समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १६ वा

कालियावर कृपा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव म्हणतात -
कृष्णाने पाहिले पाणी काळ्यासर्पेचि नाशिले ।
यमुनाजलशुद्ध्यर्थ सर्पा बाहेर काढितो ॥ १ ॥
राजा परीक्षितान विचारले -
ब्रह्मन् ! अगाध ते पाणी त्यात तो ठेचिला कसा ।
जलचर नसोनीया पाण्यात राहिला कसा ॥ २ ॥
अनंत भगवान् कृष्ण स्वच्छंदेचि विहारतो ।
गोपरूपे सुधा झाला न तृप्ति ऐकता मिळे ॥ ३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् ! यमुनापात्रीं कालियाकुंड एक ते ।
विषारी उकळे पाणी वरचा पक्षिही पडे ॥ ४ ॥
तरंगा स्पर्शिता तैसे वायूने तृण वृक्ष नी ।
मरती पशु पक्ष्यादी तात्काल वेळ ना सरे ॥ ५ ॥
( वसंततिलका )
ते चंड वीषहरिने जलि पाहिले नी
     माझी विहार यमुना अशि नाशिली का ।
चिंतूनिया करि कसी कमरेस फेटा
     गेला कदंब हरि हाबुक ठोकुनीया ।
उंचोनि त्यात उडि घे मग कृष्ण त्याच ।
     पाण्यात जे उकळते विष पांगुनीया ॥ ६ ॥
पीतो नि लाल उठती जळि त्या तरंग
     टाकी उडी हरि तदा उसळोनि आले ।
आश्चर्य ना हरिस ते बघताचि सर्प
     जो चारशे कर असे अति लांब ऐसा ॥ ७ ॥
हत्तीपरी उडविले जल श्रीहरीने
     हातेचि तो उसळिता बहु शब्द येती ।
नेत्रश्रव्यास कळले कुणि शत्रु आला
     क्रोधोनि तो मग पुन्हा हरिपाशि आला ॥ ८ ॥
ते श्याम बाळ बघता नच नेत्र झाकी
     श्रीवत्सचिन्ह पिवळ्या वसनीं हरीचे ।
सूहास्य नी पद जशी कुसुमीय गादी
     हा तो विषारि जलि ही बहु खेळतो की ।
क्रोधोनि डंख करण्या मग श्रीहरीला
     मर्मस्थ अंगि जखडी बळ लावुनीया ॥ ९ ॥
दावी हरीहि अपुली जणु शक्ति नाही
     दुःखेचि गोप पडले मग त्या भुमीसी ।
देहो धनो नि मनिच्या सगळ्याच इच्छा
     स्त्री पुत्र भोग हरिसी दिधले तयांनी ॥ १० ॥
( अनुष्टुप् )
वासुरे बैल नी गाई दुःखाने डरकाळती ।
लावली दृष्टी कृष्णाशी अचेत जाहले जसे ॥ ११ ॥
व्रजीं आकाशि भूमीसी देहा उत्पात जाहले ।
सूचना जणु त्या होती अशूभ घडणे असे ॥ १२ ॥
शकून पाहता ऐसा नंदांना कळले तसे ।
न सवे बळि तो कृष्णा व्याकूळ जाहले मनीं ॥ १३ ॥
वाटले आज ते त्यांना कृष्णाचा मृत्यु जाहला ।
बुडाले दुःख शोकात त्यांचा सर्वस्व कृष्ण तो ॥ १४ ॥
वत्सलो वृद्ध बालो नी स्त्रिया गाई व्रजींचिया ।
वनात पातले दीन सर्वांनी घर सोडिले ।
कन्हैया पाहण्या झाले आतूर मनि सर्व ते ॥ १५ ॥
बलराम प्रती कृष्ण पाहता हासला मनीं ।
बंधूची जाणुनी शक्ती शांत तो राहिला असे ॥ १६ ॥
शोधीत पदचिन्हांना कृष्णाला व्रजवासि ते ।
पद्मांकुश ध्वजो वज्र ठसे पाहत चालले ॥ १७ ॥
( इंद्रवज्रा )
गोपद्मचिन्हे अन त्याच तैशी
     त्या श्रीहरीचे पदचिन्ह होते ।
शोधीत पद्मांकुश चिन्ह सारे
     त्वरे निघाले हरिसी पहाया ॥ १८ ॥
( वसंततिलका )
लांबून ते बघत श्रीहरि सर्ववेढीं
     निश्चेष्ट तो मग तिथे बहु गोप गाई ।
आर्तस्वरेचि करिती हरिचाच धावा
     व्याकूळले नि मग मूर्छित सर्व झाले ॥ १९ ॥
श्रीरंग रंग चढला मनि गोपिकांच्या
     चित्तात त्या स्मरति नी मधु हासतीही ।
आता हरीस बघता विळख्यात सर्पीं
     दुःखोचि दुःख गमले जणु देह फाटे ॥ २० ॥
माता स्मरोनि हरि तो निघताचि डोही
     गोपी धरोनि तिजला मग थांबवीती ।
लीला स्मरोनि हरिच्या रडताहि बोले
     धीरेचि ती रडतसे तरि मेलि ऐशी ॥ २१ ॥
( अनुष्टुप् )
श्रीकृष्ण नंद गोपांचा प्राणची डोहि तो तसा ।
काढाया निघले तेंव्हा बलरामेचि रोधले ॥ २२ ॥
( वसंततिलका )
बांधोनि घेइ हरि तो परि माणसाच्या
     पाही जधी स्वनयनी व्रजि दुःख झाले ।
तेंव्हा स्मरे मनि यया मम आश्रयो नी
     एका मुहुर्ति सुटला हरि तो तिथोनी ॥ २२ ॥
कृष्णो शरीर फुगवी तुटु सर्प वाटे
     झाला ढिला नि मग फुत्कुर टाकि क्रोधे ।
पाही हरीस डसण्या गरळाहि टाकी
     ते नेत्र लाल दिसती अन आग तोंडी ॥ २४ ॥
ज्वाळा विषारी गरळे जिभल्याहि चाटी
     नेत्रातुनीहि तसली मग आग ओकी ।
खेळे हरीहि मग त्या गरुडा परी नी
     तो कालियाहि अपुला बदली पवित्रा ॥ २५ ॥
ऐसा परीभ्रमुनिया मग क्षीण झाला
     दाबी फणा हरि तदा चढला फणीसी ।
त्याच्या शिसास बहु ते मणिलाल होते
     नी नाचला प्रभु तिथे बहु लालि शोभे ॥ २६ ॥
गंधर्व सिद्ध सुर चारण भक्त यांनी
     ते पाहताच धरिला मग ढोल ताल ।
मृदंग कोणि धरिला मग ताल गीती
     नी वाहिले वरुनि पुष्प हरीवरी ते ॥ २७ ॥
त्या कालियास शिर ते शत एक होते
     ना तो शिरास झुकवी हरि लाथ मारी ।
तो क्षीण सर्व मग नाक मुखासि रक्त
     ओकीत गोल फिरला अन शुद्ध गेली ॥ २८ ॥
येताचि शुद्ध इवली भर क्रोध नेत्री
     फेकितसेचि विष नी मग फूंक मारी ।
जेंव्हा उठावि शिर तैं हरि लाथ मारी
     पायासि रक्त पडले सुमने जशी ती ॥ २९ ॥
त्या तांडवे हरिचिया चुरचुर झाला
     विच्छिन्न छत्र गमले फण भेदता ते ।
रक्तासि ओकि मग तो स्मरला मनासी
     नारायणास शरणार्थचि त्या हरीला ॥ ३० ॥
ओझे तसेचि हरिचे उदरात विश्व
     नागास ना सहवुनी मणके ढिले ते ।
पत्‍न्या तसे बघुनिया मग पातल्या की
     कृष्णास त्या शरण नी भयभीत ऐशा ॥ ३१ ॥
पुत्रासि घेउनि पुढे धरणीस आल्या
     जोडोनि हात हरिला नमिले तयांनी ।
श्रीकृष्ण तो शरण येइ तयास पावे
     सोडावयास पतिला हरि मानितो तै ॥ ३२ ॥
( इंद्रवज्रा )
नागपत्‍न्या म्हणाल्या -
प्रभो तुझा हा अवतार आहे
     दंडावया दुष्टचि कारणाने ।
न मित्र शत्रू तुजला असा तो
     क्षाळोनि पापा मग धाम देसी ॥ ३३ ॥
केलासि आम्हा अनुबोध ऐसा
     तू दंडिता नष्टचि सर्व पापे ।
हा सर्प राजो अपराधि तैसा
     कृपाचि लाभे तव कोप होता ॥ ३४ ॥
त्या पूर्वे जन्मति तप थोर त्यांचे
     असेल किंवा बहु धर्म केला ।
तेंव्हाचि लाभे तव ही कृपा नी
     तुझ्या कृपेने जिव ते प्रसन्न ॥ ३५ ॥
न साधनेचे फळ थोर ऐसे
     तुझ्या पदाची धुळ श्रेष्ठ तैशी ।
त्या श्रीरमेने बहु त्याग केला
     नी घोर केले तप तै मिळाले ॥ ३६ ॥
लाभे जयांना धुळ या पदाची
     ते नेच्छिती राज्यहि या धरेचे ।
न सत्य लोका न रसातळाला
     न मुक्ति मोक्षासहि इच्छितात ॥ ३७ ॥
हा नागराजा तमयोनि झाला
     तरी पवित्रो धुळ लाभली यां ।
स्पर्शे यया वैभव सर्व जोडे
     ने केवळो तो तर मोक्ष लाभे ॥ ३८ ॥
( अनुष्टुप् )
दिससी वस्तु रूपाने परमात्मा स्वयं असा ।
अनंता भगवंता रे तुजला प्रणिपात हा ॥ ३९ ॥
ज्ञानानुभव ठेवा तू अनंत महिमा तुझी ।
निर्गुणा ब्रह्मरूपा ते तुजला प्रणिपात हा ॥ ४० ॥
काल नी काल नाभो तू क्षण कल्पादि साक्षि तू ।
विश्वरूप तसा द्रष्टा निमित्त्ये निर्मिशी तया ॥ ४१ ॥
पंचभूत नि तन्मात्रा ठेवा तू मन बुद्धिचा ।
त्रैगुणी अभिमानाने साक्षात्कारासि झाकिशी ॥ ४२ ॥
अनंत सूक्ष्म सर्वज्ञा अज्ञ ते रूप नेणती ।
शब्दांनी सांधिशी शक्ती तुजला प्रणिपात हा ॥ ४३ ॥
प्रमाणमूलको तूची शास्त्राचे ज्ञान तू स्वता ।
वृत्तींचा वेदही तूची तुजला प्रणिपात हा ॥ ४४ ॥
कृष्ण तू राम तू तैसा वासुदेवहि तूच की ।
यादवोस्वामि तू सत्व तुजला प्रणिपात हा ॥ ४५ ॥
वृत्तिप्रकाश ज्योति तू नेणेचि झाकिशी रुपा ।
गुणसाक्षी स्वयंतेजा तुजला प्रणिपात हा ॥ ४६ ॥
अव्यक्ती रमशी नित्य तुझ्याने सृष्टि ही घडे ।
हृषीकेशा मुनीमौना तुजला प्रणिपात हा ॥ ४७ ॥
गतिंचा साक्षि तू होशी निषेध विश्वरूप तू ।
कारणो भ्रांति ज्ञानाचा तुजला प्रणिपात हा ॥ ४८ ॥
( इंद्रवज्रा )
कर्ता न तू नी नच कर्म तूं ते
     कालेचि तूं निर्मिसि मोडितोस ।
तू सत्य संकल्प नि दावि लीला
     जीवस्वभावा तुचि जागवीसी ॥ ४९ ॥
त्रिलोकिच्या त्या त्रय योनि होती
     त्या सर्व लीला तव मूर्ति होती ।
रक्षावया साधु जनास घेसी
     सत्वप्रधानी रुप प्रीय ऐसे ॥ ५० ॥
( अनुष्टुप् )
एकदा अपराधाते क्षमावे तुम्हि याजला ।
स्वामी हा मूढ बुद्धीने नोळखी रूप हे तुझे ॥ ५१ ॥
मरतो सर्प हा आज दयावंत तुम्ही असे ।
कृपया पतिदेवाला जिवंत सोडणे प्रभो ॥ ५२ ॥
दासी आम्ही तुझ्या देवा सेवा आज्ञापिणे अम्हा ।
श्रद्धेने करिता सेवा सारेचि भय संपते ॥ ५३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णाच्या पदप्रहारे छिन्नले फण सर्व ते ।
मूर्च्छीत सोडिला त्याला पत्‍न्यांनी स्तविता असे ॥ ५४ ॥
निवांत सर्पदेहात चेतना पातली पुन्हा ।
कठीण श्वास घेवोनि हात जोडोनि बोलला ॥ ५५ ॥
कालिया सर्प म्हणाला -
जन्मता आम्ही तो दुष्ट क्रोधी नी डुख धारक ।
जीवांचा न सुटे भाव लोक ते फसती तये ॥ ५६ ॥
विधाता सृष्टिचा तूची स्वभाव बल तेज नी ।
योनी बीज तसे चित्त आकृती तूचि निर्मिल्या ॥ ५७ ॥
तुझ्याच सृष्टिचे आम्ही जन्मता क्रोधि हो बहू ।
मायेने मोहिलो सर्व त्यागिणे नच शक्य ती ॥ ५८ ॥
मायेने भाव हा ऐसा सर्वज्ञ जगदीश्वरा ।
इच्छा जी करणे तैसे कृपा वा दंड दे मला ॥ ५९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
लीलाधर असे बोल ऐकता बोलला तया ।
न राही येथ तू जायी सकुटुंब समुद्रि त्या ।
आता गाई मनुष्यांना मिळेल जल शुद्ध हे ॥ ६० ॥
स्मरणी कीर्तनी गाता आज्ञा ही नी कथानका ।
सर्पाचे भय ना त्यांना कधीच घडते पहा ॥ ६१ ॥
क्रीडलो कालिया डोही इथे स्नानादि तर्पणे ।
तसे पूजा उपवासे स्मरता पाप नासते ॥ ६२ ॥
रमणक् द्वीप सोडोनी इथे तू गरुडीभये ।
पातला जाणितो मी नी आता ना तुज त्रास तो ॥ ६३ ॥
अद्‌भूत कृष्णलीला या कृष्णाची गोष्ट मानुनी ।
आनंदे पूजिले कृष्णा कालियाने सपत्‍निक ॥ ६४ ॥
दिव्य मालांबरे रत्‍ने गंध चंदन भूषणे ।
कमळे पुजिले स्वामी कृष्ण श्री गरुडध्वज ॥ ६५ ॥
केले प्रसन्न त्याला नी केली त्यासी परीक्रमा ।
वंदिता घेतली आज्ञा पुत्र बंधू नि पत्‍निच्या ॥ ६६ ॥
सवे तो रमणक् द्वीपी निघाला सागराकडे ।
यमुना जळ ते कृष्णे केले शुद्ध न केवलो ।
अमृतापरि ते गोड कृपेने निर्मिले असे ॥ ६७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP