श्रीमद् भागवत पुराण
सप्तमः स्कंधः
षष्ठोऽध्यायः

दैत्यबालकेभ्यः प्रह्रादस्य उपदेशः -

प्रल्हादाचा असूर-बालकांना उपदेश -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


प्रह्राद उवाच -
(अनुष्टुप्)
कौमार आचरेत्प्राज्ञो धर्मान् भागवतानिह ।
दुर्लभं मानुषं जन्म तदप्यध्रुवमर्थदम् ॥ १ ॥
प्रल्हाद म्हणाला -
(अनुष्टुप्‌)
दुर्लभो माणुसी जन्म येणे श्रीहरी लाभतो ।
क्षणात संपते आयू विसंबा न जरेस त्या ।
चतुरे कळते तेंव्हा पासूनी हरि पूजिणे ॥१॥

प्राज्ञः - समंजस मनुष्याने - इह - ह्या मनुष्यजन्मी - कौ‌मारे - बालपणी - भागवतान् - भगवंताला प्रिय असे - धर्मान् - धर्म - आचरेत् - आचरावे - मानुषं जन्म - मनुष्याचा जन्म - दुर्लभः - दुर्लभ - तत् अपि अर्थदं - पुरुषार्थ प्राप्त करून देणारा मनुष्यजन्म तर - अध्रुवं - अनिश्चित ॥ १ ॥
प्रल्हाद म्हणाला – या जगात मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. तो परमात्म्याची प्राप्ती करून देणारा, परंतु केव्हाही नाहीसा होणारा आहे. म्हणून शहाण्याने लहानपणीच भगवंतांची प्राप्ती करून देणार्‍या साधनांचे अनुष्ठान केले पाहिजे. (१)


यथा हि पुरुषस्येह विष्णोः पादोपसर्पणम् ।
यदेष सर्वभूतानां प्रिय आत्मेश्वरः सुहृत् ॥ २ ॥
श्रीहरीचरणी भक्ती साफल्य एकची जिवां ।
समस्ता स्वामि तो एक सुहृद्‌ आत्मा सखाहि तो ॥२॥

यथा हि - जेणे करून खरोखर - इह - ह्या लोकी - पुरुषस्य विष्णोः - भगवान विष्णूची - पादोपसर्पणं - चरणसेवा - यत् - कारण - एषः - हा - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांचा - प्रियः - आवडता - आत्मा - आत्मा - सुहृद् - मित्र - ईश्वरः (अस्ति) - ईश्वर होय. ॥ २ ॥
या मनुष्य-जन्मात भगवंतांच्या चरणांना शरण जाणे एवढीच जीवनाची सफलता आहे; कारण भगवंत सर्व प्राण्यांचे स्वामी, सुहृद, प्रियतम आणि आत्मा आहेत. (२)


सुखं ऐन्द्रियकं दैत्या देहयोगेन देहिनाम् ।
सर्वत्र लभ्यते दैवाद् यथा दुःखमयत्‍नतः ॥ ३ ॥
ज्या योनीसी असे जीव तेथले भोगितो सुख ।
प्रारब्धे ते मिळे दुःख अनायासे न ते चुके ॥३॥

दैत्याः - हे दैत्य हो - देहिनां - प्राण्यांना - ऐंद्रियकं - इंद्रियासंबंधी - सुखं - सुख - देहयोगेन - देहाच्या योगाने - अयत्नतः - यत्नावाचून - दैवात् - दैवयोगाने - सर्वत्र - सर्व ठिकाणी - लभ्यते - प्राप्त होते - यथा - जसे - दुःखम् - दुःख. ॥ ३ ॥
बंधूंनो, जसे कोणताही प्रयत्‍न न करता दैवामुळे दु:ख भोगावे लागते लागते, त्याचप्रमाणे इंद्रियांचे सुख, जीव कोणत्याही योनीत असला, तरी त्याला मिळतेच. (३)


तत्प्रयासो न कर्तव्यो यत आयुर्व्ययः परम् ।
न तथा विन्दते क्षेमं मुकुन्दचरणाम्बुजम् ॥ ४ ॥
तदा संसार भोगाच्या सुखा यत्‍न न ते करा ।
आपैसे लाभते त्याला आयू शक्ती न लाविणे ।
यात गुंते तया नाही श्रीहरी पदलाभ तो ॥४॥

तत्प्रयासः - त्या सुखासाठी प्रयत्न - न कर्तव्यः - करू नये - यतः - ज्या प्रयत्नांमुळे - परं - केवळ - आयुर्व्ययः - आयुष्याचा व्यय - तथा - तशा प्रकारचे - क्षेमं - कल्याण - न विन्दते - प्राप्त होत नाही - (यथा) मुकुंदचरणांबुजं भजन् विन्दते - ज्या प्रकारचे परमेश्वराच्या चरणकमळाचे भजन करणार्‍याला मिळते. ॥ ४ ॥
म्हणून सांसारिक सुखासाठी प्रयत्‍न करण्याची आवश्यकता नाही. कारण असे करणे म्हणजे आयुष्य आणि शक्ती व्यर्थ खर्च करणे होय. शिवाय त्यामुळे त्याला भगवंतांच्या कल्याणस्वरूप चरणकमलांची प्राप्ती होत नाही. (४)


ततो यतेत कुशलः क्षेमाय भवमाश्रितः ।
शरीरं पौरुषं यावत् न विपद्येत पुष्कलम् ॥ ५ ॥
शिरासी भय ते कैक देहाने श्रीहरी मिळे ।
रोगादी ग्रासण्यापूर्वी आपुले हित साधिणे ॥५॥

ततः - त्याकरिता - भयं आश्रितः - भयरूप संसारात सापडलेल्या - कुशलः - विचारी पुरुषाने - यावत् - जोपर्यंत - पौरूषं - पुरुषरूप - शरीरं - शरीर - पुष्कलं (अस्ति) - पुष्ट आहे - न विपद्येत (तावत्) - विपत्तींनी ग्रासले नाही तोपर्यंत - यतेत - यत्न करावा. ॥ ५ ॥
म्हणून ज्याच्या डोक्यावर अनेक प्रकारचे भय स्वार झाले आहे, असे हे शरीर जोपर्यंत मृत्यूच्या मुखात जात नाही, तोपर्यंतच बुद्धिमान पुरुषाने आपल्या कल्याणासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. (५)


पुंसो वर्षशतं ह्यायुः तदर्धं चाजितात्मनः ।
निष्फलं यदसौ रात्र्यां शेतेऽन्धं प्रापितस्तमः ॥ ६ ॥
शतायू सगळी त्यात अर्धी रात्रीत जातसे ।
अज्ञानग्रस्त होवोनी झोपती सर्वतीत की ॥६॥

हि - खरोखर - अजितात्मनः च पुंसः आयुः - आणि ज्याने मन जिंकिले नाही अशा पुरुषाचे आयुष्य - वर्षशतं (अस्ति) - शंभर वर्षे होय - तदर्धं - त्यातील अर्धे - निष्फलं (अस्ति) - फुकट जाते - यत् - कारण - असौ - हा - अंधं - भयंकर - तमः - अज्ञानात - प्रापितः - पडलेला - रात्र्यां - रात्री - शेते - निजतो. ॥ ६ ॥
मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षांचे आहे. ज्याने आपल्या इंद्रियांना वश केले नाही, त्याचे अर्धे आयुष्य व्यर्थ निघून जाते; कारण तो रात्रीच्या वेळी गाढ अज्ञानाने ग्रस्त होऊन झोपलेला असतो. (६)


मुग्धस्य बाल्ये कौमारे क्रीडतो याति विंशतिः ।
जरया ग्रस्तदेहस्य यात्यकल्पस्य विंशतिः ॥ ७ ॥
खेळात वीस ते जाती जरा ती शेवटी विसीं ।
न तदा राहते शक्ती सत्संग नच तो घडे ॥७॥

बाल्ये - बाल्यावस्थेत - कौ‌मारे - आड वयात - क्रीडतः - खेळणार्‍या - मुग्धस्य - अविवेकी मनुष्याची - विंशतिः - विशी - याति - निघून जाते - जरया - म्हातारपणाने - ग्रस्त देहस्य अकल्पस्य - शरीर ग्रासले आहे अशा असमर्थ स्थितीत त्याची - विंशतिः - विशी - याति - निघून जाते. ॥ ७ ॥
बालपणी त्याला ज्ञान नसते. कुमार-अवस्था खेळण्यात जाते, अशा स्थितीत वीस वर्षे निघून जातात. जेव्हा म्हातारपण शरीराला ग्रासते, तेव्हा शेवटच्या वीस वर्षांत काही करण्याची अंगात शक्ती उरत नाही. (७)


दुरापूरेण कामेन मोहेन च बलीयसा ।
शेषं गृहेषु सक्तस्य प्रमत्तस्यापयाति हि ॥ ८ ॥
आयू जी राहते थोडी आकांक्षा तीत श्रेष्ठ त्या ।
वाढती मोहही वाढे कर्तव्यज्ञान राहिना ।
अशीही उरली थोडी आयुही संपते तदा ॥८॥

गृहेषु - गृहकृत्यात - सक्तस्य - आसक्त झालेल्या - प्रमत्तस्य - उन्मत्त अशा - पुरुषस्य - पुरुषाचे - शेषं - बाकीचे आयुष्य - दूरापूरेण - दुःखाने पूर्ण होणार्‍या - कामेन - कामवासनेने - च - आणि - बलीयसा - अत्यंत बलिष्ठ अशा - मोहेन - मोहबंधनाने - अपयाति हि - खरोखर संपून जाते. ॥ ८ ॥
कधीही पूर्ण न होणार्‍या मोठ-मोठ्या इच्छा आणि जबरदस्त मोह यांमध्ये घरा-दाराची आसक्ती असलेल्या बेसावध जीवाचे उरलेसुरले आयुष्यही निघून जाते. (८)


को गृहेषु पुमान्सक्तं आत्मानं अजितेन्द्रियः ।
स्नेहपाशैर्दृढैर्बद्धं उत्सहेत विमोचितुम् ॥ ९ ॥
कोण तो दैत्यबाळांनो इंद्रिया नच जिंकुनी ।
फसता मोह मायेत आपणा मुक्ति मेळवी ॥९॥

कः - कोणता - अजितेंद्रियः - इंद्रिये न जिंकलेला - पुमान् - पुरुष - गृहेषु सक्तं - गृहकृत्यात आसक्त झालेल्या - दृढैः स्नेहपाशैः बद्धं - बळकट स्नेहपाशांनी जखडून गेलेल्या - आत्मानं - स्वतःला - विमोचितुं - सोडविण्यास - उत्सहेत - समर्थ होईल. ॥ ९ ॥
ज्याला इंद्रिये वश नाहीत, असा कोणता पुरुष घरा-दारात आसक्त राहून माया-ममतेच्या मजबूत पाशात अडकलेल्या स्वत:ला सोडवू शकेल ? (९)


को न्वर्थतृष्णां विसृजेत् प्राणेभ्योऽपि य ईप्सितः ।
यं क्रीणात्यसुभिः प्रेष्ठैः तस्करः सेवको वणिक् ॥ १० ॥
प्राणाची बाजि लावोनि व्यापारी धन मेळिती ।
प्राणाहून अशी प्रीय तृष्णा कोण त्यजील ती ॥१०॥

कः - कोणता मनुष्य - नु - निश्चयेकरून - अर्थतृष्णां - द्रव्याच्या इच्छेला - विसृजेत् - सोडील - यः - जो अर्थ - प्राणेभ्यः अपिः - प्राणांहून सुद्धा - ईप्सितः (अस्ति) - इष्ट आहे - यं (च) - आणि ज्या द्रव्याला - तस्कर - चोर - सेवकः - चाकर - वणिक् च - आणि व्यापारी - प्रेष्ठैः असुभिः - अत्यंत प्रिय अशा प्राणांनी - क्रीणाति - विकत घेतो. ॥ १० ॥
ज्याचा चोर, सेवक तसेच व्यापारी आपल्या अत्यंत प्रिय अशा प्राणांची बाजी लावून संग्रह करतात आणि म्हणून जे त्यांना प्राणांपेक्षाही अधिक हवेसे वाटते, त्या धनाचा लोभ कोणाला सोडवेल ? (१०)



कथं प्रियाया अनुकम्पितायाः
     सङ्‌गं रहस्यं रुचिरांश्च मन्त्रान् ।
सुहृत्सु तत्स्नेहसितः शिशूनां
     कलाक्षराणामनुरक्तचित्तः ॥ ११ ॥
पुत्रान् स्मरंस्ता दुहितॄर्हृदय्या
     भ्रातॄन् स्वसॄर्वा पितरौ च दीनौ ।
गृहान् मनोज्ञोः उपरिच्छदांश्च
     वृत्तीश्च कुल्याः पशुभृत्यवर्गान् ॥ १२ ॥
त्यजेत कोशस्कृदिवेहमानः
     कर्माणि लोभादवितृप्तकामः ।
औपस्थ्यजैह्वं बहुमन्यमानः
     कथं विरज्येत दुरन्तमोहः ॥ १३ ॥
(इंद्रवज्रा)
एकांति स्त्रीच्या मधु बोलण्याने
    ओवाळुनी जो आपणास टाकी ।
जो गुंतला त्या स्वजनात नित्य
    पशू शिशूंच्या नित प्रेमपाशी ।
बोलात लुब्धे तयि बोबड्या त्या
    अशा नरा ना कुणि सोडवी तो ॥११॥
जो सासुरी पुत्रि नि पुत्र बंधू
    बहीण नी दीनच मातृ-पितृ
घरादिकांच्या रचिण्यास चिंती
    ये कोण त्याला भवि सोडण्याला ॥१२॥
जो श्रेष्ठ मानी विषयी सुखाला
    त्याच्या न इच्छा कधि पूर्ण होती ।
कोषात गुंते जयि कीट तैसा
    विरक्त त्या कैं नच मुक्ति लाभे ॥१३॥

सुहृत्सु - मित्रांच्या ठिकाणी - स्नेहसितः - स्नेहाने बद्ध झालेला - च - आणि - कलाक्षरांणा - बोबडे भाषण करणार्‍या - शिशूनां - बालकावर - अनुरक्तचित्तः - ज्यांचे मन आसक्त झाले आहे असा - पुत्रान् - पुत्रांना - ताः हृदय्याः दुहितृः - त्या हृदयंगम कन्यांना - भ्रातृन् - भावांना - वा - किंवा - स्वसृन् - बहिणींना - च - आणि - दीनौ पितरौ - दीन आईबापांना - च - आणि - मनोज्ञोरुपरिच्छदान् - आवडती पुष्कळ साहित्ये ज्यात आहेत अशा - गृहान् - घरांना - कुल्याः - कुलपरंपरागत अशा - वृत्तीः - वृत्तींना - च - आणि - पशुभृत्यवर्गान् - पशु व सेवकवर्ग यांना - स्मरन् - स्मरण करणारा - कोशस्कृत् इव - कोश करणार्‍या किडयाप्रमाणे - कर्माणि - अनेक कर्मे - ईहमानः - करणारा - लोभात् - लोभाने - अवितृप्तकामः - ज्याची इच्छा तृप्त झाली नाही असा - औपस्थ्यजैह्‌व्यं - उपस्थ व जिव्हा यापासून होणार्‍या सुखांना - बहु - उत्तम - मन्यमानः - मानणारा असा - दुरंतमोहः - ज्याचा मोह जाण्यास कठीण आहे असा मनुष्य - अनुकंपितायाः - जिने आपल्यावर प्रेम केले आहे अशा - प्रियायाः - पत्नीच्या - रहस्यं - एकांतांतील - संगं - संगाला - च - आणि - रुचिरान् - गोड गोड अशा - मंत्रान् - एकांतातील भाषणांना - कथं - कसा - त्यजेत - सोडील - कथं - कसा - विरज्येत - विरक्त होईल. ॥ ११-१३ ॥
जो आपल्या प्रेमळ पत्‍नीशी एकांतात सहवास, तिच्या प्रेमळ गोष्टी आणि गोड सल्ल्याला भुलला, भाऊबंद आणि मित्रांच्या स्नेहपाशात बांधला गेला आणि लहान बोबड्या मुलांच्या बोबड्या बोलण्यात रमला तो हे सर्व कसे सोडू शकेल ? (११) जो आपापल्या सासरी गेलेल्या प्रिय कन्या, मुले, भाऊ-बहिणी, आणि असहाय्य माता-पिता, अत्यंत सुंदर सुंदर बहुमूल्य सामग्रींनी सजविलेली घरे, उपजीविकेची वंशपरंपरागत साधने, तसेच गुरेढोरे आणि सेवकांचे नेहमी स्मरण करण्यात रमलेला जीव त्यांना कसा सोडू शकेल ? (१२) जो जननेंद्रिय आणि रसनेंद्रिय यांपासून मिळणार्‍या सुखांनाच सर्वस्व मानून बसला आहे, त्याच्या भोगवासना कधी तृप्त होत नाहीत, जो लोभाने कर्मेच कर्मे करता करता रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वत:ला बंधनात अडकवून घेत आहे आणि ज्याच्या मोहाला कोणतीही सीमा नाही, तो त्यांच्यापासून कसा विरक्त होऊ शकेल आणि त्यांचा त्याग करील ? (१३)


कुटुम्बपोषाय वियन् निजायुः
     न बुध्यतेऽर्थं विहतं प्रमत्तः ।
सर्वत्र तापत्रयदुःखितात्मा
     निर्विद्यते न स्वकुटुम्बरामः ॥ १४ ॥
वित्तेषु नित्याभिनिविष्टचेता
     विद्वांश्च दोषं परवित्तहर्तुः ।
प्रेत्येह चाथाप्यजितेन्द्रियस्तद्
     अशान्तकामो हरते कुटुम्बी ॥ १५ ॥
कुटुंब माझे स्मरता मनासी
    त्या पोषणा आयुहि वेचितो तो ।
प्रमादिया जाळिति ते त्रिताप
    वैराग्य ना तो किति वंचना ही ॥१४॥
कुटुंबमोही बुडता धनाची
    चिंता तयाच्या हृदया सतावे ।
चोरिस दंडो जरि जाणितो तो
    त्या लालसेने करितोच चोरी ॥१५॥

प्रमत्तः - उन्मत्त पुरुष - कुटुंबपोषाय - कुटुंबाचे पोषण करण्याकरिता - वियत् - क्षीण होणार्‍या - निजायुः - स्वतःच्या आयुष्याला - विहतं - नष्ट होत असलेल्या - अर्थं - पुरुषार्थाला - न बुद्‌ध्यते - जाणत नाही - स्वकुटुंबरामः - आपल्या कुटुंबात रममाण झालेला - सर्वत्र - सर्वस्वी - तापत्रयदुःखितात्मा - त्रिविध तापाच्यायोगे ज्याचे मन दुःखित झाले आहे असा - न विरज्यते - विरक्त होत नाही. ॥ १४ ॥ वित्तेषु - द्रव्याच्या ठिकाणी - नित्याभिनिविष्टचेताः - ज्याचे चित्त नित्य गुंतले आहे असा मनुष्य - परवित्तहर्तुः - दुसर्‍याचे द्रव्य हरण करणार्‍याचा - इह - येथील - च - आणि - प्रेत्य - परलोकीचा - दोषं - अपराध - विद्वान् (अस्ति) - जाणत असतो - अथ अपि - तरी सुद्धा - अजितेंद्रियः - इंद्रिये न जिंकलेला - च - आणि - अशान्तकामः - इच्छा तृप्त न झालेला - कुटुंबी - कुटुंबवान पुरुष - तत् - ते दुसर्‍याचे द्रव्य - हरते - हरण करितो. ॥ १५ ॥
हे माझे कुटुंब आहे, या भावनेत तो इतका रममाण होतो की, त्यांचे पालन-पोषण करण्यासाठी आपले अमूल्य आयुष्य वाया घालवितो आणि आपल्या जीवनाचा खरा उद्देश सोडून दिल्याचे त्या वेड्याला भान राहत नाही. शिवाय या कामांमुळे त्याला सर्वत्र त्रिविध ताप जाळीत असतात. असे असूनही त्याला वैराग्य उत्पन्न होत नाही. कुटुंबाची काळजी वाहणार्‍या त्याचे मन धनाच्या चिंतनात नेहमी गढलेले असते. आणि दुसर्‍यांचे धन चोरण्यात असणार्‍या लौकिक-पारलौकिक दोषांची जाणीव असूनही आपल्या इच्छा काबूत न ठेवल्याकारणाने इंद्रियभोगांच्या लालसेने तो चोर्‍याही करू लागतो. (१४-१५)


विद्वानपीत्थं दनुजाः कुटुम्बं
     पुष्णन् स्वलोकाय न कल्पते वै ।
यः स्वीयपारक्यविभिन्नभावः
     तमः प्रपद्येत यथा विमूढः ॥ १६ ॥
विद्वान तोही भरिता कुटुंबा
    न प्राप्ति होते हरिच्या रूपाची ।
येणेचि होतो पर-आप भाव
    तमी जिवाची गति त्यास लाभे ॥१६॥

दनुजाः - दैत्यहो - इत्थं - याप्रमाणे - विद्वान् अपि - ज्ञानी पुरुष सुद्धा - कुटुंबं - कुटुंबाला - पुष्णन् - पोषणारा - स्वलोकाय - आत्मविचाराकरिता - न कल्पते - समर्थ होत नाही - यथा - तसा - विमूढः - अत्यंत अज्ञानी - यः - जो अज्ञानी - स्वीयपारक्यविभिन्नभावः - आपले व दुसर्‍यांचे असा भेदभाव उत्पन्न झाला आहे ज्यामध्ये असा - तमः - अंधनरकाला प्राप्त होतो. ॥ १६ ॥
बंधूंनो, अशा प्रकारे जो आपल्या कुटुंबियांच्या पालन-पोषणातच व्यग्र असतो, तो विद्वान असला तरी त्याला भगवत्प्राप्ती होऊ शकत नाही. कारण आपला-परका हा भेद त्याचे ठिकाणी राहिल्याने त्यालासुद्धा अज्ञानी लोकांप्रमाणेच तामसी गती प्राप्त होते. (१६)


यतो न कश्चित् क्व च कुत्रचिद् वा
     दीनः स्वमात्मानमलं समर्थः ।
विमोचितुं कामदृशां विहार
     क्रीडामृगो यन्निगडो विसर्गः ॥ १७ ॥
जो कामिनीची मृगयाचि झाला
    संतान बेड्या पडता करात ।
कोणी कसाही कुठलाहि होवो
    उद्धार त्याचा मग होय कैसा ॥१७॥

यतः - कारण - अलं - सर्व बाजूंनी - दीनः - दीन झालेला पुरुष - यन्निगडः - जिच्या बंधनात सापडल्यामुळे - विसर्गः - पुत्रपौत्रादि संतति होते अशा - कामदृशां - कामवासना आहे डोळ्यांत ज्यांच्या अशा त्या स्त्रियांचा - विहारक्रीडामृगः - खेळण्यासाठी पाळलेला पशु असा - कश्चित् - कोणीही - क्वच - कोठेही - वा - अथवा - कुत्रचित् - कधीही - स्वं - स्वतः - आत्मानं - आपल्याला - विमोचितुं - मुक्त करण्यास - न समर्थः - समर्थ होत नाही. ॥ १७ ॥
जो स्त्रियांच्या मनोरंजनाचे साधन होऊन तिचे खेळणे होऊन राहिला आहे आणि ज्याने आपल्या पायात संतानरूपी बेडी अडकवून घेतली आहे, तो बिचारा कोणी का असेना व कोठे का असेना, कोणत्याही प्रकारे आपला उद्धार करून घेऊ शकत नाही. (१७)


ततो विदूरात् परिहृत्य दैत्या
     दैत्येषु सङ्‌गं विषयात्मकेषु ।
उपेत नारायणमादिदेवं
     स मुक्तसङ्‌गैः इषितोऽपवर्गः ॥ १८ ॥
म्हणोनि बंधो त्यजिणेच संग
    या दैत्यकूळी हरि तो भजावा ।
प्रपंचि आशा जयि सोडियेली
    तो संत त्याची गति धन्य होते ॥१८॥

ततः - याकरिता - दैत्याः - हे दैत्य हो - विषयात्मकेषु - विषयलंपट अशा - दैत्येषु - दैत्यांच्या - संगं - संगतीला - विदुरात् - अगदी दुरून - परिहृत्य - टाळून - आदिदेवं - सर्वांचा आदिभूत अशा - नारायणं - नारायणाला - उपेत - शरण जा - सः - तोच - मुक्तसंगैः - सर्वसंग सोडिलेल्या पुरुषांनी - अपवर्गः - मोक्ष - ईषितः - मानिला आहे. ॥ १८ ॥
म्हणून बंधूंनो ! विषयासक्त दैत्यांच्या संगतीपासून तुम्ही लांब रहा आणि आदिदेव भगवान नारायणांना शरण जा. कारण ज्यांनी संसाराची आसक्ती सोडली आहे, त्या महात्म्यांचा तोच परम मोक्ष आहे. (१८)


(अनुष्टुप्)
न ह्यच्युतं प्रीणयतो बह्वायासोऽसुरात्मजाः ।
आत्मत्वात् सर्वभूतानां सिद्धत्वादिह सर्वतः ॥ १९ ॥
(अनुष्टुप्‌)
मित्रांनो बहु ना कष्ट हरीच्या प्राप्तिसी तसे ।
सर्वात्मा सर्व रूपात स्वयंसिद्धचि वस्तु तो ॥१९॥

हि - म्हणून - असुरात्मजाः - दैत्यबालकहो - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांचा - आत्मत्वात् - आत्मा असल्यामुळे - इह - येथे - सर्वतः - सर्वत्र - सिद्धत्वात् - सिद्ध असल्याकारणाने - अच्युतं - परमेश्वराला - प्रीणयतः - संतुष्ट करण्याला - बव्ह यासः - मोठा श्रम - न अस्ति - पडत नाही. ॥ १९ ॥
दैत्यपुत्रांनो, भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी फार प्रयत्‍न करावे लागत नाहीत. कारण ते समस्त प्राण्यांचे आत्मा आहेत आणि सगळीकडे सत्तेच्या रूपात स्वयंसिद्ध वस्तू आहेत. (१९)


परावरेषु भूतेषु ब्रह्मान्तस्थावरादिषु ।
भौतिकेषु विकारेषु भूतेष्वथ महत्सु च ॥ २० ॥
गुणेषु गुणसाम्ये च गुणव्यतिकरे तथा ।
एक एव परो ह्यात्मा भगवान् ईश्वरोऽव्ययः ॥ २१ ॥
ब्रह्मादी सर्व प्राण्यात तृणीही तोच की वसे ।
वस्तूत पंचभूतात सूक्ष्म तन्मात्र तत्विही ॥२०॥
त्रेगुणी गुणसाम्यात प्रकृतीच्या मधे तसा ।
विराजे हरि तो एक अविनाशी परेश तो ॥२१॥

परावरेषु - लहानमोठया - ब्रह्मान्तस्थावरादिषु - स्थावरांपासून ब्रह्मदेवापर्यंत - भूतेषु - जीवांमध्ये - अथ - तसेच - भौतिकेषु विकारेषु - पृथ्वीसंबंधी घटादि विकारांमध्ये - च - आणि - महत्सु - मोठया अशा - भूतेषु - आकाशादि पंचमहाभूतांच्या ठिकाणी. ॥ २० ॥ गुणेषु - गुणांमध्ये - गुणसाम्ये - गुणांच्या साम्यावस्थेत - तथा - त्याप्रमाणेच - गुणव्यतिकरे - गुणांच्या विषमावस्थांचे परिणाम जे महत्तत्त्वादि त्यामध्ये - एकः एव हि - एकच खरोखर - परः - श्रेष्ठ - आत्मा - आत्मा - अव्ययः - नाशरहित - च - आणि - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - ईश्वरः (अस्ति) - ईश्वर वसत आहे. ॥ २१ ॥
ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत लहान-मोठे सर्व प्राणी, पंचमहाभूतांनी बनलेल्या वस्तू, पंचमहाभूते, सूक्ष्म तन्मात्रा, महत्तत्त्व, तिन्ही गुण आणि गुणांची साम्यावस्था असलेली प्रकृती या सर्वांमध्ये एकच अविनाशी परमात्मा विराजमान आहे. (२०-२१)


प्रत्यगात्मस्वरूपेण दृश्यरूपेण च स्वयम् ।
व्याप्यव्यापकनिर्देश्यो हि, अनिर्देश्योऽविकल्पितः ॥ २२ ॥
अंतर्यामी दिसे द्रष्टा दृश्याने जगताचिया ।
अविकल्प असोनीया व्यापाने वर्णिती तया ॥२२॥

स्वयं - स्वतः - प्रत्यगात्मस्वरूपेण - अंतर्यामीस्वरूपाने - च - आणि - दृश्यरूपेण - दृश्य जे भोग्य शरीर त्या रूपाने - व्याप्यव्यापकनिर्देश्यः हि - व्याप्य व व्यापक या नावांनी दाखविला जाणारा असताहि - अनिर्देश्यः - अमुक असा न दाखविला जाणारा - अविकल्पितः - ज्याची कल्पना करता येत नाही असा. ॥ २२ ॥
तेच अंतर्यामी द्रष्ट्याच्या रूपात आहेत आणि तेच दृश्य जगाच्या रूपामध्येसुद्धा आहेत. सर्वथा अनिर्वचनीय आणि विकल्परहित असूनही त्यांना द्रष्टा आणि दृश्य, व्याप्य आणि व्यापक मानले जाते. (२२)


केवलानुभवानन्द स्वरूपः परमेश्वरः ।
माययान्तर्हितैश्वर्य ईयते गुणसर्गया ॥ २३ ॥
आनंदरूप जाणावा असा तो एकटा हरी ।
मायेने निर्मितो सृष्टी त्यात ऐश्वर्य लोपले ।
निवृत्ती मिळता तीत तयाचे दर्शनो घडे ॥२३॥

केवलानुभावानंदस्वरूपः - केवळ अनुभवात्मक आनंद हेच ज्याचे स्वरूप आहे असा - परमेश्वरः - परमेश्वर - गुणसर्गया - जिचे गुणात्मक सृष्टि हे कार्य आहे अशा - मायया - मायेने - अंतर्हितैश्वर्यः - ज्याचे स्वरूप आच्छादिले आहे असा - ईयते - जाणिला जातो. ॥ २३ ॥
ते केवलस्वरूप, अनुभवस्वरूप, आनंदस्वरूप, एकमात्र परमेश्वरच आहेत. गुणमय सृष्टी निर्माण करणार्‍या मायेमुळे त्यांचे स्वरूप लपून राहिले आहे. ती दूर होताच त्यांचे दर्शन होते. (२३)


तस्मात्सर्वेषु भूतेषु दयां कुरुत सौहृदम् ।
आसुरं भावमुन्मुच्य यया तुष्यत्यधोक्षजः ॥ २४ ॥
असुरी धन त्यागावे जीवांना करणे दया ।
प्रेमाने हित ते साधा भगवान्‌ पावतो तये ॥२४॥

