समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १५ वा

धेनुकासुर उद्धार आणि गोपाळांना कालियाच्या विषापासून वाचविणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

( इंद्रवज्रा )
श्रीशुकदेव म्हणतात -
झाला सहा वर्ष वयीहि कृष्ण
     चारावया गायिस पात्र झाला ।
वृंदावनाला पदस्पर्श देता
     पावित्र्य देति निज चालताना ॥ १ ॥
गाई पुढे नी हरि मागुती हा
     वंशीस फुंकी बळिच्या सवे नी ।
गोपाळ गाती मुखि कीर्ति त्याची
     वनात जाती हिरव्या तृणासी ॥ २ ॥
वनात भुंगे मधूगान गाती
     त्या पुष्पगंधे नित वायु हर्षी ।
सरोवरीचे जल जै महात्मे
     मनात होती नितळे तसेचि ।
ते पाहुनी श्रीहरिच्या मनाला
     संकल्प झाला क्रिडण्या तिथेची ॥ ३ ॥
फळा फुलाने झुकल्याही फांद्या
     पदास स्पर्शी नवती हरीच्या ।
बघोनि हासे मनि कृष्ण आणि
     बोले तदा तो बलराम यासी ॥ ४ ॥
श्री भगवान म्हणाले -
ते देव येती पुजनास नित्य
     हे वृक्ष आले फल पुष्प घेता ।
झुकोनिया ते करिती प्रणाम
     ते भाग्य त्यांचे तम नाश होई ॥ ५ ॥
( वसंततिलका )
ऐश्वर्य ते लपवुनी असलो इथे मी
     तोही ऋषी नि मुनि भृंगचि होवुनिया ।
गाती सदैव यश जे अपुले जगीचे
     इच्छीति ना क्षणहि एकहि तो त्यजाया ॥ ६ ॥
बंधो तुम्हीच स्तुति ती करण्यास योग्य
     पाहा घरास बघता पदि मोर आले ।
गोपी परी हरिणिही बघतात प्रेमे
     नी पाहतीहि तितक्या नजरेत हर्षे ।
कोकीळ जात कुहु स्वागत ते करीती
     आतिथ्य हे करिति या वनि आपुले की ॥ ७ ॥
धन्यो महीहि इथली तृण स्पर्शि पाया
     वृक्षो लतानि झुडुपे पदि धन्य होती ।
दृष्टी दयाभरि तयी पडता कृतार्थ ।
पक्षी नदी नि गिरी गोपिहि धन्य होती ॥ ८ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
या परी भगवंताने पाहता वन हर्षले ।
गाई त्या चारता तेथे लीलाही करु लागले ॥ ९ ॥
बाळगोपाळ गाती ते कृष्णाचे गीत गायनी ।
वनमाळी बळी दोघे भृंगाच्या परि गुंजती ॥ १० ॥
हंसाच्या सह तो कुंजे नाचे मोरांसवे कधी ।
थुइथुई नाचता मोरा वाटावा उपहास तो ॥ ११ ॥
मेघाच्या सम गंभीर शब्दे हाकी पशूस ही ।
मधूर वाणि ती ऐसी ऐकता भान हारपे ॥ १२ ॥
चकोर क्रौंच चकवा भारद्वाज नि मोर या ।
पक्षांचे बोल तो बोले सिंहनादेच भीववी ॥ १३ ॥
खेळुनी थकता राम गोपाच्या पोटि डोइ तो ।
टेकूनी घेइ विश्रांती कृष्ण तो पाय चेपि ही ॥ १४ ॥
गोपाळ नाचती गाती हाबुके कुस्ति खेळती ।
वाहवा म्हणती हात करोनी राम कृष्ण ते ॥ १५ ॥
गोपाळांच्या सवे कृष्ण खेळे कुस्ती कधी थके ।
पानांची सेज लावोनी बाळांची उशिही करी ॥ १६ ॥
पुण्यवंत कुणी बाळे हरीचे पाय चेपिती ।
रुमाल अथवा पर्णे यांचा पंखा करी कुणी ॥ १७ ॥
कोणाच्या हृदयी दाटे कृष्णाचे प्रेम ते मनी ।
लीला तशाच गाती ते मनाला रुचतील त्या ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा )
मायें हरी तो लपवी रुपाला
     पायासि लक्ष्मी जरि नित्य सेवी ।
तरीहि खेळे जणु ग्राम्य पोर
     ऐश्वर्य त्याचे प्रगटे तयात ॥ १९ ॥
( अनुष्टुप् )
श्रीदामा पुत्र तो होता तयांचा गोप जो सुहृद् ।
एकदा सुबलो नी तो स्तोककृष्णा सवे तसे ।
सकाळी बाळ गोपाळ वदले बळि कृष्णला ॥ २० ॥
सदैव सुख ते देता बलराम तुम्ही अम्हा ।
कृष्ण तो मारितो दुष्टा येथुनी जवळी वन ।
बहूत श्रेष्ठ ते आहे ताडांनी भरले असे ॥ २१ ॥
पडती ताड ते पक्व परी धेनुक दैत्य तो ।
राहतो दुष्ट नी तेथे रोधितो फळ खावया ॥ २२ ॥
बंधुंनो गाढवा ऐशा रुपाने दैत्य राहतो ।
बलिष्ठ बहु हा दैत्य अन्य दैत्यहि रूपि त्या ॥ २३ ॥
कितेक माणसे यांनी खावोनी टाकिली पहा ।
म्हणोनी माणसे पक्षी पशू तेथे न राहती ॥ २४ ॥
गंधीत फळ ते तेथे परी ना सेविले अम्ही ।
पहा ना ध्यान देवोनी गंध हा येतसे कसा ॥ २५ ॥
गंधाने मोहिले चित्त अवश्य खाउ द्या अम्हा ।
इच्छितो फळ ते आम्ही रुचेल तो चला तिथे ॥ २६ ॥
ऐकता बळि नी कृष्ण प्रसन्न हासले तसे ।
ताडवनात ते दोघे गेले त्यांच्या सवे पहा ॥ २७ ॥
वनात बळि तो ताड हलवी कवटाळुनी ।
पाडिले फळ ही खूप हत्तीचे पिल्लु जैं करी ॥ २८ ॥
गाढवे रुपि दैत्याने ऐकता शब्द ते तसे ।
पर्वतां पृथिवीलाही कंपिता धावला तिथे ॥ २९ ॥
बलवान् दैत्य तो येता पाठचे पाय झाडुनी ।
छातीसी बळिच्या लाथा मारिता भुंकला पहा ॥ ३० ॥
पुन्हाही पातला दैत्य क्रोधाने पाठ दावुनी ।
भुंकता मारिला लाथा बळीच्या अंगि त्या बळे ॥ ३१ ॥
बळीने एक हाताने धरिले पाय दोन ते ।
आकाशी फेकिला ताडी मेला दैत्य गधा तदा ॥ ३२ ॥
महान ताड वृक्षांना लागला मार हा असा ।
तडाड पडता तेणे कैक ताडहि मोडले ॥ ३३ ॥
बळीचे खेळणे जैसे परी सर्वचि ताड ते ।
हालले जणु वार्‍याने जोराचा फटका दिला ॥ ३४ ॥
भगवान् बलरामो तो स्वयंचि जगदीश्वर ।
त्याच्यात जग हे सारे वसले सूत वस्त्रि जै ॥ ३५ ॥
धेनुकासुरबंधू ते सर्वच्या सर्व क्रोधले ।
गाढवे सगळी आली तुटोनी पडली द्वया ॥ ३६ ॥
जो जो येईल त्यालाही कृष्ण नी बलरामने ।
पायांना पकडोनीया ताडांशी मारले असे ॥ ३७ ॥
फळांनी झाकली भूमी प्रेतांनी ताड झाकले ।
आकाशा ढग जै झाकी शोभा ती भासली तशी ॥ ३८ ॥
कृष्ण नी बलरामाची लीला पाहूनि देवता ।
वाहती पुष्प नी गाती स्तुती नी वाद्य वाजले ॥ ३९ ॥
मारिता धेनुकासूरा निर्भयी लोक जाहले ।
वनात फळ ते खाती गायी ही चरल्या पहा ॥ ४० ॥
भगवान् पंकजाक्षोनी बल जो वज्रि पातला ।
स्तुती गोपाळ ते गाती पवित्र कीर्तनीय जी ॥ ४१ ॥
( वसंततिलका )
श्रीकृष्णकेश मळले रजि गोखुरांच्या
     तो मोरपंख मुकुटी अन हास्य मोही ।
तो वाजवी मुरलि नी स्तुति गाति गोप
     ऐकोनि गोपि जमल्या बघण्यास कृष्णा ॥ ४२ ॥
नेत्रो रुपी भ्रमर तेचि मुखारविंदी
     पीवूनिया रस नि ते मग तृप्त झाले ।
स्वीकारुनीहि हरि तो तिरक्याच दृष्टी
     ते लाजणे विनय ते व्रजि पातला की ॥ ४३ ॥
( अनुष्टुप् )
वात्सल्य हृदयी दाटे यशोदा रोहिणीचिया ।
येताच राम श्यामो तैं यथोपचार तृप्तिले ॥ ४४ ॥
उटणे तेल लावोनी स्नान ते घातले असे ।
थकवा दूर तो झाला ल्यालेही वस्त्र ते पुन्हा ।
घातल्या दिव्य त्या माळा अंगी चंदन लाविले ॥ ४५ ॥
बधुंनी मग ते केले स्वादिष्ट भोजनो पहा ।
माता झोपविती बाळां करोनी लाड सर्वही ॥ ४६ ॥
एकदा कृष्ण गोपांच्या सह तो यमुना तटीं ।
पातला करिता लीला नव्हता बल तेधवा ॥ ४७ ॥
ग्रीष्माच्या घाम घामाने गाई गोपाळ त्रासले ।
तृष्णेने शोषले कंठ विषारी जळ ते पिले ॥ ४८ ॥
दैवाने वश ते झाले यमुना जळ पीउनी ।
प्राणहीन असे झाले पडले यमुना तिरी ॥ ४९ ॥
कृष्णाने वेणुनादाने तसे अमृतदृष्टिने ।
दिधले प्राण ते त्यांना त्यांचा एकचि स्वामि हा ॥ ५० ॥
चैतन्य पातता देही सारेचि उठले पुन्हा ।
एकमेकांकडे सारे आश्चर्ये बघु लागले ॥ ५१ ॥
राजा अंती तया झाला मरणाचाचि बोध तो ।
कृपेने पाहता कृष्णे सर्वांना जगवीयले ॥ ५२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP