॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ देविगीता ॥

॥ अथ पञ्चमोऽध्यायः - अध्याय पाचवा ॥

श्रीदेव्युवाच -
इत्यादि योगयुक्तात्मा ध्यायेन्मां ब्रह्मरूपिणीम् ।
भक्त्या निर्व्याजया राजन्नासने समुपस्थितः ॥ १ ॥
श्रीदेवी म्हणाली, हे राजा, या पूर्वोक्त योगाने युक्त होऊन आसनावर बसावे आणि निष्कपट भक्तीनें मज ब्रह्मरूपिणीचें ध्यान करावे, १,

आविः सन्निहितं गुहाचरं नाम महत्परम् ।
अत्रैतत्सर्वमर्पितमेजत्प्राणनिमिषच्च यत् ॥ २ ॥
एतज्जानथ सदसद्वरेण्यं
     विज्ञानाद्यद्‍वरिष्ठं प्रजानाम् ।
यदर्चिमद्यदणुभ्योऽणु च
     यस्मिंल्लोका निहिता लोकिनश्च ॥ ३ ॥
तदेतदक्षरं ब्रह्म स प्राणस्तदु वाङ् मनः ।
तदेतत्सत्यममृतं तद्‍वेद्धव्यं सौम्य विद्धि ॥ ४ ॥
प्रकाशरूप, सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये राहिलेलें, दर्शन, श्रवण इत्यादिकांच्या योगाने बुद्धिरूप गुहेमध्ये व्यवहार करणारे व अत्यंत श्रेष्ठ जें स्थान त्यामध्यें चलन, प्राण (श्वासोच्छ्‍वास) व निमिषोन्मेषण करणारे असें सर्व वस्तुजात गोंवलेले आहे. हे देवहो, त्याचेच ज्ञान करून घ्या. ते मूर्त व अमूर्त पदार्थांचे स्वरूप आहे. प्राण्यांच्या विज्ञानाहून श्रेष्ठ व सर्व वरिष्ठ अशा त्या ब्रह्माचीच इच्छा करणे योग्य आहे. जे (सूर्यादि दीप्तियुक्त पदार्थाचेंही प्रकाशक असल्यामुळे) दीप्तिमान् , अणूहूनही अणु व ज्याच्या ठिकाणीं भूः इत्यादि लोक व त्यांत रहाणारे प्राणी हे कल्पिलेले आहेत असे तें अक्षय ब्रह्मच प्राण, तेच वाणी व मन, तेच सत्य आणि तेच अमृत आहे. हे प्रियदर्शन शिष्या, त्यालाच वेध करणें युक्त असल्यामुळे तूं त्याला वेध कर. २-४.

धनुर्गृत्वौपनिषदं महास्त्रं
     शरं ह्युपासानिशितं सन्धयीत ।
आयम्य तद्‌भावगतेन चेतसा
     लक्ष्यं तदेवाक्षरं सौम्य विद्धि ॥ ५ ॥
तो कसा करावा म्हणून म्हणशील तर ऐक. उपनिषद्‍रूप महास्त्रभूत धनुष्य घेऊन त्याला उपासनेने पाजळलेला (तीक्ष्ण केलेला) बाण लाव व इंद्रियांसहवर्तमान अंतःकरणाचे स्वविषयांपासून आकर्षण करून लक्ष्य ब्रह्माचे ठिकाणींच ज्याची भावना आहे अशी मनाने त्या लक्ष्य अक्षराला वेध कर. ५.

प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्ष्यमुच्यते ।
अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत्तन्मयो भवेत् ॥ ६ ॥
प्रणव धनुष्य, उपाधियुक्त आत्मा हा बाण व ब्रह्म हे त्याचे लक्ष्य आहे. त्याला एकाग्र अंतःकरणानें वेध करून शराप्रमाणे तन्मय व्हावें. ६.

