कांहींसें ।
कारण संशय कांहीं न सोसे । परब्रह्मीं ॥४१॥
हा विचार पुढे येणार आहेच, येथे थोडेफार त्याबद्दल सांगितले आहे. कारण परब्रह्माच्या बाबतीत थोडा देखील संशय कामाचा नाही. (४१)

संशय तितुका घातक । बळेंचि धरी वेगळिक ।
म्हणून संशय-छेदक । विचार असावा ॥४२॥
संशय हा नेहमी घातकच असतो. तो बळजबरीने वेगळेपणा निर्माण करतो. म्हणून विचार नेहमी संशयाचे खंडन करणारा असावा. (४२)

आतां श्रुति युक्ति अनुभव । जाणावें हें सर्व ।
संशयाचा ठाव । पुसून टाकी ॥४३॥
आता श्रुती, युक्तिवाद, अनुभव हे सर्व संशयाचे निरसन करतात. म्हणून त्यांचे ज्ञान करून घ्यावे किंवा हे सर्व जाणून घ्यावे आणि आपल्या संशयाचे निरसन करून घ्यावे. ) (४३)

करणें न करणें अन्यथा करणें । इतुकें देहाचेनि गुणें ।
श्रवणमननादि साधनें । देहास्तव ॥४४॥
करणे, न करणे, विपरीत करणे हे सर्व देहामुळेच घडते. श्रवण, मननादी साधनेदेखील देहामुळेच शक्य होतात. (४४)

पाप पुण्य सुख दु:ख । ज्ञान ध्यान अशेख ।
निश्चय समाधिहि देख । देहसंबंध ॥४५॥
त्याप्रमाणेच पाप, पुण्य, सुख, दःख, ज्ञान, समाधी, ध्यान हे सर्व देहसंबंधानेच निर्माण होतात. (४५)

आत्मत्वीं हें काहीं नसे । बोलिजे त्याहून अनारिसें ।
तेंचि आपण ज्ञान ऐसें । तरी संशय कोणा ॥४६॥
यातील काहीही आत्म्याच्या ठिकाणी नाही. आपण जे त्यासंबंधी बोलू. त्यापेक्षा ते वेगळेच आहे. तेच ज्ञान आपण स्वत:च झालो तर संशय कोणाला येणार ? (४६)

आत्मा आत्मत्वीं उरला । तत्क्षणीं संशय हरपला ।
येणें रीती प्रसंग जाला । संशयछेद ॥४७॥
आत्मा आत्मत्वात राहिल्याने सर्व संशय त्याक्षणी नष्ट झाला. अशा रीतीने संशयच्छेद ह्या विषयाचे विवेचन प्रसंगानुसार पूर्ण झाले. (४७)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
संशयछेदनप्रकारे । तृतीयसमास: ॥३॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
कर्मक्षयानुकार


आतां श्रुतीचा संकेत । कीं सर्व कर्मांचा घात ।
बहुवचनें प्रारब्धसमवेत । सर्वहि गेलें ॥१॥
आता श्रुतीचा संकेत असा आहे की, सर्व कर्माचा नाश झाला पाहिजे. बहुवचनाच्या प्रयोगामुळे प्रारब्धाबरोबर सर्वच कर्माचा त्यात समावेश होतो. (१)

संचित जें पूर्वार्जित । तेंचि प्रारब्ध भोगा येत ।
प्रस्तुत जें होय संपादित । तेंचि क्रियमाण ॥२॥
संचित म्हणजे पूर्वी पूर्वजन्मात केलेल्या कर्मांचा संचय. प्रारब्ध म्हणजे त्या संचिताचा, उपभोग घेण्यासाठी वेगळा काढलेला भाग आणि सध्या जे आपण करतो ते क्रियमाण कर्म होय. (२)

स्वात्मानुभव अज्ञान । तेणेंचि संभवे कर्तेपण ।
व्यर्थचि सोसी जन्ममरण । चक्रभ्रमणापरी ॥३॥
स्वात्मानुभवाच्या अज्ञानामुळे आपण केलेल्या कर्माचे कर्तृत्व आपल्या अंगाला चिकटते. त्यामुळे जीव विनाकारणच फिरणाऱ्या चाकाप्रमाणे जन्ममरणाचे फेरे सोसत राहातो. (३)

संचितेंचि देह जाला । प्रारब्धें सुखदु:ख पावला ।
क्रियमाण येथें करू लागला । पुढील जन्मा आधारु ॥४॥
तामुळे त्याला देह प्राप्त होतो. प्रारब्धामुळे तो सुखदुःखाचा अधिकारी होतो आणि पुढील जन्माचा आधार म्हणून सध्या येथे क्रियमाण कमें करत राहातो. (४)

इतुक्याचें बीज अज्ञान । तेंचि ज्ञानें होय दहन ।
जन्ममरणातीत आपण । ज्ञान तें हेंचि ॥५॥
या सर्व कामागचे मुख्य कारण म्हणजे अज्ञान होय. ते ज्ञानाने दग्ध होते. आपण जन्ममरणांच्या पलीकडे गेलेले आहोत, हेच ते ज्ञान होय. (५)

तरी आतां कोण कर्ता । अहंपणाची मिथ्या वार्ता ।
अहंकर्तृत्वचि निमतां । त्रिविध कर्मे नासलीं ॥६॥
ते ज्ञान झाल्यानंतर कर्ता म्हणायला कोण उरला ? अहंपणाची भाषादेखील खोटीच ठरली. अहंपणा आणि कर्तृत्व नाहीशी झाल्यानंतर तीन प्रकारची कमेंदेखील नष्ट झाली. (६)

स्वप्नीं होताती व्यवहार । अवस्थाकालीं जे साचार ।
पुण्यपापाचे संस्कार । सुखदु:खप्रतीति ॥७॥
स्वप्नामध्ये जे व्यवहार होतात, ते त्या अवस्थेपुरते खरे असतात. पुण्यपापाचे जे संस्कार असतील त्यानुसार सुखदुःखाचे अनुभव हे सर्वही स्वप्रापुरतेच खरे असतात. (७)

