॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ नवमोऽध्यायः - अध्याय नववा ॥

श्रीभगवानुवाच -
देहस्वरूपं वक्ष्यामि श्रुणुष्वावहितो नृप ।
मत्तो हि जायते विश्वं मयैवैतत्प्रधार्यते ।
मय्येवेदमधिष्ठाने लीयते शुक्तिरौप्यवत् ॥ १ ॥
शंकर म्हणाले, हे रामा ! मी आतां देहाचे स्वरूप सांगतो ते स्वस्थचित्तानें श्रवण कर. हे विश्व माझ्यापासून उत्पन्न होते, मीच याला धारण करतो, व भ्रमनिवृत्ति होतांच शुक्तिकेच्या ठायीं रौप्य लय पावतें तसे अज्ञाननिवृत्ति होतांच याचे अधिष्ठान जो मी त्या माझे ठिकाणीं लय पावते. १.

अहं तु निर्मलः पूर्णः सच्चिदानन्दविग्रहः ।
असंगो निरहंकारः शुद्धं ब्रह्म सनातनम् ॥ २ ॥
अनाद्यविद्यायुक्तः सन् जगत्कारणतां व्रजे ॥ ३ ॥
मी तर मायेच्या मलाने रहित, परिपूर्ण सच्चिदानंदस्वरूप, संगरहित, निरहंकार, शुद्ध, सनातन ब्रह्मरूप, असा असून अनादि मायेच्या योगाने जगताला कारण होतों. २-३.

अनिर्वाच्या महाविद्या त्रिगुणा परिणामिनी ।
रजः सत्त्वं तमश्चेति त्रिगुणाः परिकीर्तिताः ॥ ४ ॥
ती महामाया अवर्णनीय, तीन गुणांनी युक्त, जगद्‌रूपी कार्य करणारी आहे. सत्त्व, रज, तम हे तीन गुण तिचेच आहेत. ४.

सत्त्वं शुक्लं समादिष्टं सुखज्ञानास्पदं नृणाम् ।
दुःखास्पदं रक्तवर्णं चञ्चलं च रजो मतम् ॥ ५ ॥
सत्त्वगुण शुक्लवर्ण असून प्राण्यांला सुख आणि ज्ञान हीं प्राप्त होण्याला कारण आहे. रजोगुण रक्तवर्ण, चंचल व दुःख देणारा आहे. ५

तमः कृष्णं जडं प्रोक्तमुदासीनं सुखादिषु ॥ ६ ॥
तमोगुण कृष्णवर्ण, जड आणि सुखदुःखाविषयीं उदासीन असा आहे. ६.

अतो मम समायोगाच्छक्तिः सा त्रिगुणात्मिका ।
अधिष्ठाने तु मय्येव भजते विश्वरूपताम् ।
शुक्तौ रजतवद्रज्जौ भुजङ्गो यद्वदेव तु ॥ ७ ॥
म्हणून माझ्या संयोगाने ती त्रिगुणात्मक माझी शक्ति माया, जसें शुक्तिकेवर रौप्य किंवा रज्जूवर सर्प, तद्वत् माझ्याच स्वरूपावर विश्वरूपता पावते. ७.

आकाशादीनि जायन्ते मत्तो भूतानि मायया ।
तैरारब्धमिदं विश्वं देहोऽयं पाञ्चभौतिकः ॥ ८ ॥
मग मायेच्या संयोगाने माझ्यापासून आकाश इत्यादि महाभूतें उत्पन्न झाली, त्यांनी हें विश्व उत्पन्न केले व हा पांचभौतिक देहही त्यांपासूनच उत्पन्न झाला. ८.

पितृभ्यामशितादन्नात्षट्कोशं जायते वपुः ।
स्नायवोऽस्थीनि मज्जा च जायन्ते पितृतस्तथा ॥ ९ ॥
मातापितरांनीं भक्षिलेल्या अन्नापासून षट्कोशात्मक हें शरीर उत्पन्न होते. त्यांत स्नायु, अस्थि आणि मजा हे तीन कोश पितृवीर्यापासून उत्पन्न होतात. ९.

त्वङ्मांशोणितमिति मातृतश्च भवन्ति हि ।
भावाः स्युः षड्विधास्तस्य मातृजाः पितृजास्तथा ।
रसजा आत्मजाः सत्त्वसंभूताः स्वात्मजास्तथा ॥ १० ॥
त्वचा, मांस आणि रक्त हे तीन कोश मातृवीर्यापासून होतात. ह्या षट्कोशात्मक देहांत मातृज, पितृज, रसज, आत्मज, सत्त्वज, [सत्त्व=अंतःकरण ] आणि स्वात्मजः= देहज] असे सहा प्रकारचे भाव आहेत. १०.

