॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ अवधूतगीता ॥

॥ अथ प्रथमोऽध्यायः - अध्याय पहिला ॥


॥ आत्मसंवित्त्युपदेश ॥


॥ अथ अवधूतगीता प्रारभ्यते ॥
ईश्वरानुग्रहादेव पुंसामद्वैतवासना ।
महद्‌भयपरित्राणाद्‌विप्राणामुपजायते ॥ १ ॥
ईश्वराच्या कृपेमुळे आणि महाभयापासून वेदवेत्या ब्राह्मणांचे रक्षण केल्यामुळे (या दोन कारणांनीच) पुरुषाचे ठिकाणी अद्वैताची भावना उत्पन्न होते. (१)

येनेदं पूरितं सर्वमा‌त्मनैवात्मनात्मनि ।
निराकारं कथं वन्दे ह्यभिन्नं शिवमव्ययम् ॥ २ ॥
ब्रह्मतत्त्व हे मंगल, अव्यय, भेदरहित आणि निराकार असे आहे. आत्मयोगाने स्वयंभूपणे ते आत्मा आणि सर्व विश्व व्यापून आहे. (मी त्याहून वेगळा नाही) तेव्हा त्या निराकार ब्रह्माला मी नमस्कार कसा करणार ? (२)

पञ्चभूतात्मकं विश्वं मरीचिजलसन्निभम् ।
कस्याप्यहो नमस्कुर्यामहमेको निरञ्जनः ॥ ३ ॥
पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले हे विश्व मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. मायामलरहित असा मी एकच एक आहे. (सत्स्वरूप दुसरे काहीही नाहीच तर) मी नमस्कार तो कुणाला करणार हो ? (३)

आत्मैव केवलं सर्वं भेदाभेदो न विद्यते ।
अस्ति नास्ति कथं ब्रूयां विस्मयः प्रतिभाति मे ॥ ४ ॥
केवळ आत्मतत्त्वच सर्व कांही आहे. भेदाभेदाचा प्रकार तेथे नाहीच. तेव्हा हे आहे, ते नाही, अशी आहे नाही ही शब्दात्मक भाषा कशी बोलणार ? (तशा प्रकारे बोलण्याचे) मला मोठे आश्चर्य वाटते. (४)

वेदान्तसारसर्वस्वं ज्ञानं विज्ञानमेव च ।
अहमात्मा निराकारः सर्वव्यापी स्वभावतः ॥ ५ ॥
वास्तविक सर्वव्यापक निराकार मत्स्वरूप आत्मा वेदान्ताचे सारसर्वस्व असून ज्ञान आणि विज्ञान तोच आहे. (५)

यो वै सर्वात्मको देवो निष्कलो गगनोपमः ।
स्वभावनिर्मलः शुद्धः स एवाहं न संशयः ॥ ६ ॥
आकाशाप्रमाणे अवयवरहित सर्वव्यापी स्वभावतःच निर्लेप शुद्धस्वरूप असा जो प्रकाशमान आहे तो मीच आहे. याविषयी कोणताही संशय नाही. (६)

अहमेवाव्ययोऽनन्तः शुद्धविज्ञानविग्रहः ।
सुखं दुःखं न जानामि कथं कस्यापि वर्तते ॥ ७ ॥
मी व्ययरहित आहे. मला अंत नाही. मूर्तिमन्त शुद्धविज्ञान मीच आहे. कुणाला सुख कुणाला दुःख असतेच कसे, ते मी जाणत नाही. (मी ज्ञानस्वरूप असल्यामुळे मला सुखदुःखे अनुभवाला येत नाहीत.) (७)

न मानसं कर्म शुभाशुभं मे
     न कायिकं कर्म शुभाशुभं मे ।
न वाचिकं कर्म शुभाशुभं मे
     ज्ञानामृतं शुद्धमतीन्द्रियोऽहम् ॥ ८ ॥
(शुद्धाशुद्ध संकल्पात्मक) शुभाशुभ मानसिक कर्म मला नाही. (हिंसा रक्षणात्मक) शुभाशुभ कायिक कर्म मला नाही. (निंदास्तुतिपर) शुभाशुभ वाचिक कर्म मला नाही. कारण मी ज्ञानस्वरूप, शाश्वत, शुद्ध आणि अतीन्द्रिय असा आहे. (८)

मनो वै गगनाकारं मनो वै सर्वतोमुखम् ।
मनोऽतीतं मनः सर्वं न मनः परमार्थतः ॥ ९ ॥
मन गगनासारखे आहे. ते सर्वगामी आहे. त्याच्याविषयी काहीच कल्पना करता येत नाही. परंतु भासणारे सर्व मनोरूपच आहे. तरी मन वस्तुतः सत्य नाही. (९)

