मौन धारण करून आचमन करावे. संकल्प करून भूतशुद्धी करावी. मातृकन्यास करून षडंगन्यास करावा. शंख स्थापन करून अर्ध्य द्यावे. फट् मंत्राने पूज्याद्रव्याने प्रोक्षण करावे. गुरूची आज्ञा घेऊन पूजाकर्मास आरंभ करावा. पीठपूजन करून देवीचे ध्यान करावे. पंचामृत वगैरेंनी देवीस स्नान घालावे. जो इक्षुरसाने भरलेल्या शेकडो कलशांनी देवीस स्नान घालतो. तो जन्ममुक्त होतो.
जो वेदपारायण करून आम्ररसाने किंवा उसाच्या रसाने जगदंबिकेस न्हाऊ घालतो त्याच्या घरी रमा व सरस्वती वास करते. द्राक्षरसाने महेश्वरीस अभिषेक करणारा रसाच्या रेणूइतकी वर्षे देवलोकी पूज्य होतो. कर्षी, आगरू, काश्मीरकस्तुरी पदार्थ पाण्यात कालवावे. त्याने वेदपठण करीत देवीस स्नान घालणाराची शंभर जन्मीची पापे भस्म होतात. दुधाच्या घागरीने देवीस स्नान घातल्यास एक कल्पपर्यंत तो क्षीरसागरी रहातो. दह्याने स्नान घालणारा देवलोकातील दधिकुल्या नदीचा अधिपती होतो.
मध, घृत, साखर यांनी स्नान घातल्यास तो मधुकुल्या वगैरे नदीचा स्वामी होतो. हजार कलशांनी देवीस स्नान घालणारा इहलोकी व परलोकी सुखी होतो. दोन रेशमी वस्त्रे दिल्यास वायुलोकी जातो. रत्नभूषणे अर्पण करणारा निधीपती होतो. काश्मीरचंदन भागात शेंदूराचा बिंदू, चरणावर लतांची चित्रे अशी देवीची शोभा वाढविल्याने तो देवपती होतो. प्राप्त पुष्पांनी देवीची पूजा केल्यास कैलास प्राप्त होतो. बिल्वपत्रे अर्पण करणारास दुःख प्राप्त होत नाही. बेलाच्या तिन्ही पानांवर रक्तचंदनाने मायाबीज मंत्र लिहून चतुर्थांत नाव व पुढे नमः योजून उच्चारल्यास व भक्तीने केवळ त्रिदल अर्पण केल्यास मनुत्वच प्राप्ती होते.
जो कोटी दलांनी भुवनेश्वरीचे पूजन करतो तो ब्रह्मांडाचा अधिपती होतो. सुंदर कोटी कुंदपुष्पे अर्पण केल्यास प्रजापतित्व मिळते. अष्टगंधयुक्त मालती, मल्लिका पुष्पांनी पूजा केल्यास चतुर्मुख होतो. दहा कोटी पुष्पांनी पूजल्यास विष्णूत्व प्राप्त होते. कारण हे पद प्राप्त व्हावे म्हणून विष्णूनेही हे व्रत केले होते. शंभर कोटी पुष्पांनी देवीची पूजा केल्यास सूत्रात्मत्व प्राप्त होते. या व्रतामुळे एक जीव हिरण्यगर्भ झाला. जास्वंदी, तुंबा, डाळींबी फुले पूजेसाठी वापरावीत. या पुष्यांनी पुजा केल्यास फलाचे परिणाम सांगता येत नाही.
त्या त्या ऋतूमध्ये विविध पुष्पे सहस्रनामाने दरवर्षी महादेवीस अर्पण करतो तो महापातकी असला तरी मुक्त होतो. शेवटी श्रीपदकमलाप्रत पोहोचतो.
कर्पूर, चंदन, कृष्णागुरु, आज्यसंयुक्त, गुगुल असा महादेवीस धूप समर्पण करावा. त्यामुळे घर शुद्ध होते व देवी प्रसन्न होऊन साधकास त्रिभुवन अर्पण करते. कर्पूर दीप देवीस नित्य अर्पण करावा. त्यामुळे सूर्यलोकाची प्राप्ती होते. शंभर अथवा हजार दीप समर्पण करून पर्वताकाराचा नैवेद्य देवीस अर्पण करावा. तो लेह्य, चोष्य, पेय अशाप्रकारच्या सहा रसांनी युक्त असावा.
विविध प्रकारची मधुर, रसयुक्त फळे, सुवर्णपात्रातील अन्न देवीस समर्पण करावे. यामुळे महादेवी तृप्त होते. त्रिभुवनही तृप्त होते. कपूर, वाळा यांनी युक्त थंड, कलशात ठेवलेले शुद्ध गंगाजल देवीस पिण्यासाठी अर्पण करावे. नंतर कापुराच्या तुकड्यांनी युक्त, वेलदोडा, लवंग वगैरे घातलेला सुगंधी तांबूल देवीस अर्पण करावा. मृदंग, टाळ, वीणा, तबला, नौबद इत्यादी वाद्यांचा गजर करून गायन करावे. वेदांचे पारायण, स्तोत्र, पुराणे वगैरेंनी जगन्मातेस संतुष्ट करावे.
छत्र, चवर्या देवीस अर्पण कराव्या. देवीस राजोपचार अर्पण करावेत. देवीस प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा व जगन्मातेची नित्य क्षमा मागावी. अशी देवीची पूजा केल्यावर देवी काय बरे देणार नाही ? याविषयी एक गोष्ट सांगतो या वृत्तांतामुळे बृहस्थ राजर्षीस प्रिय वस्तु, भक्ती प्राप्त झाली.
हिमालयावर चक्रवाक पक्षी रहात होता. तो फिरत फिरत काशी क्षेत्री गेला. दैवयोगाने धान्य कणाच्या लोभाने तो अन्नपूर्णेच्या स्थानी गेला. त्या मुक्तीप्रद नगरीला एक प्रदक्षिणा घालून तो आकाशमार्गाने दुसर्या स्थानी गेला. पुढे कालवशात तो मृत्यू पावला व स्वर्गपुरीत गेला. तेथे दिव्यरूपाने त्याने विषयभोग भोगले.
दोन कल्प भोग भोगल्यावर तो पुनः पृथ्वीवर आला. सर्वोत्तम क्षत्रिय कुलात त्याचा जन्म झाला. तो बृहद्रथ नावाने प्रसिद्ध राजा झाला. तो यजन करणारा, धार्मिक, सत्यवादी, जितेंद्रिय, त्रिकालज्ञ असा सार्वभौम अजिंक्य होता. त्याला पूर्वजन्माचे स्मरण होते. ते ऐकल्यावर अनेक मुनी त्याच्याकडे गेले. राजाने त्यांना योग्य आसने दिली. ते सर्वजण म्हणाले, ''हे राजा, तुला पूर्वजन्मीची स्मृती असण्याचे कारण काय ? तुला त्रिकालज्ञान कसे प्राप्त झाले ? हे सर्व तू आम्हाला निष्कपटपणे सांग."
ते ऐकून तो राजा म्हणाला, ''हे मुनीश्रेष्ठहो, मी पूर्वी नीच योनीतील चक्रवाक पक्षी होतो. मी अज्ञानानेच पण अन्नपूर्णेस प्रदक्षिणा घातली. त्या पुण्याईच्या बलावर मी दोन कल्पर्यंत स्वर्गलोकी राहिलो. यामुळे मला त्रिकालज्ञता प्राप्त झाली. हे सर्व जगदंबेच्या पदस्मरणाचे फल आहे. त्या देवीच्या स्मरणाने माझ्या नेत्रात अश्रू उभे राहातात. देवीची भक्ती न करणार्या कृतघ्न पाप्यांचा धिक्कार असो.
शंकराची उपासना, विष्णूची सेवा, देवीची उपासना हे श्रुतींनी प्रतिपादिले आहे. भगवतीच्या चरणकमलाचे नित्य सेवन करावे. तिच्याहून या भूमंडळी श्रेष्ठ असे काही नाही. त्या श्रेष्ठ देवीची निर्गुण अथवा सगुण सेवा करावी.''
हे राजाचे बोलणे ऐकून ऋषी प्रसन्न झाले व स्वस्थानी निघून गेले. देवीच्या पूजनाचे फल कोणी विचारू नये, कोणी सांगू नये. ते फल निःसीम व अनिर्वचनीय आहे. ज्याच्या मनात देवीची भक्ती असते त्याचा जन्म सफल होय. ज्याचा जन्म संकटामुळे होतो त्याच्या ठिकाणी देवीविषयीची श्रद्धा उत्पन्न होत नाही.