श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
सप्तदशोऽध्यायः

कालियस्य यमुनाह्रदे निवासस्य कारणवर्णनं
ह्रदान्निर्गतेन श्रीकृष्णेन व्रजौकसां दावानलाद् रक्षणम् -

कालियाची कथा आणि गोपांचा दावानलापासून बचाव -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


( अनुष्टुप् )
श्रीराजोवाच -
नागालयं रमणकं कस्मात् तत्याज कालियः ।
कृतं किं वा सुपर्णस्य तेनैकेनासमञ्जसम् ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
राजा परीक्षिताने विचारले -
रमणक् द्वीप नागांचे कालिये का त्यजीयले ।
अपराध गरूडाचा केला तो कोणता यये ॥ १ ॥

कालियः - कालिय नावाचा सर्प- नागालयं रमणकं - सर्पांचे निवासस्थान अशा रमणक द्वीपाला - कस्मात् तत्याज - का सोडिता झाला - एकेन तेन - एकट्या कालियाने - सुपर्णस्य - गरुडाचा - किंवा - कोणता - असमञ्जसं कृतम् - अपराध केला ॥१॥
राजाने विचारले - नागांचे निवासथान रमणकद्वीप कालिया नागाने का सोडले होते ? आणि त्याने एकट्यानेच गरुडाचा असा कोणता अपराध केला होता ? (१)


श्रीशुक उवाच -
उपहार्यैः सर्पजनैः मासि मासीह यो बलिः ।
वानस्पत्यो महाबाहो नागानां प्राङ्‌निरूपितः ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
तळी निश्चित वृक्षाच्या गरूडा रोज सर्प तो ।
खाण्यास द्यावया केले सर्व सर्पे मिळूनिया ॥ २ ॥

महाबाहो - हे राजा - इह - येथे - उपहार्यैः सर्पजनैः - भक्ष्य असलेल्या अशा सर्पसमुदायाने - यः वानस्पत्यः बलिः - जो वृक्षाच्या तळाशीच द्यावयाचा बळी - तेषां बाधापरिहाराय - त्यांची बाधा होऊ नये म्हणून - मासि मासि - प्रत्येक महिन्याला - प्राक् निरूपितः - पूर्वी ठरविला होता ॥२॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! पूर्वी गरुडाच्या आहारासाठी जाणे आवश्यक असणार्‍या सर्पांनी असा नियम केला होता की, दरमहा ठराविक वृक्षाखाली गरुडाला एक साप भेट म्हणून द्यायचा. (२)


स्वं स्वं भागं प्रयच्छन्ति नागाः पर्वणि पर्वणि ।
गोपीथायात्मनः सर्वे सुपर्णाय महात्मने ॥ ३ ॥
रक्षणार्थ असा होई आपुला भाग निश्चये ।
प्रत्येक त्या अमावास्यीं जमती भाग निश्चया ॥ ३ ॥

(तं) स्वं स्वं भागं - तो आपापला भाग - सर्वे नागाः - सर्व सर्प - पर्वणि पर्वणि - प्रत्येक अमावास्येला - आत्मनः गोपीथाय - स्वतःच्या रक्षणाकरिता - महात्मने सुपर्णाय - गरुडाला - प्रयच्छन्ति - देतात ॥३॥
या नियमानुसार प्रत्येक अमावस्येला, आपल्या रक्षणासाठी म्हणून सगळे साप शक्तिशाली गरुडाला आपापला भाग देत असत. (३)


विषवीर्य मदाविष्टः काद्रवेयस्तु कालियः ।
कदर्थीकृत्य गरुडं स्वयं तं बुभुजे बलिम् ॥ ४ ॥
सर्पात पुत्र कद्रूचा कालिया माजला असे ।
न देता गरुडा भाग भक्षिले अन्य भाग ही ॥ ४ ॥

तु - परंत - विषवीर्यमदाविष्टः - विषाच्या वीर्याने गर्विष्ठ झालेला - क्राद्रवेयः कालियः - कद्रुपुत्र कालिय - गरुडं कदर्थीकृत्य - गरुडाला तुच्छ मानून - तं बलिं - तो बलि - स्वयं बुभुजे - स्वतः खाता झाला ॥४॥
त्या सर्पांपैकी कद्रूचा पुत्र कालिया नाग आपले विष आणि बळ यांच्या घमेंडीत उन्मत्त झाला होता. गरुडाला तुच्छ मानून स्वतः बळी देणे सोडून उलट गरुडाला दिलेला बळीच तो खात असे. (४)


तच्छ्रुत्वा कुपितो राजन् भगवान् भगवत्प्रियः ।
विजिघांसुर्महावेगः कालियं समुपाद्रवत् ॥ ५ ॥
हरिभक्त गरूडाला चढला क्रोध ऐकता ।
मारण्या कालियासर्पा केले आक्रमणो तये ॥ ५ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - तत् श्रुत्वा - ते ऐकून - भगवत्प्रियः महावेगः भगवान् - भगवंताला अत्यंत प्रिय व मोठा वेगवान असा गरुड - विजिघांसुः - मारण्याच्या इच्छेने - कालियं समुपाद्रवत् - कालियावर धावला ॥५॥
परीक्षिता ! हे ऐकून भगवंतांचा प्रिय पार्षद असलेल्या शक्तिशाली गरुडाला अतिशय क्रोध आला. म्हणून त्याने कालियाला मारून टाकण्यासाठी अत्यंत वेगाने त्याच्यावर आक्रमण केले. (५)


( मिश्र )
तमापतन्तं तरसा विषायुधः
     प्रत्यभ्ययाद् उच्छ्रितनैकमस्तकः ।
दद्‌भिः सुपर्णं व्यदशद् ददायुधः
     कराल जिह्रोच्छ्वसितोग्र लोचनः ॥ ६ ॥
( इंद्रवज्रा )
तै वीषधारी बघता चढाई
     डंखावया तो शतशीर धावे ।
ते शस्त्र त्याचे अतिवीष दंत
     तेणेचि तो त्या डसला गरूडा ।
नेत्रे तसे लाल जिभाहि चाटी
     फुत्कारता तो भिववी जगाला ॥ ६ ॥

करालजिह्वोच्व्छसितोग्रलोचनः - भयंकर जिव्हा, भयंकर श्वासोच्व्छास व उग्र नेत्र असलेला - ददायुधः - दंतरुपी आयुध असलेला - विषायुधः - विष हेच आहे आयुध ज्याचे असा तो नाग - तरसा आपतन्तं सुपर्णं - वेगाने धावत येणार्‍या त्या गरुडावर - प्रत्यभ्ययात् - उलट धावत गेला - उच्छिरतनैकमस्तकः - अनेक फणा वर उभारुन - दद्‍भिः - दातांनी - (तं) व्यदशत् - त्याला चावला ॥६॥
विषारी कालियाने पाहिले की, अत्यंत वेगाने गरुड आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे, तेव्हा अनेक फणा उभारून तो त्याच्यावर तुटून पडला. विषारी दात हेच त्याचे शस्त्र होते, म्हणून दातांनी तो त्याला डसला. त्यावेळी तो भयानक जिभा हालवीत होता. दीर्घ फूत्कार टाकीत होता आणि त्याचे डोळे अतिशय भयानक दिसत होते. (६)

विवरण :- कालियाचा वध करून सुखरूप आलेल्या श्रीकृष्णास पाहून नंद-यशोदा व सर्व गोप हे हर्षभरित झाले. जणू अचेतन झालेले गोप चेतनावस्थेत आले. परत आलेल्या कृष्णाला पाहून बलरामाने त्याच्याकडे पाहिले आणि तो फक्त हसला. हे कसे ? कृष्णाला सुखरूप पाहून त्याला आनंद झाला नाही का ? निश्चितच झाला. पण तोहि सामर्थ्यसंपन्न होता. आपल्या भावाला कालियासारख्या भयंकर नागराजाला ठार करणे सहज शक्य आहे, हे जाणून कृष्णाच्या सामर्थ्याची कल्पना असल्याने तो आश्वस्त होता. म्हणूनच आपला विश्वास खरा झाला, या जाणीवेने तो शांतपणे फक्त हसला. (६)



तं तार्क्ष्यपुत्रः स निरस्य मन्युमान्
     प्रचण्डवेगो मधुसूदनासनः ।
पक्षेण सव्येन हिरण्यरोचिषा
     जघान कद्रुसुतमुग्रविक्रमः ॥ ७ ॥
अतूलनीयो हरिवाहनो तो
     तो त्या शरीरे झटकोनि फेकी ।
क्रोधेचि झाडी बहुपंख ऐसे
     प्रहारिला तो मग सर्प तेणे ॥ ७ ॥

प्रचंडवेगः - मोठा वेगवान - मधुसूदनासनः - विष्णूचे वाहन असा - उग्रविक्रमः - भयंकर आहे पराक्रम ज्याचा असा - सः तार्क्ष्यपुत्रः - तो गरुड - मन्युमान् - रागावून - हिरण्यरोचिषा सव्येन पक्षेण - सुवर्णाप्रमाणे कान्ती असलेल्या आपल्या उजव्या पंखाने - तं कद्रुसुतं निरस्य जघान - त्या कद्रुपुत्र कालियाचा धिःक्कार करुन त्याला ताडिता झाला ॥७॥
भगवंतांचे वाहन असणार्‍या प्रचंड वेगवान गरुडाने क्रोधाने त्याला झटकून टाकले आणि अत्यंत पराक्रमी अशा त्याने डाव्या सोनेरी पंखाने कालिया नागाला तडाखा दिला. (७)


( अनुष्टुप् )
सुपर्णपक्षाभिहतः कालियोऽतीव विह्वलः ।
ह्रदं विवेश कालिन्द्याः तदगम्यं दुरासदम् ॥ ८ ॥
( अनुष्टुप् )
प्रहारे जखमी होता यमुनीं सर्प पातला ।
अगम्य खोल हा डोह न तेथे कोणि पोचतो ॥ ८ ॥

सुपर्णपक्षाभिहतः - गरुडाच्या पंखाने ताडिलेला - अतीव विह्वलः - फार पीडित झालेला - कालियः - कालिय सर्प - तदगम्यं दुरासदं कालिन्द्याः ह्रदं - गरुडास जाण्यास कठिण व इतरांनाहि दुरापास्त अशा यमुनेच्या डोहात - विवेश - शिरला ॥८॥
त्याच्या पंखाच्या प्रहाराने कालिया अत्यंत घायाळ झाला, आणि तेथून निघून यमुनेच्या खोल असल्यामुळे जाण्यास कठीण अशा या डोहात आला. (८)


तत्रैकदा जलचरं गरुडो भक्ष्यमीप्सितम् ।
निवारितः सौभरिणा प्रसह्य क्षुधितोऽहरत् ॥ ९ ॥
पूर्वी सौभरिने त्यासी आडवीताहि ये स्थळी ।
क्षुधातून गरूडाने एक मत्स्यास भक्षिले ॥ ९ ॥

एकदा - एके दिवशी - तत्र - तेथे - क्षुधितः गरुडः - भुकेलेला गरुड - ईप्सितं भक्ष्यं जलचरं - इष्ट खाद्य अशा पाण्यांत हिंडणार्‍या मत्स्याला - प्रसह्य अहरत् - बलात्काराने नेता झाला - (तदा) सौभरिणा निवारितः - त्यावेळी सौभरीनामक ऋषीकडून तो गरुड निवारिला गेला ॥९॥
एके दिवशी भुकेलेल्या गरुडाने तपस्वी सौभरींनी मनाई करूनही आपले इच्छित भक्ष्य असणार्‍या माशाला बळजबरीने पकडून खाल्ले. (९)


