॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ दशमोऽध्यायः - अध्याय दहावा ॥

श्रीराम उवाच -
भगवन्नत्र जीवोऽसौ जन्तोर्देहेऽवतिष्ठते ।
जायते वा कुतो जीवः स्वरूपं चास्य किं वद ॥ १ ॥
राम म्हणाला, भगवन् , हा जीव प्राण्याच्या देहांत येतो कोठून ? किंवा या देहांत उत्पन्न होतो ? ह्याला जीव कां म्हणतात ? ह्याचे स्वरूप काय ? हें सांगा. १.

देहान्ते कुत्र वा याति गत्वा वा कुत्र तिष्ठति ।
कथमायाति वा देहं पुनर्नायाति वा वद ॥ २ ॥
तसेच देह मरण पावल्यानंतर हा कोठे जातो ? जाऊन कोठे राहतो ? पुनः देहांत कसा येतो किंवा येत नाही हे सर्व सांगा. २.

श्रीभगवानुवाच -
साधु पृष्टं महाभाग गुह्याद्गुह्यतरं हि यत् ।
देवैरपि सुदुर्ज्ञेयमिन्द्राद्यैर्वा महर्षिभिः ॥ ३ ॥
शंकर म्हणाले, हे महाभागा ! फार चांगले विचारलेंस, हें गुह्याहून गुह्य आहे. इंद्रादिदेव आणि मोठेमोठे ऋषि ह्यांनाही जाणावयास कठिण आहे. ३.

अन्यस्मै नैव वक्तव्यं मयापि रघुनन्दन ।
त्वद्‌भक्त्याहं परं प्रीतो वक्ष्याम्यवहितः श्रुणु ॥ ४ ॥
हे रघुनंदना, मीही दुसर्‍या कोणाला सांगत नाहीं. तुझ्या भक्तीने तुला प्रसन्न होऊन सांगतो; एकाग्र चित्ताने ऐक. ४.

सत्यज्ञानात्मकोऽनन्तः परमानन्दविग्रहः ।
परमात्मा परंज्योतिरव्यक्तो व्यक्तकारणम् ॥ ५ ॥
नित्यो विशुद्धः सर्वात्मा निर्लेपोऽहं निरञ्जनः ।
सर्वधर्मविहीनश्च न ग्राह्यो मनसापि च ॥ ६ ॥
मी परमात्मा सत्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, अंतरहित, परमानंदरूप, स्वप्रकाश, अव्यक्त असून व्यक्त विश्वाचें कारण, नित्य, शुद्ध, सर्वांतर्यामी, निःसंग, क्रियारहित, सर्व गुणांनी रहित, मनानें देखील जाणण्याला अशक्य असा आहे. ५-६.

नाहं सर्वेन्द्रियग्राह्यः सर्वेषां ग्राहको ह्यहम् ।
ज्ञाताहं सर्वलोकस्य मम ज्ञाता न विद्यते ॥ ७ ॥
माझे कोणत्याच इंद्रियाने ग्रहण करतां येत नाही, मी मात्र सर्व इंद्रियांचा ग्राहक आहे. मी सर्व लोकांचा ज्ञाता आहे व मला जाणणारा कोणी नाहीं. ७.

दूरः सर्वविकाराणां परिणामादिकस्य च ॥ ८ ॥
मी सर्व विकारांहून दूर आहे. परमाण्वादि विकारही माझ्या ठिकाणी नाहीत. ८.

यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ।
आनन्दं ब्रह्म मां ज्ञात्वा न बिभेति कुतश्चन ॥ ९ ॥
ज्यापासून वाणी कुंठित होऊन मागे फिरते, जो मनालाही प्राप्त होत नाही, असा आनंदमय ब्रह्मरूप जो मी त्या मला जाणल्याने जीव निर्भय होतो. ९.

यस्तु सर्वाणि भूतानि मय्येवेति प्रपश्यति ।
मां च सर्वेषु भूतेषु ततो न विजुगुप्सते ॥ १० ॥
जो सर्व भूतें माझ्या ठिकाणीं व मला सर्व भूतांचे ठिकाणीं पहातो तो सर्वकाही ब्रह्मरूप पहात असत्यामुळे कशाची निंदा करीत नाहीं. १०.

यस्य सर्वाणि भूतानि ह्यात्मैवाभूद्विजानतः ।
को मोहस्तत्र कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥ ११ ॥
ज्याला सर्व भूतें आत्मरूप दिसूं लागली अशा त्या सर्वत्र एकरूप पाहणाराला मोह कशाचा व शोक कशाचा ? ११.

एष सर्वेषु भूतेषु गूढात्मा न प्रकाशते ।
दृश्यते त्वग्र्यया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः ॥ १२ ॥
तर हा आत्मा सर्व भूतांचे ठायीं गूढरूपाने राहतो म्हणून जीवांस दिसत नाहीं. जसा सर्व जगताला प्रकाशित करणारा सूर्य घुबडाला दिसत नाही. परंतु श्रवणमननादि साधनांनीं सुसंस्कृत झालेल्या सूक्ष्म बुद्धीचे योगाने सूक्ष्मदर्शी पुरुषास हा दिसतो. १२.

अनाद्यविद्यया युक्तस्तथाप्येकोऽहमव्ययः ।
अव्याकृतब्रह्मरूपो जगत्कर्ताहमीश्वरः ॥ १३ ॥
मी अव्यय व निर्विकारब्रह्मरूप आहे, तरी अनादि मायेने युक्त होत्साता जगाचा कर्ता व शास्ता [ ईश्वरः] आहे. १३.

ज्ञानमात्रे यथा दृश्यमिदं स्वप्ने जगत्त्रयम् ।
तद्वन्मयि जगत्सर्वं दृश्यतेऽस्ति विलीयते ॥ १४ ॥
ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये हे त्रैलोक्य अज्ञानाचे योगाने ज्ञानमात्रस्वरूप आत्म्याचे ठिकाणीं कल्पिलें जाते त्याप्रमाणे विद्येचे योगाने सर्व जग माझे ठिकाणीं उत्पन्न होतें, स्थिति पावते व नाश पावते. १४.

नानाविद्यासमायुक्तो जीवत्वेन वसाम्यहम् ।
पञ्च कर्मेन्द्रियाण्येव पञ्च ज्ञानेन्द्रियाणि च ॥ १५ ॥
मनो बुद्धिरहंकारश्चित्तं चेति चतुष्टयम् ।
वायवः पञ्चमिलिता यान्ति लिङ्गशरीरताम् ॥ १६
अनेक प्रकारच्या अविद्येचा आश्रय करून मी जीवरूपाने प्रतिदेहांत वास करतों. पांच कर्मेंद्रियें, पांच ज्ञानेंद्रियें, मन, बुद्धि, अहंकार आणि चित्त हें चतुष्टय आणि पंचप्राण मिळून लिंग शरीर होते. १५-१६,

तत्राविद्यासमायुक्तं चैतन्यं प्रतिबिम्बितम् ।
व्यावहारिकजीवस्तु क्षेत्रज्ञः पुरुषोऽपि च ॥ १७ ॥
त्या लिंगशरीरांत अविद्येच्या योगानें चित्स्वरूप ईश्वराचें पडलेलें जें प्रतिबिंब त्याला व्यावहारिक जीव अथवा क्षेत्रज्ञ पुरुष असे म्हणतात. १७.

स एव जगतां भोक्तानाद्ययोः पुण्यपापयोः ।
इहामुत्र गती तस्य जाग्रत्स्वप्नादिभोक्तृता ॥ १८ ॥
तोच अनादि कालापासून चालत आलेल्या पुण्यकर्मांचा अथवा पापकर्मांचा भोक्ता असतो, त्यालाच इहलोकाची अथवा परलोकाची गति होते. जागृति, (स्वप्न, सुषुप्ति ) इत्यादि अवस्थांचाही तोच भोक्ता आहे. १८.

यथा दर्पणकालिम्ना मलिनं दृश्यते मुखम् ।
तद्वदन्तःकरणगैर्दोषैरात्मापि दृश्यते ॥ १९ ॥
जसे आरसा मलिन असला म्हणजे त्यांत मुख मलिन दिसते तसा अंतःकरणांतील कामक्रोधादि दोषांनी जीवात्मा मलिन दिसतो. १९.

