[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अशा तर्हेने तो अति बलाढ्य महिषासूर वरप्राप्तीमुळे गर्विष्ठ झाला. राज्याभिषेकानंतर त्याने सर्व जग जिंकून घेतले. सर्व पृथ्वीचे तो पालन करीत असल्याने त्याच्या शत्रूंचा पृथ्वीवर अभाव होता. ताम्र नावाचा दैत्य त्याचा खजिनदार होता. चिक्षुर नावाच्या मदमत्त महाबली अशा सेनापतीजवळ दहा हजार सेना सज्ज होती. असिलोमा, उदक, बिडाल, बाष्कल, त्रिनेत्र व शक्तिसामर्थ्यामुळे गर्व झालेला कालबंधक हे सर्व महिषासुराचे आणखी सेनापती होते. हे सर्व दानव सेनापती समुद्राने वेढलेली पृथ्वी व्यापून स्वेच्छेने राहिले होते. पूर्वीच्या सर्व राजांना त्यांनी कारभार देणारे मांडलीक बनविले होते. जे क्षात्रधर्माचा अवलंब करून रहात होते त्यांचा या दानवश्रेष्ठांनी वध केला होता, संपूर्ण पृथ्वीवरील ब्राह्मणही महिषासुराच्या आधीन झाल्याने त्यालाच यज्ञभाग समर्पण करीत होते. अशा तर्हेने एकछत्री राज्य निर्माण झाल्यावर गर्वोन्मत्त होऊन महिषासूराने स्वर्गही जिंकण्याचे ठरवले. एका दूताला त्वरित इंद्राकडे पाठविण्याचा विचार करून तो त्या दूताला म्हणाला, "हे पराक्रमी वीरा, स्वर्गामध्ये जाऊन निःशंकपणे इंद्राला सांग, ' हे सहस्राक्षा, विलंब न करता स्वर्ग सोडून तू कोठेही चालता हो. हे देवांच्या राजा, तू महात्म्या महिषासुराची सेवा कर. हे इंद्रा, तू महिषासुराला शरण गेलास तर तुझे रक्षण होईल नाही तर तू युद्धाकरता सज्ज हो. पूर्वी आम्ही तुझा पराजय केला होता. तू अहिल्येशी जारकर्म करणारा आहेस. तुझे सामर्थ्य आम्हाला कळून आले आहे. हे सुरराज, युद्धास सज्ज हो अथवा कोठेही निघून जा."
अशाप्रकारचा महिषासुराच्या दूताचा निरोप ऐकून देवेंद्राला क्रोध आला. तो उपहासाने त्या दूताला म्हणाला, "अरे मूर्खा, तू माजला आहेस हे यावरून समजले. तुझ्या दैत्यराजाला अहंकाराचा रोग झाला आहे. लवकरच त्यावर मी इलाज करीन व त्या रोगाला समूळ उपटून टाकीन. हे दैत्यदूता, शिष्टाईस असलेल्यांचा वध करू नये म्हणून तुला जिवदान देतो. तू तुझ्या राजाला सांग, इच्छा असेल तर सत्वर युद्धास तयार हो. हे महिषपुत्रा, तू तृणावर जगणारा आहेस. तुझे सामर्थ्य कळले आहे. तू जड शरीराचा आहेस. लवकरच तुझ्या शिंगाचे मी बळकट धनुष्य बनवीन. तुझ्या गर्वाचे कारण मी जाणतो. शिंगांच्या सामर्थ्यामुळे तुला गर्व चढला आहे. म्हणून तुझी शिंगेच मी मोडून टाकणार आहे. तू बलशाली शिंगांचा प्रहार करण्यास कुशल असलास तरी युद्धकला तुला अवगत नाही हे मी जाणून आहे."
याप्रमाणे देवेंद्राने दूताबरोबर पाठवलेला निरोप घेऊन दूत महिषासुरापुढे उभा राहिला व प्रणाम करून म्हणाला, "हे महाराजा, देवेंद्र आपणाला अजिबात जुमानीत नाही. सर्व देवसैन्याचा बलावर तो म्हणतो, मला स्वतःचे सामर्थ्य माहीत आहे. त्या मूर्ख देवराजाचा जसाच्या तसा निरोप सांगणेच योग्य ठरेल. कारण स्वामीपुढे सेवकाने प्रिय भाषण केले पाहिजे हे खरे असले तरी सत्य सांगितलेच पाहिजे. कल्याणेच्छू सेवकाने सत्य व हितकारक सांगावे अशी नीती आहे. मी फक्त प्रिय भाषणच केले तर तुझे कार्य होणार नाही, पण शुभ चिंतणार्या सेवकाने कठोर बोलावे. तेव्हा हे महाराज, आपला शत्रु जो इंद्र त्याने उच्चारलेले विषतुल्य शब्द माझ्या मुखातून निघणार नाहीत. त्याने ज्या प्रकारचे शब्द उच्चारले ते मी कसे बोलू ?"
दूताचे हे हेतूगर्भ भाषण ऐकल्यावर महिषासुर अतिशय क्रुध्द झाला. त्याचे डोळे लाल झाले. त्याने दैत्यांना आवाहन केले. पाठीवर शेपूट टाकून तो थोडा थोडा मूत्रस्त्राव करीत म्हणाला, "हे दैत्यांनो, देवेंद्र युद्धाचीच इच्छा करीत आहे. म्हणून तुम्ही सर्व सैन्य सज्ज करा. या अधमाला जिंकले पाहिजे. मित्रांनो, युद्धात माझ्यासमोर कोणता वीर उभा राहिल ? इंद्रासारखे कोट्यावधी वीरांनाही मी भीत नाही. मी एकटाच त्या इंद्राचा निश्चितपणे वध करीन. हा केवळ दुर्बल व शांत मनुष्यालाच आपले बळ दाखवीत असतो. तो केवळ गरिबांचे ठिकाणी बलाढ्य आहे. तो विषयलंपट, कपटी, परस्त्री हरण करणारा आहे. त्याच्याजवळ अप्सरांचे बल असल्याने तो कुणाच्याही तपश्चर्येला विघ्न उत्पन्न करीत असतो. तो पापी आहे. वैगुण्यावर प्रहार करणारा आहे. तो विश्वासघातकी आहे.
ह्या दुष्टबुद्धीने इंद्राने पूर्वी भीतीमुळे प्रथम अनेक प्रकारच्या शपथा वाहिल्या आणि कपटाने नमुचीचा वध केला. शिवाय त्याला सहाय्य देणारा विष्णु तर कपटाचार्यच आहे. मायावी, खोट्या शपथा वाहणारा, वेगवेगळी रूपे धारण करणारा, अकारण आपले सामर्थ्य दाखविणारा तो असून दंभाविषयी पंडित आहे. त्यानेच वराहरूप धारण करून हिरण्याक्षाचा व नृसिंहरूपाने हिरण्यकशिपूचा नि:पात केला. पण आता हे दानवांनो, मी त्याचेपुढे कधीही नमणार नाही. ह्मा देवांवर कधीही कोठेही मी विश्वास ठेवणार नाही. विष्णु महापराक्रमी असला तरी मला कशाची भीती ? समरांगणी माझा पराभव करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष रुद्रातही नाही. तेव्हा ह्मा सर्वांना जिंकून मी स्वर्ग जिंकून घेणार. आपणही यज्ञभाग स्वीकारून सोमरस प्राशन करून नंदनवनात क्रीडा करू.
हे दैत्यांनो, तुम्ही जाणताच की वरप्राप्तीमुळे मला देव, मानव यांच्यापासून मृत्यू नाही. परंतु स्त्रीपासून आहे. बिचारी अबला काय करणार ? तेव्हा आता वेळ न घालवता सर्वत्र गुप्तहेर पाठवून सर्व दैत्यराजांना आवाहने करा. त्यांना माझ्या सैन्याचे नायक करा. वास्तविक मी एकटाच सर्व देवांना जिंकण्यास समर्थ आहे. परंतु केवळ देखावा म्हणून तुम्हाला देवांबरोबर युद्धासाठी मी हाकारत आहे. माझी शिंगे व खूर यांच्या सामर्थ्यावर मी देवांचा नाश करीन. वरप्राप्तीमुळे मला देवापासून बिलकूल भीती नाही. देवगण, असुर व मानव यांना मी अवध्य आहे. म्हणून स्वर्ग जिंकण्यासाठी सर्व दानवांनी सज्ज व्हावे.
हे दानवांनी, मी एकटाच सर्वांना जिंकेन. लवकरच उर्वशी, मेनका, रंभा, घृताची, तिलोत्तमा, प्रमद्वरा, महासेना, मदमत्त मिश्रकेशी, विप्रचिती वगैरे नृत्यगायनात निपुण, कामधेनूच्या दुधामुळे गर्विष्ठ, अमृतपानाने आनंदित अन् मंदारपुष्पांच्या माळा घातलेल्या अशा सर्व अप्सरा तुमचे चित्तरंजन करतील. तुम्ही सर्व तयार राहा. सर्वांच्या रक्षणासाठी मुनिश्रेष्ठ भार्गवाला आवाहन करा. रणयज्ञात परमगुरूच्या ठिकाणी त्यांची स्थापना करा आणि देवांशी युद्ध करण्यासाठी आजच स्वर्गाकडे जाण्याची तयारी करा. अशा प्रकारे सर्व दानवराजांना आज्ञा करून तो दुष्टबुद्धी महिषासुर आनंदाने आपल्या घरी गेला.