[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ब्रह्मदेव अशाप्रकारे आशीर्वाद देऊन स्वस्थानी निघून गेला. तेव्हा स्वर्गात दुंदुभी वाजल्या व आकाशातून पुष्पवृष्टी झाली. नवीन संगमामुळे ते दोघेही संभोगसुखांत बुडून गेले. त्यांनी कामशास्त्रात सांगितल्याप्रमाणे चौसष्ट कलांनी शरीरसुख भोगले. अत्यंत रमणीय अशा शय्येवर साजशृंगार करून त्यांनी यथेच्छ क्रीडा केली. पण तरीही सुरतात दोघेही तृप्त झाली नाहीत. त्यांनी एकमेकांबरोबर कामचेष्टा केल्या. त्या शंखचूडाने नखाग्रांनी तिच्या वक्षावर व्रण पाडले. तिने आपल्या हातातील अलंकाराने त्याच्या डाव्या बाजूवर ओरखडले. त्याने तिच्या ओठांचे दातांनी चावे घेतले. तिनेही त्याच्या गंडस्थलावर चावे काढले. आलिंगन, चुंबन, मांडयांचे मर्दन इत्यादी सर्व प्रकार झाले. ते दोघेही रतिनिपुण असल्याने सुख भोगीत होते. अखेर रतिक्रीडा संपल्यवर त्यांनी इच्छेप्रमाणे वस्त्रे परिधान केली. तिने त्याच्या वक्षावर चंदनतिलक लावला. त्याच्या सर्वांगास उटी लावली. सुवासिक तांबूल दिला. पारिजात पुष्प व अंगठी अर्पण केली. नंतर तिने आपल्या पतीस नम्रतेने नमस्कार केला. ती म्हणाली, "ती तुमची दासी आहे."
त्याने त्या सुंदर स्त्रीला अनिमिष नेत्रांनी पाहून घेतले. नंतर तिला हृदयाशी ओढून घेतले. नंतर बिंबफलाप्रमाणे असणार्या ओठांचे व गालांचे त्याने पुनः चुंबन घेतले. वरुणापासून आणलेली वस्त्रे त्याने तिला अर्पण केली. एक उत्कृष्ट रत्नमाला दिली.
मंजीरीची जोडी, छायेचे कडे, रोहिणीचे कुंडल, रतीची कर्णभूषणे, उत्तम अंगठया, विश्वकर्त्याचा नक्षीदार शंख, विचित्र पद्म, उत्तम प्रकारची दुर्लभ शय्या, विविध भूषणे वगैरे सर्व अर्पण करून तो तिच्याकडे पाहून हसला. नंतर विविध प्रकारची सुगंधी द्रव्ये व रंगीत वस्तु देऊन तिचा शृंगार केला. तो म्हणाला, "हे देवी, मी तुझा दास आहे."
पुनः एकदा त्याने तिला आपल्या हृदयाशी धरले. नंतर ते वन सोडून तो दुसर्या स्थानी गेला.
निरनिराळ्या देवतांचे वस्तीस्थान असलेले आणि पर्वतांनी युक्त अशा त्या मलय पर्वतावर तो गेला. सुंदर वृक्ष, फले, यांनी सुशोभित, भृंगांच्या गुंजारवामुळे नादमय, पुण्योदकाने युक्त व पवित्र अशा कांचनगिरीवर तो त्या आपल्या स्त्रीसह गेला. तेथे त्यांनी बराच कालपर्यंत क्रीडा केली. पण तरीही दोघांचीही तृप्ती झाली नाही. उलट दोघांच्यातही मदनव्यथा जास्तच वाढली. अशाप्रकारे त्या शंखचूडाने एक मन्वंतरभर पुनः पुन्हा क्रीडा करून पूर्णपणे उपभोग घेतला.
त्या राजाने देव, असुर, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस यांना शांती दिली. सर्वांचे अधिकार काढून घेतले होते असे सर्व देव भिक्षुकाप्रमाणे फिरू लागले. ते सर्वजण खिन्न होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी रडत रडत सर्व वृत्तांत त्याला सांगितला. ब्रह्मदेव सर्वांना घेऊन शंकराकडे गेले. त्या चंद्रेश्वराला त्यांनी सर्व निवेदन केले. तेव्हा ते भगवान शिव सर्वांसह विष्णूकडे गेले. कारण ते एकमेव स्थान जरा, मरण, भय या सर्वांचे निवारण करणारे होते. तेथे द्वापारसुद्धा रत्नजडित मंचकावर पीत वस्त्रे धारण करून बसला होता. नंतर ते शंख, चक्र, गदा, पद्म वगैरे धारण करणार्या हरीकडे गेले. सोळा दारे ओलांडल्यावर ते सर्वजण हरीकडे पोहोचले. तेथे पार्षद नारायणाची स्तुती व सेवा करीत होते.
