श्रीनारायण उवाच
तेषु वर्षेषु देवेशाः पूर्वोक्तैः स्तवनैः सदा ।
पूजयन्ति महादेवीं जपध्यानसमाधिभिः ॥ १ ॥
सर्वर्तुकुसुमश्रेणी शोभिता वनराजयः ।
फलानां पल्लवानां च यत्र शोभा निरन्तरम् ॥ २ ॥
तेषु काननवर्षेषु वर्षपर्वतसानुषु ।
गिरिद्रोणीषु सर्वासु निर्मलोदकराशिषु ॥ ३ ॥
विकचोत्पलमालासु हंससारससञ्चयैः ।
विमिश्रितेषु तेष्वेव पक्षिभिः कूजितेषु च ॥ ४ ॥
जलक्रीडादिभिश्चित्रविनोदैः क्रीडयन्ति च ।
सुन्दरीललितभ्रूणां विलासायतनेषु च ॥ ५ ॥
तत्रत्या विहरन्त्यत्र स्वैरं युवतिभिः सह ।
नवस्वपि च वर्षेषु भगवानादिपूरुषः ॥ ६ ॥
(नारायणाख्यो लोकानामनुग्रहरसैकदृक् ।)
देवीमाराधयन्नास्ते स च सर्वैश्च पूज्यते ।
आत्मव्यूहेनेज्ययासौ सन्निधत्ते समाहितः ॥ ७ ॥
इलावृते तु भगवान् पद्मजाक्षिसमुद्भवः ।
एक एव भवो देवो नित्यं वसति साङ्गनः ॥ ८ ॥
तत्क्षेत्रे नापरः कश्चित्प्रवेशं वितनोति च ।
भवान्याः शापतस्तत्र पुमान्स्त्री भवति स्फुटम् ॥ ९ ॥
भवानीनाथकैः स्त्रीणामसंख्यैर्गणकोटिभिः ।
संरुध्यमानो देवेशो देवं सङ्कर्षणं भजन् ॥ १० ॥
आत्मना ध्यानयोगेन सर्वभूतहितेच्छया ।
तां तामसीं तुरीयां च मूर्तिं प्रकृतिमात्मनः ॥ ११ ॥
उपधावते चैकाग्रमनसा भगवानजः ।
श्रीभगवानुवाच
ॐनमो भगवते महापुरुषाय
सर्वगुणसंख्यानायानन्तायाव्यक्ताय नम इति ॥ १२ ॥
भजे भजन्यारणपादपङ्कजं
भगस्य कृत्स्नस्य परं परायणम् ।
भक्तेष्वलं भावितभूतभावनं
भवापहं त्वा भव भावमीश्वरम् ॥ १३ ॥
न यस्य मायागुणकर्मवृत्तिभि-
र्निरीक्षितो ह्यण्वपि दृष्टिरज्यते ।
ईशे यथा नो जितमन्युरंहसा
कस्तं न मन्येत जिगीषुरात्मनः ॥ १४ ॥
असद्दृशो यः प्रतिभाति मायया
क्षीबेव मध्वासवतागम्रलोचनः ।
न नागवध्वोऽर्हण ईशिरे ह्रिया
यत्पादयोः स्पर्शनधर्षितेन्द्रियाः ॥ १५ ॥
यमाहुरस्य स्थितिजन्मसंयमं
त्रिभिर्विहीनं यमनन्तमॄषयः ।
न वेद सिद्धार्थमिव क्वचित्स्थितं
भूमण्डलं मूर्धसहस्रधामसु ॥ १६ ॥
यस्याद्य आसीद् गुणविग्रहो महान्
विज्ञानधिष्ण्यो भगवानजः किल ।
यत्संवृतोऽहं त्रिवृता स्वतेजसा
वैकारिकं तामसमैन्द्रियं सृजे ॥ १७ ॥
एते वयं यस्य वशे महात्मनः
स्थिताः शकुन्ता इव सूत्रयन्त्रिताः ।
महानहंवैकृततामसेन्द्रियाः
सृजाम सर्वे यदनुग्रहादिदम् ॥ १८ ॥
यन्निर्मितां कर्ह्यपि कर्मपर्वणीं
मायां जनोऽयं गुरुसर्गमोहितः ।
न वेद निस्तारणयोगमञ्जसा
तस्मै नमस्ते विलयोदयात्मने ॥ १९ ॥
श्रीनारायण उवाच
एवं स भगवान् रुद्रो देवं सङ्कर्षणं प्रभुम् ।
इलावृतमुपासीत देवीगणसमाहितः ॥ २० ॥
तथैव धर्मपुत्रोऽसौ नाम्ना भद्रश्रवा इति ।
तत्कुलस्यापि पतयः पुरुषा भद्रसेवकाः ॥ २१ ॥
भद्राश्ववर्षे तां मूर्तिं वासुदेवस्य विश्रुताम् ।
हयमूर्तिभिदा तां तु हयग्रीवपदाङ्किताम् ॥ २२ ॥
परमेण समाध्यन्यवारकेण नियन्त्रिताम् ।
एवमेव च तां मूर्तिं गृणन्त उपयान्ति च ॥ २३ ॥
भद्रश्रवस ऊचुः
ॐ नमो भगवते धर्मायात्मविशोधनाय नम इति ।
अहो विचित्रं भगवद्विचेष्टितं
