समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय १० वा
मार्कंडेयाला भगवान शंकराचे वरदान -
सूत सांगतात -
( अनुष्टुप् )
वैभवो योगमायेचे श्रीनारायणनिर्मित ।
पाहिले निश्चये आता शरेनीं स्थिर राहिले ॥ १ ॥
मार्कंडेय मनात म्हणाले -
प्रभो ! ही आपुली माया असत्य सत्य भासते ।
मोठेही मोहती तेणे खेळ हा आगळा तसा ।
शरणार्थ्याऽभयो पाद म्हणोनी पदि पातलो ॥ २ ॥
सूत सांगतात -
मुनि तन्मय ते होता पार्वती सह ते शिव ।
जाता आकाशमार्गाने पाहिले मुनि हे असे ॥ ३ ॥
उमेने पाहता दाटे वात्सल्य हृदयी तिच्या ।
वदली शंकरा ती की पहा ब्राह्मण हा कसा ॥ ४ ॥
उदधी शांत जै होतो वादळो संपता पुन्हा ।
देहेंद्रिय तसा शांत तपाला फळ द्या तुम्ही ॥ ५ ॥
भगवान् शंकर म्हणाले -
महर्षी नेच्छिती वस्तू मोक्षांही नच इच्छिती ।
भगवद्भक्ति ती श्रेष्ठ अव्ययी मिळते तया ॥ ६ ॥
नेच्छिती जरि ते कांही तरीही भेटुया चला ।
संतांच्या भेटिचा लाभ दिवाळी दसराचि तो ॥ ७ ॥
सूत सांगतात -
विद्याधीष शिवो तैसे सर्वांच्या हृदयीं स्थित ।
आदर्श साशु संतांचे वदता पोचले तिथे ॥ ८ ॥
मनोवृत्ति मुनिंच्या तै निमाल्या हरिभक्तिसी ।
देहाचे नव्हते भान न जाणी शिव पातले ॥ ९ ॥
शिवांच्या पासुनी त्यांची न कांही लपली स्थिती ।
योगमाये करोनीया हृदयीं शिव पातले ॥ १० ॥
जटा ते जाळती तैशा त्रिनेत्रा दश त्या भुजां ।
उअंच तेजस्वि तो देह हृदयीं पाहता मुनी ॥ ११ ॥
शरिरीं व्याघ्रचर्मो नी करी ढाल शुलो धनु ।
खट्वांग अक्षमाला नी डमरू खड्गखप्पर ॥ १२ ॥
अकस्मात असे चित्ती मुनी आश्चर्य पावले ।
उदेल्या वृत्ति त्या ऐशा समाधी सोडिली तये ॥ १३ ॥
पाहती उघड्या नेत्रे सपार्वति जगद्गुरू ।
गणांच्या सह ते येता डोके पायासि टेकिले ॥ १४ ॥
स्वागतासन पाद्यार्घे गंध धूपादिने तयां ।
पूजिले ऋषिने दोघां गणांना पूजिले पुन्हा ॥ १५ ॥
त्यांना मार्कडेय म्हणाले -
आहा आत्मानुभावी नी पूर्णकाय तुम्ही प्रभो ।
तुमच्या सुख शांतीने जग ऐसे निरामय ।
करू मी काय ती सेवा प्रभो तो सांगने मला ॥ १६ ॥
नमो शिवास शांतासी सत्त्वा नी त्रिगुणातिता ।
सर्व प्रवर्तको रूप स्वरुपा नमो ॥ १७ ॥
सूत सांगतात -
स्तविता मुनिने ऐसे भगवान् शिवशंकर ।
अत्यंत तोषले चित्ती हांसोनी बोलु लागले ॥ १८ ॥
भगवान् शंकर म्हणाले -
विष्णु ब्रह्मा तसा मीही वरदेश्वर हो तिघे ।
मर्त्या अमृतही देतो म्हणोनी वर मागणे ॥ १९ ॥
द्विज तो साधुनी शांत लोकार्थ कष्ट सोशिती ।
विशेषता तयांची ती आमुचे प्रेमिभक्त ते ॥ २० ॥
पूजिती वंदिती विप्रां लोक नी लोकपाल ते ।
प्रत्यक्ष विष्णु नी ब्रह्मा सेवेत राहती सदा ॥ २१ ॥
तुम्ह्या नी आमुच्या मध्ये जीवात भेद ना मुळी ।
आत्मा तो सर्व देहात संतां तेणेचि पूजितो ॥ २२ ॥
न तीर्थ जळ ते थोडे जड मूर्ती न देवता ।
तीर्थ नी देव ते संत दर्शने लाभ होतसे ॥ २३ ॥
आम्ही तो नमितो विप्रां आमुचे वेदरूपि ते ।
एकाग्रे तप स्वाध्याये योगे ध्याने नि धारण ॥ २४ ॥
तरती पापिही थोर संतांच्या दर्शने तुम्हा ।
बोलता सान्निधी जाता न संशय तयात तो ॥ २५ ॥
सूत सांगतात -
धर्मगुह्य अशा शब्दे बोलले चंद्र भूषण ।
सुधाधिपूर्ण ते शब्द ऐकता नच तृप्ति हो ॥ २६ ॥
विष्णुमायीं भ्रमोनीया थकले बहु ते मुनी ।
शिवशब्दांमृते क्लेश संपता बोलले तयां ॥ २७ ॥
मार्कंडेय म्हणाले -
अहो ती ईश्वरी लीला न कळे देहधारिया ।
जगाचे स्वामिची होता मज ऐशास वंदिती ॥ २८ ॥
धर्माचे भाष्य नी गुह्य-स्वरूप अनुमोदिता ।
आचरिती तसे धर्मा तयां ते हे प्रशंसिती ॥ २९ ॥
जादुगार जसा खेळ दाविता राहि वेगळा ।
वंदिता संत तै तुम्ही न कांही त्रुटी होतसे ॥ ३० ॥
स्वप्नदृष्ट्यापरी त्म्ही मनाने सृष्टि निर्मिली ।
प्रवेशता तिच्यामध्ये निर्गुणा गुण भासती ॥ ३१ ॥
नमोति भगवंताला त्रैगुनी आत्मरूपि या ।
अवितीय अशा ब्रह्मा ज्ञानमूला नमो नमः ॥ ३२ ॥
अनंता श्रेष्ठ ते काय तुमच्या दर्शनाहुनी ।
दर्शने पूर्णकामो नी सत्य संकल्प होतसे ॥ ३३ ॥
भक्तांच्या कामना पूर्ण करिता भगवान तुम्ही ।
वर मी मागतो एक देवभक्ती रमो मन ॥ ३४ ॥
सूत सांगतात -
मुनिंनी ऐकता वाणी शंकतां पूजिले असे ।
उमेची प्रेरणा होता बोलले शिवे ते पुन्हा ॥ ३५ ॥
कामना पूर्ण हो विप्रा लाभेल भक्ति ती तशी ।
कल्पांत यश ते होऊ अजरामर हो पहा ॥ ३६ ॥
अक्षुण्ण ब्रह्मतेजो हो त्रिकालज्ञ असेचि ते ।
विशेष ज्ञान लाभेल वैराग्य स्थिति होय नी ।
स्वरूपस्थित् लाभोनी पुराणाचार्य हो तसा ॥ ३७ ॥
वर देवोनिया ऐसा तयांच्या प्रलया तसे ।
उमेसी सांगता गेले निघोनी ते त्रिलोचन ॥ ३८ ॥
महायोगाचिये ऐसे मार्कंडेयास ते फळ ।
लाभले लाभली भक्ती फिरती पृथिवीवरी ॥ ३९ ॥
ज्ञानसंपन्न त्या विप्रे योगमायेसि जाणिले ।
सर्व ते आपणा मी हे आत्ताच बोललो असे ॥ ४० ॥
जाणिले प्रलया ते तो माया वैभवची असे ।
तात्कालिक असे होते न ते साधारणो मुळी ॥ ४१ ॥
( इंद्रवज्रा )
मी वर्णिली ही भृगुवंशि गाथा
माया हरीची महिमानपूर्ण ।
जे ऐकती कीर्तनि गाति जे ते
त्यांचे तुटे हो भव भेय सर्व ॥ ४२ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ १० ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|