समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४४ वा

चाणूर मुष्टिक आदी पैलवान व कंसाचा उद्धार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् भगवान् कृष्णे चाणुरा मारु इच्छिले ।
चाणुरा भिडला कृष्ण मुष्टिका बलराम तो ॥ १ ॥
जिंकण्या दुसर्‍या मल्ला हातात हात नी तसे ।
पायात पाय घालोनी एकमेकास ओढिती ॥ २ ॥
पंजे पंजात नी तैसे गुडघे गुडघ्यास नी ।
छातीस छाति देवोनि एकमेकास मारिति ॥ ३ ॥
डावपेच करोनीया फिर्विती जोडिदार तो ।
ढकलिती कधी तैसे बांधिती आवळोनिया ।
आप‌टिती सुटती तैसे धावती रोधिती तसे ॥ ४ ॥
प्रहार करुनी कोणी जर्जरो करु पाहती ।
पडता दुसरा स्पर्धी गुढघे पाय आवळी ।
उचली आवळोनीया गळा दाबोनि लोटिती ॥ ५ ॥
कुस्त्या पहावया स्त्रीया तेथील कैक पातल्या ।
पाहता वीर ते थोर बाळांसी कुस्ति खेळता ।
गटाने येउनी एक बोलती त्या परस्परे ॥ ६ ॥
सभासद् कंस राजाचे अन्याय करिती पहा ।
खेदाचे गोष्ट ही ऐसी राजाच्या साक्षिने घडे ॥ ७ ॥
भगिनी बघ गे कैसे वज्राच्या परि देह ते ।
किशोर बळि नी कृष्ण सुकुमार पहा कुठे ॥ ८ ॥
जेवढे बघती त्यांना धर्म हा मोडिल्या मुळे ।
लागेल पाप ते मोठे न थांबा येथ आपण ॥ ९ ॥
शास्त्र ते सांगते ऐसे न थांबा दोष-जाणुनी ।
सांगणे ऐकणे खोटे साहने दोष या त्रयी ॥ १० ॥
पहा पहा कसा कृष्ण घेरितो चारि बाजुने ।
शोभती धर्मबिंदूही कमळावरि जै जल ॥ ११ ॥
सखये दिसले कां ते बळी संतप्त हो‍उनी ।
मारितो मुष्टिका कैसा असा तो शोभतो कसा ॥ १२ ॥
( वसंततिलका )
आहे पवित्र व्रज भू वसतो हरी तै
     लक्ष्मी तसेचि शिवतो पुजितो जयाला ।
लेवोनि माळ वनिची हरिवंशि फुंकी ।
     नी रामकृष्ण द्वय ही वनि गायि नेती ॥ १३ ॥
नाही सखे कळत ते तप गोपिकांचे
     नेत्रे सदाचि पिति त्या हरिच्या रुपाला ।
लावण्यसार हरि तो नच कोणि तैसा
     तो नित्य नूतन दिसे मिळता व्रजिंना ॥ १४ ॥
त्या धन्य गोपि व्रजिच्या हरि चित्ति ध्याती
     प्रेमे भरोनि असवे हरिकीर्ति गाती ।
त्या कांडणी दळणि नी मथिता दुहीता
     न्हाता धुता नि करिता सगळेचि कामे ॥ १५ ॥
जायी वनात हरि हा नित त्या सकाळी
     चारोनि गायि परते मग सांजवेळी ।
तै वाजवी अतिव सुंदर बासुरी ती
     सोडोनि काम बघती व्रजनारि धन्या ॥ १६ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित् पूरवासी त्या बोलता नारि या अशा ।
योगेश्वरो मनीं लक्षी मारण्या शत्रु चाणुरा ॥ १७ ॥
भयाने बोलती स्त्रीया ऐकती वसुदेव नी ।
देवकी घाबरे चित्ती पुत्र शौर्य न जाणुनी ॥ १८ ॥
भिन्न भिन्न असे डाव चाणुरो कृष्णही करी ।
तसेच मुष्टिको राम लढती ते परस्परा ॥ १९ ॥
अंग प्रत्यंग कृष्णाचे वज्राच्या परि जाहले ।
रग्‌डिता शत्रु तो झाला मणक्या माजि की ढिला ॥ २० ॥
व्यथेने क्रोधला शत्रू ससाण्या परि झेप घे ।
कृष्णाच्या छातिसी त्याने केला मुष्ठीप्रहार तो ॥ २१ ॥
फुलांचा गजरा जैसा हत्तीच्या अंगि तो पडे ।
अविचल तसा कृष्ण चित्तात शांत राहिला ॥ २२ ॥
भूमिसी आपटी कृष्ण फिरवी आंतरीक्षि नी ।
अस्ताव्यस्त असा शत्रू फेकिला त्या भुमिवरी ॥ २३ ॥
तसीच बळिरामाने मुष्टिका ठोस मारिली ।
चापटी मारिली जोरे शत्रू तो थर्रर् कांपला ॥ २४ ॥
वार्‍यात उखडे वृक्ष तसा हा त्रासला बहू ।
