श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
षोडशोऽध्यायः

कालियदमनम्-नागपत्‍नीकृतं नागकर्तृकं च
भगवतः स्तवनं नागद्वारा ह्रदपरित्यागश्च -

कालियावर कृपा -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


( अनुष्टुप् )
श्रीशुक उवाच -
विलोक्य दूषितां कृष्णां कृष्णः कृष्णाहिना विभुः ।
तस्या विशुद्धिमन्विच्छन्सर्पं तमुदवासयत् ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव म्हणतात -
कृष्णाने पाहिले पाणी काळ्यासर्पेचि नाशिले ।
यमुनाजलशुद्ध्यर्थ सर्पा बाहेर काढितो ॥ १ ॥

विभुः कृष्णः - महासामर्थ्यवान कृष्ण - कृष्णां कृष्णाहिना दूषितां विलोक्य - यमुना नदीला कालिय सर्पाने दूषित केले आहे असे पाहून - तस्याः विशुद्धिं अन्विच्छन् - तिची शुद्धी करण्याची इच्छा करणारा - तं सर्पम् उदवासयात् - त्या सर्पाला बाहेर काढिता झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की, कालिया नागाने यमुनेचे पाणी विषारी केले आहे. तेव्हा ते शुद्ध करण्यासाठी त्यांनी ता सापाला तेथून दूर पाठविले. (१)


श्रीराजोवाच -
कथमन्तर्जलेऽगाधे न्यगृह्णाद् भगवानहिम् ।
स वै बहुयुगावासं यथाऽऽसीद् विप्र कथ्यताम् ॥ २ ॥
राजा परीक्षितान विचारले -
ब्रह्मन् ! अगाध ते पाणी त्यात तो ठेचिला कसा ।
जलचर नसोनीया पाण्यात राहिला कसा ॥ २ ॥

विप्र - हे शुकाचार्या - भगवान् - श्रीकृष्ण - अगाधे अंतर्जले - अत्यंत खोल अशा जलामध्ये - अहिं कथं अगृह्‌णात् - कालिय सर्पाला कसा पकडिता झाला - सः वै - तो सर्प खरोखर - अजलचरः अपि - पाण्यात राहणारा नसूनही - अन्तर्जले बहुयुगावासं यथा आसीत् - जेणेकरून अनंतयुगेपर्यंत पाण्यात राहता झाला - तत् कथ्यताम् - ते सांगा. ॥२॥
राजाने विचारले - ब्रह्मन् ! यमुनेच्या खोल पाण्यात भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्पाचे दमन कसे केले ? शिवाय तो जलचर नसूनही पुष्कळ काळ पाण्यात का आणि कसा राहिला, ते सांगावे. (२)


ब्रह्मन्भगवतस्तस्य भूम्नः स्वच्छन्दवर्तिनः ।
गोपालोदारचरितं कस्तृप्येतामृतं जुषन् ॥ ३ ॥
अनंत भगवान् कृष्ण स्वच्छंदेचि विहारतो ।
गोपरूपे सुधा झाला न तृप्ति ऐकता मिळे ॥ ३ ॥

ब्रह्मन् - हे शुकमने - स्वच्छंदवर्तिनः - आपल्या इच्छेनुरूप वागणारा - भूम्नः - व सर्वव्यापी अशा - तस्य भगवतः - त्या षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्णाचे - गोपालोदारचरितं - गोपालरूपी जे थोर चरित्र - अमृतं जुषन् - तेच कोणी अमृत अशा त्या अमृताला सेवणारा - कः तृप्येत - कोण तृप्त होईल. ॥३॥
हे महात्मन ! स्वेच्छेनुसार वागणार्‍या अनंत भगवानांनी गोपालरूपाने ज्या दिव्य लीला केल्या, त्या लीलामृताच्या सेवनाने कोण बरे तृप्त होऊ शकेल ? (३)


श्रीशुक उवाच -
कालिन्द्यां कालियस्यासीद् ह्रदः कश्चिद् विषाग्निना ।
श्रप्यमाणपया यस्मिन् पतन्त्युपरिगाः खगाः ॥ ४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् ! यमुनापात्रीं कालियाकुंड एक ते ।
विषारी उकळे पाणी वरचा पक्षिही पडे ॥ ४ ॥

कालिंद्याम् - यमुनेमध्ये - कालियस्य कश्चित् ह्रदः - कालियाचा एक डोह - विषाग्निना - विषरूप अग्नीने - श्रप्यमाणपयः आसीत् - कढत आहे पाणी ज्यातील असा होता - उपरिगाः खगाः - वरून जाणारे पक्षी - यस्मिन् पतंति स्म - ज्यात पडत असत. ॥४॥
श्रीशुक म्हणाले - यमुना नदीत कालिया नागाचा एक डोह होता. त्यातील पाणी विषाच्या उष्णतेने उकळत असे. एवढेच काय, त्याच्यावरून उडणारे पक्षीसुद्धा होरपळून त्यामध्ये पडत असत. (४)


विप्रुष्मता विषदोर्मि मारुतेनाभिमर्शिताः ।
म्रियन्ते तीरगा यस्य प्राणिनः स्थिरजङ्‌गमाः ॥ ५ ॥
तरंगा स्पर्शिता तैसे वायूने तृण वृक्ष नी ।
मरती पशु पक्ष्यादी तात्काल वेळ ना सरे ॥ ५ ॥

विप्रुष्मता - पाण्याच्या कणांनी युक्त अशा - विषोदोर्मिमारुतेन - व विषारी पाण्याच्या लाटांवरून येणार्‍या वायूने - अभिमर्शिताः - झपाटलेले असे - यस्य तीरगा - ज्याच्या काठी राहणारे - स्थिरजंगमाः प्राणिनः - स्थावर व जंगम प्राणी - म्रियंते - मरत असत. ॥५॥
त्या विषारी पाण्याच्या लाटांवरून त्यातील लहान लहान तुषार घेऊन वाहणारा वारा जेव्हा बाहेर येई, तेव्हा त्याच्या स्पर्शाने काठावरील झाडे व प्राणी मरून जात. (५)


( वसंततिलका )
तं चण्डवेगविषवीर्यमवेक्ष्य तेन
     दुष्टां नदीं च खलसंयमनावतारः ।
कृष्णः कदम्बमधिरुह्य ततोऽतितुङ्‌गम्
     आस्फोट्य गाढरशनो न्यपतद् विषोदे ॥ ६ ॥
( वसंततिलका )
ते चंड वीषहरिने जलि पाहिले नी
     माझी विहार यमुना अशि नाशिली का ।
चिंतूनिया करि कसी कमरेस फेटा
     गेला कदंब हरि हाबुक ठोकुनीया ।
उंचोनि त्यात उडि घे मग कृष्ण त्याच ।
     पाण्यात जे उकळते विष पांगुनीया ॥ ६ ॥

खलसंयमनावतारः कृष्णः - दुष्टांना शासन करण्याकरिता अवतीर्ण झालेला कृष्ण - चंडवेगविषवीर्यं तम् - तीव्र आहे वेग ज्याचा असे विष आहे पराक्रम ज्याचा अशा त्या कालियाला - तेन च दुष्टां नदीं - आणि त्याने दूषित केलेल्या नदीला - अवेक्ष्य - पाहून - गाढरशनः - घट्ट केला आहे कमरेचा पटटा ज्याने असा - अतितुङग कदंबं अधिरुह्य - अतिशय उंच अशा कळंबाच्या झाडावर चढून - आस्फोटय ततः विषोदे न्यपतत् - दंड ठोकून तेथून विषमय उदकात उडी टाकिता झाला. ॥६॥
भगवंतांचा अवतार दुष्टांचे दमन करण्यासाठीच होता. त्यांनी पाहिले की, विषाचा वेग प्रचंड असून तेच त्याचे बलस्थान आहे; तसेच त्यामुळेच यमुना दूषित झाली आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी कमरेचा शेला घट्ट बांधून ते एका अतिशय उंच अशा कदंबाच्या वृक्षावर चढले आणि दंड थोपटून तेथून विषारी पाण्यात उडी मारली. (६)

विवरण :- कालिया सर्पाच्या महाभयंकर विषाने यमुनेचे पवित्र पाणी इतके विषारी झाले की, तिच्या प्रवाहावरून उडत जाणारे सर्व पक्षी मरून प्रवाहात पडत, जवळची सर्व झाडे वाळून जात. त्या कालियास मारण्यासाठी कृष्ण तीरावरच्या कदंब वृक्षावर चढला, पण फक्त कदंब वृक्षच, तोही अगदी उंच, कसा शिल्लक राहिला ? त्या विषयी पुराणांतून असा दाखला मिळतो की, स्वर्गातून अमृत हरण करून आणत असता गरुड काही काळ कदंब वृक्षावर बसला तेव्हा अमृताचा स्पर्श कदंबवृक्षास होऊन तो जिवंत राहिला. (६)



सर्पह्रदः पुरुषसारनिपातवेग
     संक्षोभितोरगविषोच्छ्वसिताम्बुराशिः ।
पर्यक्‌प्लुतो विषकषायबिभीषणोर्मिः
     धावन् धनुःशतमनन्तबलस्य किं तत् ॥ ७ ॥
पीतो नि लाल उठती जळि त्या तरंग
     टाकी उडी हरि तदा उसळोनि आले ।
आश्चर्य ना हरिस ते बघताचि सर्प
     जो चारशे कर असे अति लांब ऐसा ॥ ७ ॥

सर्पह्रदः - तो कालियाचा डोह - पुरुषसारनिपातवेगसंक्षोभित - वीर्यवान अशा श्रीकृष्णाच्या उडीच्या वेगाने अत्यंत क्षुब्ध झालेल्या - उरगविषोच्छ्वसितांबुराशिः - सर्पाच्या विषामुळे उसळत आहे पाण्याचा लोंढा ज्यातील असा - विषकषायविभीषणोर्मिः - विषाने कडू झालेल्या भयंकर लाटा आहेत ज्यात असा - पर्यक् धावन् - चोहोकडे धावत - धनुःशतं वृतः (आसीत्) - शंभर धनुष्ये इतकी विस्तृत जागा व्यापणारा झाला - अनंतबलस्य - अनंत आहे पराक्रम ज्याचा - तत् किं आश्चर्यम् - अशा त्या श्रीकृष्णाला ते कसले आश्चर्य. ॥७॥
सापाच्या विषामुळे यमुनेचे पाणी पहिल्यापासूनच उकळत होते. त्यावर लाल-पिवळ्या रंगांच्या अत्यंत भयंकर अशा लाटा उसळत होत्या. भगवंताणी उडी मारल्याने ते पाणी आणखीनच उसळले. त्यावेळी ते पाणी इकडे तिकडे चारशे हात पसरले. अनंत बलशली, भगवंतांच्या बाबतीत यात आश्चर्य कसले ? (७)


तस्य ह्रदे विहरतो भुजदण्डघूर्ण
     वार्घोषमङ्‌ग वरवारणविक्रमस्य ।
आश्रुत्य तत् स्वसदनाभिभवं निरीक्ष्य
     चक्षुःश्रवाः समसरत् तदमृष्यमाणः ॥ ८ ॥
हत्तीपरी उडविले जल श्रीहरीने
     हातेचि तो उसळिता बहु शब्द येती ।
नेत्रश्रव्यास कळले कुणि शत्रु आला
     क्रोधोनि तो मग पुन्हा हरिपाशि आला ॥ ८ ॥

अङग - हे परीक्षित राजा - वरवारणविक्रमस्य - ऐरावतासारखा आहे पराक्रम ज्याचा - तस्य ह्रदे विहरतः - असा तो कृष्ण डोहात क्रीडा करीत असता - (तस्य) भुजदंडघूर्णवार्घोषं आश्रुत्य - त्याच्या दंडाच्या योगाने गरगर फिरणार्‍या पाण्याचा ध्वनी ऐकून - तत् स्वसदनाभिभवं निरीक्ष्य - तेणेकरून आपल्या स्थानाचा अपमान झालेला पाहून - तत् अमृष्यमाणः चक्षुःश्रवाः - ते सहन न करणारा तो कालिय सर्प - (कृष्णं) समसरत् - त्या कृष्णाजवळ येता झाला. ॥८॥
परीक्षिता ! डोहात उडी मारून श्रीकृष्ण बलवान हत्तीप्रमाणे पोहू लागले. त्यावेळच्या त्यांच्या हाताच्या आपटण्याने पाण्यात मोठा आवाज होऊ लागला. कालिया नागाने तो आवाज ऐकला आणि आपल्या निवासस्थानावर कोणीतरी आक्रमण केले आहे, हे पासून ते सहन न झाल्यामुळे तो श्रीकृष्णांच्या समोर आला. (८)


तं प्रेक्षणीयसुकुमारघनावदातं
     श्रीवत्सपीतवसनं स्मितसुन्दरास्यम् ।
क्रीडन्तमप्रतिभयं कमलोदराङ्‌घ्रिं
     सन्दश्य मर्मसु रुषा भुजया चछाद ॥ ९ ॥
ते श्याम बाळ बघता नच नेत्र झाकी
     श्रीवत्सचिन्ह पिवळ्या वसनीं हरीचे ।
सूहास्य नी पद जशी कुसुमीय गादी
     हा तो विषारि जलि ही बहु खेळतो की ।
क्रोधोनि डंख करण्या मग श्रीहरीला
     मर्मस्थ अंगि जखडी बळ लावुनीया ॥ ९ ॥

