समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४५ वा

श्रीकृष्ण बलरामाचे यज्ञोपवीत व गुरुकुलात प्रवेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णाने पाहिले की या पितरा ज्ञान जाहले ।
न योग्य जाणुनी चित्ती योगमायाचि सोडिली ॥ १ ॥
बळिरामा सवे कृष्ण विनये झुकुनी तदा ।
प्रसन्न करण्या बोले बाबा बाबानि आई गे ॥ २ ॥
उत्कंठित तुम्हा साठी सदाचि पुत्र आम्हि हे ।
तरी बाल्य किशोरीच तुम्हा सुख न ते दिले ॥ ३ ॥
दैवाने भाग्य ना लाभे तुमच्या पाशि राहणे ।
म्हणोनी घरचे सौख्य प्रेम लाड न लाभले ॥ ४ ॥
जन्मिती पितरे तैसे लाडिती पोषिती तदा ।
गाजवी पुरुषार्था ते न ते ऋण फिटे कधी ॥ ५ ॥
धन तने न जो सेवी सामर्थ्य असुनी सुत ।
मरता यम तो त्याला त्याचेच मास भक्षवी ॥ ६ ॥
वृद्ध माता पिता विप्र सतीपत्‍नी नि बालक ।
संतती आश्रितो यांना न पोषी जो समर्थ तो ।
मुडद्या समची जाणा जिवंत पुत्र तो जरी ॥ ७ ॥
व्यर्थची वय हे गेले कंसाचे भय ठेवुनी ।
उद्विग्न राहिलो चित्ती सेवा ना घडली पहा ॥ ८ ॥
माझे आई पिताजी हो दोघांनी क्षमिणे अम्हा ।
हाय हे केवढे कष्ट कंसाने दिधले तुम्हा ॥ ९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
देवकीनंदने कृष्णे सांत्विता माय बाप ते ।
दोघांनी धरिले कृष्णा परमानंद मेळिला ॥ १० ॥
मायेने बद्ध ते झाले अश्रुंनी कृष्ण न्हाविला ।
दाटोनी कंठ तो येता न फुटे शब्द एकही ॥ ११ ॥
सांत्विता पितरां कृष्णे प्रपिता उग्रसेनला ।
राजा जो यदुवंशाचा म्हणोनी स्थापिला पुन्हा ॥ १२ ॥
नी वदे तो महाराजा आम्ही तो आपुली प्रजा ।
राजसिंहासनी कोणी न बसे यदु शापिता ॥ १३ ॥
सेवको हो‍उनी मी जै सेवा ती आपुली करी ।
देवता झुकुनी देती भेटी आणोनि त्या तुम्हा ॥ १४ ॥
कंसाच्या जे भये वृष्णी अंधको यदु नी मधू ।
दाशार्ह कुकरो आदी गेले सोडोनि देह हा ॥ १५ ॥
तयांना आग्रहे धुंडी क्लेशले घर सोडिता ।
केले हे भगवान् कृष्णे विधात्याने परीक्षिता ॥ १६ ॥
वृष्णि नी बलरामाच्या शक्तिने निर्भरो असे ।
सर्व ते आपुल्या गेही आनंदे राहु लागले ॥ १७ ॥
आनंदसदनो ऐसे झाले उत्साहिनी बली ।
स्वरूप नाचरी दृष्टी पाहता सर्व हर्षती ॥ १८ ॥
वृक्षही युवका ऐसे झाले उत्साहि नी बली ।
कां की नित्यचि त्या लाभे कृष्णदर्शन पान ते ॥ १९ ॥
कृष्ण नी बलरामो हे नंदबाबास भेटुनी ।
गळ्यासी लागले आणि तयांना बोलु लागले ॥ २० ॥
पिता जी यशदा माते पाजिले लाडिले अम्हा ।
शरिरे करिती प्रेम पिता माता न संशय ॥ २१ ॥
त्यागिती पितरे त्यांना पुत्राच्या परि पोषिती ।
लाडिती लाविती प्रेम खरे ते माय-बाप की ॥ २२ ॥
जावे व्रजी तुम्ही आता वात्सल्ये दुःख होतसे ।
सुहृद् संबंधियां साठी येवूत सुखवावया ॥ २३ ॥
कृष्णाने नंदबाबादी गोपांना वस्त्र भूषणे ।
धातुंची देउनी भांडी सर्वा सत्कारिले असे ॥ २४ ॥
कृष्णाने ऐकुनी शब्द बाळांना गळि लावुनी ।
पुन्हा ते भरल्या नेत्रे सगोप व्रजि पातले ॥ २५ ॥
पुन्हा श्री वसुदेवांनी गर्गाचार्य पुरोहिता ।
