[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाले, ''हे देवदेवे, आता गायत्री हृदय सांगा.''
नारायण म्हणाले, हे नारदा, अथर्व वेदात गायत्रीचे हृदय सांगितले आहे. ते अति गुह्य हृदय तुला सांगतो.
वेदमाता गायत्रीदेवीचे ध्यान करावे. तिच्या ठिकाणी या देवतांचे ध्यान करावे. पिंड- ब्रह्मांड यांचे ऐक्य आहे. म्हणून शरीर गायत्रीरूप आहे अशी भावना करावी. देवताशून्य हृदयाने देवीची पूजा करू नये.
गायत्रीच्या हृदयाचा ऋषी मीच आहे. गायत्री हा छंद व परमेश्वरी ही देवता आहे. प्रथम पूर्वोक्त सहा अंगे करावी. निर्जन ठिकाणी आसनस्थ होऊन एकचित्ताने ध्यान करावे. आता अर्थन्यास सांगतो.
मस्तकावर द्यौ दैवत, देवपंक्तीत अश्विनीकुमार, ओठावर दोन्ही संध्या, मुखावर अग्नी, जिभेवर सरस्वती, कंठात बृहस्पती, स्तनांचे ठिकाणी अष्टवसू बाहूवर मरुत्, हृदयात पर्जन्य, उदरात आकाश, नाभीत अंतरिक्ष, कटीच्या ठिकाणी इंद्राग्री, जघनदेशी प्रजापती, मांड्यांवर कैलास, गुडघ्यांवर विश्वदेव, जंघावर कौशिक, गुह्मस्थानी अयने, उरूंवर पितर, पायांवर पृथ्वी, अंगुलावर वनस्पती, रोमावर ऋषी, नखावर मुहूर्त, अस्थीमध्ये ग्रह, रक्त व मांस यावर ऋतू, निमिषाचे ठिकाणी संवत्सर, अहोरात्रींच्या ठिकाणी सूर्य व चंद्र यांची कल्पना करावी. नंतर प्रवर, दिव्य व सहस्त्र नेत्रांच्या गायत्रीला मी शरण जातो. त्या श्रेष्ठ सूर्यतेजास नमस्कार असो.
पूर्वदिशेस उत्पन्न झालेल्यास नमस्कार, सकाळी आदित्यमंडळात असलेल्या देवास नमस्कार. आदित्याच्या प्रतिष्ठेस नमस्कार. प्रातःकाळी अध्ययन करणारा रात्रीचे पातक नष्ट करो. सायंकाली अध्ययन करणारा दिवसाचे पाप नष्ट करो. दोन्ही वेळ अध्ययन करणारा तीर्थस्नानाप्रमाणे पवित्र व मान्य होतो, तो सर्व दोषांपासून मुक्त होतो.
प्रतिग्रह दोष, पंक्तिदूषण दोष, असत्य भाषण यांपासूनही मुक्त होतो. अब्रह्मचारी ब्रह्मचारी होतो. ह्या हृदयाच्या अध्ययनाने हजार ऋतूंचे पुण्य लाभते. साठकोटी गायत्रीजपाचे पुण्य मिळते. आठ ब्राह्मणंकडून याचे ग्रहण करावे म्हणजे सिद्धी होते. जो प्रातःकाली शुद्ध होऊन त्याचे अध्ययन करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो. तो ब्रह्मलोकी पूज्य होतो.''