समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय ५ वा

श्रीशुकदेवांचा अंतिम उपदेश -

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
वर्णिला या पुराणात विश्वात्मा भगवान् हरी ।
प्रसादे तोच हो ब्रह्मा कोपता रुद्र तोच की ॥ १ ॥
राजा तू मरणाच्या त्या पशुबुद्धीस त्यागिणे ।
नव्हता जन्मण्या पूर्वी नसशील पुन्हाहि तू ॥ २ ॥
जसे बीजातुनी वृक्ष जन्मती ते पुनःपुन्हा ।
पुत्ररूपी पुढे विश्वीं उरशील पुढेहि तू ॥ ३ ॥
स्वप्नात मरता नेता स्मशानी सर्व ते कळे ।
अवस्था शरिराची ती आत्मा तो शुद्ध वेगळा ॥ ४ ॥
घटाकाश फुटे तेंव्हा महाकाशचि भासते ।
मरता ब्रह्म तो भासे अब्रह्म भासतो मुळी ॥ ५ ॥
मनाच्या कल्पना सर्व आत्मा देहासि मानिता ।
अज्ञान वसता चित्ती जीव चक्रात त्या पडे ॥ ६ ॥
पात्र तेल तशी वात अग्नि संयोग तो घडे ।
तदाचि पेटते ज्योत देहाचेही तसेचि की ॥ ७ ॥
दीपाला विझवील्याने तेज ना संपते मुळी ।
सृष्टि ही सरता तैसी आत्म्याला नाश ना मुळी ॥ ८ ॥
राजा शुद्ध विवेकाने परमात्म्यासि जाणणे ।
हृदयी स्थिर जो त्याचा साक्षात्कार करीं स्वये ॥ ९ ॥
मृत्यूचा मृत्यु तू होशी तू स्वये ईश्वरोच की ।
द्विजाचा शाप ना मारी न मृत्यू पास ये तुझ्या ॥ १० ॥
मीचि ब्रह्म परंधाम ब्रह्म्याचे पदश्रेष्ठ मी ।
स्थित तू स्वय हो एक अनंत नित रूपि त्या ॥ ११ ॥
घेईल डंख तो पाया दांते तक्षक तो तुझ्या ।
शरीर विश्व हे सारे आत्मरूपात पाहणे ॥ १२ ॥
हरिच्या बोललो लीला प्रश्न संबंधि त्या अशा ।
आणखी ऐकणे काय आत्मरूप नृप प्रिया ॥ १३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ ५ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP