श्रीनारायण उवाच
अरुणोदा नदी या तु मया प्रोक्ता च नारद ।
मन्दरान्निपतन्ती सा पूर्वेणेलावृतं प्लवेत् ॥ १ ॥
यज्जोषणाद्भवान्याश्चानुचरीणां स्त्रियामपि ।
यक्षगन्धर्वपत्नीनां देहगन्धवहोऽनिलः ॥ २ ॥
वासयत्यभितो भूमिं दशयोजनसंख्यया ।
एवं जम्बूफलानां च तुङ्गदेशनिपातनात् ॥ ३ ॥
विशीर्यतामनस्थीनां कुञ्जराङ्गप्रमाणिनाम् ।
रसेन च नदी जम्बूनाम्नी मेर्वाख्यमन्दरात् ॥ ४ ॥
पतन्ती भूमिभागे च दक्षिणेलावृतं गता ।
देवी जम्बूफलास्वादतुष्टा जम्ब्वादिनी स्मृता ॥ ५ ॥
तत्रत्यानां च लोकानां देवनागर्षिरक्षसाम् ।
पूजनीयपदा मान्या सर्वभूतदयाकरी ॥ ६ ॥
पावनी पापिनां रोगनाशिनी स्मरतामपि ।
कीर्तिता विघ्नसंहर्त्री माननीया दिवौकसाम् ॥ ७ ॥
कोकिलाक्षी कामकला करुणा कामपूजिता ।
कठोरविग्रहा धन्या नाकिमान्या गभस्तिनी ॥ ८ ॥
एभिर्नामपदैः कामं जपनीया सदा नृणाम् ।
जम्बूनदीरोधसोर्या मृत्तिकातीरवर्तिनी ॥ ९ ॥
जम्बूरसेनानुविद्ध्यमाना वाय्वर्कयोगतः ।
विद्याधरामरस्त्रीणां भूषणं विविधं महत् ॥ १० ॥
जाम्बूनदं सुवर्णं च प्रोक्तं देवविनिर्मितम् ।
यत्सुवर्णं च विबुधा योषिद्भिः कामुकाः सदा ॥ ११ ॥
मुकुटं कटिसूत्रं च केयूरादीन्प्रकुर्वते ।
महाकदम्बः सम्प्रोक्तः सुपार्श्वगिरिसंस्थितः ॥ १२ ॥
तस्य कोटरदेशेभ्यः पञ्च धाराश्च याः स्मृताः ।
सुपार्श्वगिरिमूर्ध्नीह पतन्त्येता भुवं गताः ॥ १३ ॥
मधुधाराः पञ्च तास्तु पश्चिमेलावृतं प्लुताः ।
याश्चोपभुज्यमानानां देवानां मुखगन्धभृत् ॥ १४ ॥
वायुः समन्ततोऽगच्छञ्छतयोजनवासनः ।
धारेश्वरी महादेवी भक्तानां कार्यकारिणी ॥ १५ ॥
देवपूज्या महोत्साहा कालरूपा महानना ।
वसते कर्मफलदा कान्तारग्रहणेश्वरी ॥ १६ ॥
करालदेहा कालाङ्गी कामकोटिप्रवर्तिनी ।
इत्येतैर्नामभिः पूज्या देवी सर्वसुरेश्वरी ॥ १७ ॥
एवं कुमुदरूढो यो नाम्ना शतबलो वटः ।
तत्स्कन्धेभ्योऽधोमुखाश्च नदाः कुमुदमूर्धतः ॥ १८ ॥
पयोदधिमधुघृतगुडान्नाद्यम्बरादिभिः ।
शय्यासनाद्याभरणैः सर्वे कामदुघाश्च ते ॥ १९ ॥
उत्तरेणेलावृतं ते प्लावयन्ति समन्ततः ।
मीनाक्षी तत्तले देवी देवासुरनिषेविता ॥ २० ॥
नीलाम्बरा रौद्रमुखी नीलालकयुता च सा ।
नाकिनां देवसंघानां फलदा वरदा च सा ॥ २१ ॥
अतिमान्यातिपूज्या च मत्तमातङ्गगामिनी ।
मदनोन्मादिनी मानप्रिया मानप्रियान्तरा ॥ २२ ॥
मारवेगधरा मारपूजिता मारमादिनी ।
मयूरवरशोभाढ्या शिखिवाहनगर्भभूः ॥ २३ ॥
एभिर्नामपदैर्वन्द्या देवी सा मीनलोचना ।
जपतां स्मरतां मानदात्री चेश्वरसङ्गिनी ॥ २४ ॥
तेषां नदानां पानीयपानानुगतचेतसाम् ।
प्रजानां न कदाचित्स्याद्वलीपलितलक्षणम् ॥ २५ ॥
क्लमस्वेदादिदौर्गन्ध्यं जरामयमृतिभ्रमाः ।
शीतोष्णवातवैवर्ण्यमुखोपप्लवसंचयाः ॥ २६ ॥
नापदश्चैव जायन्ते यावज्जीवं सुखं भवेत् ।
नैरन्तर्येण तत्स्याद्वै सुखं निरतिशायकम् ॥ २७ ॥
तत ऊर्ध्वं प्रवक्ष्यामि सन्निवेशं च तद्गिरेः ।
सुवर्णमयनाम्नो वै सुमेरोः पर्वताः पृथक् ॥ २८ ॥
गिरयो विंशतिपराः कर्णिकाया इवेह ते ।
केसरीभूय सर्वेऽपि मेरोर्मूलविभागके ॥ २९ ॥
परितश्चोपक्लृप्तास्ते तेषां नामानि शृण्वतः ।
कुरङ्गः कुरगश्चैव कुसुम्भोऽथो विकङ्कतः ॥ ३० ॥
त्रिकूटः शिशिरश्चैव पतङ्गो रुचकस्तथा ।
निषधश्च शिनीवासः कपिलः शङ्ख एव च ॥ ३१ ॥
वैदूर्यश्चारुधिश्चैव हंसो ऋषभ एव च ।
नागः कालञ्जरश्चैव नारदश्चेति विंशतिः ॥ ३२ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशवर्णनेऽरुणोदादिनदीनां निसर्गस्थानवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
पर्वतांचा विस्तार -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारायण मुनी नारदाला म्हणाले, "नारदा, अरुणोद नावाची नदी मंदार पर्वतावर उगम पावल्याचे मी तुला सांगितलेच. ती इलावृत्ताच्या पूर्वदिशेकडून वहात आहे. ती नदी अत्यंत सुवासिक आहे. तिच्या सर्व बाजूंनी दहा योजनेपर्यंत हा सुगंध पसरलेला आहे. भवानी आणि तिच्याप्रमाणेच इतर देवता व यक्ष-गंधर्व यांच्या स्त्रिया त्या उदकाचे सेवन करतात. त्यामुळे त्यांची अंगकांतीही सतेज होऊन त्यांच्या देहालाही सुगंध प्राप्त होतो. वायूमुळे हा सुगंध फार दूरवर पसरला जातो व सर्व भाग गंधमय होऊन जातो.
ही नदी अत्यंत उंच प्रदेशावरून खाली पडते. त्यामुळे तिचे विभाग होतात. हत्तीच्या आकाराच्या बिया ज्यामध्ये आहेत अशा जंबू फलाच्या रसातून जंबू नावाची आणखी एक नदी उगम पावते. ती मेरू नावाच्या मंदारापासून भूमीवर पडते. तेथून ती इलावृत्ताच्या दक्षिणेस वहात जाते.
जंबू फलांचे नित्य सेवन केल्यामुळे देवी अत्यंत संतुष्ट होते. जंबू फलांच्या भक्षणामुळे तिला 'जंब्वादिनी' असे नवीन नाव प्राप्त झाले आहे. तेथे वास्तव्य करणारी ती देवी देव, नाग, ऋषी, राक्षस इत्यादी लोकांना पूज्य झाली आहे, सर्वांना मान्य झाली आहे. ती देवी सर्व भूतांवर दया करते, तसेच पापी जनांचे पाप हरण करते. तिचे नुसते स्मरण करताच सर्व रोग नष्ट होतात. ती देवी विघ्नांचा विध्वंस करते. त्यामुळे स्वर्गात रहाणार्या देवांच्याही आदराला ती देवी पात्र झाली आहे. त्या देवीला सर्वजण शरण जातात असे शास्त्र म्हणते.
तिचे नेत्र कोकिलाप्रमाणे असल्याने तिला "कोकिलाक्षी" म्हणतात. ती कामकलेत अत्यंत पूर्ण असल्याने 'कामकला' तसेच ती साक्षात् कारुण्यमूर्ती आहे म्हणून 'करुणापूर्णा', कामना पूर्ण करते म्हणून तीस 'कामपूजिता', तिचे शरीर कठीण असल्यामुळे तिला 'कठोरविग्रहा', तसेच ती देवांना मान्य असल्याने तिला 'नाकीमान्या', ती प्रकाशदायिनी असल्यामुळे तिला 'गभिस्तिनी', व ' धन्या' नावांनी सर्व लोक तिचे स्तवन करीत असतात. ही नावे घेऊन ते तिचे स्मरण करीत असतात.
जंबू नदीच्या दोन्ही तीरांवर मृत्तिका पसरलेली आहे. वायु आणि सूर्य यांच्या संयोगामुळे त्या मृत्तिकेचे सुवर्ण होत असते. त्या सुवर्णापासून विद्याधर, देव वगैरे सर्वजण आपापल्या स्त्रियांसाठी सुवर्णालंकार बनवतात, अनेक तर्हेची शोभायमान भूषणे तयार करतात. जांबूनदीकाठावरील सुवर्ण हे देवांनी निर्माण केलेले आहे. सर्व देव स्त्रियांच्या सहवासाने कामपीडित होतात आणि नंतर ते स्त्रियांना सुखी करण्यासाठी सुवर्णालंकार बनवतात. त्या सुवर्णापासून मुकुट, कटिसूत्र, केयुर इत्यादी अलंकार घडविले जातात.
सूपार्श्व नावाच्या पर्वतावर अत्यंत प्रचंड वृक्ष असून त्यांना महाकदंष म्हणतात. त्या वृक्षांच्या ढोलीतून या सूपार्श्व पर्वतावर ज्या धारा पडतात, त्यातील पाच धारा भूलोकावर गेल्या आहेत. त्या मधाप्रमाणे असून इलावृत्ताच्या पश्चिम दिशेला वहात गेल्या आहेत. देवही त्या मधाचा यथेच्छ उपभोग घेतात. त्या पंचधारांपासून उत्पन्न होणारा सुगंध त्या नदीच्या सर्व बाजूंना शंभर योजने दूरवर पसरला आहे. वायूमुळे आजुबाजूचा सर्व प्रदेश सुगंधमय होऊन गेला आहे.
धारेश्वरी, महादेवी, भक्तांचे कार्य पूर्ण करणारी, सर्व देवांना पूज्य असलेली, अत्यंत उत्साहपूर्ण, कालरूपा, महानना म्हणजे जिचे वदन प्रचंड आहे अशी देवी, उपासना केल्याने कामना पूर्ण करणारी, कांतार, ग्रहणेश्वरी, करालदेहा - (तिचा देह अक्राळ विक्राळ आहे म्हणून हे नाव प्राप्त झाले आहे.) कालांगी, कामकोटी, प्रवर्तिनी, इत्यादी नावांच्या देवींची आराधना करतात. सुरेश्वरी अत्यंत पूज्य असून प्रसिद्ध आहे.
नारदा, कुमुद नावाचा सुंदर पर्वत आहे हे मी तुला सांगितलेच आहे. कुमुदपर्वतावर शातबल नावाचा प्रचंड वटवृक्ष आहे, त्याच्या स्कंधभागापासून कुमुद पर्वताच्या शीर्षावर अधोमुख होऊन पाच नद पडत असतात.
ते सर्व नद इष्ट कामना पूर्ण करतात. तसेच ते दूध, दही, मध, तूप, गूळ, अन्न आणि निरनिराळी वस्त्रे, शय्या, आसन, आभरणे यांच्यामुळे परिपूर्ण झालेले आहेत. ते इलावृत्ताच्या उत्तर दिशेला वहात असून चोहोबाजूंनी वहात जात आहेत.
त्यांच्या मूळ ठिकाणी मीनाक्षी नावाची देवी आहे. देव आणि दानव दोघेही तिचीच आराधना करतात. तिचे केस काळेभोर असून तिचे मुख अजस्र व भयावह आहे. तिने निळी वस्त्रे परिधान केली आहेत. स्वर्गात नित्य वास्तव्य करणार्या देवांना ती इष्ट फल प्राप्त करून देते व सर्वांना योग्य वर देते.
ती अति मान्यवर असून अतिशय पूजनीय आहे. तिचे चालणे मत्त हत्तीप्रमाणे असून ती मदनाची पीडा निर्माण करते, ती मानप्रिया तसेच मानाविषयी अंतःकरणात प्रीति असलेली म्हणून मानप्रियांतरा, मदनाचा वेग धारण करणारी, मदनपूजित, मदनास उन्मत्त करणारी, तिला उन्मत्ता, मयूरामुळे अधिक शोभा प्राप्त झालेली, षडाननाची जन्मभूमी इत्यादि नावांनी ती प्रसिद्ध आहे. म्हणून त्या माशाच्या आकाराचे नेत्र असलेल्या देवी मीनाक्षीला नेहमी प्रणाम करावा.
तिची सेवा, जप किंवा स्मरण करणार्यांना ती मानसन्मान प्राप्त करून देते व ईश्वरही प्राप्त करून देते. म्हणून ती देवी वंदनीय आहे. हे नारदा, याविषयी संशय नाही.
ज्यांना त्या पांच नद्यांचे जल प्राशन करण्याची संधी प्राप्त झाली आहे त्यांना जरा प्राप्त होत नाही. त्यांच्या देहावर सुरकुत्या पडत नाहीत किंवा वृद्धत्वाचे कोणतेही दुष्ट लक्षण त्यांच्या देहावर दृग्गोचरित होत नाही. याचा अर्थ असा की तिची आराधना करणार्यांना कधीही वार्धक्य प्राप्त होत नाही.
अशा पुरुषांना, त्यांनी त्या देवीची भक्ती केल्यामुळे थकवा अथवा घाम येत नाही, शिवाय दुर्गंधी, जरा, रोग, मरण, भ्रम, शीत, उष्ण, वात इत्यादि विकारांमुळे प्राप्त होणारा निस्तेजपणा, विविध प्रकारचे मुखरोग, आपत्ती या कधीही प्राप्त होत नाहीत. त्यांना जन्मभर सुखच मिळते
अशाप्रकारचे त्या मीनाक्षी देवीची उपासना करणार्याला श्रेष्ठपद प्राप्त होते. त्यांना मोक्ष मिळतो. अशी त्या देवीची फार महती आहे.
आता हे नारदा, त्यापुढे जे पर्वत आहेत त्यांची रचना कशी आहे हे मी तुला सांगतो. सुमेरूचे वेगवेगळे वीस पर्वत असून ते सुवर्णमय या नावाने ओळखले जातात. कमलातील केसर जसे सभोवार असतात, तसेच हे वीसही पर्वत मेरूच्या पायथ्याशी असून सभोवार उभे आहेत, मेरू पर्वताच्या सर्व दिशेस हे पर्वत पसरले आहेत. आता त्यांची नावे सांगतो. हे नारदा, नीट ऐकून घे.
कुरंग, कुरंग, कुशुंभ, त्रिकुट, शिशिर, पतंग, रूचक, निषध, शंख, वैदुर्य, अरूधि, हंस, ऋषभ, नाग, कारंजर असे हे पर्वत मी तुला सांप्रत कथन केले.