[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारायणमुनी म्हणाले, ''ज्या द्विजांनी हे शिरोव्रत यथाशास्त्र धारण केले आहे त्यांनाच या परविद्येचा उपदेश करावा. इतरांना करू नये. शिरोव्रताच्या आचारानेच ब्रह्मदेव वगैरे देवता झाल्या. सर्व देव हे व्रत करतात. शिरोव्रत करणारा सर्व पापापासून मुक्त होतो. हे अथर्वण अरण्यात सांगितले आहे, म्हणून याला शिरोव्रत म्हणतात. त्याची प्राप्ती महत्पुण्याने होते.
इतर शाखात या व्रताची वेगवेगळी नावे सांगितली आहेत. पण सर्व शाखात हे व्रत एकच आहे. सर्व शाखात शिवसंज्ञक व सत्य ही वस्तु एकच आहे. तसेच ज्ञानही एकच आहे. शिरोव्रत शून्य होय. हे व्रत पापास दग्ध करते. त्याचे उत्तम आचरण करावे. अथर्वण वेदाची श्रुती सूक्ष्म आहे. त्यातून सूक्ष्म अर्थच प्रकाशित होतो. या व्रताचे नित्य अनुष्ठान करावे.
'अग्निरीतिभस्म' इत्यादी सहा मंत्रांनी शुद्ध केलेले भस्म सर्वांगास लावावे. हेच शिरोव्रत होय. ब्रह्मविद्येचा उदय होईपर्यंत संध्यासमयी हे व्रत करावे म्हणजे विद्या प्राप्त होते. शिरोव्रताने स्नान करणारास जो उपदेश करीत नाही. त्याची सर्व विद्या नष्ट होते. ब्रह्मविद्येचा उपदेश करणारा हजारो जन्म कारूणिक असतो. अज्ञानाच्या प्राबल्यामुळे द्वेष वाढतो. त्यामुळे आत्मज्ञान होत नाही. शिरोव्रत करणारे ब्रह्मोपदेशाचे अधिकारी आहेत.
हे पाशुपत व्रत ज्या द्विजांनी पाळले आहे त्यांना उपदेश द्या असे वेदवचन आहे. जो पशु असतो तो या व्रताने आपले पशुत्व टाकतो. त्रिपुंड्रधारणाविषयी जाबाल श्रुतीत आदराने वर्णन केले आहे.
म्हणून ॐकारसहित 'त्र्यंबकं यजामहे' इत्यादी मंत्राने व शिवाय नमः असे म्हणून त्रिपुंड्र धारण करावा. तीन वेळा ॐकाराचा उच्चार करून हंसः शूचिषद् या मंत्रांनी त्रिपुंड्र लावावा.
त्र्यंबकं व ॐ शिवाय नमः इति लाटे असे म्हणून गृहस्थ व वानप्रस्थ यांनी त्रिपुंड्र चर्चावा. मेधावी या मंत्राने ब्रह्मचार्याने त्रिपुंड्र धारण करावा. ब्राह्मणाने नित्य अनुष्ठान करावे. वैदिक मंत्रांनी सिद्ध केलेले भस्म देहास फासावे. रुद्रलिंगाची पूजा करावी. पंचाक्षर मंत्राचे उच्चार करून ललाट, हृदय, बाहू या ठिकाणी भस्म लावावे.
त्रियायुष व मेधावी मंत्राने ब्रह्मचार्याने व शिवाय नमः या मंत्राने शूद्राने भक्तीपूर्वक त्रिपुंड्र व भस्म लावावे. हा आचार सर्व धर्मात श्रेष्ठ व तत्त्वभूत आहे. अग्निहोत्रातील व विरजा अग्नीपासून झालेले भस्म घ्यावे. हे शुद्ध पात्रात ठेवावे. हातपाय धुऊन आचमन करावे. भस्म घेऊन पाच ब्रह्ममंत्रांनी तीन प्राणायाम करावे. अग्नितीरी भस्म या मंत्राने अभिमंत्रित करून त्याच सात मंत्रांनी तीन बेल्ली अभिमंत्रण करावे.
ॐ आपो ज्योति असे म्हणून ध्यान करावे. भस्म अंगास फासल्यामुळे मनुष्य पापरहित होतो. नंतर महाविष्णु व वरुण यांचे ध्यान करावे. भस्मात पाणी घालून कालवावे. शंकराचे ध्यान करावे. मस्तकावर भस्म उडवावे. ब्रह्मभूत होऊन त्याचेच पुनः ध्यान करावे. ललाट, वक्ष, स्कंध या ठिकाणी आपल्या आश्रमाप्रमाणे मंत्रोक्त, मध्यमा, अनामिका, अंगुष्ठा यांनी भस्म व त्रिपुंड्र लेपन करावे.