॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ अवधूतगीता ॥

॥ अथ द्वितीयोऽध्यायः - अध्याय दुसरा ॥


॥ आत्मासक्ति ॥


अवधूत उवाच -
बालस्य वा विषयभोगरतस्य वापि
     मूर्खस्य सेवकजनस्य गृहस्थितस्य ।
एतद्गुरोः किमपि नैव न चिन्तनीयं
     रत्नं कथं त्यजति कोऽप्यशुचौ प्रविष्टम् ॥ १ ॥

अवधूत म्हणाले - तो बालक आहे, किंवा विषयभोगामध्ये निमग्न आहे, किंवा मूर्ख आहे, किंवा कोणाचा सेवक आहे, किंवा तो घरातच राहणारा आहे. गुरूविषयी असे क्षुद्र विचार करीत बसू नये. व्यवहारामध्ये तरी अत्यंत अमंगल ठिकाणी पडलेले रत्न कधी कोणी टाकतो काय ? (१)

नैवात्र काव्यगुण एव तु चिन्तनीयो
     ग्राह्यः परं गुणवता खलु सार एव ।
सिन्दूरचित्ररहिता भुवि रूपशून्या
     पारं न किं नयति नौरिह गन्तुकामान् ॥ २ ॥

गुणी पुरुषाने गुरूपदेशातील केवळ काव्यगुणाचा विचार करू नये. तर त्यातील सारभूत तत्त्वाकडेच लक्ष द्यावे. सिंदूरादि रंगांनी चित्रविचित्र न केलेली आणि म्हणूनच रूपहीन असलेली अशी नौका पार जाणार्‍यांना पलीकडच्या तीरास नेत नाही काय ? (२)

प्रयत्नेन विना येन निश्चलेन चलाचलम् ।
ग्रस्तं स्वभावतः शान्तं चैतन्यं गगनोपमम् ॥ ३ ॥

प्रयत्नावाचून जे निश्चल तत्त्व चराचराला व्यापून आहे ते चैतन्य हे स्वभावतः आकाशाप्रमाणे शांत आहे. (३)

अयत्नाच्चालयेद्यस्तु एकमेव चराचरम् ।
सर्वगं तत्कथं भिन्नमद्वैतं वर्तते मम ॥ ४ ॥

जो प्रयत्नावाचून सर्व चराचर जगताकडून व्यवहार करवितो तो सर्वव्यापी एक तत्त्वच आहे. असे असताना ते तत्त्व भिन्न कसे होणार ? मला तर ते अभिन्नच आहे असा प्रत्यय येतो. (४)

अहमेव परं यस्मात्सारात्सारतरं शिवम् ।
गमागमविनिर्मुक्तं निर्विकल्पं निराकुलम् ॥ ५ ॥

मीच श्रेष्ठ, सारासाराहून वेगळा कल्याणरुप, जन्ममृत्युरहित, विकल्परहित म्हणून दुःखादिकांनी व्याकुल न होणारा आहे. (५)

सर्वावयवनिर्मुक्तं तदहं त्रिदशार्चितम् ।
सम्पूर्णत्वान्न गृह्णामि विभागं त्रिदशादिकम् ॥ ६ ॥

सर्व अवयवांनी रहित व देवादिकांनी पूज्य असे जे तत्त्व ते मी स्वतः परिपूर्ण असल्यामुळे देवादिकांनी होणारे जे विभाग ते माझे नव्हेत. (६)

प्रमादेन न सन्देहः किं करिष्यामि वृत्तिमान् ।
उत्पद्यन्ते विलीयन्ते बुद्बुदाश्च यथा जले ॥ ७ ॥

ज्याप्रमाणे पाण्यावर बुडबुडे उठतात व पुनः नाहीसे होतात. त्याप्रमाणे माझे अंतःकरणार वृत्ति उठतात व मावळतात यात संशय नाही. कारण वृत्तींनी युक्त असा मी काय करणार आहे. (७)

महदादीनि भूतानि समाप्यैवं सदैव हि ।
मृदुद्रव्येषु तीक्ष्णेषु गुडेषु कटुकेषु च ॥ ८ ॥
कटुत्वं चैव शैत्यत्वं मृदुत्वं च यथा जले ।
प्रकृतिः पुरुषस्तद्वदभिन्नं प्रतिभाति मे ॥ ९ ॥

प्राणिमात्राचे ठिकाणी आकाशादि पंचमहाभूते नित्य व्यापून असतात. मऊ पदार्थात मार्दव, कठोर पदार्थात काठिण्य, गुळात गोडी, तिखट पदार्थात तिखटपणा भरून असतो. पाण्यांतही मृदुता आणि शीतलता जशी (एकत्रच) असते त्याप्रमाणे प्रकृति आणि पुरुष अभिन्न असल्याचे माझे मत आहे. (८-९)

सर्वाख्यारहितं यद्यत्सूक्ष्मात्सूक्ष्मतरं परम् ।
मनोबुद्धीन्द्रियातीतमकलङ्‌कं जगत्पतिम् ॥ १० ॥

विकाराला प्राप्त होणारी जेवढी म्हणून नावे आहेत; त्यांनी रहित, सूक्ष्माहूनही सूक्ष्म, सर्वात श्रेष्ठ, मन, बुद्धि, वगैरे इंद्रिये यांना विषय न होणारे व निष्कलंक जगत्पति असे जे (१०)

ईदृशं सहजं यत्र अहं तत्र कथं भवेत् ।
त्वमेव हि कथं तत्र कथं तत्र चराचरम् ॥ ११ ॥

स्वभावसिद्ध आत्मतत्त्व तेथे 'तू' मी, व हे सर्व चराचर हा भेद कोठून येणार ? (११)

गगनोपमं तु यत्प्रोक्तं तदेव गगनोपमम् ।
चैतन्यं दोषहीनं च सर्वज्ञं पूर्णमेव च ॥ १२ ॥

गगनाची उपमा देऊन ज्याचे वर्णन केले, ते गगनासारखेच आहे. ते चैतन्यस्वरुप, दोषहीन व सर्वज्ञ असे आहे. (१२)

पृथिव्यां चरितं नैव मारुतेन च वाहितम् ।
वरिणा पिहितं नैव तेजोमध्ये व्यवस्थितम् ॥ १३ ॥

पृथिवीमध्ये त्याचा व्यवहार होत नाही, वायूचे योगाने तो वाहिला जात नाही. उदकाचे योगाने तो भूपृष्ठाप्रमाणे झाकले जात नाही. मात्र ते तेजामध्ये राहिले आहे. म्हणजे ते तेजोमय आहे. (१३)

आकाशं तेन संव्याप्तं न तद्‌व्याप्तं च केनचित् ।
स बाह्याभ्यन्तरं तिष्ठत्यवच्छिन्नं निरन्तरम् ॥ १४ ॥

त्या सच्चिदानंदस्वरुप परमात्म्याने हे सर्व व्यापून टाकले आहे, परंतु त्याला मात्र कोणी व्यापीत नाहीत. त्याने सर्वही कार्य समूह आंत आणि बाहेर कसा (बाह्याभ्यंतर) व्यापून टाकिला आहे. (१४)

सूक्ष्मत्वात्तददृश्यत्वान्निर्गुणत्वाच्च योगिभिः ।
आलम्बनादि यत्प्रोक्तं क्रमादालम्बनं भवेत् ॥ १५ ॥

ते तत्त्व अत्यंत सूक्ष्म आहे, अदृश्य आहे व निर्गुण आहे म्हणून योगी जनांनी नाभिकमल, हृदयदेश आणि कंठस्थान इत्यादि ठिकाणी शालिग्राम, बाण आदींच्या आश्रयाने ध्यान करावे ! असे जे सांगितले आहे त्याचाच क्रमाक्रमाने आश्रय करावा. (१५)

सतताऽभ्यासयुक्तस्तु निरालम्बो यदा भवेत् ।
तल्लयाल्लीयते नान्तर्गुणदोषविवर्जितः ॥ १६ ॥

दीर्घ कालपर्यंत अभ्यासानें युक्त झालेला पुरुष, ज्यावेळी निरालंब होईल त्यावेळी आश्रयाचा लय झाला असता त्याचा लय होईल. म्हणजे समाधी लागेल. परंतु अंतरातील गुणदोष टाकून दिले नाहीत तर अशी समाधी लागणार नाही. (१६)

विषविश्वस्य रौद्रस्य मोहमूर्च्छाप्रदस्य च ।
एकमेव विनाशाय ह्यमोघं सहजामृतम् ॥ १७ ॥

अत्यंत भयंकर मोह आणि मूर्छा उत्पन्न करणार्‍या अशा विषरूपी विश्वाचा नाश करण्याकरिता कधीही निष्फळ न होणारे असे स्वभावसिद्ध अमृत (मोक्ष) हेच एक समर्थ आहे. (१७)

भावगम्यं निराकारं साकारं दृष्टिगोचरम् ।
भावाभावविनिर्मुक्तमन्तरालं तदुच्यते ॥ १८ ॥

ते तत्त्व अनुभवाने जाणता येण्यासारखे, तत्त्वतः निराकार, (परांड प्राकृत पुरुषांच्या दृष्टीने) साकार ज्ञानदृष्टीला गोचर, भाव आणि अभावरहित व मध्य स्थितीमध्ये रहाणारे म्हणजे अनिर्वाच्य असे ते तत्त्व आहे, असे म्हणतात. (१८)

बाह्यभावं भवेद्विश्वमन्तः प्रकृतिरुच्यते ।
अन्तरादन्तरं ज्ञेयं नारिकेलफलाम्बुवत् ॥ १९ ॥

विश्व बाह्यरुपाने प्रतीत होते, आणि प्रकृति विश्वाच्या आंत आहे असे म्हणतात. परंतु नारळातील पाण्याप्रमाणे सर्वांच्याही आत असलेल्या प्रकृतीच्याही आंत ते (ज्ञेय) आहे. (१९)

भ्रान्तिज्ञानं स्थितं बाह्ये सम्यग्ज्ञानं च मध्यगम् ।
मध्यान्मध्यतरं ज्ञेयं नारिकेलफलाम्बुवत् ॥ २० ॥

भ्रांतिज्ञान हे सर्वांच्या बाहेर आहे. वास्तविक ज्ञान मध्यवर्ती आहे आणि नारळांतील पाण्याप्रमाणे, ह्या मध्यज्ञानाच्याही आत असणारे असे ते ज्ञेय आहे. (२०)

पौर्णमास्यां यथा चन्द्र एक एवातिनिर्मलः ।
तेन तत्सदृशं पश्येद्‌द्विधादृष्टिर्विपर्ययः ॥ २१ ॥
अनेनैव प्रकारेण बुद्धिभेदो न सर्वगः ।
दाता च धीरतामेति गीयते नामकोटिभिः ॥ २२॥

पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत निर्मल असा एकच चंद्र असताना जसे दृष्टिदोषाने दोन चंद्र दिसतात, त्याचप्रकाराने बुद्धिभेद आहे. तो सार्वत्रिक नव्हे म्हणजे सत्य नव्हे. त्या परमात्म्या विषयींचा साधकाला दृढ निश्चय होतो, आणि तो साधक हजारो नावांनी त्याची स्तुति करतो. (२१-२२)

गुरुप्रज्ञाप्रसादेन मूर्खो वा यदि पण्डितः ।
यस्तु सम्बुध्यते तत्त्वं विरक्तो भवसागरात् ॥ २३॥

गुरूच्या ज्ञानप्रसादानें मूर्ख किंवा पंडित कोणीही जरी असला, तरी त्याला तत्त्वाचा बोध होतो. आणि तत्त्वबोधानंतर तो या भवसागराविषयी विरक्त होतो. (२३)

रागद्वेषविनिर्मुक्तः सर्वभूतहिते रतः ।
दृढबोधश्च धीरश्च स गच्छेत्परमं पदम् ॥ २४॥

जो रागद्वेषांनी रहित, सर्व भूतांच्या कल्याणाविषयी तत्पर, ज्यांचे तत्त्वज्ञान दृढ झाले आहे, व म्हणूनच जो अत्यंत धीट आहे त्यालाच परम पुरुषार्थ प्राप्त होतो. (२४)

घटे भिन्ने घटाकाश आकाशे लीयते यथा ।
देहाभावे तथा योगी स्वरूपे परमात्मनि ॥ २५॥

घट फुटला असता घटाकाश जसे महाकाशामध्ये मिळून जाते, त्याचप्रमाणे (स्थूल सूक्ष्म कारण या) देहांचा नाश झाला असता योगी परमात्म्यामध्ये मिळून जातो. (२५)

उक्तेयं कर्मयुक्तानां मतिर्यान्तेऽपि सा गतिः ।
न चोक्ता योगयुक्तानां मतिर्यान्तेऽपि सा गतिः ॥ २६ ॥

कर्मद्वारा मुक्त होणार्‍या पुरुषांची मरणकाली जी मति असते ती गति त्यांना प्राप्त होते, असे सांगितले आहे. परंतु (अष्टांग) योगांनी युक्त असलेल्या पुरुषांची अंती जी मति असते, तीच त्यांना गति मिळते, असे कोठेही सांगितलेले नाही. (२६)

या गतिः कर्मयुक्तानां सा च वागिन्द्रियाद्वदेत् ।
योगिनां या गतिः क्वापि ह्यकथ्या भवतोर्जिता ॥ २७ ॥

कर्म करणाच्या पुरुषांना जी गति प्राप्त होते, त्या गतीचे वाणीने वर्णन करता येते, परंतु योगी पुरुषांना जी गति प्राप्त होते, वे जी आपण स्वतः प्राप्त करून घेतली आहे, ती अवर्णनीय आहे. (२७)

एवं ज्ञात्वा त्वमुं मार्गं योगिनां नैव कल्पितम् ।
विकल्पवर्जनं तेषां स्वयं सिद्धिः प्रवर्तते ॥ २८ ॥

याप्रमाणे हा मार्ग आहे, असे जाणल्यानंतर योग्यांना या मार्गाविषयी मग कधीही विकल्प होत नाही. कारण ते सर्वदा संकल्पविकल्परहित असतात आणि म्हणून सिद्धि त्यांच्याकडे चालत येते. (२८)

तीर्थे वान्त्यजगेहे वा यत्र कुत्र मृतोऽपि वा ।
न योगी पश्यते गर्भं परे ब्रह्मणि लीयते ॥ २९ ॥

तीर्थाचे ठिकाणी किंवा चांडाळाचे घरी कोठेही जरी योगी पुरुष मृत झाला तरी त्याला गर्भवास अनुभवावा लागत नाही. तर तो परब्रह्मी लीन होतो. (२९)

सहजमजमचिन्त्यं यस्तु पश्येत्स्वरूपं
     घटति यदि यथेष्टं लिप्यते नैव दोषैः ।
सकृदपि तदभावात्कर्म किंचिन्नकुर्यात्
     तदपि न च विबद्धः संयमी वा तपस्वी ॥ ३० ॥

स्वभावतःच जन्मरहित व अचिंत्य अशा स्वरूपाचा ज्याला अनुभव येतो, तो मनाला वाटेल तसा जरी व्यवहारात वागला तरी त्याला दोष सोडीत नाहीत. आणि ज्याअर्थी ह्याप्रमाणे त्याला दोष लागत नाही. त्याअर्थी एखादेवेळी त्याने जरी काही कर्म न केले, तरी त्याचे योगाने तो संयमी किंवा तपस्वी बद्ध होत नाही. (३०)

निरामयं निष्प्रतिमं निराकृतिं
     निराश्रयं निर्वपुषं निराशिषम् ।
निर्द्वन्द्वनिर्मोहमलुप्तशक्तिकं
     तमीशमात्मानमुपैति शाश्वतम् ॥ ३१ ॥

आधिव्याधिरहित, अलौकिक, आकृतिरहित, निराश्रय, निराशरीर, निरिच्छ, सुखदुःख-शीतोष्णादिक द्वंद्वरहित, मोहरहित, आणि सर्वदा अकुंठित शक्ति असणार्‍या परमेश्वरस्वरुप नित्य आत्म्याला तो जाऊन मिळतो. (३१)

वेदो न दीक्षा न च मुण्डनक्रिया
     गुरुर्न शिष्यो न च यन्त्रसम्पदः ।
मुद्रादिकं चापि न यत्र भासते
     तमीशमात्मानमुपैति शाश्वतम् ॥ ३२ ॥

ज्या ठिकाणी ऋग्वेदादि वेद यजमानादि दीक्षा मंडनादिक्रिया, गुरू, शिष्य, यंत्र संपत्ति, आणि मुद्रा इत्यादि चिन्हांचे भानही नाही, त्या नित्य, ईश्वराप्रत तो प्राप्त होतो. (३२)

न शाम्भवं शाक्तिकमानवं न वा
     पिण्डं च रूपं च पदादिकं न वा ।
आरम्भनिष्पत्तिघटादिकं च नो
     तमीशमात्मानमुपैति शाश्वतम् ॥ ३३ ॥

शंभुसंबंधी, शक्तिसंबंधी, किंवा मनुष्यासंबंधी शरीररूप किंवा स्थान हे ज्याठिकाणी नाही, त्याचप्रमाणे घटादिकांचा मृत्तिकेपासून जसा आरंभ होतो तसा ज्याचा कोणापासूनही आरंभ होत नाही, असतो तो नित्य ईशरूप आत्मा. त्याला तो साधक प्राप्त होतो. (३३)

यस्य स्वरूपात्सचराचरं जग-
     दुत्पद्यते तिष्ठति लीयतेऽपि वा ।
पयोविकारादिव फेनबुद्बुदा-
     स्तमीशमात्मानमुपैति शाश्वतम् ॥ ३४ ॥

पाण्याचा विकार होऊन जसे बुडबुडे आणि फेस पाण्यापासून उत्पन्न होतात व पाण्याच्याच आश्रयाने रहातात; आणि पाण्यामध्येच जसे नाहीसे होतात, त्याप्रमाणे ज्याच्या स्वरूपापासून हे सर्व चराचर जग उत्पन्न होते, ज्याच्या आश्रयाने रहाते आणि ज्याच्या मध्येच नाशानंतर मिळून जाते, त्या नित्य ईश्वर आत्म्याला साधक प्राप्त होतो. (३४)

नासानिरोधो न च दृष्टिरासनं
     बोधोऽप्यबोधोऽपि न यत्र भासते ।
नाडीप्रचारोऽपि न यत्र किञ्चि-
     त्तमीशमात्मानमुपैति शाश्वतम् ॥ ३५ ॥

ज्याठिकाणी वायूचा विरोध करून प्राणायामादि, नासिकाग्रदृष्टी, पद्म इत्यादिक आसने व बोध किंवा अबोध यांचे भान होत नाही. ज्याठिकाणी इडा (पिंगला) इत्यादि नाडीतून वायूची गति नाही, त्या नित्य ईश आत्म्याला तो साधक मिळतो. (३५)

नानात्वमेकत्वमुभत्वमन्यता
     अणुत्वदीर्घत्वमहत्त्वशून्यता ।
मानत्वमेयत्वसमत्ववर्जितं
     तमीशमात्मानमुपैति शाश्वतम् ॥ ३६ ॥

अनेकत्व, एकत्व, अभयविधत्व, सूक्ष्मत्व, दीर्घत्व, महत्त्व, प्रमाणत्व, प्रमेयत्व, (प्रमाणांनी समजण्यास योग्य) आणि समत्व यांनी रहित असा जो नित्य परमेश्वर आत्मा त्याला तो साधक प्राप्त होतो. (३६)

सुसंयमी वा यदि वा न संयमी
     सुसंग्रही वा यदि वा न संग्रही ।
निष्कर्मको वा यदि वा सकर्मक-
     स्तमीशमात्मानमुपैति शाश्वतम् ॥ ३७॥

उत्तम संयमी (इंद्रियनिग्रह करणारा) किंवा इंद्रियदमन न करणारा, सुसंग्रही किंवा संग्रहरहित, कर्म न करणारा किंवा कर्म करणारा असा जो नित्य ईशात्मा त्यास तो साधक प्राप्त होतो. (३७)

मनो न बुद्धिर्न शरीरमिन्द्रियं
     तन्मात्रभूतानि न भूतपञ्चकम् ।
अहंकृतिश्चापि वियत्स्वरूपकं
     तमीशमात्मानमुपैति शाश्वतम् ॥ ३८ ॥

मन, बुद्धि, इंद्रिये, शरीर, आकाशादिक सूक्ष्म भूते, स्थूल भूते व अहंकार यांपैकी तो कोणी एक नसून स्वरूपाने आकाशासारखा असा जो नित्य ईश आत्मा त्याला साधक प्राप्त होतो. (३८)

विधौ निरोधे परमात्मतां गते
     न योगिनश्चेतसि भेदवर्जिते ।
शौचं न वाशौचमलिङ्‌गभावना
     सर्वं विधेयं यदि वा निषिध्यते ॥ ३९ ॥

कर्माचा विरोध झाला असता व योग्याला परमात्म्याची प्राप्ति झाली असता व अंतःकरणांतील भेदभावना नाहीशी झाली असता, व शुद्धता अशुद्धता इत्यादि सर्व चिन्हे नष्ट झाली असता, नंतर साधकाने सर्व गोष्टी कराव्या किंवा सोडाव्या. त्याला विधिनिषेध नाही. (३९)

मनो वचो यत्र न शक्तमीरितुं
     नूनं कथं तत्र गुरूपदेशता ।
इमां कथामुक्तवतो गुरोस्त-
     द्युक्तस्य तत्त्वं हि समं प्रकाशते ॥ ४०॥

मन ज्याच्याविषयी कल्पना करू शकत नाही. वाणी बोलत नाही तेथे गुरू उपदेशा कोठून आली. गुरूपदेशादीनेयुक्त असलेल्या पुरुषालाच सम असणार्‍या तत्त्वाचा बोध होतो. (४०)

इति अवधूतगीतायां द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥

दुसरा अध्याय समाप्त.





GO TOP