तस्मात् - याकरिता - आसुरं भावं - राक्षसी स्वभाव - उन्मुच्य - सोडून - सर्वेषु भूतेषु - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी - दयां - दया - सौहृदं - प्रेम - कुरुत - करा - यया - ज्या दयेच्या योगाने - अधोक्षजः - परमेश्वर - तुष्यति - संतुष्ट होतो. ॥ २४ ॥
म्हणून तुम्ही आपला आसुरी स्वभाव सोडून सर्व प्राण्यांवर दया करा. प्रेमाने त्यांचे भले करा. यानेच भगवंत प्रसन्न होतील. (२४)


तुष्टे च तत्र किमलभ्यमनन्त आद्ये
     किं तैर्गुणव्यतिकरादिह ये स्वसिद्धाः ।
धर्मादयः किमगुणेन च काङ्‌क्षितेन
     सारंजुषां चरणयोरुपगायतां नः ॥ २५ ॥
(वसंततिलका)
तो पावता हरितदा न उणे कदापी
    ते धर्म अर्थ मिळती नच कष्ट घेता ।
जो सेवितो हरिपदा अन कीर्ति गातो
    तो मोक्षही मग तया मुळि तुच्छ वाटे ॥२५॥

तत्र आद्ये अनंते तुष्टे - तो आदि पुरुष परमेश्वर संतुष्ट झाला असता - अलभ्यं - मिळण्यास अशक्य असे - किं (अस्ति) - काय आहे - (ततः) च - आणि मग - गुणव्यतिकरात् - गुणांचा परिणाम करणारे जे दैव त्याच्या योगे - इह - ह्या लोकी - ये - जे - स्वसिद्धाः - आपोआप सिद्ध होणारे - धर्मादयः - धर्म, अर्थ व काम - तैः - त्यांच्याशी - किं (कर्तव्य अस्ति) - काय करावयाचे आहे - च - आणि - चरणयोः - परमेश्वराच्या चरणकमलांच्या - उपगायतां - गायन करणार्‍या - सारं जुषां - त्यातील सार ग्रहण करणार्‍या - नः - आम्हाला - अगुणेन कांक्षितेन - मोक्षाची इच्छा धरून - किं (प्रयोजनम्) - काय करावयाचे आहे. ॥ २५ ॥
आदिनारायण अनंत भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही, अशी कोणती वस्तू आहे ? लोक आणि परलोकासाठी ज्या धर्म, अर्थ इत्यादींची आवश्यकता सांगितली जाते, ते तर गुणांच्या परिणामानुसार प्रयत्‍न न करताही आपोआप मिळणारे आहेत. आपण जर श्रीभगवंतांच्या चरणामृताचे सेवन करू लागलो आणि त्यांच्या नाम-गुणांचे कीर्तन करू लागलो, तर आपल्याला मोक्षाची तरी काय आवश्यकता आहे ? (२५)


धर्मार्थकाम इति योऽभिहितस्त्रिवर्ग
     ईक्षा त्रयी नयदमौ विविधा च वार्ता ।
मन्ये तदेतदखिलं निगमस्य सत्यं
     स्वात्मार्पणं स्वसुहृदः परमस्य पुंसः ॥ २६ ॥
धर्मार्थ काम जरि थोर पुराण गाती
    ती दंडनीति जगणे प्रतिपाद्द वेदी ।
तो अर्पिता हरिपदा मग सार्थको नी
    नाही तसे जर घडे मग ते निरर्थ ॥२६॥

धर्मार्थकामः - धर्म, अर्थ व काम - इति - असा - यः - जो - त्रिवर्गः - तीन प्रकारचा पुरुषार्थ - अभिहितः - वर्णिला आहे - ईक्षा - आत्मविद्या - त्रयी - कर्मविद्या - नयदमौ - तर्क व दंडनिती - विविधा - अनेक प्रकारच्या - वार्ता - उपजीविकेची साधने - तत् - ते - एतत् - हे - अखिलं - सर्व - निगमस्य (प्रतिपाद्यं) मन्ये - वेदांचा प्रतिपादण्याचा विषय असे मी मानतो - सत्यं (तु) - पण खरा प्रकार - स्वसुहृदः - अंतर्यामी अशा - परमस्य - श्रेष्ठ - पुंसः - पुरुष जो परमेश्वर त्यास - स्वात्मार्पणं एव - स्वतःचा आत्मा अर्पण करणे हेच होय. ॥ २६ ॥
तसे पाहिले तर धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ आत्मविद्या, कर्मकांड, न्याय, दंडनीती आणि उपजीविकेची विविध साधने हे सर्व वेदांचे प्रतिपाद्य विषय आहेत. परंतु ते जर आपले परम हित करणार्‍या श्रीहरींना समर्पण होण्यात साहाय्यक असतील, तरच मी ते सार्थक मानतो. (२६)


ज्ञानं तदेतदमलं दुरवापमाह
     नारायणो नरसखः किल नारदाय ।
एकान्तिनां भगवतः तदकिञ्चनानां
     पादारविन्द रजसाऽऽप्लुतदेहिनां स्यात् ॥ २७ ॥
हे शुद्ध ज्ञान वदलो अति दुर्लभो हे
    नारायणे नर नि जे वदले कधीचे ।
श्री नारदास, मिळते जयिपाय धूळ
    झालेच स्नान समजा निजभक्त प्रीया ॥२७॥

नरसखः - नराचा सखा असा - नारायणः - नारायण - नारदाय - नारदाला - तत् - ते - एतत् - हे - दुरवापं - दुर्मिळ - अमलं - निर्मळ - ज्ञानं - ज्ञान - आह - सांगता झाला - तत् - ते ज्ञान - भगवतः - परमेश्वराच्या - पादारविंदरजसा - चरणकमलाच्या धुळीने - आप्लुतदेहिनां - ज्यांची शरीरे व्यापिली आहेत अशा - एकान्तिनां - एकनिष्ठ भक्ति करणार्‍या - अकिंचनानां - सर्वसंगपरित्याग केलेल्या पुरुषांना - किल - निश्चयेकरून - स्यात् - प्राप्त होईल. ॥ २७ ॥
हे निर्मल ज्ञान अतिशय दुर्लभ आहे. नर-नारायणांनी नारदांना याचा उपदेश केला होता आणि हे ज्ञान भगवंतांच्या अनन्य प्रेमी आणि निष्काम भक्तांच्या चरणकमलांच्या धुळीने न्हालेल्या माणसांनाच प्राप्त होते. (२७)


(अनुष्टुप्)
श्रुतं एतन्मया पूर्वं ज्ञानं विज्ञानसंयुतम् ।
धर्मं भागवतं शुद्धं नारदाद् देवदर्शनात् ॥ २८ ॥
(अनुष्टुप्‌)
विशुद्ध ज्ञान विज्ञान भागवद्‌धर्म हा असा ।
ऐकिला पूर्वि मी जेंव्हा घडवी कृष्णदर्शन ॥२८॥

मया - माझ्याकडून - पूर्वं - पूर्वी - देवदर्शनात् - ज्याला निरंतर परमेश्वराचे दर्शन होते अशा - नारदात् - नारदापासून - एतत् - हे - भागवतं - परमेश्वरासंबंधी - धर्म - ज्यात धर्म सांगितले आहेत असे - शुद्धं - पवित्र - विज्ञानसंयुतं - अनुभाविक ज्ञानासह - ज्ञानं - ज्ञान - श्रुतं - ऐकिले गेले. ॥ २८ ॥
हे विज्ञानासहित ज्ञान विशुद्ध भागवतधर्म होय. भगवंतांचे दर्शन करून देणार्‍या देवर्षी नारदांच्या तोंडून हे मी पूर्वी ऐकले होते. (२८)


श्रीदैत्यपुत्रा ऊचुः -
प्रह्राद त्वं वयं चापि नर्तेऽन्यं विद्महे गुरुम् ।
एताभ्यां गुरुपुत्राभ्यां बालानामपि हीश्वरौ ॥ २९ ॥
दैत्यपुत्रांनी विचारले -
प्रल्हादा आपुले दोघे हे गुरू शुक्रपुत्रची ।
न कोणी पाहिला अन्य बोधिती सगळ्यासि हे ॥२९॥

प्रल्हाद - बा प्रल्हादा - त्वं - तू - च - आणि - वयं - आम्ही - अपि - सुद्धा - एताभ्यां - ह्या - गुरुपुत्राभ्यां - गुरुपुत्र शंड व अमर्क ह्यांच्या - ऋते - शिवाय - अन्यं - दुसर्‍या - गुरुं - गुरुला - न विद्महे - जाणीत नाही - हि - कारण - बालानां अपि - अगदी आपल्या लहानपणापासूनचे सुद्धा - (एतौ एव) ईश्वरौ - हेच दोघे गुरु होत. ॥ २९ ॥
दैत्यपुत्र म्हणाले – प्रल्हादा, या दोन गुरुपुत्रांशिवाय आणखी कोणत्याही गुरूंना तू किंवा आम्ही जाणत नाही. हेच आपणा सर्व मुलांना शिकविणारे आहेत. (२९)


बालस्यान्तःपुरस्थस्य महत्सङ्‌गो दुरन्वयः ।
छिन्धि नः संशयं सौम्य स्यात् चेत् विश्रम्भकारणम् ॥ ३० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे प्रह्रादानुचरिते षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
प्रल्हादा आणखी तूही सान माताश्रयात तू ।
तुझी नी नारदाची त्या भेट खोटीच वाटते ।
विश्वासा हे असे सांग मिटवी किंतु आमुचा ॥३०॥
। इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर साहवा अध्याय हा ॥७॥६॥
हरिः ॐ तत्सत्‌ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

सौ‌म्य - बा मित्रा - अंतःपुरस्थस्य - अंतःपुरात राहणार्‍या - बालस्य - बालकाला - महत्संगः - सत्पुरुषांचा संग - दुरन्वयः (अस्ति) - दुर्घट होय - (नः) विश्रंभकारणं - आम्हाला विश्वास ठेवण्यासारखे कारण - स्यात् चेत् - जर असेल तर - नः - आमच्या - संशयं - संशयाला - छिंधि - दूर कर. ॥ ३० ॥
तू अजून लहान असून राजमहालात आईजवळ राहतोस. म्हणून तू नारदांना भेटलास हे अशक्य वाटते. यावर आमचा विश्वास बसेल अशी एखादी गोष्ट असेल, तर ती सांगून आमच्या शंकेचे निरसन कर. (३०)


स्कंध सातवा - अध्याय सहावा समाप्त

GO TOP