मीनान् सुदुःखितान् दृष्ट्वा दीनान् मीनपतौ हते ।
कृपया सौभरिः प्राह तत्रत्यक्षेममाचरन् ॥ १० ॥
मरता मत्स्यराजा तो मत्स्या व्याकूळ जाहल्या ।
सौभरीसी दया आली तये गरुड शापिला ॥ १० ॥

तत्रत्यक्षेमम् आचरन् सौभरिः - तेथील प्राण्यांचे कल्याण करणारा सौभरी - मीनपतौ हते - मत्स्याधिपती मारिला गेला असता - दीनान् सदुःखितान् मीनान् दृष्ट्वा - दीन व अत्यंत दुःख करणार्‍या मत्स्यांना पाहून - कृपया आह - दयाळूपणाने म्हणाला ॥१०॥
मत्स्यराज मारला गेल्याने बिचारे मासे अतिशय दुःखी झाले. हे पाहून सौभरींना त्यांची दया आली. त्यांनी हा डोहात राहणार्‍या सर्व जीवांच्या हितासाठी गरुडाला शाप दिला. (१०)


अत्र प्रविश्य गरुडो यदि मत्स्यान् स खादति ।
सद्यः प्राणैर्वियुज्येत सत्यमेतद् ब्रवीम्यहम् ॥ ११ ॥
गरूडा तू पुन्हा येथे मत्स्याला भक्षिता पहा ।
तत्क्षणी मृत्यु पातेल सत्य सत्यचि बोलतो ॥ ११ ॥

सः गरुडः - तो गरुड - यदि अत्र प्रविश्य - जर या डोहात शिरून - मत्स्यान् खादति - मासे खाईल - (तर्हि) सद्यः प्राणैः वियुज्येत - तर तत्काळ मरेल - अहम् एतत् सत्यं ब्रवीति - मी हे खरे बोलतो ॥११॥
गरुड जर या डोहात येऊन माशांना खाईल तर त्याच क्षणी तो प्राणाला मुकेल. हे माझे म्हणणे खरे असेल. (११)


तं कालियः परं वेद नान्यः कश्चन लेलिहः ।
अवात्सीद् गरुडाद् भीतः कृष्णेन च विवासितः ॥ १२ ॥
महर्षी सौभरींचा हा शाप त्या कालिया विना ।
कुणाला नव्हता ठावा आता कृष्णेचि निर्भयो ।
करोनी कालिया याला रमणक् द्वीपि धाडिले ॥ १२ ॥

कालियः तं (शापं) परं वेद - कालिय सर्प तो शाप चांगला जाणत होता - अन्यः कश्चन लेलिहः न - दुसरा कोणताही सर्प तो जाणत नव्हता - (अतः सः) गरुडात् भीतः तत्र अवात्सीत् - म्हणून तो गरुडाच्या भीतीने तेथे राहता झाला - च - आणि - कृष्णेन विवासितः - श्रीकृष्णाकडून काढून लाविला गेला ॥१२॥
हे कालियाखेरीज इतर कोणत्याही सापाला माहीत नव्हते. म्हणून गरुडाच्या भितीने तो तेथे राहू लागला होता. आणि आता श्रीकृष्णांनी त्याला तेथून घालवून दिले. (१२)


कृष्णं ह्रदाद् विनिष्क्रान्तं दिव्यस्रग् गन्धवाससम् ।
महामणिगणाकीर्णं जाम्बूनदपरिष्कृतम् ॥ १३ ॥
परीक्षित् इकडे कृष्ण दिव्य माला नि गंध ते ।
वस्त्र आभूषणे लेता कुंडा बाहेर पातला ॥ १३ ॥

ह्रदात् विनिष्क्रान्तं - डोहातून बाहेर येणार्‍या - दिव्यस्त्रग्गन्धवाससं - दिव्य फुलांच्या माळा, चंदन व सुंदर वस्त्र धारण केलेल्या - महामणिगणाकीर्णं - उंची मण्यांचे गुच्छ ज्याने धारण केले आहेत अशा - जाम्बूनदपरिष्कृतम् - सुवर्णांच्या अलंकारांनी सुशोभित झालेल्या - कृष्णं - श्रीकृष्णाला ॥१३॥
नंतर श्रीकृष्ण दिव्य माळा, गंध, वस्त्रे, महामूल्य रत्‍ने आणि सुवर्णमय अलंकारांनी विभूषित होऊन त्या डोहाच्या बाहेर आले. (१३)


उपलभ्योत्थिताः सर्वे लब्धप्राणा इवासवः ।
प्रमोदनिभृतात्मानो गोपाः प्रीत्याभिरेभिरे ॥ १४ ॥
तयांस पाहता सर्व सचेत उठले पुन्हा ।
गोपाळां दाटला मोद प्रेमाने धरिला उरी ॥ १४ ॥

उपलभ्य - परत आलेला पाहून - लब्धप्राणाः असवः इव उत्थिताः - मिळाला आहे प्राण ज्यांना अशा इंद्रियांप्रमाणे उठलेले - प्रमोदनिभृतात्मानः - आनंदाने भरले आहे अंतःकरण ज्यांचे असे - सर्वे गोपाः - सर्व गोप - प्रीत्या अभिरेभिरे - प्रेमाने आलिंगन देते झाले ॥१४॥
जसे प्राण परत आल्यानंतर इंद्रिये सचेतन होतात, त्याप्रमाणे त्यांना पाहून सर्व गोप-गोपी उठून उभे राहिले. त्यांची हृदये आनंदाने भरून आली. अतिशय प्रेमाने ते कृष्णाला आलिंगन देऊ लागले. (१४)


यशोदा रोहिणी नन्दो गोप्यो गोपाश्च कौरव ।
कृष्णं समेत्य लब्धेहा आसन् लब्धमनोरथा ॥ १५ ॥
यशोदा रोहिणी नंद गोपी गोपादि सर्व ते ।
उठले कृष्ण येताची फळले ते मनोरथ ॥ १५ ॥

कौरव - हे परीक्षित राजा - यशोदा रोहिणी नन्दः गोप्यः गोपाः च - यशोदा, रोहिणी, नंद, गोपी व गोप - लब्धेहाः - सावध झालेले - कृष्णं समेत्य - श्रीकृष्ण पुन्हा मिळाल्यामुळे - लब्धमनोरथाः - ज्यांचे सर्व मनोरथ सफल झाले आहेत असे - आसन् - झाले ॥१५॥
परीक्षिता ! श्रीकृष्णांना भेटून यशोदा, रोहिणी, नंद, गोपी आणि गोप यांच्या जिवात जीव आला. त्यांचे मनोरथ सफल झाले. (१५)


रामश्चाच्युतमालिङ्‌ग्य जहासास्यानुभाववित् ।
नगो गावो वृषा वत्सा लेभिरे परमां मुदम् ॥ १६ ॥
प्रभाव राम तो जाणी भेटता हासु लागला ।
वासरे बैल नी गाई वृक्ष पर्वत हर्षले ॥ १६ ॥

अस्य अनुभाववित् रामः - या श्रीकृष्णाचा पराक्रम जाणणारा बलराम - अच्युतं आलिङ्ग्य जहास - श्रीकृष्णाला आलिंगन देऊन हसू लागला - नगाः गावः वृषाः वत्साः (च) - वृक्ष, गाई, बैल व वासरे - परमां मुदं लेभिरे - अत्यंत आनंदाला मिळविते झाले ॥१६॥
बलरामाला भगवंतांचा प्रभाव माहीत होता. श्रीकृष्णांना हृदयाशी धरून तो हसू लागला. पर्वत, वृक्ष, गायी, बैल, वासरे अशा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. (१६)


नन्दं विप्राः समागत्य गुरवः सकलत्रकाः ।
ऊचुस्ते कालियग्रस्तो दिष्ट्या मुक्तस्तवात्मजः ॥ १७ ॥
सपत्‍न्य पातले विप्र नंदबाबास बोलले ।
सापाने सोडिले बाळा भाग्याची गोष्ट जाहली ॥ १७ ॥

सकलत्रकाः ते विप्राः गुरवः - कुटुंबासह ते ब्राह्मण गुरु - नन्दं समागत्य - नंदाजवळ येऊन - ऊचुः - म्हणाले - कालियग्रस्तः तव आत्मजः - कालियाने गिळलेला तुझा मुलगा - दिष्ट्या मुक्तः - सुदैवाने मुक्त झाला ॥१७॥
गोपांच्या कुलगुरू ब्राह्मणांनी पत्‍नींसह नंदाकडे येऊन म्हटले, "कालियाच्या तावडीतून सुटून तुझा मुलगा परत आला, ही मोठीच भाग्याची गोष्ट आहे." (१७)


देहि दानं द्विजातीनां कृष्णनिर्मुक्तिहेतवे ।
नन्दः प्रीतमना राजन् गाः सुवर्णं तदादिशत् ॥ १८ ॥
मृत्यूच्या मुखिचा बाळ पातला दान ते करा ।
ऐकता हर्षले नंद सोने गायी द्विजां दिल्या ॥ १८ ॥

कृष्णनिर्मुक्तिहेतवे - कॄष्णाची सुटका झाली ह्यासाठी - द्विजातीनां दानं देहि - ब्राह्मणांना दान दे - राजन् - हे परीक्षित राजा - प्रीतमनाः नंदः - आनंदित झालेला नंद - तदा - त्यावेळी - गाः सुवर्णं (च तेभ्यः) आदिशत् - गाई व सुवर्ण त्यांना देता झाला॥१८॥
श्रीकृष्णाच्या सुटकेच्या निमित्ताने तू ब्राह्मणांना दान दे. राजा ! ब्राह्मणांचे म्हणणे ऐकून नंदांनी प्रसन्न मनाने पुष्कळ सोने अणि गाई ब्रह्मणांना दान केला. (१८)


यशोदापि महाभागा नष्टलब्धप्रजा सती ।
परिष्वज्याङ्‌कमारोप्य मुमोचाश्रुकलां मुहुः ॥ १९ ॥
यशोदादेविने बाळा हृदयीं धरिले असे ।
वारंवार तिचे नेत्र आनंदे भरले पहा ॥ १९ ॥

नष्टलब्धप्रजा - पुनः प्राप्त झाला आहे नष्ट झालेला पुत्र जिला अशी - महाभागा सती यशोदा अपि - मोठी भाग्यवती पतिव्रता यशोदा सुद्धा - (कृष्णं) परिष्वज्य - कृष्णाला आलिंगन देऊन - अङ्कं आरोप्य - मांडीवर घेऊन - मुहुः अश्रुकलां मुमोच - वारंवार अश्रुबिंदू ढाळिती झाली ॥१९॥
भाग्यवती यशोदासुद्धा काळाच्या जबड्यातून परत आलेल्या मुलाला मांडीवर घेऊन, हृदयाशी कवटाळून वारंवार आसवे ढाळू लागली. (१९)


तां रात्रिं तत्र राजेन्द्र क्षुत्तृड्भ्यां श्रमकर्षिताः ।
ऊषुर्व्रयौकसो गावः कालिन्द्या उपकूलतः ॥ २० ॥
राजेंद्रा गोप गाई त्या भुकेने थकल्या पहा ।
न व्रजात कुणी गेले थांबले यमुना तटी ॥ २० ॥

राजेंद्र - हे परीक्षित राजा - तत्र क्षुत्तृड्भ्यां कर्षिताः - त्या वेळी भुकेने, तहानेने आणि श्रमाने थकून गेलेल्या - व्रजौकसः गावः - गोकुळवासी लोक व गाई - कालिन्द्याः उपकूलतः - यमुनेच्या काठी रहाते झाले ॥२०॥
हे राजेंद्रा ! व्रजवासी लोक आणि गुरे त्यादिवशी अतिशय थकली होती. शिवाय त्यांना तहान-भूकही लागली होती. म्हणून त्या रात्री ते यमुनातीरावरच झोपले. (२०)