तेथें जें जें पुण्य घडलें । जागृतीं कोण स्वर्गा गेलें ।
अथवा महापाप प्रतीतीस आलें । कोणें घेतलें प्रायश्चित्त  ॥८॥
त्या अवस्थेत जे पुण्य घडते त्या पुण्यामुळे जागृतीत कोणी कधी स्वर्गाला गेले आहे काय ? अथवा स्वप्नामध्ये महापापाचा अनुभव घेतल्यामुळे जागृतीत कोणी कधी प्रायश्चित्त घेतले आहे काय ? (८)

सुखदु:ख पुण्यपाप । हा तोंवरीचि संताप ।
जागृति येतां आपेआप । सर्वहि निमालें ॥९॥
स्वप्रातील सुखदु:खे, पुण्यपापे इत्यादी संताप स्वप्न असेपर्यंतच असतात. जागृती येताच ते सर्व आपोआपच नष्ट होतात. (९)

अज्ञान सुषुप्ती गहन । मी कर्ता भोक्ता हें स्वप्न ।
मी आत्मा हें होतां ज्ञान । सकार्य नासे ॥१०॥
अज्ञान ही गाढ निद्रा आहे. 'मी भोक्ता, मी कर्ता' अशी जाणीव हे तीत पडलेले स्वप्न होय. ते स्वप्न 'मी आत्मा आहे' असे ज्ञान होताक्षणीच आपल्या कार्यासहित नष्ट होते. (१०)

मागें जें पुण्यपाप केलें । तें ज्ञान होतां जळालें ।
अहंकर्तृत्व जेव्हां निमालें । शून्य पडिले क्रियमाणा ॥११॥
पूर्वी जी पुण्यपापे केलेली असतील ती ज्ञान झाल्याबरोबर जळून जातात. अहंपणा आणि कर्तृत्व जेव्हा नाहीशी होतात, त्याच वेळी क्रियमाण कर्मेही नष्ट होतात. (११)

प्रारब्ध देहासी भोग । नाना सुखदु:खांचा प्रसंग ।
आत्मा आपण असंग । एवं प्रारब्धही नाहीं ॥१२॥
प्रारब्ध म्हणजे देहाचा भोग म्हणजेच विविध सुखदुःखांचा अनुभव. आपण असंग असा आत्मा आहोत असे कळताच प्रारब्धही नष्ट होते. (१२)

ऐसें ऐकतां म्हणे श्रोता । सर्व करीतसे ज्ञाता ।
करून कैसा तो अकर्ता । आम्हां सांगावें ॥१३॥
हे ऐकताच श्रोता विचारतो, "ज्ञाता सर्व काही करतो. पण सर्व काही करूनही तो अकर्ता कसा हे आम्हांस सांगावे. " (१३)

वक्ता म्हणे सावधान । गीतेंत बोलिला श्रीकृष्ण ।
देहेंद्रिय अहंकार प्राण । पांचवें दैव ॥१४॥
वक्ता त्याला म्हणतो, की लक्ष देऊन ऐक. गीतेत भगवान श्रीकृष्णाने असे सांगितले आहे की, देह, इंद्रिये, अहंकार, प्राण आणि पाचवे दैव. (१४)

इतुका मिळे संघात । न्यायान्याय कर्म समस्त ।
होत तया अलिप्त । गृहकर्मा दीप जैसा ॥१५॥
इतका समुदाय जेव्हा एकत्र होईल तेव्हाच कमें घडतात. (भ. गी. १८. १४) अशा प्रकारे न्याय्य अथवा अन्याय्य अशी कमें घडत असताना आत्मा मात्र, घरातल्या वेगवेगळ्या कर्माचा दीप हा साक्षी असूनही त्यांपासून अलिप्त असतो, तसा अलिप्त असतो. (१५)

न जाणतां आत्मस्वरूप । संघाताचें नेणतां रूप ।
आत्मत्वीं करिती आरोप । कर्तेपणाचा ॥१६॥
आत्म्याची ही भूमिका न जाणता, आणि या कर्मकारणांच्या संघाताचे स्वरूप न ओळखता लोक आत्म्यावर उगीचच कर्तेपणाचा आरोप करत असतात. (१६)

मेघगति चंद्रावरी । बाळ जैसा आरोप करी ।
तैसे अज्ञान तोंवरी । अहंकर्तव्यता ॥१७॥
बालक ज्याप्रमाणे मेघातून अस्पष्ट दिसणाऱ्या चंद्रावर मेघांच्या गतीचा आरोप करते, त्याप्रमाणे अज्ञान असेतोपर्यंत मी कर्ता'असा कर्तृत्वाचा अभिमान बाळगला जातो. (१७)

संशयातीत आपण । ज्ञानेंचि गळालें मीपण ।
संचित आणि क्रियमाण । तत्क्षणीं दग्ध जालें ॥१८॥
आपण (आत्मा) संशयातीत असून ज्ञानाने मीपण गळून जाते. त्याचक्षणी संचित, क्रियमाण कर्मे जळून जातात. (१८)

म्हणसी स्वप्न सुकृत दुष्कृता । दग्ध जालें जागृति येतां ।
तैसें पूर्वार्जित संचिता । ज्ञानें नाशिलें ॥१९॥
यावर तू म्हणशील की, स्वप्रातील पाप किंवा पुण्य जागृतीत नष्ट होते त्याप्रमाणे पूर्वार्जित संचित ज्ञानाने नष्ट होते, हे मान्य. (१९)

परी जागृतीसी कर्म जालें । तें पुढें पाहिजे भोगिलें ।
ज्ञानोत्तरीं क्रियमाण घडलें । तें भोगणें लागे ॥२०॥
पण जागृतीत होणारी कमें पुढे भोगली पाहिजेतच ना! ज्ञान झाल्यानंतर जे क्रियमाण कर्म घडते ते भोगावे लागतेच. (२०)

ऐसें न घडे सर्वथा । नाहंकर्तृत्वें गेलें वृथा ।
पापपुण्यादि अनर्था । बोलोंचि नये ॥२१॥
यावर उत्तर असे की, तू म्हणतोस त्याप्रमाणे होत नाही, कारण मी कर्ता नाही या ज्ञानाने ते सर्व कर्म व्यर्थ होते. त्यामुळे पाप पुण्य इत्यादी अनाची गोष्टच काढू नये. (२१)

तेणें सर्वासि वधिलें । अथवा ब्रह्मांड रचिलें ।
श्रीकृष्णवचनें कळलें । ज्ञाता अलिप्त ॥२२॥
त्या साधकाने सर्वांचा वध केला अथवा ब्रह्मांडाची रचना केली तरी ज्ञाता अलिप्तच असतो, असे श्रीकृष्णाच्या वचनावरून कळते. (भ. गी. १८. १७४२२)

जेव्हां अज्ञान बळकट होतें । तेव्हांचि नातळे कर्मातें ।
उगेंचि धरितां मीपणातें । सुखदु:ख पावे ॥२३॥
खरे पाहिले तर अज्ञान बळकट असतानादेखील ज्ञाता तसाच कर्मापासून अलिप्तच होता. पण उगीचच मीपणा धारण केल्याने सुखदुःख भोगू लागला. (२३)

सुखादि भोक्तृत्व मुळीं नाहीं । अहंकर्तुत्वें दिसें कांही ।
ज्ञानें निमतां अहं-अही । न बोलतां अकर्ता ॥२४॥
सुखादी भोगणे असा प्रकार मुळीच नाही. पण मी कर्ता आहे या भावनेमुळे ते तसे दिसते. त्या अहमरूपी सर्पाचा ज्ञानाने नाश होताच तो काही न बोलताच अकर्ताहोतो. (२४)

मृगजळ जेथें पडिलें । तेथें तृणहि नाहीं बुडालें ।
आटतां कोरडें जालें । बोलावें नलगे ॥२५॥
ज्या ठिकाणी मृगजळ दिसते तेथे गवतसुद्धा बुडलेले नसते. त्यामुळे मृगजळ आटल्यामुळे सर्व कोरडे झाले हे सांगावे लागत नाही. (२५)

एवं क्रियमाण नाहीं ज्ञात्यासी । घडतसे तया गति कैसी ।
ऐसें कांहीं कल्पिसी । श्रुतिसिद्ध ऐका तें ॥२६॥
अशा प्रकारे ज्ञात्याला क्रियमाण कर्माची बाधा नाही. पण एरव्ही जे कर्म ज्ञात्याच्या हातून घडते त्याची गती कोणती अशी कल्पना करत असशील तर वेदाने यावर जे उत्तर दिले आहे ते ऐक. (२६)

ज्ञात्याचें कर्म पुण्यात्मक । त्याचे अधिकारी सेवक ।
वंदिती पूजिती निष्ठा एक । मानसीं जया ॥२७॥
ज्ञात्याचे जे कर्म पुण्यात्मक असते ते पुण्य त्याच्या सेवकांना मिळते. ते त्याला वंदन करतात. त्याची पूजा करतात. त्यांच्या मनात त्याच्याबद्दल एक निष्ठा असते. म्हणून त्या पुण्यकर्माचे ते अधिकारी असतात. (२७)

जें कां निंदक दुर्जन । गांजिती लाविती दूषण ।
ज्ञात्याचें जें पाप गहन । तयांचे माथां ॥२८॥
पण जे लोक त्याचे निंदक असतात, दुर्जन असतात, जे त्याचा छळ करतात, त्याला दोष देतात त्या लोकांच्या माथी ज्ञात्याचे जे पापकृत्य असेल ते बसते. (२८)

पशु धन वस्त्रे जितुकें । त्यासि अधिकारी पुत्रादिकें ।
ज्ञाता अलिप्त विवेकें । मोकळा जाला ॥२९॥
त्याचे जे पशू, धन, वस्त्रे इत्यादी जेवढे असेल त्याला त्याचे पुत्र इत्यादी नातेवाईक अधिकारी आहेत. ज्ञाता मात्र अलिप्त असून विवेकाने तो या सर्वांपासून मुक्त असतो. (२९)

श्रोता म्हणे जी भलें जालें । संचित क्रियमाण नासलें ।
परी प्रारब्ध पाहिजे भोगिलें । ज्ञातयानीं ॥३०॥
यावर श्रोता म्हणतो की, ज्ञात्याचे संचित कर्म आणि क्रियमाण कर्म नष्ट झाले ही गोष्ट छान झाली. पण यावर श्रोता म्हणतो की, ज्ञात्याचे संचित कर्म आणि क्रियमाण कर्म नष्ट झाले ही गोष्ट छान झाली. पण प्रारब्ध कर्म तरी ज्ञात्यालाच भोगावे लागते ना ? (३०)

वक्ता म्हणे हो आयिका । उगा गलबला करूं नका ।
प्रारब्धभोग देहादिकां । कीं आत्मयासी ॥३१॥
तेव्हा वक्ता म्हणतो की, शांतपणे ऐका. उगीच गोंधळ करू नका. प्रारब्धभोग कुणाला भोगावे लागतात ? देहाला की आत्म्याला ? (३१)

देहाचें तादात्म्य जो धरिता । अज्ञान अहंकार तत्वतां ।
देहसंघात नव्हे कीं ज्ञाता । तरी प्रारब्ध कोणा ॥३२॥
देहाशी तादात्म्य जो धरतो तो अज्ञानी आणि अहंकारी आहे. पण देहसंघात म्हणजे ज्ञाता नव्हे. मग प्रारब्ध कोणाचे ? (३२)

प्रारब्ध देहासी भोगवी । आत्मत्वीं केवि बोलावी ।
ज्ञाता आत्मा भेद भावी । तोचि अधम ॥३३॥
प्रारब्ध देहाला भोगावे लागते. ते आत्म्याचे कसे म्हणता येईल ? जो ज्ञाता आणि आत्मा यात भेद करतो, तोच अधम होय. (३३)

लोखंड कुटितां घणीं । अग्नीसी नव्हे जाचणी ।
बळें कल्पिजे अज्ञानीं । प्रारब्धही तैसें ॥३४॥
लोखंड घणांनी ठोकत असता अग्नीला काय वास ? पण अज्ञानी लोक मात्र अग्नीला त्रास होतो असे मानतात. प्रारब्धही बळेच आत्म्याच्या माथी मारतात. (३४)

श्रुति अज्ञांना सांगत । कीं ज्ञाता प्रारब्धीं वर्तत ।
माता जैसी बुझावीत । रडतयासी ॥३५॥
एखाद्या रडणाऱ्या लहानमुलाला जसे समजावून सांगावे तसे श्रुती अज्ञानी लोकांना सांगते की, ज्ञाता प्रारब्धानुसार वागतो खरा, (३५)

ज्ञातयासी प्रारब्ध नाहीं । श्रुतीनें उभवून बाही ।
सर्व कर्माचा लेश नाहीं । बहुवचनें बोलत ॥३६॥
पण ज्ञात्याला प्रारब्धाची झळ पोचत नाही. श्रुतीने आपले बाहू उभारून सांगितले आहे की, ज्ञात्याला सर्वच प्रकारच्या कर्मांची बाधा होत नाही. श्रुती 'कर्मांचा' असा अनेकवचनी प्रयोग करीत आहे, हे लक्षात घ्यावे. (३६)

एवं सर्व कर्मांची क्षीणता । वस्तुरूप असे ज्ञाता ।
यदर्थी संशयाची वार्ता । बोलोंचि नये ॥३७॥
अशा त-हेने सर्व कमें नाहीशी होतात. ज्ञाता ब्रह्मरूपच असतो. या संदर्भात आता संशयाची गोष्टसुद्धा काढू नये. (३७)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
कर्मक्षयानुकारे । चतुर्थसमास: ॥४॥

हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
प्रारब्धकर्मानुकार


विवेकें प्रारब्ध देहासी । भोगितां भय काय आत्मयासी ।
अखंड परिपूर्ण अभेदासी । ज्ञाता पावला ॥१॥
प्रारब्ध हे देहाचे आहे. ज्ञाता अखंड संपूर्ण अभेदस्वरूप झाल्यावर त्याने विवेकपूर्वक जर देहाचे प्रारब्ध भोगले तर आत्म्याला कशाचे भय आहे ? (१)

म्हणसी अभेदज्ञान जालिया । प्रारब्ध नसावें ज्ञातया ।
भोगानंतरें पावे क्षया । हें अघटित ॥२॥
तू असे म्हणतोस की, अभेदज्ञान झाल्यानंतर ज्ञात्याला प्रारब्ध भोगायला लागू नये, प्रारब्ध हे भोगल्यानंतरच नष्ट होते, हा न्याय बरोबर नाही. (२)

तरी ऐसें न कल्पावें । ज्ञान होतां लया जावें ।
तरी जगदोद्धार संभवे । कोणें प्रकारें ॥३॥
तर माझे सांगणे असे की, तू अशा प्रकारचा विचार करू नकोस. ज्ञान झाल्याबरोबर ज्ञात्याने लयाला जावे असे तू म्हणत असशील तर जगाचा उद्धार कसा होईल ? (३)

ज्ञाते प्रारब्धिं वर्ततां । ज्ञातयासी नसे वार्ता ।
मुमुक्षुसाधकापुरता । महोदय जाला ॥४॥
ज्ञाता प्रारब्धानुसार वागत असताना ज्ञात्याला त्याची जाणीवही नसते. पण ज्ञात्याच्या या प्रारब्धकर्मानुसार वागण्याने मुमुक्षू साधकांना मात्र ती पर्वणी वाटते (भाग्योत्कर्ष वाटतो) . (४)

जैसें सूर्यादिकां भ्रमण । स्वात्मार्थे नसे जाण ।
त्रिभुवनींचे सर्व जन । प्रकाशें वर्तती ॥५॥
सूर्य इत्यादी ग्रह भ्रमण करतात. ते स्वत:साठी नसते. पण त्यांच्या भ्रमणामुळे त्रिभुवनातील सर्व लोक प्रकाशात व्यवहार करू शकतात. (५)

ब्रह्मा विष्णु सदाशिव । तेथून परंपरा समुदाव ।
गुरुशिष्यद्वारां अपूर्व । ज्ञानप्रवाह चालिला ॥६॥
ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांच्यापासून ज्ञानाची परंपरा सुरू होऊन गुरुशिष्यक्रमाने अपूर्व ज्ञानप्रवाह चालू आहे. (६)

मागें पुढे आणि वर्तमानीं । समाधान पावले ज्ञानीं ।
हें प्रारब्धाची करणी । ज्ञानोत्तर ज्ञात्याचे ॥७॥
भूतकाळात भविष्यकाळात आणि वर्तमानकाळात तिन्ही काळांत ज्ञान्यांना समाधान प्राप्त झाले आहे. ही सर्व करामत ज्ञात्याच्या ज्ञानोत्तर प्रारब्ध कर्माची आहे. (७)

अज्ञान ज्ञानिया प्रारब्ध । सारिखा देहाचा संबंध ।
निद्रा आहारादिकां भेद । किमपि नाहीं ॥८॥
अज्ञानी माणूस आणि ज्ञानी माणूस यांना प्रारब्धामुळे सारखीच देहप्राप्ती होते. निद्रा, आहार इत्यादीमध्ये काहीही भेद नाही. (८)

भोग उभयातें समान । परी ज्ञाता आनंदें समाधान ।
अज्ञान पावती शीण । नाना सुखदु:खें ॥९॥
प्रारब्धाचे भोग दोघांनाही सारखेच असतात. पण ज्ञाता मात्र आनंदात राहून समाधानी असतो. अज्ञानी मनुष्य मात्र निरनिराळ्या प्रकारच्या सुखदुःखांनी व्यर्थ शिणतो. (९)

मज अप्राप्त तें प्राप्त व्हावें । प्राप्त तें चिरकाल राहावें ।
नाना सायास करूं धावे । दु:खरूप नेणें ॥१०॥
मला अद्याप जे मिळालेले नाही, ते मिळावे; जे मिळालेले आहे ते चिरकाल राहावे या इच्छेने तो अनेक प्रकारचे कष्ट करायला लागतो. त्या कष्टांची दुःखरूपता त्याला माहीत नसते. (१०)

प्राप्त विषयासी आनंदें । सवेंचि नासतां खेदे ।
रडे पडे आक्रंदे । वासनाबद्ध हो‍ऊनी ॥११॥
त्यामुळे विषय प्राप्त होताच तो आनंदित होतो तो नष्ट होताच तो दुःखी होतो. अशा त-हेने वासनाबद्ध झाल्यामुळे तो रडू पडू लागतो, आक्रंदन करतो. (११)

ज्ञाता ज्ञानें समाधान । आपणांहून जें कांहीं भिन्न ।
तें मृगजळासमान । मिथ्यात्वें पाहे ॥१२॥
ज्ञाता ज्ञानाने समाधानी असतो. त्यामुळे आपल्याहून जे काही भिन्न असेल ते मृगजळाप्रमाणे मिथ्या म्हणून तो पाहत असतो. (१२)

मृगजळें तृषाहरण । होय यासी काय प्रमाण ।
विषयजाता पडिलें शून्य । आतां काय इच्छावें ॥१३॥
मृगजळाने तहान भागते याला काही प्रमाण आहे का ? सर्वच विषय जेथे शून्यासारखे झाले तेथे कशाची इच्छा करणार ? (१३)

इच्छा नसतां प्राप्त जालें । तें तें उगेंचि भोगिलें ।
तेणें सुख अनुभविलें । न वचे विषयाचें ॥१४॥
इच्छा न करता जे प्राप्त होते ते तो उदासीनपणाने भोगतो. अशा भोगण्यामुळे त्याने विषयांचे सुख अनुभवले असे होत नाही. (१४)

अंत्यजाच्या घरिंचा पाक । जालासे परम रसिक ।
तया सोवळे वैदिक । नातळती जैसें ॥१५॥
अंत्यजाच्या घरी अगदी उत्कृष्ट स्वयंपाक झालेला असला तरी सोवळे वैदिक त्यापासून अलिप्त राहतात. (१५)

आत्मा हा सोवळा ब्राह्मण । देहादि अंत्यज संपूर्ण ।
तरी प्रारब्धभोगाचा शीण । आत्मबोधें कैचा ॥१६॥
येथेही आत्मा हा सोवळा ब्राह्मण असून देहादी अंत्यजाप्रमाणे आहेत. तेव्हा प्रारब्धाच्या भोगाचा शीण ज्ञान झालेल्या माणसाला कसा होईल ? (१६)

कर्मानुसार विषय नासती । ज्ञात्यासी विषाद न चित्तीं ।
जैसी वांजेची संतती । एकदाचि बुडाली ॥१७॥
कर्मानुसार विषय नष्ट झाले तरी ज्ञात्याला त्यांबद्दल मनात दुःख वाटत नाही, वांझेची अपत्ये एकदमच बुडाली, तेव्हा त्यांच्याबद्दल शोक करण्याचे कारण नाही, तसेच विषय नष्ट झाल्यानंतर त्याला वाटते. (१७)

इंद्रपदादि प्राप्त जालें । अथवा सर्वही बुडालें ।
परी हर्ष विषाद टाकिले । तरी सुखदु:ख कैचें ॥१८॥
इंद्रपद प्राप्त झाले अथवा सर्वस्व बुडाले तरी त्यासंबंधी हर्ष आणि विषाद दोन्ही टाकूनच दिल्यामुळे त्याला सुख अथवा दुःख कोठून होणार ? (१८)

सुखदु:ख धर्म मनाचा । संगचि सांडिला तयाचा ।
तेणेंविण विषयभोगाचा । संबंध नसे ॥१९॥
सुखदुःख मानणे हा मनाचा धर्म आहे. पण त्याने मनाची संगतीच टाळली असल्याने मनोरहित अवस्थेत विषयभोगाचा संबंधच येत नाही. (१९)

आत्मबोधें संतोषला । सर्व विषयाचा त्याग केला ।
दरिद्री राज्यपद पावला । पूर्वील चिंध्या नेणे तों ॥२०॥
एकदा आत्मज्ञानाच्या योगाने त्याला समाधान प्राप्त झाले आणि त्याने विषयांचा त्याग केला म्हणजे दरिद्री माणसाला राज्यपद प्राप्त झाल्यानंतर पूर्वायुष्यातील चिंध्यांचा जसा विसर पडतो तसे त्याचे होते. (२०)

येथें आक्षेपु असे केला । ज्ञाता इच्छितो विषयाला ।
तरी अभाव कामनेचा जाला । काशावरुनी ॥२१॥
यावर एक आक्षेप असा की, ज्ञातासुद्धा विषयांची इच्छा करताना दिसतो, तरी त्याच्या ठिकाणी विषयाबद्दलची कामना नसते असे कशावरून समजावयाचे ? (२१)

इच्छा जरी ज्ञातयासी । तरी सुखादि अप्रतीति कैसी ।
सांडोनि हर्ष शोकासी । समाधान कैसें तें ॥२२॥
जर इच्छा होते तर सुखादिकांचा त्याला अनुभव नसतो हे कसे ? आणि हर्षशोक टाकून दिल्यानंतर त्याला समाधान तरी कसे मिळते ? (२२)

आतां याचें कैसें उत्तर । प्रारब्धाचे तीन प्रकार ।
इच्छा अनेच्छा आणि पर । भोगवी देहासी ॥२३॥
आता या प्रश्नांचे उत्तर कसे द्यायचे ? देहाला भोगावी लागणारी प्रारब्धे तीन प्रकारची आहेत. इच्छाप्रारब्ध, अनिच्छाप्रारब्ध आणि परप्रारब्ध असे ते तीन प्रकार होत. (२३)

इच्छून यत्नें संपादिलें । तें इच्छा प्रारब्ध बोलिलें ।
न इच्छितां भोगासि आलें । अनेच्छाकर्म ॥२४॥
ज्याची इच्छा करून प्राप्ती करून घेतलेली असते, ते इच्छाप्रारब्ध होय. जे आपण इच्छा न करताही भोगावे लागते ते अनिच्छा प्रारब्ध होय. (२४)

इच्छा अनेच्छा दोन्ही नसे । परदाक्षिण्याचें मिषें ।
भोगणें सुखदु:खाचें अपैसे । परेच्छाकर्म तें ॥२५॥
इच्छाही केलेली नसते, अथवा अनिच्छेनेही जे आपण भोगत नाही तर परोपकारासाठी किंवा दसऱ्याची दया येऊन त्या निमित्ताने आपण सुखदःख भोगतो ते परेच्छाकर्म अथवा परेच्छाप्रारब्ध होय. (२५)

हे तिन्हींही एकासी असती । एक नेमिता न ये मति ।
इच्छिता न इच्छिता योय प्राप्ति । काल-कर्माधीन तें ॥२६॥
ही तिन्हीही एकाच्या ठिकाणी आढळतात. एक निश्चित असे ठरविता येत नाही. इच्छा करून अथवा इच्छा न करता ज्याची प्राप्ती होते, ते काल व कर्म यांच्या अधीन असते. (२६)

क्षुधेचें करावें हरण । इच्छून कई भिक्षाटण ।
तेथें मिळालें वस्त्रधन । इच्छेवाचुनी ॥२७॥
क्षुधा म्हणजे भूक भागविण्यासाठी इच्छा करून भिक्षेसाठी फिरत असता अचानक अन्नाबरोबर वस्त्रे आणि धनही इच्छा न करता मिळते. (२७)

मित्र कोणी आवडता । त्या नसावी दु:खवार्ता ।
उपयार्थ लगबग करितां । सुख दु:ख पावे ॥२८॥
आपला एखादा आवडता मित्र असेल त्याला दु:ख नसावे म्हणून धडपड करताना कधी अचानक सुखदुःखाची प्राप्ती होते. (२८)

देहधारी जितुका जाला । प्रारब्धें न वचे सोडिला ।
अरे कर्माचाचि उभारिला । तेणेंवीण न राहे ॥२९॥
जेवढे म्हणून देहधारी जीव आहेत त्यांपैकी कोणीही प्रारब्धातून मुक्त होत नाही. अरे, देहच जर मुळात कर्माचाच बनला आहे तो कर्मापासून मुक्त राहूच शकणार नाही. (२९)

पट सुताचा विणिला । तंतूंत तंतू गोविला ।
गोवा अवघाचि काढिला । तरी पट कैचा ॥३०॥
सुताचा पट तयार केला म्हणजे तंतूत तंतू गुंतवून ठेवण्याचा प्रकार होय. त्यांची ती गुंफण सगळीच उकलली तर पट कसा राहील ? (३०)

तैसें प्रारब्धावाचुनी । देह हा नसे नयनीं ।
सुखदु:ख-भोग तया लागुनी । चुकेना कीं ॥३१॥
त्याप्रमाणे प्रारब्धावाचून असलेला एकही देह डोळ्यांना दिसणार नाही. त्यामुळे देहाला सुखदु:खभोग चुकणार नाहीत. (३१)

प्रतिकार होणाराचा । जरी होता सुखदु:खाचा ।
नल-राम-धर्मादिकांचा । वनीं वास न होय ॥३२॥
वाट्यास येणाऱ्या सुखदुःखांचा प्रतिकार करता येत असता तर नलराजा, रामचंद्र, धर्म इत्यादींना वनात वास्तव्य करावे लागले नसते. (३२)

ईश्वर अंगें आपण । प्रारब्ध भोग नव्हे न्युन ।
ईशसामर्थ्य मानिसी उणें । तोचि प्रेरक कर्मासी ॥३३॥
स्वतः ईश्वर असला तरी त्याच्या प्रारब्धभोगात काही कमी होत नाही. त्याचे सामर्थ्य कमी पडले असे तुला वाटत असेल तर हे लक्षात घे की, तो तर सर्व कर्माचा प्रेरक आहे. (३३)

आपुली आज्ञा चक्रवर्ती । पाळितसे यथा रीती ।
म्हणोनि राजसामर्थ्यशक्ति । काय उणी जाली ॥३४॥
चक्रवर्ती राजा स्वत:चीच आज्ञा रीतीप्रमाणे पाळतो. पण त्यामुळे त्याच्या सामर्थ्याची शक्ती कमी होते काय ? (३४)

असो प्रारब्ध देहा सुटेना । ज्ञाता प्रतिकारही करीना ।
हर्ष शोक टाकुनी नाना । मौनेंचि भोगी ॥३५॥
असो, देहाला प्रारब्ध काही सुटत नाही. ज्ञाता त्याचा प्रतिकारही करत नाही. निरनिराळे हर्षशोक टाकून मौनानेच तो प्रारब्ध भोगतो. (३५)

इच्छून भोगी जरी ज्ञाता । तरी त्या हर्षशोकाची नसे वार्ता ।
कारण नामरूपात्मक द्वैता । शोन्य पडिलें ॥३६॥
इच्छा धरून जरी ज्ञात्याने प्रारब्धाचा भोग घेतला, तरी त्याला त्या हर्षशोकांची वार्ताही नसते, कारण नामरूपात्मक द्वैतच त्याच्या मनातून नष्ट झालेले असते. (३६)

द्वैत सत्य जरी असावें । तरी हानि लाभ संभवे ।
हानिलाभेविण असावें हर्ष शोक केवी ॥३७।
द्वैत जर सत्यस्वरूपात असते तर हानि, लाभ संभवले असते. पण हानिलाभच नसतील तर हर्षशोक कसे होतील ? (३७)

जैसे देहीं नाना अवयव । इतुका मीचि हा दृढभाव ।
उजवे करींचे अलंकार सर्व । डावे हाती घातले ॥३८॥
देहात विविध अवयव आहेत, ते सर्व मीच आहे अशी दृढ भावना ज्ञात्याच्या मनात झालेली असते. तेव्हा उजव्या हातातले अलंकार डाव्या हातात घातले, (३८)

एका लाभ एकासी हानी । काय दिसती भिन्नपणीं ।
हर्ष शोक न वाटे मनीं । एकात्मता दृढ जाली ॥३९॥
तर एका हाताला लाभ झाला व दुसऱ्या हाताचे नुकसान झाले असे आपण म्हणतो काय ? ते भित्र आहेत असे तरी दिसते का ? त्यांची एकात्मता दृढ झाल्याकारणाने मनास हर्ष, शोक इ. जाणवतच नाहीत. (३९)

तैसें हे चराचर जितुकें । आपुला ठाई अनेकें ।
मीतूंपणेंविण विवेकें । एक आत्मा परिपूर्ण ॥४०॥
त्याप्रमाणे हे चराचर विश्व आपल्या स्वत:च्या शरीरातूनच सामावलेले (ठिकाणी) आहे अशी भावना धरून मी-तूपणा सोडून देऊन विवेकाच्यासाहाय्याने एकच आत्मा सर्वत्र भरला आहे असे ज्ञाता मानतो. (४०)

आपणामध्यें विषयजात । येथें कोणतें अप्राप्त ।
गेले आले आपणांत । लाभ ना हानी ॥४१॥
आपल्यामध्येच सर्व विषय सामावलेलेअसल्याने आपल्याला कोणती वस्तू अप्राप्त असेल ? (सर्व वस्तू माझ्याच आहेत) त्यातल्या काही वस्तू गेल्या, तरी माझ्यावाचून दुसरीकडे कोठे जाणार ? आणि आल्या तरी माझ्यातच येणार! त्यामुळे या आल्यागेल्याचा मला लाभही नाही, नुकसानही नाही. (४१)

दृढ बोधें अद्वैत जाला । हर्ष शोक नि:शेष गेला ।
मग कोटि इच्छा करूं लागला । तेणें उणें कोणतें ॥४२॥
ज्ञान दृढ झाल्यामुळे तो द्वैतरहित झालेला असतो त्यामुळे त्याचे हर्षशोक संपूर्णपणे नाहीसे झालेले असतात. तेव्हा त्याने कोट्यवधी इच्छा केल्या तरी त्यात काय बिघडले ? (४२)

इच्छा हें अज्ञान जीवातें । बांधून घाली बळें जन्मातें ।
त्याचि इच्छेनें ज्ञानियां होतें । द्विगुण समाधान ॥४३॥
इच्छा ही अज्ञानी जीवांना बांधून बळेच जन्माला घालते. त्याच इच्छेने ज्ञानी माणसाला दुप्पट समाधान होते (४३)

एक मुळी मार्गी पडली । एक भ्याला एकें ओळखिली ।
दोघांची अवस्था भिन्न जाली । विवेक अविवेकें ॥४४॥
रस्त्यामध्ये एक मुळी पडलेली आहे. एकजण तिला पाहून घाबरतो. दुसऱ्याने ती मुळी ओळखली. त्यामुळे एकाच्या अविवेकामुळे व दुसऱ्याच्या विवेकामुळे दोघांच्या अवस्था भिन्न भित्र झाल्या. (४४)

अबोधाचें चिन्ह ते प्रीति । अनुराग असो ज्ञात्याप्रती ।
दोहीं वचनांची यथा स्थिति । सार्थक्यता जाली ॥४५॥
प्रीती हे अज्ञानाचे चिह्न होय. तशीच ज्ञात्यालाही प्रीती असायला हरकत नाही. ही दोन्ही वाक्ये आपापल्या परीने सार्थच आहेत. (४५)

शंकराचें जें आभरण । तेंचि इतरासी मरण ।
अज्ञानाचें जें दूषण । होय भूषण ज्ञानियां ॥४६॥
शंकराचा जो दागिना (सर्प) आहे तोच इतरांचे मरण ठरू शकतो. त्याप्रमाणे अज्ञानी माणसांचा जो दोष ठरतो तोच ज्ञानी माणसाचा अलंकार होऊ शकतो. (४६)

म्हणोनि ज्ञानी आणि अज्ञान । उभयतां भोग समान ।
देहद्वयाचेंहि दिसणें । सारिखें असे ॥४७॥
म्हणून ज्ञाना-अज्ञानी दोघांनाही शरीरभोग सारखेच असतात. दोघांचे देहही सारखेच दिसतात. (४७)

प्रारब्ध ज्ञाना विरोधि असे । तरी जनकादि राहती कैसे ।
प्रवर्तती हननीं तैसे । ज्ञानसिद्धि व्हावया ॥४८॥
प्रारब्ध जर ज्ञानाचे विरोधक असते, तर जनक इ. कसे राहिले असते ? ज्ञान प्राप्त होण्यासाठी प्रारब्ध नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता. (४८)

अथवा ज्ञान विरोधी प्रारब्धासी । बोलूं नये निश्चयेसी ।
एक विषय असतां दोहींसी । विरोध होता ॥४९॥
किंवा प्रारब्ध हे ज्ञानाच्या विरुद्ध आहे असे म्हणूही नये. दोघांचा विषय एकच असता तर त्यांच्यात विरोध आला असता. (४९)

भिन्न विषय भिन्नपणीं । विरोध नव्हे या लागुनी ।
पूर्वपश्चिमे एकत्र गमनीं । नवचे जैसें ॥५०॥
दोघांचेही विषय भिन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यात विरोध येत नाही. एकाच प्रवासात एकाच वेळी पूर्वेला व पश्चिमेला जाता येईल काय ? (५०)

स्वरूपाविण जितकें अन्य । तितुकें मिथ्यात्वें अवलोकन ।
हेंचि ज्ञानाचे लक्षण । प्रारब्धें न नासे ॥५१॥
स्वरूपाहून जे जे भिन्न असेल त्याच्याकडे मिथ्यात्वाने पाहणे हे ज्ञानाचे लक्षण होय. ते प्रारब्धामुळे नष्ट होत नाही. (५१)

विषय सत्यत्वें स्थापावे । मग जीवासी भोग द्यावे ।
ऐसें कदा न संभवे । मिथ्यात्वें भोग घडती ॥५२॥
विषय सत्य म्हणून स्वीकारावेत तेव्हाच जीवाला त्याचे भोग घेता येतात. मिथ्यात्वाने भोग घडतात, असे कधीच संभवत नाही. (५२)

इंद्रजाल मिथ्याचि परी । विनोदें मनरंजन करी ।
पाहतां तयासी निर्धारी । सत्यत्व नवचे ॥५३॥
इंद्रजाल (जादू) जरी मिथ्या असले तरी ते मनोरंजन करते. पण निश्चयाने त्याच्याकडे पहाताच त्याचे सत्यत्व नष्ट होते. (५३)

प्रारब्ध अग्र हें जीवासी । सुखदु:ख द्यावे निश्चयेसी ।
सत्यचि प्रतिपादी विषयासी । हें तो न घडे ॥५४॥
प्रारब्ध हे जीवाला अग्रक्रमाने अटळ आहे. त्याने जीवाला सुखदुःख खुशाल द्यावे. पण तत्पूर्वी विषयांना सत्यत्व असले पाहिजे. पण ते नसते. (विषयांच्या मिथ्यात्वामुळे प्रारब्धाने दिलेली सुखदुःखेही मिथ्याच ठरतात) (५४)

म्हणोनि ज्ञाना विरोधि नव्हे । प्रारब्ध भोगून नासताहे ।
प्रारब्धासीहि नासून लाहे । नि:शेष ज्ञान ॥५५॥
म्हणून प्रारब्ध हे ज्ञानविरोधी नव्हे. प्रारब्ध हे भोगून नष्ट होते. प्रारब्धाला नष्ट करून निखळ ज्ञानप्राप्ती होते. (५५)

सर्व मिथ्या जाणावें । खांदून नवचे काढावें ।
प्रारब्धभोग सुखें नावें । घडेना कां ॥५६॥
हे सर्व मिथ्या आहे, हे समजून घ्यावे. पण त्याचा समूळ नाश मात्र करू नये. प्रारब्धभोग सुखाने घडेनात का ? (५६)

असो ज्ञान प्रारब्धाप्रती । विरोध नसे गा निश्चिती ।
ज्ञान अज्ञान एक स्थिति । न घडे कदा ॥५७॥
असो, ज्ञान व प्रारब्ध यांच्यामध्ये निश्चितपणे विरोध नाही. कारण ज्ञान-अज्ञान एका ठिकाणी कधी राहात नाहीत. (५७)

अज्ञान नि;शेष जरी गेलें । तरिच ज्ञान प्रतिष्ठिलें ।
म्हणून अज्ञान नाशिलें । ज्ञानें येणें ॥५८॥
अज्ञान पूर्णपणे जाईल तेव्हाच ज्ञानाची प्रतिष्ठापना होईल म्हणून ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो. (५८)

विषदंत उपडिला सर्पाचा । क्रीडतां लेश नसे भीतीचा ।
तैसा ठाव पुसून अज्ञानाचा । प्रारब्ध भोगी ॥५९॥
सापाचा विषारी दात उपटून टाकल्यानंतर त्याच्याशी क्रीडा करताना भीतीचा लेशही राहत नाही. त्याप्रमाणे अज्ञानाचा ठावठिकाणा पुसून प्रारब्ध भोगावे. (५९)

अज्ञान कारण गेलें । प्रारब्ध कार्य कैसें उरलें ।
म्हणसी तरी राहिलें । कारणाभावीं क्षणभरी ॥६०॥
यावर शंका अशी की, अज्ञान कारण नष्ट झाल्यानंतरही प्रारब्धरूपी कार्य कसे उरते ? तर उत्तर असे आहे की कारण नसतानाही कार्य काही काळ (क्षणभर) राहते. (६०)

वृक्ष मुळींहूनि तोडिला । तत्क्षणीं न वचे वाळला ।
रज्जु कळतां सर्प गेला । परी कंप राहे ॥६१॥
वृक्ष मुळासकट तोडला तरी तो ताबडतोब वाळत नाही. दोरीचे ज्ञान झाल्यानंतर सर्प नाहीसा होतो खरा, पण शरीराचा कंप काही काळ राहतोच ना! (६१)

देह बहुत काळ राहतो । क्षणिक कैसा मानावा तो ।
म्हणसी तरी कल्पांत होतो । आमुचे क्षणीं ॥६२॥
श्रोता विचारतो की, देह तर पुष्कळ दिवस राहतो. त्याला क्षणिक कसे मानावे ? यावर उत्तर असे की, आमच्या एका क्षणात एक कल्प संपून जाते. (क्षणकल्पना सापेक्ष आहे. ) (६२)

स्वप्नीं जैसे क्षणांत । बहुकाळ वाटे लोटत ।
ज्ञानोत्तरी महाकल्पांत । क्षणहि न वचे ॥६३॥
स्वप्रामध्ये एका क्षणात पुष्कळ काळ गेल्याचा अनुभव येतो. तसे ज्ञान झाल्यानंतर महाकल्पान्त सुद्धा क्षणाएवढा वाटतो. (६३)

असो देहद्वयाचे भोग । होतांहि आपण नि:संग ।
परिपूर्ण अक्षई अभंग । कालकर्मातीत तो ॥६४॥
असो, दोन्ही देहांचे भोग भोगत असताही ज्ञाता स्वतः नि:संग असतो. तो परिपूर्ण, अक्षयी, अभंग आणि कालकर्मातीत असतो. (६४)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
प्रारब्धकर्मानुकारे । पंचमसमास: ॥५॥
इति पंचिका संपूर्णा ॥९॥ ओवीसआंख्या २०९
हरिः ॐ तत्सत्

GO TOP