[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्री नारायणमुनी म्हणाले, "सामवेदात सांगितलेले मनसादेवीच्या पूजनाचे विधी मी तुला सांगतो."
"तिची कांती पांढर्या चाफ्याप्रमाणे असून रत्नालंकारांनी ती विभूषित आहे. अग्नीप्रमाणे शुद्ध वस्त्र तिने परिधान केले आहे. ती नागाचे यज्ञोपवीत ल्याली असून ती सिद्धरूपिणी आहे. अशा त्या देवीची मी भक्ती करतो."
अशाप्रकारे तिचे ध्यान करावे. निरनिराळे नैवेद्य, धूप, गंध, पुष्पे वगैरे पूजासाहित्य घेऊन मूलमंत्राने तिची पूजा करावी. तिचा कल्पतरू नावाचा इष्ट द्वादशाक्षरी मंत्र आहे.
"ॐ र्हीं क्लीं मनसादेव्यै स्वाहा" हा मंत्र पाच लक्ष जपल्यास मंत्र सिद्ध होतो. मंत्रसिद्धी प्राप्त होणार्यास विषही अमृताप्रमाणेच भासते. संक्रांतपर्वकाळी, एकांतात, सुस्नात होऊन तिचे भक्तीभावे पूजन करणारा धन, पुत्र व कीर्ती यांनी युक्त होतो.
पूर्वी भूलोकामध्ये नागजातीच्या भयाने मानव कश्यपास शरण गेले. तेव्हा त्यासह कश्यपमुनी ब्रह्मदेवाला शरण गेले. नंतर ब्रह्मदेवाने सांगितले म्हणून कश्यपाने काही मंत्र तयार केले. वेदबीजाला अनुसरून त्याने मंत्र बनविले होते. नंतर त्याने मनसाला उत्पन्न केले. तप करून मनानेच तिची निर्मिती व पोषण केले. तेव्हा ही मनसा उत्पन्न झाल्यावर कैलासावरील शिवमंदिरात गेली. तेथे तिने चंद्रशेखराचे पूजन केले. देवांची दहा हजार वर्षे तिने सेवा केली. तेव्हा महेश्वर प्रसन्न झाला व त्याने तिला महाज्ञान दिले. सामवेद व अष्टाक्षरी कृष्णमंत्र तिला सांगितला.
लक्ष्मी, माया, काम यांचे बीज योजून चतुर्थ्यात कृष्णाय असे पद योजावे. नंतर पुढे नमः हे पद ठेवावे. असा तो अष्टाक्षरी मंत्र होता. नंतर शंकराने तिला मंगलनामक कवच, पूजेचा विधीक्रम, पुरश्चरणविधी, मृत्युंजय मंत्र दिला. त्यानंतर तिने तीन युगे पुष्कर क्षेत्रावर श्रीकृष्ण परमात्म्याचे तप केले. तेव्हा त्या प्रभूने तिला दर्शन दिले.
नंतर कृश झालेल्या मनसेची प्रभूने पूजा केली. तिला वर दिला की, "तू संसारात पूज्य होशील." नंतर श्रीहरी अंतर्धान पावला.
हे नारदा, कृष्णपरमात्म्याने तिचे पूजन केल्यावर शंकर, कश्यप, देव, मुनी, नाग, मानव यांनी तिची पूजा केली. त्यामुळे ती त्रैलोक्यात पूज्य झाली. नंतर जरत्कारूने तिला वरले. त्यांच्या विवाहानंतर एके दिवशी पुष्करक्षेत्री जरत्कारू मुनी तिच्या मांडीवर मस्तक ठेवून निद्रिस्त झाला होता. सूर्य अस्तास जाण्याचे वेळी पतीच्या धर्मकालाचा लोप होऊ नये म्हणून त्याला उठविण्याचा ती विचार करू लागली. तिने पतीला जागृत केले. पण त्यामुळे तो मुनीश्रेष्ठ क्रुद्ध झाला. तो म्हणाला, "पतीच्या निद्रेचा भंग केलास, त्यामुळे तुझी व्रतवैकल्ये व्यर्थ होत. पतीचे पूजन कृष्णाचे पूजन होय. पतिव्रतेच्या व्रताचे वेळी स्वतः हरी पतीरूप होत असतो. व्रतादि सर्व धर्मकृत्ये पतिसेवेच्या सोळाव्या कलेएवढीपण नाहीत. तेव्हा अशा स्त्रीस कोणते फल मिळते ते तुला सांगतो. "ती प्रथम चंद्रसूर्य असेपर्यंत कुंभीपाक नरकात पडते. नंतर पतिपुत्ररहित ती चांडाली होते."
असे सांगितल्यावर ती स्त्री भयग्रस्त झाली. ती म्हणाली, "आपल्या धर्मकृत्यांचा लोप न व्हावा म्हणून मी आपणास जागृत केले. पण मज पापिणीला क्षमा करावी." असे म्हणून पतीच्या चरणावर मस्तक ठेवून ती रडू लागली. ते अवलोकन करताच त्या मुनीने सूर्यालाच शाप देण्याचा विचार केला. तेव्हा भानू संध्येसह तेथे आला व मोठया विनयाने म्हणाला, "हे ब्राह्मणा, धर्मलोप होऊ नये म्हणून त्या साध्वीने तुझा निद्राभंग केला. त्यात तिचा काय अपराध ? मी तुला शरण आलो आहे. तू आम्हाला क्षमा कर. ब्राह्मणाने शाप देणे योग्य नव्हे. कारण जाज्वल्य ब्रह्मतेजामुळे ब्राह्मण हा प्राणी ब्रह्मकुंडात उत्पन्न होतो. म्हणून त्याने ब्रह्मज्योतीचे कृष्णरूप ध्यान करावे."
तेव्हा जरत्कारू संतुष्ट झाला. सूर्यही स्वस्थानी गेला. पण प्रतीज्ञापूर्तीसाठी त्याने आपल्या पत्नीचा त्याग केला. तेव्हा तिने गुरु, देव, शंभू, विधी, हरी, कश्यप यांचे स्मरण केले. त्याचक्षणी ते सर्वजण तेथे आले. तेव्हा त्या ब्राह्मणाने भक्तीभावाने सर्वांची स्तुती केली. सर्वांना नमस्कार करून त्याने विचारले, "तुम्ही का आलात ?" ब्रह्मदेव म्हणाले, "जर तुला भार्येचा त्यागच करायचा असेल तर तू तिच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न कर. पुत्राविना स्त्रीचा जो पती त्याग करतो त्याचे पुण्य चाळणीतील पाण्याप्रमाणे गळून जाते." ते ऐकताच जरत्कारूने योग सामर्थ्याच्या बलावर मनसेच्या नाभिस मंत्रपूर्वक स्पर्श केला. तो तिला म्हणाला, "हे मनसे, तुला होणारा पुत्र जितेंद्रिय, धर्मतत्पर, तेजस्वी, तपस्वी, सर्वगुणसंपन्न, वेदवेत्त्यात श्रेष्ठ, ज्ञानी, योगी असा यशस्वी होईल. तो विष्णूभक्त उभय कुले उद्धरील. त्याच्या जन्माबरोबरच सर्व पितर आनंदाने नाचू लागतील. जी स्त्री साध्वी व सुशील असते तसाच तिचा पुत्र होतो. यमाच्या तावडीतून सोडविणारी दया हीच खरी भगिनी, विष्णुभक्ती, विष्णु मंत्र देणारा व शुद्ध ज्ञान देणारा तोच खरा गुरु होय. कृष्णाची जाणीव करून देणारे श्रेष्ठ ज्ञान होय. हरीहून दुसरे श्रेष्ठ काही नाही.
हे साध्वी, तुला मी ज्ञानाचे सार सांगितले. जो ज्ञान देतो तोच स्वामी होय. कारण ज्ञानामुळे प्राणी मुक्त होतो. जो बंधनातून मुक्त करीत नाही तो गुरु, पिता अथवा बंधू व्यर्थ होय. अविनाशी असा कृष्णदर्शनाचा मार्ग जो दाखवीत नाही तो आप्त व्यर्थच
होय. म्हणून हे साध्वी, तू परब्रह्माची आराधना कर. कारण ते ब्रह्मच कृष्णरूप आहे. त्याच्या सेवेमुळे कर्माचा मूळासहित नाश होतो.
हे प्रिये, मी स्वार्थामुळेच कपट करून तुझा त्याग केला. म्हणून मला क्षमा कर. पतिव्रता स्त्रिया क्षमाशील असतात. हे देवी, सांप्रत मी पुष्करतीर्थावर तपश्चर्येस जात आहे. कारण मला कृष्णाच्या चरणकमलाशिवाय काहीही नको. तू कोठेही जा."
हे पतीचे भाषण ऐकून मनसा अश्रुपूर्ण नेत्रांनी म्हणाली, "हे प्रभो, वस्तुतः माझा त्याग करण्यासारखा अपराध मजकडून घडला नाही. म्हणून मी जेव्हा आपले स्मरण करीन तेव्हा आपण दर्शन द्यावे. स्त्रियांना प्राणनाथाच्या वियोगामुळे मरणप्राय दुःख होते. पतिव्रतांना शंभर पुत्रांपेक्षाही पतीच प्रिय असतो. साध्वी स्त्रियांचे मन सदैव पतीच्या ठिकाणीच स्थिर असते."
असे म्हणून ती पतीच्या चरणावर कोसळली. जरत्कारूने तिला आपल्या मांडीवर बसवले व आपल्या अश्रूंनी तिला न्हाऊ घातले. वियोगाच्या दुःखाने मनसेने मुनीची मांडी भिजवून टाकली. पण ज्ञानामुळे ती दोघेही सत्वर शोकमुक्त झाली. नंतर तो मुनी पत्नीची समजूत घालून निघून गेला. इकडे मनसा आपल्या गुरूदेव शंकराच्या घरी गेली. तेथे तिला पार्वतीचा उपदेश झाला. पुढे योग्य काली तिला नारायणाच्या अंशरूप असा सुलक्षणी पुत्र झाला. शंकराने त्याचे जातकर्म केले व त्याला संपूर्ण वेद शिकविले. तसेच त्याला मृत्युंजय असे ज्ञान दिले. मनसेचा पुत्र अस्तिक हा अद्वितीयच होता. शंकराने सांगितल्यावरून तो पुष्कर तीर्थावर तपासाठी गेला. देवांची तीन लक्ष वर्षे त्याने महामंत्राचा जप करून तप केले. नंतर तो पुनः शंकरास नमस्कार करण्यासाठी कैलासावर गेला. नंतर मनसा आपल्या पुत्राला घेऊन पित्याकडे गेली. त्यामुळे त्या प्रजापतीलाही अपार आनंद झाला. तेथेच ती राहू लागली.
एकदा अभिमन्यूचा पुत्र परीक्षित राजाला सात दिवसानंतर तुला सर्पदंशाने मृत्यू येईल असा एक ब्राह्मणाचा शाप झाला. ते ऐकून राजा देहरक्षणासाठी निर्वात जागी राहू लागला. एक धन्वंतरी राजाला वाचविण्यास जात होता. पण तक्षकाने त्याला अद्भुत मणी देऊन परत पाठवले व अंतरिक्षातील वाडयात जाऊन मंचकारूढ झालेल्या राजाला दंश केला. नंतर जनमेजयाने पित्याचे सर्व संस्कार केले. पुढे त्याने सर्पयज्ञ केला. तेव्हा भयभीत होऊन तक्षक इंद्राला शण गेला. हे जाणताच इंद्राचीच आहुती देण्याचे त्याने मनात आणले. तेव्हा सर्व सर्प मनसेला शरण गेले. अस्तिकाने राजाकडे येऊन त्याला सर्पांना जीवदान देण्यास सांगितले. ते राजाने कबुल केले. ब्राह्मणांनाही विपुल दक्षिणा दिल्या.
प्राण वाचवल्याबद्दल इंद्राने व तक्षकासह सर्व सर्पांनी विधियुक्त मनसेचे पूजन केले व तिला आवडता बली अर्पण केला. नंतर सर्वजण स्वस्थानी निघून गेले. इंद्राने प्रथम सुस्नात होऊन आचमन घेतले. शुद्ध वस्त्र लेवून रत्नमय मंचकावर मनसा देवीची स्थापना केली. रत्नकुंभातून गंगोदक आणले. अद्वितीय वस्त्रे तिला अर्पण केली. प्रथम गणेश, सूर्य, अग्नी, विष्णू, शिव व गौरी या देवतांचे पूजन केले. नंतर -
"ॐ र्हीं श्रीं मनसादेव्यै स्वाहा" या मंत्राने तिचे पूजन केले. तिला सोळा उपचार अर्पण करून मंगल वाद्यांचे ध्वनी केले. तिच्यावर पुष्पवृष्टी केली. इंद्र म्हणाला, "हे देवी, तू सर्वोत्तम साध्वी स्त्री आहेस. तूच परात्पर परम प्रकृती असल्यामुळे इच्छा असूनही मी तुझे स्तवन करण्यास समर्थ नाही. वेदांनी तुझ्या स्वभावाचे वर्णन केलेच आहे. तू शुद्ध सत्त्वरूप आहेस. म्हणून जरत्कारू मुनी तुला सोडण्यास सत्वर समर्थ झाला नाही. त्यानेही जाताना तुझीच पूजा केली. हे देवी, माता अदितीप्रमाणे तू मला प्रिय आहेस. तू दयारूप भगिनी व क्षमारूप माता आहेस. माझे सर्व भार्या, पुत्रांसह रक्षण केलेस.
हे जगदंबिके, तू सर्वांना सर्व स्थळी, सर्व काली पूज्य आहेस. आषाढातील संक्रांतीस, कोणत्याही पंचमीस अगर महिन्याच्या अखेरच्या दिवशी जे पूजन करतील त्यांच्या पुत्रपौत्रादि संपत्तीची वृद्धी होईल. गुण व यश यांनी ते विख्यात होतील. तुझे पूजन करण्याऐवजी तुझी निंदा करणार्यास नित्य नागांचे भय आहे. तूच वैकुंठीची कमलाक्षा लक्ष्मी आहेस. तसेच तूच देवाची शक्ती आहेस. तू सर्वांना वंद्य होशील व सर्वत्र तुझे पूजन होईल. तूच सत्यस्वरूप देवी आहेस."
अशाप्रकारे तिची स्तुती केल्यावर तिजकडून वर मागून घेऊन इंद्र स्वस्थानी निघून गेला. प्रत्यक्ष इंद्रासारख्या भ्रात्यानेच तिची पूजा केली. त्यामुळे ती सर्व वंद्य होऊन चिरकालपर्यंत आपल्या पुत्रासह पित्याकडे राहिली. कामधेनूनेही तिला दुधाने न्हाऊ घातले. कामधेनूने तिला अत्यंत दुर्लभ ज्ञान दिले.
पुढे देवांनाही पूज्य असलेली ती स्वर्गलोकी गेली. इंद्राने तिचे केलेले स्तोत्र म्हणजे पुण्याचे बीजच आहे. हे स्तोत्र पठण करणार्यास वंशपरंपरा नागापासून भय नाही. हे स्तोत्र सिद्ध झाल्यावर विषही अमृताप्रमाणे लागते, तसेच तो सर्पांवर शयन करू शकतो, सर्पाला वाहन व्हायला लावतो.
नारद म्हणाले, "हे ब्राह्मणश्रेष्ठा, मनसादेवीकडे गोलोकातून आलेली सुरभी कोण ? तिचे चरित्र कथन करा."