प्रेक्षणीयसुकुमारघनावदातं - पाहण्यायोग्य कोमल व मेघाप्रमाणे दैदीप्यमान अशा - श्रीवत्सपीतवसनं - श्रीवत्सचिन्हाने युक्त व पिवळे वस्त्र नेसलेल्या - स्मितसुंदरास्यं - हास्यामुळे शोभायमान आहे मुख ज्याचे - अप्रतिभयं क्रीडन्तं - अशा व निर्भयपणे क्रीडा करणार्‍या - कमलोदरांघ्रिं तं - कमळाच्या गाभ्याप्रमाणे कोमल आहेत चरण ज्याचे अशा त्या कृष्णाला - मर्मसु रुषा संदश्य - मर्माच्या ठिकाणी रागाने दंश करून - भुजया चछाद - आपल्या शरीराने वेढिता झाला. ॥९॥
त्याने पाहिले की, समोरच एक मेघाप्रमाणे सावळा सुंदर कुमार आहे. त्याच्या वक्षःस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. त्याने पीतांबर परिधान केला आहे. त्याच्या मनोहर चेहर्‍यावर मंद हास्य झळकत आहे. त्याचे पाय कमळाच्या गाभ्याप्रमाणे कोमल आहेत. इतके असूनही तो येथे निर्भयपणे खेळत आहे. तेव्हा त्याने क्रोधाने श्रीकृष्णांच्या मर्मस्थानी दंश करून त्यांना आपल्या शरीराने वेढून टाकले. (९)


तं नागभोगपरिवीतमदृष्टचेष्टम्
     आलोक्य तत्प्रियसखाः पशुपा भृशार्ताः ।
कृष्णेऽर्पितात्मसुहृदर्थकलत्रकामा
     दुःखानुशोकभयमूढधियो निपेतुः ॥ १० ॥
दावी हरीहि अपुली जणु शक्ति नाही
     दुःखेचि गोप पडले मग त्या भुमीसी ।
देहो धनो नि मनिच्या सगळ्याच इच्छा
     स्त्री पुत्र भोग हरिसी दिधले तयांनी ॥ १० ॥

तत्प्रियसखाः पशुपाः - त्याचे अत्यंत आवडते मित्र असे ते गोप - तं नागभोगपरिवीतं - त्याला नागाच्या शरीराने वेष्टिलेला व - अदृष्टचेष्टं आलोक्य - दिसत नाही हालचाल ज्याची असा पाहून - कृष्णे अर्पितात्म - कृष्णाच्या ठिकाणी अर्पिले आहेत आत्मा, - सुहृदर्थकलत्रकामाः - मित्रसंबंधी कर्तव्य व स्त्री आदिकरून मनोरथ ज्यांनी असे - भूशार्ताः दुःखानुशोकभय - अत्यंत पीडित होऊन दुःख, शोक व भय यांनी - मूढधियः निपेतुः - मोहित झाली आहे बुद्धी ज्याची असे भूमीवर पडले. ॥१०॥
नागाने वेढलेले श्रीकृष्ण काहीच हालचाल करीत नसलेले पाहून त्यांचे प्रिय सखे गोपाळ अत्यंत दुःखी झाले. कारण त्यांनी आपले शरीर, सुहृद, धन, संपत्ती, स्त्री, पुत्र, इच्छा इत्यादि सर्व काही श्रीकृष्णांनाच समर्पित केले होते. त्यामुळे दुःख, शोक आणि भितीने मूर्च्छित होऊन ते जमिनीवर पडले. (१०)


( अनुष्टुप् )
गावो वृषा वत्सतर्यः क्रन्दमानाः सुदुःखिताः ।
कृष्णे न्यस्तेक्षणा भीता रुदत्य इव तस्थिरे ॥ ११ ॥
( अनुष्टुप् )
वासुरे बैल नी गाई दुःखाने डरकाळती ।
लावली दृष्टी कृष्णाशी अचेत जाहले जसे ॥ ११ ॥

गावः वृषाः वत्सतर्यः - गाई, बैल व वासरे - क्रंदमानाः सुदुःखिताः - हंबरडा फोडणारी व अत्यंत दुःखित झालेली अशी - कृष्णे न्यस्तेक्षणाः - कृष्णाच्या ठिकाणी लाविली आहे दृष्टि ज्यांनी अशा - भीताः - घाबरलेली - रुदंत्यः इव तस्थिरे - जणु रडतच उभी राहिली. ॥११॥
गाई, बैल, वासरे अतिशय दुःखी होऊन हंबरडा फोडू लागली. भयभीत होऊन जणू काही रडत श्रीकृष्णांकडे ती एकटक पाहात राहिली. (११)


अथ व्रजे महोत्पाताः त्रिविधा ह्यतिदारुणाः ।
उत्पेतुर्भुवि दिव्यात्मन् यासन्नभयशंसिनः ॥ १२ ॥
व्रजीं आकाशि भूमीसी देहा उत्पात जाहले ।
सूचना जणु त्या होती अशूभ घडणे असे ॥ १२ ॥

अथ व्रजे - इकडे गोकुळात - भुवि दिवि आत्मनि - पृथ्वीवर, आकाशात व शरीरात - आसन्नभयशंसिनः - थोडया वेळाने येणार्‍या भयाला सुचविणारे - अतिदारुणाः - अत्यंत भयंकर - त्रिविधाः महोत्पाताः उत्पेतुः - तीन प्रकारची मोठी दुश्चिन्हे उत्पन्न झाली. ॥१२॥
इकडे व्रजात पृथ्वी, आकाश आणि शरीर या तिन्हींमध्ये अतिशय भयंकर असे अपशकुन होऊ लागले. लवकरच एखादी अशुभ घटना घडणार असल्याचे ते सूचक होते. (१२)

विवरण :- कालियाने कृष्णास विळखा घातल्यानंतर क्षणभर कृष्ण दिसेनासा झाल्याने तीरावरील सर्व गोप भयभीत झाले. गोकुळामध्येहि भय आणि अशुभसूचक असे अनेकविध अपशकुन होऊ लागले. भूकंप, (पृथ्वी) उल्कापात, (आकाश) आणि डावा डोळा स्फुरणे (मानवी) अशा प्रकारे तीनही लोकातून अपशकुन सूचित होऊ लागले. (१२)



तानालक्ष्य भयोद्विग्ना गोपा नन्दपुरोगमाः ।
विना रामेण गाः कृष्णं ज्ञात्वा चारयितुं गतम् ॥ १३ ॥
शकून पाहता ऐसा नंदांना कळले तसे ।
न सवे बळि तो कृष्णा व्याकूळ जाहले मनीं ॥ १३ ॥

नंदपुरोगमाः गोपाः - नंदादिक सर्व गोप - भयोद्विग्नाः - भयाने व्याकुळ झालेले - रामेण विना - बलरामाशिवाय - गाः चारयितुं - गाई चारण्यास - गतं कृष्णं ज्ञात्वा - गेलेल्या कृष्णाला जाणून. ॥१३॥
नंद इत्यादि गोपांनी ते अपशकुन पाहिले आणि बलरामाखेरीज श्रीकृष्ण गाई चारण्यासाठी गेला आहे, हे कळताच ते भितीने व्याकुळ झाले. (१३)


तैर्दुर्निमित्तैर्निधनं मत्वा प्राप्तमतद् विदः ।
तत् प्राणास्तन्मनस्कास्ते दुःखशोकभयातुराः ॥ १४ ॥
वाटले आज ते त्यांना कृष्णाचा मृत्यु जाहला ।
बुडाले दुःख शोकात त्यांचा सर्वस्व कृष्ण तो ॥ १४ ॥

अतद्विदः - त्या कृष्णाचा प्रभाव न जाणणारे, - तत्प्राणाः - त्याच्यावर ज्यांचा प्राण - तन्मनस्काः ते - व त्याच्या ठिकाणी सदैव मन असणारे ते गोप - तै दुर्निमित्तैः - त्या अनिष्टसूचक उत्पातांनी - निधनं प्राप्तं मत्वा - कृष्णाला मरण आले असे मानून - दुःखशोकभयःतुरा बभूवुः - दुःख, शोक व भय यांनी पीडित झाले. ॥१४॥
ते भगवंतांचा प्रभाव जाणत नव्हते; म्हणून ते अपशकुन पाहून त्यांच्या मनात आले की, श्रीकृष्णावर मरणप्राय संकट ओढवणार असे दिसते. या विचाराने ते त्याच क्षणी दुःख, शोक आणि भयाने ग्रस्त झाले. कारण श्रीकृष्णच त्यांचे प्राण, मन होते ना ! (१४)


आबालवृद्धवनिताः सर्वेऽङ्‌ग पशुवृत्तयः ।
निर्जग्मुर्गोकुलाद् दीनाः कृष्णदर्शनलालसाः ॥ १५ ॥
वत्सलो वृद्ध बालो नी स्त्रिया गाई व्रजींचिया ।
वनात पातले दीन सर्वांनी घर सोडिले ।
कन्हैया पाहण्या झाले आतूर मनि सर्व ते ॥ १५ ॥

अंग - हे परीक्षित राजा - सर्वे आबालवृद्धवनिताः पशुवृत्तयः - सगळी मुले, म्हातारी माणसे, स्त्रिया यांसह ते गवळी - कृष्णदर्शनलालसाः दीनाः - कृष्णाच्या दर्शनाची इच्छा करणारे व दीन झालेले - गोकुलात् निर्जग्मुः - गोकुळातून बाहेर निघाले. ॥१५॥
राजा ! व्रजातील मुले, वृद्ध आणि स्त्रिया यांचे कृष्णांवर गाईंसारखेच अतिशय प्रेम होते. त्यामुळे ते घाबरून कृष्णाला पाहाण्याच्या उत्कट लालसेने गोकुळातून बाहेर पडले. (१५)


तांस्तथा कातरान् वीक्ष्य भगवान् माधवो बलः ।
प्रहस्य किञ्चिन्नोवाच प्रभावज्ञोऽनुजस्य सः ॥ ॥
बलराम प्रती कृष्ण पाहता हासला मनीं ।
बंधूची जाणुनी शक्ती शांत तो राहिला असे ॥ १६ ॥

अनुजस्य प्रभावज्ञः - आपल्या धाकटया भावाचा प्रभाव जाणणारा - सः माधवः - तो लक्ष्मीपती - भगवान् बलः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न बलराम - तथा - त्याप्रमाणे - तान् कातरान् वीक्ष्य - त्या भीतीग्रस्त झालेल्या लोकांना पाहून - प्रहस्य - हसून - किंचित् न उवाच - काहीसुद्धा बोलला नाही. ॥१६॥
भगवान कृष्णाचे दुसरे रूप असे बलराम ते लोक इतके व्याकुळ झाल्याचे पाहून हसू लागले. परंतु काही बोलले नाहीत. कारण त्यांना धाकट्या भावाचा प्रभाव माहित होता. (१६)


तेऽन्वेषमाणा दयितं कृष्णं सूचितया पदैः ।
भगवत् लक्षणैर्जग्मुः पदव्या यमुनातटम् ॥ १७ ॥
शोधीत पदचिन्हांना कृष्णाला व्रजवासि ते ।
पद्मांकुश ध्वजो वज्र ठसे पाहत चालले ॥ १७ ॥

ते - ते लोक - भगवैल्लक्षणः पदैः - कृष्णाच्या पावलाच्या खुणा आहेत ज्यांवर अशा उमटलेल्या पावलांनी - सूचितया पदव्या - सुचविलेल्या मार्गाने - दयितं कृष्णं अन्वेषमाणाः - आवडत्या कृष्णाला शोधीत - यमुनातटं जग्मुः - यमुनेच्या तीरी गेले. ॥१७॥
ते प्रिय श्रीकृष्णाला शोधू लागले. वाटेतच त्यांना भगवंतांची चरणचिन्हे दिसली. त्या वाटेने यमुनेच्या तीरावर ते जाऊ लागले. (१७)


( इंद्रवंशा )
ते तत्र तत्राब्जयवाङ्‌कुशाशनि
     ध्वजोपपन्नानि पदानि विश्पतेः ।
मार्गे गवामन्यपदान्तरान्तरे
     निरीक्षमाणा ययुरङ्‌ग सत्वराः ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा )
गोपद्मचिन्हे अन त्याच तैशी
     त्या श्रीहरीचे पदचिन्ह होते ।
शोधीत पद्मांकुश चिन्ह सारे
     त्वरे निघाले हरिसी पहाया ॥ १८ ॥

अंग - हे परीक्षित राजा - ते - नंदादिक गोप - तत्र तत्र मार्गे - त्या त्या मार्गात ठिकठिकाणी - गवां - गाईंच्या - अन्यपदांतरान्तरे - व इतरांच्या पावलांच्या मध्ये - विश्पतेः अब्जयवांकुशाशनि - कृष्णाची कमल, यव, अंकुश वज्र - ध्वजोपपन्नानि पदानि - व ध्वज इत्यादिक चिन्हे यांनी युक्त अशा उमटलेल्या पावलांना - निरीक्षमाणाः सत्वराः ययुः - सूक्ष्मपणे पाहात त्वरेने गेले. ॥१८॥
परीक्षिता ! वाटेमध्ये गाई आणि इतरांच्या पावलांच्या ठशांव्यतिरिक्त अधून मधून भगवंतांची चरणचिन्हे सुद्धा दिस्त होती. त्यावर कमल, जव, अंकुश, व्रज आणि ध्वजाची चिन्हे दिसत होती. ती पाहताच ते लगबगीने चालू लागले. (१८)


( वसंततिलका )
अन्तर्ह्रदे भुजगभोगपरीतमारात् ।
     कृष्णं निरीहमुपलभ्य जलाशयान्ते ।
गोपांश्च मूढधिषणान् परितः पशूंश्च
     संक्रन्दतः परमकश्मलमापुरार्ताः ॥ १९ ॥
( वसंततिलका )
लांबून ते बघत श्रीहरि सर्ववेढीं
     निश्चेष्ट तो मग तिथे बहु गोप गाई ।
आर्तस्वरेचि करिती हरिचाच धावा
     व्याकूळले नि मग मूर्छित सर्व झाले ॥ १९ ॥

जलाशयांते अंतर्ह्रदे - त्या यमुनेच्या आतील डोहात - भुजगभोगपरीतं - सर्पाच्या देहाने वेष्टिलेल्या - निरीहं कृष्णं - व निश्चेष्ट असलेल्या कृष्णाला - आरात् उपलभ्य - दुरून पाहून - मूढधिषणान् गोपान् च - आणि ज्यांच्या मनाला भ्रम झाला आहे अशा गोपांना - पशून् च - तसेच गाईंना - संक्रंदतः - हंबरत असलेल्या - आर्ताः परमकश्मलं आपुः - पीडित झालेले अतिशय मोहाप्रत प्राप्त झाले.॥१९॥
त्यांनी लांबूनच पाहिले की, डोहात कालिय नागाच्या विळख्यात बांधले गेलेले श्रीकृष्ण निश्चेष्ट असून तीरावर गोपाळ किंकर्तव्यमूढ अवस्थेत पडलेले आहेत. ते पाहून ते सर्व गोप अत्यंत व्याकुळ होऊन मूर्छित झाले. (१९)


गोप्योऽनुरक्तमनसो भगवत्यनन्ते ।
     तत्सौहृदस्मितविलोकगिरः स्मरन्त्यः ।
ग्रस्तेऽहिना प्रियतमे भृशदुःखतप्ताः
     शून्यं प्रियव्यतिहृतं ददृशुस्त्रिलोकम् ॥ २० ॥
श्रीरंग रंग चढला मनि गोपिकांच्या
     चित्तात त्या स्मरति नी मधु हासतीही ।
आता हरीस बघता विळख्यात सर्पीं
     दुःखोचि दुःख गमले जणु देह फाटे ॥ २० ॥

भगवति अनंते - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अशा कृष्णाच्या ठिकाणी - अनुरक्तमनसः गोप्यः - ज्यांचे चित्त आसक्त झाले आहे अशा गोपी - अहिना ग्रस्ते प्रियतमे - अत्यंत आवडता कृष्ण सर्पाने वेढिला गेला असता - भृशदुःखतप्ताः - अत्यंत दुःखाने तप्त झालेल्या - तत्सौहृदस्मितविलोकगिरः - त्याचे प्रेम, किंचित हास्ययुक्त पाहणे व बोलणे - स्मरंत्यः - ही आठवीत - प्रियव्यतिहृतं त्रिलोकं - आवडत्या कृष्णाने विरहित असे त्रैलोक्य - शून्यं ददृशुः - ओस पाहत्या झाल्या. ॥२०॥
गोपींचे मन अनंत गुणांनी युक्त अशा भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमरंगात रंगले होते. त्या नित्य भगवंतांचे प्रेम, स्मितहास्य, नेत्रकटाक्ष तसेच गोड वाणी यांचेच स्मरण करीत. त्यांनी जेव्हा पाहिले की, आपल्या प्रियतमाला नागाने विळखा घातला आहे, तेव्हा त्या अत्यंत दुःखाने करपून गेल्या. आपल्या प्रियतमाखेरीज त्यांना तिन्ही लोक भकास वाटू लागले. (२०)


ताः कृष्णमातरमपत्यमनुप्रविष्टां
     तुल्यव्यथाः समनुगृह्य शुचः स्रवन्त्यः ।
तास्ता व्रजप्रियकथाः कथयन्त्य आसन्
     कृष्णाननेऽर्पितदृशो मृतकप्रतीकाः ॥ २१ ॥
माता स्मरोनि हरि तो निघताचि डोही
     गोपी धरोनि तिजला मग थांबवीती ।
लीला स्मरोनि हरिच्या रडताहि बोले
     धीरेचि ती रडतसे तरि मेलि ऐशी ॥ २१ ॥

तुल्यव्यथाः ताः - सारखे आहे दुःख ज्याचे अशा त्या गोपी - शुचः स्रवंत्यः - शोकाश्रू गाळीत - अपत्यं अनुप्रविष्टां - पुत्र जो कृष्ण त्याच्याशी एकरूप झालेल्या - कृष्णमातरं समनुगृह्य - यशोदेला बळकट धरून - ताः ताः प्रियव्रजकथाः - त्या त्या आवडत्या कृष्णाच्या गोकुळातील - कथयन्त्यः - गोष्टी सांगणार्‍या - कृष्णाने अर्पितदृशः - कृष्णाच्या तोंडाकडे ज्यांची दृष्टि लागून गेली आहे अशा - मृतकप्रतीकाः आसन् - मृतप्राय झाल्या. ॥२१॥
आपल्या लाडक्याच्या पाठोपाठ डोहात उडी मारावयास निघालेल्या यशोदेला गोपींनी कसेबसे धरून ठेवले. त्यांच्याही नेत्रांतून दुःखाने अश्रुधारा वाहात होत्या. सर्वांच्या नजरा श्रीकृष्णांच्या मुखाकडेच लागल्या होत्या. काहीजणी व्रजमोहन श्रीकृष्णांच्या कथा एकमेकींना सांगत परस्परांना धीर देत होत्या. काहीजणी तर मृतवत पडलेल्या होत्या. (२१)


( अनुष्टुप् )
कृष्णप्राणान् निर्विशतो नन्दादीन् वीक्ष्य तं ह्रदम् ।
प्रत्यषेधत् स भगवान् रामः कृष्णानुभाववित् ॥ २२ ॥
( अनुष्टुप् )
श्रीकृष्ण नंद गोपांचा प्राणची डोहि तो तसा ।
काढाया निघले तेंव्हा बलरामेचि रोधले ॥ २२ ॥

तं ह्रदं - त्या डोहात - कृष्णप्राणान् नंदादीन् - कृष्ण हाच ज्यांचा प्राण अशा नंदादिकांना - निविशतः वीक्ष्य - प्रवेश करण्यास उद्युक्त झालेले पाहून - सः कृष्णानुभाववित् - तो कृष्णाचा पराक्रम जाणणारा - भगवान् रामः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न बलराम - प्रत्यषेधत् - निषेध करिता झाला. ॥२२॥
श्रीकृष्णच जीव की प्राण असणारे नंदादि गोप डोहात घुसू लागले, हे पाहून श्रीकृष्णांचा प्रभाव जाणणार्‍या भगवान बलरामांनी त्यांना थोपवून धरले. (२२)


( वसंततिलका )
इत्थं स्वगोकुलमनन्यगतिं निरीक्ष्य
     सस्त्रीकुमारमतिदुःखितमात्महेतोः ।
आज्ञाय मर्त्यपदवीमनुवर्तमानः
     स्थित्वा मुहूर्तमुदतिष्ठदुरङ्‌गबन्धात् ॥ २३ ॥
( वसंततिलका )
बांधोनि घेइ हरि तो परि माणसाच्या
     पाही जधी स्वनयनी व्रजि दुःख झाले ।
तेंव्हा स्मरे मनि यया मम आश्रयो नी
     एका मुहुर्ति सुटला हरि तो तिथोनी ॥ २२ ॥

इत्थं - याप्रमाणे - सस्त्रीकुमारम् - बायकामुलांसह - स्वकुलम् - आपले गोकुळ - अनन्यगतिम् निरीक्ष्य - दुसरा आधार नाही ज्याला असे पाहून - आत्महेतोः अतिदुःखितं च - आणि आपल्यासाठी फार दुःखी झालेले - आज्ञाय - जाणून - मर्त्यपदवीं अनुवर्तमानः - मनुष्याच्या व्यवहाराचे अनुकरण करणारा श्रीकृष्ण - मुहूर्तं स्थित्वा - घटकाभर तसाच राहून - उरगबंधात् उदतिष्ठत् - सापाच्या बंधनातून वर उठला. ॥२३॥
आपल्याशिवाय अन्य गती नसलेले व्रजातील सगळे लोक, स्त्रिया, मुले आणि गुरे आपल्यासाठी इतकी दुःखी झालेली आहेत, हे पाहून मानवी लीला करणारे भगवान थोडा वेळ सापाच्या विळख्यात राहून मग बाहेर आले. (२३)


तत्प्रथ्यमानवपुषा व्यथितात्मभोगः
     त्यक्त्वोन्नमय्य कुपितः स्वफणान्भुजङ्‌गः ।
तस्थौ श्वसन् श्वसनरन्ध्रविषाम्बरीष
     स्तब्धेक्षणोल्मुकमुखो हरिमीक्षमाणः ॥ २४ ॥
कृष्णो शरीर फुगवी तुटु सर्प वाटे
     झाला ढिला नि मग फुत्कुर टाकि क्रोधे ।
पाही हरीस डसण्या गरळाहि टाकी
     ते नेत्र लाल दिसती अन आग तोंडी ॥ २४ ॥

तत्प्रथ्यमानवपुषा - कृष्णाने फुगविलेल्या शरीराच्या योगाने - व्यथितात्मभोगः कुपितः भुजंगः - ज्याचे शरीर पीडित झाले आहे असा रागावलेला कालिय - कृष्णं मुक्त्वा - कृष्णाला सोडून - स्वफणान् उन्नमय्य - आपला फणा उभारून - श्वसन् - धापा टाकीत - श्वसनरंध्रविषांबरीश - ज्याच्या श्वासमार्गातून विष बाहेर पडत आहे असा - स्तब्धेक्षणोल्मुक मुखः - व अग्निकण ज्याच्या मुखातून बाहेर पडत आहेत असा - हरिम् ईक्षमाणः - कृष्णाकडे टक लावून पाहत - तस्थौ - राहिला. ॥२४॥
त्यावेळी त्यांनी आपले शरीर फुगविल्यामुळे सापाला वेदना होऊ लागल्या. तो वेटोळे सोडून क्रोधाने फणा उभारून फूत्कार सोडू लागला. तो त्यांच्याकडे टक लावून पाहू लागला. त्यावेळी त्याच्या नाकातून विषारी श्वास बाहेर पडत होता. त्याचे डोळे इतके लाल झाले होते की, जणू भट्टीवर तापविलेले खापरच ! त्याच्या तोंडातूनही आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. (२४)


तं जिह्वया द्विशिखया परिलेलिहानं
     द्वे सृक्किणी ह्यतिकरालविषाग्निदृष्टिम् ।
क्रीडन्नमुं परिससार यथा खगेन्द्रो
     बभ्राम सोऽप्यवसरं प्रसमीक्षमाणः ॥ २५ ॥
ज्वाळा विषारी गरळे जिभल्याहि चाटी
     नेत्रातुनीहि तसली मग आग ओकी ।
खेळे हरीहि मग त्या गरुडा परी नी
     तो कालियाहि अपुला बदली पवित्रा ॥ २५ ॥

द्विशिखया जिह्वया - दुभागलेल्या जिभेने - द्वे सृक्किणी परिलेलिहानं - दोन्ही ओठ चाटणार्‍या - हि अतिकरालविषाग्निदृष्टिं - आणि अत्यंत भयंकर अशा विषरूप अग्नीप्रमाणे ज्याची दृष्टी झाली आहे अशा - तं अमुं (सर्पं) - त्या ह्या सर्पाला - सः अपि - तो कृष्णही - अवसरं प्रसमीक्षमाणः - संधीची वाट पाहणारा - क्रीडन् - खेळत - यथा खगेंद्रः (तथा) - ज्याप्रमाणे गरुड सापाभोवती फिरतो त्याप्रमाणे - परिससार - सभोवार फिरता झाला - बभ्राम - व फिरविता झाला. ॥२५॥
त्यावेळी कालिया आपली दुभंगलेली जीभ फिरवून आपल्या दोन्ही ओठांचे कोपरे चाटीत होता आणि भयानक डोळ्यांनी विषाग्नीच्या ज्वाळा बाहेर टाकीत होता. गरुडाप्रमाणे श्रीकृष्ण त्याच्याबरोबर खेळत पवित्रे बदलू लागले, आणि तो सापसुद्धा दंश करण्यासाठी योग्य संधीची वाट पहात पवित्रे बदलू लागला. (२५)


एवं परिभ्रमहतौजसमुन्नतांसम्
     आनम्य तत्पृथुशिरःस्वधिरूढ आद्यः ।
तन्मूर्धरत्‍ननिकरस्पर्शातिताम्र
     पादाम्बुजोऽखिलकलादिगुरुर्ननर्त ॥ २६ ॥
ऐसा परीभ्रमुनिया मग क्षीण झाला
     दाबी फणा हरि तदा चढला फणीसी ।
त्याच्या शिसास बहु ते मणिलाल होते
     नी नाचला प्रभु तिथे बहु लालि शोभे ॥ २६ ॥

आद्यः - पुराणपुरुष कृष्ण - एवं परिभ्रमहतौजसं - याप्रमाणे सभोवार फिरण्याच्या योगानेच ज्याचा पराक्रम नष्ट झाला आहे अशा - समुन्नतांसं आनम्य - उचलले आहेत स्कंध ज्याने अशा त्या सर्पाला वाकवून - तत्पृथुशिरःसु अधिरूढः - त्या सर्पाच्या विशाल मस्तकावर चढलेला असा - तन्मूर्धरत्‍ननिकरस्पर्शाति - त्या सर्पाच्या मस्तकावरील रत्‍नसमूहांच्या स्पर्शामुळे - ताम्रपादांबुजः - अत्यंत लाल दिसत आहेत चरणकमल ज्याचे असा - अखिलकलादिगुरुः ननर्त - संपूर्ण कलांचा आद्यगुरु असा कृष्ण नाचता झाला. ॥२६॥
अशा प्रकारे इकडे, तिकडे, मान फिरवून त्याची शक्ती क्षीण झाली. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा उंच फणा वाकवून उडी मारून त्यावर ते स्वार झाले. नागाच्या मस्तकावर असणार्‍या लाल मण्यांमुळे भगवंतांच्या सुकुमार पावलांची लाली अधिकच वाढली. सर्व कलांचे आद्य गुरू श्रीकृष्ण आता त्याच्या मस्तकारव सुंदर नृत्य करू लागले. (२६)

विवरण :- कृष्णाला विळखा घातलेला कालिया त्याला दंश करण्याची संधी पहात स्वतःभोवती गरगरा फिरत होता. पण कृष्णाने त्याचा फणा वाकवून त्यावर तो आरूढ झाला आणि (त्यावर) नृत्य करू लागला. फिरणार्‍या फण्यावर तो नृत्य कसा करू शकला असेल ? पण कृष्ण नृत्यादि सर्व चौसष्ठ कलांचा आदिगुरु होता, हे लक्षात घेतल्यावर त्याला कोणतीही गोष्ट कठीण नव्हती हे समजले. (आणखी एक गोष्ट लक्षात येते की सर्प-नाग यांना ठार करताना कृष्णाबरोबर बलराम नाही. अघासुराचे वेळीही तो नव्हता. बलराम शेषावतार म्हणूनहि असावे.) (२६)



तं नर्तुमुद्यतमवेक्ष्य तदा तदीय
     गन्धर्वसिद्धमुनिचारणदेववध्वः ।
प्रीत्या मृदङ्‌गपणवानकवाद्यगीत
     पुष्पोपहारनुतिभिः सहसोपसेदुः ॥ २७ ॥
गंधर्व सिद्ध सुर चारण भक्त यांनी
     ते पाहताच धरिला मग ढोल ताल ।
मृदंग कोणि धरिला मग ताल गीती
     नी वाहिले वरुनि पुष्प हरीवरी ते ॥ २७ ॥

तदा - त्यावेळी - तं नर्तुं उद्यतं अवेक्ष्य - त्या कृष्णाला नाचण्याला उद्युक्त झालेला पाहून - तदीयगंधर्वसिद्धचारणदेववध्वः - त्या कृष्णाचे सेवक असे गंधर्व, सिद्ध, देवांचे भाट व देवस्त्रिया - मृदंगपणवानकवाद्यगीत - मृदंग, पावे व नगारे इत्यादि वाद्ये वाजवीत, गात, - पुष्पोपहारनुतिभिः - पुष्पांचे हार आणि स्तोत्रे यांसह - प्रीत्या सहसा उपसेदुः - प्रेमाने तत्काल प्राप्त झाल्या. ॥२७॥
भगवान नृत्य करणार असे पाहून त्यांचे प्रिय भक्त गंधर्व, सिद्ध, देव, चारण आणि देवांगना मोठ्या प्रेमाने मृदंग, ढोल, नगारे इद्यादि वाद्ये वाजवीत, सुंदर सुंदर गीते गात, पुष्पवर्षाव करीत भेटवस्तू घेऊन स्तुती करीत भगवंतांकडे आले. (२७)


यद् यद् शिरो न नमतेऽङ्‌ग शतैकशीर्ष्णः
     तत्तन्ममर्द खरदण्डधरोऽङ्‌घ्रिपातैः ।
क्षीणायुषो भ्रमत उल्बणमास्यतोऽसृङ्‌
     नस्तो वमन् परमकश्मलमाप नागः ॥ २८ ॥
त्या कालियास शिर ते शत एक होते
     ना तो शिरास झुकवी हरि लाथ मारी ।
तो क्षीण सर्व मग नाक मुखासि रक्त
     ओकीत गोल फिरला अन शुद्ध गेली ॥ २८ ॥

अंग - हे परीक्षित राजा - खलदंडधरः - दुष्टांकरिता दंड धारण करणारा कृष्ण - शतैकशीर्ष्णः - शंभर फणांच्या - क्षीणायुषः - ज्याचे आयुष्य क्षीण झाले आहे अशा - भम्रतः - वाटोळ्या फिरणार्‍या त्या कालियाचे - यत् यत् शिरः - जे जे मस्तक - न नमते - नम्र होत नव्हते - तत् तत् - ते ते मस्तक - अंघ्रिपातैः ममर्द - पायाच्या प्रहाराने मर्दिता झाला - नागः - तो सर्प - आस्यतः नस्तः (च) - मुखापासून व नाकापासून - उल्बणं असृक् वमन् - पुष्कळ रक्त ओकत - परमकश्मलं आप - मोठया दुःखाला प्राप्त झाला. ॥२८॥
परीक्षिता ! कालिया नागाला एकशे एक फणा होत्या. तो आपली जी जी फणा वाकवीत नसे, ती ती, कठोर शासन करणारे भगवान आपल्या पायाने खाली दाबीत. यामुळे कालिया नागाची शक्ती क्षीण होऊ लागली. तो नाका तोंडातून भयंकर रक्त ओकू लागला. शेवटी त्याला चक्कर आल्याने तो बेहोश झाला. (२८)


तस्याक्षिभिर्गरलमुद्वमतः शिरःसु
     यद् यत् समुन्नमति निःश्वसतो रुषोच्चैः ।
नृत्यन् पदानुनमयन् दमयां बभूव
     पुष्पैः प्रपूजित इवेह पुमान्पुराणः ॥ २९ ॥
येताचि शुद्ध इवली भर क्रोध नेत्री
     फेकितसेचि विष नी मग फूंक मारी ।
जेंव्हा उठावि शिर तैं हरि लाथ मारी
     पायासि रक्त पडले सुमने जशी ती ॥ २९ ॥

अक्षिभिः गरलं उद्वमतः - नेत्रांनी विष ओकणार्‍या - रुषा उच्चैः निःश्वसतः - रागाने मोठमोठे श्वासोच्छवास सोडणार्‍या - तस्य शिरःसु - त्या सर्पाच्या शिरांमध्ये - यत् यत् (शिरः) समुन्नमति - जे जे मस्तक वर उचलीत असे - तत् तत् पदा अनुनमयन् नृत्यन् - ते ते पायाने वाकविणारा व नृत्य करणारा श्रीकृष्ण - दमयांबभूव - जर्जर करिता झाला - इह - यावेळी - पुराणः पुमान् इव - पुराणपुरुष म्हणजे शेषशाई नारायणच जणू आहे असे समजून - गंधर्वादिभिः पुष्पैः प्रपूजितः - गंधर्वांकडून फुलांनी पूजिला गेला. ॥२९॥
तो डोळ्यांतून वीष बाहेर फेकू लागे आणि क्रोधामुळे जोरजोरात फूत्कार टाकीत जी जी फणा वर उचलीत असे, तिच्यावर नृत्य करीत श्रीकृष्ण आपल्या लाथेने वाकवून ती तुडवीत. त्यावेळी त्या पुराण पुरुषाच्या पायांवर जे रक्ताचे थेंब पडत, ते पाहून असे वाटत असे की, जणू काही पान फुलांनी त्यांची पूजा केली जात आहे. (२९)


तच्चित्रताण्डवविरुग्णफणातपत्रो
     रक्तं मुखैरुरु वमन् नृप भग्नगात्रः ।
स्मृत्वा चराचरगुरुं पुरुषं पुराणं
     नारायणं तमरणं मनसा जगाम ॥ ३० ॥
त्या तांडवे हरिचिया चुरचुर झाला
     विच्छिन्न छत्र गमले फण भेदता ते ।
रक्तासि ओकि मग तो स्मरला मनासी
     नारायणास शरणार्थचि त्या हरीला ॥ ३० ॥

नृप - हे परीक्षित राजा - तच्चित्रतांडवविरुग्ण - त्या कृष्णाच्या विचित्र तांडवनृत्याने ज्याची - फणातपत्रः - फणारूपी छत्रे जर्जर झाली आहेत असा - मुखैः उरु रक्तं वमन् - मुखांनी अतिशय रक्त ओकणारा - भग्नगात्रः - छिन्नभिन्न झाले आहे शरीर ज्याचे असा - चराचरगुरुं पुराणं पुरुषं - स्थावरजंगमांचा गुरु व पुराणपुरुष अशा - नारायणं स्मृत्वा - शेषशाईचे स्मरण करून - तं मनसा अरणं जगाम - त्याला मनाने शरण जाता झाला. ॥३०॥
राजा ! भगवंतांच्या या अद्‌भुत तांडवनृत्यामुळे कालियाचे फणारूपी छत्र छिन्नविछिन्न झाले. त्याचे अंग खिळखिळे झाले आणि तोंडातून रक्ताची उलटी होऊ लागली. आता त्याला सर्व जगाचे गुरू असणार्‍या पुराणपुरुष नारायणांचे स्मरण झाले आणि तो मनोमन त्यांना शरण गेला. (३०)


कृष्णस्य गर्भजगतोऽतिभरावसन्नं
     पार्ष्णिप्रहारपरिरुग्णफणातपत्रम् ।
दृष्ट्वाहिमाद्यमुपसेदुरमुष्य पत्‍न्य
     आर्ताः श्लथद्वसन भूषणकेशबन्धाः ॥ ३१ ॥
ओझे तसेचि हरिचे उदरात विश्व
     नागास ना सहवुनी मणके ढिले ते ।
पत्‍न्या तसे बघुनिया मग पातल्या की
     कृष्णास त्या शरण नी भयभीत ऐशा ॥ ३१ ॥

गर्भजगतः कृष्णस्य - ज्याच्या उदरात सर्व ब्रह्मांडे आहेत अशा कृष्णाच्या - अतिभरावसन्नं - अत्यंत भाराने व्याकुळ झालेल्या - पार्ष्णिप्रहारपरिरुग्णफणातपत्रं - व पादतलाच्या प्रहाराने पीडित झाले आहे फणारूपी छत्र ज्याचे अशा - अहिं दृष्टवा - कालियाला पाहून - अमुष्य पत्‍न्यः - त्याच्या स्त्रिया - श्लथद्वसनभूषणकेशबंधाः आर्ताः - सैल झाली आहेत वस्त्रे, भूषणे व वेण्या ज्यांच्या अशा दुःखित झालेल्या - आद्यं उपसेदु - कृष्णाजवळ प्राप्त झाल्या. ॥३१॥
उदरामध्ये संपूर्ण विश्व धारण करणार्‍या श्रीकृष्णाच्या वजनाने कालिया गलितगात्र झाला. त्यांच्या टाचेने केलेल्या आघातांमुळे त्याचे छत्रासारखे फणे छिन्नविछिन्न झाले. आपल्या पतीची ही अवस्था पाहून त्याच्या भयभीत पत्‍न्या भगवंतांना शरण गेल्या. भितीने यावेळी त्यांची वस्त्रे, अलंकार अस्ताव्यस्त झाले होते आणि केसांच्या वेण्या विस्कटल्या होत्या. (३१)


तास्तं सुविग्नमनसोऽथ पुरस्कृतार्भाः
     कायं निधाय भुवि भूतपतिं प्रणेमुः ।
साध्व्यः कृताञ्जलिपुटाः शमलस्य भर्तुः
     मोक्षेप्सवः शरणदं शरणं प्रपन्नाः ॥ ३२ ॥
पुत्रासि घेउनि पुढे धरणीस आल्या
     जोडोनि हात हरिला नमिले तयांनी ।
श्रीकृष्ण तो शरण येइ तयास पावे
     सोडावयास पतिला हरि मानितो तै ॥ ३२ ॥

अथ पुरस्कृतार्भाः - नंतर पुढे केली आहेत मुले ज्यांनी अशा - कृतांजलिपुटाः ताः साध्व्यः - हात जोडलेल्या त्या पतिव्रता - सुविग्नमनसः - ज्यांची अंतःकरणे उद्विग्न झाली आहेत अशा - भर्तुः शमलस्य मोक्षेप्सवः - भर्त्याच्या पापाच्या नाशाची इच्छा करणार्‍या - तं शरणदं भूतपतिं - त्या सर्व प्राण्यांचा स्वामी अशा कृष्णाला - भूवि कायं निधाय - पृथ्वीवर शरीर टाकून - प्रणेमुः - नमस्कार करित्या झाल्या - शरणदं शरणं प्रपन्नाः - आणि आश्रयदात्या कृष्णाला शरण गेल्या. ॥३२॥
त्यावेळी त्या साध्वी नागपत्‍न्या अतिशय घाबरल्यामुळे आपल्या मुलांना पुढे करीत लोटांगण घालून, हात जोडून त्यांनी चराचराचे स्वामी अशा श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि आपल्या अपराधी पतीला सोडविण्याच्या इच्छेने त्या शरणागतवत्सल अशा त्यांना शरण गेल्या. (३२)


नागपत्‍न्य ऊचुः ।
( इंद्रवज्रा )
न्याय्यो हि दण्डः कृतकिल्बिषेऽस्मिन्
     तवावतारः खलनिग्रहाय ।
रिपोः सुतानामपि तुल्यदृष्टेः
     धत्से दमं फलमेवानुशंसन् ॥ ३३ ॥
( इंद्रवज्रा )
नागपत्‍न्या म्हणाल्या -
प्रभो तुझा हा अवतार आहे
     दंडावया दुष्टचि कारणाने ।
न मित्र शत्रू तुजला असा तो
     क्षाळोनि पापा मग धाम देसी ॥ ३३ ॥

अस्मिन् कृतकिल्बिषे - ह्या पापकर्म करणार्‍या सर्पांच्या ठायी - दंडः हि न्याय्यः - शिक्षा खरोखर न्यायप्राप्त होय - तव अवतारः - तुझा अवतार - खलनिग्रहाय (अस्ति) - दुष्टांना शासन करण्याकरिता आहे - तुल्यदृष्टेः एव फलं अनुशंसन् (त्वं) - समानदृष्टीच्याच फळाची प्रशंसा करणारा असा तू - रिपोः सुतानां अपि - शत्रूचे व पुत्रांचेहि - दमं धत्से - दमन करितोस. ॥३३॥
नागपत्‍न्या म्हणाल्या - प्रभो ! दुष्टांना दंड देण्यासाठीच आपला अवतार झाला आहे; म्हणून या अपराध्याला दंड देणेच योग्य आहे. आपल्या दिष्टीने शत्रू आणि पुत्र समानच असतात. म्हणून आपण ज्याला दंड देता तो त्याच्या कल्याणासाठीच असतो. (३३)


( वंशस्था )
अनुग्रहोऽयं भवतः कृतो हि नो
     दण्डोऽसतां ते खलु कल्मषापहः ।
यद् दन्दशूकत्वममुष्य देहिनः
     क्रोधोऽपि तेऽनुग्रह एव सम्मतः ॥ ३४ ॥
केलासि आम्हा अनुबोध ऐसा
     तू दंडिता नष्टचि सर्व पापे ।
हा सर्प राजो अपराधि तैसा
     कृपाचि लाभे तव कोप होता ॥ ३४ ॥

अयं (दमः) - हे कालियाचे दमन - भवतः - तुझ्याकडून - नः अनुग्रहः हि कृतः - आम्हांवर अनुग्रहच खरोखर केला गेला आहे - ते असतां दंडः - तू दुष्टांना केलेली शिक्षा - खलु कल्मषापहः (अस्ति) - खरोखरच पापनाशक असते - यत् - ज्याअर्थी - अमुष्य देहिनः - ह्या देहधारी प्राण्याचे - दंदशूकत्वं - सर्पत्व - तत् - त्याअर्थी - ते क्रोधः अपि - तुझा याच्यावरील क्रोधही - अनुग्रहः एव संमतः - अनुग्रहच समजला पाहिजे. ॥३४॥
आपण आमच्यावर ही मोठीच कृपा केली आहे; कारण आपण दुष्टांना जो दंड देता, त्यामुळे त्याची सर्व पापे नाहीशी होतात. हा प्राणी अपराधी आहे, म्हणून याला ही सर्पयोनी मिळाली. म्हणून आम्ही आपल्या या क्रोधालासुद्धा आपला अनुग्रहच समजतो. (३४)


( उपेंद्रवज्रा )
तपः सुतप्तं किमनेन पूर्वं
     निरस्तमानेन च मानदेन ।
धर्मोऽथ वा सर्वजनानुकम्पया
     यतो भवांस्तुष्यति सर्वजीवः ॥ ३५ ॥
त्या पूर्वे जन्मति तप थोर त्यांचे
     असेल किंवा बहु धर्म केला ।
तेंव्हाचि लाभे तव ही कृपा नी
     तुझ्या कृपेने जिव ते प्रसन्न ॥ ३५ ॥

निरस्तमानेन मानदेन च अनेन - अहंकार टाकलेल्या व दुसर्‍याला मान देणार्‍या याने - पूर्वं - पूर्वी - किं तपः सुतप्तं - कोणती तपश्चर्या केली होती - अथवा सर्वजनानुकंपया - किंवा सर्व प्राण्यावरील कृपा या योगाने - (कः) धर्मः (आचरितः) - कोणता धर्म आचरिला होता - यतः सजीवः भवान् - ज्यामुळे सर्वांचे जीवन असा तू - तुष्यति - संतुष्ट झाला आहेस. ॥३५॥
मागील जन्मात याने निश्चितच स्वतः मानरहित होऊन आणि दुसर्‍यांचा सन्मान करीत मोठी तपश्चर्या केली असावी किंवा सर्व जीवांवर दया करण्याचा मोठा धर्म केला असावा. म्हणूनच तर सर्व जीवस्वरूप आपण याच्यावर संतुष्ट झाला आहात. (३५)

विवरण :- कालियाला पूर्ण जर्जर केल्यानंतर त्याच्या स्त्रिया कृष्णाला शरण आल्या, आणि आश्चर्य म्हणजे कृष्णाला दोष न देता उलट त्या त्याची स्तुतीच करू लागल्या. 'तू केलेले हे कृत्य पूर्णपणे योग्यच आहे. कारण दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठीच तुझा जन्म आहे. ते करीत असता तू समदृष्टी असतोस. हा आपला मित्र व हा शत्रू ही तुझी भावना नसते. (कृष्णावताराचे शेवटीही गर्वाने उन्मत्त झालेल्या यादवांचाहि त्याने नाशच केला होता.) गर्वाने उन्मत्त झालेल्या आणि म्हणून उपद्रवी बनलेल्यांचे डोळे उघडावे म्हणूनहि तू त्यांच्यावर संकटे आणतोस. (हरिर्दुखाःनि भक्तानां हितबुद्ध्या करोति वै ।) त्यामुळे आमच्या पतीस त्याच्या उपद्रवाचे शासन मिळाले हे योग्यच आहे. पूर्वजन्मी केलेल्या पापांचे फळ म्हणून यास सर्पयोनी प्राप्त झाली. ते पाप नाहीसे व्हावे म्हणून तू केलेला दंड, तुझा हा क्रोध म्हणजे जणू तू त्याच्यावर केलेला अनुग्रहच आहे. (दंडोऽपि ममैषः अनुग्रहः कृतः) मग तू दंड करावा असे कोणते पुण्य कृत्य याने पूर्वजन्मी केले होते ? (३३-३५)



( मिश्र )
कस्यानुभावोऽस्य न देव विद्महे
     तवाङ्‌घ्रिरेणु स्पर्शाधिकारः ।
यद्वाञ्छया श्रीर्ललनाचरत्तपो
     विहाय कामान् सुचिरं धृतव्रता ॥ ३६ ॥
न साधनेचे फळ थोर ऐसे
     तुझ्या पदाची धुळ श्रेष्ठ तैशी ।
त्या श्रीरमेने बहु त्याग केला
     नी घोर केले तप तै मिळाले ॥ ३६ ॥

देव - हे कृष्णा - अस्य - ह्या आमच्या पतीला - तव अंघ्रिरेणुस्पर्शाधिकारः - मिळालेला तुझ्या चरणरजाच्या स्पर्शाचा अधिकार - कस्य प्रभावः (अस्ति) - कशाचा प्रभाव आहे - न विद्महे - आम्ही जाणत नाही - यद्वाञ्छया - ज्या चरणकमलांच्या इच्छेने - ललना श्रीः - सुंदर अशी लक्ष्मी - सुचिरं धृतव्रता - चिरकालपर्यंत व्रत धारण करणारी अशी - कामान् विहाय - सर्व इच्छा सोडून - तपः आचरत् - तपश्चर्या करिती झाली. ॥३६॥
भगवन् ! हा आपल्या चरणकमलांच्या धुळीचा स्पर्श होण्याचा अधिकारी झाला, हे त्याच्या कोणत्या साधनेचे फळ आहे, हे आम्हांला माहीत नाही. यासाठी लक्ष्मीदेवीलासुद्धा पुष्कळ दिवसपर्यंत भोगांचा त्याग करून नियमांचे पालन करीत तपश्चर्या करावी लागली होती. (३६)

विवरण :- कालियाच्या स्त्रिया कृष्णस्तुती करताना पुढे म्हणतात, लक्ष्मी तुझी पत्नी. तुझी प्राप्ती व्हावी म्हणून तिने बराच काळ तप केले. (लक्ष्मीची-वैभवाची प्राप्ती व्हावी म्हणून सर्वचजण सतत प्रयत्नशील असतात; पण तिला मात्र तुझ्याच प्राप्तीची इच्छा.) इथे रामायण कथेचा संदर्भ - वेदवती ही सत्य युगातील ब्रह्मर्षी कुशध्वजाची रूपवती कन्या. तिच्या प्राप्तीसाठी अनेकजण प्रयत्नशील. पण भगवान विष्णूच आपले जावई व्हावे, ही कुशध्वजाची इच्छा. विष्णूच्या प्राप्तीसाठी वेदवतीनेहि तपश्चर्या केली. त्याच काळात रावणाच्या मनात तिच्याविषयी लोभ निर्माण झाल्याने 'तुझ्या नाशासाठी मी पुनर्जन्म घेईन.' असा शाप त्याला देऊन तिने स्वतः अग्नीमध्ये प्रवेश केला. दुसर्‍या जन्मी रावणानेच ती आपल्या नाशास कारण होणार हे समजल्यावर तिला समुद्रार्पण केले. (लक्ष्मीचा जन्म समुद्रातूनच आहे.) नंतर सीतेच्या रूपात वेदवतीचा पुनर्जन्म झाला. विष्णू अवतार असलेल्या रामाशी विवाह होऊन तिची इच्छा पूर्ण झाली. रामाने रावणाचा वध करून तिची ही ही इच्छा पूर्ण केली. (३६)



न नाकपृष्ठं न च सार्वभौमं
     न पारमेष्ठ्यं न रसाधिपत्यम् ।
न योगसिद्धीरपुनर्भवं वा
     वाञ्छन्ति यत्पादरजःप्रपन्नाः ॥ ३७ ॥
लाभे जयांना धुळ या पदाची
     ते नेच्छिती राज्यहि या धरेचे ।
न सत्य लोका न रसातळाला
     न मुक्ति मोक्षासहि इच्छितात ॥ ३७ ॥

यत्पादरजःप्रपन्नाः - ज्या परमेश्वराच्या चरणरजाला प्राप्त झालेले - न नाकपृष्ठं (इच्छन्ति) - स्वर्गाची इच्छा करीत नाहीत - सार्वभौ‌मं नच - सार्वभौ‌म पद इच्छित नाहीत - पारमेष्ठयं न - ब्रह्मपदही इच्छित नाहीत - न रसाधिपत्यं - वरुणलोकही इच्छित नाहीत - न योगसिद्धीः - योगाभ्यासाने मिळणार्‍या सिद्धीची इच्छा करीत नाहीत - वा अपुनर्भवं वांछंति - किंवा मोक्षाचीही इच्छा करीत नाहीत. ॥३७॥
प्रभो ! जे आपल्या चरणरजाला शरण जातात, ते भक्तजन स्वर्गाचे राज्य किंवा पृथ्वीचे सार्वभौमत्व इच्छित नाहीत, ब्रह्मपद इच्छित नाहीत की त्यांना रसातळाचे राज्य नको असते. त्यांना अणिमादि योगसिद्धींची अभिलाषा असत नाही की मोक्षाची इच्छा असत नाही. (३७)


तदेष नाथाप दुरापमन्यैः
     तमोजनिः क्रोधवशोऽप्यहीशः ।
संसारचक्रे भ्रमतः शरीरिणो
     यदिच्छतः स्याद् विभवः समक्षः ॥ ३८ ॥
हा नागराजा तमयोनि झाला
     तरी पवित्रो धुळ लाभली यां ।
स्पर्शे यया वैभव सर्व जोडे
     ने केवळो तो तर मोक्ष लाभे ॥ ३८ ॥

नाथ - हे स्वामी कृष्णा - तत् एषः अहीशः - या कारणास्तव हा सर्पराजा - तमोदनिः क्रोधवशः अपि - तमोगुणापासून जन्मलेला व क्रोधाच्या अधीन झालेला असाही - अन्यैः दुरापं - दुसर्‍यांना मोठया संकटाने मिळणार्‍या - (तव पादरजं) आप - अशा तुझ्या पादरजाला प्राप्त झाला - यत् इच्छतः - जे पादरज इच्छिणार्‍या - संसारचक्रे भ्रमतः शरीरिणः - संसारचक्रात भ्रमण करणार्‍या प्राण्याला - मोक्षविभवः समक्षः स्यात् - मोक्षैश्वर्य प्रत्यक्ष प्राप्त होते. ॥३८॥
स्वामी ! हा नागराज तमोगुणी योनीमध्ये जन्मला असून अत्यंत्त क्रोधी आहे. असे असूनही इतरांना सर्वथैव दुर्लभ असणारे चरणरज याला प्राप्त झाले आहे. जे प्राप्त करण्याच्या केवळ इच्छेनेही संसारचक्रात पडलेल्या जीवाला साक्षात वैभवाची प्राप्ती होते. (३८)

विवरण :- कोणतेही पुण्यकर्म न करता कालियाला श्रीकृष्णाच्या दर्शनाचा कृपा-प्रसाद मिळाला, कोणत्याहि साधनाशिवाय पुण्यकर्माशिवाय ! कारण होम-हवन, जप-जाप्य करूनहि तो इतरांना मिळत नाही. इतका तो दुर्लभ. (न चक्षुषा पश्यति कश्चिदेनम् - नान्यैर्देवैः मनसा नापि वाचा ।) शिवाय कालिया अत्यंत क्रोधी, नीच योनीत जन्मलेला, तरीही त्याला कृष्णदर्शन झाले. केवढे हे भाग्य ! (३८)



( अनुष्टुप् )
नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने ।
भूतावासाय भूताय पराय परमात्मने ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् )
दिससी वस्तु रूपाने परमात्मा स्वयं असा ।
अनंता भगवंता रे तुजला प्रणिपात हा ॥ ३९ ॥

भगवते पुरुषाय महात्मने - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न पुराणपुरुष व उदार मनाचा अशा - भूतावासाय - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करणार्‍या - भूताय - व सर्वांच्या पूर्वीपासून असलेल्या - पराय परमात्मने - कारणरूप असूनही कारणातीत अशा - तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो. ॥३९॥
प्रभो ! आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत. आपण अनंत ऐश्वर्याचा ठेवा आहात. आपण सर्वांच्या ठिकाणी विराजमान असूनही अमर्याद आहात. आपण सर्व प्राणी आणि पदार्थांचे आश्रय तसेच सर्व पदर्थांच्या रूपांमध्येसुद्धा विराजमान आहात. आपण प्रकृतीच्या पलीकडील परमात्मा आहात. (३९)


ज्ञानविज्ञाननिधये ब्रह्मणेऽनन्तशक्तये ।
अगुणायाविकाराय नमस्तेऽप्राकृताय च ॥ ४० ॥
ज्ञानानुभव ठेवा तू अनंत महिमा तुझी ।
निर्गुणा ब्रह्मरूपा ते तुजला प्रणिपात हा ॥ ४० ॥

च - आणि - ज्ञानविज्ञानविधये - जाणीव व चिच्छक्ति यांचा साठा अशा - अगुणाय अविकाराय ब्रह्मणे - निर्गुण, विकाररहित व ब्रह्मरूप अशा - अप्राकृताय अनंत शक्तये - प्रकृतीपासून भिन्न व अनंत शक्ति धारण करणारा अशा - ते नमः - तुला नमस्कार असो. ॥४०॥
आपण ज्ञान विज्ञानाचा खजिना आहात. आपली शक्ति अनंत आहे. आपले स्वरूप अप्राकृत विकाररहित व निर्गुण आहे. आम्ही आपणांस नमस्कार करीत आहोत. (४०)


कालाय कालनाभाय कालावयवसाक्षिणे ।
विश्वाय तदुपद्रष्ट्रे तत्कर्त्रे विश्वहेतवे ॥ ४१ ॥
काल नी काल नाभो तू क्षण कल्पादि साक्षि तू ।
विश्वरूप तसा द्रष्टा निमित्त्ये निर्मिशी तया ॥ ४१ ॥

कालाय कालनाभाय - कालस्वरूप व कालशक्तिला आश्रयभूत अशा - कालावयवसाक्षिणे - सृष्टयादि निरनिराळ्या विशिष्ट कालत्रयाचा साक्षीभूत अशा - विश्वाय तद्रुपद्रष्टे - विश्वरूप असून जगाला उपदेश देणार्‍या - तत्कर्त्रे विश्वहेतवे (ते नमः) - जगत्कर्ता व जगाला कारणीभूत अशा तुला नमस्कार असो. ॥४१॥
आपण प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न करणारे काल आहात. कालशक्तीने आश्रय करणारे आहत. कालशक्तीचे आश्रय आहात आणि कालाच्या क्षण, कल्प इत्यादि सर्व अवयवांचे साक्षी आहात. आपण विश्वरूप असूनही त्यापासून वेगळे असे त्याचे द्रष्टे आहात. आपण ते विश्व बनविणारे निमित्तकारण व त्याच्या रूपात बनणारे उपादानकारण सुद्धा आहात. (४१)


भूतमात्रेन्द्रियप्राण मनोबुद्ध्याशयात्मने ।
त्रिगुणेनाभिमानेन गूढस्वात्मानुभूतये ॥ ४२ ॥
पंचभूत नि तन्मात्रा ठेवा तू मन बुद्धिचा ।
त्रैगुणी अभिमानाने साक्षात्कारासि झाकिशी ॥ ४२ ॥

भूतमात्रेंद्रिय - सूक्ष्मभूते, इंद्रिये, - प्राणमनोबुद्ध्‌याशयात्मने - प्राण, मन, बुद्धी , चित्त इत्यादि आहे स्वरूप ज्याचे अशा - त्रिगुणेन अभिमानेन - त्रिगुणात्मक अभिमानाने - गूढस्वात्मानुभूतये - झाकून टाकिला आहे स्वतःचे अंशभूत जे जीव त्यांचा आत्मानुभव ज्याने अशा तुला. ॥४२॥
प्रभो ! पंचमहाभूते, त्यांच्या तन्मात्रा, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी आणि चित्त आपणच आहात. तिन्ही गुण आणि त्यांच्या कार्यरूप अभिमानाच्या योगाने आपण आपल्या साक्षात्काराला झाकून ठेवले आहे. (४२)


नमोऽनन्ताय सूक्ष्माय कूटस्थाय विपश्चिते ।
नानावादानुरोधाय वाच्यवाचक शक्तये ॥ ४३ ॥
अनंत सूक्ष्म सर्वज्ञा अज्ञ ते रूप नेणती ।
शब्दांनी सांधिशी शक्ती तुजला प्रणिपात हा ॥ ४३ ॥

अनंताय सूक्ष्माय - ज्याचा अंत नाही व जो अत्यंत सूक्ष्म आहे अशा - कूटस्थाय विपश्चिते - अविकार्यस्वरूपी व सर्वज्ञ अशा - नानावादानुरोधाय - अनेक अस्तिनास्ति इत्यादि वादांना अनुसरणारा - वाच्यवाचकशक्तये (ते) नमः - व वाच्य आणि वाचक अशा भेदांनी भासणारा अशा तुला नमस्कार असो. ॥४३॥
आपण अनंत, सूक्ष्म, विकाररहित आणि सर्वज्ञ आहात. शास्त्रांच्या मतभेदानुसार आपण तसतसे होत असता. शब्द व अर्थ यांचा संबंध जोडणारी शक्ती आपणच आहात. आम्ही आपणांस नमस्कार करीत आहोत. (४३)


नमः प्रमाणमूलाय कवये शास्त्रयोनये ।
प्रवृत्ताय निवृत्ताय निगमाय नमो नमः ॥ ४४ ॥
प्रमाणमूलको तूची शास्त्राचे ज्ञान तू स्वता ।
वृत्तींचा वेदही तूची तुजला प्रणिपात हा ॥ ४४ ॥

प्रमाणमूलाय - नेत्र आदिकरून ज्ञानसाधनाचेही मूळ अशा - कवये - ज्ञानी अशा - शास्त्रयोनये - शास्त्रांचे उत्पत्तिस्थान अशा - प्रवृत्ताय निवृत्ताय - विधि व निषेध या रूपांनी भासणारा अशा - निगमाय (ते) नमोनमः - वेदस्वरूपी तुला नमस्कार असो. ॥४४॥
प्रत्यक्ष, अनुमान इत्यादि जितकी म्हणून प्रमाणे आहेत, त्या प्रमाणांचे मूळ आपणच आहात. आपण सर्वज्ञ असून सर्व शास्त्रे आपल्यापासूनच निघाली आहेत. प्रवृत्तिमार्ग आणि निवृत्तिमार्ग व या दोघांचे मूल वेदसुद्धा आपणच आहात. आम्ही आपणांस वारंवार नमस्कार करीत आहोत. (४४)


नमः कृष्णाय रामाय वसुदेवसुताय च ।
प्रद्युम्नायानिरुद्धाय सात्वतां पतये नमः ॥ ४५ ॥
कृष्ण तू राम तू तैसा वासुदेवहि तूच की ।
यादवोस्वामि तू सत्व तुजला प्रणिपात हा ॥ ४५ ॥

च रामाय वसुदेवसुताय - आणि संकर्षण व वसुदेवाचा मुलगा अशा - कृष्णाय नमः - कृष्णाला नमस्कार असो - सात्वतां पतये - उपासकांचा स्वामी - प्रद्युम्नाय अनिरुद्धाय - अशा प्रद्युम्न व अनिरुद्धस्वरूपी तुला - नमः - नमस्कार असो. ॥४५॥
आपण वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्यूहाच्या रूपामध्ये असलेले भक्तांचे व यादवांचे स्वामी श्रीकृष्ण आहात. आम्ही आपणांस नमस्कार करीत आहोत. (४५)


नमो गुणप्रदीपाय गुणात्मच्छादनाय च ।
गुणवृत्त्युपलक्ष्याय गुणद्रष्टे स्वसंविदे ॥ ४६ ॥
वृत्तिप्रकाश ज्योति तू नेणेचि झाकिशी रुपा ।
गुणसाक्षी स्वयंतेजा तुजला प्रणिपात हा ॥ ४६ ॥

गुणप्रदीपाय - अंतःकरणादि इंद्रियरूपी गुणांचे विकार त्यांना प्रकाशित करणार्‍या - गुणात्मच्छादनाय च - आणि त्याच गुणांनी आत्म्याला झाकून टाकणार्‍या - गुणवृत्युपलक्ष्याय गुणद्रष्ट्रे - चित्तादिक गुणांच्या विषयांनी दिसणार्‍या व गुणांना साक्षीभूत अशा - स्वसंविदे नमः - केवळ अनुभवानेच ज्याचे ज्ञान होऊ शकते अशा तुला नमस्कार असो. ॥४६॥
आपण त्रिगुणांचे प्रकाशक असून त्यांच्याद्वारा स्वतःला झाकूनही ठेवता. गुणवृत्तींमुळेच आपले थोडेसे ज्ञान होते. आपण ते गुण आणि त्यांच्या वृत्तींचे साक्षी असून स्वयंप्रकाश आहात. आम्ही आपणांस नमस्कार करीत आहोत. (४६)


अव्याकृतविहाराय सर्वव्याकृतसिद्धये ।
हृषीकेश नमस्तेऽस्तु मुनये मौनशीलिने ॥ ४७ ॥
अव्यक्ती रमशी नित्य तुझ्याने सृष्टि ही घडे ।
हृषीकेशा मुनीमौना तुजला प्रणिपात हा ॥ ४७ ॥

अव्याकृतविहाराय - ज्याचा महिमा अतर्क्य आहे अशा - सर्वव्याकृतसिद्धये - व सर्व कार्ये सिद्ध होण्यास कारणीभूत अशा - मौनशीलिने मुनये ते - मौन धारण करणे हा स्वभाव असणार्‍या मुनिस्वरूप अशा - हृषीकेश ते नमः अस्तु - हे इंद्रियाच्या स्वामी कृष्णा, तुला नमस्कार असो. ॥४७॥
आपण मूळ प्रकृतीमध्ये विहार करीत असता. सर्व जग आपल्यापासूनच प्रगट होते. हे हृषीकेशा ! मौन हा स्वभाव असलेले आपण मुनी आहात. आपणांस आमचा नमस्कार असो ! (४७)


परावरगतिज्ञाय सर्वाध्यक्षाय ते नमः ।
अविश्वाय च विश्वाय तद्द्रष्टेऽस्य च हेतवे ॥ ४८ ॥
गतिंचा साक्षि तू होशी निषेध विश्वरूप तू ।
कारणो भ्रांति ज्ञानाचा तुजला प्रणिपात हा ॥ ४८ ॥

परावरगतिज्ञाय सर्वाध्यक्षाय - स्थूल व सूक्ष्म गति जाणणार्‍या व सर्वांचा अधिष्ठाता अशा - अविश्वाय विश्वाय च - विश्वतैजसादि अवस्थाविरहित व विश्वाचा अधिष्ठाता अशा - तद्‌द्रष्ट्रे - आणि त्या विश्वतैजसादि अवस्थांचा साक्षी अशा - अस्य च - ह्या विश्वाचा भास व त्याचे निराकरण ही ज्या अविद्या व विद्या यांच्या योगाने होतात - हेतवे - त्या विद्या व अविद्या ह्यांचे कारण अशा - ते नमः - तुला नमस्कार असो. ॥४८॥
आपण स्थूल सूक्ष्म अशा सर्व गतींना जाणणारे तसेच सर्वांचे साक्षी आहात. आपण नामरूपात्मक विश्व नसून अधिष्ठानदृष्ट्या विश्वरूपसुद्धा आहात. आपण विश्वाचे साक्षी व त्याचे कारणही आहात. आपल्याला आमचा नमस्कार असो. (४८)


( मिश्र )
त्वं ह्यस्य जन्मस्थितिसंयमान् प्रभो
     गुणैरनीहोऽकृत कालशक्तिधृक् ।
तत्तत् स्वभावान् प्रतिबोधयन् सतः
     समीक्षयामोघविहार ईहसे ॥ ४९ ॥
( इंद्रवज्रा )
कर्ता न तू नी नच कर्म तूं ते
     कालेचि तूं निर्मिसि मोडितोस ।
तू सत्य संकल्प नि दावि लीला
     जीवस्वभावा तुचि जागवीसी ॥ ४९ ॥

प्रभो - हे समर्था श्रीकृष्णा - अनीहः कालशक्तिधृक् - निरिच्छ व अनादि अशा कालशक्तीला धारण करणारा असा तू - गुणैः - सत्त्वादिक त्रिगुणांनी - अस्य - ह्या जगाची - जन्मस्थितिसंयमान् अकृत - उत्पत्ति, पालन व संहार हे करिता झालास - सतः - बीजरूपाने असलेल्या - तत्तत्स्वभावान् प्रतिबोधयन् - त्या त्या घोरादिक स्वभावांना जागृत करणारा - अमोघविहारः ईहसे - ज्याची क्रीडा निष्फळ नाही असा तू क्रीडा करितोस.॥४९॥
प्रभो ! आपण स्वतः कर्म करीत नाही, तरी सुद्धा कालशक्ति व प्रकृतीच्या गुणांच्या द्वारा आपण या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करता; आपण सत्यसंकल्प आहात; आपण जीवांच्या संस्काररूपात असलेल्या स्वभावांना आपल्या दृष्टिक्षेपाने जागृत करून विश्वाची लीला करता. (४९)


( इंद्रवंशा )
तस्यैव तेऽमूस्तनवस्त्रिलोक्यां
     शान्ता अशान्ता उत मूढयोनयः ।
शान्ताः प्रियास्ते ह्यधुनावितुं सतां
     स्थातुश्च ते धर्मपरीप्सयेहतः ॥ ५० ॥
त्रिलोकिच्या त्या त्रय योनि होती
     त्या सर्व लीला तव मूर्ति होती ।
रक्षावया साधु जनास घेसी
     सत्वप्रधानी रुप प्रीय ऐसे ॥ ५० ॥

तस्य एव ते - अशाप्रकारची तुझीच - अमूः - ही - शान्ताः अशान्ताः उत मूढयोनयः - शान्त व क्रूर आणि अज्ञानी अशी - तनवः - स्वरूपे - त्रिलोक्यां (सन्ति) - त्रैलोक्यात आहेत - अधुना - सांप्रत - हि - खरोखर - सतां अवितुं स्थातुः - साधुंचे रक्षण करण्यासाठी प्रवृत्त झालेल्या - च - आणि - धर्मपरीप्सया इर्हतः - धर्माचे रक्षण करण्याच्या इच्छेने झटणार्‍या - ते तनवः - तुझी स्वरूपे - शान्ताः प्रियाः च (सन्ति) - शांत व प्रिय अशी आहेत. ॥५०॥
त्रैलोक्यामधील सत्त्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी प्राणी या आपल्याच लीलामूर्ती आहेत. तरीसुद्धा यावेळी आपल्याला सत्त्वगुणी जनच प्रिय आहेत. कारण आपला हा अवतार आणि या लीला साधुजनांचे पालन तसेच धर्माचे रक्षण आणि विस्तार यासाठीच आहे. (५०)

विवरण :- कालियाच्या स्त्रिया कृष्णाला वंदन करताना म्हणतात, तू सर्व विश्वाला व्यापून राहिल्याने अनंत आहेस, परंतु अदृश्य असल्याने सूक्ष्महि आहेस. विकाररहित, सर्वज्ञ आहेस. ज्ञान-विज्ञानाचा ठेवा तुझ्या ठायी आहे. तू अनंत शक्ती, सर्व जगाचा निर्माता आहेस. पंचमहाभूते, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, त्रिगुण, मन, प्राण, बुद्धी, प्रवृत्ति (विश्वाची उत्पत्ति) आणि निवृत्ति (विश्वाचा लय), शास्त्रे आणि इतर सर्वच शास्त्रे तू निर्माण केली आहेस. वेदहि तुझ्यापासून निर्माण झाले. (एतस्य महतो भूतस्य निश्वसितमेतद्य दृग्वेद । ऋचस्सामानि जज्ञिरे, छंदांसि जज्ञिरे, तस्मात् यजुस्तस्मादजायत ।) अज्ञानाने आमच्याकडून चुका झाल्या. ज्ञान देणे हा तुझा स्वभाव. त्यामुळे आम्हांस उपदेश कर. (४०-५०)



( अनुष्टुप् )
अपराधः सकृद् भर्त्रा सोढव्यः स्वप्रजाकृतः ।
क्षन्तुमर्हसि शान्तात्मम् मूढस्य त्वामजानतः ॥ ५१ ॥
( अनुष्टुप् )
एकदा अपराधाते क्षमावे तुम्हि याजला ।
स्वामी हा मूढ बुद्धीने नोळखी रूप हे तुझे ॥ ५१ ॥

सकृत् - एकवार - भर्त्रा (त्वया) - स्वामी अशा तुझ्याकडून - स्वप्रजाकृतः अपराधः - तुझे मूलच अशा या कालियाने केलेला अपराध - सोढव्यः - सहन केला जावा - शांतात्मन् - हे शांत स्वभावाच्या भगवंता - त्वां अजानतः मूढस्य - तुला न जाणणार्‍या मूर्खाला - क्षंतुम् अर्हसि - क्षमा करण्यास तू योग्य आहेस. ॥५१॥
हे शांतस्वरूपा ! स्वामींनी प्रथमच केलेला आपल्या प्रजेचा अपराध सहन करावा. हा अज्ञानी असून आपल्याला ओळखत नाही. म्हणून आपण याला क्षमा करावी. (५१)


अनुगृह्णीष्व भगवन् प्राणांस्त्यजति पन्नगः ।
स्त्रीणां नः साधुशोच्यानां पतिः प्राणः प्रदीयताम् ॥ ५२ ॥
मरतो सर्प हा आज दयावंत तुम्ही असे ।
कृपया पतिदेवाला जिवंत सोडणे प्रभो ॥ ५२ ॥

भगवन् अनुगृह्‌णीष्व - हे भगवंता कृपा कर - पन्नगः प्राणान् त्यजति - हा कालिय सर्प प्राण सोडीत आहे - साधुशोच्यानां नः स्त्रीणां - साधूंनाही ज्यांची करुणा यावी अशा आम्हा स्त्रियांचा - प्राणः पतिः (त्वया) प्रदीयताम् - प्राणच असा पति तू अर्पण कर. ॥५२॥
भगवन् ! कृपा करा. आता हा सर्प मरणाच्या दारी आहे. साधुपुरुष अबलांवर दया करीत असतात. म्हणून आपण आमच्या प्राणस्वरूप पतिदेवांना, आम्हांला परत द्या. (५२)


विधेहि ते किङ्‌करीणां अनुष्ठेयं तवाज्ञया ।
यच्छ्रद्धयानुतिष्ठन् वै मुच्यते सर्वतो भयात् ॥ ५३ ॥
दासी आम्ही तुझ्या देवा सेवा आज्ञापिणे अम्हा ।
श्रद्धेने करिता सेवा सारेचि भय संपते ॥ ५३ ॥

तव आज्ञया - तुझ्या आज्ञेने - ते किंकरिणां (नः यत्) अनुष्ठेयं (तत्) - तुझ्या दासी अशा आम्हांस जे करणे इष्ट आहे ते - विधेहि - सांग - यत् - कारण - श्रद्धया अनुतिष्ठन् - श्रद्धेने त्वत्प्रीत्यर्थ कर्म करणारा - सर्वतोभयात् - सर्व भयांपासून - वै मुच्यते - खरोखर मुक्त होतो. ॥५३॥
आम्ही आपल्या दासी आहोत. आम्ही काय करावे याविषयी आपण आम्हांला आज्ञा करावी. कारण जो श्रद्धेने आपल्या आज्ञांचे पालन करतो, त्याची सर्व प्रकारच्या भयांपासून सुटका होते. (५३)


श्रीशुक उवाच -
इत्थं स नागपत्‍नीभिः भगवान् समभिष्टुतः ।
मूर्च्छितं भग्नशिरसं विससर्जाङ्‌घ्रिकुट्टनैः ॥ ५४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णाच्या पदप्रहारे छिन्नले फण सर्व ते ।
मूर्च्छीत सोडिला त्याला पत्‍न्यांनी स्तविता असे ॥ ५४ ॥

इत्थं - याप्रमाणे - नागपत्‍नीभिः अभिष्टुतः - नागपत्‍न्यांनी स्तविलेला - सः भगवान् - तो षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - भग्नशिरसं मूर्च्छितं - ज्याची मस्तके छिन्न झाली आहेत अशा कालियाला - अङ्‌घ्रिकुटटनैः विससर्ज - पायांनी तुडविण्याचे थांबविता झाला. ॥५४॥
श्रीशुक म्हणतात - भगवंतांनी केलेल्या लत्ता प्रहारांनी फणा घायाळ होऊन तो नाग बेशुद्ध झाला होता. नागपत्‍न्यांनी अशी स्तुती केली, तेव्हा त्यांनी त्याला दयाबुद्धीने सोडून दिले. (५४)


प्रतिलब्धेन्द्रियप्राणः कालियः शनकैर्हरिम् ।
कृच्छ्रात् समुच्छ्वसन् दीनः कृष्णं प्राह कृताञ्जलिः ॥ ५५ ॥
निवांत सर्पदेहात चेतना पातली पुन्हा ।
कठीण श्वास घेवोनि हात जोडोनि बोलला ॥ ५५ ॥

प्रतिलब्धेन्द्रियप्राणः - प्राप्त झाले आहे इंद्रियात चैतन्य ज्याच्या असा - शनकैः कृच्छ्‌रात् समुच्छ्‌वसन् - हळूहळू मोठया कष्टाने श्वासोच्छवास टाकणारा असा - दीनः (सः) कालियः - अत्यंत केविलवाणा असा तो कालिय - कृताञ्जलिः (सन्) - हात जोडलेला असा होऊन - हरिं कृष्णं प्राह - सर्वांच्या दुःखे हरण करणार्‍या कृष्णाला म्हणाला. ॥५५॥
कालियाची इंद्रिये आणि प्राण यांमध्ये हळू हळू चेतना आली. अतिशय कष्टाने तो श्वासोच्छ्वास करू लागला आणि थोड्या वेळानंतर अतिशय दयेने हात जोडून तो श्रीकृष्णांना म्हणाला - (५५)


कालिय उवाच -
वयं खलाः सहोत्पत्त्या तमसा दीर्घमन्यवः ।
स्वभावो दुस्त्यजो नाथ लोकानां यदसद्‍ग्रहः ॥ ५६ ॥
कालिया सर्प म्हणाला -
जन्मता आम्ही तो दुष्ट क्रोधी नी डुख धारक ।
जीवांचा न सुटे भाव लोक ते फसती तये ॥ ५६ ॥

नाथ - हे श्रीकृष्णा - वयं उत्पत्त्या सह - आम्ही जन्मतःच - खलाः तामसाः दीर्घमन्यवः (स्मः) - दुष्ट, तामसी व अति रागीट असे आहो - यत् - कारण - लोकानां असद्‌ग्रहः स्वभावः - प्राण्यांचा दुष्टबुद्धीरूप स्वभाव - दुस्त्यजः - टाकण्यास कठीण असतो. ॥५६॥
कालिया म्हणाला - नाथ ! आम्ही जन्मतःच दुष्ट, तमोगुणी आणि दीर्घद्वेषी आहोत. आपला स्वभाव सोडणे जीवांना अतिशय कठीण आहे; म्हणूनच तर लोकांना जन्मांतरीच्या स्वभावामुळे मिथ्या प्रपंचाविषयी आसक्ति वाटते. (५६)

विवरण :- कालिया-पत्नींनी आपल्या पतीस जीवदान देण्याची कृष्णाला प्रार्थना केली. कृष्णाने त्यास अभय दिले. तेव्हा पश्चात्ताप झालेला तो नाग म्हणाला, आम्ही नीच जातीचे, अहंकारी, शीघ्रकोपी, दीर्घद्वेषी आणि परपीडा करणारे आहोत. आमच्या स्वभावाने गायी-गुरे, अनेक पशु-पक्षी, वृक्ष-वेली नष्ट झाले. आमचा स्वभाव नाहीसा होणे कठीण. (स्वभावो दुरतिक्रमः) पण तुझी कृपा झाली, तर तेही अशक्य नाही. तेव्हा तुला जसे योग्य वाटेल तसे कर. (५६)



त्वया सृष्टमिदं विश्वं धातर्गुणविसर्जनम् ।
नानास्वभाववीर्यौजो योनिबीजाशयाकृति ॥ ५७ ॥
विधाता सृष्टिचा तूची स्वभाव बल तेज नी ।
योनी बीज तसे चित्त आकृती तूचि निर्मिल्या ॥ ५७ ॥

धातः - हे विश्वकर्त्या - गुणविसर्जनं - तीन गुणांमुळे नानाप्रकारे उत्पन्न होणारे - नानास्वभाव - विविध असे स्वभाव, - विर्यौजोयोनिबीजाशयाकृति - पराक्रम, तेज, जाति व बीजे, मने व आकृति आहेत ज्यात असे - इदं विश्वं - हे जग - त्वया सृष्टं - तू निर्माण केलेस. ॥५७॥
हे विश्वविधात्या ! आपणच गुणांच्या भेदानुसार हा जगात अनेक प्रकारचे स्वभाव, सामर्थ्य, बल, योनी, बीज, चित्त आणि आकृती निर्माण केल्या आहेत. (५७)

विवरण :- 'विष्णुः प्रधानतः स्रष्टः गुणस्रष्टः चतुर्मुखः ।' ब्रह्मा सृष्टि निर्माता असला तरी मुख्य सृष्टी विष्णूचीच. प्रत्येक वस्तूमध्ये अंगभूत गुणहि विष्णूमुळेच झाले. (५७)



वयं च तत्र भगवन् सर्पा जात्युरुमन्यवः ।
कथं त्यजामस्त्वन्मायां दुस्त्यजां मोहिताः स्वयम् ॥ ५८ ॥
तुझ्याच सृष्टिचे आम्ही जन्मता क्रोधि हो बहू ।
मायेने मोहिलो सर्व त्यागिणे नच शक्य ती ॥ ५८ ॥

भगवन् - हे श्रीकृष्णा - तत्र च - त्यातही - वयम् सर्पाः - आम्ही सर्प - जात्युरुमन्यवः स्मः - जन्मतः अतिशय रागीट आहो - मोहिताः (वयं) - मोहित झालेले असे आम्ही - दुस्त्यजां त्वन्मायां - टाकण्यास कठीण अशा तुझ्या मायेला - स्वयं कथं त्यजामः - आपण होऊनच कसे टाकू. ॥५८॥
भगवन् ! आपल्याच सृष्टीमधील जन्मतःच अतिशय रागीट असे आम्ही सर्प आहोत. आपल्या त्याग करण्यास कठीण अशा मायेने मोहित झालेले आम्ही स्वप्रयत्‍नांनी या मायेचा त्याग कसा करू शकू ? (५९)


भवान् हि कारणं तत्र सर्वज्ञो जगदीश्वरः ।
अनुग्रहं निग्रहं वा मन्यसे तद् विधेहि नः ॥ ५९ ॥
मायेने भाव हा ऐसा सर्वज्ञ जगदीश्वरा ।
इच्छा जी करणे तैसे कृपा वा दंड दे मला ॥ ५९ ॥

सर्वज्ञः जगदीश्वरः - सर्वज्ञ व जगाचा स्वामी असा - भगवान् - तूच - तत्र कारणम् अस्ति - याला कारण आहेस - नः - आम्हाला - अनुग्रहं निग्रहं वा - कृपा किंवा दंड - (यत्) मन्यसे - जे तुला वाटेल - तत् विधेहि - ते कर. ॥५९॥
सर्वज्ञ आणि संपूर्ण जगाचे स्वामी असे आपणच या सर्वाला कारणीभूत आहात. म्हणून आता आपण आपल्याला योग्य वाटेल, त्याप्रमाणे कृपा करा किंवा दंड द्या. (५९)


श्रीशुक उवाच -
इत्याकर्ण्य वचः प्राह भगवान् कार्यमानुषः ।
नात्र स्थेयं त्वया सर्प समुद्रं याहि मा चिरम् ।
स्वज्ञात्यपत्यदाराढ्यो गोनृभिर्भुज्यतां नदी ॥ ६० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
लीलाधर असे बोल ऐकता बोलला तया ।
न राही येथ तू जायी सकुटुंब समुद्रि त्या ।
आता गाई मनुष्यांना मिळेल जल शुद्ध हे ॥ ६० ॥

इति कालियस्य वचः आकर्ण्य - हे कालीयाचे भाषण ऐकून - कार्यमानुषः भगवान् - कार्यांसाठी मनुष्य झालेला असा श्रीकृष्ण - प्राह - बोलला - सर्प - हे सर्पा - अत्र त्वया न स्थेयं - या ठिकाणी त्वा राहू नये - स्वज्ञात्यापत्यदाराढयः - आपले जातिबांधव, मुले व स्त्रिया यांसह - समुद्रं याहि - समुद्रात जा - मा चिरं - विलंब करू नको - नदी गोनृभिः भुज्यते - ही नदी गाई व मनुष्ये यांच्याकडून सेविली जात आहे. ॥६०॥
श्रीशुक म्हणतात - कालिया नागाची प्रार्थना ऐकून कार्यासाठी मनुष्य झालेले भगवान म्हणाले, "सर्पा ! आता तू इथे राहू नकोस. तू आपले नातलग, पुत्र आणि स्त्रियांसह ताबडतोब येथून समुद्रात निघून जा. आता गाई आणि माणसे यमुनेच्या पाण्याचा उपभोग घेऊ देत." (६०)


य एतत् संस्मरेन् मर्त्यः तुभ्यं मदनुशासनम् ।
कीर्तयन् उभयोः सन्ध्योः न युष्मद् भयमाप्नुयात् ॥ ६१ ॥
स्मरणी कीर्तनी गाता आज्ञा ही नी कथानका ।
सर्पाचे भय ना त्यांना कधीच घडते पहा ॥ ६१ ॥

यः मर्त्यः - जो मनुष्य - एतत् तुभ्यं मदनुशासनं - हे तुला मी केलेले शासन - उभयोः संध्योः कीर्तयन् - दोन्ही संध्यांच्या वेळी वर्णन करीत - संस्मरेत् - स्मरण करेल - यष्मद्‌भयं न आप्नुयात् - तुमच्यापासून भीतीला प्राप्त होणार नाही. ॥६१॥
तुला दिलेल्या माझ्या या आज्ञेचे जो मनुष्य दोन्ही वेळेला स्मरण आणि पठण करील, त्याला सर्पांपासून कधीही भय असणार नाही. (६१)


योऽस्मिन् स्नात्वा मदाक्रीडे देवादीन् तर्पयेज्जलैः ।
उपोष्य मां स्मरन्नर्चेत् सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ६२ ॥
क्रीडलो कालिया डोही इथे स्नानादि तर्पणे ।
तसे पूजा उपवासे स्मरता पाप नासते ॥ ६२ ॥

आस्मिन् मदाक्रीडे स्नात्वा - मी क्रीडा केलेल्या या जलात स्नान करून - यः जलैः देवादीन् तर्पयेत् - जो येथील उदकांनी देवादिकांचे तर्पण करील - च - आणि - उपोष्य मां स्मरन् अर्चेत् - उपाशी राहून माझे स्मरण करीत माझी पूजा करील - सर्वपापैः प्रमुच्यते - सर्व पापांपासून मुक्त होईल. ॥६२॥
जो मनुष्य या माझ्या क्रीडास्थानात स्नान करून पाण्याने देव आणि पितरांचे तर्पणा करील, तसेच उपवास करून माझे स्मरण करीत माझी पूजा करील, तो सर्व पापांपासून मुक्त होईल. (६२)


द्वीपं रमणकं हित्वा ह्रदमेतमुपाश्रितः ।
यद् भयात्स सुपर्णस्त्वां नाद्यान्मत्पाद लाञ्छितम् ॥ ६३ ॥
रमणक् द्वीप सोडोनी इथे तू गरुडीभये ।
पातला जाणितो मी नी आता ना तुज त्रास तो ॥ ६३ ॥

रमणकं द्वीपं हित्वा - रमणक नावाचे द्वीप सोडून - यद्‌भयात् - ज्याच्या भयामुळे - एतत् हृदं (त्वं) उपाश्रितः - ह्या डोहाचा तू आश्रय केलास - सः सुपर्णः - तो गरुड - मत्पादलाञ्छितं त्वां - माझ्या चरणकमलांनी चिन्हीत अशा तुला - न अद्यात् - खाणार नाही. ॥६३॥
ज्याच्या भितीने रमणक द्वीप सोडून तू या डोहामध्ये येऊन राहिला आहेत, तो गरुड आता तुझे शरीर माझ्या चरणचिन्हांनी अंकित झालेले पाहून तुला खाणार नाही. (६३)


श्रीऋषिरुवाच -
एवमुक्तो भगवता कृष्णेनाद्‌भुतकर्मणा ।
तं पूजयामास मुदा नागपत्‍न्यश्च सादरम् ॥ ६४ ॥
अद्‌भूत कृष्णलीला या कृष्णाची गोष्ट मानुनी ।
आनंदे पूजिले कृष्णा कालियाने सपत्‍निक ॥ ६४ ॥

अद्‌भुतकर्मणा भगवता कृष्णेन - आश्चर्यकारक कृत्ये करणार्‍या भगवान श्रीकृष्णाने - एवं उक्तः (कालियः) - याप्रमाणे सांगितला गेलेला तो कालिय - नागपत्‍न्यः च - आणि त्याच्या स्त्रिया - तं मुदा सादरम् पूजयामास - त्याला आनंदाने आदरपूर्वक पूजित्या झाल्या. ॥६४॥
श्रीशुक म्हणतात - अद्‍भुत लीला करणार्‍या भगवान श्रीकृष्णांनी अशी आज्ञा केली, तेव्हा कालिया नाग आणि त्याच्या पत्‍न्यांनी अतिशय आनंदाने व मोठ्या आदराने त्यांची पूजा केली. (६४)


दिव्याम्बरस्रङ्‌ मणिभिः परार्ध्यैरपि भूषणैः ।
दिव्यगन्धानुलेपैश्च महत्योत्पलमालया ॥ ६५ ॥
दिव्य मालांबरे रत्‍ने गंध चंदन भूषणे ।
कमळे पुजिले स्वामी कृष्ण श्री गरुडध्वज ॥ ६५ ॥

दिव्यांबरस्रग्मणिभिः - उत्तम वस्त्रे, माळा व रत्‍ने यांनी - परार्ध्यैः भूषणैः अपि - अत्यंत मूल्यवान अशा अलंकारांनीही - दिव्यगंधानुलेपनैः च - आणि उत्तम सुवासिक गंधांच्या उटयांनी - महत्या उत्पलमालया - तसेच मोठमोठया कमळांच्या माळांनी. ॥६५॥
त्यांनी दिव्य वस्त्र, पुष्पमाळा, रत्‍ने, बहुमूल्य अलंकार, दिव्य गंध, उटणे आणि अति उत्तम कमळपुष्पांच्या हाराने, (६५)


पूजयित्वा जगन्नाथं प्रसाद्य गरुडध्वजम् ।
ततः प्रीतोऽभ्यनुज्ञातः परिक्रम्याभिवन्द्य तम् ॥ ६६ ॥
केले प्रसन्न त्याला नी केली त्यासी परीक्रमा ।
वंदिता घेतली आज्ञा पुत्र बंधू नि पत्‍निच्या ॥ ६६ ॥

जगन्नाथं पूजयित्वा - जगाचा स्वामी जो श्रीकृष्ण त्याला पूजून - गरुढध्वजं प्रसाद्य - गरुडवाहन अशा परमेश्वराला प्रसन्न करून - ततः प्रीतः - नंतर संतुष्ट झालेला असा - अभ्यनुज्ञातः (सः) - कृष्णाची आज्ञा घेतलेला तो सर्प - तं परिक्रम्य अभिवंद्य च - कृष्णाला प्रदक्षिणा करून व त्याला नमस्कार करून - सकलत्रसुहृत्पुत्रः - आपल्या स्त्रिया, इष्टमित्र व पुत्र यांसह - अब्धेः द्वीपं - समुद्रातील द्वीपामध्ये - जगाम ह - गेला. ॥६६॥
जगताचे स्वामी असलेल्या गरुडध्वज भगवंतांचे पूजन करून त्यांना प्रसन्न केले. यानंतर अतिशय प्रेमाने त्यांना प्रदक्षिणा घातली, वंदन केले आणि त्यांची अनुमती घेतली. (५५)


सकलत्रसुहृत्पुत्रो द्वीपमब्धेर्जगाम ह ।
तदैव सामृतजला यमुना निर्विषाभवत् ।
अनुग्रहाद् भगवतः क्रीडामानुषरूपिणः ॥ ६७ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
सवे तो रमणक् द्वीपी निघाला सागराकडे ।
यमुना जळ ते कृष्णे केले शुद्ध न केवलो ।
अमृतापरि ते गोड कृपेने निर्मिले असे ॥ ६७ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

तदा - त्याच वेळेस - सा यमुना - ती यमुना नदी - क्रीडामानुषरूपिणः - लीलेने मनुष्यरूप धारण करणार्‍या - भगवतः अनुग्रहात् - भगवंताच्या कृपेने - अमृतजला - अमृताप्रमाणे आहे जल जिचे अशी - निर्विषा (च) अभवत् - व विषरहित अशी झाली. ॥६७॥
त्यानंतर समुद्रात सर्पांना राहण्याचे जे एक ठिकाण आहे, त्या रमणक द्वीपाकडे त्याने आपल्या पत्‍न्या, पुत्र आणि बांधवांसह, प्रयाण केले. लीलामनुष्य भगवन श्रीकृष्णांच्या कृपेने त्याच वेळी यमुनेचे पाणी केवळ विषविरहितच नव्हे तर अमृताप्रमाणे मधुर झाले. (६७)


अध्याय सोळावा समाप्त

GO TOP