परस्पराध्यासवशात्स्यादन्तःकरणात्मनोः ॥
एकीभावाभिमानेन परात्मा दुःखभागिव ॥ २० ॥
अंतःकरण आणि जीवात्मा या दोघांचे परस्परांशी अगदीं तादात्म्य झालेले असल्यामुळे जीवाला अंतःकरणरूपच मी आहे असे वाटते. म्हणून तोच दुःखभोक्ता आहे असे भासते. २०.

मरुभूमौ जलत्वेन मध्याह्नार्कमरीचिकाः ।
दृश्यन्ते मूढचित्तस्य न ह्यार्द्रास्तापकारकाः ॥ २१ ॥
तद्वदात्मापि निर्लेपो दृश्यते मूढचेतसाम् ।
स्वाविद्यात्मात्मदोषेण कर्तृत्वाधिकधर्मवान् ॥ २२ ॥
जसे मारवाड देशांत दोन प्रहरच्या वेळी सूर्याचे किरण, अज्ञान्याला जलरूप दिसतात, परंतु ते आर्द्र नसून केवल संतापकारक मात्र होतात, तद्वत् आत्मा हा संगरहित असून आत्म्याचे ठिकाणीं आरोप केलेल्या अविद्येच्या दोषामुळें मूढचित्त मनुष्यांस तो कर्तृत्वादिधर्मयुक्त असा दिसतो. ( असो ). २१-२२.

तत्र चान्नमये पिण्डे हृदि जीवोऽवतिष्ठते ।
आनखाग्रं व्याप्य देहं तद्ब्रुवेऽवहितः श्रुणु ।
सोऽयं तदभिधानेन मांसपिण्डो विराजते ॥ २३ ॥
पूर्वोक्त अन्नमय पिंडांत [ स्थूलदेहांत ] त्या देहाला नखशिखान्त व्यापून हृदयांत जीव राहतो कसा ते सांगतों; स्वस्थपणाने ऐक. तो हा मांसपिंडाशी तादात्म्य पावलेला जीव त्या देहाच्या अभिमानाने राहतो. २३.

नाभेरूर्ध्वमधः कण्ठाद्व्याप्य तिष्ठति यः सदा ।
तस्य मध्येऽस्ति हृदयं सनालं पद्मकोशवत् ॥ २४ ॥
अधोमुखं च तत्रास्ति सूक्ष्मं सुषिरमुत्तमम् ।
दहराकाशमित्युक्तं तत्र जीवोऽवतिष्ठते ॥ २५ ॥
नाभीच्या वर आणि कंठाच्या खाली असलेले स्थल व्यापून ( जो वायूचा संचार आहे) त्याच्या मध्यभागीं कमलाप्रमाणे जालयुक्त अधोमुख हृदय आहे. त्याला सूक्ष्म व सुंदर असे एक छिद्र आहे, त्याला दहराकाश म्हणतात. त्यांत जीव राहतो. २४-२५.

वालाग्रशतभागस्य शतधा कल्पितस्य च ।
भागो जीवः स विज्ञेयः स चानन्त्याय कल्पते ॥ २६ ॥
तो जीव केशाग्राच्या शंभराव्या भागाच्या शंभराव्या भागाच्याही कांहीं अंशाएवढा सूक्ष्म आहे; वस्तुतः त्याची इयत्ता करितां येत नाहीं.२६.

कदम्बकुसुमोद्बद्धकेसरा इव सर्वतः ।
प्रसृता हृदयान्नाड्यो याभिर्व्याप्तं शरीरकम् ॥ २७ ॥
जसे कदंबाच्या पुष्पाला ( मध्यभागीं ) सर्वतः केसर असतात तशा, हृदयापासून सर्व बाजूंनी हजारों नाडी वाहत आहेत, ज्यांनी हे सर्व शरीर व्यापले आहे. २७.

हितं बलं प्रयच्छन्ति तस्मात्तेन हिताः स्मृताः ।
द्वासप्ततिसहस्रैस्ताः संख्याता योगवित्तमैः ॥ २८ ॥
त्या हित म्हणजे बल देतात म्हणून, त्यांना "हित" अशी संज्ञा आहे. या बहात्तर हजार आहेत, अशी योग्यांनी संख्या केलेली आहे. २८,

हृदयात्तास्तु निष्क्रान्ता यथार्काद्रश्मयस्तथा ।
एकोत्तरशतं तासु मुख्या विष्वग्विनिर्गतः ॥ २९ ॥
जसे सूर्यापासून किरण प्रसार पावतात तशा या हृदयापासून निघून सर्व शरीर व्यापतात. यांपैकी एकशें एक मुख्य आहेत. २९.