मृदवः शोणितं मेदो मज्जा प्लीहा यकृद्गुदम् ।
हृन्नाभीत्येवमाद्यास्तु भावा मातृभवा मताः ॥ ११ ॥
रक्त, मेद, मज्जा, प्लीहा, यकृत्, गुद, हृदय, नाभि इत्यादि मृदु पदार्थ हे मातृज आहेत. ११.

श्मश्रुलोमकचस्नायुशिराधमनयो नखाः ।
दशनाः शुक्रमित्याद्याः स्थिराः पितृसमुद्भवाः ॥ १२ ॥
श्मश्रु, लोम, केश, स्नायु, शिरः, धमनी, नखे, दंत, शुक्र इत्यादि स्थिर पदार्थ हे पितृज आहेत. १२.

शरीरोपचितिर्वर्णो वृद्धिस्तृप्तिर्बलं स्थितिः ।
अलोलुपत्वमुत्साह इत्यादि रसजं विदुः ॥ १३ ॥
पुष्टता, वर्ण, वृद्धि, तृप्ति, बल, अवयवांची दृढता, अदीनत्व, उत्साह इत्यादि हे रसज आहेत. १३.

इच्छा द्वेषः सुखं दुःखं धर्माधर्मौ च भावना ।
प्रयत्नो ज्ञानमायुश्चेन्द्रियाणीत्येवमात्मजाः ॥ १४ ॥
इच्छा, द्वेष, सुख, दुःख, धर्म, अधर्म, भावना, प्रयत्न, ज्ञान, आयुष्य, इंद्रियें इत्यादि हे आत्मज आहेत. १४.

ज्ञानेन्द्रियाणि श्रवणं स्पर्शनं दर्शनं तथा ।
रसनं घ्राणमित्याहुः पञ्च तेषां तु गोचराः ॥ १५ ॥
शब्दः स्पर्शस्तथा रूपं रसो गन्ध इति क्रमात् ।
वाक्कराङ्घ्रिगुदोपस्थान्याहुः कर्मेन्द्रियाणि हि ॥ १६ ॥
वचनादानगमनविसर्गरतयः क्रमात् ।
कर्मेन्द्रियाणां जानीयान्मनश्चैवोभयात्मकम् ॥ १७ ॥
क्रियास्तेषां मनोबुद्धिरहंकारस्ततः परम् ।
अन्तःकरणमित्याहुश्चित्तं चेति चतुष्टयम् ॥ १८ ॥
श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि प्राण ही पांच ज्ञानेंद्रिय आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे अनुक्रमाने त्यांचे पांच विषय; वाचा, हस्त, पाद, गुद आणि उपस्थ हीं पांच कर्मेंद्रिये आणि बोलणें, घेणें, चालणें, मलविसर्जन करणें आणि रति हीं अनुक्रमाने त्यांची कर्मे. मन हें उभयरूप आहे. मन, बुद्धि, अहंकार आणि चित्त असे अंतःकरणाचे चार भेद आहेत. १५-१८.

सुखं दुःखं च विषयौ विज्ञेयौ मनसः क्रियाः ।
स्मृतिभीतिविकल्पाद्या बुद्धिः स्यान्निश्चयात्मिका ।
अहं ममेत्यहंकारश्चित्तं चेतयते यतः ॥ १९ ॥
त्यांत सुख आणि दुःख हे मनाचे विषय; स्मृति, भीति, विकल्प इत्यादि हीं मनाची कर्में. मन निश्चयात्मक झालें म्हणजे त्यालाच बुद्धि असे म्हणतात. अहं आणि मम असा जो अभिमान तो अहंकार. ज्या मनोवृत्तीनें पूर्वीच्या गोष्टींचे स्मरण होते ते चित्त. १९.

सत्त्वाख्यमन्तःकरणं गुणभेदास्त्रिधा मतम् ।
सत्त्वं रजस्तम इति गुणाः सत्त्वात्तु सात्त्विकाः ॥ २० ॥
आस्तिक्यशुद्धिधर्मैकमतिप्रभृतयो मताः ।
रजसो राजसा भावाः कामक्रोधमदादयः ॥ २१ ॥
सत्त्व म्हणजे अंतःकरण. त्याचे गुणांच्या योगाने तीन भेद होतात. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण. सत्त्वगुणापासून आस्तिक्यबुद्धि, स्वच्छता, स्वधर्माभिरुचि इत्यादि सात्त्विक धर्म प्राप्त होतात. रजोगुणापासून काम, क्रोध, मद इत्यादि राजस धर्म प्राप्त होतात. २०-२१.