तदा शुचिवनोद्‍भूतो दावाग्निः सर्वतो व्रजम् ।
सुप्तं निशीथ आवृत्य प्रदग्धुमुपचक्रमे ॥ २१ ॥
उन्हाने सुकले तृण रात्रीच आग लागली ।
घेरिले सर्व लोकांना जाळाया लागली पहा ॥ २१ ॥

तदा - त्या वेळी - निशीथे - मध्यरात्री - शिचिवनोद्‍भूतः दावाग्निः - ग्रीष्म ऋतूंतील सुकलेल्या वनात उत्पन्न झालेला वणवा - सुप्तं व्रजं सर्वतः आवृत्य - निजलेल्या गोकुळाला सभोवार वेष्टून - प्रदग्धुम् उपचक्रमे - जाळण्याला आरंभ करिता झाला ॥२१॥
उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे तेथील वनाला वणवा लागला. त्या आगीने, झोपलेल्या व्रजवासीयांना मध्यरात्री चारही बाजूंनी वेढून घेतले आणि ती आग त्यांना जाळण्यासाठी येऊ लागली. (२१)


तत उत्थाय सम्भ्रान्ता दह्यमाना व्रजौकसः ।
कृष्णं ययुस्ते शरणं मायामनुजमीश्वरम् ॥ २२ ॥
चटके बसता सारे घाबर्‍या उठले तदा ।
कृष्णासी प्रार्थिती सारे लीलाधर हरीस या ॥ २२ ॥

ततः उत्थाय - तेव्हा तेथून उठून - संभ्रान्ताःदह्यमानाः ते व्रजौकसः - घाबरलेले व वणव्याने जळणारे ते गोकुळनिवासी लोक - मायामनुजं ईश्वरं कृष्णं - मायेने मनुष्यरुप धारण करणार्‍या ऐश्वर्यवान अशा श्रीकृष्णाला - शरणं ययुः - शरण गेले ॥२२॥
आगीची आच लागल्यामुळे व्रजवासी उठून घाबरून लीलामनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण गेले. (२२)


कृष्ण कृष्ण महाभाग हे रामामितविक्रम ।
एष घोरतमो वह्निः तावकान् ग्रसते हि नः ॥ २३ ॥
कृष्णा कृष्णा महाभागा रामा अमित विक्रमा ।
पहा तो घोर हा अग्नी आम्हाला जाळु इच्छितो ॥ २३ ॥

कृष्ण - हे श्रीकृष्णा - हे महाभाग कृष्ण - हे महाभाग्यवंता श्रीकृष्णा - हे अमितविक्रम राम - हे अतुल पराक्रमी बलरामा - घोरतमः एषः वह्निः - अत्यंत भयंकर असा हा वणवा - तावकान् नः - तुझे अशा आम्हाला - हि ग्रसते - खरोखर गिळीत आहे ॥२३॥
ते म्हणाले, "हे थोर श्रीकृष्णा ! हे अतिशय पराक्रमा बलरामा ! पहा ! पहा ! ही भयंकर आग तुमच्याच असलेल्या आम्हांला जाळू पहात आहे." (२३)


सुदुस्तरान्नः स्वान् पाहि कालाग्नेः सुहृदः प्रभो ।
न शक्नुमः त्वच्चरणं संत्यक्तुं अकुतोभयम् ॥ २४ ॥
सामर्थ्यवान तू तैसा आम्ही सर्व तुझे प्रिय ।
मृत्यूचे भय ना आम्हा परी पाया न सोडितो ॥ २४ ॥

प्रभो - हे समर्थ श्रीकृष्णा - स्वान् सुह्रदः नः - तुझे मित्र अशा आम्हाला - सुदुस्तरात् कालाग्नेः - तरून जाण्याला कठीण अशा काळस्वरुपी वणव्यापासून - पाहि - राख - अकुतोभयं त्वच्चरणं - निर्भय अशा तुझ्या पायाला - संत्यक्तुं न शक्रुमः - टाकण्यास आम्ही समर्थ नाही ॥२४॥
हे प्रभो ! आम्ही तुमचेच आहोत. म्हणून या भयंकर काळरूप आगीपासून आम्हांला वाचवा. तुमचे सर्वत्र अभय देणारे चरणकमल आम्ही नाही सोडू शकत. (२४)

विवरण :- कृष्णाच्या काळजीने, तहानभुकेने व्रजवासी व्याकुळ झाले होते; त्यामुळे कृष्णाने त्यांना रात्री तिथेच झोपावयास सांगितले. पण रात्री तेथे दावाग्नी उफाळला. 'शुचि' नावाच्या पवनाने तो आणखीनच भडकला. ते पाहून सर्व गोकुळवासी कृष्णाचा धावा करू लागले, आम्ही या अग्नीत भस्मसात होऊ, याची आम्हास चिंता वाटत नाही, पण नंतर तुझे चरण दर्शन आम्हांस कसे होणार, याचीच फक्त चिंता. तेव्हा धावून ये. यातून गोपांचे श्रीकृष्णावरील निस्सीम प्रेम, भक्ती, याचेच दर्शन होते. आपल्या प्राणापेक्षा इतर कोणतीच वस्तू माणसाला प्रिय नसते. (ते रक्षण करण्यासाठी पाण्याने भरलेल्या हौदात माकडीण आपल्या पिलालाहि पायाखाली घेते, ही प्रतीकात्मक गोष्ट आहेच.) पण गोपांना आपल्या प्राणांपेक्षा परमेश्वर दर्शनाचीच ओढ अधिक. भक्तीचा हा कोणता प्रकार म्हणावा ? रात्री दावाग्नीही का प्रकटला ? कदाचित् त्याने असा विचार केला असावा की, कालियाच्या वास्तव्याने हे सर्व वन, येथील माती, थोडेफार असलेले गवत सर्वच विषारी झाले. मग सकाळी जाता जाता गाई-वासरांनी हे खाल्ले, तर काय होईल ? या दूषित वातावरणाचा परिणाम गोपांवरहि होईल, तेव्हा ते नष्ट करणेच अधिक चांगले. (२४)



इत्थं स्वजनवैक्लव्यं निरीक्ष्य जगदीश्वरः ।
तं अग्निं अपिबत् तीव्रं अनंतोऽनन्त शक्तिधृक् ॥ २५ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
अनंत शक्ति हा कृष्ण भगवान् जगदीश्वर ।
स्वजना दुःखि पाहोनी प्यालाही आग ती पहा ॥ २५ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

अनन्तशक्तिधृक् जगदीश्वरः अनन्तः - अगणित शक्ति धारण करणारा त्रैलोक्याधिपती श्रीकृष्ण - इत्थं स्वजनवैक्लव्यं निरीक्ष्य - याप्रमाणे आपल्या लोकांचे संकट पाहून - तं तीव्रं अग्निं अपिबत् - त्या भयंकर अशा वणव्याला पिता झाला॥२५॥
अनंत व अनंत शक्तींना धारण करणार्‍या जगदीश्वराने स्वजन अशा प्रकारे व्याकूळ झालेले पाहून ती भयंकर आग पिऊन टाकली. (२५)

विवरण :- विश्वपुरुषाच्या मुखातून अग्नी निर्माण झाला. (मुखात् अग्निः अजायत ।) असे वर्णन पुरुषसूक्तात आहे. अर्थात तो परमात्मा विष्णू म्हणजेच कृष्ण, हाच विश्वरूप पुरुष. मग ज्यामधून तो निर्माण झाला, त्यातच विलीन होणे योग्य. (घट फुटला, की मातीशी एकरूप होतो त्याप्रमाणे) पंचमहाभूतात्मक सृष्टीची तत्त्वे सर्व पिऊन आत्मसात करण्याची क्रीडा हा बालकृष्ण करीत होताच. म्हणूनच माती खाणे त्याला प्रिय असावे. (२५)



अध्याय सतरावा समाप्त

GO TOP