प्रतीन्द्रियं दश दश निर्गता विषयोन्मुखाः ।
नाड्यः शर्मादिहेतुत्वात् स्वप्नादिफलभुक्तये ॥ ३० ॥
प्रत्येक इंद्रियांतील विषयांकडे दहा दहा नाडी आहेत, त्या सुखदुःखाला कारण असल्यामुळें जाग्रदादि अवस्थेंतील प्रतीयमान सुखदुःखाच्या साक्षात्काराला कारण आहेत. ३०

वहन्त्यम्भो यथा नद्यो नाड्यः कर्मफलं तथा ।
अनन्तैकोर्ध्वगा नाडी मूर्धपर्यन्तमञ्जसा ॥ ३१ ॥
जशा नद्या उदक वहातात तशा नाडी ( सुखदुःखरूप ) कर्मफल वहातात. त्यांपैकी एक नाडी अनंता नांवाची मस्तकापर्यंत सारखी वर वाहते. ३१.

सुषुम्नेति मादिष्टा तया गच्छन्विमुच्यते ।
तयोपचितचैतन्यं जीवात्मानं विदुर्बुधाः ॥ ३२ ॥
तिलाच सुषुम्ना म्हणतात. त्या नाडीने जीव गेला असतां मुक्त होतो. कामादि दोष नष्ट झाल्यावर तिच्यामधून जातांना दिसणार्‍या चैतन्याला जीवात्मा म्हणतात. ३२.

यथा राहुरदृश्योऽपि दृश्यते चन्द्रमण्डले ।
तद्वत्सर्वगतोऽप्यात्मा लिङ्गदेहे हि दृश्यते ॥ ३३ ॥
जसा राहु हा अदृश्य आहे तथापि तो चंद्रमंडलावर दिसतो, तसा आत्मा हा सर्वव्यापी आहे तथापि लिंगदेहांत स्पष्ट दिसतो. ३३.

दृश्यमाने यथा कुंभे घटाकाशोऽपि दृश्यते ।
तद्वत्सर्वगतोऽप्यात्मा लिङ्गदेहे हि दृश्यते ॥ ३४ ॥
जसा घट दिसूं लागला म्हणजे घटाकाशही दिसूं लागते, तद्वत् आत्मा सर्वगत आहे, तथापि लिंगशरीराच्या उपाधीनें तो स्पष्ट दिसतो. ३४.

निश्चलः परिपूर्णोऽपि गच्छतीत्युपचर्यते ।
जाग्रत्काले यथाज्ञेयमभिव्यक्तविशेषधीः ॥ ३५ ॥
निष्क्रिय [=निश्चलः ] आणि परिपूर्ण असा असूनही हा जीवात्मा गमन इत्यादि उपचार पावतो. ज्याप्रमाणे मनुष्य सर्व पदार्थांची माहिती असून जाग्रत्कालीं एखाद्याचे पदार्थावर [ ज्ञेयं ] विशेष लक्ष ठेवतो तद्वत्. ३५.

व्याप्नोति निष्क्रियः सर्वान् भानुर्दश दिशो यथा ।
नाडीभिर्वृत्तयो यान्ति लिङ्गदेहसमुद्‌भवाः ॥ ३६ ॥
ज्याप्रमाणे सूर्य निष्क्रिय असून दाही दिशांना व्यापतो त्याप्रमाणे लिंगदेहापासून उत्पन्न होणार्‍या वृत्ति नाडींच्या द्वाराने बाहेर जातात. ३६.

तत्तत्कर्मानुसारेण जाग्रद्‌भोगोपलब्धये ।
इदं लिङ्गशरीराख्यमामोक्षं न विनश्यति ॥ ३७ ॥
त्या त्या कर्मानुसार जाग्रदवस्थेमध्ये भोग देण्याकरितां असलेलें हें लिंगशरीर मोक्ष प्राप्त होईपर्यंत नाश पावत नाहीं. ३७.

आत्मज्ञानेन नष्टेऽस्मिन्साविद्ये स्वशरीरके ।
आत्मस्वरूपावस्थानं मुक्तिरित्यभिधीयते ॥ ३८ ॥
जीवात्मा व परमात्मा एक आहेत या आत्मज्ञानाने अविद्या व शरीर यांच्यासह या लिंगदेहाचा नाश झाला म्हणजे आत्मस्वरूपाचे ठिकाणीं रहाणे याला मुक्ति असे म्हणतात. ३८.

उत्पादिते घटे यद्वद्घटाकाशत्वमृच्छति ।
घटे नष्टे यथाकाशः स्वरूपेणावतिष्ठते ॥ ३९ ॥
घट उत्पन्न झाला असता जसे आकाशाला घटाकाशत्व प्राप्त होते आणि घट नष्ट झाली म्हणजे आकाश जसे आपल्या मूळ स्वरूपाने रहातें, तसा देह नष्ट झाला म्हणजे आत्मा मूळच्या स्वरूपाने रहातो. ३९.

जाग्रत्कर्मक्षयवशात्स्वप्नभोग उपस्थिते ।
बोधावस्थां तिरोधाय देहाद्याश्रयलक्षणाम् ॥ ४० ॥
कर्मोद्‌भावितसंस्कारस्तत्र स्वप्नरिरंसया ।
अवस्थां च प्रयात्यन्यां मायावी चात्ममायया ॥ ४१ ॥
जाग्रदवस्थेतील भोग देणार्‍या कर्मांचा क्षय होऊन स्वप्नावस्थेंतील भोग प्राप्त झाला असतां, देहादि आश्रयाने युक्त असणारी ज्ञानावस्था नष्ट करून पूर्वींच्या (जाग्रवस्थेतील) कर्मांचा संस्कार उत्पन्न झालेला व स्वप्नामध्यें रमण्याची इच्छा करणारा, मायायुक्त जीव आपल्या मायेच्या अथवा अविद्येच्या योगाने दुसर्‍या (म्हणजे स्वप्नाच्या) अवस्थेला प्राप्त होतो. ४०-४१.

घटादिविषयान्सर्वान्बुद्ध्यादिकरणानि च ।
भूतानि कर्मवशतो वासनामात्रसंस्थितान् ॥ ४२ ॥
एतान् पश्यन् स्वयंज्योतिः साक्ष्यात्मा व्यवतिष्ठते ॥ ४३ ॥
घटादि सर्व विषय, बुद्धि इत्यादि इंद्रियें, कर्माचे योगानें वासनांमध्यें मात्र उरलेली भूतें या सर्वांना पहात आत्मा (या अवस्थेमध्ये) स्वप्रकाश व साक्षीरूपाने रहातो. ४२-४३.

अत्रान्तःकरणादीनां वासनाद्वासनात्मता ।
वासनामात्रसाक्षित्वं तेन तच्च परात्मनः ॥ ४४ ॥
या अवस्थेमध्यें अंतःकरण इत्यादिकांचे वासनेच्या संस्कारामुळें केवळ वासनारूपत्व असते, व परमात्म्यालाही येथें वासनामात्राचेंच साक्षित्व आहे. ४४.

वासनाभिः प्रपञ्चोऽत्र दृश्यते कर्मचोदितः ।
जाग्रद्‌भूमौ यथा तद्वत्कर्तृकर्मक्रियात्मकः ॥ ४५ ॥
जसा जाग्रदवस्थेमध्ये कर्ता, कर्म व क्रिया यांनी युक्त असा प्रपंच दिसतो तसाच या अवस्थेमध्येंही पूर्वीच्या कर्मांचे योगानें वासनारूप प्रपंच दिसतो. ४५.

निःशेषबुद्धिसाक्ष्यात्मा स्वयमेव प्रकाशते ।
वासनामात्रसाक्षित्वं साक्षिणः स्वाप उच्यते ॥ ४६ ॥
ज्ञानाचे विषय होणार्‍या सर्व पदार्थांचा साक्षी आत्मा स्वतःच प्रकाशमान असतो. त्या साक्षी आत्म्याला केवळ वासनेचें जे साक्षित्व त्याला स्वाप म्हणतात. ४६.

भूतजन्मनि यद्‌भूतं कर्म तद्वासनावशात् ।
नेदीयस्त्वाद्वयस्याद्ये स्वप्नं प्रायः प्रपश्यति ॥ ४७ ॥
अनुभवीत असलेल्या जन्मकालामध्ये (म्हणजे जाग्रदवस्थेंत ) होणारें जें स्तनपानादि कर्म तेंच सन्निध असल्यामुळें व वासनेच्या योगानें प्राणी बालवयामध्यें प्रायः स्वप्नामध्यें पहातो. ४७,

मध्ये वयसि कार्कश्यात्करणानामिहार्जितः ।
वीक्षते प्रायशः स्वप्नं वासनाकर्मणोर्वशात् ॥ ४८ ॥
तरुण वयामध्यें इंद्रियांच्या कुशलतेमुळें अनेक कर्मांमध्ये व्यग्र होत्साता वासना व कर्म यांचे योगानें प्रायः तद्‌रूपच स्वप्न पहातो. ४८.

इयासुः परलोकं तु कर्मविद्यादिसंभृतम् ।
भाविनो जन्मनो रूपं स्वप्न आत्मा प्रपश्यति ॥ ४९ ॥
परलोकी जाण्याची इच्छा करूं लागला म्हणजे वृद्धावस्थेमध्ये कर्म विद्या इत्यादि साधनांनी जणूं काय पुढील जन्माचें स्वरूप आपणास प्राप्त झालेलेंच आहे असे स्वप्नामध्ये मनुष्य पहातो. ४९.

यद्वत्प्रपतनाच्छ्येनः श्रान्तो गगनमण्डले ।
आकुञ्च्य पक्षौ यतते नीडे निलयनायनीः ॥ ५० ॥
एवं जाग्रत्स्वप्नभूमौ श्रान्त आत्माभिसंचरन् ।
आपीतकरणग्रामः कारणेनैति चैकताम् ॥ ५१ ॥
ज्याप्रमाणे श्येन पक्षी गगनमंडलामध्यें फिरण्याने श्रांत झाला म्हणजे पक्षांचे आकुंचन करून घरट्याच्या आश्रयास येण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे जागृति व स्वप्न या अवस्थांमध्ये संचार करणारा आत्मा इंद्रियांचा पूर्णपणें उपभोग घेऊन श्रांत झाला असतां कारणात्म्याशी [ = परमात्म्याशी] एकरूप पावतो. ५०-५१.

नाडीमार्गैरिन्द्रियाणामाकृष्यादाय वासनाः ।
सर्वं ग्रसित्वा कार्यं च विज्ञानात्मा विलीयते ॥ ५२ ॥
त्या वेळीं नाडीमार्गानें इंद्रियांच्या वासना आकर्षण करून घेऊन अविद्येचे जाग्रत्स्वप्नरूप सर्व कार्य ग्रासून जीवात्मा लीन होतो. ५२.

ईश्वाराख्येऽव्याकृतेऽथ यथा सुखमयो भवेत् ।
कृत्स्नप्रपञ्चविलयस्तथा भवति चात्मनः ॥ ५३ ॥
नंतर जीवात्म्याचा विकाररहित ईश्वराच्या ठिकाणीं सर्व प्रपंचाचा अशा प्रकारे लय होतो कीं, तेणेकरून तो जीवात्मा सुखानें परिपूर्ण होतो. ५३.

योषितः काम्यमानायाः संभोगान्ते यथा सुखम् ।
स आनन्दमयोऽबाह्यो नान्तरः केवलस्तथा ॥ ५४ ॥
सकाम स्त्रीच्या संभोगापासून जसें सुख होते तसा सर्वस्वी जीवात्मा या प्रसंगी बाह्य वस्तूंचा [ = वैषयिक ] आनंद नसलेला व आन्तर वस्तूंचा [ = विषयनिवृत्तिरूपी ] आनंद नसलेला असा असतो. ५४.

प्राज्ञात्मानं समासाद्य विज्ञानात्मा तथैव सः ।
विज्ञानात्मा कारणात्मा तथा तिष्ठंस्तथापि सः ॥ ५५ ॥
सुषुप्तीमध्ये ईश्वराप्रत प्राप्त होऊन देखील जीवात्मा भिन्न असतो तसाच भिन्न असून देखील दुःखराहित्यामुळे त्याला कारणात्मा समजले जाते.५५.