निद्रालस्यप्रमादादि वञ्चनाद्यास्तु तामसाः ।
प्रसन्नेन्द्रियतारोग्यानालस्याद्यास्तु सत्त्वजाः ॥ २२ ॥
तमोगुणापासून निद्रा, आलस्य, बेसावधपणा, ठकविणें इत्यादि तामसगुण प्राप्त होतात. इंद्रियांची प्रसन्नता, आरोग्य, निरलसता इत्यादि हे सत्वगुणापासून उत्पन्न झालेले धर्म होत. २२.

देहो मात्रात्मकस्तस्मादादत्ते तद्गुणानिमान् ।
शब्दः श्रोत्रं मुखरता वैचित्र्यं सूक्ष्मता धृतिः ॥ २३ ॥
देह हा मातापित्यांच्या इंद्रियांच्या विषयांपासूनच उत्पन्न झालेला आहे म्हणून त्यांचेच गुण घेतो. ते सांगतों - शब्द, श्रोत्रेंद्रिय, वक्तृत्व, कुशलता, लघुत्व, धैर्य, २३.

बलं च गगनाद्वायोः स्पर्शश्च स्पर्शनेन्द्रियम् ।
उत्क्षेपणमपक्षेपाकुञ्चने गमनं तथा ॥ २४ ॥
प्रसारणमितीमानि पञ्च कर्माणि रूक्षता ।
प्राणापानौ तथा व्यानसमानोदानसंज्ञकान् ॥ २५ ॥
नागः कूर्मश्च कृकलो देवदत्तो धनञ्जयः ।
दशैता वायुविकृतीस्तथा गृह्णाति लाघवम् ॥ २६ ॥
आणि बल हे सात गुण आकाशापासून स्थूल देहाला प्राप्त होतात. स्पर्श गुण, त्वगिंद्रिय, उत्क्षेपण [ वर फेकणे ], अपक्षेप [ खालीं टाकणें ], आकुंचन, गमन आणि प्रसारण ही पांच कर्में, कर्कशत्व, प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे पांच प्राण,नाग,कूर्म कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पांच उपप्राण आणि लाघव हे धर्म वायूपासून प्राप्त होतात. २४-२६.

तेषां मुख्यतरः प्राणो नाभेः कण्ठादवस्थितः ।
चरत्यसौ नासिकयोर्नाभौ हृदयपङ्कजे ॥ २७ ॥
ह्या दहा प्राणांत प्राण मुख्य आहे; तो नाभि आणि कंठ ह्या स्थानीं रहातो. तो नासिका, नाभि, हृदयकमल ह्या स्थानी फिरतो. २७.

शब्दोच्चारणनिश्वासोच्छ्वासादेरपि कारणम् ॥ २८ ॥
अपानस्तु गुदे मेढ्रे कटिजङ्घोदरेष्वपि ।
शब्दोच्चारण, श्वास आणि उच्छ्‌वास यांना हाच कारण आहे. २८.

नाभिकण्ठे वंक्षणयोरूरुजानुषु तिष्ठति ।
तस्य मूत्रपुरीषादिविसर्गः कर्म कीर्तितम् ॥ २९ ॥
गुद, लिंग, कटि, जंघा, उदर, नाभि, कंठ, मांडीच्या संधि, मांडी आणि जानु ह्या स्थानी अपानवायु राहतो. मूत्र, पुरीष वगैरेंचा उत्सर्ग ही त्याची कर्में आहेत. २९.

व्यानोऽक्षिश्रोत्रगुल्फेषु जिह्वाघ्राणेषु तिष्ठति ।
प्राणायामधृतित्यागग्रहणाद्यस्य कर्म च ॥ ३० ॥
नेत्र, श्रोत्र, पायाचे घोटे, जिव्हा आणि घ्राण या स्थानी व्यानवायु राहतो. प्राणायामांत कुंभक, रेचक आणि पूरक ही त्याची कर्में आहेत. ३०.