घ्नन्तं जनोऽयं हि मिषन्न पश्यति ।
ध्यायन्न सद्यर्हि विकर्म सेवितुं
निर्हृत्य पुत्रं पितरं जिजीविषुः ॥ २४ ॥
वदन्ति विश्वं कवयः स्म नश्वरं
पश्यन्ति चाध्यात्मविदो विपश्चितः ।
तथापि मुह्यन्ति तवाज मायया
सुविस्मितं कृत्यमजं नतोऽस्मि तम् ॥ २५ ॥
विश्वोद्भवस्थाननिरोधकर्म ते
ह्यकर्तुरङ्गीकृतमप्यपावृतः ।
युक्तं न चित्रं त्वयि कार्यकारणे
सर्वात्मनि व्यतिरिक्ते च वस्तुतः ॥ २६ ॥
वेदान् युगान्ते तमसा तिरस्कृतान्
रसातलाद्यो नृतुरङ्गविग्रहः ।
प्रत्याददे वै कवयेऽभियाचते
तस्मै नमस्ते वितथेहिताय ते ॥ २७ ॥
एवं स्तुवन्ति देवेशं हयशीर्षं हरिं च ते ।
भद्रश्रवसनामानो वर्णयन्ति च तद्गुणान् ॥ २८ ॥
एषां चरितमेतद्धि यः पठेच्छ्रावयेच्च यः ।
पापकंचुकमुत्सृज्य देवीलोकं व्रजेच्च सः ॥ २९ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशवर्णने इलावृतभद्राश्ववर्षवर्णनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
ईश्वराचे वर्णन -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
त्या वर्षामध्ये यापूर्वी निवेदन केल्याप्रमाणे सर्व सुरेश्वर स्तोत्र, जप, ध्यान, समाधी यांच्या सहाय्याने त्या महादेवीचे पूजन करतात. सर्व ऋतूंमध्ये निरनिराळ्या पुष्पांच्या मालांनी वनेच्या वने त्या ठिकाणी सुशोभित झालेली आढळतात. तसेच त्या ठिकाणचे वृक्ष फळांनी आणि पानांनी बहरून गेलेले असतात. अशा त्या वनांनी युक्त होऊन व वर्षांनी परिपूर्ण होऊन तेथील पर्वत शिखरावर सर्व गिरीकंदात पाण्याचे निर्मळ ओहोळ व तळी आहेत. त्या तळ्यात विविध प्रकारची कमले असून त्यात ती कमले मालांप्रमाणे शोभून दिसतात. त्यामुळे हंस सारस पक्षांचे थवेच्या थवे तेथे वास्तव्य करीत आहेत. त्यांच्या आरवामध्ये इतरही पक्ष्यांचे मधुर स्वर मिसळत असतात. अशाप्रकारे विविध तर्हेने नटलेल्या वर्षामध्ये सर्व सुरेश्वर जलक्रिहा करीत असतात. काव्य, शास्त्र, विनोद यांच्या सहाय्याने ते तेथे राहून आपली करमणूक करून घेतात. कारण ती स्थाने फारच रमणीय आहेत.
जणू काय सुंदर स्त्रियांच्या विलासांची आणि भ्रुक्रीडेची ती स्थानेच आहेत. त्या ठिकाणी आपल्या सुंदर स्त्रियांसह अनेक तरुण पुरुष रहातात आणि यथेच्छ क्रिडा करतात.
या सर्व नऊ वर्षांमध्ये भगवान आदिपुरुष देवीची आराधना करीत रहातो आणि इतर प्राणी मात्र त्या भगवान आदिपुरुषाची आराधना करीत असतात. हे सर्व उपास्य उपासक या भावनेने त्याची पूजा करतात. कारण आत्म्यांचा मूर्तिभेद त्यांना जाणवत असतो. म्हणून ते आदिदेवाची स्तुति करतात. त्यामुळे तो प्रत्येक वर्षात त्यांच्या जवळच वास्तव्य करीत असतो.
ब्रह्मदेवाच्या भ्रुमध्यप्रदेशापासून उत्पन्न झालेला शंकराचा रुद्र म्हणून संबोधला गेलेला जो अंश आहे, तो या इलावृत्तामध्ये आपल्या सुंदर स्त्रीसह एकटाच वास्तव्य करीत असतो. त्या प्रदेशात त्या रुद्रावाचून दुसरा कोणी पुरुष प्रवेश करू शकत नाही.
कारण, हे नारदा, भवानीने त्या प्रदेशाला शाप दिला. त्यामुळे त्या भागात प्रवेश करताच पुरुषास स्त्रीत्व प्राप्त होते. म्हणून ज्या स्त्रियांच्या गणसमुदायात भवानी प्रमुखतेने वास्तव्य करीत आहे, त्यांच्यासह हा भगवान व आदिदेव स्थित असतो. तो देवेश्वर तेथे राहून संकर्षण देवाचे नित्य भजन करीत असतो.
तसेच सर्व भूतमात्रांचे हित व्हावे म्हणून तो स्वतः खडतर ध्यान, योगाचे आचरण व आपल्या पितामहरूप असलेल्या चवथ्या तापसी शरीराचे एकाग्र मनाने ध्यान करतो.
श्री भगवान म्हणतात, खरोखरच ज्याच्या सहाय्याने सर्व गुण प्रकाशमय होतात, तसेच ज्याचा कितीही प्रयत्न केला तरी अंत सापडत नाही, ज्याचे शरीर इंद्रियातीत आहे, असा तो महापुरुष येथे वास्तव्य करीत आहे. त्या भगवानाला माझा नमस्कार असो.
हे भजन्य भजन करण्यास योग्य असलेल्या ईश्वरा, मी तुझी सेवा करीत आहे. तुझ्या पदकमलाचा आश्रय घेणेच योग्य आहे. हे देव, तू ऐश्वर्य, ज्ञान, शक्ती, बल, शौर्य आणि तेज या सहा गुणांचे उत्तम प्रतीचे आश्रयस्थान आहेस. तसेच तू आपले स्वरूप पूर्णपणे भक्तांच्या ठिकाणी प्रकट करीत असतोस. संसारतापाचा नाश करतोस आणि जे अभक्त आहेत त्यांना तू संसारात पाडतोस.
हे देवा, तू सर्वांचा नियंता आहेस, तसेच सर्वांचे नियमन करण्यासंबंधी तूच एकमेव साक्षी आहेस. पण आम्ही पामर मात्र क्रोध वगैरे रिपूंच्या आहारी जात असतो. आमच्यासारखी तुझी दृष्टी मात्र माया मोह, गुण, विषय, इंद्रिय यांच्या आधीन होत नाही. असे असल्यामुळे ज्याला इंद्रिय दमनाची इच्छा आहे असा कोणता बरे मुमुक्षु पुरुष तुला मान देणार नाही.
हे देवा, ज्याची दृष्टी असत्याने भरलेली आहे त्याला केवळ मायेमुळे तू एखाद्या उन्मत्त झालेल्या पुरुषासारखा अथवा अति मद्यप्राशनाने ज्याचे नेत्र आरक्त होतात असा तू दिसत असतोस.
केवळ लज्जेमुळेच नाग स्त्रिया तुझी पूजा करण्यास असमर्थ झाल्या. कारण तुझ्या नुसत्या पदस्पर्शाने त्यांचे मन मोहित झाले. हे देवन तूच या जगाची उत्पत्ती करतोस. त्याचे पालन करतोस आणि प्रलयकाळी त्याचा लय करतोस. म्हणून त्या तिन्ही अवस्थात तूच आहेस.
हे देवा, या कारणामुळेच सर्व ऋषी तुला अनंत असे म्हणतात. हे देवा, तू हजारो मस्तकांनी युक्त आहेस. तुझ्या या विशाल स्वरूपापुढे हे भूमंडल एखाद्या मोहरीप्रमाणे भासते. त्यामुळे त्याचे अस्तित्वही तुला कळत नाही. तुझ्या गुणांमुळे तुझा एकंदर आकार हा महान झाला आहे, हे भगवन् खरोखरच तुला जन्म अथवा मरण नाही. सत्त्वगुण हेच तुझे आश्रयस्थान आहे आणि असा हा तू विश्वरूप आहेस. तुझ्यापासून मी उत्पन्न झालो असून मी स्वतःच्या त्रिगुणांनी युक्त असलेल्या तेजाने, अहंकाराने विकारयुक्त भूतमात्र व इंद्रियांना निर्माण करीत असतो.
आम्ही सर्व जणू जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणे तुझ्यासारख्या श्रेष्ठ विभूतीच्या आधीन झालो आहोत आणि केवळ तू अनुग्रह करतोस म्हणून मोठया प्रमाणात ज्या भूतांमध्ये अहंकारादि विकार उत्पन्न झाले आहेत अशी भूते व ही सर्व इंद्रिये मी उत्पन्न करतो. तुला कर्मरूपी ग्रंथीत पोहोचविणार्या मायेला या मोठया सृष्टीने मोहित झालेला जनसमुदाय ओळखतो. पण तू तिचा निरास करणार्यांचा उपाय मात्र जाणीत नाहीस. उत्पत्ती-स्थिति-लय करण्यास समर्थ असलेल्या तुला माझा नित्य नमस्कार असो.