हरीची ती सभा असंख्य रत्नमालांनी भूषित होती. चंद्रमंडलाप्रमाणे तिचा आकार होता.
तेथील आसन रत्नांनी मढविलेले होते. अशारीतीने विविध रत्नालंकारांनी विभूषित असलेल्या स्थानी सर्व देवांनी, त्या श्रीहरीस पाहिले. अमूल्य रत्नांनी मढवलेल्या सिंहासनावर श्रीहरी विराजमान झाला होता. त्याच्या सर्वांगावर चंदन शिंपडले होते. त्याने हातात कमल घेतले होते. समोर चालू असलेले नृत्य-गायन तो पहात होता. तो सरस्वतीपती शांत होता. लक्ष्मी त्याच्या पदकमलाजवळ बसून पाय चेपीत होती. त्याने सुवासिक तांबूल भक्षण केला होता. गंगा भक्तीभावाने चौर्या ढाळीत होती.
अशा त्या देवाधिदेवाची ब्रह्मा वगैरे सर्व देव स्तुती करू लागले. त्यांची शरीरे रोमांचित झाली होती. अश्रुपूर्ण नेत्र होऊन कंठ दाटला होता. ते सर्व भक्त भयग्रस्त झाले होते. त्यांनी सर्व वृत्तांत हरीला कथन केला. तो सर्वभाव जाणणारा हरी म्हणाला, "हे कमलोद्भवा, माझ्या गोप नावाच्या भक्ताचा म्हणजे शंखचूडाचा सर्व पूर्व इतिहास मी जाणतो. आता त्याचे गोलोकातील पुण्यमय, पापघ्न चरित्र मी तुला सांगतो."
सुदामा म्हणून माझा एक थोर पार्षद होता. पण त्याला राधेच्या शापामुळे दानवयोनीत जन्म घ्यावा लागला. मीही एकदा त्या रासमंडळात गेलो होतो. तेव्हा गोपी विरजा माझ्याबरोबर होती. प्राणाहून प्रिय असलेल्या त्या राधेला हे सहन झाले नाही. पण विरजा नदीरूप होती. मीही गुप्त होतो, त्यामुळे राधा तशीच परत स्वस्थानी गेली.
मी सुदाम्यासह मंदिरात असलेला पाहून तिने माझी निर्भर्त्सना केली. म्हणून सुदाम्याला क्रोध आला. माझ्यादेखतच त्याने तिला दोष दिला. ते ऐकताच ती रागाने लाल झाली. सुदाम्याला बाहेर घालविण्याविषयी तिने मला आज्ञा केली. त्याचवेळी तिच्या एक लक्ष सख्या एकदम उठल्या. त्यांनी सुदाम्याला बाहेर काढले. तेव्हा सुदाम्याने प्रतिकार केला, म्हणून तिने सुदाम्याला शाप दिला - "तू दानवयोनीत जन्माला जा."
तेव्हा तो रडू लागला. म्हणून राधेलाही वाईट वाटले. कारण मीही बाहेर जाऊ लागलो. तिने माझे निवारण करण्याचा प्रयत्न केला.
"अरे, कोठे जातोस ? थांब, जाऊ नकोस." असे म्हणत तीही मागोमाग निघून गेली. त्यामुळे सर्व गोपीही रडू लागल्या. गोप दुःखीकष्टी झाले. मग मी राधिकेची व इतरांची समजूत घातली. "आता एका क्षणार्धात तो शाप भोगून परत येईल." "तू परत येथे ये." असे मी सुदाम्याला सांगितले, त्यामुळे राधेचेही निवारण झाले. हे ब्रह्मदेवा, गोलीकीचा क्षणार्ध म्हणजे पृथ्वीवरील एक मन्वंतर होय. म्हणून शंखचूड आता पुन्हा त्या ठिकाणी जाईल. तो महाबलाढय असून सर्व मायेत निपुण आहे. आता माझा हा शूल घेऊन तुम्ही सत्वर भारतवर्षात जा. शंकराने माझ्या शूलाच्या सहाय्याने त्या दानवांचा संहार करावा. माझे मंगल कवच तो कंठांत धारण करतो म्हणून तो सर्वविजयी झाला आहे.
सांप्रत त्या श्रेष्ठाला मारण्यास कोणीही समर्थ नाही. त्याच्या पत्नीच्या सतित्त्वाची हानी झाल्यावरच त्याला मृत्यू येईल. मी त्याच्या पत्नीच्या उदरात बीजारोपण करीन. त्याचवेळी त्याचा वध होईल."
असे सांगून श्रीहरी जगन्नाथाने शंकराला शूल दिला. नंतर तो श्रीहरी सत्वर अंतर्गृहात गेला. ब्रह्मदेव वगैरे सर्वजण भारतवर्षात गेले.