निष्प्राण पडला खाली ओकला रक्तही बहू ॥ २५ ॥
योद्धाश्रेष्ठ बळीरामे तत्काल दुसरा भिडू ।
कूटाला धरुनी डाव्या करें तुच्छोनि मारिले ॥ २६ ॥
त्या क्षणी कृष्णलाथेने शलाचे शिरही तुटे ।
त्या शला चिरले जैसे तृण ते कापणे तसे ॥ २७ ॥
चाणुरो मुष्टिको कूट शल तोषल पाच हे ।
मरता, वाचले जे ते पळाले प्राण रक्षिण्या ॥ २८ ॥
पळता मल्ल ते सारे भेरीनादात नाचुनी ।
बळी कृष्ण तसे गोप खेळले मल्लखेळही ॥ २९ ॥
प्रेक्षकां मोद तो झाला कार्याने रामकृष्णाच्या ।
शिष्टे प्रशंसिले त्यांना तेणे कंस चिडे बहू ॥ ३० ॥
मारिता पाच ते मल्ल पळाले अन्य सर्व तै ।
कंसाने वाद्य ते सारे केले बंद नि तो वदे ॥ ३१ ॥
अरे हे वसुदेवाचे दुश्चरित्र अशी मुले ।
हाकला येथुनी त्यांना लुटा नंदास बांधणे ॥ ३२ ॥
कुबुद्धी वसुदेवो तो उग्रसेन पिता तसा ।
दोघांना मारणे शीघ्र जिते सोडान त्यांजला ॥ ३३ ॥
बरळे कंस हा ऐसा तेंव्हा अक्षेय कृष्ण तो ।
वेगाने चढला मंची क्रोधपूर्ण असाचि की ॥ ३४ ॥
मनात जाणिले कंसे मारण्या कृष्ण पातला ।
सखड्ग ढाल घेवोनी उठे सिंहासनातुनी ॥ ३५ ॥
( इंद्रवज्रा )
प्रहारण्या कंस घेई पवित्रा
     डावीकडे नी उजव्या करांसी ।
असह्य ऐसे हरिकृष्ण तेज
     बळे धरीला मग कंस कृष्णे ॥ ३६ ॥
मुकुट त्याचा पडला धरेशी
     केसा धरोनी मग कृष्ण पाडी ।
नी मुक्त ऐशा हरिने तयाच्या
     देहासि केला मग मुक्त नाच ॥ ३७ ॥
लाथेचि मेला तै कंस शत्रू
     प्रेतास ओढी धरणीसि कृष्ण ।
सिंहो जसा ओढितो हत्ति लागी
     मेलो असा एकचि शब्द आला ॥ ३८ ॥
भितीत कंसो हरि चिंति नित्य
     खाता पिता चालत श्वास घेता ।
शत्रू मनी मानुनि नित्य ध्यायी
     सारुप्य मोक्षो हरि दे तयासी ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् )
कंसाला आठ ते बंधू न्यग्रोध कंक हे द्वय ।
क्रोधाने बदला घ्याया रामकृष्णाशि धावले ॥ ४० ॥
बळीने पाहता दोघा परीघ उचलोनिया ।
पशूला सिंह जै मारी तसेचि मारिले द्वया ॥ ४१ ॥
आकाशी वाजल्या भेरी ब्रह्मादी देव सर्व ते ।
स्तवोनी अर्पिती पुष्पे अप्सरा नाचल्या तशा ॥ ४२ ॥
नृपा ! कंसादिच्या स्त्रीया पिटीत ऊर तेधवा ।
रडता पातल्या तेथे विलापस्वर जाहला ॥ ४३ ॥
वीरशय्ये वरी ऐसे नृपादी पाहता बहू ।
आक्रोश करुनी मोठा अश्रु त्या ढाळु लागल्या ॥ ४४ ॥
नाथा रे प्रीय धर्मज्ञा करुणाकर वत्सला ।
उजाड जाहलो आम्ही अनाथ पुत्र जाहले ॥ ४५ ॥
स्वामी हो विरहे सारे मांगल्योत्सव संपले ।
शोभाहीन अशा झालो विधवा आम्हि सर्व या ॥ ४६ ॥
निरपराधि प्राण्यांना द्रोहिले तुम्हि ते बहू ।
अन्याये गति ही झाली कोणा शांती मिळे तशी ॥ ४७ ॥
आधार कृष्ण जीवांचा रक्षितो तोच जीवही ।
तिरस्कार तया होता कोणाला सुख लाभते ॥ ४८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् भगवान् कृष्ण जगाचा जीवनो असे ।
स्त्रियांना सांत्विले आणि केलेसे अंत्यकर्म ते ॥ ४९ ॥
कृष्णनी बलरामाने पितरां सोडवीयले ।
शीर ते टेकवोनीया पदासी वंदिले पुन्हा ॥ ५० ॥
पुत्रांनी नमिले तेंव्हा जगदीश्वर मानुनी ।
तयांनी त्या द्वयांना ना धरिले छातिसी पहा ॥ ५१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चव्वेचाळिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP