॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ आगमसार ॥

(पूर्वार्ध)


पंचिका १ ली
उपक्रम

॥ श्रीरामसमर्थ ॥

समास १ ला
मंगलाचरण


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥
श्रीरघुपतये नम: ॥ श्रीसद्‌गुरवे नम: ॥ श्रीरामो जयति ॥

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्‌ ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्‌गुरुं तं नमामि ॥


जयजयाजी सद्‌गुरु । न कळे स्वरूपाचा पारू ।
जेथें मायेचा बडिवारू । सर्वथा न चले ॥१॥
सद्गुरुमहाराज, आपला जयजयकार असो. आपल्या स्वरूपाचा अंत लागत नाही. मायेचे सामर्थ्य आपल्यापुढे मुळीत चालत नाही. (१)

अहो आतां कैसें करावें । पुरली उपायांची धावें ।
अलक्षासी लक्षवें । कोणेपरि ॥२॥
अहो, आता काय करावे ? सर्व साधनांची मर्यादा येथे संपते. त्यामुळे अलक्ष्य (अज्ञेय, अतळ) अशा सद्गुरूंचे ध्यान कसे करावे हे कळेनासे झाले आहे. (२)

मंगलाची लक्षणें । स्मृति स्तुति नमन ।
या तिहींवाचुन आन । चवथें नाही ॥३॥
ग्रंथाच्या आरंभी जे मंगल करतात त्याचे तीन प्रकार आहेत. स्मरण, स्तवन आणि नमन असे ते तीन प्रकार होत. या तिहींखेरीज चौथा प्रकार नाही. (३)

निरवयवासी कैसें ध्यावें । अनिर्वाच्या कैसें स्तवावें ।
निरंजनासी वंदावें । कोणेपरी ॥४॥
पण जो अवयवविहीन आहे त्याचे स्मरणरूप ध्यान कसे करावे ? जो अनिर्वाच्य (म्हणजे वर्णन करण्याच्या पलीकडचा) आहे त्याची स्तुती कशी करावी ? आणि जो निरंजन (म्हणजे निर्विकल्प, मायाविरहित, गुणरहित) आहे, त्याला वंदन तरी कसे करायचे ? (४)

तथापि धिवसा धरिला । अनंतरूपि रिघ केला ।
परि विवेकेसहित मनाला । निष्प्रचारु होय ॥५॥
तरी धैर्य धरून अनंताच्या रूपामध्ये मी प्रवेश करू लागलो; पण विवेकयुक्त (सदसद्विचारयुक्त) असूनसुद्धा मनाला तेथे प्रवेश करण्यास मनाई आहे ! (५)

बुध्दी निश्चया थोटावली । अहं निमोनी अंग घाली ।
म्हणोनि ध्यानाची पुरली । हाव अपैसी ॥६॥
बुद्धीची निश्चय करण्याची शक्ती तेथे नष्ट झाली, अहंकार जमीनदोस्त होऊन नष्ट झाला. या कारणाने ध्यान करण्याची हौस आपोआप फिटली. (म्हणजे मन, बुद्धी, अहंकार इत्यादी ध्यानाची साधने निरुपयोगी ठरल्यानंतर ध्यान कसे करणार ? (६)

जेथें परा विराली । पश्यंती देखूनी मुरडली ।
मध्यमा बाहेरी घाबरली । अंग न धरी ॥७॥
सद्गुरूंच्या बाबतीत परा वाणी विरून गेली, पश्यन्ती त्यांना पाहाताच मागे फिरली, मध्यमा बाहेरच्या बाहेर घाबरून गेली; भीतीने तिचे सामर्थ्यच गळून गेले. (७)

तेथें वैखरीचा पवाड । काय करील द्वाड ।
मज लागलेंसें वेड । जें स्तऊं पाहे ॥८॥
अशा परिस्थितीत वैखरी वाणीचे सामर्थ्य बिचारे काय करू शकणार ? अशातही मी सद्गुरूंची स्तुती करू पाहात आहे, याचा अर्थ मला वेडच लागले असले पाहिजे. (८)

चित्सागर तो अगाध । केवळ आनंदाचा कंद ।
तेथें कैंची पदद्वंद । तरी नमन कैसें ॥९॥
सद्गुरू म्हणजे ज्ञानाचा सागर; तो किती अगाध आहे ! केवळ आनंदाचा तो गाभाच होय. तेथे दोन पावले कोठून असणार ? मग त्यांना नमस्कार तरी कसा शक्य होईल ? (९)

असो कोणेही प्रकारिं । मंगलासी नाहीं उरि ।
चिदंभोधींत लहरी । मृगजळाची ॥१०॥
तेव्हा स्मरण, स्तवन आणि मनन या तीनही प्रकारांनी मंगलाला अवसर नाही. (मंगल शक्य नाही.) ज्ञानसागरात कल्पनारूप मृगजळाची लाट उठणे अशक्यच ! (म्हणजे वरील तिन्ही व्यापार कल्पनारूप आहेत आणि निखळ ज्ञानाच्या ठिकाणी कल्पनेला वावच नसतो.) (१०)

तैसी माया जेथें स्पर्शेना । तेथें हिंपुटी कल्पना ।
तरी आतां स्तवावे ना । हेंचि बरें ॥११॥
जेथे माया स्पर्श करू शकत नाही, तेथे कल्पना कष्टी (निराश) होणारच. म्हणून स्तुती करू नये, हेच रास्त ठरेल. (११)

तरी इष्टदेवता गुरूवांचुनी । न देखोचि त्रिभुवनी ।
कारण मायेची करणी । तेथें शाश्वतता नसे ॥१२॥
पण सद्गुरूवाचून दुसरे इष्ट दैवत सबंध त्रिभुवनात आढळत नाही. कारण जे जे मायानिर्मित ते ते अशाश्वत असते. (कारण मायेचे जे जे कार्य असते ते कधीच शाश्वत नसते. त्रिभूवन हे मायाकार्यच आहे. तेथे सद्गुरूंसारखे नित्य, शाश्वत असे तत्त्व कसे भेटणार ?) (१२)

आतां एक सुचलें बुद्धी । मुख्य स्वरूपाची नातुडे शुद्धि ।
मायायोगें निषेध विधि । अवसान श्रुतीचें ॥१३॥
आता यावर बुद्धीला एक उपाय सुचला. मुख्य स्वरूप जर असे वर्णनाच्या आवाक्यात येत नाही, तर मग मायेच्या साहाय्याने विधिनिषेधरूप मार्गानी त्याचे वर्णन करावे, हे बरे. वेदांचीही मर्यादा तेवढीच आहे. (१३)

अणु नव्हे म्हणोनी गुरू । पार नव्हे म्हणोनी अपारू ।
विकार नव्हे म्हणोनी निर्विकारू । हें निषेधमुख ॥१४॥
श्रीसद्गुरू हे अणू नाहीत म्हणून गुरू आहेत. (अणू म्हणजे सूक्ष्म आणि गुरू म्हणजे थोर.) त्यांचा पार (दुसरी कड) लागत नाही म्हणून ते अपार आहेत. त्यांच्या रूपात विकार नाहीत म्हणून ते निर्विकार होत, अशी ही निषेधरूप वर्णनाची पद्धत होय. (१४)

सद्‌रूप आणि ज्ञानघन । आनंद अनंत पूर्ण ।
हें विधिमुखें श्रुतीचेंवचन । अवधिशेष ॥१५॥
याउलट सद्गुरू हे सद्‌रूप, ज्ञानघन, आनंदमय, अनंत आणि परिपूर्ण आहेत, अशा प्रकारचे हे वेदांतील वर्णन विधिरूप आहे. या प्रकारच्या वर्णनापर्यंतच वेदांची मर्यादा जाते. (त्या पलीकडे वेद अधिक काही सांगू शकत नाहीत. (१५)

तटस्थ आणि स्वरूप लक्षणें । हीं दोन्ही ओळखोंचीं चिन्हें ।
बोलिजेती मायागुणें । शास्त्रसिद्ध ॥१६॥
सद्गुरुस्वरूपाची ओळख पटावी म्हणून मायेच्या साहाय्याने तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण ही दोन शास्त्रशुद्ध चिह्ने आता सांगता येतील. (१६)

जें त्रिकालीं अबाधित । तया नांव बोलिजे सत्‌ ।
स्वप्रभत्वें सदोदित । ज्ञानरूप हे ॥१७॥
परमानंदाची खाणी । जेथें सुखदु:खाची हानी ।
हें जाणिजें स्वरूपलक्षणी । अव्यावर्तक ॥१८॥
ते तिन्ही काळी अबाधित असते म्हणून ते सत् होय. ते सदा सर्वदा स्वयंप्रकाशी असते हेच त्याचे ज्ञानरूप होय. त्याच्या ठिकाणी सर्व सुखदुःखांचा नाश झालेला असतो म्हणून ते परम म्हणजे सर्वश्रेष्ठ अशा आनंदाची जणू खाणच असते. ही तीन वैशिष्ट्ये स्वरूपाच्या लक्षणांमध्ये अव्यावर्तक म्हणजे कधीही दूर न करता येणारी असतात. (१७-१८)

आतां तटस्थ लक्षण । कादाचित्कत्वें चिन्ह ।
हें तित्तिरीचें वचन । व्यावर्तकत्व ॥१९॥
आता त्याचे तटस्थ लक्षण म्हणजे विशिष्ट काळीच त्याला लागू होणारे त्याचे चिह्न. ते तैत्तिरीय उपनिषदात सांगितले असून ते व्यावर्तक म्हणजे प्रसंगी त्याच्यापासून दूर करता येते. (ते नित्यलक्षण नसून बदलणारे लक्षण होय.) (१९)

ज्यापासून हे सर्व जालें । आणि जया स्वरूपीं वर्तलें ।
शेवटी जेथें लया गेलें । ते अधिष्ठान गुरु ॥२०॥
ज्यापासून हे सर्व (विश्व) निर्माण झाले, ते ज्याच्या स्वरूपात राहाते आणि शेवटी ते ज्याच्यात विलीन होते, ते या उत्पत्ति, स्थिती, लयाचे अधिष्ठान असते. तेच श्रीगुरू होत. (२०)

एवं हें गुरुस्वरूपाचें ज्ञान । यथार्थ नव्हे हें प्रमाण ।
जरि गुरुकृपें गळें मीपण । तरी मग तेंचि तें ॥२१॥
गुरुस्वरूपाचे अशा प्रकारे करून दिलेले ज्ञान हे यथार्थ नाही हे खरे;जर गुरुकृपेने मीपण नाहीसे झाले तर मग जे उरते तेच गुरुस्वरूप होय. (२१)

मायायोगत्वें जे बोलिलें । काल्पनीक जें जें उद्‌भवलें ।
तेंही नामरूपाचे मासले । आस्तिभातिविण नाहीं ॥२२॥
मायेच्या साहाय्याने ज्याचे वर्णन केले, कल्पनेपासून ज्याची उत्पत्ती झाली ते सर्व नामरूपाचे मासले (नमुने) आहेत. (नामरूपाचे वेगवेगळे प्रकार आहेत.) त्या सर्वांमध्ये अस्ति (सत्ता) , भाति (ज्ञान) आणि प्रिय (आनंद) या ब्रह्मलक्षणांशिवाय दुसरे काही नाही. (२२)

जैसें एक मृत्तिकेविण । कैचें घट गाडगें रांझण ।
तैसें आहे जें कां एकपण । तेंचि तें हें सर्व ॥२३॥
एका मातीवाचून घट, गाडगे, रांजण इत्यादी प्रकार कसे संभवतील ? त्याप्रमाणे जे एकत्व आहे. तेच हे सर्व (दृश्य विश्व) आहे. (तेच सर्वत्र सर्वदा व्यापून आहे. (२३)

असो ऐसा अमूर्ति गुरु । तोचि मूर्तिमान जगदाकारू ।
नाना धरणें अवतारु । ते मायागुणें ॥२४॥
असो, अशा प्रकारे सद्गुरू अमूर्त आहेत, ते जगदाकार धारण करून मूर्तिमान होतात, तेच विविध अवतार धारण करतात. हे ते सर्व मायेच्या प्रभावाने करतात. (२४)

माया अविद्या शक्ती दोन्ही । इयेस्तव जीव-शिव हो‍ऊनी ।
क्रीडसी एकला एकपणीं । गुरुशिष्यरूपें ॥२५॥
(अहो गुरुमहाराज !) माया आणि अविद्या या दोन शक्तींच्या योगाने तुम्ही अनुक्रमे शिव आणि जीव अशी रूपे धारण करता; गुरू आणि शिष्य अशी रूपे धारण करता; एकटेच असूनही तुम्हीच ही सर्व क्रीडा करता. (२५)

अविद्यावशें मोहिसी । नाथिलें म्हणून उपदेशिसी ।
शेखीं एकलाची अससी । दोनीपणीं ॥२६॥
अविद्येच्या साहाय्याने तुम्ही मोह (अज्ञान) निर्माण करता (आणि जगाला त्यात गुंतवून ठेवता.) आणि पुन्हा तुम्हीच हे सर्व मिथ्या आहे म्हणून उपदेश करता. पण या दोन्ही क्रियांमध्ये शेवटी तुम्हीच एकटे असता. (२६)

तस्मात्‌ तूंचि अससी दोठाई । आतां मीपणाचें काज काई ।
मीपणेंविण तूंपणही । सहजची वाव ॥२७॥
दोन्ही ठिकाणी तुम्हीच असल्याने मग मीपणाचे (अहंकाराचे) कामच काय ? (मीपणा व्यर्थच ठरला) मीपणा नसल्याने तूपणाही सहजच व्यर्थ ठरतो. (२७)

मी तूं नसतां तूंचि अससी । लहरीविण आपा जैसी ।
मा उपाधि असतां काई नव्हेसी । तूंचि अघवा ॥२८॥
मी-तू असे द्वैत नसल्याने, लाटा नसतामाही जसे पाणी पाणीरूपाने राहाते, त्याप्रमाणे तुम्हीच (मी-तूपणाची उपाधी नसलेल्या अवस्थेत) एकटे असता. मग (मी-तूपणाची) उपाधी निर्माण झाल्यावर तुम्हीच सर्व कसे नसाल ? (या सर्व नामरूपात्मक उपाधींमध्ये तुम्हीच व्यापून असता. (२८)

हें तुझिये कृपेंचि कळें । येर्हंवी सर्वथा नाकळे ।
तुजसी जें अनन्यत्वें मिळे । त्यासीच कृपा तुझी ॥२९॥
हे सर्व तुमच्या कृपेनेच कळू शकते. एरवी कळणे अशक्य. तुम्हाला जे अनन्यत्वाने येऊन मिळतात त्यांवरच तुमची कृपा होते. (२९)

कृपा म्हणजे मीपण । हरऊन देसी आपुलेंपण ।
या नांव आत्मनिवेदन । जे भक्ती नवमी ॥३०॥
कृपा म्हणजे तुम्ही मुमुक्षु-साधकाचा मीपणा नष्ट करून त्याला आपलेपण देता. यालाच आत्मनिवेदन म्हणतात. हा भक्तीचा नववा प्रकार होय. (३०)

न जाणतां जीव भ्रमले । केवल एकदेशी दरिद्र आलें ।
तेंचि उपदेशून बैसविलें । बोधसाम्राज्यपदीं ॥३१॥
अज्ञानामुळे जीव भ्रमले होते. केवळ त्या संकुचितपणामुळे (एकदेशित्वामुळे) त्यांना दारिद्रय आले होते. त्यांना उपदेश करून तुम्ही ज्ञानरूपी साम्राज्य पदावर बसवले. (३१)

दाते उदंड असती । परी निजपद कोणी न देती ।
जरी ब्रह्मादिक तिन्ही मूर्ती । पद वंचिती आपुलें ॥३२॥
जगात दाते उदंड आहेत. पण स्वत:चे स्थान (निजपद) कोणी देत नाहीत. ब्रह्मादी तीन देव (दाते म्हणून प्रसिद्ध) असले तरी ते आपापली स्थाने सांभाळून असतात. (३२)

ऐसा तूं नव्हेसी । शरणागता आपुलें पद देशी ।
म्हणवून तुजवीण आणिकासी । वंचकासी न मनी ॥३३॥
तुम्ही मात्र असे नाही आहात. शरण आलेल्या भक्ताला तुम्ही आपले स्थान (पद) देऊन टाकता. म्हणून तुमच्याखेरीज दुसऱ्या वंचक देवतांना मी मानत नाही. (३३)

तुजसारिखा त्रिभुवनीं । दुजा नाहीं नाही गा कोणी ।
उपमा आणावी कोठुनी । तूं निरुपम ॥३४॥
तुमच्यासारखा दुसरा कोणीही या त्रिभुवनात नाही. तुम्हाला देण्यासाठी उपमा कोठून आणावी ? (तुम्हाला उपमा देता येत नाही.) तुम्ही निरुपम आहात. (३४)

हे असो वेगळें काईसें । जळ तरंगा भेद नसें ।
जें जें दिसे आणि भासे । तें तूंचि गा गुरुराया ॥३५॥
हे असू द्यात. तुम्ही वेगळे कुठे आहात ? पाणी आणि लाटा यांत भेद असतो काय ? सद्गुरुमहाराज, जे जे दिसते आणि भासते ते ते आपणच आहात. (३५)

प्रणवरूप तूं गणपती । जयासी मंगळारंभी स्तविती ।
तूंचि तूं आदिअंती । त्रिमात्रात्मक ॥३६॥
मंगलारंभी ज्याचे स्तवन करतात असा त्रिमात्रात्मक (अ, ऊ, म) प्रणवरूप (ओंकार स्वरूप) गणपती तुम्हीच आहात. तुम्हीच विश्वाच्या आरंभी होता, त्याच्या अन्तानंतरही तुम्हीच राहणार आहात. (३६)

चारी वाणी ज्या प्रसिद्धा । ते मायाकुमारी शारदा ।
तुज सूर्यापासून सदां । मृगजळ वाहे ॥३७॥
ज्या प्रसिद्ध चार वाणी आहेत त्याच मायाकन्या (मायेपासून निर्माण झालेल्या) शारदा होत. तुम्ही सूर्याप्रमाणे असून त्या चार वाणी मृगजळाप्रमाणे (तुमच्यामुळेच निर्माण झालेल्या) तुमच्यापासूनच वाहत असतात. (३७)

तूं रजोगुण अविलंबिसी । तेव्हां सृष्टीचें सृजन करिसी ।
चतुरानन म्हणती ज्यासी । ब्रह्मदेव तूं ॥३८॥
तुम्ही रजोगुणाचा स्वीकार करता तेव्हाच सृष्टीची उत्पत्ती करता. ज्याला चतुरानन म्हणतात, तो ब्रह्मदेव तुम्हीच आहात. (३८)

उत्तम जो सत्त्वगुण । जाणीवरूपें सृष्टिपालन ।
करी चतुर्भुज नारायण । तो विष्णु तूंचि ॥३९॥
श्रेष्ठ अशा सत्त्वगुणाचा आश्रय करून जाणीवरूपाने सृष्टीचे पालन करणारा चतुर्भुज नारायण विष्णू तुम्हीच आहात. (३९)

तमोगुण जे नेणिव । तेणें संव्हारी सदाशिव ।
पंचवदन त्रिनयन देव । कैलासवासी तूं ॥४०॥
नेणीव हा तमोगुण असून तिच्या साहाय्याने श्रीशंकर विश्वाचा संहार करतो. तो कैलासावर निवास करणारा, पंचमुखी, तीन डोळे असलेला शंकर तुम्हीच आहात. (४०)

इंद्र चंद्र दिनकर । वरुण वायु कुबेर ।
आदिकरुन समग्र। दिग्पाल तूं ॥४१॥
इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण, वायू, कुबेर इत्यादी सर्व दिक्पाल तुम्हीच आहात. (४१)

तूंचि काल तूंचि कर्ता । तूंचि मायेचा नियंता ।
हें असो भूतीं भौतिकता । तुजविण नाहीं ॥४२॥
तुम्हीच काल, तुम्हीच कर्ता, तुम्हीच मायेचे नियंत्रक आहात. हे राहू द्या. पंचभूतांमधील भौतिकता तुमच्यावाचून नाही. (४२)

समष्टिरूप तूंचि अघवा । तदंतर्गत व्यष्टीचा कोण केंवा ।
म्हणोनिया देवाधिदेवा । मीही तो तूंचा ॥४३॥
सर्व समष्टी तुम्हीच असल्याने तदंतर्गत व्यष्टीची काय कथा ? म्हणून हे देवाधिदेवा, मीदेखील तुम्हीच आहात. (४३)

तुवा अधिष्ठूनि मन बुध्दि । वर्तविसी नाना छंदी ।
लया जाणें तूं अवधि । निर्विशेषरूपा ॥४४॥
मन, बुद्धी व्यापून तुम्हीच निरनिराळ्या व्यवसायात गुंतविता. अहो निर्विकल्प गुरुमहाराज, तुम्हीच त्यांचा लय घडवून आणता. (४४)

ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय । पंचप्राण पंचविषय ।
या सर्वत्रीं अन्वय । तुझाचि असे ॥४५॥
ज्ञानेंद्रिये, कमेंद्रिये, पंचप्राण, पंचविषय या सर्वांत तुमचीच व्याप्ती आहे. (४५)

कार्यामाजी कारण असे । परी कारणामाजीं कार्य नसें ।
घटीं मृत्तिका विलसे । मृत्तिके घट नाही ॥४६॥
कार्यामध्ये कारण असते. पण कारणामध्ये कार्य नसते. घटामध्ये माती असते, पण मातीत घट नसतो. (४६)

मीपणीं जंव पाहिले । तूंचि प्रतीतीस आलें ।
निखळ तुझ्या ठाई अनुमानिले । न वचेचि मीपण ॥४७॥
जेव्हा मी मीपणा'मध्ये (डोकावून पाहिले, तेव्हा माझ्यामध्ये तुम्हीच तेवढे आहात असे प्रत्ययास आले. परंतु तुमच्या निखळ स्वरूपात मात्र मीपणा'चे अनुमानसुद्धा करता येत नाही. (४७)

कार्यामाजी अनुवृत्ती । कारणाची त्या अन्वय म्हणती ।
कारणीं कार्याची व्यावृत्ती । हा व्यतिरेक ॥४८॥
कार्यामध्ये कारणाची व्याप्ती (पाहणे) म्हणजे अन्वय होय. (उदा. घटामध्ये मातीची व्याप्ती असते) याउलट कारणामध्ये कार्य नसणे म्हणजे व्यतिरेक होय. (उदा. मातीमध्ये घटाचा अभाव असतो. (४८)

ऐसें मायायोगें स्तविलें । अज्ञानग्रासक जीं पाऊलें ।
देहेवीण वंदन केलें । तया प्रभूसी ॥४९॥
अशात-हेने अज्ञानग्रासक सद्गुरूंच्या पावलांचे मायेच्या साहाय्याने स्तवन केले. देहरहित अशा त्या प्रभुंना नमस्कार केला. (४९)

मुख्य रूप तें कैसें । नेणें नेणें मी अपैसें ।
तेथे मंगल काइसें । मीपणेंविण ॥५०॥
मुख्य स्वरूप कसे आहे, ते तर मला मुळीच माहीत नाही. 'मीपणा'च नसल्यामुळे मंगल कसे करणार ? (५०)

म्हणून सद्‌गुरु वर्णवेना । लाजून सांडिले मीपणा ।
आतां जैसे असाल तैसे असाना । सद्‌गुरुराया ॥५१॥
आता सद्गुरूंचे वर्णन करणे आपल्याला शक्य नाही, म्हणून लाजून 'मीपणा'चा त्याग केला. तेव्हा सद्गुरुराया, आता जसे असाल तसेच राहा. (५१)

अहो कायहो केलें । अलक्षा लक्षण लाविलें ।
हे बहूत अन्याय घडले । धि:कारू मज ॥५२॥
अरेरे, हे मी काय केले ? अलक्ष्य अशा सद्गुरूंचे लक्षण (व्याख्या) करण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या हातून खरोखरच मोठा अन्याय घडला. माझा धिक्कार असतो. (५२)

विदेहासी अवयव कल्पिले । नि:संगास संग बोलिलें ।
निर्विकारा विकारिलें । ते क्षमा क्षमा ॥५३॥
विदेह (देहरहित) अशा सद्गुरूंच्या ठिकाणी अवयवांची कल्पना केली;नि:संग सद्गुरूंना संग लावला (म्हणजे नि:संगाच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचा संबंध जोडला) ;निर्विकार सद्गुरूंच्या ठिकाणी विकारांची कल्पना केली. त्याबद्दल क्षमा मागतो. (५३)

जेथे एकपण न साहे । तेथें कल्पिलें सर्व हें ।
तरी अन्याय हा थोर होय । ते क्षमा क्षमा ॥५४॥
वास्तविक पाहता जेथे एकपणही सहन होत नाही, त्या ठिकाणी मी या सगळ्यांची कल्पना केली. हा माझ्याकडून मोठाच अन्याय घडला. त्याबद्दल क्षमा मागतो. (५४)

भज्यभजकत्व नाथिलें । तेंचि स्तवनें उभें केलें ।
अनिर्वाच्या वाच्यांशे बोलिलें । ते क्षमा क्षमा ॥५५॥
भज्य (पूजनीय देवता) आणि भजक (भक्त) असे दोन्हीही नसताना स्तवनाच्या निमित्ताने मी त्यांची उभारणी केली (कल्पना केली). जे अनिर्वाच्य आहे त्याचे वाच्य शब्दांनी वर्णन केले. त्याबद्दल क्षमा मागतो. (५५)

अद्वैतीं द्वैत लाजिलें । अद्वैत शब्द होतीं फोलें ।
आतां मौनही राहिलें । अबोलणेंपणें ॥५६॥
अद्वैताच्या ठिकाणी द्वैत लाजले. अद्वैत हे शब्दसुद्धा फोल ठरतात. आता काहीच बोलणे नसल्याने त्याला मौन म्हणणेसुद्धा योग्य ठरत नाही. (न बोलण्याने मौनसुद्धा तेथे व्यर्थ होते) (५६)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
मंगलाचरणानुकारे । प्रथमसमास: ॥ ॥१॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास २ रा
अनुबंधचतुष्टय


होतां वेदांत प्रतिपादन । पाहिजे चत्वारि अनुबंधन ।
विषय संबंध प्रयोजन । अधिकारी चौथा ॥१॥
वेदांताचे प्रतिपादन होत असते. तेव्हा चार घटकांचे परस्परसंबंध स्पष्ट करणे आवश्यक असते. त्या चार घटकांना अनुबंधचतुष्टय म्हणतात. ते घटक म्हणजे विषय, संबंध, प्रयोजन आणि अधिकारी हे होत. (१)

हे अनुक्रमें बोलिजेती । प्रथम विषय जो वेदांति ।
सकल उपनिषत्संमति । प्रतिपाद्य असे ॥२॥
त्यांचेच आता अनुक्रमाने विवेचन करावयाचे आहे. त्यांपैकी वेदान्ताचा जो प्रतिपाद्य विषय आहे त्याचे सर्व उपनिषदांच्या संमतीने जे स्वरूप आहे ते पाहू. (२)

आणि संत साधू सज्जन । भूत भविष्य वर्तमान ।
या सर्वांचें जें ज्ञान । तें एकचि असे ॥३॥
आणि भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ या तिन्ही काळातील जे संत, साधू, सज्जन असतील त्या सर्वांचे ज्ञान एकच असते. (३)

ब्रह्मीं उपाधी माया । मन उपाधी प्रत्यगात्मया ।
उपाधियोगें भेदा यया । सत्यत्व नसे ॥४॥
ब्रह्माच्या बाबतीत माया ही उपाधी असून त्याचा व्यक्तिविशिष्ट जो कल्पित अंश प्रत्यगात्मा त्याच्याबाबतीत मन हे उपाधी आहे. उपाधीमुळे निर्माण झालेल्या या भेदाला वास्तवात सत्यत्व नाही. (४)

भेद पारमार्थिक असतां । तरी ज्ञानें कैसा निरसता ।
ज्ञानेवीण मोक्षाची वार्ता । बोलोंचि नये ॥५॥
ब्रह्म आणि प्रत्यगात्मा यांच्यातील भेद पारमार्थिक म्हणजे खरा असता तर ज्ञानाने त्याचे निरसन कधी झाले असते काय ? (म्हणजे हा जो भेद जाणवतो तो ज्ञानामुळे नष्ट होतो.) म्हणून ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त करण्याच्या गोष्टी बोलूच नयेत. (५)

पूर्वी साधू थोर थोर । शास्त्र गुरु आत्मविचार ।
बोलती आपरोक्ष साक्षात्कार । भेद उपाधी निरासें ॥६॥
पूर्वी होऊन गेलेले थोर थोर साधुसत्पुरुष, शास्त्रग्रंथ आणि सद्गुरू आत्मविचार सांगत असताना भेद आणि उपाधी यांच्या निरसनाने अपरोक्ष साक्षात्कार होतो असे सांगून गेले आहेत. (अपरोक्ष म्हणजे माध्यमाची अपेक्षा नसणारा, प्रत्यक्ष.) (६)

भेद सत्यत्वें मानिला । तरी या सर्वांसी उच्छेद आला ।
तरी मग गुरु शास्त्राला । कोण पुसे ॥७॥
या दोहोंतील भेद जर खराच आहे असे मानले तर, वर उल्लेख केलेलेसाधुसत्पुरुष, शास्त्रग्रंथ, गुरुवचन, आत्मप्रत्यय यांचे खंडन झाले असे होते. असे असेल तर गुरू, शास्त्र यांना कोण विचारील ? (त्यांचे काहीच महत्त्व उरणार नाही. (७)

ऐसें विरोधाचे बोलणें । न स्वीकारिती शहाणे ।
भेद मिथ्या कोटिगुणें । हें सर्व मान्य ॥८॥
तेव्हा शहाणे लोक अशा परस्परविरोधी गोष्टी स्वीकारीत नाहीत. भेद हा सर्व प्रकारांनी (शब्दश: कोट्यवधी प्रमाणांनी) मिथ्याच ठरतो, हे सर्वमान्य आहे. (८)

जाणावें ब्रह्मतत्त्व निर्गुण । हें मुख्य विषयाचे लक्षण ।
सर्व वेदांताचे तात्पर्य जाण । जें प्रत्यगात्मा ब्रह्म ॥९॥
म्हणून निर्गुण अशा ब्रह्माचे ज्ञान करून घ्यावे, हे या ग्रंथाच्या मुख्य विषयाचे स्वरूप आहे. प्रत्यगात्मा हाच ब्रह्म आहे. हे सर्व वेदान्तशास्त्राचे तात्पर्य ठरते. (९)

भेद असतां ऐक्य न घडे । उपाधीवीण ज्ञान न जोडे ।
ऐसें सांकडे दोन्हीकडे । तरी विषय कैसा ॥१०॥
आता यावर एक शंका निर्माण होते. प्रत्यगात्मा आणि ब्रह्म यांमध्ये भेद असेल तर ज्ञान संभवत नाही. पण कोठल्या तरी उपाधीशिवाय ज्ञान होऊच शकत नाही. (ज्ञानासाठी ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान अशा त्रिपुटीची गरज असते.) अशाप्रकारे या दोन्ही दृष्टींनी संकटच येते. मग ब्रह्मज्ञान हा विषय कसा होऊ शकतो ? (हा विषय संदिग्ध आहे, व्यामिश्र आहे. (१०)

आणि ब्रह्म तरी निराकार । मन बुध्दी अगोचर ।
म्हणोनी ज्ञानासी गोचर । नव्हे स्वरूप ॥११॥
आणि ब्रह्म तर निराकार आहे. ते मन, बुद्धी या साधनांनी अनाकलनीय आहे, (अदृश्य आहे) , म्हणून स्वरूप म्हणजेच ब्रह्मरूप हे ज्ञानाला अनाकलनीय आहे. अप्राप्य आहे. (११)

ऐसिये आशंकेचा भाव । याचा कैसा अनुभव ।
बोलिजे तो अपूर्व । प्रमाणसिध्द ॥१२॥
असा या शंकेचा अभिप्राय आहे. याबाबतीत अनुभव काय आहे ? तो अपूर्व अनुभव आता प्रमाणांनी सिद्ध करून सांगितला पाहिजे. (१२)

फलव्याप्तीविण । वृत्तिव्याप्तीचें प्रयोजन ।
इंद्रियेवीण जाणें मन । म्हणोनि विषय ॥१३॥
फलव्याप्तीशिवाय (म्ह. जीवाच्या व्याप्तीशिवाय) केवळ बुद्धीच्या व्याप्तीने (वृत्तिव्याप्ती) इंद्रियांच्या मदतीशिवाय मन त्या ब्रह्माला जाणू शकते. म्हणून ब्रह्मज्ञान हा वेदान्ताचा विषय ठरतो. (१३)

वृत्ति म्हणीजे चंचल । तेथें प्रतिबिंब ते फळ ।
उभय व्याप्तीनें सकळ । विषयाचें ज्ञान होतें ॥१४॥
चंचल वृत्तीमध्ये प्रत्यगात्म्याचे जे प्रतिबिंब पडते तेच फल म्हणजे जीव होय. जीव आणि वृत्तीच्या व्याप्तीने सर्व लौकिक विषयांचे ज्ञान होते. (१४)

बुध्दीनें अज्ञान नासे । आभासें घट स्फुरतसे ।
उभय व्याप्तीचे कारण असे । बाह्यविषई ॥१५॥
बुद्धीने घटादी पदार्थाविषयीचे अज्ञान नाहीसे होते आणि आभासरूप जीवचैतन्याने घटादी पदार्थ प्रकाशित होतात. अशा त-हेने बाह्य विषयांच्या ज्ञानासाठी बुद्धिवृत्ती आणि जीव या दोहोंच्या व्याप्तीची आवश्यकता आहे. (१५)

उभयांपूर्वी जें साधारण । तें ब्रह्मतत्त्व प्रकाशमान ।
व्यापोनिया ज्ञानाज्ञान । जें सहज असे ॥१६॥
बुद्धी आणि जीव उत्पन्न होण्यापूर्वी जी सामान्य अवस्था असते तेच प्रकाशमान होणारे ब्रह्मतत्त्व असून ते ज्ञान आणि अज्ञान या दोहोंनाही व्यापून अगदी सहजभावाने असते. (१६)

ब्रह्मतत्त्वें बुध्दी प्रकाशे । तरी आभासाचे काज काईसें ।
याचें उत्तर अपैसें । बोलिजेते ॥१७॥
ब्रह्मतत्त्वामुळे जर बुद्धी प्रकाशित होत असेल तर आभासरूप जीवाचे प्रयोजनच काय, याचे उत्तर आता ओघाने सांगितले पाहिजे. (१७)

विशेषेत्वें घट स्फुरण । हें तो आभासाचे लक्षण ।
बुध्दीसी जडत्व कारण । म्हणोनिया ॥१८॥
बुद्धी जड असल्यामुळे घटाचे विशेषत्वाने ज्ञान जीवालाच होते. घटादी पदार्थाचे विशेष ज्ञान करून देणे हे जीवाचेच लक्षण आहे. (१८)

स्फुरण होतांची जाय लया । आभास ऐसें म्हणावें तया ।
मुख्य तत्व अपसया । अंतर्बाह्य सदोदित ॥१९॥
स्फुरण होताच जे लयाला जाते त्यालाच आभास असे म्हणतात. मुख्य ब्रह्मतत्त्व हे साहजिकच अंतर्बाह्य एकरूप आणि शाश्वत आहे. (१९)

सामान्य आणि विशेष । मुख्य चैतन्य आणि आभास ।
बुद्धीस्तव आभासाभास । बुद्ध्‌याभावीं सामान्य ॥२०॥
मुख्य चैतन्य म्हणजे सामान्य आणि जीवचैतन्य म्हणजे विशेष. बुद्धीमुळेच जीवचैतन्याचा भास होतो. बुद्धीच्या अभावी सामान्यच असते. (२०)

बुद्धी नसतां ज्ञान नासे । आभास जाय तया सरिसें ।
मुख्य तें असतची असे । तिहीं काळीं ॥२१॥
बुद्धी जर नसेल तर ज्ञान नष्ट होईल. त्याजबरोबर जीवचैतन्यही नष्ट होईल. पण मुख्य ब्रह्मतत्त्व मात्र सर्वकाळी तिन्ही काळी असतच असते. (२१)

म्हणऊ नी आभास चैतन्य । येणें स्फुरणें बुद्धीस ज्ञान ।
बोलिलें हें युक्त लक्षण । बाह्यविषयीं उभय व्याप्ति ॥२२॥
म्हणून आभासचैतन्य म्हणजे जीवचैतन्याच्या स्फुरणामुळेच बुद्धीस ज्ञान प्राप्त होते, असे म्हटले आहे. जीव आणि बुद्धी या दोहोंच्या व्याप्तीची बाह्य विषयांच्या ज्ञानासाठी आवश्यकता असते. (२२)

आभास बुद्धिसत्वें आहे । हें एकेविण एक न राहे ।
तरी दोन म्हणणें न साहे । बुद्धी आणि आभास ॥२३॥
जीवचैतन्याचे अस्तित्व बुद्धीच्या अस्तित्वावर अवलंबून असते. ही दोन्ही एकमेकावाचून राहू शकत नाहीत. म्हणून बुद्धी आणि जीव यांना दोन भिन्न पदार्थ म्हणता येत नाही. (२३)

बुद्धीविण प्रतिबिंब न पडे । चैतन्यावीण बुद्ध्‌यादि जडें ।
उभयापेक्षा उजेडे । इंद्रिया विषय ॥२४॥
बुद्धीवाचून जीवरूपी प्रतिबिंब पडत नाही, तर जीवचैतन्याच्या अभावी बुद्ध्यादी पदार्थ जड असतात. (म्हणजे या दोहोंना एकमेकाच्या अस्तित्वाची अपेक्षा असते.) आणि या दोहोंमुळेच इंद्रियांना विषयांचे ज्ञान होते. (२४)

हें असो ब्रह्मविषईंइ । फलव्याप्तीचें काज नाहीं ।
अज्ञाननिरासार्थ ठाईं ठाईं । वृत्तिव्याप्ती-अंगिकार ॥२५॥
असो, ब्रह्मप्राप्तीच्या संदर्भात जीवचैतन्याच्या व्याप्तीची आवश्यकता नाही. पण अज्ञानाचे निरसन करण्यासाठी मात्र बुद्धिवृत्तीच्या व्याप्तीचा स्वीकार करावा लागतो. (२५)

हें ब्रह्म मी न जाणे । जाणोनीच म्हणे मी नेणें ।
या अज्ञान निवृत्ति करणें । मी ब्रह्म हे वृत्ति ॥२६॥
हे ब्रह्म म्हणजे मी हे न जाणणे, जाणले तरी मी जाणत नाही, असे वाटणे या अज्ञानाचे, 'मी ब्रह्म'अशी वृत्ती, निरसन करते. (२६)

नसे आभासाचें काज । बोलिलें हें अयुक्त वोज ।
वृत्ति असतां असे सहज । बाह्य विषयापरी ॥२७॥
पण जीवचैतन्याचे येथे कारण नाही, असे म्हणणे अयोग्य आहे. बुद्धी जर असेल तर ब्रह्मज्ञान बाह्य विषयांप्रमाणेच सहज होईल. (२७)

याचें कैसें समाधान । ब्रह्म तरी स्वप्रकाशमान ।
घटादि जड म्हणऊन । आभासअ पेक्षा ॥२८॥
या शंकेचे समाधान कसे करायचे ? ब्रह्म हे स्वयंप्रकाशी असते. घटादी पदार्थ हे जड असतात. म्हणून त्यांच्या ज्ञानाला जीवचैतन्याची अपेक्षा असते. (२८)

जैसा चक्षु आणि दीप । मिळतां घटाचें दिसें रूप ।
पहावया चक्षूनें दीप । अन्यापेक्षा नसे ॥२९॥
घट पाहण्यासाठी डोळा आणि दिवा यांची अपेक्षा असते. पण डोळ्याने दिवा पाहण्यासाठी अन्य पदार्थाची अपेक्षा नसते. (२९)

तैसें ब्रह्मतत्त्व स्वयंप्रकाश । तेथें नलगे आभास ।
बुध्दीस्तव असतां तयास । अंतर्भूतता घडे ॥३०॥
त्याप्रमाणे ब्रह्मतत्त्व हे स्वयंप्रकाशी असल्याने तेथे जीवचैतन्याची अपेक्षा नाही. पण ते जीवचैतन्य बुद्धिवृत्तीसह त्यात अंतर्भूत (समाविष्ट) असते. (३०)

जैसे सूर्याच्या प्रकाशीं । लावितांही दीपासी ।
तेणें न प्रकाशी जे सूर्यासी । परि प्रकाशीं अंतर्भूत ॥३१॥
ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश पडला असताना जरी दीप प्रज्वलित केला तरी त्या दीपाने सूर्य प्रकाशिला जात नाही पण त्या सूर्याच्या प्रकाशातच सामावून जातो. (३१)

येणें रीती बुध्दियोगें । ब्रह्मतत्त्व जाणावें प्रसंगें ।
तेथें श्रोतीं लागवेगें । आक्षेपिलें ॥३२॥
अशा रीतीने बुद्धीच्या साहाय्याने ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान करून घ्यावे. यावर श्रोत्यांनी लगेच आक्षेप घेतला. (३२)

अंत:करणादि जडें । म्हणून ब्रह्म जाणणें न घडे ।
येथें बोलिजेल उघडें । सप्रतीत ज्ञान ॥३३॥
अंत:करणादी पदार्थ जड असल्यामुळे त्यांच्या साहाय्याने ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. यावर आता अनुभवासहित ज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करून सांगण्यात येईल. (३३)

अरसियांतील प्रतिबिंब । मुखेंचि जाणिजे स्वयंभ ।
हे माझिये मुखींची आभ । मजचि दिसे ॥३४॥
आरशातील प्रतिबिंबाचे ज्ञान स्वतः मुखालाच होऊ शकते. माझ्या मुखाची शोभा ही मलाच दिसू शकते. (३४)

अरसेविण मुख । नव्हे कदापि सन्मुख ।
अरसा जड मिथ्यात्व देख । प्रतिबिंबेंसी ॥३५॥
आरशाखेरीज मुख आपल्यासमोर कधीच येऊ शकत नाही. आरसा आणि प्रतिबिंब जड आणि मिथ्या आहेत. (३५)

तैसी बुध्दी हे आरसा । दिसणें असे प्रतिभासा ।
परि ते बुध्दी आणि आभासा । पाहणें न घडे ॥३६॥
त्याप्रमाणे बुद्धीच्या आरशात प्रतिबिंब दिसू शकते. पण ते बुद्धी आणि जीव यांना पाहता येत नाही. (कारण ती दोन्ही अनुक्रमे जड आणि मिथ्या आहेत.) (३६)

बुध्दी वेगळें ब्रह्म दिसेना । बुध्दी तरी जडत्वें जाणेना ।
मिथ्या आभासा कळेना । मी हा ऐसा असें ॥३७॥
बुद्धीवाचून ब्रह्म दिसत नाही आणि बुद्धी तर जड असल्यामुळे जाणू शकत नाही. मिथ्या असल्यामुळे आभासस्वरूप जीवचैतन्याला 'मी असा आहे' हे कळत नाही. (३७)

बुध्दिगत चैतन्य असे । तया चैतन्यचि जानतसे ।
हा वेदांतसंमती असे । राजयोगु ॥३८॥
बुद्धीच्या ठिकाणी जे चैतन्य आहे, त्याचे ज्ञान मुख्य चैतन्यालाच (ब्रह्मालाच) होते. वेदान्तामध्ये ज्याला राजयोग म्हणतात तो हाच होय. (३८)

अज्ञान जेव्हां सरे । तेव्हांचि ज्ञान ओसरें ।
जैसें सरतांचि कापुरें । अग्नि विझे ॥३९॥
कापूर संपताच ज्याप्रमाणे अग्नीही विझतो त्याप्रमाणे अज्ञान संपताच ज्ञानही ओसरते. (३९)

एवं ब्रह्म प्रत्यगात्मा होय। हा मुख्य वेदांत-विषय ।
येणें ज्ञानें पावन होय । मुमुक्षुजन ॥४०॥
अशा त-हेने प्रत्यगात्मा हाच ब्रह्म आहे, हाच वेदान्ताचा मुख्य विषय आहे. या ज्ञानाने मुमुक्षू लोक पावन होतात. (म्हणजे कृतार्थ होतात) (४०)

आतां संबंध तो कोणता । जाणावी साध्यसाधकता ।
साधक मुमुक्षू तत्त्वतां । साध्य ते वस्तु ॥४१॥
वेदान्तातील साध्य कोणते आणि साधक कोण हे जाणणे हाच संबंध होय. येथे मुमुक्षु हा साधक असून मूल वस्तू म्हणजे ब्रह्म हे त्याचे साध्य होय. (४१)

प्रत्यगात्मा ब्रह्म असतां । कैची ही साध्य साधकता ।
ऐसें कोणी आक्षेपितां । बोलणें घडे ॥४२॥
वास्तविक प्रत्यगात्मा हाच ब्रह्म अशी स्थिती असताना त्यात साध्यसाधकता कशी काय निर्माण होते असा कोणी आक्षेप घेतला तर त्याला उत्तर देणे भाग पडते. (४२)

तेंचि ब्रह्म आपण । असुन मी जीव मज बंधन ।
साध्य असुन विलक्षण । सहजची जाला ॥४३॥
आपण ब्रह्म असूनही मी जीव आहे, मला बंधन आहे'अशा समजुतीमुळे तो मुमुक्षू (प्रत्यगात्मा) स्वत: साध्य असूनही (म्हणजे ब्रह्मरूप असूनही) स्वाभाविकपणेच त्यापासून वेगळा पडतो. (४३)

तें ब्रह्म मी कैसा पावेन । कोणतें करावें साधन ।
रिघाला सद्‌गुरूसी शरण । या नांव साधक ॥४४॥
मग ते ब्रह्म मला कसे होता येईल, त्यासाठी कोणते साधन करावे लागेल, अशी चिंता करीत जो सद्गुरूला शरण जातो, त्याला साधक म्हणतात. (४४)

साध्य ब्रह्म असें सहजें । अज्ञानें केलें दुजें ।
तेंचि ज्ञानें पाविजे । सद्‌गुरुकृपें ॥४५॥
साध्य ब्रह्म स्वाभाविकपणे आपणच असूनही अज्ञानामुळे ते दुसरे वाटत होते, तेच सद्गुरुकृपेने ज्ञानाने प्राप्त होते. (४५)

एवं साध्य साधक । उभयरूपें आपण एक ।
असुन घडे विवेक । संबंधाचा ॥४६॥
अशा त-हेने साध्य आणि साधक या दोन्ही रूपांनी आपण एकच आहोत हा सबंध विचार झाला. (४६)

आतां तिसरें लक्षण । अनुबंधाचें प्रयोजन ।
सांगिजे तें सावधान । हो‍ऊन असावें ॥४७॥
आता तिसऱ्या अनुबंधाचे म्हणजे प्रयोजन या पदार्थाचे लक्षण सांगू. श्रोत्यांनी सावधान होऊन लक्ष द्यावे. (४७)

वेद कासयासी बोलिला । आनि सर्व शास्त्रांचा गलबला ।
नाना ग्रंथ विचारितां आला । कोण प्रत्यय ॥४८॥
वेद कशासाठी निर्माण झाला ? (वेद कशासाठी सांगण्यास प्रवृत्त झाला ?) सर्व शास्त्रांचा स्वमताविषयीचा आग्रह कशासाठी चालला आहे ? निरनिराळ्या ग्रंथांचा आशय विचारात घेता काय दिसून येते ? (४८)

तरी याचें फळ काय । बोलिजे तें यथान्वय ।
मागां बोलिला जो विषय । जाणता मोक्ष ॥४९॥
तरी या सर्व ऊहापोहाचे फळ काय ते आता सुसंगतपणे सांगितले पाहिजे. मागे जो ब्रह्मज्ञान हा विषय सांगितला त्याच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होणे, हेच येथेप्रयोजन आहे. (४९)

हें उपोद्‌घातत्वें बोलिजे । जें अर्थांतरे वर्णन कीजे ।
शोकनिवृत्ती आणि दुजें । आनंदावाप्ती ॥५०॥
मोक्षाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून प्रथम बंधन म्हणजे काय हे सांगून नंतर त्यातून मुक्तता म्हणजे मोक्ष असा पक्ष मांडण्यात येतो. त्याचे प्रत्यक्षातील स्वरूप म्हणजे शोकनिवृत्ती, आनंदप्राप्ती हे सांगण्यात येते. हा उपोद्घात झाल्यानंतर ह्या आशयाचे निरनिराळ्या अर्थाने प्रतिपादन करण्यात येते. (५०)

स्वरूपाचे न जाणणें । जें प्रसिध्द अज्ञान ।
त्यापासून विक्षेप जाण । जे मी जीव ऐसें ॥५१॥
स्वत:चे मूळ रूप न ओळखणे ह्यालाच अज्ञान म्हणतात. त्या अज्ञानापासूनच आपल्या मूळ रूपाच्या ऐवजी'मी जीव आहे' असे विपरीत ज्ञान निर्माण होते. हा विक्षेप होय. (५१)

जैसें मागें कर्म केलें । तेंचि आतां भोगने पडलें ।
आतां जे क्रियमान जालें । तें भोगणें अवश्य ॥५२॥
या विक्षेपामुळे जीवाला वाटत असते की, आपण मागे जी कमें केली त्यांचीच फळे आता आपण प्रारब्ध म्हणून भोगत आहोत. ती भोगत असताना येथून पुढे जी कमें केली जातील ती क्रियमाण कमेंही भोगावी लागतील. (५२)

ऐसी वासना बळावली । जन्मतांचि पुन्हा मेली ।
उसंत नाहीं पावली । नाना कष्ट ॥५३॥
अशी दृढ भावना बळावते. तिच्यामुळे जन्म झाला की मृत्यू पावणे (त्यानंतर पुन्हा जन्म, पुन्हा मरण) अशा क्रमाने जराही उसंत न घेता अव्याहतपणे अनेकविध कष्ट भोगत राहतो. (५३)

या नावें बोलिजे शोक । तया नाशी ज्ञानविवेक ।
ज्ञान म्हणजे प्रतिपादक । जें वेदें केलें ॥५४॥
याला शोक असे म्हणतात. अशा या शोकाचा, ज्ञानाचा विवेक नाश करतो. ज्ञान म्हणजे वेदाने ज्याचे प्रतिपादन केले त्याचा विचार होय. (५४)

संशय विपर्यासा जाऊन । जे प्रत्यगात्मा ब्रह्म पूर्ण ।
या नांव बोलिजे ज्ञान । आत्मशास्त्रगुरुप्रतीति ॥५५॥
संशय आणि विपर्यास यांचा निरास करून प्रत्यगात्मा तोच ब्रह्म अशी जाणीव होणे यालाच ज्ञान असे म्हणतात. ते आत्मप्रतीती, शास्त्रप्रतीती आणि गुरुप्रतीती या त्रिविध प्रतीतींनी सिद्ध होते. (५५)

आपण ब्रह्म परिपूर्ण । मग कोणासी जन्ममरण ।
होय शोकाचें निवर्तन । हें एक फळ ॥५६॥
आपणच परिपूर्ण ब्रह्म आहोत हे निश्चित झाल्यावर जन्म मरण कोणाला असणार ? अशा त-हेने शोकाचे निरसन होते. हे त्या ज्ञानाचे एक फळ होय. (५६)

आत्मा ब्रह्म आनंदघन । तेंचि निजांगे आपण ।
पावला सहज समाधान । निरतिशयानंद ॥५७॥
आनंदघन ब्रह्म म्हणजेच आत्मा असून आपण स्वत:ही तेच आहोत. या निश्चयाने आत्म्याला सहज समाधान आणि अतिशय आनंद प्राप्त होतो. (५७)

आत्मस्वरूप एव मुक्ति । ऐसे बोले वेदश्रुति ।
म्हणोनि आनंदावाप्ती । तोचि हा मोक्ष ॥५८॥
आत्मस्वरूपज्ञान हीच मुक्ती, असेच वेदांचे म्हणणे आहे. म्हणजे आनंदप्राप्ती हाच मोक्ष होय. (५८)

एवं ऐसीं फळें दोन । आनंदावाप्ती शोकापगमन ।
हेंचि मुख्य प्रयोजन । लक्षण तिसरें ॥५९॥
अशा त-हेने आनंदप्राप्ती आणि शोकपरिहार ही जी ज्ञानाची दोन फळे होत. तीच प्राप्त करणे हे या ब्रह्मज्ञानाचे प्रयोजन होय. (५९)

चौथा अधिकारी बोलिजे । सांगिजेल चिन्हीं ओळखिजे ।
मग तेणें रीती कीजे । साधन साधकीं ॥६०॥
चौथा अनुबंध म्हणजे अधिकारी होय. त्याची पुढे सांगण्यात येणाऱ्या चिन्हांनी ओळख पटेल. मग साधकाने तशा प्रकारचे साधन करावे. (६०)

ये समासीं लक्षण केलें । अनुबंधचतुष्टय वर्णिलें ।
पुढिले समासीं निरोपिलें । साधनचतुष्टय ॥६१॥
अशा त-हेने या समासात अनुबंधचतुष्टय यांची व्याख्यापूर्वक वर्णन केले. पुढच्या समासात साधनचतुष्टय सांगितले आहे. (६१)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
अनुबंधचतुष्टयप्रकारे । द्वितीयसमास: ॥२॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास ३ रा
नित्यानित्यविचार


वेदांत प्रसिध्द जें ज्ञान । म्हणऊन वेदांत कथन ।
पूर्वी सांगितलें निरूपण । अनुबंधाचे ॥१॥
वेदान्त प्रसिद्ध असे जे ज्ञान आहे त्याचे प्रतिपादन म्हणजे वेदान्तकथन होयत्याच्या अनुबंधांचे निरूपण यापूर्वी केले. (१)

येथें अधिकारी कोणता । तो तीप्रकारें तत्त्वतां ।
मंद तीव्र तीव्रतरता । प्रज्ञा जयाची ॥२॥
या ठिकाणी अधिकारी म्हणजे कोण, असा प्रश्न विचारला तर त्याचे मंदप्रज्ञ, तीव्रप्रज्ञ, तीव्रतरप्रज्ञ असे प्रज्ञेच्या क्षमतेवरून तीन प्रकार आहेत. (२)

तीव्रतरऊत्तम अधिकारी । अनंत जन्मींची सामुग्री ।
जरी पुण्य-पुंज असे पदरीं । तत्काळ त्या प्राप्ती ॥३॥
तीव्रप्रज्ञ हा त्यातील उत्तमअधिकारी होय. जर अनंत जन्माची सामग्री गाठी असेल, पुण्याचा मोठा साठा पदरी असेल तर त्याला तत्काळ ज्ञानप्राप्ती होईल. (३)

त्यासि नलगे सायास । एकवेळ होतां उपदेश ।
करुनी संशयाचा ग्रास । समाधान पावे ॥४॥
त्यासाठी त्याला कष्टांची गरज भासणार नाही. श्रीगुरूंचा एकदा उपदेश झाला की त्याच्या सर्व संशयांचा नाश होऊन त्याला समाधान प्राप्त होते. (४)

आतां मंदप्रज्ञ कनिष्ठ । तयासि साधनाचें कचाट ।
विविदिषा असे तरि वाट । सत्संगें शोधावी ॥५॥
त्यांमध्ये मंदप्रज्ञ हा सर्वांत खालच्या पातळीवरचा अधिकारी असून त्याला साधनांचे खूप कचाट सोसावे लागते. त्याच्या ठिकाणी विविदिषा (जाणून घेण्याची इच्छा, ज्ञानप्राप्तीची इच्छा) असेल तरच त्याने सज्जनांच्या सहवासात या मार्गाचा अवलंब करावा. (५)

विविदिषा नसतां तयास । वेदांतिं नसे अवकाश ।
तेणें कर्म अथवा उपासनेस । सुदृढ धरावें ॥६॥
त्याला जर अशी विविदिषा नसेल तर त्याला वेदान्तशास्त्रात स्थान नाही. त्याने कर्ममार्ग अथवा उपासनामार्ग यांचा दृढतापूर्वक अवलंब करावा. (६)

तथापि बळेंचि रिग केला । तो इहपरत्रीं नासला ।
बोलकेंपणे वरपडा जाला । पाषांडमति ॥७॥
त्याने बळजबरीने वेदान्तमार्गात प्रवेश केला तर त्याचे इहलोकी आणि परलोकी दोन्ही ठिकाणी नुकसान होईल. कारण त्याचे वेदान्तज्ञान केवळ बोलघेवडे ठरून तो पाखंडी बुद्धीचा होईल. (७)

मंदप्रज्ञ जरी भावार्थी । तया साधनें ब्रह्मप्राप्ती ।
आतां मुख्य वेदांतीं । अधिकारी कोणता ॥८॥
मंदप्ररज्ञ जर खरोखरच इच्छुक असेल तर साधन करून त्याला ब्रह्मप्राप्ती होऊ शकते. हे आता राहू देत. वेदान्तमार्गात मुख्य अधिकारी कोणता, याचा विचार करू. (८)

तीव्रप्रज्ञ मध्यम । तया वेदांत विचार सुगम ।
कांही प्रतिबंधास्तव उत्तम । नव्हे, मध्यम बोलावा ॥९॥
(तीव्रतरप्रज्ञही नाही आणि मंदप्रज्ञही नाही) तर मधला जो तीव्रप्रज्ञ आहे त्याला वेदान्तविचार सोपा ठरेल. काही प्रतिबंधामुळे (अडथळ्यांमुळे) त्याला उत्तम अधिकारी म्हणता येत नाही. म्हणून त्याला मध्यम अधिकारी म्हणावे. (९)

उपदेशापूर्वी साधनयुक्त । तोचि जाणावा परमयुक्त ।
तयासीच हें वेदौक्त। ज्ञान लाभे ॥१०॥
वेदान्ताचा उपदेश घेण्यापूर्वी जो अगोदरच साधनसंपन्न असेल तोच या मार्गातील अतिशय योग्य अधिकारी होय. अशा अधिकारी व्यक्तीलाच हे वेदोक्त (वेदात सांगितलेले) ज्ञान लाभेल. (१०)

तथा साधनाचें लक्षण । विशद कीजें निरुपण ।
जो कां चतुष्टयसंपन्न । साधनयुक्त ॥११॥
अशा साधकाच्या लक्षणांचे आता स्पष्ट निरूपण करतो. तो चार प्रकारच्या साधनांनी युक्त असावा लागतो. (११)

नित्यानित्यवस्तुविवेक । विरक्त असे इहामुष्मिक ।
संपत्ति शमादिशट्‌क । मुमुक्षता चौथी ॥१२॥
ते साधनचतुष्टय म्हणजे नित्यानित्यवस्तुविवेक, इहलोक आणि परलोकातील सुखांपासून विरक्ती;शमदमादिषद्क संपत्ती आणि चौथी मुमुक्षुता हे होय. (१२)

हें अनुक्रमें बोलिजेती । ज्याची अनुतापें तप्त मती ।
तयासीच साधनसंपत्ती । माळ घाली ॥१३॥
यांचे आता अनुक्रमाने स्पष्टीकरण करतो. ज्याची बुद्धी पश्चात्तापाने दग्ध झाली असेल अशालाच ही साधनसंपत्ती माळ घालील. (१३)

यासी कारण त्रिविधताप । जया घडे अनुताप ।
कैसें तापाचें स्वरूप । आधीं जाणावें ॥१४॥
ज्याला पश्चात्ताप होतो त्याच्या पश्चात्तापाचे कारण म्हणजे त्रिविध (तीन प्रकारचे) ताप होत. प्रथम त्या तापांचे स्वरूप जाणून घ्यावे. (१४)

आध्यात्मिक आधिभौतिक । तिसरा तो अधिदैविक ।
संक्षेपें याचा विवेक । कळला पाहिजे ॥१५॥
ते त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे होत. आता यांचा विचार संक्षेपाने जाणून घेतला पाहिजे. (१५)

देह प्राणापासून झाले । दु:ख इंद्रियानें केलें ।
किंवा मनें कल्पिलें । नाना आधि ॥१६॥
देह व प्राण यांच्यापासून झालेले दुःख, इंद्रियांपासून झालेले दुःख (या सर्व शरीरात उद्भवणाऱ्या दु:खांना व्याधी म्हणतात) किंवा मनाने कल्पिलेल्या चिंता, खेद, उद्विग्रता इत्यादी विविध आधी. (म्हणजे मानसिक दु:खे. ४१६)

हें आध्यात्मिक या नाव । पूर्वसंचिताचा ठेवा ।
सुखदु:ख भोग सर्व । प्रारब्धाधीन ॥१७॥
या सर्वांना आध्यात्मिक ताप असे नाव आहे. सुखदु:खादी भोग हे सर्व प्रारब्धाधीन असून पूर्वसंचिताची सामग्री आहे. (पूर्वी केलेल्या पापपुण्यांचा साचलेला संग्रह आहे.) (१७)

नाना भूतें पीडा करिती । अथवा भौतिकें दु:ख देतीं ।
जाणावी हे प्रतीति । आधिभौतिकाची ॥१८॥
निरनिराळी भूते (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश) जो त्रास देतात अथवा या भूतांपासून निर्माण झालेले पदार्थ (भौतिक) जी दु:खे देतात, त्यांमध्ये आधिभौतिक तापाचा अनुभव येतो. (१८)

या लोकांचे दैवत । अथवा अंतीं यमदूत ।
अत्यंतचि पीडा करित । हा आधिदैविक ॥१९॥
या इहलोकातील दैवते अथवा मरणानंतर यमदूत इत्यादी जे अतिशय कष्ट देतात, त्याला आधिदैविक ताप म्हणतात. (१९)

त्रिविधतापें जन्मले प्राणी । भोगिताति नाना जाचणी ।
परि उपजेना अनुताप मनीं । हेंचि पूर्व पाप ॥२०॥
या सृष्टीतील सर्व प्राणी या त्रिविध तापांसह जन्म घेतात, निरनिराळे जाच सहन करतात, तरीसुद्धा त्यांच्या मनात पश्चात्ताप उत्पन्न होत नाही, हेच पूर्वपाप होय. (२०)

जरी जन्मांतरी घडलें । पूर्व पुण्य उभें राहिलें ।
अनुतापें दुश्चित्त जालें । संसारिं चित्त ॥२१॥
असे पूर्वपाप मागच्या जन्मात आपल्याकडून घडले तरी या जन्मी पूर्वपुण्य उदयाला आले तर त्या प्राण्याचे मन पश्चात्तापामुळे संसारातून उद्विग्न होते. (२१)

जैसा उष्ण काळी अरण्यांत । गज सांपडे ओणवियांत ।
सरोवर देखतां अकस्मात्‌ । उडी घाली ॥२२॥
ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात एखादा हत्ती अरण्याला लागलेल्या वणव्यात सापडला आणि त्याला अकस्मात् एखादे सरोवर दिसले तर त्यात उडी घेतो. (२२)

तैसा त्रिविधतापें पोळला । अनुतापें अवघा त्याग केला ।
सुखरूप सत्संग धरिला । पुन्हा न सोडी ॥२३॥
त्याप्रमाणे जो कोणी या त्रिविध तापांनी पोळून निघाला असेल तो पश्चात्तापाने सर्व गोष्टींचा त्याग करतो आणि सुखकारक अशा सज्जनसंगतीचा स्वीकार करतोआणि ती कधीही सोडीत नाही. (२३)

तयासीच साधन घडे । येरव्ही सर्वथा न जोडे ।
नाना संसारीं सांकडें । भोगितां कष्ट ॥२४॥
त्यालाच साधन घडते. अन्यथा त्याला साधन प्राप्त होत नाही. संसारातील अनेक संकटे भोगताना त्याला कष्टच सहन करावे लागतात. (२४)

असो नित्यानित्यविवेक । तयाचे कैसें रूपक ।
येथें बोलिजे संक्षेपक । ते अवधारा ॥२५॥
तर हे राहू द्या, आता नित्यानित्यवस्तुविवेक असे ज्याला म्हणतात, त्याचे रूप काय आहे, ते आता संक्षेपाने सांगतो. ते नीट लक्षपूर्वक ऐका. (२५)

नित्य म्हणिजे सत्य । अनित्य जाणावें असत्य ।
निवाडा करी विचारयुक्त । क्षीर नीर जैसें ॥२६॥
नित्य म्हणजेच सत्य आणि अनित्य म्हणजे असत्य. या दोहोंचा हंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी यांचा निवाडा करतो त्याप्रमाणे साधक विचारपूर्वक निवाडा करतो म्हणजे नित्यानित्यवस्तुविवेक होय. (२६)

नाना ग्रंथ पाहिले । विचारें त्रैलोक्य धुंडिलें ।
मज जन्मासि येणें पडिलें । कवणें परी ॥२७॥
त्यासाठी खूप ग्रंथांचे अध्ययन करावे लागते, विचाराच्या साहाय्याने सर्व त्रैलोक्याचा धांडोळा घ्यावा लागतो. मला जन्म कशाप्रकारे प्राप्त झाला ? (२७)

हे जग कासयाचे जालें । आणि यासी कोणी निर्मिलें ।
मज जन्मासी घातलें । तो कोण देव ॥२८॥
(हे जग म्हणजे काय ?) ते कशापासून निर्माण झाले ? त्याला कोणी निर्माण केले ? मला जन्माला घालणारा देव कोणता ? (२८)

मी मी जया म्हणीतलें । ते देह तरी आतां जन्मले ।
त्यासी नांवही ठेविलें । गोम्यातिम्या ॥२९॥
ज्याला मी 'मी' म्हणून ओळखतो ('मी' असे म्हणतो) तो देह तर आता म्हणजे अलीकडे जन्माला आला आहे. त्याला (ओळखण्यासाठी) गोम्या, तिम्या असे नावही ठेवले आहे. (२९)

जयासी जन्म होय तत्त्वतां । तो जन्मापूर्वी होता ।
देह मरणधर्मी अवचिता । मरुनि जातो ॥३०॥
खरे पाहिले तर, ज्याला हा जन्म प्राप्त होतो तो, हा जन्म प्राप्त होण्यापूर्वीही अस्तित्वात होता. मरण हा ज्याचा स्वभाव आहे तो देह अचानकपणे मरून जातो. (३०)

बाप आजा पणजा मेला । प्राणी मरतो तो जन्मला ।
गतगोष्टीनें प्रत्यय आला । मृत्यु न चुके ॥३१॥
बाप मेला, आजा मेला, पणजा मेला याप्रमाणे जो जो जन्माला येतो तो तो प्राणी मरण पावतो. हे आतापर्यंत होऊन गेलेल्या घटनांनी अनुभवास येते. तेव्हा मृत्यू हा चुकत नाही. (३१)

नाना शारीराचे मासले । पंचभूताचे उभे केले ।
देखत देखतां नासले । तें सत्य कैसें ॥३२॥
पंचमहाभूतांपासून बनलेले अनेकविध शरीरांचे प्रकार पाहता पाहता नष्ट झाले. त्यांना सत्य कसे म्हणावे ? (३२)

म्हणोनि भौतिक नाशवंत । सत्य म्हणो जरी पंचभूत ।
पृथ्वी रचूनिया खचत । आप आटत सर्वदा ॥३३॥
म्हणून पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले सर्व पदार्थ नाशवंत आहेत. पंचभूतांना सत्य मानले तर, पृथ्वी निर्माण होऊन खचते, पाणी नेहमी आटून जाते. (३३)

अग्नी जळून विझतो । कीं वायु सुटून वितळतो ।
येणें रीती संहार होतो । पंचभूतासी ॥३४॥
अग्नी प्रज्वलित होऊन विझतो, वारा सुटतो आणि विरून जातो, अशा प्रकारे पंचमहाभूतांचा संहार होतो. (३४)

तस्मात्‌ हे सत्य न होती । असत्य ऐसें विचारी चित्तीं ।
परि कर्त्याची सामर्थ्य शक्ति । कैसी असे ॥३५॥
त्यामुळे ती सत्य नाहीत, ती असत्य आहेत, असा मनात विचार करावा. पण या सर्वांचा निर्माता कोण आहे, त्याचे सामर्थ्य कशा प्रकारचे आहे ? त्याच्या ठिकाणी कशा प्रकारची शक्ती आहे ? (३५)

परि हें कोणी केलें । म्हणो ब्रह्मदेवें निर्मिलें ।
तया ब्रह्मया उत्पन्नविलें । कोण्या देवें ॥३६॥
हे कोणी निर्माण केले ? ब्रह्मदेवाने निर्माण केले असे म्हटले तर त्या ब्रह्मदेवाला कोणत्या देवाने निर्माण केले ? (३६)

यासि विष्णु पालन करी । शेवटी रुद्र संहारी ।
पाळितो आणि संहारी । उभयतांसी कोण ॥३७॥
याचे (विश्वाचे) विष्णू पालन करतो, शेवटी रुद्र त्याचा संहार करतो असे म्हटले तर या दोघांचे पालन कोण करतो ? त्यांचा संहार कोण करतो ? (३७)

येथें कर्तेपणा दिसेना । केलें तें असत्य नाना ।
जेथें कर्ता आढळेना । त्यासी कल्पना मूळ ॥३८॥
या संदर्भात कोणाच्याही ठिकाणी कर्तेपण दिसत नाही. ज्या कोणी केले ते सर्व अनेकविध पदार्थ असत्य आहेत. जेथे कर्ता आढळत नाही, तेथे कल्पना हीच त्याच्या मुळाशी असते. (म्हणजे हे सर्व काल्पनिक आहे. (३८)

नाना पिंड आणि ब्रह्मांड । अवघें कल्पनेचे बंड ।
कल्पनाच मुळीं थोतांड । असत्य मनाची ॥३९॥
निरनिराळी व्यष्टिरूप शरीरे आणि समष्टिरूप हे सर्व ब्रह्मांड हे सर्व कल्पनेचेच बंड आहे. खुद्द कल्पना हीच खोट्या असलेल्या मनाची खोटी निर्मिती आहे. (३९)

एवं हे सर्व अनित्य । क्षणक्षणा नासे जन्मत ।
काल्पनीक हें प्रतींत । खरी आली ॥४०॥
अशा त-हेने हे सर्व अनित्य आहे. ते सर्व क्षणोक्षणी जन्माला येते, नष्ट होते. त्यावरून हे सर्व काल्पनिक आहे अशी प्रतीती आली. (४०)

परि कल्पना कोनासि जाली । मिथ्या परि कोणाची सा‍उली ।
अधिष्ठानेंविण भ्रमली । न वचे दृष्टी ॥४१॥
पण ही मूळ कल्पना कोणाच्या ठिकाणी निर्माण झाली ? सावली खोटी असते, पण ती कुणाची तरी (कुणामुळे तरी) निर्माण झालेली असते. तशी कल्पना कुणाशी संबंधित असते ? दृष्टीला भ्रम झाला म्हटले तरी त्याचे अधिष्ठान काहीतरी असतेच. अधिष्ठानावाचून दृष्टीला भ्रम होत नाही. (४१)

सर्प मिथ्या तरि रज्जूचा जाला । अधिष्ठान सत्यत्व असें त्याला ।
सत्यत्वेंवीण भ्रमाला । रूप कैचें ॥४२॥
साप खोटा असला तरी त्याचे अधिष्ठान रज्जूा दोरी) हेच असते. त्या खोट्या सापाला निदान अधिष्ठान सत्यत्व असते. तेव्हा सत्याच्या अधिष्ठानाखेरीज भ्रमाला अस्तित्व कसे असेल ? (४२)

ब्रम्हांड इच्छा जयाची । ते शक्ति माया परि कोणाची ।
सत्यत्वेंवीण नव्हेची । नाथिलें सर्व ॥४३॥
त्याप्रमाणे ब्रह्मांड ज्याच्या इच्छेने निर्माण झाले, ती इच्छाशक्ती माया म्हणजे मिथ्या खरी, पण ती कोणाची ? सत्यत्वाच्या अधिष्ठानावाचून ती सत्य असूच शकणार नाही. म्हणून सर्वच असत्य आहे. (४३)

ऐसें असत्य निवडिलें । सत्य ब्रह्म ठाईं पाडिलें ।
आतां मी देह जेणे कल्पिलें । तो मी कोण ॥४४॥
अशा त-हेने असत्य निवडून काढले तेव्हा सत्य ब्रह्माचे स्वरूप समजले. (पदरात पाडून घेतले.) आता मी देह'अशी कल्पना करतो तो मी'कोण ? (४४)

मी देहापूर्वी होतों । कल्पनेसी जाणतों ।
निद्रासुखाचा येतो । अनुभव मज ॥४५॥
मी देहापूर्वी होतो, मी कल्पनेला जाणतो, निद्रासुखाचा मला अनुभव येतो. (४५)

तिन्ही अवस्थेचा जाणता । अवस्था नव्हे मी तत्त्वतां ।
नाथिली कल्पनेची व्यवस्था । मज घडली ॥४६॥
जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा जाणता हा (त्या अवस्था नसून) मी आहे. म्हणजे त्या अवस्था म्हणजे मी नव्हे. मिथ्या कल्पनेतून निर्माण झालेली ही व्यवस्था मला म्हणजे माझ्या ठिकाणी घडते. (४६)

तो मी सत्यची आहें । माझा नाश कोण पाहे ।
असत्य तितुकें नासताहे । मज देखतां ॥४७॥
असा मी सत्यच आहे. माझा नाश कोण पाहतो ? जेवढे असत्य असेल ते सगळे माझ्यादेखत नष्ट होते. (४७)

म्हणउ न मी सत्य असें । ब्रह्म आत्मा दोनि ऐसें ।
येणें बोलें द्वैत भासें । दोहींच्या सत्यत्वें ॥४८॥
म्हणून मी सत्य आहे. आता ब्रह्म सत्य आहे. आत्माही सत्य आहे. या वचनांनी या दोहोंचे सत्यत्व प्रतिपादले असल्यामुळे द्वैत भासू लागते. (४८)

द्वैत अज्ञानें दिसलें । मिथ्या प्रतीतीस आलें ।
विचारितां व्यर्थ जालें । दोनिपण ॥४९॥
पण हे द्वैत अज्ञानामुळे दिसत आहे. ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येते. विचार करून पाहता ते द्वैत खोटे ठरते. (४९)

म्हणउिन प्रत्यगात्मा ब्रह्मपूर्ण । येथें नाही कीं दुजेपण ।
या नांव बोलिजें ज्ञान । नित्यानित्यविचार ॥५०॥
म्हणून प्रत्यगात्मा हाच ब्रह्म असून त्याला दुसरेपण संभवत नाही. यालाच नित्यानित्यविवेक म्हणतात हेच ज्ञान होय. (५०)

जाला विचार विवेकाचा । ठाव लाधला नित्याचा ।
यासि हेतुभूत विरक्तीचा । विचार पुढें ॥५१॥
याप्रमाणे विवेक (नित्यानित्यवस्तुविवेक) म्हणजे काय हे कळले आणि नित्य म्हणजे काय हेही कळले. या दोहोंचा हेतू (म्हणजे कारण) जी विरक्ती (वैराग्य) तिचा विचार पुढे करू. (५१)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
नित्यानित्यविचारे। तृतीयसमास ॥३॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास ४ था
वैराग्यलक्षण


इह म्हणिजे या लोकींचे । अमुत्र म्हणजे स्वर्गींचे ।
तया कल्पित सुखाचे । भोगणें कर्मानुसार ॥१॥
इह म्हणजे या लोकातले, अमत्र म्हणजे स्वर्गातले अशी जी कल्पित सुखे आहेत, ती सुखे कर्मानुसार भोगायला मिळतात. (१)

तेथें विवेके जो विटला । तोचि ज्ञानाचा अधिकारी जाला ।
विरक्तीवीण ज्ञानाला । दृढता नसे ॥२॥
या सुखांना विवेकाने (विचाराने) जो विटतो. तोच ज्ञानाचा अधिकारी होतो. कारण वैराग्यावाचून ज्ञानाला दृढता येत नाही. (२)

विरक्ती म्हणिजे त्याग । विषयाचा जो अनुराग ।
प्रस्तुत इहलोकींचे भोग। जाणावे आधीं ॥३॥
विरक्ती म्हणजे विषयसुखांबद्दलचे जे प्रेम त्याचा त्याग होय. आता अगोदर इहलोकीचे भोग म्हणजे काय ते जाणून घेऊ. (३)

स्त्री पुत्र आणि वित्त । माझें माझें जे म्हणत ।
यासि जे का हेतुभूत । जे मी मी म्हणे ॥४॥
स्त्री, पुत्र, धन यांना आपण 'माझे, माझे' असे म्हणत असतो आणि 'माझे' असे म्हणणारा जो, त्याला 'मी, मी' असे म्हणत असतो. (४)

मी माझें हा संसार । इतुकाचि असे जोजार ।
या विरहित अणुमात्र । तिसरें नाही ॥५॥
मी आणि माझे एवढेच आपले विश्व असते. याखेरीज त्यात तिसरे कणभर देखील नसते. (५)

म्हणोनि मीपण शोधावें । मग काय माझें तें पडे ठावें ।
मी तरी कोणास म्हणावें । शरीरीं नानात्व बहु ॥६॥
म्हणून 'मीपण' म्हणजे काय त्याचा शोध घ्यावा, त्यानंतर 'काय माझे आहे' ते कळते. आता आपल्या शरीराच्या संदर्भात विविध गोष्टी आढळतात. यांपैकी 'मी' नेमके कोणाला म्हणता येईल ? (६)

जन्मानंतरे ठेविलें नाम । तें मी नव्हे हा नेम ।
आतां रूपाचा अनुक्रम । बोलिजे तो ॥७॥
मनुष्याचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव ठेवतात. ते नाव म्हणजे 'मी' नव्हे, हे निश्चित. आता त्यानंतर रूपाचा क्रम सांगितला जातो त्याचेही स्वरूप पाहू. (७)

इंद्रिय प्राण अंत:करण । त्याचीं नामें भिन्न भिन्न ।
तें तें माझी म्हणतां आन । तो तो मी नव्हे ॥८॥
शरीरात इंद्रिये, प्राण, अंत:करण अशी अनेक तत्त्वे आहेत. त्यांची भिन्न भिन्न नावे आहेत. त्या तत्त्वांना आपण 'माझी' म्हणून संबोधतो. त्या अर्थी ती तत्त्वे माझ्यापासून भित्र ठरतात. म्हणून ती तत्त्वे म्हणजे मी नव्हेत. (८)

जैसी चिरगुटाची बाहुली । अवयवें परम शोभली ।
हाव भाव कटाक्षें जाली । परम सलक्षण ॥९॥
तीं लक्षणें आणि हाव भाव । उकलून पाहतां न दिसे ठाव ।
दिसे परि तें समूळ वाव । आकार असतांही ॥१०॥
ज्याप्रमाणे चिरगुटे म्हणजे चिंध्यांची बाहुली केलेली असते. तिच्या निरनिराळ्या अवयवांमुळे ती छान दिसते. तिचे हावभाव, कटाक्ष इत्यादींनी तिच्यात काही लक्षणे म्हणजे गुण उतरतात. आता ती उकलून पाहिली तर त्या लक्षणांचा आणि हावभावांचा काहीच मागमूस दिसत नाही. आता ते तर दिसत होते, पण ते आकार असतानाही व्यर्थ ठरले. (९-१०)

तैसी बहु तत्त्वें मिळाली । म्हणून काया दिसूं लागली ।
मी मी ऐसी प्रतीती आली । परि ते मिथ्या ॥११॥
त्याप्रमाणे अनेक तत्त्वे एकत्र आली म्हणून हे शरीर दिसू लागले. त्याच्या ठिकाणी 'मी, मी' अशी प्रतीतीही आली, पण ते सर्व मिथ्या होय. (११)

तत्त्वीं तत्त्वें शोधिलीं । बहुपणें विरोनि गेली ।
तरी मग मीपणाची भुली । सहजची वाव ॥१२॥
तत्त्वांच्या साहाय्याने तत्त्वांचा शोध घेतला तर त्यांच्या अनेकत्वामुळेच ती बाद ठरतात, तर मग त्यांच्या ठिकाणी मीपणाचा जो भ्रम होतो तो मुळासहित व्यर्थ ठरतो. (१२)

मी एक सत्य असावा । तरी माझें हे हा पडे गोवा ।
तथापि तया भोग्या सर्वा । सत्यत्व नाहीं ॥१३॥
आता मी एक सत्य मानले तरी'माझे'चा गुंता कायम राहतोच. तथापि माझे असे आपण ज्यांना म्हणतो ते सर्व भोग्य (भोगण्यासारखे) या सदरात पडत असल्यामुळे त्या सर्वांना सत्यत्व येतच नाही. (१३)

स्त्रीसंगे बहुत सुख । क्षणीक वाटे परि तें दु:ख ।
परम लावण्य दिसे मुख । परि तें घाणेरें ॥१४॥
स्त्रीच्या सहवासात पुष्कळ सुख क्षणभर वाटते. पण नंतर ते दुःखरूप ठरते. तिचे मुख अतिशय सुंदर दिसते. पण वास्तवात तेथे घाणच असते. (१४)

अस्थि मांस त्वचा रक्त । तेथें काय रे शोभिवंत ।
नाना दोषें असें प्लुत । वमन जैसे ॥१५॥
अस्थी, मांस, त्वचा, रक्त हेच तिथे असते. त्यांमध्ये शोभिवंत असे काय आहे ? त्यामध्ये नाना दोष भरलेले आहेत. ते सर्व ओकून टाकलेल्या पदार्थांसारखे आहेत. (१५)

तैसाचि पुत्रही अनर्थ । दु:खरूपासी म्हणती स्वार्थ ।
पुत्र व्हावा हा हेत । पूर्वी दु:खरूप ॥१६॥
त्याप्रमाणे पुत्र हाही अनर्थरूपच होय. जे दुःखरूप आहेत त्याला लोक स्वार्थ (स्वत:च्या हिताचे, उपयोगाचे) मानतात. सर्वजण पुत्र व्हावा हा हेतू मनात बाळगतात. पण पुत्र अगोदर दुःखरूपच असतो. (१६)

गर्भापासून मरणवरी । पुत्र पित्यासी दु:खकारी ।
अनुभवें जाणावें कितीतरी । विस्तार करूं ॥१७॥
गर्भधारणेपासून मरण येईपर्यंत पुत्र पित्याला दुःखदायकच असतो. ते सगळे अनुभवाने जाणून घ्यावे. मी त्याचा विस्तार कशाला करत बसू ? (१७)

येणें रीतीं राज्य संपदा । ते ते दु:खाची आपदा ।
अर्जनीं रक्षणीं व्ययीं सदा । क्लेशरूप ॥१८॥
याच प्रकारे राज्य, संपत्ती या सर्व गोष्टी दु:खे देणारी संकटेच होत. त्या प्राप्त करताना, त्यांचे रक्षण करताना, खर्च करताना सर्व प्रसंगी कष्टरूपच असतात. (१८)

तस्मात्‌ हें सर्व दु:खमूळ । त्याग करणें हेंचि मंगळ ।
विषय त्यागितांही सकळ । देह वाचेना ॥१९॥
म्हणून या सर्व गोष्टी दुःखाचे मूळ असून त्यांचा त्याग करणे हीच मांगल्यदायक कृती होय. पण सर्व विषयांचा त्याग केला तर देह वाचणार नाही, त्याचे काय ? (१९)

या आक्षेपी बोलिजे उत्तर । त्याग करणें प्रीति मात्र ।
भोगी बांधिलें जें अंतर । ते दोषदृष्टी त्यागावें ॥२०॥
या आक्षेपाचे उत्तर आता सांगितले पाहिजे. या पदार्थांचा त्याग करावा म्हणजे केवळ त्यांच्याबद्दलची आसक्ती सोडावी हे होय. आपले मन त्यांच्या भोगात गुंतलेले असते. ते दोषपूर्ण मानून त्याचा त्याग करावा. (२०)

अल्प निद्रा अल्प आहार । अल्पचि असावा विहार ।
साधानासी जो विघ्नकर । तो तो विषय त्यागावा ॥२१॥
अल्प निद्रा, अल्प आहार, अल्प विहार (फिरणे) असा नियम करून साधनेला जो जो विघ्नकारक असेल त्या त्या विषयाचा त्याग करावा. (२१)

अंतर्त्याग घडे सर्वांसी । उभय त्याग संन्याशासी ।
तथापि आहार निद्रा तयासी । सर्व सांडितां सुटेना ॥२२॥
त्यागाचे दोन प्रकार आहेत. अंतस्त्याग आणि उभयत्याग. अंतस्त्याग हा सर्वांना शक्य आहे. म्हणजे विषयाबद्दल जे प्रेम (आकर्षण) असते त्याचा त्याग करणे सर्वांना शक्य आहे. संन्याशांनी मात्र उभयत्याग करावा. म्हणजे विषयाबद्दलची आसक्ती आणि साक्षात् विषय या दोहोंचा त्याग करावा. पण संन्याशाला इतर सर्व गोष्टींचा त्याग केला तरी आहार आणि निद्रा सुटत नाहीतच. (२२)

म्हणून विवेकसहित त्याग । हाचि जाणावा विराग ।
अंतरीं निरोपिले जे भोग । विषप्राय त्यागावें ॥२३॥
विवेकपूर्वक केलेला त्याग हेच वैराग्य म्हणून समजावे. आपल्या मनात जे भोग घट्ट पाय रोवून राहिलेले असतात ते विषप्राय समजून त्यांचा त्याग करावा. (२३)

भोगीं कांही सुख नाहीं । सुख भोक्त्याचे ठाईं ।
भोक्ता असतां नवाई । विषय सुखाची ॥२४॥
खरे म्हणजे भोगात काहीच सुख नसते. सुख भोक्त्याच्या ठिकाणी असते. भोक्ता असेल तरच विषयसुखाचे अपूर्वत्व असते. (२४)

जैसें श्वान हाडें चघळी । गोड लागे मुखीची लाळी ।
परि तें समजे तये वेळीं । हाडची गोड ॥२५॥
एखादे कुत्रे हाड चघळत असते. तेव्हा आपल्या तोंडातील लाळच त्याला गोड लागत असते. परंतु ते हाड चघळत असते म्हणून ते हाडच गोड आहे असे त्याला वाटत असते. (२५)

पोट न भरे होय शीण । पडे दांत लागतां कठिण ।
नुसधें क्लेशासी कारण । त्या पशुसी न कळे ॥२६॥
त्या कृतीने त्याचे पोटही नीट भरत नाही. उलट श्रमच जास्त होतात. ती कृती त्याला यातना देण्यासच कारणीभूत होते. पण त्या प्राण्याला ते कळत नाही. (२६)

आपण सुखरूपची असे । भोगीं कांही सुख नसे ।
तथापि मानिलें अविश्वासें । वियोगें दु:खरूप ॥२७॥
वास्तविक आपण (आत्मा) सुखरूपच असतो. भोगामध्ये काही सुख नसते. परंतु अविश्वासाने आपण स्वत:ला भोगातच सुखरूप मानतो आणि त्या भोगाच्या वियोगाने दुःखरूप मानतो. (२७)

आपुलिया सुखाकारणें । पडे विषयांचे घेणें ।
तया भोग्यार्थ न घडे वचनें । श्रुतीची ऐसी ॥२८॥
आपल्या (आत्म्याच्या) सुखासाठी आपल्याला विषयांचा स्वीकार करावा लागतो. भोग्य विषयासाठी नव्हे. वेदांची वचनेसुद्धा अशीच आहेत. (बृहदारण्यक २. ४. २-५) (२८)

याज्ञवल्कि म्हणे मैत्रेयी । पतिसाठीं पति प्रिय नाहीं ।
पुत्रवित्तादि सर्वही । आपणासाठीं ॥२९॥
याज्ञवल्क्य स्वत:ची पत्नी मैत्रेयी हिला म्हणतात, पती हा पती आहे म्हणून प्रिय नाही. पती, पुत्र, वित्त ही सर्व आपल्यासाठी (आत्म्याच्या अस्तित्वामुळे) प्रिय आहेत. (२९)

सर्वामाजीं आवडता । अत्यंत असे जो तत्त्वतां ।
तयाचा अंतरी शोध घेतां । उडे ममता सर्वांची ॥३०॥
जो सर्वात अधिक आवडतो, त्याचा आपल्या अंत:करणात शोध घेऊ लागतो असता इतर सर्व पदार्थांबद्दल वाटणारी ममता उडून जाते. (त्यांबद्दलचे ममत्व नष्ट होऊन जाते. ३०)

येणे रीती इहलोक भोग । सर्वस्वेंसी करावा त्याग ।
भोक्त्यास्तव कर्म उद्योग । स्वर्गार्थ करणें ॥३१॥
अशा प्रकारे इहलोकातील भोगांचा सर्वप्रकारे त्याग करावा. आपली सर्व कमें, उद्योग, स्वर्गसाधने ही सर्व आपण आतल्या भोक्त्यासाठी करत असतो. (३१)

क्लेशें यज्ञादि करणें । तेणें स्वर्गासी जाणें ।
तेथेंही कर्मानुसार भोगणें । स्वर्गांगनामृतपान ॥३२॥
आपण अनेक कष्ट घेऊन यज्ञादी कमें करतो, त्याद्वारे स्वर्गाला जातो, तेथेदेखील स्वर्गातील अप्सरांचा सहवास, अमृतपान इत्यादी सुखांचा स्वकर्मानुसार भोग घेतो. (३२)

जयाचे कर्म अधिक । तयासी भोग अलोकिक ।
न्यून तरी अवश्यक । अल भोग ॥३३॥
ज्याचे कर्म अधिक त्याला अलौकिक (खूप) भोग मिळतात, कमी असेल त्याला निश्चितपणे अल्प भोगच मिळतात. (३३)

ऐसें न्यून अधिक पाहतां । मत्सारची उठे तत्त्वतां ।
तेणें गुणें सुखाची वार्ता । बोलेंचि नये ॥३४॥
अशा प्रकारचा कमी अधिक भेदभाव पाहिल्यावर (सुख भोगत असताही) खरोखर मत्सरच निर्माण होत असतो. त्यामुळे (त्या सुखात) सुखाची गोष्टच बोलू नये. (३४)

तेंही शाश्वत नाहीं । कर्मक्षीणें सरे भोगही ।
पुढे गर्भवास योनी सर्वही । फिरणे लागे ॥३५॥
(तेथे जे सुख मिळते) तेही शाश्वत नाही. कर्म क्षीण होताच भोगही संपतात. त्यानंतर गर्भवास, सर्व योनीत फिरणे इत्यादी भोग वाट्याला येतात. (३५)

बचके काउळा आला । तैसा नरदेह लाधला ।
फुकट कामसाठीं वेंचला । पुन्हा कैचा ॥३६॥
बचकेत अचानक कावळा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला मिळाला आहे. पण तोही व्यर्थ कर्मकटकटीतच पुन्हा का बरे खर्च करावा ? (३६)

असो स्वर्गसुखाचें फळ । प्रतीतीवीण खळखळ ।
स्वर्गी सुख असें पुष्कळ । कोणी लिहून धाडिलें ॥३७॥
हे असू द्या, स्वर्गसुखाच्या फळाची अपेक्षा धरणे म्हणजे प्रतीतीवाचून खळखळ करण्यासारखे आहे. स्वर्गात पुष्कळ सुख असते, असे कोणी आपल्याला लिहून पाठवले आहे काय ? (३७)

शास्त्रीं जरी सांगितलें । तेणें ज्योतिष्टोमादि केलें ।
परि तें प्रतीतीस आलें । कैसें सांगा ॥३८॥
शास्त्रात जरी सांगितलेले असते की, जो स्वर्गात जातो, त्याने ज्योतिष्टोम इत्यादी यज्ञ केलेले असतात, तरी पण याचा प्रत्यय कसा आला हे प्रथम स्पष्ट सांगायला पाहिजे. (३८)

एवं नाशवंत आणि उधार । हें न गणावें साचार ।
इहलोक आणि परत्र । एकरूप ॥३९॥
तेव्हा अशाप्रकारे जे सुख नाशवंत आणि उधार स्वरूपाचे आहे ते सत्य मानू नये. इहलोक आणि परलोक याबाबतीत एकरूपच (सारखे) आहेत. (३९)

ब्रह्मलोकादि तृणान्त । जें तें अवघें नाशवंत ।
जें जें दिसें आणि भासत । तें तें नासत कल्पान्ता ॥४०॥
ब्रह्मलोकापासून अगदी गवताच्या काडीपर्यंत सर्व काही नाशवंत आहे. जे जे दिसते आणि भासते ते ते सर्व कल्पान्ती नाश पावणार आहे. (४०)

जें जें कांही उत्पन्न होतें । तें तें सर्वही लया जातें ।
प्रतीत रोकडी पाहणें तें । यासि काय ॥४१॥
जे जे काही उत्पन्न होते ते ते सर्वच लयाला जाते. याबाबतीत प्रत्यक्ष अनुभव पहावा, याहून अधिक काय ? (४१)

आदि अंती नाश ज्यासी । त्याची इच्छा ते कायसी ।
ऐसी दोष दृष्टि सर्वासी । काकविष्ठेसम मानी ॥४२॥
आरंभापासून अखेरपर्यंत ज्याला नाश आहे त्याची इच्छा कशासाठी धरायची ? सृष्ट पदार्थाकडे अशा प्रकारच्या दोषदृष्टीने पाहून त्यांना काकविष्ठेसमान मानून त्यांचा त्याग करावा. (४२ यालाच विरक्ती म्हणतात.)

हें विरक्ती नव्हे भाग्य । ज्ञानाचें केवळ सौभाग्य ।
विरक्ती नसतां अभाग्य । ज्ञान कैचें ॥४३॥
ही विरक्ती नसून भाग्याची गोष्ट समजावी. ही ज्ञानाचे सौभाग्य समजावे. (ज्ञानाची ही कृतार्थता समजावी.) विरक्ती नसलेल्या अभाग्याला ज्ञान कसे प्राप्त होईल ? (४३)

ऐसें विवेकवैराग्य दोनीं । साधकाची जनक जननी ।
तत्काल घालिती नेउनी । पूर्व भूमिकेस ॥४४॥
अशा प्रकारे विवेक आणि वैराग्य ही दोन साधकाचे मातापिताच आहेत. ही दोन्ही साधकास ताबडतोब आपल्या मूळ भूमिकेला नेऊन पोचवितात. (४४)

पुढें दोनीं लक्षणें असतीं । षट्‌कसंपत्ति मुमुक्षा चौथी ।
अधिकारिया सहज होती । जरी अत्यंत चाड ॥४५॥
यापुढे आणखी दोन अधिकारिलक्षणे सांगावयाची आहेत. ती म्हणजे शमदिषट्क संपत्ती आणि चौथी ममक्षा (मोक्षाची इच्छा) ही होत. अधिकाऱ्याला जर अत्यंत तळमळ असेल तर ही दोन्ही सहजपणे प्राप्त होतील. (४५)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
वैराग्यलक्षणप्रकारे। चतुर्थसमास: ॥४॥
हरिः ॐ तत्सत्॥ श्रीराम समर्थ ॥

समास ५ वा
शमादिषट्‌क व मुमुक्षत्व


दोनी लक्षण अधिकारीयाचें । या समासीं निरूपण साचें ।
जेणें साधनें ज्ञानाचें । ऐश्वर्य बाणें ॥१॥
या समासात वेदान्ताच्या अधिकारी व्यक्तीच्या लक्षणांचे निरूपण करावयाचे आहे. या साधनाच्या योगाने ज्ञानाचे ऐश्वर्य अंगी बाणते. (१)

शम दम उपरती जाण । तितिक्षा श्रध्दा समाधान ।
येणें साधनें पावन । बहुत जाली ॥२॥
शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान अशी ही शमादिषट्क संपत्ती आहे. या (सहा) साधनांनी अनेक लोक पावन झाले आहेत. (२)

प्रत्यगात्मा ब्रह्म पूर्ण । हेंचि मनासी मनन ।
सांडुनी अन्य कल्पन । स्वरूपसागरीं लहरी ॥३॥
(मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंत:करण या पाचांचे मिळून अंत:करणपंचक होते. या पाचही इंद्रियांच्या वृत्ती ब्रह्मावर केंद्रित करून त्याच्याशी एकरूप होऊन राहणे हा शम होय. तेच क्रमाने सांगतात.) ब्रह्माखेरीज इतर कल्पना म्हणजे स्वरूप सागरावरील (ब्रह्मरूपी सागरावरील) लाटा होत. त्यांचा त्याग करून प्रत्यगात्मा हाच ब्रह्म आहे असे मनाने मनन केले जाते. (३)

बुध्दी निश्चया सोंकली । तेणेंचि सिध्दी जाली ।
स्वरूप निश्चयें पावली । समाधान ॥४॥
निश्चय करते ती बुद्धी. तिला त्याचीच चटक लागलेली असते. या निश्चयरूप व्यापारानेच तिची सिद्धता होते, तर अशी ही बुद्धी स्वरूपविषयक (ब्रह्मासंबंधीचा) निश्चय करून समाधान पावते. (४)

तेंचि चित्ताचे चिंतन । मी ब्रह्म हा अभिमान ।
येणें रीती अंत:करण । निर्विकार जाली ॥५॥
ब्रह्माविषयीचे चिंतन करणे हेच चित्ताचे कार्य होय. 'मी ब्रह्म आहे' असा अभिमान बाळगणे हेच अहंकाराचे स्वरूप होय. अशाच त-हेने अंत:करण हेही निर्विकार होते. (५)

वेगळेंपणें विषयध्यान । तंवचि त्यासी नामाभिधान ।
स्वरूपीं राहतां अभिन्न । मुळींच असती ॥६॥
जोपर्यंत ही अंत:करणे (अंतरिद्रिये) वेगळी राहून विषयाचे ध्यान करत असतात, तोपर्यतच त्यांना वेगळे नाव असते. पण तीच इंद्रिये जर स्वरूपाच्या (ब्रह्माच्या) ठिकाणी अभिनत्वाने असतील तर ती त्यामध्येच असतात. (आपल्या मूळरूपातच असतात.) (६)

या नांव बोलीजे शम । जें अंतरी निष्काम ।
येणें रीती जाणिजे दम । बाह्येंद्रियनिग्रह ॥७॥
अशा रीतीने अंत:करणपंचकाच्या व्यापारातून अखंडपणे ब्रह्माचा अनुभव घेण, अंत:करणात निष्काम असणे यालाच शम असे म्हणतात. अशाच प्रकारे बाह्य इंद्रियांचा निग्रह म्हणजे दम होय. (बाह्येद्रिये म्हणजे श्रवण, त्वचा, चक्षू, जिव्हा, नासिका यांचा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांकडे ओढा असतो. त्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे दम होय.) (७)

इंद्रियवृत्ति विषयाकार । बहिर्मुखेंचि व्यापार ।
शब्द स्पर्शादि अपार । भोगींच प्रीती ॥८॥
इंद्रियांची धाव विषयांकडे असते. त्यांचे व्यापारही बहिर्मुख असतात आणि त्यांची शब्द, स्पर्श इत्यादी भोगांवरच प्रीती असते. (८)

अंत:करण उपशम जालिया । इंद्रियनिग्रह कासया ।
तरी इंद्रिये धांवतां विषयां । मनासी ओढिती ॥९॥
आता अंत:करणे (मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी इंद्रिये) शांत झाल्यावर म्हणजे त्यांचे समाधान झाल्यावर इंद्रियनिग्रह कशासाठी करायचा ? या प्रश्नाचे उत्तर असे की, इंद्रिये विषयांकडे धाव घेत असताना ती स्वत:बरोबर मनालाही ओढून नेतात. (९)

मन धांवे इंद्रियांसवे । मनें इंद्रियां विषय फावे ।
इंद्रियेवीण मन धावे । परि तो इंद्रियाध्यास ॥१०॥
मन इंद्रियांबरोबर धावू लागते. मनामुळे इंद्रियांना विषय भेटतात. कधी कधी इंद्रिये नसतानाही मन विषयाकडे धावते. पण त्यावेळी मनावर इंद्रियांचा आरोप झालेला असतो. (अध्यास म्हणजे मन इंद्रियरूप नसताही इंद्रियरूप असल्याची त्याची कल्पना. १०)

एवं परस्परां साह्यभूत । याचा निग्रह तोचि एकांत ।
म्हणोनिया सावचित्त । इंद्रियें आवरावीं ॥११॥
अशा त-हेने मन आणि इंद्रिये परस्परांना साहाय्य करतात. म्हणून यांचा निग्रह करणे आवश्यक ठरते. असा निग्रह जेव्हा शक्य होईल तेव्हाच खरे एकांताचे सुख मिळेल. म्हणून सावधानतापूर्वक इंद्रियांना आवरावे. (११)

तरी जो जयाचा विषय । तो तेणेसी वेगळा न होय ।
तरि निग्रहाचा उपाय । कैसा करावा ॥१२॥
पण जो ज्याचा विषय असेल तो त्यापासून वेगळा करता येत नाही. अशा परिस्थितीत निग्रहाचा उपाय कसा आचरणात आणावा ? (१२)

तरी याचें उत्तर । दिधलें पाहिजे साचार ।
जालें अवघें सचराचर । परि विषय पांच ॥१३॥
याचे (खरे) उत्तर आता दिले पाहिजे. सर्व चराचर विश्व निर्माण झाले तरीपण विषयांची संख्या पाचच आहे. (१३)

शब्द स्पर्श रूप रस गंध । हा पंचवृत्त्यात्मक भेद ।
येथें बोलिजे विशद । उपोद्‌घातत्वें ॥१४॥
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांनुसार पाच वेगवेगळ्या वृत्ती निर्माण होतात. त्यांचे आता उपोद्घात रूपाने स्पष्ट विवेचन करू. (१४)

नाम रूप हे मायेचे । अस्तिभाति प्रियत्व ब्रम्हमीचें ।
नामरूप बोलिलें साचें । तेंचि आधीं ओळखावें ॥१५॥
त्या विषयांचे ठिकाणी असणारी नामरूपे मायाजनित असून त्यांच्या ठिकाणी असणारी अस्ति, भाति, प्रिय ही लक्षणे ब्रह्माची आहेत. आता प्रथम नाम आणि रूप यांचे स्वरूप आधी ओळखून घेऊ. (१५)

नाना अळंकारी भिन्न भिन्न । एकची जैसें सुवर्ण ।
व्यवहारार्थ नामें अगाध । आकार तें रूप ॥१६॥
निरनिराळ्या अलंकारांमध्ये जसे एकच सोने असते, तसे व्यवहाराच्या सोयीसाठी अनेक नामे देण्यात आलेली असतात. तसेच त्यांचे रूप म्हणजे आकारही भिन्न भिन्न असतात. (१६)

अळंकारी सुवर्ण असे । पाहतांही सुवर्णचि दिसे ।
आणि आवडी ही असे । सुवर्णाचे ठाई ॥१७॥
अलंकारांमध्ये सुवर्ण असतेच. ते पाहू गेल्यास सुवर्णच दिसते आणि सुवर्णाबद्दल सर्वांना आवडही असते. (१७)

तैसें दृश्य नामरूपाचें । परि ते अस्तिभातिविण कैचें ।
जरी जालें विषयाचें । इंद्रियां नानात्व ॥१८॥
त्याप्रमाणे कोणतेही दृश्य घेतले तरी त्याला नाम आणि रूप असते. पण अस्ति, भाति आणि प्रिय या लक्षणांखेरीज तिथे दुसरे काय असते ? इंद्रियांना विषय भिन्न भिन्न वाटले तरी त्या सर्वांच्या ठिकाणी अस्ति, भाति, प्रिय हीच लक्षणे असतात. (अस्ति म्हणजे आहेपणा अथवा सत्ता, भाति म्हणजे ज्ञानविषय होणे, दिसणे आणि प्रिय म्हणजे आवडणे. ४१८)

जयाचें अस्तित्वं असती । जयाचें स्फुरणेंची भासती ।
जेणें सुखेंचि होती । सुखरूप सदा ॥१९॥
ज्याच्या अस्तित्वामुळे या अलंकारांना अस्तित्व प्राप्त होते, ज्याच्या स्फुरणामुळे त्यांचे ज्ञान होते, अथवा ते भासतात, तसेच ज्याच्या सुखरूपामुळे ते नेहमी सुखरूप वाटतात. (१९)

सुवर्णावांचून कांहीं । अळंकारा रूप नाहीं ।
तैसें या सर्वांच्या ठाई । अस्ति भाति असे ॥२०॥
अशा सोन्यावाचून अलंकारांना रूप नाही, त्याप्रमाणे या सर्व सृष्ट पदार्थांच्या ठिकाणी ब्रह्माचेच अस्तिभाति प्रियत्व असते. (२०)

ऐसें बुध्दीसी बोधावें । मग इंद्रिया तेंचि फावें ।
विषय घेतां आठवें । अस्ति भाति प्रियत्व ॥२१॥
असे बुद्धीला समजावून द्यावे. मग इंद्रियांनाही ते सर्व पदार्थ तसेच जाणवतील. विषयाचा अनुभव घेत असता त्यांचे अस्तिभातिप्रियत्वच आठवत राहील. (२१)

श्रवणीं जें जें ऐकावें । शब्द अंतर्बाह्य स्वरूप आघवें ।
नेत्रें जें जें अवलोकावें । तें तें अस्ति भाति ॥२२॥
कानांनी जे जे ऐकावे ते शब्द म्हणजे अंतर्बाह्य सगळे स्वरूपच म्हणजे ब्रह्मच होत. डोळ्यांनी जे जे पाहावे ते सर्व दृश्य म्हणजे अस्ति-भाति-प्रिय स्वरूपी ब्रह्मच होय. (२२)

मृदु कठिण स्पर्श होतां । नाना रस जिव्हा सेवितां ।
अथवा नाना गंध घेतां । स्वरूपेंवीण नाहीं ॥२३॥
मृदू, कठीण अशा स्पर्शाचा अनुभव घेताना किंवा जिभेने निरनिराळ्या रसांचा (चवींचा) अनुभव घेताना किंवा निरनिराळे गंध (वास) घेताना स्वरूप म्हणजे ब्रह्मावाचून वेगळे काहीच नसते. (२३)

इंद्रिय आणि विषय । तिजा व्यापार जो होय ।
या सर्वा अंतर्बाह्य । व्यापून असे ॥२४॥
इंद्रिये, विषय आणि तिसरा व्यापार या सर्वांना ते स्वरूपच (ब्रह्मच) अंतर्बाह्यव्यापून असते. (२४)

व्यापक सहजची आहे । विचारुनी कोणी न पाहे ।
स्मरणें विचारितां लाहे । स्वरूपस्थिति ॥२५॥
ते व्यापक तत्त्व सहजपणेच सिद्ध आहे. कोणी त्याचा विचार करत नाहीत. (त्याची दखलही घेत नाहीत) इतकेच. पण स्मरणपूर्वक विचार केल्यास त्या स्वरूपस्थितीची प्राप्ती होते. (२५)

ऐसें इंद्रिय आणि मन । व्यापारता स्वरूपीं निमग्न ।
मग विषयांचे ग्रहण । सहजची राहे ॥२६॥
अशा त-हेने इंद्रिये आणि मन ही स्वरूपामध्ये मग्न होऊन व्यापार करू लागली म्हणजे विषयांचा अनुभव आपोआपच थांबतो. (२६)

उगाचि निग्रह करितां । नाटोपती हे सर्वथा ।
नाना कष्टें दांत खातां । शीणची होय ॥२७॥
पण तसे न करता नुसता इंद्रियनिग्रह करत राहिलो तर हे विषय आटोक्यात येणार नाहीत. उलट कष्टपूर्वक त्यांच्यावर दात ओठ खाल्ल्याने उगीचच शीण मात्र होईल. (२७)

नाना वल्ली एकरसें । वाढणें घडे अपैसें ।
ब्रह्मसुख सर्वां तैसें । एकची विषय ॥२८॥
निरनिराळ्या वेली केवळ एकाच रसतत्त्वाने आपोआप वाढतात तशाच प्रकारे ब्रह्मसुख हाच सर्वांना एकमेव विषय होतो. (२८)

चित्त स्वरूपींच खेळें । नित्य सुखाचे सोहळे ।
मग इंद्रियाचें लळे । क्रिइयेवीण पुरती ॥२९॥
चित्त स्वरूपाच्याच ठिकाणी क्रीडा करते. त्यामुळे त्याला शाश्वत सुखाचे सोहळे प्राप्त होतात. मग इंद्रियांचे लाडही कोणत्याही कृतीवाचून पुरविले जातात. (२९)

सुख अपार देखिले । तरी तेथेंचि सोकलें ।
पूर्व विषय विसरले । हळूं हळूं ॥३०॥
ब्रह्मसुखासारखे सुख पाहताच सर्व इंद्रिये तेथेच लालचावतात व पूर्वीचे सर्व विषय हळूहळू विसरून जातात. (हे शमाचे वर्णन होय. शम म्हणजे मनोनिग्रह.) (३०)

आत्मा हा रथस्थ । देह हाचि रथ ।
इंद्रिय घोडे उन्मत्त । मन वाग्दोर ॥३१॥
आत्मा हा रथात बसलेला असून देह हाच त्याचा रथ होय. इंद्रिये हे त्या रथाचे उन्मत्त घोडे होत आणि मन हा त्याचा वाग्दोर (लगाम) होय. (३१)

बुध्दी हे चपळ सारथी । दुष्ट तरी अश्व नावरती ।
बळेंचि ओढोनि नेती । विषयभूमी ॥३२॥
बुद्धी ही चपळ सारथी आहे. असे असले तरी या रथाचे इंद्रियरूपी दष्ट घोडे या सारथ्याला आवरत नाहीत आणि ते या रथाला विषयभूमीवर बळेच ओढून नेतात. (३२)

जरी सारथी असे उत्तम । सहजीं इंद्रियां उपरम ।
येणें रीती हा दम । ओळखावा ॥३३॥
जर सारथी उत्तम असेल तरच त्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो. याप्रकारे दम म्हणजे इंद्रियनिग्रहाचे स्वरूप कळते. (३३)

आतां तसरी उपरती । मागां बोलिली जे विरक्ती ।
दोषदृष्टीनें आसक्ती । कोठेंचि नाहीं ॥३४॥
आता तिसरी जी उपरती, तिचे स्वरूप पाहू. मागे (चौथ्या समासात) जे वैराग्याचे वर्णन केले ते वैराग्य म्हणजेच उपरती होय. उपरती म्हणजे सर्व सृष्ट पदार्थ सदोष (नष्ट होणारे, अशाश्वत) आहेत असे जाणून कशावरच आसक्ती न ठेवणे होय. (३४)

वीट आला सर्वांचा । छंद लागला स्वरूपाचा ।
इंद्रिय आणि मनाचा । संचार स्वरूपीं ॥३५॥
सर्वांचा वीट येऊन स्वरूपाचा (ब्रह्मस्वरूपाचा) छंद लागला म्हणजे इंद्रिये आणि मनाचा व्यापार स्वरूपाच्या ठिकाणी होऊ लागतो. (३५)

जैसें ढोर भागलें । त्या निवांत घर सांपडलें ।
पुन्हां उठवितां मोडिले । हातपय ॥३६॥
जसे एखादे दमलेले जनावर एखादे निवांत निवाऱ्याचे ठिकाण सापडले की तेथेच बसून राहते. त्याला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न केला तरी ते हातपाय मोडल्याप्रमाणे जागच्या जागीच बसून राहते. तशी त्या इंद्रिये आणि मनाची अवस्था होते. (३६)

हेचि जाणावी उपरती । विषयेंवीण उपशांती ।
आतां तितिक्षा जयेतें म्हणती । सर्व सहन ॥३७॥
तिलाच उपरती असे म्हणतात. उपरती म्हणजे विषयांच्या अभावी इंद्रिये आणि मन यांची शांत, स्थिर अवस्था. आता तितिक्षा असे जिला म्हणतात ती तितिक्षा म्हणजे सर्व सहन करणे होय. (३७)

परमार्थीं जो लागला । देहाचें सुख कैचें त्याला ।
प्रारब्धावरी टाकिला । सुखदु:खात्मक ॥३८॥
आता ज्याला परमार्थमार्गाचा ध्यास लागलेला आहे, त्याला देहाचे सुख कोठून मिळणार ? त्याने आपला देह सुखदुःख स्वरूपी प्रारब्धावर सोडून दिलेला असतो. (३८)

जें जें होणारें तें न चुकें । नव्हेल तें करणें फिकें ।
या बोधें राहिला एकें । निजस्वरूपीं ॥३९॥
जे जे होणार असेल ते काही टळत नाही. न होणार त्याची आसक्ती न धरता त्याच्या बाबतीत उदासीनता धारण करतो आणि तो एका निजस्वरूपात (स्वत:च्या ब्रह्मरूपात) निमग्न राहतो. (३९)

भोगी जें जें प्राप्त होतां । अप्राप्ताची न करी चिंता ।
देहावरील ममता । सांडिली जेणें ॥४०॥
भोगामध्ये जे जे प्राप्त होईल ते सर्व (उदासीन वृत्तीने) तो सहन करतो. जे अप्राप्त असेल त्याची काळजी करत नाही, देहाबद्दलची ममता (माझेपणाची भावना) त्याने सोडून दिलेली असते. (४०)

लोक कोणी पीडा करिती । कोणी नेऊनी पूजिती ।
कोणी देखोनी निंदिती । स्तविती एक ॥४१॥
कोणी लोकांनी त्याला त्रास दिला, कोणी घरी नेऊन त्याची पूजा केली, कोणी त्याला पाहताच निंदा करायला लागले, कोणी स्तुती करायला लागले. (४१)

अंतरात्मा अवघा एक । तेथें कैचे असती लोक ।
सुखदु:खाचे दायक । हे न होती ॥४२॥
तर (तो विचार करतो की) सगळ्यांचा अंतरात्मा एकच आहे, तेथे हा मी, हे लोक असा विचार कसा संभवतो ? त्यामुळे हे लोक मला सुखदुःख देतात हे म्हणणे चुकीचे आहे. (४२)

सुखदु:ख मनें कल्पिलें । तें बळें स्वरूपाकार केले ।
बाह्य कायेसी जें जें जालें । साक्षी तयाचा ॥४३॥
सुख, दु:ख या कल्पना मनाने कल्पिलेल्या आहेत. ते मनच प्रयत्नपूर्वक स्वरूपाकार (ब्रह्मस्वरूप) केले तर बाह्य शरीराला जे प्राप्त होईल त्याचा मी केवळ साक्षी ठरतो. (४३)

सुख अथवा दु:ख । भोगणें देहा अवश्यक ।
प्रतिकार करणें ना ग्राहक । दोन्ही नाहीं ॥४४॥
सुख असो अथवा दुःख असो ते देहाला भोगावेच लागणार तेव्हा त्याचा प्रतिकार अथवा स्वीकार या दोन्ही कृतींना काही अर्थच राहत नाही. (४४)

येणें रीती जें जें जाले । तें तें सहजत्वें साहिलें ।
निरूपण समाप्त जालें । तितिक्षेचें ॥४५॥
अशा प्रकारे (असा विचार करून) जे जे होईल ते ते तो सहजपणे सहन करतो. तितिक्षा या गुणाचे निरूपण येथे संपते. (४५)

आतां पांचवी श्रध्दा । जे परमार्थाची संपदा ।
गुरुशास्त्राचे ठाईं सदा । बळकट विश्वास ॥४६॥
आता पाचवा गुण म्हणजे श्रद्धा होय. श्रद्धा ही खरी परमार्थाची संपत्ती आहे. गुरू, शास्त्र यांच्या ठायी दृढ विश्वास म्हणजे श्रद्धा होय. (४६)

विषयसुख सांडिलें । गुरुसेवे शरीर विकलें ।
प्रपंचासी दिधले। तिलोदक ॥४७॥
सर्व विषयसुखांचा त्याग करून गुरुसेवेला आपले शरीर वाहून टाकणे आणि प्रपंचाला तिलोदक देणे (त्याग करणे) . (४७)

गुरुपदीं अत्यंत आवडी । वेदान्त विषयाची गोडी ।
मननें अर्थांतर काढी । स्वानुभवानुसार ॥४८॥
गुरुचरणांबद्दल अत्यंत प्रेम असणे, वेदान्त विषयाची गोडी असणे आणि शास्त्रीय ग्रंथांचा मननपूर्वक आणि स्वानुभवानुसार अर्थ लावणे (ही या श्रद्धावंताची लक्षणे आहेत.) (४८)

पुरते कोणाकडे पाहेना । पुरते कोणासी बोलेना ।
आवडी गुंतली गुरुचरणा । व्यापरा उसंत नाहीं ॥४९॥
तो कोणाकडेही पुरते पाहतसुद्धा नाही. कोणाशी जास्त बोलतही नाही आणि गुरुचरणावर आत्यंतिक प्रेम गुंतल्यामुळे इतर व्यापार करायला त्याला उसंतही मिळत नाही. (४९)

काया गुरुसेवे गुंतली । वाणी गुरुभजनीं रातली ।
अंत:करणी सांठविली । गुरुमूर्ती सदा ॥५०॥
त्याचे शरीर गुरुसेवेमध्ये गुंतलेले असते. वाणी गुरूंच्या भजनात रमलेली असते. त्याने अंत:करणामध्ये सदैव गुरुमूर्ती साठवून ठेवलेली असते. (५०)

गुरुवचन हाचि वेदांत । गुरुवचन हाचि सिध्दांत ।
गुरुवचनीं अनन्य रत । या नांव श्रध्दा ॥५१॥
गुरूंचे वाक्य हाच त्याचा वेदान्त, गुरूंचे वाक्य हाच त्याचा सिद्धान्त असतो. गुरूंच्या वचनामध्ये तो अनन्यभावाने रममाण झालेला असतो. यालाच श्रद्धा म्हणतात. (५१)

होतां पांचही परिपूर्ण । तेचि जाणिजे समाधान ।
संपत्तीचें लक्षण । सहवें जें कां ॥५२॥
या पाचही गोष्टी पूर्ण झाल्यानंतर जे प्राप्त होते त्यालाच समाधान म्हणतात. समाधान हे सहाव्या संपत्तीचे लक्षण आहे. (५२)

दु:ख अवघेचि ओसरलें । देहबुध्दीचें पाप गेलें ।
सुखरूप कोंदाटले । पुण्य परब्रह्म ॥५३॥
या अवस्थेमध्ये सगळे दु:ख ओसरून गेलेले असते. देहबुद्धीचे पाप (मी देह आहे ही जाणीव) नाहीसे झाले आणि सुखरूप असे पुण्यकारक परब्रह्म सर्वत्र भरून राहिलेले असते. (५३)

ज्न्ममरण विसरला । मायेचा ठावची पुसिला ।
देहीं असोनि विदेही झाला । नि:संगपणें ॥५४॥
त्या साधकाला जन्ममरणाचा विसर पडतो, त्याच्या दृष्टीने मायेचे अस्तित्वच पुसून टाकलेले असते आणि नि:संगपणामुळे (कशाचीच आसक्ती उरलेली नसल्यामुळे) तो शरीर धारण करणारा असूनही विदेही (देहविरहित) झाल्यासारखा झालेला असतो. (५४)

गेली अवघी तळमळ । जाला सुखरूपची केवळ ।
सागरामाजीं निवळ । लवण जैसें ॥५५॥
त्याची सर्व तळमळ नाहीशी झालेली असते. तो पूर्णपणे सुखरूप झालेला असतो. समुद्रामध्ये जसे मीठ विरघळून जाते तसा तो सुखस्वरूप ब्रह्मामध्ये पूर्णपणे मिसळून गेलेला असतो. (५५)

हे सहा मिळोनी तिसरें साधन । नेहटोन पाहतां हेंचि ज्ञान ।
निश्चयालागीं श्रवण मनन । करणें लागे ॥५६॥
अशा या सहा गुणांचे मिळून तिसरे शमदिषट्क संपत्ती हे साधन पूर्ण होते. खरे पाहता ही संपत्ती हेच खरे ज्ञान होय. पण त्या ज्ञानाचा निश्चय होण्यासाठी श्रवण, मनन इत्यादी करावे लागते. (५६)

आतां चौथी मुमुक्षता । म्हणजे मज व्हावी मुक्तता ।
अन्य पदार्थी असक्तता । इच्छा बळकट मोक्षाची ॥५७॥
आता चौथे साधन म्हणजे मुमुक्षुता अथवा मोक्षाची इच्छा हे होय. मुमुक्षुता म्हणजे मला मुक्ती मिळावी ही इच्छा होय. सर्व पदार्थांमधील आसक्ती नष्ट होऊन मला मोक्ष मिळावा ही बळकट इच्छा म्हणजे मुमुक्षुता होय. (५७)

येथें आक्षेप असे थोर । मोक्ष तू अपरोक्ष साक्षात्कार ।
प्रमाणसिध्द हा विचार । न कळतां इच्छा नसे ॥५८॥
प्रमाणसिध्द जरी कळलें । तरी प्राप्तविषया न वचे इच्छिलें ।
तस्मात्‌ मोक्षेच्छा जी नाव बोलिले । असंभवतिचें ॥५९॥
या संदर्भात एक मोठा आक्षेप आहे. मोक्ष म्हणजे प्रत्यक्ष साक्षात्कार होय. अशा मोक्षाची इच्छा असा शब्दप्रयोग संभवत नाही. कारण मोक्षाचे यथार्थ (प्रमाणांनी सिद्ध असे) स्वरूप कळल्याशिवाय मोक्षाची इच्छा संभवतच नाही आणि ते यथार्थ स्वरूप जर कळून आले तर हस्तगत झालेल्या विषयाची इच्छा संभवत नाही. त्यामुळे जिला मोक्षाची इच्छा (मुमुक्षा) असे म्हटले ती स्थिती असंभवनीय ठरेल. (५८-५९)

तरि याचें कैसें उत्तर । सुखचि इच्छिती सर्व नर ।
हा धर्म अंत:करणाचा साचार । कळला पाहिजे ॥६०॥
या प्रश्नाचे उत्तर असे की, सर्व माणसे सुखाचीच इच्छा करतात. अंत:करणाचा हा धर्म अगोदर बरोबर कळला पाहिजे. (६०)

येथें प्रमाणाचें काज नाहीं । सुखार्थ इच्छिती सर्वही ।
तें सुख अन्यविषयी नाहीं । जे सुखरूप आत्मा ॥६१॥
याबाबतीत अन्य प्रमाणांची गरज नाही. कारण सर्व प्राणिमात्र सुखाची इच्छा करतात. आता सुखरूप आत्म्याचे सुख आहे ते इतर कोणत्याही विषयात नाही. (६१)

अन्य अन्या पाहती । अन्य अन्यासी जाणती ।
तयासी अल्प म्हणे श्रुती । छांदोग्याची ॥६२॥
ज्यावेळी एक द्रष्टा एका दृश्याला पाहतो किंवा एक ज्ञाता दुसऱ्या ज्ञेयाला जाणतो अशी द्वैताची स्थिती असते त्यावेळी जे सुख होते, ते अल्प असते असे छान्दोग्य उपनिषदात म्हटले आहे. (६२)

अन्य अन्यासी न पाहे । अन्य अन्या जाणणें नोव्हे ।
तेचि भूमत्व सुखरूप आहे । म्हणोनि इच्छा संभवे ॥६३॥
आणि एक द्रष्टा दुसऱ्या एका दृश्याला पाहत नाही, एक ज्ञाता दुसऱ्या ज्ञेयाला पाहत नाही. त्या अद्वैतातील सुख पुष्कळ असते, म्हणून त्याबाबतीत इच्छा संभवते. (६३)

सुखार्थ इच्छी परि मोक्ष कैसा । अनुमान असे जरी ऐसा ।
अविद्या आच्छादन आनंदाशा । तीच वृत्ति तो मोक्ष ॥६४॥
मनुष्यप्राणी सुखाची इच्छा करतो हे खरे पण त्या सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष हे कसे ठरते अशी शंका असल्यास त्याचे उत्तर असे की आत्मस्थितीमध्येच अविद्या नष्ट होऊन आनंदप्राप्ती होते. त्यामुळे तोच मोक्ष होय. (६४)

तरी हे सर्वांसी कां न संभवे । या आक्षेपी बोलिजे बरवें ।
अविद्येस्तव नेणती सर्वे । म्हणती विषय सुखरूप ॥६५॥
मग असा मोक्ष सर्वांना का प्राप्त होत नाही, या आक्षेपाचे उत्तर असे की, सर्व जणांना अविद्येमुळे ते सुख समजत नाही आणि त्यामुळे ते विषयसुखालाच सुख मानतात. (६५)

अनंत जन्मींचा पुण्य ठेवा । जरी गांठी असे बरवा ।
विषईं त्रास उपजे जीवा । तोचि इच्छि येरा नाहीं ॥६६॥
अनंत जन्मांच्या पुण्याचा ठेवा गाठी असेल तरच जीवाला विषयसुखांचा उबग येईल आणि तोच मोक्षाची इच्छा करील. ती इच्छा इतरांना संभवत नाही. (६६)

असो मुमुक्षुचें चिन्ह । सादर करावें श्रवण ।
मुख्य विषयीं उदासीन । परमार्थीं आवडी ॥६७॥
हे असू देत. आता मुमुक्षूचे लक्षण आदरपूर्वक ऐकावे. मुमुक्षू हा विषयांच्या बाबतीत प्रामुख्याने उदासीन असतो आणि त्याला परमार्थामध्ये रुची असते. (६७)

मज हा अलभ्य लाभ झाला । नरदेह अवचिता प्राप्त जाला ।
तो म्यां विषई वेंचला । धि:कारू मज ॥६८॥
मला त्या नरदेहाची अचानक प्राप्ती झाली, हा मला झालेला अलभ्य लाभ होय. परंतु हा देह मी विषयसुखासाठी खर्च केला. माझा धिक्कार असो. (६८)

श्वानशूकरादीं नाना योनी । भोगितां चिळस ये मनीं ।
येथें तेंचि भोगितां जनी । मज लाज नये ॥६९॥
श्वानशूकरांचे (कुत्री, डुकरांचे) अनेक जन्म भोगत असताना मनात किळस निर्माण होते. या जन्मातही तीच सुखदुःखे भोगताना मला लाज कशी वाटत नाही ! (६९)

हे प्रारब्धा माझिया दुष्टा । मज कां भोगविसी कष्टा ।
हा हे विधातिया श्रेष्ठा । काय अदृष्टा लिहिलें ॥७०॥
हे माझ्या दुष्ट प्रारब्धा, मला हे कष्ट का भोगायला लावतोस ? हे श्रेष्ठ ब्रह्मदेवा, माझ्या नशिबात काय लिहून ठेवलेस ? (७०)

या प्रारब्धावरी बिंदुलें । घालिती सद्‌गुरु पाउलें ।
हे जाणोनि बोभाइलें । सखया सद्‌गुरुसी ॥७१॥
सद्गुरूंचे चरण या प्रारब्धाचा शेवट करतील हे जाणून साहाय्यक सद्गुरूंना साद घातली. (७१)

व्याघ्रसमुदाईं गाय । सांपडतां मोकली धाय ।
घाबरी चहूंकडे हाय । वास पाहे कैवारियाची ॥७२॥
वाघांच्या समुदायात जर गाय सापडली तर ती मोठ्याने हंबरडा फोडते, घाबरून चोहीकडे पाहू लागते आणि कोणी आपल्याला सोडवायला येतो का याची वाट पाहते. (माझी अवस्था तशीच झाली आहे. ४७२)

अहो अहो जी सद्‌गुरु । दु:खसागर कैसा तरुं ।
धावे पावे न धरी धिरूं । उडी घाली लागवेगीं ॥७३॥
अहो सद्गुरुमहाराज, हा दु:खाचा सागर कसा पार करू ? माझ्यावर प्रसन्न व्हा आणि धावत या, मला आता धीर धरवत नाही. ताबडतोब माझ्या या संकटात उडी घाला (आणि मला त्यातून सोडवा.) (७३)

विश्वचक्षूं तूं म्हणविसी । माझी उपेक्षा केली कैसी ।
चंद्रे काय चकोरासी । आव्हेरु केला ॥७४॥
तू स्वत:ला विश्वचक्षू म्हणवतोस आणि माझी उपेक्षा का केलीस ? चंद्राने कधी चकोराचा अव्हेर केला आहे काय ? (७४)

चातका न वर्षे घन । तरी कां दधिमधू करी सेवन ।
मी तुझिया चरणा शरण । अन्यथा नव्हे ॥७५॥
मेघाने जर चातकासाठी वर्षाव केला नाही तर तो काय कधी दही, मध यांचे सेवन करील का ? मी त्याप्रमाणे तुझ्या पायांशी शरण आलो आहे, हे सत्य आहे. (हे काही खोटे नाही.) (७५)

तान्हें पडतां आरण्यीं । सुख निद्रा नये जननी ।
मज टाकुनी निर्वाणी । कोठे अससी दयाळे ॥७६॥
आपले तान्हे मूल अरण्यात पडले असताना आईला कधी सुखाची झोप येईल काय ? हे दयाळू सद्गुरुमाउली, मला या संकटात टाकून तू कुठे जाऊन बसलीस ? (७६)

किंवा सन्नीधचे अससी । लपून कौतुक पाहसी ।
हेंचि खरें परि प्राणासी । निर्वाण आलें ॥७७॥
अथवा तू अगदी जवळच असशील, आणि लपून तू कौतुक पाहत असशील. तुझे हे वागणे खरे असेलही, पण इकडे माझ्या प्राणावर संकट आले आहे ना ! (७७)

किंवा शब्द साचूल जाला । वाटे दयाळू पावला ।
निरखून पाहतां नव्हेसा जाला । पुन्हां अंग घाली ॥७८॥
काही शब्दाचा आवाज झाला की वाटते की दयाळू परमेश्वरच प्रसन्न झाला. निरखून पाहू लागतो तेव्हा तू नाहीसा होतोस, मग मी पुन्हा जमिनीवर अंग टाकतो. (७८)

जें जें दृष्टीस दिसतें । तें तें सद्गुरूच ऐसें वाटतें ।
परि उपदेशून दु:खापरतें । मज कोण करी ॥७९॥
दृष्टीने जे जे दिसते, ते ते सर्वच सद्गुरूच आहेत असे वाटते. पण मला उपदेश करून मला दु:खापासून कोण मुक्त करील ? (७९)

स्त्रीपुत्रादि पुढें आले । सद्‌गुरूच म्हणून चरण धरिलें।
इतुके वेळ कोठें क्रमिले । सांगा स्वामी ॥८०॥
स्त्री, पुत्र इत्यादी पुढे आले तर सद्गुरूच आले आहेत, म्हणून त्यांचे पाय धरले आणि विचारले, की "स्वामीमहाराज, आपण इतका वेळ कोठे घालवलात ? "अशी त्याची अवस्था झाली. (८०)

अथवा वृक्ष शिळा श्वापद । म्हणे हे गुरु सच्चिदानंद ।
ऐसा लागला छंद । गुरुवीण न स्मरे ॥८१॥
किंवा वृक्ष, शिलाखंड, हिंस्र प्राणी यांनाच "हेच माझे सच्चिदानंदस्वरूपी सद्गुरू आहेत' असे म्हटले. असा छंद लागला. गुरुवाचून अन्य काही त्याला आठवतच नाही. (८१)

लोक म्हणती लागलें वेड । अंतरीं सांठवला घबाड ।
देहबुध्दीचें कबाड । नेणेचि तो ॥८२॥
हे पाहून लोक म्हणू लागले की, याला आता वेड लागले आहे. त्याच्या अंत:करणात खूप काही साचलेले आहे. पण देहबुद्धीचे दारच त्याला माहीत नाही. (अंत:करणात पुष्कळ विचार आहेत पण मानवी व्यवहाराची भाषा तो विसरून गेला आहे. म्हणजे तो असंबद्ध बोलू लागला आहे.) (८२)

अथवा पुसे भलत्या प्रती । मज सद्‌गुरू कैं भेटती ।
चंचल जड नये प्रतीती । गुरु म्हणोनि हाक फोडी ॥८३॥
किंवा भलत्याच माणसाला विचारू लागला की, मला सद्गुरू केव्हा भेटतील ? त्याला हे जड आहे, हे जंगम आहे, असा भेदच कळेनासा झाला. दिसेल त्याला 'गुरुमहाराज' म्हणून हाक मारू लागला. (८३)

नेत्रीं गुरुरूप कैं पाहीन । हा मस्तक चरणीं ठेवीन ।
ऐसें म्हणोनि ठेवी आनन । पाषाणावरी ॥८४॥
'डोळ्यांनी गुरुरूप कधी पाहीन, त्यांच्या पायावर माझा माथा कधी टेकवीन' असे म्हणून तो दगडावरच डोके टेकवू लागला. (८४)

लोक लाज अवघी गेली । क्षुधा तृषा जितची मेली ।
आपुली देखतां साउली । सद्‌गुरु आला म्हणे ॥८५॥
त्याला लोक-लाज वाटेनाशी झाली. ती नष्टच झाली. तो जिवंत असूनही त्याची, तहान भूक मरून गेली आणि आपली सावलीदेखील पाहिली की 'माझे सद्गुरू आले' असे म्हणू लागला. (८५)

जरी निद्रेनें व्यापिला । स्वप्नीं वाटे गुरु आला ।
धाऊनी खांब पोटाळिला । ओळखितां अंग घाली ॥८६॥
त्याला झोपेने घेरले तरी स्वप्रामध्येही 'सद्गुरू आले' असे वाटू लागले. किंवा कधी धावत जाऊन खांबालाच गुरू म्हणून आलिंगन दिले. थोड्या वेळाने खांबाची ओळख पटल्यावर अंग जमिनीवर टाकून दिले. (८६)

ऐसा ध्यासें गुरुचि जाला । परि तें न कळे तयाला ।
रात्री कीं दिवस उगवला । गुरुवीण झाला कासावीस ॥८७॥
अशा ध्यासाने तो स्वत:च गुरू झाला. पण तेही त्याला कळेना. ही रात्र आहे की दिवस आहे हे भानही त्याचे नाहीसे झाले. गुरूवाचून तो अगदी कासावीस झाला. (८७)

ऐसी बळकट जाली बुध्दि । नेणे आपपर शुध्दी ।
हें जाणोनि त्रिशुध्दी । स्वरूप खळबळिलें ॥८८॥
अशी दृढबुद्धी बळावली. त्याला आपले-परक्याचे हे ओळखण्याची शुद्धही राहिली नाही. हे लक्षात आल्यावर साक्षात परब्रह्माच्या ठिकाणी खरोखरच खळबळ निर्माण झाली. (८८)

मी निर्विकार नाठवतां । विकारची होय तत्त्वतां ।
अमूर्तचि परि तयाकरितां । देहचि धरी ॥८९॥
आपण निर्विकारी आहोत हे विसरून ते विकार पावले, आणि स्वतः अमूर्त असूनही या मुमुक्षूकरिता त्याने देह धारण केला. (८९)

मग तया आवड तयासी । धुंडीत चालले देशोदेशीं ।
अकस्मात्‌ असोसी । पुरली दोघांची ॥९०॥
मग त्याला त्या मुमुक्षूची आवड निर्माण झाली आणि ते देशोदेशी त्याला शोधीत निघाले आणि मग एकदा अकस्मात् दोघांचीही इच्छा एकदमच पूर्ण झाली. (९०)

धन्य धन्य ते धरणी । जेथें गुरुशिष्यांची मिळणी ।
एकमेकां नयनीं । अवलोकिलें ॥९१॥
ज्या ठिकाणी या गुरुशिष्यांची भेट झाली, त्यांनी एकमेकांचे अवलोकन केले, ती भूमी धन्य होय. (९१)

परस्परें बाणली खूण । येरें घातलें लोटांगण ।
गुरुमाउली ये धाऊन । पोटेसी धरियेला ॥९२॥
त्या दोघांना एकमेकांची ओळख पटली. तेव्हा शिष्याने गुरूपढे लोटांगण घातले. तेव्हा गुरुमाउली धावून आली आणि त्या शिष्याला त्यांनी पोटाशी कवटाळून धरले. (९२)

एकमेकां पडली मिठी । सुखरूप कोंदली सृष्टी ।
तया सुखाची चावटी । केवि करूं ॥९३॥
एकमेकांनी एकमेकाला आलिंगन दिले. सबंध सृष्टी सुखरूप होऊन त्या भावनेने दाटून गेली. त्या सुखाचे वर्णन केवळ शब्दांनी मला कसे करता येईल ? (९३)

हे मुमुक्षूचें लक्षण । संक्षेपे केलें कथन ।
जालें चत्वारी साधन । अधिकारीयाचें ॥९४॥
अशा प्रकारे हे मुमुक्षूचे संक्षेपाने लक्षण सांगितले. आणि अधिकारी व्यक्तीची चारप्रकारची लक्षणेही सांगितली. (९४)

इति श्रीमद् आगमसारे । उपनिषत् तात्पर्यानुसारे ।
शमादिषट्‌क मुमुक्षुत्वप्रकारे । पंचमसमास: ॥
इति पंचिका संपूर्णा ॥१॥ ओवी संख्या ३०७
हरिः ॐ तत्सत्

GO TOP