अविद्यासूक्ष्मवृत्त्यानुभवत्येव सुखं यथा ।
तथाहं सुखमस्वाप्सं नैव किञ्चिदवेदिषम्।५६ ॥
अज्ञानमपि साक्ष्यादि वृत्तिभिश्चानुभूयते ।
इत्येवं प्रत्यभिज्ञापि पश्चात्तस्योपजायते ॥ ५७ ॥
त्या ठिकाणी अविद्येची सूक्ष्मत्वानें वृत्ति असल्यामुळे जसे सुख अनुभवितो तसेंच "मी सुखाने निजलों होते" "मी कांहीं जाणत नव्हतों ?" असे अज्ञान देखील साक्षी जो आत्मा त्याची वृत्ति असल्यामुळे अनुभवितो. त्याचप्रमाणे प्रत्यभिज्ञा [=निद्राकालीन अनुभवाची स्मृति ] देखील नंतर त्याला होते. ५६-५७.

जाग्रत्स्वप्नसुषुप्त्याख्यमेवेहामुत्र लोकयोः ।
पश्चात्कर्मवशादेव विस्फुलिङ्गा यथानलात् ।
जायन्ते कारणादेव मनोबुद्ध्यादिकानि तु ॥ ५८ ॥
जागृति, स्वप्न सुषुप्ति जशा या लोकीं मनुष्यांना तशा परलोकीं देवांनाही आहेत. सुषुप्तीनंतर पुनः जाग्रदवस्था प्राप्त होण्याला कारण जें पूर्व कर्म त्याचे योगानें अग्नीपासून जशा ठिणग्या तशीं मन, बुद्धि इत्यादि पुनः कारणाम्यापासून परत उत्पन्न होतात. ५८.

पयःपूर्णो घटो यद्वन्निमग्नः सलिलाशये ।
तैरेविद्धत आयाति विज्ञानात्मा तथैत्यजात् ॥ ५९ ॥
ज्याप्रमाणे सलिलाशयामध्ये बुडालेला पण उदकाने भरलेला घट वर काढला असतां उदकासहवर्तमान येतो त्याप्रमाणे जीवात्मा कारणात्म्यापासून [अजात् ] जाग्रदवस्थेमध्ये परत येतो. ५९.

विज्ञानात्मा कारणात्मा तथा तिष्ठंस्तथापि सः ।
दृश्यते सत्सु तेष्वेव नष्टेष्वायात्यदृश्यताम् ॥ ६० ॥
अशा प्रकारचा असला तरी जीवात्मा [विज्ञानात्मा] हाच [अपि=एव] परमात्मा [कारणात्मा] आहे. अविद्या व तिचे कार्य हीं असलीं म्हणजेच हा सर्व प्रपंच दिसतो; ही नष्ट झाली म्हणजे दिसत नाहीं. ६०.

एकाकारोऽर्यमा तत्तत्कार्येष्विव परः पुमान् ।
कूटस्थो दृश्यते तद्वद्गच्छत्यागच्छतीव सः ॥ ६१ ॥
एकच आकार असलेला सूर्य त्या त्या पदार्थांमध्यें प्रतिबिंबित झाला म्हणजे अनेक रूपांनीं दिसतो. त्याप्रमाणे हा निर्विकार परम पुरुष एकच असून जीवरूपाने वेगळा व गमनागमनादि धर्मांनी युक्त असा दिसतो. ६१.

मोहमात्रान्तरायत्वात्सर्वं तस्योपपद्यते ।
देहाद्यतीत आत्मापि स्वयंज्योतिः स्वभावतः ॥ ६२ ॥
केवळ मायारूपी विघ्नानें हे सर्व ( स्वरूपप्रतिबंधक विरुद्ध धर्मत्व) त्याचे ठिकाणीं संभवते. जीवात्मा देखील देहापासून वेगळा झाला म्हणजे स्वभावतः स्वप्रकाशरूपच आहे. ६२.

एवं जीवस्वरूपं ते प्रोक्तं दशरथात्मज ॥ ६३ ॥
हे दशरथात्मजा, याप्रमाणे जीवाचे स्वरूप तुला सांगितलें. ६३.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
जीवस्वरूपकथनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
॥ इति दशमोऽध्यायः ॥ १० ॥





GO TOP