नारायणमुनी नारदाला म्हणाले, "हे नारदमुने, अशाप्रकारे सर्व देवीगणासहवर्तमान त्या भगवान रुद्राने इलावृत्तामधे सर्वोत्तम प्रभू संकर्षण या देवाची उपासना केली. तसेच भद्राष्वर्षाचा अधिपती भद्रश्रवा नावाने प्रसिद्ध आहे. त्या सर्वोत्तम कुलात जे पुरुष उत्पन्न होतात ते भद्र नावाच्या वर्षाधिपतीचे सेवक होते.
या भद्राष्ववर्षामध्ये वासुदेवाची जगप्रसिद्ध मूर्ति आहे. ती हयग्रीवमूर्तीचा भाग म्हणून संबोधली जाते. त्या मूर्तीचे नावही हयग्रीवच आहे. तेथील पुरुषांनी समाधीला बाध होऊ नये म्हणून सर्व उपद्रवांचे निवारण करण्यासाठी अत्यंत उत्तमोत्तम उपाय योजून त्या मूर्तीला तेथेच नियंत्रित करून ठेवले आहे. त्या मूर्तीची नित्य स्तुति केल्याने त्यांना सिद्धी प्राप्त होतात. त्या मूर्तीची स्तुति करताना भद्राश्ववर्षांत वास्तव्य करणारे म्हणतात, हे भगवंता, तू त्रिगुणात्मक मायेला आपल्या स्वाधीन करून घेतोस. तू धर्मरूप असून तू श्रेष्ठ आहेस तुला नमस्कार असो. तूच आमचे अंतःकरण शुद्ध करीत असतोस. म्हणून तुला आम्ही सर्वजण वारंवार नमस्कार करतो. खरोखरच भगवानाची लीला विचित्र आहे. जो मृत्यु मरणास कारण होतो, त्याला पाहूनही हा प्राणी न पाहिल्यासारखे करतो. तसेच मृत झालेल्या पुत्रास किंवा पित्यास हा प्राणी जाळून टाकतो आणि त्याच्या द्रव्याने या जगातील ही मिथ्या सुखे उपभोगण्याची इच्छा करतो. ज्ञानी पुरुष मात्र हे विश्व नाशवंत म्हणून सांगत असतात. ज्यांना आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो ते अनुभवाने जग मिथ्या आहे असे म्हणतात. कारण ते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. पण हे अनादी ईश्वरा, अखेर ते सर्व तुझ्याच मायेने मोहित होऊन जातात. खरोखरच तुझी ही कृती आश्चर्यकारक आहे. म्हणून हे ईश्वरा, मी तुजपुढे लोटांगण घालीत आहे.
हे परमेश्वरा, विश्वाची उत्पत्ती स्थिती, लय करणे हे कार्य तुझे आहे. पण तरीही हे सर्व करून तू अकर्ता होतोस. तुला अज्ञानाचे आवरण पडत नाही असे प्रत्यक्ष सर्व वेदही मान्य करतात. पण तूच या सर्वांचे कारण असून तू सर्वात्मरूप आहेस. तसेच वस्तुमात्रांपेक्षा तू भिन्न आहेस. म्हणून वेदांचे म्हणणे उक्त आहे. युगाच्या शेवटी दैत्यांनी सर्व वेद रसातळात पळवून नेले. तेव्हा तू मनुष्य व घोडा यांचा आकार धारण केलास. तुझे धड मनुष्याचे व मस्तक अश्वाचे असे तू रूप घेतलेस आणि त्या वेदांकरता याचना करीत असलेल्या ब्रह्मदेवाला तू वेद प्राप्त करून दिलेस.
हे देवाधिदेवा, तूच सर्व प्राण्याचे हित करणारा आहेस. तूच या ब्रह्मांडात एकमेव सत्य आहेस. म्हणून असा तू युक्त असल्याने तुला आमचा सर्वदा नमस्कार असो."
अशाप्रकारे तेथे वसती करणार्या जनांनी तेथील हयग्रीव नावाच्या देवाधिदेव हरीची व त्याच्या अंगी असलेल्या गुणांची स्तुती केली. तेथील भद्राश्रव नावाचे भक्त त्या देवीची आराधना करीत असतात. त्यांचे हे चरित्र जो वाचतो किंवा जो श्रवण करतो अथवा जो हे दुसर्यास ऐकवतो त्याच्या भोवतीचे पापरूपी कवच सोडून तो देवलोकाप्रत जाऊन पोहोचतो.