[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्री नारायण मुनी म्हणाले, ''हे नारदा, रुद्राक्षाचा महिमा ऐकल्यामुळे षडानन कृतार्थ झाला. आता त्याचे मंत्र व लक्षण सांगतो. रुद्राक्षाच्या दर्शनाने लक्षपट व स्पर्शाने कोटीपट पुण्य मिळते. रुद्राक्ष धारणाचे फल अधिक आहे. आवळ्याएवढे रुद्राक्ष श्रेष्ठ असतात. बोराएवढी मध्यम व हरभर्याएवढा अधम रुद्राक्ष होय.
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे शंकराच्या आज्ञेमुळे पृथ्वीवर वृक्ष झाले आहेत. म्हणून ज्याच्या त्याच्या जातीचा रुद्राक्ष शुभ होय, ब्राह्मणाने शुभ्रवर्णी, क्षत्रियाने लाल, वैश्याने पिवळे व शूद्राने काळे रुद्राक्ष धारण करावेत. ते सर्व तेजस्वी व काट्यांनी युक्त असावेत. ज्याला आपोआप छिद्र झाले असेल तो भूलोकी उत्तम होय. ज्याला प्रयत्नाने छिद्र पाडावे लागते तो मध्यम होय. रुद्राक्ष सारखे घेऊन रेशमी दोर्यात ओवावे. रुद्राक्षावर अतिशय विलक्षण सोन्याच्या रेघेसारखी रेघ ज्या ठिकाणी दिसते तो रुद्राक्ष उत्तम जाणावा. शिवभक्तांनी तो धारण करावा.
कुंडल, मुकूट, कणिका पुष्पांचा हार, कडे, बाहुबंध, यात नित्य हे रुद्राक्ष धारण करावेत. तीनशे रुद्राक्ष अधम, पाचशे मध्यम व हजार रुद्राक्ष धारण करणे हे उत्तम होय.
"ईशातः सर्वभूतानां ।" या मंत्राने मस्तकावर; "तत्पुरुषाय" या मंत्राने कानात; "अधोरेभ्यो" अशा मंत्राने ललाटावर व वक्षस्थलावर रुद्राक्ष धारण करावेत.
'वामदेवायनमो' या मंत्राने पन्नास, रुद्राक्ष माला उदरावर धारण करावी. 'सद्योजाताय' या ब्रह्ममंत्राने व अंगमंत्रांनी रुद्राक्ष धारण करावेत. एकमुखी रुद्राक्ष परमतत्त्वाचा प्रकाशक आहे.
त्यामुळे परमतत्त्वाचा साक्षात्कार होतो. द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारीश्वर होय. त्या योगे अर्धनारीश्वर नित्य प्रसन्न होतो. त्रिमुखी रुद्राक्ष अग्नी पासून तो स्त्रीहत्येचे दहन करतो. चतुर्मुख रुद्राक्ष म्हणजे ब्रह्मदेव होय. पुरुष आरोग्य व धनसंपन्न होतो. तो महाज्ञानी होतो. पंचमुखी रुद्राक्ष पंचब्रह्मरूप होय. त्यामुळे महेश्वर संतुष्ट राहतो. सहामुखी रुद्राक्षाची अधिदेवता कार्तिकेय होय. काही विद्वान विनायक ही देवता मानतात. सातमुखी रुद्राक्षाची सप्तमात्रा ही देवता आहे. सूर्य व सप्तर्षी याही त्याच्या देवता आहेत. त्याच्या धारणामुळे ज्ञान व शुद्धता प्राप्त होते.
अष्टमात्रा ही अष्टमुखी रुद्राची देवता आहे. शिवाय अष्टवसूही त्याची देवता आहे. त्यायोगे गंगा संतुष्ट होते. नऊमुखांचा रुद्राक्ष हा रामदेव आहे. तो यमापासूनची भीती नष्ट करतो. एकादश रुद्र ही अकरामुखी रुद्राक्षाची देवता आहे. शिवाय सुखदायी इंद्रही त्याची देवता आहेच. बारामुखी रुद्राक्ष विष्णुस्वरूप आहे. तेरामुखी रुद्राक्ष कामदेवरूप असून कामनापूर्ती करतो. रुद्राच्या नेत्रापासून चवदामुखी रुद्राक्ष उत्पन्न झाला आहे. तो सर्व व्याधींचा नाश करतो.
मद्य, मांस, कांदे, लसूण, गौदणीची फले, ग्रामसूकर यांचे भक्षण करताना रुद्राक्ष वर्ज्य करावेत. ग्रहण, विषुव काल (तुळ व मेष संक्रांतीचा काल) संक्रांत, उदगादी अयन प्रारंभ, दर्श, पौर्णिमा, कोणताही पुण्य दिवस या वेळी रुद्राक्ष धारण केले असता प्राणी सर्व पापापासून मुक्त होतो.