यस्मिन्द्यौश्च पृथिवी चान्तरिक्ष-
     मोतं मनः सह प्राणैश्च सर्वैः ।
तमेवैकं जानथात्मानमन्या
     वाचो विमुञ्चथा अमृतस्यैष सेतुः ॥ ७ ॥
ज्यामध्यें द्युलोक, पृथिवी, अंतरिक्ष व सर्व इंद्रियांसहवर्तमान मन ओंवले आहे त्या एका आत्म्यालाच जाण व अन्य सर्व वाग्व्यापार सोड; कारण, हा मोक्षाचा सेतु संसारमहोदधींतून तरून जाण्याचे साधन आहे. ७.

अरा इव रथनाभौ संहता यत्र नाड्यः ।
स एषोन्तश्चरते बहुधा जायमानः ॥ ८ ॥
रथाच्या नाभींत जसे अरे त्याप्रमाणे जेथें नाड्यांचा समुदाय जमलेला आहे अशा हृदयांत बुद्धयादि प्रत्ययांनी बहुत प्रकारे उत्पन्न होणारा आत्मा राहतो. ८.

ओमित्येवं ध्यायथात्मानं स्वस्ति वः पाराय तमसः परस्तात् ।
दिव्ये ब्रह्मपुरे व्योम्नि आत्मा सम्प्रतिष्ठितः ॥ ९ ॥
आत्मप्रतीक अथवा आत्मसंज्ञा असा जो प्रणव त्याचा आश्रय करून आत्म्याचे ध्यान करावें, तमाच्या (अविद्येच्या) परतीरी जाण्यास म्हणजे आत्मसाक्षात्कार होण्यास तुम्हांस कांहीं विघ्न न येवो. तो आत्मा प्रकाशमय अशा ह्या ब्रह्मपुरींत (हृदयपुंडरीकांत) जी पोकळी आहे तींत राहिलेला असल्यासारखा वाटतो ९.

मनोमयः प्राणशरीरनेता
     प्रतिष्ठितोऽन्ने हृदयं संनिधाय ।
तद्विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा
     आनन्दरूपममृतं यद्विभाति ॥ १० ॥
तो मनोवृत्तीवरून आहेसा वाटतो; तो प्राण व शरीर यांचा नियंता आहे; अन्नपरिणामभूत हृदयामध्यें बुद्धि स्थिर करून त्याच्या साक्षात्कारानें धीर पुरुष आनंद व अमृतरूप असे जे ब्रह्म ते पाहतात. १०.

भिद्यते हृदयग्रन्थिश्च्छिद्यन्ते सर्वसंशयाः ।
क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे ॥ ११ ॥
त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला असतां हृदयग्रंथीचा (म्हणजे चिज्जडतादात्म्याचा ) भेद होतो; सर्व संशय नष्ट होतात व त्याची सर्व संचित व क्रियमाण कर्मे क्षीण होतात. ११.

हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्म निष्कलम् ।
तच्छुभ्रं ज्योतिषां ज्योतिस्तद्यदात्मविदो विदुः ॥ १२ ॥
गुणत्रयरहित, मायाशून्य, त्यामुळेंच निर्मल, सूर्यादि ज्योतींचेंही प्रकाशक व आत्मज्ञांनी ज्याला जाणतात असें तें ब्रह्म ज्योतिरूप अशा आनंदमय कोशांत राहते. १२.

न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं
     नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः ।
तमेव भान्तमनुभाति सर्वं
     तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥ १३ ॥
त्या ब्रह्माच्या ठिकाणी सूर्य प्रकाशित होत नाहीं; चंद्राचे तेज रहात नाहीं व तारांचीही ज्योति टिकत नाही. मग हा अग्नि त्याच्यापुढें कोठून रहाणार ? सारांश, त्याच्या प्रकाशाच्या मागून सर्व ज्योति प्रकाशित होतात ( म्हणजे ) त्याच्या प्रकाशाने हे सर्व भासतें. १३.

ब्रह्मैवेदममृतं पुरस्ताद्
     ब्रह्म पश्चाद् ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण ।
अधश्चोर्ध्वं प्रसृतं ब्रह्म
     एवेदं विश्वं वरिष्ठम् ॥ १४ ॥
हे पूर्वोक्त अमृत ब्रह्मच पुढें आहे, मागें आहे व दक्षिणोत्तर दिशेलाही आहे. खाली व वरही तेच पसरले आहे. फार काय, पण हें समस्त जगही ब्रह्मच आहे. १४.

