समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १२ वा - अध्याय ४ ला

चार प्रकारचे प्रलय -

श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
परमाणु पासुनी काळ द्विपरार्धहि बोललो ।
आता कल्पस्थिती तैसे प्रलया ऐकणे नृपा ॥ १ ॥
चतुर्युग हजारांचा ब्रह्म्याचा दिन एक तो ।
कल्पही म्हणती त्याला चवदा मनु कल्पि त्या ॥ २ ॥
प्रलयो तेवढा होत जेवढा कल्प तो असे ।
ब्रह्म्याची निशि ती होय लीन ती तिन्हि लोक तैं ॥ ३ ॥
नैमितिक यया नाम ब्रह्मा विश्वास मोडुनी ।
तसे नारायणो शेष झोपती प्रलयात त्या ॥ ४ ॥
या परी दिन रात्रीने ब्रह्म्याचे शतवर्ष ते ।
द्वपरार्ध असा काळ महत्तत्वेहि लीन तैं ॥ ५ ॥
असा प्राकृतिको राजा प्रलयो घडुनी तदा ।
ब्रह्मांडरूप तो सोडी कारणी स्थिर होतसे ॥ ६ ॥
पर्जन्य शत वर्षे तैं नपडे भूमिसी नृपा ।
न मिळे खावया अन्न लोक लोकास भक्षिती ॥ ७ ॥
काळ तो त्रासितो ऐसे प्रजा ती क्षीण हौनी ।
सांवर्तक असा सूर्य आपुले तेज ओकुनी ॥ ८ ॥
पृथ्वीचे रस शोषोनी धार सम्तत वर्षितो ।
आणि सांवर्तको शेष संवर्तक् अग्नि ओकिता ॥ ९ ॥
अग्निने जळती सर्व सप्तपाताळही तसे ।
केव्हाच मरती प्राणी ब्रह्मांड भाजते त‍इ ॥ १० ॥
गोवर्‍या जळता पूर्ण भस्म ते राहते जसे ।
पुन्हा सांवर्तको वायु शेकडो वर्ष चालतो ॥ ११ ॥
धूळची चूळ दातोनी रंगी बेरंगिते ढग ।
आकाशी दाटती आणि गर्जना होतसे बहु ॥ १२ ॥
शेकडो वर्ष ती वर्षा होवोनीया भयंकर ।
ब्रह्मांडा आत नी बाह्य होतसे जलमग्न ते ॥ १३ ॥
जलप्रलय हा होता पृथ्विचा गंध संपतो ।
जळात गंध तो जाता धूळही जलरूप हो ॥ १४ ॥
जळाला गिळिते तेज तेजाला वायु तो गिळी ।
वायुचा स्पर्श आकाश गिळोनी शांत होतसे ॥ १५ ॥
तमऽहंकार आकाशा शब्दाला गिळिते पुन्हा ।
इंद्रीयवृत्तिला तेची आपुल्या उदरात घे ॥ १६ ॥
देवता त्या अधिष्ठातृ सत्त्वाहंकारि मेळती ।
इंद्रीयवृत्तिला तोची आपुल्या उदरात घे ॥ १७ ॥
अहंकारा महत्तत्व महत्त्वासि त्रैगुण ।
ग्रासिती महिमा सारा काळाचाचि परीक्षिता ॥ १८ ॥
चराचरास तो मूळ नित्याव्यक्त अनादिनी ।
अनंत अविनाशी तो साम्यवस्थेस स्थीर हो ।
विकारहीन तै काल न त्या क्षण न वर्ष तै ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
न त्यास वाचा नि मनो न सत्व
     तमो रजो वा अन श्रेष्ठतत्व ।
न प्राण बुद्धिप्रिय देवता वा
     न कांहि इच्छा स्थितिही तयास ॥ २० ॥
न स्वप्न जागृत् अन तै सुषुप्ति
     न राहि सूर्यो अन पंचभूते ।
ते शून्य जैसे अनुमान नोहे
     अव्यक्त ते हो मुलभूत तत्व ॥ २१ ॥
( अनुष्टुप् )
लयो प्राकृतिको ऐसा पुरूष प्रकृती तदा ।
संपती दोन्हिही शक्ती मूळरूपी स्थिरावती ॥ २२ ॥
बुद्धि इंद्रिय नी रूप ज्ञानही भासची उरे ।
आदी नी अंतिही तेच म्हणॊनी सत्य ते नसे ।
दृश्य तो नच त्यां सत्ता माया सर्वचि मिथ्य ती ॥ २३ ॥
दीप नेत्र तसे रूप तेजाच्या हुनि भिन्न जैं ।
ब्रह्माच्या वेगळे तैसे तन्मात्रा बुद्धि इंद्रिया ॥ २४ ॥
अवस्था बुद्धिच्या तीन आंतरात्मा ययांनि तो ।
विश्व तैजस नी प्राज्ञ मायेने भासतो त्रयी ।
बुद्धिगत अशा रूपा आत्मा तो भिन्नचे असे ॥ २५ ॥
अवस्था सृष्टिसी तीन ब्रह्मात दूरही कधी ।
आकाशात जसे मेघ असती नसती जसे ॥ २६ ॥
अवयवी जगी वस्तु नसता सत्य वाटती ।
वस्त्र जैं सूत्ररूपाने तसे या जगता रुपो ॥ २७ ॥
कार्यकारण ना ब्रह्मा सामान्य नि विशेष ते ।
भ्रमाने भासती भेद अवस्तु स्ःउन्य ते उरे ॥ २८ ॥
प्रपंच असुनी खोटा ब्रह्मरूपा न वेगळा ।
मानिता वेगळा त्याला आत्म्याच्या परि सिद्ध हो ॥ २९ ॥
सत्याला नच भिन्नत्व अज्ञानी भिन्न पाहती ।
महाकाश घटाकाशा परी ते पाहणे असे ॥ ३० ॥
( इंद्रवज्रा )
सोने जसे भिन्न रुपात भासे
     व्यवहार ज्ञाने त‍इ कोणि ज्ञाते ।
आधार घेती श्रुतिचाच आत्मा
     अनेक रूपी मग वर्णितात ॥ ३१ ॥
सूर्या कडोनी ढग जन्मतांत
     तेजेचि होती मग भासमान ।
सूर्या बघायासहि आड येती
     ब्रह्मांश जीवो त‍इ आड येती ॥ ३२ ॥
दिसेचि भानू ढग पांगल्याने
     तसेचि इच्छी जधि जीव आत्मा ।
उपाधि सोडोनिहि आपुल्या त्या
     स्वरूप होते मग ज्ञात जीवा ॥ ३३ ॥
विवेक खड्गे जधि जीव तोडी
     मायामयाहंकरणात्मबंध ।
तै स्थीर होतो स्वरुपात जीव
     अत्यंतिको तो प्रलयोच जाणी ॥ ३४ ॥
( अनुष्टुप् )
सांगती ब्रह्मवादी ते जेवढे प्राणिमात्र हे ।
जन्मती समयी नित्य नित्य तो जन्म नी लय ॥ ३५ ॥
प्रवाह वाहतो नित्य दीपज्योती जळे जशी ।
काळाने देह तै नित्य क्षणाने रूप पालटी ।
प्रत्येक क्षणि तो होतो जन्म नी लय ही पुन्हा ॥ ३६ ॥
आकशी असती तारे तयांची गति ना दिसे ।
तसेचि भगवान् काल न दिसे पालटोनिया ॥ ३७ ॥
नित्य नैमित्तिको तैसे आत्यंतिक नि प्राकृती ।
प्रलया वर्णिले चारी काळाची गति सूक्ष्म ती ॥ ३८ ॥
( इंद्रवज्रा )
नारायणो शक्ति नि आश्रयो त्या
     समस्त प्राण्यां कुरुश्रेष्ठ वीरा ।
लीला कथाया हरिच्याच सर्व
     ब्रह्मासही त्या नच पूर्ण ज्ञान ॥ ३९ ॥
( वसंततिलका )
संसारसिंधु मधुनी तरणे जयाला
     त्यांना कथेविण नसे दुसरीच नौका ।
एको कथा नरपती पुरुषोत्तमाच्या
     तो सेवितो रस मिळे बन इच्छिते ते ॥ ४० ॥
( अनुष्टुप् )
कथिलीही मला राजा भगवान् बादरायणो ।
कथा भागवती प्रेमे संहिता वेदतुल्य जी ॥ ४१ ॥
वक्ता सूत पुढे हीच नैमीषवनि सत्रि त्या ।
शौनकादी ऋषी यांना संहिता सांगतील की ॥ ४२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥
॥ पहिला अध्याय हा ॥ १२ ॥ ४ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP