[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
राजा म्हणाला, "हे महर्षे, योगेश्वरीचा प्रभाव तर आपण सांगितला. आता तिचे चरित्र श्रवण करण्याची मला अति उत्कंठा लागली आहे. सर्व चराचर सृष्टी महादेवीपासून उत्पन्न झाल्याने तिचे चरित्र श्रवण करण्याची इच्छा कुणाला होणार नाही ?"
व्यास म्हणाले, "राजा ऐक. मी तुला सविस्तर कथा सांगतो. कारण श्रद्धाळु आणि शांत पुरुषाला भगवतीचे चरित्र कथन करणार नाही तो मूढ होय."
पूर्वी या पृथ्वीवर महिष नामक असूर राजाने मेरुपर्वतावर जाऊन अतिशय उग्र तपश्चर्या केली. संपूर्ण दहा हजार वर्षे एकसारखे तो अंतःकरणपूर्वक देवतेचे चिंतन करीत राहिल्याने ब्रह्मदेव त्याच्यावर संतुष्ट झाले. हंसारूढ होऊन ब्रह्मदेव स्वत: तेथे गेला आणि म्हणाला, "हे धर्मपरायणा, तुला इच्छित वर माग. मी तुझी इच्छा पूर्ण करीन."
ते ऐकून महिष म्हणाला, "हे देवाधिदेवा, मला अमरत्व प्राप्त होऊन मृत्यूपासून भय राहणार नाही अशी व्यवस्था तुम्ही करा."
ब्रह्मदेव उत्तरले, "प्राण्याला मृत्यु व पुनर्जन्म हे ठरूनच गेलेले आहे. हे दैत्यश्रेष्ठा, सर्व प्राण्याचा केवळ कालानेच नाश होतो असे नाही तर महापर्वत व समुद्रही कालांतराने नाश पावतात. तेव्हा दुसरा कोणताही वर तू माग."
महिष म्हणाला, "हे पितामह, मला मनुष्य व दैत्ययोनीतील पुरुषापासून मृत्यू येऊ नये. कारण हे ब्रह्मदेवा, माझा वध करण्यास कोणतीही स्त्री समर्थ नाही. म्हणून मला स्त्रीपासून मरण दे. कारण कोणतीही अबला माझा वध करू शकणार नाही.
ब्रह्मदेव म्हणाले, "तथास्तु हे दैत्यराज, जेव्हा तुला मरण येणार असेल तेव्हा ते स्त्रीपासूनच येईल. माझ्या वराने तुला पुरुषापासून मरण येणार नाही."
राजा म्हणाला, "हा महिष कोणाचा पुत्र होता ? त्याला महिषाचे रूप का प्राप्त झाले ?"
व्यास म्हणाले, "दानवश्रेष्ठ दस्यूचे पुत्र रंभ आणि करंभ हे प्रख्यात होऊन गेले. ते निपुत्रिक होते. त्यानी पवित्र अशा पाच नद्यांच्या पाण्याजवळ अनेक वर्षे पुत्रप्राप्तीसाठी उग्र तप केले. करंभ उदकात मग्न होऊन उत्कृष्ट तप करीत होता तर रंभ रसालवट नावाच्या वृक्षाच्या आश्रयाने अग्नीची सेवा करीत होता. तेव्हा इंद्राने त्यांना फार दुःख दिले.
इंद्र पंच नद्यामध्ये गेला व मकररूप धारण करून त्याने करंभाचे पाय धरले आणि दुष्ट करंभाचा त्याने वध केला. आपल्या भावाचा अशाप्रकारे वध झाल्याचे ऐकून रंभाला अत्यंत कोप आला. त्याने स्वत:चे मस्तक तोडून अग्नीला अर्पण करण्याकरता शस्त्र उचलले. केस एका हाताने घट्ट धरले. तो स्वत:वर शस्त्र चालवणार इतक्यात अग्नीच तेथे प्रकट झाला व त्याने रंभाला बोध केला.
अग्नी म्हणाला, "हे दैत्या, आत्महत्त्या करणे हे निंद्य असून मूर्खपणाचे लक्षण आहे. मेल्याने तुझे कोणते कार्य सिद्धीस जाणार आहे ? तुझे कल्याण होवो, तू कोणताही वर माग."
हे अग्नीचे सहानुभूतीचे भाषण ऐकून रंभाने आपले केस सोडून दिले. तो म्हणाला, " हे परमेश्वरा, तू संतुष्ट झाला असशील तर माझी इच्छा पूर्ण कर. सर्व त्रैलोक्यविजयी शत्रूचा नाश करणारा पुत्र मला होऊ दे. देव, दानव आणि मानव ह्मा सर्वांना तो अजिंक्य व्हावा. त्याला इच्छेप्रमाणे रूप धारण करता यावे. तो सर्व लोकांना वंदनीय व्हावा."
अग्नी म्हणाला, "बरे, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला पुत्र होईल. ज्या तरुण स्त्रीवर तुझे मन जडेल तिचे ठिकाणी तुला बलवान असा पुत्र होईल."
ह्याप्रमाणे समाधानकारक भाषण ऐकल्यावर रंभाने अग्नीला प्रणाम केला. तो तेथून निघून गेला. एका वनात यक्षांनी वसती केलेले अत्यंत रमणीय स्थान त्याला दिसले. त्या ठिकाणी स्त्री सोडून एका सौंदर्य संपन्न व मत्त अशा महिषीवर रंभाचे मन गेले. त्यामुळे आनंदित मनाने कामविव्हल झालेली ती महिषी रंभाजवळ आली आणि रंभानेही तिच्याशी समागम केला. त्यामुळे ती गर्भवती झाली.
आपल्या प्रियेला महिषापासून त्रास होऊ नये म्हणून रंभ तिला घेऊन पाताल लोकी गेला. एकदा तेथे एक कामातुर महिष रहात होता. त्याने त्या महिषीला पाहिल्यावर तो तिच्याकडे धावू लागला. इतक्यात रंभाने त्याला अडवले. त्या महिषाला भरपूर ताडन केले. त्यामुळे महिष अधिकच चवताळला व त्याने रंभावर आपल्या शिंगांनी प्रहार केला. ते तीक्ष्ण शिंग हृदयात घुसल्याने रंभ एकदम मुर्च्छित पडला व मृत झाला.
आपला पती मृत झाल्यावर महिषी घाबरून सैरावैरा पळू लागली. परन्तु कामाने अति विव्हल झालेला महिष तिच्यामागे पळू लागला. अत्यंत दीन होऊन रडत असलेली महिषी व तिच्या मागे धावत असलेला महिष पाहून यक्ष तिच्या रक्षणार्थ धावले. यक्षांचे व महिषांचे युद्ध झाले. यक्षांच्या बाणांनी जखमा होऊन महिष भूमीवर पडला व मृत्यु पावला.
नंतर यक्षांनी त्या मृत रंभाला आणून त्याच्या देहशुद्धीसाठी त्याला चितेवर ठेवले. ते पाहून महिषीने आपल्या पतीबरोबर अग्निप्रवेश करण्याचे ठरवले. यक्ष तिला तसे न करण्याबद्दल विनवीत असताही ती अग्नीमध्ये शिरली. तेव्हा महाबलाढ्य महिषासूर त्या चितेतून बाहेर पडला. पुत्रप्रेमाने मोहित होऊन रंभदेखील दुसरे दिव्य रूप धारण करून अग्नीतून बाहेर आला. हाच रंभ काही काळानंतर रक्तीबीज नाव धारण करता झाला. पुढे त्या महापराक्रमी महिषासूराला दैत्यांनी राज्यभिषेक केला.
ह्याप्रमाणे देव, दैत्य व मानव यांना तो बलाढ्य महिषासूर रक्तबीज दैत्यासह अवध्य झाला. हे राजा, अशा तर्हेने त्या महात्म्याच्या उत्पत्तीची सविस्तर कथा मी तुला कथन केली आहे.