अहमेकमिदं सर्वं व्योमातीतं निरन्तरम् ।
पश्यामि कथमात्मानं प्रत्यक्षं वा तिरोहितम् ॥ १० ॥
मी एक आहे, दृश्यजात मीच आहे. आकाशालाही व्यापणारा व निरंतर असा मी आहे. यास्तव मी स्वतःला प्रत्यक्ष किंवा कसा पाहू शकेन ? (१०)

त्वमेवमेकं हि कथं न बुध्यसे
     समं हि सर्वेषु विमृष्टमव्ययम् ।
सदोदितोऽसि त्वमखण्डितः प्रभो
     दिवा च नक्तं च कथं हि मन्यसे ॥ ११ ॥
हे जीवा तूच एक व सत्स्वरूप परमात्मा आहेस, हे कसे जाणीत नाहीस ? तू अव्यय आहेस. तू सर्वांच्या ठिकाणी उपलब्ध आहेस, तू सर्वदा प्रकाशरूप व अखंडित आहेस असे असताना हे प्रभो जीवा, दिवस आणि रात्र कशी मानतोस ? (११)

आत्मानं सततं विद्धि सर्वत्रैकं निरन्तरम् ।
अहं ध्याता परं ध्येयमखण्डं खण्ड्यते कथम् ॥ १२ ॥
तू स्वतः अखंड व सर्वत्र एक रूप (म्हणजे देशकाल - वस्तुपरिच्छेदरहित) आहेस असे जाण. कारण (स्वतःच्याच अज्ञानाने मी) ध्यान करणारा आणि इतर कोणी ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय, असा अखंड वस्तूचा भेद कसा बरे होणार ? (१२)

न जातो न मृतोऽसि त्वं न ते देहः कदाचन ।
सर्वं ब्रह्मेति विख्यातं ब्रवीति बहुधा श्रुतिः ॥ १३ ॥
तू उत्पन्न होत नाहीस व मृतही होत नाहीस तुला कधीच देह नाही. व हे सर्व ब्रह्मच असल्याने प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारांनी श्रुति हेच प्रतिपादन करत आहे. (१३)

स बाह्याभ्यन्तरोऽसि त्वं शिवः सर्वत्र सर्वदा ।
इतस्ततः कथं भ्रान्तः प्रधावसि पिशाचवत् ॥ १४ ॥
सर्वकाली आणि सर्व ठिकाणी आत बाहेर असणारा तू कल्याणरूप आहेस. असे असताना भ्रमिष्ट होऊन पिशाचाप्रमाणे इकडे तिकडे कां धावत आहेस ? (१४)

संयोगश्च वियोगश्च वर्तते न च ते न मे ।
न त्वं नाहं जगन्नेदं सर्वमात्मैव केवलम् ॥ १५ ॥
तुझा व माझा संयोग किंवा वियोग होत नाही. कारण तू, मी आणि हे जग हे भेद सत्य नसून हे सर्वकाही केवल आत्माच आहे. (१५)

शब्दादिपञ्चकस्यास्य नैवासि त्वं न ते पुनः ।
त्वमेव परमं तत्त्वमतः किं परितप्यसे ॥ १६ ॥
शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे इंद्रिय विषय-पंचक तुझे नव्हे, व तू त्याचा नव्हेस. कारण परमतत्व ते तूच आहेस. असे असून तू व्यर्थ खेद का करितोस ? (१६)

जन्म मृत्युर्न ते चित्तं बन्धमोक्षौ शुभाशुभौ ।
कथं रोदिषि रे वत्स नामरूपं न ते न मे ॥ १७ ॥
तुला जन्म व मृत्यु नाहीत. शुभ अशुभ बंध आणि मोक्ष हे ही तुला संभवत नाहीत. असे असताना हे वत्सा ! उगाच का शोक करतोस ? कारण नाम, रूप इत्यादि विकार तुला नाहीत व मलाही नाहीत. (१७)

अहो चित्त कथं भ्रान्तः प्रधावसि पिशाचवत् ।
अभिन्नं पश्य चात्मानं रागत्यागात्सुखी भव ॥ १८ ॥
हे (वत्सा), चित्त मोहित होऊन पिशाचाप्रमाणे का धावत आहेस ? आत्मा हा भेदरहित आहे. अशी भावना कर आणि सर्व विषयवासना सोडून सुखी हो. (१८)

त्वमेव तत्त्वं हि विकारवर्जितं
     निष्कम्पमेकं हि विमोक्षविग्रहम् ।
न ते च रागो ह्यथवा विरागः
     कथं हि सन्तप्यसि कामकामतः ॥ १९ ॥
निश्चल, एक, मोक्षस्वरूप व सर्व विकाररहित असे परमार्थ तत्त्व तूच आहेस. तुझ्या ठिकाणी प्रीति अथवा वैराग्य यातले काहीच नाही असे असताना विषयांच्या इच्छेने व्यर्थ का संताप करून घेत आहेस ? (१९)

वदन्ति श्रुतयः सर्वाः निर्गुणं शुद्धमव्ययम् ।
अशरीरं समं तत्त्वं तन्मां विद्धि न संशयः ॥ २० ॥
सर्वही श्रुति निर्गुण, शुद्ध व्ययरहित, निराकार व सर्वत्र सम अशा तत्त्वाचे प्रतिपादन करतात. ते तत्त्व मीच आहे असे निःसंशय समज. (२०)

साकारमनृतं विद्धि निराकारं निरन्तरम् ।
एतत्तत्त्वोपदेशेन न पुनर्भवसम्भवः ॥ २१ ॥
आकारयुक्त ते असत्य आणि निराकार ते नित्य असे जाण या तत्त्वोपदेशाने पुन्हा जन्म होणार नाही. (२१)

एकमेव समं तत्त्वं वदन्ति हि विपश्चितः ।
रागत्यागात्पुनश्चित्तमेकानेकं न विद्यते ॥ २२ ॥
आत्मज्ञानी पंडित सर्वत्र सम असणारे तत्त्व एकच आहे असे सांगतात. कामना त्याग केल्यानंतर संकल्पविकल्पात्मक चित्तच राहत नाही. (२२)

अनात्मरूपं च कथं समाधि-
     रात्मस्वरूपं च कथं समाधिः ।
अस्तीति नास्तीति कथं समाधि-
     र्मोक्षस्वरूपं यदि सर्वमेकम् ॥ २३ ॥
सर्व मोक्षस्वरूप जर एक आहे तर अनात्मरूप ध्येयाच्या समाधीने फल कोणते ? किंवा आत्मस्वरूप समाधींचे ध्येय कसे होणार किंवा समसदात्मक विरोध ध्येय कसे होऊ शकेल ?(२३)

विशुद्धोऽसि समं तत्त्वं विदेहस्त्वमजोऽव्ययः ।
जानामीह न जानामीत्यात्मानं मन्यसे कथम् ॥ २४ ॥
तू अव्यय, जन्मरहित, देहरहित, अत्यंत निर्मल व सर्वत्र सम असा आहेत. त्याअर्थी मी आत्म्याला जाणतो किंवा जाणत नाहीं असे कसे मानितोस ? (२४)

तत्त्वमस्यादिवाक्येन स्वात्मा हि प्रतिपादितः ।
नेति नेति श्रुतिर्ब्रूयादनृतं पाञ्चभौतिकम् ॥ २५ ॥
'तो तू आहेस' इत्यादि महा वाक्यांनी श्रुतीमध्ये आत्मप्रतिपादन केलेले आहे आणि तसेच 'हे नव्हे, हे नव्हे' इत्यादि सर्व द्वैताचा निषेध करणारी श्रुति, सर्व पंचभूतात्मक सृष्टि मिथ्या आहे, असे सांगते. (२५)

आत्मन्येवात्मना सर्वं त्वया पूर्णं निरन्तरम् ।
ध्याता ध्यानं न ते चित्तं निर्लज्जं ध्यायते कथम् ॥ २६ ॥
हे शिष्या तू आत्मस्वरूपाने स्वतःच्या ठिकाणी हे सर्व निरंतर, भरून टाकले आहेस. ध्यान करणारा अहंकार तुझा नव्हे, व ध्यान क्रिया ही तुझी नव्हे व ध्यान साधन चित्तही तुझे नव्हे असे असताना ध्येयावाचून ध्यान कसे करणार ? (२६)

शिवं न जानामि कथं वदामि
     शिवं न जानामि कथं भजामि ।
अहं शिवश्चेत्परमार्थतत्त्वं
     समस्वरूपं गगनोपमञ्च ॥ २७ ॥
त्या कल्याणस्वरूपाला मी जाणत नाही किंवा मी जाणतो असे तरी कसे म्हणू ? ज्ञातृज्ञेयादि द्वंद्वावांचून असे करणे अशक्य आहे. कारण आकाशाप्रमाणे सर्वत्र समस्वरूप असलेले मंगल परमतत्त्व मीच आहे. (२७)

नाहं तत्त्वं समं तत्त्वं कल्पनाहेतुवर्जितम् ।
ग्राह्यग्राहकनिर्मुक्तं स्वसंवेद्यं कथं भवेत् ॥ २८ ॥
अहंकारबोधक 'मी' ते तत्व नव्हे. कारण तत्व हे सम असते. ते कल्पनाकारक नसते. ज्ञाताज्ञेय भावरहित केवळ स्वानुभवगम्य असे तत्व तो 'अहंकार' कसा होईल ? (२८)

अनन्तरूपं न हि वस्तु किंचि-
     त्तत्त्वस्वरूपं न हि वस्तु किंचित् ।
आत्मैकरूपं परमार्थतत्त्वं
     न हिंसको वापि न चाप्यहिंसा ॥ २९ ॥
कोणताही व्यावहारिक तो तत्वरूपही नसतो. आत्मा हीच एक वस्तु नित्य सत्य आहे. आत्मा हिंसा करणारा नाही आणि त्याची हिंसाही (कोणाकडून) होत नाही. (२९)

विशुद्धोऽसि समं तत्त्वं विदेहमजमव्ययम् ।
विभ्रमं कथमात्मार्थं विभ्रान्तोऽहं कथं पुनः ॥ ३० ॥
तू अत्यंत शुद्ध, सर्वत्र एकरस देहरहित, जन्मरहित, व्ययरहित असा आहेस. असे असतां आत्मप्राप्तिसाठी इतका श्रम कशाला ? मी परत भ्रमिष्ट कसा झालो ? (३०)

घटे भिन्ने घटाकाशं सुलीनं भेदवर्जितम् ।
शिवेन मनसा शुद्धो न भेदः प्रतिभाति मे ॥ ३१ ॥
घट फुटला असता, घटाकाश महाकाशात जसे लीन होत, त्याप्रमाणे शुद्ध झालेल्या माझ्या मनामुळे जीवाशिवामध्ये मला भेद मुळीच भासत नाही. (३१)

न घटो न घटाकाशो न जीवो जीवविग्रहः ।
केवलं ब्रह्म संविद्धि वेद्यवेदकवर्जितम् ॥ ३२ ॥
ज्याप्रमाणे वस्तुतः घट नाही, व घटाकाशही नाही (केवल परमाकाश सत्य असते) त्याप्रमाणे जीव व देह ही वस्तुतः नसून ज्ञाता व ज्ञेय संबंध नसलेले, शुद्ध ब्रह्मच आहे असे जाण. (३२)

सर्वत्र सर्वदा सर्वमात्मानं सततं ध्रुवम् ।
सर्वं शून्यमशून्यं च तन्मां विद्धि न संशयः ॥ ३३ ॥
सर्व ठिकाणी व सर्वकाली भासणारे सर्व व्यापक स्वरूप आत्मा स्वतः सिद्ध, कूटस्थ सर्व दृश्य वस्तु संसर्गरहित, परम सत्यं असे जे तत्व ते मीच आहे, असे निःसंशय जाण. (३३)

वेदा न लोका न सुरा न यज्ञा
     वर्णाश्रमो नैव कुलं न जातिः ।
न धूममार्गो न च दीप्तिमार्गो
     ब्रह्मैकरूपं परमार्थतत्त्वम् ॥ ३४ ॥
ऋग्वेदादी वेद, भूर इ. लोक, इंद्रादि देव, अग्निष्टोमादी यज्ञ, ब्राह्मणादी वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रम, कुल, जाती, कृष्णमार्ग व शुक्लमार्ग यांपैकी काही एक सत्य नाही. तर परमार्थ तत्त्व व एकरूप जे ब्रह्म तेच केवल सत्य आहे. (३४)

व्याप्यव्यापकनिर्मुक्तं त्वमेकः सफलं यदि ।
प्रत्यक्षं चापरोक्षं च ह्यात्मानं मन्यसे कथम् ॥ ३५ ॥
हे सर्व जर तूच = एक आहेस आणि व्याप्यव्यापकभाव तुझ्यापाशी नाही तर आत्मा इंद्रिय-प्रत्यक्ष व अपरोक्ष आहे, हे कसे मानतोस ? (ही भाषा द्वैतवाद्यांची आहे.) (३५)

अद्वैतं केचिदिच्छन्ति द्वैतमिच्छन्ति चापरे ।
समं तत्त्वं न विन्दन्ति द्वैताद्वैतविवर्जितम् ॥ ३६ ॥
काही अधिकारी अद्वैताची इच्छा मात्र करितात आणि काही द्वैताची करतात. परंतु द्वैत आणि अद्वैत यांचा जेथे स्पर्श नाही, व जे सर्वत्र एकरस आहे, त्याला ते दोघेही जाणत नाहीत. (३६)

श्वेतादिवर्णरहितं शब्दादिगुणवर्जितम् ।
कथयन्ति कथं तत्त्वं मनोवाचामगोचरम् ॥ ३७ ॥
पांढरा, काळा इत्यादि वर्णांनीरहित, शब्द स्पर्श इत्यादि गुणांनी रहित, व मन आणि वाणी यांना गोचर न होणारे तत्व, मी कसे वर्णावे ? (३७)

यदाऽनृतमिदं सर्वं देहादिगगनोपमम् ।
तदा हि ब्रह्म संवेत्ति न ते द्वैतपरम्परा ॥ ३८ ॥
हे सर्व देहादि द्वैतजात, घटाकाशाप्रमाणे मिथ्या आहे, असा जेव्हा दृढ निश्चय होईल, त्या वेळीच तुला ब्रह्मज्ञान होईल. आणि ही तुझी द्वैतपरंपरा नष्ट होईल. (३८)

परेण सहजात्मापि ह्यभिन्नः प्रतिभाति मे ।
व्योमाकारं तथैवैकं ध्याता ध्यानं कथं भवेत् ॥ ३९ ॥
आणि असे की माझा आत्मा परब्रह्माहून निराळा नाही हे मी जाणतो तेव्हा आकाशाप्रमाणे सर्वव्यापी, निराकर अद्वितीय आत्मस्वरूप परब्रह्मामध्ये ध्याता, ध्यान हा भेद कसा होईल ? (३९)

यत्करोमि यदश्नामि यज्जुहोमि ददामि यत् ।
एतत्सर्वं न मे किंचिद्विशुद्धोऽहमजोऽव्ययः ॥ ४० ॥
जे काही मी करतो, जे काही मी खातो, ज्याचे मी हवन करतो, किंवा जे मी देतो, त्यातील काहीही माझे नव्हे, कारण मी अत्यंत शुद्ध जन्मरहित व क्षयरहित आहे. (४०)

सर्वं जगद्विद्धि निराकृतीदं
     सर्वं जगद्विद्धि विकारहीनम् ।
सर्वं जगद्विद्धि विशुद्धदेहं
     सर्वं जगद्विद्धि शिवैकरूपम् ॥ ४१ ॥
वस्तुतः हे सर्वही जग निराकार, निर्विकार आणि विशुद्धात्मक व कल्याणरूप ब्रह्म आहे असे जाण. (४१)

तत्त्वं त्वं न हि सन्देहः किं जानाम्यथवा पुनः ।
असंवेद्यं स्वसंवेद्यमात्मानं मन्यसे कथम् ॥ ४२ ॥
परब्रह्म तूंच आहेस ह्यात काही संशय नाही तर मग आत्मा ज्ञानगम्य नाही हे कसे जाणतोस किंवा त्या आत्म्याला अनुभवगम्य तरी कसे मानितोस ? (४२)

मायाऽमाया कथं तात छायाऽछाया न विद्यते ।
तत्त्वमेकमिदं सर्वं व्योमाकारं निरञ्जनम् ॥ ४३ ॥
बाबारे माया किंवा अमाया (कौटिल्य आणि अकौटिल्य) ही कशी असणार ? कारण छाया आणि अछाया किंवा तम आणि प्रकाश हा आत्म्याच्या ठिकाणी भेदच नाही तर, हे सर्व दृश्य जात, निराकार निर्मल व एक असे जे आत्मतत्व तेच आहे. (४३)

आदिमध्यान्तमुक्तोऽहं न बद्धोऽहं कदाचन ।
स्वभावनिर्मलः शुद्ध इति मे निश्चिता मतिः ॥ ४४ ॥
जन्म स्थिति व मृत्यु हे मला नाहीत. मी कधीही ब्रद्ध होत नाही, मी स्वभावतःच निर्मल व शुद्ध आहे. अशी माझी निश्चित बुद्धि आहे. (४४)

महदादि जगत्सर्वं न किंचित्प्रतिभाति मे ।
ब्रह्मैव केवलं सर्वं कथं वर्णाश्रमस्थितिः ॥ ४५॥
अगदी मूळ प्रकृतीपासून तो ह्या स्थूल पदार्थापर्यंत मला काही भासत नाही. हे सर्वही केवळ ब्रह्म आहे. मग तेथे वर्णाश्रमव्यवस्था कोठून येणार ? (४५)

जानामि सर्वथा सर्वमहमेको निरन्तरम् ।
निरालम्बमशून्यं च शून्यं व्योमादिपञ्चकम् ॥ ४६ ॥
मी पूर्णपणे सर्वगत एक, निरंतर, कोणाच्याही आश्रयाने न राहणारा व सत्स्वरूप आहे, व आकाशादि भूतपंचक शून्यरूप (मिथ्या, सत्तारहित) आहे, हे मी जाणतो. (४६)

न षण्ढो न पुमान्न स्त्री न बोधो नैव कल्पना ।
सानन्दो वा निरानन्दमात्मानं मन्यसे कथम् ॥ ४७ ॥
ते आत्मतत्त्व षण्ढ नाही, पुरुष नाही, स्त्री नाही, वैषयिक ज्ञानरूप नाही किंवा कल्पना नाही, तर ते आनंदी किंवा आनंदरहित असे असता, आहे हे तरी कसे मानतोस ? (४७)

षडङ्‌गयोगान्न तु नैव शुद्धं
     मनोविनाशान्न तु नैव शुद्धम् ।
गुरूपदेशान्न तु नैव शुद्धं
     स्वयं च तत्त्वं स्वयमेव बुद्धम् ॥ ४८ ॥
ते परम तत्त्व यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार व ध्यान ह्या सहा योगांगांनी ज्ञात होत नाही. मनो विनाशाने ज्ञात होत नाही व गुरूपदेशाने ज्ञात होत नाही. कारण ते स्वतः सत्स्वरूप व ज्ञानस्वरूप आहे. (४८)

न हि पञ्चात्मको देहो विदेहो वर्तते न हि ।
आत्मैव केवलं सर्वं तुरीयं च त्रयं कथम् ॥ ४९ ॥
पंचभूतात्मक देह नाही व तद्विपरीत विदेहही नाही. सर्वच जर केवल आत्मा आहे तर तुरीयावस्था आणि जाग्रणादि तीन अवस्था तरी कशा सिद्ध होणार. (४९)

न बद्धो नैव मुक्तोऽहं न चाहं ब्रह्मणः पृथक् ।
न कर्ता न च भोक्ताहं व्याप्यव्यापकवर्जितः ॥ ५० ॥
मी बद्ध नाही, मुक्त नाही, मी ब्रह्माहून पृथक् नाही, कर्ता नाही व भोक्ताही नाही तर व्याप्यव्यापक धर्मानी रहित ब्रह्मच आहे. (५०)

यथा जलं जले न्यस्तं सलिलं भेदवर्जितम् ।
प्रकृतिं पुरुषं तद्वदभिन्नं प्रतिभाति मे ॥ ५१ ॥
जसे उदकांत उदक टाकले असता ते सर्व उदकच होऊन जाते, भेद कोणताही रहात नाही, तसेच प्रकृति व पुरुष या उभयतांचेही माझ्या दृष्टीने ऐक्य झाल्यामुळे मला हे सर्व भेदरहित भासत आहे. (५१)

यदि नाम न मुक्तोऽसि न बद्धोऽसि कदाचन ।
साकारं च निराकारमात्मानं मन्यसे कथम् ॥ ५२ ॥
जर तू मुक्त नव्हेस तर बद्धही कदापि नव्हेस. आत्मा साकार किंवा निराकार आहे असे तरी तू कसे समजणार ? (५२)

जानामि ते परं रूपं प्रत्यक्षं गगनोपमम् ।
यथा परं हि रूपं यन्मरीचिजलसन्निभम् ॥ ५३ ॥
तुझे परस्वरुप स्वसंवेद्य व गगनासारखे आहे तसेच दुसरे जे अपर (निकृष्ट) रुप ते मृगजळाप्रमाणे खोटे आहे. (५३)

न गुरुर्नोपदेशश्च न चोपाधिर्न मे क्रिया ।
विदेहं गगनं विद्धि विशुद्धोऽहं स्वभावतः ॥ ५४ ॥
मी बुद्धिस्थ परमात्मा स्वभावतः अति निर्मल देहरहित आकाशासारखा सर्वव्यापी आहे. मी कोणतीच क्रिया करीत नाही मला उपाधी नाही. मला गुरु किंवा गुरुपदेशाचीही अपेक्षा नाही. (५४)

विशुद्धोऽस्य शरीरोऽसि न ते चित्तं परात्परम् ।
अहं चात्मा परं तत्त्वमिति वक्तुं न लज्जसे ॥ ५५ ॥
तू अतिशुद्ध आहेस, अशरीरी आहेस. उत्कृष्टाहून उत्कृष्ट जे परब्रह्म ते तुझे चित्त नव्हे, असे असताना अहंबुद्धि आत्मा परमतत्त्व नव्हे, असे म्हणण्यास तुला लाज कशी वाटत नाही ? (५५)

कथं रोदिषि रे चित्त ह्यात्मैवात्मात्मना भव ।
पिब वत्स कलातीतमद्वैतं परमामृतम् ॥ ५६ ॥
बा चित्ता ! उगाच का रडतोस ? तू स्वस्वरुपाने आत्मा हो, आणि बाळा ! कलारहित असे जे श्रेष्ठ अद्वैतामृत त्याचे प्राशन कर. (५६)

नैव बोधो न चाबोधो न बोधाबोध एव च ।
यस्येदृशः सदा बोधः स बोधो नान्यथा भवेत् ॥ ५७ ॥
ज्ञान नाही, अज्ञान नाही, व ज्ञानाज्ञानही नाही अशा प्रकारचा ज्याला सर्वदा बोध झालेला आहे तो स्वतः बोधरूपच आहे, त्याखेरीज दुसरे काही नाही. (५७)

ज्ञानं न तर्को न समाधियोगो
     न देशकालौ न गुरूपदेशः ।
स्वभावसंवित्तिरहं च तत्त्व-
     माकाशकल्पं सहजं ध्रुवं च ॥ ५८ ॥
इंद्रियजन्य ज्ञान नाही, तर्क नाहीं समाधियोग नाही, देशकाल नाही व गुरुपदेश नाही, तर मी केवल ज्ञानरुप परमार्थ सत्य, आकाशासारखें सर्वव्यापी व स्वभावसिद्ध नित्य असे तत्त्व आहे. (५८)

न जातोऽहं मृतो वापि न मे कर्म शुभाशुभम् ।
विशुद्धं निर्गुणं ब्रह्म बन्धो मुक्तिः कथं मम ॥ ५९ ॥
मी कधी उत्पन्न होत नाही; मी कधी मरत नाही व मी शुभाशुभ कर्मही करीत नाही; तर मी उत्पन्न शुद्ध गुणरहित ब्रह्म आहे. त्या मला बंध व मोक्ष कसा होणार ? (५९)

यदि सर्वगतो देवः स्थिरः पूर्णो निरन्तरः ।
अन्तरं हि न पश्यामि स बाह्याभ्यन्तरः कथम् ॥ ६० ॥
जर प्रकाशस्वरुप आत्मा हा सर्व ठिकाणी आहे, स्थिर आहे, पूर्ण आहे, छिद्ररहित आहे व मी त्याच्यामध्ये अंतर पहात नाही, तर त्याला सबाह्यानंतर हे भेदसापेक्ष विशेषण कसे लावावे. (६०)

स्फुरत्येव जगत्कृत्स्नमखण्डितनिरन्तरम् ।
अहो मायामहामोहो द्वैताद्वैतविकल्पना ॥ ६१ ॥
(असे आहे तरी) हे सर्व जग सर्वत्र व सर्वदा अनुभवास येतच आहे. कायहो हा मायेचा प्रभाव ! ही सर्व द्वैता-द्वैत कल्पना हाच महामोह होय. (६१)

साकारं च निराकारं नेति नेतीति सर्वदा ।
भेदाभेदविनिर्मुक्तो वर्तते केवलः शिवः ॥ ६२ ॥
श्रुतीने मूर्त व अमूर्त अशा सर्वही सृष्ट पदार्थांचा 'हे नव्हे हे नव्हे' अशा रीतीने निषेध केल्यानंतर सर्वकाळी भेदाभेदरहित व केवल कल्याणरूप असा परमात्मा अवशिष्ट राहतो. (६२)

न ते च माता च पिता च बन्धु-
     र्न ते च पत्नी न सुतश्च मित्रम् ।
न पक्षपाती न विपक्षपातः
     कथं हि संतप्तिरियं हि चित्ते ॥ ६३ ॥
माता तुझी नव्हे, पिता तुझा नव्हे, तसेच बंधु, पत्नी, पुत्र, मित्र हे कोणीही तुझे नव्हेत. असे असताना तुझ्या अंतःकरणात उगाच का शोक ताप आहे. (६३)

दिवा नक्तं न ते चित्तं उदयास्तमयौ न हि ।
विदेहस्य शरीरत्वं कल्पयन्ति कथं बुधाः ॥ ६४ ॥
हे चित्ता, दिवस किंवा रात्र ही तुझी नव्हेत आणि उदय अथवा अस्तही तुझे नव्हेत. परंतु शहाणे लोक विदेहीला शरीर आहे अशी कशी कल्पना करता ? (६४)

नाविभक्तं विभक्तं च न हि दुःखसुखादि च ।
न हि सर्वमसर्वे च विद्धि चात्मानमव्ययम् ॥ ६५॥
ब्रह्मातिरिक्त दुसरे काही नसल्यामुळे मी सर्वांभूती विभक्तही नाही वे अविभक्तही नाही, वैषयिक सुखदुःखादी नाहीत व्याप्य-व्यापक नाही, तर मी क्षयरहित आत्मा आहे, असे जाण. (६५)

नाहं कर्ता न भोक्ता च न मे कर्म पुराऽधुना ।
न मे देहो विदेहो वा निर्ममेति ममेति किम् ॥ ६६ ॥
मी कर्ता नव्हे, मी भोक्ता नव्हे, मी पूर्वी काही कर्म केले नाही, व आता करीतही नाही. मला देह नाही, व मी देहारहितही नाही. असे असताना हे माझे नव्हे' व 'हे माझे' असे कसे म्हणता येईल? (६६)

न मे रागादिको दोषो दुःखं देहादिकं न मे ।
आत्मानं विद्धि मामेकं विशालं गगनोपमम् ॥ ६७ ॥
विषयवासनादि दोष मला नाहींत, देहादिक दुःखे मला नाहीत. तर मी गगनासारखा विशाल आत्मा आहे असे जाण. (६७)

सखे मनः किं बहुजल्पितेन
     सखे मनः सर्वमिदं वितर्क्यम् ।
यत्सारभूतं कथितं मया ते
     त्वमेव तत्त्वं गगनोपमोऽसि ॥ ६८ ॥
मित्रा मना ! इतकी व्यर्थ बडबड कशाला? कारण सख्या, हे सर्व असत्य आहे आणि सारभूत म्हणून जे काही ते मी तुला सांगितले की ते गगनासारखे तत्त्व तूच आहेस. (६८)

येन केनापि भावेन यत्र कुत्र मृता अपि ।
योगिनस्तत्र लीयन्ते घटाकाशमिवाम्बरे ॥ ६९ ॥
बया वाईट कोणत्याही स्थितिमध्ये व बर्‍या वाईट कोणत्याही स्थली योगी पुरुष मृत झाले, तरी घटाकाश महाकाशामध्ये जसे लीन होते तसे ते आत्म्यामध्येच लीन होतात. (६९)

तीर्थे चान्त्यजगेहे वा नष्टस्मृतिरपि त्यजन् ।
समकाले तनुं मुक्तः कैवल्यव्यापको भवेत् ॥ ७० ॥
काशीसारख्या क्षेत्रामध्ये किंवा चांडाळाच्या घरी नष्टस्मृति होऊन जरी योग्याचे प्राणोत्कम्रण झाले, तरी ज्ञानप्राप्तिक्षणीच मुक्त झालेला मरणोत्तर ब्रह्मस्वरुप प्राप्त होतो. (७०)

धर्मार्थकाममोक्षांश्च द्विपदादिचराचरम् ।
मन्यन्ते योगिनः सर्वं मरीचिजलसन्निभम् ॥ ७१ ॥
धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष हे पुरुषार्थ स्थावर जंगम आकाशादि सृष्टि ही सर्व योग्याला मृगजलाप्रमाणे भासतात. (७१)

अतीतानागतं कर्म वर्तमानं तथैव च ।
न करोमि न भुञ्जामि इति मे निश्चला मतिः ॥ ७२ ॥
मागे होऊन गेलेले, आता होत असलेले व पुढे होणारे कर्म मी करीत नाही, व मी त्यांच्या फलांचाही उपभोग घेत नाही असा माझा निश्चय झालेला आहे. (७२)

शून्यागारे समरसपूत-
     स्तिष्ठन्नेकः सुखमवधूतः ।
चरति हि नग्नस्त्यक्त्वा गर्वं
     विन्दति केवलमात्मनि सर्वम् ॥ ७३ ॥
शून्य (निर्जन) गृहामध्ये समत्व रसाने पवित्र होऊन ब्रह्मानंदात एकटाच राहणारा, सर्व संगत्यागी व देहाभिमान सोडून दिगंबर वृत्तीने रहातो, आणि त्याला केवळ ब्रह्मस्वरुपामध्ये त्यांच्या सर्व काम सर्व इच्छा पूर्ण होतात. (७३)

त्रितयतुरीयं न हि न हि यत्र
     विन्दति केवलमात्मनि तत्र ।
धर्माधर्मौ न हि न हि यत्र
     बद्धो मुक्तः कथमिह तत्र ॥ ७४ ॥
ज्याठिकाणी जागृतादिक तीन अवस्था नाहीत तसेच तुरीया अवस्थाही नाही, त्या आत्मस्वरुपात कैवल्य प्राप्ति होते. ज्या पुरुषाच्या ठिकाणी धर्म आणि अधर्म हा भेद नाही त्या बद्ध किंवा मुक्त असे कसे म्हणता येणार ? (७४)

विन्दति विन्दति न हि न हि मन्त्रं
     छन्दोलक्षणं न हि न हि तन्त्रम् ।
समरसमग्नो भावितपूतः
     प्रलपितमे तत्परमवधूतः ॥ ७५ ॥
अन्तःकरणाने पवित्र असणारा तो अवधूत कोणताही मंत्र प्राप्त करून घेण्याची इच्छा करीत नाही किंवा कोणतेही छंदरुपी तंत्र अवगत करून घेत नाही. तथापि तो आत्मानंदरसात नित्य मग्न असतो. (७५)

सर्वशून्यमशून्यं च सत्यासत्यं न विद्यते ।
स्वभावभावतः प्रोक्तं शास्त्रसंवित्तिपूर्वकम् ॥ ७६ ॥
हे सर्व शून्य नाही व अशून्यही नाही सत्य नाही व असत्यही नाही. परंतु शास्त्र ज्ञानपूर्वक लोकव्यवहाराला अनुसरून त्याचे हे वर्णन केले आहे. (७६)

इति श्रीदत्तात्रेयविरचितायां अवधूतगीतायां
आत्मसंवित्युपदेशो नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥
ह्याप्रमाणे श्रीदत्तात्रेयविरचित अवधूत गीतेतील आत्मसंवित्युपदेश (आत्मज्ञानोपदेश) नावाचा पहिला अध्याय संपूर्ण झाला.





GO TOP