समानो व्याप्य निखिलं शरीरं वह्निना सह ।
द्विसप्ततिसहस्रेषु नाडीरन्ध्रेषु संचरन् ॥ ३१ ॥
भुक्तपीतरसान्सम्यगानयन्देहपुष्टिकृत् ।
उदानः पादयोरास्ते हस्तयोरङ्गसंधिषु ॥ ३२ ॥
कर्मास्य देहोन्नयनोत्क्रमणादि प्रकीर्तितम् ।
त्वगादिधातूनाश्रित्य पञ्च नागादयः स्थिताः ॥ ३३ ॥
समानवायु हा सर्व शरीर व्यापून जठराग्नीबरोबर बाहत्तर हजार नाडींच्या रंध्रांत संचार करीत, खाल्लेल्या व प्यालेल्या सर्व रसांना त्या त्या अवयवाचे ठिकाणी पोंचवून देहपुष्टि करतो. उदानवायु हा पाय, हात आणि अवयवसंधि या स्थानीं राहतो. देहाला वर उठविणें, चालविणे इत्यादि ह्याची कर्में आहेत. त्वचा,मांस, रक्त, अस्थि आणि स्नायु ह्या पांच धातूंच्या आश्रयाने नागादि पांच उपप्राण राहतात. ३१-३३.

उद्गारादि निमेषादि क्षुत्पिपासादिकं क्रमात् ।
तन्द्रीप्रभृति शोकादि तेषां कर्म प्रकीर्तितम् ॥ ३४ ॥
त्यांत ढेकर, उचकी, वांति इत्यादि नागाचीं कर्में. निमेष, उन्मेष, कटाक्ष इत्यादि कूर्माची कर्में. क्षुधा, पिपासा, शिंक इत्यादि कृकलाचीं कर्में. आलस्य, निद्रा, जांभई इत्यादि देवदत्ताची कर्में आणि शोक, हास्य इत्यादि धनंजयाची कर्में आहेत. ३४.

अग्नेस्तु रोचकं रूपं दीप्तं पाकं प्रकाशताम् ।
अमर्षतीक्ष्णसूक्ष्माणामोजस्तेजश्च शूरताम् ॥ ३५ ॥
मेधावितां तथाऽऽदत्ते जलात्तु रसनं रसम् ।
शैत्यं स्नेहं द्रवं स्वेदं गात्रादिमृदुतामपि ॥ ३६ ॥
चक्षु [ रोचकं ], शुक्ल रूप, पचन ( अथवा अभिमान ), स्फूर्ति, क्रोध, तीक्ष्णत्व, कुशत्व, ओज, संताप, शूरत्व आणि धारणाशक्ति हे गुण तेजापासून [अग्नि=तेज] प्राप्त होतात. रसनेंद्रिय, रस, शैत्य, चिकटपणा, द्रवत्व, घाम, अवयवयांची कोमलता, हे धर्म जलापासून प्राप्त होतात. ३५-३६.

भूमेर्घ्राणेन्द्रियं गन्धं स्थैर्यं धैर्यं च गौरवम् ।
त्वगसृङ्मांसमेदोऽस्थिमज्जाशुक्राणि धातवः ॥ ३७ ॥
घ्राणेंद्रिय, गंध, स्थिरता, धैर्य, गुरुत्व, हे धर्म भूमीपासून प्राप्त होतात. त्वचा, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र ह्या सप्तधातूंनी शरीर धारण केले आहे. ३७.

अन्नं पुंसाशितं त्रेधा जायते जठराग्निना ।
मलः स्थविष्ठो भागः स्यान्मध्यमो मांसतां व्रजेत् ।
मनः कनिष्ठो भागः स्यात्तस्मादन्नमयं मनः ॥ ३८ ॥
पुरुषानें भक्षिलेल्या अन्नाचे जठराग्नीवर तीन विभाग होतात. त्यांत मल हा मोठा भाग, मांस हा मध्यम आणि मन हो अगदी लहान भाग, म्हणूनच मन हे अन्नमय आहे. ३८.

अपां स्थविष्ठो मूत्रं स्यान्मध्यमो रुधिरं भवेत् ।
प्राणः कनिष्ठो भागः स्यात्तस्मात्प्राणो जलात्मकः ॥ ३९ ॥
उदकाचा मुख्य भाग मूत्र, रक्त हा मध्यम आणि प्राण हा कनिष्ठ, म्हणून प्राण हा उदकमय आहे. ३९.

तेजसोऽस्थि स्थविष्ठः स्यान्मज्जा मध्यम संभवः ।
कनिष्ठा वाङ्मता तस्मात्तेजोऽवन्नात्मकं जगत् ॥ ४० ॥
तेजाचा मोठा भाग अस्थि, मज्जा मध्यम आणि वाणी हा लहान, म्हणून वाणी ही तेजोमय आहे. ( तात्पर्य ) तेज, उदक व अन्न एतद्‌रूप सर्वं जग आहे. ४०.

लोहिताज्जायते मांसं मेदो मांससमुद्भवम् ।
मेदसोऽस्थीनि जायन्ते मज्जा चास्थिसमुद्भवा ॥ ४१ ॥
रक्तापासून मांस, मांसापासून मेद, मेदापासून अस्थि आणि अस्थींपासून मजा उत्पन्न होतात. ४१.

नाड्योपि मांससंघाताच्छुक्रं मज्जासमुद्भवम् ॥ ४२ ॥
मांसापासून नाडी उत्पन्न होतात व मज्जेपासून शुक्र उत्पन्न होते, ४२.

वातपित्तकफाश्चात्र धातवः परिकीर्तिताः ।
दशाञ्जलि जलं ज्ञेयं रसस्याञ्जलयो नव ॥ ४३ ॥
रक्तस्याष्टौ पुरीषस्य सप्त स्युः श्लेष्मणश्च षट् ।
पित्तस्य पञ्च चत्वारो मूत्रस्याञ्जलयस्त्रयः ॥ ४४ ॥
वसाया मेदसो द्वौ तु मज्जा त्वञ्जलिसंमिता ।
अर्धाञ्जलि तथा शुक्रं तदेव बलमुच्यते ॥ ४५ ॥
वात, पित्त आणि कफ हेही धातु या शरीरांत आहेत. ( शरीरांत ) दहा अंजलि उदक, रस [ खाल्लेल्या अन्नाचा झालेला परिणाम ] नउ अंजलि, रक्त आठ अंजलि, पुरीष सात अंजलि, कफ सहा अंजलि, पित्त पांच अंजलि मूत्र चार अंजलि, वसा [चर्बी ] तीन अंजलि, मेद दोन अंजलि, मज्जा एक अंजलि आणि अर्ध अंजलि शुक्र. यालाच बल म्हणतात. ४३-४५.

अस्थ्नां शरीरे संख्या स्यात्षष्टियुक्तं शतत्रयम् ।
जलजानि कपालानि रुचकास्तरणानि च ।
नलकानीति तान्याहुः पञ्चधास्थीनि सूरयः ॥ ४६ ॥
शरीरांत अस्थींची संख्या तीनशे साठ आहे. शंख, कपाल, रुचक, आस्तरण आणि नलक असे अस्थींचे पांच भेद ज्ञात्यांनी सांगितले आहेत. ४६.

द्वे शते त्वस्थिसंधीनां स्यातां तत्र दशोत्तरे ।
रौरवाः प्रसराः स्कन्दसेचनाः स्युरुलूखलाः ॥ ४७ ॥
समुद्गा मण्डलाः शंखावर्ता वामनकुण्डलाः ।
इत्यष्टधा समुद्दिष्टाः शरीरेष्वस्थिसंधयः ॥ ४८ ॥
शरीरांत दोनशें दहा अस्थींचे सांधे आहेत. त्यांचे रौरव, प्रसर,स्कंदसेचन, उलूखल, समुद्र, मंडल, शंखावर्त आणि वामनकुंडल हे आठ भेद आहेत. ४७-४८.

सार्धकोटित्रयं रोम्णां श्मश्रुकेशास्त्रिलक्षकाः ।
देहस्वरूपमेवं ते प्रोक्तं दशरथात्मज ॥ ४९ ॥
साडेतीन कोटि अंगावरील रोम आहेत आणि श्मश्रु व मस्तकावरील केश तीन लक्ष आहेत. हे दशरथात्मजा, याप्रमाणे तुला देहाचे स्वरूप वर्णन केलें. याहून अधिक असार पदार्थ त्रैलोक्यामध्ये दुसरा नाहीं. ४९.

यस्मादसारो नास्त्येव पदार्थो भुवनत्रये ।
देहेऽस्मिन्नभिमानेन न महोपायबुद्धयः ॥ ५० ॥
अशा या देहाचे ठायीं अभिमान धरून आणि अंहकाररूप पापाच्या योगाने, अत्यंत श्रेष्ठ आनंदाविषयी म्हणजे मोक्षाविषयीं [ महः ] कोणी विचार करीत नाहीं. ५०.

अहंकारेण पापेन क्रियन्ते हंत सांप्रतम् ।
तस्मादेतत्स्वरूपं तु विबोद्धव्यं मुमुक्षिभिः ॥ ५१ ॥
म्हणून मुमुक्षुने वैराग्य दृढ होण्यासाठीं हे देहाचे स्वरूप अवश्य जाणावें, ५१.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
देहस्वरूपनिर्णयो नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
॥ इति नवमोऽध्यायः ॥ ९ ॥

GO TOP