एतादृगनुभवो यस्य स कृतार्थो नरोत्तमः ।
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्‌क्षति ॥ १५ ॥
असो. तात्पर्य, अशा प्रकारचा अनुभव ज्याला येतो तो पुरुषश्रेष्ठ कृतार्थ होय. तो ब्रह्म झाला असता त्याचे अंतःकरण प्रसन्न होते व तो शोक (अप्राप्त वस्तूविषयीं खेद) करीत नाही आणि प्रिय वस्तूविषयी इच्छा करीत नाहीं. १५.

द्वितीयाद्वै भयं रजंस्तदभावाद्‌बिभेति न ।
न तद्वियोगो मेऽप्यस्ति मद्वियोगोऽपि तस्य न ॥ १६ ॥
हे राजा, द्वैतापासून भय उत्पन्न होतें हे सर्वप्रसिद्ध आहे, अर्थात् द्वैताचा अभाव झाला असतां आत्मज्ञानी भीत नाही. आणि त्याचा माझ्याशी व माझा त्याच्याशी कधी वियोग होत नाहीं. १६.

अहमेव स सोऽहं वै निश्चितं विद्धि पर्वत ।
मद्दर्शनं तु तत्र स्याद्यत्र ज्ञानी स्थितो मम ॥ १७ ॥
हे पर्वता, मीच तो व तोच मी असे तू निःसंशय जाण. मला जाणणारा ज्या ठिकाणी असेल तेथेच माझे दर्शन होईल. १७.

नाहं तीर्थे न कैलासे वैकुण्ठे वा न कर्हिचित् ।
वसामि किन्तु मज्ज्ञानिहृदयांभोजमध्यमे ॥ १८ ॥
मी तीर्थाचे ठिकाणी किंवा कैलासपर्वतावर किंवा वैकुंठलोकीं कधीच रहात नसून माझा ज्याला साक्षात्कार झाला आहे अशा ज्ञान्याच्या हृदयकमलामध्यें मी वास करते. १८.

मत्पूजाकोटिफलदं सकृन्मज्ज्ञानिनोऽर्चनम् ।
कुलं पवित्रं तस्यास्ति जननी कृतकृत्यका ॥ १९ ॥
माझे ज्याला ज्ञान झाले आहे अशा पुरुषाचे एकदां पूजन करणें हे माझ्या पूजेपेक्षां कोटिपट फल देणारे आहे. अशा त्या पूजकाचे कुल पवित्र होते व माता कृतकृत्य होते. १९.

विश्वंभरा पुण्यवती चिल्लयो यस्य चेतसः ।
ब्रह्मज्ञानं तु यत्पृष्टं त्वया पर्वतसत्तम ॥ २० ॥
ज्याच्या अंतःकरणाचा लय चैतन्यामध्ये झालेला असतो त्याच्या योगाने पृथ्वी पुण्यवती होते. हे पर्वतोत्तमा, जे तूं ब्रह्मज्ञान विचारिलेंस २०

कथितं तन्मया सर्वं नातो वक्तव्यमस्ति हि ।
इदं ज्येष्ठाय पुत्राय भक्तियुक्ताय शीलिने ॥ २१ ॥
ते मी तुला सर्व सांगितले आहे. याहून अधिक कांहीं सांगण्यासारखे राहिले नाही. हे शीलसंपन्न व भक्तिमान् अशा श्रेष्ठ पुत्राला २१

शिष्याय च यथोक्ताय वक्तव्यं नान्यथा क्वचित् ।
यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ ॥ २२ ॥
किंवा अशा प्रकारच्या शिष्याला सांगावे, यांहून इतर कोणाला सांगू नये. ज्याची देवावर व देवाप्रमाणेंच गुरूवरही श्रेष्ठ भक्ति असते २२,

तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ।
येनोपदिष्टा विद्येयं स एव परमेश्वरः ॥ २३ ॥
त्या महात्म्यालाच सांगितलेले हे अर्थ समजतात. ज्याने या ब्रह्मविद्येचा उपदेश केला असेल तोच शिष्याला परमेश्वर होय. २३.

यस्यायं सुकृतं कर्तुमसमर्थस्ततो ऋणी ।
पित्रोरप्यधिकः प्रोक्तो ब्रह्मजन्मप्रदायकः ॥ २४ ॥
ज्या अर्थीं हा शिष्य त्या गुरूंवर उपकार करण्यास असमर्थ असतो त्याअर्थीं तो मरेपर्यंत त्यांचा ऋणी रहातो. ( कारण, ) ब्रह्मरूपानें जन्म देणारा गुरु मातापितरांपेक्षा अधिक आहे, असे सांगितले आहे. २४.

पितृजातं जन्म नष्टं नेत्थं जातं कदाचन ।
तस्मै न द्रुह्येदित्यादि निगमोऽप्यवदन्नग ॥ २५ ॥
पित्यापासून प्राप्त झालेला जन्म नष्ट होतो, पण ब्रह्मरूपाने जन्म झाला असतां तो नष्ट होत नाही. यास्तव, हे पर्वता, त्याचा द्रोह करू नये; असे वेदानेंही सांगितले आहे. २५.

तस्माच्छास्त्रस्य सिद्धान्तो ब्रह्मदाता गुरुः परः ।
शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न शङ्‌करः ॥ २६ ॥
तस्मात् , ब्रह्मदाता, गुरु श्रेष्ठ आहे असा शास्त्रसिद्धान्त ठरतो. शंकर रागावला असतां गुरु रक्षण करतो, पण गुरु रागावला असता त्याचे शंकर रक्षण करीत नाहीं. २६.

तस्मात्सर्वप्रयत्नेन श्रीगुरुं तोषयेन्नग ।
कायेन मनसा वाचा सर्वदा तत्परो भवेत् ॥ २७ ॥
यास्तव, हे पर्वता, सर्व प्रयत्नाने श्रीगुरूंना संतुष्ट करावे; व कायावाचामनाने त्याच्या सेवेत सर्वदा तत्पर होऊन रहावे. २७.

अन्यथा तु कृतघ्नः स्यात्कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ।
इन्द्रेणाथर्वणायोक्ता शिरश्छेदप्रतिज्ञया ॥ २८ ॥
असे न केल्यास शिष्य कृतघ्न होतो व कृतघ्नतेला प्रायश्चित्तच नाहीं. इंद्राने दध्यङ् आथर्वणाला शिरच्छेदाची प्रतिज्ञा करून विद्या सांगितली. २८.

अश्विभ्यां कथने तस्य शिरश्छिन्नं च वज्रिणा ।
अश्वीयं तच्छिरो नष्टं दृष्ट्‍वा वैद्यो सुरोत्तमौ ॥ २९ ॥
पण त्याने अश्विनीकुमारांना विद्या सांगितली असतां इंद्राने त्याचा शिरच्छेद केला. आणि उत्तम देव अशा त्या वैद्यांनीं ( आपण जोडलेले ) ते अश्वशिर नष्ट झाले आहे २९

पुनः संयोजितं स्वीयं ताभ्यां मुनिशिरस्तदा ।
इति सङ्‌कटसंपाद्या ब्रह्मविद्या नगाधिप ।
लब्धा येन स धन्यः स्यात्कृतकृत्यश्च भूधर ॥ ३० ॥
असे पाहून पुनः त्या मुनींचें तें पूर्वीचे मस्तक जोडलें. सारांश, हे हिमालया, संकटाने प्राप्त होणारी अशी ही ब्रह्मविद्या आहे. यास्तव, हे भूधरा, ज्याने ती प्राप्त करून घेतली असेल तो धन्य व कृतकृत्य होय. ३०.

॥ इति श्रीदेवीभागवते देवीगीतायां पञ्चमोऽध्यायः ॥
॥ पाचवा अध्याय समाप्त ॥ ५ ॥GO TOP