द्विजांच्या करवी केला द्वयांचा मुंजिचा विधी ॥ २६ ॥
वस्त्र आभूषणे द्रव्य सवत्स धेनु ज्या तशा ।
आलंकृत करुनी विप्रा दिधल्या दक्षिणा पहा ॥ २७ ॥
कृष्ण नी बलरामाचे जन्मनक्षत्र योजुनी ।
दान त्या दिधल्या गाई संकल्प मनिचा जसा ॥ २८ ॥
कृष्ण नी बलरामाला द्विजत्व प्राप्त जाहले ।
होतेच ब्रह्मचारी ते गायत्री पाठ घेतला ॥ २९ ॥
स्त्रोत ते सर्व विद्येचे सर्वज्ञ जगदीश्वर ।
विशुद्ध ज्ञान सिद्धो ते दडती मानवी रुपी ॥ ३० ॥
गुरुकुला इच्छुनी गोले दोघे काश्यप गोत्रिच्या ।
सांदीपनी मुनी पाशी अवंति पुरवासि ते ॥ ३१ ॥
विधिने राहिले तेथे सुसंयत् वागणे तसे ।
दोघेही गुरुची सेवा करिती इष्ट देव जै ॥ ३२ ॥
शुद्धभाव अशी सेवा पाहता गुरु तोषले ।
वेदांगोपनिषद् सर्व दोघां दीक्षा दिली असे ॥ ३३ ॥
धनुर्वेद स्मृती शास्त्र मिमांसा तर्क न्याय नी ।
राजनैतिक तो दंड द्वयां शिकविले तये ॥ ३४ ॥
सर्व नरवरो श्रेष्ठ सर्वविद्या प्रवर्तक ।
द्वय ही बंधु ते ऐसे ऐकता सांगती तसे ॥ ३५ ॥
चौंसष्ट त्या दिन-रात्री शिकले सर्व त्या कला ।
शिकणे संपता त्यांनी गुरुला पुसले असे ।
आपुली सांगणे इच्छा देऊ ती दक्षिणा तशी ॥ ३६ ॥
( इंद्रवज्रा )
अद्‌भूत बुद्धी गुरुपत्‍नि यांची
     जाणोनी दोघांस वदोनि गेली ।
प्रभास क्षेत्रास बुडोनि मेला
     तो पुत्र आम्हा परतोनि द्यावा ॥ ३७ ॥
रथात बैसोनि द्वयो निघाले
     मानोनि आज्ञाहि समुद्रक्षेत्री ।
साक्षात् प्रभूला बघता समुद्र
     पूजा करी घेउनी पातला की ॥ ३८ ॥
( अनुषुप् )
भगवान् वदले त्याला लाटा थोर तुझ्या अशा ।
तेणे तू गुरुपुत्राला नेले तू देइ शीघ्रची ॥ ३९ ॥
समुद्र म्हणाला -
न नेला पुत्र मी देवा जळात शंख दैत्य तो ।
राहतो चोरिला त्याने सहसा गुरुपुत्र तो ॥ ४० ॥
ऐकता जळिचा दैत्य मारोनी फाडिला असे ।
तरी ना भेटला पोटी गुरुपुत्र हरीस की ॥ ४१ ॥
घेतला शंख तो कृष्णे बळीच्या सह पातले ।
यमाच्या नगरीं आणि फुंकिला शंख तो बहू ॥ ४२ ॥
यमाने भक्तिभावाने विधिने पूजिले द्वया ।
सच्चिदानंद कृष्णाला वदला यमराज तो ॥ ४३ ॥
लीलावतार घेवोनी मानवी रूप धारिले ।
सर्वव्यापक रे देवा काय सेवा करू तुम्हा ॥ ४४ ॥
श्रीभगवान् म्हणाले -
यमराज गुरुपुत्रा तुम्ही तो कर्मबंधने ।
आणिले येथ तो त्याला क्षमोनी आणणे पुढे ॥ ४५ ॥
जी आज्ञा म्हणूनी धर्मे आणिला गुरुपुत्र तो ।
गुरुसी दिधला पुत्र वदले काय आणखी ॥ ४६ ॥
गुरुजी म्हणाले -
लाभली दक्षिणा श्रेष्ठ आता काय हवे दुजे ।
श्रेष्ठाचा गुरु तो त्याला जगात काय ते उणे ॥ ४७ ॥
वीरांनो घरि जा आता पवित्र कीर्तीवंत व्हा ।
नित्य नवी अशी विद्या कधी ना विसराल ही ॥ ४८ ॥
पुत्रा परीक्षिता ! तेंव्हा वेगवान् रथि बैसुनी ।
कृष्ण नी बलरामो हे पातले मथुरापुरा ॥ ४९ ॥
विरही लोक ते सारे आनंदी मग्न जाहले ।
गेलेले धन ते लाभे तसे झाले तयांस की ॥ ५० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचेचाळिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP